Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कळंब्यातील उपसा बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा तलावातील पाण्याचा साठा संपण्याच्या मार्गावर असल्याने शुक्रवारपासून पाणी उपसा बंद होणार आहे. तलावातील पाणी उपसा बंद झाला तर पाचगावच्या पश्चिम भागातील २७ कॉलन्यांमधील सुमारे दहा हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने गिरगावमधील दोन पाणी पुरवठा संस्थेतून पाणी उपसा करून त्याचा पुरवठा करण्याचे ठरविले आहे. तात्पुरत्या स्वरूपातील पाइपलाइनसाठी दहा लाखांचा खर्च होणार आहे. त्याचा आराखडा तयार करून जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. प्रशासकीय पातळीवर येत्या चार दिवसात आराखडा मंजूर होऊन पाइपलाइन टाकण्यास सुरूवात झाली नाही तर पाचगावकरांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने गिरगावमधील शाहू पाणी संस्था व भैरवनाथ संस्थेतून उपसा करण्याचे ठरविले आहे. सायफन पद्ध्तीने तात्पुरत्या स्वरूपात पाइपलाइन टाकून पाचगाव फिल्टर हाऊसपर्यंत पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ९,९९,८३८ रुपये खर्चाचे इस्टीमेट तयार करून मंजुरीसाठी करवीर पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर झाला आहे. टंचाई योजनेतून दीड किलोमीटर अंतरावरील पाणी पुरवठ्यासाठी मदत केली जाते.

जि.प.कडील काही निधी यासाठी खर्ची टाकून काम त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. अद्याप जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेने निधी मंजूर केलेला नाही. शुक्रवारपासून कळंबा तलावातील पाणी उपसा पूर्ण बंद झाला तर पश्चिम भागातील नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे.

सध्या आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. प्रशासकीय दिरंगाई झाली तर नागरिकांसमोर पिण्यासह वापरायच्या पाण्याचा मोठा प्रश्न राहणार आहे. खासगी टँकरने काहीजण पाणी पुरवठा करतात, पण त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.

गुरुवारी मासिक सभा

ग्रामपंचायतीने पाचगावच्या गावठाणमधील लोकवस्तीला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन बोअर ताब्यात घेतले आहेत. पाचगावच्या पश्चिम भागातील कॉलन्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी आणखी पाच खासगी बोअर ताब्यात घेतले जाणार आहेत. पाचगाव ग्रामपंचायतीची गुरूवारी मासिक सभा आहे. पाणी टंचाई हाच प्रमुख विषय आहे. सभेत खासगी बोअर ताब्यात घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस उमेदवारच केंद्रस्थानी

$
0
0

मुंबई, दिल्लीतील वजनावरच होणार उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : विधानपरिषदेसाठी रणधुमाळी सुरू झाली असली तरी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावरच निवडणुकीचे वातावरण ठरणार आहे. आमदार महादेवराव महाडिक अथवा सतेज पाटील या दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरच निवडणुकीत रंगत येणार आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी आणखी आठ दिवस तरी उमदेवारी जाहीर होण्याची शक्यता नाही. इच्छुकांचे मुंबई व दिल्लीतील वजनच आता उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार आहे. राष्ट्रवादी वगळता इतर कोणत्याच पक्षाची निवडून येण्याइतपत ताकद नसल्याने इतर पक्षांची उमेदवार असण्याची शक्यता फार कमी आहे.

विधानपरिषदेसाठी मंगळवारी निवडणूक जाहीर झाली. यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे असल्याने या पक्षात महिनाभर उमेदवारीसाठी फिल्डींग लावली जात आहे. यामध्ये महाडिक, सतेज पाटील, पी.एन. पाटील यांच्यासह प्रकाश आवाडे यांचा समावेश आहे. या नेत्यानी सोमवारी व मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. आपल्यालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी या नेत्यांनी केली. पक्षाच्या उमेदवारीसाठी अठरा वर्षात प्रथमच चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. महाडिक अथवा सतेज पाटील यांच्यात कोणालाही उमेदवारी मिळाल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. कारण या दोघांतील वाद टोकाला गेला आहे.

२ ते ९ डिसेंबर या काळात अर्ज भरण्याची मुदत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उशिरात उशिरा उमेदवारी जाहीर करण्याची पक्षाची व्यूहरचना आहे. महाडिक यांना उमेदवारी मिळाल्यास पाटील यांच्या घरातील किंवा अन्य व्यक्तीला ताकद दिली जाईल. याउलट पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास महाडिक स्वत‍ः अथवा स्वरूप महाडिक उमेदवार असण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास या निवडणुकीत आर्थिक व्यवहार मोठया प्रमाणात होणार आहे. यातून मतदारांची चांदी होणार आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी पी. एन. यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. विधानसभेतील आतापर्यंतच्या पराभवात या पक्षाचा मोठा वाटा आहे. यामुळे आमदार मुश्रीफ यांना पी.एन. पाटील कसे समजवणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. प्रकाश आवाडे यांनीही निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. महापालिका निवडणुकीत पाटील यांनी ताकद दाखवल्याने त्यांची दावेदारी प्रबळ झाली आहे.

दरम्यान, नेत्यांनी राज्यस्तरीय नेत्यांच्या भेटीगाटी घेत उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. सतेज पाटील यांच्या समर्थकांनी मंगळवारी कोल्हापुरात पतंगराव कदम यांची भेट घेतली. कदम यांनी कामाला लागा असा आदेश दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, अशोक जाधव, जयश्री चव्हाण, संदीप नेजदार यांचा सहभाग होता.

राष्ट्रवादीच किंगमेकर

महापालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीच किंगमेकर ठरणार आहे. राज्यात आघाडी झाल्याने हा पक्ष जिल्ह्यात बंडखोरी करण्याची शक्यता फार कमी आहे. मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यताही धूसर असून झालीच तर राजेंद्र पाटील यड्रावकर, के.पी. पाटील अथवा ए.वाय.पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मागील निवडणुकीत महाडिक यांना टक्कर दिलेले प्रा. जयंत पाटील अथवा माजी मंत्री विनय कोरे यांना देखील बाहेरून पाठिंबा देत निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी या निवडणुकीत दबावाचे राजकारण हसन मुश्रीफ करू शकतात. पण हे सारे काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावरच अवलंबून आहे.

काँग्रेस पक्षाची उमेदवारी मलाच मिळावी असा आग्रह राहील. पण न मिळाल्यास ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून आपलीच राहील.

- पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष

गेल्या चाळीस वर्षात पक्षाचे काम निष्ठापूर्वक करत आहेत. जिल्ह्यात काँग्रेसबरोबरच मित्र पक्षातही चांगले संबंध असल्याने उमेदवारी ​मलाच मिळावी असा आग्रह राहील. ज्यामुळे पक्षाचा विजय सुकर होईल.

- प्रकाश आवाडे, माजी मंत्री

राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसचा कोणीही उमेदवार असो त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा राहील. कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणूक लढवणार नाही.

- हसन मुश्रीफ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगच केले गिळंकृत

$
0
0

अनधिकृत धार्मिक स्थळांमुळे कोंडीच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील काही प्रमुख रस्त्यांशिवाय छोट्या पण प्रचंड वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यावरील धार्मिकस्थळांचाही वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडसर होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यांवरील वाहनांच्या पार्किंगची जागा कमी झाली असून ही वाहने रस्त्यांवर लावण्यात येत आहेत. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्यांवरुन चालण्याशिवाय पर्याय राहिलेला नसून काही ठिकाणी​ शाळा तसेच हॉस्पिटल असल्याने तेथील रस्त्यांवर लावली जाणारी वाहने धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

महापालिकेने मोठ्या रस्त्यांवरील अनाधिकृत स्थळांचा जसा सर्व्हे केला. तसाच तो छोट्या पण वर्दळीच्या रस्त्यांवरील अनाधिकृत स्थळांचाही केला आहे.अनेक ठिकाणे त्यापेक्षाही छोट्या रस्त्यांवरील आहेत. मंगळवार पेठ असो, शुक्रवार पेठ असो वा राजारामपुरी परिसरातील रस्ते असोत. या ठिकाणी फार मोठे प्रशस्त रस्ते नाहीत. त्यामुळे फुटपाथचा प्रश्नच नाही. तेथील रस्त्यांवर अनाधिकृत धार्मिक स्थळे आहेत.

शुक्रवार पेठेतील पंचगंगा हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. या हॉस्पिटलच्या इमारतीला लागूनच धार्मिक स्थळाची उभारणी केली आहे. मुख्य रस्त्यावर जवळपास दहा फूट बाहेर त्याचा आवार आहे.

या रस्त्यावर एसटी, ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या धार्मिक स्थळाबाहेर रिक्षा स्टॉपही आहे. या स्टॉपमुळेही तिथून ये जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर वाहन येत नाही हे पाहून पुढे जावे लागते. या रस्त्याला एका बाजूने उतार असल्याने वाहनांना वेग असतो. या परिसरात गर्दीच्यावेळी वाहतुकीची कोंडी होत असते.

लक्ष्मीपुरीतून उमा टॉकीजकडे जाणारा मुख्य रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. आयआरबीने रस्ते केल्यानंतर दुभाजकामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच दोन्हीबाजूला गटार ठेवण्यात आली आहे. रस्ता अरुंद असल्याने या गटारीच्या भागावरच दुचाकी पार्किंग केल्या जातात. तिथे असलेल्या एका धार्मिक स्थळासमोर अनेकदा दुचाकी रस्त्यावर लावल्या जातात. एकतर फुटपाथ नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन ये जा करावी लागते. तर रस्ता अरुंद असल्याने एखादे वाहन वळण घेत असेल तर तिथे वाहनांची मोठी रांग लागते.

सुरू आहे उभारणी

मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलचा ​परिसर म्हणजे दिवसभर गजबजलेला. एकाबाजूला केएमटी बस स्टॉप, खाऊ गल्ली, शाळा, केशवराव भोसले नाट्यगृह यांच्यामुळे वर्दळ असते. प्रायव्हेट हायस्कूलकडून शाहू मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडापच्या रिक्षा लागलेल्या असतातच. पण शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या रिक्षाही तिथेच असतात. त्यांच्यामुळेच रस्ता हाउसफुल्ल असतो. तिथेच असलेल्या एका धार्मिक स्थळाची हळूहळू उभारणी सुरू आहे. त्याच्याभोवतीने ग्रील लावण्यात आले आहे. त्याशेजारी, त्याच्यासमोर रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे या रिक्षा रस्त्यावरच असतात. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना तसेच अन्य नागरिकांना या गर्दीतून वाट काढावी लागते. दुचाकीस्वारांना येथून जाताना कसरत करावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांवर काही कामांचे बंधन

$
0
0

शिक्षणाधिकारी चौगुले यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालकाचा मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना दशवार्षिक जनगणना व निवडणूक याशिवाय अशैक्षणिक कामे शिक्षकांनी करू नयेत, असे म्हटले असले तरी आरटीइनुसार तीन कामे शिक्षकांनी केलीच पाहिजेत. ती बंधनकारक असल्याची स्पष्टोक्ती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा टाकला जात असल्यामुळे अनेक शिक्षकांनी याबाबत आवाज उठविला. काहींनी अशैक्षणिक काम करण्यास नकार दिला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्याच्या कारवाईचा इशारा दिला जात असल्यामुळे नाइलाजास्तव ही अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत असल्यामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली काम करत आहेत. याबाबत सर्व शिक्षक संघटना कृती समितीने बहिष्कारही घातला होता. त्यानंतर काही काळापुरते ही कामे लादण्याचे प्रमाण कमी करण्यात आले, पण पुन्हा नव्याने ही काम लादली जात असल्याची तक्रार शिक्षक करत आहेत.

यावर शिक्षणाधिकारी चौगुले यांनी आरटीइनुसार आपत्ती व्यवस्थापन, जनगणना आणि निवडणुकीचे सर्व कामे शैक्षणिक तासांच्या वेळेशिवाय कामे करणे बंधनकारक आहे. याशिवाय शाळांमध्ये जी अशैक्षणिक कामे लावली जात असल्यास ती शिक्षकांनी करू नये. मुळातच शैक्षणिक तासा व्यक्तिरिक्त इतर वेळी ही कामे केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर कोणताही विपरित परिणाम होत नसल्याचेही सांगितले.

महापालिकेच्या निवडणुकीचे काम केवळ प्रशिक्षण व त्या दिवशी याशिवाय प्रभाग रचना, स्लीप तयार करणे, जनगणनमधील एनसीआर पत्रक पूर्ण करण्याचे सांगितले या अशैक्षणिक कामाबाबत कोर्टात गेलो असून या २१ याबाबत कोर्टान स्थगिती दिली उद्या याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

- राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष, राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचा खर्च ५८ लाखांवर

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाने शर्थ केली. नेत्यांच्या सभा, रोड शो, कॉर्नर सभा, पोस्टरबाजीच्या माध्यमातून दोन प्रचाराचा धडाका उडाला होता. पक्षीय आणि व्यक्तीगत उमेदवारांच्या पातळीवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असल्याचे शहरवासियांनी पाहिले असताना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावयच्या अहवालात निवडणूक खर्च उमेदवारांनी दीड ते दोन लाख रुपयांपर्यत तर पक्षाचा खर्चही लाखाच्या पटीत आहे.

