Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अखेर प्रतापचा मृतदेह दरीतून काढला

$
0
0

रमेश चव्हाण , आजरा

सोमवारी (ता.३१) गडहिंग्लज येथून आंबोली येथे पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या आणि कावळेसाद दरीमध्ये मद्यप्राशन केल्यामुळे पडलेल्या दोन तरूणांच्या मृतदेहापैकी अखेर शुक्रवारी पाचव्या दिवशी प्रताप उजगरे (रा. बीड) याचा मृतदेह दरीतून वरती काढण्यात शोधपथकाला यश आले. दुपारी साडेतीनच्या सुमारास सांगेली (ता.सावंतवाडी) च्या पथकाला हे यश मिळाले. मात्र दुसरा तरूण इम्रान गारदी याचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात दरीच्या खाली वाहून गेल्याने पथकाला आढळून आला नाही. यामुळे त्याच्या मृतदेहाचे शोधकार्य शनिवारीदेखील सुरू राहील. दरम्यान, पाचव्या दिवशी सापडलेला प्रतापचा मृतदेह कमालीचा सडला होता. त्यामुळे आंबोली आरोग्य केंद्रामध्ये सावंतवाडीहून आलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन केल्यानंतर प्रतापचे वडील व काका यांच्यासह आलेल्या नातलगांच्या ताब्यात तो देण्यात आला. बीडला त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

बेफाम वारा, मुसळधार पावसाच्या सरी, घनदाट धुके आणि पाण्याचा गतिमान प्रवाह अशा प्रतिकूल वातावरणामुळे गेले चार दिवस कावळेसादच्या सहाशे फूटाहून अधिक खोल दरीत पडलेल्या प्रताप व इम्रान यांच्या मृतदेहाचा शोध शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा सुरू झाला. घटनास्थळी आटलेले आसू आणि दाटलेले दु:ख मनात घेऊन या दोघा तरूणांच्या नातलागांच्या आशा कायम होत्या. पण प्रतिकूल हवामानामुळे आजही यश मिळेल याची खात्री कोणीही देऊ शकत नव्हते. दरम्यान, सिंहगडचे नवे पथक शुक्रवारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण या परिसराची माहिती असलेल्या सांगेलीच्या पथकाने शोध घेण्याबाबत नातलगांनी आग्रह धरला. त्यामुळे सकाळी साडेदहाच्या सुमारास या पथकातील बाबल अल्मेडा, किरण नार्वेकर, संतोष नार्वेकर व दाजी नार्वेकर हे स्वयंसेवक दरीमध्ये उतरले.

शोधपथकाला पाण्याच्या प्रवाहामध्ये दूर गेलेला प्रतापचा मृतदेह त्यांना आढळून आला. मात्र गेल्या चार दिवसात मृतदेह कमालीचा सडला होता. जलचरांनी मृतदेहाचे लचकेही तोडले होते. तशा स्थितीत इम्रानचा मृतदेहही शोधण्यात आला, पण तो आढळला नाही. अखेर प्रतापचा मृतदेह व्यवस्थित बांधून क्रेनच्या सहाय्याने दुपारी दरीबाहेर काढण्यात आला. मृतदेह काढल्यानंतर गेले चार दिवस कोंडलेला नातलगांचा आक्रोश अखेर बाहेर पडला. शवविच्छेदनानंतर मृतदेह घेऊन प्रतापचे नातलग गावाकडे परतले.

मात्र इम्रानच्या नातेवाईकांची शुक्रवारी पाचव्या दिवशीही घोर निराशाच झाली. दरीमध्ये पडल्यानंतर वास्तविकत: इम्रानचा मृतदेह प्रथमत: आढळून आला होता. मात्र वेळ जात राहल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर दरीखाली सरकत गेलेला इम्रानचा मृतदेह सापडू शकला नाही. शनिवारी पुन्हा एकदा त्याचा शोध घेण्यासाठी दरीच्या पश्चिमेकडील शिरसंगे व वेर्णे गावाकडून सांगेलाकर जातील, असे सांगण्यात आले. दरम्यान या शोधकार्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) सहभागी होणार आहे. तशा सूचना पोलिस अधिक्षकांनी दिल्या असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

............

चौकट

नियोजित वधूला पाहिलेच नाही

प्रताप खरेतर लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सोमवारी गावी जाणार होता. वधू पाहण्याचा कार्यक्रम नातलगांनी निश्चित केला होता. त्यामुळे गावी येत असल्याचा निरोप त्याने गावी दिला होता. पण त्याच्या दैवातच ते नव्हते. त्याआधीच तो काम करीत असलेल्या पोल्ट्री मालकाकडून प्रताप बेपत्ता असल्याचे नातलगांना कळविण्यात आले होते. पण येथे आल्यानंतर व व्हायरल झालेला व्हीडीओ पाहिल्यानंतर त्यांनाही वास्तव कळून चुकले.

.............

सांगेली पथकाला मदतीचे आवाहन

गेले चार दिवस शोधकार्यापासून थोडे दूर राहिलेल्या सांगेलीच्या पथकातील बाबल अल्मेडा व नार्वेकर साहसवीरांनी शुक्रवारी काही तासातच एक मृतदेह दरीबाहेर काढला. वास्तविकत: पहिल्या दिवशीच या पथकाचे स्वयंसेवक मृतदेहाजवळ पोहोचले होते. मात्र अपुऱ्या दोरखंडामुळे त्या दिवशी इम्रानचा मृतदेह वरती काढता आला नाही. या धाडसी पथकाला पुरेसे दोरखंड व इतर अनुषंगिक साहित्य दिल्यास त्यांचा अशा आपत्ती परिस्थितीत चांगले काम करता येईल, असे आवाहन दोन्हीकडच्या नातेवाईकांसह स्थानिकांनीही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेलवळे खुर्दमधीलबालकाला फ्ल्यूची लागण

$
0
0

, कागल

तालुक्यातील बेलवळे खुर्द येथील तुकाराम शहाजी पाटील (वय ५) या अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून जिल्हा रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण सापडल्याचे समजताच ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. एक ऑगस्ट रोजी तुकाराम पाटील याला जिल्हा रूग्णालयात तापाचा रूग्ण म्हणून दाखल केले. मात्र त्याला स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्यावर त्या अनुषंगाने उपचार सुरू आहेत.

बेलवळे खुर्द येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीमार्फत गावात गल्लोगल्ली सर्व्हे करून गावातील नागरिकांना पाणी उकळून पिण्याबाबत व पाण्याच्या टाक्या तसेच घरासभोवतीची स्वच्छता करून ताजे व सकस अन्न खाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावात सर्दी, खोकला, फ्ल्यू अशा प्रकारचे रूग्ण आहेत का याची तपासणी सुरू आहे. गावची सार्वजनिक व खासगी पाण्याच्या टाक्या वेळेवर धुण्याबरोबरच त्यामध्ये टिसीएल पावडर टाकून ग्रामस्थांचे आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत सर्वोतोपरी सहकार्य असल्याचे सरपंच सीमा गुरव यांनी सांगितले.

