Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बायोमेट्रीक पॉज मशिनदुकानदारांकडून परत

$
0
0

इचलकरंजी

धान्य वितरण पद्धती सुलभ व्हावी यासाठी राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेल्या बायोमेट्रीक पॉज मशिनमध्ये सतत व्यत्यय निर्माण होत असल्याने बुधवारी शहरातील सर्वच रेशनधान्य दुकानदारांनी सर्व मशिन पुरवठा अधिकारी महादेव शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे सर्वसामान्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

शहरात एक लाख बत्तीस हजार लाभार्थी असून त्यांना १०३ रेशनधान्य दुकानातून धान्य वितरीत केले जाते. सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था पारदर्शक होण्यासाठी कर्नाटक, राजस्थान, हिमाचल राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातसुध्दा बायोमॅट्रिक मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार धान्य दुकानदारांना एक मे पासून बायोमेट्रीक पॉज मशिनचे वितरण करण्यात आले होते. रेशनकार्डवर ज्या व्यक्तींची नावे आहेत, त्यापैकी एका व्यक्तीचा अंगठा मशीनला लावल्याशिवाय धान्य मिळत नाही. मात्र ऑनलाईन पध्दतीत सतत व्यत्यय निर्माण होत असल्याने दुकानातील मशीन ऑपरेट होत नाहीत. सर्व्हर डाऊन होत असल्याने धान्य वितरणात अडथळा निर्माण होत आहे. शिवाय काही लाभार्थ्यांची नावे यादीत नसल्याने दुकानदारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होत आहेत.

या प्रकाराला कंटाळून शहरातील १०३ रेशनधान्य दुकानदारांनी पुरवठा अधिकारी शिंदे यांची भेट घेऊन सर्व मशिन्स आणून त्यांच्या टेबलावर ठेवल्या. जोपर्यंत सर्व्हर व मशिन व्यवस्थितरित्या कार्यान्वित होत नाहीत तोपर्यंत मशिन ताब्यात घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. त्याचबरोबर ही यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत पूर्ववत रेशनधान्य देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. या संदर्भात पुरवठा अधिकारी शिंदे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. यावेळी चंद्रकांत यादव, अन्वर मोमीन, रमेश पाटील, दीपक ढेरे, बाजी आवळे, उत्तम पाटील, दिनकर पाटील, पाडुरंग सुबेदार, बाळू मुजावर यांच्यासह शहरातील रेशनधान्य दुकानदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपुरात महावितरणवर धडक

$
0
0

जयसिंगपूर

शेतीपंपाची वीज दरवाढ रद्द करावी, शेतीपंपाबरोबरच ग्रामीण नळपाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अतिरिक्त भारनियमन रद्द करावे या मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्यावतीने जयसिंगपूर येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे नेते व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिरोळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावरून मोर्चास सुरूवात झाली. क्रांती चौक, शिवाजी चौक मार्गावरून शिरोळ रोडने मोर्चा महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर आला. ‘आमच्या मागण्या मान्य करा-नाहीतर खुर्ची खाली करा, वीजदरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, भारनियमन रद्द झालेच पाहिजे, अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. मोर्चा महावितरण कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलक कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या कक्षात घुसले. आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी वीज दरवाढ आणि भारनियमन याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचे सांगितले. भारनियमनामुळे सामान्य माणसाला प्यायला पाणी मिळत नसेल, पिके वाळत असतील, तर खपवून घेणार नाही, असे त्यांनी ठणकावले. भारनियमनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळित करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित का केला, असा सवाल करून गणपतराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खुलासा मागितला. पाणीबिले थकित राहिल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचे कार्यकारी अभियंता आवळेकर यांनी सांगितले. उद्योजकांची १०० टक्के वसुली नसतानाही त्यांची वीज सुरू आहे, मग शेतकऱ्यांवर हा अन्याय का, असा प्रतिप्रश्न केल्याने अधिकारी निरुत्तर झाले. वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी गणपतराव पाटील यांनी केली.

आंदोलकांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलकांच्या भावना वरिष्ठ अधिकारी व सरकारपर्यंत पोचवू, असे आवळेकर यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्ते कक्षातून बाहेर पडले. कार्यालयाबाहेरील कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारविरोधात बोंब मारून निषेध केला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, शेखर पाटील, बंडा माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, उदयसिंह खाडे, नगरसेवक असलम फरास, एन. एम. बागे, राजेंद्र झेले आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ गटाचे ठरावप्रा. मंडलिकांकडे सुपूर्द

$
0
0

कागल

हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हसन मुश्रीफ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मुश्रीफ गटाच्या पन्नास सहकारी संस्थांचे ठराव एकत्रित करुन मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले. मुश्रीफ गटाने एकत्रित ठराव प्रा. मंडलिकांच्याकडे दिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकार झाला आहे.

कारखान्याच्या या पूर्वीमया दोन निवडणुका मंडलिक व मुश्रीफ या दोन गटात चुरशीने झालेल्या होत्या. या दोन्ही निवडणुका प्रचंड गाजल्या होत्या. सभासदांचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये दिवंगत सदाशिवराव मंडलिकांचे संपूर्ण पॅनेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. तथापि सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक बिनविरोध व्हावी अशी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यादृष्टीने मुश्रीफ गटाचे प्रमुख कार्यकर्ते शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, शशिकांत खोत, गणपतराव फराकटे, बळासो तुरंबे, सुर्यकांत पाटील, विकास पाटील, संजय चितारी, नंदकुमार पाटील, अनिल सदलगे आदींनी मुश्रीफ गटाच्या सहकारी संस्थांचे ठराव एकत्रित करुन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. मंडलिक यांच्याकडे दिले.

संस्थेच्या एकूण १८१ सहकारी संस्थांना ठराव मागविण्यासाठी पत्रे दिलेली आहेत. ठराव देण्याची अंतिम तारिख पाच मे आहे. मुश्रीफ गटाने एकत्रित ठराव दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक बंडोपंत चौगुले, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळवाने झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विजांच्या कडकडाट व जोरदार वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसाने बुधवारी सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले.​ जिल्ह्यातील काही तालुक्यात यापूर्वी पाऊस झाले असले तरी शहर परिसरात यंदा प्रथमच वळीव पावसाने हजेरी लावल्याने उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासियांनी सुखद गारवा अनुभवला. जवळपास अर्धा तास झोडपून काढणाऱ्या पावसामुळे शहरात चार विविध ठिकाणी मोठी झाडे कोसळली. दसरा चौकात फुटपाथवर झाड कोसळले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहतूक कोंडी झाली.

