Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महाराष्ट्राचे ऐक्य महत्त्वाचे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'कराडचा कृष्णा-कोयना नद्यांचा प्रीतिसंगम पाहिल्यानंतर एकसंघपणाचा विचार समोर येतो. स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांनाही महाराष्ट्राचे ऐक्य महत्त्वाचे वाटत होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलेल्या स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी बोध मिळाल्यास महाराष्ट्राचे भले होईल. राज्य एकसंघ राहील याचे स्मरण मुख्यमंत्र्यांनी ठेवावे, ' असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लागवला.

पवार म्हणाले, 'राज्यातील दुष्काळ निवारणाच्या कामासाठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी वेळेत प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यात विलंब झाल्यास केंद्र सरकारला दोष देणे योग्य नाही. राज्याच्या महसूल व कृषिमंत्र्यांनी दुष्काळ निवारणासाठी सात हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकी मदत मिळाल्यास राज्य सरकारचे कौतुक करावे लागले. कारण या पूर्वी राज्याच्या दुष्काळ निवारणासाठी इतकी भोरघोस मदत कधीच मिळाली नव्हती.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरोग्यसेविके’चा पेपर फुटला?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या शक्यतेने बुधवारी सांगलीत खळबळ उडाली. प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्याचा सपाटा लावणाऱ्या शाहीन अजमुद्दीन जमादार (करगणी, ता. आटपाडी) आणि तिला सहकार्य करणाऱ्या शाकीरा उमराणी यांच्या विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. परीक्षार्थी शाहीन हिने आपल्या सलवारवर प्रश्नांची उत्तरे लिहून आणल्याचे समोर आले आहे. तिने आणलेल्या उत्तरांपैकी सत्तर टक्के उत्तरे तंतोतंत असल्याने पेपर फुटल्याच्या शक्यतेला बळकटी आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका परिक्षेसाठी बुधवारी दुपारी राजावाड्यातील पुरोहित कन्याशाळेतील केंद्रावर शाहीन ही परीक्षेस बसली होती. प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर उत्तरपत्रिका देण्यात येते. उत्तरपत्रिका हातात पडताच शाहीनने पटापट उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली. हा प्रकार शेजारच्या परीक्षार्थीच्या लक्षात आला. त्याने पर्यवेक्षकांना कल्पना देताच शाहीनची धावपळ उडाली. ती आणि तिला मदत करणारी शाकीरा उमराणी या स्वच्छतागृहात गेल्या. तेथून शाहीन बाहेर आली, त्यावेळी तिने सलवार बदलल्याचे पर्यवेक्षकांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी तिचा पेपर काढून घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना दिली. त्यानंतर नेमकी वस्तूस्थिती जाणून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दोघींवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी शाहीनकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण ती सतत बेशुद्ध पडल्यासारखी करू लागली. तिला मदत करणारी शाकीरा उमराणी ही कायम आरोग्यसेविका म्हणून शेटफळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. परिक्षार्थी शाहीन जमादार हीही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शेटफळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील १३ संवर्गातील ९८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. बुधवार २५ नोव्हेंबर रोजी यापैकी आरोग्य विभागाकडील आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता तसेच बालकल्याणकडील अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या जागेसाठी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी आरोग्य सेवक (महिला) ३८ पदांसाठी ९१५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यापैकी २४ उमेदवारांची परीक्षा कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला राजवाडा (सांगली) येथील केंद्रावरील १९ खोल्यांमध्ये दुपारी २ ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आली होती. तेव्हा हा प्रकार घडल्याने खळबळ माजली.

सखोल चौकशी

हा प्रकार कॉपीचा आहे की पेपरफुटीचा आहे, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्या दोघींवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणाबद्दल कसून विचारपूस करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याची चौकशी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृहाचे ३ सुरक्षारक्षक नि‌लंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांजा पार्टी प्रकरणी कळंबा कारागृहाचे अधीक्षक सुधीर केंगरे यांची पुणे कारागृहात तर जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांची सांगली कारागृहात बदली करण्यात आली. तीन सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले तर दोन तुरूंगाधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. पश्चिम विभागाच्या कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साठे यांनी केलेल्या या कारवाईमुळे कारागृहात पार्टी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कारागृहात गांजा पार्टी झालेली नाही. तो तंबाखू असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र कैद्यांकडे मोबाइल होता हेही सिध्द झाल्याचे त्यांनी सांगितले.

कारागृहात गांजा पार्टी झाल्याचे वृत्त प्रसिध्द होताच साठे मंगळवारी दुपारी तातडीने दाखल झाल्या. त्यांनी दोन दिवस संशयित कैदी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कारागृहात गैरप्रकार झाल्याचे तपासात निष्पण्ण झाल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. प्राथमिक चौकशीतील निष्कर्षानुसार अधीक्षक केंगरे यांची पुणे तर जेलर गायकवाड यांची सांगली कारागृहात बदली करण्यात आली. पार्टीसाठी मदत करणारे सुरक्षा रक्षक विजय पंडीतराव टिपुगडे, मनोज महादेव जाधव, युवराज शंकर कांबळे यांना निलंबित केले. तुरूंगाधिकारी एस.एम. सोनवणे व एस.एस. हिरेकर यांची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल पाठवण्यात आला. पुढील तपासानंतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधीक्षक केंगरे यांचा पदभार शरद शेळके यांनी ताबडतोब स्वीकारला.

तूप मिळाले, गांजा, दारू गायब

कारागृहाची झडती घेताना शिऱ्यासाठी तूप मिळाले. तूप वापरणे कायद्याचे विरूध्द आहे. तुरूंगात गांजा व दारू मिळालेली नाही. तसेच मोबाइल मिळाला नाही, पण जेलमध्ये मोबाइलने चित्रण केल्याचेही साठे यांनी सांगितले. जेल मॅन्युअलचा भंग केल्याप्रकरणी दोषी कैद्यांविरोधात न्यायालयात अहवाल पाठवणार आहे. कैद्यांकडे मोबाइल असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

गांजा पार्टीत सहभागी

कारागृहाच्या बराकीत बाळू चौधरी, किसन सोमा राठोड, गणेश देविदास शिंदे, अजिज अबू सलीम, बबलू जाविर यांनी पार्टी केल्याचे सिध्द झाले असून त्यांच्यावर जेल मॅन्युअललनुसार कारवाई करण्यात येणार आहे. चौधरी हा कच्चा कैदी आहे. राठोड, शिंदे, सलीम, जाविर हे शिक्षा भोगणारे कैदी आहेत. तपासात कारागृहात तंबाखू विकत मिळतो असेही साठे यांनी सांगितले.

