Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कागलच्या घरातील ‘आनंद’ हरपला

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबांचा जन्मभर परिस्थितीशी चालणारा संघर्ष आणि झगडा आपल्या साहित्यातून समर्थपणे मांडणाऱ्या मूळचे ‘कागल’कर असणाऱ्या ज्येष्ठ साहि​त्यिक डॉ. आनंद यादव यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यातील धनकवडी येथील घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कागलमधील त्यांच्या घरातील खराखुरा ‘आनंद’ हरपला आहे. ज्या घरात आनंद यादव लहानाचे मोठे झाले, त्या घरातील त्यांच्या आठवणी यादव यांचे वयोवृध्द भाऊ शिवा यादव यांनी आपल्या पत्नी लक्ष्मी आणि मुले भरत आणि राजू यांच्यासमवेत जशाच्या तशा जपल्या आहेत. वयाच्या ७८ वर्षापर्यंत काबाडकष्टातच ‘आनंद’ घडवण्यासाठी झिजणाऱ्या शिवा यांचे अश्रू ,आपल्या दादांच्या आठवणी सांगताना आलेली भोवळ या गोष्टी दिवंगत आनंद यादव यांच्या जाण्याने आता घरासह त्यांच्याही आयुष्यातलाच ‘आनंद’ संपल्याचे सांगतात.

कागलच्या सणगर-धनगर गल्लीत डॉ. आनंद यादव यांचे १३० फूट लांबी आणि २७ फूट रुंदीचे साधे घर आजही आहे. याच ठिकाणी डॉ. यादव यांच्यासह त्यांचे चार भाऊ आणि पाच बहिणी मातीच्या ‘घरभिंती’ सांभाळत कष्टाशी ‘झोंबत’ जगल्या. आज त्यातील तीन बहीणी हयात आहेत. त्यांचे वडील जकात गोळा करायचे म्हणून त्यांना ‘जकाते’ या नावानेही संबोधले जाते. घराची कौले बदलली असली तरी मातीच्या भिंती आजही त्याच आहेत. सर्वात पाठीमागची खोली त्याकाळच्या गोठ्याची आजही साक्ष देते. जेवण खोली आणि देव्हारा आजही जसाच्या तसा आहे. डॉ.यादव अभ्यास करतानाची खोली मात्र दुरुस्त केली आहे. दोन वर्षापूर्वी डॉ. यादव आपल्या या मूळ घरी येवून गेले होते. यादव यांचे अन्य दोन बंधू शिकून सुस्थितीत आहेत. मात्र त्यांचे धाकटे बंधू शिवा हे शिकता न आल्याने याच जीर्ण घरात आपल्या लाडक्या दादांच्या आठवणी जपत जगत आहेत.

आयुष्यात केवळ कष्ट करणेच माहीती असणारे शिवा यादव वार्धक्यामुळे थरथरत्या हातानेच दादाची खोली, देवघर आणि त्याचा नावलौकीक तसेच आपण डॉ. यादव यांच्यासाठी दिलेले योगदान सांगतात. ‘शिवानं माझ्यासाठी कष्ट उपसताना, त्याची शाळा खोटी झाली,’ असं वाक्य दोन पुस्तकात लिहून दादानं माझं नाव गाजवलं असे ऊर भरुन सांगतानाच, परंतु आता सगळंच गेलं म्हणत ते आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन देतात. ‘माझ्या वडीलांशेजारीच माझ्या डॉक्टर दादाचा फोटो म्या लावणार आणि दररोज पूजणार,’ हे सांगताना त्यांना भोवळही येते. ते कोसळतात आणि माझे काय, मी आज हाय काय अन् नाय काय, पण माझ्या दादाच्या आठवणी व विचार जपून ठेवा,’ अशी आर्त सादही देतात.

...

कोट

‘माझे दिवंगत दादाच माझे गुरु होते. त्यांच्या विचाराचा जागर होणे गरजेचे आहे. कागलमध्ये त्यांचे पुढील प्रत्येक पिढीला प्रेरणा देईल, असे स्मारक व्हावे अशी आमची मागणी आहे. येथील डी.आर.माने महाविद्यालय डॉ.आनंद यादव वाचनकट्टा सुरु करुन प्राथमिक शाळेपासूनच मुलांना डॉ. यादव समजून देणार आहेत.

आप्पासाहेब यादव, लहान बंधू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे होतेय स्वागत!

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

Tweet : @ MTjanhavisarate

कोल्हापूर : वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, मुलगी जन्मली तर ती ‘नकोशी’ अशा बुरसटलेल्या विचारांनी स्त्री-भ्रूणहत्यांच्या घटनांमुळे राज्यातील ‘डेंजर झोन’मध्ये असलेल्या कोल्हापुरात आता मुलीच्या जन्माचे स्वागत होत आहे. २०११ मध्ये दर हजारी ८८१ पर्यंत खालावलेला मुलींचा जन्मदर प्रबोधनासह बदलत्या मानसिकतेमुळे ९२४ पर्यंत वाढला आहे. सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई, सरकारी आणि खासगी हॉस्पिटलांमधील कौन्सेलिंग आणि पालकत्वाची बदलती मानसिकता यातून गेल्या तीन वर्षांत हा बदल दिसून येत आहे.

वस्तुतः एक हजार मुलांमागे ९५० मुली हा जन्मदर समाजाच्या स्वास्थ्याच्या आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. मात्र, वंशाला दिवा हवा या अट्टाहासापायी गर्भातच कळ्या खुडल्या गेल्या. तालुका स्तरावरील आणि आडमार्गावरील सोनोग्राफी केंद्रे, कारमध्येच सोनोग्राफी मशिन घेऊन केले जाणारे गर्भलिंगनिदान आणि त्यापेक्षाही कर्नाटक सीमेलगतच्या केंद्रांवरील एजंटांचा सुळसुळाट यातून मुलींचा जन्मदर लक्षणीयरीत्या खालावला. राज्याबरोबरच कोल्हापुरात स्त्री-भ्रूणहत्येची अनेक प्रकरणे उघडकीस आली. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह विविध स्थानिक सामाजिक संघटनांनी याच्या विरोधात चळवळ राबवली. जिल्हाच नव्हे तर राज्यभर सामाजिक संघटनांनी प्रशासकीय पातळीवर एकत्र येत प्रबोधनासाठी विविध योजना मोहिमा राबविल्या. सरकारी यंत्रणेनेही मुलींचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांना पाठबळ दिले. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.

गेल्या तीन वर्षांत कोल्हापुरातील मुलींचा जन्मदर पाहिला तर चंदगड, शाहूवाडी आणि आजरा या दुर्गम तालुक्यांतही मुलींचा टक्का दिवसागणिक वाढला आहे. मात्र, तुलनेने कोल्हापूर शहरानजीकचा करवीर तालुका अद्याप जन्मदराबाबत मागेच आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने सर्वच पातळीवर राबवलेल्या जनजागृती मोहिमा, नियंत्रणाखाली आणलेली सोनोग्राफी सेंटर्स, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी यामुळे कोल्हापुरातील मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी मदत होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

कारमध्येही केली सोनोग्राफी

कडक कारवाई होत असूनही गर्भलिंग निदानाचे नवनवे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस येत राहिले. भुदरगड तालुक्यातील दारवाड गावात २०१३ मध्ये आणि २०१५ मध्ये कोल्हापूर शहरात एका आलिशान कारमध्ये सोनोग्राफी मशिन ठेवून गर्भलिंग निदान चाचण्या केल्या गेल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांचे कनेक्शन उघडकीस आले. अनेक डॉक्टरांचे कर्नाटकातील निपाणी, संकेश्वर येथील सोनोग्राफी केंद्रांशी साटेलोटे असल्याचे उघड आले. शहरात गर्भलिंग चाचणीला अटकाव केल्यावर ग्रामीण भागात गर्भलिंग चाचण्या केल्या गेल्या. या पार्श्वभूमीवर मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले. सोनोग्राफी मशिनला सायलेंट ऑब्झर्व्हर यंत्र बसवून त्यातून गर्भलिंग निदानाची नोंद ठेवली गेली. याच्या विरोधात न्यायालयातही याचिका दाखल झाल्या. सद्यस्थितीत सोनोग्राफी मशिनच्या चाचणीची नोंद जिल्हा प्रशासनाकडे होते.

