Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तासगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

तासगावमधील व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी दुकाने आणि दैनदिन व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्तपणे बंद पाळला. शनिवारचा बंद तणावपूर्ण वातावरणात, पोलिसांच्या जागत्या पहाऱ्याने आणि तासगावकरांच्या सहकार्याने शांततेत पार पडला. खासदार संजय पाटील यांनी अभय दिल्याने तासगाव शहरासह तालुक्यात दहशत माजवली जात आहे. असा आरोप करून तासगाव तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या गुंडगिरीचा निषेध म्हणून तासगाव बंदचे आवाहन केले होते.

बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौका चौकांत बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दुपारी बारानंतर आंदोलकांनी दुकाने उघडण्याचे आवाहन केले. त्यामुळे दुपारनंतर व्यवहार पूर्ववत झाले. बंदमुळे तासगाव शहरात शुकशुकाट होता. जनजीवनावरही परिणाम जाणवला. गुरुवारी दुपारी मणेराजुरीचे भाजपचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पवार, संभाजी पवार यांना चिंचणीच्या तरुणांनी किरकोळ कारणावरून जबर मारहाण केली. तासगाव शहर व तालुक्यात हे प्रकार वारंवार होत आहेत. खासदार पाठीशी घालत असल्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे, असा आरोप करीत या विरोधात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंत देसाई, बंडु पवार, शेकापचे शरद शेळके, यांच्यासह मणेराजुरीचे भाजपचे प्रदीप पवार, नागावचे सरपंच महेश पाटील, रवींद्र साळुंखे, दिलीप जमदाडे, नेताजी घाटगे, नंदू मंडले यांनी तासगाव बंदचे आवाहन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेंगतेलाला महागाईची फोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

या आठवड्यात शेंगतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे. शेंगदाण्यामध्ये ४ रुपयांनी तर शेगतेलामध्ये दोन रुपयांची वाढ झाली आहे. मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे फळभाज्या व पालेभाज्याचे दर ३० टक्क्यांनी उतरले आहेत. आवक मोठ्या प्रमाणात होत असली तरी त्या तुलनेत खरेदी नसल्याने भाजीपाला वाया जात आहे.

या आठवड्यात लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, राजारामपुरी भाजी मार्केटमध्ये जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले परिसरासह सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरातून भाज्यांची आवक वाढली. त्यामुळे दर आवाक्यात आहेत. या आठवड्यात पालेभाज्यांचे सुमारे ३० टक्के दर उतरले आहेत. टोमॅटोचे दर या आठवड्यात १० रुपयांनी उतरले असून ओली मिरची ८० रुपये किलोने विक्री होत आहे. तर लिंबू अडीच रुपयांना एक याप्रमाणे विक्री होत असल्याचे भाजी विक्रेते अरुण लोंढे यांनी सांगितले.

या आठवड्यात कडधान्य बाजार स्थिर असून शेंगदाणे ११६ वरुन १२० रुपये किलोवर पोहचला आणि शेंगतेल १३४ रुपये किलोवरुन १३६ किलोवर पोहचला असल्याचे धान्यव्यापारी महेश नष्टे यांनी सांगितले.


भाजी दर (दर प्रतिकिलो)

वांगी : ६० रु.

टोमॅटो : ३० रु.

भेंडी : ६० रु.

दोडका : ६० रु.

कारली :५० रु.

ढबू मिरची : ७० रु.

कोबी : ४० प्रति नग

फ्लॉवर : २० ते ३० रु.

गवार : ६० ते ८० रु.

मेथी : १० रु. पेंडी

पोकळा : १० रु पेंडी

पालक : १० रु पेंडी

शेपू : ८ ते १० रु पेंडी

कोथिंबीर : १२ रु. पेंडी

कांदापात : ८ ते १० रु पेंडी

तांदळी : ८ ते १० रु पेंडी

कांदा : २०. किलो

बटाटा : ३० रु. किलो

...............

डाळींचे दर (प्रतिकिलो)

तूरडाळ : १४८

मूगडाळ : ८० रु.

उडीद डाळ : १८० रु.

हरभरा : १०८ रु.

हरभरा डाळ ः१२० रु.

.............

खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)

सरकी : ८० रु.

सूर्यफूल ९६ रु.

शेंगतेल : १३६ रु.

........

फळांचे दर (प्रतिकिलो)

डाळिंब : ८० ते १०० रु.

सफरचंद : १४० रु.

विदेशी सफरचंद : १८० ते २०० रु.

पेरू : १२० रु.

केळी वसई : ३० (डझन)

केळी जवारी : ४० ते ५० रु.

किरणा दर

या आठवड्यात पोह्याचे दर दोन रुपयांनी वाढले असून ४२ वरून ४४ रुपये किलोने विक्री होत आहे. साखर ३९.५० रुपये किलो, मैदा ३० रुपये किलो, रवा ३० रुपये किलो, शाबू ६० रुपये किलो, आटा ३० रुपये किलो, गोळी चहा ३०० रुपये किलोने विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबोलीत दरीत पडून युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आंबोली (ता. सावंतवाडी) येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. त्याच्या सोबत आलेल्या १० मित्रांसह स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. रूद्राप्पा विद्यल गजेरी (वय १९, रा. नेगनीहाळ, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. येथील भोगौलिक परिस्थितीची जाणीव नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. रुद्राप्पा लघुशंकेसाठी दरीच्या काठावर गेला असता तो पाय घसरून कोसळला. आंबोली परिसरात पावसाळी पर्यटनासाठी हे सर्व युवक शनिवारी सकाळी १०च्या सुमारास येथे दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, बैलहोंगल येथील ११ युवक खासगी वाहनातून येथे सकाळी १०च्या सुमारास पावसाळी पर्यटनासाठी आले होते. येथील घाटमार्ग सुरू होण्याच्या सनसेट पॉईंटनजीकच्या मंदिराजवळील देवाचा वस या स्थळाजवळ रूद्राप्पा लघुशंकेसाठी गेला होता. मात्र निसरटीमुळे त्याचा पाय घसरला व तेथील ६०ते ७० फूट खोल दरीत कोसळला. याबाबतची माहिती संजय तरूमुरी याने पोलिसात दिली. यावेळी आंबोली पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. खोल दरीत कोसळल्याने रुद्राप्पाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सैनिक स्कूलचे नागेश भोसले, सतिश अहिर व अजित नार्वेकर यांनी दरीत उतरून मृतदेह दोरखंडाच्या सहाय्याने वरील रस्त्यावर आणण्यासाठी मोलाची मदत केली. यासाठी स्थानिकांसह काही पर्यटकांनी सहकार्य केले. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच रुद्राप्पाचे नातलग घटनास्थळी पोहोचले होते. रुद्राप्पास सांगेली (ता. सावंतवाडी) येथील आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाती मृत्यूबाबतची नोंद आंबोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमोल माळी टोळीला मोक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

खूनासह खंडणी, अपहरणसारख्या अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला तारदाळ येथील अमोल अशोक माळी याच्यासह आठजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अजित वाघमारे खून प्रकरणाचा माळी हा मुख्य सूत्रधार आहे. मोक्काअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची इचलकरंजीतील ही पहिलीच घटना आहे.

