Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगली, साताऱ्यात अवकाळी

$
0
0

टीम मटा (कुपवाड, सातारा, सोलापूर)

सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सातार शहरात गारांचा वर्षावही झाला. सांगली जिल्ह्याच्या आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याच्या काही भागांत रविवारी चांगला पाऊस झाला. सायंकाळी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे द्राक्षे, डाळिंब आणि रब्बी हंगामातील गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. करमाळा तालुक्यात हलका पाऊस झाला आहे. पावसामुळे आंब्यांचा मोहोर गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहरातही सांयकाळी चार वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. काही काळ थांबून पुन्हा साडेपाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस सुरू झाला.

द्राक्ष-बेदाण्याचे नुकसान
कुपवाड : सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव तालुक्याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळच्या काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. तासगावच्या पूर्व भागात चांगला पाऊस झाला आहे. खानापूरमध्ये गारांचा पाऊस झाला. आटपाडी परिसरात अर्धातास पावसाची रिमझीम सुरू राहिल्याने काढणी करुन शेतातच ठेवलेली ज्वारी, हरभरा, मका, गहू भिजले. डाळींब बागांनाही या पावसाने काही प्रमाणात फटका बसला आहे. जतमध्ये वादळी वाऱ्याने द्राक्ष बाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तासगाव पूर्वभागातील द्राक्ष बागाईतदार शेतकरीही या अवकाळी पावसाने हबकला आहे. काढणीला आलेली द्राक्षे कुजून आणि बेदाण्याच्या शेडवरील बेदाणा काळा पडून मोठे नुकसान होणार आहे.
रविवारी सकाळीही वातावरण झाकोळलेले होते. सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याचे झोत येऊ लागले. त्यापाठोपाठ अवकाळीनेही हजेरी लावली. आटपाडी तालुक्यातील जरंडी, करगणी, दिघंची या भागात. तासगाव तालुक्यातील सावळज, वायफळे, गव्हाण, अंजनी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळगाव, कुची या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.

करमाळ्यात हलका पाऊस
सोलापूर : दुष्काळाची आणि उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढतच चालली असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानकपणे बदल होऊन ढगांचा गडगडाट होऊन जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला. करमाळा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत होत्या. रविवारी सायंकाळी पाचनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले. ढगांचा गडगडाट सुरू होवून जिल्ह्याच्या काही भागात पावसानेही हजेरी लावली. करमाळा शहरासह परिसरात चांगला पाऊस झाला. पावसामुळे आंबा उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे.

मुलांनी लुटला पावसात भिजण्याचा आनंद
सातारा : साताऱ्यात सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरींनी शिडकाव केला. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पावसाने हवेत काहीस गारवा निर्माण झाला. तुरळक स्वरुपाचा हा पाऊस यंदाच्या हंगातील पहिलाच पाऊस असल्याने आणि रविवारची सुटी असल्याने लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आणि गारा वेचून खाण्याचा आनंद लुटला.
पहिल्यांदा पावसात जोर नव्हता मात्र, फिरून आलेल्या पावसाने शहरात पाणीपाणी केले. पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते जलमय झाले होते. अनेक सखल भागात पाणी साचले होते. राजवाडा, राधिका रोड, देवीचौकात पाण्याची तळी साचली होती. शहरातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. वाऱ्यामुळे सिल्व्हर ओकचे झाड पडून वाहतूक कोंडी झाली होती. बाजाराचा दिवस असल्याने बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या व पुन्हा गावाकडे परतणाऱ्या ग्रामस्थांची तारांबळ उडाली. पावसामुळे आंब्यांचा मोहोर गळून पडण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवेला मिळणार गती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील १६० बंद अवस्थेतील विमानतळांना भरीव आर्थिक मदत करण्याची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाला मोठी मदत होणार असून, विमानसेवा सुरू होण्यास गती येणार आहे. दरम्यान, खासगी विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर विमानसेवा २०१० पासून बंद आहे. २०११ साली काही महिने सुरू झाली; पण नंतर की बंद झाली. पावसाळ्यात उड्डाणासाठी कोल्हापूर विमानतळ अयोग्य असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत; पण काही परवाने मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. परिणामी कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत. राजकीय ताकद कमी पडत असल्याने ही सेवा बंद राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर खासगी विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. खासदार धनंजय महाडिक हे देखील विविध मंत्री व पदाधिकाऱ्यांना भेटून याबाबत पाठपुरावा करत आहेत. देशातील १६० बंद विमानतळांमध्ये कोल्हापूरचाही समावेश आहे. त्यामुळे हा निधी कोल्हापूरला मिळणार आहे. हा निधी तातडीने मिळाल्यास विमानसेवा सुरू होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्रनगर रस्ता अपघातांचा हॉट स्पॉट

$
0
0

satish.ghatage @timesgroup.com

कोल्हापूर ः शहराच्या पूर्व भागातून पश्चिम व दक्षिण भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असलेला सायबर चौक ते संभाजीनगर हा रस्ता अपघातांचा हॉट स्पॉट झाला आहे. एसएससी बोर्ड ऑफिसजवळील अपघाती वळण तर भयंकर धोकादायक आहे. उखडलेले स्पीडब्रीकर, अंतर्गत रस्त्यांवर स्पीडब्रेकरचा अभाव, फुटपाथवर अतिक्रमण, हॉटेल आणि मंगल कार्यालयांचे थेट रस्त्यावर पार्किंग असल्याने रिंग रोड दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे.