तालुकास्तरावर ‘आशा’ कर्मचाऱ्यांमार्फत परिसरातील तीन महिन्यांच्या गर्भवती महिलांची माहिती घेऊन त्यांचा प्रसूतीपर्यंत फॉलोअप घेतला जातो. गर्भवती महिलेची तपासणी, आरोग्याची स्थिती याची पडताळणी केली जाते. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, मुलगी जन्मलेल्या कुटुंबांचा सत्कार अशा योजनांतून मुलींच्या जन्माचे स्वागत केले जाते. त्यातून मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.

- डॉ. प्रकाश पाटील, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरावर दृष्टिक्षेप

वर्ष जन्मदर

२०११ ८८१

२०१२ ८८४

२०१३ ८९७

२०१४ ९१९

२०१५ ९२४

२०१६ ९२४ (ऑक्टोबरअखेर)

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस आघाडी एकसंघच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेत नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे असल्याने सत्तेसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता असताना काँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू विकास आघाडीने एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले वचन कधीही विसरणार नसल्याचा निर्वाळा आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. बहुमतासाठी शाहू आघाडी भाजपकडे जाणार या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सत्तास्थापन करण्यासाठी अद्याप १६ दिवसांचा कालावधी असून दरम्यानच्या कालावधीत अनेक घडामोडी घडू शकतात. परंतु जर-तर च्या शक्यतांवर तुर्तास काँग्रेस आघाडीने पडदा टाकला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-राजर्षि शाहू विकास आघाडीने एकत्रपणे लढविली होती. त्यामध्ये काँग्रेसला १८, राष्ट्रवादीला ७ आणि शाहू आघाडीला ९ जागा मिळाल्याने आघाडीचे एकूण बलाबल ३४ झाले आहे. तर दीपाली बेडक्याळे या शाहू आघाडीसोबत तर मदन झोरे हे काँग्रेससोबत राहणार असल्याचे खात्रीशीररित्या समजते. दोन अपक्षांसह आघाडीचे बलाबल ३६ वर पोहोचते. या उलट भाजप-ताराराणी आघाडीकडे २६ सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षा अलका स्वामी या भाजपच्या असल्याने कामकाज करताना अडचणी येण्याच्या शक्यता गृहीत धरुन बहुमतासाठी भाजपा-ताराराणीकडून हालचाल सुरु आहेत. शाहू आघाडीला सोबत घेतल्यास बहुमताचा आकडा ओलांडू शकतो असा तर्क बांधून भाजप-ताराराणी आघाडी कामास लागली आहे. उलट काँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीने निवडणूकीपूर्वी मतदारांना दिलेले आश्वासन पाळणार असल्याचा निर्धार केला आहे. शाहू आघाडीला उपनगराध्यक्षपदासह काही समित्या देण्याचा विचार असल्याची चर्चा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. अशा वातावरणात काँग्रेस आघाडीचे काय होणार असाही तर्क लढविला जात आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-राजर्षि शाहू विकास आघाडीची बैठक पार पडली. त्यामध्ये आघाडीत कोणत्याही प्रकारची फारकत होणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. निवडणूक निकालानंतर आघाडीची पहिलीच बैठक माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, शाहू आघाडीचे प्रमुख मदन कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. निकालानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत ऊहापोह करण्यात आला. सत्ता स्थापण्यास कालावधी असला तरी राजकीय अफवांवर कोणीच विश्वास ठेवू नये, असे मत आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीत मांडले. ‘उत्तम प्रशासन सुंदर शहर’ हे ब्रीद घेऊन आघाडी करण्यात आली असून त्यानुसार शहराच्या विकासाला अग्रक्रम असणार आहे. राजकारण बाजूला ठेवून केवळ विरोधासाठी विरोध करण्याचा कुटील डाव आघाडीकडून कदापि होणार नसल्याचे मत यावेळी बैठकीत मांडण्यात आले. बैठकीस शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, सुनील पाटील, विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील, स्वप्निल आवाडे, लतिफ गैबान, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.

...

चौकट

८१ जणांची अनामत जप्त

या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांसह तब्बल ८१ जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एक लाख ७४ हजार रुपयांची ही अनामत रक्कम परिषदेच्या फंडात जमा करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दशरथ माने, एमआयएमचे विजय कांबळे आणि अपक्ष उमेश खांडेकर, संजय पोळ, अजय भोरे यांचा समावेश आहे. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या एक आणि नगरसेवकपदाच्या ५९ जागांसाठी २२५ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवकपदासाठी २१८ उमेदवार होते. काँग्रेस-राष्ट्रवादी-राजर्षी शाहू विकास आघाडी, भाजप-ताराराणी आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), राष्ट्रीय समाज पक्षांसह अनेक अपक्ष नशिब आजमावत होते. यामध्ये काँग्रेस आघाडीला ३४ तर भाजप-ताराराणी आघाडीला २५, शिवसेनेला एक व अपक्षांना तीन जागा मिळाल्या. तर विजयी उमेदवारांच्या एकषष्टमांशपेक्षा कमी मते मिळालेल्या ८१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार झाला, बँकेतच राहिला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या पगाराचा अनुभव ‘कही खुशी कही गम’ चा आला. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांमध्ये खाती असलेल्या नोकरदारांना पगारातील दहा हजार रुपये खात्यावरून काढता आले तर जिल्हा बँक, सहकारी आणि नागरी बँकामध्ये फक्त दोन हजार रुपयांच्या नोटेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, पगार घेण्यासाठी बँकामध्ये भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा पहिला पगार गुरुवारी झाला. पगारासाठी बँकामध्ये रांगा लागल्या होत्या. निवृत्तीवेतन घेणाऱ्या पेन्शनरांची संख्याही मोठी होती. जिल्ह्यात सरकारी-निमसरकारी ८५ हजार कर्मचारी आहेत. निवृत्तीवेतनधारकांची संख्या ३० हजार आहे. शिक्षक वगळता जिल्ह्यात २५० केंद्रीय व राज्य सरकारी कार्यालये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, अॅक्सिस या बँकेत ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची खाती आहेत, त्यांना रोख दहा हजार रुपये देण्यात आले. प्रत्येक आठवड्याला रोख २४ हजार रूपये देण्याची अट असली तरी पगारदार व बँकेतील ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन काही बँकामध्ये पाच हजार रुपये पगार देण्यात आला. मात्र अद्याप महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही.