दरम्यान,स्वाईन फ्ल्यूची लक्षणे, रोग याबाबत घ्यावयाची काळजी यासंदर्भात डिजीटल फलक व भित्ती पत्रके लावली असून गावातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून आरोग्यविषयक जनजागृती ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्षाबंधनासाठी इचलकरंजीतएसटीच्या जादा फेऱ्या

$
0
0

इचलकरंजी

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठा सजल्या असून एसटी महामंडळ देखील सज्ज झाले आहे. यादिवशी होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता इचलकरंजी आगाराने जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (ता. ७) आणि मंगळवार (ता.८) रोजी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सांगली, मिरज, कोल्हापूर, पुणे, कागल, पेठवडगांव या मार्गावर ५० जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. ही गर्दी कॅश करण्यासाठी महामंडळाने देखील कंबर कसली आहे. एसटीला सर्वात जास्त प्रवासी याचदिवशी मिळतात. त्यामुळे यादिवशी एसटीने जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करतील यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे महामंडळाने कळविले आहे. तसेच ‘एसटीरुपी बहिणाला सुरक्षित प्रवासासाठी फक्त एसटीतूनच प्रवास करीन,’ अशी ओवाळणी प्रवासी बांधवांनी घालावी, असे भावनात्मक आवाहन देखील एसटी प्रशासनाने केले आहे.

एसटीने यंदाच्या वर्षी आगार पातळीवर केंद्रीयस्तरावरुन मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केलेले आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर प्रवाशांची गर्दी पाहून एसटी बसेस सोडण्यात येत असत. परंतु यंदा मध्यवर्ती कार्यालयाकडून विशेष परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे एसटीला वर्षातील सर्वाधिक प्रवासी यादिवशी मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी एसटीने प्रवास करतील आणि एसटीचा महसूल वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

रक्षाबंधन सणादिवशी इचलकरंजी आगारातील चालक, वाहकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी बसस्थानकावर कार्यरत राहून मार्गदर्शन करतील. तर राजवाडा, नदीवेस, सांगली नाका, कबनूर याठिकाणी नियंत्रकाची नेमणूक करुन प्रवाशांची सोय केली जाणार आहे.

...............

कोट

‘रक्षाबंधन सणादिवशी पुणे मार्गावर पाच तर सांगली, मिरज, कोल्हापूर या मार्गावर प्रत्येकी १५ जादा फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होणार नाही याची पुरेपुर काळजी इचलकरंजी आगाराकडून घेण्यात आली आहे.

दिलीप पाटील, आगारप्रमुख इचलकरंजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोठडीत जागली रात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खाकी वर्दीत रुबाबात अनेक सराईत चोरट्यांना कोठडीच्या सळ्या मोजायला लावणारे विश्वनाथ घनवट आणि सूरज चंदनशिवे यांना मात्र कोठडीत रात्र जागून काढावी लागली. प्रयत्न करूनही जामीन न मिळाल्याने अखेर शरण आलेल्या या दोघांचीही रवानगी करवीर पोलिस ठाण्यातील कोठडीत केली आहे. मधुमेहाने त्रस्त असलेला घनवट आणि चोरटा म्हणून शिक्का बसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या चंदनशिवेची बडदास्त ठेवण्यासाठी नातेवाईकांची करवीर पोलिस ठाण्यात लुडबूड सुरू आहे. विशेष ट्रीटमेंट मिळावी यासाठी नातेवाईक धडपडत आहेत.

पाच महिने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणारे घनवट आणि चंदनशिवे अखेर सीआयडीकडे शरण आले. पाच महिन्यांपूर्वी हे खाकी वर्दीच्या रुबाबात सराईतांना धाक दाखवत होते. पोलिस खात्यात काम करताना अनेकांना त्यांनी कोठडीपर्यंत पोहोचवले आणि सळ्या मोजायला लावले. एका मोहाच्या क्षणाने मात्र त्यांच्या अंगावरील खाकी वर्दी गेली आणि तेही पोलिस कोठडीत पोहोचले. गुरूवारी शरण आल्यानंतर सीआयडीने घनवट आणि चंदनशिवे या दोघांना करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले. संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू झाल्याने या दोघांची चुळबूळ वाढली. नातेवाईकांकडून त्यांनी ओडोमस आणि मालिश करण्यासाठी तेल मागवले. कोठडीत दुर्गंधी येत असल्याने फिनेल फवारण्याची विनंतीही त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे केली, मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. नातेवाईकांनी आणलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि काही खाद्यपदार्थ कोठडीत पोहोचले.

रात्री अकराच्या सुमारास अचानक सीआयडीचे डीआयजी जय जाधव हे करवीर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी कोठडीची पाहणी केली. ‘घनवट आणि चंदनशिवे यांना इतर आरोपींसारखीच वागणूक द्या. औषधांव्यतिरिक्त कोणतीही विशेष सुविधा त्यांना मिळू नये. कोठडीजवळ नातेवाईकांनाही थांबू देऊ नका,’ अशा स्पष्ट सूचना डीआयजी जाधव यांनी पोलिसांना दिल्या. दरम्यान, डीआयजी जाधव पोहोचण्यापूर्वीच संशयितांच्या नातेवाईकांनी पाण्याच्या बाटल्या आणि काही खाद्यपदार्थ कोठडीत पोहोचवले होते. शुक्रवारी सकाळीही त्यांना चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली. याशिवाय सीआयडीच्या कार्यालयात चौकशीदरम्यानही संशयितांच्या नातेवाईकांनी दोघांसाठी स्पेशल चहा पोहोचवला.

बचावासाठी लुटीचे पैसे

संशयित पोलिसांनी वारणेतून तब्बल ९ कोटी १८ लाख रुपये लंपास केले आहेत. याच लुटीच्या पैशातून ते चोरी प्रकरणातून बचावाचा प्रयत्न करीत आहेत. अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा यासाठी संशयितांनी मुंबईतील नामांकित वकिलांची मदत घेतली. अॅड. हर्षद निंबाळकर, अशोक मुंडरगी, सत्यवर्तक जोशी अशा दिग्गज वकिलांनी संशयितांची बाजू कोर्टात मांडली. गेल्या पाच महिन्यात घनवट हा पुणे, मुंबई आणि राजस्थान येथे राहिला होता. गुरुवारी तो थेट राजस्थानहून खासगी कारमधून कोल्हापुरात पोहोचला आहे. चंदनशिवे यानेदेखील फरार असलेल्या कालावधीत कोट्यवधी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो पोलिसांची पदोन्नती लटकली

$
0
0

Rahul.Jadhav @timesgroup.com

Tweet : @rahuljadhavMT

कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्याची आपण किमान पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून निवृत्त व्हावे, अशी अपेक्षा असते. परंतु राज्यातील हजारो पोलिस शिपायांच्या या अपेक्षेवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. पदोन्नीतीने भरल्या जाणाऱ्या उपननिरीक्षकपदांचा वेग इतका कमी आहे की, चार वर्षांत केवळ ११.१ टक्के लोकांनाच पदोन्नती दिली आहे. एका अंदाजानुसार उर्वरित ८९ टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यासाठी पुढची वीस वर्षे लागू शकतात. साहजिकच हजारो कर्मचाऱ्यांचे अधिकारीपदाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षकपदाची नेमणूक करण्याच्या गुणोत्तरात शिथिलता आणावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.

