Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्षयरोग रोखू

$
0
0

क्षययरोगाला रोखण्यासाठी वेळीच निदान, नियमित औषधोपचार यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोल्हापूरातील टी. बी., एमडीआर टी. बी. रोखण्याचे मोठे आव्हान आहे. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यामातून तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार करून क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले.

क्षयरोगाची सध्या कोल्हापुरातील काय स्थिती आहे?

कोल्हापुरात क्षयरोगाचे निदान होत असल्यामुळे दिवसेंदिवस टी. बी आणि एमडीआर टी. बी.च्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसते. टी. बी. झालेल्या रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबातीलही लोकांचीही तपासणी करुन तो इतरांना होऊ नये, यासाठी आयएनएसचे औषध दिले जाते. २०१२ पासून सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये टीबीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवण्यात येत आहे. २०१२ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत जिल्ह्यात ११ हजार ५७७ टीबीचे रुग्ण आहेत. त्यामध्ये थुंकी दुषित रुग्णांची संख्या ५९४८ असून थुंकी अदुषित टीबी रूग्णांची संख्या १९४३ इतकी आहे.

एमडीआर टी.बीचे रुग्ण किती? पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध आहे का?

गेल्या दहा महिन्यात टी. बीचे १८३१ रुग्णांची झाली असून २१५९ रुग्णांच्या तपासणीमध्ये २०४ एमडीआरचे रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यापैकी १६२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यामध्ये एमडीआरचे ५५ तर टी. बी चे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार अर्धवट सोडल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असून वेळीच उपचार घेणे हाच एक पर्याय एमडीआरमधून मुक्त होण्याचा आहे. सरकारकडून वेळेत आणि आवश्यक तेवढा औषधोपचार केला जात असून औषध संपले तर विभागस्तरावर ती खरेदी करुन रुग्णांना उपलब्ध करुन दिले जातात.

क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रांमासाठी सरकारकडून किती निधी येतो ?

टी.बी. एमडीआर असो किंवा एक्स.डी.आर या आजारवर मात करण्यासाठी त्वरित निदान आणि योग्य औषधोपचार होणे महत्त्वाचे असून लोकांमध्ये याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. एखाद्या एमडीआर पेशंटची तपासणी केल्यानंतर त्याचे निदान त्वरित होण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलत सीपीआरला सीबीनॅट मशीन उपलब्ध करुन दिले आहे. या मशीनद्वारे एमडीआरचे होणारे निदान आता दोन तासांच्या कालावधीत होत असल्यामुळे त्या रुग्णावर उपचार त्वरित सुरू करणे शक्य झाले आहे. या मशीनमुळे तपासणी करताच दोन तासामध्ये रिपोर्ट मिळणार असून एमडीआर असो किंवा एचआयव्ही तपासणी ही मोफत केली जाते. समाजात वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी तसेच या क्षयरोग विभागाच्या इतर खर्चासाठी एकूण १ कोटी ८७ लाख निधी मंजूर झाला आहे.

क्षयरोगावरील औषधोपचार अर्धवट सोडल्यामुळे एमडीआर रुग्णाचे प्रमाण वाढत आहे, हे रोखण्यासाठी काय उपाय-योजना केल्या जातील?

क्षयरोगावरच्या (टी.बी) उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या औषधांच्या मात्रा चुकवल्यास त्या रुग्णाच्या शरीरात औषधाला प्रतिसाद न देणारे जंतू निर्माण होतात. परिणामी याचे रुपांतर एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरोगात होते. अशा रुग्णांच्या थुंकी, रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केल्यानंतर त्यांना औषधोपचार करण्याचा सल्ला दिला जातो. परिस्थितीमुळे उपचार अर्धवट राहू नये यासाठी त्यांना मोफत औषधोपचार केले जातात. तसेच त्या रुग्णाचा व त्याच्या एका नातेवाईक असा वाहतुकीचा खर्चही सरकार करत आहे. एमडीआर रोखण्यासाठी उपचारवर भर दिला जाणार असून अधिकाधिक प्रबोधनावर भर दिला जाणार आहे.

Janhavi.Sarate@timesgroup.com

Tweet : @ MTjanhavisarate

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरात सात साखर कारखाने बंद राहणार

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात यंदा ऊसाची कमतरता भासणार असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सात साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. शनिवारपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरात उसतोड कामगारांची पालं पडू लागली आहेत.
जिल्ह्यात सहकारी आणि खासगी मिळून एकूण ३७ साखर कारखाने आहेत. मागील वर्षी पाण्याअभावी उसाची लागवड कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात उसासाठी साखर कारखानदारांना दमछाक करावी लागणार आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर कोणता साखर कारखाना किती दिवस चालेल याचा नेम नाही. त्यामुळे २५ साखर कारखाने सुरू राहतील आणि सात साखर कारखाने बंद राहतील तर उर्वरित कारखाने अनेक वर्षांपासून दिवाळखोरीत निघाल्यामुळे त्यांचा गाळप हंगाम सुरू होणे अशक्यच बनले आहे.
‘गेल्या वर्षीच्या हंगामावेळी सांगोला सहकारी, वैरागचा संतनाथ आणि अक्कलकोटचा स्वामी समर्थ असे तीन साखर कारखाने बंद होते. तर यंदा पुन्हा हे कारखाने तर सुरू होणारच नाहीत. मात्र, बबनराव शिंदे, संत सीताराम महाराज, संत कुमर्दास, शंकररत्न आणि विजय शुगर हे कारखानेसुद्धा बंद राहणार आहेत. करमाळ्याचा आदिनाथ व माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षीची एफआरपी दिली नसली तरीसुद्धा यंदाच्या हंगामासाठी गाळपासाठी परवाना मात्र मागितला आहे आणि एफआरपीची रक्कम दिली तर त्यांना गाळपाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या शिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवशक्ती आणि विठ्ठल रिफायनरीज हे दोन साखर कारखाने यंदा नव्याने सुरू होणार आहेत. एकूणच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार असला तरी सर्वच साखर कारखान्यासमोर गाळपासाठीच्या उसाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. उस कमी असल्यामुळे पहिली उचल जो कारखाना अधिक देईल तिथे उस घालण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागोरीपुढे पोलिसही हतबल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

आंतरराज्य पिस्तुल तस्कर ते आता खुनाची सुपारी घेण्यापर्यंत मनीष नागोरीने मजल मारली आहे. नवी मुंबई येथील एका बांधकाम व्यावसायिकाची गेम करण्याची सुपारी घेतल्याप्रकरणी सध्या तो शहापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. नागोरीच्या वाढत्या कारवाया आणि ताब्यात घेऊन तपासात काहीच माहिती मिळत नसल्याने त्याच्यापुढे पोलिसही हतबल झाल्यासारखी स्थिती आहे.

झटपट श्रीमंत बनण्याच्या हव्यासातून गुन्हेगारांशी हातमिळवणी केली की पुढे त्याचे काय होते हे मनीष रामविलास नागोरी याच्या कारनाम्यातून उघड झाले आहे. रिटेल मोबाईल विक्रेता ते पिस्तुल विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील म्होरक्या असा नागोरीचा प्रवास आहे. आता तर त्याने खुनाच्या सुपाऱ्या घेण्यात आघाडी घेतली आहे. व्यापाराच्या निमित्ताने इचलकरंजीत आलेल्या राजस्थानी बांधवांच्या पराक्रमाच्या अनेक कथा वस्त्रनगरीत पावलोपावली ऐकावास मिळत असतात. त्याला काळीमा फासून व्यापारी बांधवांची नवी पिढी पैशाच्या हव्यासापोटी कोणत्या थराला जाऊ शकते याचा पर्दाफाश नागोरीच्या कृष्णकृत्याने झाला आहे. कुख्यात गुंड भरत त्यागी, पुणे विद्यापाठातील रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर याच्या हत्या प्रकरणात पिस्तुल पुरविल्याप्रकरणी गुन्हे नोंद असलेल्या नागोरीला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्लेखोरांनाही पिस्तुल विकल्याप्रकरणी अटक केली होती, पण तपासात काहीच हाती न लागल्याने त्याला जामीन मंजूर झाला.