अशी झाली गांजा पार्टी

कारागृहात एका कैद्याने जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील कैद्यांशी संबंधित काम करणाऱ्या संस्थेला हा व्हिडिओ दिला. व्हिडिओमध्ये पाच कैदी बराकीत चुलीवर चिकण शिजवत होते. शिजवण्यासाठी त्यांनी रद्दीचा वापर केला होता. त्यानंतर रद्दीत गांजा भरून दोन कैद्यांनी त्याचे झुरके मारले. तसेच एका कैद्याकडे ड्रायफ्रूटस् होते. कैद्यांनी कढईत चिकण फोडणीला टाकले. त्यावर मसाला टाकला. झुरके मानणारा एक कैदी मोबाइलवर बोलत होता. तर एक मद्यपान करीत होता. एका कैदाने तर मिशा पिरंगाळून पोझ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कळंबा’साठी नवीन आराखडा

$
0
0

उदयसिंग पाटील

कळंबा तलावाच्या पाणी साठवण्यावर मर्यादा आणणारे व जैवविविधतेला हानी पोहोचवणारे सुशोभीकरणाचे काम अखेर थांबवले. पाण्यापासून दूर तसेच जलचर, उभयचरांच्या जीवनसाखळीला बाधा न आणणाऱ्या कामाचा नवीन आराखडा सादर करुनच हे काम सुरु केले जाणार आहे. त्यासाठी तलावाच्या पाण्याच्या महत्तम पातळीची रेषा आखून घेतली असून तिथून दहा मीटर बफर झोन सोडून पुढील आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार कंत्राटदार आठवडाभरात हा आराखडा सादर करणार आहे.

काँग्रेस आघाडीच्या सरकारने कळंबा तलावाच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटीचां निधी मंजूर केला. त्याचे काम सध्या सुरू करण्यात आले होते. वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, बगीचा, प्रवेश प्लाझा, कुस्तीचे मैदान आदी विविध कामांचा समावेश आहे. ही विकास कामे सुरु करण्यापूर्वी पाण्याच्या महत्तम पातळीपासून पुढे कामे सुरु करायची चर्चा झाली होती. पण कंत्राटदाराने ​ज्या क्षेत्रात पाणी साठते त्या भागात कामाला सुरुवात केली. हे काम तलावाला धोकादायक ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याविरोधात चर्चा सुरु झाली. महापालिकेच्यावतीने काम केले जात असल्याने शहराचे जैवविविधता मंडळ तसेच वृक्ष प्राधिकरण समितीवरही त्याबाबतची जबाबदारी आहे. त्यामुळे या समितीच्या पर्यावरणप्रेमींच्यावतीने नुकतीच पाहणी केल्यानंतर पाणलोटमध्ये काम केले जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जलअभियंता मनिष पवार यांना कामावर बोलवून परिस्थिती दाखवण्यात आली. बफर झोन ठेवलेला नाही, वृक्षलागवडीच्यादृष्टीने काही नियोजन दिसत नसल्याने हे काम बंद करण्यात आले. तलावाच्या पश्चिमेच्याबाजूला तसेच पाठीमागेपर्यंत ट्रॅकच्या भिंतीचे काम केले जाणार होते. त्यामुळे तलावात येणारे पाणी थांबणार आहे हाही मोठा धोका आहे.

काम थांबवण्याचा आदेश दिल्यानंतर दहा मीटरचा परिसर सोडून पुन्हा नवीन काम करण्याची कंत्राटदाराची तयारी होती. मात्र समिती सदस्य व अधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनंतर नवीन आराखडा सादर करावा असे सांगण्यात आले. त्यासाठी तातडीने तलावाची पाण्याची महत्तम रेषा आखून घेण्यात आली. त्या रेषेपासून पुढे दहा मीटरचा परिसर बफर झोन ठरवण्यात आला आहे. त्यानंतरच काम करायचे आहे. तसेच हे काम करताना तलावातील पाणीसाठवणूक, त्या पाण्यावर अवलं​बून प्राणी तसेच जलचर, उभयचरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र तोपर्यंत धरणाच्या भिंतीचे संवर्धनाचे काम करण्यास काहीच हरकत नसल्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले. कंत्राटदाराने मात्र संपुर्ण काम थांबवून नवीन आराखड्यानंतरच काम सुरु केले जाईल, असे अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. पुढील आठवड्यात कंत्राटदाराकडून नवीन आराखडा सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

नव्या आराखड्यासाठी केलेल्या सूचना

पाण्याजवळील दलदल जलचर, उभयचरांसाठी आवश्यक असते. कासव या दलदलीत येऊन अंडी घालतात. तर पक्षी त्या दलदलीतील खाद्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे अनेक पक्षी काठावर आलेले पाहायला मिळत असतात. त्यामुळे पाण्याच्या महत्तम रेषेपासून दहा मीटरचा बफर झोन राहील. त्यानंतर काम सुरु करावे.

ट्रॅकचे काम करत असताना त्याच्या बांधकामामुळे तलावात येणारे पाणी अडू नये यासाठी पाणी तलावाकडे जाण्यासाठी त्या बांधकामामध्ये पाइप टाकण्यात याव्यात

तलावाचा सर्व भाग कामाने व्यापू नये यादृष्टीने रचना

प्रवेशाचा प्लाझा मोठा करण्यापेक्षा त्याचा आकार कमी करण्यात येणार आहे.

तलावाभोवती कंपाउंड व तारेचे कुंपण आवश्यक आहे

पक्षीनिरीक्षणासाठी सुचवलेल्या कामांचा समावेश आवश्यक

कामाचा आराखडा तयार केला जात असताना बफर झोन तसेच विविध कामाबाबतच्या सूचना यांची चर्चा झाली होती. कंत्राटदाराने प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी पाण्याची महत्तम रेषा प्रथम आखण्याची गरज होती. पण त्यापद्धतीने काहीही गांभीर्याने न करता बेधडक काम सुरु केले होते. ते तलावाला, जैवविविधतेला धोकादायक असल्याने काम थांबवले. - उदय गायकवाड, सदस्य, जैवविविधता मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचे पाणी पिण्यासाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाळ्यात घरावर पडणारे पाणी वाहून जाताना पाहायला मजा वाटते; पण तेच पाणी योग्यप्रकारे साठविले तर एका कुटुंबाचा वर्षभराचा पिण्याच्या पाणीप्रश्न सुटू शकतो. तसेच पावसाळ्यात इतर वापरासाठीही महापालिकेने मोठा खर्च करून शुद्ध केलेल्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. नागाळा पार्कमध्ये राहणारे डॉ. सुभाष आठले प्रत्येक वर्षी घरावर पडणाऱ्या पावसाच्या ६० हजार लिटर पाण्याचा वापर करताहेत. पिण्यासाठी ते वर्षभर पावसाचेच पाणी वापरतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वाया जात असल्याची खंत वाटणाऱ्या डॉ. आठले यांनी पंधरा वर्षांपूर्वी घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्याचा चंग बांधला. त्यांनी स्वतःच पोगर लावून छतावरील सर्व पाणी एकत्रित करण्यासाठी पाइप बसवल्या. त्यासाठी किरकोळ खर्च आला. पण त्यामुळे मोठी बचत करून देण्यापेक्षा त्यांच्या मनाला मोठे समाधानही मिळवून दिले. महापालिकेचे पाणी साठवण्यासाठी एक टाकी होती. त्याच्या शेजारी फायबरची टाकी बसवली. फायबरच्या टाकीत पिण्याचे पाणी साठवण्याचे नियोजन केले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिले पाणी वाहून जाऊ देतात. नंतर त्या पाइपलाइनचे तोंड या टाकीमध्ये सोडतात. या टाकीत कचरा जाऊ नये यासाठी एक जाळी बसवली आहे. तसेच एक नायलॉनची जाळीही बसवण्यात येते. त्यातून गाळून पाणी टाकीत पडते. ही टाकी भरली बंद केली जाते. त्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून झाकण घट्ट बंद करून त्यावर जाळी टाकली जाते. त्याचवेळी महापालिकेचे पाणी साठविण्यासाठी बनविलेल्या टाकीतही पावसाचे पाणी सोडले जाते. या दोन्ही टाक्या भरल्यानंतर ते सर्व पाणी त्यांच्या परिसरातील बागेला सोडले जाते. पावसाळ्यात महापालिकेचे पाणी बंद करून ते पावसाचेच पाणी वापरतात. अडीच हजार लिटर पाण्याची टाकी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवली जाते. घरात सहा सदस्य असून, ते पावसाचे साठवलेले पाणी वर्षभर ​पितात.

