Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भीषण अपघातात मिनी बसचा चुराडा; ६ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मिरज-पंढरपूर रस्त्यार शुक्रवारी पहाटे मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं.

अपघातग्रस्त मिनी बसमधील प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील माले गावचे असल्याचं समजतं. हे सगळेजण पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना आवळगाव फाटा इथं त्यांची मिनी बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. त्यात सहा लोक जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन लहान मुलं, एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर चालक संदीप यादव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांची नावे:

नंदकुमार जयंत हेगडे (वय ३७)
रेणुका नंदकुमार हेगडे (३५)
आदित्य नंदकुमार हेगडे (१२)
लखन राजू संकाजी (३६)
विनायक मार्तंड लोंढे (४०)
गौरव राजू नरदे (७)

गंभीर जखमी

रेखा राजाराम देवकुळे (४०)
स्नेहल कृष्णात हेगडे (२०)
काजल कृष्णात हेगडे (१९)

जखमी

सावित्री बळवंत आवळे (५५)
शीतल सुनील हेगडे (४२)
सोनल कांबळे (३६)
कोमल हेगडे (२०)
कल्पना बाबर (४०)
अनमोल हेगडे (१२)
गौरी हेगडे (७)
शुभम कांबळे (१०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा बँकेची निवडणूक बिनविरोध

$
0
0

कोल्हापूर

वारणानगर (ता.पन्हाळा) येथील श्री वारणा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली. एकूण सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर मांगले (ता.शिराळा), देवर्डे (ता.वाळवा) व पोखले (ता.पन्हाळा) या तीन गावांना प्रथमच संधी देण्यात आली आहे .निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर वारणा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम एल. माळी यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले संचालक असे : निपुण विलासराव कोरे (वारणानगर), उत्तम बाबासाहेब पाटील (लाटवडे), महादेव हिंदुराव चावरे (देवाळे), अरविंद भाऊसाहेब बुद्रुक (एतवडे बुद्रुक), बाबासो गोविंद बावडे (बहादूरवाडी), बाळासाहेब यशवंत पाटील (सातवे), बळवंत शंकर पाटील (सागाव), प्रताप रघुनाथ पाटील (पोखले), विनायक राजाराम बांदल (बच्चे सावर्डे),अभिजित यशवंत पाटील (मांगले), प्रकाश रंगराव माने (भादोले) ,बाबासो नामदेव पाटील (देवर्डे) , शोभा प्रमोद कोरे (कोडोली), नलिनी बसवेश्वर डोईजड (इचलकरंजी), नितीन शंकर माळी (किणी), डॉ.प्रशांत मधुकर जमने (कोडोली),धोंडीराम मंगू सिद (घुणकी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात महावितरणवर धडक

$
0
0

जयसिंगपूर

शेतीपंपाची वीज दरवाढ रद्द करावी, शेतीपंपाबरोबरच ग्रामीण नळपाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अतिरिक्त भारनियमन रद्द करावे या मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्यावतीने जयसिंगपूर येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे नेते व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिरोळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावरून मोर्चास सुरूवात झाली. क्रांती चौक, शिवाजी चौक मार्गावरून शिरोळ रोडने मोर्चा महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर आला. ‘आमच्या मागण्या मान्य करा-नाहीतर खुर्ची खाली करा, वीजदरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे काय-खाली डोके वर पाय, भारनियमन रद्द झालेच पाहिजे, अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. मोर्चा महावितरण कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलक कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या कक्षात घुसले. आंदोलकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी वीज दरवाढ आणि भारनियमन याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचे सांगितले. भारनियमनामुळे सामान्य माणसाला प्यायला पाणी मिळत नसेल, पिके वाळत असतील, तर खपवून घेणार नाही, असे त्यांनी ठणकावले. भारनियमनामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळित करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित का केला, असा सवाल करून गणपतराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खुलासा मागितला. पाणीबिले थकित राहिल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचे कार्यकारी अभियंता आवळेकर यांनी सांगितले. उद्योजकांची १०० टक्के वसुली नसतानाही त्यांची वीज सुरू आहे, मग शेतकऱ्यांवर हा अन्याय का, असा प्रतिप्रश्न केल्याने अधिकारी निरुत्तर झाले. वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी गणपतराव पाटील यांनी केली.

आंदोलकांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलकांच्या भावना वरिष्ठ अधिकारी व सरकारपर्यंत पोचवू, असे आवळेकर यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्ते कक्षातून बाहेर पडले. कार्यालयाबाहेरील कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारविरोधात बोंब मारून निषेध केला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, शेखर पाटील, बंडा माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, उदयसिंह खाडे, नगरसेवक असलम फरास, एन. एम. बागे, राजेंद्र झेले आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅक्टिवाची डिकी म्हणजेच पंटर

$
0
0

Raviraj.gaikwad@timesgroup.com

Twitter - @rg_ravirajMT

एखादा वाळू ठेकेदार येतो... फोनवर संभाषण होते... जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या अॅक्टिवाच्या डिकीत पाकीट ठेवण्याचा निरोप मिळतो... ठेकेदार स्वतः किंवा त्याचा माणूस हळूच आपली टू-व्हिलर सभागृहाच्या मागे नेतो... डिकीला लॉक नाहीच. सहज डिकी उघडायची आणि आपले पाकीट त्यात टाकायचे... अधिकारी जाग्यावर बसूनच खिडकीतून गाडीवर नजर ठेऊन असतोच. पैसे डिकीत कोणी ठेवले, याची खात्री झाली की काम संपले. ठेकेदाराची पुढची कामे होण्याचा मार्ग मोकळा.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पडकल्यानंतर या कार्यालयातील भ्रष्ट कारभाराच्या अनेक कथा आता चर्चेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात थेट क्लास वन पातळीवरचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. या कारवाईमुळे कार्यालय परिसरातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. गाळ उपसा केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतली जात असेल, तर वाळू उपसा, क्रशर खाणी, बॉक्साइट खाणींच्या व्यवहारांमध्ये कितीची देवाण-घेवाण होत असेल, याची सामान्यांनी कल्पना न केलेलीच बरी.

गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात वाळू उपसा करण्याच्या १६ जणांना ऑर्डर्स मिळाल्या होत्या. त्यांच्याकडून एका अधिकाऱ्याने प्रत्येकी दोन लाख रुपये मागितल्याचे ठेकेदार सांगतात. यातील दहा जणांनी लाच दिली. काहींनी दोन लाख, तर काहींनी दीड लाख दिल्याचे बोलले जाते. यापूर्वीही खनिकर्म विभागात अनेकदा थेट टेबलाखालून लाच घेतल्याची तक्रार वाळू ठेकेदार नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगतात. कार्यालयात सीसीटीव्ही असूनही, घाबरत नसल्याबद्दल ‘सीसीटीव्ही बंद आहे,’ असे स्पष्ट केले जायचे. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या या कारभाराविषयी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे गेल्या काही महिन्यांपासून अनेक तक्ररी दाखल झाल्या होत्या. दोन वेळा सापळा रचण्यात आला होता. पण, तिसऱ्या सापळ्यात अधिकारी अडकल्याचे लाचलुचपतचे अधिकारी सांगतात.

