Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘वर्कशॉप’चे काम आता ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील प्रत्येक हालचाल आता ऑनलाइनवर नोंदविली जाणार आहे. स्पेअर पार्टची मागणी, पुरवठा, वाहनांची दुरुस्ती, वापरलेले मटेरियल अशा प्रत्येक कामावर नजर राहणार आहे. वाहनांना जीपीएस ट्रॅकर सिस्टीमपाठोपाठ वर्कशॉपचे काम मॅन्युअलसोबतच ऑनलाइन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या लागणाऱ्या वाहनांचा इंधनाचा हिशेब ठेवण्यासाठी केएमटी वर्कशॉपमध्ये रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

रडार यंत्रणेमुळे कोणत्या वाहनांना कधी आणि किती इंधन भरले होते, वाहनाचा वापर या गोष्टी समजणार आहेत. महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये १३८ वाहने आहेत. या वाहनांना केएमटी वर्कशॉपमध्ये डिझेल भरण्याची सुविधा आहे. सध्या नोंदवहीत नोंदी केल्या जातात. मात्र रडार यंत्रणेमुळे ऑनलाइन समजू शकणार आहे. आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी वर्कशॉप विभागाची तपासणी केली. स्टोअर डिझेल, कार अशा प्रत्येक विभागाची पाहणी केली. नोंदवही तपासल्या. वर्कशॉपमधील हालचाली, स्पेअर पार्टची मागणी, पुरवठा, खरेदी या बाबींची नोंदवहीत नोंदी केल्या जातात. आयुक्तांनी या सगळ्या घटकांची नोंद ऑनलाइन करण्याच्या सक्त सूचना केल्या. वर्कशॉप विभाग प्रमुख रावसाहेब चव्हाण, सहायक अभियंता सुनील पुजारी यांच्याकडून माहिती घेतली. लेखा परीक्षणात डिझेल विभागातील नोंदीमधे तफावती आढळल्या आहेत. काही वाहनांचे मीटर बंद असल्याचे सामोरे आले आहे.

९६ वाहनांना जीपीएस

महापालिकेच्या वाहनांचा योग्य रितीने वापर व्हावा, दैनंदिन कामकाजातील सद्यःस्थिती समजावी याकरिता महापालिकेच्या प्रत्येक वाहनाला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येत आहे. आतापर्यंत ९६ वाहनांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा व पदाधिकाऱ्यांचा वाहनांचाही समावेश आहे. १९ अधिकारी, सात पदाधिकाऱ्यांची वाहने या यंत्रणेच्या कक्षात आहेत. पाणीपुरवठा, अग्निशमन, वसुली विभागातील वाहनांना ट्रॅकिंग सिस्टीम असणार आहे. ट्रॅकिंगमुळे वाहनांच्या गैरवापराला आळा बसणार आहे. महापालिकेच्या हद्दीबाहेर वाहने जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

२७ वाहनांचा लिलाव होणार

वर्कशॉप विभागातील २७ वाहनांचे आयुष्यमान संपले आहे. ही वाहने नादुरूस्त बनली आहेत. या वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहे. जाहीर लिलाव करून त्याची विक्री होणार आहे. यामध्ये टाटा सुमो, अॅम्बेसिडर, वॉटर टँकर, डंपर, नऊ कचरा ट्रक, व्हॅन अशा वाहनांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूर, हरभरा डाळ वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डाळींच्या दरात चढउतार होत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत तूरडाळ व हरभरा डाळींचे दर दहा रुपयांनी वाढले आहेत. त्याचवेळी उडीद व मूग डाळीत दहा रुपयांची घटही झाली आहे. पुढील आठवड्यानंतर सुरू होणाऱ्या दसऱ्यासाठी खजूर बाजारात आला आहे. भाज्यांच्या दरातही फार वाढ झालेली नसून कोबीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने शहरात ठिकठिकाणी कोबीचे ढीगच्या ढीग विक्रीसाठी ठेवलेले दिसत आहेत.

धान्य बाजार अजूनही थंड असून तांदळाचे दर थोडेफार वाढले आहेत. मात्र ही वाढ फार मोठी नाही. गव्हाचे दर जैसे थे आहेत. भाज्यांची आवक योग्य असल्याने दरांमध्ये फार मोठी वाढ झालेली नाही. पाच रुपयांचा चढ उतार असून टोमॅटोचे दर अजूनही गडगडलेलेच आहेत. दहा ते पंधरा रुपये दराने टोमॅटो विक्री होत आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपयांपर्यंत पोहचलेली वांगी, दोडका, गवार, श्रावण घेवडा, वरणा, कारली, शिमला मिरची, भेंडी या साऱ्या भाज्यांचे दर आता थोडे कमी झाले आहेत. फ्लॉवरचा दरही २० रुपयापर्यंत खाली आला आहे. कोबीची आवक मोठी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर दहा रुपयांनी कमी झाला आहे.

डाळींच्या दरात दहा रुपयांचा चढ उतार या आठवड्यातही सुरू आहे. १२० रुपयांवर असलेली तूरडाळ १३० रुपयांवर पोहचली आहे. तर हरभरा डाळही ११० रुपयांवरुन १२० रुपयांवर गेली आहे. दुसरीकडे उडीद डाळीच्या दराची घसरण सुरू असून आठवड्यात आणखी दहा रुपयांनी दर कमी झाला आहे. किराणा बाजाराचे दरही एक ते दोन रुपयांनी कमी जास्त होत आहेत, असे व्यापारी अमर ठाणेकर यांनी सांगितले. आगामी महिन्यातील दसरा, दिवाळी सण आहेत. तेलांच्या दरात सध्या तरी वाढ झालेली नाही. यापुढेही फार मोठी वाढ होणार नाही, असा अंदाज तेल व्यापारी प्रदीप कापडिया यांनी व्यक्त केला आहे. सध्या सरकीच्या तेलाचा दर ७८ ते ८० रुपयापर्यंत आहे.

भाज्यांचे दर (किलो)

वांगी : २५ ते ३० रु.

टोमॅटो : १५ रु.

कारली : २० ते २५ रु.

ढबू मिरची : १० ते १५ रु.

कोबी : ३० प्रति नग

फ्लॉवर : २० रु.

गवार : ४० रु.

मेथी : १० रु. पेंडी

कोथिंबीर : १० रु. पेंडी

ओली मिरची : २० रु. कि.

कांदा : १५ रु.

बटाटा : २५ रु.

लसूण : १५० रु.

वरणा : २० रु.

आले : २० रु.

शेवगा : ३० रु.

....

खाद्यतेल

सरकी : ७८ ते ८० रु.

सूर्यफूल : ९५ रु.

शेंगतेल : १४० रु.

फळांचे दर (किलो)

डाळिंब : १०० रु.

सफरचंद : १०० रु.

विदेशी सफरचंद : १८० ते २०० रु.

सीताफळ : १२० रु.

डाळींचे दर (किलो)

तूरडाळ : १३० रु.

मूगडाळ : ९० रु.

उडीद डाळ : १४० रु.

हरभरा डाळ : १२० रु.

मूग ८० रु.

मसूर डाळ ९० रु.

किराणा दर (किलो)

पोहे : ३८ रु.

साखर : ३८ रु.

मैदा : ३० रु.

रवा : ३० रु.

शाबू : ६० रु.

आटा : ३० रु.