'पावसाच्या पाण्याचा पावसाळ्यात वापर केला जातो. तसेच इतरवेळी पडणारे पावसाचे पाणीही टाकीत साठवले जाते. वर्षभर पिण्यासाठी आम्ही पावसाचेच पाणी वापरतो. फक्त पिण्यासाठीचे पाणी साठवणाऱ्या टाकीवर सूर्यप्रकाश येऊ नये व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जाळी लावून झाकण घट्ट बंद करण्याची गरज आहे. याबरोबर घरातून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी बाहेर सोडले जात नाही.' - डॉ. सुभाष आठले, नागाळा पार्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्तीचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हत्ती हा प्राणी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजल्याचा प्रत्यय चंदगडवासीयांना येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्तीं उमगाव, न्हावेली परिसरात स्थिरावला आहे. नुकसानीपेक्षा नागरिकांनी जीवाच्या भितीने शेतीच्या रखवालीसाठी जाणे बंद केले आहे. त्यामुळे हत्तींना मोकळे रान झाले आहे. नुकसान भरपाई नको, मात्र हत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

तालुक्यात चार हत्ती आणि एक पिल्लू असा पाच हत्तींचा एक कळप आहे. शिवाय एक टस्करही स्वतंत्रपणे वावरत आहे. पाच हत्तींचा कळप अधूनमधून खासगी रानात येऊन शेतीचे नुकसान करीत आहे. टस्कर प्रचंड प्रमाणात नुकसान करत असून लोकांच्या अंगावर धावून जात आहे. त्यामुळे हत्तीला हुसकावण्यासाठी कोणीही पुढे जात नाही. ऊस, केळी, मेसकाठी, भात, नाचणा पिकांवर हत्ती ताव मारीत असून वर्षभर काबाडकष्ट करुन पिकविलेले आणि हातातोंडाशी आलेले पीक हत्तीच्या धुमाकुळाने नाश होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळजन्य परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंग महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकाचवेळी आकाशात झेपावणाऱ्या तीन हजार पतंगांचा विहार पाहण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना शनिवारी विक्रमी पतंग महोत्सवाच्यानिमित्ताने होणार आहे. शनिवारी (ता.२८) सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पैलवान बाबा महाडिक पतंगप्रेमी ग्रुप व महापालिकेच्या प्राथमिक ​शिक्षण मंडळ यांच्यावतीने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असून त्यासाठी महोत्सवात सहभागी होणाऱ्यांना वि​शिष्ट क्रमानेच पतंग उडवायचा आहे.

महोत्सवात सहभागी होणाऱ्या मुलामुलींना तीन सहाय्यक देण्यात येणार आहेत. तसेच संयोजकांमार्फत पतंग मोफत देण्यात येणार असून दोरा स्वत: आणायचा आहे. या महोत्सवाची नोंद लिम्का बुकमध्ये होणार असल्यामुळे संयोजकांच्या सूचनेनुसार पतंग उडवायचा आहे. यामध्ये प्रथम पतंगाची गाठ बांधणे, नंतर उडवण्यासाठी पतंग नि​निश्चित केलेल्या अंतरावर सहाय्यकाने उभे राहणे आ​णि शेवटी पतंग आकाशात उडवणे असा क्रम आहे. सहभागी होणाऱ्यांनी शुक्रवार (ता.२७) पर्यंत शिवाजी मार्केट येथील प्राथमिक ​शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बाळासाहेब कांबळे यांच्याकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा घंटानाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील अनधिकृत धार्मिकस्थळावरील कारवाईला विरोध करण्यासाठी ​गुरुवारी शिवसेनेतर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. धार्मिक स्थळावर कारवाईच्या नोटिसा काढणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार करत महापालिकेसमोर घंटानाद आणि आरती करण्यात आली. पहिल्यांदा शहरातील अन्य अनधिकृत बांधकामे हटवा, बंदिस्त पार्किंग खुली करा, अशी मागणी करून धार्मिक स्थळे हटविली तर गाठ शिवसैनिकांशी आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू आहे. प्रशासनाने, शहरातील १३० धार्मिकस्थळांना महिन्याची नोटीस दिली आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहर कार्यालयापासून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. महापालिका प्रवेशद्वारासमोर मोर्चा अडविल्यानंतर प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. प्रवेशद्वारासमोर घंटानाद आणि आरती करण्यात आली. जनतेच्या भावनेशी खेळू नका, प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणला. शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, नगरसेवक अभिजीत चव्हाण, राहूल चव्हाण, नियाज खान, प्रतिज्ञा निल्ले यांचा मोर्चात समावेश होता.

.......

आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण सांगून धार्मिक स्थळावर कारवाई होणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शहरातील अनेक इमारतीतील पार्किंग बंदिस्त आहे. पा​र्किंगसाठी ही जागा खुली केली पाहिजे. बांधकाम नियमावलीची अंमलबजावणी करताना अधिकारी संगनमत करतात. अनेक इमारतींना पार्किंगची सुविधा नाही. इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करून मंदिरावर कारवाई सुरू केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा आमदारांनी दिला. आयुक्तांनी सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे. शक्य तेथे नियमितीकरण, काही ठिकाणी स्थलांतर केले जाईल. धा​र्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय हा अंतिम टप्प्यातील असणार आहे, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेतर्फे मिणचेकरांना संधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त नक्की झाला आहे. १ डिसेंबरपूर्वी हा विस्तार होणार असून विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला स्थान देण्याचे शिवसेनेने निश्चित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या विस्तारात महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांचा समावेश नक्की झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या यादीत सुजित मिणचेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. बिहार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर हा विस्तार करण्याचे निश्चित झाले होते. घटकपक्षातील नाराजी कमी करण्यासाठी सर्व मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर यांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रीपद देण्यात येणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत तसा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याला हिरवा कंदिल दाखवला गेला आहे. यामुळे चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे नियोजन आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला संधी मिळणार आहे. भाजपच्या वतीने आमदार सुरेश खाडे अथवा शिवाजीराव नाईक यांना संधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याला स्थान देण्याचा निर्णय सेनेने घेतला आहे. आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर व डॉ. मिणचेकर या तिघांत मंत्रीपदासाठी स्पर्धा आहे. सध्या डॉ. ​मिणचेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​कैद्यांची ‘फाइव्ह स्टार’ राहणी

