Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सल्याच्या पत्नीला न्यायालयीन कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कुख्यात गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्या याच्या टोळीने घडवून आणलेल्या बबलू उर्फ उमेश माने याच्या खुनाच्या कटातील मुख्य सूत्रधाराचा येथील शहर पोलिसांकडून अद्यापही कसून शोध सुरूच आहे. बबलूचा 'गेम' झाल्यानंतर या खुनाच्या कटातील प्रमुख सूत्रधाराने शहरातून पोबारा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहेत. तसेच या मुख्यसुत्रधारासह या गुन्ह्यात नावे निष्पन्न झालेल्या अन्य संशयितांनीही शहरातून पोबारा केला आहे. पोलिस या सर्वांना पकडण्यासाठी विविधस्तरांवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, सल्याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या बेकायदा शस्त्रप्रकरणी अटक केलेल्या सल्याच्या पत्नीला येथील कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.

कुख्यात गुंड सल्या चेप्या उर्फ सलीम शेख याच्याशी संबंधित बाबर खान याने फिरोज मिस्त्रीच्या मदतीने बबलू उर्फ उमेश माने याचा भाजी मंडई परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. बबलूचा खून सल्या चेप्या टोळीच्या पूर्वनियोजित कटातून झाला होता. या खुनाच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून फिरोज मिस्त्रीसह, सल्याचा मेहुणा इब्राहिम सय्यद, सल्याच्या गाडीचा चालक जावेद शेख, सल्याचा साथीदार मोहसीन जमादार, इरफान इनामदार अशा बाबर खानच्या पाच साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या संशयितांकडे केलेल्या चौकशीतून कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संशयिताचे नाव निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्यासह कटात सहभागी असलेल्या आणखी काही जणांची नावेही पोलिसांना समजली आहेत. मात्र, त्यांनी येथून पोबार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दौलत’चा अखेर बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचवेळा निविदा मागवूनही प्रतिसाद न मिळालेल्या हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस बँकेचे संचालक व कारखान्याचे माजी चेअरमन नरसिंग गुरुनाथ पाटील अनुपस्थित होते. ते मुंबई येथून परत आल्यानंतर टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. टेंडर काढण्याचे अधिकार चेअरमन हसन मुश्रीफ यांना संचालक मंडळाने दिले आहेत. दौलत विक्रीचा निर्णय घेतल्याने बँकेची थकीत रक्कम वसूल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा बँकेचे दौलत कारखान्याकडे ६१ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. कारखान्याच्या थकबाकीमुळे बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे. बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेवून कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी पाचवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखाना व मुंबईच्या तासगांवकर शुगर्सने निविदा सादर केली होती. मात्र दोन्ही कंपनीने बयाणा रक्कम भरली नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. संचालक नरसिंगराव पाटील यांच्या मागणीनुसार भागभांडवल जमा करुन देण्याचे आश्वासन देत कारखाना विक्रीस काढू नये, अशी विनंती केली होती. मात्र आजच्या बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाहीत.

गळीत हंगाम तीन महिन्यावर येऊन ठेपल्याने कारखाना लवकर भाडेतत्वार गेला नसल्यास संबंधित कंपनीला दुरुस्तीसाठी वेळ मिळणार नाही. आणि बँकेचे थकीत रक्कमही मिळणार नाही. अशा दुहेरी अडचणीत सापडलेल्या बँकेने आज दौलत कारखान्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटील मुंबईला गेले असल्याने ते परत आल्यानंतर विक्रीच्या टेंडरबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

कोलदांड्याची भीती

कारखाना भाडेतत्वावर देण्यास सिटी पेपरने विरोध केला होता. यासाठी त्यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. सिक्युरिटीझेन कायद्यानुसार त्यांची याचिका फेटाळून बँकेच्या बाजूने निर्णय दिला होता. पुन्हा सिटी पेपरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात केस उभा राहण्यापूर्वीच दौलत विक्री करण्याच निर्णय घेतला असल्याने पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

चार वर्षे कारखाना बंद असल्याने मशिनरीला गंज चढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारखाना भाडेतत्वावर दिल्यास किमान दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीला अवधी लागेल. अपुरा कालावधीत हे शक्य नसल्याने कारखाना विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

-हसन मुश्रीफ, चेअरमन, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातत्त्व समिती घालणार अटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे तसेच मूर्तीवर विघातक परिणाम करणाऱ्या गोष्टी कशाप्रकारे टाळल्या पाहिजेत, याबाबत केंद्रीय पुरातत्त्व समितीच्यावतीने दहा अटी घालण्यात येणार आहेत. संवर्धनप्रक्रियेनंतर या दहा अटींचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याचा पाठपुरावादेखील समिती करणार असून याबाबतची सूचनायादी समितीने तयार केली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून मूर्ती संवर्धन प्रक्रिया अतिशय योग्यप्रकारे सुरू आहे. पहिल्या दोन दिवशी मूर्तीची स्वच्छता आणि डिझाइन करण्याचे काम झाले. तर त्यानंतरच्या दोन दिवसात मूर्तीवरील पूर्वीचा लेप काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शुक्रवारपासून बिब्बा तेल आणि बेहडा व दुर्वांच्या अर्कापासून बनवलेला सेंद्रिय द्रव मूर्तीमध्ये सोडण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या तीन दिवसात मूर्ती संवर्धनाच्या प्रक्रियेचे काम मार्गी लागणार आहे. मात्र संवर्धन प्रक्रियेनंतरही मूर्तीची काळजी घेण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासन, देवस्थान समिती आणि श्रीपूजक यांची आहे. त्यामुळे मूर्तीवर केलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल याबाबत तज्ज्ञ समितीने सूचनांची यादी तयार केली आहे. येत्या दोन दिवसात अधिकृतपणे ही यादी समितीतर्फे देवस्थानला देण्यात येणार आहे.