यंदा मे सुरु झाला तरी आजरा, हातकणंगले तालुके वगळता वळीव पावसाने हजेरी लावली नव्हती. शहर परिसरात तर वळीव पावसाचे वातावरणही तयार झाले नव्हते. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला होता. तापमानाचा पारा ४० अंशावर पोहचला होता. त्यामुळे शहरवासीय वळवाच्या प्रतिक्षेत होते. दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा आणखी वाढला होता. मंगळवारी रात्री ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी सकाळपासून हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास शहराच्या दक्षिणेकडील बाजूने काळे ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. करवीरच्या पश्चिमेकडील भागात विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

शहरात साडेचारच्या सुमारास टपोरे थेंब पडण्यास सुरुवात झाली व पाहता पाहता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरात यंदाचा हा पहिलाच वळीव असल्याने अ​नेक नागरिकांनी त्यात भिजण्याचा आनंद लुटला. जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तुंबलेल्या गटारीमुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोटच्या लोट वाहिल्याने सखल भागात काही मिनिटांतच पाण्याची तळी साठली. पार्वती टॉकीजजवळील मुख्य रस्त्यालगत उभी केलेली अनेक दुचाकी, चारचाकी वाहने साठलेल्या पाण्यात अडकली. त्याचबरोबर लक्ष्मीपुरी धान्य बाजार, दसरा चौक परिसर, जयंती नाला, कसबा बावडा, शास्त्रीनगर, लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्ता अशा अनेक ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली होती.

दसरा चौक, सासने ग्राउंड, शिपुगडे तालीम व रेल्वे स्टेशनजवळ झाडे कोसळली. दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंगजवळच्या वर्दळीच्या रस्त्याजवळील फुटपाथवर झाड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्यावतीने ठिकठिकाणी जवानांचे पथक पाठवून झाडांचे रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले. पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा बंदच राहिल्याने परिसर अंधारात होते.

शहराबरोबरच करवीरचा पश्चिम भाग, हुपरीचा परिसर, पन्हाळा, राधानगरी, गारगोटी या भागातही जोरदार पाऊस झाला. वळवाच्या हजेरीमुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडे पडली, वाहतूक कोलमडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुधवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शहरवासीयांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या उष्म्यानंतर संध्याकाळी जोरदार वारा आणि विजांचा कडकडांसह आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला, वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी, मुस्लिम बोर्डिंगच्या इमारतीच्या कुंपनाचे किरकोळ नुकसान झाले. रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे सुमारे दोन तास शहरातील वाहतूक कोलमडली, तर सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.

बुधवारी जोरदार वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडांची पडझड झाली. मुस्लिम बोर्डिंग इमारतीच्या बाहेरचे गुलमोहोराचे झाड उन्मळून पडले. भलेमोठे झाड रस्त्यावर पडूनही सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. तसेच रेल्वे स्टेशन, बुधवार पेठेतील शिपुगडे तालमीसमोर आणि सासने ग्राऊंडसमोर तीन झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक कोलमडली होती. मुस्लिम बोर्डिंग आणि सासने ग्राऊंसमोरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी या मार्गांवरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. झाले पडल्याची वर्दी महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमनच्या २० ते २५ जवानांनी तातडीने रस्त्यात पडलेली वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत हे काम सरूच होते.

अनेक ठिकाणी गटर्स भरून रस्त्यांवरूनही पाणी वाहत होते. सासने ग्राऊंड, परिख पूल, राजारामपुरीतील जनता बजार चौक, बागल चौक, लक्ष्मीपुरी, जयंती नाला या परिसरात रस्त्यांवर सखल भागात एक ते दीड फूट पाणी साचले होते, त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. काही वाहनधारकांनी साचलेल्या पाण्यातूनच कसरत करीत मार्ग काढला. जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंप या मार्गावरील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलजवळ विजेचा खांब दुसऱ्या खांबावर कोलमडला आहे. विजेच्या तारा लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला होता, मात्र वीज प्रवाह खंडित केल्याने हा धोका टळला. रात्री उशिरापर्यंत पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी सांगितले.

अनर्थ टळला

बऱ्याच प्रतीक्षेनंतर आलेल्या पहिल्याच वळिवाने कोल्हापूरकरांची त्रेधातिरपिट उडाली. मुस्लिम बोर्डिंगच्या इमारतीजवळ गुलमोहोराच्या झालाखाली नेहमीच शहाळे विकणारा एक तरुण उभा असतो. याशिवाय उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरातील विक्रेते आणि वाटसरू याच झाडाच्या सावलीचा आसरा घेत होते. पावसाला सुरूवात होताच लोकांनी झाडाखालून पळ काढला, त्यामुळे अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा बँकेची निवडणूक बिनविरोध

$
0
0

कोल्हापूर

वारणानगर (ता.पन्हाळा) येथील श्री वारणा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. एकूण सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर मांगले (ता.शिराळा), देवर्डे (ता.वाळवा) व पोखले (ता.पन्हाळा) या तीन गावांना प्रथमच संधी देण्यात आली आहे .निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर वारणा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम एल. माळी यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले संचालक असे : निपुण विलासराव कोरे (वारणानगर), उत्तम बाबासाहेब पाटील (लाटवडे), महादेव हिंदुराव चावरे (देवाळे), अरविंद भाऊसाहेब बुद्रुक (एतवडे बुद्रुक), बाबासो गोविंद बावडे (बहादूरवाडी), बाळासाहेब यशवंत पाटील (सातवे), बळवंत शंकर पाटील (सागाव), प्रताप रघुनाथ पाटील (पोखले), विनायक राजाराम बांदल (बच्चे सावर्डे),अभिजित यशवंत पाटील (मांगले), प्रकाश रंगराव माने (भादोले) ,बाबासो नामदेव पाटील (देवर्डे) , शोभा प्रमोद कोरे (कोडोली), नलिनी बसवेश्वर डोईजड (इचलकरंजी), नितीन शंकर माळी (किणी), डॉ.प्रशांत मधुकर जमने (कोडोली),धोंडीराम मंगू सिद (घुणकी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडजवळ शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

कर्जबाजारीपणाला कंटाळून पार्ले (ता. कराड) येथील एका शेतकऱ्याने बुधवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश कृष्णा नलवडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते ४५ वर्षांचे होते.