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर - कळंबा कारागृहाला मध्यवर्ती कार्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबई टोळीयुध्दातील गुंडांनी पैशाच्या जोरावर जेलमधील कायद्यांची मोडतोड करत शिस्त बिघडवली. मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर मौजमजा बंद झाल्याचा दिखावा असला तरी दगडी तटबंदीच्या आत पैशाच्या जीवावरील कैद्यांची 'फाईव्ह स्टार' राहणी कायम राहिल्याचे मोबाइलच्या क्लिपमधून उघड झाले आहे.

बिंदू चौक सबजेल व कळंबा जेल ही संस्थानकालापासूनची कारागृहे आहेत. दिवाण सुर्वे यांनी संस्थानकालात कळंबा कारागृह बांधले. १९९२ पर्यंत कळंबा कारागृह हे जिल्हा कारागृह होते. १९९२ मध्ये मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना कळंबा कारागृहात हलवण्यास सुरूवात झाली. मध्यवर्ती कारागृहाप्रमाणे त्याचा विस्तारही झाला. कडेकोट सुरक्षा असलेले सुरक्षित कारागृह म्हणून कळंबा कारागृहाची ख्याती असली तरी आतील शिस्तबध्द वातावरण अंडरवर्ल्ड टोळीमधील गुंडांच्यामुळे बिघडले.

मध्यवर्ती कारागृहाचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबई व पुण्यातून गवळी, दाऊद, नाईक टोळीतील गुंडांना कळंबा कारागृहात हलवण्यात आले. गुंड मंडळी कच्चे कैदी असल्याने त्यांना बाहेरचे जेवण मागवण्याची कायद्याप्रमाणे सोय होती. त्यामुळे गुंडांना बाहेरून मटणासह घरचे जेवण मिळायचे. अंडरवर्ल्डने कारागृहात जेवणाचे डबे पोचवण्यासाठी कोल्हापुरातील खानावळीवाल्यांना ऑर्डर दिल्या होत्या. गुंडांना जसे जेवण मिळू लागले तसे मद्य व बिअरही पोच होऊ लागली. खलिस्तान चळवळीतील टाडा कायद्याखालील अटक केलेल्या आरोपींची कंळबा कारागृहात रवानगी करण्यात आली. या कैद्यांसाठी अंडा सेल बांधण्यात आले. कारागृह अधिक्षक व जेलरच्या कार्यालयासमोर हे सेल बांधण्यात आले. त्यांच्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

सुरक्षा वाढली तसे नियमही वाढले. नियम तोडण्यासाठी अंडरवर्ल्डचे हप्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरू झाले. दारू, सिगारेट, गांजा, ब्राऊन शुगरही अंडरवर्ल्डवाल्यांना मिळत असल्याची चर्चा होती. अंडरवर्ल्डमधील अश्विन नाईकही काही काळ कळंबा कारागृहात होता. कारागृहातून तो नेटवर्क चालवायचा. मुंबईतील सुपारीही द्यायचा. त्याची पत्नीही त्याला कारागृहात भेटायला याचची. दोघांना मोकळीक मिळण्याची सोयही कारागृह प्रशासन करायचे. मौजमजेसाठी अंडरवर्ल्डला पैसे मोजायला लागायचे. अंडरवर्ल्डला मिळणारी फाईव्ह स्टार वागणूक व स्थानिक कैद्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचे पडसादही हातघाईवर आले. स्थानिक कैद्यांनी अंडरवर्ल्डच्या गुंडाना जेलमधील जेवणाची ताटे व वाट्यांनी मारहाण केली. पण या बातम्या बाहेर न येण्याची दक्षता कारागृहाने घेतली.

कैद्यांनीच फोडले बिंग

कारागृहातील छानछोकी जगण्यावर मुंबई हायकोर्टाने आक्षेप घेऊन अंडर ट्रायलमधील आरोपींना बाहेरचे जेवण बंद केले. त्यामुळे अंडरवर्ल्डमधील गुंडांना कारागृहातील जेवण मिळू लागले. चमचमीत जेवण, दारू व अन्य व्यसनाची तल्लफ भागवण्यासाठी जेलचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना अंडरवर्ल्डने हाताशी धरले. गुंडाच्याबरोबर जे पैसेवाले कैदी होते त्यांनीही हात सैल करण्यास सुरूवात केली. त्यातून जेलमध्ये डोळेझाक करून मैफिली झडू लागल्या. मैफीलीच्या बातम्या बाहेर येत नव्हत्या. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या वारेमाप मागणीमुळे अखेर कैद्यांनीच त्यांचे बिंग फुटले आणि कारागृहातच्या भिंतीतील वास्तव्य पुढे आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिजिटल’मुळे परीक्षेत क्रांती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन व डिजिटल साधनसुविधांच्या मदतीने विद्यापीठीय परीक्षा पद्धतीत क्रांतिकारक बदल शक्य असल्याचे प्रतिपादन बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाचे (व्हीटीयू) कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात गुरुवारपासून भारतीय विश्वविद्यालय संघातर्फे (एआययू) पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेची सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील २५ विद्यापीठाचे कुलगुरू परिषदेत सहभागी झाले आहेत.

डॉ. महेशप्पा म्हणाले, 'परीक्षा यंत्रणा विद्यापीठीय यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा व विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विद्यापीठावर परीक्षा सुरळीत घेण्याचे आणि वेळेत निकाल लावण्याचे महत्त्वाचे आव्हान असते. येथे ऑनलाइन व डिजिटल साधन-सुविधांचा वापर करून परीक्षा पद्धतीत अधिकाधिक पारदर्शकता येऊ शकते. वेळ आणि श्रमाची तसेच कागदाचीही बचत करणे शक्य आहे. प्रश्नपत्रिकांचे सुरक्षितपणे ऑनलाइन वाटप करण्यासह उत्तरपत्रिकांची डिजिटल तपासणी करता येईल. पीएचडीसह विविध परीक्षांतर्गत शोधनिबंध व शोधप्रबंधांच्या बाबतीत वाङ्मयचौर्य तपासणी आणि रोखणेही ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे.'

