Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दारू दुकानांविरोधात असंतोष

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि प्रार्थनास्थळांच्या परिसरात अंतराचे नियम डावलून सुरू असलेल्या दारू दुकानांविरोधात नागरिकांतून असंतोष वाढत आहे. नागरिकांनी अशा दारू दुकानचालकांविरोधात आवाज उठवणे सुरू केले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील दारू दुकानांचे हवाई अंतर मोजावे, अशी मागणी केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागासह जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अंतराचे नियम धुडकावून शहरात मंदिरे आणि शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारू दुकाने सुरू असल्याची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दाखवली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि दारू विक्रेते यांच्यातील संगनमतानेच नियमांना बगल देऊन दारू दुकाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरातील उमा टॉकीज चौकापासून जवळच असलेल्या ओढ्यावरील गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेले दारू दुकान, हॉकी स्टेडियम, धैर्यप्रसाद हॉल, कसबा बावड्यातील रेणुका मंदिर, बिंदू चौकातील मशिदीच्या बाजूला शाळा आणि मंदिरांच्या आसपास दारू दुकाने सुरू आहेत. ही दुकाने शाळा आणि मंदिरांपासून ३० ते ५० मीटरच्या आत असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र हवाई अंतरापेक्षा सोयीचे वळणाचे रस्ते दाखवून दुकाने नियमात बसवण्याचा प्रयत्न केला आहे. या दुकानांमुळे परिसरातील स्वास्थ्य धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या दुकानांवर कारवाई होत नसल्याने नागरिक संतापले आहेत.

सुप्रिम कोर्टाने महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील एक हजारहून अधिक दुकानांना टाळे लागले आहेत. दुकाने बंद झाल्यानंतर विक्रेत्यांकडून स्थलांतरासाठी मोक्याचा जागा बळकावण्यासाठी नियमांचा सोयीने वापर केला जात आहे. सायबर चौकात नव्याने बांधलेल्या एका इमारतीत नुकतेच दारू दुकान सुरू झाले. या दुकानाविरोधात परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रस्ता ओलांडताच सायबर कॉलेज आहे. समोरच शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस आहे. सतत विद्यार्थांचा वावर या चौकात असतो. त्यामुळे दारूचे दुकान सुरू होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र स्थानिकांचा विरोध डावलून हे दुकान सुरू झाल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला आहे.

शनिवार पेठेतील रोहिडेश्वर मंदिरापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर दारू दुकान सुरू आहे. जवळच एक मशिदही आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत हे दुकान सुरू असते. या दुकानात दारूसोबत सोडा आणि कोल्ड्रींक्सचीही विक्री होते. त्यामुळे परिसरात तळीराम उघड्यावरच मद्यप्राशन करतात. रात्री परिसराचा ओपन बार होतो. दारुच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास यामुळे परिसर नेहमीच अस्वच्छ होतो. विक्रेत्याची राजकीय पार्श्वभूमी असल्याने तो नागरिकांना धमकावतो. पोलिस ठाण्यात तक्रारी केल्यानंतरही पोलिस याकडे दुर्लक्ष करतात, असा नागरिकांचा अनुभव आहे.


हवाई अंतर मोजणीची मागणी

शाळा आणि प्रार्थनास्थळांपासून किमान ७० मीटर अंतराबाहेर दारू दुकानांना परवानगी द्यावी, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र अंतराच्या नियमातून पळवाट काढण्यासाठी दारू दुकानापासून ते शाळांचे अंतर मोजताना वळणाच्या रस्त्यांचा आधार घेतला जातो. प्रार्थनास्थळ आणि दारू दुकान एकमेकांच्या समोर असले तरीही हवाई अंतर मोजले जात नाही. शहरातील सर्व दारू दुकाने आणि त्या परिसरातील शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळांचे हवाई अंतर मोजावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिक आक्रमक होणार

नियम डावलून सुरू असलेल्या दुकानांच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. हॉकी स्टेडियम आणि सायबर चौकातील दारू दुकानांविरोधात जनक्षोभ उसळला आहे. नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस अधिकाऱ्यांकडेही तक्रारी दिल्या आहेत. विरोध डावलून ही दुकाने सुरू असल्याने अखेर नागिरकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. वेळ पडल्यास आक्रमक होऊन दुकाने बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


शिवसेनेचा इशारा

नियम डावलून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या दारू विक्रेत्यांविरोधात शिवसेनाही आक्रमक बनली आहे. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावरील दारू दुकानात सुरू असलेली अवैध विक्री उधळून लावली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानांचे हवाई अंतर मोजून नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करावे, अन्यथा शिवसेना स्टाइलने दारू दुकाने बंद पाडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा समाजाच्या न्यायालयीन कक्षेतील मागण्यांसाठी प्रयत्नशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्ट क्रांतिदिनादिवशी मुंबईत आयोजित केलेल्या सकल मराठा समाजाच्या मोर्चापूर्वी सरकारस्तरावर असलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता केली आहे. न्यायालयीनस्तरावर असलेल्या मागण्यासंबंधी सरकार लढा देत आहे. सरकारपातळीवर ज्या मागण्या प्रलंबित आहेत, त्या त्वरीत मार्गी लावण्यात येतील. त्यामुळे मुंबईतील मोर्चा अत्यंत शांततेने निघेल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पाटील म्हणाले, ‘मुंबई येथे नऊ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी ५७ मोर्चे अत्यंत शांततेत निघाले आहेत. मोर्चाच्या माध्यमातून प्रगल्भ नेतृत्व लाभले असल्याने सर्व मोर्चे शांततेत निघाले. पहिल्या मोर्चापासून सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहेत. सरकारच्या पातळीवरील सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. न्यायालयीन कक्षेतील मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी न्यायालयात लढा सुरू आहे.’

‘प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मराठा समाजाच्यावतीने मुंबई येथे मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चा काढण्यापूर्वी किंवा त्यानंतर सरकारपातळीवर काही प्रलंबित मागण्या आणि त्या सरकारच्या कक्षेतील मागण्या असल्यास त्यांची पूर्तता केली जाईल. न्यायालयीन कक्षेतील मागण्यासाठी मात्र सरकार शेवटपर्यंत लढा देत राहील,’ असा निर्वाळाही पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिद्रीच्या‘ सभासदांची कच्ची यादी प्रसिध्द

$
0
0

कागल

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वाढीव १४ हजार ५६३ सभासदांचा पात्र अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्याने निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कारखान्याच्या कार्यालयात निवडणुकीसाठी पात्र असलेल्या ५७ हजार ८०९ सभासदांची कच्ची यादी सोमवारी प्रसिध्द केली आहे. पात्र-अपात्रचा विषय अनेक महिने रेंगाळत आल्याने या यादीमध्ये आपला समावेश आहे का हे पाहण्यासाठी सभासद कारखाना कार्यस्थळावर धाव घेत आहेत. सभासदांच्या कच्च्या यादीवर १६ ऑगस्ट पर्यंत हरकती घेता येणार असून २८ ऑगस्टपर्यंत हरकतीवर निर्णय घेतला जाणार आहे. तर ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री साखर कारखान्याची मागील पंचवार्षिक निवडणूक २०१० मध्ये ४७ हजार ८३८ पात्र मतदारांनी झाली होती. त्यावेळी वाढीव केलेले चार हजार ३८४ सभासद निवडणुकीपासून वंचित राहिले होते. त्यानंतर के.पी.पाटील यांच्या संचालक मंडळाने पुन्हा १४ हजार ५६३ सभासद केले. त्यावर विरोधी प्रकाश आबिटकर व अन्य मंडळीनी आक्षेप घेतल्याने कारखान्याचे वाढीव सभासद प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. सातत्याने निकालाच्या तारखा वाढत गेल्याने कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत पूर्ण होऊन देखील निवडणूक होऊ शकली नाही. दरम्यान, कारखान्यावर प्रशासक आणण्याची मागणी विरोधी मंडळीनी न्यायालयात केली. त्यानुसार १९ डिसेंबर २०१५ रोजी प्रशासकिय मंडळ कार्यरत झाले.त्यानंतर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