एकीकडे राष्ट्रीयकृत व खासगी बँकेत पैशाची उपलब्धता असली तरी जिल्हा, सहकारी व अर्बन बँकेत नोटांची चणचण भासत आहेत. ग्रामिण भागात नोकरी करणाऱ्या सरकारी, निमसरकारी व शिक्षकांची खाती जिल्हा, सहकारी बँकेत आहेत. या बँकांना रोज कमी रक्कम मिळत असल्याने प्रति खातेदाराला फक्त दोन ते अडीच हजार रुपये देण्यात आले. जिल्हा बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त दोन हजार रूपये पगार देण्यात आला. हीच स्थिती प्राथमिक शिक्षक बँक, गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेत पहायला मिळाली. खात्यावरून पगारापोटी अवघे दोन हजार मिळाल्याने नोकरदारांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी बँक कर्मचारी व नोकरदारांचे वादही झाले.


मला निवृत्तीवेतनातून मला दहा हजार रुपये हवे होते. मात्र बँकेतून फक्त दोन हजार रुपयेच मिळाले. त्यातही दोन हजार रुपयांची नोट मिळाल्याने मी पैसे सुट्टे कुठे करायचे? असा प्रश्न आहे. आणखी पैसे काढण्यासाठी आम्हाला बँकेच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागणार आहेत. आणखी किती दिवस हा त्रास सहन करावा लागेल हे सरकारने एकदाच सांगून टाकावे.

बाळासाहेब सूर्यवंशी, निवृत्तीवेतनधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर खंडपीठासाठी साखळी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या (सर्किट बेंच) मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खंडपीठ कृती समितीने गुरुवारपासून (ता. १ डिसेंबर) न्यायसंकुलाच्या आवारात साखळी उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी आजी-माजी अध्यक्षांनी उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनाची दखल घेऊन काही लोकप्रतिनिधींनीही आंदोलनस्थळी हजेरी लावली. दरम्यान, राज्य सरकार जोपर्यंत स्वतःहून खंडपीठाच्या चर्चेचे निमंत्रण देत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने जाहीर केला.

‘कोल्हापुरातील खंडपीठासाठी जे आवश्यक होते ते सर्व राज्य सरकारने केले आहे. आता हाय कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून निर्णय येणे बाकी आहे’ असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीस यांचे हे वक्तव्य म्हणजे सरकारने दिलेल्या आश्वासनांपासून टोलवाटोलवी असल्याचा आरोप खंडपीठ कृती समितीने केला. त्याचबरोबर आंदोलन तीव्र करण्याचाही इशाराही दिला होता. यानुसार खंडपीठ कृती समितीने गुरूवारी सकाळी अकरा वाजल्यापासून न्यायसंकुलाच्या आवारात साखळी उपोषणाला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी खंडपीठ कृती समितीने माजी अध्यक्ष अॅड. अशोक पाटील, महादेवराव आडगुळे, अजित मोहिते, शिवाजीराव राणे, दीपक पाटील, प्रकाश मोरे आणि चारुलता चव्हाण यांनी उपोषण केले. प्रस्ताविकात कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी कृती समितीला दिलेल्या आश्वासनांपासून घुमजाव केले आहे. जाहीर कार्यक्रमांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. निर्दोष ठराव करण्याचेही काम राज्य सरकारने केले नाही, त्यामुळे आम्हाला नव्याने आंदोलन सुरू करावे लागले आहे. दररोज पाच ते दहा सदस्य उपोषण करणार आहेत. न्यायालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. जोपर्तंयत राज्य सरकार चर्चेसाठी बोलवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.’

खंडपीठ कृती समितीचे आंदोलन सुरू होताच आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि माजी उपाध्यक्ष उपोषण करणार आहेत. यानंतर सचिव, सदस्य, महिला प्रतिनिधी यासह बाहेरून येणाऱ्या जिल्ह्यातील वकील उपोषणासाठी बसणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार गुरूजी अखेर अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाटबंधारे विभागात लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शिक्षक सदाशिव बापू कोरवी (रा. उत्तूर, ता. आजरा) याला करवीर पोलिसांनी अटक केली. फवसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला कोरवी गुरूजी सीमाभागात लपून बसला होता. अखेर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २) पहाटे भादवण फाटा (ता. आजरा) येथे त्याला सापळा रचून अटक केली.

फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाला जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्याने जिल्हा परिषदेच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. करवीर पोलिसांनीही वेळीच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात न घेता फसवणूक करणाऱ्या कोरवी गुरुजीची अटक टाळली होती. शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात कोरवी याने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, तरीही पोलिसांना फरार कोरवी सापडला नाही. करवीर पोलिसांच्या आशीर्वादानेच कोरवी फरार असल्याची चर्चा सुरू होती. यावर टीकेची झोड उटल्यानंतर करवीर पोलिसांनी कोरवीच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप शेवाळे यांना कोरवीस अटक करण्यात अपयश आल्याने करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी स्वतः कोरवीच्या तपासात लक्ष घातले. गुरुवारी दिवसभर उत्तूर आणि आर्दाळ परिसरात कोरवीची माहिती काढून पोलिसांनी त्याच्या घरासमोरच ठिय्या मारला. लपलेला कोरवी माद्याळ येथे त्याच्या बहिणीकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कोरवी याला शुक्रवारी पहाटे भादवण फाटा येथून अटक केली.

सदाशिव कोरवी हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्याने श्रीकांत आण्णाप्पा गजरे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) आणि मकबूल मोहम्मदअली नदाफ (रा. गडहिंग्लज) या दोघांच्या मदतीने कृष्णात भीमराव कोरवी (रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) यांची १५ लाखांची फसवणूक केली होती. पोलिसांनी सदाशिव कोरवी याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्याला ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील इतर दोन संशयितांनाही अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.

आपटेंच्या मतदारसंघातील शिक्षक

कोरवी हा आर्दाळ येथील शाळेत कार्यरत होता. आर्दाळ हे गाव जि. प. चे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे कोरवीचा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित होऊ नये यासाठी आपटे दक्ष होते. मात्र, परशराम तावरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्य सभेत कोरवीचा विषय उपस्थित केला. मात्र, आपटे यांनी मधेच ‘शाहू पुरस्काराचे काय झाले’ असे विचारत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आपटे यांच्या भूमिकेवर आणि जिल्हा परिषदेने दिलेल्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी अपघातातीलजखमीचा मृत्यू

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, जयसिंगपूर

हुपरी (ता.हातकणंगले) येथे अपघातात जखमी झालेल्या मजले येथील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धनपाल कलगोंडा पाटील (वय २७) असे त्याचे नाव आहे. हुपरी-कोल्हापूर रस्त्यावर वृंदावन हॉटेलजवळ हा अपघात झाला होता.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, धनपाल पाटील हा हुपरी येथील जवाहर साखर कारखान्यात गेल्या चार वर्षापासून काम करीत होता. शुक्रवारी पहाटे तो कारखान्यातील काम संपवून मित्रासमवेत मोटारसायकलवरून मजलेकडे जात होता. यावेळी वृंदावन हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. या अपघातात धनपाल पाटील व मनोहर सुतार जखमी झाले. दरम्यान अपघाताची घटना निदर्शनास येताच वाहनधारकांनी धनपाल याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या धनपाल यास जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे. धनपाल हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ९ नगरपालिकांवरभाजप आघाडीचे वर्चस्व असेल’

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी

‘आगामी पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व ९ नगरपालिकांवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्षांचे वर्चस्व असेल असे सूतोवाच करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांनी सहजपणे न घेता गंभीरपणे याची दखल घेऊन कामाला लागावे, असा इशाराही दिला.