पक्षीय पातळीवर सर्वाधिक खर्च शिवसेनेच्या खात्यावर आहे. सेनेचे ५८ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यापाठोपाठ खर्च करण्यात काँग्रेस (२४,३९,९५७) आणि राष्ट्रवादीचा (२३,६९,५९२) नंबर लागतो. दुसरीकडे उमेदवारांचा व्यक्तीगत पातळीवरील खर्चही दोन लाखापर्यंत पोहचली आहे. उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा तीन लाखांपर्यंत आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करावा लागतो. उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर झालेल्या दिवसापर्यंतचा अहवाल देणे बंधनकारक आहे.

कोल्हापूर महापालिकेसाठी यंदा ५०६ उमेदवार रिंगणात होते. यापैकी अपक्ष उमेदवारांची संख्या १४० च्या आसपास होती. दोन डिसेंबर २०१५ पर्यंत निवडणूक खर्च अहवाल देण्याची मुदत आहे. काही पक्षाच्या खर्चात तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने त्यांना नोटीसा काढून पुन्हा ताळमेळ मागविला आहे. तो लवकरच सादर होण्याची शक्यता आहे.

भाजपपेक्षा ताराराणी आघाडीचा खर्च दुप्पट

भाजप-ताराराणी आघाडीने संयुक्तपणे निवडणूक लढवली. भाजपने ३८ तर ताराराणी आघाडीने ४१ जागा लढविल्या होत्या. भाजप आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात सभा घेतली. भाजपचा एकूण प्रचार खर्च हा १० लाख ४२ हजार ५०७ इतका झाला आहे. तर त्यांनी पक्षाकडून प्रत्येक उमेदवारावर झालेला खर्च २७ हजार ४३५ इतका आहे. ताराराणी आघाडीचा खर्च हा २२ लाख ५१ हजार ९३१ इतका झाला असून प्रती उमेदवार ५१ हजार १६८ इतका खर्च दर्शविला आहे. अखिल भारत हिंदू महासभेने पाच जागा लढवल्या, पण पक्षीय पातळीवर एक रुपयाही खर्च केला नाही.

काँग्रेसचा २४ लाखांवर

काँग्रेस पक्षाने सर्व ८१ जागांवर निवडणूक लढविली. प्रचाराच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा, मेळावे आयोजित केले होते. पक्षातर्फे ठिकठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. पक्षाचा एकूण खर्च हा २४, ३९, ९५७ इतका दाखविण्यात आला आहे. यापैकी प्रती उमेदवारासाठी ३०, १२३ इतका खर्च निश्चित केला आहे.

शिवसेना खर्चात अव्वल

शिवसेनेने निवडणूक कालावधीत प्रचाराचा धडाका लावला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा रोड शोसह मंत्र्यांचे प्रचार मेळावे भरवून वातावरण निर्मिती केली होती. सेनेचा खर्चाचा आकडाही इतर पक्षांपेक्षा जादा आहे. सेनेचा खर्च ५८, ०७, ०७१ इतका असून प्रती उमेदवारासाठी ७१, ६९३ इतका खर्च आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही बड्या नेत्यांच्या सभासह रॅली, कॉर्नर सभेवर भर दिला होता. ८१ उमेदवारांसाठी राबविलेल्या प्रचार यंत्रणेसाठी २३, ६९, ५९२ रुपये खर्च पडले आहेत. पक्षाकडून प्रती उमेदवारावरील खर्च २९, ६२० इतका दर्शविला आहे. सर्व जागा लढविलेल्या राष्ट्रवादीला पंधरा जागेवर विजय मिळवता आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक-सतेज धूमशान सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची रणधुमाळी शांत होताच आता विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २७ डिसेंबरला मतदान तर मतमोजणी ३० डिसेंबला होणार आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसने आघाडी केली असून त्यानुसार कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे.

काँग्रेसकडे चार नेत्यांनी उमेदवारी मागितल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातही विद्यमान आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री स‌तेज पाटील यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. जिल्ह्याचे राजकीय समीकरणही त्याचदिशने जात आहे. निवडणुकीसाठी २ डिसेंबपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या मतदारसंघातून आमदार महादेवराव महाडिक यांनी हॅट्रिक केली आहे. तेही आता पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाडिक यांच्यासह माजी राज्यमंत्री सतेज पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे चार नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. गेले दोन दिवस ते मुंबईत ठाण मांडून आहेत. काँग्रेसचा उमेदवार कुणीही असो, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार यावर निवडणुकीतील चुरस ठरणार आहे. महाडिक यांची मुदत १ जानेवारी २०१६ ला संपणार आहे. महाडिक विरूध्द सतेज पाटील लढत झाल्यास राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

स्वीकृतांसाठी प्रयत्न

निवडणुकीसाठीची आजारसंहिताही लागू झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान केंद्र असतील. ती अजून निश्चित झालेली नाहीत. मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन येथेच होण्याची शक्यता आहे. स्वीकृत सदस्यांना मतदानाची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अद्याप त्याला परवानगी मिळालेली नाही.

मी विद्यमान आमदार आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारीवर माझाच हक्क आहे. मला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित आहे. कारण जिल्ह्यात माझी ताकद आहे. तीन वेळा निवडून आल्याने चौथ्यावेळी निवडून येण्यात काहीच अडचण नाही.

-महादेवराव महाडिक, आमदार

महापालिका निवडणुकीत मी ताकद दाखवून दिली आहे. जिल्ह्यात सर्वत्र माझी ताकद आहे. विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याची माझी क्षमता आहे. पक्षाच्या विस्ताराबरोबरच जिल्हयाच्या विकासासाठी मला उमेदवारी मिळणे आवश्यक आहे.

-सतेज पाटील, माजी मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृहात झाडाझडती

$
0
0

गांजा पार्टीची घेतली गंभीर दखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोळी युध्द, बॉम्बस्फोट व गंभीर गुन्ह्यातील आरोपी व कैदी असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील गांजा पार्टीची गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे. कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांनी मंगळवारी कारागृहाला भेट देऊन संशयित कैद्यांकडे कसून चौकशी केली. त्यांनी सहा तासांहून अधिक काळ कारागृहाची झाडाझडती घेतल्याने अधिकारी व कर्मचारी हादरून गेले आहेत.

