Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तीस हजारांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील गुटखा तस्करी आणि खुलेआम विक्रीचे वास्तव ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दाखवल्यानंतर अन्न व औषध प्रशासनला जाग आली आहे. विभागाने मंगळवारी (ता. २९) हातकणंगले परिसरात पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे ३० हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त केली. तर सप्टेंबर महिन्यात कारवाई केलेल्या गुटखा कारखान्यातील चार आरोपींवर जयसिंगपूर कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल केला.

सीमाभागातून जिल्ह्यात होणारी गुटख्याची तस्करी आणि खुलेआम विक्री याची वस्तुस्थिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मांडली होती. या वृत्ताची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनने मंगळवारी हातकणंगले आणि तारदाळ येथे पाच ठिकाणी छापे टाकून करवाई केली. हातकणंगले येथे पोलिस ठाण्याच्यासमोर बाबू पानशॉपमध्ये छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना १८ हजार ५०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाला मिळाला. तारदाळ येथील महालक्ष्मी किराणा अँड बेकर्स या दुकानात केलेल्या कारवाईत १० हजार रुपयांचा गुटखा आणि पानमसाला मिळाला. सिकंदर मोबाइल रिचार्ज या दुकानात १५०० रुपयांचा गुटखा मिळाला. अधिकाऱ्यांनी यासह आणखी दोन दुकानांमध्ये कारवाई करून सुमारे ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तीन दुकानदारांकडे व्यवसाय परवानेही नाहीत.

अधिकाऱ्यांनी मुद्देमाल जप्त केला असून, दुकानदारांना नोटिसाही दिल्या आहेत. सहायक आयुक्त (अन्न) सुकुमार चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक कोळी, बिभीषण मुळे आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बहुजन विकास शिक्षणातूनच शक्य’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

‘महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाचा विकास खुंटला आहे. त्याला मनूवादी धर्मव्यवस्था कारणीभूत आहे. या व्यवस्थेविरोधात लढताना चांगल्या शिक्षणाबरोबरच समग्र साहित्याचे वाचनही आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांनी केले.

शाहू स्मारक भवन येथे क्रांतिबा जोतिराव फुले यांचा स्मृतिदिन तसेच बहुजन शिक्षक दिनानिमित्त सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक संघ, बहुजन ऐक्य चळवळ, सम्यक मुव्हमेंट, पंचगंगा खोरे बहुजन युवा शक्तीच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी लेखिका प्रा. डॉ. सिंधुताई आवळे होत्या.

‘क्रांतिबा जोतिराव फुले आणि आजचे समाजवास्तव’ या विषयावर माने यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर शिक्षक व प्राध्यापकांनी समग्र वाड्मय वाचले पाहिजे. आजच्या पिढीत वाचनाचा अभाव दिसतो. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाबाबत पायाभूत सुविधा निर्माण केल्या. मात्र मनूवादी शिक्षण पद्धतीमुळे आपले विचार, जीवनशैलीवर प्रभाव टाकला असून जोपर्यंत आपल्या डोक्यातून मनूवादाचे विसर्जन होत नाही, तोपर्यंत बहुजनांचा विकास होणार नाही.’

प्रा. डॉ. आवळे म्हणाल्या, ‘आज दीडशे वर्षे झाले तरीही महिलांवर होणारे अत्याचार, दलितांवरील अन्याय कमी झालेले नाहीत. संघटनेच्या वतीने दलितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.’

माने यांच्या हस्ते महावीर कॉलेजचे प्रा.डॉ. शरद गायकवाड व एस. के. पाटील कॉलेजच्या प्रा. शैलजा शिंदे यांना सत्यशोधक पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि परिवर्तनवादी चळवळीची पाच हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरुप होते.

डॉ. गायकवाड व प्रा. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरेंद्र तावडेवर दोषारोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर मंगळवारी (ता. २९) पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पहिला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्यावर १४ डिसेंबर २०१५ रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. तावडेवरील दोषारोपपत्र ४३८ पानी असून, समीरवर दाखल केलेले सर्व आरोप डॉ. तावडे याच्यावरही लावले आहेत. ७ वे दिवाणी सहन्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तावडे याला अटक केली होती. एसआयटीनेही तावडे याच्या विरोधात सबळ पुरावे मिळाल्यानंतर २ सप्टेंबर २०१६ रोजी तावडेला सीबीआयकडून ताब्यात घेतले. तावडेला अटक केल्यापासून एसआयटीने त्याची गायब असलेली ट्रॅक्स शोधली. त्याचबरोबर पनवेल येथील सनातन संस्थेचा आश्रम आणि तावडेच्या घरातून संशयास्पद वस्तू जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या ८९ दिवसांमध्ये एसआयटीने वीरेंद्रसिंह तावडे याचा कसून तपास करून आरोपपत्र तयार केले. आरोपपत्रात कोणत्याही उणिवा राहू नयेत यासाठी एसआयटी प्रमुख संजय कुमार यांनी विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांची मदत घेऊन पुण्यातच आरोपपत्र तयार केले. तावडे याला अटक केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याने एसआयटीने गेल्या महिन्यापासूनच सक्षम आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरू केले होते. मंगळवारी चारच्या सुमारास तपास अधिकारी सुहेल शर्मा यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुने, किशोर डोंगरे यांच्यासह पोलिस पथक जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले. ७ वे दिवाणी सहन्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यानंतर आरोपपत्राची प्रत सहायक अधीक्षक ए. ए. कारेकर यांच्याकडे सादर करण्यात आली. यावेळी अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विवेक घाटगे आदी उपस्थित होते.

हे आरोपपत्र ४३८ पानी असून, आरोपपत्रात तावडे याच्या विरोधात दिलेल्या साक्षीदारांच्या साक्षी, तावडे याचा इमेलवरील संशयास्पद पत्रव्यवहार, मोबाइलवरूल संभाषण, कोल्हापूरसह परिसरातील संशयास्पद वावर आणि तावडे याच्या गायब असलेल्या वाहनांसंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. हे आरोपपत्र सबळ पुराव्यांवर आधारित असून, कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे, असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान बुधवारी (ता. ३०) तावडेच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तावडेवरही ‘ते’च आरोप

दुसरा संशयित आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर भारतीय दंड विधान कायदा १२० (ब), ३०२, ३०७, ३४ आणि भारतीय हत्यार कायदा ३ सह २५, ५ यासह २७ या कलमांद्वारे आरोप लावले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, कट करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि शस्त्रांचा वापर करणे असे हे गुन्हे आहेत. कॉम्रेड पानसरे हत्येतील पहिला संशयित समीर गायकवाड याच्यावरही एसआयटीने हेच आरोप लावले आहेत.


''कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दुसऱ्या संशयिताला एसआयटीने अटक केली होती. बुधवारी (ता. ३०) अटकेला ९० दिवस होत आहेत. त्यामुळे आम्ही आजच (मंगळवारी) कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. सक्षम पुराव्यांनिशी हे आरोपपत्र तयार केले आहे.''

सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक तथा तपास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर पालिकेत गोंधळ

$
0
0



सोलापूर

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील कचरा उचलण्याच्या २४ कोटींच्या विषयाला मंजुरी देऊ नये यासाठी कामगार संघटनांनी आंदोलन केले. परंतु, सत्ताधाऱ्यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात हा मक्ता देण्याच्या विषयाला बहुमताने मंजुरी दिली.

सोलापूर शहरातील आठही विभागीय कार्यालयांतर्गत कचरा उचलण्याच्या कंत्राट यशश्री इंटरप्रायजेस आणि वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला देण्याचा विषय गेल्या तीन आठवड्यांपासून तहकूब ठेवण्यात आला होता. स्थायी सभेत चर्चा झाल्यानंतर या विषयाला मंजुरी देण्यासाठी बुधवारी सभापती रियाज हुंडेकरी यांनी विशेष सभा बोलाविली होती. या विषयास विरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली सभापती रियाज हुंडेकरींना घेराव घातला. कचरा उचलण्याचा विषय सर्वसाधारण सभेकडे पाठवावा. या विषयाला स्थायीत मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. तूर्तास हा विषय स्थगित करावा, अशी मागणी नरेंद्र काळे यांनी केली. या विषयावर तासभर घेराव घालण्यात आला.

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत असल्याने ते बहुमताने मंजुरी देण्यावर ठाम राहिले. विरोधी सदस्यांचा गोंधळ चालूच राहिल्याने स्थायी समिती सभेला पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आणि पोलिस बंदोबस्तात स्थायीचे कामकाज सुरू झाले. इकडे स्थायी समिती सभागृहाचा दरवाजा बंद करण्यावरून पोलिस आणि भाजप नगरसेवकात बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी वातावरण शांत करीत सभेचे कामकाज सुरू झाले. विरोधकांचा आणि कामगारांचा विरोध असतानाही सत्ताधाऱ्यांनी तसेच सभापतींनी बहुमतने मंजुरी देत सभा तहकूब केली. दरम्यान, १ ते ४ विभागात कचरा उचलण्यासाठी यशश्री इंटरप्रायजेस यांना प्रति टन १६७० रुपये तर पाच ते आठ झोनसाठी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला १६८० रुपये दर देण्यात आला. १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा खर्च वेळेत करण्याचे गरजेचे असल्याने या विषयाला मंजुरी देण्याची आयुक्तांनीच विनंती केल्याने या विषयाला मंजुरी देण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले.

विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे म्हणाले, कचरा उचलण्याच्या विषयात गौडबंगाल आहे. सत्ताधाऱ्यांनी मोठा आर्थिक वाटा घेत या विषयाला स्थायीत मंजुरी दिली आहे. या विषयात पालिकेचे हित पहिले नाही. या विषयावर सभेत चर्चा होण्याअगोदर भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी विषयाला मंजुरी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकमंगल’चा गोपाळराव देशमुखांना विशेष पुरस्कारसई परांजपे, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुखांचा होणार सन्मान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

लोकमंगल वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकमंगल साहित्य पुरस्काराची घोषणा पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख आणि वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

सई परांजपे (आणि मग एक दिवस-अनुवाद मूळ पुस्तक-नसरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र), प्रवीण बांदेकर (उजव्या सोंडेच्या बाहुल्या-कादंबरी) आणि श्रीकांत देशमुख (पडझड वाऱ्याच्या भिंती-ललित लेखसंग्रह) यांना लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या शिवाय जिल्ह्यातील इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ११ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पत्रकार उदय निरगुडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद कुणाल गोसावी यांना अखेरचा निरोप

$
0
0

सुनील दिवाण । पंढरपूर

जम्मू मधील नगरोटामध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या जिगरबाज मेजर कुणाल गोसावी यांच्यावर आज पंढरपूर जवळील वाखरी येथे लष्करी इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आजोबांच्या कडेवर बसून चिमुरड्या उमंगने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी 'अमर रहे... अमर रहे, शहीद कुणाल गोसावी अमर रहे', 'भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम', अशा घोषणा दिल्या.

आज सकाळी साडेदहा वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने शहीद मेजर कुणाल यांचा मृतदेह पंढरपूर मध्ये आणण्यात आला. यावेळी हॅलिपॅडपासून त्यांच्या डाळे गल्लीतील निवासस्थानापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांनी जयजयकार करीत साश्रु नयनांनी सलामी दिली. सकाळी अकरा वाजल्यापासून गोसावी यांच्या निवासस्थानी हजारो स्त्री-पुरुषांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी वातावरण अतिशय भावनिक बनले होते.



दुपारी साडेबारा वाजता ठरल्याप्रमाणे सजविलेल्या ट्रकवर शहीद मेजर कुणाल यांचे पार्थिव ठेवण्यात आले. 'मेजर कुणाल अमर रहे'च्या घोषणात ही अंत्ययात्रा पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्ग , स्टेशन रोड , कॉलेज चौक मार्गे वाखरी येथे आणण्यात आली. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत अंतिम दर्शन घेतले. शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शहरात ठिकठिकाणी अंत्ययात्रेच्या मार्गावर मेजर कुणाल यांचे मोठंमोठे फलक लावून सडा-रांगोळ्या काढून आणि फुले टाकून मार्ग सजविण्यात आला होता.

दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस व लष्करी जवानांनी शहिद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाला भावना अनावर झाल्या. त्यानंतर शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या आई वृंदा गोसावी यांच्याकडे राष्ट्रीय ध्वज लष्कराच्या वतीने सुपूर्द करण्यात आला. लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहीद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. पोलीसांच्यावतीनेही शहीद कुणाल गोसावी याना अखेरची मानवंदना देण्यात आली. वडील मुन्नागीर आणि मेजर कुणाल यांची कन्या उमंग यांनी अग्नी देताच अवघा परिसर शोकाकूल झाला होता.