मूर्ती संवर्धनाची जबाबदारी आमची असली तरी त्यानंतर मूर्तीच्या टिकाऊपणावर परिणाम करणाऱ्या गोष्टींची काळजी देवस्थान व श्रीपूजक यांनाच घ्यायची आहे. त्यासाठी काही सूचनांची यादी तयार करण्यात आली आहे. या गोष्टी पाळल्या जात आहेत की नाही याबाबत केंद्रीय पुरातत्वविभागातर्फे सहा महिन्यांनी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

- डॉ. एम. आर. सिंग, अधिकारी, पुरातत्त्व विभाग





अशा आहेत अटी

अंबाबाईच्या गर्भकुडीतील आर्द्रता कमी करणे

यासाठी पाण्याचा साठा काढणे.

गाभारा आणि गर्भकुडी यांना जोडणारी लाकडी चौकट काढणे

गर्भकुडीत निर्माल्य व फुलांचा साठा ठेवू नये

गाभाऱ्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा साठा ठेवू नये

चांदीची प्रभावळ काढावी

शक्य असल्यास सोन्याचा मुलामा द्यावा

गाभाऱ्यातील चांदीच्या वस्तू, चौथरा, पायरी यावर सोन्याचे पाणी द्यावे

गर्भकुडीत अधिकाधिक पाच श्रीपूजकांनीच थांबावे

पूजेसाठी दुधाचा वापर करायचा झाल्यास गायीचे दूध वापरावे

दर्जेदार मधाचा वापर करावा

साडी व नित्यालंकाराचे वजन कमी करण्यासाठी दागिन्यांची संख्या कमी करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा ‘स्मार्ट सिटी’चा रस्ता बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भक्कम आर्थिक उत्पन्नाअभावी स्मार्ट सिटी योजनेत समावेशाचा रस्ता कोल्हापूरसाठी बंद झाला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या निकषांची पूर्तता करण्यात कोल्हापूर महापालिका कमी पडली. शहराची हद्दवाढ झाली नसल्याने लोकसंख्या-आकारमानाच्या दृष्टीने इतरांच्या तुलनेत कोल्हापूर छोटे ठरते. तसेच मोठ्या एमआयडीसींचा शहरात समावेश नसल्याने आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आहेत, ही कारणेही जबाबदार ठरल्याचे सां​गितले जात आहे.

केंद्र सरकारच्या ११ निकषांनुसार महापालिकेने योजनेसाठी अहवाल सादर केला होता. आयुक्त पी. शिवशंकर यांनी २८ जुलैला स्मार्ट सिटी संदर्भात सादरीकरण केले. यावेळी आयुक्तांनी इस्टेट विभाग व घरफाळा विभागाचे करवाढीचे प्रस्ताव असून त्या माध्यमातून उत्पन्न वाढ होईल, अशी बाजू मांडली होती. मात्र उत्पन्नवाढीसंदर्भात उपाययोजना स्मार्ट सिटीतील निकषासमोर कुचकामी ठरल्या. स्वच्छतेपासून ई गव्हर्नन्सपर्यंत अनेक पातळ्यांवर सुधारणा करण्याची गरज स्पष्ट झाली.

२०० कोटी उभारावे लागणार

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापुरात विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी महापालिकेला दहा टक्के स्वनिधी गुंतवावा लागत आहे. त्यानुसार थेट पाइपलाइन योजनेसाठी १०६ कोटी, रस्त्यासाठी ५४ कोटी आणि स्टॉर्म वॉटरसाठी ३७ कोटी मिळून २०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम लागणार आहे. ही रक्कम कर्जाऊ उभारावी लागणार आहे. महापालिकेने ही रक्कम उभी केल्यखेरीज संबंधित प्रकल्पांना पूर्ण रक्कम उपलब्ध होणार नाही.

महापालिकेला ८७.५ गुण मिळाले, पण दहा शहरांत समावेश झाला नाही. स्मार्ट सिटीत समावेशासाठी नव्या जोमाने प्रयत्न केला जाईल. कमतरतांचा अभ्यास करून पुढील वर्षी सहभाग नोंदवू.

- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅकमेल कराल तर याद राखा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

यंदाच्या एफआरपीसह पुढील वर्षाचीही वाढीव एफआरपी कारखानदारांच्या मानगुटीवर बसून वसूल करणार आहे. ऊस जादा आहे, साखरेला दर नाही, त्यामुळे साखर कारखाने बंद ठेवू, असे सांगून शेतकऱ्यांना ब्लॅकमेल कराल तर याद राखा, असा सज्जड इशारा देत आगामी हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. उदगांव (ता.शिरोळ) येथे शेतकरी मेळावा आणि नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फरीद नदाफ होते.

खासदार राजू शेट्टी म्हणाले की, कारखाने बंद ठेवणार असल्याची आवई साखर कारखानदार आतापासूनच उठवत आहे. साखर कारखाने त्यांच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. त्यांनी जर कारखाने चालू केले नाहीत, तर साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यास भाग पाडू. शेतकरीही ऊस घालवण्यास तयार आहे. सध्या साखरेचे दर बाजारात कोसळले आहेत. जवळपास एक कोटी ६० लाख टन साखर शिल्लक आहे. देशाची गरज २४० लाख टन आहे. तरीही येणाऱ्या हंगामात २६० लाख टन साखर उत्पाद‌ित होणार आहे. तरीही एक कोटी टन साखर शिल्लक राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने त्वरीत साखरेचा ६० लाख टनाचा बफर स्टॉक केल्यास व उर्वरित साखर निर्यात केल्यास शिल्लक साखरेचा प्रश्न मिटणार आहे. साखर कारखान्यांनी शिल्लक साखरेचा बागलबुवा करू नये. सन २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी एफआरपीमध्ये १०० रूपयाने वाढ झालेली आहे. त्यातच साखर कारखानदार साखरेच्या दराची भीती घालून एफआरपी बंद करा, अशी ओरड सुरू करत आहे. राज्य सरकारनेही तसे संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. एफआरपी बंद करणे हे राज्य सरकारच्या हातात नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे.