कारागृहात गांजापार्टी झाल्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत दोन कैदी गांजाचे झुरके मारत होते. तसेच त्याचे सहकारी चिकनही शिजवत होते. एक कैदी स्मार्ट फोनव्दारे चित्रीकरण करत होता तर आणखी एका कैद्याकडे मोबाइल दिसत होता.

या घटनेची गंभीर दखल घेत तुरूंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांच्या आदेशानुसार पश्चिम विभागीय पुणे येरवडा येथील कारागृह महानिरीक्षक साठे कोल्हापुरात आल्या. त्यानी दुपारी दोनला कारागृहाला भेट देऊन झाडाझडती घेतली. पुण्यातील चौधरी, परमार, सोनवणे, राठोड या कैद्यांची ओळख परेड घेतली. एक कैदी गवळी टोळीतील तर तीन आरोपी 'मोक्का'तील असल्याची माहिती पुढे आली आहे. व्हिडिओतील व प्रत्यक्षातील कैदी तेच आहेत का याची खातरजमा घेऊन साठे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. गेल्या दोन वर्षात कळंबा कारागृहातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्याकडे त्या चौकशी करणार आहेत. कारागृहात गांजा, मोबाईल, चिकन, भांडी, कशी आली, याची चौकशी त्यांनी कैद्यांकडे सुरू केली आहे. कारागृह अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व कर्मचाऱ्यांच्या मदतीने पार्टीसाठी साहित्य कारागृहात आणल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. गांजा पार्टीला मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे बुधवारी चौकशी करणार आहेत.

प्राथमिक चौकशी सुरू

वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण कळंबा कारागृहाला मंगळवारी दुपारी भेट दिली. घटनेची गंभीर दखल घेऊन प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. चौकशीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल, असे साठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधश्रद्धेतून वडिलांकडून मुलाच्या पायात बेड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरज तालुक्यातील आरग येथे अंधश्रद्धेतून सागर शंकर हेरवाडे या बारा वर्षांच्या मुलाच्या पायात चार किलो वजनाच्या लोखंडी बेड्या घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या बेड्यांमुळे लंगडत चालणाऱ्या सागरला रिपाइं कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.

कर्नाटकातील केंपवाड (ता. अथणी) येथील हेरवाडे कुटुंबीय शेतमजुरीसाठी आरगेत वास्तव्यास आहे. सागरचे वडील शंकर हेरवाडे यांनी सागर आपल्या सोबत कामाला येत नाही. तो नेहमी शाळेला जाण्याचा हट्ट करीत असतो. म्हणून कर्नाटकातील एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून सागरच्या पायात जाड लोखंडी बेड्या घातल्या आहेत. सागरच्या पायात जाड बेड्या असल्याने चालणे, फिरणे अवघड झाले होते. लंगडत कसा बसा सागर फिरत असताना आरग-शिंदेवाडी रिपाइं कार्यकर्ते लक्ष्मण नाईक यांना दिसला. पायातील बेड्यांमुळे रडकुंडीला आलेल्या सागरची विचारपूस केल्यानंतर बेड्या वडिलांनी घातल्याचे त्याने सांगितले. सागरला मिरजेत आणून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. सागरच्या आजीशी संपर्क साधला असून, त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. अन्यथा सरकारी रिमांडहोममध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्य दुष्काळमुक्त करू

$
0
0

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, कराड

'शेतकऱ्यांना सक्षम बनवून महाराष्ट्र राज्य संपूर्णपणे दुष्काळमुक्त करू,' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येथे आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, 'प्रदर्शन आयोजनात बारा वर्षांचे सातत्य राखण्यात आले आहे. शेतीसमोर असणारे आव्हाने दूर करायचे असतील तर शेतीमध्ये नवनवे प्रयोग झाले पाहिजेत. मागील वर्षी २४ हजार गावांत खरीपाचा दुष्काळ होता. यंदाही १५ हजार गावांत खरिपाचा दुष्काळ आहे. शेतीसमोर प्रचंड आव्हाने उभी असल्याने पाण्याचे योग्य नियोजन केल्याशिवाय शाश्वत शेती होणार नाही. वातावरणीय बदलाने पावसाचे सूत्र बदलले आहे. या बदललेल्या सुत्राचा अभ्यास आणि संशोधन करून शेती क्षेत्रामध्येही बदल करावयाची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार अभियान हे महत्वांकाक्षी अभियान हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या शेती समस्यांवर मात करायची असेल तर पाण्याचे विकेंद्रीत जलसाठे निर्माण झाले पाहिजेत. जलसंधारणाची कामे अधिकाधिक झाले पाहिजेत. पाण्याच्या जुन्या स्त्रोतांचे बळकटीकरण झाले पाहिजे, तरच शेती करणे सुलभ होईल.' दरम्यान, फडणवीस यांनी कृष्णा कारखान्याच्या ऊसविकास व सिंचन योजनेला सरकार सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री आमदार जयंत पाटील म्हणाले, 'सलग बारा वर्ष यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कृषी प्रदर्शन भरवून एक वेगळा उच्चतम दर्जा या प्रदर्शनाने गाठला आहे. नवनव्या गोष्टी पाहून या प्रदर्शनाद्वारे नवी पिढी उद्योगशील झाली आहे. शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहचविण्याचे काम हे प्रदर्शन करीत आहे. शेतकऱ्यांनीही ऊसाच्या पलिकडे जावून नवे प्रयत्न करायला हवेत.'

या प्रसंगी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृह, कृषी व पणन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, सांगलीचे खासदार संजय पाटील, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चेरेगावकर, आमदार शंभुराज देसाई, नरेंद्र पाटील, जयंत पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

सहकारमंत्री म्हणातात

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शंभर शहरांमध्ये 'शेतकरी बाजार' सुरू करणार.

शेतकऱ्यांनी आगामी काळात या शेतकरी बाजाराचा फायदा घ्यावा.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गोदाम आणि कोल्ड स्टोअरेज बांधणी आवश्यक आहे.

स्टोअरेजमध्ये तसेच गोदामांमधून शेतकऱ्यांचा माल ठेवण्यात येईल.

गोदाम आणि कोल्ड स्टोअरेज बांधणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अनुदान दिले जाईल.

महिलांसाठी निवारागृह, शेतकऱ्यांसाठी स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी आदींसाठी २५ कोटींची योजना आखली आहे.

