Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उदयनराजे स्वतःहून पोलिसांत शरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

उद्योजकाला खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर उदयनराजे मंगळवारी स्वतःहून सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना साताऱ्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. ए. ढोलकिया यांनी सात दिवसांसाठी जामीन मंजूर केला.

उदयनराजेंना अटक होण्याच्या शक्यतेमुळे हे प्रकरण संवेदनशील झाले होते. मात्र, कायद्याचा मान राखत वकिलांनाही कल्पना न देता उदयनराजे मंगळवारी सकाळी सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांच्या वकिलांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या प्रकरणी पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे.

उदयनराजेंच्या अटकेची बातमी कळताच सातारा शहरात बंद पाळण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी दोन एसटी बसची तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला; परंतु, पोलिसांची पूर्वतयारी असल्याने शहरात सर्वत्र तातडीने बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता अनुचित प्रकार घडला नाही. संपूर्ण दिवसभर शहरात तणावाची परिस्थिती होती. खासदार उदयनराजे भोसले यांनीही कार्यकर्त्यांनी कायद्याचा आदर राखावा, संयम राखावा, असे आवाहन केले होते.

उदयनराजेंना जामीन मंजूर झाल्यानंतर साताऱ्यात ठिकठिकाणी समर्थकांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर उदयनराजे आणि दमयंतीराजे यांनी पोवई नाक्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नाक्यावर समर्थकांनी मोठा जल्लोष केला. खासदार उदयनराजेंनी नेहमीची स्टाईल केल्याने जल्लोष अधिकच वाढला.

पोलिस अधिकाऱ्याशी गळाभेट

शरण येण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेले खासदार उदयनराजे यांची पोलिस निरीक्षक सारंगकर यांनी गळाभेट घेतली. अटकेसाठी आलेल्या आरोपीची पोलिस अधिकाऱ्याने गळाभेट घेतल्याने साऱ्यांच्यात भुवया उंचावल्या. अटकेसाठी उदयनराजेंनी धक्कातंत्र वापरले. कोणालाही कल्पना न देता ते थेट सकाळी सव्वा आठ वाजता शहर पोलिस ठाण्यात गेले. त्यांच्याबरोबर वकीलही नव्हते. अटक आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर उदयनराजेंचे वकील धैर्यशील पाटील यांना कळविण्यात आले.

पोलिसांनीच केला जामिनाचा मार्ग मोकळा

या प्रकारच्या प्रकरणात आरोपीला अटक झाल्यास कोर्टात दुपारी हजर करण्यात येते. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची विनंती अॅड. धैर्यशील पाटील यांनी पोलिसांना केली. त्यानुसार पोलिसांनी विनंती केल्यानंतर अकराच्या सुमारास उदयनराजेंना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे सुमारे पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यामुळे उदयनराजेंचा जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली असती तर त्यांना जामिनासाठी अर्ज करता आला नसता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत फक्त नोटिशींवरच भागणार?

$
0
0

इचलकरंजी : पावसाळ्यात जुन्या, जीर्ण व नादुरुस्त झालेल्या इमारती, घरांना धोका असल्याने नगरपालिकेने यंदा १७९ मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. यातील अवघ्या दहा ते बारा घरांची डागडुजी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे, उर्वरित धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एखादी गंभीर घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असाही प्रश्न यातून उपस्थित होतो.
गत वर्षी गाव भागातील राम मंदिर परिसरातील जुने दगड मातीचे घर कोसळून तिघांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. जुन्या, जीर्ण व धोकादायक इमारतींची पाहणी करून दोनशेहून अधिक इमारती, घरे धोकादायक ठरविण्यात आली होती. त्यानुसार संबधितांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
शहरातील एखादी इमारत अगर तिचा काही भाग, छप्परकाम, जिना, इतर कामाचा भाग धोक्याचा असल्यास त्याची लेखी माहिती नगरपालिकेच्या बांधकाम विभागात द्यावी लागते. त्यानंतर प्रशासन संबंधितांना नोटीस पाठवते. मात्र धोकादायक घरांची, इमारतींची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने शक्य ती उपाययोजना नगरपालिकेकडून करण्यात येत नाहीत. केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडले जातात. धोकादायक इमारतीबाबतची माहीती व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात क्षेत्रीय अधिकारी नियुक्त आहेत. मात्र त्यांच्याकडून आजपर्यंत अशा प्रकारचे अहवाल आल्याची माहिती नाही.
इचलकरंजीत गावभाग, जुना चंदूर रोड, जवाहरनगर, गणेशनगर, या परिसरात अजूनही धोकादायक इमारती, घरे आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने संबाधित धोकादायक इमारती, घरांच्या मालकांना नोटिसा लागू केल्या आहेत. यातील चांदणी चौक, नरसोबा कट्टा व मोठे तळे येथील जुन्या घरांच्या भिंती पावसाळा सुरू झाल्यानंतर पडल्या. तिन्ही ठिकाणी जीवितहानी झाली नसली तरी पालिका प्रशासनाने यातून कोणता बोध घेतला असाही प्रश्न पडतो.
धोकादायक चाळ
शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा चौकात एका माजी नगरसेवकाची स्थावर मालमत्ता आहे, यावर न्यायालयीन वाद असल्याने जागा मालकांचे नातेवाईक याकडे लक्ष देत नाहीत, काही दुकानदार तसेच इमारतीचे वापर करणाऱ्यांनी किरकोळ डागडुजी करून धोकादायक भाग हटविला आहे, तर काहींनी विनापरवाना इमारती, दुकाने बांधली आहेत. अजूनही काही घरे धोकादायक आहेत, याकडेही नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू

$
0
0


मिरज : कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील हवालदार दिगंबर शंकर खंदारे (वय ५३) यांचा मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी सकाळी नऊ वाजता मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी सकाळी ते गार्ड ड्यूटीवर होते. मंगळवारी सकाळी मानमोडी येथील एका गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस निरीक्षक अशोक कदम व इतर कर्मचाऱ्यांच्या समवेत गेले असताना तेथेच त्यांच्या छातीत दुखू लागले. कदम यांनी खंदारे यांना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, खंदारे यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली. उपचार सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला. दिगंबर खंदारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.