नलवडे यांच्यावर गावातील बँक, पतसंस्था आणि सोसायटी यांचे मिळून सुमारे सहा लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या मालकीची ४५ गुंठे जमीन आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य होत नव्हते. त्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नलवडे बुधवारी सकाळी घरातून टॉवेल व नायलॉनची दोरी घेऊन जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी एक वाजला तरी ते घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने मुलाला वडिलांना बोलावून आणण्यास सांगितले. मुलगा शेतात गेला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. मुलाने घरी येऊन घटनेची माहिती दिली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशीरा पार्ले येथे त्यांच्यावर वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नलवडे यांचा मुलगा नववीत शिकतो आणि मुलगी त्यापेक्षा लहान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टक्केवारी मिळाल्यावरच होते सही

$
0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter - @rg_ravirajMT

कोल्हापूर जिल्हा खनिकर्म विभागात प्रत्येक व्यवहार हा टक्केवारीवर होतो. जेवढ्या रकमेचे काम तेवढ्या रकमेच्या दहा टक्के खिशात टाकल्याशिवाय सही होणार नाही, असे स्पष्ट सांगितले जात असल्याने ठेकेदारांचाही नाईलाज होतो. काम तर करावे लागणार, आजवर केलेल्या गुंतवणुकीचे काय?, असे म्हणून ठेकेदारही या टक्केवारीला बळी पडतात. गेल्या काही महिन्यांत तर विभागाकडून अक्षरशः वेठीस धरले गेल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना केल्या. तर, दुसऱ्याबाजूला बॉक्साइटच्या खाणींचे काम करणाऱ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते दिले गेल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर जिल्हा खनिज संपत्तीची उधळण असलेला जिल्हा. बॉक्साइट, वाळू, मुरूम, स्टोन क्रशर यांची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे उत्खननाची कामेही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होतात. म्हणूनच, कोल्हापूरचा खनिकर्म विभाग ‘मलईदार’ म्हणून ओळखला जातो. याच ‘मलई’मुळे थेट जिल्हा खनिकर्म अधिकारीच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. खात्यातील कामात पारदर्शकता यावी, यासाठी ऑनलाइन टेंडर प्रक्रिया सुरू झाली. पण, त्यालाही बगल देण्यात आली असून, या विभागात पैसे दिल्याशिवाय काहीच काम होत असल्याची तक्रार अनेक दिवसांतपासून सुरू होती. दोन-दोन महिने नव्हे, तर सहा सहा महिने कामे प्रलंबित राहिलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे.

खनिकर्म खात्यातील अधिकारी कोणालाच जुमानत नाहीत, असाच प्रकार सुरू होता. अगदी आमदार, खासदारांनी दिलेल्या पत्रांनाही उत्तरे मिळत नव्हती. पत्र मिळाल्याचेही प्रत्युत्तर मिळत नसल्याने, काम होणे खूपच दूर राहिले. एखाद्या नेत्याने उपद्रव मूल्य दाखविले, तरच त्याच्याशी संबंधित फाइल पुढे सरकणार, अशी कामाची पद्धत होती. बॉक्साइट किंवा वाळू उत्खननात मिळालेल्या परवानगी इतकेच उत्खनन कधीच होत नाही. परवानगीच्या दुप्पट-तिप्पट उत्खनन होत असताना, त्याकडे दुर्लक्ष करणे, ‘याचसाठी अट्टाहास’, केला जातो. वाळूच्या बाबतीत ठेका मिळाल्यानंतर, पावती बुके घेताना प्रत्येकवेळी टक्केवारी दिली जाते. त्यामुळे वाळू ठेका घेणारा ही रक्कम जादा वाळू उपसूनच वसूल करतो. यात नुकसान नैसर्गिक साधन संपत्तीचे आणि सरकारच्या महसुलाचे. अगदी ठेकेदाराला डिपॉझिट परत मिळवण्यसाठीही कार्यालयात येरझाऱ्या घालाव्या लागत होत्या. अर्थात ठराविक रक्कम हातात ठेवल्याशिवाय तेही परत मिळत नव्हते. जिल्हा ख‌निकर्म अधिकारी अभय भोगे याच्या अटकेनंतर या विभागातील सगळ्याच गोष्टी चव्हाट्यावर आल्या. आता भोगे याच्यावर कोणत्याप्रकारची कारवाई होते की, त्यांना ‘अभय’ मिळते, याची उत्सुकता लागली आहे.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना उपदेश

काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी अभय भोगे यांचीही भेट घेतली होती. या विद्यार्थ्यांना ‘तुम्ही खनिकर्म विभागाकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका’, असा उपदेश वजा सल्ला दिल्याचे स्वतः भोगे याने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले होते. आता तेच विद्यार्थी भोगे यांना अटक झाल्याचे पाहून अवाक् झाले आहेत.

अडीच महिन्यातच गवळींची बदली

लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेले जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांची बदली काही दिवसांवरच आली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रलंबित प्रकरणांच्या फाइल्स बाहेर काढण्यात आल्याची जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा आहे. त्यातूनच गेल्या काही महिन्यांत कामांची टक्केवारीतून मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या तक्रारी झाल्या. अखेर लाचलुचपत प्रतिबंध खात्याला या तक्रारींची दखल घ्यायला लागली आणि अखेर भोगे जाळ्यात सापडले. दुसरीकडे भोगे यांना अटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश गवळी यांची पुण्याला बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गवळी यांनी अवघ्या दोन-अडीच महिन्यांत जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी केली होती. पण, भोगे यांच्यावरच कारवाई झाल्यानंतर त्यांची बदली हा केवळ योगायोग नसल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रध्वजाचा एक कोटींचा विमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील पोलिस उद्यानात उभा केलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच राष्ट्रध्वजाचा तब्बल एक कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. राष्ट्रध्वजासह ध्वजस्तंभ, मोटर, रोप, वायररोप यात कोणताही बिघाड झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास एक कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या (केएसबीपी) पदाधिकाऱ्यांनी एका कंपनीकडून राष्ट्रध्वजासाठी विमा सुरक्षा कवच घेतले आहे.

