Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वाळू ठेका बंद करण्याचा आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील कालगाव येथील कृष्णा नदीपात्रात मरळोशी (ता. पाटण) येथील किरण गोरखनाथ घाडगे यांना काही अटीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू उपसा करण्यास परवानगी दिली होती, मात्र सदर प्लॉटची कराड तहसीलदारांनी अचानक पाहणी केली असता वाहतूक पास स्कॅनिंग करत नसल्याचे आढळून आल्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत वाळू प्लॉट बंद ठेवण्याचा आदेश येथील तहसीलदारांनी दिला.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी वाहतूक पास स्कॅनिंगची पाहणी केली असता ते स्कॅनिंग करत नसल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांना प्रशासनाने १७ सप्टेंबर रोजी २४ तासांत स्मार्ट प्रणाली सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली होती. मात्र, कराड तहसीलदारांनी समक्ष पाहणी केली असता ठेकेदाराने स्मार्ट प्रणाली सुरू न केल्यामुळे कालगाव येथील वाळू प्लॉटमधून पुढील आदेश होईपर्यंत वाळूचा उपसा करण्यास बंदी घातली असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली.

दरम्यान, कराड तालुक्यातील कृष्णा नदीच्या दोन्ही तिरांकडील गावांत आणि राष्ट्रीय महामार्गासह उपमार्गाकडेला बेकायदा वाळू डेपो मारण्यात आले आहेत. या सर्व डेपोंमध्ये हजारो ब्रास वाळूचा साठा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डेपोचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोगस डॉक्टर पिता-पुत्रावर कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीवाडीतील बोगस पिता-पुत्र डॉक्टरांचे पितळ उघडे पडल्याने त्यांनी आपला व्यवसाय बंद करून हे गाव सोडले. अजय कदम व श्याम कदम (बेळगाव) असे या तथाकथित डॉक्टर पितापुत्रांचे नाव आहे. गेली दहा वर्षे ते आपला हा व्यवसाय बिनदिग्गतपणे करीत होते. महपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने, तसेच अन्न व औषध प्रशासनाने त्यांची तपासणी केली त्यावेळी ते स्टेरॉईडमिश्रित पूड औषध म्हणून देत होते, असे दिसून आले. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना त्यांनी आपला हे उद्योग चालू ठेवला होता.

सांगलीवाडीतील एका गाळ्यात 'विशुद्ध आयुर्वेदिक चिकित्सालय' या नावाने त्यांनी आपला दवाखाना थाटला होता. रुग्णांना ते स्टेरॉईडमिश्रित पूड औषध म्हणून देत होते. या पुडीमुळे काही रुग्णांना थोडेपार बरे वाटायचे. येथील पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर कुलकर्णी यांना कदम यांनी वैद्यकीय रजेसाठी दाखला दिला होता. तो दाखल त्यांच्या कार्यालयाने नाकारल्यावर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरू लागली. या विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. एम. साक्रीकर व औषध निरीक्षक जे. पी. सौंदत्ती या पथकाने या दवाखान्यावर छापा औषधांचे नमुने तब्यात घेतले.

तपासणीनंतर त्यात स्टेरॉईड असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती, शिवाय रजिस्ट्रेशनही नव्हते. डॉ. कुलकर्णी म्हणाले, कदम पिता-पुत्रांकडे कसलेच प्रमाणपत्र नसल्याने त्यांना दवाखाना बंद करायला लावला. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कदम पिता-पुत्रांवर फौजदारी कारवाई का? झाली नाही, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते रामचंद्र कदम यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आवाज’ करणाऱ्यांवर कारवाई

$
0
0

पोलिसांना २२ सप्टेंबरला हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, सातारा

डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर बंदी घातलेली नाही. तसेच त्यांना दिलेल्या नोटिसाचा त्यांनी चुकीचा अर्थ काढला आहे. ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या अटीवर त्यांना उत्सव काळात परवानगी दिली जाईल. मात्र, नियमापेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण सातारा शहर पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

डॉल्बी व्यावसायिकांनी शहर पोलिसांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या संदर्भात याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. मुकुंद सारडा यांना पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षी गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केले होते. त्यामुळे कायद्याचा भंग व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी लाऊड स्पीकर, डीजे डॉल्बी, बेन्जो, म्युझिक सिस्टिम हे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांना पुरवू नयेत, या आशयाची नोटीस २८ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाने दिली होती. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्या कुठल्याही व्यावसायिकाला बंदी घातलेली नाही. जिल्हा डॉल्बी संघटनेच्या याचिकेनंतर हायकोर्टाने या बाबत म्हणणे सादर करण्यासाठी पोलिसांना २२ सप्टेंबर रोजी हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संघटनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीला कलंक लागला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून केल्याप्रकरणी सांगलीतील समीर गायकवाडला अटक झाली आहे. सांगलीला अशाप्रकारचा कलंक लागणे हे बरोबर नाही. वसंतदादा पाटील, सहकार चळवळीतला अग्रगण्य जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. जागतिक ख्याती असलेल्या सांगलीत समीर गायकवाडसारखे प्रॉडक्ट पुन्हा होता कामा नये, याची वेळीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत खासदार रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यामुळे विचारांचे उत्तर वैचारिक पातळीवरच दिले पाहिजे. कोणा व्यक्तीचा खून करून विचार संपणार नाहीत. विचाराने प्रगत असलेल्या महाराष्ट्राची ख्याती आगळी वेगळी आहे. त्यात सांगलीला अनन्य साधारण महत्व आहे. अशा सांगलीत कॉम्रेड पानसरे यांचा मारेकरी समीर गायकवाड हा निघावा, हे मनाला यातना देणारे आहे. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असल्याने त्यांच्या आदेशानेच समीर गायकवाडला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले असले तरी सरकार पानसरे यांच्या खुनातील आरोपीला अजिबात पाठीशी घालणार नाहीत. पोलिसांना तपास करण्यासाठी पूर्णतः मोकळीक देण्यात आली आहे. पानसरे यांच्या खुन्याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणेने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याही मारेकऱ्याला शोधून अटक करावी. या दोन्ही घटनांची एकमेकाशी लिंक असल्याचे नाकारता येणार नाही, असेही आठवले म्हणाले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना २५ लाखांची मदत द्या

एक लाख रुपयांना आता काहीही किमत उरलेली नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला किमान पंचवीस लाख रुपयांचे रोखीने मदत केली पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली. या संदर्भात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तीक पणे अशी मदत करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कायमस्वरुपी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करणार आहोत, असेही ते म्हणाले.