यावेळी स्वाभिमानी तसेच स्वाभिमानीने केलेल्या आघाडीमधून निवडून आलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, भगवान काटे, राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमागधारकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी : 'यंत्रमाग उद्योगासाठी वीजदर कमी करण्यासाठी वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली बैठक हा निव्वळ फार्स असून, प्रत्यक्षात सवलतीच्या दरासाठी सरकार अनुदान जाहीर करीत नाही, तोपर्यंत यंत्रमागधारकांचे आंदोलन सुरूच राहील,' असा इशारा माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी दिला. यंत्रमाग विजेच्या दरवाढीविरोधात शनिवारी इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोशिएशनच्यावतीने महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी वाढीव दरवीज बिलांची होळी करत सरकारच्या विरोधात जोरदार शंखध्वनी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामभाऊ थोरावडे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिक्षा व्यावसायिकांना संघटित करुन पहिली संघटना स्थापन केलेले, डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ भैरवनाथ थोरावडे (वय ८३) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने कष्टकरी रिक्षा व्यावसायिकांचा नेता हरपल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

गेल्या चार दिवसांपासून किडनीच्या आजारामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पापाची तिकटी येथील दत्त गल्लीतून रिक्षा तसेच अन्य वाहतूक व्यवसायांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत सुभाष शेटे, दिलीप पवार, मारुतराव कातवरे यांची भाषणे झाली. रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी रक्षाविसर्जन आहे.

कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मुशीत थोरावडे यांच्यातील कार्यकर्ता घडला होता. भाकपचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. १९७३ साली त्यांनी करवीर ऑटो रिक्षा युनियनची पहिली संघटना स्थापन केली. त्यानंतर ते ९३ सालापर्यंत संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली १९८० साली शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रिक्षा व्यावसायिकांनी महापालिकेला घातलेला घेराव राज्यभर गाजला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र लढण्यास सेना समर्थ

$
0
0

आमदार ​राजेश क्षीरसागर यांनी ठोकला शड्डू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापलिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेशी युती केली नाही हेच आमच्यासाठी फायद्याचे ठरणार असून शिवसेनेच्यावतीने रिंगणात उतरवले जाणारे ८१ उमेदवार हुकमीच असतील. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लढण्यास शिवसेना समर्थ आहे, असे सांगत आमदार राजेश क्षीरसागर यांनी शड्डू ठोकला.

पत्रकारांशी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, 'आगामी निवडणुकीसाठी झालेली प्रभाग रचना आणि आरक्षणाचा विचार करून कोणत्या प्रभागात इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार देता येईल यांची जुळणी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून उमेद​वारांचा तटस्थपणे अभ्यास सुरू होता, आता त्याला कृतीची जोड देण्यासाठी कंबर कसणार आहे. कोल्हापुरात सेनेची हुकमी मते आहेत. त्यामुळे भाजपच्या कुबड्यांशिवाय या निवडणुकीत सेनेला तिची ताकद दाखवण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी उमेदवारांना सर्वतोपरी सहकार्य करावे यासाठी येत्या दोन दिवसांत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.'

स्वतंत्रपणे लढण्याची ही निवडणूक पक्षासाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडलेल्या हुकमी उमेदवारांना सर्व सहकार्य करून निवडून आणण्यासाठी पक्ष पाठीशी असणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

१५ नगरसेवक संपर्कात

महापालिकेतील विद्यमान १५ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्कात आहेत, अशी माहितीही आमदार क्षीरसागर यांनी दिली. गेल्या पाच वर्षांत काही कारणाने नाराज झालेल्या, काम करूनही चांगल्या पदांचा लाभ न मिळालेल्या नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. लवकरच त्यांना शिवसेनेत समाविष्ट करून घेऊ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वच पक्षांसमोर आव्हान

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

महापालिका आरक्षणाची लॉटरी फुटायच्या आधीपासूनच शहरात निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. सर्वच प्रभागांची मोडतोड झाल्यामुळे इच्छुकांना घाम फुटला आहे. पाच वर्षे विशिष्ट मतदार डोळ्यासमोर ठेवून काहीजण तयारी करीत होते. मात्र ते मतदारच गायब झाल्याने नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. हे आव्हान पेलावेच लागणार असल्याने शुक्रवारपासूनच अनेकांनी पायाला भिंगरी बांधून धडपड सुरू केली आहे.

अपक्ष लढणाऱ्यांची संख्या जास्त होती. नेतेही निवडून येईल तो आमचा याच न्यायाने आघाडी करीत. गेल्या निवडणुकीत मात्र सर्वच पक्षांनी चिन्हावर निवडणूक लढविली. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. दोघांनीही हातात घालून पाच वर्षे सत्ता भोगली. पूर्वी जशी आघाडीची सत्ता होती. जे जे आघाडीच्या सत्तेत होत होते ते सारे पक्षाची सत्ता येऊनही घडले. फक्त पदाधिकारी निवडताना जो पैशाचा खेळ होत होता तो थांबला. शुक्रवारी आरक्षणाची लॉटरी फुटल्यानंतर सारेच पक्ष महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

काही आत काही बाहेर

यावेळी अनेक मान्यवरांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. कादंबरी कवाळे, कांचन कवाळे, महेश सावंत, मधुकर रामाणे, राजेश लाटकर, महेश जाधव, आर. डी. पाटील, रवीकिरण इंगवले, आदिल फरास, दिगंबर फराकटे, सर्जेराव पाटील, रमेश पोवार, प्रकाश कुंभार अशा अनेकांचा यात समावेश आहे. पण काही कारभारी आणि 'नावाजलेल्या' नगरसेवकांना पुन्हा महापालिकेत येण्याची संधी मिळवून दिली आहे.