मनीष हा नजीकच्या यड्राव (ता. शिरोळ) रेथे स्थायिक झाला आहे. त्याचे वडील कापडाचा लहानसा व्यवसाय करीत होते. मनीषनेही इचलकरंजीत मोबाइल विक्रीचे दुकान थाटले. पण झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अवैध व्यावसायिकांशी त्याची सलगी वाढल्याने उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील काहींचा संपर्कात होता. हाच मनीषचा प्रवास अनेकांच्या भुवया उंचावण्यास कारणीभूत ठरला. सुरुवातीला त्याच्या गुन्हेगारीला खाकी वर्दीतील काही जण पाठबळ देत होते,याच जोरावर त्याने परराज्यातून पिस्तुल आणून विकण्याचा छुपा व्यवसाय सुरू केला, आपले कोणीच काही करू शकत नाहीत हाच आत्मविश्वास बळावल्यानंतर आता तर तो गेम करण्याची सुपारी ही घेऊ लागला आहे.

दोनवर्षी पूर्वी खंडणीच्या एका प्रकरणात साताऱ्यात गोळीबार करून तो चांगलाच चर्चेत आला. त्यापूर्वी कराड पो‌लिस ठाण्यात त्याच्यावर मोबाइल चोरीप्रकरणाचा गुन्हा नोंद होता. साताऱ्यात गोळीबार प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या मनीषचे त्यानंतर अनेक कारनामे समोर येऊ लागले. पाच-सहा वर्षांपासून अनेक प्रकरणात सहभाग असूनदेखील त्याला कोणताही पोलिस अंगाला हात लावत नसे. दोन जिल्ह्यातील पोलिसापासून अधिकाऱ्यांपर्यंत त्याची अनेकांशी असणारी सलगी पो‌लिस वर्तुळातूनच ऐकावयास मिळत होती. खून, खंडणी अशा प्रकरणात सुपारी घेण्यात मनीषचा चांगला हातखंडा होता. सातारा पोलिसांनी काही प्रकरणे उघडकीस आणली. त्यामध्ये तक्रारदार पुढे न आल्याने त्याची नोंद कोठेही झाली नाही. गुन्हेगारी टोळ्यांशी साटेलोटे करून मोठा डॉन बनण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या मनीषचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. जुगार क्लब सावकारी, वसुलीची सुपारी अशा प्रकरणात सहभागी असणाऱ्या अवैध व्यावसायिकांशी जवळीक वाढल्याने मनीषने एवढे मोठे धाडस केले आहे. बनावट पिस्तुल विक्री प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मनीषला दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून पिस्तुले जप्त केली होती. पण मोठी ‘अर्थपूर्ण घडामोड झाल्याने तो त्यातून सहीसलामत सुटल्याची चर्चा होती. त्यानंतर जयसिंगपूर येथे झालेल्या कोल्हापुरातील कुख्यात गुंड भरत त्यागी याच्या हत्येनंतर मनीष पुन्हा एकदा चर्चेत आला. पुणे विद्यापीठातील रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर याचा गोळ्या झाडून खून केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने नागोरी याच्यासह विकास रामअवतार खंडेलवाल, याच्यासह इचलकरंजीतील काहींना अटक केली होती, अल्पकाळात श्रीमंत बनण्याची स्वप्ने पडल्याने गुन्हेगारीकडे खेचला गेलेल्या मनीषची थेट दाभोलकरांच्या खुनाच्या कटातील एक आरोपी म्हणून ओळख होती आता तो शार्पशुटर म्हणून गुन्हेगारी जगतात ओळखू लागला आहे.

पोलिसांचे अपयश

मनीषवर एखादा गुन्हा नोंद झाल्यावर तो स्वःताहून पोल‌िसात हजर होतो. अटकेच्या कारवाईनंतर पोल‌िस कोठडी मिळते पण या कालावधीत पोल‌िस काहीच नवीन माहिती मिळवू शकत नाहीत. पोलिसांचे हे अपयश म्हणावयाचे की गुन्हेगारीला पाठबळ हा प्रश्न अद्याप कुणालाच सुटलेला नाही.

दिल्ली, नेपाळला आश्रय

मध्यतरीच्या काळात नागोरीने आपले नेटवर्क एवढे वाढवले आहे की, त्याने गेले काही दिवस दिल्ली आणि नेपाळमध्ये आश्रय घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिली आहे. मा‌त्र, यापुढे तो अधिक माहितीसाठी तोंडही उघडत नाही. त्यामुळे सुपारी प्रकरणातील नावे त्याने उघड केलेली नाहीत.

कोटा जिल्ह्यातून आणले पिस्तूल

आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याने राजस्थातील कोटा जिल्ह्यातून पिस्तूल खरेदी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईतील बिल्डर सुरेश बिजलानी याच्या हत्येचा सुपारी घेतल्या प्रकरणी कुख्यात पिस्तूल तस्कर मनीष नागोरी नागोरी याला शहापूर पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. तसेच बिल्डरचा गेम करण्यासाठी निघालेल्या मनीष नागोरी याचा साथीदार स्वप्नील फातले याला महिनाभरापूर्वी शहापूर पोलिसांनी म्हसोबा मंदीर परिसरात पकडले होते. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत राउंड तसेच ३५ हजाराची रोकड जप्त केली होती. नागोरी याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. महिन्याभरात मनीष पुणे, मुंबई तसेच नेपाळ, जम्मू परिसरात वास्तव्यास होता. तसेच राजस्थातील कोटा जिल्ह्यातून नागोरी पिस्तूल खरेदी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच कारखान्यांच्या गाळपाला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊस कमी असल्याने उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून सरकारने यंदाचा गळीत हंगाम पाच नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या ​निर्णयाप्रमाणे शनिवारी जिल्ह्यातील केवळ पाचच कारखान्यांच्या हंगामाला सुरुवात झाली. वारणा कारखाना यापूर्वीपासून सुरू असल्याने सध्या जिल्ह्यात केवळ सहाच कारखाने सुरू असल्याचे चित्र आहे. अन्य कारखाने या आठवड्यात टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. दरम्यान, कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या अजूनही दाखल होत असल्याने हंगामाला पुढील आठवड्यातच वेग येणार असल्याचे दिसते.

वारणा कारखाना यापुर्वीपासून सुरू करण्यात आला असून शनिवारपासून आणखी पाच कारखाने सुरू झाले. त्यामध्ये डी. वाय. पाटील कारखाना, राजाराम कारखाना, कुंभी कारखाना या सहकारी तर दालमिया व हेमरस या खासगी कारखान्यांचा समावेश आहे. ऊस कमी असल्याने सरकारने पूर्वी एक डिसेंबरला हंगाम सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यास लावून ५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऊस दराचाही प्रश्न मिटल्याने पाच तारखेपासून बहुतांश कारखाने सुरू होतील, अशी आशा होती. त्यानुसार अनेकांनी दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मोळी टाकली होती.

शनिवारी दिवसभरात पाच कारखाने सुरू झाले. कर्नाटकातील काही कारखान्यांकडून महाराष्ट्रातील ऊस नेण्यास सुरुवात केली आहे. वारणा सुरू केल्याने भविष्यात उसाची कमतरता जाणवू नये यासाठी या परिसरातील डी. वाय. पाटील व कुंभी कारखाने पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहेत. कागल परिसरातील कारखाने दोन दिवसांत सुरू होणार आहेत. जिल्ह्यात एकूण २१ कारखाने असून या आठवड्यात बहुतांश कारखाने सुरू होतील. दोन कारखान्यांच्या गाळप हंगामाचे प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल. सोमवारनंतर ते केव्हा सुरू होतील, हे स्पष्ट होईल.