पोलिस उपनिरीक्षक (सेवा प्रवेश) नियमानुसार या पदाची नेमणूक २५ टक्के पदोन्नतीने, २५ टक्के मर्यादित विभागीय परीक्षेतून (खात्यांतर्गत) आणि ५० टक्के महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. पदोन्नतीने पदे भरण्यासाठी २०१३ मध्ये उपनिरीक्षक अर्हता परीक्षा झाली. याआधी ही परीक्षा २००१ मध्ये झाली होती. सुमारे बारा वर्षांनी झालेल्या परीक्षेत राज्यातून सुमारे १९३८४ कर्मचारी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी चार वर्षांत केवळ २१६३ उमेदवारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. विभागीय अर्हता परीक्षेसाठी २५ टक्के म्हणजे २२४२ जागाच उपलब्ध आहेत. त्यामुळे या पदावर केवळ २२४२ उपनिरीक्षकच कार्यरत राहू शकतात. साहजिकच विभागीय अर्हता परीक्षा पास झालेल्या १७२२१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे अशक्य आहे. त्यामुळे परीक्षेत पास होऊनही या कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळण्याआधीच निवृत्त व्हावे लागणार आहे. या पदाच्या गुणोत्तराचे नियम १९९५ साली करण्यात आले आहेत. अर्हता परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, या नियमामध्ये काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. हे नियम तयार केले त्यावेळी पदवीधर उमेदवार पोलिस दलात नव्हते. परंतु आता ९० टक्के उमेदवार पदवीधर आहेत. त्यामुळे या गुणोत्तरात बदल करणे आवश्यक आहे. शिवाय या नियमांमध्ये गुणोत्तर अर्थात कोटा पध्दती शिथिल करण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर सरकारने या उमेदवारांना पदोन्नती दिल्यास त्यांच्या ग्रेड पेमध्ये फक्त २५०० वरून ४३०० इतका बदल करावा लागतो. त्यामुळे केवळ १५०० ते १८०० रूपये ग्रेड पे इतकाच बोजा सरकारवर पडतो. त्यामुळे अल्प खर्चात अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. आपल्या या न्याय्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी पोलिस महासंचालकांसह गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रिपद असल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात जातीने लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

..............

चौकट

तोंड दाबून बुक्क्यांचा मार ...

अनेकजणांना परिस्थितीमुळे पोलिस दलात ​शिपाई म्हणून भरती व्हावे लागते. त्यानंतर कामाचा व्याप आणि जबाबदाऱ्या यामुळे अनेक होतकरू कर्मचाऱ्यांचे अधिकारीपदाचे स्वप्न अधुरेच राहते. शिवाय पोलिस दलात संघटना करण्यावर बंदी असल्याने याबाबत संघटितपणे मागणीही करता येत नाही. साहजिकच सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची आपल्यावरील अन्यायाबाबत मात्र ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ खात असल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गोळीबार करूनपेट्रोलपंप लुटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
कडेगावात गोळीबार करून चोरट्यांनी पेट्रोलपंप लुटल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. एकदा भिंतीवर आणि दुसऱ्या वेळी हवेत गोळीबार करून तलवारीचा धाक दाखवून दोन चोरट्यांनी ४० हजारांची रोकड घेऊन मोटारसायकलवरुन पोबारा केला. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन चौकशी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार मोहनराव कदम यांचे चिरंजीव शांताराम कदम यांच्या मालकीचा पेट्रोल पंप असल्याचे सांगण्यात आले.
कडेगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पेट्रोलपंपावर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन दोघे आले. त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी आल्याचे भासवले. त्यानंतर लगेच गोळीबार करून केबिनमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी पुन्हा भिंतीवर गोळी झाडली. कामगार संजय मांडवे आणि हणमंत कदम, सुरक्षा रक्षक जैनुद्दीन जमादार आदींना तलवारीचा धाक दाखवून ४० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. दोन्ही कामगारांचे दोन मोबाइल घेऊन मोटारसायकलवरुन पोबारा केला. पंपावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच कडेगाव पोलिस धावले. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, चोरट्यांचा मार्ग सापडला नाही. या बाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाई पंजाबराव चव्हाणांचे निधन

$
0
0

भाई पंजाबराव चव्हाणांचे निधन

कराड : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, कृषिभूषण व पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई पंजाबराव चव्हाण यांचे शनिवारी पहाटे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
भाई पंजाबराव नाईकजी चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगाव या छोट्याशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभारगाव येथे झाले. पुढील माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंदौरला गेले. माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांचे ते पुतणे होत. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे चुलत बंधू होत. आनंदराव चव्हाण त्यावेळी यशवंतराव होळकर यांचे सेक्रेटरी होते. ते इंदौरला असल्यामुळे भाईंचे शिक्षण इंदौरला झाले. ते १९४९मध्ये नेव्हीमध्ये दाखल झाले. नेव्हीत असताना ते अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअर येथे होते. १९४९ ते १९५५ पर्यंत त्यांनी नेव्हीत नोकरी केली.
त्यांच्यावर डाव्या विचारांचा पगडा होता. त्यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये काम केले. त्यांनी एस. एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृतराव डांगे यांचेबरोबर काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ औंध संस्थानिकांच्या बनावटसहीने जमिनीचा व्यवहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
ओगलेवाडी येथील तत्कालीन ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी येथील ज्येष्ठ वकिलास पोलिसांनी आज अटक केली. अॅड. विजय भगवान पाटील (रा. कराड) असे त्यांचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी हजारमाची (ता. कराड) गावचे पोलिस पाटील मुकुंद नामदेव कदम यांनी फिर्याद दिली होती. त्या प्रकरणात तब्बल पाच वर्षांनी अॅड. विजय भगवान पाटील यांना अटक झाली आहे. या व्यवहारात औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आले होते.
ओगले काच कारखान्याला औंध संस्थानाने ९९ वर्षांच्या करारने सन १९२३मध्ये १४ एकर १९ गुंठे जमीन नाममात्र भाडेतत्वाने दिली होती. ओगले काच कारखान्याच्या विसर्जनानंतर त्या जमिनीबाबत काही व्यवहार झाले. ते व्यवहार बनावट असल्याची फिर्याद मुकुंद नामदेव कदम यांनी येथील न्यायालयात ७ जुलै २०१२ रोजी दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणाच्या सखोल पोलीस तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार ओगले काच कारखान्याची सिटी सर्व्हे नं. ४४, ४८, ४९, ५०, ५१ याचे व्यवहार झाले असून, ते व्यवहार भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी विक्रम अण्णा सोनवणे यांच्याशी संगनमत करून झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यांनी त्याचवेळी अटकपूर्व जामिन घेतला आहे.
दरम्यान, अॅड. पाटील यांनी केलेल्या व्यवहारामध्ये ओगले काच कारखान्याची या जागेवरची नोंद बनावट कागदपत्राद्वारे रद्द केली आहे. तसेच या प्रकरणात आमणे नावाच्या व्यक्तीची कागदपत्रे सादर करण्यात आली असल्याचे येथील पोलिस तपासात समोर आले आहे. मुकुंद नामदेव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणी गायत्रीदेवी यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यात त्यांनी कोणत्याही प्रकरची सही अथवा खरेदीपत्राला परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गायत्रीदेवी यांचीही यामध्ये फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
या प्रकरणी अॅड. पाटील यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा कोर्टाने फेटाळला आहे. पोलिसांनी शुक्रवारी अॅड. पाटील यांना अटक केली. शुक्रवारी सायंकाळी त्यांना कोर्टाने सोमवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादात अडकले १५ कोटी

$
0
0


Gurubal.mali@timesgroup.com

Tweet:@gurubalmaliMT

कोल्हापूर ः शहराच्या विकासासाठी पंधरा कोटींचा विशेष निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; पण वाटपाच्या वादात निधी मंत्रालयात अडकून पडला आहे. अशाच वादात सात कोटींचा निधी दोन वर्षे खर्चाविना पडून असल्याच्या पार्श्वभूमीवर पंधरा कोटींचा नवा अध्याय सुरू झाला आहे. यामुळे मात्र महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या वादाचा फटका शहर विकासाच्या निधीला बसत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने २० कोटींचा विशेष निधी महापालिकेला दिला होता. हा निधी भाजप सरकारने दिल्याने महापालिकेतील भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रभागातच हा निधी जादा खर्च व्हावा असा आग्रह धरण्यात आला. पण सत्ता आमची असल्याने निधी आम्हालाच हवा असा हट्ट धरतानाच दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची विभागणीदेखील तशीच केली. प्रभागात कामे आहेत की नाहीत हे न पाहता प्रत्येक नगरसेवकाच्या नावावरच निधी दिला. सत्ताधारी नगरसेवकांना ८० टक्के तर विरोधकांना २० टक्के असे या निधीचे वाटप करण्यात आले. निधी असतानाही काही नगरसेवकांनी कामेच न सुचवल्याने सात कोटींचा निधी पडून आहे. या निधीच्या खर्चासाठी नव्याने प्रक्रिया करावी लागली.