अमोल अशोक माळी (रा. तारदाळ) याच्यासह सूरज मनोहर शिर्के (वय २०), अजय भानुदास कुलकर्णी (वय २९), अनिल संपत मोळे (वय ३१ सर्व रा. श्रीरामनगर तारदाळ), तौफिक अब्दुल शिरगुप्पे (वय ३१), बसवेश्वर उर्फ राहुल विश्वनाथ एकोंडे (वय २१), अमोल प्रभाकर कोंडारे (वय २६ तिघे रा. आझादनगर तारदाळ) व अक्षय बबन कल्ले (रा. शहापूर) यांचा त्यामध्ये समावेश आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी दिली.

एप्रिल २०१६ मध्ये अजित वाघमारे याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह कर्नाटकातील शेडबाळ गावच्या हद्दीत टाकण्यात आला होता. शहापूर पोलिसांनी या प्रकरणी सातजणांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार अमोल माळी हा अद्याप फरार आहे. ही टोळी तारदाळ व इचलकरंजी परिसरातील उद्योग व्यावसायिकांकडून संरक्षणाच्या नावाखाली खंडणी उकळत होती. अवैध व्यवसायांच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होण्याबरोबरच राजकीय पार्श्वभूमीचा फायदा घेत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यात अग्रेसर होती. या वर्चस्व वादातूनच वाघमारे याचा खून झाल्याचे तपासात समोर आले.

शहापूरचे पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी मोक्का कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन तो विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कलमे लावून तो पुढील तपासासाठी करवीर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सव, नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नको यासाठी याचा तपास करवीर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे

माळीवर तीन खूनाचे गुन्हे

अमोल माळी याच्यावर विजय चिंचलकर, सचिन उर्फ पिंटू जाधव व अजित वाघमारे असे तीन खूनाचे गुन्हे नोंद आहेत. त्याशिवाय खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, हाणामारी व विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे विविध गुन्हे गावभाग, शिवाजीनगर, हातकणंगले, शहापूर, कागल आदी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. सर्वच संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर खूनाचे दोन, खूनासाठी मनुष्य पळविणे एक, खंडणीचे दोन, परवाना नसताना शस्त्रे बाळगणे एक, मारामारीचे चार असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी धरण भरण्याच्या वाटेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राधानगरीचा लक्ष्मी जलाशय नव्वद टक्के भरला आहे. काळम्मावाडीतील राजर्षी शाहू सागर जलाशय पन्नास टक्के भरला तर तुळशी तलावात साठटक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या तीन दिवसांत धरणक्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी असल्याने धरणांच्या पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण परिसरात पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास ते चार दिवसांत पूर्ण क्षमतेने भरेल,असा अंदाज येत आहे. स्वयंचलित दरवाज्याजवळ पाणी संचय झाला असून जलाशयातून वीजनिर्मितीसाठी १८०० क्यसेस विसर्ग सुरु आहे. धरणात सध्या ९१ टक्के साठा (७.५१ टीएमसी) आहे. राधानगरी धरण क्षेत्रात आजअखेर २१२७ मिलीमीटर्स पाऊस झाला आहे. राधानगरीतून विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. साहजिकच पंचगंगेची पातळीही वाढणार आहे.

दरम्यान, पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने कर्नाटकातील अलमट्टी धरणही भरले आहे. या धरणामध्ये ५२४ मीटरपर्यंत पाणी साठवण्याचा निर्णय लवादाने दिला आहे. पण ही पातळी सप्टेंबरनंतर राखायची अट आहे. तेरवाड बंधाऱ्याची पायथा पातळी ५२४ मीटर उंचीवर असून, अलमट्टीची माथापातळी ५२४ मीटर आहे. त्यामुळे अलमट्टी भरले, त्यापाठोपाठ कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा विसर्ग झाला तर तेरवाडपासून ते अलमट्टीपर्यंत पाण्याची फूग येऊ शकते. या दोन्हीमध्ये असलेले हिप्परगी धरणही भरून जाते. ही परिस्थिती एकदमच उद्भवू नये यासाठी दोन्ही राज्यांत नियोजन आवश्यक आहे.

धरण क्षमता साठा

राधानगरी ८.३६ ७.५१

दूधगंगा २५.३९ १२.५८

वारणा ३४.३९ २५.१४

तुळशी ३.४७ २.०६

पाटगाव ३.७१ २.१२

चित्री १.८८ ०.९६

कुंभी २.७१ २.३०

धोका टाळण्यासाठी समन्वयाची गरज

दरम्यान, धरणे भरलेली नसताना अगदी चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने आलेला पूर हटण्यास सहा दिवस गेले. आता पावसाळा मध्यावर आलेला असताना धरणे भरण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील धरणांबरोबरच परिसरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे व अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन न झाल्यास शिरोळबरोबरच कोल्हापूरवासीयांना पुराचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत लवादाने निर्णय दिला असला तरी ५२४ मीटरची उंची ही सप्टेंबरनंतर राखायची आहे. २००५ मध्ये कृष्णेबरोबरच पंचगंगा नद्यांनी एकाचवेळी धोक्याची पातळी ओलांडली. त्यानंतर आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर, शिरोळ व सांगलीला विळखा घातला. जवळपास पंधरा दिवसांच्या कालावधीतील महापुराने अनेकांना विस्थापित करण्याबरोबरच मोठी आर्थिक हानीही झाली. त्यावेळी धरणांमधून झालेल्या विसर्गाचे नियोजन झाले नसल्याने हा मोठा फटका होता. यंदा धरणांनी तळ गाठला होता. त्यामुळे जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातील पावसाने काही धरणे निम्म्यावर भरली. आता पंचगंगा खोऱ्यातील राधानगरीसह अन्य धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसात धरणानंतरच्या टप्प्यातील पाणी नदीमध्ये आल्याने पूर आला होता.

'२००५ नंतर धरणांमधील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन एकमेकांशी बोलून केले जात होते; पण सध्या धरणांबरोबरच खोऱ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे प्रमाण व त्यानुसार अलमट्टीमधून किती विसर्ग करायचा हे ठरवणे आवश्यकता आहे. जर हे नियोजन झाले नाही तर पूर लवकर कमी होणार नाही, असे नुकत्याच येऊन गेलेल्या पूरस्थितीमुळे दिसून आले.'

उदय गायकवाड, अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांना वाट आहे कुठे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या पश्चिमेस जाऊळाचा गणपती ते दत्त मंगल कार्यालय हा रस्ता पश्चिमेकडून शहरात प्रवेश करण्यासाठी आणि शहराबाहेर पडण्यासाठीचा मुख्य रस्ता. मात्र, या रस्त्याला अवैध आणि बेशिस्त पार्किंगने विळखा घातला आहे. रंकाळा चौपाटीला लागून असलेल्या या रस्त्यावर चौपाटीवर आलेल्या सामान्य कोल्हापूरकरांसह पर्यटकांची वाहने अस्ताव्यस्त पार्किंग करून ठेवलेली असतात. यामुळे दोन्ही दिशेला जाणाऱ्या वाहनांना अडथळे होत असून, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.