वाढीव सभासदांच्या न्यायालयीन निकालात सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांची छाननी करण्याचा निर्णय दिला. त्यानुसार साखर सह संचालक कार्यालयामार्फत तसेच महसूल विभागामार्फत चार महिने छाननी सुरु होती. नुकतीच छाननी पूर्ण होऊन त्यामध्ये ९ हजार ८२० सभासद अपात्र तर चार हजार ७४३ पात्र झाले. वाढीव १४ हजार ५६३ सभासदांपैकी नेमके कोण पात्र व अपात्र ठरले याची उत्सुकता सभासदांना होती. सोमवारी कारखान्यावर एकूण पात्र सभासदांची यादी जाहीर केल्याने नवीन सभासदात कोणाचे समावेश आहे हे कळणार होते. त्यामुळे सभासदांनी आपल्या नावाचा समावेश आहे का, हे पाहण्यासाठी कारखान्याकडे धाव घेतली.

मागील निवडणुकीत ४७ हजार ८३८ मतदार पात्र होते. त्यामध्ये चार हजार ३८४ जणांची वाढ तसेच वाढीव पात्र ठरलेल्या चार हजार ७४३ असे ५७ हजार ८०९ मतदार पात्र ठरले. त्यांची कच्ची यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), जिल्हाधिकारी कोल्हापूर ,तहसीलदार कागल,सहाय्यक निबंधक सहकारी कागल यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चांगभलं’च्या गजरातजोतिबा नगरप्रदक्षिणा

$
0
0

पन्हाळा

डोंगररांगांतून वाहणारे धुके, मंद वारा, सोबतीला ऊन-पावसाचा खेळ, हिरव्यागार निसर्गाच्या संगतीत गुलालाची उधळण, तोंडी यमाईदेवी, चोपडाईदेवी, काळभैरव, व जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सोमवारी जोतिबा डोंगर येथे नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळा झाला.वीणा, टाळ, मृदंग, ढोल, सनई, तसेच भजन-कीर्तनाच्या तालात प्रदक्षिणेसाठी लाखाच्यावर भाविकांनी हजेरी लावली. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगरप्रदक्षिणा काढली जाते.

जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात. रविवारपासूनच नगरप्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते.

सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाले. अभिषेक व श्रींच्या अलंकारिक पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता चांगभलंचा अखंड जयघोष झाला, त्यानंतर दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली.

सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाले. त्यानंतर भाविकांनी तेथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. साडेअकरा वाजता दिंडी जोतिबा कोल्हापूर मार्गावरील भीमाशंकरजवळ आली. तेथून ती नंदीवन, आंबावन, पानखंड, नागझरी, मंडोपतीत, व्याघराई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरागुळा येथे आली. मुरागुळात झिम्मा फुगडीने रंगत आणली. काहींनी भजनांचे सूर व जोतिबाची भक्तिगीते गायिली. येथे चहा, केळी, शाबूदाणा, राजिगरा लाडूचे वाटप झाले. दिंडी पुन्हा जमनाचीवाडी (दानेवाडी) सरकाळामार्गे गिरोली (ता. पन्हाळा) येथे आली. तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली. येथेच एक दगडावर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. तेथे भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा सोहळा पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील ऐतिहासिक पांडव लेण्यामागे आवंढ्या नागनाथाचे दर्शन घेऊन पुन्हा गायमुख येथे आला. तेथून जोतिबा मंदिरमार्गे पुन्हा श्री मूळमाया यमाई मंदिरात दिंडी आली. प्रदक्षिणा घातल्यानंतर भाविकांना सुंठवडा वाटप झाले. त्यानंतर सायंकाळी नगरप्रदक्षिणेची सांगता झाली.

................

सहज सेवा ट्रस्टतर्फे खिचडी

सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख तलाव येथे भाविकांना शाबू खिचडी, केळी, चहाचे वाटप केले. तसेच जोतिबा डोंगरावर धसडाचे खळे येथे काही शेतकऱ्यांनी चहा वाटप केले. मुरागुळा, गिरोली येथेही चहा, राजिगरा लाडू, खिचडी, केळीचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठराविक डिलर्सना झुकते ‘माप’

$
0
0

प्रकाश कारंडे,कागल

सकाळच्या सत्रात इंधन थंड असल्याने त्याची घनता कमी झालेली असते, याचाच फायदा पेट्रोल कंपन्यांतील काही अधिकारी आणि कंत्राटदार घेत आहेत. ठराविक कंत्राटदार आणि डिलरना थंड इंधन सकाळच्या सत्रात भरून द्यायचे. याच इंधनाची दुपारी वातावरणामुळे घनता वाढल्यानंतर काढून घ्यायचे असा उद्योग सुरू आहे. प्रत्येक डेपोत ठराविक मक्तेदारंना झुकते माप देऊन चांगल्या रस्त्यानेच लांब पल्ल्याचे वितरणाचे काम दिले जाते. रस्त्यात चोरी करण्यासाठी आणि डेपोत शिल्लक राहिलेल्या इंधनाची विल्हेवाट लावण्यासाठीच हे ‘उद्योग’ केले जातात.

टँकरला आतील कप्प्यांसाठी कंपनीची लॉकर सिस्टिम आहे. ही अत्यंत काटेकोर असून याची वारंवार तपासणीही होते. टँकरमालकाकडे ज्या त्या टँकरच्या लॉकरच्या चाव्या आणि कंपनीकडे सर्व टँकरना चालणारी ‘मास्टर की’ असते. चावी हरवली अथवा त्याचा दुरुपयोग झाल्यास फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंद होतो. पेट्रोल पंपाच्या कक्षेच्या बाहेर या चाव्या नेता येत नाहीत. शिवाय चालक आणि वाहक यांनादेखील या चाव्या हाताळण्याची परवानगी नाही. डेपोमध्ये असणारी ‘मास्टर की’ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताब्यात असते. ही चावी काढणे आणि ठेवण्याची वेळेसह नोंद करावी लागते. तरीसुद्धा याची बनावट चावी तयार करून शेकडो टँकर ड्रायव्हर, मालक आणि कंत्राटदार राजरोसपणे चोरी करतात. असा प्रकार करताना पकडल्याने चालक, मालकांवर गुन्हे नोंद होवून कोर्टात खटलेदेखील चालू आहेत. परंतु यावर कंपनीने आजपर्यंत ठोस उपाययोजना केलेली नाही. कंपनीच्या या हलगर्जीपणाचाच फटका पंपमालक आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्राहकाला बसत आहे.

इंधन काढण्याची यंत्रणा प्रत्येक डेपोच्या विभागात टोळ्या-टोळ्यांनी कार्यरत आहे. या टोळ्यांची एवढी दहशत आहे की, हे लोक सर्वांसमक्ष रस्त्यात आडमार्गावर रोज शेकडो टँकरमधून पेट्रोल डिझेलची चोरी करुन काळ्या बाजारात विकत आहेत. याची कंपनी आणि त्या-त्या विभागातील पोलिस खात्याला चांगलीच माहिती आहे. परंतु वर्षातून कधीतरी पंटरांमार्फत धरपकडीचा फार्स केला जातो. यामुळे चोऱ्या करण्याची संस्कृतीच निर्माण झाली आहे. वैधमापन विभागाकडून टॅकरांचे ‘स्टँम्पिंग’ होते. हे करताना यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याचा गैरफायदा घेऊनसुद्धा चोऱ्या केल्या जातात. विशेष म्हणजे सर्व टँकर्सना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यांचे मार्ग निश्चित करून प्रतितास ६० किलोमीटरपेक्षा जास्त वेग वाढल्यास अथवा रस्त्यात टँकर थांबल्यास त्याची माहिती कंपनीला मिळते. त्यावर दंडात्मक कार्यवाहीही होते. असे असताना या सिस्टिमवर मात करुन चोऱ्या होत आहेत. सध्या कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक लॉकर सिस्टिम बसवण्याचा मोठ्या शहरात पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. ही यंत्रणा आल्यास त्याच्यावरही पर्याय असल्याचे यातील तज्ज्ञ छातीठोकपणे सांगतात.