अनेक कारखान्यांकडे तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल होत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात तोडणीला वेग येऊन हंगाम पुर्ण क्षमतेने सुरू होतील. दरम्यान, काही संघटनांनी दराबाबत तोडणी बंद करण्याच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे काही ठिकाणी कारखान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत दोघा चोरट्यांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

संशयितरित्या फिरणाऱ्या दोघा चोरट्यांकडून शिवाजीनगर पोलिसांनी शहरासह कबनुरातील तीन घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. ऋषिकेश शांताराम म्हेतर (वय २२ रा. चंदूर) व मनोज अशोक रुपनर (वय २० रा. श्रीमंती कॉलनी कुपवाड सांगली) अशी चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्यास शक्यता असून सांगली, सातारा व पुणे पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील अवैध धंदे व शहरातील चोऱ्या, घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गस्तीपथक फिरत असताना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील यशोलक्ष्मी कॉलनी परिसरात ऋषिकेश म्हेतर व मनोज रुपनर हे दोघेजण संशयितरित्या फिरत असताना आढळून आले. त्यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी करता प्रारंभी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनी कबनूर परिसरातील सुशीला शिंदे व कासिम मुल्लाणी तसेच जवाहरनगर परिसरातील छाया भोसले यांच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडील साहित्याची झडती घेता त्यामध्ये सोन्याची अंगठी, रिंगा, नेकलेस, लक्ष्मी हार, टॉप्स, नथ असा सुमारे २ लाख ३५ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. चोरीतील काही मुद्देमाल कोल्हापुरातील एका सराफाला विकल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. दरम्यान, या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुऱ्हाळघरांना मिळणार वीजसवलत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज नियामक आयोगाने शेती पंपाप्रमाणे गुऱ्हाळ घरांना व कडबाकुट्टीला वीज दर जाहीर केल्याने ​राज्यातील गुऱ्हाळ घरांना आता फक्त प्रति युनिट ९७ पैसे या दराने वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रत्येक गुऱ्हाळ घर मालकाच्या महिन्याच्या वीज बिलात किमान ४० हजार रुपयांची बचत होणार आहे. शेवटच्या घटका मोजणाऱ्या गूळ व्यवसायाला यातून नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात जवळपास १२०० गुऱ्हाळ घरे आहेत. यामुळे केवळ जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांची महिन्याला ४ कोटी ८० लाख रुपयांची बचत होणार आहे.

वीज वितरण कंपनीने १ जून, २०१५ पासून जाहीर केलेल्या वीजदर पत्रकानुसार गुऱ्हाळ घरांचा समावेश क वर्गामध्ये करण्यात आला होता. या गटामध्ये शीतगृहे, कुक्कुटपालन, ग्रीन हाऊस, मशरुम उत्पादन, नर्सरी, फूल उत्पादन अशा चार प्रकारांचा समावेश होतो. त्यांना १२ महिने २४ तास वीज पुरवठा केला जात होता. गुऱ्हाळघरांना मात्र ८ तास वीज पुरवठा केला जात होता. तसेच ही गुऱ्हाळ घरे चार महिनेच चालवली जात असल्याने त्यांना शेती पंपाप्रमाणे वीज दर आकारावा, अशी मागणी आमदार नरके यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. याप्रमाणे सरकारी सवलत देणेही क्रमप्राप्त ठरते, त्यामुळे क वर्ग रद्द करावा. पूर्वीप्रमाणेच अ वर्गाप्रमाणे दर आकारणी करावी अशी मागणी केली होती.

यानुसार नवीन जाहीर झालेल्या दर पत्रकामध्ये गुऱ्हाळ घरांना व कडबाकुट्टीला शेतीपंपाप्रमाणे वीज दर लागू करण्यात आला आहे. यामुळे १ जून, २०१५ पासून लागू झालेला ३ रुपये ९६ पैसे इतका लागणारा दर कमी होऊन शेती पंपाप्रमाणे २ रुपये ९४ पैसे झाला आहे. त्यामध्ये सरकारी सवलतीमुळे केवळ ९७ पैसे दर आकारणी होणार आहे. तसेच प्रति अश्वशक्ती ५० रुपये असलेला स्थिर आकारही २१ रुपये इतका कमी करण्यात आला आहे. दहा ते पंधरा अश्वश्क्तीच्या मोटर गुऱ्हाळ घरांना लागत असल्याने बंद काळात त्याचा शेतकऱ्यांना बसणारा फटका कमी होणार आहे, असे नरके यांनी सांगितले. आता जी फरकाची रक्कम आहे ती सरकारने भरावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात अंदाजे १२०० गुऱ्हाळघरे आहेत. नव्या निर्णयामुळे प्रत्येक गुऱ्हाळ घराच्या वीज बिलात किमान ४० हजार रुपयांची बचत होईल. महिन्याला बचतीचा आकडा चार कोटींवर जात असून याशिवाय राज्यातील अन्य ​भागातील गुऱ्हाळ घरांचीही बचत होणार आहे. सध्या गुऱ्हाळ घरांची अवस्था दयनीय होत चालली असताना नवीन वीज दरामुळे मोठा आधार मिळाला आहे. आमदार नरके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे गुऱ्हाळघर मालक बाळ पाटील यांनी सांगितले. यावेळी संपत दळवी, एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, किशोर कालेकर, सुरेश पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३०० रुपये विनाकपात हवी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

चालू गळीत हंगामात उसाला प्र्रतिटन विनाकपात एकरकमी ३३०० रुपये दर द्यावा. एफआरपीसह १७५ रुपये १५ दिवसांत ऊस उत्पादकांना द्यावेत, अशा मागणीचा ठराव शिरोळ येथे झालेल्या सकल ऊस उत्पादक परिषदेत करण्यात आला. दरम्यान, सोमवारी (ता.७) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर सकल ऊस उत्पादक परिषदेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून तोपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शिरोळ येथील शिवाजी चौकात पहिली सकल ऊस उत्पादक परिषद झाली. या परिषदेस सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातून ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊस परिषदेत प्रारंभी शिवाजी तख्तातील ताराराणी गादीला तसेच व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आत्महत्या केलेले शेतकरी तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत अमित दळवी यांनी केले. विकास पाटील यांनी प्रास्ताविक करुन सकल ऊस परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. ऊस दरासाठी अनेक संघटना चळवळीचे काम करतात. शिरोळ तालुक्यातील संघटनेची धोरणे चुकायला लागली आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत एफआरपी बदललेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची फळी निर्माण करून सकल ऊस परिषदेच्या माध्यमातून शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिफो, ही भूमिका घेवून ऊस परिषदेचे धोरण ठरले. या माध्यमातून चांगले संघटन बांधायचे आहे. येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय समन्वय समितीचे सदस्य सुभाष निकम म्हणाले, शेतकऱ्यांच्या मनात जी खदखद होती, ती या सकल ऊस परिषदेतून पुढे आली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे तथाकथित नेते व एसी मध्ये बसलेले अधिकारी शेतकऱ्यांच्या उसाचा दर ठरवत आहेत. सरकार शेतकरीविरोधी असून कारखानदार तसेच शेतकऱ्यांची झुंज लावत आहे. ऊसदर प्रश्नी त्यांची भुमिका महत्त्वाची असताना सरकारचे धोरण चुकीचे ठरत आहे. सकल ऊस परिषदेच्या माध्यमातून शिरोळच्या शिवाजी चौकात आंदोलनाची ठिणगी पडली आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर टी‌केची झोड उठवित हर्षल बागल म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात संघटनेने उमेदवारी देण्यासाठी घोडेबाजार केला. सोलापूर जिल्ह्यात ७०० तरुणांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. मंत्री झाल्यापासून खोत यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मंत्र‌िपद आले की कार्यकर्ते दिसत नाहीत. आता वाहतुकदारांच्या गाड्या फोडायच्या नाहीत. तर मंत्र्यांच्या व कारखानदारांच्या गाड्या फोडू, असेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात दुधाचे आंदोलन झाले, मात्र दुध उत्पादकांना दरवाढ मिळाली नाही. आता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मित्र महादेव फानकर दुग्धविकास मंत्री आहेत. मग दूध दरवाढीसाठी खोत यांच्याकडून प्रयत्न का होत नाहीत,’ असा सवालही त्यांनी केला.