जाऊळाच्या गणपतीपासून पुढे जाणारा हा शहराच्या पश्चिमेकडील प्रमुख महामार्ग आहे. कोकण आणि गोव्याच्या दिशेन जाणाऱ्या एसटी, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या तसेच गळीत हंगामात उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर, फुलेवाडी बोंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत, शिंगणापूरकडे जाणाऱ्या केएमटी बसेस यांची या मार्गावर ये-जा सुरू असते. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे. या रस्त्याला लागून असलेल्या रंकाळा चौपाटीवर साधारपणे सायंकाळच्या सुमारास गर्दी असते. यात मुलांना चौपाटीवर खेळण्यासाठी घेऊन आलेल्या पालकांना आसपास पार्किंगची सुविधा नसल्याने चौपाटीच्या बाजूलाच रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात. यात टू व्हिलर्स बरोबर फोर व्हिलर्सची संख्याही मोठी असते. त्यामुळे फुलेवाडीच्या दिशेने जाणारा रस्ता किमान चार फुटांनी अरुंद होतो. अर्थात याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होताना दिसतो. वाहनांना कशीबशी वाट काढून पुढे जावे लागते. ही परिस्थिती डी मार्ट या शॉपिंग मॉलसमोर असते. मॉलने पार्किंगची सुविधा केली असून, ही तेथे जाणारे अनेकजण रस्त्यावर गाडी लावून जाताना दिसतात. विशेष म्हणजे याला कोणीही अटकाव करत नाही. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांना अडथळे येत आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या एकाच बाजूचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे परिसरात सतत वाहतूक कोंडी होत होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर दोन्हीकडून वाहतूक सुरू झाली. यामुळे कोंडीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा सामन्यांना होती. मात्र, बेशिस्त पार्किंगमुळे ही अपेक्षा फोल ठरली.

सध्या या रस्त्यावर सायंकाळी चार ते रात्री साधारण नऊ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मार्गावर एकही पोलिस दिसत नाही. काही वेळे जाऊळाचा गणपती चौकात वाहतूक पोलिस दिसतात. मात्र, तोदेखील अपवादच म्हणावा लागतो. या मार्गावर वाहतूक पोलिस असल्यास कोंडीचा प्रश्न किमान सुटेल, असे मत परिसरातील नागरिक व्यक्त करतात.

हॉर्नमुळे डोकेदुखी

वाहनांच्या सततच्या कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत असूनही अनेक दुचाकीस्वार आणि कार चालक या रस्त्यावर सतत हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे रंकाळा चौपाटीवरील फेरीवाले आणि रस्त्यापलिकडील दुकानदार यांच्यासाठी हे हॉर्न डोकेदुखी ठरत आहेत. या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी त्यांची मागणी आहे.

रस्त्याचे काम वेगाने व्हावे

खराडे कॉलेज ते जुना वाशीनाका रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे रंकाळा बस स्थानकावरून राधानगरीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या जाऊळाचा गणपती मार्गे न्यू पॅलेस, अंबाई टँक मार्गे क्रशर चौक आणि पुढे राधानगरी रोड अशा जातात. या एसटी गाड्यांमुळे सध्या जाऊळाचा गणपती ते न्यू पॅलेस प्रवेशद्वार या मार्गावर वाहतुकीचा ताण येत आहे. या गाड्यांसाठी सध्या दुसरा पर्यायी मार्गदेखील नाही. त्यामुळे खराडे कॉलेज ते जुना वाशीनाका रस्त्याचे काम पूर्ण होऊन त्या रस्त्यावरून एसटी वाहतूक सुरू झाल्याशिवाय या मार्गावरील कोंडी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

संध्याकाळी सातच्या सुमारास ऑफिस संपल्यानंतर घर गाठायचे असते. मात्र, जाऊळाचा गणपती ते न्यू पॅलेस प्रवेशद्वार हा रस्ता पार करण्यासाठी रोज साधारण १५ ते २० मिनिटे लागतात. रस्ता बदलून जाणे शक्य नसल्याने कोंडीतून मार्ग काढत पुढे जाणे हाच एकमेव पर्याय असतो.

- किशोर देसाई, फुलेवाडी रिंगरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरनेही अनुभवला थरार...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
पंचगंगा नदीचा पूर कोल्हापूर शहरातही घुसला होता. महापुराने आंबेवाडी, चिखली, आंबेवाडी केर्ली, निगवे या प्रमुख गावांसह अनेक गावांना विळखा घातलाच. पण शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर पाणी आले होते. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली येथील नवीन पुलावर अडीच ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रुकडीजवळील पूलही वाहतुकीसाठी बंद केल्याने रेल्वेवाहतूक ठप्प झाली होती.

ज्यांच्या घरात पाणी शिरले होते त्यांना महापालिकेच्या शाळा, खासगी शाळा, शंकराचार्य मठ, चित्रदुर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग येथे सुरक्षित ठेवले होते. शहरातील मंडळे व तालमी संस्थांनी पुरात अडकलेल्या लोकांना जेवण, नाष्टा व चहाची सोय केली होती. पुरातून लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युवा वर्ग धाडसाने पाण्यात उतरला होता. काही युवकांनी थेट शिरोळ तालुक्यात मदतीसाठी धाव घेतली होती. जिल्हा प्रशासनाला मदत करण्यासाठी नागरिक सरसावले होते. पुराच्या पाण्यात मदतकार्य करणारे शाहूपुरी कुंभार वसाहत व पंचगंगा नदी परिसरातील दोन युवकांना लेप्टोची लागण झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.

रेडझोनचा फटका

महापुराने प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिकांना बरेच काही शिकवले. महापुराच्या अनुभवातून काही उपाययोजना केल्या, पण ज्या ठिकाणी उपाययोजना हवी होती त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षही झाले. जयंती नाल्यावरील पुलावर, दसरा चौकातील सुतार वाड्यातून टायटन शोरुमजवळील पेट्रोल पंपापर्यंत, कोंडा ओळ, शाहूपुरी कुंभार गल्ली या परिसरात पुराच्या पाण्याने ठाण मांडले होते. त्यावेळी हायवेच्या सर्व्हिस रोडवरही पाणी आल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली होती. शहराशेजारील प्रयाग चिखली, आंबेवाडी, वडणगे या गावांना पुराच्या पाण्याचा नेहमीपेक्षा जास्त काळ तडाखा बसला. येथे पुराचे पाणी जवळपास पंधरा दिवसाहून अधिककाळ होते. त्यावेळी शहरालगत नदीच्या पूररेषेत झालेल्या बांधकामांचा हा परिणाम असल्याचे अभ्यासकांचे मत होते.


ऐतिहासिक रंकाळा ओसंडला...