येथील भाजप शहर कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा अलका स्वामी (इचलकरंजी), अमोल केसरकर (मलकापूर) व डॉ. नीता माने (जयसिंगपूर), रामचंद्र डांगे (कुरुंदवाड) व वसंतराव यमगेकर (गडहिंग्लज) यांच्यासह इचलकरंजी, कुरुंदवाड, जयसिंगपूर, मलकापूर, गडं​हिंग्लज व वडगांव नगरपरिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक व रिंगणातील सर्वच उमेदवारांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटक बाबा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सर्वच सदस्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पाटील बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे शहरांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. नवनिर्वाचित प्रतिनिधींनी आपली प्रतिमा ढळू न देता ती सहज उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी अशी निर्माण करावी. आगामी पाच वर्षाचा शहराच्या विकासाचा आराखडा तयार करुन तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवावा. दरवर्षी एक टप्पा अशा पध्दतीने या आराखड्याला मूर्तस्वरुप दिले जाईल.’ आमदार हाळवणकर यांचा थेट नामोल्लेख न करता येत्या मार्चनंतर इचलकरंजीकरांना मोठा विजयोत्सव साजरा करण्याची आणखी एक संधी मिळेल, असे सांगत अनपेक्षितपणे हाळवणकर यांना मंत्रीमंडळात स्थान निश्चित असल्याचे सूतोवाच केले. राजकारण हे घसरणारे क्षेत्र असून त्यामध्ये अनेक अमिषे दाखविली जातात. पण लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक क्षेत्रात आपली स्वच्छ प्रतिमा राखत जपून पाऊल टाकावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत दोघा तरुणांचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वावादातून येथील धनवान ऊर्फ विकी टिंगरे (वय २२) व राहुल मल्लेश बंड्याघोळ (वय २४, दोघेही रा. रामनगर) या दोन तरुणांचा धारदार सुऱ्याचे वार करून खून करण्यात आला. हल्ल्यात हरीश सुखदेव शिंदे (वय-२६) जखमी झाला. ही घटना सांगली-कोल्हापूर रोडवरील रामनगरच्या मुख्य रोडवर रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

या प्रकरणातील प्रमुख संशयित हल्लेखोर अल्लू मकाशी फरार आहे. हल्लेखोर व मृत हे दोन वेगवेगळ्या समाजाचे असल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनास्थळी प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला.

पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षक दिपाली कवळे, गुंडा विरोधी पथकाचे विश्वनाथ घनवट यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व तपासासंदर्भात सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक अनिल गुजर मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, विकी, राहुल, हरीश आणि अन्य एक असे चौघे महापालिका आखाड्यासमोरील रामनगरकडे जाणाऱ्या रोडवर थांबले होते. तेथे राहुल सत्याळ याच्या लहान भावाला काही वेळापूर्वी अल्लू मकाशीने मारल्याचे समजले. त्याच दरम्यान अल्लू त्या रामनगरवरून जात होता. या चौघांनीही त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यातूनच वाद वाढला. अंधारातच अल्लूने जवळील धारदार लांबलचक सुऱ्याने राहुल व विकीवर वार केले. अंधारात अचानक झालेल्या हल्लाने काहीच कळाले नाही. हरीशला मारहाण करून अल्लूने यामाहा गाडी (एमएएल ३१०१) त्याच ठिकाणी टाकून पळ काढला. दरम्यान, राहुल अल्लूच्या हल्यातून बचावला. त्यानंतर काहीक्षणात ही घटना शहरात कळाली. तिघांनाही तत्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत राहुल व विकीचा मृत्यु झाला होता.

घटनेची माहिती समजताच परिसरातील तरुण प्रचंड संख्येने घटनास्थळी व सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. विकी व राहुलला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचेही निधन झाले. हरीशवर उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर लगेचच पंचवीस ते तीस दुचाकीवरून तरुण मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही तातडीने वाढवण्यात आला. मात्र, संबधित तरुण बराच वेळ घटनास्थळी आलेच नव्हते.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी घटनेची माहिती मिळताच सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पोलिसांशी चर्चा केली. सरकारी हॉस्पिटल परिसरात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. घटनास्थळीही मोठी गर्दी होती. काही वेळासाठी संबंधित मार्गावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सल्लागार समितीचे वावडे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहराच्या वाहतूक ​नियोजनात महत्त्वाची भूमिका निभावणारी वाहतूक सल्लागार समितीची बैठक घ्यायला गेली पाच वर्षे पोलिस प्रशासनाला मुहूर्तच सापडलेला नाही. समितीची बैठकच होत नसल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. ही समिती लवकर कार्यान्वित करण्याची मागणी सर्व घटकांकडून होत आहे. वाहतूक सल्लागार समितीच्या सूचनांचा विचार करुन वाहतुकीचे नियोजन व्हावे, अशी अपेक्षा असते.

शहराच्या वाहतुकीसंबंधात सूचना करण्यासाठी १९९६ मध्ये वाहतूक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत व्यापारी, उद्योजक, डॉक्टर वकील, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा आणि फेरीवाले संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, वाहतूक तज्ज्ञांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होत असे. प्रत्येक महिन्यात वाहतूक सल्लागार समितीची बैठक पोलिस प्रशासन आयोजित करत असे. वाहतूक सल्लागार समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक असतात तर सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी असतात. तसेच महापालिका नगरअभियंता, एसटी व केएमटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित असतात. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, शहर पोलिस उपअधीक्षक बैठकीचे आयोजन करत.

बैठकीत रिक्षा थांबे, वाहतूक कोंडी, केएमटी बस स्टॉप, सिग्नल व्यवस्था, फेरीवाल्यांचे प्रश्न, खराब रस्ते, वाहतुकीला अडथळे ठरणारे विजेचे खांब यावर चर्चा होऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक सूचना केल्या जात असत. रिक्षा स्टॉप कुठे सुरू करायचा, केएमटी बस थांब्यावरील अतिक्रमण हटवणे या सूचनांची अंमलबजावणीही होत असे. बैठकीला शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी उपस्थित राहत.

वाहतूक सल्लागार समितीत कर्नल शंकरराव निकम हेही सदस्य होते. त्यांना सर्व अधिकारी मान द्यायचे. वाहतुकीच्या एखाद्या गंभीर समस्यांची सोडवणूक करायची असल्यास काही सदस्य बैठकीपूर्वी त्यांच्याशी चर्चा केली. निकम यांना मुद्दा पटला तर ते प्रशासनाला समस्यांची सोडवणूक करायला भाग पाडायचे.

वाहतूक सल्लागारांनी दिलेल्या सूचनांचे पालन महापालिका, पोलिस प्रशासन, आरटीओ, वीज मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूक शाखेच्यावतीने केले जात असे. निवृत्त पोलिस अधीक्षक भगवंतराव मोरे तर स्वतः रस्त्यांवर फिरून वाहतुकीचा आढावा घेऊन वाहतूक सल्लागारांनी केलेल्या तक्रारी व सूचना तपासून कार्यवाही करीत असत. वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारीही सल्लागार समितीची बैठक घेण्यात रस दाखवत. वाहतूक शाखेत काम केलेले सध्याचे पोलिस उपअधीक्षक सतीश माने, दीपक घाटगे, अनिल पाटील, अस्लम मोमीन, बरकत मुजावर, आर.बी. शेडे यांनी वाहतूक सल्लागारांच्या बैठका घेतल्या होता, पण गेल्या पाच वर्षांत वाहतूक सल्लागार समितीची बैठक घेण्याचा पायंडाच मोडला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहराच्या वाहतुकीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीत विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीतील सूचनेनंतर ३१ मार्चपूर्वी शहरातील वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या वाहतूक नियोजनात वाहतूक सल्लागार समिती चांगली भूमिका वठवू शकते. त्यासाठी वाहतूक सल्लागार समितीची पुनर्रचना करून बैठका घेण्याची गरज आहे.