खजूर : ८० ते २४० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवालाचे पावणेदोन कोटी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी ट्रॅव्हल बसमधून बेकायदेशीररित्या हवाल्याची रक्कम नेण्याच्या प्रयत्नातील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून हवाल्यातील एक कोटी ६७ लाख रूपयेही जप्त करण्यात आले आहेत. चौकशीत संशयितांनी हवालाची अंगडिया कुरिअरची ही रक्कम असल्याची कबुली दिली आहे. दाभोलकर कॉर्नरजवळील रॉयल प्लाझा येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी भरत जयंतीलाल पटेल (वय ४६, रा. सध्या शाहूपुरी पाचवी गल्ली. मूळ गाव वडनगर), प्रकाश चतुर्गिरी गोस्वामी (३६ सध्या रा. शाहूपुरी पहिली गल्ली, मूळ गाव लाडोली), महेश विक्रमसिंह रजपूत (चव्हाण) (२३, सध्या रा. राजारामपुरी आठवी गल्ली, मूळ गाव गिरना) आणि रमणसिंह शंकररसिंह चव्हाण उर्फ रजपूत (२५, सध्या रा. राजारामपुरी आठवी गल्ली, मूळ गाव, गिरणा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. चौघेही मेहसाना जिल्ह्यातील आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 'दाभोलकर कॉर्नर येथील व्हीआरएल ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसमधून चार व्यक्ती अनधिकृतपणे रोख रक्कम घेऊन शुक्रवारी रात्री जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखालील दोन पथके दाभोलकर कॉलनी येथे गेली. दहाच्या सुमारास चार तरूण खांद्याला सॅक अडकवून शर्मा ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाकडे निघाल्याचे दिसले. पोलिसांनी चारही तरूणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीत त्यांनी हवालाची अंगडिया कुरिअरची रक्कम घेऊन जात असल्याची कबुली दिली.'

चौघांकडील रक्कम ताब्यात घेण्यात आली. पहाटे चारपर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरू होते. चौघांजवळ एक कोटी ६७ लाख १० हजाराची रक्कम मिळून आली. पोलिसांनी एक मोबाइलही जप्त केला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत सहाय्यक फौजदार विजय कोळी, चंद्रकांत मस्के, यशवंत उफराटे, संतोष माने, शहाजी पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीची वाट दबावातून सुकर होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्मार्ट​ सिटी होण्याच्यादृष्टीने कोल्हापूरचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, स्मार्ट​ सिटीच्या पंक्तीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषपूर्तीसाठी प्रशासन, नेतृत्व आणि नागरिक यांच्यात जनजागृतीची गरज असून, या संकल्पनेत अडथळे ठरणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाजात दबावगट तयार झाला पाहिजे,' असा मार्मिक सूर 'कोल्हापूर स्मार्ट होण्यामागील अडथळे' या विषयावरील चर्चासत्राच्या व्यासपीठावर उमटला. सातव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय ​ चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या चर्चासत्रात 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक विजय जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, जयसिंग पाटील आणि भारत चव्हाण यांनी अभ्यासू विवेचन केले. पत्रकार चारुदत्त जोशी यांनी या चर्चासत्राचे निवेदन केले.

विजय जाधव म्हणाले, 'विकासाच्या दिशेने जाण्यासाठी आवश्यक असलेली नवी प्रणाली स्वीकारली पाहिजे. चौकटीबाहेर न पडण्याची प्रवृत्ती हा देखील या संकल्पनेपूर्तीसाठी अडथळा ठरू शकतो. विरोधासाठी विरोध या मानसिकतेमुळेही काही प्रश्न मार्गी लागत नाहीत. हे चित्र बदलायचे असेल तर महापालिका व्यवस्थापन, नगर नियोजन याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. ढिसाळपणे होणारे काम स्मार्टसिटीसाठी घातक आहे. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येणारी राजकीय फळी गेल्या वीस वर्षांत निर्माण न होण्यात सध्याच्या प्रश्नांचे मूळ आहे. समाजमन जागृत असेल तर नेते आणि अधिकाऱ्यांना जाब विचारणारा आवाज तयार होऊ शकतो. केवळ घोषणांपेक्षा कृतीसाठी पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वाचा दुष्काळ कोल्हापूरच्या विकासाला मारक आहे. भविष्यात काय करता येईल याचे वैचारिक जाळे निर्माण करून कुठे कमी पडलो याचा लेखाजोखा मांडला पाहिजे.'

श्रीराम पवार म्हणाले, 'एखादी गोष्ट अन्य शहरात होते आणि कोल्हापुरात होत नाही या तुलनेला अविश्वासू राजकीय नेतृत्वच जबाबदार आहे. पुढच्या पाच वर्षांत कोल्हापूर स्मार्टसिटीच्या यादीत येणार नाही हे वास्तव असले तरी यादीत येण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा झाली पाहिजे. सरकारचे लेबल नाही म्हणून फरक पडत नसला तरी विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी सर्वंकष पातळीवर सक्षम बनण्याचे कर्तव्य बजावले पाहिजे. त्यासाठी सुविधांचे व्यवस्थापन स्मार्टपणे व्हायला हवे. चौकटीबाहेर पडून नव्या पद्धतीने उत्तरे शोधण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरण्याची मानसिकता सबळ झाली तर स्मार्टसिटीकडे जाण्याची दिशा स्पष्ट होईल.'

भारत चव्हाण म्हणाले, 'तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण विकासाची कास धरत असताना पायाभूत सुविधा मजबूत होणेही महत्त्वाचे आहे. आजही शहरातील ३० टक्के भागात ड्रेनेजयंत्रणा नाही. गटर्स नाहीत, आरक्षणातील बाग, मैदाने विकसित झालेली नाहीत. सार्व​जनिक वाहतूक व्यवस्थेची यंत्रणा सक्षम नाही. या अडथळ्यांवर मात करायची असेल तर महापालिकेतील अंतर्गत राजकारण आणि प्रत्येक गोष्टीत '​अर्थ' शोधणाऱ्या नेतृत्वावर लोकांचा अंकुश असला पाहिजे. लोकांनीही आपल्या हक्क अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवली तर स्मार्टसिटीचे बिरुद कोल्हापूरला लागू शकते.'

जय​सिंग पाटील म्हणाले, 'कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा यासारख्या क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळ, स्रोत यांचा वापर शहराचे महत्त्व वाढविण्यासाठी कसा करता येईल याचा विचारही प्रकर्षाने झाला पाहिजे. इतिहासातून बाहेर पडून दृष्टिकोन व्यापक होण्याच्या मार्गातील अडथळ्यांबाबत प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. संख्यात्मकपेक्षा गुणात्मक जे आहे त्याचा उपयोग विकासासाठी करण्याच्या मुद्द्यांवर विचार झाला पा​हिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला महामूक मोर्चाचे आयोजन केले आहे. १५ लाख मराठा समाजबांधवांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्याचा निर्धार नियोजन बैठकीत केला असल्याने मोर्चाच्या तयारीसाठी कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध करण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण केली जात आहे. कोपरा सभा, प्रभात फेरी, विविध सरकारी कार्यालयांत बैठका घेण्याबरोबरच सोशल मीडियांमधून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, आदी मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखो संख्येचे मोर्चे निघत आहेत. संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने काढण्यात येणाऱ्या मूकमोर्चाने अनेकांना धडकी भरवली आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातही पंधरा लाखांचा मोर्चा काढण्याचा निर्धार करत मोर्चा समितीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मोर्चाच्या तयारीसाठी बोलाविलेल्या बैठकीला तब्बल दहा हजार मराठा बांधवांनी हजेरी लावल्याने सर्वांना कोल्हापुरातील मोर्चाबाबत उत्सुकता लागली आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वांत मोठ्या लोकसंख्येचा मोर्चा काढण्याचा निर्धार करत नियोजन समितीचे कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे फिरत आहेत. गाव अन् गाव पिंजून काढत प्रत्येक युवक मंडळाशी स्वतंत्र संपर्क साधत आहेत.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी जबाबदारी देण्यापूर्वीच सर्वजण स्वतंत्र पातळीवर प्रयत्न करत आहेत. मोर्चामध्ये अधिकधिक युवकांच्या सहभागासाठी सोशल मीडियाद्वारे आवाहन केले जात आहे. सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असल्याने वेगवेगळे ग्रुप अॅक्टिव झाले आहेत. याच माध्यमातून मोर्चातील मराठा बांधवांची संख्या जास्त असल्याने पार्किंगचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी मोर्चात विनावाहन सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. प्रत्येक वाहनावर मोर्चाची तारीख, स्थळ, प्रमुख मागण्या असलेले स्टिकर लावले जात आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी 'सकल मराठा मोर्चा' असे स्टिकर लावलेली वाहने सर्रास दिसत आहेत. तसेच मोर्चातील युवकांना टी-शर्ट देण्याचे नियोजन केले आहे. असे मोफत टी-शर्टऐवजी स्वतः टी-शर्ट तयार करण्यास विविध ग्रुपनी सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला मोर्चा यशस्वी करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.