फौजदारकीचे स्वप्न अपुरेच

दिगंबर खंदारे यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्याबद्दल सर्व पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये व मित्रपरिवारांमध्ये आदर होता. गेल्या डिसेंबर महिन्यात पोलिस उपनिरीक्षकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आता आपण काही दिवसांत फौजदार होणार आणि यामुळे आपल्या कुटुंबातील सर्वानी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार याचा त्यांना खूपच आनंद झाला होता. मात्र, आकस्मिक निधनामुळे त्यांचे फौजदारकीचे स्वप्न अपूर्णच राहिल्याची हळहळ त्यांच्या मित्रपरिवाराने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायीच्या पोटातून काढले मंगळसूत्र

$
0
0

कराड : गायीच्या पोटातून गिळलेले मंगळसूत्र व सोन्याचे इतर दागिने बाहेर काढण्यात येथील सरकारी पशू चिकित्सालयातील डॉक्टरांना यश आले. अशा प्रकारची शस्त्रक्रिया कराडमध्ये प्रथमच झाली आहे.
डॉ. अंकुश परिहार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. पाटण तालुकयातील चाफळ खोऱ्यातील पाडळोशी गावातील शेतकरी व्यंकटराव जगन्नाथ पाटील यांच्या मालकीची ही गाय आहे. शस्त्रक्रियेनंतर गायीची प्रकृती उत्तम आहे.
पाडळोशी गाव दुर्गम भागात असून, तेथे चोऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे दागिने वा रोख रक्कम लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने लपवून ठेवली जाते. पाटील यांच्या पत्नीने मंगळवारी रात्री झोपण्याआधी तीन तोळे सोन्याचे मणी मंगळसूत्र गंठण घरातील ड्रममध्ये ठेवलेल्या असलेल्या पशुखाद्यामध्ये लपवून ठेवले होते. बुधवारी सकाळी घरातील महिला स्वयंपाकाच्या घाईगडबडीत असतानाच, घरातील पुरुष मंडळींनी ड्रममधील पशुखाद्य घमेल्यात काढून ते आपल्या दोन गायींना खाण्यासाठी गायींच्या गव्हाणीत ठेवले. याच खाद्यावाटे ड्रममध्ये ठेवलेले गंठण दोन्हींपैकी एका गायीपुढे ठेवलेल्या घमेल्यात गेले होते. दोन्ही गायींनी समोर ठेवलेले सर्व पशुखाद्य संपवले.
घरातील महिलांनी गडबड आटोपल्यानंतर पशुखाद्य ड्रममधील गंठण शोधण्याचा प्रयत्न केला असता, तेथे गंठण सापडले नाही. त्यामुळे पाटील यांच्या पत्नीने घरी विचारणा केली. त्यानंतर गायीच्या पोटात दागिना गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ चाफळ (ता. पाटण) येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांनी दोन्ही गायींच्या पोटाचा एक्स रे काढण्यासाठी कराडच्या शासकीय पशुवैद्यकिय चिकित्सालयात गायीला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार व्यंकटराव पाटील यांनी आपल्या दोन्ही गायींसह येथील शासकिय पशुवैद्यकिय चिकित्सालय गाठले. येथील वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश परिहार यांनी तातडीने हालचाली करत प्रथम दोन्ही गायींच्या पोटांचा एक्स रे घेऊन कोणत्या गायीच्या पोटात दागिना आहे, ते पाहिले. एका गायीच्या पोटात गंठण असल्याचे एक्स रे चाचणीत दिसले.
त्यानंतर परिहार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दोन तास त्या गायीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून गंठण बाहेर काढले. सध्या ही गायीवर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात उपचार सुरू आहेत. गायीची प्रकृती स्थिर असून, ती सुखरूप असल्याचा निर्वाळा डॉ. परिहार यांनी दिला.

दुर्मिळ व किचकट शस्त्रक्रिया

जनावरांच्या चाऱ्यातून अथवा खाद्यातून आजपर्यंत खिळे, लोखंडी तुकडे गेल्याच्या घटना घडल्याने ते पोटातून काढण्यासाठी अनेक जनावरांच्या शस्त्रक्रिया आपण केल्या आहेत. मात्र एखाद्या जनावराने सोने गिळल्याचा हा दुर्मिळ प्रसंग असल्याने व याचा गायीच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होण्याचा धोका होता. जनावरांनी खाद्यावाटे खाल्लेल्या वस्तू शौचावाटे बाहेर पडत नाहीत. जनांवरांच्या जठरात विविध कप्पे असतात, त्यातून ती वस्तू शोधून काढण्यासाठीची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. पोटात गेलेली वस्तू लोखंड आहे की सोने यापेक्षा ती बाहेर काढणे आवश्यक असते. अन्यथा जनांवरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या शस्त्रक्रियेत गायीचा जीव वाचविण्याबरोबर काबाडकष्ट करून मिळविलेली मौल्यवान वस्तूही मिळाल्याने वेगळेच समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया डॉ. परिहार यांनी व्यक्त केली. गायमालक व्यंकटराव पाटील यांनीही समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपंचमीसाठी शिराळ्यात यंत्रणा सज्ज

$
0
0

शिराळा : जिवंत नागांची पूजा करण्यास परवानगी न मिळाल्याने नाराज असलेले शिराळावासीय आता नागपंचमीच्या तयारीत गुंगले आहेत. गुरुवारी होणाऱ्या नागपंचमी उत्सवाची प्रशासनाने नेटकी तयारी केली आहे.