नागपूर कनेक्शनमुळे ‘अभय’?

खणिकर्म अधिकारी अभय भोगे हे मुळचे नागपूरचे आहे. त्यामुळे त्यांचे हात खूप वरपर्यंत असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात दबक्या आवाजात सुरू होती. त्यांच्या जामिनासाठीही थेट मुंबईतून मंत्रालयातून काहींना दिवसभर फोन सुरू होते. त्यांच्यावर नागपुरातून वरदहस्त ठेवणारे कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता हाच वरदहस्त असल्यामुळे रंगेहाथ सापडूनही त्यांच्या फार मोठी कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कारवाईतूनही त्यांना ‘अभय’ मिळेल, असे बोलले जाते.

जामिनासाठी धावणारे कोण?

जिल्हा खणीकर्म अधिकारी अभय भोगे यांना अटकेनंतर बुधवारी दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला. त्यांना जामीन मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अनेक मंडळी दिवसभर धडपडत होती. ही मंडळी मायनिंग क्षेत्रातील असल्याचे बोलले जाते. भोगे यांच्या किरकीर्दीला लाचखोरीचा ढपला पडला असताना त्याला ‘गवंडी’काम करून डागडुजी करण्याचा प्रयत्न दिवसभर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या बाहेर आणि कोर्टाबाहेर सुरू होता. जामिनासाठी वकिलांची जुळवाजुळव करून एकाने ‘इमानदारी’ने मैत्री निभावली. दिवसभरात ‘राहुल’ची धडपडही उल्लेखनीय म्हणावी लागेल. दुपारी अडीचच्या सुमारास भोगे यांना जेवण आणून देण्यात मायनिंग कंपन्यांचेच लोक पुढे होते. अगदी हात धुण्यासाठी साबणही दिला. जामिनाची प्रकिया टप्प्यात आल्यानंतर जणू काही खूप मोठा ‘विजय’ मिळवल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. जामिनासाठी मदतीला धावून आलेली मंडळी केवळ कोल्हापुरातून नव्हे, तर गोव्यातूनही आली होती. यावरून भोगे यांचे ‘ऋणानुबंध’ किती दूरवर आहेत, याचा अंदाज येईल.

(पूर्वार्ध)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवी बँकेचे अवसायक दोषी

$
0
0

Maruti.Patil@ timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : कर्ज वसूल न करता ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देणे व छपाई, स्टेशनरी, न्यायालयीन खर्चाच्या कोणताही हिशोब न ठेवल्याने अवसायक म्हणून रवी को-ऑपरेटिव्ह बँकेचे तीन लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षक डी. जे. जाधव यांनी तत्कालीन अवसायक प्रदीप मालगावे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस लेखापरीक्षण अहवालामध्ये केली आहे. मालगावे यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र पायमल व कॅशिअर विजयकुमार कारंडे यांनाही लेखापरीक्षण अहवालात दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, जिल्हा उपनिबंधकांना अहवाल प्राप्त होऊन पाच महिने उलटूनही त्याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

रवी बँकेच्या एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ मधील कालावधीचे विशेष लेखापरीक्षण नागरी बँकेचे विशेष लेखापरीक्षक डी. जे. जाधव यांनी केले. त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक काकडे यांच्याकडे डिसेंबर २०१६ मध्ये सादर करण्यात आला. जाधव यांनी तत्कालीन अ‍वसायक व शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दोन लाख ४२ हजार कर्ज रकमेची वसुली न करता एनओसी दिली आहे. तसेच छपाई, स्टेशनरी, न्यायालयीन निवाड्यासाठी लागणारा एक लाख दोन हजार असे तीन लाख ४४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवला आहे. मालगावे यांच्यासह व्यवस्थापक पायमल व कारंडे यांनाही अहवालात दोषी ठरवण्यात आले आहे.

लेखापरीक्षक जाधव यांनी सध्याच्या अवसायक अरुणा पाटील यांनी कलम १०५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. मात्र अहवाल सादर होऊन पाच महिन्याचा कालवधी होऊनही अद्याप कार्यवाही झालेली नसल्याने जिल्हा उपनिबंधक भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

दृष्ट‌िक्षेपात रवी बँक

२५ हजार

सभासद

दोन कोटी ५० लाख

शेअर्स भांडवल देणे बाकी

१२ कोटी ३५ लाख

येणे कर्ज

तीन कोटी

एक लाखवरील ठेवीदारांचे देणे



रवी बँकेचे यापुर्वीचे अवसायक एस. एस. कुंभार यांनी दोन कोटी ४४ लाख रकमेच्या एका कर्जदारास एक कोटी ८७ लाखांची सूट देऊन एनओसी दिली होती. तसेच यापूर्वी बँकेची दक्षता पथकांमार्फत चौकशी होऊन अवसायकांना एक कोटी २५ लाख रुपयांची सूट दिली होती. या दोन्ही सूट नियमबाह्य असल्याने राज्याचे सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. तसेच मालगावे यांच्या संबंधी पाच महिन्यापूर्वी लेखापरीक्षकांनी अहवाल सादर केला आहे, मात्र जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी अद्याप यावर कोणतीही कार्यवाही सुरू केलेली नसल्यामुळे काकडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’चा आज मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक अरिष्ठात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला असून गुरुवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौक येथून मोर्चाला दुपारी एक वाजता सुरुवात होईल. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. यानंतर जाहीर सभा होणार आहे. सभेमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याने आजच्या मोर्चाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि कृषीमालाला हमीभाव मिळालेला नसल्याने गेल्या वर्षभरांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संपूर्ण कर्जमाफीचे आंदोलन हाती घेतले आहे. कर्जमाफीसह कृषीमालाला दीडपट हमीभाव द्या, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पुर्वी कोडोली (ता. पन्हाळा) येथून संघटनेचे कार्यकर्ते मोटारसायकल रॅलीने दसरा चौकात दुपारी १२ वाजता दाखल होणार आहेत. रॅली दाखल झाल्यानंतर दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा दसरा चौक मार्गे आईसाहेब पुतळा, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल होईल.

मोर्चातील शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देतील. त्यानंतर संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी सभेला मार्गदर्शन करून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करणार आहेत. मोर्चाला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोफळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मोर्चाला सुमारे दहा हजार शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी संघटनेच्यावतीने मोर्चाची जय्यत तयारी केली आहे.