दरवर्षी पाच हजार नवीन गावांत जलयुक्त शिवार अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्वॉरी झोनमध्ये दगड उत्खनन

$
0
0

जयसिंगपुरात वडार समाजबांधव आंदोलन तीव्र करणार

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

दगड खाणीसाठी जागा मिळावी याकरिता येथील वडार समाज बांधवांनी सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी क्वॉरी झोनमधील गट क्रमांक ३११ मध्ये ठिय्या आंदोलन केले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी याठिकाणी मुरूम व दगडाचे उत्खनन सुरू करण्यात आले. आंदोलन तीव्र करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

दगड खाणीसाठी गट क्रमांक ३११ मधील क्वॉरी झोनमधील ४२ एकर जागा मिळावी, अशी वडार समाजाची गेल्या दहा वर्षापासूनची मागणी आहे. जयसिंगपुरात मोठ्या संख्येने वडार समाजबांधव असून दगड फोडून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. जागेसाठी शिष्टमंडळांने महसूलमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, प्रश्न प्रलंबित आहे. मोर्चे, बंद यासारखी आंदोलने करूनही सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे मंगळवारी वडार समाजबांधवांनी क्वॉरी झोनमधील जागेत ठिय्या आंदोलन केले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते.

बुधवारी सकाळी पुन्हा क्वॉरी झोनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. सरकारीपातळीवर कोणत्याच हालचाली होत नसल्याने संतप्त झालेल्या वडार समाजबांधवांनी या ठिकाणी मुरूम व दगड उत्खननही सुरू केले. मात्र, दिवसभर याठिकाणी तहसीलदार अथवा अन्य अधिकारी फिरकले नाहीत.

आमदार उल्हास पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन हा प्रश्न आपण विधानसभेत मांडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वडार समाजाचा दगड खाणीसाठी जागेचा प्रश्न महत्त्वाचा असून, सरकारला मंजुरी द्यायला भाग पाडू असेही ते म्हणाले. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना भेटून याप्रश्नी त्यांचे लक्ष वेधण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर म्हणाले, 'वडार समाजाला जागा मिळावी यासाठी शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाठपुरावा केला. याबाबत बैठकीचे आयोजन व्हावे यासाठी ते सचिवांची भेट घेणार आहेत.' दरम्यान, वडार समाजाच्या या आंदोलनास क्रशर असोसिएशनबरोबरच अन्य व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली. जागेबाबत त्वरित निर्णय न झाल्यास रास्ता रोको, रेल्वे रोको करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोवार दाम्पत्यावर होणार कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनधिकृत बांधकामप्रश्नी नगरसेवक दिलीप पोवार व माजी नगरसेविका सरस्वती पोवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव महापालिकेच्या सभागृहाने दोन वेळा नामंजूर केला होता. सभागृहाचे हे दोन्ही ठराव नगरविकास विभागाने विखंडीत केल्याने पोवार दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा महापालिका प्रशासनाचा मार्ग सुकर झाला आहे.

पोवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाने जानेवारी व मार्च २०१५ मधील सर्वसाधारण सभेपुढे ठराव मांडला होता. मात्र महापालिका सभागृहाने पोवार यांच्या विरोधातील ठराव फेटाळून लावले होते. त्यानंतर प्रशासनाने नगरविकास विभागाकडे हे ठराव सादर करून सभागृहाचा प्रस्ताव विखंडीत करण्याची मागणी केली होती. महासभेने पोवार यांच्या बाजूने केलेले दोन्ही ठराव महापालिका कायद्यातील तरतुदीचा भंग करणारे असल्याचे निदर्शनास येत असल्याचे कारण नमूद करत नगरविकास विभागाने दोन्ही ठराव विखंडीत केले. यासंबंधी प्रशासनाला पत्र मिळाले आहे. प्रशासन आता पोवार यांच्यावर कारवाईसाठी कोर्टात जाणार असल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२० व्हिडिओ गेम म‌‌शीन छाप्यात जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांनी शहरातील चार प्रमुख व्हिडिओ पार्लरवर छापे टाकून ११३ जणांना अटक केली, तर रोख चार लाख दहा हजार रूपये, २४ लाख ६० हजार रूपये किंमतीची १२० व्हिडिओ गेम मशीन जप्त केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. जुना राजवाडा पोलिसांनी सरस्वती टॉकीज येथील क्लासिक व्हिडिओ गेम सेंटरवर छापा टाकून रोख दोन लाख १९ हजार ५७५ रूपये जप्त केले. तसेच दहा लाख रूपये किंमतीची ५० व्हिडिओ गेम मशिन, ३४ मोबाइल जप्त करून ४० जणांना अटक केली. या पार्लरचा मालक रणधीर महाडिक फरारी आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी क्लासिक व्हिडिओ गेमवर छापा टाकून एक लाख ५० हजार ८१५ रूपये जप्त केले. तसेच आठ लाख किंमतीची ४० मशिन जप्त करून ४४ जणांना अटक केली. शाहूपुरी पोलिसांनी प्रभाकर प्लाझा येथील क्लासिक एंटरमेंट व्हिडिओ गेमवर छापा टाकला. पोलिसांनी रोख ७६ हजार ९५ रूपये जप्त केली. तसेच पाच लाख २० हजार किंमतीची वीस मशिन जप्त केली. २० हजार ५०० किंमतीचे मोबाइल जप्त केले. तसेच दोन मोटासायकल जप्त करून १८ जणांना अटक केली.राजारामपुरी पोलिसांनी शिवेच्छा व्हिडिओ पार्लर छापा टाकून सहा व्हिडिओ मशिन जप्त केली. तसेच रोख ३५२५ रूपये जप्त केले. तसेच राजश्री लॉटरी सेंटरवर छापा टाकून सहा संगणक जप्त केले. पोलिसांनी एक लाख ४३ हजार ५२५ रूपये जप्त केले.

पोलिसाच्या आत्महत्येने आली जाग

इचलकरंजीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. एका पोलिसानेच व्हिडिओ पार्लरमध्ये पैसे गमावले होते. पोलिसांनाच जर खासगी सावकारकीचा त्रास होत असेल तर सामान्य व्यक्तींना किती त्रास होत असेल या भावनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक नव्हे जुगार

$
0
0

व्हिडीओ पार्लरमधील खेळांतून अनेक कुटुंबांची वाताहत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करमणुकीच्या नावाखाली शहर आणि जिल्ह्यात राजरोसपणे व्हिडीओ पार्लर जुगार सुरू आहे. पोलिस प्रशासनाने व्हिडिओ पार्लरवर कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. व्हिडीओ पार्लरमध्ये जुगार खेळणाऱ्या अनेकांच्या कुटुंबांची वाताहत होत असल्याने कारवाई सुरू केली आहे.