अंत्यसंस्कार होईपर्यंत धीर धरून बसलेल्या कुणालच्या वीरपत्नी उमा यांचा धीर खचल्याने त्यांना येथेच त्रास होऊ लागताच तातडीने वैद्यकीय मदत देऊन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले . आपल्या लाडक्या बबलूचे अंतिम दर्शन घेताना वीरमाता वृंदा यांनाही शोक अनावर झाला. विशेष म्हणजे आपल्या शहीद वडिलांना पोलीस आणि सैन्यदलाकडून अखेरची सलामी सुरु असताना ५ वर्षाची चिमुरडी उमंग देखील चौथऱ्याजवळ उभी राहून आपल्या वडिलांना सलामी देऊ लागताच उपस्थिताना आपल्या अश्रूचा बांध रोखणे अशक्य झाले होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमसिंह पाटणकरांनी राखला गड

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. या निकालाने एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील गटास सतरापैकी तीन जागा गमवाव्या लागल्या. पाटणचे विद्यमान शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या गटाला अवघ्या दोन प्रभागांत यश मिळाले तर भाजपने एक जागा मिळवित पाटणच्या राजकारणात चंचूप्रवेश केला आहे.

पाटण नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारत त्यांचे पानिपत केले. तरी या निवडणुकीत केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सभा घेऊन कार्यकर्त्यांना कानमंत्र देऊनही भाजपचा काही प्रभाव पडला नाही.

पाटण नगरपंचायतीत परिवर्तन घडवू पाहणाऱ्या पराभूत परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मतदारांनी बाजूला सारले. या पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर पाटणचेच असल्याने त्यांचा या तालुक्याच्या गावावर पहिल्यापासून राजकीय दबदबा आहे, तो मतदारांनी यावेळी ही कायम ठेवत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

पाटण ग्रामपंचायतीचे नुकतेच नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने व देसाई-पाटणकर गटांत राजकीय चुरस असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते. या पूर्वीच्या ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाचे वर्चस्व होते. ते नेस्तनाबुत करण्यासाठी विरोधी देसाई गटाने जंग-जंग पछाडले, तरीही सत्ता कायम राखण्यात पाटणकर गटाला यश आले.

१९ उमेदवारांची अनामत जप्त

पाटण नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाल्याने राष्ट्रवादीचा पराभव होऊन सेना, भाजप ही नगरपंचायत ताब्यात घेणार, अशी चर्चा होती. त्यामुळे पाटणकर गटानेही गड राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. पाटणकर गटाच्या उमेदवारांना चांगली मते पडल्याने शिवसेनेच्या ६, भाजपच्या ४, परिवर्तन पॅनेलच्या ७, मनसे १, अपक्ष १ अशा एकूण १९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.


कराडची ‘जनशक्ती’ फुटीच्या उंबरठ्यावर


माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत स्पष्ट बहुमताचा कौल मिळवूनही नगराध्यक्षपद भाजपच्या पारड्यात गेल्याने निकाल लागून केवळ काही तास होण्याअगोदरच बहुमतातील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीमध्ये मोठी फूट पडण्याचे संकेत मिळू लागले आहेत. जनशक्ती आघाडीच्या नेत्यांनीच गद्दारी करून आघाडीचे महत्वाचा घटक असलेले राजेंद्र यादव यांना पराभूत केल्याचा यादव समर्थकांचा समज करून त्यांना मानणारे सर्व नगरसेवक आघाडीमधून बाजूला होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी राजकारणासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा गट एकसंघ राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण काय राजकीय खेळी करणार याकडे कराडकरांचे लक्ष लागून आहे.

निवडणूक वादातून गोळीबार

पालिका निवडणूक निकाल जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच येथील परस्परविरोधी उमेदवार आणि शहरात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यात भर म्हणून मंगळवारी रात्री नऊ वाजता सुपर मार्केटमध्ये वादावादी झाली. या वादावादी दरम्यान संशयितांनी एकाच्या दिशेने गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, गोळीबार झाला किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची आज, राष्ट्रवादीची उद्या बैठक

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीवरून महापालिकेतील राजकारणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी अशी पुन्हा एकदा लढत होणार आहे. सत्तारूढ काँग्रेस आघाडीकडे बहुमताचा आकडा असला तरी जिल्ह्यातील बदलत्या राजकीय संदर्भाचे पडसाद महापालिकेच्या राजकारणात उमटतील, अशी शक्यता काही जण व्यक्त करत आहेत. यामुळे महापौरपदाची निवडणूक सत्तारूढ आघाडी विशेषता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर विरोधी भाजप, ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी स्मिता मारुती माने या उमेदवार असणार आहेत. संख्याबळाचा विचार केल्यास सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादीचे पारडे जड आहे.

राष्ट्रवादीत चुरस, काँग्रेसमध्ये चर्चा स्थायीची

महापौर, उपमहापौर निवडी संदर्भात हालचालींना वेग आला असून काँग्रेसच्या नगरसेवकांची बुधवारी सायंकाळी काँग्रेस कमिटीत बैठक होत आहे. आमदार सतेज पाटील नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसकडे उपमहापौरपद आहे, मात्र या पदासाठी नगरसेवक इच्छुक नाहीत. अनेकांचा डोळा स्थायी समिती सभापतीपदावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महापौरपद मिळाल्याने या पक्षातील इच्छुकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. नगरसेविका हसीना फरास, माधवी गवंडी आणि अनुराधा खेडकर या महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी सर्किट हाऊस येथे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक होत आहे. शुक्रवारी (ता.२) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी असल्याने या बैठकीत नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्ण बहुमत आहे. मात्र सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदार विनय कोरे यांना मानणारे नगरसेवक आहेत. आमदार मुश्रीफ आणि कोरेंची मैत्री सर्वश्रूत असतानाच कोरे यांनी नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी भाजपला साथ दिली. महापालिका राजकारणापासून ते अलीकडे अलिप्त आहेत. महापौर, उपमहापौर निवडीत ते सक्रिय होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे सत्तारूढ आघाडीला अडचणी उद्भभवणार नाहीत असे चित्र आहे. मात्र महापालिकेतील कारभाऱ्यांच्या कारभारावर मात्र सत्तारूढ आघाडीतील नगरसेवक नाराज आहेत. त्या नाराजीचा फायदा, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आरोप प्रत्यारोपाचा लाभ उठविण्याची खेळी विरोधकाकडून खेळली जाऊ शकते. मात्र गेल्या वर्षभरात महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची भूमिका ही सत्तारूढ गटाला पूरक अशी राहिली आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची शुक्रवारी बैठक होत आहे.