पाच वर्षांपासून वाहतूक सल्लागार समितीच्या बैठका घेण्याचे काम बंद झाले आहे. या बैठका का बंद करण्यात आल्या याची आपल्याला माहिती नाही. पण समितीचे महत्त्व लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार आहे. वरिष्ठांच्या निर्णयानंतरच वाहतूक सल्लागार समितीबाबत निर्णय घेतला जाईल.

अशोक धुमाळ, निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

०००००

सल्लागार समिती ही वाहतूक नियोजनाबाबत सूचना देणारे माध्यम होते. ही मंडळी वाहतूक नियोजनातील उणीवा लक्षात आणून देऊन उपायही सूचवत असत. या समितीला घटनात्मक अधिकार नसले तरी शहराच्या वाहतूक नियोजनात ती महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते.

सतीश माने, गृह पोलिस उपअधीक्षक


०००००

आजही आम्हाला वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून पोलिस प्रशासनच्या कार्यक्रमाला निमंत्रण येते पण गेले पाच वर्षे बैठका होत नाहीत. वाहतूक सल्लागार समितीने शहरातील अनेक अडचणींकडे लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली आहे. समस्या सोडवताना कोणत्या अडचणी येतात याचा बैठकीत उहापोह होऊन समस्यांचे निराकरणही होत असे. वाहतूक नियोजनाचा खेळखंडोबा झाला असल्याने समितीच्या बैठका पुन्हा होण्याची गरज आहे.

प्रदीपभाई कापडिया, उद्योजक व सदस्य वाहतूक सल्लागार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांचे कृत्रिम साधनांच्या मागणीसाठी आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अपंगांना स्वावलंबीपणे जगता यावे तसेच त्यांना विनाअडथळा वातावरण मिळावे यासाठी कृत्रिम साधनांसह अवयवरोपणासाठी प्राधान्य देण्याची केंद्र सरकारची सुगम्य योजना आहे. मात्र ही योजना केवळ कागदावरच असून गेल्या दोन वर्षांपासून कृत्रिम साधनांच्या मागणीचा प्रस्ताव बारगळला आहे. सरकारकडून अपंगांकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक अपंग​ दिनाच्या पूर्वदिनी अपंगांनी जिल्हा प्रशासनकडे रांगत व्यथा मांडल्या. कृत्रिम साधनांच्या पुरवठ्यासंदर्भातील प्रस्ताव मार्गी लागले नाहीत तर आमच्यावर रांगण्याचीच वेळ येणार आहे का? असा सवाल उपस्थित करत अपंगांनी ​निवासी उप​जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. शुक्रवारी दुपारी भर उन्हात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेअकराच्या सुमारास अपंग व्यक्ती एकत्र आल्या. कृत्रिम साधने तातडीने मिळाली पाहिजेत, अवयवरोपणासाठी प्राधान्याने अस्थिव्यंग अपंगांचा विचार झाला पाहिजे, अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या अपंगांनी आपल्या कृत्रिम साधनांना जमिनीवर ठेवले आणि भर दुपारी तापलेल्या रस्त्यावरून अपंग बांधव रांगत गेटच्या आत आले.

प्रहार संघटनेच्यावतीने देवदत्त माने, शर्मिली इनामदार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रांगतच निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांच्या कक्षापर्यंत आंदोलन केले. शिंदे यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले. लवकरात लवकर अपंगांच्या कृत्रिम साधनांची प्रस्तावित यादी मार्गी लावली जाईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

असे वेधले लक्ष

अपंगांच्या आंदोलनावेळीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचेही आंदोलन होते. दरम्यान आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी अपंगांशी संपर्क साधून रांगत न येण्याची विनंती केली होती. मात्र अपंग आंदोलक रांगत येऊन निवेदन देण्यावर ठाम होते. दरम्यान पोलिसांकडून आंदोलनाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर गनिमी कावा करून अपंगांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘औषधबंदी’ आरोग्याला घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डोकेदुखी, सर्दी-खोकला, अंगदुखी, ताप, आदी आजारांवर प्रभावी ठरणारी ‘विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ या गोळीसह मिश्र औषधांचा वापर करणाऱ्या ३४४ औषधांवर केंद्र सरकारने घातलेली बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी उठवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशातील औषधनिर्मिती करणाऱ्या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असला तरी हा निर्णय लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे.

एकापेक्षा अधिक घटकांचा समावेश असणारी औषधे आरोग्यास हानिकारक असल्याने केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य होता. मात्र, वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळी औषधे द्यावी लागतात, त्यामुळे औषधांच्या डोसबरोबरच खिशाचे बजेटही वाढत असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातून ४५० याचिका दाखल झाल्या होत्या.

एखादी गोळी ताप, सर्दी, खोकला, अॅलर्जी या सगळ्यांवर चालत असेल आणि पेशंटला फक्त ताप आणि सर्दी असेल तर इतर डोस विनाकरण त्या व्यक्तीला दिले जातात, हे टाळण्यासाठी या औषधांवर बंदी हवी होती. तसेच परदेशातही प्रत्येक आजारावर वेगवेगळीच औषध दिली जातात. एकापेक्षा अधिक घटकांचा समावेश असलेले औषध पेशंटला हानिकारक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

या निर्णयाचे तसे दोन परिणाम होणार आहेत. बंदी घातली तर रुग्णांना अधिक डोस तसेच अधिक पैसे मोजावे लागतील, तसेच बंदी उठविल्यामुळे लोक स्वतः औषध घेण्यावर भर देतील. आजही अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमध्ये सांगून औषध घेत असतात, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

डॉ. किशोर लंबे, वैद्यकीय अधिकारी

सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घातलेल्या बंदीमुळे रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांना डॉक्टरांकडून अनेक औषधे बदलून घ्यावी लागली. आता पुन्हा ही बंदी उठवल्यामुळे पेशंट आणि डॉक्टरांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. बंदी घातलेल्या औषधांमध्ये अधिक घटक असल्यामुळे सरकारने तो निर्णय घेतला होता. परदेशातही वेगवेगळ्या आजारांवर स्वतंत्र औषध दिले जाते, तीच पद्धत रुग्णांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

विकास पाटील, औषध विक्रेते

या औषधांवर होती बंदी

डी कोल्ड टोटल, कोरेक्स कफ सिरफ, विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा, क्रोसिन कोल्ड अँड फ्लू, डीकोल्ड टोटल, ओफलोक्स, डोलो कोल्ड, चेरीफोफ, डी कोफ, कफनील, पॅडियाट्रिक सिरफ टी ९८, टेडीकॉफ जेसी ३४४ एफडीएस यासह ३४४ औषधांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेतर्फे १४ पासूनराजर्षी शाहू व्याख्यानमाला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेतर्फे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला आयोजित केली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रोज सायंकाळी ५.३० वाजता व्याख्यानाला प्रारंभ होईल.

महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १९८५ पासून व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. महापालिकेचे भास्करराव जाधव वाचनालय व्याख्यानमाला घेण्यात पुढाकार घेते. आयुक्त शिवशंकर म्हणाले, ‘समाजप्रबोधन हा उद्देश ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. शास्त्रज्ञ, लेखक, पत्रकार व्याख्यानमालेत सहभागी होणार आहेत. यावेळी स्पर्धा परीक्षेतील करिअरच्या संधीविषयी मार्गदर्शन होणार आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली १४ डिसेंबरला व्याख्यानमालेचा प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. अरुण नाईक ​व विनायक पाचलग मुलाखत घेणार आहेत. व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.’