पत्ते खेळणे, कॅरम खेळणे, मशिनवर व्हिडीओ खेळणे ही करमणुकीची साधने आहेत. रमी कल्ब, कॅरम क्लब व व्हिडीओ पार्लरला जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक विभाग परवानगी ​देते. विशिष्ट रक्कम भरून कॅरम खेळायला, पत्ते खेळायला व व्हिडीओ पार्लरमध्ये खेळायला परवानगी आहे. पण क्लब व व्हिडीओ पार्लरचे मालक जुगारच्या नावाखाली अनेकांचे खिसे रिकामे करतात.

व्हिडीओ पार्लवर एका तासाला विशिष्ट रक्कम भरून कॉईन घेतले जातात. हे कॉईन टाकून विशिष्ट नंबर प्रेस केला जातो. जर नंबर लागला तर जीत होते. जर नंबर लागला नाही तर हार होते. जो नंबर प्रेस केला जातो त्याला जादा कॉईन मिळतात असे या खेळाचे स्वरूप आहे. कॉईनची किंमत दाखवून जुगार खेळण्यास प्रोत्साहित केल जातेे. विशिष्ट रक्कम भरून कॉईन खेळणाऱ्याला दिले जाते. कॉईन टाकून जो जिंकतो त्याला रक्कम दिली जाते. जॅकपॉटच्या नावाखाली अनेकजण जुगार खेळण्यासाठी येतात. पण मशीन सेट केली असल्याने खेळणाऱ्या व्यक्तीला जिंकण्याची संधी कमी मिळते. एक हजार रूपये जुगार खेळणारा माणूस चारशे ते पाचशे रूपये गमावून जातो. अनेक ठिकाणी रूपयांच्या पटीत खेळ खेळला जातो.

पोलिसांना हप्ता पोच झाला की व्हिडीओ पार्लरला मुक्त रान दिले ​जाते. अनेक व्हिडीओ पार्लर परवानगीशिवाय सुरू आहेत. तर अनेक व्हिडीओ पार्लरना दोन मशिनची परवानगी असताना पाच ते आठ मशिन लावून पैसे कमाईचे मशिन सुरू असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिकस्थळप्रश्नी संघर्षाची चिन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील १३० धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही होणार आहे. मात्र विविध संघटनांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनधिकृत धार्मिक स्थळाच्या कारवाईवरून प्रशासन आणि संघटनांत संघर्षाची चिन्हे आहेत. अनेक धार्मिक स्थळे बेकायदेशीरपणे उभारली असताना आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळे येत असताना संघटनांनी विरोध करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. मंदिराची उभारणी करतानाच काही​ ठिकाणी राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे वाढीव बांधकाम केले आहे. सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून मंडप, शेड उभारले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर विविध संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेनेचा आज मोर्चा

मंदिरावर होणाऱ्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे गुरूवारी (ता.२६) महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवार पेठ येथील शिवसेना शहर कार्यालयातून सकाळी ११.३० वाजता महापालिकेवर मोर्चा निघणार आहे. यावेळी मंदिर हटविण्यासंदर्भात देण्यात येणाऱ्या नोटिसांची महापालिकेसमोर होळी केली जाणार आहे. महापालिकेतील विठ्ठल रामजी शिंदे चौकातील श्री गणेश मंदिरासमोर महाआरती केली जाणार आहे. मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

काही संघटनांनी अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्याची मागणी केली आहे. याचा अर्थ ते चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत आहेत. शहरात वाहतुकीची समस्या वाढली असताना काही ठिकाणी रस्त्यालगत, चौकात धार्मिक स्थळांची उभारणी केली आहे. यामुळे रहदारीला अडथळा होत असताना, संघटना मात्र कारवाईला विरोध करण्याच्या भूमिकेत आहेत.

-सचिन पाटील (मंगळवार पेठ)

अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीसा

हरकती व सूचना मांडण्यास एक महिन्याची मुदत

काही धार्मिक स्थळांचे नियमितकरण, काही ठिकाणी स्थलांतरण

अंतिम टप्प्यात धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय

तत्पूर्वी विविध घटकांची बैठक घेऊन चर्चा होणार

कोर्टाचे जून २०१६ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेअभावी तीस कुलगुरूंची परिषदेकडे पाठ

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

केवळ विमानसेवा नसल्याने चार राज्यांतील ३० कुलगुरुंनी पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेकडे पाठ फिरवली. मुंबई आणि पुणेपर्यंत परिषद असती तर आलो असतो, मात्र कोल्हापूरला विमानसेवा नाही. त्यामुळे केवळ मुंबई आणि पुणे येथून कारने प्रवास करावा लागणार असल्याने तीस कुलुगुरुंनी परिषदेकडे पाठ फिरवली आहे.

शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विश्वविद्यालय संघातर्फे दोन दिवस पश्चिम विभागीय कुलगुरुंची परिषद होत आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडे यजमानपद आहे. या परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठाकडून साठ विद्यापीठाच्या कुलगुरुंशी संपर्क साधण्यात आला. विद्यापीठातर्फे गुजरात, राजस्थान, गोवा आणि महाराष्ट्रातील कुलुगुरुंना निमंत्रित करण्यात आले होते. शेवटच्या दिवसापर्यंत तीस कुलगुरुंनी या परिषदेसाठी नोंदणी केली.

परिषदेच्या नोडल ऑफिसर यांच्याकडूनही प्रयत्न सुरु होते. गेले पंधरा दिवस या परिषदेची तयारी सुरु होती. प्रत्येक समितीकडून आढावा घेतला जात होता. कुलगुरुंच्या संपर्कासाठी आणि त्यांच्याकडून आलेल्या निरोपाची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली. मात्र तीस विद्यापीठाच्या कुलगुरुंनी केवळ विमानसेवा नसल्याने कोल्हापूरला येऊ शकत नाही, असे सांगितले. काही कुलगुरुंनी आपल्या स्वीय सहायकांच्याकडून शिवाजी विद्यापीठाला निरोप दिला.

परिषदेकडे पाठ फिरवलेल्या कुलगुरुंनी विमानसेवा नसल्याने कामकाजावर परिणाम होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाला कळविले आहे. परदेशी उद्योजकही विमानसेवा नसल्याने कोल्हापुरात येण्यासाठी तयार नव्हते. गेले कित्येक दिवस लोकप्रतिनिधींकडून विमानसेवा सुरु होण्याची मृगजळासारखी आश्वासने दिली जात आहे. त्याचा फटका विद्यापीठात होत असलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेला बसला आहे. विमानाचे खासगी लायसन्स असूनही काही विद्यापीठाच्या कुलगुरुंनी कोल्हापूरच्या विमानतळाची दुरवस्था असल्याने नापसंती दर्शविली.