दुसऱ्या सत्रात नॅसकॉम (मुंबई)च्या सेक्टर स्कील कौन्सिलचे प्रादेशिक प्रमुख युधिष्ठर यादव म्हणाले, सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योगांत सर्वाधिक मनुष्यबळ रोजगारात सामावून घेतले जाते आहे. देशात या उद्योगांची उलाढाल २२५ अब्ज डॉलरच्या घरात आहे. २०२० पर्यंत ती ३०० अब्ज डॉलरच्या घरात जाईल. सध्या साडेतीन दशलक्ष विद्यार्थी या क्षेत्रात असून ही संख्या सहा टक्के दराने वाढते आहे..' प्रा. देबजानी दासगुप्ता, प्रा. डी.एच. राव, डॉ. ए.एम. महाजन होते. प्रा. डी. एच. राव आदिंनी विविध विषयांवर मते मांडली. तंत्रज्ञानाचा गतीने स्वीकारकरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या विकासाची विचारसरणी ठेवा

'भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी 'प्रो-भारत' किंवा 'प्रो-इंडिया' विचारसरणी अवलंबण्याची गरज आहे. अधिकाधिक युवकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे', असे प्रतिपादन 'बिट्स पिलानी'चे माजी संचालक व गोव्याच्या के. के. बिर्ला कॅम्पसचे प्रा. जी. रघुरामा यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघ (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात गुरुवारी सकाळी रोपाला पाणी घालून उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी भारतीय विश्वविद्यालय संघाचे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर होते.

'डिजिटल इंडिया व उच्चशिक्षण' या विषयावर प्रा. जी. रघुरामा म्हणाले, 'माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्रांती यांमुळे सुविधांचा होणारा गतिमान विकास या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रात अनेकानेक उपयुक्त व्यासपीठे निर्माण होत आहेत. त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी तत्परतेने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठे डिजिटल इंडिया अभियानामध्ये व्यापक सहभाग नोंदवू शकतात.

त्याचप्रमाणे त्याचे लाभही घेऊ शकतात. डिजिटल इंडिया अभियानातील डिजिटल लॉकर सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे ऑनलाइन प्रमाणपत्रे, पदवी कशा प्रकारे प्रदान करता येऊ शकतील याचा विचार करता येईल. ऑनलाइन परीक्षा, असेसमेंट, प्रवेश प्रक्रिया, सुपर फॅकल्टी किंवा मॅसिव्ह ऑनलाइन अभ्यासक्रम, नवनिर्मिती व उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास आदींबाबतही या अभियानाचा चांगला वापर करता येऊ शकतो.'

प्रा. जी. रघुरामा म्हणाले, 'अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी समाजमाध्यमांचा उपयुक्त वापर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अद्ययावत अभ्यासक्रम निर्मिती यांच्यासाठीही ऑनलाइन व्यासपीठांचा प्रभावी वापर करता येईल. ऑनलाइन माध्यमांमुळे आता विद्यापीठांनी अधिक स्वतंत्र, स्वायत्त व गतिमान होण्याची वेळ आली आहे. डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेमध्ये आर्थिक व पायाभूत तांत्रिक बाबींचा अडथळा असला तरी भारताच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहण्याची गरज आहे.'

प्रा. फुरकान कमर म्हणाले, 'उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. विद्यापीठांवर सातत्याने होणारे बदल स्वीकारणे, सामोरे जाणे आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची प्रमुख जबाबदारी आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात उलट चित्र दिसते. हे चित्र नव तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील जास्तीत जास्त युवकांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्यस्थितीत विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये प्रचंड लवचिकता आणण्याची गरज आहे.

स्वतःच्या वेळेनुसार व गरजेनुसार ऑनलाइन स्वरुपात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांवर शंका निरसनाची जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांनीही नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यावरील अतिरिक्त भार कमी करून नव अध्यापन तंत्रांचा अंगिकार केला पाहिजे. संशोधन व नवनिर्मितीच्या नवसंकल्पनांना आविष्कृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे.'

एआययूचे साप्ताहिक 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी शहीद दिनानिमित्त शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या चार राज्यांतील कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींसह बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा, एआययूचे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड, सहसचिव वीणा भल्ला, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वागत केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी आभार मानले.

सकाळी ९.३० वाजता : बॉश कंपनीतर्फे सादरीकरण

सकाळी १० ते ११ वाजता : सत्र चौथे - आयसीटी बेस्ट फ्युचरिस्टीक टेक्नॉलॉजी अॅण्ड पोटॅशियल रोल ऑफ इंडिया इन हॉरिझॉन २०२०, अध्यक्ष : प्रा. ओंकार सिंग, कुलगुरू, मदनमोहन मालवीय तंत्रज्ञान, विद्यापीठ, गोरखपूर. मार्गदर्शक : महेश कुलकर्णी, सहसंचालक, जिस्ट डब्ल्यूडीजी सी डॅक, पुणे, स्थळ : कलातपस्वी आबालाल रेहमान दालन

११.३० ते १२.३० : ए. आय. यू बिझनेस सत्र : समन्वयक प्रा. फुरकान कमर, सरचिटणीस ए. आय. यू, स्थळ : कलातपस्वी आबालाल रेहमान दालन

दुपारी १२.३० ते १.०० समारोप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरवर डिसेंबरमध्ये आरोपपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येतील प्रमुख संशयित समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समीरच्या न्यायालयीन कोठडीची सुनावणी पाच डिसेंबरला होणार आहे. त्यापूर्वी कोर्टात आरोपपत्र दाखल होणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून दिले जात आहेत. दरम्यान कळंबा कारागृहातील गांजा पार्टीच्या पार्श्वभूमीवर समीरची कारागृहातील सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारागृह प्रशासनाला पत्र पाठवले आहे.

पानसरे हत्येप्रकरणी समीरला कोल्हापूर पोलिसांनी १६ सप्टेंबर २०१५ रोजी सांगलीत त्याच्या घरातून अटक केली होती. समीर सनानत संस्थेशी संबंधित असल्याने पोलिसांनी कसून तपास केला आहे. समीरने पानसरे हत्येसंबधी त्याची मैत्रीण व मानलेल्या बहिणीशी मोबाइलवर बोलणे केले होते. मोबाइलवरील संभाषण पुणे व गुजरात येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवले असून त्याचे सकारात्मक अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत. समीरच्या घरातून जप्त केलेले २३ मोबाइल व ३१ सीमकार्डही पोलिसांना मिळाली आहेत. पोलिसांनी समीरच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा केले असून पोलिसांनी सव्वातीनशे ते साडेतीनशे पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात समीरची मैत्रीण, व मानलेल्या बहिणींचे जबाब महत्त्वाचे आहेत.

