Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

समरजितसिंह घाटगेचेअरमनपदी बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अपेक्षेप्रमाणे समरजितसिंह घाटगे यांची तर व्हाईस चेअरमनपदी अमरसिंह घोरपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन संचालकांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख होते.

शाहू साखर कारखान्याची नुकतीच निवडणूक झाली.यामध्ये सभासदांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत सत्ता त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर लगेचच गुरूवारी दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत चेअरमनपदासाठी समरजितसिंह घाटगे यांचे नाव ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनी सुचविले. त्यास धनंजय पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी अमरसिंह घोरपडे यांचे नाव युवराज पाटील यांनी सुचविले त्यास यशवंत माने यांनी अनुमोदन दिले. यावेळी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक सुनील चव्हाण, कार्यकारी संचालक विजय औताडे, सेक्रेटरी एस.ए.कांबळे व नूतन संचालक मंडळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साखरेचा व्यापार थंडावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर वाढू नयेत यासाठी सरकारकडून साठा नियंत्रणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर गुरुवारी साखर व्यापार थंडावला. काही साखर कारखान्यांनी दोन आठवड्यापूर्वीच्या दरापेक्षाही कमी दरात साखर विक्री काढली. पण ती खरेदी करण्यास कुणी व्यापारी पुढे आले नसल्याचे चित्र आहे.

गुरुवारी एक्साईज ड्युटीसह प्रति क्विंटल ३४०० ते ३४७५ रुपये इतका दर असतानाही साखर खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्येच उत्साह नसल्याने दर आणखी कमी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नियंत्रणाबाबत राज्य साखर संघाच्यावतीने हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात येणार आहे.

साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबरअखेरपर्यंत ३७ टक्के साखर शिल्लक ठेवण्याची अट घातली. राज्य सरकारनेही कारखान्यांतील साखर बाहेर यावी यासाठी कारवाई सुरू केली. कोल्हापुरातील बहुतांश कारखान्यांमध्ये ३७ टक्क्यापेक्षा जास्त साखरसाठा आहे. हा साठा विक्री करण्यासाठी केवळ आठ दिवस आहेत. तरीही सरकारच्यावतीने कारवाई सुरू केल्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. कारवाईला घाबरुन जाऊन कारखान्यांनी कमी दरात साखर विक्री करावी अशी सरकारची रणनिती दिसते.

आता व्यापारी साखर उठाव करतील, अशी अपेक्षा होती. मात्र काही व्यापाऱ्यांनी सप्टेंबरच्या प्रारंभी ३५०० ते ३५५० रुपयांनी खरेदी केलेली साखर अजून बाहेर विक्री झालेली नाही. गुरुवारी काही कारखान्यांनी स्वतः दर कमी करुन प्रति क्विंटल ३४७५ रुपये इतका ठेवलेला असतानाही कुणी व्यापारी खरेदीसाठी उत्सुक नसल्याचे चित्र होते.

यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीमध्ये हंगाम केव्हा सुरू करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये प्रारंभी दसरा व शेवटी दिवाळी असल्याने ऊसतोडणी मजूर त्यानंतरच येण्याची शक्यता असते. त्यामुळे हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू करावा अशी कारखानदारांची इच्छा आहे. त्यातून ऊसाला योग्य रिकव्हरी मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर कमी झाले आहेत. पण मागणीच नसल्याने व्यापारी साखरेचा उठाव करत नसल्याची परिस्थिती आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली साखर अजून विक्री झालेली नाही. त्यामुळे ही नवीन साखर खरेदी केली जात नाही.

- अतुल शहा, साखर व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानासाठी जाचक अटी नकोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या १५ वर्षांपासून राज्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा देणारा अनुदान मंजुरीचा आदेश दिला. मात्र त्यासाठी घालण्यात आलेल्या अटी इतक्या जाचक आहेत की 'अनुदानाची भीक नको पण कुत्रं आवर' असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरच्या जाचक अटींचा फास शिक्षकांनी का सोसायचा असा सवाल करत हा अध्यादेश रद्द न केल्यास २ ऑक्टोबर रोजी राज्यातील शिक्षक संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा कृती समितीचे मार्गदर्शक आणि शिक्षक संघटनेचे नेते भगवानराव साळुंखे यांनी दिला.

विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान मंजुरीच्या आदेशातील जाचक अटींविरोधात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ​सुमारे दहा हजार शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदेश रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली. दसरा चौक येथून व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला. यावेळी मोर्चाला सभेचे स्वरूप आले. सरकारच्या जाचक अटींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'आदेश नव्हे काळ्या पाण्याची शिक्षा...', 'आमच्यावरच कुऱ्हाड का...' 'बिनपगारी किती दिवस राबायचे' अशा घोषणांनी परिसर दणदणून गेला. पालकांनीही मोर्चात सहभाग देत शिक्षकांना साथ दिली. विद्यार्थी शिक्षकांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले.

शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना साळुंखे म्हणाले, 'एकीकडे अनुदान टप्प्याने देण्याची मागणी मान्य करायची आणि आदेशात अन्यायकारक अटी लादायच्या असा दुटप्पी व्यवहार सरकारने केला आहे. नव्या आदेशातील अटींमध्ये अनुदानासाठी पात्र ठरवलेल्या शाळांमध्ये बायोमेट्रीक पद्धत राबवावी असे म्हटले आहे. मात्र राज्यातील कोणत्याही अनुदानित शाळांमध्ये अशी पद्धत नसताना विनाअनुदानित शाळांनाच हे बंधन घालणे योग्य नाही. शंभर टक्के अनुदानास पात्र शाळांनाही २० टक्क्यांच्या निकषात समाविष्ट करण्यात आल्यामुळे अशा शाळांचे नुकसान होणार आहे. अनुदान पात्रतेसाठी दहावीचा निकाल सलग तीन वर्षे शंभर टक्के लागला पाहिजे ही अटदेखील जाचक आहे.

सर्व सुविधा असलेल्या अनेक शाळांमध्येही शंभर टक्के निकाल लागणे शक्य नाही. त्यामुळे ही अट विनाअनुदानित शाळांना लागू करणे योग्य नाही. अशाप्रकारे अटी लादणे ही शिक्षकांची क्रूर थट्टा आहे.'

मोर्चात मुख्याध्यापक संघाचे चेअरमन व्ही. जी. पवार, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, सचिव प्रकाश पाटील, खंडेराव जगदाळे, बबन पेटकर, एस. एम. पाटील, गजानन काटकर, सुनील कल्याणी, प्रेमकुमार ​बिंदगे, संतोष आयरे, रजनी कुंभार यांनी नेतृत्व केले.

सरकारने अनुदान देण्याचे मंजूर करत असताना अशक्य अटी घातल्या आहेत. त्यामुळे राज्यातील १६०० शाळांतील शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदेश रद्द न केल्यास शिक्षक संघटना, परिषद एकत्र येऊन लढा देतील. त्याचा पहिला टप्पा २ ऑक्टोबरच्या आंदोलनात दिसून येईल.