मंत्री खोत यांच्या उपस्थितीकडे लक्ष

संघटनेची मुलूख मैदान तोफ म्हणून ख्याती असलेले कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची मंत्र‌िमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. खुद्द खासदार शेट्टी यांनी अनेकवेळा मंत्री खोत यांना लक्ष केल्याने आजच्या मोर्चात खोत उपस्थित राहणार का याकडे संघटनेसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’लाही ताकद दाखवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भाजप राज्यात मित्रपक्षांच्या साथीने सत्तेत आहे. मात्र त्यांचे इशारे, धमक्या सातत्याने ऐकून घ्यावे लागत आहेत. हा प्रकार संपवण्यासाठी आगामी विधानसभा ताकदीने लढवायची आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आमच्यासोबत आहे. आगामी निवडणुकीत ते आमच्यासोबत रहावे. मात्र ते सोबत न आल्यास खासदारकीच्या दोन्ही जागा लढवून त्या जिंकून दाखवू, त्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी कामाला लागावे,’ असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘काँग्रेसवाल्यांनी जनतेला मागायची सवय लावली. त्यामुळेच अनुदान, कर्जमाफी, व्याजमाफी अशी मागणी होत आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजातील गरजूंना मदत करावी. यासाठी तरुणांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे. केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील भाजपच्या कार्यकर्त्यांत संवाद होण्यासाठी कार्यकारिणीच्या बैठका होत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांची ही संकल्पना आणली आहे. त्याचा फायदा पक्षबांधणीसाठी झाला पाहिजे.’

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘समाजसेवा करण्याचे चांगले व्यासपीठ म्हणून कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये यावे. केवळ पदा‌साठी आल्यास येथे भ्रमनिरास होईल. येथे पदे मेरीटनुसार दिली जातात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणून कागलकडे पाहता येईल. कागलमध्ये भाजपला चांगले यश मिळवून दिल्यामुळे समरजितसिंह घाटगे यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले. बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण केल्यास २०१९ ची निवडणूक जिंकणे सोपे होईल.’

यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी भाजप प्रचारक अभियानची माहिती दिली. म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समरजितसिंह घाटगे, प्रदेश कार्यकारिणीवरील निवडीबद्दल सुहास लटोरे यांचा सत्कार झाला. यावेळी राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, बाबा देसाई, संदीप देसाई, महेश जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


‘पालिकेची पोटनिवडणूक लवकर घ्या’

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘महानगरपालिकेत भाजपची सत्ता नसल्याने वि‌कास कामात अडचणीत येत आहेत. तेथे टोळधाड सुरू आहे. ती थांबवण्यासाठी पालकमंत्र्यांनी नगरसेवकपद रद्द झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक घेवून महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणावी. निवडणुकीत दारू, पैसे सगळेच वाटतात. यापलिकडे जाऊन निवडणुकीत विचारधारेचा फायदा घेण्यासाठी

भाजप

कार्यकर्त्यांनी पक्षाची बांधणी करावी,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन पोलिसांचे जामिनासाठी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतून शिक्षण संस्थेच्या इमारतीतील ९ कोटी, १८ लाख रुपयांची रक्कम लुटणाऱ्या सांगलीतील सात पोलिसांपैकी तीन पोलिसांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली. पोलिस कॉन्स्टेबल दीपक उत्तमराव पाटील (वय ४४, रा. विश्रामबाग, सांगली), शंकर महादेव पाटील (५०, रा. माधनगर, सांगली) आणि रवींद्र बापू पाटील (४०, रा. व्हन्नूर, ता. कागल) या तिघांनी वकिलांकरवी कोर्टात अर्ज दाखल केले आहेत.

वारणा लुटीतील ९ कोटी, १८ लाख रुपयांच्या रकमेवर सांगली येथील एलसीबीच्या पोलिसांनी चोरटा मैनुद्दीन मुल्ला याच्या मदतीने डल्ला मारला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर सात पोलिसांसह नऊ जण दोषी आढळल्यानंतर सांगलीतील संशयित सातही पोलिसांनी पळ काढला आहे. यातील तीन पोलिसांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा कोर्टात धाव घेतली आहे. कॉन्स्टेबल शंकर पाटील, दीपक पाटील आणि रवी पाटील यांच्यावतीने अॅड. व्ही. एम. घोरपडे. श्रीकांत जाधव आणि शिवाजीराव राणे यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्याकडे अर्ज सादर केला. सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांनी अटकपूर्व जामिनास जोरदार आक्षेप घेतला. या तिन्ही अर्जांवर ५ व ६ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, सीआयडीचे पोलिस अधीक्षक राजेंद्र बनसोडे यांची बदली असून, श्वेता खेडकर यांची या पदावर नियुक्ती झाली आहे, खेडकर यांनी अद्याप पादभार स्वीकारला नसल्याने पुन्हा या गन्ह्याचा तपास रखडला आहे. उर्वरित संशयितांनीही जामिनासाठी धावाधाव सुरू केली असून, अटकपूर्व जामीन फेटाळल्यास ते पोलिसात शरण येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघटित गुन्हेगारीला हवा लगाम

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून संजय मोहिते यांनी स्वीकारली. त्यांच्यासमोर अवैध धंदे बंद करण्यापासून ते संघटित गुन्हेगारी, खासगी सावकारी आणि व्हाइट कॉलर गुन्हेगारांवरही वचक निर्माण करण्याचे आव्हान आहे. उपनगरांपर्यंत संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे जाळे पसरले आहे. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. मद्य तस्करी आणि चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. खाकीतील लुटारू पोलिसांनाही आवरावे लागणार आहे. एकूणच कायदा सुव्यवस्था राखण्यासह पोलिस दलाची प्रतिमा नव्याने तयार करण्याचे काम मोहिते यांना करावे लागणार आहे.

अवैध धंदे सुरूच
मटका, जुगार, क्लब यासह देशी दारू निर्मिती, दारूची तस्करी, अवैध विक्री आजही सुरूच आहे. यापूर्वी दोन पोलिस अधीक्षकांनी जुगार अड्डे बंद करणार असल्याची जाहीर वक्तव्ये केली. मात्र कृतीच्या पातळीवर काहीच दिसले नाही. खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही जुगार अड्डे बंद करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. उलट मटका अड्डे चालवणाऱ्यांकडूनच पोलिसांना हप्ते पोहोचतात. त्यामुळे काही पोलिसच अवैध धंद्यांना संरक्षण देत असल्याचा काही संघटनांचा आरोप आहे. राजरोसपणे नागरी वस्तीत सुरू असलेले अवैध धंदे सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. यातूनच टोळ्या तयार होत आहेत. याला वेळीच आळा न घातल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांत वाढ होत आहे. पोलिस ठाण्यांतील अधिकारी अनेकदा केवळ कारवायांचा फार्स करतात. त्यामुळे अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरूच राहतात. पोलिस अधीक्षक मोहिते यांना अधिकाऱ्यांचीच झाडाझडती घेऊन अवैध धंद्यांवर अंकुश ठेवावा लागणार आहे.