पश्चिम व दक्षिणेकडील उपनगराकडे जाण्यासाठी सायबर चौक ते संभाजीनगर पेट्रोल पंप हा रस्ता सर्वांत सोयीचा आहे. १०० फुटांहून जास्त रुंद असलेला हा रस्ता रस्ते विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तयार करण्यात आला. दुभाजक, त्यामध्ये शोभेची झाडे, दोन्ही बाजूला फूटपाथ असे सुंदर चित्र असले तरी पाच वर्षांत या रस्त्यांवरील उणिवा मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ राम मंगल कार्यालय ते एसएससी बोर्ड ऑफिस हे वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी दोन दिवसांतून एकदा अपघात ठरलेलाच. दोन वर्षांपूर्वी एका युवतीचा मृत्यू अपघात झाला होता तर सांगलीतील इंजिनीअरिंग महाविद्यालयाची बस उलटून चालकाचा मृत्यू झाला होता. मृत्युचा सापळा म्हणून ओळख असलेल्या या रस्त्यांवर स्पीडब्रेकर आहे. तसेच पुढे 'अपघातप्रवण क्षेत्र' असल्याचे सूचना फलकही लावलेले आहेत. मात्र तरीही अपघाताची संख्या कमी झालेली नाही.

रिंग रोडवर असलेले शिवाजी विद्यापीठ, एसएससी ऑफिस, शेंडा पार्क, सुभाषनगर, आयसोलोशन हॉस्पिटल आणि हॉकी स्टेडियम चौकातील स्पीडब्रेकर उखडले आहेत. त्यामुळे साहजिकच वाहनधारक वेगाने येत असल्याने अपघाताचे धोकेही वाढले आहेत. एसएससीबोर्ड समोरील दुभाजकात लावलेल्या झाडावर परिसरातील महिला कपडे वाळत घालतात. कपडे वाळत घालत असताना कोणतीच काळजी घेत असल्याने वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.

शिवाजी विद्यापीठ, सम्राटनगर चौक, एसएससी ऑफिस, शेंडा पार्क, हॉकी स्टेडियम या परिसरातील फूटपाथच्या बाजूच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण करून वेगाने टपऱ्या उभारण्याचे काम सुरू आहे. शेंडा पार्क चौकात सायंकाळी फूटपाथवर तर भाजी मंडईच भरते. संभाजीनगर सिग्नलजवळ खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या आहेत. खवय्ये मंडळी वाहने थेट रस्त्यांवरच लावत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. एसएससी ऑफिससमोरील झोपडपट्टीचे सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहत असते. पाण्याचे व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असते. काही ठिकाणी फूटपाथ उखडले आहेत तर अनेक ठिकाणी दुभाजकावरील झाडांची देखभाल झाली नसल्याने झाडे वाळली आहेत.

एसएससी ऑफिस रस्त्यांवर तीव्र वळणामुळे दोन दिवसांतून एक अपघात होतो. एक स्पीडब्रेकर व अपघाताचे ठिकाण म्हणून फलक लावले असले तरी छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठी सिग्नल, इंडिकेटरची सोय केली पाहिजे.

-राजेंद्र कल्याणकर, एसएससी ऑफिसजवळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईचा लाडूप्रसाद बंद करा

$
0
0

कोल्हापूर :

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारा लाडूप्रसाद बंद करून त्याऐवजी खडीसाखर आणि फुटाण्यांचा प्रसाद सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली असून अंबाबाईच्या प्रसाद बनवण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाचाही निषेध केला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अंबाबाईच्या लाडूप्रसाद बनवण्याचे काम महिला कैद्यांना देण्याचा विचार व्यक्त केला. त्याला हिंदुत्ववादी संघटनांनी सात्विकतेचा मुद्दा पुढे करत विरोध केला आहे. यासंदर्भातही या निवेदनात म्हटले आहे की, सात्विकता आणि सेवेच्या नावाखाली प्रसादाचा लाडू कुणी वळायचा या चर्चेमुळे अंबाबाई देवस्थानची बदनामी होत आहे. देवीचा प्रसाद म्हणून खडीसाखर आणि फुटाणे देण्याची पारंपरिक प्रथा होती. मात्र ती बंद करून तिरूपतीच्या धर्तीवर लाडूप्रसाद द्यायला सुरूवात झाली. ही प्रथाच बंद करून खडी, साखर, फुटाणे प्रसाद दिल्यास लाडूवरून सुरू असलेला वादही मिटेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अंबाबाई मंदिर विकासाबाबत, भाविकांच्या सुविधांबाबत चर्चा करण्याऐवजी लाडूप्रसादाबाबत सुरू असलेली नाहक चर्चा थांबवण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय टी-२० संघातील सहभागाबद्दल अनुजाचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर :

'ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्धच्या टी-२० सामन्यात केलेल्या कामगिरीची दखल घेत स्वतःच्या गावात आपुलकीने झालेल्या गौरवाने भारावून गेले आहे. यापुढेही अशीच कामगिरी करुन टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेन,' अशी ग्वाही अष्टपैलू खेळाडू अनुजा पाटीलने दिली.

क्षत्रीय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्वाभिमान संघटना, महाभारत कन्ट्रक्शन आणि संयुक्त रविवार पेठ तरुण मंडळाच्यावतीने अनुजाचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.