उत्पादित झालेली साखर ३० टक्के सर्वसामान्यांना तर उर्वरित ७० टक्के उद्योगासाठी लागते. यामुळे साखरेचे भाव वाढले पाहिजेत. मात्र, साखरेचे भाव वाढले तर उद्योजकांकडून सरकारला अर्थपुरवठा बंद होईल, या भीतीपोटीच साखरेचे दर पाडले जातात. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव मिळत नाही. अडीच लाख कोटीचे कर्ज सरकार माफ करते. कुंभमेळ्यासाठी २३५० कोटी रुपये खर्च केले जातात. सध्याचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे.’

विश्वास काळे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत एफआरपीच्या रक्कमेत एक रुपयाचीही वाढ झालेली नाही. दरवाढ झाली असती तर ३६०० रुपयांपर्यंत ऊसदर मिळाला असता. ऊस परिषद घ्यायची अन् सरकारकडे जायचे. ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका शेतकऱ्यांना समजली आहे. सकल ऊस परिषद मोडायची होती, म्हणूनच ऊसदराचा तोडगा त्यांनी घाईगडबडीने काढला.

इस्लामपूरचे बी. जी.पाटील म्हणाले, २००९ मध्ये एफआरपीचा कायदा मान्य नाही, असे म्हणणारे शेट्टी आता एफआरपीनुसार तडफोड करीत आहेत. १९७३ मध्ये उसाला प्रतिटन ३०० रुपये दर होता. देशात २६० लाख मेट्र‌िक टन साखरेचे उत्पादन होते. गेल्या वर्षी २२ रुपये दराने साखर असताना सरासरी २५०० रुपये दर मिळाला. यंदा बाजारात साखरेचे दर ३६०० रुपयांवर पोहचले आहेत. असे असताना भुलभुलैया करुन शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.’

बंटी देसाई म्हणाले, पक्ष, गट-तट बाजूला ठेवून ऊस सकल परिषद पुढे आली आहे. ऊसदराची एफआरपीची रक्कम आणि १७५ रुपये पंधरा दिवसाच्या आत देण्याचे लेखी आश्वासन कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून घेतल्याशिवाय त्यांच्या घरासमोर सात तारखेचे आंदोलन स्थगित केले जाणार नाही. येणाऱ्या काळात साखरेचे दर वाढणार आहेत. पंधरा दिवसांत एफआरपी व १७५ रुपये मिळाले नाहीत तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार राजू शेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी बंटी देसाई, दादा काळे, मुकुंद गावडे, राजवर्धन निंबाळकर, संभाजी चव्हाण, रफीक जमादार, मानाजीराव भोसले, संतोष शिंदे, धन्यकुमार भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


- परिषदेतील ठराव

* प्रत्येक उत्पादन खर्चावर आधारित एफआरपीची वाढ करावी.

* साखरेची किंमत भेद आमलात आणावी.

* ऊस तोडणी टोळ्याकडून होणारी फसवणूक टाळयासाठी सरकारमार्फत स्वायत्त महामंडळ स्थापन करुन त्यामार्फत करार करावेत.

* ऊस वाहतूक खर्चाची रक्कम अंतराप्रमाणे कपात करावी.

* शेतीमालास योग्य भाव मिळविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबफावणी करा.

*जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्यातून साखर वगळावी.

* साखर उद्योगाबाबत वारंवार अनिश्चित धोरण आखल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांसहित साखर उद्योगाला बसतो याबाबत कायमस्वरुपी धोरण ठरवावे.

* केंद्र सरकारने केलेली साखर साठ्यावरील कोठा पद्धत बंद करावी.

* एफआरपीपेक्षा फादा ऊस बीले अदा करण्याबाबत सरकारकडून घालण्यात येणारे निर्बंध रद्द करावेत.

* सर्व कारखान्यांनी ताळेबंद आर्थिक वर्षाऐवफा साखर वर्षाप्रमाणे करावेत.

* मागील वर्षीच्या उसाचे अंतिम बील ३०० रुपये द्यावे

कैवारी नव्हे शोषणकर्ते

खासदार राजू शेट्टी हेच शेतकऱ्यांचे खरे शोषणकर्ते आहेत. ऊस परिषदेनंतर तीन दिवस मॅरेथॉन बैठका घेत त्यांनी ऊसदराचा प्रश्न झुलवत ठेवला. यानंतर तोडगा काढण्यात आला. सरकारबरोबर त्यांची हातमिळवणी आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव बदलून ‘गहाण शेतकरी संघटना’ असे ठेवावे, असेही बागल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नडिगांविरूद्ध तीव्र असंतोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगावात काळा दिनादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या कर्नाटक पोलिसांचा शनिवारी कोल्हापुरातील बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळासह बेळगावच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना ‘तुम्ही असे का वागलात’, असा जाब विचारण्यावर बैठकीत एकमत झाले. त्याबरोबर सीमावासियांना बळ देण्यासाठी राज्यातील खासदारांना एकत्र करून ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात लवकरच सीमा परिषद घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

दरम्यान, संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कागलच्या सीमा तपासणी नाक्यावर कर्नाटकच्या बसेस रोखल्या. प्रवासी उतरून बसेस पुन्हा कर्नाटकाकडे पाठविण्यात आल्या. तसेच कर्नाटक पासिंगची वाहनेही कर्नाटकाकडे परत फिरविली. यामुळे महामार्गावर काही काळ तणाव निर्माण झाला. कोल्हापुरात शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह अन्य संघटनांनीही कर्नाटकाविरोधात जोरदार निदर्शने करीत पोलिसी अत्याचाराचा निषेध केला.

शनिवारी सायंकाळी शाहू स्मारक भवनात सर्वपक्षीय बैठ झाली. यावेळी कर्नाटक पोलिसांच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव मुळीक यांनी बैठकीचे नेतृत्व केले. ते म्हणाले, ‘कर्नाटकच्या मगरमिठीतील सीमावासियांच्या पाठीशी सदैव राहिले पाहिजे. यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरच्या लढाईलाही तयार रहावे लागले. या संदर्भात महाराष्ट्र मंत्रिमंडळानेही तातडीने बैठक घेतली पाहिजे. येत्या २१ नोव्हेंबरला बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी, कोल्हापुरात सीमा परिषद आयोजित करून सीमावासियांना बळ देण्याची गरज आहे.’ सीमावासियांच्या संदर्भात कोणतेही आंदोलन असो, महिला त्यात सक्रीय सहभाग घेतील, अशी ग्वाही शैलजा भोसले, दीपा पाटील व रूपाराणी निकम यांनी दिली.

कोर्टातील सुनावणीचे भान ठेवू

अनिल घाटगे यांनी आंदोलन करताना संयम बाळगण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, ‘कर्नाटकची एक गाडी फोडल्यानंतर महाराष्ट्राच्या दहा गाड्या फोडल्या जातात. तेथील कन्नड संघटनांना पोलिसांचे पाठबळ आहे. त्यामुळे सीमवासियांवर पुन्हा अमानुष अत्याचार होतो. सुप्रीम कोर्टात जानेवारीत अंतिम सुनावणी असल्याने तेथे आपली बाजू कमकुवत होता कामा नये. त्यामुळे अत्यंत सनदशील मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा. मानवी हक्क आयोगाकडे पोलिसी अत्याचाराची छायाचित्रे पाठवावीत. त्याचबरोबर बेळगावात कर्नाटक पोलिसांना हटवून केंद्रीय राखीव पोलिस दल तैनात करावे, अशी मागणी करण्याची गरज आहे.’