मोर्चाच्या तयारीसाठी आज बैठक

१५ ऑक्टोबरच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातील हिंदू एकता समितीच्या कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीत मंगळवार पेठ येथील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे, महिला मंडळे, बचत गट व सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रकांनी केले आहे.


मुख्य कार्यालयाचे आज उद्घाटन

कोल्हापुरात मराठा मोर्चाचे आयोजन १५ ऑक्टोबर रोजी केले आहे. याची सर्वत्र तयारी सुरू असून, मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांना एकच संपर्क कार्यालय असावे, यासाठी शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिरात 'मराठा क्रांती मोर्चा' प्रधान कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कार्यालयाचे उघाटन रविवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता मराठा समाजातील पाच विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सर्व तालीम संस्था व मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. उदघाटन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन 'सकल मराठा समाजा'च्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगसह हिरकणी कक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शनिवारी सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. दहा दिवसांच्या नवरात्रकाळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने पार्किंगपासून सुरक्षा यंत्रणेपर्यंत तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरातील १३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, महिलांसाठी हिरकणी कक्ष तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मंदिर परिसरातील रहिवांशांसाठी शाहू बँक येथे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डॉ. सैनी म्हणाले, 'नवरात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांसाठी बैठक घेऊन नियोजन केले आहे. यामध्ये पार्किंगपासून स्वच्छतेबाबतची सर्व काळजी घेतली आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केला जाणार असून, भाविकांचे सामान ठेवण्यासाठीची सुविधा शेतकरी संघामध्ये केली आहे. तसेच तेथे सुरक्षारक्षक व दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मंदिरातील दुकानदारांनी नवरात्रकाळात प्लास्टिक पिशव्या वापरणार नसल्याचे सांगितले आहे. पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी त्यादृष्टीने एमटीडीसीचे वेल कम टू कोल्हापूर सेंटर उभारण्यात येणार आहे. मंगळवारी, सकाळी नऊ वाजता श्रमदान करण्यात येणार आहे.'

देशपांडे म्हणाले, 'नवरात्रोत्सवापूर्वी मंदिर परिसरात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. तसेच या काळात दोन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. मंदिराच्या सुरक्षितेच्यादृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.'

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील कामकाजाची व सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, देवस्थान व्यवस्थान समिती सचिव विजय पोवार यांनी शनिवारी करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी देवस्थान कार्यालयासमोरील कारंजा परिसरातील स्वच्छ करून तेथे लायटिंग करावी, अशा सूचना दिल्या. तसेच चारही दरवाजांची पाहणी केली.

१३ ठिकाणी पार्किंग

शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने यंदा नवरात्रकाळात १३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. मेन राजाराम हायस्कूल मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, एमएलजी हायस्कूल, शिवाजी स्टेडियम, न्यू हायस्कूलचे पेटाळा मैदान, गांधी मैदान, पेटाळा मैदान, दसरा चौक, सिद्धार्थनगर मैदान (आंबेडकर हॉल) आदी मैदान परिसर, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी परिसर, डॉ. झाकीर हुसेन उर्दू व मराठी शाळा सुसरबाग, लक्ष्मीपुरी या ठिकाणी भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध असणार आहे. गर्दी जास्त झाल्यानंतर पंचगंगा घाटावरही पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. मंदिर परिसरातील रहिवाशांसाठी शाहू बँक येथे स्वतंत्र तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था केली आहे.

दिशादर्शक फलक

अंबाबाई मंदिर रस्ता, अंतर व पार्किंगची सुविधा आदींची माहिती दिशादर्शक फलकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हे फलक शहरातील प्रमुख रस्ते आणि शहराच्या मुख्य प्रवेशमार्गावर लावण्यात येणार आहेत. त्याचा भाविकांना याचा लाभ होणार आहे.

हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहाची सोय

नवरात्रकाळात महिलांची संख्या पाहता यंदा प्रथमच महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात नऊ ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा केली आहे. याचबरोबर मेन राजाराम हायस्कूल व बांधकाम विभागाचे स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी दिली आहे.

अन्न व औषध प्रशासन करणार तपासणी

नवरात्र काळात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मंदिर परिसरातील सर्व खाद्यपदार्थांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

बॅग स्कॅनरची प्रतीक्षा कायम

अंबाबाई मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली बॅगस्कॅनर यंत्रणा साडेतीन वर्षांपासून प्रलंबित आहे. संशयास्पदरीत्या कुणी बॅग लॉकरमध्ये ठेवू नये, यासाठी खबरदारी म्हणून बॅगस्कॅनर तातडीने कार्यान्वित होण्याची गरज असताना मंदिर सुरक्षेकडे डोळेझाकपणा होत आहे. यंदा बॅगस्कॅनरचे टेंडर काढले असून, त्या प्रक्रियेला किमान महिन्याचा कालावधी लागणार असल्यामुळे यंदाही बॅग स्कॅनरची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

श्रीपूजक, आर्द्रता समितीची बैठक

मंदिरामधील आर्द्रता कमी राहण्यासाठी मंदिरात हार नेण्यासाठी परवानगी असावी की नसावी, याबाबत पुढील आठवड्यात श्रीपूजक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समिती, आर्द्रता संवर्धन समिती आणि हार विक्रेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमावासिय कोल्हापूरच्यामेळाव्यात सहभागी होणार

$
0
0



बेळगाव

मराठा क्रांती मोर्चाबाबत चर्चा करण्यासाठी मराठा समाजाची बैठक तुकाराम बँकेच्या सभागृहात पार पडली. कोल्हापूर येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. व्यासपीठावर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवराज पाटील, कोल्हापूरचे मोर्चाचे प्रचारक राजू पवार, दिलीप पाटील उपस्थित होते.

बेळगावातही मराठा क्रांती मोर्चा काढावा तसेच कोल्हापूरच्या मोर्चात सहभागी व्हावे असे विचार उपस्थितांनी व्यक्त केले. कोल्हापूर, सांगलीची जनता नेहमी सीमाबांधवाच्या पाठfशी खंबीरपणे नेहमी उभे असतात. यासाठी प्रथम कोल्हापूरच्या क्रांती मोर्चात सीमाभागातील मराठा समाजाने सहभागी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे नंतर बेळगावमध्ये मोर्चा काढण्यासंबंधी विचार करायचा चर्चेअंती निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाने आपल्या मागण्यात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचीही मागणी करावी, असे आवाहन महाराष्ट्रातील मराठा समाजाला करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात बेळगावात मोर्चा काढायचा झाल्यास महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागातील मराठा समाजाला मार्गदर्शन करण्याची मागणी करण्याचे ठरविण्यात आले.

सीमाभागात मराठा क्रांती मोर्चाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोल्हापूरचे कार्यकर्ते सीमाभागात बैठकांना उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. काही जण व्हाट्स-अॅप आणि अन्य सोशल मीडियावर मोर्चा संबंधी तारखा जाहीर करीत आहेत. पण, बेळगावात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार नसून कोल्हापूरच्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सीमाभागातील मराठा समाजाने सहभागी होण्याचे ठरवले असल्याचे मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवठेमहांकाळ-तासगावात पाणी पाणी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

पावसाने रविवारी सांगली-मिरज परिसरात विश्रांती घेतली असली तरी तासगाव कवठेमहांकाळ परिसरात तुफानी बरसात केलीच. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोणपासून तासगाव तालुक्याच्या पूर्वभागात जोरदार पावसाने हजेरी लावून पाणीपाणी केले. सायंकाळनंतर आभाळ भरून आल्याने कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असे वातावरण तयार झाले होते.