सरकार कोणते आहे, यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूल्यमान करण्यापेक्षा संबधित कुटुंबाना प्राप्त परिस्थितीत मदत मिळणे आवश्यक आहे. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य कौतुकास्पदच आहे. त्यांच्या कार्याला नावे ठेवण्यापेक्षा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी मदतीसाठी पुढे यावे. आपण स्वतः आपला दोन महिन्यांच्या दोन लाख रुपये पगाराचा चेक मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आरपीआय पक्षाच्या वतीने पंचवीस लाख रुपये देण्यात येणार आहेत. दुष्काळी जिल्ह्याचा दौरा सोलापूरपासून सुरू करणार आहे. २२ सप्टेंबरला उस्मानाबाद येथे दुष्काळी परिषद घेण्यात येणार आहे. दुष्काळ केवळ मराठवाडा, विदर्भातच आहे, असे नाही तर पश्चिम महाराष्ट्रही दुष्काळाच्या छायेतच आहे.

'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' उभारा

इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अरबी समुद्रातही स्मारक व्हावे. समुद्रात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रमाणेच डॉ. आंबेडकर यांचा सव्वाशे फूट उंचीचा पुतळा उभा करून त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, असे नाव द्यावे, अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन चार ऑक्टोबरला करण्याचे सरकारचे नियोजन आहे. भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. पंतप्रधानांची भेट घेऊन आपण त्यांना तशी विनंती केली आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी केलेला स्मारक आराखडा मान्य करण्यात आला आहे. चारशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०१९पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने प्रत्येक अंदाजपत्रकात शंभर, सव्वाशे कोटीची तरतूद करणे आवश्यक आहे.

विस्ताराची वाट पाहतोय

राज्य सरकारचा विस्तारच होत नाही, त्यामुळे घटक पक्षांचाही विस्तार थांबलेला आहे. सत्तेत सत्तर टक्के भाजपचा आणि तीस टक्के शिवसेनेचा वाटा आहे. त्यांच्या वाट्यातून घटक पक्षांना वाटा मिळणार आहे. अद्याप त्यांच्यातच ताळमेळ बसताना दिसत नाही. आम्ही इशारे देऊन बघितले. आता विस्ताराची वाट पाहणार आहे, असेही ते म्हणाले.

सांगलीत विमानतळ हवे

सांगलीत आल्यानंतर सांगली संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विमानतळाची मागणी केली आहे. सांगलीतले रस्तेही नीट नाहीत. आपण गेली दहा वर्षे ज्या रस्त्यावरुन येतोय, त्या रस्त्यावरील खड्डे कधीच हटलेले दिसत नाहीत. दरम्यान, संजय कांबळे यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. ते प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टीत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाडची ‘एनआयए’ चौकशी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या चौकशीत मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलचे नाव पुढे आल्याने रविवारी ''एनआयए''चे पथक कोल्हापुरात दाखल झाले. दिवसभर त्यांनी सीबीआय पथकासोबत कसून चौकशीला सुरुवात केली. यातून काही ठोस धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी तोरणानगर परिसरातील काही तरुणांना गायकवाडची ओळख पटवण्यासाठी आणले होते. त्यांच्या माध्यमातून गायकवाडचा या प्रकरणातील सहभागाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर सात महिन्यांनी कोल्हापूर पोलिसांसह एसआयटीच्या पथकाने समीर गायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाला अटक करून चौकशी सुरू केली आहे. यात रुद्र पाटील याचे नाव चर्चेत आल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. रुद्र पाटील हा २००९मध्ये मडगाव येथे झालेल्या स्फोटातील आरोपी असल्याने तो ''एनआयए''च्या मोस्ट वॉन्टेड यादीतील आरोपी आहे. गेल्या पाच वर्षांपासून 'एनआयए'ची टीम रुद्र पाटीलच्या शोधात आहे. मात्र, अजूनही रुद्र पाटीलला पकडण्यात 'एनआयए'ला यश आलेले नाही.

'एनआयए'च्या पथकाने रविवारी गायकवाडची कसून चौकशी सुरू केली. गायकवाड आणि रुद्र पाटील हे दोघेही १९९८पासून सनातन संस्थेसाठी काम करीत होते, अशी माहिती तपासात स्पष्ट झाली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये झालेल्या 'सनातन'च्या एका कार्यक्रमात हे दोघेही एकत्र होते. त्यामुळे दोघांमध्ये झालेले संभाषण, पत्रव्यवहार तपासण्याचे काम सुरू आहे. गायकवाडची मैत्रीण ज्योती, त्याच्याशी संबंध आलेले 'सनातन'चे साधक आणि त्याच्या नातेवाईकांचीही 'एनआयए'कडून चौकशी होणार आहे. प्रामुख्याने रुद्र पाटीलच्या अनुषंगाने माहिती मिळवण्याचा 'एनआयए'चा प्रयत्न आहे. त्यामुळे गायकवाडच्या माध्यमातून रुद्र पाटीलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न 'एनआयए'च्या अधिकाऱ्यांनी सुरू ठेवला आहे.

बंदोबस्त वाढवला

संशयित आरोपी समीर गायकवाड याची 'एनआयए'कडून चौकशी सुरू होताच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यालयात येणाऱ्याजाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात असून, या बंदोबस्तात आणखी वाढ होणार आहे.

कर्नाटककडून चौकशी

समीर गायकवाड याचे संकेश्वर कनेक्शन समोर येत असल्याने कर्नाटक पोलिसांनीही समीर गायकवाडच्या चौकशीस सुरुवात केली आहे. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत काही धागेदोरे मिळतात का, याची तपासणी कर्नाटक पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत कोम्बिंग ऑपरेशन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गणेशोत्सव आणि बकरी ईदाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दीची आणि संवेदनशील ठिकाणी सोमवारी बॉम्बशोध पथकाने तपासणी मोहीम राबविली. अनंत चतुर्दशीपर्यंत शहरातील विविध ठिकाणी ही मोहीम कायम ठेवण्यात येणार आहे, ही माहिती पथक प्रमुख फौजदार सूर्यकांत जाधव यांनी पत्रकारांना दिली.