राज्य संघात देदिप्यमान कामगिरी केल्यानंतर अनुजाला भारतीय टी-२० संघात संधी मिळाली होती. या सामन्यांत तिने आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातही अनुजानेही उत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रांची येथे झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या तीन टी-२० मालिकेत अनुजाने लौकिकास साजेशी कामगिरी करत प्रत्येक सामन्याच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. फलंदाजीबरोबरच उत्कृष्ट गोलंदाजी करत सामनावीर पुरस्कारही पटकावला.

कोल्हापूरच्या या कन्येचा सन्मान करण्यासाठी बिंदू चौक येथे सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी अनुजाला रोख २५ हजार रुपये देऊन महापौर रामाणे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. उपमहापौर शमा मुल्ला, महाभारत कन्ट्रक्शनच्ये जयेश कदम, दिलीप पाटील, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक सचिन पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत, गणी आजरेकर, प्रताप जाधव, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीत प्रचंड वाऱ्यासह पाऊस

$
0
0

शाहूवाडीत प्रचंड वाऱ्यासह पाऊस

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

मेघगर्जनेसह, प्रचंड वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने शाहूवाडी तालुक्याला मंगळवारी झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून प्रचंड उष्मा वाढला आहे. सकाळी उन्हाची तीव्रता तर दुपारनंतर ढगाळ वातावरणाने अवकाळी पावसाची शक्यता गडद झाली होती. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मलकापूर परिसराला वादळी वा‍ऱ्यासह पावसाने जोरात झोपडून काढले. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान मलकापुरात झाले आहे. रत्नागिरी मार्गावर वारुळनजीक रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली तर कडवे (ता. शाहूवाडी) येथील घराचे छप्पर उडून गेले. सरूड (ता. शाहूवाडी) येथील आठवडी बाजारातही व्यापा‍ऱ्यांसह महिलांची तारांबळ उडाली.

अवकाळी पावसामुळे गु‍ऱ्हाळघरांच्या चिमण्या आठवडाभर थंडावणार आहेत. तु‍ऱ्यावर आलेल्या मका पिकासह, काकडी, आंबा आणि भाजीपाला पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वीट उद्योगही आर्थिक संकटात सापडला आहे.

शहर परिसरात शिडकाव

कोल्हापूर ः शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाट सुरू होता. काही भागात मात्र पावसाचा शिडकावा झाला. आठवडाभर उष्म्याने कहर चालवला आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्रीही तगमग वाढली होती. दोन दिवसांपासून तर सायंकाळी ढगाळ वातावरण होत होते. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने दिवसभरात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता होती. सायंकाळनंतर ढगांनी आभाळ भरुन गेले. रात्री नऊनंतर ढगाचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. काही भागात किरकोळ शिडकावा करत पावसाला सुरूवात झाली. आर. के. नगर, पाचगाव, उचगाव या परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या कालावधीत वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. कसबा बावडा, शिरोली परिसरातही रात्री पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. हातकणंगले, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातही रात्री वळीव पावसाचे वातावरण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर अधिकाऱ्यास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जिल्हा परिषदेकडे शाळेची पटसंख्या पत्रके पाठविण्यासाठी एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी हातकणंगले तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाबासो चौगोंडा पाटील याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. आर. जी. अस्मर यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिले. कोरोची (ता. हातकणंगले) येथे न्यू जनरेशन इनोव्हेटिव्ह इंग्लिश स्कूल चालविले जाते. शाळा कायम विनाअनुदानित आहे. या शाळेची पटसंख्या पत्रके भरुन ती जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी पाटीलने हजाराची लाच मागितली होती. २० नोव्हेंबर २००९ रोजी लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाटीलला पकडले होते. त्यांच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याबाबतचे दोषारोपपत्र येथील न्यायालयात दाखल केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाद्वारवर हॉकर्स झोनला स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार रोड व ताराबाई रोडवर हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्यास १७ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. महाद्वार रोडवरील व्यापारी व कोल्हापूर ​जिल्हा व्यापारी महासंघाने महापालिकेच्या कारवाईविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. पुढील सुनावणीवेळी महापालिका म्हणणे मांडणार आहे. व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगावकर यांनी पत्रकार बैठकीत याचिकेवरील सुनावणीसंबंधी माहिती दिली.

महापालिका प्रशासनाने, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, बिंदू चौक परिसर, मिरजकर तिकटी परिसरसह ५२ ठिकाणे नो हॉकर्स झोन घोषित केली होती. फेरीवाला धोरण अंमलबजावणीसंदर्भात महापालिकेत आयोजित बैठकीत बिनखांबी गणेश मंदिर ते जोतिबा मंदिरपर्यंतचा रस्ता फेरीवालामुक्त करण्याचे ठरले. सारडा दुकान ते पापाची तिकटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि ताराबाई रोडवर जॉकी बिल्डींगपर्यंत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता.