संघटित टोळ्यांची वाढती दहशत

शहरासह उपनगरांतही संघटित गुन्हेगारी टोळ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्षभरात यातील काही टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करून सुमारे ३० गुंडांना हद्दपार केले आहे. मात्र यातील काही गुंड आजही कोल्हापुरात वावरतात. हे गुंड पोलिसांना का दिसत नाहीत? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे. एसटी गँगच्या पाच ते सहा गुंडांनी दोन महिन्यांपूर्वी बापट कॅम्प येथील नगरसेवकांना घरात घुसून मारहाण केली होती. या हल्ल्यातील गुंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. शिवाय शहरातील अनेक उपनगरांमध्ये टोळ्यांची दहशत आहे. इचलकरंजी, हातकणंगले, पेठवडगाव परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. काही टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळते. त्यामुळे गुंडांवर कारवाई होत नाही. अशा गुंडांचा बंदोबस्त करून हद्दपार गुंडही शहरात फिरकणार नाहीत, याची दक्षता पोलिस अधीक्षक मोहिते यांना घ्यावी लागणार आहे.

पानसरे हत्या तपासाचे आव्हान कायम

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर तीन पोलिस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या. शिवाय दोन तपास अधिकारीही बदलले. राज्य सरकारने या गुन्ह्याच्या शोधासाठी एसआयटी स्थापन केली असली तरीही जिल्हा पोलिस अधीक्षकांना विशेष लक्ष घालावे लागते. संवेदनशील गुन्ह्यातील फरार आरोपी विनय पवार आणि सारंग आकोळकर यांना अटक करण्याचे आव्हान अधीक्षक मोहिते यांच्यासमोर आहे. गुन्ह्यातील शस्त्र आणि वाहनही पोलिसांना मिळालेले नाही. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमागे एकाच शक्तीचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने तपास पुढे नेऊन संशयितांना अटक करणे, भक्कम पुरावे जमा करण्याचे काम मोहिते यांना करावे लागेल.

सायबर क्राइमसह वाढली व्हाईट कॉलर गुन्हेगारी
शहरासह जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून आर्थिक गुन्हे, हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियातून बदनामी असे गुन्हे वाढले आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांचा सहभाग चिंताजनक आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यापासून ते बँकिंग आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांना दक्षता घ्यावी लागणार आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे, कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणे अशा गुन्ह्यातील गुन्हेगार उच्चशिक्षत आणि व्हाईट कॉलर आहेत. यांच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याने तपास मुळापर्यंत पोहोचत नाहीत. अधीक्षक मोहिते यांना काही गुन्ह्यांच्या दाखल प्रकरणांचा आढावा घेऊन फाईल नव्याने ओपन कराव्या लागतील.

वाहतूक कोंडी नित्याचीच
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, याअंतर्गत शहरातील बहुतांश ट्रॅफिक सिग्नल सुरू झाले आहेत. पार्किंग, वन वेची अंमलबजावणी करणे, वर्दळीच्या ठिकाणी जादा मनुष्यबळ देऊन कोंडी टाळण्याचे काम पोलिसांना करावे लागेल. वाहतूक आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी अधीक्षक मोहिते यांना पाठपुरावा करावा लागणार आहे. शिवाय अवैध वाहतूक रोखण्यासाठी आरटीओ विभागाला सोबत घेऊन सातत्याने कारवाया करणे गरजेचे आहे.

पोलिस दलाची प्रतिमा खालावली
लाचखोरी, चोरीच्या पैशांवर डल्ला मारणे, फिर्याद दाखल होतानाच तोडपाणी, नागरिकांना, विक्रेत्यांना दमदाटी, अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी हप्ते घेणे असे गंभीर प्रकार पोलिसांकडूनच सुरू असतात. गेल्या वर्षभरात हुपरी, आजरा, इचलकरंजी येथील पोलिसांवर निलंबनाची कारवाईही झाली. अशा प्रकारांमुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली आहे. पोलिस जनतेच्या रक्षणासाठी असले तरीही त्यांच्या बाबतीत नागरिकांच्या मनात शंकास्पद वातावरण असते. त्यामुळे पोलिस दलातील वाईट प्रवृत्तींना आळा घालून पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचे काम करावे लागणार आहे. शिवाय महिला सुरक्षा, चेनस्नेचिंग, घरफोड्या असे गुन्हे रोखण्याचे आव्हानही आहे. ही आव्हाने पेलून नागरिकांना बेस्ट पोलिसिंग देण्याचा प्रयत्न मोहिते यांना करावा लागेल. यात ते किती यशस्वी होणार ते काळच सांगेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडे पडली, वाहतूक कोलमडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुधवारी दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पडलेल्या पावसाने शहरवासीयांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या उष्म्यानंतर संध्याकाळी जोरदार वारा आणि विजांचा कडकडांसह आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला, वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यात सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी, मुस्लिम बोर्डिंगच्या इमारतीच्या कुंपनाचे किरकोळ नुकसान झाले. रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे सुमारे दोन तास शहरातील वाहतूक कोलमडली, तर सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.

बुधवारी जोरदार वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडांची पडझड झाली. मुस्लिम बोर्डिंग इमारतीच्या बाहेरचे गुलमोहोराचे झाड उन्मळून पडले. भलेमोठे झाड रस्त्यावर पडूनही सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. तसेच रेल्वे स्टेशन, बुधवार पेठेतील शिपुगडे तालमीसमोर आणि सासने ग्राऊंडसमोर तीन झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक कोलमडली होती. मुस्लिम बोर्डिंग आणि सासने ग्राऊंसमोरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी या मार्गांवरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. झाले पडल्याची वर्दी महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमनच्या २० ते २५ जवानांनी तातडीने रस्त्यात पडलेली वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत हे काम सरूच होते.

अनेक ठिकाणी गटर्स भरून रस्त्यांवरूनही पाणी वाहत होते. सासने ग्राऊंड, परिख पूल, राजारामपुरीतील जनता बजार चौक, बागल चौक, लक्ष्मीपुरी, जयंती नाला या परिसरात रस्त्यांवर सखल भागात एक ते दीड फूट पाणी साचले होते, त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. काही वाहनधारकांनी साचलेल्या पाण्यातूनच कसरत करीत मार्ग काढला. जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंप या मार्गावरील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलजवळ विजेचा खांब दुसऱ्या खांबावर कोलमडला आहे. विजेच्या तारा लोंबकळत असल्याने धोका निर्माण झाला होता, मात्र वीज प्रवाह खंडित केल्याने हा धोका टळला. रात्री उशिरापर्यंत पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी सांगितले.