कोल्हापूरच्या तीन खासदारांना एकत्र करून सीमावासियांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज, आर. के पोवार यांनी व्यक्त केली. मूळचे बेळगावचे असलेले दिनेश ओउळकर म्हणाले, ‘पाटसकर तत्वानुसार आपल्या मागण्या रास्त आहेत. खेडे हा मूळ घटक मानून लोकेच्छा, लोकसंस्कृती, भाषा याचा विचार करून तब्बल १६५ गावे आपल्या राज्यात समाविष्ट होऊ शकतात. सुप्रीम कोर्टात हा निकाल प्रलंबित असला तरी तेथील निर्णयानंतर संसदेत याविषयी ठरव होणार आहे. त्यामुळे तेथे दबावगट असणे गरजेचे आहे.’

यावेळी अॅड. पंडितराव सडोलीकर, सुनीलकुमार सरनाईक आणि संभाजीराव जगदाळे यांचीही भाषणे झाली. बैठकीस सचिन तोडकर, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, शिवाजीराव हिलगे, शिरीष देशपांडे, संदीप पाटील, डॉ. गिरिष कोरे, श्रीकांत मोनळे, शंकरराव बोडके, बबनराव रानगे, डॉ संदीप पाटील, बाबुराव बोडके आदी उपस्थित होते

बैठकीतील ठराव असे

कर्नाटक पोलिसांच्या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव पोलिस आयुक्तांना शिष्टमंडळ भेटणार

ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कोल्हापुरात सीमा परिषद

संयमाने प्रत्युत्तर दिले म्हणून, कमकुवत समजू नये. वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देऊ.

महाराष्ट्र सरकारला गांभीर्य कळावे, यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोथंबिरीची मोठी आवक, भाजीपाल्याचे दर घसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​दिवाळीच्या दरम्यान भाजीपाल्याची आवक मंदावली होती. पण या आठवड्यात साऱ्याच भाज्यांची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. कोथंबिरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून ठिकठिकाणच्या बाजारात कोथंबिरीचे ढिगच्या ढिग पहायला मिळत आहेत. त्यामुळे दहा रुपयाच्या आतच कोथंबिरीची मोठी पेंडी मिळत आहे. देशी गाजराची आवक सुरू झाली असून सध्या ५० रुपये किलोपर्यंत दर आहे. पुढील आठवड्यापासून गाजराची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या लगबगीत भाजीपाल्याला मागणी कमी असल्याने भाज्यांची आवक कमी असते. त्यामुळे दरही स्थिर होते. दिवाळी संपल्यानंतर भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. दोन आठवड्यांपासून टोमॅटोचे दर घसरले आहेत. अजूनही ते तसेच आहेत. मात्र ६० रुपये किलो अशी मिळणारी वांगी आता ३० रुपये किलोवर आली आहेत. इतर भाज्यांच्या दरातही पाच ते दहा रुपयांनी घट झाली आहे. कोबी आणि फ्लॉवरच्या दरातही पाच रुपयांनी घट झाली असून कोबी दहा रुपये तर फ्लॉवर २० रुपये नग झाला आहे. मध्यंतरी ८० रुपये किलोवर पोहचलेली गवार आता ५० रुपये किलोने मिळत आहे. तशीच गवारीची आवकही चांगली सुरू झाली आहे. त्याबरोबर ​बीन्सची आवकही मोठी झाली आहे. सिमला मिरची, दोडका, कारले यांचे दर तीस रुपये किलो झाले आहेत. देशी गाजर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ४०ते ५० रुपये किलो असा त्याचा दर आहे. पण येथूनपुढे गाजराची आवक मोठ्या प्रमाणावर होण्याची चिन्हे आहेत.

फळ मार्केटमध्ये सिताफळांची आवक मोठी झाली असून दर ३० रुपये किलोवर आला आहे. मात्र अजूनही बोरांची मोठ्या प्रमाणावर आवक नसल्याने ६० रुपयांवरच दर आहे. किराणा बाजारातही दर फारसे बदललेले नाहीत. हरभरा व तुरडाळीचे दर काहीसे कमी झाले. १४० रुपयांवर असणारी हरभरा डाळ या आठवड्याच्या शेवटी १३० रुपयांवर आली. तुरडाळीचा दरही पाच रुपयांनी घसरून १२५ रुपयांवर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊंच्या दारात आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

चालू हंगामात उसाला विनाकपात एकरकमी ३३०० रुपये दर ‌मिळालाच पाहिजे, असा ठराव ठराव शिरोळमधील सकल ऊस उत्पादक परिषदेत करण्यात आला. त्यासाठी सोमवारी (ता.७) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर उत्पादक परिषदेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून तोपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

परिषदेस सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातून ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊसप्रश्नी शिरोळ तालुक्यातील संघटनेची धोरणे चुकायला लागली आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत एफआरपी बदललेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची फळी निर्माण करून सकल ऊस परिषदेच्या माध्यमातून शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन परिषदेचे धोरण ठरल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर हर्षल बागल यांनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात संघटनेने उमेदवारी देण्यासाठी घोडेबाजार केला. सोलापूर जिल्ह्यात ७०० तरुणांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. मंत्री झाल्यापासून खोत यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मंत्र‌िपद आले की कार्यकर्ते दिसत नाहीत. आता वाहतुकदारांच्या गाड्या फोडायच्या नाहीत. तर मंत्र्यांच्या व कारखानदारांच्या गाड्या फोडू.’

सोलापूर जिल्ह्यात दुधाचे आंदोलन झाले, मात्र दुध उत्पादकांना दरवाढ मिळाली नाही. आता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मित्र महादेव जानकर दुग्धविकास मंत्री आहेत. मग दूध दरवाढीसाठी खोत यांच्याकडून प्रयत्न का होत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

कैवारी नव्हे शोषणकर्ते

खासदार राजू शेट्टी हेच शेतकऱ्यांचे खरे शोषणकर्ते आहेत. ऊस परिषदेनंतर तीन दिवस मॅरेथॉन बैठका घेत त्यांनी ऊसदराचा प्रश्न झुलवत ठेवला. यानंतर तोडगा काढण्यात आला. सरकारबरोबर त्यांची हातमिळवणी आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव बदलून ‘गहाण शेतकरी संघटना’ असे ठेवावे, असेही बागल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटीदार समाजाच्या सुवर्ण महोत्सवाला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील श्री कोल्हापूर पाटीदार समाज संस्थेच्या सुवर्ण महोत्सवास शनिवारी मिरवणुकीने प्रारंभ झाला. महोत्सवादरम्यान टिंबर मार्केटमधील पाटीदार भवनात तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत.

‌‌पाटीदार समाज शहर आणि जिल्ह्यात विविध व्यवसायात ‌स्थिरावला आहे. त्यांच्या संस्थेस ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सुवर्ण महोत्सवास प्रारंभ झाला. दुपारी अडीच वाजता टिंबर मार्केटमधील गणपती मंदिरापासून‌ मिरवणुकीला सुरूवात झाली. जिल्हा पाटीदार समाजाचे अध्यक्ष गोपाळ पटेल, सुवर्ण महोत्सव आयोजन समितीचे चेअरमन जेठा पटेल, सचिव डाया पटेल, रतन पटेल, गंगाराम पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरवणुकीत दोन ट्रॅक्टरवर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, नारदमुनी, गणपती यांची वेषभूषा करून बसलेल्या पाटीदार बांधवांनी लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा करून घोड्यावर बसलेला युवक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पाटीदार भवनासमोर मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. महोत्सवात कोल्हापूरसह, सांगली, सातारा, कोकण आदी ठिकाणाहून आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सहभागी झाले होते. उद्या, रविवारी राजेंद्रदास महाराज (गुजरात) मार्गदर्शन करणार आहेत. ७ रोजी सांगता होणार आहे.‌ महोत्सव काळात महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला धडा शिकवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मराठा आरक्षणासाठी राज्यभर मूकमोर्चाने सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार काहीच करत नाही. याप्रश्नी सकारात्मक तोडगा न निघाल्यास सरकारला धडा शिकवू,’ असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. टाऊन हॉल येथील बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्रात मराठा संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना कोल्हापूर बंदी करत असल्याची घोषणा करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विचारमंथन करण्यासाठी २० नोव्हेंबरला राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील संघटनेच्या प्रमुखांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मराठा समाजातील मुलांची शैक्षणिक फी माफ करावी, नोकरीमध्ये आरक्षण मिळावे. याप्रश्नी जर सरकारने सकारत्मकता दाखविली नाही, तर हा मराठा समाज पेटून उठेल. हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका राहील.’