महाद्वार रोड आणि ताराबाई रोडवरील व्यापाऱ्यांनी, फेरीवाल्यांचे पुनर्वसन दुकानाच्या दारात करू नये, अशी भूमिका घेत आंदोलन केले. महापालिकेच्या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. जिल्हा व्यापारी महासंघ व महाद्वार रोडवरील १५ व्यापाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

कनिष्ठ स्तर १० वे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती के. एम. चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. व्यापाऱ्यांच्यावतीने युक्तिवाद करताना अॅड. अरविंद मेहता यांनी शहरातील ही प्रमुख बाजारपेठ आहे. या भागात शाळा, बँका, हॉस्पिटल्स आहेत. प्रशासानने एकदा मंदिर परिसर नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केला आहे. पुन्हा त्याच ठिकाणी हॉकर्स झोन करणे चुकीचे असल्याची बाजू मांडली, कोर्टाच्या निर्णयासंबंधीची माहिती श्री. कोरगावकर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते उपस्थित होते. १७ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत महापालिका म्हणणे मांडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारा लाख पशुधन संकटात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे. चाऱ्याअभावी जनावरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पशुधन वाचविण्यासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ११ लाख ६८ हजार पशुधन दुष्काळी संकटात सापडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणायला सुरुवात केली आहे. दुष्काळाचा गैरफायदा घेत उत्तम प्रतीच्या जनावराला कवडीमोल किमतीत विकत घेणाऱ्या कसायांची टोळी ग्रामीण भागात फिरत आहे. बळीराजासुद्धा मिळेल त्या किमतीत आपले पशुधन या कसायांच्या हवाली करत असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामापाठोपाठ पावसाने रब्बी हंगामातही दगा दिल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यात पाण्याबरोबरच चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये २,४९, १२६ लहान तर ९,१८, ८८१ मोठी जनावरे आहेत. त्यासाठी दररोज १५ लाख टन चाऱ्याची आवश्यकता आहे. तेवढ्या प्रमाणात चारा उपलब्ध नसल्यामुळे पशुधन वाचवायचे कसे, याची चिंता पशुपालकांना लागली आहे. पशुधन योजनेंतर्गत चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाने पर्याय म्हणून चाऱ्याची सोय करण्यासाठी वैरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मक्याचे बियाणे वाटप केले होते, मात्र पाण्याअभावी शेतकऱ्यांना पेरणीच करता आली नाही. त्यातच जिल्ह्यात उसालाच ओला चारा समजून कृषी विभागने जिल्ह्यात मुबलक चारा असल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला असल्यामुळे सरकारनेसुद्धा जिल्ह्यातील दुष्काळाकडे पाठ फिरवली. परिणामी जनावरांचे जगणे अवघड बनले आहे.
जिल्ह्यातील १२ लाखांवर असलेल्या जनावरांना रोज १५, ६५१ टन चारा लागतो. या शिवाय एका मोठ्या जनावराला पिण्यासाठी रोज ३५ ते ४० लीटर तर लहान जनावरांना १० ते १५ लीटर पाणी लागते. एकूणच जिल्ह्यातील पशुधनाला कोटी लीटरमध्ये पाणी लागते. एवढे पाणी आणणार कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. उसाचे वाढे वाडे वैरण म्हणून वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीसाठी भरीव निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'राजर्षी शाहू समाधी स्थळ विकासासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली जाईल,' अशी ग्वाही महापौर अश्विनी रामाणे यांनी दिली. तसेच छत्रपती शाहू ट्रस्टकडून समाधीस्थळाची जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. समाधीस्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे ठरले.
नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू समाधी स्थळ विकसित करण्यात येत आहे. यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. महापौर रामाणे यांनी सोमवारी समाधीस्थळाच्या कामाचा आढावा घेतला. समितीचे सदस्य सचिव व शहर अ​भियंता नेत्रदीप सरनोबत, वास्तुशिल्पी अभिजीत जाधव यांनी आराखड्याची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ७० लाखाची निविदा काढली असून यामध्ये मुख्य समाधीच्या चबुतऱ्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले असल्याचे सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतीदिन ६ मे रोजी आहे तोपर्यंत समाधीस्थळाचे जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे मत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी छत्रपती शाहू ट्रस्टच्या मालकीची जागा महापालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी समाधीस्थळाच्या विकासाकरिता आवश्यक निधीसाठी पालकमंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू असे सांगितले. बैठकीस स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, अफजल पिरजादे, शारंगधर देशमुख, मेहजबीन सुभेदार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाईचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली शहराच्या दोन विभागांतील ४६ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. या धार्मिक स्थळांना नियमितीकरणाच्या नोटिसा बाजवण्यात येणार असून, त्यांनी मुदतीत नियमितीकरण करून न घेतल्यास कोणत्याही क्षणी ती पाडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या ४६ पैकी दोन धार्मिक स्थळे स्थलांतरित करावी लागणार आहेत. अन्य आठ धार्मिक स्थळांचे बांधकाम नियमित करण्यासाठीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. दर महिन्याच्या १५ तारखेला याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला असल्याने सर्व महापालिका, नगरपालिकांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या संदर्भातील अहवाल पाच तारखेला राज्य सरकारला सादर करावा, असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्या सर्व धार्मिकस्थळांचे अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सांगली मिरज व कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात १७६ हून अधिक धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे दिसून आले होते. याची यादी प्रसिद्ध करून यावर सूचना, हरकती सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्य सरकारला दर महिन्याच्या १५ तारखेस कामाबाबत काय कार्यवाही केली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयात याप्रकरणी १९ जानेवारी २०१६ रोजी सुनावणी झाली त्यावेळी शासन आदेशानुसार कार्यवाही होत नाही म्हणून उच्च न्यायालयाने नाराजी प्रकट केली होती. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रभाग समिती एक व दोनच्या कार्यक्षेत्रात ४६ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे दिसून आले व त्यापैकी दोन रस्त्यावरच असल्यान ती स्थलांतरित करावी लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरातील दहा जण एमपीएससी गुणवत्ता यादीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत इस्लामपूर शहरातील तीन स्पर्धा परीक्षा केंद्रांतील दहा उमेदवार गुणवत्ता यादीत आले. स्पर्धा परीक्षेतील इस्लामपूर पॅटर्न याही परीक्षेत या विद्यार्थ्यांनी सिद्ध केला आहे.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या पाच जणांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. रणविजय शिवाजी पाटील, वाटेगाव (ता. वाळवा) स्नेहल संभाजी जाधव (भैरेवाडी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) संतोश मोहन पेदापल्ली (परभणी), रेखा हैबती रूपनर (अमरापूर ता. कडेगाव) व अनुराधा पाटील (इस्लामपूर) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यषस्वी विद्यार्थ्यांना केंद्रसंचालक प्रा. डी. बी. पाटील, प्रा. अजितकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
येथील राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे चार विद्यार्थी विक्रीकर निरीक्षक झाले. या केंद्राची वैशाली मोहन शिर्के, (कराड) ही विद्यार्थिनी ओबीसी मुलीत राज्यात दुसरी आली आहे. अनुराधा आनंदराव खामकर (इस्लामपूर) सुलोचना बाळासो चाळके (गौंडवाडी ता. वाळवा) व इंद्रजित बाळासो खोत (बहादूरवाडी ता. वाळवा) या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. प्रा. श्यामराव पाटील, प्रा. सौ. सुषमा शिंदे व केंद्रसंचालक विजय शिंदे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
येथील महाराष्ट्र अॅकॅडमीची विद्यार्थिनी डॉ. अश्निनी अशोक देषमुख (देसाई) येवलेवाडी (ता. वाळवा) हिने एनटी-बी गटातून राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्र अॅकॅडमीचे सचिव अस्लम शिकलगार, प्रा. उमाकांत वाघमारे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुसुमाग्रजांची कविता प्रेरणादायी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'कुसुमाग्रजांनी कवितेच्या सर्व प्रांताना समर्थपणे स्पर्श केला. त्यांच्या कवितेतून मानवी मनाला प्रेरणा मिळते,' असे मत ज्येष्ठ लेखक प्रा. भैरव कुंभार यांनी व्यक्त केले. येथील महालक्ष्मी नगरमधील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयामध्ये आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
प्रा. कुंभार म्हणाले, 'विश्वात्मक भूमिका घेऊन कुसुमाग्रज आपल्या कवितेच्या माध्यमातून ठामपणे उभे राहिले. सखीच्या हाताला चांदण्यांची उपमा देणारा हा कवी पाठीवरती हात ठेवून लढण्याची प्रेरणाही देतो.' प्रारंभी कवी कुसुमाग्रज व मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यानिमित्ताने वाचनालयाने आयोजित केलेल्या ग्रंथदान उपक्रमाचे कौतुक करत प्रा. कुंभार यांनी आपलेही यात योगदान असेल असे सांगितले. यावेळी रवींद्र जोशी, अरूणा देशपांडे, नारायण बेहरे, राम जोशी, शुभदा कामत, रश्मी कामत यांच्यासह अनेकांनी वाचनालयासाठी संजीवनी देशपांडे यांच्याकडे ग्रंथ सुपूर्द केले. याप्रसंगी 'निसर्गमित्र'चे अनिल चौगुले, पराग केमकर, अवधूत वीर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघाचे शिर्डीत अधिवेशन

