Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्मार्ट सिटी’च्या अामिषाला बळी पडू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्ता जवळ असली की सत्ताधीश वेगवेगळी अमिषे दाखवतात. कोल्हापूरला स्मार्ट सिटीचे अमिष दाखवून काही पक्ष मतांचा सट्टा लावू पाहात आहेत. नागरिकांनी अशा अमिषांना बळी पडू नये, असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी रविवारी नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष्य दानवेंवर निशाणा साधला. शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. तोरस्कर चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

राऊत म्हणाले, 'जनतेने वर्षभरापूर्वी परिवर्तनाच्या अपेक्षेने केंद्रात व राज्यामध्ये सत्ताबदल केला होता. मात्र, अद्यापही जनतेला अपेक्षित असलेले परिवर्तन घडू शकलेले नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. काँग्रेस व राष्ट्रवादीने पाडलेले चुकीचे पायंडेच सध्या सत्तेमध्ये असणारी मंडळी पुढे चालवत आहेत. पंचगंगा शुद्धिकरणासाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही. टोलमुक्तीचा प्रश्नही भीजत ठेवण्यात आला आहे. कोल्हापूरसारख्या शहराचे परिवर्तन करायचे असल्यास वीस कोटींचा निधी पुरेसा नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिवसेनेकडे एकहाती सत्ता येणे गरजेचे आहे.' या वेळी एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षामध्ये असल्याबद्दलही राऊत यांनी यावेळी टीका केली.

आमदार क्षीरसागर यांनी मागील पाच वर्षांत शहराच्या खुंटलेल्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना लक्ष्य केले. शिवसेना महानगरपालिकेत सत्तेवर आल्यास शहरातील रस्त्याबरोबरच शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न करू, तसेच शहरातील विमानसेवा व रेल्वेसेवा यामध्ये तातडीने सुधारणा करू, असे आश्वासन क्षीरसागर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालक्ष्मी तलाव गाठतोय तळ

$
0
0

प्रवीण कांबळे, हातकणंगले

पेठवडगांवला गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला महालक्ष्मी तलाव अपुऱ्या पावसाने आटत चालला आहे. पाण्याची पातळी घटत असली तरी वारणा नदीतून पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची गैरसोय होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे..

पेठवडगाव (ता. हातकणंगले) या शहरासाठी छत्रपती शाहू महाराजांनी ३०० एकर जागेत महालक्ष्मी तलाव बांधला. पूर्वी शाहू महाराज या परिसरात शिकारीसाठी येत होते. सादळे-मादळे डोंगरावरील पावसाचे पाणी व मौजे तासगाव डोंगरावरील पाणी हे वडगाव शहराबाहेरील सखल भागात साचत असल्याचे महाराजांच्या लक्षात आले. तसेच साचलेले पाणी पिण्यासाठी अनेक जनावरे येत असल्याने त्यांनी महालक्ष्मी तलाव बांधून पाणी वडगाव शहरासाठी देण्याची कल्पना त्याकाळी अंमलात आणली. या तलावातील पाणी शेतीला देण्यासाठी या तलावातील पाणी शेतीसाठी देण्यासाठी शाहू महाराजांनी ओढ्या-वगळीमध्ये दगडी पाट बांधून घेतले होते. व पिण्याच्या पाण्यासाठी अंतर्गत पाइपलाइन करून वडगाव शहराबाहेर फिल्टर हाऊस बांधून सायफन पद्धतीने सर्वत्र पाणी दिले.

महाराजांनी त्याकाळी दूरदृष्टी ठेऊन निर्मिती केलेल्या महालक्ष्मी तलाव अजून ही शहरासाठी वरदान आहे. हा तलाव १० डिसेंबर, १९७७ मध्ये वडगाव नगरपरिषदेकडे हस्तातंरित करण्यात आला. प्रत्येक वर्षी हा महालक्ष्मी तलाव पूर्ण क्षमतेने तुटूंब भरलेला असतो. यातील पाणी वडगावला पिण्यासाठी वापर केला जातो. या तलावातील पाणी दर महिन्याला तपासणी केली जाते.

सध्या पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तलावात केवळ १८ फुट पाणीसाठा आहे. हा पाणी साठा येत्या सहा महिने शहराला पुरेल इतका आहे. तसेच वारणा नदीवरून वडगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. त्यामुळे वडगाव शहराला येत्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही.

छत्रपती शाहू महाराजांनी दृरदृष्टीचे व अत्यंत कल्पकतेने महालक्ष्मी तलावाची निर्मिती केली असून या तलावामुळे वडगांव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही. तसेच वारणा नदीवरून पाणी घेतल्यामुळे दृष्काळ स्थितीतमध्ये पाण्याची समस्या होणार नाही.

- विद्याताई पोळ, नगराध्यक्ष

महालक्ष्मी तलावाच्या पाण्यामुळे शहरात पाण्याची टंचाई कधी निर्माण झाली नाही . येत्या काळात महालक्ष्मी तलावाच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न करणार आहे.

- नागेंद्र मुतगेकर, मुख्याधिकारी वडगांव नगरपरिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवेळी मोहोरतोय आंबा

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

पावसाने मारलेली दडी, रात्री थंडी तर दिवसा ऐन सप्टेबरमध्ये ऑक्टोबर हिटचे चटके. वातावरणातील या बदलामुळे यंदा शिरोळ तालुक्यात दीड महिना आधीच आंब्याला मोहोर येऊ लागला आहे.

पानगळ होऊन चैत्र प्रतिपदेला गुढी पाडव्यावेळी आंब्याला नवी पालवी फुटते. पावसाळ्यात ही प्रक्र‌िया सुरूच राहते. पाऊस थांबला की झाडाची पालवी पक्व होऊन मोहोर येण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो. आंब्याच्या फुटव्यात काडी तयार होऊन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अनेकदा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येतो. दरवर्षी कडाक्याच्या थंडीनंतर आंबा झाडांना मोहोर येतो.

अनेकदा सप्टेबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस असल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रीया रखडते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिना संपला तरी आंब्याला मोहोर नव्हता. पावसामुळे तसेच थंडी उशिरा पडल्याने मोहोर येण्याची प्रक्र‌िया लांबली होती. परिणामी बाजारात फळांच्या राजाचे आगमनही उशिरा झाले होते. तसेच हवामानाचा फटका बसल्याने आंब्याचे उत्पादनही घटले होते.