अनर्थ टळला

बऱ्याच प्रतीक्षेनंतर आलेल्या पहिल्याच वळिवाने कोल्हापूरकरांची त्रेधातिरपिट उडाली. मुस्लिम बोर्डिंगच्या इमारतीजवळ गुलमोहोराच्या झालाखाली नेहमीच शहाळे विकणारा एक तरुण उभा असतो. याशिवाय उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरातील विक्रेते आणि वाटसरू याच झाडाच्या सावलीचा आसरा घेत होते. पावसाला सुरूवात होताच लोकांनी झाडाखालून पळ काढला, त्यामुळे अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्तर’ मध्ये क्षीरसागर यांना आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर उत्तर मतदार संघात भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ​सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनाच थेट आव्हान दिले आहे. यामुळे सातत्याने भाजप व पालकमंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या क्षीरसागर यांना आगामी विधानसभा निवडणूक सोपी नसेल हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी दुसरीकडे दोन्ही खासदार भाजपचे होतील, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनाही ‘सरकार सोबत राहण्याचा’ इशारावजा सल्ला दिला आहे. जिल्हा भाजपमय करण्यासाठी पालकमंत्र्यांनी कंबर कसली असून प्रसंगी मित्रपक्षांच्या विरोधात उभे ठाकून विजय खेचण्याची रणनीती आखली आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वीपासून पालकमंत्री पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यातील आरोप,प्रत्यारोपाने शहर ढवळून निघाले होते. अगदी वैयक्तिक स्तरावर जाऊन आरोप करण्यात आले होते. त्यामुळे दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. मात्र, अलिकडच्या काळात या दोघांत सख्य निर्माण झाल्याचे चित्र होते. नुकत्याच झालेल्या भगिनी महोत्सवाच्या उद्‍घाटनावेळी पालकमंत्री पाटील यांनी क्षीरसारगर यांची स्तुती केली होती. राज्यभरातील आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारमध्ये शिवसेना मित्रपक्ष असल्याने सरकारवर परिणाम होऊ नये, म्हणून आतापर्यंत भाजपकडून शांततेचे धोरण स्वीकारल्याचे दिसत होते. पण पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आरोपांना आणि विरोधाला आक्रमक उत्तर देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील इतर मतदार संघातील भाजपच्या आमदारांसाठी जोडणी केली जात होती. आता उत्तर मतदार संघातही भाजपने त्यादृष्टीने चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवणारे व नंतर महापालिकेत ताराराणी आघाडीची धुरा सांभाळणाऱ्या सत्यजित कदम यांना भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यासपीठावर घेण्यात आले. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून कदम यांच्याबरोबर मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा आहे. कदम यांच्यासाठी महाडिक गटाकडून पालकमंत्र्यांकडे शब्द टाकला जाणे स्वाभाविकच आहे. कदम यांच्यापाठीमागे महाडिक गटाची ताकद उभी राहणार आहे. त्याचबरोबर भाजपचे बळ मिळाल्यास क्षीरसागर यांच्यासाठी कदम हे तगडा उमेदवार बनू शकतात. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरी माजी आमदार मालोजीराजे यांच्याकडून त्यादृष्टीने काहीच संकेत मिळत नाहीत. शहरात अजूनही मालोजीराजे यांना मानणारा राजकीय गट आहे. मधुरिमाराजे यांना उमेदवारी मिळाल्यास साहजिकच त्या गटाची मदत होईलच. शिवाय शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील पेठेतील मतदानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडे असलेल्या दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे क्षीरसागर यांना आगामी निवडणूक आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

सेनेच्या आमदारांचा भाजपशी घरोबा

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीची गणिते मांडली गेली आहेत. त्यातून काँग्रेसमधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील टप्प्यात आणखीही काही प्रवेश आहेत. सध्या शिवसेनेचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. त्यातील आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यज‌ित पाटील-सरुडकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा मार्ग स्वीकारला. तत्कालिन राजकारणाची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ही पेरणी केली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिरोळचे आमदार उल्हास पाटील जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपसोबत नसले तरी खासदार राजू शेट्टी यांचे विरोधक म्हणून विधानसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांना कडवा विरोध करण्यासाठी काँग्रेसमधील राहुल देसाई यांना भाजपमध्ये दाखल करून घेतले आहे. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या ​शिवसेनेच्या विरोधात भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.

खासदार शेट्टींसाठी इशारा

सध्याचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्री होण्याची इच्छा २०१९ नंतर पुर्ण होईल, असे वक्तव्य करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश होईल, असेच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत महाडिक यांनी पडद्याआडून भाजपसोबतच काम केले आहे. महाडिक भविष्यात पक्षासोबत राहतील याची शाश्वती राष्ट्रवादीला नाही. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांनी आतापासूनच त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. महाडिक हे भाजपचे उमेदवार राहिल्यास त्यांच्याविरोधात तूल्यबळ उमेदवार देण्यासाठी काही बेरजेची राजकारण केली जात आहेत. त्यातूनच मुश्रीफ गटाने मंडलिक गटाला साथ देण्याचे धोरण जिल्हा परिषद निवडणुकीत अवलंबले. प्रा. संजय मंडलिकांच्या कारखान्यामध्येही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुश्रीफ गटाने साथ दिली आहे. मंडलिक गटाबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या महाडिक विरोधाची मोट बांधली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर सातत्याने कोरडे ओढले आहेत. मंत्र‌िपद देऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सतत रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेत खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेप्रमाणे संघटनेलाही पालकमंत्र्यांनी इशारेवजा सल्ला देत आगामी धोरणच स्पष्ट केले आहे. खासदार शेट्टी सरकार सोबत आहेत. पण ते सोबत नसतील तर तिथेही सक्षम उमेदवार उभा करू शकतो, असा इशारा दिला आहे. शेट्टी यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपला मात्र तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर शहर स्वच्छतेत मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील कचरा उठाव व त्यावरील प्रक्रियेबाबतच्या महापालिकेच्या उदासीनतेमुळे केंद्र सरकारने राबवलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात कोल्हापूरला १७७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. या क्रमवारीत इचलकरंजी (१४१ क्रमांक), सातारासारखी (१५७ क्रमांक) शहरे कोल्हापूरपेक्षा अग्रक्रमावर आहेत. यातून कोल्हापूर महापालिकेला स्वच्छतेबाबत बरीच मेहनत घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने देशभरातील शहर स्वच्छतेसाठी सर्वेक्षण घेण्यात आले. डिसेंबरमध्ये त्याबाबतच्या समितीकडून पाहणी केली होती. या सर्वेक्षणासाठीच्या नियमानुसार ही पाहणी करण्यात आली. या पाहणीत मिळालेल्या गुणांनुसार शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीमध्ये कोल्हापूर महापालिकेला १०४८ गुण मिळाले असून १७७ वा क्रमांक मिळाला आहे. इचलकरंजी नगरपरिषदेला ११३३ गुण मिळाले असून १४१ क्रमांक तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा शहराला १०९० गुण मिळाले. त्यांना १५७ वा क्रमांक मिळाला आहे.