पत्रकार परिषदेला सहायक आयुक्त बाळासाहेब जगताप, ग्रंथपाल समीर महाब्री, रत्नाकर जाधव, आदी उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे वेळापत्रक

१४ डिसेंबर ः डॉ. जयंत नारळीकर यांची प्रकट मुलाखत

१५ डिसेंबर ः अॅड. बाबूराव हिरडे, विषय ः जगायचे का आणि कशासाठी ?

१६ डिसेंबर ः निळू दामले, विषय ः नोटाबंदीची लाट अर्थकारणाला तारक की मारक?

१७ डिसेंबर ः संजय आवटे, विषय ः बदलणारं जग आणि आयडिया ऑफ इंडिया

१८ डिसेंबर ः डॉ. आनंद पाटील, विषय ः स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप आणि प्रशासकीय सेवेतील आव्हाने

स्थळ ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, रोज सायंकाळी ५.३० वाजता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चप्पलनिर्मितीला कोटीचा फटका

$
0
0


Maruti.Patil @timesgroup.com

Tweet :@ MarutipatilMT

कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळत नसल्याने चप्पलनिर्मिती निम्म्याने कमी झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या व्यवसायातील कारागिरांना कच्चा माल पुरवठाधारकांना देण्यासाठी पुरेशी रक्कम मिळत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. कारागीर आणि विक्रेते यांचा बहुतांश वेळ बँका, एटीएमसमोरील रांगांमध्ये जात असल्याने नोटाबंदीच्या काळात सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कच्च्या मालाबरोबरच पर्यटकांचा ओढा कमी झाल्याने विक्रीही ४० टक्क्याने घटली आहे.

कोल्हापुरी चप्पलने देशभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चप्पल तयार करण्यासाठी प्रामुख्याने निपाणी व चेन्नई येथून कच्च्या मालाचा पुरवठा होत आहे. कच्च्या मालापासून चप्पल तयार करणारी सुमारे ३०० युनिटस् आहेत. एका युनिटमध्ये तीन कारागीर असे ९०० कारागीर कोल्हापुरी चप्पल तयार करत आहेत. सर्व छोटे व्यावसायिक कच्च्या मालाचा व्यवहार पूर्णत: रोखीच्या स्वरूपात करतात. पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हळूहळू या व्यवसायातील कारागिरांना बसू लागला आहे. कच्चा माल पुरवठाधारक जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने आणि नवीन नोटा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने कच्च्या मालाचा पुरवठाच घटला आहे. कच्चा माल मिळविण्यासाठी चलनाची व्यवस्था करण्यासाठी बँकेत गेल्यास दिवसातील चार-पाच तास बँकेच्या रांगेत जात आहेत. रक्कम पुरेशी मिळत नसताना वेळही जात असल्याने चप्पलनिर्मितीवर विपरित परिणाम झाला असून, येथील व्यावसायिकांना सुमारे ३० लाखांचा फटका बसला आहे.

चप्पलनिर्मितीबरोबरच विक्रीवर चांगलाच परिमाण दिसू लागला आहे. नोटाबंदीनंतर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने चप्पल लाइन व भवानी मंडप येथील कोल्हापुरी चप्पल विक्रीमध्ये ४० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे सुमारे ६६ लाख रुपयांची उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. गोवंश हत्याबंदीनंतर चप्पलनिर्मितीवर परिणाम झालेला असतानाच नोटाबंदीचाही परिणाम होत असल्याने कोल्हापुरी चप्पल कारागिरांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.

‘कच्चा माल पुरवठा करणारे जुन्या नोटा स्वीकारत नाहीत. नोटाबंदी निर्णयानंतर नोटा बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत आठवडा गेला आहे. तसेच आठवड्याला २४ हजार रुपये कच्च्या मालासाठी पुरेसे ठरत नसल्याने कोल्हापुरी चप्पलच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे.’

प्रकाश अडसुळे, कारागीर

नोटाबंदी निर्णयामुळे चप्पलनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर पर्यटकांची संख्या घटली असून, त्यामुळे भवनी मंडप व चप्पल लाइनमधील विक्रेत्यांच्या व्यवसायावर ३० ते ४० टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळे उलाढालही कमी झाली आहे.

भूपाल शेटे, संचालक, कोल्हापुरी चप्पल औद्योगिक समूह क्लस्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात कामगारांचा बुडून मृत्यु

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील बस्तवडे येथील खाणीत प्रवाशी वाहतूक करणारे वाहन कोसळून सात कामगारांचा बुडून मृत्यू झाला. सर्व मृत हमीदवाडा, बेनिक्रे आणि हळदी येथील आहेत. ते सर्वजण कागल एमआयडीसीत कामगार होते. उदय रघुनाथ चौगुले (वय २२), किशोर केरबा कुंभार (३२), विनायक विलास चोपडे (२८, सर्व रा. हमीदवाडा, ता.कागल) आकाश गोपाळा ढोले (२०), बाबूराव शिवाजी कापडे (३४) संदीप सदाशिव लुल्ले (३२, सर्व रा. हळदी) तसेच बेनिक्रे येथील शहाजी तानाजी जाधव (२५) अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये सहाजण कुटुंबात एकुलते एक असून तिघे अविवाहीत होते. शुक्रवारी (ता.२) मध्यरात्री बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त वाहनाची क्षमता नऊ असताना त्यातून १८ जण प्रवास करत होते. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. ‌अपघाताचे वृत्त समजताच तिन्ही गावांवर शोककळा पसरली. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या अपघातातून सुदैवाने अकराजण बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. श्रीनाथ रामचंद्र चंद्रकुडे (हमिदवाडा) प्रदीप हरी चव्हाण, विजय फेगडे, (दोघेही- बेनिक्रे) जोतीराम आसोळे (करंजिवणे) सौरभ आण्णा बेलेकर, अनिल दत्तात्रय पंडे, संजय मारुती तिकोडे, अमोल शिवाजी पारळे, राजेंद्र तुकाराम गोरुले, विनायक उर्फ नागेश शिवाजी मगदूम आणि गाडीचा मालक आनंदा बाबुराव लुल्ले (सर्व रा. हळदी) अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, हळदी येथील आनंदा सदाशिव लुल्ले हे टाटा मॅक्झीमो (एमएच १२ जीएम३८४५) या वाहनातून मुरगूड परिसरातील कामगारांची कागल पंचतारांकित एमआयडीसीत तीन शिफ्टमध्ये रोज ने-आण करतात. काल त्यांनी दीड वाजता मुरगूडहून १६ कामगारांना एमआयडीसीत सोडले. रात्री सव्वाअकराच्या सुमारास १९ जणांना घेऊन ते हळदीकडे येत होते. यातील जावेद देसाई (हमिदवाडा) हे कागलमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी उतरले. बाराच्या सुमारास गाडी वेदगंगा नदीवरील पूल ओलांडून बस्तवडेजवळ आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याकडील झाडाला धडकली. मोठा आवाज करीत गाडी खणीत कोसळली. अंधार असल्याने काहीच कळत नव्हते. शरीराला पाणी लागताच प्रत्येकाने बाहेर पडण्याची धडपड केली. चालकाशेजारी बसलेले हळदीचे प्रदीप चव्हाण बाहेर पडले. भांबावलेल्या अवस्थेतच त्यांनी रस्ता पार करुन बस्तवडेतील प्रमोद पाटील यांना उठवले. घरी फोन केला. तोपर्यंत गाडीतील सात ते आठजण बाहेर पडले. त्यांच्या आरडाओरड्याने बस्तवडेसह परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. तत्पूर्वी बाहेर आलेल्या कामगारांनी दोन सहकाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढले. कामगारांनी तातडीने आपापल्या गावी कळवल्याने काही वेळातच नातेवाईकांसह मित्र आणि पै-पाहुण्यांनी घटनास्थळी गर्दी केली. खाणीत पडलेले डबे,चपला आणि मृतदेह पाहून उपस्थित सुमारे आठशे ते हजार नागरिक अक्षरश: थिजून गेले होते. नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