समीरवर ९० दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची पोलिसांना मुदत आहे. १६ डिसेंबरला ९० दिवसांची मुदत संपणार आहे. सात डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने समीरने पोलिसांवर केलेले आरोप व पोलिसांच्या तपासावर सभागृहात प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाच डिसेंबरपूर्वीच समीरवर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यामुळे सरकारला सभागृहात या प्रश्नांवर निवेदन करणे सोपे जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्तक यांच्यावर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिसेंचे जाहीर समर्थन करणाऱ्या सनातन संस्थेचे प्रमुख अभय वर्तक यांना तत्काळ अटक करावी या मागणीसह हिंसेचे समर्थन करणाऱ्यांच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ३० नोव्हेंबर) दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याजवळ चिंता आंदोलन केले जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते डोळ्याला पट्टी बांधून आंदोलन करतील. ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा खून झाला. या घटना घडल्यानंतरही सनातन संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते आणि नेते हिंसेचे जाहीर समर्थन करतात. सनातन संस्थेचे प्रमुख अभय वर्तक यांना तिघांच्या खुनाचे मारेकरी माहिती आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करुन चौकशी करावी. वर्तक यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ डोळ्यांना काळी पट्टी बांधून चिंता आंदोलन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेवर आणि वर्तक यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यात राजर्षी शाहूप्रेमी कार्यकर्ते आणि धर्मनिरपेक्ष जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन अनिल म्हमाने, अॅड. पंडित सडोलीकर, डॉ. ज. रा. दाभोळे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्द्रता गाभाऱ्यात, कारणे आवारात

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांना मूर्तीची झीज होण्यास मंदिराच्या गाभाऱ्यातील आर्द्रताही कारणीभूत ठरली ठरली असल्याचे दिसून आले आहे. अन्य कारणांमध्ये हे कारण ठळक आहे. मात्र आर्द्रता जरी गाभाऱ्यात असली तरी ती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी मंदिराच्या आवारात आहेत. आर्द्रतेबाबत निरीक्षणासाठी नियुक्त समितीचा पाहणी दौरा सुरू केला असल्याने या समितीने मंदिराच्या आवारातील आर्द्रता वाढविणाऱ्या बाबी थांबविण्यासाठी लक्ष देण्याचीही गरज आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीचे जतन होण्यासाठी मंदिरातील आर्द्रतेवर नियंत्रण आवश्यक असल्याची सूचना मूर्ती संवर्धन समितीने केली. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. प​श्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि ​शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्यावतीने विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखालील समिती गाभाऱ्यातील आर्द्रता, तापमान कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे मिलिंद कारंजकर, डॉ. कोळेकर, हेरिटेज कमिटीतर्फे उदय गायकवाड, सदस्य सचिव म्हणून देवस्थान समितीच्या स​चिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, अ​भियंता सुदेश देशपांडे, श्रीपूजक प्रतिनिधी केदार मुनिश्वर व माधव मुनिश्वर यांचा समितीत समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अ​धिकाऱ्यांनी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली. त्यावेळी मूर्तीचे भविष्यात जतन करण्यासाठी गाभाऱ्यातील आर्द्रता, तापमान नियंत्रित करण्याच्या सूचना समितीने दिल्या. गाभाऱ्यातील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी यापूर्वी एलइडी लाइट बसविले आहेत. त्यामुळे काहीअंशी आर्द्रता कमी झाली आहे. मात्र समितीच्या निरीक्षणात मंदिराच्या गणपती चौक ते पेटी चौकापर्यंत होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा परिणामही आर्द्रतेवर होत असल्याची नोंद झाली आहे.

मंदिराच्या आवारातील अनेक गोष्टींचा परिणाम गाभाऱ्यातील आर्द्रता वाढीवर होत असल्याने समितीने याचाही विचार करण्याची गरज आहे. मंदिराच्या वास्तूरचनेत झालेल्या बदलांमुळेही सूर्यकिरणाचा कोन बदलत आहे. यात गरुडमंडप, शनिमंदिरासह अनेक मंदिरांचे आवारात नव्याने बांधकाम झाले आहे. विविध उत्सवांसाठी मंदिराच्या आवारात विद्युत रोषणाई केली जाते, त्यामुळेही आवारात तापमानवाढ होते. मंदिराच्या छतावर बसविलेल्या सिरॅमिक टाइल्स तापल्यानंतर त्याचाही परिणाम गाभाऱ्यापर्यंतच्या आर्द्रतेवर होतो.

मंदिराच्या बाह्यभागातील छोट्या मंदिरांचा काही भाग ऑइलपेंटने रंगवण्यात आला आहे. हा रंग दिलेला भाग तापमानवाढीला पोषक ठरतो. काही हौशी भाविक मंदिर फुलांनी सजवतात. या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पंजवीटा लावण्यासाठी ड्रायर वापरला जातो. त्यामुळेही मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या दगडावर कृत्रिम तापमानाचा मारा होतो. मंदिर पाण्याने धुण्यासाठी अद्ययावत यंत्रणेद्वारे जो पाण्याचा फवारा मारला जातो त्यातूनही उष्णता निर्माण होते.

या गोष्टी कारणीभूत

मंदिराच्या वास्तूरचनेतील बदल, वाढीव बांधकाम

परिसरात होणारी रोषणाई

मंदिराच्या छतावरील सिरॅमिक टाइल्स

बाह्यआवारातील मंदिरांवर लावण्यात येणारा ऑइलपेंट

पुष्पसजावटीसाठी होणारा ड्रायरचा वापर

मंदिर धुण्यासाठी होणाऱ्या पाण्याचा फवारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुटपुंज्या निधीचा आराखडा

$
0
0

आवश्यकता ९९ कोटींची, आरखडा फक्त ४२ कोटींचा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय पेयजल योजना बंद करुन मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली असून नवीन योजनेत सर्व रखडलेल्या जुन्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. रखडलेल्या योजनेसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधींची आवश्यकता असताना केवळ ४२ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाने आराखडा तयार केला असून तो नव्याने सरकार दरबारी सादर करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात ९९ कोटी रुपयांची आवश्यकता असताना केवळ ४२ कोटी रुपयांचा आराखडा कशासाठी तयार केला, आता रखडलेल्या १४८ योजना कार्यन्वित होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली होती. योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्यातील पाणी योजनांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तरतूद केलेल्या रक्कमेनुसार संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांकडून प्रस्ताव मागविले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आरखडा सादर करण्याच्या सूचना दिल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडा सादर केला आहे. नवीन आराखड्यातून टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रामुख्याने योजना राबवण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्यावतीने ३७८ पाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी उपलब्ध निधीतून २३० योजना प्राथमिक टप्प्यावर सुरूही झाल्या होत्या. यापैकी १४ योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत १४८ योजनांसाठी ९९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. सरकारपातळीवर ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नसताना पुन्हा नवीन आराखडा सादर केला आहे. यामध्ये आवश्यकतेपेक्षा कमी निधीची मागणी केली असल्याने रखडलेल्या योजना मार्गी लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

झळा सोसाव्या लागणार

नवीन योजनेसाठी सादर केलेल्या आरखड्यातील रक्कम मंजूर होण्यास डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. आरखडा मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष निधी फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. त्यानंतर योजनेवर खर्च करण्यास बऱ्याच वेळ जाणार असल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीरची भेट घेणाऱ्यांची होणार चौकशी

$
0
0

पुढील आठवड्यात कोल्हापुरात एसआयटीची बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याने पोलिसांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृहात समीरची भेट घेणाऱ्यांची पोलिस चौकशी करणार आहेत. या संदर्भात पुढील आठवड्यात एसआयटीची बैठक कोल्हापुरात होणार आहे.