यंदा ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा वाढला आहे. रात्री थंडी तर दिवसा उन्हाचा तडाखा जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे शिरोळ तालुक्यात दीड महिना आधीच आंब्याला मोहोर येत आहे. हा मोहोर टिकून राहणार का? हा प्रश्न आहे. मोहोर अवेळी आला की कोवळ्या फुटीमधील मोहोर व लहान फळे गळून पडतात. फळधारणेवर त्याचा अनिष्ठ परिणाम होतो. किडीचाही प्रादुर्भाव होतो.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याच्या झाडाची पालवी पक्व होऊन मोहोर येण्यास सुरूवात होते. यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे सप्टेबरमध्येच मोहोर येत आहे.

- अजित भारव्दाज, कृषी अधिकारी

गेल्यावर्षी आंब्याला मोहोर येण्याची प्रक्र‌िया लांबली होती. यंदा मात्र झाडांना लवकर मोहोर आला आहे. शेतकऱ्यांना नेहमीच हवामानाचा फटका बसतो. आता आलेला मोहोर टिकून राहाण्याची गरज आहे.

- आक्काताई शिंदे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटण, मासे खरेदीसाठी गर्दी

$
0
0

श्रावण समाप्तीनंतर खवय्यांनी मारला येथेच्छ ताव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्रावणातील सण-समारंभ आणि व्रतवैकल्यांमुळे सक्तीच्या शाकाहारानंतर अमावास्या संपल्यानंतर खवय्यांनी मटण, मासे, चिकन खरेदीसाठी मटण मार्केटसमोर प्रचंड गर्दी केली होती. गुरुवारी गणरायाचे आगमन आणि बुधवारी हरितालिका उपवास असल्याने खवय्यांना केवळ रविवार व मंगळवारीच मांसाहाराची संधी मिळणार असल्याने मटण खरेदी करण्यासाठी मटण मार्केट येथे चांगलीच गर्दी झाली होती. कुटुंबासोबतच युवावर्गाने सुटीची पर्वणी साधन निसर्गाच्या सान्निध्यात पार्टीचे बेत रचले होते. यामुळे अनेक फार्म हाउसवर आलिशान कार पार्किंग केल्याचा दिसत होत्या. मास व अंडी विक्रीतून जवळपास लाखो रुपयांची उलाढाल झाली. महिन्याच्या सक्तीमुळे रविवारी दुपारी अमावास्या संपताच मटण खरेदीसाठी गर्दी केली.

यामुळे शहरातील मटण

मार्केटमध्ये एकच गर्दी झाली होती. शहरासह मुडशिंगी, उचगाव, कांडगाव, बालिंगे, कोगे, आंबेवाडी, गोकुळ शिरगाव येथे चांगले व दहा-वीस रुपये कमी दरात मटण मिळत असल्याने अनेकांनी शहराबाहेर मटण खरेदी केले. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यापासून मटण विक्री कमी होत होती. मात्र आज अमावस्या संपल्यानंतर नागरिकांनी मटण खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अच्छे दिन नव्हे फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अच्छे दिना'च्या नावाखाली सरकार देशवासियांची फसवणूक करत आहे. नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भाजपने सत्ता मिळवली. पण लोकांची अपेक्षा पूर्ती काही झाली नाही. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी या साऱ्या घटकांवर सरकार अन्याय करत आहे,' अशी टीका किसान संदेश रॅलीच्या माध्यमातून प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आ​णि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर केली.

युवक काँग्रेसच्यावतीने किसान संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. किसान संदेश रॅलीचे रविवारी कोल्हापुरात आगमन झाले. काँग्रेसजे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या हस्ते आ​णि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस हिम्मतसिंग, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजीत कदम, माजी मंत्री सतेज पाटील, महापौर वैशाली डकरे, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. सुरेश कुराडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर चौक येथून रॅलीला सुरूवात झाली.

दसरा चौक येथे बोलताना विश्वजीत कदम यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले, 'राज्यातील निम्माहून अधिक भाग दुष्काळांनी होरपळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौरे करत आहेत. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनक्षम नाही. सरकारचा कारभार हा हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे.' यावेळी एस. के. माळी, शंभूराजे देसाई, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राहुल देसाई उपस्थित होते.

इच्छुकांची गर्दी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी रॅलीला गर्दी केली होती. विद्यमान नगरसेवक, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार जातीनिशी रॅलीत सहभागी झाले होते. महिला उमेदवारांनी रॅलीत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीपर्यंत कारवाई टळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरातील फेरीवाले झोनची अंमलबजावणी करताना फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या जातील. तसेच गणेशोत्सव आ​णि दसरा-दिवाळीच्या कालावधीत फेरीवाल्यांवर हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची कारवाई करू नये,' असे स्पष्ट आदेश महापालिकेला दिले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरातील विविध भागांत फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्रांची घोषणा केली आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसर, भवानी मंडप परिसर, शिवाजी चौक,शिवाजी रोड, महाद्वार रोड, बिंदू चौक परिसर, ताराबाई रोड, जोतिबा रोड अशी गर्दीची ठिकाणी नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केली आहेत. गर्दीची ठिकाणी नो हॉकर्स झोन म्हणून घो​षित केल्याने फेरीवाल्यांचा पुनर्वसनाचा व व्यवसायाचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रशासनाने मनमानी पद्धतीने झोन निश्चित केले आहेत असा आक्षेप घेत फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींनी याप्रश्नी न्याय मिळावा याकरिता पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. फुल विक्रेते, हार विक्रेतेपासून लहान सहान फेरीवाल्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले.

फेरीवाल्यांना अच्छे दिन कधी येणार?

माजी महापौर आर. के.पोवार, नंदकुमार वळंजू, कॉम्रेड दिलीप पोवार, रघुनाथ कांबळे, अशोक भंडारे, प्र. द. गणपुले, महमंद शरीफ शेख, सुरेश जरग यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांची भेट घेतली. माजी महापौर पोवार म्हणाले, 'महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनमुळे फेरीवाल्यांच्या व्यवसायाचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रशासनाने फेरीवाला संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी फेरीवाले झोन निश्चित केले आहेत. यामुळे पुनवर्ससनाऐवजी फेरीवाले रस्ते येणार आहेत.' माजी महापौर वळंजू म्हणाले, 'झोनच्या नावाखाली फेरीवाल्यांचा व्यवसायावर गंडातर येण्याची भिती आहे. फेरीवाले वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. त्यांच्या जीवनात अच्छे दिन कधी येणार ? अशी विचारणा केली. यावेळी पालकमंत्र्यानी फेरीवाले संघटनेचे प्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. तत्पूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींनी झोन निश्चिती, पुनर्वसनबाबत जे योग्य आहे त्या संदर्भात भूमिका मांडावी. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून याप्रश्नी योग्य तो मार्ग काढला जाईल.' शिष्टमंडळात रमाकांत उरसाल,नितीन पाटील, राजेंद्र महाडिक, समीर नदाफ, किरण गवळी, आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजना गरिबांची, फायदा पुढाऱ्यांचा