नगर पंचायतीने स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. बंदोबस्तासाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलिस निरीक्षक, ३३ फौजदार आणि ५००हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन विभागाचे एक वनसंरक्षक, चार विभागीय वनाधिकारी आणि १५८ इतर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. एसटी आगाराच्या ७० गाड्या प्रवाशांची बसस्थानकापर्यंत ये-जा करणार आहेत. २००२ पासून नागपंचमी उत्सव न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे नागावर श्रद्धा असूनही शिराळा शहरातील नागरिकांना जिवंत नागाची पूजा करता येत नाही. तरीही नागपंचमी उत्सवाची देशभर ख्याती असल्यामुळे हजारो लोक प्रत्येक वर्षी हजेरी लावतात. कायद्याचा मान राखून उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम–पाटील यांनी नागमंडळे,शासकीय अधिकारी यांच्या बैठकीवेळी केले आहे.
नागपंचमीदिवशी जिवंत नागांचे खेळ करण्याची परवानगी मिळावी, यासाठी शिराळावासीयांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवरही बहिष्कार घातला होता. मात्र, न्यायालयातून परवानगी मिळाली नाही. तसेच, शिराळ्यासाठी कायद्यात बदल करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले होते. मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यंदा शिराळ्यात निरुत्साह जाणवत आहे.
परंपरा बाराव्या शतकापासून
शिराळ्यात नागांच्या जिवंत पूजेची परंपरा बाराव्या शतकापासून असल्याचे सांगितले जाते. बाराव्या शतकात नागपंचमीच्या दिवशी नाथ संप्रदायातील गुरू गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गावातील महाजन यांच्या घरी गेले. त्या घरातील गृहिणी मातीच्या प्रतीकात्मक नागाची पूजा करीत असल्यामुळे तिला भिक्षा वाढण्यासाठी वेळ झाला. भिक्षा वाढण्यास वेळ लागल्याचे कारण विचारल्यानंतर गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा करू शकाल का, असा प्रश्न केला. त्या गृहिणीने तत्काळ होकार दिला. त्यापासून जिवंत नागांच्या पूजेस शिराळ्यात सुरवात झाली, अशी आख्यायिका आहे. त्यावेळी जवळपासच्या बत्तीस खेड्यातील लोक गोरक्षनाथांचे शिष्य बनले. त्यामुळे गावालाही बत्तीस शिराळा असे नाव पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायकदगड हलविण्यास प्रारंभ

$
0
0

कुडित्रे

महे (ता. करवीर) गावच्या पूर्व बाजूच्या भैरवनाथ टेकडीवर असलेला धोकादायक दगड बुधवारी(ता.२६) तहसील कार्यालय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने हलविण्यास सुरुवात करण्यात आली.

बुधवारी दुपारी बारा वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व तहसीलदार विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमत: या धोकादायक दगडाची सभोवती पाहणी केली. दगडाच्या चारही बाजूला जवळ झाडे नसल्यामुळे सुमारे ८०- १०० फुटांवर असणाऱ्या झाडांचा आधार घेत पहिल्यांदा दगड रोपने बांधून जाळी लावण्यात आली. मध्येच पाऊस येत असल्यामुळे कामात अडथळे येत होते. त्यानंतर टेकडीवर जेसीबी मशीन आणले गेले. पण चिखलामुळे मशीन वर आणायला सायंकाळचे पाच वाजले.

हा दगड ५ - ६ फूट उंचीचा व १० फूट घेरीचा असून सुमारे १० टन वजनाचा आहे. दगड गावाच्या उताराच्या बाजूला टेकडीवर धोकादायक अवस्थेत असल्यामुळे तो फोडण्यासाठी आणलेला कॉंक्रीट हॅंडब्रेकर कमी ताकदीचा असल्याने दगड फुटू शकला नाही. त्यामुळे गुरूवारी सकाळी स्टोनब्रेकर उपलब्ध करून हा दगड पूर्णपणे या जागेवर हटवू, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे यांनी सांगितले.

या मोहिमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे गजानन मोहिते, सज्जन सवळेकरी, नायब तहसीलदार ना. रा.पवार , तलाठी नितीन केदार , मंडल अधिकारी एम. डी. सांगडे , उपसरपंच सचिन पाटील, बुद्धीराज पाटील , युवराज पाटील, महेश पाटील यांच्यासह गावातील युवक व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोंघावणाऱ्या काळाकडे सरकारी दुर्लक्ष

$
0
0

सांगली : धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच सांगली महापालिकेने ही बाब गांभीर्याने मनावर घेतलेली दिसत नाही. पालिकेच्या यादीतील ४६ धोकादायक इमारतींपैैकी एक खुद्द पालिकेच्याच मालकीची असून, त्यात महापालिकेची कार्यालयेही आहेत.

एखाद्याचा जीव जाईपर्यंत जाग न येणाऱ्या म्हणजे झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला उठवायचे कसे, हा प्रश्न आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीवर आलेल्या ४६पैकी सर्वाधिक सांगलीत आहेत. अत्यंत धोकादायक असलेली इमारत महापालिकेच्या मालकीची आणि महापालिकेच्या दारात आहे. ती पूर्वी अतिथीगृह नावाने ओळखली जायची. सध्या त्यामध्ये जन्म-मृत्यूची नोंद असलेली महापालिकेची कार्यालये आहेत. या इमारतीलगतची प्रसूतिगृहाची इमारतही धोकादायकच आहे. म्हणजे रोज धडधडीत नजरेला पडणारी आणि आपल्याच मालकीच्या धोकादायक इमारतींकडे प्रशासन काणाडोळा करत असेल अन्य इमारतींकडे किती दुर्लक्ष होत असेल याचा केवळ विचारच केलेला बरा.

सांगलीतील मुख्यत्वे वखार भाग, गाव भाग पेठ भाग, खण भाग,नळ भाग आणि माळी गल्लीत धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. जामवाडीच्या परिसरातही काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत. ६० ते ७० वर्षांपूर्वींच्या या इमारती असून, काही इमारती बाहेरून दगडी बांधकामाच्या भासत असल्या तरी ते बांधकाम सिमेंटमध्ये केलेले नाही. अनेक इमारतींमध्ये लाकडाचा वापर जास्त आहे. कौलारू छताच्या या इमारती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धोकादायक इमारतींच्या बाबतीत ठोस काहीच होत नाही. मधूनच जाग आल्यासारखे करून कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच होत नाही. अनेक धोकादायक इमारतींचे काही भाग अधूनमधून कोसळतात. काही इमारती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होतील, अशी स्थिती आहे. भाडेकरू आणि मालक यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे मालक इमारत कोसळण्याची वाट पाहत आहेत. काही इमारतींबाबत स्थानिक अधिकाऱ्यांचे हितसंबंध आड येत असल्याची चर्चा आहे.