कोल्हापुरातील ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर ५ हजार, ४०० स्वेअर फुटांचा राष्ट्रध्वज फडकताच हा कोल्हापूरकरांसाठी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. गेले चार दिवस राज्यासह देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून भव्यदिव्य राष्ट्रध्वजाची चर्चा सुरू आहे. ध्वजस्तंभ आणि राष्ट्रध्वज पुरवणाऱ्या बजाज कंपनीने २० वर्षांची वॉरंटी दिली आहे, तरीही केएसबीपीने ध्वजासाठी विम्याचे सुरक्षा कवच घेतले आहे. ध्वजस्तंभ, ध्वज, ध्वज वर घेण्यासाठी वापरली जाणारी विद्युत मोटर, रोप, वायर रोप या सगळ्या वस्तुंचा विमा उतरवण्यात आला आहे. केएसबीपीने ओरिएन्टल कंपनीचा एक कोटी रुपयांचा विमा घेतला असून, एक वर्षाच्या काळात कोणताही तांत्रिक बिघाड किंवा दुर्घटना घडल्यास विमा कंपनीकडून एक कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे, अशी माहिती केएसबीपीचे प्रमुख सुजय पित्रे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.

उद्या लागणार शाहू महाराजांची प्रतिमा

पोलिस उद्यानात साकारलेल्या जयगान संकल्पनेत शाहू महाराजांची प्रतिमा नसल्याने वादंग निर्माण झाले होते. नजरचुकीने ही प्रतिमा राहिल्याचे केएसबीपीचे प्रमुख पित्रे यांनी कबूल करून तातडीने प्रतिमा लावणार असल्याचे सांगितले होते. शनिवारी (ता. ६) राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने उद्यानात त्यांची प्रतिमा लावली जाणार असल्याचे केएसबीपीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

तपासणीसाठी राष्ट्रध्वज उतरवला

बुधवारी संध्याकाळी शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील सर्वात उंच ध्वजाची काळजी वाढली होती. ध्वजासह ध्वजस्तंभाला काही अडचण निर्माण झाली आहे काय? याची पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तपासणीसाठी ध्वज उतरवण्यात आला. अचानक ध्वज उतरवल्याने सोशल मीडियात उलटसुलट चर्चेला उधान आले होते, तर ध्वज खाली घेतल्याने पोलिस उद्यानात बघ्यांचीही मोठी गर्दी निर्माण झाली होती. अर्ध्या तासात पुन्हा ध्वज फडकला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला.

पोलिस उद्यनात ३०३ फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभा राहिल्यांतर तिसऱ्याच दिवशी शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसात चार ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विजेचे खांबही कोलमडले, यामुळे ३०३ फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाबद्दलही काळजी वाढली होती. ६५ किलो वजनाचा राष्ट्रध्वज सोसाट्याच्या वाऱ्याने फडकत होता. ध्वजाचा ताण स्तंभावर आला आहे काय? ध्वजाची शिलाई उसवली आहे का? बांधणीत काही फरक पडला आहे का? याची पाहणी करण्यासाठी केएसबीपीच्या टीमकडून गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ध्वज उतरवण्यात आला. अचानक ध्वज खाली घेतल्याने सोशल मीडियातून चर्चेला उधान आले. अनेकांनी ध्वज उतरवल्याचे फोटोही शेअर करून दुपारीच ध्वज उरवल्याबद्दल शंका व्यक्त केल्या. ध्वजाची आचारसंहिता, तांत्रिक अडचणी याचीही जोरदार चर्चा झाली. बघ्यांनीही पोलिस उद्यानात गर्दी केली होती. मात्र अर्ध्या तासात पुन्हा ध्वज फडकल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला.

केएसबीपीच्या टीमने पाहणी केली असता शिलाई, रंग, कापड यात कोणतीच त्रुटी आढळली नाही, त्यामुळे पुन्हा अर्ध्या तासात ध्वज फडकला. पुन्हा ध्वज फडकताच सोशल मीडियात फोटो झळकले आणि त्याला लाईकही मिळाल्या. दरम्यानच्या काळात मात्र ध्वजाच्या आचारसंहितेबाबत बरीच चर्चा रंगली. याबाबत केएसबीपीचे प्रमुख सुजय पित्रे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘ध्वजाची पाहणी करण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दररोज ठराविक अंतराने दुर्बिनीतून ध्वजाची बारकाईने पाहणी केली जाते. पहिल्या पावसाचा ध्वजावर काय परिणाम झाला आहे काय याची पाहणी करण्यासाठी ध्वज उतरवला होता. पाहणीनंतर ध्वज सुस्थितीत असल्याचे आढळले.’

प्रतिकात्मक ध्वजाला आचारसंहिता नाही

पोलिस उद्यानात उभारलेला ध्वज प्रतिकात्मक आहे, त्यामुळे ध्वज फडकवणे, उतरवणे आणि त्यासाठी लागणारी आदर्श आचारसंहिता या ध्वजासाठी लागू होत नाही. ध्वजाचा सन्मान जपण्यात मात्र कोणतीही तडजोड केली जात नाही. एकाच वेळी पाच राष्ट्रध्वज तयार करून घेतले आहेत. ठराविक दिवसांनी ध्वज उतरवून त्याची दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती केएसबीपीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राणे कुठेही जावोत, सेनेला फरक पडत नाही!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असे नमूद करताना पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार, असे आज उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, या बातम्या चुकीच्या आहेत. राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला काहीच फरत पडणार नाही, असेही देसाई यावेळी म्हणाले.

नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना-भाजपमधील दुरावा आणखी वाढेल व शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत आज देसाई यांना विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. नारायण राणे कोणत्या पक्षात जातात, त्यांना कोणता पक्ष स्वीकारतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याने शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असे देसाई म्हणाले.

शिवसेना मुळात असल्या गोष्टींची दखलच घेत नाही. असे किती आले आणि किती गेले. शिवसेना त्या सगळ्यांनाच पुरून उरली आहे. अशा अनेकांना आम्ही टोलवून लावलं आहे. हा विषय शिवसेनेवर परिणाम करणारा नाही. आपल्याला काय परवडेल, काय झेपेल, काय होईल, याचा निर्णय त्या त्या पक्षाने घ्यायचा आहे. हा आमचा विषयच नाही, असेही देसाई यांनी पुढे स्पष्ट केले.