सांगली, मिरजेसह तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, जत या परिसरात शनिवारी जोरदार पाऊस कोसळला. सर्वाधिक पाऊस सांगली मिरजेत ३९ मिलीमीटर नोंदला गेला. जतच्या पश्चिम भागात १३.८ मिलीमीटर तर कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात २०.५ मिलीमीटर पाऊस झाला. कडेगाव तालुक्यात २२ मिलीमीटर पाऊस झाला असला तरी नजीकच्या पलूस तालुक्यात मात्र केवळ रिमझीमच बरसून गेली होती. शिराळा, वाळवा तालुक्यातील पावसात अजिबातच जोर नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांती मोर्चे स्वयंप्रेरणेने

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

मराठा समाज आपल्या न्याय मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात क्रांती मोर्चात उतरला आहे. सरकार कोणाचे आहे हा प्रश्न आहे, मोर्चामुळे टोकाची व निर्णायक वेळ आली आहे. महात्मा गांधींच्या व्यापक अहिसंक आंदोलनाची आठवण हे मोर्चे करून देत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत निर्णय घ्यावाच लागेल, असा इशारा माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कदम यांनी रविवारी सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. मोर्चाची तयारी व पुढील नियोजन याची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. कदम म्हणाले, 'सर्व क्रांती मोर्चे स्वयंप्रेरणेने निघत आहेत. प्रथमच राजकीय पक्ष व नेते व चमकोगिरींचा सहभाग न घेता समाजानेच हे आंदोलन हाती घेतले आहे. मराठा समाज हा तसा सर्व समावेशक समाज. सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत आहे. मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. चांगले शिक्षण मिळत नाही. अडचणींवर मात करून शिक्षण घेतले तर नोकरी मिळत नाही. अनेक प्रश्नांनी हा समाज त्रस्त झाला आहे. आमच्या सरकारने या समाजाला आरक्षण दिले. मात्र, कोर्टात त्याला स्थगिती मिळाली. त्यामध्ये त्रुटी काढल्या आहेत. या सर्व त्रुटी दूर करून आरक्षणाचा विषय तातडीने निकाली काढणे गरजेचे आहे.'

तातडीने निर्णय देण्याची वेळ

मराठा क्रांती मोर्चा हा सरकार विरोधी नव्हे तर प्रस्थापितांविरोधात आहे, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. या बाबत विचारले असता कदम म्हणाले, 'सध्या मोर्चे निर्णायक व टोकाच्या ठिकाणावर आहे. मोर्चाचा सिग्नल जबरदस्त आहे. राजकीय उत्तरे देण्याची ही वेळ नाही. मोर्चाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. तातडीने निर्णय घेण्याची ही वेळ आहे. हा मोर्चा दलित अथवा कोणत्याही समाजाच्या विरोधी नाही. आपणही मोर्चात सहभागी होणार आहोत. कोणतेही महत्वाचे निर्णय लगेच होत नाहीत . मात्र, त्यासाठी तातडीने प्रयत्न तरी केले पाहिजेत.'

मुस्लिम, लिंगायत समाजाचा पाठिंबा

मिरज

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या क्रांती मूक मोर्चाला शहरात विविध समाज आणि व्यक्तींकडून पाठिंबा मिळत आहे. मोर्चा नियोजन कार्यालयात पाठिंबा देण्यासाठी मराठासह इतर समाज बांधवांची गर्दी होती. मुस्लिम, माळी, लिंगायत, गोंधळी समाजाच्या प्रतिनिधींनी पाठिंब्याचे पत्र अभिजित पवार, विलास देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज तीन हजार पर्यटकांना प्रवेशकास पठारावरील गर्दीवर येणार नियंत्रण

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

कास पुष्प पठारावरील पर्यटकांच्या गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी व नैसर्गिक जागतिक वारसा स्थळाचे कास पुष्प पठाराचे संरक्षणासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सातवाजेपर्यंत प्रत्येकी तीन तासाला ७५० या प्रमाणे प्रतिदिन तीन हजार पर्यटकांना कास पठारावर प्रवेश देण्यात येणार आहे. ही कास पठाराच्या संरक्षणासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी असल्याची माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.

कास पुष्प पठारावर २६ ऑगस्टपासून पर्यटन हंगाम सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर वन विभागामार्फत बुकिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. कास पठारावर सर्व पुष्पप्रजातींना फुले फुलली असून ती पाहण्यासाठी बहुतांश पर्यटक हे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे कास पठरावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पठारावर सध्या पाऊस पडत असल्याने पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कास पठारावर होणारी गर्दी व वाहतूक कोंडी व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबई, पुणे व स्थानिक पर्यटकांनी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कास पुष्प पठाराला भेट द्यावी, असे आवाहनही अंजनकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाई हत्याकांडभंडारी ज्वेलर्समधूनअकरा तोळे सोने जप्त

$
0
0



सातारा

धोम (ता. वाई) येथील हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी संतोष पोळ याच्याकडे सध्या सुरेखा किसन चिकणे (रा. वडवली) खून प्रकरणात चौकशी सुरू आहे. चिकणे यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोने गायब झाले होते. याची पोलिसांनी चौकशी करून भंडारी ज्वेलर्स येथून अकरा तोळे सोने जप्त केले. यासाठी दोन दिवस संतोष पोळला वाई बाजारपेठेतून फिरवण्यात आले.

संतोष पोळ याने येथील भंडारी ज्वेलर्स येथे चिकणे याचे काही सोने विकले होते तर काही घाणवट ठेवले होते. मे २००३साली चिकणे वाईतून धोमला गेल्यानंतर गायब झाल्या होत्या. या दरम्यानचे अकरा तोळे सोने पोलिसांनी भंडारी ज्वेलर्स येथून जप्त केले. दोन गंठण, अंगठी, सोन्याच्या बांगड्या, चेन, कानातील टॉप असे अकरा तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. अत्यंत हसतखेळत पोळने सोन्या बाबतची माहिती पोलिसांना दिली. भंडारी ज्वेलर्स येथे पोळला आणल्यानंतर सराफ बाजारात खळबळ उडाली होती. पो. नि. विनायक वेताळ यांनी सराफाकडून पंचनाम्यासह सोन्याचे दागिने ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटगांव बाजारपेठेत पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

पाटगांव (ता.भुदरगड) येथील बाजारपेठेत पाटगांव प्रकल्पातील सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी शिरल्याने पाटगांवला बेटाचे स्वरुप प्राप्त झाले असून सांडव्यातून प्रती सेंकद २३०० क्युसेक्स वेगाने पाणी पडत असल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाणी गावातील घरांना लागल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटगांव धरणक्षेञात रविवार सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. केवळ दोन तासात ६३ मीमी पावसाची तर गेल्या चोवीस तासात १७५ मी मी पावसाची नोंद झाली. जलाशय पुर्ण भरल्यामुळे सांडव्यातून विसर्ग चालूच आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढला त्यामुळे वेदगंगा नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाली आणि पाणी बाजारपेठेत पाणी शिरले

पाटगांव येथील जुना पूल पुर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच गावातील म्हापसेकर यांच्या घरात व श्री.मौनी महाराज हायस्कूल जवळ पाणी आले आहे. अचानक पाणी वाढल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाटगांव शेजारीच असणाऱ्या शिवडाव गावातील ओढ्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. धरणात ३.७१ टी.एम.सी.एवढा पूर्ण पाणी साठा झाला असून सांडव्यातून २०४२ आणि जल विद्युत केंद्रसाठी २५० क्युसेक असे सुमारे २३०० क्युसेक पाणी वेदगंगा नदीच्या पात्रात पडत आहे