या मोहिमेत शाहू पुतळा, शिवाजी पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, डॉ. आंबेडकर पुतळा, सार्वजनिक बाजारासह आठवडी बाजार अशी गर्दीची ठिकाणी तपासली जाणार आहेत. पथकामध्ये बॉम्बशोध मशिनसह रँचो नामक श्वानाचाही समावेश आहे. पथकाने अचानकपणे संग्राम चौकातील एका बाझारात तपासणी सुरु केल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. खरेदीसाठी बाझारात आलेल्या ग्राहकांची तर भीतीने गाळण उडाली होती. तर घटनांचे सोशल मीड‌ियावरुन प्रसारण होऊन अफवांचे पीक उठले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता घोषणा बाकी

$
0
0

Appasaheb.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : इलेक्टीव्ह मेरीटला प्राधान्य देत चारही प्रमुख पक्षांनी पहिल्या टप्प्यात सक्षम उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. निवडून येण्याची क्षमता, प्रभागातील स्वपक्षीय स्पर्धकांची कमी संख्या आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षीय पातळीवर विरोध होणार नाही सक्षम उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेना, आणि भारतीय जनता पक्ष ताराराणी आघाडीची यादी जाहीर होणार आहे. चारही पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधले असता पहिल्या टप्प्यात जाहीर होणाऱ्या उमेदवारांची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र ही यादी अंतिम नव्हे.

शिवसेना

उदय साळोखे (तटाकडील तालीम), शशिकांत बीडकर (व्हीनस कॉर्नर), अरविंद मेढे-पवार (भोसलेवाडी कदमवाडी), नियाज खान (जवाहरनगर-शास्त्रीनगर), अरूण सोनवणे (जवाहरनगर), तेजस्विनी घोरपडे (सिद्धार्थनगर), पदमाकर कापसे (शिवाजी उद्यमनगर), उदय निगडे (दुधाळी पॅव्हेलियन), विश्वजित मोहिते (शिवाजीपार्क) , प्रकाश सरनाईक यांच्या कुटुंबांतील महिला सदस्य (चंदेश्वर गल्ली), विनय वाणी (मुक्तसैनिक वसाहत), राजू हुंबे कुंटुंबातील महिला सदस्य (सम्राटनगर), दत्ताजी टिपुगडे (संभाजीनगर बसस्थानक), अमृता सावंत (शिपुगडे तालीम). शिवसेनेची पहिली २५ उमेदवारांची यादी २८ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला दुसरी २५ जणांची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रभागासाठी उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार

शारंगधर देशमुख (रंकाळा तलाव), सचिन चव्हाण (नाथा गोळे तालीम), महेश गायकवाड (आपटेनगर), नंदकुमार सूर्यवंशी (बलराम कॉलनी), भूपाल शेटे (जवाहरनगर), प्रवीण केसरकर (शिवाजी विद्यापीठ), निलोफर आजरेकर (कॉमर्स कॉलेज), जयश्री सोनवणे (नेहरूनगर), सुभाष बुचडे (शुगरमिल), संदीप नेजदार (हनुमान तलाव), गीतांजली चौगुले (कसबा बावडा पॅव्हेलियन), मुश्ताक मोमीन (लाइन बाजार), जयश्री साबळे (स्वातंत्र्यसैनिक कॉलनी), वृषाली कदम (कळंबा फिल्टर हाऊस), दीपा मगदूम (राजलक्ष्मीनगर), माधुरी लोखंडे (साने गुरूजी वसाहत), दिलीप पोवार (कनाननगर), रेखा बेळगांवकर (मार्केट यार्ड), जयश्री चव्हाण (सिद्धाळा गार्डन), दीपाली ढोणुक्षे (सम्राटनगर), राजेंद्र चव्हाण (पदमाराजे उद्यान), संजय मोहिते (साईक्स एक्स्टेंशन)

राष्ट्रवादी

राजू लाटकर (शिवाजी पार्क), मुरलीधर जाधव (राजारामपुरी एक्स्टेंशन), संगीता पोवार (ट्रेझरी ऑफीस), हसिना फरास (महालक्ष्मी मंदिर), अलका दिनकर कांबळे (कळंबा फिल्टर हाऊस), अश्विनी सतीश लोळगे (शासकीय मध्यवर्ती कारागृह), सुनील पाटील (रामानंदनगर जरगनगर), महेश सावंत (संभाजीनगर बसस्थानक), अजिंक्य चव्हाण (पद्माराजे उद्यान), विश्वास आयरेकर (दुधाळी पॅव्हेलियन), विनायक फाळके (शिवाजी उद्यमनगर), पाटील (रुईकर कॉलनी), सुहास सोरटे (जवाहरनगर), सरिता मोरे (शिपुगडे तालीम), अफजल पिरजादे (सिद्धार्थनगर), विश्वास आयरेकर (दुधाळी पॅव्हेलियन), प्रमोद पोवार (तपोवन), माधवी गवंडी (पंचगंगा तालीम), स्नेहल जाधव (सदर बाजार), संभाजी देवणे (कैलासगडची स्वारी मंदिर), प्रकाश पाटील यांच्या कुटुंबांतील महिला सदस्य (रूईकर कॉलनी). बाळकृष्ण मेढे किंवा आदिल फरास यांच्यामध्ये बिंदू चौक प्रभागात रस्सीखेच आहे. फरास यांच्या आई हसिना फरास या महालक्ष्मी मंदिर प्रभागातून उमेदवार आहेत. त्यामुळे बिंदू चौक प्रभागातून फरास यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिंदू चौकातून बाळकृष्ण मेढे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भाजप-ताराराणी आघाडी