दरम्यान, नारायण राणे शिवसेनेत जाण्यासाठी आटापिटा करत असल्याच्या वृत्तावर नितेश राणे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं इतकी वाईट वेळ राणे कुटुंबावर आलेली नाही, असे म्हणत नितेश यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. त्या अनुशंगाने प्रश्न विचारला असता देसाई यांनी जोरदार पलटवार केला.

राणे यांना दिल्लीचं बोलावणं

नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांमुळे राणेंची मनधरणी करण्यासाठी दिल्लीतून नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. राणे यांना काँग्रेस श्रेष्ठींनी दिल्लीत बोलावून घेतलं आहे. राणेंची समजूत काढण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यावर सोपण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकाऱ्यांना अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

सोलापुरातील समाजकल्याण विभागातील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी सहाय्यक समाजकल्याण आयुक्त मनीषा फुले आणि निलंबित सहाय्यक समाजकल्याण आयुक्त दीपक घाटे या दोघांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांनाही ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील वर्षी सोलापुरातील समाजकल्याण विभागात रोजंदारीवर काम करणारी सारिका काळे हिला शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. सोलापुरसह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या यादीत बोगस नावे घालून त्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाटली होती. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते. काळे हिच्या सांगण्यावरून पहिल्या टप्यातील तपासात सुमारे १८ ते २० कोटींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले होते. तिच्याकडून अधिक माहिती घेतली असता यामध्ये फुले, घाटे यांच्यासह जवळपास शंभर जणांना आरोपी करण्यात आले. काळे ही सध्या कारागृहात आहे तर काहीजण त्यावेळीच जामिनावर सुटले होते. यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. घाटे सोलापुरातून बदली होऊन गेला होता आणि तो सांगली येथे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त म्हणून कामकाज पाहत होता.

दरम्यान फुले आणि घाटे यांनी यापूर्वी अटकपूर्व जमीन घेतला होता. त्यावेळी त्यांनी या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु बराच कालावधी उलटून गेला तरीसुध्दा या दोघांकडूनही तापसकामात कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळण्याचे ठरविले. त्यानुसार फुले आणि घाटे यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनच्या जीविताला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या सात पोलिसांपैकी दोन पोलिसांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. ५) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. तब्बल तीन झालेल्या युक्त‌िवादात १४ कोटी रुपयांच्या चोरीचा बनाव असून, ईडी आणि आयकरचा ससेमिरा चुकवण्यासाठी सांगलीतील पोलिसांना बळीचा बकरा केल्याचा आरोप संशयित पोल‌िसांच्या वकिलांनी कोर्टात केला. याशिवाय संबंधित रक्कम वारणा शिक्षण समुहाची असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. पुढील सुनावणी शनिवारी (ता. ६) होणार आहे.

सांगलीतील काही गुंडांकडून माझ्या जीवितास धोका आहे. असा अर्ज मैनुद्दीन मुल्लाने सांगली पोलिस अधीक्षकांकडे पाठवल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी न्यायालयात सांगितले. मैनुद्दीनच्या अर्जाची प्रतही त्यांनी कोर्टात सादर केली. यामध्ये झुंजार सरनोबत यांनी पैशाचे अमिष दाखवून कोल्हापुरात नेऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सांगलीतील एलसीबीचे तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, कुलदीप कांबळे, शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील यांच्यावर कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील शंकर पाटील (वय ४५, रा. माधवनगर, सांगली), दीपक उत्तम पाटील (४१, विश्रामबाग, सांगली) आणि रवींद्र बाबूराव पाटील (४०, रा, कागल) या तिघांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. यापैकी शंकर पाटील आणि दीपक पाटील यांच्या अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. अॅड. श्रीकांत जाधव यांनी युक्त‌िवाद करताना फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्या फिर्यादीबाबत संशय उपस्थित केला. सरनोबत यांचे वय आणि उत्पन्नाची साधने पाहता इतकी रक्कम कुठून आली? स्वतः फिर्यादीनेही याबाबत पोलिसांना वेळीच माहिती का दिली नाही? फिर्यादीला स्वतःच्याच रकमेची माहिती नव्हती काय? वर्षाने पुन्हा वेगळी फिर्याद का दाखल केली? असे सवाल अॅड. जाधव यांनी उपस्थित केले. संबंधित रक्कम वारणा शिक्षण समुहाची असावी, असा संशयही उपस्थित केला आहे. पोलिसांवर येणाऱ्या दबावापोटीच सांगलीतील पोलिसांना बळीचा बकरा केल्याचा युक्त‌िवाद अॅड. जाधव यांनी केला. सुमारे तीन तास हा युक्त‌िवाद सुरू होता.

रकमेबाबत संशय

वारणा शिक्षण समुहाचे सचिव जी. डी. पाटील यांचा मुलगा आशुतोष पाटील यांच्याशी भागीदारीमध्ये जमीन खरेदीसाठी रक्कम आणून ठेवल्याची माहिती सरनोबत यांनी जबाबात दिली होती. इतकी मोठी रक्कम कोणत्याही सुरक्षेविना वारणानगरमध्ये का ठेवली? हा मोठा प्रश्न आहे. अशावेळी आयकर व ईडीच्या चौकशीचा फेरा चुकविण्यासाठी तपासातील पोलिसांनीच रक्कम चोरल्याचा बनाव केल्याचा युक्त‌िवाद अ‍ॅड. जाधव यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी चप्पलला बूस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘राज्यातील सर्वच पारंपरिक व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सरकार सर्वती मदत करेल. कारागिरांनीही बदलत्या काळाला अनुसरून ग्राहकांना हव्या तशा आणि निर्यातक्षम कोल्हापुरी चप्पल बनविण्याचे कौशल्य आ‌त्मसात करावे,’ असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे केले.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित‌ कोल्हापुरी चप्पल कारागीर कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रिचा बागल प्रमुख उ‌पस्थित होत्या. शाहू स्मारक भवनात कार्यशाळा झाली.