$
0
0

ठराविक गटांनाच मिळाला लाभ; खराखुरा लाभार्थी वंचितच असल्याच्या तक्रारी

म. टा. विशेष प्रतिनीधी, कोल्हापूर

राज्यातील निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक आणि मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती तसेच निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार, आर्थिक दुर्बलांसाठीची अनुदान योजना १९८० सालापासून राबवण्यात येत होती. परंतु अलिकडील काळात योजनेच्या निकषात पूर्णपणे बदल करुन देवदासी, परितक्त्या, तृतीयपंथीयांचा समावेश करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि काही व्यक्तींनी केली. त्याचाच फायदा घेवून गरीबांच्या योजनांचा वापर करुन स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राजकारण्यांनी जनतेच्या कराच्या पैशांची अक्षरश: उधळपट्टी केली आहे. ठराविक यंत्रणा आणि गटालाच लाभ मिळाल्याने विरोधी गटांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सध्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजना आहे. तर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, अपंग आणि विधवा निवृत्तीवेतन योजना आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती, ८० टक्क्याहून जास्त अपंग, २१ हजाराच्या आतील उत्पन्न आणि मुलांचे वय २५ वर्षाच्या आतील असल्यास यातील काही योजनासांठी लाभार्थी पात्र होतो. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तलाठ्यापासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना, शिवाय क्षेत्रीय मर्यादा न ठेवता प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळेच राजकीय दबाव अथवा अन्य कारणांनी विशिष्ठ यंत्रणेने कागदपत्रांची पूर्तता करुन अनेक लाभार्थी बनवले आहेत.

या योजनेवर राज्यातील सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यात तालुकावार आठ सदस्यांची समिती गठीत करतात. त्यामुळे साहजिकच आपल्या गटाच्या व्यक्तीचे काम करण्याच्या नादात ठराविक व्यक्तींचे अर्ज छाननीतून बाद करुन खऱ्या लाभार्थ्यांनाही वगळल्याच्या तक्रारी जिल्ह्याच्या महसूल विभागाकडे दाखल झाल्या आहेत. याशिवाय पात्र यादी जिल्हाधिकाऱ्यांनी वेबसाईटवर टाकून ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांनी त्या सूचना फलकावर प्रसिध्द कराव्यात या न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

छाननी नाहीच

योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचा अर्ज आला की, तलाठी, ग्रामसेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दाखल्याची शहानिशा करण्याचा प्रकारच या सर्व प्रक्रियेत नाही. दाखले पहायचे आणि मंजुरी द्यायची. कुणी चौकशी लावलीच तर जो बोगस दाखला देईल त्याच्यावर कारवाई होईल, असे या साखळीतील जबाबदार अधिकारी सांगतात.परंतु आतापर्यंत बोगस दाखला दिल्यावरुन कारवाई झाल्याचे जिल्ह्यात एकही उदाहरण नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोजिमाशि’त गोंधळ

$
0
0

प्राथमिक शिक्षकांवरील कारवाईचा सरांनी घेतला धसका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भागभांडवल, अहवालावरील छायाचित्र आणि ताळेबंदाच्या विषयावरून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची (कोजिमाशि) ४५ वी सर्वसाधारणसभा गोंधळामुळे गाजली. पोलिस बंदोबस्त, प्रत्येक सभासदाचे होणारे व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत झालेल्या गुरुजींच्या चौकशीचा धसका यामुळे गोंधळाचे प्रमाण बरेच कमी होते. पण काही मुद्यांवर विरोधक आणि सत्ताधा‍ऱ्यांमध्ये सातत्याने जोरदार शाब्दिक चकमकी झडत होत्या. तसेच यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागत होते.

मार्केट यार्डातील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात रविवारी पोलिस बंदोबस्तात आणि सभापती लक्ष्मण डेळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवालवाचन केले. धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची, हवेत कागद भिरकावणे, जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की, समांतर सभा या साऱ्याला आज सरांनी फाटा देत सभा पार पडली.

सभेच्या प्रारंभी सभासद दीपक पाटील यांनी तीन वर्षे झाले तरी अद्याप ओळखपत्र मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला, यावर दादा लाड यांनी सर्व सभासदांना सहा महिन्यांत ओळखपत्र मिळेल अशी हमी दिली. सध्या भागभांडवल २० हजारांपर्यंत घेतले जाते ते ३० ते ५० हजारांपर्यंत वा‌ढविण्याची मागणी विरोधक संजय पाटील आणि राजेंद्र रानमाळे यांनी केली. यावर लाड यांनी महाराष्ट्र अधिनियम सांगत वीस हजारांहून अधिक भागभांडवल ठेवता येत नसल्याचे सांगितले. सभासदांचा विचार करूनच भागभांडवल वीस हजार ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याला विरोध करत महावीर चौगुले यांनी भागभांडवल वाढविता येत नसेल तर चिरंतर ठेव परत करण्याची मागणी केली. यानंतर जालिंदर गुरव यांनी माईकवर बोलण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी त्यांना पोलिसांनी अटकाव घातला. विरोधकांनी लाडऐवजी डेळेकर यांनी बोलावे, अशी मागणी केली.

अशा मुद्यांवर दोन तास सतत काही ना काही वाद वा गोंधळ होत राहिला. माजी संचालक सिकंदर जमाल यांनी राधानगरीत शाखा सुरू करण्याची मागणी केली. डेळेकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप पाटील यांनी आभार मानले.

ध्वनिक्षेपकामुळे गोंधळ टळला

दरवर्षी सरांचा ध्वनिक्षेपक हिसकावून घेण्यासाठी गोंधळ होत असे, तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जाणे किंवा धक्काबुक्कीचा प्रकार घडत असल्यामुळे यंदा सभापती लक्ष्मण डेळेकर आणि तज्ज्ञ संचालक दादा लाड यांनी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था स्टेजवर केल्यामुळे गोंधळ टाळता आला.

रानमाळे तिसऱ्या रांगेत

सभेच्या सुरुवातीला विरोधी संचालक राजेंद्र रानमाळे यांची खुर्ची व्यासपीठावरील तिसऱ्या रांगेत ठेवली होती. त्यांनी त्याला विरोध केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना नमते घेत त्यांची खुर्ची पहिल्या रांगेत लावण्यात आली.

सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापू नका

सभासद एकनाथ पाटील यांनी भागभांडवल वाढविणे, कर्जाचा दर कमी करणे या साऱ्या विषयावर घाईगडबडीने निर्णय घेत संस्था डबघाईला आणू नका, असे सांगत कोजिमाशि ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून तिला कापू नका, असा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेलमुळे हजारो मिळकती बाधित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारागृहांच्या भिंतीपासून ५०० मीटर अंतरापर्यंत खासगी बांधकामांना मनाई करण्याच्या निर्णयाचा शहरातील हजारो मिळकतधारकांना फटका बसणार आहे.

कारागृह परिसरातील १५० ते ५०० मीटर अंतरापर्यंत केवळ २१ फुटापर्यंतच बांधकाम करता येणार आहे. शून्य ते १५० मीटर अंतरात एक मजलीच बांधकाम होणार असल्याने शहराच्या मध्यवस्तीतील लोकांसाठी हा नियम गैरसोयीचा ठरणार आहे. बिंदू चौक सबजेल परिसरातील सुमारे १५०० मिळकती तर कळंबा कारागृह परिसरातील ५०० हून अधिक मिळकतधारक बाधित होणार आहेत.

कळंबा मध्यवर्ती कारागृह परिसरात लोकवस्ती आहे. हजारो लोक २५-३० वर्षापासून वास्तव्यास आहेत. आयटीआय परिसर, एलआयसी कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, जगतापनगर, सरनाईकनगर, साळोखेनगर परिसरातील मिळकतींचा समावेश होतो. कुटुंबातील लोकसंख्या वाढत असल्याने वाढीव बांधकाम करण्यावाचून अनेकांना गत्यंतर नाही. यामुळे या नियमांचा फटका या कुटुंबीयांना बसू शकतो. या नियमावलींची आकारणी करताना सामान्य लोकांना सवलत मिळावी. मोठे गृहप्रकल्प, उंच इमारतीसाठीचा नियम कुटुंबीयांना लावू नये अशी या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

बिंदू चौक परिसरातील सब जेल परिसरातील नागरिकांनाही नवी नियमावली गैरसोयीची ठरणार आहे. ​सबजेलच्या ५०० मीटर अंतर परिसरात बाराईमाम तालीम परिसर, बालगोपाल तालीम परिसर, भवानी मंडप परिसर, करवीर नगर वाचन मंदिर, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, जैन गल्ली परिसरातील मिळकतींचा समावेश होतो. या भागात मुळात दाटीवाटीची लोकवस्ती आहे. नव्याने बांधकाम करण्यास मान्यता मिळण्यात अडचणी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकील आक्रमकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या २८ वर्षांपासून खंडपीठाची मागणी असूनही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वकील संघटनांनी मुख्य न्यायमूर्ती आणि पुण्यात खंडपीठाची मागणी करून कोल्हापूरला खोडा घालणाऱ्या वकिलांचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी मोहित शहा यांच्याकडून फसवणूक झाल्याचे सांगत ज्यांनी फसवले त्यांना कायद्यानेच जाब विचारू, असे सांगितले. पुण्यातील वकील संघटना आणि मुंबईतील काही अल्पसंतुष्ठांनीच कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयात खोडा घातल्याचा आरोप श्रीकांत जाधव यांनी केला, पण याविरोधातील आंदोलन करताना संयम बाळगण्याचीही गरज जाधव यांनी व्यक्त केली. बुद्धिवाद्यांचे आंदोलन बौद्धिकतेनेच लढले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बार कौन्सिल इंडियाचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सरकारमध्ये साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त करीत, सरकारचा रोष पत्करायला नको यासाठीच निर्णय प्रलंबित ठेवल्याची शंका व्यक्त केली, त्याचबरोबर मोहित शहा यांना राज्यकर्त्यांनी काही आमिष दाखवले आहे की काय, अशीही शंका उपस्थित केली. मुंबई उच्च न्यायालयात सध्या पूर्णवेळ मुख्य न्यायमूर्ती नाहीत, त्यामुळे आंदोलन केले तरीही निर्णय होण्याची शक्यता कमीच असल्याने काही काळ थांबून पुन्हा आंदोलन करण्याचे पाटील यांनी सूचवले.

बेमुदत कामबंदचा निर्धार

बैठकीत अनेक वकिलांनी तातडीने बेमुदत आंदोलनाचा आग्रह धरला होता. तापलेल्या वातावरणात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहिले, तर २८ वर्षांच्या लढ्याला यश येईल. या टप्प्यावर आंदोलन शिथिल झाले, तर पुन्हा हा मुद्दा रेंगाळेल अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. मात्र, तांत्रिकदृष्या आंदोलनाचा फायदा होणार नसल्याने अखेर काही काळ थांबण्यावर एकमत झाले. गणेशोत्सवानंतर पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन करूच, असा निर्धार वकिलांनी व्यक्त केला आहे.

मोहित शहा यांनी आठ तारखेला घेतलेल्या निर्णयाची लेखी प्रत खंडपीठ कृती समितीला मिळालेली नाही. माहितीच्या अधिकारात निर्णयाची प्रत घ्यावी लागणार आहे, त्यामुळे निर्णयातील तपशील पाहूनच आंदोलनाची दिशा ठरवणे योग्य ठरणार आहे.

- राजेंद्र चव्हाण, निमंत्रक, खंडपीठ कृती समिती

दोनच न्यायाधीश कोल्हापूर खंडपीठासाठी सकारात्मक आहेत. इतर ७० न्यायाधीशांचे मनपरिवर्त करणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील खंडपीठाची गरज त्यांना पटवून द्यायला हवी. कदाचित मुंबई उच्च न्यायालयातील गर्दी कमी होईल अशी भीती त्यांना वाटत असावी.

- धैर्यशील पाटील, माजी अध्यक्ष, बार कौन्सिल इंडिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलचा निर्णय हिवाळी अधिवेशनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासंदर्भात सरकारची भू​मिका स्पष्ट आहे. अहवालानुसार येत्या तीन महिन्यात प्रकल्पाची किंमती किती आ​​णि खर्च कसा भागवायचा हे ठरविले जाईल. डिसेंबर महिन्यात होणार हिवाळी अधिवेशनात प्रकल्पासाठी द्यावयाच्या रक्कमेच्या तरतुदीची घोषणा केली जाईल. कोल्हापूर टोलमुक्त होणार हे निश्चित आहे,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप सेनेचे सरकार सत्तेवर येऊन दहा महिने होत आले, पण महापालिका निवडणुकीपूर्वी टोलमुक्तीची केवळ घोषणा करण्याचा खेळ सरकार करत असल्याची टीका केली होती. त्यावर पालकमंत्री म्हणाले,' सध्या प्रकल्पाची किंमत निश्चित करायचे काम सुरू आहे. प्रकल्पाची किंमतच निश्चित केली नाही, मग आर्थिक तरतूद कशी करणार ? जयंत पाटील यांनी अनेक वर्षे राज्याचे अर्थमंत्रीपद भूषविले आहे. अर्थमंत्रीपद भूषविलेल्या माणसांना कायदा कसा कळत नाही ? त्यांची टीका मला हास्यास्पद वाटते. कोल्हापूरच्या टोलप्रश्नी सरकार कृतीशील पावले टाकत आहे. कोल्हापूरला टोलमुक्त करणार अशी भूमिका यापूर्वीच स्पष्ट करण्यात आली आहे.'