मुरगूड पोलिसही काही वेळात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी येथील ग्रामास्थांच्या मदतीने सुरूवातीला बजरंग पाटील यांच्या ट्रॅक्टरच्या मदतीने गाडी खाणीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयश आल्यावर महेश पाटील यांच्या जेसीबीने गाडी बाहेर काढली. यावेळी गाडीत आणखी दोन मृतदेह सापडले. पोलिसांनी गळ उपलब्ध करुन उर्वरित तीन मृतदेह बाहेर काढले.

एकुलते एक.. आणि कुटुंबे उद्‍ध्वस्त

मृतांपैकी हळदी येथील आकाश ढोले हा अविवाहीत असून शिक्षण घेत नोकरी करीत होता. वडील गवंडी काम करतात. बाबूराव कापडे यांना पत्नी, दोन मुली आणि मुलगा आहे. संदीप लुल्ले याला मुलगी आणि मुलगा आहे. शहाजी जाधव हा अविवाहीत असून बेनिक्रेत राहतो. उदय चौगुले हा अविवाहीत असून, विनायक चोपडे (रा. हमिदवाडा) याचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. त्याची पत्नी गर्भवती आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण एकुलते एक आहेत. त्यांच्या जाण्याने कुटुंबेच उद‍्ध्वस्त झाली आहेत. हळदी आणि हमिदवाडा येथे मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

०००००००००

कोंबून प्रवासी भरल्यानेच घात

कामगार ज्या वाहनातून येत होते त्याची क्षमता नऊ प्रवाशांची आहे. परंतु, गाडीत १९ प्रवासी भरले होते. त्यातील एकजण कागलमध्ये उतरला. त्यामुळे गाडीत पुढे ड्रायव्हरसह चार, मध्ये आठ आणि मागे सातजण बसले होते. हे सर्वचजण झोपेत होते. अचानक गाडी पाण्यात पडल्यावर सगळ्यांनीच बाहेर पडण्याची धडपड केली. परंतु मांडीवर असणारे बाहेर पडू शकले. कोंबून प्रवासी भरल्यानेच सातजणांना जीव गमवावा लागला.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काळरात्रीत झाला स्वप्नांचा चुराडा

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

तालुक्यातील बहुतांशी गावातील तरुण कागल औद्योगिक वसाहतीत नोकरीला. आठ तासाची नोकरी करायची आणि उर्वरित वेळेत शेतीत राबायचे असा दररोजचा दिनक्रम. आठ तास अंगमेहनत केल्यांनतर मिळणाऱ्या पैशांतून सुखाचा संसार उभा करण्याचे त्यांचे स्वप्न.... पण, काळरात्रीत झालेल्या अपघाताने त्यांच्या सगळ्याच स्वप्नांचा चुराडा झाला.

बस्तवडे (ता.कागल)येथे खणीत गाडी पडून तब्बल सात एमआयडीसीत काम करणाऱ्या सात कर्त्या तरुणांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या स्वप्नांबरोबरच घरच्यांचा आधारही तुटला. या अपघातात कुणाचा वडील, भाऊ, मुलगा, पती याबरोबरच कुटुंबाचा एकमेव आधार असणारे ठार झाले. मृतांमध्ये हमीदवाडा येथील तीन, हळदी येथील तीन तर बेनिक्रेतील एक अशा सात जणांचा समावेश आहे. त्यांच्या जाण्याने तीनही गावे सुन्न झाली. त्यांच्या जाण्याने कुटुंबांची मात्र वाताहत झाली आहे. कारण यातील सहाजण एकुलते असून तिघेजण अविवाहित आहेत.

कागल तालुक्यातील हमिदवाडा,बेनिक्रे आणि हळदी या गावातील तरुण एमआयडीसी येथील इंडोकॉन, रेमंड, सोक्टास आदी कंपन्यात कामाला जातात. काल दुपारी ३ -११च्या शिफ्टचे काम आटोपून सुमारे १८ जणांना घेऊन महिंद्रा मॅक्झामो (गाडी क्र.एम.एस.१२ जेएम ३८४५) गावाकडे परतत होती. दिवसभराच्या दगदगीमुळे चालकाला डुलकी आली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी सरळ रस्त्यापासून केवळ १० ते १२ फुटावर असणाऱ्या दगडाच्या खणीत जावून पडली. गाडीत अडकेलेले सात जण पाण्यात गटांगळ्या खाऊन बुडून जागीच ठार झाले. आज पहाटे सहाच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलवल्यात आले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उत्तरीय तपासणी करून सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

मृतातील हळदीचा संदीप लुल्ले यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, वडील असा परिवार असून ते इंडोकॉन कंपनीमध्ये सात वर्षांपासून काम करत होते. येथीलच आकाश ढोले हा अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील आहेत. बी एससी शिक्षण करीत तो गेल्या दोन महिन्यांपासून कामावर जात होता. त्याचे वडील गवंडी काम करतात. तर बाबूराव कापडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आई, वडील आहेत. त्याचे आईवडील शेतमजूर आहेत. हमिदवाड्यातील किशोर कुंभार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून ते सहा वर्षांपासून कामावर होते. येथील विनायक चोपडे यांचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले असून पश्चात आई वडील आणि गर्भवती पत्नी आहे. तर उदय चौगले हा अविवाहित असून यांच्या पश्चात आई,वडील व दोन बहिणी आहेत. त्याचे वडील आणि एक बहीण गतिमंद आहेत. बेनिक्रेतील शहाजी जाधव विवाहित असून पश्चात पत्नी, आई,वडील, मुले आहेत. विशेष म्हणजे यातील कुंभार वगळता सर्वजण एकुलते एक आहेत आणि त्यांच्यावरच कुटुंबाचा भार होता.

मुरगूड पोलिसात अपघाताची नोंद झाली असून स. पो. नि. राकेश हांडे करीत आहेत. मुरगूड ग्रामीण रुग्णालयात मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, नाविद मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे, नगरसेवक जयसिंग भोसले आदींनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. अपघातानंतर पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, पोलिस उपअधीक्षक सागर पाटील, मुरगूडचे स.पो.नि.राकेश हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

कुटुंबीयचा आक्रोश

अत्यंत शोकाकूल वातावरणात बेनिक्रे, हमिदवाडा आणि हळदी येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची घटना समजताच गावे सुन्न झाली. मध्यरात्रीपासून गावातील वातावरण गंभीर होते. गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तर महिला गटागटाने चर्चा करत होत्या. पहाटे मृतदेह गावात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मृतदेह काही काळ घराजवळ ठेवल्यानंतर अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांचा आक्रोशाने अनेकांचे डोळे पाणावले. कर्ते तरूण गेल्याने कुटुंबांचा आधारवडच हरवला. लहान मुलांची फोडलेला टाहो अनेकांच्या काळजाला भिडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस्तवडेजवळ अपघातात माजी पोलिस पाटील ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