विरोधकांना कमी निधी मिळाल्याने त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विनंती केली. त्यानुसार आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यानुसार पंधरा कोटींचा विशेष निधी पुन्हा मंजूर करण्यात आला; पण हा निधी महापालिकेस देण्यासाठी त्यास महासभेचा ठराव लागतो. असा ठराव करण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर निधी आल्यानंतर पूर्वीप्रमाणे ८० टक्के सत्ताधारी तर २० टक्के निधी विरोधकांना देण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. निधी आम्ही मंजूर केल्याने ८० टक्के निधी भाजप-ताराराणी आघाडीला देण्याची मागणी करण्यात आली; पण हा प्रस्ताव सत्ताधारी गटाला मान्य नाही. कुणाला किती​ टक्के यावरच दोन्ही आघाडीत गेले अनेक दिवस वादावादी सुरू आहे.

महापालिकेकडे निधी नसल्याने शहरातील कामे प्रलंबित आहेत. दुसरीकडे निधी मिळूनही त्याच्या वाटपाचा वाद मिटत नसल्याने १५ कोटींचा निधी मुंबईत अडकला आहे. हा निधी तातडीने मिळावा यासाठी ८० टक्क्यांचा आग्रह मागे घेत प्रथम ७०, तर नंतर ६० टक्के निधी विरोधकांना देण्याचा प्रस्ताव पुढे केला; पण त्याला ​सत्ताधारी गटाने अजूनही मान्यता दिली नाही. गेले महिनाभर कुणाला किती टक्के, हा वादच मिटत नसल्याने ठरावाला मुहूर्त मिळण्यात अडचणी येत आहेत. नेते या वादात भाग घेत नसल्याने आणि महापालिकेत कारभारी हट्ट सोडत नसल्याने फटका मात्र शहराच्या विकासाला बसत आहे.


भाजप सरकारने यापूर्वी दिलेला २० कोटींचा विशेष निधी सत्ताधारी गटाने आपल्या नगरसेवकांनाच दिला; पण नव्याने मंजूर झालेल्या निधीतील किमान ७० टक्के विरोधकांना द्यावा हा आमचा आग्रह आहे. आमच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळणार असल्याने त्यावर आमचाच हक्क आहे.

विजय सूर्यवंशी, गटनेते भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इम्रानही मृतदेह काढण्यात यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

सहा दिवसांपुर्वी आंबोली परिसरातील कावळेसाद दरीत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांपैकी इम्रान गारदी (रा. हुनगिनहाळ, ता. गडहिंग्लज) या तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शोधपथकांना यश मिळाले. दुपारी अडीचच्या सुमारास लोणावळ्याच्या शिवदुर्ग-मित्र शोधपथकाने सांगेलीकरांसह संयुक्तरित्या प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला. शुक्रवारी (ता.४) सांगेलीकरांनी प्रताप उजगरे याचा मृतदेह दरीतून वर काढला होता. आंबोली आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह इम्रानचे वडील व इतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, शनिवारी घटनास्थळाला सिंधुदूर्गचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन माहिती घेतली.

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (ता.३१) गडहिंग्लज तालुक्यातील आत्याळ परिसरातील पोल्ट्री फार्मवरील कामगार पावसाळी पर्यटनासाठी आंबोली परिसरात आले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील कावळेसाद दरीमध्ये त्यांच्यापैकी इम्रान व प्रताप हे दोन तरुण कोसळले होते. तत्परतेने शोधमोहीम सुरू झाली पण प्रतिकूल वातावरणामुळे थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी एक मृतदेह दरीमध्ये आढळून आला. प्रथमत: हे दोघेजण जेवणावरून उठून परिसरामध्ये बेपत्ता झाल्याचा बनाव करण्यात आला. तर त्यानंतर सेल्फी काढताना हे दोन तरुण पाय घसरून दरीत पडल्याची वदंता पसरविण्यात आली होती. मात्र हे दोघेजण अतिमद्यसेवन केल्याने सुमारे ८०० फूट खोल दरीच्या कठड्यावर बांधलेल्या रेलींगच्याही पुढे अतिधोकादायक टोकावर गेले होते व अतिरेकी स्टंटबाजी करीत असताना पडले होते. येथे असलेल्या पर्यटकांनी किंवा त्यांच्यातीलच एकाने काढलेल्या व्हिडिओमुळे हे वास्तव समोर आले. त्यानंतर सलग चौथ्या दिवसापर्यंत कोल्हापूरच्या पथकांकडून प्रयत्न करूनही अपयश आल्यामुळे दोन्ही मृतदेह दरीतच राहिले. पावसाचा जोर, दाट धुके आणि दरीवरून कोसळणारा पाणीप्रवाह यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. शुक्रवारी सांगेलीच्या पथकाने प्रतापचा, तर शनिवारी लोणावळ्याच्या पथकाने सांगेलीकरांच्या सहकार्याने इम्रानचा मृतदेह वर काढला. सकाळी साडेआठच्या सुमारास लोणावळा पथकातील रोहित वर्तक व गणेश गीध दरीत उतरले. प्रतापचा मृतदेह आढळलेल्या दरीतील स्थळापासून तीसेक फूटवरच एका दगडाच्या खोबणीमध्ये इम्रानचा मृतदेह अडकून राहिला होता. एका पॉलिथीन पिशवीत बांधून तो मृतदेह त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांसह सांगेलीच्या साहसवीरांनी वर काढला. दरम्यान शुक्रवारी कळविल्याप्रमाणे येथे येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवराण पथकास निरोप देण्यात आला. त्यामुळे ते आले नाहीत.

अश्रूंना फुटला बांध

पहिल्या दिवसापासून पाऊस-वाऱ्याची तमा न बाळगता, आशा-निराशेचा सामना करणाऱ्या इम्रानच्या वयोवृद्ध वडिलांनी आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. शंभरहून अधिक तास खोल दरीत पाऊस-पाण्यात मुलाचा मृतदेह पडून राहिल्याने त्यांनी आक्रोश केला. त्यामुळे त्यांच्या नातलगांसह त्यांच्यासोबत सलग सहा दिवस तेथे तळ ठोकून राहिलेल्या गडहिंग्लज भाजप अध्यक्ष राजेंद्र तारळे व मित्रमंडळींनाही अश्रू आवरले नाहीत.