आर. डी. पाटील (शिवाजी उद्यमनगर), शितल सुभाष रामुगडे (कळंबा फिल्टर हाऊस), प्रकाश काटे (शिवाजी विद्यापीठ), संतोष गायकवाड (संभाजीनगर), विक्रम जरग (पद्माराजे उद्यान), सुनील मोदी (कनाननगर), वर्षा कुंभार (मार्केट यार्ड), श्रृती पाटील (महालक्ष्मी मंदिर), सत्यजित कदम (भोसलेवाडी कदमवाडी), मामा कोळवणकर (नागाळा पार्क), किरण शिराळे (बाजारगेट), संजय सावंत (आपटेनगर), अजित ठाणेकर (तटाकडील तालीम), अमोल पालोजी (रंकाळा तलाव), प्रकाश मोहिते (नाथा गोळे तालीम), यशोदा मोहिते (संभाजीनगर बसस्थानक), ईश्वर परमार (बिंदू चौक), नंदकुमार वळंजू (जवाहरनगर-शास्त्रीनगर), नंदकुमार गुर्जर (जवाहरनगर), तेजश्री पाटील (साने गुरूजी वसाहत), रचना मोरे (फुलेवाडी), किरण शिराळे (खोल खंडोबा), हेमंत कांदेकर (दुधाळी पॅव्हेलियन), विजय खाडे (तपोवन), वर्षा कुंभार (मार्केट यार्ड), स्मिता माने (सदर बाजार), मृदुला पुरेकर (साईक्स एक्स्टेंशन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी मत्स्यबीज केंद्रावर काहींचा डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा येथील सरकारी मत्सबीज केंद्रात कागदोपत्री मत्स्यबीज वर्षभर बंद पडले आहे. मात्र या मत्सबीज संगोपन केंद्रात काही खासगी व्यक्ती व संस्था मत्स्यबीज तयार करून त्याची खुलेआम विक्री करत आहेत. देखभाल खर्च सरकारचा आणि फायदा इतरांचा अशी केंद्राची अवस्था निर्माण झाली आहे. काही संस्था आणि व्यक्ती या केंद्राच्या उत्पन्नावर डल्ला मारत गब्बर होत असताना सरकारी उत्पन्नाचा मार्ग बंद पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात रंकाळा व तिलारी येथे दोन मत्सबीज केंद्रे आहेत. यातील तिलारीचे केंद्र अजूनही सुरू झालेले नाही. रंकाळा येथील केंद्र मात्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू असले तरी गतवर्षापासून ते बंद पडले आहे. सरकारी दप्तरातील कागदोपत्रानुसार हे केंद्र बंद असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र या केंद्राची मत्स्यबीज निर्मिती सुरू असून काही खासगी संस्था व व्यक्ती मत्सबीज उत्पादन घेत त्याची राजरोस विक्री करत आहेत. या प्रक्रियेत मत्स्यबीज केंद्र या सरकारी कार्यालयातील काही कर्मचारी देखील सहभागी झाल्याचे समजते.

रंकाळा येथील या मत्सबीज केंद्राचा देखभाल खर्च सरकारी निधीतून होतो. त्याचा फायदा मात्र सध्या खासगी व्यक्ती घेत आहेत. दरवर्षी येथे दोन कोटी पेक्षा अधिक मत्सबीज गरज असते. जिल्हयात जे तलाव आहेत, तेथील मासेमारीचा ठेका अनेकांनी घेतला आहे. त्या तलावात सोडण्यासाठी रंकाळा येथील केंद्रातून मत्स्यबीजाची विक्री होते. गेले काही दिवस येथून राजरोसपणे विक्री सुरू असले तरी या केंद्रात एकही मत्स्यबीज उत्पादन होत नसल्याचा अहवाल मात्र कोल्हापूर कार्यालयाने वरिष्ठाकडे पाठवला आहे. या केंद्रातून रोज मत्सबीजाची विक्री होत असताना येथे निर्मिती बंद असल्याचा कागदोपत्री देखावा केला जात आहे. यावरून या केंद्रातील काही कर्मचारी व खासगी व्यक्तींची साखळीच कार्यरत असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांचीच शिष्टाई यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने एफआरपी देण्यासंबंधीच्या अटी शिथिल केल्यामुळे जिल्ह्यातील पाच कारखान्यांना सॉफ्ट व गॅप लोनच्या माध्यमातून १०३ कोटी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एफआरपीनुसार रक्कम जमा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा केल्यानंतर अटी शिथिल केल्या असून ४० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यामुळे आंदोलकांनी फुकटचे श्रेय घेवू नये असा टोला स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेताल जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत लगावला. तसेच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढत मंत्री समितीची बैठक घेवून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, असा टोला लगावला.

मुश्रीफ म्हणाले, ' राज्यासह जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांकडे गाळप परवाना मागितला होता. मात्र मंत्री समितीची बैठकच झाली नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सहकार मंत्र्यांनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून मंत्री समितीची बैठक घेण्यासाठी चर्चा करुन १५ ऑक्टोबरपर्यंत कारखाने सुरू होतील याकडे लक्ष द्यावे.' मुख्यमंत्री फडणवीस नुकतेच जपानवरुन परत आले आहेत, त्यांची भेट झाल्यास गाळप परवान्यासाठी विनंती करु असा चिमटाही त्यांनी काढला. पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष विनायक पाटील, संचालक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रतापसिंह उर्फ भैय्या माने, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

'दौलत' बाबत बैठक

दौलत कारखाना लीजवर घेण्यासाठी काही कंपन्या उत्सूक आहेत. बँकेच्या कर्जाचा पहिला हप्ता देवून सरकारी देणी देण्यासाठी सुलभ हप्ते पाडून देण्याची मागणी केली आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार अर्थ, साखरआयुक्त व सहकार प्रधान सचिवांसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेच्यावतीने सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

स्थान अबाधित

मुश्रीफ म्हणाले,'शरद पवार यांच्या पंतप्रधान भेटीनंतर तीन दिवसांत साखर निर्यातीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पंतप्रधान मोदी फक्त पवार यांचे ऐकतात. आमेच नाही, असे खुद्द सहकामंत्रीच म्हणत असल्याने पवारांचे देशातील राजकाणातील स्थान अबाधित असल्याचे आधोरेखित होते. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख टन साखर होणार निर्यात

$
0
0

साखर निर्यातीचे उद्दिष्ट वाढविल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा वाटाही वाढणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने पुढील हंगामाच्या अखेरपर्यंत साखर कारखान्यांसमोर ४० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले असून या निर्यातीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा वाटा अंदाजे दोन लाख टन इतका असेल. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमधून पुढील वर्षभरामध्ये १४ लाख टन इतकी साखर निर्यात होणार आहे.

सलग पाचव्या वर्षी देशामध्ये साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत असून ऊस उत्पादकांची थकबाकी १४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे २,७०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढील वर्षासाठी निर्यात उद्दिष्ट वाढवून चाळीस लाख टनांपर्यंत नेले आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामासाठी नव्याने निर्यात उद्दिष्ट ठरवण्यात आले. हे निर्यात उद्दिष्ट ठरवताना सध्याच्या वर्षासहित मागील तीन वर्षांचे साखर उत्पादन विचारात घेतले जाते. मागील सलग तीन वर्षे देशामध्ये साखरेचा पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक आहे. त्याचवेळी निर्यातीवर मर्यादा असल्याने देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेचे दर घसरत आहेत.