- भगवानराव साळुंखे, मार्गदर्शक, शिक्षक कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पेट्रोलपंपाची जागा कशी विकली?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिरोहोंडाचे शोरुम मार्केट यार्डमध्ये कसे आले? नवीन पेट्रोल पंपासाठी जागा शोधली जात असेल तर पेट्रोलपंप असलेली जागा विनापरवानगी कशी देण्यात आली? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती गूळ उत्पादक सभासद, माजी महापौर सुनील कदम यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण वार्षिक सभा झाली. नूतन अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत कदम यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उपसभापती विलास साठे यांनी, 'शेतकऱ्यांसह नागरिकांच्या सोईकरिता शाहू मार्केट यार्डचे मुख्य प्रवेशद्वार पूर्ववत सुरू करण्यात येईल,' असे सांगितले.

कदम यांनी समितीच्या कारभारावर टिकेची झोड उठवली. ते म्हणाले, 'दिलेले प्लॉट काहींनी बदल करून इतरांना कसे दिले? दरवाजे बंद करून केवळ तीन लाख उत्पन्न मिळणार असेल, ते कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा जास्त असेल तर हा प्रकार बंद करा. या प्रश्नांमागे समितीला फायदा व्हावा हाच हेतू आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधावेत.'

यावर उपसभापती कदम म्हणाले, 'मुख्य रस्त्यालगत असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुळाला मिळालेल्या जीआय मानांकनापासून (भौगोलिक उपदर्शन) मिळणाऱ्या फायद्याची अन्न व औषध प्रशासन तसेच गूळ उत्पादन प्रक्रियेतील तज्ज्ञांशी चर्चा करुन लवकरच गूळ उत्पादकांची बैठक घेणार आहे.'

यामध्ये समितीच्या कारभाराची माहिती दिल्यानंतर आयत्यावेळच्या प्रश्नांची विचारणा करण्यात आली. माजी महापौर कदम, उत्तम पाटील, प्रसाद वळंजू यांनी गुळाच्या जीआय मानांकनामुळे होणाऱ्या फायद्याची माहिती विचारली. तर सिताराम मोरे, हणमंत शिंदे यांनीही गुळाबाबतचे प्रश्न विचारले. उपसभापती साठे यांनी सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. 'गूळ बॉक्सचे वजन वजा केले जात असेल तर तो बॉक्स परत केला पाहिजे. तसेच सहा टक्क्यांपेक्षा जास्त अडत घेतली जात असेल तर ती निदर्शनास आणून द्यावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल', असे साठे यांनी सांगितले.

सुनील कदम यांनी बाजार समितीचे बंद केलेल्या दरवाजांचा विषय उपस्थित केला. या बंद दरवाजामुळे समितीच्या उत्पन्नाला फटका बसत असून दोन दरवाजांवर ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, 'भाजी मार्केटमध्ये सुधारणा झाली पाहिजे. कोल्ड स्टोअरेजबाबतही तातडीने विचार झाला पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा परिसर सुशोभीत करण्याची गरज आहे. येथील विकास कामांना चालना देण्यासाठी समितीचा परिसर महापालिकेकडे हस्तांतरित करावा.

प्रसाद वळंजू यांनी नियमनमुक्तीमुळे समितीचे उत्पन्न कमी होणार असून त्याबाबत संचालक मंडळाने प्रयत्न करावेत.'

यावेळी संचालक भगवान काटे, मोहन सालपे यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् उद्धव भावूक झाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवंगत शिवसेनाप्रमुख, बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्याच पूर्णाकृती पुतळ्याचे काम करवीर तालुक्यातील शिये येथे सुरू आहे. गुरूवारी (ता. २२) शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिये येथे पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. तासभराच्या पाहणीत उद्धव यांनी शिल्पकार संताजी चौगले यांना काही सूचनाही केल्या. ठाकरे यांचा पुतळा न्याहाळताना उद्धव भावूक झाल्याचे दिसले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पहिलाच, भव्य पुतळा मुंबईत उभारण्यात येणार आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचे काम शियेतील शिल्पकार संताजी चौगले आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्याची पाहणी करण्यासाठी थेट शिये गाठले. उद्धव हे गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास खासगी विमानाने उजळाईवाडी विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर होते. आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह ते शियेतील हनुमाननगरात शिल्पकार चौगुले यांच्या घरी पोहोचले. उद्धव यांनी तासभर बारकाईने पुतळ्याची पाहणी केली. ब्राँझ धातूपासून बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे काम चौगले गेले वर्षभर करीत आहेत.

तब्बल २२ फूट उंच आणि ५ टन वजनाचा हा पुतळा असेल. त्याच्या चेहऱ्याचे काम अंतिम टप्यात आहे. पुतळ्याचे मेणाचे आणि फायबरचे काम पूर्ण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शरीररचना, त्यांचे हावभाव, त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ, पेहरावाच्या बरकाव्यांकडे लक्ष दिले आहे. पुतळ्याच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा आणि बाळासाहेबांची केसांची रचना याबाबत उद्धव यांनी काही बदल सुचवले.

व्यक्तीशिल्पांमध्ये नावलौकिक

व्यक्तीशिल्प तयार करण्यामध्ये शिल्पकार संताजी यांचा नावलौकिक आहे. त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे यापूर्वी साकारले आहेत.

कामाबाबत गोपनीयता

पुतळ्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. सद्यस्थितीत ते अंतिम टप्प्यात आहे. मात्र याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली गेली आहे. पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंनी गोपनीयता बाळगली. ठराविक कार्यकर्त्यांसह ते शियेत आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी सांगलीत आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये लाखोंच्या गर्दीचे मूक मोर्चे निघत असतानाच 'मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशी चिठ्ठी लिहून ठेऊन सांगलीतील जतमध्ये एका ३५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

बाळकृष्ण लक्ष्मण चव्हाण असे मृत इसमाचे नाव आहे. जत तालुक्यातील उटगी गावातील रहिवासी असलेले चव्हाण तीन दिवसांपूर्वी नातेवाईकांना भेटायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. प्रथम ते सोलापूरमधील मंगळवेढा येथे राहत असलेल्या बहिणीकडे गेले. तिथे त्यांनी एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर सोलापूरातील अन्य काही नातेवाईकांच्या घरीही ते गेले. तिथून बुधवारी सायंकाळी ते उटगीकडे निघाले. मात्र, घरी न परतता ते जतला आले आणि तिथेच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गुरुवारी सकाळी जत-वळसंग मार्गावर असलेल्या केंचराया मंदिरामागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.

आत्महत्या करण्यापूर्वी 'मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे हाल होतील' अशा आशयाची चिठ्ठी चव्हाण यांनी लिहून ठेवली आहे, असे या प्रकरणी फिर्याद देणारे मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मच्छिंद्र बाबर यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी बाळकृष्ण यांच्या खिशात आढळलेली चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्याआधारे पुढील तपास सुरू केला आहे. बाळकृष्ण यांच्या पश्चात पत्नी वैशाली, आई सुसाबाई, दोन मुले राघवेंद्र (८) व लक्ष्मण (१२) असा परिवार आहे.

सरकारला आणखी किती बळी हवेत: नितेश राणे

काँग्रेस आमदार आणि स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी ट्विटरवरून बाळकृष्ण चव्हाण यांना श्रद्धांजली वाहताना चव्हाण यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी भावना व्यक्त केली आहे. सरकारला आणखी किती बळी हवे आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतातरी मराठा समाजाचा आक्रोश ऐकावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्तरा’ने मिटविलीशेतकऱ्यांची चिंता

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापुर शहर आणि जिल्ह्यात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. चिंतेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न उत्तरा ने मिटविला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांत सोलापुरात सव्वादोन इंच पाऊस झाला आहे.