२६ जुलै २००५ चा दिवस कोल्हापूरकरांच्याही कायम स्मरणात राहिला. आठवडाभर पडलेल्या पावसाने रंकाळा काठोकाठ भरला होता. २५ जुलैला रात्री पावसामुळे टेंबलाई परिसरात बंधारा फुटल्याने पाणी नागरी वस्तीत घुसले. त्याच रात्री रंकाळा भरून राजघाटाजवळून वाहू लागल्याची बातमी पसरली. रात्री रंकाळा ओसंडून वाहायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी 'न भूतो, न भविष्यती' असा हा क्षण पाहण्यासाठी कोल्हापूरसह परिसरही लोटला. रंकाळा टॉवरमधून धबधब्यासारखे पाणी वाहू लागल्याने हा क्षण पाहण्यासाठी नागरिकांच्या झुंडी येऊ लागल्या. ओसंडून वाहणारे पाणी रंकाळा टॉवरकडून नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या दिशेने असलेल्या रंकाळा तालीम मंडळ, आयरेकर गल्लीतील लोकांच्या घरात घुसले होते. रंकाळ्याचा सांडवा बुजवून पाणी जाण्यासाठी छोटे नळ घातले होते. तत्कालीन नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी जेसीबीने नळ व सांडवा फोडून पाण्याला वाट करून दिल्यानंतर तब्बल दोन दिवसानंतर ओसंडून वाहणारा रंकाळा वाहायचा थांबला.


घरांत पाणी शिरल्याने हाहाकार

विल्सन पूल वगळता जयंती पूल. शेळके पूल, संभाजी पूल बुडाले होते. शहरातील सुतार वाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, शंकराचार्य मठ, उत्तरेश्वर पेठ गवत मंडई, लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा, कदमवाडी, भोसलेवाडी, बापट कॅम्प या परिसरातील घरात पाणी शिरले होते. जयंती नाल्याच्या पाण्याची फूग जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली होती. केव्हीज प्लाजा या वसाहतीत पाणी पसरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खताच्या काळाबाजाराला चाप

$
0
0

कोल्हापूर

यावर्षीपासून प्रथमच नीम कोटेड युरियाचे उत्पादन सुरू झाल्याने काळ्याबाजारामधील विक्रीला चांगलाच चाप बसला आहे. युरियाची उपलब्धता जास्त असल्याने शेतकऱ्यांना घरपोच युरिया मिळत असून यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांची लिकिंगपासून सुटका झाली आहे. नीम कोटेड युरियाची बाष्पीभवन प्रक्रिया हळूहळू होत असल्याने रासायनिक उद्योगातील वापर कमी झाला आहे. तसेच पिकांनाही याची मात्रा हळूहळू लागत असल्याने शेतीमध्ये याचा पूर्वीपेक्षा वापर कमी झाल्याचे निष्कर्षही समोर आले आहेत.

रासायनिक उद्योगातील काही पदार्थ निर्मितीमध्ये युरियाचा वापर केला जात आहे. विशेषत: रंग निर्मितीमध्ये युरियाचा वापर होत असल्याची टीका नेहमीच होत होती. त्यामुळे अनुदानीत युरियाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. त्यामुळे पेरणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना खत टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काळाबाजारांतून युरिया खरेदीबरोबरच लिकिंगला सामोरे जावे लागत होते. पेरणीवेळी कमी पडणाऱ्या खतांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत होती. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी प्रथमच नीम कोटेड युरियाचे उत्पादनाबरोबरच अनुदान थेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा खरीप पेरणीमध्ये दिसून आला आहे.

शेतात टाकलेला युरिया त्वरीत विरघळत नसल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे वापरही कमी झाला आहे. दुधाचे फॅट अधिक वाढवण्यासाठी युरियाचा वापर होत असल्याच्या घटना अन्न व औषध प्रशासन विभागाने उघडकीस आणल्या होत्या. अशा भेसळींनाही नीम कोटेड युरियामुळे पायबंद बसला आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख ४० हजार मेट्रिक टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी ९७ हजार मेट्रिक टन खते उपलब्ध झाली असून खरीप हंगामासाठी ५८ हजार मेट्रिक टनाची विक्री झाली आहे. या विक्रीमध्ये लिकिंगची जिल्ह्यात एकही घटना समोर आलेली नसल्याने नीम कोटेड युरियाचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरले आहे.

चौकट

शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा

यापूर्वी पांढरा युरियाच्या ५० किलोचा बॅगचा २८३ रुपये दर होता. या युरियाचे त्वरीत बाष्पीभवन होत असल्याने याच्यासबोत निमोळा खताची मात्रा द्यावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भार पडत होता. सध्या नीम कोटेडचा दर २९८ रुपये असल्याने आणि त्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी असल्याने वारंवार युरिया वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा झाला आहे.

कोट

'नीम कोटेड युरियाची मात्रा पिकांना हळूहळू लागत असल्याने शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे. सफेद युरीयाचे बाष्पीभवन त्वरीत होत असल्याने गैरप्रकाराला चालना मिळत होती. तसेच युरीयाचे अनुदान थेट कंपन्यांना मिळत अनुदान वजा करुन एमआरपीनुसार युरीयाची विक्री केली जात आहे. त्यामुळे खरीप हंगामात युरीयाची टंचाई जाणवलेली नाही.

चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

...

कोट

'बगॅसपासून तयार होणाऱ्या युको बोरसाठी औद्योगिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात अनुदानित युरीयाची विक्री होत होती. नीम कोटेड युरिया विरघळण्यास भरपूर कालवाधी लागत असल्याने औद्योगिक क्षेत्रातील वापर कमी झाला आहे.

सुनील डुणूंग, सचिव, जिल्हा बी-बियाणे व्यापारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकारी ‘घेतात’, कर्मचारी ‘झेलतात’

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर: राज्य सरकारला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांही उखळपांढरे करून घेत आहेत. महसूल आणि पोलिस खात्यानंतर सर्वाधिक भ्रष्ट खाते म्हणून कुख्यात असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात बहुतांश अधिकाऱ्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. कर्मचाऱ्यांकरवी लाखोंची वरकमाई करवून घेणारे अधिकारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर नामानिराळे राहत असल्याने ही प्रकरणे कर्मचाऱ्यांवर शेकतात. अधिकाऱ्यांच्या हव्यासापोटी कर्मचाऱ्यांचे बळी जात आहेत.

समाजाच्या दृष्टीने नकोसा, पण सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला उत्पादन शुल्क विभाग म्हणजे हमखास वरकमाई करून दिला जाणारा विभाग म्हणून ओळखला जातो. मद्य निर्मितीवरील कर जमा करणे, मद्याची तस्करी रोखणे, अवैध मद्यनिर्मिती रोखणे यासह वाईन शॉप, ब‌िअर बारला परवाने देण्याचे काम या विभागाकडे आहे. राज्य सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणारा हा विभाग आहे. दरवर्षी महसुलाची उद्दिष्टपूर्ती होण्यासह जवळपास तितक्याच रकमेचे हप्तेही संबंधित यंत्रणेला पोहोचतात, त्यामुळे या विभागातील कारभार बिनबोभाट सुरू असतो. कोल्हापुरात चार दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत एका निरीक्षकाला अटक झाली. लाचेची रक्कम स्वीकारणारा पंटर फरार झाला असून, अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्या प्रकाराच्या मुळाशीही एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा सुरू आहे. मद्य तस्करीतील जप्त केलेला ट्रक सोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यानेच लाच घेण्यासाठी निरीक्षकाला प्रवृत्त केले आहे. निरीक्षकाने स्वतःच्या बचावासाठी पंटरला पुढे केले, मात्र या प्रकारात निरीक्षकाचे नाव रेकॉर्डवर आल्याने हे प्रकरण निरीक्षकावर शेकले. अधिकाऱ्यांच्या कामातील चुकांचेही खापर कर्मचाऱ्यांवर फोडले जात आहे. एका वाहतूक निरीक्षकाच्या अपघाती मृत्यूनंतर वरिष्ठ कार्यालयाला माहिती न कळवल्याबद्दल नुकतेच लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. या मृत अधिकाऱ्याची कोल्हापूरहून नाशिकला बदली करण्यात आल्याची घटना समोर आली.