टॅकरमधून पेट्रोल-डिझेल चोरीचे प्रकार

टॅंकरमधून सूक्ष्म पाइपलाइन काढून त्याच टँकरच्या डिझेलच्या पाइपला जोडली जाते आणि ४०० लिटरची चोरी केली जाते.

टँकरमया खाली ‘अलंकी’ नट (बोल्ट) बसवून त्याला दिसून नये, म्हणून ग्रीस आणि पांढरा रंग लावून बंद करतात आणि रस्त्यात थांबवून त्यातून पेट्रोल अथवा डिझेलची चोरी करतात.

पेट्रोल सोडण्याच्या पाइपमध्ये लॉक आणि व्हॉल्व दिसायला एकत्र परंतु प्रत्यक्षात वेगवेगळे जोडता येतात. त्यातून चोरी केली जाते.

टँकरच्या वरच्या झाकणाला कंपनीचे लॉक असते, परंतु त्याच्या दुसऱ्या बाजूची बिजगरी उचकटून टोपन उघडून चोरी केली जाते.

झाकन उघडल्यानंतर अगोदरच त्यात रबराचे (४० ते ५० लिटरचे) फुगे अथवा कॅन आत सोडले जातात. टँकर रिकामा केल्यावर हे फुगे व कॅन तळाला भरलेल्या अवस्थेत रहातात.

टँकर पंपावर खाली झाल्यावर काही इंधन तळाला आणि काही पाइपमध्ये रहाते. त्याचा उंचीवर टँकर तिरका करुन नितळा काढला जातो. यावेळी इंधन शिल्लक राखण्याचे कसब टँकरचालकाकडे असते.

चोरलेले इंधन टँकरमध्ये बरोबर आहे हे दाखवण्यासाठी डुप्ल‌िकेट ‘डीप रॉड’वापरतातच, शिवाय एका बाजूची टायरमधीळ हवा सोडून डीप रॉडवर इंधनाचे मोजमाप दाखविले जाते.

प्रत्येकवेळी वेगवेगळा टँकर आणि महिन्याने फरक लक्षात येत असल्याने पंपमालकाच्या लक्षातच येत नाही.

विमानासारखी सिस्टिम हवी

विमानात इंधन भरताना टँकरवरच मोजमापाचे मशिन बसवले जाते. गेली ६० वर्ष याच कंपन्या ही यंत्रणा देतात. परंतु पंपावर डिपने पेट्रोल मापून घनता, उष्मांक याचा फायदा घेवून पेट्रोल दिले जाते. कंपनीने दिलेले पाच लिटरचे मापदेखील पत्र्याचे आहे. त्याला खालुन आत बाहेर दाबून पेट्रोल कमी जास्त करता येते. परंतु विमानाप्रमाणे मोजून पेट्रोल दिल्यास रस्त्यातही चोऱ्या होणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृसिंहवाडीत नारळी पौर्णिमा उत्साहात

$
0
0

जयसिंगपूर

कन्यागत महापर्वकाळ, चंद्रग्रहण व श्रावण सोमवार अशा दुर्मिळ योगावर आलेली नारळी पौर्णिमा श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी कृष्णा नदीला नारळ अर्पण केला. भाविकांनी श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

नारळी पौर्णिमेनिमित्त पहाटे श्री दत्त मंदिरात काकड आरती व प्रात:कालीन पूजा झाली. सकाळी आठ ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक करण्यात आला. दुपारी तीन ते चार या वेळेत पवमान पंचसुक्त पठण झाले. रात्री उशीरा धूप दीप आरती इंदूकोटी आदी धार्मिक कार्यक्रम झाले. चंद्रग्रहणानिमित्त भाविकांनी कृष्णा नदीपात्रात स्नान केले. श्रीं च्या दर्शनासाठी दत्तदेवस्थानने तीन स्वतंत्र रांगा केल्या होत्या. कृष्णेस नारळ अर्पण करताना भाविकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट, यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या होत्या.

कन्यागत महापर्वकाळ, चंद्रग्रहण व श्रावण सोमवार अशा दुर्मिळ योगावर नारळी पोर्णिमा आल्याने भाविकांनी कृष्णेस भक्तिभावाने नारळ अर्पण केले. दत्त देवस्थानच्यावतीने सभामंडप, दर्शनरांगा, महाप्रसाद, पिण्याचे पाणी यांचे नियोजन करण्यात आले होते. कुरुंदवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी, मिरज या आगारातून जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चाची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे बुधवारी (ता. ९) काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चासाठी कोल्हापूर येथून सहभागी होणाऱ्या २५० चारचाकी वाहनांना सकल मराठा समाजाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे स्टिकर्स वाटप करण्यात आले. मोर्चा शांततेत होण्यासाठी कोल्हापुरातील ७०० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. सर्व स्वयंसेवक मंगळवारी रात्री मुंबईकडे रवाना होणार आहेत. मोर्चासाठी मराठा समाजातील कार्यकर्ते सोमवारीच रवाना झाले.

मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकालात निघाला नसल्याने शेवटचा मूक मोर्चा मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुंबई येथील मोर्चासाठी जिल्ह्यातून नियोजन करण्यात आले आहे. सभा, कोपरा सभा, पत्रकार बैठक आदी जनजागृतीच्या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून लाखो कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

मराठा समाजातील कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने रेल्वे आरक्षण करण्याबरोबरच खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी वाहनांची व्यवस्था केली आहे. सध्या रेल्वेच्या एका बोगीचे आरक्षण केले, असले तरी आणखी तीन बोगी आरक्ष‌ित करण्यासाठी केंद्रपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत-जास्त कार्यकर्ते मोर्चापुर्वी मुंबईत जाण्यासाठी जिल्हा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रयत्न करत असून सोमवारी काही कार्यकर्ते स्वत:च्या वाहनांने मुंबईकडे रवानी झाले.

मंगळवारी जाणाऱ्या वाहनांसाठी मिरजकर तिकटी येथे चारचाकी वाहनांवर ‘सकल मराठा मूक मोर्चा’ ची २५० स्टिकर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप पाटील, उमेश पोवार, शाहीर दिलीप सावंत, स्वप्नील पार्टे, ह्रषिकेश पाटील, आशितोष खराडे, साईल करले, प्रथमेश देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे वरिष्ठ कार्यकर्ते समाजातील अधिकाधिक नागरिक सहभागी होण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होते. त्या अनुषंगाने अनेकांनी स्वतंत्र बैठका घेऊन नियोजन केले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सहभागी होणार

मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मूक क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आपण सविस्तर भूमिका मांडली आहे. या भूमिकेला अनुसरुन मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी आहे. मराठा समाजातील सुशिक्षित, युवक, विद्यार्थी, शेतकरी व उद्योजक यांच्यातील नैराश्य दूर करुन सर्वांगिण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मराठा समाजाला आरक्षणे देण्याची गरज आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्षाबंधनादिवशीच भाऊअपघातात ठार