अलीकडे काही जण इमारतीमधील भाडेकरूंच्या हक्कासह इमारत विकत घेतात आणि मग भाडेकरूंना हाकलण्यासाठी दंडुकेशाहीचा अवलंब करतात. अशा दंडुकेशहांच्या मदतीला पालिकेचे अधिकारी धावून जातात. इमारत धोकादायक झाल्याची नोटीस देऊन भाडेकरुंचा विरोध डावलून ती खाली करण्याची तत्परता अधिकारी दाखवत असतील तर मग खऱ्या अर्थाने धोकादायक इमारतींच्या बाबतीत ती तत्परता का दाखविली जात नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

सांगलीतील प्रभाग समिती एक अंतर्गतच्या क्षेत्रात २१ धोकादायक इमारती असल्याची नोंद असल्याचे सांगून समितीचे अधिकारी अप्पा हालकुडे म्हणाले, ‘संबधित सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही इमारतींचा वाद न्यायालयात आहे. शेजारी बांधकाम करताना खोदाई केल्याने नजीकच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. बालाजी चौकानजीकच्या इमारतीचा काही भाग कोसळला असून, ती अधिक धोकादायक बनली आहे. ती इमारत उतरवून धोका टाळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वखार भाग, महावीर नगरमध्ये जुन्या इमारतींची संख्या जास्त आहे.’

प्रभाग समिती चार अंतर्गत मिरजेचा परिसर येत असून, त्या ठिकाणचे अधिकारी मेथे यांनी आपण रुजू होऊन पंधरा दिवस झाले आहोत. धोकादायक इमारतींची माहिती अद्याप घेतली नसल्याचे सांगितले. कुपवाड शहरात धोकादायक इमारतींची संख्या नगण्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बचत गटांना रेल्वे स्टेशनवर स्टॉल्स द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुटसुटीत करून दलालांना पायबंद घालावा, रेल्वे स्टेशनवर खाद्य विक्रीचे स्टॉल्स सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली. त्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात खासदार धनंजय महाडिक यांनी सहभाग घेत, रेल्वे तिकीट काळाबाजार आणि रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीर रित्या कार्यरत असलेल्या एजंटावर कारवाईची मागणी केली. छोट्या शहरांमध्ये रेल्वे तिकीटासाठी तासन तास रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळेच दलालांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी तिकीट बुकींग प्रणाली सुटसुटीत केल्यास दलालांचा विळखा आपोआप सुटेल असे मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केले.

‘रेल्वे स्टेशनवर मोजकेच अधिकृत स्टॉल्स असतात. तर काही ठिकाणी कोणतीही सुविधा रेल्वे प्रशासनाकडून मिळत नाही. म्हणूनच अनाधिकृत आणि बेकायदेशीर खाद्य विक्रेत्यांची संख्या वाढते. ही बाब ध्यानात घेवून रेल्वे स्टेशनवर अधिकृत खाद्य विक्रेत्यांची संख्या वाढवावी, तसेच महिला बचत गटांना संधी दिली जावी’ असे खासदार महाडिक म्हणाले. त्यांच्या या प्रश्नावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उत्तर देताना, या मतांशी सहमती व्यक्त केली. तिकीटाचा काळाबाजार करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल केला जात असल्याचे मंत्री प्रभू यांनी सांगितले. त्यासाठी नवीन अॅप लाँच केले असून, त्याद्वारे तिकीटाशी संबंधीत व्यवहार करता येणार आहेत. प्रवाशांनी किमान एक ओळखपत्राची मूळ प्रत जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इतर नावावर तिकीट बुकींग करून अन्य व्यक्तीने प्रवास करण्याला पायबंद बसल्याचे प्रभू यांनी सांगितले.

तसेच रेल्वे सुटण्यापूर्वी इंटरनेटद्वारे बुकींग केल्यास त्यांच्याही नावाचा समावेश प्रवासी यादीत केला जात आहे. पीआरएस अंतर्गत जागा शिल्लक असेल तर पुढील स्टेशनवर प्रवासी यादीत त्या जागेचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्रभू यांनी दिली. तिकीट बुकिंग काऊंटरवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे काम देशपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. बुधवारी दिवसभरात स्वाइन फ्ल्यूच्या दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लता जयदेव सुखरेजा (वय ४७, रा. गांधीनगर, ता. करवीर) आणि रघुनाथ महादेव सावंत (६६, रा. दापोली) अशी मृतांची नावे आहेत. गेल्या दोन महिन्यात स्वाइन फ्लूने १५ रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

स्वाइन फ्लूचा धोका जिल्ह्यात वाढला असून, बुधवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात १५ रुग्ण दगावल्याने नागरिकांच्या मनात स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाली आहे. गांधीनगर येथील लता सुखरेजा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दापोलीतील रघुनाथ सावंत यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने बुधवारी सावंत यांचा मृत्यू झाला. या दोन रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील स्वाईनने दगावलेल्या रुग्णांची संख्या पंधरावर पोहोचली आहे. यात जिल्ह्यातील ८, तर जिल्ह्याबाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर १० रुग्ण संशयित आहेत.

गेल्या दोन महिन्यात स्वाइन फ्लूचे १४६ रुग्ण दाखल झाले होते. यातील ८४ पॉझिटिव्ह होते, तर ६२ रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. स्वाईनचा वाढता धोका रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सीपीआर, कसबा बावड्यासह जिल्ह्यातील गांधीनगर, कोडोली, गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्येही या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. खासगी रुग्णालयांनाही स्वाइनच्या रुग्णांची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय खबरदारीच्या उपाययोजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आरोग्य विभागाची ४२ पथके कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बझार शिष्टाईचे ‘पी.एन.’ना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्सच्या (जनता बझार) निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडत असून बुधवारी दिवसभर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यास यश येत असताना सायंकाळी प्रल्हाद चव्हाण व प्रकाश बोंद्रे यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना संधी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पुन्हा दोन पॅनेल होण्याची शक्यता निर्माण झाली.

निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाल्याने संचालक शिष्टाईसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना साकडे घालणार आहेत. दरम्यान निवडणूक अधिकारी यांनी चव्हाण यांच्या पॅनेलला विमान तर विद्यमान चेअरमन उदय पोवार यांच्या पॅनेला कपबशी हे चिन्ह बुधवारी दिले.