सध्या देशांतर्गत घाऊक बाजारपेठेमध्ये साखरेची किंमत प्रतिकिलो २० रुपयांच्या आसपास आहेत. साखरेचा उत्पादन खर्च मात्र प्रतिकिलो तीस रुपये इतका आहे. ऑक्टोबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ या काळामध्ये देशामध्ये झालेले साखरेचे अंदाजे उत्पादन २.८३ कोटी टन इतके आहे. २०१३-१४ या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत (२.४३ कोटी टन) यंदाचे उत्पादन चाळीस लाख टनांनी अधिक आहे. देशांतर्गत साखरेची मागणी २.४५ कोटी टन इतकीच आहे. एफआरपीसाठी मिळणारे कर्ज, करमाफी, सबसिडी हे सर्व तत्कालीन उपाय असले, तरी दीर्घकाळामध्ये साखरउद्योग फायद्यात येण्यासाठी मागणी व पुरवठा यामध्ये समतोल राखला जाणे आवश्यक आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत

केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाने साखर निर्यातीचे उद्दिष्ट वाढवल्याच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी याविषयी २३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन आणि अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याशी पत्रव्यवहार करून चालू हंगामाअखेर शिल्लक राहणाऱ्या साखरेच्या साठ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे, ऊस उत्पादकांना थकबाकी मिळण्यासाठी देशांतर्गत साखरेचे दर वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्येही शेट्टी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल नव्या निर्यात धोरणामध्ये घेण्यात आल्याबद्दल शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

'केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे साखरेचे अतिरिक्त उत्पादन बाजारात येणार आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होऊ शकेल व कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी देता येणे शक्य होणार आहे.

- विजय औताडे, कार्यकारी संचालक, शाहू साखर कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात सापडला साडेआठ फुटी अजगर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजऱ्याच्या हिरण्यकेशी नदीपात्रातील हाजगोळी बंधाऱ्यानजीक साडेआठ फूट लांबीचा अजगर सापडला. येथील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर जाधव यांच्यासह ग्रामस्थांना गेले आठवडाभर त्याचे दर्शन होत असे. सोमवारी दुपारी अजगर दिसल्यानंतर त्यांनी वनविभागास कळविले. त्यानुसार आजऱ्यातील हसन मकानदार व शकीर बागवान या सर्पमित्रांना घेऊन वनपाल कृष्णा डेळेकर सहकाऱ्यांसह पोहोचले. त्यांनी या अजगरास पकडले व सुळेरानच्या घनदाट जंगलात सोडून दिले.

'हा अजगर पायथॉन मोल्युरस प्रजातीतील असून आशिया खंडामध्ये विशेषत: पश्चिम घाटामध्ये सर्रास आढळून येतो. साधारणत: १० फुटापर्यंत त्याची लांबी असते. मात्र तो बिनविषारी असतो. नदीकाठावरील जंगल व गवताळ परिसरात त्याचे वास्तव्य असते. उंदीर आणि सशांसारखे सस्तन प्राणी हेच त्याचे खाद्य असते. प्राण्यांना विळखा घालू गुदमरून मारणे आणि मगच त्यांचे सेवन करण्याची त्याची रित असते. एकदा शिकार केली की साधारणत: दोन तीन आठवडे त्याला भूक लागत नाही, ,असे आजरा महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. विनायक आजगेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोळ मिटविण्याचे आव्हान

$
0
0

मतदारयादी घोळप्रश्नी अधिकाऱ्यांची बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीतील घोळाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. दुबार नोंदणी, मतदार यादीत नावाचा समाविष्ठ नसणे, एका प्रभागातील कॉलनी-वसाहतींचा अन्य प्रभागात समावेश झाल्याने नगरसेवकासह इच्छुक उमेदवारही हैराण झाले आहेत. हरकतीनंतर अंतिम मतदार यादी अपडेट करण्यासाठी केवळ चार दिवसाचा कालावधी असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मतदार यादीतील घोळावरून प्रशासनावर सगळ्याच घटकाकडून तोंडसूख घेण्यास सुरूवात झाल्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घातले आहे. काही नगरसेवक मतदार यादीतील घोळप्रकरणी कायदेशीर लढाईच्या विचारात आहेत. नगरसेवकांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेऊन घोळाबाबत विचारणा केली.

आयुक्तांनी, सोमवारी सुटीच्या दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यादीतील घोळ निस्तरण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना केल्या. मतदार यादीतील घोळाप्रकरणी अ​धिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचेही वृत्त आहे. 'प्रत्येक प्रभागनिहाय तक्रार आणि हरकतींनुसार दुरूस्ती करण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा कामाला लावले जाईल. २८ सप्टेंबरपर्यंत हरकती आ​णि सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. तीन ऑक्टोंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदार यादी जाहीर करण्या अगोदर सगळ्या दुरूस्ती केल्या जातील.' अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

बलराम कॉलनीचे मतदार डिलीट

मतदार यादीतील सावळ्यागोंधळाचा आणखी एक नमुना बलराम कॉलनी प्रभागातील यादीत पाहावयास मिळत आहे. मतदार यादीतील पान नंबर २ ते २१७ पानावर पुरवणीनुसार वगळलेले मतदार अशी टीप छापली आहे. यामुळे या प्रभागातील सर्व ६१९० मतदारांची नावे वगळल्याची भिती इच्छुकांत निर्माण झाली. माजी नगरसेवक नंदकुमार सुर्यवंशी यांनी चूक निदर्शनास आणली.

तांत्रिक दोष की...

प्रत्येक प्रभागातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. काही प्रभागात तर प्रगणक गटच दुसऱ्या प्रभागात समाविष्ठ झाल्याची उदाहरणे आहेत. मतदार यादीतील घोळामुळे प्रशासनाकडून टीका होऊ लागली आहे. यंदा मतदार यादी तयार करताना सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. मतदार यादीतील घोळ बीएलओच्या पातळीवर झाला आहे की तांत्रिक बाबीमुळे याचाही शोध प्रशासन घेत आहे.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रत्येक पातळीवर घोळ सुरू आहे. या प्रकाराला प्रशासनाचा गलथानपणा कारणीभूत आहे. तेव्हा निवडणूक पारदर्शी व सुरळीत होण्यासाठी अनुभवी व ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडणे आवश्यक आहे.

- संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

महापालिका प्रशासन निवडणुका घेण्यास सक्षम आहे की नाही अशी साशंकता येत आहे. यादीतील घोळाप्रश्नी कायदेशीर मत घेऊन पुढील लढा देणार आहोत. आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटी दाखविल्या आहेत. आयुक्तांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जाहीर प्रकटीकरण करावे. मतदार यादीतील घोळ कसा दुरूस्त करणार हे साऱ्यांना समजले पाहिजे.