महापौर निवड सहा तारखेला

विभागीय आयुक्त कार्यालयाने महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सहा डिसेंबर रोजी महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक होईल. या दोन्ही पदासाठी दोन डिसेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. महापौरपद ओबीसी (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित आहे. उमेदवाराने अर्ज भरताना जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेल्या वैधता प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच छाननीच्या वेळी मूळ जात प्रमाणपत्र व मूळ जातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणीकरिता सादर करण्याची अट आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडीचा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्ज देण्याचे आमिष दाखवत महिलांचे गट तयार करून त्यांच्याकडून प्रत्येकी ३०० रुपये उकळून कंपनीच्या मॅनेजरने पलायन केले आहे. तीन दिवसांपासून कंपनी मॅनेजर समाधान पाटील हा गायब असून, त्याचा फोनही बंद आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह गुंतवणूक करणाऱ्या हजारो महिला हवालदिल झाल्या आहेत. फसवणुकीची रक्कम लाखोंच्या घरात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दीड महिन्यापूर्वी शहरात रंकाळा परिसरातील डी मार्ट शेजारी दिल्लीतील शताब्दी पिनकॉर्फ या कंपनीच्या नावाने एक कार्यालय सुरू झाले. शताब्दी पिनकॉर्फ फायनान्स कंपनीसाठी गरजू मुले आणि मुलांची कर्मचारी भरती सुरू असल्याची जाहिरात वर्तमान पत्रातून प्रसिद्ध झाली. यातून निवडलेल्या मुलांना फायनान्स कंपनीसाठी गुंतवणूकदार शोधण्याचे काम दिले. प्रत्येक कर्मचाऱ्याने दहा महिला गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी ३०० रुपये भरून घ्यायचे. २१ दिवसानंतर गरजूंना अल्प व्याजदरात २० ते ३० हजार रुपयांचे कर्ज मिळेल, असे कंपनी मॅनेजर समाधान पाटील याने कर्मचाऱ्यांना सांगितले होते. रंकाळा शाखेतील २५ कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी दहा ते वीस गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी ३०० रुपांची रक्कम घेऊन कार्यालयात जमा केली. गेली महिनाभर रकमा जमा करण्याचे काम सुरू होते.

२१ दिवसांचा अवधी संपल्याने गुंतवणूकदारांना कर्ज वाटप सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली, मात्र कंपनी मॅनेजर समाधान पाटील याने नोटाबंदीचे कारण देऊन कर्जवाटप पुढे ढकलले. गुंतवणूकदारांकडून वारंवार विचारणा होऊ लागल्याने सोमवारी (ता. २८) कर्जवाटप करणार असल्याचे पाटील याने सांगितले. सोमवारी कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर मॅनेजर समाधान पाटील गायब झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. दिल्लीतील शताब्दी पिनकॉर्फ कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर दिल्लीव्यतिरिक्त कुठेही कंपनीचे कार्यालय नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसात मात्र अजूनही फिर्याद दाखल झालेली नाही.

पोलिसात तक्रार नाहीच

पैसे परत देण्यासाठी गुंतवणूकदारांकडून तगादा सुरू झाल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी लक्ष्मीपुरी पोलिसात धाव घेतली, मात्र आपणच चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला. शताब्दी कंपनीच्या नावे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. समाधान पाटील याने जळगावमध्येही अशाच पद्धतीने ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी केलेल्या चौकशीत पुढे आली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लायवूड अंगावरपडून कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील हत्ती चौक परिसरात गोदामातील साहित्य काढत असताना अंगावर प्लायवूड पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल उर्फ नवाज पापालाल मुजावर (वय ३०, रा. मुजावर गल्ली गावभाग) असे मृताचे नाव आहे.

हत्ती चौक परिसरात असलेल्या विनायक प्लायवूड सेंटर या दुकानात नवाज मुजावर हा गत दोन-तीन वर्षापासून कामास होता. बुधवारी नवाज नेहमीप्रमाणे कामावर आला. दुपारच्या सुमारास प्लायवूडची ऑर्डर आल्याने नवाज हत्ती चौक परिसरात असलेल्या गोदामात सहकाऱ्यांसह प्लायवूड आणण्यासाठी गेला होते. त्याठिकाणी प्लायवूड काढत असताना अचानकपणे प्लायवूडचा मोठा गठ्ठाच नवाजच्या अंगावर पडला. प्लायवूड खाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी नवाज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर नवाज याला आयजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेची माहिती समजताच नवाजच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीनी आयजीएम आवारात मोठी गर्दी केली होती. नवाजचे आई-वडील आणि भावाचा दोन वर्षापूर्वीच मृत्यू झालेला आहे. नवाजच्या पश्चात पत्नी व दोन जुळी मुले असा परिवार आहे. गावभाग परिसरातील मुजावर गल्लीत राहणारा नवाज भागातील प्रत्येक कार्यक्रमात हिरीरिने सहभागी व्हायचा. त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पराभवाने राष्ट्रवादीत अस्वस्थता

$
0
0

कोल्हापूर

जिल्ह्यातील महायुती​ची घोडदौड रोखण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काही मतदासंघांत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले आहेत. ताकद असूनही काही कारणांमुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला दणका बसल्याच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेतील अपयशाने राष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ झाले असून जिल्हा परिषद निवडणुकीत चुका टाळण्यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखण्यात येत आहे.

जिल्ह्यात दोन्ही काँग्रसची चांगली ताकद आहे. जिल्हा बँक, महापालिका, बाजार समिती या सारख्या महत्वाच्या संस्था या पक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत याच पक्षाला रोखण्यासाठी भाजपने तयारी केली. त्यासाठी या पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांनी आपल्या पक्षात घेतले. जनसुराज्य पक्षाला आपल्या तंबूत घेतले. आमदार हसन मुश्रीफ यांना कागलमध्येच रोखण्यासाठी समरजित​सिंह घाटगे यांना ताकद दिली. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक हे भाजपबरोबर रहावेत यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यश आले. मलकापुरात काँग्रेसने भाजपला मदत करावी अशी परिस्थिती निर्माण केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अधिक सक्रीय होतील अशी शक्यता होती, मात्र तसे न झाल्याने या पक्षाला गडहिंग्लज, कागल, मुरगूड, जयसिंगपूर, मलकापूर, कुरूंदवाड अशा अनेक ठिकाणी दणका बसला. केवळ पेठवडगावला या पक्षाला अतिशय चांगले यश मिळाले.