तब्बल ११६ तास शोधमोहीम

या दुर्घटनेमध्ये ८०० फूट खोल कावळेसाद दरीमध्ये कोसळलेल्या दोन मृतदेह शोधण्याची मोहीम तब्बल ११६ तास चालली. सोमवारी पोलिसांना माहिती मिळाल्यापासून सांगेलीकर पथक व स्थानिक तरुणांनी शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची तीन पथके त्यात सामिल झाली. तर आज सहाव्या दिवशी लोणावळ्याचे मिळून सहा पथकांनी या शोधकार्यात सहभाग घेतला. यापैकी कोल्हापूर पथकातील दोघे साहसवीर अडकल्यामुळे तिसऱ्या दिवशी रात्रभर दरीतच थांबले होते. या रोमहर्षक शोधमोहिमेत काल ९२ तासांनी प्रतापचा, तर आज ११६ तासांनी इम्रानचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएसकडून अंबाबाई मंदिराची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे आणि कोल्हापूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेची संयुक्त पाहणी केली. प्रवेशद्वारातील सुरक्षा यंत्रणेसह मंदिरातील सीसीटीव्ही आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक सूचना देण्यात आल्या, तर देवस्थान समितीला बंद लिफाफ्यातून सूचना दिल्या आहेत.

मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याने मंदिरातील सुरक्षा वाढवली आहे. चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टरसह भाविकांची झडती घेतली जाते. शनिवारी पुणे आणि कोल्हापुरातील दहशतवाद विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांनी मंदिरातील सुरक्षेची पाहणी केली. महाद्वार, दक्षिण दरवाजा, घाटी दरवाजा आणि दिंडी दरवाजा या चारही दरवाजांवरील मेटल डिटेक्टर, पोलिसांची झडतीच्या पद्धतीची तपासणी पथकाने माहिती घेतली. शिवाय मंदिरासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पाहणी केली. पथकाने देवस्थान समितीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये जाऊन मंदिरातील चित्रीकरण पाहिले. दर्शनरांग, गरुड मंडप, आवारातील दुकाने यांचीही बारकाईने पाहणी केली. यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांना सुरक्षेबाबत आवश्यक सूचना केल्या.

मंदिर परिसरातील बेवारस वस्तूंबाबत भाविकांसह पोलिसांनाही गांभीर्य नसल्याचे पाहणीत समोर आले आहे. बेवारस वस्तूंबाबत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तपासणी करावी. सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये सतत एक कर्मचारी उपस्थित असणे गरजेचे आहे. साध्या वेशातील पोलिसांनी मंदिर परिसरात टेहळणी करावी, अशा सूचना पुणे पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन माने यांनी केल्या. माने यांनी सुरक्षेबाबत बंद लिफाफ्यातून देवस्थान समितीकडे सूचना दिल्या असून, याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, कोल्हापूर दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक जावेद सय्यद, हेडकॉन्स्टेबल संजय क्षीरसागर, उदय पवार, राजू घाटगे, सूरजित चव्हाण, झाकीर इनामदार, आधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणेकरांबाबत संघर्ष समिती आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्याने उद्भवलेल्या वादानंतर पुजारी बाबूराव ठाणेकर मंदिरात जात असल्याने पुजारी हटाओ संघर्ष समिती आक्रमक बनली आहे. ठाणेकर पितापुत्रांना मंदिरात प्रवेश दिल्यास कोल्हापूरची जनता खपवून घेणार नाही, असा इशारा संघर्ष समितीने पोलिसांना दिला आहे. शनिवारी पुजारी बाबूराव ठाणेकर यांनी मंदिरात जाऊन पूजा विधीत सहभाग घेतल्याने संतप्त झालेल्या संघर्ष समितीने शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याशी चर्चा करून पोलिस पुजाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. याविरोधात रविवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

पुजारी अजित ठाणेकर, बाबूराव ठाणेकर यांनी मूर्तीला घागरा-चोलीचा पोषाख परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत प्रशासनाच्या बैठकीत ठाणेकर पिता-पुत्र मंदिरात येणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र शुक्रवारी बाबूराव ठाणेकर मंदिरात गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. शनिवारी पुन्हा ते पोलिस बंदोबस्तात मंदिरात जाऊन पूजा विधीत सहभागी झाले. याबाबत पोलिसांना जाब विचारण्यासाठी समितीच्या सदस्यांनी शनिवारी सायंकाळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांची भेट घेतली. ‘एकदा निर्णय झालेला असताना बाबूराव ठाणेकर मंदिरात आलेच कसे? त्यांच्या पुढे व पाठीमागे चार पोलिस होते. याचा अर्थ त्यांनी पोलिस बंदोबस्त घेतला होता काय? बंदोबस्ताचे पैसे भरले आहेत का?’ अशा प्रश्नांचा भडीमार डॉ. अमृतकर यांच्यावर केला. संजय पवार, विजय देवणे, दिलीप देसाई, डॉ. सुभाष देसाई, माजी आमदार सुरेश साळोखे यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत पोलिस ठाणेकर पितापुत्रास पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.डॉ. अमृतकर यांनी कृती समितीच्या भावना ऐकूण घेतल्यानंतर मंदिरात जाण्याचा बाबूराव ठाणेकरांचा अधिकार असून, त्यांची अडवणूक करणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. अमृतकर यांच्या उत्तरावर संतापलेल्या समिती सदस्यांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिसच ठाणेकर पितापुत्राला पाठीशी घातल असल्याचा आरोप केला. सरकारी पुजारी नेमण्याबाबत सरकारचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ठाणेकर पितापुत्रांचा मंदिरातील प्रवेश रोखावा या मागणीसाठी रविवारी (ता. ६) जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.यावेळी कृती समितीचे आर. के. पोवार, विजय देवणे, संजय पवार, माजी आमदार सुरेश साळुंखे, वसंतराव मुळीक, डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, सचिन तोडकर, आनंद माने, बाबा पार्टे, जयश्री चव्हाण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या मालमत्तेवर टाच येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी विनय बाबूराव पवार (वय ३५, रा. उंब्रज) आणि सारंग दिलीप अकोलकर (वय ३७, रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांना फरार उद्घोषित करण्यात आले. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे ही मागणी केली होती. शनिवारी (ता. ५) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश बिले यांनी संशयितांना फरार उद्घोषित करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी दिली. ३० दिवसात संशयित पोलिसात हजर न झाल्यास संशयितांच्या संपत्तीवरही टाच येण्याची शक्यता आहे.

कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी शनिवारी न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पानसरे हत्येतील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना फरार उद्घोषित करण्याची मागणी अर्जाद्वारे केली होती. शनिवारी राणे यांनी या अर्जावर युक्तिवाद केला. ते म्हणाले, ‘विनय पवार आणि सारंग अकोलकर हे पानसरे हत्येतील महत्त्वाचे संशयित आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी झाले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी यांच्या अटकेची गरज आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते स्वतःची ओळख लपवत आहेत. अटकेसाठी त्यांना फरार उद्घोषित करावे आणि संशयितांची संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळावी.’ राणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बिले यांनी संशयितांना फरार घोषित (उद्घोषित) करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी दिली. ३० दिवसांच्या कालावधीत संशयितांचे फोटो, माहिती राज्यासह परराज्यात प्रसिद्ध करावी लागणार आहेत. यादरम्यान संशयित पोलिसांच्या ताब्यात न आल्यास कोर्टाच्या परवानगीने त्यांना फरार घोषित करून संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती अॅड. राणे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी संशयित समीर गायकवाड, अॅड. समीर पटवर्धन कोर्टात उपस्थित होते. पुढील सुनावणी २१ सप्टेबरला होणार आहे.