$
0
0

जयसिंगपूर

इचलकरंजी येथे बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर मिरजेकडे जात असताना एसटीने ठोकरल्याने भाऊ ठार झाला. प्रशांत विलास खिलारे (वय ४७, रा.मंगळवार पेठ, मिरज) असे त्यांचे नाव आहे. जयसिंगपूर-इचलकरंजी मार्गावर गोशाळेजवळ सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, प्रशांत खिलारे हे मुळचे इचलकरंजीचे असून ते गेल्या २२ वर्षांपासून मिरज येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी ते महिंद्रा ड्युरो मोपेडवरून इचलकरंजी येथे बहिणीकडे रक्षाबंधनसाठी गेले होते. सोलगे मळ्यात बहिणीला भेटून दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीहून मिरजेकडे जात असताना कोंडीग्रे गावच्या हद्दीत गोशाळेजवळ मोपेड व एसटीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रशांत खिलारे यांच्या डोक्यास तसेच डाव्या हातास गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची वर्दी एसटी वाहक तुलसीराम श्रीरंग सुळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. अधिक तपास सहायक फौजदार बजरंग माने आणि हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाणेकरांना रोखा, अन्यथा बंदोबस्त करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्याने उद्‍भवलेल्या वादानंतर मंदिरात जाण्यास मज्जाव करूनही पुजारी बाबूराव ठाणेकर मंदिरात जात आहेत. ठाणेकर कोल्हापूरच्या जनतेला आव्हान देत आहेत. पोलिसांनी वेळीच याची गंभीर्याने दखल घेऊन ठाणेकरांना मंदिरात जाण्यापासून रोखावे, अन्यथा आम्हीच ठाणेकरांचा बंदोबस्त करू,’ असा इशारा पुजारी हटाव संघर्ष समितीने पोलिस अधिकाऱ्यांना दिला. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सोमवारी बोलवलेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या सदस्यांना हा इशारा दिला आहे.

अंबाबाई देवीच्या मूर्तीला पुजाऱ्यांनी घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्यानंतर संघर्ष समितीने पुजारी हटवण्याची मागणी केली आहे. हा वाद टोकाला जात असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर दोन्ही बाजूचे म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. दरम्यानच्या कळात ठाणेकर पिता-पुत्रांनी मंदिरात प्रवेश करू नये, असेही सांगितले होते. गेले तीन दिवस बाबूराव ठाणेकर संघर्ष समितीचा विरोध डावलून मंदिरात जात आहेत. विशेष म्हणजे ठाणेकरांना पोलिसांनी बंदोबस्त पुरविला आहे, त्यामुळे संतापलेल्या सघर्ष समितीने पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. रविवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने झाली, तर संघर्ष समितीच्या काही महिलांनी मंदिरात गाभाऱ्यासमोरही निदर्शने केली. हा वाद वाढू नये, यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांची सोमवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

यावेळी बोलताना संघर्ष समितीचे सदस्य आर. के. पोवार म्हणाले, ‘बाबूराव ठाणेकरांकडून जाणीवपूर्वक जातीय वाद घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी त्यांना संरक्षण का दिले हे समजत नाही. पोलिस संरक्षण काढून घ्यावे. कायदा सुव्यवस्था राहायची असेल तर पोलिस अधिकाऱ्यांनी ठाणेकरांना ताकीत द्यावी.’

विजय देवणे म्हणाले, ‘देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांनाच पोलिसांनी संरक्षण देणे चुकीचे आहे. ठाणेकरांना मंदिरात जाण्यासाठी संरक्षण देऊ नका. मंदिरात जाण्यासाठी पोलिस संरक्षण मिळत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पोलिसांनी त्यांना सूचना द्याव्यात, अन्यथा आम्ही ठाणेकरांचा बंदोबस्त करू.’

दिलीप देसाई म्हणाले, ‘ठाणेकर पिता-पुत्राविरोधात फिर्याद देऊन त्यांना चौकशीसाठी बोलवले जात नाही. अटकेसही टाळाटाळ होते. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने आम्ही कोर्टात जाऊ.’

यावेळी इंद्रजित सवंत, वसंतराव मुळीक, जयंत पाटील, आनंद माने, राजेश लाटकर, शरद तांबट आदींनी मनोगते व्यक्त केली.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी संघर्ष समितीच्या भावना ऐकूण घेतल्यानंतर मुंबईतील मराठा महामोर्चा आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन केले. ठाणेकर यांच्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांना दिले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक निशिकांत भुजबळ आदी उपस्थित होते.

मंदिरातील ‘टी’ कंपनीला आवरा

‘मंदिरात ठाणेकरांच्या टी कंपनीची दहशत आहे. मंदिरातील बरेच वाद ठाणेकरांमुळेच सुरू झाले आहेत. एक व्यक्ती शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवते आणि पोलिस त्यांनाच संरक्षण देतात. हे पोलिसांच्या प्रतिमेस धक्का देणारे आहे. केवळ एका व्यक्तीमुळे शहरातील शांततेचा भंग होत आहे. मंदिरातील ‘टी’ कंपनीला आवर घाला, अन्यथा कोल्हापूरकर आक्रमक होतील,’ असा इशारा संजय पवार यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बेरड'कार भीमराव गस्ती यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

देवदासी प्रथा नष्ट व्हावी म्हणून आयुष्यभर संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे आज पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बेरड समाजाच्या व्यथा, वेदना आणि होणाऱ्या छळाचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या 'बेरड' या आत्मचरित्राने साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.

भीमराव गस्ती यांनी देवदासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे 'उत्थान' ही सामाजिक संस्था सुरू केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. 'बेरड' (आत्मकथन) आणि 'आक्रोश' या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. 'सांजवारा' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.

गस्ती मूळचे बेळगावजवळच्या यमनापूरचे रहिवाशी. अंधश्रध्दा आणि रुढी- परंपरांनी जखडलेल्या बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयाची डॉक्टरेटही संपादन केली. हैद्राबाद येथील डी. आर. डी. ओ. मध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती.

सुट्टीत गावी परतल्यावर बेळगावजवळच्या सुतकट्टी घाटात झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात, त्या परिसरातल्या बेरड समाजातल्या वीस निरपराध्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांचा अनन्वित छळ केला. या अन्यायाने पेटून उठलेल्या गस्तींनी न्यायासाठी झुंज दिली. मोर्चे काढले, आंदोलने केली. या घटनेने त्यांचे जीवनच बदललले. त्यांनी बेरड समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. निपाणीस त्यांनी १८० मुलींसाठी वसतीगृह सुरु केले. देवदासीच्या प्रथेचे निर्मूलन व्हावे यासाठी सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरु केली. शेकडो देवदासींचे विवाह केले. त्यांच्या २५ / ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे देवदासींच्या मुली आता शिक्षण घेऊन शिक्षिका, प्राध्यापिका, तहसीलदार झालेल्या आहेत. ते अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समितीचे अध्यक्ष होते.


बेरड जमातीत जन्म घेतलेल्या गस्तींचं 'बेरड' हे अतिशय प्रांजळ आत्मकथन. बेरड जमातीच्या रुढी,परंपरा, वेदना,समस्या वाचताना समाजाची एक वेगळीच बाजू आपल्याला दिसते. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य साहित्य पुरस्काराबरोबरच अन्य सात पुरस्कार मिळाले आहेत.