$
0
0

सांगली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी (जि. अहमदनगर) येथे ७ मार्च रोजी होणार आहे. सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना सुरू ठेवण्याच्या मागणीसह २५ मागण्यांकडे या अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे, अशी माहिती संघाचे नेते शिवाजीराव पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि सुमारे दीड लाख शिक्षक या अधिवेशनास पस्थित राहतील. संघाचे यापूर्वी ओरोसला १० जानेवारी २०१३ रोजी अधिवेशन झाले होते. अधिवेशनासाठी सरकारने ऑन ड्युटी रजा मंजूर केली आहे. शिर्डीच्या कृषी विभागाच्या क्रीडांगणावर हे अधिवेशन होईल. ६ मार्चला प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिक्षण परिषद होत आहे. अधिवेशनात संघटनात्मक निवडी जाहीर होतील. प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रमुख मागण्या अशा : वीसपेक्षा कमी पटाच्या शाळा सुरूच ठेवाव्यात, नगरपालिका, महापालिकांतील शिक्षकांना १०० टक्के पगार शासनाने द्यावा, आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरावर एकच रोस्टर करावे, पटाची अट न लावता मुख्याध्यापक द्या, अशैक्षणिक कामे बंद करा, एमएससीआयटीला मुदतवाढ द्या, उत्कृष्ट सेवेबद्दल वेतनवाढ द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी पेपरलाच कॉपीचे तीन प्रकार

$
0
0

कोल्हापूर :

तणाव आणि हुरहूर असली तरी दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उत्साहाने परीक्षेला सामोरे जातानाचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचे चेहरे मात्र चिंताक्रांत दिसत होते. 'टेन्शन घेऊ नको, सोपे प्रश्न आधी सोडंव,' अशा सूचनांचे पालूपद त्यांच्याकडून सुरू होते. पेपरची वेळ झाली तसे 'ऑल‌ दि बेस्ट!' म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता केंद्रावर उपस्थित हजर झाले. परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मित्र आणि पालकांनीही केंद्रावर उपस्थिती लावली होती. पहिल्याच दिवशी मराठी पेपरला जिल्ह्यात दोन तर सातारा जिल्ह्यात एक असे तीन कॉपी प्रकार उघडकीस आले.