बझारच्या १९ जागांसाठी ४३ उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. बुधवारी चिन्ह वाटपादरम्यान सर्व जुन्या संचालकांनी एकत्र येत निवडणुकीतील इर्ष्या संपविण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार पवार गटाला ११ तर चव्हाण गटाला ८ जागा दिल्या. चव्हाण गटाकडून प्रल्हाद चव्हाण व माजी महापौर सचिन चव्हाण, प्रकाश बोंद्रे व सुहास बोंद्रे अशा एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना संधी का? यावरुन पुन्हा गटांची बोलणी फिसकटली. आमदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्यानंतर रात्री उशीरापर्यंत समझोत्याचे प्रयत्न असफल ठरले. सचिन चव्हाण यांच्या नावाला विरोध झाल्यानंतर सर्व संचालकांनी गुरुवारी माजी आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे माजी आमदार पाटील यांच्या निर्णयानंतरच जनता बझारच्या निवडणुकीतील अनिश्चितता संपुष्टात येणार आहे. दरम्यान, दोन्ही गटांतील टोकाला गेलेला वाद पाहता समझोता कितपत होईल याबाबत साशंकता आहे. त्यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर खड्डे खोदल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने शहरात १०० टक्के पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांना साद घातली आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठीच्या प्रयत्नांत नागरिकांना सामावून घेतले जाणार आहे. रस्त्यावर खड्डे खोदणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय याबाबत आयोजित बैठकीत झाला. महापालिका, पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रस्त्यावर मंडप घालणाऱ्या व खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरले. आयुक्त अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमांत कोल्हापुरातील पर्यावरणपूरक उपक्रमांचा गौरवोल्लेख केला असून शहरवासियांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. सार्वजनिक मंडळांनी गेल्या वर्षी पर्यावरणपूरक उत्सवाला प्रतिसाद दिला. यावर्षी १०० टक्के पर्यावरणपूरक उत्सव साजरा करू या अशी भूमिका आयुक्त चौधरी यांनी मांडली. गणेशोत्सवापूर्वी सर्व ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सार्वजनिक मंडळातील निर्माल्य उचलण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाची स्थापना करण्याचे ठरले. मंडळांनी निर्माल्य कुठेही टाकू नये. महापालिकेच्या वाहनातून तीन दिवसांतून एकदा निर्माल्य जमा केले जाणार आहे.

दान केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन इराणी खणीत करण्यात येणार आहे. यासाठी सजविलेले ट्रॅक्टर व पवडी विभागाचे २०० कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. आपत्त्कालीन व्यवस्थापनेसाठी अग्निशमन विभागाचे ५० कर्मचारी व रेस्क्यू बोट तैनात असेल. विसर्जन ठिकाणी विद्युत दिव्यांची व पाण्याची व्यवस्था करण्याचे बैठकीत ठरले.

अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी रा. स. कामत, क्षेत्र अधिकारी अविनाश कडले, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, एकटी संस्थेच्या अनुराधा भोसले, पंचगंगा घाट संवर्धन समितीचे अतुल इंगळे, सेव्ह कोल्हापूर सिटीझनचे सुरेश मिरजकर, दिपक पोलादे यांनी चर्चेत सहभाग घेतला. जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, आर. के जाधव, हर्षजित घाटगे, पर्यावरण अभियंता समीर व्हाघ्राबळे, आर. के. पाटील, डॉ. विजय पाटील, अग्निशमन दलाचे अधिकारी रणजित चिले आदी उपस्थित होते.


बैठकीतील निर्णय
- नागरिक व मंडळांनी शाडूच्या गणेशमूर्ती घ्याव्यात
- निर्माल्य गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाच्या ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
- शहरात तेरा पथके कार्यरत, एक पथक प्लास्टिकचा कचरा गोळा करणार
- गोळा केलेले निर्माल्य अवनि व एकटी संस्थेस खत निर्मितीसाठी देणार
- मंडळांनी महाप्रसादावेळी प्लास्टिक पत्रावळ्या, वाट्या वापरु नयेत
- विसर्जन कुंडसाठी नवीन जागा शोधाव्यात, प्रायोजकांच्या मदतीतून कुंड बांधणार
- पंचगंगा नदीघाटावर क्रेनला परवानगी नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुकास्तरावर होणार महिला महाविद्यालय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तालुकास्तरावर स्वतंत्र महिला महाविद्यालयाचा प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात मांडण्यात आला आहे. बुधवारी अधिसभेच्या सदस्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच स्वतंत्र महिला महाविद्यालयाचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

आगामी पाच वर्षांसाठी प्रस्तावित असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या बृहत आराखड्यात ​ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि मुलींच्या शिक्षणातील अडथळे यांचा विचार करून ग्रामीण भागात सॅटेलाइट सेंटर आणि स्वतंत्र महिला महाविद्यालय हे दोन प्रस्ताव महत्त्वपूर्ण ठरले आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्राला असलेला लोककलांचा वारसा पुढच्या पिढीकडून जपला जाताना त्याला शास्त्रशुद्ध ​शिक्षणाची जोड मिळावी यासाठी लोककला महाविद्यालये स्थापन करण्याचाही प्रस्ताव आराखड्यात आहे. उर्दू भाषेतून विज्ञानशाखेचा अभ्यासक्रम आणि नवे ११९ अभ्यासक्रमांचा समावेशही आराखड्यात असून शिक्षण अधिक रोजगारक्षम व्हावे यादृष्टीने अधिसभेत मंजूर करण्यात आलेला बृहत आराखडा भविष्यातील नव्या संधींशी सुसंगत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत बृहत आराखड्याला मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सादर करण्यात आलेला बृहत आराखडा बुधवारी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये (सिनेट) एकमताने मंजूर करण्यात आला. ​शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची विशेष बैठक व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी तालुका स्तरावर लोककला महाविद्यालय, महिला महाविद्यालय, शुगर इन्स्टिट्यूट, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सॅटेलाइट सेंटर आणि कला, विज्ञान व वाणिज्य शाखांमधील नवे ११९ अभ्यासक्रम या सुविधांचा समावेश असलेल्या पाच वर्षाच्या बृहत आराखड्याला अधिसभेत मंजुरी देण्यात आली. आराखडा पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्पष्ट केले. साखर कारखाना असलेल्या परिसरात तालुका स्तरावर शुगर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचाही प्रस्ताव या आराखड्यात आहे.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर इंडस्ट्रीची कौशल्याधिष्ठीत मागणी पूर्ण करण्याचे आव्हान आहे. वाढती स्पर्धा आणि कौशल्यपूर्ण शिक्षण हा मेळ जुळण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या हेतूने बृहत आराखड्यात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी फायदा होणार आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भाग आणि कष्टकरी समाजातील आहेत. ग्रामीण भागतील दुर्गम वाड्यावस्त्यांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी खरोशी (महाबळेश्वर), चंदगड, जत, माणगाव येथे सॅटेलाईट सेंटरचा प्रस्ताव आराखड्यामध्ये मांडण्यात आला आहे.’