सोलापुर शहर आणि जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. खरीपाच्या पेरण्यांना जीवदान मिळण्याबरोबरच रब्बीच्या पेरण्यासाठी सुद्धा या दमदार पावसाची साथ लाभणार असल्यामुळे बळीराजाची चिंता बऱ्याचअंशी दूर झाली आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत २४.७ मी. मी पावसाची नोंद झाली होती. आणखी पाऊस सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अक्कलकोट, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा या ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. चांगला पाऊस झाल्यास येत्या काही दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून विसर्ग वाढला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना जलाशयात २८ हजार ७१८ क्युसेकने पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे एका फुटावर ठेवण्यात आलेले कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे शनिवारी दुपारी दीड वाजता तीन फुटांवर उचलून दरवाजातून २६ हजार ६५४ व पायथा वीजगृहातून २000 असे एकूण २८ हजार ६५४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. सध्या शिवसागर जलाशयात १०३.१९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.

शनिवारी २४ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे ६, नवजा १२, महाबळेश्वर २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणीपातळी २११६.११ फूट इतकी झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे सहा दरवाज एका फुटावर ठेवण्यात आले होते. मात्र, दुपारनंतर पावसाला सुरूवात झाल्याने रात्रीच्या वेळी जलाशयातील पाण्याची आवक वाढली. परिणामी शनिवारी पहाटे साडेचार वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावरून साडेचार फुटांपर्यंत उचलण्यात आले होत. शनिवारी दिवसभरात पावसाने कमी-अधिक प्रमाण होत असल्याने पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे शनिवारी दुपारी दीड वाजता पुन्हा धरणाचे सहा दरवाजे कमी करण्यात येवून तीन फुटावर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंडिया गेटवरहीमराठ्यांचा मोर्चा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

महाराष्ट्रात मराठा मोर्चाचा हुंकार घुमत असतानाच आता दिल्लीच्या इंडिया गेटवर राजकारणविरहित मराठा महामोर्चा काढण्यासाठी दिल्लीस्थित मराठा रहिवासी सरसावले आहेत. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली असल्याची माहिती नवी दिल्लीस्थित मराठी रहिवासी प्रदीप पाटील यांनी येथे दिली आहे.

दिल्लीतील मराठा मोर्चाबाबत रविवारी, २५ रोजी महाराष्ट्र सदनमध्ये प्रमुख आयोजकांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत नियोजनावर चर्चा होणार आहे. उत्तर भारतातील प्रत्येक मराठा बांधवापर्यंत या मोर्चाची माहिती पोहोचविण्याचे काम जिकिरीचे आहे. त्यासाठी येणारा खर्च करण्यासाठी आपल्यातील काहीजण स्वत:हून पुढे सरसावले आहेत. यासाठी प्रत्येकी लाख दोन लाख रुपये वैयक्तिक खर्च करण्याचीही अनेकांनी तयारी दर्शविली आहे. प्रशासकीय सेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेले सुमारे पाच हजार विद्यार्थीही या मोर्चात सहभागी होणार आहेत, असेही पाटील म्हणाले.

मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले प्रदीप पाटील म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील प्रत्येक मराठा बांधवाची माहिती गोळा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. नवी दिल्ली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशातही मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मोर्चात किमान पंचवीस हजार बांधव तरी नक्कीच जमतील.

या पूर्वीही दिल्लीतील सुमारे पाच हजार मराठा बांधव एकत्र आले होते. त्यानंतर एकमेकांची ओळख काढत उत्तर भारतीय मराठा समाजाच्या बांधवांची अंदाजे संख्या मोजली गेली तेव्हा हा आकडा तीस हजारांपेक्षा जास्त होता. नवी दिल्लीतील मोर्चानंतर या आकड्यांची माहिती कदाचित वाढू शकते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा मार्ग ‘नो व्हेईकल झोन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेतील संशयितांना शिक्षा द्या, र मराठा समाजाला आरक्षण आणि आट्रॉसिटी कायद्यातील बदलासाठी १५ ऑक्टोबरला कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विक्रमी संख्या उपस्थित राहण्याच्या शक्यतेमुळे मोर्चा विनाअडथळा पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोर्चा मार्ग 'नो व्हेईकल झोन' करण्याचे ठरवले आहे. याशिवाय सोशल मीडियातून उलटसुलट पोस्ट टाकून मोर्चाबाबत अपप्रचार करणाऱ्यांवरही सायबर सेलची विशेष नजर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांना दिली. ते शुक्रवारी(ता. २३) पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा संघटनांचा कोल्हापुरातील मूक मोर्चा १५ ऑक्टोबरला निघणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या मराठा मोर्चांमध्ये कोल्हापुरातील मोर्चाला विक्रमी लोक उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. सकल मराठा समाजाच्या नेत्यांशी पोलिसांची बैठकीची पहिली फेरी झाली आहे. यामध्ये गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा मार्ग ठरला आहे. या मार्गावरील रस्ते अरुंद आहेत, त्याचबरोबर गांधी मैदान आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही पुरेशी जागा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर मोर्चा मार्गात वाहनांचे अडथळे येऊ नयेत, यासाठी मोर्चा मार्ग नो व्हेईकल झोन करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, 'मराठा संघटनांनी मोर्चासाठी १५ लाख लोक येतील असा अंदाज वर्तवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मराठा समाज आहे, त्यामुळे नक्कीच मोठ्या संखेने मोर्चा निघणार. मोर्चातील लोकांना रस्त्याने चालताना पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी संपूर्ण मोर्चा मार्ग नो व्हेईकल झोन करण्यात येईल. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवरील उपनगरांमध्येच पार्किंगची सुविधा केली जाईल. याबाबत पुढील आठवड्यात मराठा संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करू.' मोर्चा दरम्यान वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण विभागाशी स्वतंत्र बैठक होणार आहे. यामध्ये पार्किंगची ठिकाणेही निश्चित केली जाणार आहेत.

सोशल मीडियावर नजर

राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चे शांततेत निघत असताना गेल्या दोन दिवसांपासून काही लोक सोशल मीडियात मोर्चांबाबत अपप्रचार करीत आहेत. मराठा मोर्चांमधील शांतता भंग करण्यासाठी काही मेसेज जाणीवपूर्वक फॉरवर्ड केले जात आहेत. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. सायबर सेलने व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर लक्ष्य केंद्रीत केले असून, संशयास्पद मेसेज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक देशपांडे यांनी दिला आहे.

००००

मोर्चासाठी साधारणत: १५ लाख लोक येण्याची शक्यता मराठा संघटनांनी वर्तविली आहे. हा मोर्चा सुरळीत होण्यासाठी पोलिस प्रशासन तयारीला लागले आहे. मोर्चा मार्ग अरुंद असल्याने १५ ऑक्टोबरला हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचे थोरपण ओळखणारे डॉ. बाळकृष्ण

$
0
0

सध्याच्या पाकव्यक्त पंजाबमधील मुलतानचे रहिवाशी आणि लंडन विश्वविद्यालयाचे पीएचडीधारक डॉ. बाळकृष्ण यांनी १० वर्षे ध्यास घेऊन लिहिलेले चार खंडातील इंग्रजीतील शिवचरित्र म्हणजेच 'शिवाजी द ग्रेट' हा ग्रंथ. या ग्रंथाच्या संपादित आवृत्तीचे प्रकाशन आज (ता.२४) माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होत आहे. ग्रंथाचे संपादक इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याशी यानिमित्ताने साधलेला संवाद...