बारावीच्या तुलनेत दहावीच्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक परीक्षा केंद्रावर आले होते. मुलांचा नंबर कोणत्या हॉलमध्ये आहे हे पाहण्यासाठी पालकांची पळापळ सुरू होती. परीक्षा सुरू झाल्यानंतर पालकांना परीक्षा केंद्राबाहेर काढण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.

विद्यार्थ्यांना ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. त्यांना पेपरच्या सुरूवातीच्या अर्धा तास आधी केंद्रात सोडण्यात आले. विद्यार्थ्यांना पेपर नीट वाचता यावा, ते गोंधळून जाऊ नयेत, यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त होता. पालक व नातेवाईक पेपर सुटेपर्यंत केंद्राबाहेर थांबून होते.

कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विभागात ५ भरारी पथके कार्यरत आहेत. आज या पथकाला पहिल्याच पेपरला तीन गैरप्रकार आढळून आले. यामध्ये करवीर तालुक्यातील कुडित्रेतील श्रीराम हायस्कूल, गारगोटीतील कुमार भवन आणि सातारा जिल्ह्यातील जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलमध्ये कॉपीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळाचे विभागीय सचिव शरद गोसावी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावीनंतरच ‘स्पर्धे’त उतरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'आर्थिक परिस्थिती आणि स्पर्धा परीक्षा यांचा काहीच संबंध असत नाही. जिद्द, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते. स्पर्धा परीक्षेचा पाया हा दहावीनंतर रचला जाऊ शकतो. चौफर वाचन, फिटनेस, शिक्षकांचे मार्गदर्शन, जिद्द, चिकाटी आणि आत्मवि‍श्वास अत्यंत महत्वाचा आहे. यश मिळवण्याचे धेय्य ठेवा, कोणतीही परीक्षा अवघड नाही', असा कानमंत्र एमपीएससीतर्फे विक्रीकर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिला.

प्रत्येक जण पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होईल, असे नाही. मात्र त्यासाठी निराशा आणि आत्मविश्वास गमाविता कामा नये. कारण कोणतीही गोष्ट प्रयत्नपूर्वक केल्यास त्यात हमखास यश मिळते. दहावीनंतर आयुष्यातील दोन ते तीन वर्षे महत्वाची आहे. या वर्षांचे महत्व जाणून घेतल्यास स्पर्धा परीक्षा काहीच अवघड नाही. घरची स्थिती बेताची आहे. घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षेत यश मिळविता येते असे अजिंक्य आजगेकर याने सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही, असा गैरसमज दूर करावा. अभ्यासाची अनेक साधने उपलब्ध झाली आहे. वाचनालये, इंटरनेटसह स्पर्धा परीक्षांची पुस्तके सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकतात. दररोज तीन ते चार तास अभ्यास केला.नेमकेपणाने अभ्यास केल्यास अधिक तणाव कधीच जाणविला नाही. घरची परिस्थिती बेताची होती. मात्र यश मिळविण्यासाठी परिस्थितीवर मात केल्यास कोणतेही यश सहजपणे मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यात टॅलेट आहे. त्यांनी हे टॅलेट बाहेर काढण्याची गरज आहे असे प्रमोद भोपळेने सांगितले.

परीक्षा जवळ आली की दिवस रात्र अभ्यास ही पद्धत विद्यार्थ्यांनी सोडून द्यावी. या प्रकारच्या पद्धतीने केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. त्याचा फायदाही होत नाही. विक्रीकर निरीक्षक पदासाठी तीन वेळा प्रयत्न केला. मात्र तीनही वेळा यश मिळाले नाही. यश मिळत नसले तरी आत्मविश्वास आणि जिद्द सोडली नाही. त्यासाठी कुटुंबांचे मोठे सहकार्य लाभले. दोन वेळा केलेल्या प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक परीक्षेच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. केवळ पूर्व परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत नाहीत. ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी सातत्याने अभ्यास केल्यास यश सहजपणे मिळते असे सारिका शिर्केने सांगितले.

पेपर क्रमांक एक मराठी आणि इंग्रजी अभ्यासक्रम आणि पेपर क्रमांक दोन सामान्य अध्ययन आणि बुद्धीमत्ता चाचणी अभ्यासक्रमची पहिल्यापासूनच तयारी केली. दोनशे गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहायक या दोन्ही परीक्षांसाठी अभ्यासक्रमात समानता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चौफर अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ पाठांतरवर भर देऊन अभ्यास केला, असे चालणार नाही. कोणताही विषय आणि एखादा घटक समजला नसल्यास त्याचे निरसन होईपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. सातत्याने वाचनाची सवय अत्यंत महत्वाची आहे असे राजवर्धन पाटीलने सांगितले.

मी हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे वडिलांचे निधन झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्यये बाळगले. आर्थिक परिस्थिती बेताची होती. काही वेळेला नोकरी शोधण्यासाठी मित्रांकडून पैसे घेतले. इंग्रजी माध्यमाची पदवी घेतली. त्यापूर्वी डीटीएड पूर्ण करून वडगाव येथे खासगी शाळेत नोकरी केली. समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन रत्नागिरी येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयात लिपीक म्हणून रुजू झालो. दुसऱ्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही असे शशिकांत मानेने सांगितले.