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक गरजा, विद्यार्थी विकास लक्षात घेऊन अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. कोल्हापूरमध्ये स्वतंत्र लोककला महाविद्यालय असावे असे आराखड्यात प्रस्तावित केले आहे. तसेच उर्दू भाषेतून ज्यांना विज्ञानशाखेचे शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी विज्ञानशाखेचा उर्दू भाषेतील अभ्यासक्रम तयार करण्याबाबतही प्रस्ताव आराखड्यात सादर करण्यात आला आहे. विज्ञान शाखेसाठी ५५, कला शाखेसाठी २४, तर वाणिज्य शाखेसाठी ३० तर इतर शाखांमधील १० असे ११९ नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला आहे. ​विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तालुकास्तरावर महिला महाविद्यालय, कौशल्याधिष्ठित कम्युनिटी महाविद्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव बृहत आराखड्यात अधोरेखित करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी उपक्रमांची माहिती अधिसभेसमोर सादर केली. कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी मार्चमध्ये झालेल्या बैठकीतील वृतांत व ​विषयनिहाय झालेल्या चर्चेतील मुद्दे मांडले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सन २०१७-१८ ते २०२१-२२ या कालावधीसाठीचा विद्यापीठाचा शैक्षणिक बृहत आराखडा सभागृहासमोर सादर केला. त्यात त्यांनी संबंधित आराखडा तयार करण्यासाठी राबविलेली प्रक्रिया, नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, महाविद्यालये आदींची माहिती दिली. यानंतर झालेल्या चर्चेत अधिसभा सभागृहाने या आराखडा मंजूर असल्याचे जाहीर केले.

या बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. भारती पाटील, आदी उपस्थित होते.


- ग्रामीण भागातील दुर्गम वसाहतीतील विद्यार्थ्यांसाठी सॅटेलाइट सेंटर

- विद्यापीठ कार्यक्षेत्रात तालुकानिहाय महिला, लोककला महाविद्यालय

- उर्दू भाषेतून विज्ञानशाखेच्या अभ्यासक्रमाची रचना

- कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधील ११९ नवे अभ्यासक्रम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांत शरण येण्याचे वारणा लुटीतील संशयितांना आदेश

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षण संस्थेच्या इमारतीतून ९ कोटी, १३ लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी सांगलीतील संशयित पोलिसांना दहा दिवसांत पोलिसात शरण येण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. मंगळवारी (ता. २५) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश रेवती मोहिते-ढेरे यांनी हा आदेश दिला. शरण न आल्यास अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा इशाराही कोर्टाने संशयितांना दिला आहे, त्यामुळे लवकरच वारणा लुटीतील संशयित पोलिसात हजर होऊ शकतात.

सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वारणानगर येथील चोरीचा तपास करताना चोरट्याशी संगनमत करून ९ कोटी १३ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीत हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, सहायक फौजदार शंकर पाटील, दीपक पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील आणि कुलदीप कांबळे या सात पोलिसांसह प्रवीण सावंत आणि चोरटा मैनुद्दीन मुल्ला या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर यातील चार पोलिसांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी यावर न्यायाधीश रेवती मोहिते-ढेरे यांनी निर्णय दिला. निलंबित पोलिस निरीक्षक घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे आणि सहायक फौजदार दीपक पाटील यांना जामीन अर्ज माघारी घेण्याची सूचना कोर्टाने केली.

दहा दिवसात पोलिसांना शरण जा, अन्यथा तुमचे अर्ज फेटाळले जातील, असा आदेश दिल्याने संशयित पोलिसांचे जामीन मिळवण्याचे मनसुबे उधळले आहेत. घनवट याच्या वतीने अॅड. अशोक मुंदरगी, चंदनशिवे याच्या वतीने अॅड. हर्षद निंबाळकर, तर दीपक पाटील याच्यावतीने अॅड. सत्यवर्तक जोशी यांनी काम पाहिले. संशयितांना शरण येण्याचे आदेश दिल्याने लवकरच संशयित पोलिस ठाण्यात हजर होऊ शकतात. फिर्यादी झुंजार सरनोबत यांचे वकील अॅड. अभिजित आडगुळे यांनी संशयितांच्या जामिनाला आक्षेप घेतला होता. पोलिस नाईक कुलदीप कांबळे यांच्या जामिनाचा अर्ज प्रलंबित ठेवला असून, त्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरसकट कर्जमाफीसाठीगारगोटीत सर्वपक्षीय आंदोलन

$
0
0

गारगोटी



भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी भुदरगड तहसील कार्यालयासमोर सर्व पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांनी गेटवर येऊन निवेदन स्वीकारावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर तीन तास ठिय्या मारला. त्यानंतर तहसीलदार यांच्या निषेर्धात आंदोलकांनी गारगोटी -कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास शेतकरी बचाव आंदोलन संघटनेच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा कॉ.दत्ता मोरे व कॉ.राम कळंबेकर यांनी दिला.

यावेळी बोलताना कॉ.राम कळंबेकर म्हणाले, ‘राज्य व केंद्र सरकार कर्जमाफी संदर्भात संदिग्ध भूमिका घेत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी न दिल्याने शेतकरी व कुटुंबीय देशोधडीला लागले आहेत.’ कॉ.राजाराम देसाई यांनी कॉंग्रेस सरकारने आजपर्यंत जे शेतकरी विरोधी धोरण स्वीकारले तेच धोरण भाजप सरकारने अवलंबल्याने शेतकरी वर्ग पूर्णतः भुईसपाट झाला आहे. त्यामुळेच राज्य सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी बचाव आंदोलन संघटनेचे पदाधिकारी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला. माजी सरपंच सर्जेराव देसाई म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबवण्यासाठी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे.’

आंदोलनात कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई,शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, माजी सरपंच सर्जेराव देसाई, अजित देसाई, प्रकाश वडर, सुनील कोटकर, कॉ दत्ता मोरे, राम कळबेकर, शामराव देसाई, व्ही.जे.कदम, डॉ. उदय शिंदे, सरपंच गीता चिले, उपसरपंच अरुण शिंदे आदी सहभागी झाले.