गस्ती यांना मिळालेले पुरस्कार

> कै. बापूसाहेब विधे वाड.मय पुरस्कार (रत्नागिरी) मे १९८९.
> रत्नाप्पा कुंभार साहित्य पुरस्कार(कोल्हापूर) जून १९८९.
> डॉ. अरुण लिमये पुरस्कार, जुलै १९८९.
> पंचगंगा सहकारी साखर कारखाना साहित्य पुरस्कार, सप्टेंबर १९८९.
> मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बा.सी.मर्ढेकर साहित्य पुरस्कार, जानेवारी १९९०.
> कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, मार्च १९९०
> महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, नोव्हेंबर १९९०.
> मुकादम साहित्य पुरस्कार(कराड) जानेवारी १९९१.
> समता साहित्य पुरस्कार(बेळगाव) मार्च १९९१.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अथणी शुगर्सचा दावा चुकीचा

$
0
0

,गारगोटी



तांबाळे (ता.भुदरगड) येथील इंदिरा गांधी भारतीय महिला सहकारी साखर कारखान्याचा लिलाव आयडीबीआय बँकेने बेकायदेशीररित्या केला असून पुणे येथील डीआरटी न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे कारखाना अथणी शुगर्सकडे असा दावा करणे चुकीचे असल्याचे सांगून सांगली येथील कारखान्याचे कर्ज असताना भाडे तत्वावर चालविण्यास देता मग महिला कारखान्यास वेगळा न्याय का ?, असा सवाल कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. मडिलगे बुद्रुक (ता.भुदरगड) येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

देसाई म्हणाल्या, ‘कारखान्यास सरकारने १: ९ भागभांडवल दिले होते. कारखान्याने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या कर्ज परतफेडीसाठी वन टाइम सेटलमेंटकरीता (ओटीएस) पत्र दिले होते. पण बँकेने सरकार, सभासद, इतर देणेकऱ्यांचा विचार न करता कारखान्याचा बेकायदेशीररित्या लिलाव केला. यामध्ये अथणी शुगर्सने ९३ कोटींची बोली करून पैसे बँकेत भरले होते. तर दालमियाने १०० कोटींची बोली केली होती. पण बँकेने अथणी शुगर्सकडे कारखान्याचा ताबा दिला. दरम्यान, आयडीबीआय बँकेने केलेला लिलाव बेकायदेशीर असून तो रद्द करावा या मागणीसाठी पुणे येथील डीआरटी न्यायालयात कारखान्याने दाद मागितली होती. हा दावा प्रलंबित असताना अथणी शुगर्सने कारखान्याचा ताबा मिळावा यासाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.उच्च न्यायालयाने अथणी शुगर्सने भरलेले पैसे मागे घ्यावेत तसेच डीआरटीच्या कामकाजाविरोधात ताशेरे ओढले आहेत.’

तांबाळे कारखाना अथणी शुगर्सकडेच असा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय झालेला नसून याबाबतचा दावा डीआरटी न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. सांगली येथील कारखान्याचे ३५० कोटीचे कर्ज असताना हा कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास दिला जातो. मात्र महिला कारखान्यास ३६ कोटी ५० लाख रुपयांचे वन टाइम सेटलमेंट दिले असताना या कारखान्याचा लिलाव केला जातो. हा अन्याय असून महिला कारखान्यास निश्चित न्याय मिळेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदणेच्या विरोधात भक्कम पुरावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा (वय १०) या शालेय मुलाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचा युक्त‌िवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. मंगळवारी (ता. ८) जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत निकम यांनी २२ परिस्थितीजन्य पुराव्यांची मांडणी केली. संशयित आरोपीच्या वकिलाने साक्षीदार आणि पुराव्यांबाबत केलेली वक्तव्येही अॅड. निकम यांनी खोडून काढली. पुढील सुनावणी आज (बुधवारी) होणार आहे.

२५ डिसेंबर २०१२ रोजी संध्याकाळी देवकर पाणंद येथून दर्शन शहा याचे अपहरण झाले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जवळच असलेल्या शेतातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील योगेश उर्फ चारू चांदणे या संशयिताला अटक केली होती. संशयित चांदणे यानेच दर्शनचे अपहरण करून गळा आवळून त्याला विहिरीत फेकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. चांदणेविरोधात २२ परिस्थितीजन्य पुरावे असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

मंगळवारी न्यायाधीश बिले यांच्यासमोर युक्तीवाद करताना निकम म्हणाले, ‘गुन्ह्यापूर्वी संशयिताने नायलॉनची दोरी खरेदी केली होती. हीच दोरी घटनास्थळी पोलिसांना सापडली आहे. दोरीची जाडी आणि दर्शनच्या गळ्यावरील दोरीचा व्रण सारखाच असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. संशयिताने नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून १ लाख रुपये उसने घेतले होते. यातील ३० हजार रुपये परत दिले, तर ७० हजार रुपये थकले होते. सागर कटके यांच्याकडून ५८ हजार रुपये घेतले होते. है पैसेही संशयिताने परत दिले नाहीत, त्यामुळे पैसे फेडण्याचा त्याच्यावर दबाव होता. यातूनच त्याने १२ डिसेंबर, २०१२ मध्ये दर्शनच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. २५ डिसेंबर, २०१२ रोजी दर्शनला शेताकडे घेऊन जाताना दोन साक्षीदारांनी संशयिताला पाहिले होते, तर रात्री नऊच्या सुमारास योगेश चांदणे हा घाबरलेल्या अवस्थेत एकटाच परत येतानाही साक्षीदारांनी पाहिले आहे. घटनास्थळावर योगेशच्या शर्टचे तुटलेले बटन सापडले. याशिवाय दर्शनच्या घरासमोर सापडलेल्या धमकी पत्रातील हस्ताक्षरही जुळत असल्याचा अहवाल हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिला आहे. या सर्व घटनांचा एकमेकांशी असलेला संदर्भ पाहता संशयित चांदणे यानेच २५ तोळे सोन्यासाठी दर्शन शहा याचा गळा आवळून त्याला विहिरीत फेकल्याचे स्पष्ट होते.’

याशिवाय अॅड. निकम यांनी आरोपीचे वकील पीटर बारदेस्कर यांनी युक्त‌िवादात मांडलेले मुद्देही खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ‘३० साक्षीदारांच्या साक्षी, पोलिसांनी केलेला पंचनामा, पंचांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे संशयित आरोपी चारू चांदणे यानेच दर्शनचा खून केला आहे,’ असा दावा अॅड. निकम यांनी केला. न्यायाधीश बिले यांच्यासमोर सुमारे तीन तास अॅड. निकम यांनी युक्त‌िवाद केला. पुढील सुनावणी बुधवारी घेण्याचा आदेश न्यायाधीश बिले यांनी दिला. बुधवारी पुन्हा अॅड. निकम युक्त‌िवाद करणार आहेत. यावेळी संशयित आरोपी चारू चांदणे याला पोलिस बंदोबस्तात हजर केले होते. दर्शन शहा याची आई आणि आजी उपस्थित होत्या.

महत्त्वाचे परिस्थितीजन्य पुरावे

संशयिताला पैशांची गरज होती. त्यानेच दर्शनच्या घरात चोरीचा प्रयत्न केला.

२५ डिसेंबरला गुन्ह्यापूर्वी संशयित चांदणे हा दर्शनला शेताकडे घेऊन गेल्याचे साक्षीदारांनी पाहिले.

विहिरीजवळ संशयिताचे शर्टचे तुटलेले बटन सापडले.

संशयिताकडे गुन्ह्यातील दोरी मिळाली.

धमकी पत्रातील हस्ताक्षर जुळले.