दरम्यान, समीर गायकवाडने १४ ते २६ ऑगस्ट दरम्यानच्या रविवारी मुंबईतील दादर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची परवानगी अर्जाद्वारे कोर्टाकडे मागितली. पोलिस आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी समीरच्या जामिनाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. याबाबात कोर्ट कामासाठी मुंबईला जाणे आवश्यक असल्याने जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. याला कोर्टाने परवानगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिब्बल, चिदंबरम् बाजू मांडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘२००८ मधील अपात्र कर्जमाफी मिळविण्यासाठी ‘नाबार्ड’ने हरकत घेतल्यानंतर सेवा सोसायटी व शेतकऱ्यांना सुप्रीम कोर्टाने नोटिसा पाठवल्या आहेत. सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी अॅड. शिवाजीराव जाधव यांच्याकडून योग्य मसुदा तयार करून घेतला आहे. ज्येष्ठ वकिलांना मसुदा दाखवून कोर्टात सादर केला जाणार आहे. कर्जदारांची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम् यांची नियुक्ती केली जाणार असून, विधिज्ञांची संपूर्ण फी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकाही बँकेच्यावती देण्यात येईल,’ अशी घोषणा अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. जोपर्यंत कर्जमाफीची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला.

२००८ मध्ये अपात्र कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचा मेळावा जिल्हा परिषद सोसायटीच्या हॉलमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘तत्कालीन केंद्र सरकारने २००७ मध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊन २००८ मध्ये पाच एकरांपर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. २००९ मध्ये कर्जमाफीची रक्कम संपूर्ण वर्ग झाली. त्यानंतर झालेल्या तक्रारीनंतर नाबार्डने पुन्हा कर्जाची वसुली करून कर्जदारांच्या खात्यावर वर्ग केली. त्यानंतर न्यायालयीन लढाईमध्ये जानेवारी २०१७ मध्ये हायकोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. कोर्टाच्या निर्णयानंतर नाबार्डने केंद्र सरकारकडे रकमेची मागणी केली. केंद्र सरकारने नकार देत नाबार्डला अपील करण्याची सूचना दिली. न्यायालयीन निर्णयानंतर तीन महिन्यांत अशी प्रक्रिया अपेक्षित असते, पण तब्बल सात महिन्यांनी नाबार्डने अपील दाखल केले आहे. सुप्रीम कोर्टाने अपील फेटाळले असते, तर समस्या निकालात निघाली असती. पण पुन्हा सेवा सोसायटी व शेतकऱ्यांना नोटिसा दिल्याने पुन्हा लढा द्यावा लागेल. कर्जमाफीची रक्कम कोणत्याही स्थितीत परत आणण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल व चिदंबरम् यांची मदत घेणार आहे. यासाठी संपूर्ण खर्च जिल्हा बँक करणार आहे.’

सीईओ प्रतापसिंह चव्हाण म्हणाले, ‘कर्जमाफी जाहीर करताना कमाल मर्यादेचा (कम) निकष नव्हता. त्यामुळे वसूल केलेली ११२ कोटी आणि व्याज असे २७० कोटी रुपये परत मिळण्यासाठी नाबार्ड व आरबीआयला सातत्याने बँकेने पत्रव्यवहार केला आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना नव्या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये ९१ टक्के कर्जदार पात्र ठरत असून पात्र कर्जदारांनी ऑनलाइन फॉर्म भरावेत, त्यासाठी जिल्हा बँक मदत करणार आहे.’

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ‘अनेक आंदोलनांच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी इतिहास घडवला आहे. कर्जमाफीच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती करावयाची आहे. कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला, तरी विविध निकषांच्या आधारे त्यांना कर्जमाफी द्यायची नाही. सरकार झोपले असले तरी त्याला जाग करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.’

मेळाव्यानंतर जिल्हा बँकेच्या निरीक्षक व सेवा सोसायटी सचिवांची बैठक झाली. यावेळी कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्यास मदत करण्याच्या सूचना जिल्हा बँकेच्यावतीने दिल्या. मेळाव्यास संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर, पी. जी. शिंदे, प्रताप ऊर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, उदयानी साळुंखे, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, दत्तात्रय पाटील, अशोकराव पाटील, रामचंद्र मोहिते आदी उपस्थित होते. याचिकाकर्ते प्रकाश तिपन्नवार यांनी अपात्र कर्जमाफीची माहिती विशद केली.

९१ टक्के शेतकरी पात्र

केंद्र सरकारने २००७ मध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर तत्कालीन पंतप्रधानांची २००९ मध्ये कर्जमाफी पत्रके मिळाली. त्यानंतर झालेल्या तक्रारीनंतर २०१२ मध्ये अपात्र रक्कम पुन्हा खातेदारांच्या कर्जखात्यावर वर्ग केली, त्यामुळे सर्व कर्जांचे पुनर्गठण झाले. सध्या राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये २००९ पासूनच्या थकीत कर्जांचा समावेश केला आहे. त्यानुसार अपात्र कर्जमाफीतील ९१ टक्के शेतकरी यासाठी पात्र ठरत असून, त्यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरण्याचे आवाहन सर्वच वक्त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनवट, चंदनशिवेच्या घरांची झडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील ९ कोटी १८ लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी सीआयडीकडे शरण आलेले विश्वनाथ घनवट आणि सूरज चंदनशिवे या दोघांच्या संगलीतील घरांची झडती घेण्यात आली. सीआयडीच्या दोन पथकांनी शुक्रवारी रात्री बारा ते शनिवारी पहाटेपाचपर्यंत ही कारवाई केली. या कारवाईत सीआयडीने दोन्ही सशयितांच्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. शनिवारी या दोघांनाही वेगवेगळ्या कोठडीत ठेवून स्वतंत्र चौकशी करण्यात आली.

पन्हाळा कोर्टाने घनवट आणि चंदनशिवे या दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर सीआयडीने गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास सीआयडीचे प्रभारी अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्यासह दोन अधिकारी आणि आठ कर्मचाऱ्यांच्या दोन पथकांनी करवीर पोलिस ठाण्यातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर सांगलीतील सिद्धीविनायकपूरम येथील घनवटच्या रो बंगल्याची झडती घेतली. याचवेळी दुसऱ्या पथकाने चंदनशिवे याच्या वारणाली येथील ५ व्या गल्लीतील फ्लॅटची झडती घेतली. दोघांचेही नातेवाईक बाहेरगावी असल्याने घरे बंद होती. पहाटे पाचपर्यंत झडती आणि चौकशीचे काम सुरू होते. दोन्ही पथके शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास कोल्हापुरात परतली. या झडतीमध्ये दोन्ही संशयितांच्या घरात रोख रक्कम किंवा किमती ऐवज हाती लागला नाही, मात्र काही महत्त्वाची कागदपत्रे सीआयडीला मिळाली आहेत.

विश्वनाथ घनवट याला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने चौकशीत वारंवार अडथळे येत आहेत. प्रश्नांचा भडीमार करताच त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने काही वेळ थांबून पुन्हा चौकशी करावी लागत आहे. सूरज चंदनशिवे याच्याकडूनही चौकशीत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस कोठडीतील वेळ वाया घालवण्यासाठी संशयितांकडून आरोग्याची तक्रार पुढे केली जात असल्याचा संशय तपास पथकांना आहे.


दोघांची स्वतंत्र चौकशी

सीआयडीने घनवट आणि चंदनशिवे यांच्या घरांची झडती घेतल्यानंतर या दोघांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. सांगलीतून पुन्हा कोल्हापुरात आल्यानंतर घनवट याला राजारामपुरी पोलिस ठाण्यात, तर चंदनशिवे याला करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले आहे. वेगवेगळ्या पथकांद्वारे दोघांचीही स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

आम्हाला अडकवण्याचे षङ्यंत्र

वारणानगर येथील चोरीचा आम्ही तपास केला, मात्र यातील रक्कम आम्ही चोरली नाही. पोलिस दलातील काही विरोधकांनीच राजकारण करून सांगली एलसीबीला बदनाम करण्यासाठी षङ्यंत्र रचले आहे. आमची बाजू आम्ही

कोर्टात मांडू, अशी माहिती घनवट याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे दिली.