आयआरबी कंपनीने कोल्हापुरात तयार केलेल्या रस्ते विकास प्रकल्पासंदर्भात फेर मूल्याकंनाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे. २२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यासाठी तामसेकर समिती नेमण्यात आली आहे. प्रकल्पाच्या किंमत, एकूण झालेली कामे, निकृष्ट दर्जाची कामे या संदर्भात मूल्यांकन समितीने अहवाल सादर केला आहे. या संदर्भाने बोलताना पालकमंत्री पाटील यांनी 'दोन्ही अहवालांचा अभ्यास करून प्रकल्पाची नेमकी किंमत आणि खर्च कसा द्यायचा हे येत्या तीन महिन्यात ठरणार आहे. हिवाळी अधिवेशनात प्रकल्पासाठी द्यावयाच्या रक्कमेची तरतूद केली जाईल.

फेरीवाल्यांवर कारवाई नको

दरम्यान, 'शहरातील फेरीवाले झोनची अंमलबजावणी करताना फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या जातील. तसेच गणेशोत्सव आ​णि दसरा-दिवाळीच्या कालावधीत फेरीवाल्यांवर हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची कारवाई करू नये,' असे स्पष्ट आदेश महापालिकेला दिले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीचे दोघे समुद्रात बुडाले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गणेशगुळे (ता. रत्नागिरी) येथे समुद्रस्नासाठी गेलेल्या इचलकरंजीतील दोघांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी समुद्राला आहोटी असल्याने या दोघांना जलसमाधी मिळाली, तर तिसऱ्या व्यक्तीला वाचविण्यात सुदैवाने यश आले. नरसिंह सावता शेडशाळे (वय ४५ रा. बंगला रोड) व ब्रिजकिशोर सोनी (३० रा. बिग बझारजवळ, मूळ रा. मध्यप्रदेश) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

शेडशाळे हे आयडिया कंपनीचे वितरक तर सोनी हे एरिया सेल्स मॅनेजर होते. त्यांच्यासोबत सुनील बटवारा आणि वासिफ मुल्ला हे सहकारीही कोकण भागात कंपनीच्या कामासाठी गेले होते. रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्र किनाऱ्यावर रविवारी दुपारी पोहचले असता ते समुद्रस्नान करण्यासाठी उतरले. यावेळी शेडशाळे व सोनी हे दोघे बुडाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर बचावपथकाला शेडशाळे व सोनी यांचे मृतदेह हाती लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंचचा लढा गणेशोत्सवानंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर खंडपीठाबाबत अपेक्षित निर्णय न दिल्याने संतप्त झालेल्या खंडपीठ कृती समितीने गणेशोत्सवानंतर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात झालेल्या सहा जिल्ह्यातील वकील संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बेमुदत कामबंद आंदोलन करण्यावर वकील संघटना आक्रमक आहेत.

निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी आठ सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर खंडपीठाबाबत निर्णय देऊ असे आश्वासन खंडपीठ कृती समितीला दिले होते, परंतु याबाबत शहा यांनी अपेक्षित निर्णय दिला नसल्याने यावर संतप्त झालेल्या वकील संघटनांनी मोहित शहा यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आणि तीन दिवस कामबंद आंदोलन करून नाराजी व्यक्त केली होती. सहा जिल्ह्यातील हे आंदोलन असेच पुढे सुरु ठेवण्याबाबत काही वकील संघटना आक्रमक होत्या, त्यामुळे आंदोलनाबाबत निर्णय घेण्यासाठी खंडपीठ कृती समितीने सहा जिल्ह्यातील वकील संघटनांची बैठक आयोजित केली होती.

कोल्हापूर बार असोसिएशनच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसह पुण्यात खंडपीठाची मागणी करणाऱ्या वकील संघटनांबाबतही प्रचंड नाराजी व्यक्त केली. काही वकिलांनी तर बेमुदत कामबंद आंदोलनासह जेलभरो, रास्तारोको अशी उग्र आंदोलने सुरुच ठेवण्याचा आग्रह बैठकीत धरला.

खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी माजी मुख्य न्यायाधीश मोहीत शहा यांच्या लेखी निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, सहाही जिल्ह्यातील वकिलांची एकजूट वाढवण्यासाठी आणि आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी वेळेची गरज असल्याचे सांगत सर्वांशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेऊ असे जाहीर केले. नव्याने आंदोलन सुरू करताना सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून अंतिम निर्णय होईपर्यंत लढण्याचा निर्धार वकिलांनी व्यक्त केला. कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पुण्यातून होणाऱ्या विरोधामागील राजकारण मोडून काढण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. वकिलांच्या आंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

यावेळी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक वकील उपस्थित होते. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी तातडीने आंदोलन करण्यातील अडचणी स्पष्ट केल्यानंतर गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यातील वकील प्रतिनिधींची बैठक घेऊन बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्याचे ठरले.

कोर्टाचे कामकाज आजपासून सुरू

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकिलांनी तीन दिवस कामबंद आंदोलन केले होते. खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत गणेशोत्सवानंतर नव्याने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोमवार (ता.१४)पासून सहा जिल्ह्यातील वकिलांचे कामकाज पूर्ववत सुरू राहणार आहे. तीन दिवस झालेल्या वकिलांच्या कामबंद आंदोलनामुळे हजारो खटले प्रलंबित राहिले आहेत. सोमवारपासून कामकाज पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तदानानंतर सांडले रक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

उदगावनजीक रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील तिघे आणि नांद्रे येथील एकाचा बळी घेतल्याने सोमवारी दिवसभर दोन्ही गावे सुन्न झाली. नांद्रे येथे रक्तदान शिबिर राबविल्यानंतर हे सर्व जण राष्ट्रवादीचे दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना मुंबईच्या बसमध्ये बसविण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. तेथून परतताना त्यांच्या झायलो गाडीचा टायर फुटून चार तरुणांचा बळी गेला.