सुनील कदम, सुनील मोदी, नंदकुमार वळंजू, हरिदास सोनवणे, प्रकाश मोहिते, विक्रम जरग, बाजीराव चव्हाण, सुजय पोतदार, उदय साळोखे, अजित राऊत अशा जुन्या नगरसेवकांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

सक्षम उमेदवाराचा शोध

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या निवडणुकीसाठी भाजप आणि ताराराणी आघाडीने एकत्र येऊन अनेकांना शह दिला आहे. भाजपची फारशी ताकद नसल्याने त्यांनी ताराराणी आघाडीला सोबत घेऊन उसनी का होईना ताकद मिळवली आहे. काँग्रेसमध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार महादेवराव महाडिक असे दोन गट आहेत. राष्ट्रवादी आणि जनसुराज्यमध्ये आघाडीची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक पक्षाला सक्षम उमेदवार हवा आहे. तो मिळण्याची शक्यता सर्वच प्रभागात नाही.

पक्षांतर्गत गटबाजी आणि शिळ्या कढीला ऊत

निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, शिवसेनेला अंतर्गत गटबाजीला प्रथम सामोरे जावे लागणार आहे. ताकद असूनही त्यांना गटबाजीमुळे फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. हीच अवस्था काँग्रेसचीही आहे. गटबाजीचा फटका लोकसभा, विधानसभा, बाजार समिती अशा अनेक ठिकाणी या पक्षाला बसला, तरीही नेत्यांचे डोळे उघडले नाहीत. हीच परंपरा महापालिका निवडणुकीतही सुरू राहणार याची झलक दिसत आहे. महाडिक-पाटील गटात वाढलेल्या संघर्षामुळे ते दोघे या निवडणुकीत एकत्र येतील अशी ​चिन्हे नाहीत.

भाजप यापूर्वी कमकुवत पक्ष होता. आता मात्र राज्यात सत्ता आणि सोबत ताराराणी आघाडीची कुमक यामुळे सध्या तरी उत्साहाचे वातावरण आहे. आर्थिक व्यवहारात सातत्याने कमी पडणाऱ्या भाजपने हात सैल सोडले आहेत. त्यांच्या तुलनेत हात सैल सोडण्यात इतर पक्षांना मर्यादा असतील. आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीची धुरा खासदार धनंजय महाडिक यांच्या खांद्यावर देण्याचे यापूर्वी जाहीर केले होते, पण नव्या घडामोडीत ते शक्य दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुश्रीफांनाच महापालिकेची सूत्रे हलवावी लागणार आहेत. आता राज्यात सत्ता नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे उमेदवारांसाठी हात सैल सोडणे शक्य नाही. अशावेळी सतेज पाटील आणि विनय कोरे यांची मदत घेत स्वतंत्र आघाडी स्थापण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला यश आले तर ही आघाडी भाजप आणि ताराराणीला आव्हान देऊ शकते. शहरात शिवसेनेला चांगले वातावरण आहे. गटबाजी संपली तर हा पक्षही ताकदीने निवडणुकीत उतरू शकतो. त्यामुळे सध्याच्या हालचालीनुसार तिरंगी लढत होण्याचीच दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्यास आंबेडकरी चळवळ हा कार्यक्रम उधळून लावेल, असा इशारा समता प्रबोधनीचे अध्यक्ष वसंतराव लिंगनूरकर यांनी पत्रकार बैठकीत दिला.

लिंगनूरकर म्हणाले, 'पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरास बहुजन चळवळीचा मोठा इतिहास असून कोल्हापुरातील आंबेडकरी जनता या षडयंत्राचा जाहीर निषेध करत आहे. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची व त्यांच्या वंशजांची कोणत्याही प्रकारे बदनामी झाल्यास कोल्हापुरातील आंबेडकरी जनता उग्र आंदोलन करेल. या कार्यक्रमात संघटनेचे स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आपल्या व्याख्यानात बदनामीकारक वक्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेस प्रशांत वाघमारे, दिंगबर सकट, संजय बुधले, वर्षा कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ ऑगस्टपर्यंत ‘अभय’ला मुदतवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्नास कोटींवर वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी सुरु राहण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून (१ ऑगस्ट) सुरु झाली. पण गेल्या चार वर्षांपासून एलबीटी भरलेला नाही, अशा व्यापाऱ्यांसाठी लागू केलेल्या अभय योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजनेप्रमाणेच महानगरपालिका थकबाकी वसूल करण्यासाठी व्हॅटकडे नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांची माहितीही घेत आहे.

