Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिला आघाडीवरही जोरदार मोर्चेबांधणी

$
0
0

महेश पाटील, कोल्हापूर

महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या धोरणामुळे नव्या सभागृहात तब्बल ४१ महिला नगरसेविका असतील. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कार्यरत असलेल्या महिला आघाड्या, आपल्या इच्छुक कार्यकर्त्यांच्या पत्नी, महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर भिस्त ठेवली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक प्रभागात तुल्यबळ उमेदवारांसाठी फिल्डिंग लावली असली तरी महिला उमेदवार शोधताना दमछाक सुरू आहे.

राज्य सरकारने सन २०११ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच होणारी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. पूर्वीच्या ३३ टक्के आरक्षणाच्या धोरणानुसार मावळत्या सभागृहात २८ नगरसेविका कार्यरत होत्या. नव्या सभागृहात तब्बल ४१ नगरसेविका तर ४० नगरसेवक दिसतील. सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांच्या विविध समित्यांच्या माध्यमातून महिला कार्यरत आहेत. मात्र निवडणुकीसाठी सक्षमतेने तयार महिला उमेदवारांची सर्वच ठिकाणी वानवा असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या पक्षांसमोर आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांच्या पत्नी यांना संधी देण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. ३१ जुलै पर्यंत आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षची धावाधाव सुरू आहे.

प्रभाग आरक्षण जाहीर झाले नसल्याने सर्वच ठिकाणी लक्ष केंद्रीत करणे अवघड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आर. के. पोवार यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सर्वच ४१ ठिकाणी सक्षम महिला उमेदवार मिळण्याची स्थिती नाही. मात्र, आतापासूनच चाचपणी करून निवडणुकीसाठी किमान ४५ महिला उमेदवार रिंगणात उतरतील असे नियोजन पक्षाने केले आहे.' आरक्षित जागा वगळता सर्वसाधारण जागांवरूनही सक्षम महिला उमेदवार निवडून येऊ शकतात असे पवार यांनी सांगितले.

भाजपने ताराराणी आघाडीशी युती केली असली तरी जागावाटप उशीरा होईल. त्यामुळे पक्षाने सर्वच प्रभागांची चाचपणी सभासद नोंदणीच्या दरम्यान केल्याचे पक्षाचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, 'इच्छुक कार्यकर्त्यांच्या पत्नी, महिला बचत गटातील सक्षम महिला, काही उद्योजक महिला पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आम्हाला महिला उमेदवार मिळण्यात फारशी अडचण वाटत नाही.'

शिवसेनेने गेल्यावेळच्या निवडणुकीत मित्रपक्षाला २५ जागा देऊन उर्वरीत ५२ जागा लढवल्या होत्या. त्यातही आम्ही महिला उमेदवारांना अधिक संधी दिली होती' असे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. ते म्हणाले, शिवसेनेची महिला आघाडी सक्षमपणे कार्यरत आहे. याशिवाय, विविध आंदोलने, प्रभागदौरे आदी माध्यमातून सक्षम महिला उमेदवारांच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आम्हालाही महिला उमेदवार न मिळण्याची अडचण वाटत नाही.'

वास्तव वेगळेच

राजकीय पक्षांकडून महिला उमेदवार मिळण्यात अडचण वाटत नसल्याचे सांगितले जात असले तरी वास्तव वेगळेच आहे. ४१ जागांवर उमेदवार आणायचे कोठुन ? हा प्रश्न पक्षांच्या केडरच्या बैठकांतही चर्चिला गेला आहे. प्रभागांचे आरक्षण निश्चित नसल्याने कोणता वॉर्ड महिला राखीव होणार हे निश्चित नाही. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतील अशा उमेदवारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेंगदाणा, शेंगतेलही आता महागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कांद्यापाठोपाठ आता शेंगतेलाच्या दरातही पंधरा दिवसांत किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे. सरकी आणि सनफ्लॉवर तेलाच्या दरात दोन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या दरातही आठ ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.