सर्व पालिकांत राष्ट्रवादीची ताकद असतानाही या पक्षाची वाताहत झाली. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पक्षाचे नेते सक्रीय झाले आहेत. भाजपने ज्या पध्दतीने स्वाभिमानी, शिवसेना,जनसुराज्य या पक्षाची मदत घेतली. त्याच पध्दतीने मित्रपक्षाची मदत घेण्याचे नियोजन राष्ट्रवादीने सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही मतदारसंघात काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात येणार आहे. तसे संकेत आमदार मुश्रीफ यांनी दिले आहेत. नगरपालिका निवडणुकीत पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीने दणदणीत यश मिळवले होते, पेठवडगाव वगळता यावेळी सर्वच पालिकेत या पक्षाची पिछेहाट झाली आहे, त्यामुळेच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

…………

राष्ट्रवादीची स्थिती

नगरपालिका २०११ २०१६

इचलकरंजी ११ ७

वडगाव ४ १३

गडहिंग्लज ८ ४

कागल १० ९

मुरगूड १० १

कुरूंदवाड ८ ५

जयसिंगपूर २१ १३

...

कोट

‘निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षाची फसवणूक केली, ही फसवणूक महागात पडली. गडहिंग्लज, कुरूंदवाड येथे याचा फार मोठा फटका बसला. कागलला यश मिळाले असले तरी ते समाधानकारक नाही. यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याना विश्वासात घेऊन चांगली जोडणी केली जाईल.

ए.वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष

............

‘सत्तेचा वापर करत भाजपने काही ठिकाणी आमिषे दाखवल्याने अनेकजण या पक्षात गेले. पण अशाने पक्ष वाढत नाही. ही सूज आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ही सूज नक्की उतरेल. कारण ग्रामीण भागात दोन्ही काँग्रेस बळकट आहेत. जेथे आमची ताकद आहे, तेथे स्वबळावर लढू आणि ताकद कमी असलेल्या ठिकाणी काँग्रेस अथवा मित्र पक्षांबरोबर आघाडी करू.

हसन मुश्रीफ, आमदार

.........

चौकट

नेत्यांचे दुर्लक्षच पक्षाला भोवले

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एक खासदार, दोन आमदार आहेत. जिल्हा बँक, महापालिका याशिवाय पाच ते सहा साखर कारखाने ताब्यात आहेत. सात पालिका या पक्षाच्या ताब्यात होत्या, त्यामुळे जिल्ह्यात हा पक्ष बळकट असल्यानेच पालिका निवडणुकीत या पक्षाकडून कार्यकर्त्यांना होत्या. पण खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्यासह अनेकांनी या निवडणुकीत म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही. यातील बहुतेकजण आमदार मुश्रीफ यांच्या कारभारावर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिली,पण त्याचा फटका पक्षाला बसला. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत ही नाराजी दूर करण्याचे आव्हान मुश्रीफांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगनूर तलावासाठीएक कोटी १६ लाख मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मांगनूर येथील पाझर तलाव दुरुस्ती तीन वर्षे रखडली होती. जिल्हा परिषदेच्या सभेत त्याच्या दुरूस्तीसाठी एक कोटी १६ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची सोय म्हणून तत्कालीन आमदार सदाशिवराव मंडलिक यांनी १९८४ मध्ये हा तलाव उभारला. पुढे मांगनूर व भुदरगड तालुक्यातील नांगरगावच्या पिण्याच्या पाण्याची त्यातून सोय झाली. मात्र गेल्या चार वर्षापासून त्याला गळतीने ग्रासले. त्याशिवाय बांधाला घळ पडली आहे. त्यावर झाडे, झुडपे वाढली असून यामुळे पाझर तलाव फुटतो की का अशी स्थिती तयार झाली. परिणामी गावाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कमी पडू लागले. त्यावेळेपासून माजी सरपंच व ‘सदा साखर’चे संचालक आप्पासाहेब तांबेकर, सरपंच आनंदा राऊत व प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रयत्नाने या कामाला यश मिळाल्याचे आप्पासाहेब तांबेकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सभेत एक कोटी १६ लाख रुपयांची मंजुरी मिळाली. यातून घळ भरणे, बांधाची दुरुस्ती व वृक्षतोड, दोन्ही बाजूंनी पिचिंग होणार आहे.याचबरोबर बाळेघोल येथे नवीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यासाठी ६८ लाख रुपये मंजूर झाले. यासाठी सरपंच शामराव पाटील, आर. एस. पाटील यांचे प्रयत्न सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपपत्रात ५२ साक्षीदारांचे जबाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने दुसरा संशयित आरोपी डॉ.वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर मंगळवारी (ता. २९) पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रात ५२ साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब नोंदवण्यात आले आहेत, तर शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या व्याख्यानादरम्यान संशयित वीरेंद्र तावडेचा कोल्हापुरात वावर होता, असा जबाब एका प्रत्यक्षदर्शीने नोंदवला आहे. दरम्यान, तावडेच्या वकिलांनी आरोपीची भेट होत नसल्याची तोंडी तक्रार केल्यानंतर तावडे याला ९ डिसेंबरला कोर्टात हजर करण्याचे आदेश दिवाणी सह न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दिले.

संशयित आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केल्यानंतर ८९ व्या दिवशी एसआयटीने ४३८ पानांचे आरोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात ५२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. जबाबांमध्ये तावडे याची पत्नी डॉ. निधी तावडे, एनआयएकडील फरार संशयित विनय पवार याची पत्नी श्रद्धा, सारंग आकोळकर याची बहीण भक्ती ओंकार कापशीकर, सीबीआयकडील साक्षीदार संजय साडविलकर, यांच्यासह पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या संकेश्वर येथील नातेवाईकांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. ५२ साक्षीदारांमध्ये सनातन संस्थेच्या पनवेल आणि गोवा येथील आश्रमातील पूर्णवेळ साधकांचाही समावेश आहे. पोलिसांनी आश्रमांची घेतलेली झडती, आश्रमातून जप्त केलेल्या वस्तू, संशयित वीरेंद्रसिंह तावडे याच्याबद्दल माहिती दिली आहे.

आरोपपत्रात पहिला जबाब संजय साडविलकर यांचा नोंदवण्यात आला असून, साडविलकर यांनी तावडेसोबत झालेल्या भेटी, तावडेने केलेली पिस्तुलाची मागणी आणि दोन व्यक्तींना राहण्यासाठी जागेची व्यवस्था करण्यास सांगितले होते, अशी माहिती दिली आहे. साडविलकर याच्या चांदी कारखान्यातील कामगाराचाही जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. पोलिसांनी विष्णू राजाराम साळुंखे या गॅरेज मालकाचाही जबाब आरोपपत्रात नोंदवला असून, तावडेने विक्री केलेल्या ट्रॅक्स संदर्भात साळुंखे यांनी माहिती दिली आहे.