गावात पाणी शिरल्याची माहिती पोलिस पाटील अस्मिता वर्दम यांनी प्रशासनाला तात्काळ दिली. तलाठी मिसाळ आणि कृषी पर्यवेक्षक चव्हाण यांनी परिस्थितीची पाहणी केली. मात्र पाटबंधारे खात्याचे आधिकारी यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत होता. पाटगाव बाजापेठेत पाणी शिरल्याची माहिती समजताच आमदार प्रकाश आबिटकर यांनी भुदरगडच्या तहसिलदार शितल देसाई याना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाची प्रशासनाने दखल घेतली असून आपत्कालीन व्यवस्था सतर्क करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार शितल देसाई यानी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या सेवेसाठी सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सव काळात गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था अंबेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना देवीची सेवा करण्यासाठी सेवेकरी अहोरात्र काम करत आहेत. येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, ही निरपेक्ष भावना ठेवून या काळात दर्शनरांगांचे ‌नियोजन, वैद्यकीय मदत, पाण्याची सुविधा, मंदिर स्वच्छता, प्रसादवाटप अशा अनेक सुविधा पुरविण्याचे काम व्हाइट आर्मी, अनिरुद्ध स्वयंसेवी संस्था, जीवनज्योती, संजय मेंटेनन्स, श्रीपूजक करत आहेत.

व्हाइट आर्मीकडून प्राथमिक उपचार

गेल्या नऊ वर्षांपासून व्हाइट आर्मी संस्थेच्यावतीने आपत्कालीन व्यवस्था केली जात आहे. भाविकांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथकही कार्यरत असते. हे पथक यंदा मनकर्णिका कुंड येथे राहणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी रांगेत अधिक काळ उभे राहिल्यामुळे चक्कर येणे, रक्तदाब आणि उन्हामुळे डी हायड्रेशन होणाऱ्यांवर या कॅम्पमध्ये उपचार केले जातात. व्हाइट आर्मीचे यंदा १०० जवान मंदिरात रांग लावण्यासाठी मदत करणे, शिस्त लावण्याचे काम करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी सांगितले.

महापालिका-पोलिसांतर्फे मार्गदर्शन केंद्र

जुना राजवाडा पोलिस ठाणे व कोल्हापूर महापालिकेच्यावतीने माहिती व सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माहिती देण्याचे काम केले जाणार असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या बूथवरून गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. लहान मुले अथवा भाविकांची नातेवाइकांपासून चुकामूक झाल्यास ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.

महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे मोफत अन्नछत्र

श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने बाहेरगावच्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्राची सोय केली आहे. यंदा दिवसाला सात हजार भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे. ही सुविधा सकाळी ११.३० ते दुपारी चार या वेळेत उपलब्ध असणार आहे. रांगेमध्ये भाविकांना अन्नछत्राचे कुपण वाटण्यात येणार असून, यंदा पाऊण लाख भाविक याचा लाभ घेतील, अशी अपेक्षा अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी व्यक्त केली.

संजय मेंटेनन्सतर्फे मंदिर स्वच्छता

दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अंबाबाई मंदिराची स्वच्छता मुंबई येथील संजय मेंटेनन्सतर्फे केली जाते. गेल्या १३ वर्षांपासून संस्थेच्या १८ कर्मचाऱ्यांकडून अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने मंदिराची अंतर्बाह्य स्वच्छता केली जाते. पाण्याचा फवारा मारून मंदिराच्या ​​​​शिखरापासून ते आवारातील फरशीपर्यंतची स्वच्छता या यंत्रणेच्या माध्यमातून केली जात असल्याचे संजय माने यांनी सांगितले.

अनिरुद्ध, जीवनज्योतीतर्फे पाणीवाटप

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी लाखो भाविकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून स्टॉल लावले जातात. सकाळी दहा ते रात्री सहापर्यंत पाणीवाटपाची सेवा या संस्था करतात. संस्थेचे कार्यकर्ते रांगेतील भाविकांना पाणीवाटपाचे काम करतात. तसेच काही संस्था मंदिरातील गरुड मंडप परिसरात मिनरल वॉटरची सोय करतात.

ए-वन डेकोरेटरतर्फे मोफत लायटिंग

गेल्या अनेक वर्षांपासून ए-वन डेकोरेटरच्यावतीने अंबाबाई मंदिराला नवरात्रोत्सवकाळात सर्व लायटिंगची व्यवस्था मोफत केली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून नवव्या माळेपर्यंत असलेले दररोज एका रंगाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व यावर्षी अंबाबाई मंदिराच्या सजावटीतूनही झळकणार आहे, तर स्मार्ट व शार्प वायडिंगच्या वतीने यंदाही मंदिरातील सर्व फॅन स्वच्छ करून ते सुस्थित करण्याची जबाबदारी घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरवाई, जैवविविधतेने समृद्ध परिसर

$
0
0

sachin.yadav@timesgroup.com

sachin.yadavMT

कोल्हापूर ः क्रशर चौक लक्ष्मी टेक वसाहत परिसरातील चाळीस वर्षांपूर्वी तीन रुपये चौरस फूट दराने मिळणाऱ्या जागेचा दर आता लाखांत पोहोचला आहे. साध्या एकमजली आणि जुन्या इमारती पाडून अपार्टमेंट उभारल्या आहेत. रिकामा माळ, बैठ्या घरांची वस्ती, शालिनी सिनेटोन परिसराचे रूप बदलले आहे. क्रशर चौक ते हरिओमनगरचा परिसर विस्तारला असून अनेकांनी गुंतवणूक म्हणून या भागात जागा आणि घरे खरेदी केली. रंकाळा तलावाच्या शेजारी असलेला हा परिसर हिरवाईने नटला आहे.

इराणी खणीजवळ क्रशरवर काम करणाऱ्या कामगारांची सर्वांत जुनी वसाहत. त्यानंतर नागरी वस्ती म्हणून लक्ष्मी टेक वसाहत १९७० च्या दरम्यान उदयास आली. परिसरातील पहिली जुनी वसाहत म्हणून दीप्तीसागर अपार्टमेंटची ओळख आहे. मोजक्या कॉलनींचा परिसर म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी हा भाग ओळखला जात होता. दळणवणाची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नव्हती. अगदी रिक्षावालेही क्रशर चौक बसस्टॉपपासून पुढे येण्यास नकार देत होते. कारण या ठिकाणी रस्ते आणि रस्त्यावर विजेची कोणतीही सुविधा नव्हती. सध्याच्या क्रशर चौकातून अंबाई टँककडे जाणाऱ्या परिसरातही रस्ता आणि विजेची सोय नसल्याने हा भाग निमर्नुष्य होता. सध्या या परिसराचे रूप पालटले आहे. क्रशर चौकात राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन साळोखेनगर परिसरातील वाल्मीकी आंबेडकर वसाहतीत झाले. त्यानंतर या ठिकाणी मोहिते पार्क, टाकळकर कॉलनी, शिवराम पोवार कॉलनी, हरिओमनगरपर्यंत नागरीकरण झपाट्याने वाढले. सुमारे आठ हजार नागरिकांची या ठिकाणी वस्ती आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा, दवाखाने, सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अगदी तीन रुपये चौरस फूट दराने जागेची विक्री केली होती. या परिसरात शिवाजी पेठेतील आणि काही सरकार मंडळींची शेती आहे. त्यांनी शेतीचे प्लॉट पाडून जमिनीची विक्री केली. सध्या या परिसरात सुमारे तीस टक्के शेती आहे. रंकाळा तलावाच्या शेजारील शांत परिसर म्हणूनही या वस्तीची ओळख आहे. प्रत्येक रहिवाशाने दारात एक झाड लावले आहे. सध्याच्या कृष्ण मंदिरापासून ते हरिओमनगरपर्यंतच्या काही भागात पाणलोट क्षेत्र (परताळा) आहे. त्यामुळे काही भागांत बांधकाम झालेले नाही. या ठिकाणी काही व्यावसायिकांनी अपार्टमेंट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने पाणलोट क्षेत्रातील बांधकाम थांबले आहे. पाणलोट क्षेत्राला लागून काही अपार्टमेंट उभारल्या आहेत. जुन्या काळातील शालिनी सिनेटोन या परिसरातील वैभव होते. आता या सिनेटोनचे अस्तित्व संपले आहे. केवळ एक जुने मंदिर या ठिकाणी आहे. तत्कालीन काळात मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पाहण्यासाठी हौशी प्रेक्षकांची मोठी गर्दी या परिसरात होत होती. सध्या या परिसराचे नागरीकरण झपाट्याने झाले. या परिसरात २३ अपार्टमेंट उभारल्या आहे. मुंबई आणि पुणे भागातील काहींनी या परिसरात मोठी गुंतवणूक केली. काही अपार्टमेंटमधील खोल्या आणि काही रो बंगले भाड्याने दिले आहेत. परिसरात नवीन पदपथाची उभारणी झाली. त्यानंतर खणीवर पोहायला येणाऱ्यांनी खणविहार मित्रमंडळाची स्थापना केली आहे. कृष्ण मंदिर आणि हनुमान मंदिराची स्थापना केली. या अंतर्गत कॉलनीत मात्र काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