अभय योजनेमध्ये २१४१ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती. आता योजनेला मुदतवाढ दिली आहे, तशीच ३१ जुलैपर्यंतची माहिती देण्यासही सांगितले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना परत एप्रिल ते जुलैपर्यंतच्या व्यापाराची माहिती सादर करावी लागणार आहे. एकीकडे अभय योजनेचे काम सुरु असताना व्यापारी सांगतात म्हणून ती थकबाकी निश्चित करण्यास महापालिका तयार नाही. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहे. व्यापाऱ्यांची कागदपत्रे व व्हॅटमधील उलाढालीची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानुसार जर एखाद्या व्यापाऱ्याची थकबाकी जास्त निघत असेल तर त्याच्याकडून ती वसूल करुन घेतली जाणार आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटीची नोंद केलेली नाही, अशा १५०० व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल पाहून एलबीटीची नोंदणी केली आहे. चार महिन्यात २६ कोटी एलबीटी जमा झाला आहे. नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून थकबाकीतून किमान २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे एलबीटीचे प्रमुख दिलीप कोळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योतिप्रिया सिंह यांची एक महिन्यात चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जालनाच्या पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांची एक महिन्याच्या आत चौकशी करून त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्योतिप्रिया सिंग यांच्या वादग्रस्त कारकीर्दीबाबत विधानसभा अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांनी ही ग्वाही दिल्याचेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'जालना येथे ६ जुलै रोजी एका तरूणीवर बलात्कार झाला. त्या घटनेचा तपास करताना सिंग यांनी संबंधित तरूणीचा वापर केला. अशाप्रकारे पिडित युवतीला तपासकामात वापरणे चुकीचे असल्याचे मत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही मांडले. तसेच सिंग यांची प्रशिक्षणार्थी काळातील वर्तणूकही आक्षेपार्ह होती. कोल्हापुरातही गणपती विसर्जन मिरवणूक काळात सूडबुद्धीने त्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले. सिंग यांच्या या वर्तणुकीमुळे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत आहे. ही बदनामी थांबवायची असेल तर ज्योतिप्रिया सिंग यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीला सर्वपक्षाच्या आमदारांनी दुजोरा दिला आहे.'

दरम्यान, जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या कामात अनियमितता व गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहितीही आमदार क्षीरसागर यांनी दिली. मनरेगाच्या कामात राज्यात गेल्या चार ते पाच वर्षात तब्बल १५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनरेगाच्या कामातही पाणी मुरत असल्याचा प्रश्न अधिवेशनात मांडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची चौघांना अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोरीचा गुन्हा कबूल करण्यासाठी अमानुष मारहाण करुन विजेचा शॉक देण्याची धमकी देण्याबरोबरच गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी 'थर्ड डिग्री'चा वापर केल्याची माहिती संशयित आरोपींनी उपचारादरम्यान पत्रकारांना दिली. मात्र पोलिसांच्या या मारहाणीबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

कणेरीवाडी येथील पेट्रोल पंपावर अनेक वाहनधारक रात्रीच्यावेळी विश्रांती घेतात. आठ जुलै रोजी एका ट्रकमधील वस्तू चोरीस गेल्या. याबाबतची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर पंपावरील कर्मचारी धनाजी शंकर पाटील (अदनाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव), योगेश मारुती कांबळे, भिकाजी हिंदूराव कांबळे, दिनकर दादू शिंदे (सर्व रा. किरवे, ता. गगनबावडा) यांना ताब्यात घेतले. सर्व संशयितांना एलसीबीच्या पालवे नावाच्या पोलिसाने एका रांगेत उभे करून सर्वांची ओळख परेड घेतली.

त्यानंतर प्रथम धनाजीला एका खोलीत घेऊन पट्ट्याने मारहाण केली. मारहाणीमुळे धनाजीने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनाच खोलीत घेवून पोलिसांनी उघडे करुन पट्ट्याचा बेदम चोप दिला. यातील दोघांना इंजेक्शन दिले. उघडे करुन केलेल्या मारहाणीमुळे व इंजेक्शनमुळे वेदना असह्य होत असल्याने सीपीआरमध्ये उपचारासाठी आलो असल्याचे दिनकर शिंदे यांनी सांगितले. घडल्या प्रकाराची माहिती पंप मालक सुरेश मोरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी चौघांनाही सोडवून नेले. चौकशीसाठी पाहिजे त्यावेळी कर्मचाऱ्यांना घेवून येण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुक्तता झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या या अमानुष मारहाणीचा सर्वत्र निषेध होत असून उपचारासाठी कर्मचाऱ्यांसमवेत अनेक किरवे ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र याबाबत जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोज शर्मा यांच्याशी संपर्क साधला असत त्यांनी या घटनेचा इन्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेत कोल्हापूरचे वजन कमीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या विकासासाठी मोठी सहाय्यभूत असणाऱ्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत कोल्हापूरचा समावेश नसल्याने विकासाची मोठी संधी गमावली आहे. यापाठीमागे आर्थिक उत्पन्नाला मर्यादा असल्याचे सांगण्यात येत असले तरी यापूर्वीही काही योजनांसाठी राजकीय ताकद कमी पडली होती. यावेळीही ती कमी पडल्याचे ​दिसून आले. त्यामुळे सत्ता बदलली तरी सत्तेत कोल्हापूरचे वजन कमीच असल्याचे, शहराकडे दुर्लक्ष झाल्याच्या तिखट भावना व्यक्त होत आहेत.

महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निकष पूर्ण करण्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती. निकष पूर्ण करण्यामध्ये महापालिका कमी पडली असेच या निर्णयावरुन स्पष्ट होत आहे. हद्दवाढ होत नाही, उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असलेला एलबीटीसारखा कर बंद केला आहे. अशावेळी विकासासाठी महानगरपालिकेचे अवलंबित्व वाढलेले असताना या योजनेत समावेश न झाल्याने शहर बकाल होण्याची जास्त भीती आहे. यामध्ये निकषांचा एक मुद्दा असला तरी राजकीय ताकद हाही महत्वाचा भाग होता. राज्यातून दहा शहरांची स्मार्ट सिटीमध्ये निवड होणार होती. राज्यात व केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आहे. अशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या राज्यापासून केंद्र सरकारपर्यंतच्या वजनामुळे शहराचा या योजनेत समावेश होईल, असा शहरवासियांचा विश्वास होता. पण कोल्हापूरला वगळून इतर शहरांचा​ विचार केला गेल्याने शहरवासियांच्या भावना तीव्र आहेत.