प्रदीप पाटील यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील राजापूर-बोरगाव आहे. कर्नाळ ही त्यांची सासुरवाडी. त्यांचे मेहुणे कपिल पाटील आणि कर्नाळनजीक साई सरगम हॉटेल चालविणारे अनंतकुमार उर्फ नानू खोत (नांद्रे) यांनी प्रदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी नांद्रे येथे रक्तदान शिबिर भरविले होते. त्यासाठी प्रदीप पाटील मुंबईहून आपली झायलो गाडी आणि दोन कार्यकर्त्यांसह नांद्रे येथे आले होते. शिबिर संपल्यानंतर ते मुंबईला जाऊन दोन दिवसांनी गणेशोत्सवासाठी कर्नाळला पुन्हा येणार होते. त्यामुळे त्यांनी गाडी आणि बरोबर आणलेल्या दोन्ही कार्यकर्त्यांना कर्नाळलाच ठेवले. जेवणानंतर इचलकरंजीतील नातेवाईकांना भेटून कोल्हापूरातुन खासगी बस पकडायची असे ठरले. प्रदीप यांना सोडण्यासाठी कपिल पाटील, शिवराज पाटील, प्रवीण मोहिते (कर्नाळ), अनंतकुमार खोत (नांद्रे) आणि भिवंडीचे संतोष गणू वैद्य, सचिन जमखंडीकर आदी झायलोमधून कोल्हापूरला गेले.

प्रदीप यांना बसमध्ये बसविल्यानंतर ते सर्व जण सांगलीकडे निघाले. उदगावनजीक मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. घरच्या कर्तेपणाची जबाबदारी पार पाडणारा प्रवीण मोहिते (वय ३५) हा पेट्रोल पंपावर काम करून संसारगाडा ओढत होता. कपिल पाटील (वय २८) हा चौगुले शोरूममध्ये नोकरी करत होता. शिवराज पाटील (वय ३०) हा खासगी नोकरीत होता. याही तिघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लेकीपाठोपाठ वडिलांवर घाला

या अपघातात ठार झालेले अनंतकुमार खोत यांच्या सात वर्षांच्या मुलीचा वर्षभरापूर्वी विचित्र अपघातात मृत्यू झाला होता. स्कूलबसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले असता बसला अगदी घासून गेलेल्या डंपरने त्या बालिकेचे डोके उडविले होते. त्या दुःखातून सावरण्यापूर्वीच अनंतकुमार यांच्यावर काळाने घाला घातल्याने नांद्रे गाव सोमवारी सुन्न झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कार अडकले फायलीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शाहू जयंती व शिक्षक दिनानिमित्त राजर्षी शाहू पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली जाते. गेल्या दोन वर्षापूर्वी या दोन्ही पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आली होती, मात्र पुरस्कार वितरणाला मान्यवर मिळत नसल्याने पुरस्कार वितरणाला मुहूर्तच मिळेना झाला आहे. यामुळे पुरस्कार विजेत्यांना आपला सन्मान कधी होणार याची प्रतीक्षा लागली आहे. पुरस्कार जाहीर करुन जर वेळेवर सन्मानपूर्वक देणार नसाल तर, पुरस्कार देताच कशाला असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेमार्फतत राजर्षी शाहू पुरस्कारांची घोषणा केली जाते. यामध्ये मतदारसंघात आदर्शवत विकासकामे करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाच सदस्यांचा समावेश होता. तर उत्कृष्ट काम केलेल्या पंधरा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना पुरस्कार घोषित केला जात होता. २०१३ पूर्वी शाहू जयंतीच्या दोन दिवस अगोदर पुरस्कार जाहीर करुन त्याचे वितरण त्वरीत केले जात होते. लोकराजा शाहूंच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराला एक वेगळेच महत्व असल्याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. अध्यक्ष, सीईओ व प्रत्येक विभाग प्रमुख यांच्या समितीने शिफारस केलेल्या सदस्य किंवा कर्मचाऱ्याला पुरस्कार दिला जातो.

२०१४ मध्ये जाहीर झालेले पुरस्कार किमान २०१५ च्या शाहू जयंतीला देणे अपेक्षित होते. मात्र संपूर्ण वर्षभर जिल्हा परिषदेला अपेक्षित मान्यवर पाहुणा मिळाला नसल्याने पुरस्कार वितरणच राहून गेले आहे. पुन्हा २०१५ चे पुरस्कार जाहीर झाल्याने दोन वर्षाच्या मिळून ४० पुरस्कारप्राप्त व्यक्ती सन्मानाच्या प्रतिक्षेत आहेत. अशीच स्थिती आदर्श शिक्षक पुरस्कारांची झाली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. हे पुरस्कारही गेल्या दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. हे पुरस्कारही केवळ मान्यवर पाहुण्यांअभावी रखडले आहेत.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची चालढकल

पुरस्कार कार्यक्रमाची वेळ व तारीख निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सीईओ अविनाश सुभेदार यांच्याकडे फाइल पाठवली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ही फाइल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र अध्यक्षांच्या चेंबरमधून यासंबंधीचा निर्णय होत नसल्याने हे पुरस्कार फाइलीत अडकून पडले आहेत.

अनेक पुरस्कार वादात

यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार वगळता जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे सर्व पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अनेकांचे कार्य आणि कर्तृत्व नसताना त्यांना पुरस्कार जाहीर केला जातो. पुरस्कारप्राप्त व्यक्तींवर चौहोबाजूनी टीकाही झाली आहे. मात्र अशा वादामुळे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान राहून गेल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकशीचा फेरा पुन्हा सुरू

$
0
0

अभियंता कुलकर्णींच्या चौकशीबाबत चालढकल

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हपूर : पदाचा गैरवापर करत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान आणि सरकारचा महसूल बुडवल्याप्रकरणी समितीचे अभियंता संजय बळवंत कुलकर्णी यांची चौकशी करण्यासाठी कागलच्या तत्कालीन सहायक निबंधक अरुणा पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, नियुक्तीनंतर कोणतीही चौकशी न केल्याने पणन संचालकांच्या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी सोमवारी पाटील यांना पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी करून अहवाल पंधरा दिवसांत सादर न केल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