सायलेंट झोन कागदावर

फुलेवाडी रिंगरोडचे काम अद्याप सुरू आहे. फुलेवाडी जकात नाक्यापासून ते गंगाई लॉनपर्यंतचा रस्ता खराब असल्याने शालिनी पॅलेसपासून क्रशर चौकमार्गे वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सायलेंट झोन केवळ कागदावरच आहे. पदपथ उद्यानाजवळ एका ट्रकने दिलेल्या धडकेत अवजड वाहतूक बंदसाठी असलेली लोखंडी कमान तुटली. फुलेवाडी रिंगरोडवरील रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी, ट्रक, टॅक्टर, टेम्पोसह अवजड वाहनांची कर्कश चौकापर्यंत हॉर्न देत वाहतूक सुरूच असते. त्यामुळे दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे पक्षितज्ज्ञांचे मत आहे.

परिसरातील पक्षी निरीक्षण केंद्र

रंकाळ्याजवळील निसर्ग प्रशिक्षण आणि पक्षी निरीक्षण केंद्रात पक्षीही नाहीत आणि पक्षी निरीक्षकही, अशी अवस्था या केंद्राची झाली आहे. या केंद्राला झाडाझुडपांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत वापराविना पडून आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय नदी व तलाव, सरोवर संवर्धन योजनेतून यासाठी निधी दिला होता. हिवाळ्यात रंकाळा तलावावर विविध पक्षी येतात. त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमी कॅमेरा घेऊन गर्दी करीत असल्याचे चित्र होते. हौशी फोटोग्राफर रंकाळा परिसरातील विविध छटा कॅमेऱ्यात बंदिस्त करतात. मात्र, पक्षी निरीक्षण केंद्र सुरू झाल्यास या भागाची आणखी एक नवी ओळख निर्माण होईल. हौशी छायाचित्रकार, निसर्गमित्र संस्थांनी येथे प्रदर्शनाद्वारे पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे नियोजन होते.

'दीप्तीसागर' ही परिसरातील सर्वांत जुनी अपार्टमेंट आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी केवळ दोन हजार नागरी वस्ती या ठिकाणी होती. मात्र, नागरीकरणामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती झाली आहे. रंकाळ्याचा सायलेंट झोन आता कागदावरच पाहायला मिळतो आहे.'

परेश डांगे, दीप्तीसागर अपार्टमेंट

'जैवविविधतेने नटलेला हा परिसर आहे. त्यासाठी रंकाळा परिसरात पक्षी निरीक्षण केंद्रही झाले. सध्या ते बंद अवस्थेत आहे. लक्ष्मी टेक वसाहत ते हरिओमनगरमधील काही अंतर्गत रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. रंकाळा पदपथालाही अवकळा आली आहे.'

डॉ. संदेश कचरे, टाकळकर कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठ्यांचा आवाज दिल्लीत पोहोचवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली कित्येक वर्षे मनातील धग आता बाहेर आली आहे. मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत निश्चितच पोहोचविला जाणार आहे. मंगळवार पेठेला लढवय्यांचा मोठा वारसा आहे. मोर्चात मंगळवार पेठेचा सिंहाचा वाटा राहणार आहे. मंगळवार पेठेतील तालीम, सार्वजनिक तरुण मंडळ, युवा वर्गासह प्रत्येक घराला कुलूप लावून मोर्चात सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीत काही तीन मिनिटे वीज पुरवठा खंडित झाला. त्या वेळी मोबाइल बॅटरीच्या प्रकाशात मनोगते सुरू राहिली. मराठेत्तर समाजाने या मोर्चाला पाठिंबा देऊन सक्रीय सहभागाचे आश्वासन दिले.

येत्या १५ ऑक्टोबरला होत असलेल्या सकल मराठा मूक क्रांती मोर्चाच्या तयारीसाठी मंगळवार पेठेतील नागरिकांची बैठक हिंदू एकताच्या सभागृहात रविवारी झाली.

नेता म्हणून मी या सभेत आलेला नाही. मला कुणी निमंत्रणही दिलेले नाही. एक मराठा म्हणून बैठकीत उपस्थित राहिलो आहे, असे सांगत आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'राज्यात सर्वांत मोठा मोर्चा होईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही. मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविला आहे. मोर्चात लाखो सहभागी होणार असल्याने नियोजन महत्त्वाचे आहे. येत्या दोन ऑक्टोबरला बुधवार, उत्तरेश्वर, शिवाजी पेठ आणि कसबा बावडा यासह एकूण १५ बैठका घेतल्या जाणार आहेत. मंगळवार पेठेलाही लढवय्यांचा इतिहास आहे. त्यामुळे घर बंद करून प्रत्येकाने मोर्चात सहभागी होण्याची गरज आहे. सीमाभागातील नागरिकही मोर्चात सहभागी होणार असल्याने पार्किंगच्या ठिकाणाचा विचार हवा.

बालगोपाल तालीम मंडळाचे निवास साळोखे म्हणाले, 'मोर्चात मंगळवार पेठेचा सिंहाचा वाटा असेल. शाहू तरुण मंडळाच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र येण्यास काहीच हरकत नाही. नियोजनासाठी एक कोअर कमिटी तयार करावी. राजर्षी शाहूंची नगरीही पुरोगामी विचारांची आहे. सर्व जातीचे आणि धर्मांच्या लोकांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाच्या लढाईत मंगळवार पेठेतील प्रत्येक कुटुंबाचा सहभाग असेल. बाराइमाम आणि बालगोपाल तालमीची संयुक्त बैठक घेतली जाईल. मिरजकर तिकटी ते गांधी मैदानापर्यंत स्वयंसेवकांची फौज उभारली जाईल. या मार्गावरील रस्ता स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मंगळवार पेठेतील कार्यकर्ते घेतील.

उमेश पोवार म्हणाले, 'मोर्चात सर्व पेठांनी एकत्रपणे सहभागी होण्याची गरज आहे. त्यासाठी वैयक्तिक हेवेदावे आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. संपूर्ण देशात मराठा समाजाची लाट आहे. या लाटेवर स्वार होऊन आरक्षण मिळविण्यासाठी या लढ्यात प्रत्येक कुंटुंबाने सहभागी व्हावे.