- प्रा. जयंत पाटील, नगरसेवक, जनसुराज्य शक्ती पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्येचे पडसाद निवडणुकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे पडसाद येत्या महापालिका निवडणुकीत उमटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. पानसरेंची हत्या होऊन सात महिन्याचा कालावधी उलटला. हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील मास्टरमाइंड कोण? हे अजून सामोरे आलेले नाही. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पानसरे हत्येचा छडा लावण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून सत्ताधारी भाजप-सेना सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत त्याची तीव्रता आणखी वाढून सरकारवर दबाव टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गोविंद पानसरे यांची नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळली होती. त्यांनी कष्टकरी, श्रमकरी, फेरीवाले, घरेलू मोलकरीण, कामगार अशा विविध घटकांच्या न्याय्य हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. कोल्हापूरचा पाणीप्रश्न असो वा रेशनचा पानसरे आंदोलनात सदैव एक पाऊल पुढे राहिले. कोल्हापुरात गेली पाच वर्षे सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलनात पानसरे यांनी एल्गार पुकारला होता. कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून प्रस्था​पितांना आव्हान देण्याचा त्यांचा खाक्या हा सर्वसामान्य लोकांना नेहमीच दिलासादायक ठरला. आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नाचा तडा लावतानाच पानसरे यांनी व्याख्यान, परिसंवाद, साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या पुढाकार घ्यायचे. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांना नेहमीच पाठबळ देत त्यांना व्यासपीठ मिळवून दिले.

पानसरे यांच्या हत्येनंतर समाजातील सर्वच थरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या संघटनांनी त्यांच्या हत्येप्रकरणी आवाज उठवित मारेकऱ्यांचा तत्काळ शोध लावावा याकरिता सरकारवर दबाव टाकत आहेत. पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेच्या समीर गायकवाडला १६ सप्टेंबरला अटक करण्यात आली; पण या हत्येमागील मास्टरमाईंड अद्याप उजेडात आला नाही. मारेकऱ्यांना पकडण्यात विलंब होत असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वीच सरकारवर आरोप सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांनी सरकार मारेकऱ्यांची नावे उघड करत नसल्याचा आरोप यापूर्वीच केला आहे. हत्येतील मास्टरमाईंड, अन्य मारेकऱ्यांचा तत्काळ छडा लागला नाही तर याप्रश्नावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांची खेळी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन, संघावरही बंदी घाला

$
0
0

कोळसे-पाटील, शमशुद्दीन मुश्रीफ यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातील बहुतांश विघातक कारवायांमध्ये सनातनसह हिंदुत्ववादी संघटनांचे नाव वारंवार समोर येत आहे. याच संस्थांनी देशात भगव्या दहशतवादाला जन्माला घातले आहे. देशातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे मूळ आरएसएस ही संघटना असल्याने सनातनसह आरएसएसवरही बंदी घालावी,' अशी आग्रही मागणी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील आणि माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रासह गोव्यात झालेल्या पाच देशविघातक कारवायांमध्ये सनातन संस्थेच्या साधकांचे नाव पुढे आले आहे. मडगावातील स्फोटात तर सनातनचे दोन साधक मृत्युमुखी पडले होते. हाच धागा पकडून तपास यंत्रणा सनातनपर्यंत पोहोचल्या होत्या. मडगाव स्फोटातील मुख्य आरोपी रुद्र पाटील याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने २००९ पासून फरार घोषित केले आहे. इतरही अनेक साधकांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. मात्र, या कारवायांमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले नसल्यानेच सनातनसह आरएसएस आणि इतर देशविघातक संस्थांकडून पुनःपुन्हा हल्ले होत आहेत.

या संघटनांचा आत्मविश्वास वाढला असून, वेळीच ठोस कारवाई झाली नाही, तर भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता कोळसे-पाटील यांनी वर्तवली आहे, त्यामुळेच केंद्र सरकारने तातडीने सनातनसह आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी कोळसे-पाटील आणि शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील तपास यंत्रणांवरही शंका उपस्थित केली जात आहे. महाराष्ट्र एटीएसने मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रुद्र पाटीलसह त्याच्या साथीदारांचा शोध २००९ मध्येच घेतला असता, तर कदाचित पुढे डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या नसत्या, असा दावा कोळसे-पाटील आणि मुश्रीफ यांनी केला आहे. सनातन संस्थेबाबतच्या निष्काळजीबद्दल याआधीचे आघाडी सरकार आणि आताचे युती सरकार हे दोघेही जबाबदार असल्याचा टोल माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी लगावला आहे.

विशिष्ट विचारसरणीचे लोक देशाच्या निर्णयप्रक्रियेत आहेत. वरिष्ठ पदांवरही यांचीच वर्णी आहे, त्यामुळे हे लोक त्यांचा छुपा उद्देश साध्य करीत आहेत. देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही प्रभाव मात्र यांचाच असतो, त्यामुळे आरएसएस ही कडवी विचारधारा थोपवण्यासाठी राज्यकर्त्यांनी धाडस दाखवण्याची गरज माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.

भगव्या दहशतवादाचे भय वाढले

धर्माच्या नावाखाली लोकांच्या मनात इतर धर्मांविरोधात द्वेष निर्माण करणारी यंत्रणा गतिमान झाली आहे. यातूनच टोकाचा आणि हिंसक विरोध वाढला आहे. अनेक कारवायांमध्ये हिंदुत्ववादी अतिरेकी सापडले आहेत. विघातक कारवायांच्या मुळाशी अशाच संस्था असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे हा भगवा दहशतवाद नव्याने वाढण्याचे भय निर्माण झाले आहे असाही दावा बी. जी. कोळसे-पाटील आणि शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरचा मुक्काम होता कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याने हत्येपूर्वी कोल्हापुरातील साधकांच्या घरी मुक्काम केला होता हे पोलिसांच्या चौकशीत पुढे येत आहे. त्यामुळे समीर कोणत्या साधकाच्या घरी उतरला होता, याचा पोलिस गुप्तरीत्या तपास करत आहेत.

समीरला अटक केल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात २३ मोबाइल संच, ५० सीमकार्ड, लॅपटॉप व सनानत संस्थेच्या संबंधित कागदपत्रे मिळाली. कागदपत्रांत समीरच्या मिळालेल्या डायरीत सनातच्या साधकांची माहिती मिळाली आहे. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, मिरज, कराडसह कर्नाटकातील सनातनच्या साधकांची माहिती मिळाली आहे. पानसरे हत्येची आखणी समीरने केली असल्याने त्याने स्वतः व मैत्रिणीसमवेत कोल्हापूर व इचलकरंजीला भेट दिली असल्याची माहिती स्पष्ट झाली आहे.