कोल्हापूरपेक्षा छोट्या समजल्या जाणाऱ्या या शहरांच्या तुलनेत कोल्हापूर महापालिकेकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याचे या क्रमवारीमुळे स्पष्ट झाले आहे. शहरात घरातून कचरा जमा केला जात असला तरी कोंडाळ्यात साचणाऱ्या कचऱ्याचा उठाव नियमित होत नसल्याने शहरात कोंडाळ्यांचे ओंगळवाणे रुप पहायला मिळते. अनेक ठिकाणी कोंडाळी भरुन आजूबाजूच्या परिसरात कचरा पसरल्याचे चित्र असते. याबरोबरच ​जिथून रोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यांच्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली नाही. परिणामी जी यंत्रणा नागरी वस्तीतील कचरा उठाव करते त्यांच्याकडूनच विविध बाजारांच्या ठिकाणचा तसेच हॉटेल, कत्तलखाना, मटण व मासे मार्केटमधील कचऱ्याचा उठाव होतो. सर्वेक्षणात यासाठी स्वतंत्र व्यवस्था अपेक्षित असते. कचरा संकलनाबरोबरच त्यावरील प्रक्रियेबाबतच्या टप्प्यातही कोल्हापूर पिछाडीवर आहे. लँड फिलींग साइट विकसीत करण्यात आली आहे. पण, झूम प्रकल्पानंतर घनकचऱ्यावरील प्रकल्पाची उभारणी झाली नाही. हा कचरा जागा मिळेल त्या ठिकाणी टाकण्यात येत असल्याने त्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही. या सर्वेक्षणात सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली जाते. या पातळीवरही शहराची परिस्थिती समाधानकारक नाही. अनेक ठिकाणच्या शौचालयांची अवस्था वाईट आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे विकेंद्रीकरण

शहरातील सर्व कचरा एका ठिकाणी जमा करुन त्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा शहराच्या विविध ​भागात त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी आवश्यक आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर संभाजीनगर येथे एकटी संस्थेच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा उपक्रम भाजी मंडई, कत्तलखान्यांबरोबर हॉटेल्सच्या कचऱ्यासाठी राबवण्याची आवश्यकता आहे. त्यातून एका ठिकाणी प्रक्रियेवर ताण येणार नाही व कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला अल्टीमेटम, शेट्टी यांचा इशारा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्या गावात आदल्या दिवशी सभा घेतली. त्याच गावातील शेतकरी सकाळी सहा वाजता आत्महत्या करतो, हा माझा पराभव आहे. शेतकरी नेता म्हणून त्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला कमी पडलो, अशी खंत व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे कर्जमुक्तीसाठी २२ मे पासून आत्मक्लेश आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाने सरकारला जाग आली नाही तर पुढच्या टप्प्यात मुंबईचे दूध, भाजीपाला आणि पाणी तोडून नाकाबंदी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

येत्या २२ मे रोजी पुण्यातील फुलेवाड्यापासून राजभवनपर्यंत पायी यात्रा काढून आत्मक्लेष आंदोलन करण्यात येईल. या माध्यमातून शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करणार आहे. ‘सरकार ऐकत नाही, किमान राज्यपाल तरी आमची व्यथा समजून घेतील. त्यानंतरही दाद मिळाली नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती रॅलीचा समारोप गुरुवारी मोर्चाने झाला. शिरोळमधून ही मोटारसायकल रॅली सुरू झाली होती. दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

वारणा कोडोली येथील विलास यशवंत सितापे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. काल (बुधवारी) रात्री खासदार शेट्टी यांची कोडोलीत सभा झाली होती. हा संदर्भ घेत खासदार शेट्टी यांनी भाषणाची सुरुवात सितापे यांना श्रद्धांजली अर्पण करून केली.

ते म्हणाले, ‘कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत असेल तर ही लोकशाहीत अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. त्यांच्यामागे कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँकांना मी प्रश्न विचारतो की, तुमचा एनपीए किती वाढला? विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांचे काय? देशातील अनेक भांडवलदार कर्जबुडव्यांची यादी आमच्याकडे आहे. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय चालणार नाही. अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन आमचे संरक्षण करू.’

ठाणे जिल्ह्यातील महामार्गाला विरोध करणाऱ्या शहापुरातील आदिवासी शेतकऱ्यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले. त्या शेतकऱ्यांनी मुंबईचे पाणी केव्हाही बंद करण्याची तयारी असल्याचे सांगितले. कर्जमुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर कोल्हापुरातून मुंबईचे दूध आणि भाजीपाला तर ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधून मुंबईचे पाणी बंद करू आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
...तर साखरेची गोदामे बंद

साखर कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्यावा आणि रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार साखरेच्या आताच्या चार हजार रुपये दरानुसार तिसऱ्या हप्त्यात नफ्यातील वाटा द्यावा, अशी मागणी मोर्चात करण्यात आली. सरकार आणि कारखानदारांनी या मागण्या मान्य केल्या नाहीत तर २२ मेपासून साखरेचा एक कणही गोदामाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

असे होईल आंदोलन

पुण्यातील फुलेवाड्यापासून राज्यापालांना भेटण्यासाठी खासदार शेट्टी मुंबईकडे पायी यात्रा सुरू करणार. गेल्या वर्षी अक्षय्यतृतीयेला तुळजापुरातून सुरू केलेल्या सह्यांच्या मोहिमेतील साडेसहा लाख सह्या केलेल्या शेतकऱ्यांची सर्व माहिती राज्यपालांना देणार. मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना ३० मे रोजी भेटण्याचे नियोजन. पायी यात्रेत कुणालाही सहभागी होता येणार. यात्रेत भाग घेणाऱ्यांसाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांकडून जेवण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकर्मींचा सन्मानसोहळा आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे​ चित्रपट क्षेत्रातील कलावंत आणि तंत्रज्ञांना भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारे चित्रकर्मी पुरस्कार आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यात स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार पहायला मिळणार आहे. यावर्षी १६ कलावंत व तंत्रज्ञांना चित्रकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख दहा हजार रुपये, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापुरात प्रथमच हा सोहळा होणार आहे.