कोर्टाच्या आवारात आणताना समीर गायकवाडला एका पोलिसाने ऑफर दिली होती असा आरोप समीरने २१ नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीच्यावेळी केला होता. समीरने ब्रेन मॅपिंग टेस्टला होकार द्यावा. पोलिस ज्यांची नावे सांगतील त्यांची नावे घ्यावीत. त्यासाठी २५ लाख रूपयाची ऑफर होती. समीरने नकार दिल्यास फासावर लटकवले जाईल. त्याच्या कुटुंबाला त्रास दिली जाईल अशी धमकी दिली एका पोलिसाने दिली होती अशी माहिती समीरने कोर्टाला दिली. समीरच्या आरोपाची चौकशी करून पाच डिसेंबरला अहवाल द्यावा, असा आदेशही कोर्टाने दिला आहे.

समीरच्या आरोपावर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. समीरला कोर्टात हजर करताना त्याच्यासोबत कोणते पोलिस अधिकारी व कर्मचारी होते याची माहिती घेतली जात आहे. तपासात दिशाभूल करण्यासाठी समीरने आरोप केले आहेत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. समीरला नऊ ऑक्टोबरच्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने विचारले असता तक्रार नसल्याचे सांगितले होते. पण तब्बल एक महिन्याने समीरने पोलिसांच्यावर आरोप केले. समीरने पोलिसांच्यावर कोणाच्या सांगण्यावरून आरोप केले याची चौकशी केली जात आहे. त्यासाठी समीरला कारागृहात कोण कोण भेटायला गेला होता याची माहिती घेतली जात आहे. भेटायला गेलेल्या व्यक्तींची पोलिस चौकशी करणार आहेत. समीरला भेटायला जाण्यासाठी कोर्टाची परवानगी घेतली होती का याचाही पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, समीरवर मजबूत आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. आरोपपत्र व पुढील तपासाची दिशा ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात एसआयटीची बैठक कोल्हापुरात होणार आहे. या बैठकीला एसआयटी प्रमुख संजय कुमार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांच्या शेतातून पुरवठा

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा, दारू व मटणाचा पुरवठा कैद्यांच्या शेतातून होतो. अधिकारी, कर्मचारी व कैद्यांच्या मिलिभगतीतून हा व्यवहार गेली बरीच वर्षे बिनबोभाटपणे सुरू आहे. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी वाढल्याने कारागृहातील कैद्यांच्यात असंतोष असून त्याची ठिणगी ​व्हीडीओ क्लिपिंगमधून बाहेर पडली आहे.

अंडरवर्ल्डच्या गुंडांनी कारागृहात एैषआरामात जगण्यासाठी जेलर व कारागृह अधिक्षकांना जवळ केले. पण ही साखळी अधिकाऱ्यांपासून तुरूंग रक्षकांपर्यंत पोचली आहे. कारागृहाच्या मुख्य दरवाजातून मालाचा पुरवठा न करता तो कैद्यांच्या शेतातून करण्याची पध्दत आजही कायम आहे. कळंबा कारागृहाची रेसकोर्स परिसरात २२ एकर शेती आहे. या शेतीचे एक टोक मंगळवार पेठेत आहे तर दुसरे टोक रामानंदनगर ओढ्याजवळ आहे. कारागृहातील कैद्यांना सुधारण्यासाठी त्यांना आवडेल त्या प्रमाणे काम दिले जाते. आठवड्यातून काही दिवस काही कैदी कैद्यांच्या शेतात श्रमदान करण्यासाठी जातात.

कारागृहात गांजा, दारू, मटण पोचवण्यासाठी कैदी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधतात. त्यानंतर कारागृहात हा माल येण्यासाठी कैद्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जातो. कारागृहाच्या दारातून गांजा, दारू, मटण नातेवाईकांना नेता येत नसल्याने कैद्याच्या शेतातील विशिष्ट जागेत हे सामान नातेवाईकांकडून ठेवल जाते. शेतात काम करणारे कैदी दारू, मटण अथवा गांजा विशिष्ट जागेवरून ताब्यात घेतात. काही कैदी कारागृहात मटण नेण्याऐवजी कैद्याच्या शेतात लपवून ठेवलेल्या भांड्यात मटण शिजवतात. कुणालाही न कळता मटणाची पार्टी कैद्याच्या शेतातच केली जाते. पण गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बाहेर सोडले जात नसल्याने शेतात काम करणारे कैदी खिशातून अथवा अवजाराच्या पोत्यातून हे सामान कारागृहात नेतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खिसे गरम केले असल्याने त्यांची तपासणी होत नाही. त्यानंतर बराकीत मटण शिजवून खाल्ले जाते.

कारागृहात काम कारणाऱ्या कैद्यांना कूपन दिले जाते. प्रति महिना २००० ते ३००० हजार रूपयाचा माल कॅन्टीनमधून मिळतो. कॅन्टीनमध्ये तंबाखू, काडेपेटी, रवा, तूप हे पदार्थ मिळतात. तूप अथवा तेलाचा वापर करून मटण शिजवले जाते. दारू व गांजाचा पुरवठा तुरूंग रक्षक करतात. पण कैद्यांपर्यंत जाणाऱ्या दारूचा आस्वाद मधली मंडळी घेत असल्याने मागणी करणाऱ्या कैद्यापर्यंत ३० ते ५० मिली इतकीच दारू पोचते. दारू पिऊन कैद्यांनी दंगा करू नये म्हणून कमी दारू दिले असे कारण सांगितले जाते.

कळंब्याचे लोकेशन तपासले

पानसरे हत्येचा तपास करताना कळंबा कारागृहातील गुंडांकडून सुपारी दिली असल्याचा संशय पोलिसांना संशय होता. त्यावेळी पोलिसांनी कळंबा कारागृहाचे लोकेशन तपासले होते. कारागृहातील २० ते ३० मोबाइल सुरू होते. हे मोबाइल कैद्यांचे होते असे तपासात निष्पण्ण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाध‌िस्थळाच्या कामास वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या कामाला वेग आला असून पायाचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष चबुतऱ्याच्या बांधकामास सुरूवात झाली आहे. टाऊन हॉल नर्सरी बागेतील समाधीस्थळाचा पहिला टप्पा तीन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिल्लक कामांसाठी राज्य व महापालिकेकडून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शाहू महाराजांच्या समाधीस्थळासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यासाठी ६७ लाखाचा निधी मंजूर केला आहे. चार महिन्यांपूर्वी समाधीस्थळाच्या कामास सुरूवात झाली आहे. ५५ फूट लांब व ५५ फूट रूंद जागेवर काळ्या दगडातील चबुतरा बांधण्यात येणार आहे. चबुतऱ्यासाठी चार फूट पाया खोदण्यात आला असून पायाचे काम पूर्ण झाले आहे. चबुतऱ्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. पाच ते सात फूट उंचीच्या चबुतऱ्यावर समाधीस्थळाकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर मेघडंबरी बांधण्यात येणार आहे. मेघडंबरीला जाळीदार पडदा बांधण्यात येणार आहे.