बाबा पार्टे म्हणाले, 'मोर्चाच्या दिवशीही मंगळवार पेठेत सर्व व्यवसाय बंद राहतील. शाळा आणि कॉलेजमधील प्रत्येक युवक मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यामध्ये मंगळवार पेठ प्रत्येक घरात जागृतीचे काम करेल. मोर्चात आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाण्याचा वापरही जपून करायला हवा.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, 'भविष्याचा विचार करून प्रत्येक घरातील युवा मंडळीनी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडण्याची गरज आहे.'

माणिक मंडलिक म्हणाले, 'गेली कित्येक वर्षे धगधगत असलेली मनातील धग बाहेर पडली आहे. ही धग आता दिल्लीपर्यत पोहोचणार आहे. पन्नास टक्के आरक्षणही देण्याचे धोरण ठरविताना अन्य समाजाचा विचार केलेला नव्हता.' मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले, 'सकल मराठा समाज क्रांती मोर्चासाठी कोणतीही जबाबदारी द्यावी. त्यासाठी मुस्लिम समाजाचा कायम पाठिबा राहिली. आदिल फरास म्हणाले, 'मराठा आरक्षणाला मुस्लिम समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात दोन हजार मुस्लिम मावळे सहभाग घेणार आहेत.'

आरपीआयचे अॅड. पंडितराव सडोलीकर म्हणाले, 'आरपीआयच्या सर्व गटाचा मराठ्यांच्या मोर्चाला पाठिंबा राहणार आहे.' बोडके तालीम मंडळाचे अशोक पोवार म्हणाले, 'मंगळवार पेठेतून अधिकाधिक स्वयंसेवक देण्यासाठी प्रयत्न देण्याची गरज आहे.'

माळी समाजाचे बाबासाहेब माळी यांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. संदीप पाटील, महेश जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी चंद्रमोहन पाटील यांनी दोन हजार चपात्या आणि अजित सासने यांनी ५०० किलो पोहे देण्याचे जाहीर केले.

यावेळी प्रा. आनंद जरग, जयकुमार शिंदे, अशोक पोवार, प्रसाद जाधव, अच्युत साळोखे, विनायक साळोखे, श्रीकांत जाधव, अशोक जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्यासह मंगळवार पेठातील तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भक्तांचे स्वागत होणार खड्ड्यांनी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवासाठी मंदिराची स्वच्छता तसेच तेथील सुविधांवर लक्ष दिले ​जात असले तरी या मंदिरापर्यंत येणाऱ्या रस्त्यांच्या अवस्थेकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. पार्किंगच्या ठिकाणी जाणाऱ्या टेंब रोड, बिंदू चौक, शाहू मैदान, मिरजकर तिकटी, बाबूजमाल रोड परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांचे स्वागत महापालिका या ठिकाणच्या खड्ड्यांनी करणार का? असा सवाल आहे.

शहरात दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक रस्ते उखडले आहेत. उपनगरांच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था वाईट आहेच. पण शहराच्या मध्यवस्तीतीलही रस्त्यांची स्थिती चांगली नाही. येत्या शनिवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी राज्यभरातून दररोज लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात.

भाविकांची ही संख्या पाहून प्रशासनाला जय्यत तयारी करावी लागते. त्यानुसार मंदिर परिसरातील सुरक्षा तसेच आवारात भाविकांसाठी सुविधा देण्याचा, सुशोभीकरणाचे काम वेगावले आहे. पण ज्या

रस्त्यांवरुन भाविक मंदिरात येणार आहेत. त्या रस्त्यांकडे मात्र प्रशासनाचे लक्ष ​गेलेले नाही, असेच दिसते.

अंबाबाई मंदिराकडे जाण्यासाठी बिंदू चौक हा परिसर महत्वाचा आहे. या परिसरात पार्किंगची व्यवस्था असल्याने बहुतांश भाविक येथेच येतात. शाहू वैदिक स्कूलसमोरील रस्ता नव्हे, पाणंद झाली आहे. येथे वाहनांची वर्दळ मोठी असते. तरीही मुरूमासारखी तकलादू व्यवस्था महापालिकेने केली आहे. त्यानंतर आलेल्या पावसाने हा मुरुम धुवून गेला आहे. भाविक या परिसरातूनच मंदिराकडे मोठ्या संख्येने पायी जात असतात. त्यांना चालत जाण्यासारखीही परिस्थिती तिथे नाही. हीच अवस्था टेंबे रोडची झाली आहे. शिवाजी स्टेडियमवर पार्किंग असल्याने तिथून टेंबे रोडवरुन चालत मंदिराकडे जावे लागते. खड्ड्यांमुळे या रस्त्याची अवस्था वाईट असून येणाऱ्या भाविकांसाठी हेच कोल्हापूर? असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे.

गांधी मैदान, पेटाळा या ठिकाणीही पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यासाठी ​न्यू महाद्वार रोडवरुन जावे लागते. हा रस्ता खराब झाला असून पावसाने उघडिप दिली की येथे धुळीचे साम्राज्य पसरते. त्याचा भाविकांना त्रासच होणार आहे. लक्ष्मीपुरीतील सुसर बागेतील शाळेकडे जाण्यासाठीही लक्ष्मीपुरीत असलेल्या मोठ्या खड्ड्यांमधून जावे लागणार आहे. मंदिर परिसराजवळील जोतिबा रोडवरही खड्डे भाविकांची पाठ सोडणार नाहीत. गाडगे महाराजांच्या पुतळ्यापासून महाद्वार रोडकडे जाणाऱ्या या रस्त्यावर खड्डे आहेतच. शिवाय पावसाने त्यामध्ये पाणी साठत असल्याने तिथून चालत जाता येत नाही. या रस्त्यांच्या अवस्थेमुळे भाविकांना मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत त्रासच सहन करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेने तातडीने या रस्त्यांवरील दुरुस्तीची कामे हाती घेण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवालाची रक्कम गुजरातमधील कंपनीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शनिवारी (ता. २४) रात्री जप्त केलेली 'हवाला'मार्गे पाठवली जाणारे एक कोटी ६८ लाख रुपये गुजरात येथील एका कंपनीची असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी कंपनीच्या मॅनेजरकडे कसून चौकशी केली आहे. एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली होती याचा शोध घेतला जात आहे. हवाला कंपनीचे मालक धीरजभाई पटेल यांच्याकडेही सोमवारी चौकशी करण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिरसरातून व्ही. आर. एल. कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून बेंगलोरकडे जाणाऱ्या भरत जयंतीलाल पटेल (वय ४६), प्रकाश चर्तुगिरी गोस्वामी (वय ३६), महेश विक्रमसिंह रजपूत- चव्हाण (वय २३), रमणसिंह शंकरसिंह चव्हाण उर्फ रजपूत (वय २५ सर्व रा. सध्या शाहूपुरी, मूळ रा. गुजरात) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले होते. त्यांच्याकडून १ कोटी ६८ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. शनिवारी रात्री ८ वाजता या चौघांना ही रक्कम कंपनीच्या शाहूपुरी कार्यालयात देण्यात आली होती. ही रक्कम गुजरात येथील शैलेंद्र पटेल अँड कंपनीची असल्याचे तपासात समोर आले होते. या कंपनीचे मालक धीरज पटेल यांना पोलिसांनी अहमदाबाद येथून कोल्हापुरात बोलवले आहे. दरम्यान, या कंपनीचे कोल्हापुरातील कामकाज अश्विन पटेल, अजित पटेल, निकेश पटेल हे पाहत होते. यापैकी नीकेश पटेल याच्याकडे पोलिसांनी रविवारी दिवसभर चौकशी केली. अटक केलेल्या चौघांचे फोन पोलिसांनी जप्त केले होते. या फोनचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर उपसा केंद्रातील इलेक्ट्र‌िकल व गळती दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने सोमवारी (ता. २६) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

सोमवारी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने त्या कालावधीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने इलेक्ट्र‌िकलचे काम हाती घेण्यात येणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्राच्या सबस्टेशनमधील इले​क्ट्रिकल पंप दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्याचवेळी शिंगणापूर जॅकवेलजवळील एक हजार मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनवरील गळतीच्या दुरुस्तीचे कामही करण्यात येणार आहे.