याच विभागातील आजी-माजी अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने सर्व कारभार बिनबोभाट चालतो. उत्पादन शुल्क विभागातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी पदाचा गैरफायदा घेत मुलाबाळांसह नातेवाईकांच्या नावे वाईन शॉप, बिअर बारचे परवाने घेतले आहेत. परवाना नुतन‌ीकरण, करवसुली यामध्ये त्रुटी असल्या तरी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची दुकाने राजरोसपणे सुरू असतात. उत्पादन शुल्क विभागातील एका वादग्रस्त माजी अधिकाऱ्याने मुलाच्या नावे शहरात वाईन शॉपी सुरू केली आहे. या दुकानाबाबत वाद असूनही दुकान सुरू आहे. दुकानांना परवाने देण्यासाठी अधिकाऱ्यांचे दर लाखात आहेत. परवाने नुतनीकरण, तस्करी, अवैध मद्य निर्मितीवरील धाडींमध्ये प्रकरणे मिटवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाखो रुपये द्यावे लागतात. अधिकाऱ्याने स्पॉट व्हिजीट केल्यास तोडपाण्याचा दर आणखी वाढतो, त्यामुळे या विभागात केवळ वसुली आणि कारवायांचीच चर्च रंगलेली असते.

अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे मूल्यमापन हवे

उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक माजी अधिकाऱ्यांसाठी कोल्हापूर हे आवडीचे ठिकाण ठरले आहे. आल्हाददायक हवामानासह सुविधांच्या उपलब्धतेमुळे त्या अधिकाऱ्यांनी नोकरीत असतानाच पदाचा गैरवापर करून कमवलेल्या कोट्यवधी रुपयांमधून जिल्ह्यात पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी परिसरात निसर्गरम्य ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. काहींचे शहरात प्रशस्त बंगलेही आहेत. अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येऊ शकतात.

क्लार्क, पंटर, ड्रायव्हरही कलेक्टर

हप्ते वसुलीची जबाबदारी निरीक्षकांकडे आहे. निरीक्षकांनी स्वतःचे क्लार्क, पंटर आणि कार ड्रायव्हरला कलेक्टर म्हणून नेमले आहे. दर महिन्याच्या एक ते पाच तारखेला संबंधित कार्यक्षेत्रातील बार आणि वाईन शॉपमध्ये जाऊन हप्ते वसुली केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षाचे पडसात विधानसभेत

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यातील संघर्ष आणि वैयक्तिक लाभाचे साहित्य वाटपातील मनमानीच्या विरोधातील सदस्यांमधील असंतोषाचे पडसाद आमदारांच्या रुपाने शुक्रवारी विधानसभेत उमटले. कृषी विभागाच्या साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाला आहे, नियम डावलेले आहेत असा आरोप आमदार उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, हसन मुश्रीफ यांनी केला‍.

वर्षानुवर्षे ज्याप्रमाणे साहित्याची खरेदी केली जाते, त्याच पद्धतीने साहित्याची खरेदी यंदाही केली आहे‍. तरीही विधानसभेत आमदारांनी तक्रार करण्यामागे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यातील छुपा संघर्ष अधिक कारणीभूत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.

अध्यक्षा पाटील काँग्रसेचे नेते पी‍. एन‍‍‍‍. पाटील समर्थक आहेत. याउलट उपाध्यक्ष खोत विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. गोकुळमध्ये पाटील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत आहेत. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत महाडिक विरूद्ध सतेज पाटील यांच्यात अतिशय इर्षेने लढत झाली. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यातील दुरावा वाढत गेला. संधी मिळेल, तेथे एकमेकांवर कुरघोडी करू लागले.

स्वनिधीतून वैयक्तिक लाभासाठीचे साहित्य आपल्या गटातील म्हणजे नेते सतेज पाटील यांना मदत केलेल्या सदस्यांना कसे अधिक देता येईल, याकडे खोत यांनी लक्ष दिले. याउलट अध्यक्षा पाटील यांनी आपल्या गटातील सदस्यांना जादा साहित्य देण्यासाठी प्रयत्नशील राहिले.

दरम्यान, कृषी समितीचे पदसिध्द अध्यक्ष असल्याने उपाध्यक्ष खोत यांनी लाभाचे साहित्य वाटप करताना आपल्या गटातील सदस्यांना झुकते माप दिले‍. परिणामी महाडिक यांना मदत केलेल्या सदस्यांना कमी साहित्य मिळाले. कमी साहित्य मिळालेल्या सदस्यांत अन्यायाची भावना निर्माण झाली. त्यातून सदस्यांत असंतोष निर्माण झाला. सदस्यांनी पक्षाच्या आमदारांकडे कृषी विभागाविरोधात तक्रारी केल्या. आमदारांनी विधानसभेत यासंबंधी प्रश्न उपस्थित केला.

वाटप बेकायदेशीर

वैयक्तिक लाभाचे साहित्याचे वाटप सदस्यातर्फे करावे, असा कोणताही शासन नियम नाही. पण निवडणुकीत मत आपल्यालाच टाकावीत, यासाठी सदस्य बगलबच्चे, हितसंबंधीत, कार्यकर्ते यांना साहित्य देत असतात. अशा बेकायदेशीर वाटप प्रक्रियेत विधानसभेत प्रश्न विचारलेल्या आमदार समर्थकांचे सदस्यही अपवाद नाहीत‍.‌‌ नियमबाह्य, चुकीच्या पद्धतीने निकृष्ट साहित्याची खरेदी करण्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण बेकायदेशीरपणे साहित्य वाटपातबद्दल आमदार, सदस्य तोंड न उघण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

कृषी विभागाची साहित्य खरेदी नियमानुसारच केली आहे. नियमाचे कोठेही उल्लघंन केलेले नाही. कृषीचे वैय‌क्तिक साहित्य सदस्यांना वाटपासंबंधी तक्रारी आहेत‍‍. पदाधिकाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप आहे. त्यातून अनेक सदस्यांत नाराजी होती. त्या नाराजीचे पडसाद ‌अधिवेशनात उमटले‍. नियमानुसार काम केल्याने विभागीय आयुक्तातर्फे चौकशी झाली तरी आम्ही निर्दोषच ठरू.

चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पग्रस्त ‘आदर्श’ अंधारातच

$
0
0

आजरा : तालुक्यातील धनगरवाड्यांपर्यंत वीज पोहोचली आहे. पण उचंगी (ता. आजरा) प्रकल्पबाधित क्षेत्रातील चाफवडे नजिक उभारलेल्या ४०-४५ कुटुंबांची आदर्श वसाहत गेली वीस वर्षे वीज कनेक्शन मिळण्यासाठी धडपडते आहे. अथक परिश्रमातून शेतीपंपासाठी वीज मिळाली आहे. पण चाफवडे गावचे सरपंचपद भूषविणाऱ्या स्मिता घेवडे यांच्यासह अनेकांना अद्यापही अंधाराचाच वसा जपावा लागतो आहे. प्रकल्पासाठी सर्वस्व देऊनही प्रकल्पबाधित असल्यामुळे या वसाहतीला केवळ वीजच नव्हे, तर मूलभूत सुविधांनाही पारखे व्हावे लागले आहे. ही व्यथा संपणार तरी कधी असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

आजरा तालुक्यासह गडहिंग्लज परिसराला शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी साकरण्यात आलेल्या उचंगी प्रकल्पामुळे येथील चाफवडे, उचंगी, जेऊर व चितळे परिसरातील अनेकांना आपले सर्वस्व गमवावे लागले. उचंगी गाव तर पूर्णत: पुनर्वसित झाले. अद्याप प्रलंबित प्रश्नांमुळे हा प्रकल्प गेली २० वर्षे रखडला आहे. या २० वर्षांत आसपासच्या ग्रामस्थांना अनेक सरकारी सुविधांचा लाभ मिळाला. पण या प्रकल्पामुळे बाधीत पण १९९६ पासून उभारण्यात आलेल्या आदर्श वसाहतीला सर्व सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. जंगल परिसरालगतच्या या वसाहतीला रस्ते आणि पाणी नसू देत, पण किमान विजेची सुविधा मिळावी यासाठी कित्येक वर्षे अर्ज-विनंत्या करण्यात येत आहेत. पण प्रकल्पाचा शिक्का बसल्याने त्यांना कायमच दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे.

येथील अनेक विद्यार्थी हायस्कूलपासून महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असतात. परीक्षा आली की रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यासास बसावे लागते. विजेअभावी टीव्ही नाही की इतर कोणत्याही सुविधेचा वापर नाही. रॉकेलचा पुरवठाही मर्यादित असल्याने सात वाजले की सारी वसाहत चिडीचूप होते व झोपी जाते. पाण्यासाठी खासगी विहीरी किंवा वर्षापूर्वी सायफनने आणलेल्या स्त्रोतांचा आधार घ्यावा लागतो. यावर कायमचा तोडगा निघावा यासाठी सरपंच घेवडे यांनी पाटबंधारे विभागाकडून ना हरकत दाखला मिळविला आहे. येथील अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत. तरीही महावितरणने काही पोलसाठीची रक्कम संबंधीतांकडून भरून घेतली आहे. पण तारा ओढण्यात कासवगती आहे. याचा फटका वसाहतीला बसतो आहे. पंचायत समिती सभापती विष्णू केसरकर यांनीही याकडे विभागाचे गेले वर्षभर लक्ष वेधले होते. पण तकलादू उत्तरे देत वेळ मारून नेण्यापलिकडे काहीही झालेले नाही, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर ही वसाहत कधी उजळणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.

'आदर्श वसाहत प्रकल्पबाधित असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते, ते मिळाले आहे. माझ्याकडे येथील कार्यभार येण्याआधी व ठेकेदाराच्या कौटुंबिक अडचणीमुळे विलंब झाला आहे. पण लवकरात लवकर जोडण्या दिल्या जातील.

रामचंद्र लोंढे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगडियाच्या ३० लाखांवर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्दळीच्या स्टेशन रोडवरील हॉटेल रामकृष्णसमोर मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी अपघाताचा बनाव करीत गुजरातच्या एम. माधव कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने तीस लाख रुपये पळवले. शनिवारी (ता. २३) रात्री हा प्रकार घडला. सलग दुसऱ्या महिन्यात कुरिअर कंपनीच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कुरिअर कंपन्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एम. माधव या गुजरातच्या कुरिअर कंपनीच्या सांगली कार्यालयात अरुणभाई अमृतभाई सुतार काम करतात. शनिवारी रात्री ते सांगलीतून रोख ३० लाख रुपये घेऊन एसटीने कोल्हापूरला आले. कंपनीच्या कोल्हापूर कार्यालयाचे व्यवस्थापक निकेश पटेल त्यांना घेण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. दोघेही दुचाकीवरून कार्यालयाकडे जाताना हॉटेल राधाकृष्णसमोर एका तरुणाने दुचाकी आडवी लावून त्यांना अडवले. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी निकेश पटेल यांच्या दुचाकीला धडक दिली. तिघांनीही पटेल आणि सुतार यांना धक्काबुक्की, मारहाण करीत ३० लाख रुपये असलेली बॅग पळवली. या घटनेनंतर तब्बल सहा तासांनी सुतार यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. कुरिअर कंपनीच्या दोन्ही कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी सुरू आहे. तपासासाठी शाहूपुरी पोलिसांची चार पथके कार्यरत आहेत. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली.

सलग दुसरी घटना

कुरिअर कंपन्यांच्या मुद्देमालावर डल्ला मारण्याची सलग दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे सव्वादोन कोटींचे दागिने लुटण्याची घटना यापूर्वी घडली होती. पोलिसांनी त्या प्रकरणातील मुद्देमाल मिळवला तरी, चोरटे मात्र अद्याप फरारीच नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजपमध्ये जाण्याचा तूर्तास विचार नाही’

$
0
0

कोल्हापूर : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा सदस्य झालेले कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी तूर्त भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारण्याचा विचार नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिले.

संभाजीराजे लवकरच भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार, अशी चर्चा शनिवारी सायंकाळनंतर राजकीय वर्तुळात सुरू होती. संभाजीराजेंनी याविषयी सविस्तर खुलासा केला. राष्ट्रपतीनियुक्त सदस्याला नियुक्तीनंतर सहा महिन्यांत राजकीय भूमिकेविषयी माहिती द्यावी लागते. सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणार की सभागृहात तटस्थ राहणार, याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली. त्यातच दुसरे राष्ट्रपती नियुक्त सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार नसल्याचे जाहीर केल्याने संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारवरील दबावासाठी निर्भय मॉर्निंग वॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील दोन संशितांना ताब्यात घेतल्यानंतरही तपासात अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्यामुळे विविध पुरोगामी संघटनांकडून सरकारवर दबाव वाढवला जात आहे. तपासाची गती वाढावी यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्यावतीने रविवारी (ता. २४) सकाळी शहरात निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. २० ऑगस्टपर्यंत दर रविवारी निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवण्यात येणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर खुन्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने मॉर्निंग वॉक आंदोलन केले जात होते. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर आंदोलनाची व्याप्ती वाढली, मात्र पोलिसांच्या तपासाची गती वाढली नाही. या दोन्ही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासह सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. विशेष म्हणजे दोन्ही हत्यांमध्ये दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत, तरीही तपासात अपेक्षित गती नाही. यामुळेच विविध पुरोगामी संघटनांकडून सरकारसह तपास यंत्रणांवरील दबाव वाढवला जात आहे. २० ऑगस्टपासून दर रविवारी सकाळी शहरात निर्भय मॉर्निंग वॉक करण्याचा निर्णय पानसरे समता संघर्ष समितीने घेतला आहे. रविवारी (ता. २४) सकाळी बिंदू चौकातून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. खासगाब, मिरजकर तिकटी,

बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, जोतिबा रोड मार्गे बिंदू चौकात समारोप करण्यात आला. यावेळी घोषणांसोबत प्रबोधनाची गाणीही गाण्यात आली. यावेळी व्यंकाप्पा भोसले, भरत लाटकर, प्राचार्य टी. एस. पाटील, दिलीप पवार, सुजाता म्हेत्रे, कप‌िल मळे, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मण जाधव, शहाजी भोसलेंना पुरस्कार

$
0
0

सोलापूर

डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार सोमवारी जाहीर झाले. ज्येष्ठ साहित्यिक ल. सि. तथा लक्ष्मण जाधव यांना साहित्यसेवा तर औरंगाबादचे ज्येष्ठ समाजसेवक शहाजी भोसले यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

गुरुवार २८ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. लक्ष्मण जाधव यांचे होरपळ हे आत्मचरित्र व सुंभ आणि पीळ या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शहाजी भोसले यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पूर्णवेळ स्वीकारले असून, त्यांनी देशभरात १९०० ठिकाणी चमत्काराचे सादरीकरण करून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ स्वातंत्र्यसौनिक प्रभाकर लाडयांचे निधन

$
0
0


पंढरपूर

ज्येष्ठ स्वातंत्र्यसौनिक, पत्रकार प्रभाकर लाड गुरुजी (वय ९३ ) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना नातवडे, असा परिवार आहे. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या लाड यांनी स्वांतत्र्यानंतर पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केले. कामगार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. पंढरपुरातील छोट्या उद्योजकांना अर्थ पुरवठा करण्यासाठी त्यांनी निशिगंधा बँकेची स्थापना केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येथे नोटांवर चालतो कारभार

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर: मद्यनिर्मीती, विक्री आणि वाहतूक यासाठी भली मोठी नियमावली आणि कायदेही आहेत, मात्र जाचक नियम व अटींच्या आधारेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील हप्तेखोरी वाढली आहे. परवानाधारकांना नियमांची भीती घालून अधिकारी आणि कर्मचारीच हप्त्यांची मागणी करतात. नोटांवर सुरू झालेल्या कारभारामुळे नियम आणि कायद्यांना मात्र हरताळ फासला जात आहे. यातून अनेक बेकायदेशीर कामंही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.

जिल्ह्यातील बिअरबार आणि वाइन शॉपींना परवाना देण्याचे महत्त्वाचे काम या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहीशिवाय पूर्णच होत नाही. ज्या परिसरात मद्याची विक्री अधिक होते, त्या ठिकाणी परवाना मिळवण्यासाठी मोठ्या रकमेची उलाढल होते. शाळा, महाविद्यालये, मंदिरे यापासून शंभर मीटरच्या आत मद्य विक्रीला परवानगी दिली जात नाही, त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्र, जिथे बांधकामाला परवानगी मिळणार नाही अशा नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्रातही मद्य विक्रीला परवानगी देऊ नये असा संकेत आहे. या विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र केवळ वरकमाई पाहूनच बिअर बार आणि वाईन शॉपला परवानगी दिल्या आहेत. कसबा बावड्याकडून राजाराम बंधाऱ्यावर गेल्यानंतर नदीपासून अवघ्या ५० मीटरवर एका बारला परवानगी दिली आहे. नुकत्याच बदली झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीनेच हे शक्य झाले आहे. दोन आठवड्यापूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यात तो बार पूर्ण बुडाला होता. विशेष म्हणजे पाण्यातील बारच्या नावेही मद्याची ऑर्डर बुक झाली आणि त्या मद्याची विक्रीही झाली. हे मद्य नेमके कुठे विकले याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीच चौकशी केलेली नाही. केवळ हप्तेखोरीमुळेच नियम धाब्यावर बसवून राजरोस कारभार केला जात आहे.

बिअर बारच्या केवळ एका खोलीत मद्य प्राशन करण्याची परवानगी घेतली असतानाही बारच्या गार्डनमध्ये ग्राहकांच्या बसण्याची सुविधा केली जाते. वाइन शॉपमध्ये केवळ विक्रीला परवानगी आहे, मात्र जिल्ह्यातील काही मार्गांवर वाइन शॉपच्या मागेच मद्य प्राशन करण्याची व्यवस्था केली जाते. रात्री अकराला बार बंद करावेत, असा नियम आहे, मात्र रात्री साडेबारापर्यंत सुरू राहणाऱ्या बारवर कधीच कारवाई होताना दिसत नाही. एखाद्या बार मालकाने हप्ता देण्यास टाळाटाळ केली तरच कारवाईचा फार्स होतो. नियमित हप्ते मिळणाऱ्या बार आणि वाइन शॉपमधील परवाने नुतनीकरण, नोकरनामे, मासिक रिपोर्टकडेही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. मद्याच्या विक्रीनुसार हप्त्यांची रक्कम ठरवून दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसुलीही होते.

गावठीचा महापूर

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हातभट्टीची दारू काढली जाते. या दारुची विक्रीही मोठ्या प्रमाणात आहे, मात्र काही अपवाद वगळता उत्पादन शुल्क विभागाकडून यावर कारवाई होतच नाही. ग्रामीण भागात तर काही ठराविक गावं हातभट्टीसाठी प्रसिद्ध आहेत. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक हातभट्टीची निर्मिती होते. परिसरातील महिलांनी विरोध करूनही हे अड्डे सुरूच आहेत.

जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने

६२०

परमिट रुम

४०५

बिअर बार

२८३

देशी दारू दुकाने

४४

वाइन शॉप

ऑनलाइनलाही चकवा

या विभागाचा कारभार नुकताच ऑनलाइन पद्धतीने सुरू झाला आहे. मद्यनिर्मिती कंपन्यांकडून दर महिन्याला उत्पादित होणारे मद्य, विक्री केलेल्या मद्याची माहिती भरली जाते. वाईन शॉप आणि बिअर बारमधील खरेदी-विक्रीसह कर भरण्यासाठीही ऑनलाइन पद्धत सुरू आहे, मात्र विक्री कमी दाखवून सरकारी कर चुकवण्याचे काम मद्य उत्पादन करणाऱ्या संस्थांसह विक्री करणाऱ्या दुकानांकडून सुरू आहे. या प्रकाराला उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचे अभय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूक्ष्म गुरुत्वाकर्षणच्या लहरींचे होणार मोजमाप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विश्वातील सुक्ष्म गुरूत्वाकर्षण लहरींवर अभ्यास करणारी अमेरिकेतील 'लायगो' प्रयोगशाळा भारतात सुरू करण्यासाठी करार झाला आहे. भारतात केंद्र सरकार ती प्रयोगशाळा सुरू करेल. त्यानंतर पृथ्वीवरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणच्या लहरी मोजता येतील, असे प्रतिपादन युवा शास्त्रज्ञ चिन्मय कलघटगी यांनी सोमवारी केले.