समाधीस्थळ विकसित करण्यासाठी साडेपाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात महापालिकेने ६७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अर्किटेक्ट अभिजित जाधव कसबेकर यांनी समाधीस्थळाचा आराखडा केला असून विखे पाटील यांच्याकडे काम देण्यात आले आहे. समाधीस्थळाभोवती लॅन्डस्केप, कंपाऊंड वॉल, शिवाजी महाराज व ताराराणी मंदिर परिसर सुशोभिकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात छोटे सभागृह, व्यायामशाळा व ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उभारावा लागणार आहे.

भरीव निधीची तरतूद ...

नर्सरी बागेत शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांची मंदिरे बांधली आहेत. या मंदिरांशेजारी महापालिकेच्या जागेत शाहू समाधीस्थळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवरील ग्रीन झोनचे आरक्षण बदलण्यात थोडा कालावधी गेल्यानंतर दीड वर्षापूर्वी तत्कालिन स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण व अदिल फरास यांनी स्मारकांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. नवीन सभागृहाकडून निधीची तरतूदही आगामी अंदाजपत्रकात होण्याची शक्यता आहे.

ठराव बहुमताने मंजूर

नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराजांची समाधी बांधावी अशी मागणी २०१२ मध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी तत्कालीन महापौर जयश्री सोनवणे यांच्याकडे केली. त्यानंतर या मागणीला जोर आला. सर्वसाधारण सभेत समाधी बांधण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. स्थायी समितीने निधी मंजूर केल्याने समाधीस्थळाचे काम सुरू झाले.

शाहू समाधीस्थळ उभारणीसाठी पाच ते सहा कोटी खर्च अपेक्षित आहे. पाया, चबुतरा व मेघडंबरी असे समाधीस्थळाचे स्वरूप आहे. सध्या दगड घडवण्याचे काम सुरू असून प्रत्येक दगडाचे डिझाईन वेगळे असणार आहे.

-एस. के. पाटील, उपशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा जेलमध्ये ४० मोबाइल ?

$
0
0

मोबाइल चार्जिंगसाठी १३०० रूपये दर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा कारागृहात कैद्यांच्याकडे ३० ते ४० मोबाइल असून मोबाइलसाठी प्रति महिना तीन हजार रूपये तर चार्जिंगसाठी १३०० रूपये दर आहे, असा दावा कारागृहातून् सुटलेल्या एका कैद्याने केला आहे. कारागृहातील कारनाम्यांमुळे सावध झालेल्या नूतन तुरूंग अधीक्षकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कैद्यांशी संबध कमी ठेवण्याचा सल्ला दिला असून दोषींच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

कळंबा कारागृहातील भ्रष्टाचाराबद्दल यापूर्वी दबक्या आवाजात चर्चा व्हायची. कारागृह प्रशासनही कडक सुरक्षा असल्याचा दावा करायचे. पण गांजा पार्टीच्या चित्रणाने कळंबा कारागृहातील सुरक्षेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. कारागृहातून शिक्षा भोगून येणारे व कच्चे कैदी भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आता सांगत आहेत. पैशाच्या जोरावर कारागृहात सर्व विकत घेता येते. कारागृहात गांजा, दारू, साबण, तेल, मसाले या वस्तू कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आत घेऊन येतात. आजारी कैद्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी कैद्यांना अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना सुविधा मिळतात. पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना मात्र गप्प बसावे लागते. कारागृहातील या भेदभावामुळे कैद्यांच्यात मोठा असंतोष असून त्याचा स्फोट होण्याची शक्यताही वर्तवली जात आहेत.

दरम्यान, गांजा पार्टीतील कैद्यांना वेगवेगळ्या मध्यवर्ती कार्यालयात ठेवण्यासंबधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. नूतन कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू केले आहे. कैद्यांपासून चार हात लांब रहा असा सल्ला त्यांनी दिला असून कर्तव्यात कसूर करू नका. अन्यथा कारवाईवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूविकास बँक अखेर अवसायनात

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : सातत्याने तोट्यात असल्याने १९ पैकी राज्यातील १७ जिल्हा सहकारी कृषी-ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका (भूविकास) अवसायानात काढण्याचा निर्णय यापूर्वीच मंत्रीमंडळाने घेतला होता. यातून बचावलेल्या कोल्हापूर बँकेला अखेरची घरघर सुरू झाली आहे. सातत्याने वाढत जाणारे तोट्याचे प्रमाण लक्षात घेत जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी अवसायक म्हणून शहर निबंधक एस. डी. निकम यांची नियुक्ती केली. बँकेवर अवसायकांची नियुक्ती झाल्याने कोल्हापूर भूविकास बँकेचे अस्तित्वही संपुष्टात यायला सुरूवात झाली आहे.

थांबवलेले कर्ज वितरण, कर्जवसुलीचे घटते प्रमाण आणि वाढत्या तोट्यामुळे २०१३ मध्ये संचालक मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. संचालक मंडळाने या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना राज्यातील सर्वच शाखा अवसायनात काढण्याला स्थगिती देण्यात आली. त्यात कोल्हापूर भूविकास बँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळाला दिलासा मिळाला होता.

मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सरकारने १९ शाखांपैकी १७ शाखा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. कोल्हापूर व नाशिक बँकांचे थकबाकी जास्त असल्याने आणि सदरची थकबाकी वसूल झाल्यास बँकांचे पुनरुजीवन होण्याची शक्यता असल्याने जिल्हा उपनिबंधकांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मंत्री मंडळाच्या निर्णयानंतर बँकेककडे असलेल्या ३२ कोटी थकीत रकमेपैकी काहीच रकम वसूल न झाल्याने आणि तोटा वाढत असल्याने अखेर जिल्हा उपनिबंधकांनी अवसायक नियुक्तीचा निर्णय घेतला. शुक्रवारी नियुक्तीचे पत्र शहर निबंधक निकम यांना मिळताच त्यांनी त्वरीत पदभार स्विकारला.

प्रचंड तोट्यामुळे निर्णय

मंत्रीमंडळाने १२ मे २०१५ रोजी राज्यातील भूविकास बँका बरखास्त करण्याचा अद्यादेश काढल होता. कोल्हापूर व नाशिक भूविकास बँकांना या निर्णयामधून वगळण्यात आले होते. यामुळे कोल्हापूर बँक पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र बंद झालेले कर्जवापट, कर्ज वसुलीचे घटते प्रमाण आणि वाढत जाणाऱ्या तोट्यामुळे शेवटी बँकेवर अवसायकांची नियुक्ती करावी लागली आहे.

कर्जवाटप आणि वसुली होत नसल्याने बँकेचा तोटा वाढत आहे. बँकेची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी प्रथम कर्जवसुलीला प्राधान्य देणार आहे. यापूर्वीच बँकेने एकरकमी परतफेड योजना सुरू केली आहे.

- एस. डी. निकम, अवसायक, भूविकास बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images