साक्षीदारांच्या साक्षी

२२ परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध

धमकीचे पत्र टाकण्याआधीच केला खून

संशयित आरोपी योगेश चांदणे याला देणी भागवण्यासाठी पैशांची गरज होती. दर्शनच्या घरातील चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने दर्शनचे अपहरण करून २५ तोळे सोने उकळण्याचा कट रचला. दर्शनचे अपहरण केल्यानंतर त्याचा गळा आवळून विहिरीत फेकले. यानंतर चांदणेने धमकीचा लिफाफा दर्शनच्या दारात टाकला. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५०० बिल्डरांना ‘रेरा’चा दणका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सद्यस्थितीतील गृहप्रकल्पांची ३१ जुलैपर्यंत नोंदणी न केलेल्या बिल्डरांवर ‘रेरा’ कायद्यानुसार ५० हजाराची दंडात्मक कारवाई होणार आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणने राज्यभरातील ५०० बिल्डरांना नोटीसा काढल्या आहेत. दंडाची रक्कम स्वीकारुन प्रकल्पाची नोंदणी होणार आहे. राज्यभरातील अनेक बिल्डरांनी एक आणि दोन ऑगस्टला आपापल्या प्रकल्पाची नोंदणी केली आहे. दरम्यान, तांत्रिक बाबीमुळे काहीजणांना उशीरा झाल्यास त्यांना सवलत देण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या विचाराधीन आहे. त्याचवेळी ‘रेरा’कडे सद्यस्थितीतील प्रकल्पाच्या नोंदणीला मुदतवाढ दिली नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. दंडात्मक कारवाई झालेल्या बिल्डरांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील दोघा बिल्डरांचा समावेश आहे.

बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आणि ​आर्थिक शिस्त आणण्यासाठी रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कायद्यानुसार महारेरा प्राधिकरणकडे एक मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत चालू स्थितीतील प्रकल्पांची नोंदणी करण्याची मुदत होती. प्राधिकरणाकडे ३१ जुलैपर्यंत ११००० प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, बिल्डरांनी एक आणि दोन ऑगस्टला मोठ्या संख्येने गृहप्रकल्पाची नोंदणी केली आहे. दुसरीकडे चालू स्थितीतील प्रकल्पाची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होती.

‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी, सदस्य बी. डी. कारखानीस, डॉ. विजय सतबिर सिंघ यांच्या समितीने चालू स्थितीतील गृह प्रकल्पाच्या नोंदणीसाठी कसल्याही प्रकारची मुदतवाढ देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी रेरा कायद्यातील चालू स्थितीतील व बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र नसलेल्या गृहप्रकल्पावर दंडात्मक कारवाईच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे ठरले. रेरा कायद्यांतर्गत मुदतीत नोंदणी न केल्यास प्रकल्पाच्या एकूण एस्टीमेटच्या दहा टक्के दंडाची तरतूद आहे. मुदतीत गृहप्रकल्पाची माहिती न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची मोठी आहे.

त्या सगळ्यांना मुंबईला सुनावणीसाठी बोलावणे व्यावहारिक ठरणार नाही. म्हणून पहिल्या टप्प्यात उशिराने नोंदणी केलेल्या बिल्डरांना नोटीसा लागू केल्या आहेत. तसेच ५०००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाबाबत संबंधित बिल्डरांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. ज्यांना तां​त्रिक कारणामुळे थोडा वेळ लागला असेल त्यांना सवलत देता येते का ? याचा निर्णय होणार आहे. मात्र ज्यांनी जाणूनबुजून विलंब केला आहे त्यांच्याकडून दंड वसूल होणार आहे. सात बिल्डरांनी दंडाची रक्कम भरल्याचे ‘महारेरा’कडून समजले. दरम्यान, या संदर्भात ‘महारेरा’चे सचिव वसंत प्रभू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मिटींगमध्ये असल्याचे सांगण्यात आले.


काही बांधकाम व्यावसायिकांनी मुदतीत अपलोड करायची प्रक्रिया सुरु केली असेल तर त्यांना दंडाची रक्कम माफ करावी. तांत्रिक बाबीमुळे नोंदणी व चलन भरण्यासाठी विलंब झाला असल्याची कारणे आहेत अशा बिल्डरांना सवलत देता येते का याचा प्राधिकरणने विचार करावा.

विद्यानंद बेडेकर, बांधकाम व्यावसायिक


रेरा कायद्याची अंमलबजावणी पहिल्यांदाच होत आहे. कायद्याविषयी अजूनही अनेकांना संपूर्ण माहिती झाली नाही. यामुळे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणने कोल्हापूरसारख्या मध्यम व लहान शहरासाठी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यायला पाहिजे होती. नोंदणीसाठी महिन्याची मुदतवाढ मिळायला पाहिजे यासाठी क्रेडाईतर्फे महारेरा अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. दरम्यान कोल्हापुरातील प्रकल्पांची मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे.

महेश यादव अध्यक्ष, क्रिडाई, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूट भरण्यासाठी ग्राहकांची लूट

$
0
0

प्रकाश कारंडे,कोल्हापूर

टँकरमधून चोरी करीत आलेले पेट्रोल ज्यावेळी प्रत्यक्षात पंपावर येते त्यावेळी त्यामध्ये तूट असतेच. याव्यतिरिक्त पेट्रोलला लिटरमागे ०.५५ मिलि तर डिझेलमागे ०. १५ ‌म‌िल‌‌ि संभाव्य तूट ग्राह्य मानली आहे. यापेक्षा जास्त तूट झाल्यास चोरी समजली जाते. तरीही थेट मशिनमध्ये फेरफार करून तूट भरून काढली जाते. यातून पंपमालक ग्राहकांची लूट करतात. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात उघड झाले आहे.

सकाळच्या पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर प्रत्येक पंपावर पाच लिटरचे माप घेऊन सर्वच नोझल तपासणे, मापात ताळमेळ बसत नसल्यास विक्री बंद करुन कंपनीला याबाबत तातडीने कळवावे लागते. त्याची नोंद कंपनीच्या डी. एस. आर. मध्ये करावी लागते. यामुळे हवेचा दाब आणि कमी पेट्रोलचे धोके टाळता येतात. पेट्रोल, डिझेलची घनता मोजून त्याची रजिस्टरमध्ये नोंद रजिस्टरमध्ये करावी लागते. पेट्रोल-डिझेलचे बदलणारे दर अॅटोमेशनच्या ठिकाणी थेट बदलले जातात. जिथे सोय नाही तिथे कंपनीच्या वीज बोर्डावर रोज सकाळी जाहीर करावी लागते. पेट्रोल डिझेलचे सकाळचे तापमान तापमान बुकात नोंद करावी लागते. जमिनीतील टँकमध्ये ‘डीप’ टाकून टँकच्या तळाला पाणी साचले आहे का नाही याची नोंद डी.एस.आर.मध्ये करावी लागते. मशिनमधून आजपर्यंत किती पेटोल व डिझेल गेले याचीही नोंद करुन कंपनीच्या अॅपवर पाठवावी लागते. या सर्व कार्यवाहीसाठी वेळेचे बंधन आहे. यामुळे कंपन्यांना देशपातळीवरील विक्री आणि शिल्लक कळते. परंतु या बाबी ठराविक पंपचालक करीतच नाहीत. याउलट यातले काही न करता कशा पद्धतीने तूट भरून काढून ग्राहकाकडे जाणारे पेट्रोल रोखता येईल आणि आपलाच फायदा होईल एवढेच पाहिले जाते.