संपूर्ण देशात पावसाने हुलकावणी दिल्याने त्याचा परिणाम हळूहळू बाजारपेठेवरही दिसू लागले आहेत. फळभाजी व पालेभाज्याबरोबर शेंगतेल, शेंगदाणा व कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेंगतेलाचा दर शंभर रुपयांवरुन ११० रुपयांवर पोहोचला होता. महिनाअखेरीस हाच दर १२० रुपयांवर पोहोचला आहे. तर शेंगदाणा दरात पंधरा दिवसांत दहा रुपयांची वाढ झाली आहे. जुलैच्या सुरुवातीला ८५ रुपयांवर स्थिर असणारा शेंगदाणा जुलै अखेर ९० ते १०० रुपयांवर पोहोचला. स्वयंपाक घरातील प्रमुख वस्तूंच्या दरातच सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणींच्या बजेटवर चांगलाच परिणाम झाला आहे.

कांदा ३५ ते ४० वर

मे, जून महिन्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांद्याला वाजवी दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात मूल्य वाढवण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम कांदा बाजारपेठेत दिसू लागला असून कांद्याच्या दरात क्विंटलला सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात २० ते २५ रुपये किलो असणारा कांदा सध्या ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीस रेटवर वेतनपद्धत अमान्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वार्पर्स कामगारांना पीस रेट पद्धतीची मजूरी कोणत्याही परिस्थितीत मंजूर केली जाणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुधारीत किमान वेतनाची अंमलबजावणीसाठी आमचे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा देत उद्या गुरुवारी ( ३० जुलै) प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा कामगार नेते ए. बी. पाटील यांनी बुधवारी केली. आंदोलन पुढे सुरुच राहणार असल्याने आता त्याचा परिणाम संपूर्ण वस्त्रोद्योगावर होणार आहे. किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेने मागील आठवड्यापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२८ जुलै) मुंबई येथे कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत सायझिंग मालक व कामगार प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये वार्पर्सना किमान वेतन पीस रेटवर रुपांतरीत करुन द्यावे असा प्रस्ताव मंत्री मेहता यांनी कामगार नेत्यांसमोर ठेवला होता. त्यावर कामगार नेत्यांनी कामगारांची चर्चा करुन निर्णय कळविण्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील थोरात चौकात कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना ए. बी. पाटील यांनी मंत्रालय बैठकीत झालेल्या बैठकीचा वृत्तांत सांगितला. कामगार संघटनेने पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचा आरोप सायझिंग मालक करीत आहेत. जर संप बेकायदेशीर असता तर राज्य सरकारने चर्चेला बोलविले असते का असा सवाल उपस्थित करुन ते म्हणाले, किमान वेतनाची अंमलबजावणी व्हावी इतकीच आमची मागणी आहे. पण ती पीस रेटवर रुपांतरीत करावी असे आमदारांचे सांगणे म्हणजे आजारी माणसाला विष देण्याचाच हा प्रकार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने किमान वेतन लागू करण्याची घोषणा केली असताना अंमलबजावणी केली जात नाही. सरकारचे डोके फिरले असल्यामुळे कामगारांना हक्क मिळत नाहीत. तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी कामगारांनी एकसंघ होऊन लढा द्यावा असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी कॉ. आनंदराव चव्हाण, कॉ. सुभाष निकम, कॉ. चंद्रकांत गागरे, कॉ. मारुती जाधव, कॉ. कृष्णात कुलकर्णी यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम असल्याने या संपाचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावर जाणवण्यास सुरुवात झाली असून दैनंदिन कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागत आहे. तीन हजाराहून अधिक सायझिंग कामगारांनी बेमुदत संप पुकारल्कयाने सोमवारपासून बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसन मुश्रीफांची नार्को टेस्ट करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांची भेट घेऊन केली. पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने वर्मा यांना निवेदन दिले.