हद्दवाढ अजून झाली नसली तरी उपनगरांचा विकास करण्यासाठी विविध योजनांची आवश्यकता आहे. पाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, परिवहन योजना, आरोग्य सुविधा यांची गरज आहे. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पाहिला तर या योजना राज्य अथवा केंद्र सरकारच्या मदतीशिवाय पूर्ण होणारच नाहीत. स्मार्ट सिटी बनवण्यासाठी महापालिकेच्या वतीने तोकड्या निधीवर प्रयत्न सुरु आहेत. योजनेमध्ये समावेश झाला असता तर किमान या सुविधांमध्ये सुधारणा करता आली असती, त्यातून शहर स्मार्ट बनवण्याच्यादृष्टीने पाऊल पडले असते.

'एखाद्या योजनेमध्ये शहराचा समावेश करण्याचा विषय राजकीय पातळीवर जास्त असतो. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ताकद आहे. त्यांच्या पक्षाच्या पातळीवर ते काहीही करु शकत होते. पण त्यांनी यामध्ये वजन तर वापरलेच नाहीत, शिवाय दुर्लक्षच केले. त्यांचे कोल्हापूरपेक्षा पुण्यावरच जास्त लक्ष आहे. यातून शहराविषयी आत्मीयता नसल्याचे दिसून आले.

- शारंगधर देशमुख, गटनेता, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाराम महाराज जयंतीचा विसर

$
0
0

टिंबर मार्केट, केएसएविरोधात तीव्र प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श मानून शैक्षणिक, क्रीडा, संगीत, उद्योग क्षेत्रात धडाडीचे कार्य केलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती शुक्रवारी (ता.३१) ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक संस्थामध्ये शुक्रवारचा दिवस त्यांच्या आठवणींनी जागवण्यात आला. सर्वत्र असे भावनिक वातावरण असताना त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टिंबर मार्केट असोसिएशन व कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मात्र त्यांच्या प्रतिमेला पुष्पाहारही अर्पण करण्याचे भान न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विमान, व्यापारपेठ, स्त्री शिक्षणाला गती याचबरोबर शेती व्यावसायाच्या प्रगतीला छत्रपती राजाराम महाराज यांनी संस्थानकाळात चांगली चालना दिली. त्यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे यासाठी त्यांच्या नावाच्या अनेक संस्था शहरात आणि जिल्ह्यात कार्यरत आहेत. अशा अनेक संस्थांमध्ये शुक्रवारी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या कोल्हापूर जिल्हा टिंबर मार्केट असोसिएशनमध्ये त्यांची जयंतीनिमित्त कोणताच कार्यक्रम आयोजित केला नव्हता.

जून १९६७ मध्ये टिंबर मार्केटची स्थापना करण्यात आल्यानंतर त्याचे छत्रपती राजाराम महाराज टिंबर मार्केट असे नामकरण करण्यात आले. नगरपालिकेने येथील व्यापाऱ्यांना लिलाव पद्धतीने जागाही देण्यात आल्या. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार असोसिएशनला भवन बांधण्यासाठी जागाही दिली आहे. सुविधा देण्यासाठी नेहमी ओरड करणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र राजाराम महाराजांची जयंती साजरी करण्यास वेळ मिळू नये याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. टिंबर मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी रेसकोर्स व पाण्याचा खजिना येथे दोन प्रवेश कमानी उभारल्या. रेसकोर्स येथील कमान तर झाडाझुडपांनी वेढली आहे. जयंतीनिमित्त रंग देण्याचे सौजन्यही असोसिएशनने दाखवले नाही.

केएसएचेही दुर्लक्ष

छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापुरात फुटबॉलचा पाया घातला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे फुटबॉलचा विकास होत गेला आणि अनेक संघांची स्थापना झाली. शहरात अनेक ठिकाणी राजाराम महाराजांची जयंती साजरी केली जात असताना फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनमध्ये (केएसए) महाराजांची जयंती साजरी करण्यास वेळ मिळाला नसल्याचे चित्र आहे. केएसए अमृतमहोत्सव साजरा करत असताना ज्यांनी शहरात फुटबॉलचा पाया घतला, त्यांचाच केएसएला विसर पडल्याची चर्चा फुटबॉल शौकिनांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांद्याचा भाव वधारलेलाच

$
0
0

भाज्यांची आवक वाढली; पडवळ, घेवडा, वरणा, मुळ्याला मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्पादकांना वाजवी दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात मूल्य वाढवले असल्याने कांद्याच्या दरामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. प्रतिक्विंटलचा भाव ३५०० ते चार हजारपर्यंत पोहोचला असल्याने किरकोळ बाजारात हाच दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कांद्याच्या दरात सातत्याने दर वाढ होत असल्याने याचा फटका ग्राहकांना बसत असला, तरी फायदा मात्र शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. खरीप हंगामात पेरणी केलेल्या फळ व पालेभाज्यांची आवक वाढल्याने या दोन्ही भाज्यांचे दर मात्र पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत.

जुलैच्या अखेरीस कांद्याचे भाव गडगडल्याने कांद्याचे निर्यातमूल्य वाढवण्यात आले आहे. तसेच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील कांदा उत्पादक विभागात पेरण्या रखडल्या आहेत. सध्या उन्हाळी हंगामातील साठवणुकीचा कांदा बाजारात दाखल झाला असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन ते चार हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला असून सरासरी तीन हजार रुपये क्विंटल कांदा झाला आहे. यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा भाव चांगलाच वधारला आहे.