किशोर घाटगे म्हणाले, ‘मराठा समाजबरोबर इतर संघटनांनी एकत्र येत दबाव गट निर्माण करणे गरजेचे आहे.’

राजेंद्र पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात मराठा समाजाच्या १५ ते २० संघटना आहेत. मराठा समाजाच्या हितासाठी या संघटनांनी आपले श्रेयवाद, मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यावे.’

बाळ घाटगे म्हणाले, ‘मराठा समाजातील अनेक लोक शेतीवर जगत आहेत, मात्र तिचे राष्ट्रीयकरण करा, खासगी क्षेत्रातही मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे.’

यावेळी माजी महापौर महादेवराव अडगुळे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, छावा संघटनेचे राजू सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, किशोर घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाजी चौकसाठी एक कोटीचा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार क्षीरसागर यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

यावेळी प्रताप घाटगे, बाळासाहेब यादव, डॉ. मानसिंगराव घाटगे, शंकरराव शेळके, श्रीकांत भोसले, प्रा. दिनेश डांगे, संजय पाटील, प्रकाश पाटील, अनंत बकरे, राजू कदम, शुभांगी गायकवाड, संजय गायकवाड, उदय भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिशोब न देणाऱ्या २४ उमेदवारांना नोटीसा

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी -

निवडणूकीचा दैनंदिन खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केलेल्या २४ उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. सोमवारपर्यंत हिशोब सादर न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

इचलकरंजी नगरपरिषदेमया सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून अनेकांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून प्रत्येक उमेदवाराला दैनंदिन खर्च निवडणूक विभागाकडे विहित नमुन्यात सादर करावा लागतो. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अन्वये मुदतीत संबंधित उमेदवाराने हिशोब सादर न केल्यास त्यामयावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

नगरपरिषदेसाठी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांनी आपला दैनंदिन खर्च वेळेत सादर न केल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामध्ये ताराराणी आघाडीमया प्रभाग १८ मधील उमेदवार वंदना मोहन माने, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभाग १५ मधील उमेदवार दिलीप शंकर गजाकुंश यांच्यासह अभिजित खोत, निता लोटके, , सुनिता शिंगाडे, नारायण केकले, सुधाकर ताडे, प्रितम लोटके, विश्वनाथ लोटे, इजाज कलावंत, दिपाली बेडक्याळे, अरुण आवळे, कावेरी पनोरी, अरीफ मोमीन, सारीका वासुदेव, रवि गोंदकर, प्रशांत वासुदेव, अभिजित पुजारी, तानाजी केसरे, पल्लवी देसाई, आशादेवी लायकर, स्वप्निल मालगांवे पाटील व जोतिबा बरगे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात जैवविविधता पार्क साकारणार

$
0
0

मारुती पाटील

Maruti.Patil @timesgroup.com

Tweet :@ MarutipatilMT
वनस्पतीशास्त्रातील संशोधन आणि दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी अव्याहतपणे काम करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. आर. यादव यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सन्माननीय सदस्य (फेलो) म्हणून निवड झाली आहे. विद्यापीठात बोटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून ते पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती जतन आणि संवर्धनाचे कार्य करत आहेत. क्यू बोटॅनिकल गार्डन आणि न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डनप्रमाणे विद्यापीठात जैवविविधता पार्क साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. लीड बोटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून सपुष्प वनस्पतींचे वर्गीकरण विषयावर विचारमंथन होण्यासाठी सोमवारी (ता.७) आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. यादव यांनी जैवविविधतेचे महत्त्व विशद केले.


भारतातील जैवविविधतेबद्दल काय वाटते ?

टेक्सॉनॉमीला सर्व जीवशास्त्र शाखांची जननी मानले जाते. टेक्सॉनॉमीच्या माध्यमातून भारतात ज्ञात असलेल्या एक लाख ३५ हजार प्रजातींच्या ४७ हजार वनस्पतींची नोंद झाली आहे. त्याचबरोबर देशात सुमारे १८ हजार सपुष्प वनस्पतींची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतात विपुल प्रमाणात जैवविविधता आढळून येत आहे. एखाद्या विभागात किती वनस्पती आहेत याची माहिती टेक्सॉनॉमीस्टकडून मिळते. त्यामुळे टेक्सॉनॉमीला सर्व जीवशास्त्रांची जननी मानले जात आहे. जगातील १२ देश जैवविविधतेने समृद्ध मानले जातात. त्यामध्ये भारताची गगना होत आहे. जगातील ३४ जैवविविधतेबाबत संवदेनशील मानलेल्या प्रदेशात भारतातील पश्चिम घाटाचा समावेश असून, पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवण्याची आवश्यकता आहे.

शैक्षणिक कार्यकालातील विद्यार्थ्यांबाबतचा अनुभव ?

शिवाजी विद्यापाठातील ३० वर्षांच्या कालावधीत १५० एम. एस्सी., २७ पीएचडी व ११ एम. फील विद्यार्थी घडवले आहेत. मानवाची खरी गरज वनस्पती असून याकडे ५० वर्षापासून दुर्लक्ष केले. मात्र, ‘बायोडाव्हर्सिटी’ शब्दप्रयोगानंतर वनस्पतीशास्त्राला महत्त्व प्राप्त झाले. २५ वर्षांपूर्वी स्पेशल टेक्सॉनॉमी ऑफ अँझिमो ट्रेनिंग सेंटर सुरू केले. त्याची गगनना आता भारतातील अग्रेसर टेक्सॉनॉमी सेंटर म्हणून होऊ लागली आहे. या सेंटरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थांना मार्गदर्शन करुन त्यांना वनस्पतीशास्त्राचे महत्त्व जाणून दिले आहे. हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे समाजात कार्यरत आहेत.

०००

लीड बोटॅनिकल गार्डन संकल्पना काय आहे ?

१९८९-९० च्या दरम्यान विभागाभोवती बोटॅनिकल गार्डनची सुरुवात झाली. तत्कालीन कुलगुरुंनी पावणेसहा एकर जागा दिली. १९९६ मध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाने आठ लाखांचा निधी दिला. त्यानंतर निधीचा ओघ सातत्याने राहिला. यासाठी विभागासह विद्यापीठ प्रशासनाची चांगली मदत झाली. २००७ मध्ये लीड बोटॅनिकल गार्डन जाहीर करून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. त्यातून उन्हाळ्यात बिया गोळा करणे, बागेत रोपे तयार करणे, त्याचबरोबर दुर्मीळ वनस्पतींची रोपवाटिका तयार करुन रोपांचे वितरण करणे आदी कामे केली. त्यामुळे पश्चिम घाटातील अनेक दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन करण्यात यश आले. या उपक्रमामुळे बोटॅनिकल गार्डन चालती-बोलती प्रयोगशाळा बनली. ऊती संवर्धन करून काही वनस्पती वाचविण्यात यश आल्याने सध्या हे गार्डन जैवविविधतेची बँक म्हणून उदयास आली आहे. त्याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होणार आहे.

शिवाजी विद्यापीठात जैवविविधता पार्क होऊ शकते ?