आणूर बस्तवडे मार्गावरील बस्तवडे जवळील युवराज जगदाळे यांच्या शेताजवळ टेंपोने मोटरसायकला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील हिंदुराव तुकाराम यादव (वय ६८, रा.बस्तवडे) हे माजी पोलिस पाटील ठार झाले. महिंद्रा मॅक्झीमो दगडाच्या खणीत पडून सात ठार झालेल्या अपघातापासून हा झालेला अपघात केवळ अर्ध्या किमीवर झाला. एकाच दिवशी अर्ध्या किमीवर असे अपघात झाल्याने नागरिकांता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मुरगूड पोलिसातून मिळालेली अधिक मा‌हिती अशी, हिंदुराव यादव मोटारसायकलीवरून गावात जात असतानाजात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने ( एम.एच.१० के ७३९०) जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या पायाला जोराचा मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला. जखमी अवस्थेतील यादव यांना निपाणी येथे रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. याबाबतची वर्दी महादेव शिवाजी भोसले यांनी वर्दी दिली असून मुरगूड पोलिसात याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार एस.टी.खणदाळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगीच वंशाचा दिवा : जन्मदराचे वाढते प्रमाण

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूरः जिल्ह्यात प्रत्येक वर्षी मुलींच्या जन्मदराचा टक्का वाढतो आहे. मुलगीच आमच्या वंशाचा दिवा समजून एक आणि दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या वाढत असल्याचे गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

आरोग्य प्रशासनाकडे नोंद नसलेल्याही अनेक दाम्पत्यांनी एक-दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. ती आकडेवारीही मोठी आहे, असा आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यावरून मुलगा वंशाचा दिवा आहे ही मानसिकता मागे पडत आहे, असा नि‌ष्कर्ष निघत आहे. देशात मुलींचा जन्मदर कमी असलेल्या दहा जिल्ह्यांत कोल्हापूरचा सामावेश आहे. हे ‌‌चित्र बदलण्यासाठी प्रशासन नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात सुधारणा होत आहे. मुलगा म्हातारपणाची काठी, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, असा चुकीचा समज पिढ्यानपिढ्या समाजात रुजला आहे.

सधन आणि विकसनशील कुटुंबात याच मानसिकतेतून स्त्री-भ्रूणहत्या होत आहे. परिणामी दर हजारी मुलांमागे मुलींची संख्या कमी आहे. ज्या समाजात मुलींची संख्या कमी आहे, त्या समाजातील उपवर मुलाग वधू संशोधन करणे अवघड बनले आहे. त्याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत. जागृती करणे, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे असे उपक्रम सातत्याने आरोग्य विभाग राबवत आहे. केवळ एक आणि दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यास प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. त्यातूनच जिल्हा परिषद स्वनिधीतून एका मुलीवर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील दाम्पत्यास दहा हजार आणि दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे अल्पबचत प्रमाणपत्र दिले जात आहे. कन्या प्रगती, लेक लाडकी, बालिका समृद्धी, भाग्यरेखा अशा योजनांतूनही मुलीच्या जन्माला प्रोत्साहन दिले जात आहे. एका मुलीवर शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या वाढली आहे. २०१२ ‌ते ऑक्टोबर २०१६ अखेर ५९९ दाम्पत्यांनी मुलींवरच शस्त्रक्रिया करून घेऊन मुलगीही वारसदार होऊ शकते, या विचाराला चालना दिली आहे.

हातकणगंले आघाडीवर

२०१२ ते ऑक्टोबर २०१६ अखेर एक आणि कंसात दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या तालुकानिहाय अशी ः आजरा ११ (५५), भुदरगड २ (३२), चंदगड ४ (४५), गडहिंग्लज ८ (६१), गगनबावडा १ (२), हातकणंगले १४ (७२), कागल ३ (१८), करवीर ९ (७८), पन्हाळा ९ (४७), राधानगरी ४ (४१), शाहूवाडी ८ (२१), शिरोळ १२ (५०).

दिवसेंदिवस एक-दोन मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या वाढते आहे. विविध योजनांतून केलेल्या जनजागृतीमुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मुलगीच वंशाचा दिवा म्हणण्याकडे कल वाढत आहे. हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल.

- डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य ‌अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकले हात शिकतायत मर्दानी खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी... या घोषणांनी भारावून गेलेल्या वातावरणात शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात बालचमूंसह त्यांच्या पालकांनीही लाठी-काठी फिरविण्याची कला शिकण्यास सुरुवात केली. या शिबिराला चिमुकल्यांसह तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसंस्कार प्रतिष्ठानचे सचिव संजय शहापुरे व खजानिस सारिका शहापुरे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद् घाटन करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि शिवसंस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने शिबिराचे आयोजन ‌केले आहे.

शिबिरात तलवार, दांडपट्टा, विटा, भाला, बाणा, फरीगदगा अशी विविध शस्त्रास्त्रे चालवण्याची माहिती दिली जात आहे. शिवाजी विद्यापीठ मैदान येथे सकाळी​ सात ते आठ या वेळेत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तेथे वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील व लखन जाधव प्रशिक्षण देत आहेत.

पेठवडगाव येथे होली मदर इंग्लीश स्कूल दुपारी तीन ते चार यावेळेत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तेथे संस्थेचे अध्यक्ष सुजय राऊत यांच्या हस्ते व प्राचार्य पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले. कदमवाडी येथील समता हायस्कूल मैदान येथे सायंकाळी पाच ते सहा या वेळेत शिबिर होत आहे. तेथे नगरसेवक सत्यजित कदम यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. राजोपाध्येनगर येथील गोविंद पानसरे विद्यालयाच्या मैदानावर येथे सायंकाळी सात ते आठ या वेळेत शिबिर सुरू आहे. तेथे नगसेविका मनिषा कुंभार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी अविनाश कुंभार उपस्थित होते.

मोहिते कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर येथे सायंकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत शिबिर होत आहे. तेथे नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांच्या हस्ते व धीरज पाटील यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले. नाव नोंदणीसाठी राजेश पाटील (९८९०५९४४६३) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीच्या तारखेकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनामुळे महापौर निवडीच्या तारीख बदलण्याची मागणी झाल्यामुळे सोमवारी (ता. ५) निवडीची तारीख बदलणार की जैसे थे राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यानंतरच पुढील हालचाली गतीमान होणार आहेत.

६ डिसेंबर ही महापौर निवडीची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र त्यादिवशी डॉ. आंबेडकर महा​परिनिर्वाणदिन असल्याने ही तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सूरमंज‌िरी लाटकर यांच्या नेतृत्वाखाली काही संघटनांनी केली होती. त्यानंतर इच्छुक उमेदवारांकडूनही निवडीची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडे मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे. यानुसार सोमवारी त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अशा प्रकारामध्ये निवडीची तारीख वाढवून देण्यात आली होती. तसेच काही संघटनांनी आंदालनाचा पवित्रा घेतला असल्यानेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन तारीख बुधवारी किंवा शुक्रवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमवारी सकाळपर्यंत तारीख निश्चित झाल्यानंतर नगरसेवकांना सहलीवर ​केव्हा पाठवायचे हे निश्चित केले जाणार आहे. तारीख पुढे गेल्यास निवडीच्याआधी दोन दिवस नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी व विरोधी आघाडीतील संख्याबळात मोठा फरक असल्याने विरोधी गटाकडून फार मोठी हालचाली नाहीत. त्यामुळे या निवडीमध्ये फार मोठी उलथापालथ होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images