मिरची, टोमॅटो स्वस्त

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिरवी मिरचीचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मिरचीची आवक वाढल्याने दर हळूहळू कमी झाले होते. या आठवड्यात तर ४० रुपयांवरुन थेट २० रुपयांपर्यंत मिरचीची घसरण झाली आहे. टोमॅटोचे दरही पाच रुपयांनी कमी झाले आहेत. खरीप हंगामात बांधावर पेरणी केल्या जाणाऱ्या भाज्यांची आवक वाढल्यामुळे फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. पडवळ, वरणा, घेवडा भाज्यांची मोठी आवक झाली आहे. मेथी, शेपू, पोकळा व पालक भाज्यांचीही चांगली आवक झाली आहे.

सांगलीत बेदाणा आवकेत वाढ

कुपवाड : सणासुदीचे दिवस जवळ आल्याने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याची आवक वाढली असून शुक्रवारी एका दिवसात ४३५७२ बॉक्स बेदाणा आवक झाली. गेल्या आठवड्यात एकूण १६ लाख ३ हजार २६ बॉक्स बेदाण्याची आवक होऊन ​क्वंटलला दहा हजारापासून पंचवीस हजार शंभर रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दरम्यान, विष्णुआण्णा पाटील फळ मार्केटमध्ये शुक्रवारी नवीन सफरचंद आवक झाली. सांगली बाजार समितीचाच एक भाग असलेल्या फळ मार्केटमध्ये सोलन ( हिमाचल प्रदेश) या भागातील सिमल्याहून ७२५ बॉक्सची आवक झाली. या सफरचंदच्या बॉक्सला पंधराशे पासून दोन हजार पाचशे रुपयांपर्यंतचा दर मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय अर्काद्वारे पहिलेच संवर्धन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वनस्पतींच्या माध्यमातून सेंद्रिय अर्काचा वापर करून मूर्ती संवर्धन करण्याचा देशातील पहिला प्रयोग कोल्हापुरात श्री अंबाबाई मूर्तीवर यशस्वीपणे करण्यात आल्याचा दावा पुण्याच्या डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आणि पुरातत्त्व तज्ज्ञ प्रा. वसंत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाची ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून आज रविवारी (२ ऑगस्ट) या प्रक्रियेचा अखेरचा दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या सहा दिवसांपासून अंबाबाई मूर्तीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद शाखेतील तज्ज्ञ संवर्धनप्रक्रिया करत आहेत. या प्रक्रियेसाठी आवर्जून वनस्तपींचा अर्क व तेल यांचे शास्त्रशुद्ध मिश्रण वापरण्यात आले आहे. अंबाबाईची मूर्ती अकराव्या शतकातील असल्यामुळे तिची प्राचीनता जपण्यासाठी नैसर्गिक संवर्धन प्रक्रिया निश्चितच उपयुक्त असून अशा प्रकारे संवर्धन करण्यात आलेली ही देशातील पहिली मूर्ती ठरली आहे.

शिंदे म्हणाले, 'संवर्धन प्रक्रियेमध्ये अनेकदा पाश्चात्त्य पद्धतींचा वापर केला जातो. मात्र या पद्धतीमुळे मूर्ती संवर्धित राहण्याचा कालखंड कमी होतो. मूर्तिशास्त्रामध्ये संवर्धनासाठी वनस्पतींच्या अर्कांचा वापर करण्याबाबत उल्लेख आहे. रसायनशास्त्रज्ञ डॉ. एम. आर. सिंह यांनी मूर्तिशास्त्रात देण्यात आलेल्या दाखल्यांचा अभ्यास करून त्यासाठी आवश्यक असलेल्या अर्कांचा वापर केला आहे. यामध्ये गायीच्या तुपापासून बनवण्यात आलेले अंजन, चंदनाची भुकटी, बिब्ब्याचे तेल, बेहडा आणि दुर्वांचा रस याचे शास्त्रीय मिश्रण वापरले आहे.'

१९५५ साली केलेल्या वज्रलेपात दोष होता. त्यामुळे मूर्तीवर तीन ते चार​ किलो अतिरिक्त वजन आले होते, त्याचाही परिणाम मूर्तीची झीज होत झाला, असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, 'त्यानंतर मूर्तीवर एमसीलचा थर दिला होता, जो अतिशय धोकादायक आहे. हे मिश्रण मूर्तीवरील पाषाणाचा लेप घेऊन बाहेर पडत असल्यामुळे मूर्ती खराब झाली होती. नव्या संवर्धन प्रक्रियेत मूर्तीवरील हा अतिरिक्त लेप काढून टाकला आहे. या प्रक्रियेनंतर मूर्तीवरील दागिने, मुद्रा, अवयवांचे बारकावे ठसठशीत झाले आहेत. मूर्तीचे मूळ सौंदर्यही यामुळे खुले झाले आहे.'

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेसाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या वेळेत आणि योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्या. संवर्धनामुळे मूर्ती अधिक रेखीव झाली आहे.

- डॉ. एम. आर. सिंह, मूर्ती संवर्धक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा बूथ उद् ध्वस्त

$
0
0

तासगावात काठीधारी तरुणांकडून कृत्य

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्ह्यातील तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीवेळी काठ्याधारी तरुणांनी तीन तास घातलेल्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ उद्ध्वस्त करण्यात आला. एक मोटार फोडण्यात आली. हाणामारीत पोलिस उपअधीक्षकांसह तीन पोलिस आणि राष्ट्रवादीचे नऊ कार्यकर्ते जखमी झाले. खासदार संजय पाटील यांनी ही दंगल घडविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीच या गोंधळाला जबाबदार असल्याचे खासदार पाटील यांनी म्हटले आहे.