दरम्यान, तहसीलदारांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे भुदरगड पोलिस ठाण्यात आंदोलकांनी गोंधळ घातला. यावेळी आंदोलक व पोलिसांत झटापट झाली. तहसीलदारांच्या निषेधार्थ शुक्रवारी गारगोटी बंदची हाक देण्यात आली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची दमछाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी छापील अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत होती. अर्जदारांची इथंभूत माहिती भरण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना छापील अर्ज देण्याची सुविधा अनेक ठिकाणी केली असली, तरी त्यानंतरची प्रक्रिया वेग घेत नसल्याने बुधवारी अनेकांची निराशा झाली. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर थेट राज्यस्तरावर माहिती पोहोच होणार असल्याने महा इ-सेवा केंद्रासह कोणतीही यंत्रणा जोखीम पत्करण्यास तयार नसल्याचे अनेक ठिकाणी दिसत होते. रात्रीनंतर ऑनलाइन प्रक्रिया वेग घेईल अशी शक्यता सहकार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर या योजनेत जिल्ह्यातील सुमारे ८० हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले आहे. पात्र कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ३५० संगणक चालकांना एक दिवसाचे प्रशिक्षणही दिले. घोषणा व त्यानंतर दिलेल्या प्रशिक्षणानंतरही अद्याप एकही कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

सोमवारपासून मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छापील अर्ज देण्यास सुरुवात केली. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सर्व महा ई-सेवा केंद्रे, तहसिलदार, ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, सेवा संस्थांचे सचिव यांच्या पर्यंत छापील अर्ज पोहोच झाले आहेत. पाच पानांचा छापील अर्ज बुधवारी हातात मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हा अर्ज प्रशिक्षित व्यक्तींकडून भरून घेतला. अर्जाला लागणारी अनेक माहिती जमा करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. काही शेतकऱ्यांनी छापील अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, पण अर्जाची नोंदणी झाल्यानंतर प्रक्रिया पुढे जात नसल्याने अनेकांची निराशा झाली. एकाच अर्जावर सर्व प्रकारची कर्जाची माहिती देणे आवश्यक असल्याने अनेकांची माहिती जमवाजमव करताना धावपळ उडाली होती. ऑनलाइन अर्ज भरताना अडचण येत असताना छापील अर्ज मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीकरीता भरलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्यास कर्जमाफीची किंवा प्रोत्साहन अनुदानाची रक्कम दंड व्याजासह वसुली केली जाणार आहे.


प्रामाणिक कर्जदारांना ५० हजार द्या

राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेताना ३० जून २०१६ पर्यंतच्या शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. त्याऐवजी ३० जून २०१७ पर्यंतची तारीख निश्चित करुन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी, मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. तसेच प्रामाणिक कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजारांऐवजी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी अधिवेशनामध्ये केली.

दुटप्पी कर्जदारांची अडचण

पीककर्ज किंवा मध्यम मुदतीचे कर्ज अनेक खातेदार एकाच सात-बारा उताऱ्यावर दोन-दोन बँकांचे कर्ज घेतात. कर्जमाफीचा अर्ज सादर करताना दोन्ही बँकेतील कर्जाची माहिती दिल्यास अडचण येणार असल्याने अनेक शेतकऱ्यांना एकाच खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे एका ठिकाणच्या कर्जावरील सवलतीला मुकावे लागणार आहे. मात्र, दोन्ही ठिकाणच्या कर्जाचा तपशील भरल्यास कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याने दोन ठिकाणी कर्ज घेतलेल्या कर्जदारांची चांगलीच अडचण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांना क्रीडा साहित्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या शाळांना क्रीडा साहित्य, बेंच पुरविण्याचा आणि शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी शौचालय बांधण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत झाला. याचा तत्काळ ऑफीस प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना सभापती वहिदा सौदागर यांनी केली. सर्व प्रभागांत महिलांसाठी ओपन जीमचे साहित्य बसविण्याचा ठराव मंजूर केला. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू कक्ष) सुरू करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये आयसीयू कक्ष सुरू केल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय योजनांचा लाभ गरजू रुग्णांना मिळणार आहे. यासाठी हॉस्पिटलमध्ये आयसीयूसाठी पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी निविदा काढल्याची माहिती प्रशासनातर्फे बैठकीत सांगण्यात आली. सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची बैठक झाली. यात २०० अंगणवाड्यांत शैक्षणिक खेळाचे व महापालिका शाळेतील दारिद्र्यरेषेखालील मुलांना उपस्थिती भत्ता देण्याचे ठरले. शाळेत बोलक्या भिंती संकल्पना, वर्ग खोल्यांची दुरुस्तीसाठी निधीची तरतुदीचा निर्णय घेतल. कुटंब कल्याण केंद्र, रुग्णालये व ज्या प्रभागामध्ये महापालिकेची शाळा नाही त्या भागात स्मार्ट कार्डद्वारे चालणारे नॅपकीन व्हेंडिंंग मशीन्स व ड्रेस्ट्राय मशीन बसविण्यात येणार आहेत.

सहाय्यक आयुक्त मंगेश शिंदे यांनी ओपन जिमची निविदा काढली आहे. प्राथमिक शाळेतील मुलींसाठी शिष्यवृत्तीचे पैसे थेट खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे सांगितले. अकबर मोहल्ला येथील कोंडवाडा इमारत महिला व बालकल्याण समितीकडे वापरायला देण्याचे ठरले. श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदीर खेळाला साहित्य, प्रतिभानगर जगदाळे कॉलनी व राजलक्ष्मीनगर मधुबन कॉलनी येथे ओपन जीमचे साहित्य देण्याचा ठराव मंजूर झाला. उपसभापती छाया पोवार, नगरसेविका सविता भालकर, माधुरी लाड, गीता गुरव, दीपा मगदुम,सिमा कदम, आरोग्याधिकारी डॉ.अरुण वाडेकर, नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्या उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सधन कोल्हापूर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com
Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : सधन कोल्हापूर जिल्ह्यात ७०० कुपोषित बालके आढळून आली आहेत. त्यामध्ये १५१ तीव्र कमी वजनाच्या (सॅम) बालकांचा समावेश असून ही स्थिती विचार करण्यास भाग पाडणारी आहे. गर्भवती महिलांसह, बालकांच्या आहारकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. कुपोषित बालकांचा आरोग्य सदृढ बनवण्यासाठी ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ (व्हीसीडीसी) राबवण्यात येणार आहे. मात्र, यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विकास विभागीच बैठकच झालेली नाही.