संशयितांना वारणानगरात फिरवणार

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत ज्या इमारतीतून कोटयवधींची रोकड संशयितांनी लांपास केली त्या ठिकाणी त्यांना फिरवले जाणार आहे. लुटीतील रक्कम शोधण्यासाठी संशयितांचे मित्र व काही पाहुण्यांकडेही चौकशी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल १३५ वर्षे वाहतुकीचा भार सोसणाऱ्या शिवाजी पुलाला कोणताही धोका नसल्याचा अहवाल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आला. पण, दोन महिने उलटण्यापूर्वीच रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या धोकादायक पुलाच्या यादीत त्याचा समावेश असल्याचे जाहीर केले. यामुळे या पुलासह पश्चिम महाराष्ट्रातील महामार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी महामार्ग विभागाने तातडीने कन्सल्टंटची नियुक्ती केली आहे.

देशातील शंभर धोकादायक पुलांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात कोल्हापुरातील शिवाजी पुलासह सांगलीतील चार पुलांचा समावेश आहे. हे सर्व पूल ब्रिटीशकालीन असून शंभर वर्षांपूर्वीचे आहेत. बरीच वर्षे या पुलांनी वाहतुकीचा भार सोसल्याने ते धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढत ही यादी तयार करण्यात आली. प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी सार्वजिनक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील चारशेवर पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यामध्ये एकही पूल धोकादायक स्थितीत नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. शिवाय राष्ट्रीय महामार्ग विभागानेही शिवाजी पुलासह काही पुलांची तपासणी केली. त्यात या पुलांना कोणताही धोका नसल्याचा अहवाल पाठवण्यात आला.

शिवाजी पूल धोकादायक असल्याचे जाहीर होताच कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्ग विभागालाही आश्चर्याचा धक्का बसला. धोक्याचा कोणताही अहवाल पाठवला नसताना केवळ जुना आहे म्हणून ‘धोकादायक’ असा निष्कर्ष काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. या विभागाच्यावतीने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी केआयटी कॉलेजची नियुक्ती केली होती. पण हे कामच झाले नाही. आता ध्रुव कन्सल्टंटकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचेही ऑडिट करण्यात येणार आहे.

===

शिवाजी पुलाची पावसाळ्यापूर्वी पाहणी केली आहे. त्याला कोणताही धोका नसल्याचे आढळले आहे. पूल १३५ वर्षांपूर्वीचा असल्याने धोकादायक पुलांच्या यादीत त्याचे नाव घेतले गेले आहे. तो धोकादायक असल्याचा कोणताही अहवाल दिलेला नाही.

विजय कांडगावे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात पाच ठिकाणी प्लास्टिक बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्लास्टिकमुक्त कोल्हापूर’अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात पाच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड, कपिलतीर्थ मार्केट, मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि जनरल मटण मार्केट या भागात सरसकट प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून यासंदर्भात अहवाल तयार केला असून, तो आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईची व्याप्ती वाढविण्यासाठी पाच डिजिटल थिकनेस मीटरची खरेदी केली आहे.

कोल्हापुरात प्लास्टिक आणि ई-कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. या पिशव्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरासही मनाई आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने यापूर्वी तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकांमार्फत शहरातील विविध भागांतील दुकानांची तपासणी केली जाते. एका पथकात तीन आरोग्य निरीक्षकांचा समावेश आहे.

शहरातील काही भागात, दुकानात अजूनही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. कारवाईची व्याप्ती वाढविण्यासाठी महापालिका आणखी दोन पथकांची स्थापना करणार आहे. प्लास्टिक पिशव्यांची जाडी मोजण्यासाठी आणि कारवाई प्रभावी करण्यासाठी महापालिकेने पाच डिजिटल थिकनेस मीटरची खरेदी केली आहे. मीटरच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्यांची जाडी ज्या त्या ठिकाणी मोजता येणार आहे. पथकांकडे डिजिटल थिकनेस मीटर सोपविण्यात येणार आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाने व स्थायी समितीने संपूर्ण शहरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार प्रशासन प्लास्टिकमुक्त कोल्हापूरसाठी प्रयत्नशील आहे. त्याची सुरुवात म्हणून पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. आरोग्य विभागाकडून ​ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी, मार्केटचा समावेश आहे. अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड, कपिलतीर्थ मार्केट, मध्यवर्ती बसस्थानक परिसर आ​​णि लक्ष्मीपुरी येथील मटण मार्केट ही ठिकाणे प्रस्तावित केली आहेत.

.................

कायदा व नियमावलींच्या चौकटीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली जाईल. संपूर्ण शहरात एकाचवेळी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी न आणता टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. लोकांमध्ये जागृती घडवली जाईल. प्लास्टिकमुक्त कोल्हापूरसाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारासाठी रुग्णांचा डोलीतून प्रवास