यासाठी मशिनमध्ये फेरफार करुन पेट्रोलमधील तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ याच गैरमार्गाने पैसे मिळवण्याचे प्रमाण मोठे असून ही कन्सेप्ट सर्रास वापरली जाते. वैधमापन विभागाकडून पंपांचे स्टँम्पिंग होते. याचवेळी नियमापेक्षा जास्त तूट करून दिली जाते. पंपावर असणारे पाच लिटरचे माप पत्र्याचे असते. त्याच्या खालच्या बाजूला चेप देऊन मापाचा आकार कमी केला जातो. त्याचे स्टँम्पिंग करून घेतले जाते. यासाठी हे माप काचेचेच असावे लागते. याच्याही पुढे जावून स्टँम्पिंगचे सील तोडून तशाच पद्धतीचे सील करून देणारी टोळीच सध्या कार्यरत आहे. यामधून पेट्रोल चोरीला प्रचंड वाव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत उचगाव रोड येथील एका पंपावर पाच लिटरला १४० मिलीची तूट आढळून आली ती अशाच पद्धतीने प्रकार करून केल्याचे स्पष्ट होते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे लिटर अथवा पैशाच्या किमतीत फेरफार करुन तसेच १०० लिटरला दोन लिटर कमी पेट्रोल डिझेल सोडणारी चीप बसवून चोरी केली जाते. कोणत्याही प्रकारे पेट्रोल पंप मालकाने चोऱ्या केल्या तरी त्याचे सर्व इंधन त्यांच्याच टाकीत साठवले जाते. त्याची विल्हेवाट लावायची झाल्यास टेस्टिंग टाकून किंवा टँकरमधून काढून परस्पर पेट्रोल, डिझेल विक्री केली जाते.

नाफ्ताचा छुपा व्यवसाय

नाफ्ता हे एक केमिकल असून पेट्रोल व डिझेलपेक्षा १० ते १५ रुपये स्वस्त आहे. याचा ज्वलनांक पेट्रोल व डिझेलपेक्षा कमी असतो.१९८० ते २०१० पर्यंत या नाफ्त्याने एका बाजूला ग्राहकांच्या गाड्यांची अक्षरश: दूर्दशा केली. रॉकेलचा काळाबाजार करुन आणि त्यात नाफ्ता टाकून अनेकांनी डिझेलचा धंदाच सुरू केला. यातून कोट्यवधी रुपये कमावले. अनेकांनी यासाठी पंपात स्वतंत्र टाक्या ठेवल्या होत्या. आताही हा धंदा जिवंत असला तरी काही खासगी कंपन्या आणि पंपमालकच ठेवतात. यातून बक्कळ नफा असल्यामुळे पंपमालकही धाडस करतात. नाफ्ता तयार करण्याचे कारखाने मेट्रोसिटीत आहेत. यातूनच गँगवॉरही होतात. नाफ्ता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता त्यावेळी उधारीचे मोठे पेव फुटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या अभिषेकासाठी बाबूराव ठाणेकर मंदिरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

दोन महिन्यांपूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीला घागरा चोली नेसवल्याप्रकरणी श्रीपूजक बाबूराव ठाणेकर यांना मंदिर प्रवेश बंदी असतानाही पहाटे चार वाजता देवीचा पहिला अभिषेक करुन निघून गेले. गेल्या दोन दिवसांपासून ठाणेकर यांच्या मंदिर प्रवेशामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. याबाबत करवीर पोल‌िस ठाण्याच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली होती.

पेहराव प्रकरणानंतर संघर्ष समितीच्यावतीने अंबाबाई मंदिर पूजारी हटाओची मागणी केली. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सरकारला पाठवून निर्णय होईपर्यंत, श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांना अंबाबाई मंदिर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही बाबूराव ठाणेकर यांचा आठवडा सुरू झाल्यापासून गेले पाच दिवस ते अंबाबाईच्या गाभाऱ्यात येवून देवीचा अभिषेक, पूजाविधी करत आहेत.

बंदी असतानाही ते मंदिरात येत असल्यामुळे याला संघर्ष समितीने विरोध केला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी श्रीपूजक बाबूराव ठाणेकर यांना तशा आशयाची नोटिसही काढण्याचे समजते. परिणामी बाबूराव ठाणेकर पहाटेच अंबाबाई मंदिरात आले देवीचा पहिला अभिषेकसह सुरुवातीचे धार्मिक विधी केले आणि परत निघून गेल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीचे १२ हजार नवे करदाते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जीएसटीच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या नवीन नोंदणीला करदात्यांचा चांगला प्रतिसाद आहे. १ जुलैपासून नवीन नोंदणीची सुरुवात झाली. आजअखेर कोल्हापूर विभागात १२ हजार नवीन करदात्यांची नोंदणी जीएसटीएन नेटवर्ककडे झाली आहे. या करदात्यांच्या उत्पन्नाची ऊलाढाल २० लाखांच्या पुढे आहे.

जीएसटीएन नेटवर्ककडे १ जुलैपासून सुरू झालेल्या नोंदणीला करदात्यांनी प्रतिसाद दिला. पहिल्या २० दिवसांतच दीड हजार करदात्यांची नोंदणी झाली. आतापर्यंत ७१ हजार व्हॅटचे क्रमांक स्थलांतरित झाले आहेत. आठ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या कोल्हापूर विभागात १२ हजार नवीन करदात्यांची नोंदणी झाली आहे. आजअखेर ८३ हजार जणांना जीएसटीचा क्रमांक मिळाला आहे. त्यासही काहींनी जीएसटी क्रमांकासाठी ऐच्छिक नोंदणी केली आहे. जीएसटी भवनने वस्तू व सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. जीएसटी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी जीएसटीचे आयुक्त आणि उपायुक्तांनी जिल्हा, शहर आणि तालुकास्तरावर प्रबोधन शिबिर घेण्यात आली. त्यासह २० लाखांच्या पुढे उत्पन्न असूनही जीएसटी क्रमांक न घेतलेल्या करदात्यांच्यावर कारवाईचा इशारा दिल्याने करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जीएसटीची नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे.

जीएसटीच्या पहिल्या टप्प्यात करदात्यांचा डेटा स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये जूनअखेरपर्यंत ६५ हजार करदात्यांचा डेटा स्थलांतरित झाला. ३१ ऑगस्टपर्यंत ८३ हजार करदाते व्हॅटमधून जीएसटीकडे स्थलांतरित झाले. अजूनही जीएसटीच्या नोंदणी अॅप्लिकेशनमधून प्रोव्हिजनल आयडी दिला जात आहे. करदात्यांना महा ई सेवा केंद्रातूनही अॅप्ल‌िकेशन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या १० ऑगस्टला करदात्यांना पहिले रिटर्न भरावे लागणार आहे. या रिटर्नसाठी दोन पानांचा ऑनलाइन अर्ज करदात्यांना नेटवर्कवर उपलब्ध करून दिला आहे. २० लाखांच्या पुढे उलाढाल असलेल्या करदात्यांना जीएसटी क्रमांक अत्यावश्यक आहे. काही करदात्यांनी ऐच्छिक नोंदणी करून जीएसटी क्रमांक घेतला असून सेट ऑफ किंवा इनपुट क्रेडिट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीएसटी भवनात स्वतंत्र जीएसटी कक्षातून चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी कागदपत्रे डाऊनलोड करण्यासह जीएसटी क्रमांक मिळेपर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. रजिस्टर्ड डिलर्ससाठीही नवीन करप्रणाली आणि रिटर्नची माहिती दिली जात आहे.