दिग्दर्शक व लेखक चंद्रकांत जोशी, अभिनेता दिग्दर्शक विलास रकटे, गीतकार डॉ. श्रीकांत नरूले, लेखक प्रताप गंगावणे, निर्माता दिग्दर्शक जगदीश पाटणकर, छायाचित्रकार प्रकाश शिंदे, कलादिग्दर्शक व छायाचित्रकार अशोक पेंटर, ध्वनिरेखक अशोक निकम, अभिनेत्री गीता वंटमुरीकर, निर्मिती व्यवस्थापन सिद्धू गावडे, रंगभूषाकार शशी यादव, वेशभूषाकार कमल पाटील, लाइटमन किसन पोवार, लाइटमन कृष्णात चव्हाण, कामगार विजय कल्याणकर, भोजन व्यवस्थापक कै. बजरंग भोसले (मरणोत्तर) यांना चित्रकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रेरा’ने वाचणार घर खरेदीदाराचा फेरा

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

twitter:satishgMT

कोल्हापूर ः बांधकाम क्षेत्रात एक मे पासून रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्ट (रेरा) कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर शहर व आसपासच्या २५ ते ३० नवीन प्रोजेक्टची नोंदणी एक महिन्यात होणार आहे. जुन्या प्रोजेक्टसनाही तीन महिन्यांची मुदत दिली असून त्याच्या नोंदणीच्या तयारीत बांधकाम व्यावसायिक आहेत. बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांमधील व्यवहारात यामुळे पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार असून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाची बांधकाम व्यावसायिकाला अडवणूक करता येणार नाही. साहजिकच ‘रेरा’ कायद्यामुळे व्यावसायिकांकडे सातत्याने मारावे लागणारे फेऱ्या वाचणार आहेत.

कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रीडाई या संस्थेने ‘रेरा’ कायद्याबाबत बांधकाम व्यावसायिकांत चांगलेच प्रबोधन केले आहे. जानेवारी २०१५ पासून ‘रेरा’ कायद्याला सामोरे जाण्याची तयारी बांधकाम व्यवसायकांनी केली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र रेरा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. गौतम चॅटर्जी यांची प्राधिकरण अध्यक्षपदी निवड केली आहे. एप्रिलमध्ये पुणे व मुंबई येथे रेरा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चॅटर्जी यांच्या बैठका झाल्या. त्या बैठकांना क्रीडाई पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी या कायद्याची माहिती घेऊन स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे. त्यानुसार नवीन व जुन्या प्रोजेक्टची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

एक मे पासून रेरा कायद्यानुसार नवीन प्रोजेक्टची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. शहर व आसपासच्या २५ ते ३० नवीन प्रोजेक्टची त्यानुसार नोंदणी होणार आहे. पहिल्या आठवड्यात ऑनलाइन प्रक्रिया संथ असल्याने नोंदणी वेगाने झाली नाही. मुंबईत या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कार्यालय सुरु केले असून, वीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जुन्या प्रकल्पांना ‘रेरा’ कायद्यानुसार नोंदणी करण्यासाठी तीन महिन्याची मुदत असल्याने कोल्हापुरातील ५० हून अधिक प्रोजेक्टची नोंदणी होणार आहे. त्यादृष्टीने कागदपत्रे तयार केली असून ऑनलाइनचे फॉर्म भरुन ठेवले आहेत. पण, अद्याप सबमिट केलेले नाहीत.

रेरा कायद्यानुसार नवीन प्रोजेक्टचे बांधकाम व्यावसायिकांना ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे. त्यात सर्व कागदपत्राबरोबर प्रकल्पाची जाहिरात केलेल्या माहितीपत्रकाची नोंदही करावी लागणार आहे. ‘रेरा’ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्यात नियामक स्थापन करण्यात येणार आहे. या नियामकांकडे ऑनलाइन नोंदणी करुन नोंदणी फी भरावी लागणार आहे. तीन महिन्यात प्रत्येक शहरात राज्य सरकारला स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. नवीन बांधकाम प्रकल्प रेरा कायद्यानुसार नोंदणी करावी लागणार आहे. एक मेच्या तीन महिने आधी र ज्यांचे प्रकल्प सुरू झाले आहेत ते प्रकल्प ‘रेरा’ कायद्याच्या फेऱ्यात येणार आहे.

प्रकल्प सुरु झाल्यानंतर एखाद्या ग्राहकाने फ्लॅट अथवा बंगला बुकिंग करुन रक्कम भरली तर ती रक्कम त्या प्रकल्पावरच खर्च करावी लागणार आहे. ग्राहकांकडून आलेली रक्कम बँकेत खात्यावर ठेवली जाणार आहे. जसजसा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल, तसतशी ग्राहकाची रक्कम बांधकाम व्यवसायाला त्याच प्रकल्पांवर खर्च करण्याचे बंधन आहे. घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांनी भरलेल्या अतिरिक्त इएमआयवरील व्याज बांधकाम व्यावसायिकाला द्यावे लागणार आहेत.


ग्राहकाचे संरक्षण

‘रेरा’ कायद्याचा फायदा ग्राहकाला होणार आहे. व्यावसायिकांकडून तयार होणाऱ्या प्रकल्पात पूर्वी घोषीत केलेल्या नियम व अटी आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सोयी फ्लॅट व बंगले खरेदी केल्यानंतर मिळत नसल्याबाबत मोठ्या तक्रारी येत होत्या. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सुविधाबाबत तक्रार केली तरी व्यावसायिक दाद लागून देत नव्हते. एखाद्या प्रकल्पात ग्राहकाने बुकिंग केल्यानंतर वेळेत प्रकल्प न पूर्ण करता व्यावसायिकांकडून ग्राहकांची अडवणूक केली जायची. त्यामुळे ग्राहकांचे पैसे व्यावसायिकांकडे अडकून रहायचे. पण या कायद्यामुळे व्यावसायिकांना शिस्त लागणार असून ग्राहकाला संरक्षण मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी स्वतंत्र‌ मुक्त विद्यापीठ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिलांसाठी स्वतंत्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. त्यासाठी सरकारच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

स्वयंसिद्धा संस्थेच्या सहकार्याने गरजू महिलांसाठी महिला उद्योग केंद्र, दे आसरा फाउंडेशनच्यावतीने उद्योजकता विकास व प्रशिक्षण केंद्र व अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या सहकार्याने आरोग्य केंद्र चालवण्यात येणार आहे. कपिलतीर्थ मार्केटजवळील कपिलेश्वर प्लाझामधील कार्यालयाबरोबरच या उपक्रमांचे उदघाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले.

यावेळी स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकर यांनी महिलांच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी देण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे मांडले होते. त्याचा धागा पकडत पालकमंत्री पाटील म्हणाले, महिलांसाठी बचत गट सुरु करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून महिला उद्योजक बनल्या आहेत. या महिलांसाठी​ शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याच्यादृष्टीने येथे महिला मुक्त विद्यापीठ उभे करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक जागाही देण्यात येईल. यासाठी योग्य ती कार्यवाही सुरु करावी. सरकारच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल.

नगरसेवक ठाणेकर यांनी कार्यालय तसेच उपक्रमांबाबतची माहिती दिली. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, अनिल पाठक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चळवळीनेचमला मंत्री केले’

$
0
0

कोल्हापूर

‘सदाभाऊ खोत ही व्यक्ती चळवळीतून पुढे आली आहे. शांत असलो, तरी कमजोर नाही. तलवार घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे. कोणाच्या मेहेरबानीने नव्हे, तर चळवळीने मला मंत्री केले,’ असे वक्तव्य कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. कर्जमुक्ती महामोर्चात ते बोलत होते.