शेवटच्या क्षणापर्यंत सर्वंच कुलगुरुंना आमंत्रित केले. मात्र काहींनी विमानसेवा नसल्याने येण्यास नकार दिला. तरीही विद्यापीठात प्रथमच होत असलेल्या परिषदेत तीस कुलगुरु उपस्थित राहणार आहेत.

डॉ. डी. आर. मोरे, नोडल ऑफिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंगणगावच्या जवानाचा कुपवाडात मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

कुपवाड : भारत-पाक सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दलाचे जवान आदित्य चंद्रकांत कदम यांचा मृत्यू झाला. ते मूळचे कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील आहेत. शुक्रवारी सकाळी त्याचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर ते हिंगणगाव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

कदम यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. तो अविवाहित असून त्यांचे आईवडील, एक भाऊ, बहीण हे सर्वजण मुंबईत असतात. सांगली पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल कदम यांचे पार्थिव गुरुवारी जम्मू-कश्मिरमधील कुपवाडामधून दिल्लीकडे रवाना होणार आहे. दिल्लीतून सायंकाळी विमानाने पुण्याकडे रवाना होणार असून, पुणे येथे २७ नोव्हेंबरला सकाळी सव्वासात वाजता पोहचणार आहे. तेथून शववाहिकेतून ते हिंगणगाव येथे आणण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे

$
0
0

काँग्रेसचे चारही इच्छुक मुंबईत ठाण मांडून

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. चारही इच्छुकांशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चर्चा केली आहे. दोन दिवसात आपला अहवाल ते दिल्लीत पक्षश्रेष्ठींना देणार आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय त्यांच्याच हाती राहणार आहे, फक्त त्याची घोषणा दिल्लीत होणार आहे. यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या शिफारशीकडे नेत्यांचे डोळे लागले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील व प्रकाश आवाडे हे चार नेते इच्छुक आहेत. चौघेही उमेदवारीसाठी मुंबईत ठाण मांडून आहेत. प्रदेशाध्यक्षांना भेटून प्रत्येकाने उमेदवारीची मागणी केली आहे. चव्हाण यांनी प्रत्येकाशी स्वतंत्र भेटून चर्चा केली. बंडखोरी होऊ नये यासाठी प्रदेश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. २ ते ९ डिसेंबर या काळात अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे दोन ​डिसेंबरनंतरच उमेदवारीची घोषणा होणार आहे.

कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण आपला अहवाल दोन दिवसात दिल्लीला देणार आहेत. त्यांची शिफारस महत्वाची ठरणार आहे. म्हणून इच्छुकांबरोबरच त्यांच्या समर्थकांचे डोळे चव्हाण यांच्या अहवालाकडे लागले आहेत. चव्हाण यांनी एका नावाची शिफारस केल्यास त्याची उमेदवारी निश्चित आहे. उमेदवारीसाठी महाडिक व सतेज पाटील अधिक आक्रमक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास या दोघांकडूनच वेगळा विचार होऊ शकतो. त्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास जाणीवपूर्वक टाइमपास होण्याची चिन्हे आहेत.

२७ डिसेंबरला मतदान होणार आहे. अर्ज भरल्यानंतर प्रचाराला फार दिवस मिळणार नाहीत. प्रत्येक मत महत्वाचे असल्याने लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करण्याची मागणी इच्छुकांनी केली आहे. सध्या तरी विरोधी पक्षाकडून उमेदवारीची चिन्हे नाहीत. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली तरच विरोधी पक्षांना महत्व येणार आहे. काँग्रेसमध्ये एकमत झाल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. न राष्ट्रवादी बंडखोरी करणार नाही हे आमदार मुश्रीफ यांनी जाहीर केल्याने या पक्षाचा उमेदवार नसणार हे नक्की झाले आहे.

हातकणंगले, शिरोळ ठरणार निर्णायक

नगरसेवक, जि.प. सदस्य व पंचायत समितीचे सभापती हे या निवडणुकीत मतदान करणार आहेत. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे ८१ सदस्य असल्याने निवडणुकीत महापालिकेचे नगरसेवक महत्वाचे ठरणार आहेत. याशिवाय हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यातच दीडशे मतदार आहेत. त्यामध्ये इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरूंदवाड व पेठवडगाव या चार नगरपालिका सदस्यांचा समावेश आहे. निम्मे मतदार याच दोन तालुक्यात असल्याने निकाल ठरवण्यात हे दोन तालुकेच निर्णायक ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’

$
0
0

१७ कोटींच्या घरफाळा वसुलीसाठी प्रॉपर्टीवर बोजा नोंद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारंवार सूचना करूनही थकीत घरफाळा भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मिळकतधारकांवर कारवाईचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबत २५०० थकबाकीधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. थकबाकीदार मिळकतधारकांची सुनावणी सुरू असून थकबाकीदारांची प्रॉपर्टी जप्त करून त्यावर बोजा चढविण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरातील थकीत घरफाळ्याची रक्कम सुमारे सतरा कोटी रुपये आहे. राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे थकीत रक्कमेचा आकडा वाढला आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्याने प्रशासनाने घरफाळ्याच्या थकीत रक्कमेवर लक्ष केंद्रित केले आहे.

शहरातील एकूण मिळकतधारकांची संख्या ही १ लाख ३४ हजार २५५ आहे. मात्र, अनेक मिळकतधारक घरफाळा भरत नाहीत. काही मिळकतधारकांकडे एक लाख रुपयांपासून ते २२ लाख रुपयांपर्यंत थकबाकी आहे. घरफाळा विभागाकडून वारंवार नोटिसा देऊनही त्यांच्याकडून रक्कमेचा भरणा होत नाही. अशा मिळकतधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांची सुनावणी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासमोर सुरू आहे.

चारही विभागीय कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. एकूण एक हजाराहून अधिक मिळकतधारकांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षात एकदाही घरफाळा भरला नाही. यात हॉटेल व्यावसायिक, कारखानदार, शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

गांधी मैदान विभागीय कार्यालय, शिवाजी मार्केट, राजारामपुरी आणि ताराराणी मार्केट या चारही विभागीय कार्यालयाच्या अखत्यारितील मिळकतधारकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. थकबाकी भरली नाही तर, मालमत्ता जप्त करून

त्यावर बोजा चढविण्यात येईल असे नोटिसीत म्हटले आहे. मोठी रक्कम थकीत असलेल्या मिळकतधारकांची संख्या ५५०० हून अधिक आहे. पहिल्या टप्प्यात २५००हून अधिक थकबाकीधारकांना नोटिसा काढून कारवाईचा इशारा दिला आहे.