...

चौकट

९ डिसेंबरला तावडेला कोर्टात हजर करणार

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एसआयटीने तावडे याची रवानगी पुण्यातील येरवाडा जेलमध्ये केली. आरोपी कोल्हापुरात नसल्याने त्याची भेट घेता आली नाही, अशी तोंडी तक्रार तावडेचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी दिवाणी सहन्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे केली. यावर तावडे याला ९ डिसेंबरला कोर्टात हजर करावे, असा आदेश कोर्टाने दिल्याची माहिती अॅड. समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

...

चौकट

समीर आणि तावडेच्या जामिनासाठी प्रयत्न

समीर गायकवाड आणि वीरेंद्रसिंह तावडे या दोघांवर पोलिसांनी खुनाचा आरोप लावला आहे, मात्र आरोपपत्रात कोठेही त्यांनी शस्त्र चालवले आणि कॉ. पानसरे यांची हत्या केली असा उल्लेख नाही. पोलिसांनी लावलेल्या कलमांबाबत आरोपपत्रात काहीच दिसत नाही. किंबहुना विसंगतीच आढळते, त्यामुळे या दोघांनाही जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आरोपींचे वकील अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यान, अॅड. पटवर्धन यांनी बुधवारी (ता. ३०) पुरवणी दोषारोपपत्राची प्रत कोर्टातून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांमध्ये खडखडाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यात एटीएममध्ये जाणवणारा पैशांचा खडखडाट आता बँकांमध्येही जाणवू लागल्याने राष्ट्रीयीकृत बँकांमधून नागरिकांना कमी पैसे मिळू लागले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतून पाच ते दहा हजार रुपयापर्यंत पैसे देण्यात येणार आहेत. गुरुवारपासून खात्यांमध्ये पगार तसेच पेन्शन जमा होणार असताना व बहुतांश एटीएम बंद असल्याने चलन तुटवड्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे परिस्थिती गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गेल्या २१ दिवसात सहकारी संस्थांना पैसे मिळत नसल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात सर्व पदाधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांची सभा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात नवीन रक्कम आली नसल्याने विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या रकमेवर २१ दिवसाचा कारभार करण्यात आला. आता ती रक्कम संपत आली आहे. एक तारखेपासून ​नोकरदारांचे पगार तसेच पेन्शनरांची पेन्शन खात्यांमध्ये जमा होणार आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेकडून नवीन रक्कम येण्याची शक्यता फार कमी असल्याचे सूत्रांचे मत असल्याने किमान आठ दिवस प्रचंड त्रास होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकता असलेल्या सर्वांना पैशांची उपलब्धता व्हावी यासाठी ‘नागरिकांनी गरज असल्यासच पैसे काढावेत,’ असे आवाहन बँकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

नोटा बंदीच्या निर्णयानंतर सहकारी बँकांना पुरेशी रक्कम उपलब्ध होत नसल्याने यापूर्वीपासूनच अगदी तुटपुंजी रक्कम नागरिकांना दिली जात होती. मात्र राष्ट्रीयीकृत बँकेत २१ दिवस एटीएम तसेच काउंटरवरुन दिल्या गेलेल्या रकमेमुळे व रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नसल्याने या बँकांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सध्या बँकांमध्ये कमी प्रमाणात पैसे असल्याने काही बँकांनी बुधवारपासूनच पाच हजार रुपयेच देण्यास सुरुवात केली. तर गुरुवारपासून अन्य बँकांही त्याच मार्गाचा अवलंब करत जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत पैसे देणार आहेत. अनेक सहकारी बँकांनी पाचशे रुपयेच ग्राहकांनी दिले. काही बँकांनी तर पैसे देणेच बंद केले.

०००००००००

नोकरदारांना मर्यादित रकमेवरच समाधान

बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचीच एटीएम सुरू होती. अन्य एटीएम बंदच असल्याने नागरिकांना आता बँकेतून मिळणाऱ्या मर्यादित रकमेवर समाधान मानावे लागणार आहे. सरकारी तसेच खासगी नोकरदारांचे पगार एक तारखेपासून जमा होत असून त्यांची गुरुवारपासून बँकेत गर्दी होणार आहे. त्यासाठी बँकांनी उपलब्ध पैसे सर्वांना मिळावेत, यासाठी प्रत्येकाला कमी रक्कम देण्याचे नियोजन केले आहे. रिझर्व्ह बँकेकडे रकमेची मागणी केलेली असली तरी त्यांच्याकडून जेव्हा रक्कम उपलब्ध होईल, तेव्हा ही परिस्थिती नियंत्रणात येईल असे सूत्रांचे मत आहे.

जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी

प्राथमिक शिक्षक ९५००

शिक्षकत्तेर कर्मचारी ४३००

माध्यमिक शिक्षक ९०००

माध्यमिक शिक्षकेतर ४१००

महसूल १७५०

आरोग्य २४००

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलास पाणी योजनेत अर्धा कोटींचा ‘ढपला’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.comTweet:@bhimgondaMT

कोल्हापूर ः शिरोळ तालुक्यातील आलास नळ पाणी पुरवठा योजनेत घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने केलेल्या चौकशी अहवालात काळी माती असताना कठीण खडक, ब्लास्टिंगचा वापर दाखवून ४९ लाख ८९ हजार ३५४ रूपये खर्च केल्याचे म्हटले आहे. परिणामी योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

दरम्यान, या कामात सुमारे अर्धा कोटींचा ढपला मारल्याचा आरोप अकुंश संघटनेने केला आहे. संघटनेच्या तक्रारीवरून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अकुंशच्या शिष्टमंडळाने सीइओ डॉ. कुणाल खेमनार यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून आलाससाठी नळपाणी योजनेसाठी २०११ मध्ये २ कोटी ४९ लाख ७४ हजार ५६६ रूपये मंजूर झाले. योजना २३ नोव्हेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. कृष्णा नदीवरील या योजनेचे अंदाजपत्रक तयार करताना पाईपलाइन टाकण्यासाठी जमिन खुदाई करून चाचणी खड्डे घेतले. त्यात काळी माती आणि मुरूम असल्याचे दिसून आले. तरीही अंदाजपत्रकात कठीण खडक, ब्लास्टिंगसाठी तरतूद केली. योजनेतून सुमारे ६ किलोमीटरची पाइपलाइन टाकली. चाचणीवेळी काळी माती आढळली असताना ढपला मारण्यासाठीच कठीण खडकाचे आणि ब्लास्टिंगचे पैसे उचलले आहेत, अशी तक्रार ‘अकुंश’ने २२ जून २०१५ रोजी सीइओंकडे केली होती. त्याची चौकशी झाली.