समितीचे अभियंता कुलकर्णी यांनी बांधकाम विभागप्रमुख पदाचा गैरवापर करत पत्नीच्या नावे स्थापन असलेल्या सुशम एंटरप्रायजेसला बांधकामांची कामे दिली होती. यातून कोट्यवधीची मालमत्ता मिळवली असून, त्यांच्या गैरकारभारामुळे समितीच्या आवारात अतिक्रमण होऊन लाखो रुपयांच्या उत्पन्नाला कात्री लागली आहे. याविरोधात चोकाक येथील मानसिंह ढेरे यांनी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन प्रशासक आणि उपनिबंधक रंजन लाखे यांनी तब्बल दीड वर्षानंतर मार्च २०१५ मध्ये चौकशी अधिकारी म्हणून अरुणा पाटील यांची नियुक्ती केली होती. पाटील यांनी आदेश मिळाल्यानंतर कोणतीही चौकशी केली नाही. याबाबत ढेरे यांनी वारंवार पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, पाटील यांनी चौकशीस दिरंगाई लावत कुलकर्णी यांना अभय देण्याचा प्रयत्न केला. याविरोधात पणन संचालकांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे फेरआदेश काढण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक शिरापूरकर यांनी भुदरगड तालुक्याच्या सहाय्यक निबंधक अरुणा पाटील यांना कुलकर्णी यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सहायक निबंधक पाटील यांच्याकडे श्रीकृष्ण क्रेडिट सोसायटीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी दिली आहे. सोसायटीच्या संचालकांनी दहा हजारांचे कर्ज घेऊन ठेव ठेवून कर्ज बुडवले आहे. तसेच सोसायटीने जिल्हा बँकेत ठेव न ठेवता भुदरगड पतसंस्थेमध्ये ठेवले आहे. यामुळे सोसायटीचे नुकसान झाले असून या प्रकरणाची चौकशी पाटील यांच्याकडे दिली आहे. मात्र, याही सोसायटीची चौकशी त्यांनी अद्याप केलेली नाही.

चौकशी का नाही?

महिला दिनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चौकशी अधिकारी अरुणा पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी सहकार्य करत नसल्याचे सांगितले होते. याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी का केली जात नाही, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

'चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक होऊनही चौकशी होत नसल्याने पणन संचालकांमार्फत आदेश प्राप्त केले आहेत. नोटिसीमध्ये दिलेल्या सर्व मुद्द्यावर निष्पक्षपाती चौकशी होऊन समितीचे नुकसानभरपाई करून कायदेशीर कारवाई करावी.'

- मानसिंह ढेरे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन कुंडच प्रदूषणाच्या विळख्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊनही शिवाजी पेठेतील स्वातंत्र्यसैनिक दत्तोबा तांबट गणेश विसर्जन कुंडाची अवस्था डर्टी आहे. महापालिकेने रंकाळा तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी केलेले आवाहन धुडकावून लावत रंकाळा परिसरातील रहिवाशांनी नियमच धाब्यावर बसविले आहेत. विसर्जन कुंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे.

थेट रंकाळ्यात गणेशमूर्ती विसर्जित न करता दत्तोबा तांबट प्रवेशव्दाराजवळ महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड करण्यात आले. मात्र या कुंडाची दुरवस्था अद्यापही कायम आहे. या दुरवस्थेला महापालिका आणि परिसरातील नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. महापालिकेने या कुंड आणि तलाव परिसरात कचरा, वाहने, जनावरे, कपडे धुणे, आंघोळ करु नये, असे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाला धुडकावत लावत नागरिकांनी विसर्जन कुंडाच्या प्रदूषणाला हातभार लावला आहे. सध्या कुंडातील पाण्यावर जलपर्णी आहे. पाण्याचा रंगही हिरवा झाला आहे. कुंडाच्या काठावरच धुणी वाळत घातली आहेत. परिसरात नागरिकांच्याकडून अनेक बाटल्यांचा खच टाकला आहे. या कुंड परिसरात निर्माल्य कुंड आहे. मात्र यातील कचराही वेळेत उचलला जात नाही. त्यामुळे विसर्जन कुंडच प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.

घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. रंकाळा तलावात प्रदूषण टाळण्यासाठी अनेक भाविक या कुंडात विसर्जनासाठी पसंती देतात. मात्र शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना वाशी नाका परिसरातील अनेकजण जनावरे धुण्यासाठी येतात. परिसरातील रहिवाशी याच ठिकाणी धुणी धुतात. त्यामुळे प्रदूषणाचा टक्का अधिकच वाढत चालला आहे. दत्तोबा तांबट गणेश विसर्जन प्रवेशव्दाराकडे जाणारा रस्त्याचीही दुरवस्था आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आणि विसर्जनाच्या वेळी काही मंडळे आणि शिवाजी पेठेतील काही नेते, इच्छुक उमेदवार शुभेच्छा देण्यासाठी तांबट कमानीजवळ मंडप उभारतील. मात्र महापालिकेसह सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदुषणमुक्तीसाठी सवड नसल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्याचा भुर्दंड नागरिकांवर नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा विभागातील अफरातफरीस एचसीएल कंपनीही जबाबदार असून त्यावर कारवाई करावी यासाठी नगरसेवक आक्रमक झाले. वाढीव ​बिले, घरफाळा आकारणीतील विसंगती, समान बांधकामासाठी वेगवेगळी बिले यावरून संतप्त झालेल्या नगरसेवकांनी चूक कर्मचाऱ्यांची असताना, नागरिकांना भुर्दंड कशासाठी ? अशा शब्दांत प्रशासनावर हल्लाबोल केला. एचसीएल कंपनी व अधिकाऱ्यांमध्ये संगनमत आहे. वाढीव ​​बिलाची रक्कम नागरिकांच्या माथी मारली तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा दिला. नगरसेवकांनी महापौर व आयुक्तांच्या आसनासमोर धाव घेत वाढीव ​बिलाच्या पावत्या सादर करत चुकीच्या बिलप्रकरणी प्रशासनाला जाब विचारला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका मीना सुर्यवंशी होत्या.

थकीत घरफाळा वसुलीत दंड व व्याजात नियमबाह्यरित्या सवलत दिल्याप्रकरणी प्रशासनाने ६९ कर्मचारी व सात अधिकाऱ्यांच्यावर वेतनवाढीची कारवाई केली आहे. ही कारवाई जुजबी असून आयुक्तांनी वेगवेगळ्या स्तरावर चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी या सदस्य ठरावावरून घरफाळा विभागावरील चर्चेला सुरूवात झाली. नगरसेवक निशिकांत मेथे व प्रा. जयंत पाटील यांनी घरफाळा विभागातील या प्रकाराला एचसीएल कंपनी दोषी असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. एचसीएल कंपनीने सॉफ्टवेअर अपडेट केले नाही. त्यामुळे रक्कम भरल्यानंतर थकीत रक्कम यंत्रणेच्या माध्यमातून दर्शवित नसल्याचे सांगितले.