पर्यावरण व वन मंत्रालयासह विविध विभागाकडून सुमारे दोन कोटीचा फंड मिळाला आहे. यातून क्यू बोटॅनिकल गार्डन व न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डनप्रमाणे विद्यापीठात जैवविविधता पार्क उदयास आणण्याचा विचार आहे. विद्यापीठाच्या ८०० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात जैवविविधता पार्क झाल्यास जगभरातील वनस्पतीशास्त्रातील अभ्यासक आणि पर्यटक येथे भेट देतील. त्यादृष्टीने मेडिशन आर्बोरॅटमध्ये शंभर औषधी वृक्षांची लागवड केली आहे. तसेच प्रदेशनिहाय दुर्मिळ वनस्पतींचे उद्यान तयार केले आहे. तसेच तीन वॉटर बॉडी तयार केले आहे.

संशोधनाची प्रसिद्धी कोणत्या माध्यमातून केली आहे?

पहिल्या ‘फ्लोअरा ऑफ कोल्हापूर डिस्ट्रीक्ट’ पुस्तकामध्ये २२३० सपुष्प वनस्पती आढळल्याचा उल्लेख आहे. ‘नो युवर ग्रासेस थ्रू हँडलेन्स’, ‘ग्रासेस ऑफ महाराष्ट्र’, ‘प्लँट्स ऑफ सह्याद्री अँड कोकण’ आदी पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर समाजाच्या उपयोगासाठी संशोधन प्रसिद्ध केले आहे. पहिल्या दोन पुस्तकांचा अॅकॅडमीक विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

पश्चिम घाटात विकास अपेक्षित आहे का ?

तापी ते कन्याकुमारी अशा सुमारे १९०० कि.मी. अंतराचा पश्चिम घाट म्हणून ओळख आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ पाच टक्के जागेत सुमारे २५ ते ३० टक्के देशाची जैवविविधता आहे. त्यात केवळ सपुष्प वनस्पतींच्या दोन हजार प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. अशा या जैवविविधतेच्या तिजोरीवर हल्ला करून विकासाचे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. देशाच्या प्रगतीमध्ये विकासाला महत्त्व असले, तरी जैवविविधतेवर हल्ला करुन विकास अपेक्षित नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडीकलमधून६६ हजाराची रोकड लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील गांधी पुतळा परिसरात असलेल्या औषध दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केली. गजबजलेल्या व भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यासह नागरिकांतही भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

गांधी पुतळा परिसरात नगरपालिकेची जुनी इमारत असून या इमारतीला लागूनच संतोष नेमगोंडा पाटील (वय ४०, रा. जुना सांगली नाका) यांचे आदर्श मेडीकल नामक औषध दुकान आहे. संतोष व त्यांचा मेहुणा अभिनंदन अनिल पाटील (वय २६ रा. यड्राव) हे दोघेजण दुकानाचे कामकाज पाहतात. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन सर्वजण निघून गेले. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी अभिनंदन पाटील हे आले असताना शटर उचकटण्यात आल्याचे व कुलूप गायब असल्याचे निदर्शनास आले. पाटील यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता आतील साहित्य विस्कटून टाकल्याने तसेच ड्रॉववरमध्ये ठेवलेली ६६ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचे आढळून आले. पाटील यांनी या संदर्भातील माहिती गावभाग पोलिसांना दिली. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास शटरची कुलूपे उचकटून दुकानात प्रवेश केला. आतील एका ड्रॉवरमध्ये काळ्या रंगाच्या रेक्झिन पिशवीत ठेवलेली सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास केली. शिवाय जाताना दुकानातील साहित्यासह दुकानाची कुलूपेही चोरट्यांनी नेली आहेत. त्यामुळे हे एखाद्या माहितीगार व्यक्तीचे काम असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुकानात सीसीटिव्ही बसविण्यात आला आहे. मात्र रात्री दुकान बंद करुन जाताना तो बंद करण्यात आला असल्याने चोरट्याच्या हालचाली त्यामध्ये कैद होऊ शकल्या नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्युने प्रशासनाला हडबडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूरपैकी मलकापूर येथील आधार मतिमंद मुलांच्या आश्रमशाळेतील कुपोषित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी रविवारी (ता. ६) सीपीआरमध्ये जाऊन उपचाराचा आढावा घेतला आहे. खासदार धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती यांनीही सीपीआरमध्ये मुलांची विचारपूस केली. दरम्यान, शित्तूर पैकी मलकापूर येथील या शाळेतील ४० विद्यार्थ्यांना इतरत्र हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पंचरत्न राजपाल यांनी २००९ साली शित्तूर येथे विनाअनुदान तत्त्वावर मूकबधीर मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केली. सध्या ही शाळा लोकवर्गणीतून सुरू आहे. आश्रमशाळेत ४० मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथील गांधी (बिल्ला नंबर १५०) हा १५ वर्षांचा मुलगा खेळताना पडला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने आणि कुपोषणामुळे त्याचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळेच्या कारभारावर शंका उपस्थित झाली आहे.

या घटनेनंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेमनार यांनी रविवारी सीपीआरमध्ये भेट देऊन खुशी व कार्तिक या मुलांच्या उपचाराठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. नंतर खासदार धनंजय महाडिक व खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या मुलांची विचारपूस केली. या दोन मुलांच्या उपचारात कोणतीही हयगय करू नका, असे त्यांनी अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना सांगितले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता कुंभोजकर यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात या दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह समाज कल्याण विभागाकडूनही मुलांच्या प्रकृतीची विचारणा केली जात आहे. मतिमंद मुलाच्या मृत्यूची चौकशी करून शित्तूर येथील आश्रमशाळेची परवानगी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आश्रमशाळेतील सुविधांवर प्रश्नचिन्ह

एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शित्तूरमधील आश्रमशाळेतील सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेतील उर्वरित मुलांचे चांगले संगोपन व्हावे तसेच त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी उर्वरित ४० मुलांना इतरत्र हलवण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे. जिल्हा परिषद आरोग्य आधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि शाहूवाडीच्या प्रांताधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. चर्चेनंतर मुलांना इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शाहूवाडीच्या प्रांताधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडीमुळे वाहनचालक बेजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिर जवळ असल्याने गोवा किंवा कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांची मिरजकर तिकटी ते पाण्याचा खजिना मार्गावर नेहमीच वर्दळ असते. पाण्याच्या खजिन्यापासून मिरजकर तिकटीपर्यंतचा रस्ता मोठ्या वाहनांसाठी एकेरी असूनही शिंगोशी मार्केट आणि कोळेकर तिकटीवर नेहमीच वाहनांची कोंडी होते. अस्ताव्यस्त लावलेली वाहने आणि रस्त्यावरच असलेल्या रिक्षा थांब्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत होणाऱ्या सततच्या कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

मिरजकर तिकटी मार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून कसाबसा मार्ग काढावा लागतो. संभाजीनगरपासून पुढे असलेल्या सर्व उपनगरांतून आणि त्यापुढील ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनधारकांनी शहरात प्रवेश केल्यानंतर पाण्याच्या खजिन्यापासून यावे लागते. अरुंद रस्त्यामुळे हा मार्ग मिरजकर तिकटीपर्यंत केएमटीसह मोठ्या वाहनांसाठी एकेरी केला आहे. मात्र, उपाय तकलादू ठरला असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे.

परिसरात शाळा, सरकारी कार्यालये, शिंगोशी मार्केटमुळे नेहमीच वर्दळ असते. शिंगोशी मार्केटसमोर तर वाहनधारकांची मोठी अडचण होते. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. मार्केटमध्ये आलेल्या नागरिकांची वाहने आणि जवळच असलेल्या रिक्षा थांब्यामुळे वाहनधारक अडकूनच पडतात. कोळेकर तिकटी व साई मंदिराजवळ असलेल्या हॉस्पिटलसमोर लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भरच पडते.