स्पर्धा परीक्षेची नाहक भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीनंतर स्पर्धा परीक्षा नको, असा बहुतांशी विद्यार्थ्यांचा सूर आहे. ही भीती मनातून काढून टाकल्यास स्पर्धा परीक्षेत यश सहजपणे मिळू शकते. सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे. विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळविण्यासाठी बारावीनंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध वृत्तपत्रांचे वाचन महत्वाचे आहे. अनेक वृत्तपत्रांचे वाचन स्पर्धा परीक्षेसाठी वरदान आहे. मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे असे सुशांत भास्करने सांगितले. केवळ पाठांतर केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळते असे नाही. कारण पाठांतर केल्यास त्याचे आकलन महत्वाचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे नियोजन अत्यावश्यक आहे. दिवसभर अभ्यासाच्या तासांचे नियोजन महत्वाचे आहे. नोकरी आणि व्यवसाय करुनही स्पर्धा परीक्षा देणे सहज शक्य आहे. त्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. बारा आणि पंधरा तास अभ्यास करावा, असे नाही. नेमका आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते असे सुजाता जाधवने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीशक्तीनेच घडवले माझे जीवन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माझ्या लहानपणी मी आईला तृतीयपंथी, वारांगना यांची सेवा करताना पाहिले आहे. नर्स म्हणून नोकरीपलीकडे अशी संवेदना जपणाऱ्या माझ्या आईच्या या वेगळेपणाने मलाही ती दृष्टी आपोआप दिली. महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याच्या संघर्षात प्रोत्साहनाचे टॉनिक बनलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्यासारख्या गुरू. माझ्या आयुष्यात येणारी आणि माझ्या प्रत्येक चढउताराच्या वळणावर साथ देणारी पत्नी सुचित्रा माझा आधार बनली. अगदी परवा परवा जीवावर बेतलेल्या संकटातून मला जीवनदान देणाऱ्या महिला डॉक्टरांची शर्थ आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचे भावविश्व जाणून घेण्याची संधी देणाऱ्या वहिन्या... या स्त्री शक्तीतून मी जे अनुभव घेतले त्यातून मी अक्षरशा माणूस म्हणून घडलो...' अभिनेते, निवेदन आदेश बांदेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या रूपातून अनुभवलेल्या स्त्रीशक्तीचा पट उलगडला.

अरुण नरके फाउंडेशनच्यावतीने सुनीता नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिनेते आदेश बांदेकर यांची प्रकट मुलाखत त्यांच्या गुरूस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. एकीकडे गुरूशिष्यामधील संवाद आणि दुसरीकडे आदेश यांच्या आयुष्यात आलेल्या ​स्त्रियांमधील सशक्तपणाचे किस्से अशा प्रवाहात दोन तास रंगलेली ही मुलाखत रसिकमनाचे किनारे चांगलीच भिजवून गेली.

महिला शक्तीच्या प्रेरणेबरोबरच आपल्या करिअरबाबत बोलताना आदेश म्हणाले, 'मी कधीच मनोरंजनाचे राजकारण करत नाही. समाजकारणाचा व्यवसाय करत नाही . कला, समाजकारण आणि राजकारण अशा तीनही दालनाच्या माध्यमातून माणसांना आनंद देण्याचं, माणसं मिळवण्याचं काम करतो. कारण मला माणसांमध्ये रमायला आवडते. आज जर मला कुणी विचारले की तुझ्याकडे काय आहे तर मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्याकडे माणसांची श्रीमंती आहे. असंख्य जोडलेली नाती आहेत. मित्रांचा खजिना आहे. एका हाकेला धावून येतील असे स्नेही आहेत यासारखी श्रीमंती नाही.'

होममिनिस्टरच्या माध्यमातून साडे तेरा लाख किलोमीटचा प्रवास आजपर्यंत केला आहे असे सांगत या प्रवासातील अनेक हृद्य आठवणी बांदेकर यांनी उलगडल्या. मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील एक ५०० मुलांची शाळा दत्तक घेतले असल्याचेही त्यांनी सां​गितले. निर्मिती क्षेत्रातील अनुभवाबाबत बोलताना आदेश म्हणाले, कलाकार म्हणून नाविन्याची कास असली पाहिजे या भावनेतून निर्मिती क्षेत्रात उतरलो.

अरुण नरके यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवालानंतरही जप्त तांदूळ पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोठा गाजावाजा करत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला तांदूळ बनावट किंवा विशिष्ट केमिकलचा वापर केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य शाळेतून याबाबत गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन विभागाला अहवाल प्राप्त झाला आहे. जप्त तांदूळ नेण्यासाठी संबंधितांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र पत्रव्यवहार करुनही सुमारे ४० हजार किमतीचा ५० पोती तांदूळ नेला नसल्याने सर्व तांदूळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात पडून आहे.