कॉ. पानसरे स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात, पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत असे एका तपास कामातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते, असा गौप्यस्फोट आमदार हसन मुश्रीफ यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पोलिस महानिरीक्षक वर्मा यांची भेट घेतली. यावेळी संजय पवार म्हणाले, 'कॉ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडणे ही काळाची गरज आहे. पानसरे यांच्या हत्येचा तपास एसआयटीकडून सुरू असताना राज्यातील एक पोलिस अधिकारी हल्लेखोरांची माहिती विरोधी पक्षातील आमदारांना देतो, पण मुख्यमंत्र्यांना माहिती देत नाही ही बाब अतिशय गंभीर आह. गोपनियतेचा भंग करणाऱ्या अशा अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्याला बडतर्फ करावे. '

'पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत असे वक्तव्य करणारे आमदार मुश्रीफ हे जबाबदार लोकप्रतिनिधी व जागरूक नागरिक असल्याने त्यांनी हल्लेखोरांची नावे सांगणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एकीकडे पोलिस रात्रंदिवस तपास करत असताना सवंग लोकप्रियतेसाठी संवेदनशील प्रकरणाबाबत मुश्रीफ संभ्रमावस्था पसरवण्याचा प्रयत्न करत असतील ती समाजाच्यादृष्टीने हिताची बाब नाही. असे वक्तव्य करणाऱ्या मुश्रीफांबद्दल पोलिस प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी.' अशी मागणी संजय पवार यांनी केली. महानिरीक्षक वर्मा म्हणाले, 'आमदार मुश्रीफांनी वक्तव्य केल्यावर त्यांना पत्र पाठवले आहे. काही अधिकाऱ्यांनाही भेटायला पाठवले. पण माहिती दिलेली नाही.' शिष्टमंडळात दिलीप पाटील कावणेकर, रवि चौगुले, शशी बिडकर, दत्ता टिपुगडे, कमलाकर जगदाळे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्न घटले, खर्च वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एलबीटी हा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. एलबीटी जर रद्द करणार असाल तर शहराचा गाडा हाकण्यासाठी राज्य सरकारने विनाविलंब भरभक्कम निधी महापालिकेला द्यावा यासाठी महापालिका आक्रमक बनली आहे. महापालिकचे अस्तित्व टिकले पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे याकरिता महापालिकेतील पदाधिकारी, कर्मचारी संघटना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घेणार आहेत.

सध्या महापालिकेचे जे आर्थिक उत्पन्न आहे, त्यापैकी निम्म्याहून अधिक रक्कम आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्ची पडते. यंदा अस्थापना खर्च १७३ कोटी ९३ लाख इतका अपेक्षित धरला आहे. इतर खर्चाची रक्कमही ६२ कोटी २३ लाखापर्यंत वाढली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून शहरात विविध प्रकल्प सुरू आहेत. नगरोत्थान रस्ते, स्टॉर्म वॉटर प्रकल्प, थेट पाइपलाइन योजना अशा विविध योजनांसाठी महापालिकेला स्वनिधीतून रक्कम उभी करावी लागत आहे. हुडकोकडून ९१ कोटीच्या कर्जाचा प्रस्ताव आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी वार्षिक दहा बारा कोटीची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. थेट पाइपलाइन योजनेसाठी महापालिकेचा दहा टक्के हिस्सा असून अन्य कामासाठी १०४ कोटी रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे.

महापालिकेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एलबीटी बंद होणार असल्याने महापालिकेचा गाडा हाकायचा कसा प्रश्न महापालिका पदाधिकारी, अधिकारीसह विविध कर्मचारी संघटनांना पडला आहे. अपेक्षित उत्पन्न जमा होणार नसल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराची पंचाईत होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात थेट पाइपलाइन योजना, नगरोत्थान योजना, टोप येथील खणीचा विकास, सांडपाणी प्रकल्प, स्टॉर्म वॉटर योजना याकरिता महापालिकेला स्वतःचा हिस्सा गुंतवावा लागणार आहे. एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा कणा मोडणार आहे. राज्य सरकारला या प्रश्नाची जाणीव व्हावी याकरिता महापालिकेचे पदाधिकारी, अ​धिकारी, नगरसेवक, महापालिका कर्मचारी संघ, शिक्षक संघटना, केएमटी कर्मचारी संघटना, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

जकात बंद झाल्यानंतर एलबीटी हाच महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख कणा ठरला आहे. एलबीटीच्या माध्यमातून दरवर्षी ११० कोटी रुपये उत्पन्न मिळते. उत्पन्नाचा मुख्य मार्गच आटला जाणार असेल तर महापालिका सुविधा कशा पुरवणार? महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याची स्वायत्तता संपण्याची भिती आहे.

- राजू लाटकर, राष्ट्रवादीचे गटनेते

एक फेब्रुवारी २०१४ पासून ५९ वस्तूंवरील एलबीटी रद्द केली होती. याकामी ग्रेन मर्चंटस असोसिएशनने पुढाकार घेतला होता. आता उर्वरित वस्तूंवरीलही एलबीटी रद्द होणार आहे. विविध प्रकारची कागदपत्रे, विवरणपत्रांच्या जंजाळातून व्यापाऱ्यांची मुक्तता झाली.

- विवेक शेटे,

अध्यक्ष, ग्रेन मर्चंटस असोसिएशन

व्यापाऱ्यांचा पहिल्यापासूनच एलबीटीला विरोध होता.एलबीटीच्या जाचक अटींमुळे व्यापारी, उद्योजक त्रस्त बनले होते. एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द होणार असल्यामुळे जाचक अटीतून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे.

- वैभव सावर्डेकर, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्गत लाथाळ्या कशासाठी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपल्या घरावर हल्ला होत असताना घरातल्या सर्वांची तोंडे चारी दिशेला असता कामा नये, असा दम शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांना भरला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या भूमिकेने स्थानिक नेते सावरले आहेत. शिवसेनेतील गटातटाला तिलांजली देण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपर्क नेते अरुण दुधवडकर कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

महापालिका निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडीच्या संभाव्य युतीला तोंड देण्यासाठी शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी गटतट विसरून एकत्र यावे, असा आग्रह शिवसैनिकांकडून होत आहे. सध्या शिवसेनेत आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांचे गट आहेत. क्षीरसागर व पवार यांच्यात सात वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कोल्हापूर शिवसेनेवर आमदार क्षीरसागर यांची पक्की मांड असल्याने पवार व देवणे यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमवेत पवार व देवणे काम करत आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिपद मिळवण्यासाठी क्षीरसागर व नरके यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. या गटबाजीमुळे शिवसेनेचे कार्यक्रमही स्वतंत्र होतात. दुसऱ्या गटाच्या कार्यक्रमाला गेल्यास नेते मंडळी टार्गेट करतील, अशी भीतीही शिवसैनिक बोलून दाखवतात. गटबाजीमुळे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाची ताकद विभागली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेतली गेली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेपेक्षा वरचढ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा वरचढ व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी ताराराणी आघाडीला पायघड्या अंथरल्या आहेत. भाजप-ताराराणी आघाडीशी मुकाबला करण्यासाठी पक्षातील नेत्यांचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अनुभव, ताकदीचा उपयोग