प्रश्नः डॉ. बाळकृष्ण यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेले शिवचरित्र संपादित करावेसे का वाटले ?

डॉ. बाळकृष्ण हे मूळचे सध्याच्या पाकिस्तानव्याप्त पंजाब भागातील मुलतान प्रातांतील. ते त्यावेळच्या लंडन विश्वविद्यालयाचे पीएचडी असलेले उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व. लंडनमधून ते राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोल्हापूर संस्थानात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची ओढीने भारावून जाऊन डॉ. बाळकृष्ण यांनी १० वर्षे ध्यास घेऊन हे शिवचरित्र लिहिले. शिवरायांचा प्रेरणादायी इतिहासच स्वातंत्र्यलढ्यासाठी आवश्यक आहे हे ओळखणारे डॉ. बाळकृष्ण हे पहिले व्यक्ती. म्हणूनच हे शिवचरित्र लोकांच्या समोर जावे, म्हणून मी हा ग्रंथ संपादित करण्याचे ठरवले.


'शिवाजी द ग्रेट' या शिवचरित्राचे वेगळेपण काय आहे ?

डॉ. बाळकृष्ण यांनी १९३२ मध्ये पहिला खंड 'शहाजी' नावाने प्रकाशित केला. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचे कर्तृत्व ओळखून कर्नाटक मोहीम तसेच स्वराज्याची प्रेरणा ही शहाजीराजे व जिजाऊ यांची होती हे त्यांनी सिद्ध केले. शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवभारतातील शिक्षण शिवरायांना दिले त्या संदर्भाची दखल त्यांनी प्रथम घेतली. डॉ. बाळकृष्ण यांनी 'एज्युकेशन ऑफ शिवाजी' हा टॉपिक लिहिला. राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजींच्या फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असल्याचे सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डच,पोर्तुगीज, इंग्रजी, संस्कृत, मोडी, पारशी या संदर्भ साधनांचा प्रथमच उपयोग करून लिहिलेले हे पहिले शिवचरित्र आहे. दोन, तीन आणि चार या खंडांमध्ये त्यांनी अस्सल संदर्भ साधनांतून शिवाजी महाराज कसे ग्रेट होते याबाबत विवेचन केले आहे. शिवाजींची तुलना त्यांनी नेपोलियन, अलेक्झांडर, ज्युल‌िअस सीझर ,हनिबॉल आदी जगप्रसिद्ध योद्ध्यांशी केली आहे.

.............

प्रश्नः या ग्रंथाच्या संपादनानंतर तुमचा पुढील उपक्रम कोणता आहे ?

डॉ. बाळकृष्ण यांना त्या काळात जी संदर्भ साधने उपलब्ध झाली, त्यामध्ये काही फर्मान, कागदपत्रे बोगस होती. परंतु त्या संदर्भातील अस्सल संर्दभ साधने आता उपलब्ध झाल्याने माझ्या ७० पानांच्या प्रस्तावनेत काही संर्दभासह दुरुस्त्या केल्या आहेत. डॉ. बाळकृष्णांचा पत्रव्यवहार, संदर्भसाधने यांचा नव्याने शोध घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शिवचरित्राची अस्सल संदर्भसाधने मूळ स्वरूपात एकत्रित करून पारसी, डच, इंग्रजी, संस्कृत, मोडी ,तमीळ आदी भाषांतील साधने संपादित करून खंडाच्या स्वरुपात प्रकाशित करण्याचे काम सुरू आहे.



डॉ. बाळकृष्ण यांच्याबद्दल काय सांगाल ?

राजर्षी शाहू महाराजांच्या सांगण्यावरून डॉ. बाळकृष्ण हे राजाराम कॉलेज येथे प्राचार्य म्हणून रूजू झाले. आर्य समाजाने लंडन येथे असणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांना १९२२ ला कोल्हापूर येथे बोलवले. रावबहादूर डोंगरे, सी. आर. तावडे, भास्करराव जाधव, माधवराव बागल यांच्या सहवासात ते राहिले. १९२२ ते १९४० दरम्यान त्यांनी कोल्हापुरात वास्तव्य केले. गगनबावडा येथील सध्याचे जिल्हा परिषदेचे विश्रामधाम म्हणजेच डॉ. बाळकृष्ण यांचा 'कृष्णकुंज' बंगला. त्यांचा मृत्यू कोल्हापूरमध्ये वयाच्या ५७ व्या वर्षी झाला. 'शिवाजी द ग्रेट' असे म्हणणारे ते पहिले संशोधक होत. शिवाजींच्या नावाचे विद्यापीठ निघावे याची प्रथम संकल्पना डॉ. बळकृष्ण यांनीच मांडली. त्यांनी मुंबईचा किल्ला , राजापूर, सुरत, डच, इंग्रजांच्या वखारींची छायाचित्रे खूप कष्टाने मिळविली. त्यांनी परकीय प्रवाशांचे वृत्तांत वापरले. नेदरलँड येथील बटेरिया येथून डच कागदपत्रे भाषांतर करून घेतली. खूप कष्टातून त्यांनी शिवचरित्र साकारले. नुकतीच डॉ. बाळकृष्ण यांची डायरी मला मातोश्री वृद्धाश्रमाचे शिवाजीराव पाटोळे यांनी दिली. डॉ. बाळकृष्ण यांची सुशीला नावाची मुलगी या वृद्धाश्रमात रहात होत्या. त्यांच्या बॅगेत ही डायरी होती.

राहुल मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचेने डागाळली ‘खाकी’

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

अवैध व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी इचलकरंजीमधील पोलिस ठाण्यात चालणारी हप्तेबाजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर चव्हाट्यावर आली आहे. गुटखा व्यावसायिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात जाळे पसरलेल्या राजू पाच्छापुरे याची पोलिसाला अडकवण्याची परंपरा अखंडीत आहे. आजपर्यंत पोलिस लाच घेण्यात आघाडीवर होते. परंतु पोलिस निरिक्षकानेच लाच मागण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे पोलिस नाईक विष्णू शिंदे हा बदली झाली असतानाही केवळ वसुलीसाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होता. याला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची उघड चर्चा पोलिस वर्तुळातूनच ऐकावयास मिळत आहे.

लाचखोरीतून 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्यालाच काळीमा फासली जात असल्याची घटना शुक्रवारी इचलकरंजीत घडली. वादग्रस्त पोलिस म्हणून विष्णू शिंदे याची ओळख आहे. त्याच्याविरोधात वरिष्ठांकडे अनेक तक्रारी दाखल आहेत. असे असतानाही वरिष्ठांचेही कारवाईसाठी हात बांधल्याने खाकी वर्दी लाचखोरीत 'सैराट' झाली आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहेत. गुटख्यातून गावभाग व शिवाजीनगर पोलिसांना महिन्याकाठी लाखो रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचे मोबाईल रेकॉर्डींग शुक्रवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात ऐकावयास मिळत होते. खुद्द तक्रारदाराने प्रसारमाध्यमांना याची माहिती दिली. गुटखा व्यवसायात अनेकजण असताना आकसबुध्दीने आपल्यावरच कारवाईचा बडगा उगारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे लाचखोरी विरोधात तक्रार दाखल करावी लागल्याचे त्याने सांगितले.