देसाई म्हणाले, ‘राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पिढ्यान्‍पिढ्या करणारे १२० व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक कोल्हापुरी चप्पल आहे. कोल्हापुरी चप्पलची वेगळी ओळख राज्य, देशपातळीवर आहे. व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी कारागिरांनी ग्राहकांच्या पसंतीच्या फॅशनेबल चपला ‌तयार कराव्यात. मूळ ढाच्या कायम राखत विविध डिझाइन्समध्ये आणि पायांना टोचणार नाहीत असे कोल्हापुरी चप्पल तयार करणे काळाची गरज आहे. कारागिरांनी आपल्यातील व्यावसायिक स्पर्धा बाजूला ठेवून क्लस्टर करावे. त्या माध्यमातून कच्चा माल मिळवावा. ग्रामोद्योग मंडळाकडून या व्यवसायाला प्रोत्साहन देताना कारागिरांची उन्नती केंद्रस्थानी ठेवली. सरकार कोल्हापुरीसह सर्वच जिल्ह्यांतील पारंपरिक व्यवसायांना उत्तेजन देण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत आहे.’

शिवाजी विद्यापीठाची मदत

कोल्हापुरी चप्पलला पेटंट मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या व्यवसायातील अडचणी, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरी चप्पलवर नवीन संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाची मदत घेतली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

शिवसेनेची स्वबळाची तयारी

दरम्यान, ‘सरकारचा पाठिंबा काढण्याचा शिवसेनेचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट करून देसाई यांनी. मध्यावधी निवडणुकीची शक्यताही नाही. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवून सत्तेत येण्यासाठी आतापासून ‌शिवसेनेने तयारी सुरू केली आहे,’ अशी माहिती देसाई यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनच्या जीविताला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेच्या कामातील २० लाख किंमतीच्या लोखंडी पुलासाठी सव्वा कोटी जादा बिल दिल्याची कबुली युनिटी कन्सल्टंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुनाच थेट पाइपलाइनसंदर्भात आयोजित बैठकीत पुढे आला. आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ व राजेश क्षीरसागर यांच्यासमोर कन्सल्टंटचे महेश पाठक यांनी ज्यादा बिलाची कबुली दिली. भोंगळ कारभाराला शिस्त लावण्यासाठी सुकाणू समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य सरकारकडे प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी भाजप व ताराराणी आघाडीच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

थेट पाइपलाइनच्या कामांमध्ये युनिटी कन्सल्टंट कंपनीला अडीच कोटी रुपये जादा बिल दिल्याचा आरोप भाजप-ताराराणी आघाडीने केल्यानंतर जाग आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी बैठक घेतली. महानगरपालिकेतील ताराराणी सभागृहात तीन आमदारांसह, महापौर हसीना फरास, आयुक्त अभिजित चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी आमदार पाटील म्हणाले, ‘थेट पाइपलाइन योजनेच्या कामावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या योजनेला खो बसू नये यासाठी आढावा बैठक घेतली आहे.’

थेट पाइपलाइनच्या कामावर देखरेख करणाऱ्या युनिटी कन्सल्टंटीचे अधिकारी महेश पाठक यांनी वाढीव बिलाबाबत बैठकीच्या सुरुवातीला खुलासा केला. या योजनेचा आराखडा राज्य सरकार व जीवन प्राधिकरणनने बनविला आहे. यामध्ये योजनेसाठी अंदाजे रक्कमेचा विचार केला आहे. या योजनेतील कामांच्या बिलाबाबत उपमहापौर अर्जुन माने यांनी कन्सल्टंटकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. निविदेतील अटींप्रमाणे बिले केली आहेत. सहा पूल, कॉपरडॅम, डी वॉटरिंग यांच्या कामांसाठी २५ लाख रुपये खर्च येतो. पण निविदेत या सर्व कामांसाठी दोन कोटी ३८ लाख रुपये तरतूद केली आहे. प्रत्यक्ष कामांपेक्षा जादा बिल दिली आहेत. बिलामध्ये तफावत आढळली आहे. पाइपलाइनसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी पुलाचा खर्च २५ लाख असून महानगरपालिकेने सव्वा कोटी रुपये बिल दिल्याची माहिती दिली. पण महानगरपालिकेने दिलेली रक्कम अॅडव्हॉन्स रक्कम असून जादा दिलेले बिल पुढील बिलात वळते करुन घेतले जाईल, असे स्पष्ट केले.

युनिटी कन्सल्टंटीचे अधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त तपासणी करणे आवश्यक असताना ते केले नसल्याने घोळ निर्माण झाला आहे, असा आरोप प्रा. जयंत पाटील, भूपाल शेटे यांच्यासह नगरसे​वकांनी केला. त्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी, विरोधी पक्षनेता, अधिकाऱ्यांची सुकाणू समितीची नियुक्ती करण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ढोबळ बिले न काढता प्रत्यक्ष काम पाहून बिले काढण्याचा आदेशही मुश्रीफ यांनी दिले.

‘योजनेचे वाटोळे केले’

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी कन्सल्टंटीचे अधिकारी पाठक यांच्यावर योजनेचे वाटोळे केल्याचा आरोप केला. योजनेचा मार्ग बदलण्याची सूचना केली असताना कन्सल्टंटने ऐकले नाही. पण चूक लक्षात आल्यावर मार्ग बदलला. चांगल्या दर्जाचे इंजिनिअर दिले नाहीत. जागेवर बसून निविदा तयार केली. कन्सल्टंटकडून काही होणार नसून ही योजना बारगळेल, असे भाकितही केले.

उपायुक्तांचे बांधकामांच्या फायलीकडे जादा लक्ष

पाइपलाइन योजनेचे काम उपायुक्तांकडे असायला हवे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. उपायुक्तांचे लक्ष लोकोपयोगी कामापेक्षा बांधकामाच्या फायली, टीडीआर, एफएसआयकडे जास्त लक्ष असतो, असा आरोप केला. पण आपल्याकडे पूर्वीपासून जबाबदारी असल्याचे उपायुक्त खोराटे यांनी स्पष्ट करुन आपल्या कामाला मर्यादा असल्याची कबुली दिली.