नंदुरबार, गडचिरोली, रायगडसारख्या कुपोषित बालकांची संख्या जादा आढळून आली. काहीअंशी आदिवसी पट्ट्यात कुपोषित बालके लक्षणीय संख्येत आढळतात. राज्य पातळीवर कुपोषित बालकांची समस्या दूर करण्यासाठी अनेक योजना कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आदिवासी पट्ट्याबरोबरच सधन अशा कोल्हापूर जिल्ह्यातही कुपोषित बालकांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती महिलांसह बालकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित बालकांच्या वजनात व श्रेणीत वाढ होण्यासाठी पोषक आहार दिला जातो. मात्र आहार दिल्यानंतर बालकांच्या वजनात व श्रेणीत कोणतीही वाढ झालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे पोषण आहाराने नेमके कोणाचे पोषण केले? हा कळीचा मुद्दा बनला आहे.

जिल्ह्यातील कागल, शिरोळ, करवीर व हातकणंगले अशा अत्यंत सधन भागात सेव्हियर अॅक्यूट माल न्यूट्रिशीयन (सॅम) आणि मॉडरेट अॅक्युट माल न्यूट्रिशीयन (मॅम) बालकांची संख्या विचार करण्यास भाग पाडणारी आहे. तीव्र कमी वजनाची कागल ३५, शिरोळ २०, हातकणंगले ११ तर करवीर तालुक्यांत ९ बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांना सदृढ बनवण्यासाठी ‘व्हीसीडीसी’ नुसार पोषण आहार, लसीकरण करण्यात येणार असून त्यांना प्राथिमिक आरोग्य केंद्रात सहा तास ठेवण्यात येणार आहे. पण व्हीसीडीसीची अंमलबजावणी

करण्यासाठी राज्यस्तरावर अद्याप एकदाही बैठक झालेली नाही. जिल्ह्यासह राज्य आणि देशभरात कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. सरकारच्या स्तरावर निधी खर्च करुन योजना कार्यन्वित केल्या जातात. प्रशासकीय स्तरावर त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे वास्तव आहे.

राज्य सरकारच्यावतीने व्हीसीडीसी सुरू करण्यात येणार आहे. हा प्रोग्रॅम जिल्ह्यातील ७० अंगणवाड्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
- एस. डी. मोहिते, प्रभारी, जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३९ इमारती अतिधोकादायक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘नेमेचि येतो मग पावसाळा,’ या म्हणीप्रमाणे दरवर्षी महापालिका मे-जून महिन्यात शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे करते. ना​गरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक इमारत उतरवून घेण्याची नोटीस काढली जाते. नोटिसा काढण्याचे सोपस्कार पूर्ण झाले की पुन्हा मात्र ‘ये रे माझ्या मागल्या...’ सुरू राहते. एखादी दुर्घटना घडली की मगच महापालिकेच्या यंत्रणेला जाग येते. यावर्षी झालेल्या सर्वेक्षणात शहरातील ३९ इमारती अतिधोकादायक आहेत. त्या खाली करण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनालाही कळविले आहे.

मालक आणि कूळ अशा वादात जुन्या इमारतींवरील कारवाईचा प्रश्न रखडला असताना पोलिस आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. महाव्दार रोड, पोतनीस बोळ, वांगी बोळ, बागवान गल्ली, आझाद गल्ली, बाराईमाम, शिवाजी पेठ आणि महापालिका इमारत परिसरात धोकादायक इमारती आहेत. या सर्व इमारती शहरातील दाट लोकवस्तीच्या भागातीलच आहेत. त्यापैकी काही इमारती या गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर आहेत. विसर्जन मिरवणुकीत वाद्यांच्या दणदणाटामुळे काही वर्षांपूर्वी महाव्दार रोडवरील भिंत ढासळल्याची घटना घडली होती. या आठवणी ताज्या असतानाच या अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

महापालिकेकडील माहितीनुसार यावर्षी ४२ इमारती अतिधोकादायक स्वरुपात होत्या. त्यापैकी तीन इमारती उतरवून घेतल्या आहेत. शहरातील ए, बी, सी आणि डी वॉर्डा​तील मिळून जवळपास १२२ इमारती धोकादायक म्हणून निश्चित केल्या आहेत. यापैकी ३६ इमारती रिकाम्या करुन दुरुस्त कराव्यात, अशा नोटिसा काढल्या आहेत. तर तीस इमारती रिकाम्या न करता त्यात दुरुस्ती होऊ शकतात. महापालिका प्रशासनाने या संदर्भात इमारत मालकांना नोटिसा काढल्या आहेत.

न्यायप्रविष्ट बाब, कारवाई ठप्प

महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या काही इमारती १०० वर्षांपूर्वीच्या आहेत. या इमारती निवासासाठी योग्य नसल्याने त्या उतरवून घेण्याविषयी नोटीस काढली जाते. शहरातील २५ हून अधिक इमारतींचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मालक आणि कूळ यांच्यात वाद निर्माण झाल्याने इमारतीची डागडुजी कुणी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्या इमारतींचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट बनल्याने कारवाईवर मर्यादा असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे.

००००००

महाराष्ट्र महापालिका अ​धिनियम आणि सरकारी आदेशानुसार धोकादायक इमारतीमधील रहिवासांना इमारतीतून अन्यक्ष स्थलांतर करण्याबाबत स्पष्ट आदेश आहेत. त्यानुसार अतिधोकादायक इमारतींची यादी पोलिस प्रशासनाला दिली आहे.

एस. के. माने, उपशहर अभियंता शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोव्याच्या तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या गोव्यातील तरुणाने ताराबाई रोडवरील क्लासिक हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. तेजराज विजयकुमार मोहिते (वय ३१, रा. वाशी मरळ, शिगाव, सऊथ गोवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले की, तेजराज मोहिते हा तरुण गेल्या दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त कोल्हापुरात आला. ताराबाई रोडवरील क्लासिक हॉटेलमध्ये तो थांबला होता. मंगळवारी (ता. २५) रात्री अकरा वाजता हॉटेलमधील कर्मचारी जेवणाची विचारपूस करण्यासाठी तेजराजच्या रुमकडे गेला. रुमचा दरवाजा ठोठावल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता, तेजराजने छताच्या पंख्याला दोरी लावून गळफास घेतल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. तेजराजचे मामा रवींद्र शिंदे राजारामपुरीत राहतात. पोलिसांनी तेजराजच्या मोबाइलवरून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images