जीएसटीच्या दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १२ हजार करदात्यांना जीएसटी क्रमांक मिळाला आहे. त्यासह अजूनही नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी विभागात करदात्यांची संख्या वाढत आहे. अजूनही काही करदात्यांचा पॅनकार्ड, आधारकार्ड लिकिंग करण्याचे काम सुरू आहे. जीएसटी संदर्भात शंका असल्यास जीएसटी कक्षाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

सचिन जोशी, सहआयुक्त जीएसटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठ्यांना गृहीत धरण्याचे दिवस संपले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आतापर्यंत प्रस्थापित राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरण्याची भूमिका बजावली आहे. सध्या गृहीत धरण्याचे दिवस संपुष्टात आले आहेत. सर्वच क्षेत्रात मराठा बांधवांची पिछेहाट बांधवांना अस्वस्थ करत आहे. समाजाचा आक्रोश रास्त असून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नोकरी व शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व्यापक धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे,’ असे पत्रक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, ‘शूर, स्वाभिमानी आणि लढवय्या अशी मराठा समाजाची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. मराठा समाजाने न्याय मिळवण्यासाठी असंख्य लढाया केल्या. सातत्याने संघर्ष केला. हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून हा संघर्ष आजही सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात मात्र मराठ्यांसह बहुजन समाजाला संस्थानात नोकऱ्यांत पन्नास टक्के आरक्षण दिले. शिक्षणाद्वारे सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय स्वातंत्र्यानंतर शाहूंचा विचार जसाच्या तसा अमलात आणला नाही. राजर्षी शाहूंची भूमिका जशीच्या तशी स्वीकारली असती, तर आजचे चित्र दिसले नसते. सर्वच क्षेत्रात मराठा समाजाची पीछेहाट होत असल्याने ते एकत्र येत आहेत. त्यांच्या मागण्या रास्त असून त्या सोडवण्याची आवश्यकता आहे. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी कायद्यातही बदल करावा लागला, तरी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्यांचा आक्रोश कायम राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिकेद्वारे क्रांतिकारी निर्णय घेऊन देशात महाराष्ट्राला अव्वल क्रमांक मिळवून द्यावा. राज्यासह राज्याबाहेरील मराठा बांधवांना आरक्षण देण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधाळी एसटीपीसाठी ३१ डिसेंबर डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दुधाळी येथील १७ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ही डेडलाइन दिली आहे. लवादाचे न्यायाधीश यू.डी. साळवी व रंजन चटर्जी यांनी हा आदेश दिला. ३१ डिसेंबरनंतर पर्यावरण दंड लावण्यात येईल, असे लवादाने स्पष्ट केले. पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव प्रदूषण मुक्तीसाठी कदमवाडी येथील सुनील केंबळे यांनी हरित लवादाकडे दाद मागितली आहे.

दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्याबद्दल महानगरपालिकेने ठेकेदार लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी ५२ लाख रुपयांचा दंड केला आहे. दंडापोटी महानगरपालिकेने बिलातून ३५ लाख रुपये वजा केले आहेत. दरम्यान दुधाळी एसटीपी उभारणीस विलंब होत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी लवादाने ठेकेदाराला सुनावणीच्यावेळी हजर राहण्याचा आदेश दिला होता. आजच्या सुनावणीत दुधाळी एसटीपी ३१ डिसेंबर, २०१७ पर्यंत पूर्ण करावा, असे आदेश लवादाने दिले. जर दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाल्यास पर्यावरण दंड आकारला जाईल, अशी समजही देण्यात आली.

आजच्या सुनावणीत रंकाळा तलावाचे सांडपाणी रोखण्यासाठी उभारण्यात येणारा पाच एमएलडी एसटीपीचा प्रस्ताव राज्य सरकारने स्थायी समितीची मान्यता नसल्याने परत पाठवला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आली. हा प्रस्ताव नव्याने शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करुन तीन दिवसात राज्य सरकारला पाठवण्याचे आदेशही लवादाने दिले. सुनावणीवेळी महानगर पालिकेकडून प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी, पर्यावरण अभियंता समीर वाघ्रांबरे, अभियंता आर.के. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’ची १०७ कोटींची फुटणार हंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन व जुनी वितरण नलिका मिळून ३९६ किलोमीटर पाइपलाइन, साडेतीन लाख ते १६ लाख लिटर क्षमतेच्या बारा टाक्या, शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी तीन संप अशा महत्त्वपूर्ण अमृत योजनेंतर्गत १०७ कोटी रुपयांच्या विकासकामांची निविदा दोन दिवसांत निघणार आहे. कोल्हापूरची सन २०४९ मधील लोकसंख्या गृहित धरून पिण्याच्या पाणीपुरवठ्याची कामे होणार आहेत. महापालिका स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संपूर्ण योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून काम करेल. या कामाची वर्क ऑर्डर दिल्यांतर २४ महिन्यांत योजनेतील प्रस्तावित कामे पूर्ण करावयाची आहेत.

पाइपलाइन गळती, खराब पाइप यामुळे हिशेबबाह्य पाण्याच्या प्रमाणाची टक्केवारी ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. उत्कृष्ट पाणीपुरवठ्यासाठी हिशेबबाह्य पाण्याच्या प्रमाणाची टक्केवारी वीस टक्के असायला हवी. अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्यासाठी ११४ कोटी ८१ लाख रुपयांची योजना मंजूर आहे. यापैकी १०७ कोटींच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात पंपिंग मशिनरी, स्काडा अॅटोशन व्यवस्थेची कामे वगळली आहेत. या कामाची स्वतंत्र निविदा कालांतराने काढण्याचे प्रस्तावित आहे.

महापालिकेने एसजीआय कंपनीमार्फत कोल्हापूर शहरातील सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे हायड्रोलिक मॉडेलिंग करून शहरातील वितरण प्रणालीची माहिती संकलित केली. यासाठी आधुनिक प्रचलित वॉटर जेम्स सॉफ्टवेअरचा आधार घेतला. महापालिकेने एसजीआय कंपनीमार्फत संकलित केलेली माहिती व संकल्पनेच्या आधारे एमजीपीने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. राज्य सरकारकडून बारा जुलै रोजी त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. सध्या महापालिकेत या योजनेच्या कामाची निविदा काढण्यासाठी धांदल सुरू आहे. निविदेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या बाजूंची तपासणी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच टोळ्या होणार हद्दपार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाच टोळ्यांसह विविध गुन्ह्यातील १०७ गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे. रेकॉर्डवरील सराईतांच्या यादीनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमानुसार त्यांच्यावर कारवाई होणार आहे. हे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहेत, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सार्वजनिक उत्सवांत गुंड टोळ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. विसर्जन मिरवणुकीतही गणेश मंडळे आणि गुंडांच्या टोळ्यांमध्ये संघर्ष होतो. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असे प्रसंग टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. चारही पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील सराईत गुंड आणि चोरट्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी दिल्या होत्या. यानुसार शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यांनी ५ टोळ्यांमधील ५५ संशयितांचे प्रस्ताव तयार केले आहेत. यात राजारामपुरी, जवाहरनगर, लक्षतीर्थ वसाहत, सदर बाजार आदी परिसरातील टोळ्यांचा समावेश आहे.

टोळ्यांसह मटका, जुगार, चोरीच्या गुन्ह्यातील सराईतांवरही कारवाई होणार आहे. किमान गणेशोत्सव काळात हे गुंड जिल्ह्याबाहेर राहिल्यास गणेशोत्सवात गुन्हेगारी घटना घडणार नाहीत, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपारीचे प्रस्ताव मंजूर करताच संबंधितांना नोटिसा पाठवल्या जणार आहेत. कलम ५५ नुसार ५ टोळ्यातील ५५ गुंड, कलम ५६ प्रमाणे २३ सराईत, कलम ५७ नुसार दोघे, कलम ९३ नुसार २३ गुंड आणि प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ४ संशयितांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत, अशी माहिती डॉ. अमृतकर यांनी दिली.


सहा महिलांनाही केले हद्दपार

राजारामपुरी पोलिस ठाण्याने परिसरातील सहा महिलांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले होते, ते यापूर्वीच मंजूर झाले आहेत. अन्नू विकास देवकर (रा. टेंबलाई रेल्वे फाटक), संगीता उर्फ ताई वाल्मिकी फुलोरे, बायडी सागर रसाळ, अश्विनी दत्ता नाईक, (तिघी रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी), पूजा शिवाजी माळी (रा. डवरी वसाहत, यादवनगर) आणि सुरेखा राजू नरंदे (रा. टेंबलाई रेल्वे फाटक) या महिलांविरोधात संघटित चोरीचे गुन्हे नोंद आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images