कर्मचारी, अधिकाऱ्यांवर हवा वॉच

घरफाळा विभागातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कामकाज हा वादग्रस्त आहे. काही जण मिळकतधारकांशी संगनमत करून मिळकतीची नोंदच करत नाहीत. परस्पर व्यवहार करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत अशा तक्रारी आहेत.

वाणिज्य मिळकतींना काही कर्मचाऱ्यांनी परस्पर सवलत दिली आहे. मिळकतीचा वाणिज्य वर्गात समावेश असताना कर्मचाऱ्यांनी आर्थिक लाभापोटी त्या मिळकतींना रहिवासी घरफाळा लागू केला आहे. परिणामी महापालिकेच्या आ​र्थिक उत्पन्नावर मर्यादा पडत आहेत. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवला तर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने जर प्रयत्न केले गेले तर घरफाळा वाढू शकतो. सद्यस्थितीत उत्पन्नाचे मार्ग कमी असल्याने महापालिकेच्या निधी वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातूनच महापालिका अधिक सक्षम होऊ शकेल.

नव्या मिळकतींचा शोध कधी लागणार ?

गेल्या दहा ते पंधरा वर्षात कोल्हापूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली आहेत. उपनगरात कॉलन्या वसल्या. मिळकतीत वाढ झाली. पण महापालिकेकडे हजारो नव्या मिळकतींची नोंद नाही. मिळकतींची नोंदच नसल्यामुळे घरफाळा वसूल होत नाही. वास्तविक शहर आ​णि उपनगरातील नागरिक महापालिकेच्या सगळ्या सुविधांचा लाभ घेतात. पण कर भरला जात नाही. याचा ताण महापालिकेवर पडत आहे. प्रशासनाने अशा मिळकतींचा शोध घेण्याचे ठरविले होते. जीपीएस सिस्मिटचा याकरिता अवलंब करण्यात येणार होता. अद्याप तशा मिळकतींचा शोध घेतला नाही.

अनेक मिळकतधारकांनी वर्षानुवर्षे घरफाळ्याचा भरणा केला नाही. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. अशा बड्या थकबाकीधारकांकडील रक्कमेच्या वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी द्यावीच लागेल

$
0
0

ऊस खरेदी करात सूट देणार; मुख्यमंत्री फडणवीस

म. टा. वृत्तसेवा, कराड

'साखर कारखाने टिकले पाहिजेत आणि शेतकरी जगला पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे. ऊस उत्पादकांवर वाईट परिणाम झाला तर ऊस शेतीच्या अर्थकरणावर दूरगामी परिणाम होतील. यासाठी कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागेल. सरकार ऊसाच्या खरेदी करात सूट देणार आहे. त्यातून ७०० ते ८०० कोटी रुपयांचा फायदा शेतकऱ्यांना होईल,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कराड येथे आयोजित यशंवतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, 'ऊसाला एफआरपीनुसार दर द्यावाच लागेल. मात्र, याचवेळी कारखानेही टिकले पाहिजेत. यासाठी सरकार खरेदी करात सूट देणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी सरकार मूल्य साखळी तयार करीत आहे. साखरेचे भाव कमी झाले तर साखर कारखाने अडचणीत येऊ शकतात. सरकारच्या मदतीवर अर्थकारण टिकणार नाही. सातत्याने बजेटमधून पैसा देता येईल, अशी अवस्था नसते. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीही उत्पादकता वाढविली पाहिजे. साखर कारखान्यांनीही आपल्या भागातील ऊसाचे सर्व क्षेत्र ठिबक सिंचनाव्दारे करावे. कारखान्यांनी नियोजन करावे. सरकार लागेल ती मदत देण्यास तयार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान व्यवसायावर मंदीचे सावट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

पान बाजारपेठेत देशी खाऊच्या पानांना कवडीमोल किंमत मिळत असल्याने पान उत्पादक अडचणीत आला आहे. पान व्यवसाय गेल्या वर्षभरापासून मंदीत सापडला असून, बाजारभावाने आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे. परिणामी देशी खाऊची पाने कवडीमोल किंमतीला विकली जाऊ लागली आहेत. त्यामुळे पान व्यवसायावर अवलंबून असणाऱ्याची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.

पान उत्पादकांच्या हाती केवळ चांगल्या प्रतीची पाने पिकविणे एवढेच राहिले असून, उत्पादित केलेल्या पानमालाची दुसऱ्यांनी केलेली किंमत नाईलाजास्तव मान्य करावी लागत आहे. पानांच्या लागणीचे वाढलेले क्षेत्र, शेतकऱ्यांतील एकीची अभाव आणि पाने हा नाशवंत माल असल्याने पान व्यवसायातील व्यापाऱ्यांनी पान उत्पादकांना वेठीस धरल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

मिरज पूर्व भागातील नरवाड, म्हैसाळ, बेडग आणि मालगाव ही गावे खाऊच्या पानांसाठी अग्रणी समजली जातात. येथूनच मुंबई, पुणे, नाशिक, पनवेल, रत्नागिरी, लांजा, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, राजकोट (गुजरात) आदी ठिकाणी पानांची मोठ्या प्रमाणावर जावक होते. पानांचा साधारणपणे २१ दिवसाला खुड्याचा फेर येतो; मात्र पान बाजारपेठेत पानांना मागणी कमी झाल्याने पान उत्पादकांनी पाने खुडण्याचे प्रमाण घटविले आहे. परिणामी दराअभावी पाने पानवेलीवरच पिकून गळून पडू लागली आहेत.

असे कोलमडले गणित

व्यापाऱ्यांनी चंग बांधला असून, पान उत्पादकांना पानमळ्यात पाने ठेवून परवडत नसल्याचा मोका साधला आहे. यामुळे २१ दिवसांनी पानांचा होणारा खुडा ४१ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. ४० कवळीच्या एका डागास (१२ हजार पानांचा एक डाग) पाने खुडण्यासाठी २८० ते ३०० रुपये पान उत्पादकाला मोजावे लागत आहेत. या शिवाय वेल बांधणाऱ्यांना २५० रुपये शेतमजुरी द्यावी लागत आहे. पानांचा १ डाग ४०० रुपयाला विकला जात आहे. पानमळ्यात खुडनी, वेल बांधणीसारखी कामे करणारे मजुरही मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाहतुकीसह सर्व खर्च वजा केल्यास पान उत्पादकांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे पान उत्पादकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images