पाचगाव, कळंबा, येवती मार्गावर जाणाऱ्या केएमटी बसेस आणि परिसरातील शाळांची सुटण्याची एकच वेळ आल्यास वाहनधारक अक्षरश: हैराण होतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सकाळच्या वेळेस वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असते. मात्र, वाहनांची संख्या आणि पार्किंग केलेल्या वाहनांमुळे त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कायमची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

ऊसवाहतूक, वडापला बंदी करा

शनिवारपासून ऊस गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. राजाराम कारखान्याला ऊसपुरवठा करणारी सर्व वाहने या मार्गावरुनच जातात. पाण्याच्या खजिन्यापासून मोठ्या वाहनांसाठी एकेरी मार्ग केला असला, तरी ऊस वाहतूक करणारी वाहने आणि गारगोटी मार्गावरील वडापची वाहने याच मार्गावरून येतात. त्यामुळे या प्रकारच्या दोन्ही वाहनांना या मार्गावरून बंदी करण्याची मागणी प्रवाशी व वाहनधारकांकडून होत आहे.

‘सकाळी शिंगोशी मार्केटमध्ये मोठी गर्दी असते. मंडईत येणाऱ्या ग्राहकांसाठी जवळ पार्किंग नसल्यामुळे कशाही पद्धतीने वाहने लावली जातात. अनेकवेळा शेतकरी रिक्षातून भाजीपाला आणतात. भाजीपाला घेईपर्यंत या रिक्षा थांबून राहिल्याने वाहतूक कोंडी होत आहे.’

राहुल कोतमिरे, मंगळवार पेठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांमुळे शहर हाउसफुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या सुटीमुळे रविवारी कोल्हापूर शहर हाउसफुल झाल्याची प्रचिती आली. बाहेरगावहून आलेल्या पर्यटक व भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. दर्शन रांगा भवानी मंडपापर्यंत पोहोचल्या होत्या, तर मुखदर्शनासाठीही भाविकांची रीघ लागली होती. दिवसभरात पर्यटक व भाविकांमुळे शहर जणू हाउसफुल झाले होते. शहरातील यात्री निवास, हॉटेलमध्ये अगोदरच बुकिंग केल्याने तीही हाउसफुल झाली होती.

सुट्या सुरू झाल्या की मुला-बाळांसह पर्यटनाला जाण्याचे बेत ठरतात. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी शनिवारपासूनच पर्यटक भाविकांच्या वाहनांनी कोल्हापूरचे रस्ते पॅक झाले होते. रविवारी सकाळी लवकर दर्शन करण्याचे नियोजन करून शनिवारीच कोल्हापूर मुक्कामी भाविक दाखल झाले. रविवारी पहाटे सहा वाजता दर्शनरांगा लागल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास गर्दीने उच्चांक गाठला होता.

नेहमीप्रमाणे अंबाबाई मंदिर, जोतिबा, नृसिंहवाडीला गर्दी आहेच, पण यावेळी पन्हाळा, आंबा, दाजीपूर, राधानगरी, गगनबावडा या ठिकाणांनाही पसंती मिळाली आहे. शहरात उच्चदर्जाची २५, तर मध्यम दर्जाची ४३ हॉटेल्स आहेत. त्याबरोबरच छोटी २५ हॉटेल्स आहेत, तर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी धर्मशाळा व यात्रीनिवासाला पसंती दिली.

कोकणात किंवा गोव्याला जाणारे पर्यटक आवर्जून कोल्हापुरात थांबत असल्याने हॉटेलिंग, वाहतूक, खरेदी वाढली आहे. दिवाळी सुटीमुळे पर्यटकांचा उत्साह हॉटेल आणि पर्यटन उद्योगाला चालना देणारा ठरत आहे.

पार्किंग सुविधांमुळे कोंडी टळली

यावर्षी नवरात्रोत्सवात भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केल्यामुळे तसेच शहरातील विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्थेचे फलक लावल्यामुळे भाविकांची गैरसोय टळली. अंबाबाई मंदिर परिसरातील काही परिसर वाहनमुक्त असल्यामुळे भाविकांना चालण्यासाठी सोयीचे ठरत आहे.

एमटीडीसीचे माहिती केंद्र

नवरात्रोत्सव तसेच दिवाळी व मे महिन्यातील लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसमोर कोल्हापुरातील पर्यटन क्षेत्रांचा खजिना मांडण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) अंबाबाई मंदिराजवळ पर्यटन माहिती केंद्र सुरू केले आहे. केंद्रातर्फे पर्यटकांना राज्यातील तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिली जाते.

दागिने आणि चप्पल खरेदीकडे कल

परगावच्या पर्यटकांकडून दागिने आणि कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठी खास वेळ काढला जात आहे. त्यामुळे महाद्वार रोड, पापाची तिकटी आणि गुजरी परिसरात पर्यटक खरेदीचा आनंद लुटत आहेत. इमिटेशन ज्वेलरी मार्केटमध्ये ठुशी, टिक, साज असे कोल्हापुरी पारंपरिक दागिने खरेदीकडे पर्यटक महिलांची गर्दी वाढली आहे. पापाची तिकटी परिसरात कोल्हापुरी चप्पल खरेदीलाही चांगली मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडावत ग्रुपच्या गोडाऊनला आग

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

चिपरी (ता. शिरोळ) येथील संजय घोडावत ग्रुपच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत स्टार नमकीन पॅकिंगच्या कच्च्या मालासह निरनिराळ्या उत्पादनांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे लॅमिनेशन बंडल, बॉ्नस यासह इतर साहित्य जळून भस्मसात झाले. आगीत सुमारे एक कोटी २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संजय घोडावत ग्रुपच्या विविध विभागांमधून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या साठ्याकरिता प्रशस्त डिसपॅच गोडाऊन आहे. रात्री उशीरा या गोडाऊनला विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिनीवर कबुतरे बसल्याने तेथे शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर गोडाऊनमधून धूर येऊ लागला. सुरक्षारक्षकास धूर निदर्शनास येताच जयसिंगपूर नगरपालिका, दत्त साखर शिरोळ तसेच घोडावत ग्रुपमया अग्निशमन पथकास पाचारण करण्यात आले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीरा आग आटोक्यात आणण्यास दलास यश आले.

तथापि, या गोडाऊनमधे असलेल्या विविध उत्पादने पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे ३५ हजार बॉ्नस, लॅमिनेशन रोल यासह इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. या आगीत सव्वाकोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली असून हवालदार विक्रम चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

.गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील साईट नं. १०२ मधील महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजित अनिल लोखंडे (वय २२) असे त्याचे नाव आहे. ही घटना पाहण्यासाठी गेलेल्या शालन मल्लिकार्जुन मट्टीकल्ली (वय ५५) या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर भागातील अन्य एक महिलाही भोवळ येऊन पडल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

अजित लोखंडे हा साईट नं. १०२ मध्ये राहण्यास होता. रविवारी दुपारी आई व वडीलांना त्याने दत्तनगर परिसरातील बहिणीकडे सोडले व तो घरी परतला होता. घरातील दुसऱ्या मजल्यावर त्याने दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास अजित याचा भाऊ अमित हा घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. अजित हा बी.कॉम. तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. एका चष्मा दुकानात तो कामास होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

दरम्यान, ही घटना समजल्यानंतर भागातील अनेक नागरिकांनी लोखंडे यांच्या घरासमोर गर्दी केली होती. शेजारीच राहणाऱ्या शालन मट्टीकल्ली या देखील तेथे आल्या होत्या. अजित याचा मृतदेह पाहून त्यांना कसेतरी वाटू लागल्याने त्या घरी परतल्या. काही वेळातच त्या घरात भोवळ येऊन कोसळल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर भागातीलच हमिदा शेख नामक महिला लोखंडे कुटुंबियासमवेत आयजीएम रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनाही भोवळ आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सहकारनगर परिसरात दोघांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली होती. मृतांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>