चौकशी अहवालात म्हटले आहे की, अशुध्द पाणी दाबनलिकेवर चाचणी खड्डा खणला. त्यावेळी मुरूम बेडींग केलेले नसल्याचे दिसून आले. पाइपलाइनची खुदाई प्रत्यक्षात काळ्या मातीत केलेली आहे. पाईपलाइनवर कव्हर खूप कमी आढळले. त्याची पडताळणी केली असता ०.७५ मीटर खोली आवश्यक होती, पण कमी खोलीवर पाईप टाकली आहे. गावात सर्व ठिकाणी काळी माती आढळली. अशुध्द पाणी पंपिग म‌शिनरीमध्ये १५ एचपीचे दोन सबमर्सिबल पंप सुरू नाहीत. शुध्द पाणी पपिंग मशिनरीचे काम सुरू झालेले नाही. स्वयंचलित व्यवस्था, तारेचे कम्पाउंड नाही. अशा गंभीर त्रुटी चौकशीत दिसून आल्यामुळे योजनेतील घोटाळ्याबाबत संशय बळावला आहे.

===

पाइपलाइनच्या एका खुदाई कामात ४६ लाखांचा ढपला मारून सरकारचे नुकसान केले आहे. उर्वरित कामांची चौकशी केल्यानंतर आणखी गैरव्यवहार उघडकीस येतील. ज्या ‌कामात ढपला मारण्याची संधी जास्त आहे, ते काम प्राधान्याने केले आहे. जेथे संधी नाही, ते काम मागे ठेवले आहे. दोषींवर कारवाई करण्यासही टाळाटाळ केली जात आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करणार आहोत.

धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, अंकुंश संघटना

===

आलास पाणी योजनेची चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जादा पैसे अदा केले असतील तर वसूल केले जातील.

एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य, पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रभागातील कचरा उठाव होत नाही, ड्रेनेज लाइन चोकअप झालीय, पाइपलाइनच्या गळतीकडे दुर्लक्ष होतेय, परिसरात विनापरवाना बांधकाम होत आहे, रस्त्यावरील विद्युत दिवे खराब आहेत... अशा एक ना समस्या नागरिकांसमोर असतात. मग, त्यासाठी महापालिकेत हेलपाटे घालायचे किंवा नगरसेवकाला सांगायचे ही पारंपरिक पद्धत. मात्र, महापालिकेने सुरू करून दिलेल्या १८००२३३१९१३ या टोल फ्री क्रमांकाने नागरिकांना एक स्वतंत्र व्यासपीठ दिले. गेल्या सहा महिन्यात या हेल्पलाइनकडे नोंदविण्यात आलेल्या तब्बल ११४२ तक्रारींत आरोग्य विभागाशी निगडीत तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. आरोग्य विभागाशी संबंधीत ५३२, विद्युत विभागाशी संबंधित २६३ तर अपुरा पाणीपुरवठा, पाइपलाइन गळती याबाबत ९४ तक्रारींची नोंद झाली आहे.

जून ते नोव्हेंबर या काळात नागरिकांच्या ११४२ तक्रारींपैकी १०९६ तक्रारींची सोडवणूक केल्याचा दावा प्रशासनाचा दावा आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याच्या सोडवणुकीबाबतची माहिती एसएमएस करून नागरिकांना दिली जाते. त्यातून आपल्या प्रश्नाचे काय झाले याची माहिती नागरिकांना घरबसल्या होऊ लागली आहे. तर हेल्पलाइन सुविधेमुळे शहराच्या कोणत्या भागात नेमकी कोणती समस्या आहेत, याची माहितीही जमा होत आहे.

प्रभागातील कचरा उठाव, साफसफाई, पाइपलाइन गळती, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम, ड्रेनेज चोकअप अशा विविध तक्रारी नागरिकांना घरबसल्या करता येतात. महापालिकेच्या कामकाजात नागरिकांना सामावून घेण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली. याबाबत जनसंपर्क विभागात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे तक्रारींची नोंद होते. त्यानंतर संबंधित विभागांना तक्रारींचे स्वरुप आणि नागरिकांना तक्रार नोंदवून घेतल्याविषयीची माहिती कळवली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मानसिक आजारांच्या त्सुनामीचा धोका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे सुखसाधने वाढली आहेत. आर्थिक क्रयशक्तीमध्ये वाढ झाली आहे. राहणीमानात सुधारणा होत आहे. मात्र तरीही जीवनाकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे माणूस असमाधानी आहे. त्यामुळे वीस वर्षांत माणसाच्या आयुष्यात मानसिक आजारांची त्सुनामी येण्याचा धोका आहे’ असे मत पीस ऑफ माइंड या आध्यात्मिक वाहिनीचे प्रवक्ते ब्रह्माकुमार सूर्यभाई यांनी व्यक्त केले.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोल्हापूर केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राजयोग मेडिटेशन फॉर हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस या कार्यक्रमात ते बोलत होते.

ब्रह्माकुमार सूर्यभाई म्हणाले, ‘माणसाने दिवसातील पाच मिनिटांचा वेळ स्वत:साठी काढला पाहिजे असे सांगून सूर्यभाई म्हणाले, संपत्तीची लालसा न ठेवता समाधानी राहिले पाहिजे. अनेकजण कधीच संतुष्ट होत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनाला कधीही समाधान मिळत नाही. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. पैसा जवळ असूनही मानसिक स्वास्थ्य नसेल तर त्या माणसाच्या आयुष्याला अर्थ मिळत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण नेमके कसे वागायचे याची जाणीव ठेवायला हवी. त्यातून आपले व्यक्तिमत्वही विकसित होते.’

ब्रह्माकुमारी गीताबहन म्हणाल्या, ‘आनंदी जीवन जगण्यासाठी आपण आपल्या अनावश्यक गरजा, अपेक्षांना बाजूला ठेवले पाहिजे. तणावमुक्त आयुष्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. दुसऱ्या व्यक्तीला आनंद देण्यासारखे सुख दुसरे नाही ही भावना उमगली तर आयुष्य सुखी होते. त्यामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्वाला जपायला हवी.’