तीन आमदार देणार लक्ष

राज्य सरकारकडे रखडलेल्या कामाच्या परवानगीसाठी आमदार मुश्रीफ, आमदार पाटील व आमदार क्षीरसागर यांना माहिती द्यावी. ते राज्यसरकारकडे पाठपुरावा करतील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची स्वबळाची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सरकारचा पाठिंबा काढण्याचा शिवसेनेचा कोणताही विचार नाही. मध्यावधी निवडणुकीची शक्यताही नाही. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवून सत्तेत येण्यासाठी आतापासून ‌शिवसेनेने तयारी सुरू केली आहे,’ अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोल्हापुरी चप्पल कारागीर कार्यशाळेच्या उद्‍घाटन सोहळ्यासाठी ते आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘शिवसेना सरकारमध्ये आहे. ती यापुढील काळातही राहील. पाठिंबा काढून घेण्यासंबंधी‌चा विचार शिवसेनेने केलेला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढवेल. राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढवेल. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना तयारी करण्याच्या सूचना पक्षाकडून दिल्या आहेत.’

दिवसेंदिवस शिवसेना मजबूत होत चालली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जाणार हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे नाहीत. ते कुठे जातात, त्याची दखलही आम्ही घेत नाही. त्यांचे भले होईल तिथे त्यांनी जावे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरोडा टाकून शिष्टाई करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयआरबी रस्ते प्रकल्पानंतर दरोडा टाकण्यासाठी थेट पाइपलाइनसारखी महत्त्वाच्या योजना आणली. ज्यांनी या योजनेत ढपला पाडला, त्याच दोन खऱ्या सूत्रधारांनी महापालिकेत येऊन भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. पण भाजप ताराराणी आघाडी शांत राहणार नाही, असा इशारा माजी महापौर सुनील कदम यांनी आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला. ज्यांनी जागांवर दरोडे टाकले, त्यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

थेट पाइपलाइन योजनेतील भ्रष्टाचाराच्या निमित्ताने काँग्रेस आघाडी व भाजप आघाडीमधील वातावरण पुन्हा तापले आहे. भाजप आघाडीने यातील घोटाळा उघड केल्यानंतर काँग्रेस आघाडीनेही या भ्रष्टाचाराला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र योजनेबाबत शुक्रवारी बोलवलेल्या आढावा बैठकीस भाजप आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रितच न केल्याने संतापलेल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आघाडीच्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले.

याबाबत सुनील कदम यांनी या योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता देण्यात आलेले बिल पुढील बिलात वजा करून घेण्यापेक्षा ज्यांनी बिले दिली त्यांच्याकडून वसूल करून घेऊन त्यांच्यावर आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच ज्यांनी दरोडे घातले, त्यांच्याकडून शिष्टाई करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वत‍ःच्या भ्रष्टाचारावर पांघरुण टाकण्यासाठी केलेला प्रकार आहे, असाही आरोप केला. योजनेची मूळ किंमत ४२४ कोटी रुपयांची असताना ती ४८५ कोटी रुपयांची कशी झाली? यातील ६० कोटी रुपये गेले कुठे? हे सारे सत्य बाहेर येण्यासाठी नार्को टेस्ट करावी. ज्यांनी चोर पकडून दिला, त्यांनाच या बैठकीला बोलवले नाही. कदाचित त्यांना बोलवले तर आणखी काही उघड होईल ही भीती त्यामागे असेल, असा टोलाही कदम यांनी लगावला.

ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम म्हणाले, ज्यांनी टोलच्या आंदोलनात उपोषणाला बसलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फसवले, त्यांनी या योजनेत जनतेला फसवण्याचे काम केले आहे. योजना सुरू झाल्यापासून तीन वर्षात एक आढावा बैठक न घेतलेल्या नेत्यांना मुदत संपून पाच महिने उलटून गेल्यानंतर आढावा बैठक घेण्याचे स्वप्न पडले काय? आम्ही दाखवून दिलेली चूक प्रशासनाने व कन्सल्टंटनेही कबूल केली. त्यामुळे या चुकीतून झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्यासाठी ते आले होते. मात्र भाजप आघाडीच्यावतीने योजनेतील साऱ्या त्रुटी जनतेसमोर मांडणार आहे. तसेच सीआयडी चौकशी व नार्को टेस्टच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघड करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस किरण नकाते, ईश्वर परमार, अजित ठाणेकर, राजाराम गायकवाड, राज​सिंह शेळके, शेखर कुसाळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉक्टरांनी उपचार करण्यास हालगर्जीपणा केल्यानेच रुग्ण दगावल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात गोंधळ घातला. संतप्त नातेवाईकांनी विभागातील व्हेंटिलेटर जमिनीवर आदळून फोडल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार शेतात काम करताना काहीतरी चावल्याने सुनील रावण (वय २८, रा. हारुगडेवाडी, ता. शाहूवाडी) या तरुणास उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी दाखल केले होते. मूत्राशयात बिघाड झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे डायलेसिससाठी सुनीलला अतिदक्षता विभागात ठेवले होते. शुक्रवारी रात्री त्याची प्रकृती अधिकच बिघडली. रात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आपल्या भावावर डॉक्टरांची तातडीने व योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप करीत नारायण रावण व इतर नातेवाईकांनी ड्युटीवरील डॉक्टरांशी वाद घातला. त्यावेळी काही तरुणांनी व्हेंटिलेटर उचलून जमिनीवर आदळला. वादाची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी असलेले पोलिस अतिदक्षता विभागात पोहोचले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वाद वाढला नाही. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पोलिसांत नोंद झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक धडा शिकवतील

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यावधी निवडणुकीचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना तयार आहे. सेनेचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. काही राजकीय पक्ष फाटाफुटीसाठी प्रयत्न करत आहेत. पण, शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही. कुणी गद्दारी केली तर मधमाशाचे पोळे फुटल्यावर जशा माशा बाहेर पडतात त्याप्रमाणे शिवसैनिक गद्दारांना धडा शिकवतील, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, परिवहन सभापती नियाज खान उपस्थित होते. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात मेळावा झाला.

संजय पवार म्हणाले, ‘काही पक्ष ताकद वाढवण्यासाठी मनी टॉनिक दाखवत असतील तर शिवसेना मसल टॉनिक दाखवेल. काहीजण मी स्वतःच्या जीवावर आमदार झालो आहे, अशी भाषा करत असतील तर ते शिवसेनेमुळे आमदार झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. अशी भाषा करणारी मंडळी शिवसेनेला विसरली तर त्यांचे नामोनिशाणही राहणार नाही.’