$
0
0

भगवान शेवडे, शिराळा

डीजिटल इंडिया, मेक इन इंडिया सारख्या अनेक योजना देशपातळीवर मोठा गाजावाजा करून राबविल्या जात आहेत. मात्र, स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनंतर दुर्गम आणि डोंगरकपाऱ्यांत वसलेल्या अनेक गावांसाठी आपण साधे रस्तेही बांधू शकलो नाही, ही वस्तूस्थिती आहे. चांदोली धरणाच्या खाली वसलेल्या आरळापैकी भाष्टेवाडी गावाला ये-जा करण्यासाठी आजही रस्ता नाही. आजारी माणसाला डोलीत बसवून दहा किलोमीटर आंतर पायी चालून उपचारासाठी आणावे लागते. पावसाळ्यात तर हा प्रकार आजारी माणसाची आणि त्यांच्या कुटुंबीयांची कसोटीच पाहणारा ठरतो आहे.
आरळापैकी भाष्टेवाडी चांदोली धरणाच्या खाली दुर्गम ठिकाणी वसलेले गाव आहे. गावात एखादा माणूस आजारी पडल्यास दहा किमी पायपीट करावी लागते. गंभीर आजारी पेशंटला डोली करून आरळागावापर्यंत घेऊन जावे लागते. शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात डोंगरदऱ्यांत अनेक वाड्या वस्त्या आहेत. या वाडी वस्तींतील लोकांना दळणवळणाच्या आणि आरोग्याच्या सुविधा स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनतरही उपलब्ध झाल्या नाहीत.
चांदोली धरण परिसरात पडणारा तुफान पाऊस, जंगलातील प्राण्यांची भीतीसह अनेक समस्यांना ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे सामोरे जावे लागत आहे. सरकारने गांभीर्याने या वस्त्यांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी या वाडी वस्तीतील लोकांची मागणी आहे. भाष्टेवाडी १०० ते १२५ लोकवस्तीचे गाव आहे. अनेक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असणाऱ्या गावाला दळणवळणाचे साधन नाही. त्यामुळे दैनंदिन कामांसाठीही दहा किमी अंतर पायपीट करून जावे लागते. गंभीर रुग्णांना डोलीत घालून जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे लागते. वस्तीकडे जाण्यासाठी बेरडेवाडी मार्गे डोंगरातून ओढे, वगळी पार करून वाडीकडे जावे लागते. पावसाळयात तर येथील विध्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना ओढ्याच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. आजारी रुग्णाला डोलीतून किंवा शिडीवर झोपवून डोंगरातून पायवाटेने बेरडेवाडीमार्गे जवळजवळ दहा किलोमीटर अंतर पार करून आरळा गावात उपचारासाठी न्यावे लागते. रुग्णांना उपचार वेळेत न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. प्रशासन आणि सरकारचे अशा दुर्गम भागातील गावांकडे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळा जीवाचा अंत पाहणारा
डोंगरकपारींत वसलेल्या वाडी-वस्तीतील ग्रामस्थांना पावसाळा नकोसा वाटतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर मे महिन्यात संसारउपयोगी साहित्य व इतर गरजेच्या वस्तू आणून ठेवाव्या लागतात. पावसाळयात वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी लागणाऱ्या ओढ्यामुळे या लोकांना वस्ती सोडून बाहेर पडता येत नाही, अशी अवस्था येथील लोकांची आहे. आजारी रुग्ण त्या परिस्थितीत देवावर विश्वास ठेऊन दिवस काढतात. वस्तीतील तरुण आणि बहुतांशी पुरुष मंडळी मुंबईत चाकरमाने म्हणून काम करतात, त्यामुळे महिला, वयोवृद्ध व्यक्ती आणि शाळकरी मुलेच वस्तीवर आसतात. रस्ताच नसल्यामुळे सरकारच्या सोयी-सुविधांपासून या वाड्या वंचित राहिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी वस्तीतील राजाराम पांडू भाष्टे, या रुग्णाला हृदयविकाराचा त्रास जाणऊ लागल्याने डोली करून रुग्णालयात घेऊन जावे लागले. सरकारने या भाष्टेवाडीकडे जाणारा रस्ता करावा व उपचार वेळेत न मिळाल्याने दगावणाऱ्या रुग्णांचे जीव वाचवावेत,अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. या बाबत बोलताना आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील आरळापैकी भाष्टेवाडीत जायला रस्ता नाही, हे वास्तव आहे. भाष्टेवाडीला जाताना दोन मोठे ओढे लागतात. त्यामुळे त्या ओढ्यांवर पूल बांधल्याशिवाय रस्त्याचा प्रश्न मिटणार नाही. भाष्टेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईपीएफ’च्या निर्णयाविरोधातयंत्रमाग कारखानदारांचा बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापुरातील विकेंद्रित सूक्ष्म आणि लघु यंत्रमाग उद्योगातील कामगारांना इपीएफ लागू करण्याचा निर्णय भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने घेतल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील यंत्रमाग कारखानदारांनी रविवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवून सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला.
या बंदमुळे गांधी नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सत्तरफूट रोड, निलम नगर या भागातील यंत्रमागाची धडधड थांबली होती. शिवाय या संपूर्ण परिसरात शुकशुकाट पसरला होता. जिल्हा यंत्रमागधारक संघाने बंदची घोषणा केली होती.
भारतात शेती खालोखाल मोठा रोजगार देणारा उद्योग म्हणून विकेंद्रित यंत्रमाग उद्योगाकडे पाहिले जाते. सोलापुरातील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने काही कारखानदारांना भेटून इपीएफ कायदा लागू करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. भारतात व अन्य कोणत्याही राज्यात वसलेल्या विकेंद्रित यंत्रमाग उद्योगाला इपीएफ लागू नसताना फक्त सोलापुरातील उद्योगातील कामगारांना इपीएफ लागू करण्याचा एकतर्फी आदेश देऊन या यंत्रमाग व्यवसायाला वेठीस धरण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. कामगार, कारखानदार प्रतिनिधी, लोकनेते एकत्र बसून यावर तोडगा निघणे गरजेचे असल्याचे यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी सांगितले.
सोलापूरच्या उद्योगाला घरघर लागली आहे. सर्व गिरण्या बंद पडल्या आहेत. नवीन उद्योग येण्याचे नाव घेईना. त्यातच एकमेव कसाबसा तग धरून अडचणीतून मार्गक्रम करीत असलेल्या या यंत्रमाग उद्योगात आता भविष्यनिर्वाह निधी शिरल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत. हा उद्योग थांबला तर सोलापुरात बेकरी आणखी वाढेल आणि शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांची अवस्था होईल, त्यामुळे सरकारने यातून मार्ग काढावा, अशी मागणी माजी खासदार धर्मांना सादुल यांनी केली.
जीएसटीच्या कचाट्यात अगोदरच यंत्रमाग उद्योग सापडला आहे. उत्पादन ५० टाक्यांवर आले आहे. काम कमी असल्याने कामगारांची चूल पेटने मुश्कील बनले असताना आता भविष्यनिर्वाह निधीच्या संकटाने कारखानदारांची झोप उडाली आहे.
इपीएफ कामगारांचा अधिकार - आडम
यंत्रमाग उद्योगात काम करण्याऱ्या प्रत्येक कामगाराचा इपीएफ हा अधिकार आहे. कामगारांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कामगारांना इपीएफ लागू करण्यासाठी दिल्ली आणि मुंबईचे दरवाजे झिजवले आहेत. ज्या कामगारांच्या जीवावर कारखानदार मोठे झालेत, त्याच कामगारांना इपीएफ देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. हे संघटना म्हणून आम्ही कधीच सहन करणार नाही. कारखानदार टाळाटाळ करीत असतील तर आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांनी दिला. कारखानदार असलेल्या वसाहतीत जाहीर सभा घेऊन आडम मास्तर यांनी कारखानदारांवर तोफ डागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भलिंग चाचणी, गर्भपातकरताना बोगस डॉक्टर गजाआड

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
वैद्यकीय प्रमाणपत्रे नसताना बेकायदा गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण असल्यास गर्भपात करण्यासाठी पैसे घेणाऱ्या बोगस डॉक्टरचा भांडाफोड कारण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. बोगस डॉक्टर नंदकुमार स्वामी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बोगस डॉक्टर त्याच्या चारचाकी गाडीत बेकायदा गर्भलिंग व गर्भपात करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून वैद्यकीय पथकासह पोलिस पथकाने शनिवारी ही कारवाई केली. बोगस डॉक्टर नंदकुमार स्वामी (वय ४७, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे. मूळचा दत्तनगर, बार्शी) गर्भलिंग निदान करताना आणि स्त्री जातीचा गर्भ असल्यास ग्राहकाकडून २२ हजार रुपये घेताना तालुक्यातील जातेगाव परिसरात शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान आढळून आला. या वेळी एका दाम्पत्याने बनावट ग्राहक बनून बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
या घटनेत पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी, एक लॅपटॉप, अल्ट्रासाऊंड सिस्टिम, सोनोग्राफी मशिन, जेल बॉटल, वेगवेगळ्या आकाराचे चमचे, डाल्टेशन सेट, टाके काढण्याची कात्री, हातमोजे, गोळ्या, इंजेक्शन, सुया आदी साहित्य आढळून आले आहे.
या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानदेव केमकर (वय ५८) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ नसताना तसेच मेडिकल बोर्डकडे प्रॅक्टिस करण्याकरीता नोंदणी न करता सरकारने बंदी घातलेली असतानाही बेकायदा गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशिन व इतर सर्जिकल साहित्य स्वतःजवळ बाळगले तसेच पाठविण्यात आलेल्या बनावट ग्राहक दाम्पत्याकडून गर्भलिंग निदान करणे व स्त्री जातीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्यासाठी २२ हजार रुपये घेतले. गर्भपात करीत असताना एखाद्याचा जीव जावू शकतो, याची जाणीव असताना गर्भलिंग निदान करीत असताना स्वामी हा सापडला, अशी फिर्याद करण्यात आली आहे. आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश देवरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images