पोलिस निरिक्षक सर्जेराव गायकवाड हे चार महिन्यापूर्वीच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रुजू झाले आहेत. सुरुवातीपासून त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. अनेक प्रकरणात त्यांनी मारहाण करुन तोडपाणी केल्याची तक्रार वरिष्ठांपर्यंत झाली आहे. पण पाठबळामुळे गायकवाड यांचे मनोधैर्य वाढले आणि त्यातूनच खुलेआम हप्ता घेण्याची प्रवृत्ती बळावली. पाच्छापुरे याच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या जाळ्यात गायकवाड अलगद सापडले आहेत. विशेष म्हणजे सापळ्यातील काही पोलिसांसोबत पाच्छापुरे याने गायकवाड यांच्या कक्षातच हप्ता ठरविला होता. याचे मोबाईल रेकॉर्डींग तक्रारदारासाठी पुरावा ठरला.

पोलिस नाईक विष्णू शिंदे हा शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा 'कलेक्टर' म्हणून ओळखला जात होता. अनेक वर्षांपासून तो याठिकाणी ठिय्या मारुन होता. या कालावधीत त्याने कोट्यवधीची माया गोळा केल्याची चर्चा पोलिस वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. पोलिस ठाण्याच्या समोरील भागातच शिंदे याने सर्वसुविधांनीयुक्त अशा टोलेजंग बंगल्याचे बांधकाम सुरु केले असून याठिकाणी स्विमिंग पूलचीही संकल्पना आहे. ही सर्व संपत्ती त्याच्याकडे कोठून आली यासाठी त्याच्या संपूर्ण मालमत्तेची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच शिरोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला शिंदे याचा भाऊ महेश शिंदे याची कारकिर्दही वादग्रस्त असून त्याच्याही चौकशीची मागणी होत आहे.

चौकट

राजकीय वरदहस्त ?

चार महिन्यापूर्वी पोलिस नाईक शिंदे याची जयसिंगपूर येथे बदली झाली आहे. मात्र तो अद्यापही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होता. यामागे एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा आणि राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र आजच्या या कारवाईमुळे हा वरदहस्त त्याला चांगलाच भोवल्याचेही बोलले जात होते. शिंदे याच्या विरोधात अनेक तक्रारी पुढे येण्याची शक्यता असून त्या अनुषंगानेही तपास होण्याची गरज आहे.

चौकट

वरिष्ठांचे दुर्लक्षच कारणीभूत

दरम्यान, विष्णू शिंदे हा लाचखोरीत सापडल्यानंतर काही क्षणातच त्याच्या घरातील महत्वाची कागदपत्रे व मौलिक ऐवज हा एका वाहनातून तातडीने अन्यत्र हलविण्यात आला. शिंदे हा सावकारी, कार्डभिशी यासह जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय पोलिस बळावर करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. परंतु वरिष्ठांनी त्याकडे डोळेझाक केल्याने शिवाजीनगरच्या खाकी वर्दीला डाग लागल्याची चर्चा पोलिस ठाण्यात ऐकावयास मिळत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे घेऊन शिक्षकांना पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षण समितीच्या कारभारावरून सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. अधिकारी पैसे खाऊन पुरस्कार देतात असा आरोप स्थायी समिती सभेत ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केला. डॉ. उदय भट हे व्यव​स्थित काम करत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणखी चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सिग्नलमध्ये मुंबईच्या धर्तीवर डीएनसीप्रमाणे वेळ (टायमिंग) ठरवले जाईल. नवीन सिग्नलबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिली. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

महापालिका शाळांची दुरवस्था झाली आहे. मात्र प्रशासनाधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही. स्थायी समितीच्या बैठकीला प्रशासनाधिकारी प्रत‌िभा सुर्वे हजर राहत नाहीत. शिक्षक पुरस्कार कोणत्या निकषावर दिले? जिल्हा नियोजन समितीकडून ई लर्निंगसाठी ४० लाख रुपयांचा निधी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निधी परत गेला. या प्रकरणी जबाबदार अधिकारी, ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

४० हजार रुपयांसाठी जेसीबी बंद असल्याचे दीपा मगदूम यांनी निदर्शनास आणले. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी शिक्षण विभागाकडील वैद्यकीय ​बिलांचा प्रश्न मांडला. त्यावर नवीन अध्यादेशानुसार आरोग्य अधिकारी, आयुक्त यांच्याकडून वैद्यकीय बिलांची तपासणी झाल्यानंतर देण्यात असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. सुनील पाटील यांनी मटण मार्केट, कोंबडी बाजार येथील अतिक्रमणाकडे लक्ष वेधल्यानंतर लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. नगरसेविका रुपाराणी निकम यांनी झोपडपट्टीधारकांना जागा खरेदी का दिली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. मोकाट कुत्री, डुकरे पकडण्यासाठी मोहीम घेऊ. तसेच कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी जागा मिळाली असल्याचे सांगितले.

प्रवेशद्वारावर झळकणार शहराची वैशिष्ट्ये

शहराच्या प्रवेशाची ठिकाणे आ​णि प्रवेशद्वारांचे सौंदर्य खुलणार आहे. या ठिकाणी शहराच्या वैशिष्ट्यांवर आधारित पोस्टर्स लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सदस्या उमा इंगळे यांनी प्रवेशद्वारावर होर्डिंग्ज न लावता शहराची वैशिष्ट्ये दर्शविणारे पोस्टर्स लावण्याची सूचना केली.

रविवारपर्यंत मंडप काढा, अन्यथा कारवाई

नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांनी शहरातील रस्त्यावरील मांडवाकडे लक्ष वेधत तत्काळ रस्ते खुले करण्याची सूचना केली. प्रशासनाने, मंडळांना मंडप काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारपर्यंत मंडप काढले नाहीत तर कारवाई होईल. पुढील वर्षासाठी पर्यावरणपूक गणेशोत्सव व विना खड्डा मांडव यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले.

गांधी मैदानाची डागडुजी

१५ ऑक्टोबर रोजी गांधी मैदान येथून मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. गांधी मैदान येथे दलदल आहे, रस्ते खराब आहेत. नवरात्र उत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी, स्वच्छता करण्याची सूचना नगरसेविका शोभा बोंद्रे यांनी केली. गांधी मैदानातील गवत काढून डागडुजी केली जाईल. तसेच नवरात्र उत्सवापूर्वी रस्त्यांची दुरस्ती केली जाईल असे उत्तर प्रशासनाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमच्या खेळपट्टीचे तीन-तेरा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील एकमेव क्रिकेट मैदान असलेल्या शिवाजी स्टेडियमवरील खेळपट्टीचे तीन-तेरा झाले आहेत. मैदानावर क्रिकेटची खेळपट्टी होती, असे सांगण्याची वेळ आली आहे. खेळपट्टीची निगा राखण्याचे, काळजी घेण्याची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे आज ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावर शहरातील क्रिकेट खेळाडूंनी अतिशय नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर खेळपट्टी नव्याने तयार करून घेण्याची गरज या व्यक्त केली आहे. दरम्यान, खेळपट्टी रोलिंग करून दुरुस्त होईल, असे मत क्रीडाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, खेळपट्टीची अवस्था पाहता केवळ रोलिंग करून ती दुरुस्त होईल, असे दिसत नाही.

कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियमवरची खेळपट्टी लेदर बॉलवरील खेळासाठी खूप नावाजलेली होती. मैदानावर रणजी सामनेही झाले आहेत. कपिल देव, सचिन तेंडुलकर, अझर, संजय मांजरेकर, विनोद कांबळी ऋषिकेश कानिटकर यांसारख्या खेळाडूंनी शिवाजी स्टेडियमवर सामने खेळले आहेत. सध्या या मैदानाची आवस्था पाहिली, तर मोठाच काय एखादा नवोदित क्रिकेटपटूही मैदानावर खेळण्याची इच्छा व्यक्त करणार नाही.

खेळपट्टी हा क्रिकेटचा गाभा मानला जातो. खेळपट्टीच्या दर्जावरच मैदानाचा दर्जा ठरतो. शिवाजी स्टेडिमयवर आता खेळपट्टी शोधावी लागते. सध्या मैदानावर फुटबॉलचे खेळाडू सराव करतात. यापूर्वीही इतर खेळांची मुले येथे सराव करायची. पण, त्यावेळी खेळपट्टीच्या संरक्षणासाठी बांबू आणि दोरीच्या साह्याने बॅरिकेटिंग केले जायचे. पावसाळ्यात खेळपट्टीच्या सुरक्षेसाठी कोणतेही नियोजन न केल्याने खेळपट्टीच नाहिशी झाली आहे. मैदानावर गेल्या फेब्रुवारीमध्ये सर्वांत मोठी स्पर्धा झाली होती. हॉटेल कर्मचाऱ्यांनी टेनिस बॉल स्पर्धाही याच मैदानावर याच खेळपट्टीवर झाली होती. सध्याची खेळपट्टी पाहता भविष्यात लवकर येथे एखादा क्रिकेट सामना पाहायला मिळेल, अशी आशा बाळगणे शहाणपणाचे ठरणार नाही. खेळपट्टीची दुरुस्ती करायची असल्यास, आता मुळापासून सुरुवात करावी लागणार असल्याचे मत क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि तज्ज्ञांची गरज भासणार असल्याचे क्रिकेटपटू सांगतात.

क्रिकेटपटूंनीच उभारले मैदान

शिवाजी स्टेडियमच्या उभारणीत कोल्हापुरातील जुन्या खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा मोठा वाटा होता. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात मोलाचा वाटा असलेले बापूसाहेब खराडे, बाळासाहेब खराडे आणि जयसिंगराव कुसाळे यांनी एकत्र येत शिवाजी स्टेडियमची खेळपट्टी तयार केली होती. दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांना तीन महिन्यांत खेळपट्टी तयार करतो, असे सांगून या तिघांनी इतरांच्या मदतीने खेळपट्टी तयार करून घेतली होती. मात्र, याच खेळपट्टीचे नुकसान झालेले पाहून दुःख होत असल्याची भावना ज्येष्ठ क्रिकेटपटू सदा पाटील यांनी व्यक्त केली.

क्लाइव्ह लॉइड यांच्याकडूनही कौतुक

वेस्ट इंडिजचा संघ १९८३ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी अध्यक्षीय संघासोबतचा सामना कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमवर झाला होता. कोल्हापुरात झालेल्या मोठ्या सामन्यांपैकी तो एक सामना होता. त्यावेळी क्लाइव्ह लॉइड यांनी कोल्हापूरच्या खेळपट्टीचे कौतुक केले होते. भारतातील चांगल्या खेळपट्ट्यांपैकी ही एक खेळपट्टी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले होते.

सगळ्या खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यात क्रिकेटसाठी चांगली खेळपट्टी मिळायला पाहिजे. क्रीडाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन खेळपट्टी नव्याने तयार करण्याचे नियोजन करावे. तसेच ही खेळपट्टी सांभाळण्याकडेही लक्ष द्यावे. मैदानावर होणाऱ्या इतर कोणत्याही खेळाला आमचा विरोध नाही.

- सदा पाटील, क्रिकेटपटू

फुटबॉलचा सराव करणाऱ्या मुलांमुळे खेळपट्टी खराब झाली आहे. रोलिंग करून ती पुन्हा दुरुस्त करता येईल. येत्या महिन्याभरात खेळपट्टीची दुरुस्ती करून घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर खेळपट्टीला बॅरिकेटिंग करणार आहोत. जेणेकरून पुन्हा खेळपट्टी खराब होऊ नये.

- माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी

शिवाजी स्टेडियमच्या खेळपट्टीवर कोल्हापुरातील सगळ्यात चांगले गवत आहे. त्यावर खूप वर्षांपासून चांगले काम झाले होते. पण, आता खेळपट्टीसाठी मुळापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्याचबरोबर खेळपट्टी झाल्यानंतर पावसाळ्यात किंवा इतर खेळांसाठी मुले मैदानावर आल्यानंतर खेळपट्टी झाकून ठेवण्यासाठी एखादा लोखंडी ट्रे तयार करावा.

- सचिन केसरकर, क्रिकेटपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा नव्या वर्षाचा मुहूर्त हुकणार

$
0
0

sachin.yadav@timesgroup.com

tweet : sachinyadavMT

कोल्हापूर : नव्या वर्षात विमानसेवेचा मुहूर्त राज्य सरकारने काढला असला तरी त्यासाठीच्या अटींच्या पूर्ततेसाठी बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे हा मुहूर्त हुकण्याचीच जास्त शक्यता आहे. विशेषतः प्रपोशन अॅप्रोच पाथ इंडिकेटर (पापी) आणि रनवे एंड सेफ्टी एरियासाठी (रेसा) राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. विमानतळावरील जुनाट यंत्रणा बदलून इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या कॅटेगरी वनसाठी खासदारांनी आग्रह धरायला हवा. नागरी उड्डयन सेवा संचालनालयाच्या (डीजीसीए) वीस अटींची पूर्तता करायला सांगितले आहे. कायमस्वरुपी भक्कम कम्पाउंड वॉल, इमर्जन्सी सप्लायसह ऑन दि स्पॉट तपासणी झाल्याशिवाय हवाई उड्डाणाचा परवाना मिळणे अशक्य आहे.

सध्या कोल्हापूर विमानतळ भारतीय विमानपतन प्राधिकरणाकडे (एएआय)कडे आहे. डीजीसीएकडून परवाना मिळविण्यासाठी सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सध्या विमानतळ परिसरात सुमारे सहा फूट उंच गवत वाढले आहे. संरक्षक भिंतीसाठी १६ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. प्रत्यक्षात कामाची सुरूवात झाली नाही. तारेच्या कुंपणाला काही ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे कुंपण ओलांडून कुणीही धावपट्टीवर सहज प्रवेश करू शकतो. ससे, साप, मांजर, आणि कुत्रे यांचाही वावर सुरू असतो. त्यामुळे चारही बाजूने भक्कम संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. तीन महिन्यात संरक्षक भिंतीचे काम पूर्ण होण्याची गरज आहे. डीजीसीए समिती तारेच्या कुंपणाला परवानगी देणार नाही. फायर फायटरही तितक्याच दर्जाचा असायला हवी. यापूर्वी सुरू असलेल्या विमानसेवेवेळी फायर फायटरचा दिखावा होता. फायर स्टेशन आणि सशस्त्र सुरक्षा स्टाफ ही महत्त्वाची बाब डीजीसीएकडून तपासली जाणार आहे. वन जमिनीतील वृक्षांची उंची, रनवेची सुरक्षा, नवीन गेट, आपत्कालीन गेटची व्यवस्था अद्याप नाही. त्यामुळे दिवसाची विमानसेवा सुरू करण्यासाठी एएआयला डीजीसीएच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. डीजीसीएकडून अटीमध्ये सवलती दिली जाणार नसल्याने तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे आव्हान उभे राहणार आहे. तीन महिन्यात या अटी पूर्ण करण्याची कसोटी एएआयसमोर आहे.