तासगावातील यशवंत हायस्कूलमधील केंद्रावर मतदान सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास काठ्याधारी तरुणांची टोळकी तेथे आली. हे तरुण बाहेरील असल्याचे लक्षात येताच पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तातडीने दंगलविरोधी पथक मागवले. एका मतदाराला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नातून दुपारी दोनच्या सुमारास या टोळक्याने दिनकर पाटील, निवास पाटील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेले पिंगळे यांच्यावर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्यात पिंगळेंसह तीन पोलिस जखमी झाले. टोळक्याने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी

यांच्या मोटारीचा चक्काचूर केला. या हल्ल्यात बी. डी. पाटील (येळावी), अमित पाटील (चिंचणी), संजय पाटील (तुरची) निवास पाटील (बोरगाव), दिनकर पाटील (मांजर्डे) हे जखमी झाले.

त्यानंतर हा जमाव आमदार सुमन पाटील, त्यांची कन्या स्मिता पाटील बसलेल्या ठिकाणी धावून गेला. तेथील दरवाज्यावर दगड घालण्यात आले. त्यानंतर तासगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत तांबोळी जादा कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचले. तीन तासांनंतर हा धुमाकूळ शांत झाला.

खासदारांनी परगावाहून आणलेल्या गुंडांकरवी दंगल घडविली. आमदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खासदार संजय पाटील आणि त्यांनी आणलेल्या गुंडावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी तासगाव बंद पाळण्यात येणार आहे.

- महादेव पाटील, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

या हाणामारीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे. वाळू माफियांनी आणि गावगुंडांनी पूर्वी आर. आर. पाटील यांच्याभोवती कोंडाळे केले होते. त्यात कोंडाळ्यातील गुंडांनी मतदानावेळी गोंधळ घातला. प्रसिद्धी आणि सहानुभूतीसाठी राष्ट्रवादीने केलेली ही स्टंटबाजी आहे.

- संजय पाटील, खासदार, सांगली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंपधारकांचा १० रोजी मास हॉलिडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येक पेट्रोल पंपधारकाची वार्षिक उलाढाल ५० कोटीच्या आत असल्याने बिलातून एलबीटी कापून घेऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनने १० ऑगस्ट रोजी मास हॉलिडे या नावाखाली एक दिवस पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंपधारकांकडून एलबीटी कापून घेतला नाही तर शहरात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार आहे.

सध्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आयबीपी या कंपन्यांचे २७ पंप शहरात आहेत. पेट्रोल व डिझेल पुरवठा केला जात असताना शहरासाठी येणाऱ्या इंधनावर एलबीटी आकारला जातो. याबाबत असोसिएशनचे सचिव किरण पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक पंपाचे वार्षिक उत्पन्न दहा कोटीवर जात नाही. त्यामुळे नव्या मर्यादेनुसार पंपधारकांकडून एलबीटी आकारणी व्हायला नको. यामुळे थेट वाहनधारकांना फायदा होणार असून इंधन स्वस्त होणार आहे. या मागणीसाठी असोसिएशनने १० ऑगस्टला मास हॉलिडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर ११ ऑगस्टपासून रोज सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत. याबाबत पेट्रोलियम कंपनी व सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.'

पेट्रोल व डिझेलवर चार टक्के एलबीटी आकारला जातो. त्यामुळे शहराबाहेर इंधन स्वस्त मिळत असल्याने वाहनधारक तिथे इंधन भरतात. त्यातून शहरातील पंपधारकांचा व्यवसाय कमी होतो. नव्या मर्यादेनुसार एलबीटी आकारला नाही तर शहरातही त्याच दराने इंधन मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांसाठी शोधमोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या निवडणुकीसाठी परिसराबरोबरच आरक्षणही निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्ष उमेदवारांसाठी सक्रिय झाले आहेत. सर्व पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात असल्याने तगडे उमेदवार मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यांच्यापर्यंत नेत्यांपासून कारभाऱ्यांनी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षांकडून ​बैठकांचेही आयोजन केले जात आहे.

भाजप-ताराराणी आघाडी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती या प्रमुख पक्षांमध्ये बहुतांश ठिकाणी लढत होण्याची चिन्हे आहेत. प्रत्येकाने स्वबळ आजमावून एकहाती सत्तेचे स्वप्न ठेवल्याने तगडे उमेदवार हेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक पक्षाने अशा उमेदवारांपर्यंत संपर्क चालवला आहे. काही पक्षांनी, आघाडीने काही उमेदवार निश्चित केले आहेत. त्यापेक्षा इतर ठिकाणच्या प्रभागांसाठी त्यांची चाचपणी सुरू आहे. सक्षम उमेदवार मिळावेत म्हणून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी रात्रीपासून संपर्क मोहीम सुरू केली आहे. काही दिवस कोल्हापुरातील राजकारणापासून अलिप्त असलेले माजी आमदार मालोजीराजे अचानक सक्रिय झाले आहेत. महापालिकेत आपलाही गट असावा यासाठी त्यांनी अनेकांशी संपर्क सुरू केला आहे. ताराराणी आघाडी व भाजपने आठ दिवसांत उमेदवार जाहीर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. ताराराणी आघाडी ५० तर भाजप ३१ जागा लढविण्याची शक्यता आहे. त्यांना तोडीस तोड म्हणून मुश्रीफ-कोरे-सतेज पाटील आघाडी झाल्यास शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

पक्षांनीही ​उमेदवार निवडीसाठी कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले आहे. शिवसेनेने तातडीने रविवारी (२ ऑगस्ट) संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचीही दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images