बेळगाव (कर्नाटक) येथील आंतरराज्य टोळीकडून सात फेब्रुवारी रोजी बनावट तांदूळ म्हणून बाजार समिती आणि अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याचे सांगितले होते. बीटी कॉलेजसारख्या वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम कमी दरात तांदूळ विक्री होत असल्याने ग्राहकांची तांदूळ खरेदीसाठी गर्दी झाली होती. याची माहिती बाजार समिती आणि अन्न व प्रशासन विभागास मिळाल्यानंतर तांदूळ जप्त करण्यात आला. बाजार समितीने केवळ सेस स्वरुपात दंड वसूल करून तांदूळ अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतला होता. तांदूळ विक्री करणारे भैरू बजंत्री व सुरेश बजंत्री यांच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले होते. या तांदळाला विशिष्ट केमिकल्सचा सुगंध येत असल्याने नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाठवला होता. २५ फेब्रुवारीला आलेल्या अहवालात तांदूळ बनवाट नसल्याचा स्पष्ट दिले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने बजंत्री कुटुंबाशी तांदूळ नेण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ते फिरकलेले नाही.

जप्त केलेला तांदूळ जिल्हा प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. बनावट तांदळाच्या नमुन्याची केवळ भात (राईस) म्हणून तपासणी केली. त्यामुळे हा तांदुळ बनावट आहे किंवा नाही यापेक्षा तो राईस वर्गामध्ये मोडतो का? आणि त्यात सिंथेटिक रंगाचा वापर केला आहे का? एवढीच तपासणी करण्यात आली. त्यामुळे तो बनावट असण्यापेक्षा खाण्यायोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगरोत्थान’चे फेरनियोजन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरोत्थान योजनेंतर्गंत चार कोटींच्या विकास कामाबाबत महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेला प्रस्ताव योग्य आहे का ? आणि प्रस्ताव सादर करताना महापालिका सभागृहातील नव्या सदस्यांना विश्वासात घ्यायला हवे होत अशी भू​मिका मांडत या योजनेतील कामाचे फेरनियोजन करावे. अशी मागणी नगरसेविका मेहजबीन सुभेदार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. नगरसेविका मुजावर यांनी आयुक्त कार्यालयाला यासंबंधी पत्र दिले आहे. महापालिका सदस्यांना विश्वासात घेऊन नव्याने प्रस्ताव सादर करता येतो का हे तपासून पाहावे असे त्यांनी नमूद केले आहे.

महापालिकेने, १ जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने चार कोटीच्या विकास कामाचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात त्रुटी दाखवून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. महापालिकेकडून त्रुटीमध्ये दुरूस्ती करून पुन्हा प्रस्ताव सादर केला. मात्र या साऱ्या प्रक्रियेत नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. महापालिका निवडणुकीच्या अगोदर प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. यामुळे सभागृहात चर्चा गरजेची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नी ठोस धोरण हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेतकऱ्यांची आत्महत्या हा फार मोठा आघात असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. याबाबत संवेदनशीलता वाढविण्यासाठी सरकार, समाज, प्रसार माध्यमे व चळवळींच्या पातळीवर काही बदल आवश्यक आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज आहे,' असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या व प्रसारमाध्यमांची भूमिका' या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या समारोप्रसंगी बुधवारी वक्त्यांनी व्यक्त केला. वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभाग, वारणा महाविद्यालय व कोल्हापूर प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र झाले.

'सरकारी धोरण हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. धोरण बदलले तरच शेतकरी फायदेशीर शेती करू शकेल' असा विश्वास 'महाराष्ट्र टाइम्स' चे निवासी संपादक विजय जाधव यांनी व्यक्त केला.

जाधव म्हणाले, 'महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण परिस्थिती आहे. पण हे भीषण वास्तव समाजापुढे मांडण्यात प्रसारमाध्यमे कमी पडत आहेत. याउलट शेतकऱ्यांची आत्महत्या ही फॅशन झाली आहे, असे म्हणत या प्रश्नाची कुचेष्टा सुरू आहे. आज सुरू असलेल्या गदारोळात या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. आत्महत्या हे एक सामाजिक संकट आहे. म्हणूनच प्रसारमाध्यमांनीही संवेदनशीलतेने हा विषय हाताळण्याची गरज आहे. या विषयाकडे पाहण्याची संवेदनशीलता कमी झाली आहे. माध्यमे त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, राजकीय नेते सोयीने शेतकऱ्यांचा वापर करून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यात अडचणी येत आहेत.'

जाधव म्हणाले, 'खरेतर शेतकरी जगला, त्याने धान्य पिकवले तरच आपण जगू शकतो. तरीही त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही. प्रसारमाध्यमांनी याबाबत आग्रह धरायला हवा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. शेतकरी संघटना या राजकारण्याच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत', अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव म्हणाले, 'सध्या राज्यातील तसेच देशातील पर्जन्यमान कमालीचे बदललेले आहे, या परिस्थितीत पारंपरिक पीक पद्धतीवर विसंबून न राहता शेतकऱ्यांनी बदलत्या पर्जन्यमानानुरूप पीक पद्धतीत बदल आवश्यक आहे. पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांनी विषय केंद्रींत पत्रकारिता करणे काळाची गरज आहे. सखोल माहिती, संशोधनासह वाचकांच्या समोर वास्तववादी मांडणे आवश्यक आहे. कृषी पत्रकारितेच्या क्षेत्रात तरुणांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना योग्य सहकार्य दिले पाहिजे. त्यासाठी माध्यमांची सकारात्मक भूमिका महत्वाची आहे.'

यावेळी प्राचार्य डॉ. मंगला पाटील-बडदारे यांनी मनोगत व्यक्त केले. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमेधा साळुंखे-घाटगे यांनी आभार मानले. चंद्रशेखर वानखेडे, सुनील जाधव यांनी संयोजन केले. प्रा. डॉ. ​सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images