महामोर्चात सहभागी न होण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत मंत्री खोत यांनी मोर्चाच्या व्यासपीठावर प्रवेश केला. भाषणात त्यांनी कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांपेक्षा आपण, संघटनेशी अजूनही कसे जोडले गेलो आहोत आणि यापुढेही कसे, कायम राहणार आहोत, हेच स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मिशी फुटण्याच्या आधीपासून चळवळीत असल्याचे सांगत सदाभाऊ खोत म्हणाले, ‘मिशी फुटल्यानंतर चळवळीत आलेल्यांनी मला शिकविण्याची गरज नाही. मी शांत असलो तरी कमजोर नाही. राजवाड्यातील शिपायाप्रमाणे उंची कपडे घालून, संपूर्ण राजवाडा माझा असल्यासारखे वावरणाऱ्यांपैकी मी नाही. आयुष्यभर संघर्ष करणारा आणि तलवार घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे. तुम्हा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणूनच मी काम करत आहे. सत्तेत असलो, तरी मला चळवळीनेच मंत्री केले आहे. त्यामुळे तुमच्या सोबत राहणे हे मी माझे काम समजतो.’

विरोधकांच्या जाहीरनाम्यात कर्जमुक्तीचा विषय नाही. तर आम्ही तुळजापुरातून हे अभियान सुरू केल्याचे सांगून मंत्री खोत म्हणाले, ‘शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा प्रतिनिधी म्हणून मी मंत्रिमंडळात काम करत आहे. गेली २५-३० वर्षे चळवळीत काम करताना, खासदार शेट्टींच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. राज्यमंत्री म्हणून काम करताना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजीपाला नियमन मुक्ती, हवामान केंद्रे उभारणे अशी उल्लेखनीय कामे केली आ्रहेत. सध्याच्या तुरीच्या प्रश्नावरही शेवटचा कण संपेपर्यंत ही केंद्रे सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे.’

कर्जमुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करण्याचे धोरण सरकारचे असल्याची ग्वाही दिल्याचे सदाभाऊंनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसंगी सरकारला पायाखाली तुडवू

$
0
0

कोल्हापूर

‘सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी रस्त्यावर आला आहे. तुरीला भाव मिळाला असता, कांदा आयात करण्यापूर्वी जर देशातील कांद्याला भाव मिळाला असता, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना होता तेवढा भाव सोयाबीनला मिळाला असता, तर राज्यात कर्जमुक्तीसाठी मोर्चे काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली नसती. सरकार सातव्या वेतन आयोगासाठी २१ हजार कोटींची तरतूद करत असेल, तर डोक्यावर घेतलेल्या सरकारला पायाखाली तुडवायला शेतकरी मागे पुढे पाहणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेट्टी म्हणाले, ‘गेल्यावर्षी अक्षय्यतृतीयेला सदाभाऊ खोत आणि आम्ही कर्जमुक्ती चळवळ सुरू केली. त्यासाठी राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतले आहेत. येत्या आठ दिवसांत ते फॉर्म गोळा करण्यात येतील. परिस्थिती इतकी वाईट आहे की, शेतकरीच नव्हे, त्यांची पोरं आत्महत्या करू लागली आहेत आणि काही बुद्धिवंत शेतीला इन्क्मटॅक्स का नाही, यावर चर्चा करत आहेत. अशी वक्तव्ये जाणीवपूर्वक पेरली जात आहेत. परवडणारी शेती करून दाखवा आणि खुशाल शेतीला इन्कम टॅक्स लावा आम्ही तो अभिमानाने भरू. पण, जर शेतकरी संपावर गेला, तर देशातील १२६ कोटी जनतेचं दोनवेळचं पोट भरण्याची क्षमता इतर कोणत्याही देशाकडे नाही.’

.................

कर्जमुक्ती हे केवळ सलाइन

शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती हे केवळ सलाइन असल्यासारखे आहे, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, ‘एखादा माणूस आजारी पडला, तर त्याला सलाइन लावतात. त्यामुळे तो बरा होत नाही, तर त्याची प्रकृती पुढील उपचारांना साथ देऊ लागते. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती हे केवळ सलाइन आहे. त्याला पुढे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार हमीभाव दिला, तर पुन्हा तुमच्या दारात यावे लागणार नाही.’

...................

पक्षात जाण्यापेक्षा देणी द्या

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे साखर कारखाने असल्याचा संदर्भ देत खासदार शेट्टी म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. कारखानदाराविषयी एखादी तक्रार केली, तर सत्ताधारी पक्ष आमच्या पक्षात प्रवेश करा नाही, तर कारवाई करतो, अशी धमकी देतो. त्यामुळे कारखानदारांनी त्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा आमची देणी द्यावीत आणि खुशाल त्यांच्याच पक्षात रहावं, आमची काही हरकत नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

पन्हाळा

कोडोली (ता.पन्हाळा) येथे विलास यशवंत सितापे (वय ५०) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून येथील ‘परीटकी’ नावाच्या शेतामध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी कोडोली पोलिसांकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विलास सितापे हे पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह येथील महालक्ष्मी गल्लीत रहात होते. त्यांच्या नावे कोडोलीत दहा गुंठे जमीन आहे. त्यांनी जोतिर्लिंग दुध संस्थेमार्फत कोडोली येथील बँक ऑफ इंडिया शाखेमधून गायी म्हशीच्या खरेदी करण्याकरिता एक लाख रुपयांचे कर्ज मार्च २०१६ मध्ये घेतले होते. या कर्जापोटी वीस हजार रुपयांची परतफेड केली होती, तर तीन हप्ते थकीत असल्याने बँकेमार्फत या रक्कमेची सतत विचारणा होत होती. बँकेतून सतत तगादा चालू झाल्यामुळे सोमवारपासून ते घरातून निघून गेले होते. गुरुवारी सकाळी ‘परीटकी’ नावाच्या शेतात नागरिकांना विलास यांनी आब्यांच्या झाडाला गळफास लावल्याचे दिसून आले. त्यांचे बंधू विजय यांनी या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत केली. दरम्यान, या आत्महत्येस बँक कारणीभूत असल्याच्या कारणावरून बँक ऑफ इंडियाच्या कोडोली शाखेत नागरिक मोठ्या संख्येने जमले. नागरिकांनी मृत विलास यांचा मुलगा संदीप, सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखील पाटील यांच्यासह बँकेत येवून या घटनेबाबत विचारणा केली. याबाबत बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सितापे यांच्याकडे ३१ मार्च २०१७ रोजी थकीत रक्कमेची मागणी केली होती. त्यांतर वसुलीबाबत विचारणा करण्यात आली नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images