आमदार क्षीरसागर यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यांनी शिवसैनिकांची बळकट फळी तयार केली आहे. संजय पवार नगरसेवक म्हणून चार वेळा निवडून आल्याने त्यांच्या ज्येष्ठत्वाचा फायदा पक्षाला होऊ शकतो. देवणे यांचा मंगळवार पेठेत चांगला दबदबा असून, शहरातील त्यांचे चांगले नेटवर्क आहे. आमदार नरके यांचे शिवाजी पेठेत घर आहे तर आमदार सुजित मिणचेकरही कोल्हापूरचे आहेत. आमदार व पदाधिकाऱ्यांची एकत्रित ताकद निवडणुकीत आणण्यासाठी थेट नेत्यांचेच कान पक्षप्रमुखांनी टोचल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य वितरणासाठी जीपीएस प्रणाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रास्तभाव धान्य दुकानामध्ये पोहोच होणाऱ्या धान्य व रॉकेल वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने अशा भ्रष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वखार महामंडळातून बाहेर पडलेल्या प्रत्येक वाहन जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टिम) प्रणालीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने हा निर्णय घेतला असून याबरोबर विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जीपीएस प्रणालीमुळे काळाबाजारात होणाऱ्या रॉकेल पुरवठ्यावर आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच धान्य वितरणामध्ये भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्यास सहा महिन्याच्या शिक्षेचीही तरतूद नवीन अद्यादेशामध्ये केली आहे.

रास्तभाव दुकानदारांना यापूर्वी जिल्हा वखार महामंडळातून धान्याची उचल करावी लागत होती. यामुळे अनेक ठिकाणी धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हते. यामुळे पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहत होते. यामध्ये बदल करण्यासाठी अन्न व पुरवठा खात्याने १५ जुलैपासून 'द्वार पोहोच योजना' सुरू केली आहे. योजनेतंर्गत जिल्हा वखार महामंडळ गोदामातून तालुकास्तराव धान्य दिल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणावरुन प्रत्येक रास्तभाव दुकानात धान्य पोहोच करण्यास सुरुवात केली होती. यासाठी जिल्ह्यात आठ रुट तयार करुन यासाठी वाहतूकदारांशी तीन वर्षांचा करार केला आहे.

द्वार पोहोच योजना यशस्वी होत असतानाच या योजनेमध्ये अधिक पारदर्शीपणा आणण्यासाठी जीपीएस प्रणाली कार्यन्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत गोदामातून बाहेर पडलेल्या प्रत्येक वाहनावर नियोजित स्थळापर्यंत पोहोचेपर्यंत ट्रॅक लावण्यात येणार आहे. याचे नियंत्रण पुरवठा कार्यलयातून होणार असल्याने भ्रष्टाचारी यंत्रणेवर चांगलाच चाफ बसणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तत्कालीन पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी रॉकेल वितरण करणाऱ्या ४३ वाहनांवर २०१२ पासून जीपीएस प्रणाली अवंलबली होती. यासाठी नियोजन मंडळाकडून आठ लाखांचा निधी उपलब्ध केला होता. राज्यात आदर्शवत ठरलेली जीपीएस प्रणाली राज्यात कार्यन्वित करण्याचा निर्णय झाला होता. मात्र कोल्हापुरातील यंत्रणा २०१३ मध्ये बंद पडली होती. आता राज्य सरकारने पुन्हा जीपीएस प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापुरातील प्रयोग आदर्शवत ठरला आहे.

अंत्योदय

गहू - ११७२ मे.टन

तांदूळ - ७५९ मे. टन



प्राधान्य

गहू - ६६३५ मे. टन

तांदूळ - ४४२६ मे. टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आमदार महादेवराव महाडिक हे 'आम्ही गेल्या निवडणुकीतच ताराराणी आघाडी विसर्जित केली. ताराराणी आघाडीशी माझा संबंध नाही' असे कितीही सांगितले तरी त्यांचा मुलगा स्वरूप हाच आघाडीचा प्रमुख असल्याने त्यांचा यातील सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे महाडिक गटाला मानणारे म्हणजेच काँग्रेसमधून निवडून आलेले किंवा पूर्वी काँग्रेसकडे इच्छूक असलेले उमेदवार या आघाडीकडे ओढले जातील हे स्पष्ट आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसला जादा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