परिपूर्ततेसाठी तीन वर्षे

सिव्हील एव्हीएशन डायरेक्टर बोर्डसमोर २७० कोटी रूपयांचा खर्चाचा आराखडा मंजूर करण्यासाठी येत्या आठवड्यात बैठक होत आहे. त्यासाठी खासदारांच्याकडून पाठपुरावा केला जाणार आहे. हा निधी मंजूर झाल्यास येत्या तीन वर्षात विमानतळावर सर्व पायाभूत आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील. त्यानंतर नाइट लँण्डींगची सुविधा सुरू होईल.

कितीही अडचणी आल्या तरी कोल्हापूरची विमानसेवा जानेवारी महिन्यात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. डीजीसीएच्या अटी पूर्ण करण्यासाठी गतीने प्रयत्न सुरू आहे.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

एअर डेक्कनच्या नियमित सेवेवेळी इंधन भरण्याची सुविधा होती. शेड्युल फ्लाइंट सुरू होण्यासाठी आणखी काही कालावधी लागला तरी चालेल. मात्र डीजीसीएच्या सर्व अटींची पूर्तता आवश्यक आहे. अटींची पू्र्तता परिपूर्ण झाल्यास कोल्हापूरचे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ सहज बनू शकेल.

आनंद उगवे, माजी व्यवस्थापक एअर डेक्कन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मशानभूमीसाठी मारवाडी समाजाची लाखाची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पायाभूत सुविधांची पूर्तता असो की सार्वजनिक व्यवस्थेची पूर्तता प्रत्येक काम प्रशासनानेच करावी, अशी भूमिका साऱ्यांची असते. मात्र लोकसहभागातून विकास कामे होऊ शकतात आ​णि समाजाच्या एकत्रीकरणातून विधायक कार्य घडू शकते, याची प्रचिती राजस्थानी श्वेतांबर जैन मारवाडी समाज व नाभिक समाजाने घडविली आहे. मारवाडी समाज पंचगंगा स्मशानभूमीच्या विकास कामाकरिता एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश देणार आहे. नाभिक समाजकडून अर्थसहाय्याबरोबरच 'पंचगंगा स्मशानभूमीला मदत करा' अशा प्रबोधनपर पत्रकाचे वाटप होणार आहे.

'पंचगंगा स्मशानभूमी येथे मोफत अंत्यसंस्कार केले जातात. महापालिका यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. स्मशानभूमी परिसरात विकास कामे करणे आवश्यक आहे. याकरिता मारवाडी समाज आणि नाभिक समाज एकत्र आले आहेत. पंचगंगा स्मशानभूमी येथे शनिवारी (ता.२४) शाहूकालीन दिवा बसविणे, दानपेटीचे उद्घाटन, फलक अनावरण आणि प्रबोधन पत्रकांच्या वाटपाचा कार्यक्रम होत असल्याची माहिती नगरसेवक ईश्वर परमार यांनी दिली. पंचगंगा स्मशानभूमीत शाहूकालीन विद्युत दिवा बंद अवस्थेत पडून होता. हा दिवा २९ ऑगस्ट, १९१६ रोची बसविण्याचे उल्लेख आढळतात. हा दिव्याचे मूळ अस्तित्व कायम ठेवून पुन्हा प्रकाशित करण्यात करण्याचा निर्णय मारवाडी समाजाने घेतला. विद्युत दिव्याची दुरूस्ती केली आहे.

नाभिक समाज करणार प्रबोधन पत्रकाचे वाटप

पंचगंगा स्मशानभूमी येथील सध्याची दान पेटी जुनी झाली असून ती नागरिकांच्या नजरेस पडत नाही. मारवाडी समाजाने स्मशानभूमीसाठी मोठी दान पेटी बसविली आहे. 'तुमची मदत पेटी जड करेल, खर्चिक अंत्यसंस्कार हलके करेल' या आशयाची ५० हजार प्रबोधनपर पत्रके छापलेली आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार अथवा रक्षाविसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पत्रिका वितरीत करण्याचे नियोजन आहे. दानपेटीत अधिकाधिक लोकांनी मदत करावी, यासाठी नाभिक समाज केशकर्तनालयात प्रबोधन पत्रकाचे वाटप करणार आहे.

उपक्रमासाठी अनेकांचा हातभार

खासदार धनंजय महाडिक, आयुक्त पी. शिवशंकर, महापालिकेतील भाजपाचे गटनेते विजय सूर्यवंशी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात मारवाडी व नाभिक समाजाकडून अर्थसहाय, नवीन दान पेटी पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी नरेंद्र ओसवाल, कांतीलाल ओसवाल, ललित गांधी, निलाचंद ओसवाल, भरत ओसवाल, ईश्वर परमार, माणिक ओसवाल, जवाहर गांधी, प्रकाश ओसवाल, अशोक ओसवाल, श्रेणिक ओसवाल, प्रवीण ओसवाल, रुपेश राठोड, आसमाचे अध्यक्ष संजय रणदिवे, नाभिक समाजाचे मनोहर झेंडे, राजाराम ​शिंदे, अॅड. डी. एन. जाधव, भारत माने, बाबासाहेब काशीद, मोहन चव्हाण, सूर्यकांत मांडरेकर, अविनाश यादव यांचे सहकार्य लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राणे समितीचा अहवाल आरक्षणाला बळकटी देणारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वेक्षण करून अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने घेतला होता. मात्र, कोर्टाने केंद्रीय मागासवर्गीय विकास आयोग आणि मंडल आयोग यांचेच अहवाल पाहिले. सरकारने कोर्टाला मागील सरकारमधील राणे समितीने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दाखवावा,' असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि आमदार नारायण राणे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला दिला. यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. राज्यातील कोणत्या तरी एका मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राणे म्हणाले, 'गेल्या सरकारने राज्यातील १८ लाख मराठा समाजातील लोकांचे सर्व्हेक्षण केले होते. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास केला होता. त्यावरून घटनेच्या कलम १५ (४) आणि १६ (६) अन्वये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. यात ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात आलेला नव्हता. तमीळनाडूमध्ये आरक्षण ६८ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. त्याच धर्तीवर हा निर्णय तात्कालीन राज्य सरकारने घेतला होता. विद्यमान सरकारने हा अहवाल कोर्टापुढे अधोरेखीत केल्यास आरक्षण मिळेल.' आरक्षण देण्यासाठी कायदा परिपक्व बनवावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठा मोर्चांची दखल घेतली नाही, तर नुकसान सरकारचे आहे. सरकार बदलण्याची ताकद मराठ्यांमध्ये नक्कीच आहे आणि दखल घेतली नाही तर सरकार टिकेल, पण चालेल असे वाटत नाही, असे मत राणे यांनी व्यक्त केले.