मंत्र्यांच्या आदेशाने नगरसेवकांची बदनामी

महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. वाढीव घरफाळा बिले, चुकीची बिले नागरिकांना माथी मारून सध्याच्या सभागृहाला व नगरसेवकांना बदनाम करण्याचा डाव एका मंत्र्यांच्या आदेशाने प्रशासन करत आहे. प्रशासनाची चूक असेल तर नागरिकांना फटका कशासाठी ? विनाकारण नागरिकांना त्रास देणार असाल तर बिले भरू नका असे आवाहन करू, असा इशारा नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणसे मरायची वाट पाहताय?

$
0
0

स्वाइन फ्लूप्रश्नी आरोग्य विभागाचा पंचनामा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षित जागा संपादन, राजेंद्रनगर येथील पाण्याचा प्रश्न, कपिलतीर्थ मार्केट अशा प्रश्नावरून प्रशासन आणि अ​धिकारी आमने-सामने ठाकले. मात्र, त्याचवेळी या प्रश्नावरून नगरसेवकांतही एकमत नसल्याचे सभागृहाने पाहिले. स्वाइन फ्लूवरून आरोग्य विभागाला लक्ष्य करताना माणसे मेल्यानंतर आरोग्य विभाग जागा होणार का? अशी विचारणा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. पर्चेस नोटीस आणि पाणीप्रश्नावरून सत्तारूढ आघाडीच्या नगरसेवकांतील मतभेदाचे दर्शन घडले.

आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी जुजबी माहिती देताच आदिल फरास संतप्त होऊन अजून किती माणसे मरायची वाट पाहताय? अशी विचारणा केली. डॉ. पाटील यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या जातील असे सांगितले. नगर रचना विभागाने वॉर्डातील बगीचासाठी आरक्षित जागा संपादन करण्याचा ठरावावर चर्चा न करता पुढील मिटिंगमध्ये हा विषय घेऊ असे गटनेते राजू लाटकर यांनी सांगताच प्रा. जयंत पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला. प्रत्येक वेळी पुढील मिटिंगला विषय ढकलणे योग्य नाही. तसेच आरक्षण उठवणे हा सभागृहाचा विषय नसल्याचे सांगताच लाटकर यांनी त्याला आक्षेप घेतला. सहायक संचालक धनंजय खोत यांचा या प्रस्तावासाठी इतका अट्टहास का ? तुम्हाला यामध्ये पैसे मिळणार आहेत अशी थेट विचारणा नगरसेवक शारंगधर देशमुख, भूपाल शेटे यांनी केली. काँग्रेसअंतर्गत वैशाली डकरे, मीना सूर्यवंशी, दीपाली ढोणुक्षे या महापौरपदाच्या शर्यतीत होत्या. डकरे यांना महापौरपद केल्याने सूर्यवंशी नाराज झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचा भाग म्हणून सभाध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेचे प्रदूषण वाढणार

$
0
0

Udaysing.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : शहर, गावांमधून, विविध औद्योगिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यापासून पंचगंगा नदीची स्वच्छता करण्यासाठी धरणातील पाणी सोडण्याची चैन यंदा करता येणार नाही. त्यामुळे यंदा दुष्काळाबरोबर पंचगंगा नदीकाठावरील कोल्हापूरपासूनच्या पुढील ३९ गावांना प्रदूषित पाण्याचे विष पचवावे लागणार आहे. भविष्यातील या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाच्यावतीने प्रदूषण करणाऱ्या घटकांना यंदा धरणातील पाणी नदी धुवून काढण्यासाठी नसेल याचा इशारा आत्ताच दिला जाणार आहे.

धरणांपासून राजापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी प्रवाहित करण्यासाठी जवळपास दीड टीएमसी पाणी सोडण्याची आवश्यकता असते. यंदा हे पाणी सोडायचे बंद झाल्यास जवळपास पंधरा टीएमसी पाण्याचा अपव्यय थांबवता येणे शक्य आहे.

राधानगरी धरण भरल्याचे चित्र असले तरी पश्चिम महाराष्ट्रातही धरणांच्या पाणीसाठ्याची परिस्थिती कोल्हापुरात जेमतेम आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून पाणीसाठ्यावर लक्ष ठेवले जात असून काटेकोर नियोजनाची तयारी चालवली आहे. सध्या प​रतीच्या मान्सूनचा पाऊस पडल्यास ठिक आहे. तो न झाल्यास या पाणीसाठ्यावर जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी काढावा लागणार आहे. तशात राज्य सरकारकडून काही धोरण निश्चित झाल्यास त्याचाही दबाव येथील व्यवस्थेवर राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत धरणातून नियोजनाप्रमाणे पाणी सोडले जाणार आहे. पावसाळा संपल्यानंतर रब्बीच्या हंगामासाठी दर २१ दिवसांनी १५०० क्युसेक्सप्रमाणे पाणी सोडले जाईल. पंचगंगा नदीवरील १४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर ते अडवून शेतीसाठी व पिण्यासाठी उपसले जाते. हे पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्यावर स्थिर राहते. प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी ते वाहते रहावे यासाठी सातत्याने पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. पण यंदा दुष्काळी परिस्थितीने हे जादाचे पाणी सोडले जाणार नाही. त्याची सूचनाही दिली जाणार आहे.

नदी धुण्याची का आवश्यकता

महानगरपालिका शहरासाठी दररोज १२० एमएलडी पाण्याचा उपसा करते. त्यातून ९० एमएलडी सांडपाणी तयार होते. पंचगंगेच्या खोऱ्यात सर्वात जास्त सांडपाणी महापालिकाच तयार करते. त्यानंतर इचलकरंजी नगरपालिका, नदीकाठावरील १३९ गावे, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती यांच्यामधूनही सांडपाणी तयार होते. आतापर्यंत आंदोलन, न्यायालय यांच्या दबावानंतर महापालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. त्या ९० एमएलडी सांडपाण्यापैकी जयंती व दुधाळीतील जास्तीत जास्त ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. शहरातील उर्वरित दहा नाल्यांमधून सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळते. या सांडपाण्याने वाढणारी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी २०१२ पासून धरणांमधून पावसाळा संपल्यानंतर सातत्याने पाणी सोडले जात होते. यामुळे नदी प्रवाहीत होऊन प्रदूषण कमी होत आहे.

धरणातील पाणीसाठा जेमतेम आहे. त्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. अशा परिस्थितीत प्रदूषण कमी करण्यासाठी पाणी सोडले जाणे हे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित घटकांनी त्याबाबतची आतापासूनच दक्षता घ्यावी याची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे.

- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, जलसंपदा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images