कार्यक्रमाला माजी महापौर वैशाली डकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, उद्योगपती बाबाभाई वसा, वसंतराव देशमुख, डॉ. चंद्रकांत पाटील आदींसह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या निर्णयांमागे ठामपणे उभे राहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘करिअरची चौकट मोडून जर तुमची मुलं काही वेगळा मार्ग चोखाळत असतील तर त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणारे पालक असतील तर युवकांचे ​भविष्य खऱ्या अर्थाने घडू शकेल’ असा विश्वास अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केला.

ब्राह्मण सभा करवीर आणि श्री महालक्ष्मी बँक यांच्यावतीने सुरू असलेल्या तात्यासाहेब तेंडुलकर स्मृति व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. मराठी युवकांपुढील आव्हाने या विषयावर शर्मा यांनी संवाद साधला. तर विश्वनेट या संस्थेचे संचालक अजय कुलकर्णी यांनीही यावेळी संवाद साधला.

शर्मा म्हणाले, ‘तरूण वयात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मुलांना पालकांकडून मिळत नाही. त्यांचा निर्णय चुकेल अशी भीती पालकांना वाटत असते. तर डॉक्टर, इंजिनीअर, बँकर या पलीकडे अनेक वेगळ्या करियरच्या दिशा आज खुल्या झाल्या आहेत. पण पालक मुलांवर दबाव टाकतात ज्यामुळे मुलं त्यांच्या मनासारख्या क्षेत्रात करिअर करू शकत नाहीत. निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये घडावी यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी पालकांनी दृ​ष्टिकोन बदलण्याची गरज आहे.’

अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षेसारख्या क्षेत्रात अशाप्रकारे निर्णय घेण्याची अक्षमताच मराठी युवकांना मागे खेचते हे वास्तव आहे. त्यावर मात करायची असेल तर पालक आणि मुलं यांच्यातील संवादाची दरीही कमी झाली पाहिजे.’

विश्वनेटचे संचालक अजय कुलकर्णी म्हणाले, ‘बेरोजगारी, व्यसनाधीनता, मनोरूग्ण, आत्महत्येचे विचार या महत्वाच्या समस्या आहेत. आजच्या युवकांसमोर अनेक प्रलोभने आहेत, त्यामुळे एकीकडे तरूण या प्रलोभनांना बळी पडत आहे. मात्र त्याचवेळी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारे, संघर्ष करत आयुष्य घडवणारे तरूणही आपल्यासमोर आहेत. त्यामुळे परि​स्थितीला दोष न देता यशस्वी होणारा तरूण ही देशाची संपत्ती आहे. मुलांना तारुण्यातच नकार पचवण्याची, जबाबदारी निभावण्याची सवय पालकांनी लावली पाहिजे. त्यातून युवक घडतील. आपण आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलाच्या हल्यातशेतकऱ्यांचा मृत्यू

$
0
0

चंदगड

बैलाचे शिंग पोटात घुसल्याने हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील कल्मेश्वर उर्फ बाळु भागोजी पाटील (वय ५१) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. स्वत:च्या बैलानेच शेतकऱ्याला मारल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. संतोष बेळगांवकर यांनी याबाबतची वर्दी कोवाड पोलिसात दिली आहे.

कल्मेश्वर पाटील हे प्रगतशील शेतकरी होते. कोवाड परिसरात शर्यतीची बैलजोडी म्हणून त्यांच्या बैलजोडीकडे पाहिले जात होते. गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे कल्मेश्वर पाटील आपल्या बैलजोडीला अंगणात बांधण्यासाठी सोडत होते. यापैकी एक बैल मारक असल्याने ते कोणालातरी मदतीला घेवून बैलजोडी सोडत होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी होती. गुरूवारी सकाळी पत्नी लताला मदतीला घेवून गोठ्यातून बैल सोंडून अंगणात बांधत असताना ही घटना घडली. मारका बैल सोडून दुसरा बैल सोडत असताना मारक्या बैलाने त्याचे शिंगे पोटात घुसविले. पाठीमागे भिंत असल्याने त्यांना किंचितही हलता आले नाही. त्यामुळे सहा इंच शिंग पोटात घेसले. त्यामुळे कल्मेश्वर रक्ताच्या थारोळ्यात गोठ्यात पडले होते. पत्नीने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. यावेळी शेजारील नागरीकांनी बैलाला बाजुला करुन कल्मेश्वर यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निढोरी उजव्या कालव्यातून पाणी सोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

निढोरी उजव्या कालव्यातून नियमितपणे पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या कागल तालुक्याबरोबरच सीमा भागातील शेतकऱ्यांची शेकडो एकरातील ऊस व रब्बी पिके वाळू लागली आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. येत्या आठवडाभरात सरकारने गंभीर दखल घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी कागलच्या तहसीलदार कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी खांद्यावर झेंडे घेवून आंदोलन केले. लाल बावटा कामगार संघटना व शेतकरी यांनी यावळी घोषणाबाजी केली. सरकारचा धिक्कार करीत ‘आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजेत’ अशी आग्रही भूमिका मांडली.

अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. संभाजी यादव म्हणाले, ‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसचे आघाडी सरकार यापूर्वी सत्तेत होते. त्यांनी शेतकऱ्यांना भूलथापा देत रिकामेच ठेवले. ते गेले आणि आता भाजप सरकार आले. या सरकारनेही पूर्वीच्या सरकारच्या योजना बंद करीत कामगार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावले.’

कॉ. उदय नारकर म्हणाले, ‘आज शेतकरी जे कष्ट करतो आहे, त्याचे चीज होत नाही. शेतकऱ्यांना फसविण्याचे काम सत्ताधारी मंडळी करीत आहेत. शेतकरी गेली कित्येक दिवस झाले शेतीच्या पाण्याबद्दल ओरडत आहे. मात्र हे सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी मिळालेच पाहीजे ही आमची आग्रही मागणी आहे.’

निवेदनात म्हटले आहे, निढोरीपासून म्हाकवे पर्यंतच्या ३० कि.मी. अंतरात कालव्यातून गाळ, केंदाळ, वेली, झाडे, झुडूपे आहेत. त्यामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाच्या निढोरी कार्यालयाकडे चौकशी केली असता, तेथील अधिकारी उडवाउडविची उत्तरे देत जबाबदारी झटकून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? हा प्रश्न आहे. निढोरी कार्यालयातील सर्व विभागप्रमुखांची तहसीलदारांनी बैठक लावून निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

आंदोलनात गौस नायकवडी, आप्पा दावणे, विजय राजिगरे, सुभाष निकम, विजय डाफळे, पांडूरंग पाटील, आप्पासो पाटील, शिवराम चौगुले, सुरेश शिंदे, चंद्रकांत कांबळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images