विजय देवणे म्हणाले, ३१ वर्षांपूर्वी सुरेश साळोखे व शिवाजीराज जाधव यांनी शिवसेनेची शाखा स्थापन केली होती. गावागावात जाऊन शिवसैनिकांनी शिवसेनेची बांधणी केली. आज शिवसैनिकांच्या जोरावर जिल्ह्यातील १० पैकी सहा आमदार निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेत दहा सदस्य आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसैनिकांनी झेंडा फडकावण्यासाठी सज्ज रहावे. लोकसभा निवडणुकीत दोन खासदार व दहा आमदार जिंकण्यासाठी शिवसेना तयार आहेत.

शहर प्रमुख शिवाजीराव जाधव व दुर्गेश लिंग्रस यांची भाषणे झाली. कमलाकर जगदाळे यांनी सूत्रसंचलन केले.

सुनील शिंत्रे, सुजीत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, नगरसेविका प्रतिभा निल्ले, महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, शहरप्रमुख रिया पाटील, शशी बीडकर, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणत्याही चौकशीची काँग्रेस आघाडीची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एका महासभेत ५३ आरक्षणे उठवून जमिनीच्या व्यवहारातून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याची चौकशी लागलेली असताना त्याचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या कदम बंधूंचीच दरोडेखोरी प्रवृत्ती आहे. दुसऱ्याच्या ताटातील ओरबडण्याच्या प्रवृत्तीमुळे सारे जगच दरोडेखोर वाटत असल्याचा प्रतिटोला काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वात केला आहे. आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटींचा निधी आणला. पण, जनतेशी कधी प्रतारणा केली नाही. त्यामुळे नार्को टेस्टच नव्हे, कोणतीही परीक्षा द्यायला नेते तयार असल्याचे आव्हानही दिले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या महापौर हसीना फरास वगळता उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी संयुक्तरिक्ता दिलेल्या पत्रकात भाजप ताराराणी आघाडीचे माजी महापौर सुनील कदम व नगरसेवक सत्यजीत कदम यांच्यावर कडवट टीका केली आहे. गेली २५ वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत असताना जिल्ह्यासाठी हजारो कोटींचा निधी आणला. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या उंचीची बरोबरी होत नसताना आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कदम बंधूंनी आरोप करणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कदम बंधूंनी दुसऱ्याच्या ताटातील ओरबडण्याचे काम केले. ताराराणी आघाडी सत्तेत असताना महासभेत आरक्षणे उठवून त्यातून कोट्यवधीची संपत्ती जमवली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याची चौकशी लागलेली असताना त्याची संपत्ती हडप केली. असे दरोडे घालण्याची प्रवृत्ती असलेल्या कदम बंधूंना सारे जगच दरोडेखोर वाटत आहे.

काँग्रेस आघाडीची योजना म्हणून विरोधक हेतूपुरस्सर पाइपलाइन योजना प्रलंबित ठेवून जनतेच्या प्रश्नाशी खेळत असल्याचा आरोप करताना म्हटले आहे की, भाजपची केंद्रात सत्ता येऊन तीन वर्षे तर राज्यात सत्तेला अडीच वर्षे झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महत्त्वाची खाती असताना अजूनही सरकारकडील आवश्यक परवानगी प्रलंबित आहेत हे दुर्दैव आहे. योजनेबाबतचे इस्टिमेट, खर्च करणे, मंजुरी देणे ही कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतात. या योजनेबाबतही सर्व प्रक्रिया पूर्ण करुन केंद्र सरकारची परवानगी घेतली. याबाबतची माहिती कॅडसन कंपनीमार्फत मंत्र्यांची चमचेगिरी करुन सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यवधीची कामे मिळवणाऱ्या ठेकेदार लोकप्रतिनिधी सत्यजीत कदम यांना आहे. पण, केवळ उत्तर मतदार संघात भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु आहे. ज्या थेट पाइपलाइन योजनेच्या मंजुरीचा वापर करुन मताचा जोगवा मागितला. तसेच योजनेच्या सादरीकरणावेळी योजना परि​पूर्ण असल्याचे सांगणाऱ्या नाना कदम यांनी आता आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे, असा टोलाही लगावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी स्वप्ने पाहणे बंद करावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘सात वर्षे आमदार म्हणून काम करताना कोल्हापूरच्या विकासासाठी खूप कामे केली. याच कामांच्या जोरावर जनता पुन्हा मला निवडून देईल. मी हॅट्‍ट्रिक साधल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मंत्र्यांनी स्वप्ने पाहणे बंद करावे,’ असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
जिल्हा शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा झाला.
मेळाव्यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवचरित्र व्याख्याते शिवरत्न शेटे, आमदार वैभव नाईक प्रमुख उपस्थित होते. गेल्या आठवड्यात भाजपच्या जिल्हा मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुकांत भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार आणि दहा आमदार असे टार्गेट असल्याचे जाहीर केले. त्याला आमदार क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘आपल्या जिल्ह्यातील मंत्री जिल्ह्यातून दोन खासदार आणि सगळे आमदार भाजपचे निवडून आणू, असे सांगत आहेत. पण, गेली सात वर्षे मी आमदार आहे आणि आजही रस्त्यावर आहे. सत्तेवर आहे म्हणून बोलत नाही तर जनतेतून बोलत आहे. इगो आहे म्हणून मी सांगत नाही, तर ही जनताच मला पुन्हा निवडून देईल, असा ठाम विश्वास आहे. सत्तेवर आहात म्हणून तुम्ही काहीही बोलता, हे बरोबर नाही.’

शहराचा आमदार शिवसेनेचाच

आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री पाटील यांनाच लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेनेचे कोल्हापूरशी अतूट नाते आहे. त्यामुळेच सहापैकी पाच वेळा शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून आला. एकावेळचा अपवाद हा छत्रपती घराण्याच्या सन्मानासाठी होता. त्यामुळे पुढच्या निवडणुकीतही शहराचा आमदार शिवसेनेचाच असेल. जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस एकत्र असताना आणि शेकापचा बालेकिल्ला असताना शिवसेना वाढली, रुजली. त्यामुळे आता सेनेला लक्ष्य करू पाहणाऱ्यांनी स्वप्ने पाहणे बंद करावीत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>