आरक्षणाबाबत 'आम्हाला नाही, तर कुणालाच नको', हा विचार शोभणारा नाही. तसेच तो परवडणारा आणि कायद्यात बसणारा नाही, असे मत राणे यांनी व्यक्त केले. कोणत्याही समाजाच्या विरोधात रोष नसल्याचे सांगून राणे म्हणाले, 'अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची आमची मागणी नाही. या कायद्याचा गैरवापर होताना दिसत आहे. अधिकाऱ्यांकडून चौकशी न होताच कारवाई होताना दिसत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा व्हावी, अशी आमची मागणी आहे.'

भुजबळ-मुंडे भेट गैर नाही

माजी मंत्री आणि गैरव्यवहार प्रकरणात अटक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात भेट घेतली. यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राणे म्हणाले, 'भुजबळ आजारी आहेत. त्यांची पंकजा यांनी रुग्णालयात भेट घेतली, यात गैर काहीच नाही. उद्या आम्हीही तब्येतीच्या चौकशीसाठी त्यांची भेट घेऊ.' या भेटीवरून भाजपमधील अंतर्गत धूसफूस सुरू असल्याच्या चर्चेवर 'तो भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे,' असे राणे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत तुफान पाऊस

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

धुवॉधार पावसाने सांगलीसह मिरज, तासगाव परिसराला झोडपून काढले. सलग तीन तास एकसारखा पाऊस कोसळत राहिल्याने संपूर्ण सांगली जलमय झाली. रस्ते वाहू लागले तर अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली. शहरवासियांची तारांबळ उडविली. शनिवारचा आठवडा बाजारातील विक्रेत्यांची आणि ग्राहकांची दैना उडवून दिली. यंदाच्या पावसाळ्यातला सर्वात मोठा आणि एकसारखा कोसळेला पाऊस म्हणून शनिवारच्या पावसाची चर्चा होती.

हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरवत राज्याच्या कानाकोपऱ्यात जोरदार पाऊस कोसळू लागला असून, शनिवारी सांगली, मिरज परिसरात तुफान पाऊस पडला. धरण आणि कृष्णा-कोयना नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर वाढल्याने सांगलीनजीक कृष्णेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असतानाच शनिवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली.

तासगाव परिसरात दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरूच होता. सांगलीत एकसारखा पाऊस कोसळत राहिल्याने जनजीवन विस्कळित होऊन एक प्रकारची कोंडी झाली होती. राजवाडा चौक, शिवाजी मंडई, मारुती चौक, मध्यवर्ती बसस्थानक या परिसरात पाणी साचल्याने दुचाकी वाहने अडकून पडली. विस्तारीत भागातील नागरिकांचीही दैना उडाली होती. शनिवार असल्याने दुपारी सुटणाऱ्या शाळा, कॉलेजातील विद्यार्थी काही तास शाळेतच अडकून पडले होते.

चांदोलीत ४० मीमी

शिराळा

चांदोली धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ४० मी. मी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या सांडव्यातून ७८०० तर वीज निर्मितीतून १५५५ असा एकूण ९३५५ पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. धरणात ३४.४० टीएमसी इतका शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, भुईमुग काढणीच्या कामात व्यत्यय येत असून, शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे.
मिरजला पावसाने झोडपले

मिरज

मागील दीड महिन्यांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने शनिवारी शहरासह पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग तीन तास पडलेल्या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले. शहरातील व्यवहार काही काळ ठप्प झाला. पूर्व भागातील ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरून ओसडून वाहत आहेत. तर, संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यातील मुरुमाचे चिखलात रुपांतर होत असल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे.

तब्बल दीड महिना विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा जोर लावला आहे. शुक्रवारी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र, शनिवारी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. काही भागात मुसळधार तर, अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरूच आहे. शहरात संततधार पावसामुळे अनेक व्यवहार ठप्प आहेत. सलग नागरीक घरातच थांबून आहे. शहरातील बस स्थानक, गांधी चौक, गणेशनगर, कुपवाड रस्ता, झारी बाग, शासकीय दूध डेअरी, कमान वेस, दिंडी वेस, मालगाव रोड, उदगाव वेस, वखारभाग आदी प्रमुख रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवापूर्वी मुरुम टाकले होते. मात्र, मुरुमात मातीचे प्रमाण जास्त असल्याने सर्वच रस्ते चिखलमय आणि खड्डे आहे तसेच आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना चालणे ही मुश्किल झाले आहे.

पूर्व भागातील म्हैसाळ, बेडग, आरग, सलगरे, एरंडोली, खंडेराजुरी, मल्लेवाडी, मालगाव, बेळंकी आदी परिसरातही पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, बारा वाजता सुरू झालेल्या पावसाने तब्बल तीन तास जोरदार तर, दोन तास संततधार पाऊस सुरूच होता. अनेक द्राक्षबागायतदारांचे द्राक्ष छाटणीची कामे सुरू आहेत. सलग पाऊस सुरू असल्याने मजुरांना काम करता आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणाला एमआयएमचा विरोध नाही -आमदार पाठण

$
0
0



सोलापूर - एमआयएम पक्ष सोलापूर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास आमचा विरोध नाही मात्र, मुस्लिम आरक्षणाकडेही सरकारने दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका आमदार वारिस पठाण यांनी मांडली. राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

अ‍ॅड. वारिस पठाण रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीबाबत बोलताना सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टिका करताना एमआयएम सर्व समाजाला सोबत घेऊन पूर्ण ताकदीशी निवडणूक लढणार आहे. सर्वांना शिक्षण, शहराचा विकास आणि स्वच्छता हा निवडणुकीचा अजेंडा असणार आहे. राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा आहे. प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलत आहेत. त्यांच्याबद्दल बोलून मी त्यांना मोठं करणार नाही. भारत माता की जय या प्रकरणावरुन कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरा चेहरा बाहेर आला. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रमाण मानतो, असेही पठाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाची विज्ञाननिष्ठा वाढली पाहिजेडॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादनडॉ. माशेलकरांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुररस्कार प्रदान

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

'आज अंधश्रद्धेचे जोखड उखडून टाकण्यासाठी आधुनिक विज्ञानाबरोबरच चांगल्या शिक्षणाचीही तितकीच गरज आहे अन्यथा एकीकडे भारताने मंगळावर पहिल्या प्रयत्नात सोडलेले मंगल यान आणि दुसरीकडे मंगळ आहे म्हणून मुलीचे लग्न जमत नाही ही बाब मोठी शोचनीय आहे. समाजाची विज्ञाननिष्ठा वाढली पाहिजे,' असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांमया स्मृतिप्रीत्यर्थ सातारा पालिकेतर्फे देण्यात चौथा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी माशेलकर बोलत होते.

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराचे वितरण सातारा नगरपालिकेच्या वतीने शाहू कला मंदिरात ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. हमीद दाभोलकर आदी उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, 'आपण पॅराशूटसारखे उघडे मन ठेवले तर अंधश्रद्धांची जोखडे निर्माणच होणार नाहीत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराला सथ देत सातारा पालिकेने राबविलेला पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशउत्सव राज्यात एक आदर्श उत्सव म्हणून पुढे यावा.'

अध्यक्षीय भाषणात डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, 'दाभोलकरांना मारणारी माणसे विचारांचा खून करू शकत नाहीत. अंनिसचे आंदोलन खुनानांतर अधिक प्रभावी व जोमाने विस्तारत आहे. दाभोलकरांच्या खुनानंतरच जादूटोणा कायदा संमत झाला. अनेकांना डॉ नरेंद्र हे खुनानंतर कळले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>