समीरने कोल्हापूर शहरात काही वेळा भेटी दिल्या आहेत. सनातनच्या नियमानुसार त्यांचे साधक लॉज, हॉटेलमध्ये राहत नाहीत. तसेच हॉटेलमध्येही जेवायला जात नाहीत. ज्या शहरात सनातनचे प्रमुख साधक असतात, त्यांच्या घरी ते मुक्काम करतात. तसेच नाश्ता व भोजनही ते साधकाच्या घरी करतात. हे साधक सनातनच्या वरच्या फळीत काम करत असल्याने तेही अतिशय खबरदारी बाळगतात. समीर ज्या वेळी कोल्हापुरात आला होता, त्यावेळी कोल्हापूरच्या साधकाच्या घरी मुक्काम केला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर ज्या साधकाच्या घरी उतरला होता, त्या साधकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. समीरबरोबर आलेले सहकारीही कोणत्या साधकांच्या घरी उतरले होते त्याची माहिती पोलिस गुप्तपणे घेत आहेत. समीरने कोणत्या साधकाशी मोबाइलवरून संपर्क साधला होता व संभाषण केले होते याचीही माहिती घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्नाटकमुळेच उलगडा

$
0
0

Satish.Ghatage@timesgroup.com

कोल्हापूर पोलिसांनी ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात सनातन संस्थेचा सक्रिय कार्यकर्ता समीर गायकवाडला युद्धपातळीवर ताब्यात घेतले. तथापि, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात समीर गायकवाड व रूद्र पाटील यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी आधीच लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच कोल्हापूर पोलिसांना पानसरे हत्येच्या तपासासाठी तातडीने पावले उचलावी लागली, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना उजव्या विचारांच्या संघटनांवर लक्ष केंद्रित केले होते. पण राज्य सरकारकडून त्यांना प्रतिसाद मिळत, नव्हता अशी चर्चा आहे. विरोधी पक्ष व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते टीका करत होते. समीर गायकवाडला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी पावले उचलल्यानंतर तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांची बदली करण्यात आल्याचा संशय डाव्या चळवळतील कार्यकर्त्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. तसेच तत्कालीन तपास अधिकारी अंकित गोयल यांना बढती देऊन वर्धा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

पानसरे हत्येचा तपास करताना रितेशकुमार यांनी कोल्हापूरच्या सीमेवरील महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील ११ पोलिस अधीक्षकांची संयुक्त बैठक नियमित घेण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर आठवडाभरात त्यांची अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर तडकाफडकी बदली करण्यात आली. एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याशिवाय बदली करता येत नसतानाही गृहखात्याने रितेशकुमार यांची बदली केली. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांत सनातन व काही उजव्या संघटनांचे नेटवर्क मोठे आहे. रितेशकुमार यांनी यापूर्वी सांगली पोलिस अधीक्षक म्हणून काम केले असल्याने सांगली जिल्ह्यातील सनातनच्या नेटवर्कची त्यांना चांगली माहिती होती. रितेशकुमार यांची बदली झाल्यानंतर तीन राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेण्याचे नियोजन बंद झाले.

दाभोलकर हत्येचा तपास करतानाही पोलिसांनी सनातनवर लक्ष केंद्रित केले होते. पानसरे हत्येनंतर सनातनवरील संशय बळावला होता, पण कलबुर्गी हत्येनंतर सनातनचे कनेक्शन उघड करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावरून भारतात परतल्यावर त्यांना घटनेचे गांभीर्य सांगण्यात आल्यानंतर त्यांनी हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनीही रूद्र पाटील व समीर गायकवाडला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कर्नाटक पोलिसांच्या अगोदर कोल्हा पूर पोलिस प्रथम पोहोचल्याने त्यांच्या ताब्यात समीर आला आणि कर्नाटकची वेळ चुकली. कोल्हापूर पोलिसांच्या तपासानंतर समीरला कर्नाटक पोलिसांना ताब्यात घ्यावे लागणार आहे. तोपर्यंत दोन्ही राज्याची पथकांना रूद्र पाटीलच्या मागावर राहावे लागणार आहे.

हत्येतील साम्याचा आधार

कलबुर्गी हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांची दोन पथके हुबळीला रवाना झाली होती, पण त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी हत्येत साम्य असल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. कलबुर्गी हत्येचे कनेक्शन महाराष्ट्रात आहे का, याचा तपास कर्नाटक पोलिसांनी सुरू केल्यावर पानसरे हत्येचा तपास करणारे विशेष पथक सजग झाले. कोल्हापूर, सांगली परिसरात कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेची तडजोड

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

कोल्हापूरः महापालिकेत सत्ता स्थापन करताना गरज भासली तर शिवसेनेची मदत घेण्यासाठी​ भाजप ताराराणी आघाडीने नवी व्यूहरचना आखली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेला टीकेचे लक्ष्य न करण्याचा रणनीती आखली आहे. राज्यातील सत्तासहभागाच्या नीतीबरोबच कोल्हापूर महापालिकेतही हीच नीती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ​आता शिवसेनेला वगळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्याचा भाजपचा डाव आहे.

काही नेत्यांनी भाषणबाजीतून प्रचारात उडी घेतली आहे. शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांनी त्याची झलक दाखवली. पालकमंत्री पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात आता खडाखडी होणार असल्याचे दिसत आहे. आमदार महाडिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातही कलगीतुरा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप विरूध्द राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरूध्द काँग्रेस अशी स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपचे नेते दोन्ही काँग्रेसवर टीका करत असले तरी काही दिवसापासून त्यांनी सेनेवर वार करण्यात टाळाटाळ सुरू केली आहे.

सध्या ज्या पध्दतीने वातावरण निर्माण झाले आहे त्यावरून थेट कोणत्याच एका पक्षाच्या हातात सत्ता जाईल, असे चित्र दिसत नाही. ताराराणी व भाजप आघाडीने 'मिशन ४१' हे सूत्र ठेवून प्रचारात उडी मारली आहे. याउलट शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांनी आमचे टार्गेट २५ पर्यंत आहे, असा दावा केला आहे. म्हणजे वेळ आली तर पुन्हा दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली होण्याची शक्यता आहे. अशावेळी गरज भासल्यास कुणाचीतरी मदत घेता यावी यासाठी भाजपने शिवसेनेला सॉफ्ट कॉर्नर द्यायचे ठरवले आहे. शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणार नाही याची त्यांनाही खात्री आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त जागा आणून सत्तेत सहभागी होण्याचा खेळ सेनाही खेळू शकते. काँग्रेस अथवा राष्ट्रवादीपेक्षा भा​जपलाच ‌शिवसेना जवळ करू शकते.