येथील राजाराम महाविद्यालयातील सभागृहात मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, 'आइनस्टाइनले गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या थेअरीवर विश्वातील गुरुत्वाकर्षण आणि कृष्णलहरी यावर अमेरिकेतील लायगो प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे. संशोधन पथकांत माझ्यासह जगभरातील ८० विद्यापीठातील एक हजार संशोधकांचा सामावेश आहे‍. त्या पथकाने दीर्घ काळ संशोधन करून विश्वात आइन्सस्टाइनच्या सिद्धांताप्रमाणे गुरुत्वाकर्षणच्या लहरी असतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यासंब‌ंधी देशातही संशोधन होण्यासाठी लायगोशी एप्रिल २०१६ मध्ये करार झाला आहे. यामुळे देशात प्रयोशाळा होईल. गुरुत्वाकर्षण आणि कृष्ण लहरींचा अभ्यास देशात झाल्यास विश्वाची निर्मिती कधी झाली, कृष्ण लहरी एकमेकांवर कधी आदळल्या, त्यांचा परिणाम काय झाला, विश्वाचा विस्तार कसा झाला या प्रश्नांची उकल होण्यास मदत होणार आहे.

यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष एस. बी. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एल. डी. जाधव यांनी पाहुण्यांची ओेळख करून दिली. आर. व्ही. भोसले, डॉ. आर. एम. कांबळे यांची भाषणे झाली. योगेन कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहजीवन कॉलनीत आरोग्याची समस्या गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शासकीय विश्रामगृह आणि कदमवाडी परिसरात असलेला सहजीवन कॉलनी परिसर गेल्या पंधरा वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. काही रस्त्यांचे अपवाद वगळता बहुतांश रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. ड्रेनेजची सोय नसल्याने ठिकठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये सांडपाण्याची तळी साचली आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांत सहजीवन परिसर गतीने विकसित होत आहे. भोसलेवाडी, कदमवाडीच्या परिसरात घरांची संख्या वाढत आहे. अॅपल सरस्वती हॉस्पिटलसह मोठी अपार्टमेंट या परिसरात निर्माण झाली आहेत. टुमदार बंगल्यांनी हा परिसर आकर्षक बनला आहे. मात्र, पायाभूत सुविधांची वानवा असल्याने या परिसरातील समस्याही वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी रिकामे प्लॉट असल्याने या प्लॉटमध्ये सांडपाणी साचून अक्षरशः तळी बनली आहेत.

पावसाच्या दिवसात तर रिकाम्या जागा पाण्याने भरतात. वाढलेले गवत कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्याचबरोबर डासांचाही त्रास वाढतो. परिसरात ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने नागरिकांना नाक धरून पुढे जावे लागते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे, त्यामुळे महापालिकेने परिसरात ड्रेनेजची सुविधा करावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. केवळ खडीकरण झालेले रस्ते खड्ड्यांनी आणि चिखलाने माखलेले असतात. मोठ्या पावसात तर रस्ते जलमय बनतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कसरत करत घरांपर्यंत जावे लागते.

सहजीवन कॉलनी परिसरात अंतर्गत रस्ते एकमेकांना जोडलेले नाहीत. अजूनही बरेच प्लॉट रिकामे असल्याने रस्त्यांचे योग्य नियोजनही झालेले नाही. याच परिसरात अॅपल सरस्वती हॉस्पिटल आहे. मात्र हॉस्पिटलच्या समोरच खड्ड्यांचे साम्राज्य आहे. नुकत्याच झालेल्या पावसात रस्त्याची दूरवस्था झाली आहे. मात्र अजूनही रस्ते दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागतो.

भोसलेवाडी आणि कदमवाडीकडून शासकीय विश्रामगृहाकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचबरोबर कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलकडेही जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्याने हा मार्ग प्रशस्त होण्यासह खड्डेमुक्तही होण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवचरित्रात विकासाची प्रेरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आपल्या युवा पिढीकडून भाषा, धर्म, संस्कृतीचा अभिमान बाळगणे कमी होत आहे. त्यामुळे आपला देश बलवान व्हायचा असेल, तर देशातील युवकांनी शिवछत्रपतींचे चरित्र वाचावे', असे मत अमेरिका स्थित व्याख्याते हेमंत काळे यांनी आज येथे केले. शिवशक्ती प्रतिष्ठान व समर्थ भारत यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

अक्षता मंगल कार्यालयात 'जागर इतिहासाचा व समर्थ भारताचा वसा सामाजिक बांधिलकीचा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात हेमंत काळे यांच्यासह इतिहास संशोधक डॉ. केदार फाळके व कृष्णा पाटील यांची व्याख्याने झाली.

काळे यांनी 'विराट हिंदू संघटन व त्याचे महत्त्व संघशक्ती कलयुगे' या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले, 'युवकांमधील आत्मविश्वास कमी होत आहे. त्यांना आपली संस्कृती समजून सांगण्याची वेळ येऊ लागली आहे. त्यांच्यासाठी शिवछत्रपतींचे चरित्र प्रेरणादायी असून, त्यांच्यापैकी प्रत्येकाने ते वाचायला हवे. समाजातील प्रत्येक घटकाचे कल्याण करायचे असल्यास शिवचरित्र समजून घेणे महत्त्वाचे आहे.'

डॉ. फाळके यांनी 'आज्ञापत्र-शिवछत्रपतींची राजनिती' या विषयावर स्लाइड शोद्वारे माहिती दिली.

ते म्हणाले, 'शिवरायांचे आयुष्य १८ हजार दिवस होते. त्यातील केवळ दोन हजार दिवस त्यांनी लढाया केल्या. आयुष्यातील बराच भाग त्यांनी कुशल प्रशासक म्हणून काम वेगळा ठसा उमटविला आहे. आपत्कालीन निधी, शेतकऱ्यांविषयी कळवळा, गडकोटांच्या दुरुस्तीसाठी निधी काढून ठेवणे, अशी अनेक कामे त्यांनी चारशे वर्षांपूर्वी सुरू केली होती. हिंदी स्वराज्य हे नितीशास्त्रावर उभे राहिलेले एकमेव राज्य होते. शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांना स्त्रीयांविषयी असणारा आदार, याचे शत्रूही कौतुक करायचे.' शिवरायांच्या मराठी, राजस्थानी आणि पर्शियन भाषेतील पत्रांचा दाखला देत त्यांनी ही माहिती दिली. कृष्णा पाटील यांच्या व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव यांनी स्वागत केले. धनंजय नामजोशी यांनी आभार मानले. यावेळी इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, विकास भोसले, राजेश पाटील, योगेश रोकडे, प्रतिक जगताप, विनायक चौगुले, प्रवीण भास्कर, रोहन वेल्हाळ, अमोल पोवार, प्रमोद पाटील, युवराज माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images