त्यामुळे ए, बी, सी, डी व ई अशा पाचही वॉर्डमध्ये म्हणजेच पुर्ण शहराला सोमवारी या दुरुस्तीचा फटका बसणार आहे. दुरुस्तीची पुर्वतयारी करण्यात आली असल्याने सोमवारी रात्रीपर्यंत काम पुर्ण होईल. त्यानंतर पाणी उपसा सुरू करण्यात येऊन मंगळवारपासून सर्व भागात पाणी पुरवठा होईल, याची काळजी घेण्यात येणार आहे. मात्र मंगळवारी सर्व ठिकाणी पाण्याची मागणी वाढणार असल्याने अनेक भागात अपुरा पाणी मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज सांगलीत मराठा एकवटणार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी निवडण्यात आलेल्या पाच मुली मध्यवर्ती बसस्थानकाकडून येताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून राम मंदिर भागात मोर्चात सहभागी होणार आहेत.

विश्रामबागमधील क्रांतीसिंहाच्या पुतळ्याला, कर्मवार भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दुसऱ्या पाच मुलींचे पथक निश्चित करण्यात आले आहे. मोर्चासाठी निश्चित करण्यात आलेला सुमारे तीन किलोमीटरचा मार्ग आणि त्यालगतच्या पसिरात स्पीकर्स लावण्यात आले आहेत. त्या स्पिकरवर वाहतुकीच्या बदलाची माहिती, शाहिरी पोवाडे वाजण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, पोलिस बंदोबस्त सोमवारी सायंकाळीच आपापल्या जागेवर तैनात झाला होता. अन्नदान, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या संघटनांनी आपले स्टॉल उभे केले आहेत. संपूर्ण शहर आणि मोर्चाचा तीन किलोमीटरचा मार्ग भगव्या झेंड्यांनी भगवामय झाला आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी काहीजण सोमवारी सायंकाळीच सांगलीत दाखल होताना दिसत होते. सोमवारी सायंकाळी कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली.

कोपर्डी घटनेचा निषेध, मराठा समाजाचे आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी सांगली सज्ज झाली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासह अवघा जिल्हा मोर्चामय झाला आहे.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या जत तालुक्यातील उमेदीपासून सांगलीपर्यंतचे अंतर सुमारे दोनशे किलोमीटर आहे. उमदीपासून ते शिराळ्याच्या दुसऱ्या टोकापर्यंतचा मराठा समाज पहाटे चार वाजताच सांगलीच्या दिशेने निघणार आहे. सकाळी सातपासूनच मोर्चाच्या मार्ग गर्दीने फुलायला सुरू होईल, असे चिन्हे दिसत आहेत. शहरात कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व वाहनांच्या पार्किंगचे काटेकोर नियोजन केले आहे. मिरज गांधी चौकातून मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांशिवाय इतर वाहनांना सोडण्यात येणार नाही. मोर्चाच्या दिशेने येणाऱ्या सर्व वाहनांना त्याच मार्गावर पार्किंगची सोय केली आहे. पार्किंग जागा भरेल त्या प्रमाणे पार्किंग पॉर्इंट मागे-मागे जाणार आहेत.

मोर्चात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे २५ टँकरची सोय करण्यात आली आहे. मोर्चा मार्गावर कोणताही कचरा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चानंतर झालेला कचरा आंदोलक स्वतः गोळा करणार आहेत.


अशी आहे मोर्चाची तयारी

जिल्ह्यातील ३७४ शाळांकॉलेजांना सुट्टी.

स्वयंसेवक ५ हजार, ३० रुग्णवाहिका तैनात

मुख्य मार्गावर ९०० स्वयंसेवक,२०० प्राध्यापक

व्हिडिओ चित्रणसाठी ५ ड्रोनकॅमेरे

महिला व पुरुषांसाठी ४०० फिरती स्वच्छतागृहे

झेंडे, टोप्या, शर्ट वाटप आणि विक्रीचे स्टॉल.

महाडीक संस्थेकडून दोन लाख पाण्याच्या बॉटल्या

मुस्लिम समाजाकडून पाच लाख पाण्याची पाकिटे

कॉलेज कॉर्नरला सावकार गणेशोत्सव मंडळातर्फे अन्नदान


राम मंदिर चौकात व्यासपीठ

मोर्चाचे मुख्य व्यासपीठ राम मंदिर चौकात असेल. व्यासपीठावर श्रद्धांजली, निवेदन वाचन होईल. तीन मुलींचे भाषण आणि राष्ट्रगीत, असा एकूण तीस मिनिटांचा कार्यक्रम असेल.

अशी असेल पार्किंगची व्यवस्था

मोर्चाच्या मुख्यमार्गाकडे येणारे सर्व उपमार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असतील. मिरजेकडील वाहतूक मिरजेतील गांधी चौकात, कोल्हापूरकडून येणारी वाहतूक अंकली फाटा, इस्लामपूरकडून येणारी वाहतूक टोलनाका आणि तासगावकडून येणारी वाहतूक सांगली कॉलेज कॉर्नरपर्यंत असेल. या ठिकाणाहून पुढे मोर्चासाठी आलेली दुचाकी आणि चारचाकी हलकी वाहनेच मोर्चा निघण्याच्या ठिकाणापासून काही अंतरापर्यंत सोडली जातील.

मोर्चासाठी येणाऱ्या दुचाकी- मिरज रोडवर चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, कांतीलाल शहा पुरुषोत्तम शाळा, विलिंग्डन महाविद्यालयावर पार्किंग.

मोर्चासाठी येणारी चार चाकी वाहने- नवीन प्रशासकीय इमारत, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, संजय भोकरे इन्स्टिट्यूटवर पार्किंग.

कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकींसाठी दामाणी हायस्कूल, मालू हायस्कूल, राजमती ग्राऊंडवर पार्किंग. चारचाकी वाहनांसाठी शंभर फुटी रस्त्याचा अर्धा भागावर पार्किंग असेल.

इस्लामपूर मार्गे येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी इदगाह मैदान, मल्टीप्लेस, तात्यासाहेब मळा येथे पार्किंग. तर दुचाकीसाठी करीता सांगलीवाडीची चिंचबाग, वैरण अड्डा, नदीचा घाट, टिळक चौकात पार्किंग.

कर्नाळ, तासगाव मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता वसंतदादा शेतकरी साखर कारखाना, बुधगाव कॉलेज, वसंतदादा मार्केट यार्ड, कारखान्याचा गाडी अड्डा, यशवंतनगरमधील आंबा चौक येथे चारचाकी आणि दुचाकीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर पार्किंग असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी पट्ट्यात पावसाचा जोर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

परतीच्या मान्सूनने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोर धरला आहे. सोमवारी तासगाव, खानापूर, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत दमदार हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात मान्सून आणि परतीच्या मान्सूनने संपूर्ण जिल्ह्याला व्यापले असले तरी अद्यापही काही तालुक्यात ३२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरुच आहे. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे मात्र टँकरच्या बंद होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा पावसाच्या सरीवर सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप आहे. परंतु, पूर्व आणि उत्तर भागात पावसाचा जोर आहे. सोमवारी दुपारीच खानापूर, आटपाडी भागात पावसाला सुरुवात झाली होती तर सायंकाळी तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. जतमध्ये सुमारे अर्धातास एकसारखा पाऊस झाला.

सांगली जिल्ह्यात अद्यापही ३२ टँकरद्वारे ३७ गावे आणि १५६ वाड्यांवरील ७८ हजार ८२७ बाधित लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तासगाव ९, आटपाडी ९, जत ३, कवठेमहांकाळ ३ व खानापूर तालुक्यात ८ टँकर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images