या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपने एकमेकांवर फारशी टीका न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांना काही ठिकाणी मदत करण्याची भूमिका अंतिम टप्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुद्र पाटील प्रमुख संशयित

$
0
0

वृत्तसंस्था, कोल्हापूर, नवी दिल्ली

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे आणखी दोघे संशयित तपास यंत्रणांच्या रडारवर असून त्यांच्यापैकी रुद्र पाटील हा प्रमुख संशयीत असल्याचे विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी स्पष्ट केले आहे. २००९ च्या गोव्यामध्ये झालेल्या मडगाव बॉम्बस्फोटात रुद्र पाटील आणि सारंग अकोलकर उर्फ कुलकर्णी हो दोघे प्रमुख आरोपी होते. त्यानंतर ते दोघेही फरार आहे.

एसआयटीने रुद्र पाटीलच्या शोधासाठी जोरदार तपास सुरू केला असून केंद्र सरकारनेही पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, शिवसेनेने पानसरे हत्याप्रकरणात सनातन संस्थेचे नाव या प्रकरणात गोवणे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने हिंदुत्ववादी संस्थांना बदनाम करण्याचा प्रकार सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

मडगाव स्फोटात ठार झालेल्या गोंडा पाटील याचा रुद्र पाटील हा चुलतभाऊ असून रुद्र हा सनातन संस्थेचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याची पत्नी प्रीती पाटील ही वकील असून तिने समीर गायकवाडचा खटला कोर्टात चालवण्याची तयारी दर्शवली होती.

हत्येचा कट शिजला संकेश्वरात

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकातील संकेश्वर (जि. बेळगाव) येथील सनातन संस्थेच्या गुप्त ठिकाणी ठरला होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. कटाच्यावेळी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेला संशयित समीर गायकवाड, रुद्र पाटील, सारंग अकोलकर उर्फ कुलकर्णी, यांच्यासह दोन महिलाही उपस्थित होत्या. समीरचे संकेश्वर कनेक्शन लक्षात घेऊन डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्येत 'सनातन'चा सहभाग होता का? याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने सोमवारी कोल्हापूर पोलिसांकडून माहिती घेतली. पानसरे हत्येचा तपास करताना विशेष पथकाने पानसरे यांच्या विचारांना विरोध करणाऱ्या संस्थांवर लक्ष केंद्रित केले होते. टेक्निकल सर्व्हेलन्सव्दारे विशिष्ट व्यक्तींवर मोबाइलवर लक्ष केंद्रित केले असताना पोलिसांना पानसरे हत्येसंबंधी माहिती मिळू लागली. सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडच्या संभाषणात पोलिसांना पानसरे हत्येसंबंधीची संभाषण मिळाल्याने पोलिसांनी सनातन संस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे.



'कलबुर्गी' तपासाने जाग

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासात समीर गायकवाड व रूद्र पाटील यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी आधीच लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच कोल्हापूर पोलिसांना पानसरे हत्येच्या तपासासाठी तातडीने पावले उचलावी लागली, अशी चर्चा सुरू झाली आहे. पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना उजव्या विचारांच्या संघटनांवर लक्ष केंद्रित केले होते. पण राज्य सरकारकडून त्यांना प्रतिसाद मिळत, नव्हता. त्यातच तपासाशी संबंधित मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाल्याने शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विष्णुपुरी धरणाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणामध्ये हायसिंथ नावाची वनस्पती वाहून आली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची स्थिती बघण्यासाठी स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे पाटील यांनी केली.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. या पाण्याबरोबर हायसिंथ वनस्पतीदेखील वाहून आली. अद्यापही ती वाहून येत आहे. धरणाच्या पाण्यात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात जमा झाली. त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे पाटील, माजी प्रभाग समिती सभापती साबेर चाउस, माजी नगरसेवक अमित तेहरा यांनी धरणावर जाऊन पाहणी केली. याबाबतीत जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सभापती गिरडे यांनी चर्चा केली.

हायसिंथ वनस्पती पाण्यातील ऑक्सिजन ओढून घेते. त्यामुळे मासे आणि पाण्यातील अन्य जीवांना अपाय होण्याची शक्यता वर्तवली जाते. मानवी आरोग्यावर याचा काही परिणाम होतो किंवा नाही याबाबतीत अभ्यासकांचा सल्ला घेतला जाणार आहे. ही वनस्पती काढण्यासंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सभापती गिरडे यांनी सांगितले. या वनस्पतीमुळे नागरिकांना अपाय होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या; तसेच पाण्याची शुद्धता तपासून पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा आणि आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापांचे खेळ दाखवणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल

$
0
0

कराड : कराड परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सापांचे खेळ दाखविणाऱ्या सहा जणांवर वनविभागाने कारवाई केली आहे. सहा जणांवर गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली .

उत्सवात सापांचे खेळ दाखवल्याची छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीकरण केंद्र सरकारच्या वन विभागांतर्गत असलेल्या नवी दिल्लीतील वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागास मिळाले. त्यांनी याची गंभीर दखल घेत वन विभागाच्या कराड येथील कार्यालयाला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वन विभागाने मलकापूर येथील सर्पमित्र संजय देसाई याच्या घरावर छापा टाकून विविध जातींचे जीवंत दहा साप व माकडाचे पिल्लू ताब्यात घेतले. मात्र, माकडाचे पिल्लू घाबरल्याने आणि देसाई याच्या घरात रुळले असल्याने त्यास काही दिवस सांभाळण्याच्या अटीवर तेथेच ठेवण्यात आले. दरम्यान, साप बाळगून त्यांचे प्रदर्शन केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संजय देसाईसह सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील तिघांना वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यातील संजय देसाई यास मंगळवारी वन विभागाने अटक केले. मात्र, अन्य तिघे फरार असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यामध्ये सर्पमित्राला अटक झाल्याच्य कारवाईने खळबळ उडाली आहे.

येथील सर्पमित्र संजय देसाईसह पाच जणांनी तीन नाग, दोन घोणस आणि वेगवेगळ्या जातीचे पाच सर्प पकडले होते. गेल्या काही दिवसांपासून ते जवळच बाळगले होते. दरम्यान, या तीन नागांसह दहा सर्प एका सार्वजनिक मंडळात देखावा म्हणून कार्यक्रमासाठी आणले होते. याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कराड शहरासह शेजारील मलकापूर परिसरातील काही युवक विविध जातींच्या सापांचे खेळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये दाखवत होते. कराडचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. काळे, वनपाल डी. के. जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images