गेल्या पाच वर्षांमध्ये पक्षीय राजकारणात अडकल्याने पूर्वीच्या तुलनेत आर्थिक उलाढाल करायला न मिळालेले बहुसंख्य नगरसेवक ताराराणी आघाडीची सातत्याने आठवण काढत होते. आता भाजपसारख्या पक्षाशी नव्या ताराराणी आघाडीची युती केल्याने अशा साऱ्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. पूर्वाश्रमीच्या आघाडीतील कारभारीच या आघाडीच्या चित्रात दिसत असल्याने अनेक पक्षातील विद्यमान नगरसेवक, इच्छूक आघाडीकडे ओढले जातील. २००५ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी आणि महापालिकेची सत्ता हे समीकरण बनले होते. महाडिक यांनी अर्ज भरणे किंवा निवड प्रक्रियेच्या शेवटच्या क्षणी नाव जाहीर करावे, त्याच व्यक्तीने महापौरपद भुषवावे अशी स्थिती होती. पक्षीय राजकारण नसल्याने आघाडीच्या या राजकारणाची सूत्रे महाडिक स्वतंत्रपणे राबवत होते.

पक्षीय राजकारणाला सुरुवात झाल्यानंतर ताराराणी आघाडीचे महत्व कमी होत गेले. गेल्या निवडणुकीवेळी ताराराणी आघाडी काँग्रेस पक्षामध्ये आघाडी विलीन करत असल्याचे महाडिक यांना जाहीर करावे लागले. अर्थात त्यावेळी त्यांची ती अपरिहार्यता होती. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या महाडिक व सतेज पाटील गटाच्या राजकारणामुळे काँग्रेसमध्ये असतानाही अनेक इच्छुकांना पदापासून वंचित रहावे लागले. विकास निधीसाठीही आटापीटा करावा लागला. या राजकारणामुळे वैतागलेल्या नगरसेवकांच्या तोंडातून गेल्या दोन वर्षात ताराराणी आघाडीच बरी असे जाहिररित्या बोलले जायचे. या निवडणुकीत अधिकृतरित्या आघाडी रिंगणात उतरणार असल्याने या साऱ्या अस्वस्थ नगरसेवक, इच्छुकांना एक मार्ग सापडला आहे.

गेल्या निवडणुकीत आघाडी विलीन करावी लागल्याने महाडिकांच्या अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेसचे तिकिट घ्यावे लागले. काहींचे तिकिट कापले गेले. त्यामुळे निवडणूक रिंगणापासून दूर रहावे लागले. तयारी केलेल्या मोजक्या इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. महाडिक यांच्या शब्दावर काहींना काँग्रेसमध्ये तिकिट मिळेल. पण ज्यांना तिकिट मिळणार नाही, ते आघाडीकडे सरकतील. सध्याच्या ताराराणी आघाडीतील कारभारी पाहता भविष्यात कोणत्याही समीकरणांची जुळवाजुळव करायची असल्यास ते सक्षम आहेत. त्यामुळे भविष्यात काही गरज भासल्यास या आघाडीचा पाठिंबा मोठा ठरू शकतो. त्यामुळे साहजिकच महाडिक यांना मानणारे जे काँग्रेसच्या गोटात सहभागी होण्याची शक्यता होती, ते ताराराणी आघाडीकडेच जाण्याची जास्त शक्यता आहे.

अन्य पक्षातील इच्छुकही वळचणीला

इतर पक्षातीलही ज्यांना महाडिकांची कार्यपद्धती पाहिली आहे, त्यांच्याकडूनही या आघाडीला प्राधान्य देण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही महाडिक यांना मानणारे काही नगरसेवक आहेत. काही इच्छुक यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक हते. त्यांनाही आता ताराराणी आघाडीत संधी मिळेल. एकूणच भाजपच्या सहकार्याने आघाडीकडून सतेज पाटील यांच्या दक्षिणेतील गटाला धक्का पोहचवण्याचा अजेंडा ताराराणी आघाडीचा असेल. त्यामुळे काँग्रेस पक्षाला दोन्ही बाजूने हा फटका बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगली पालिकेला डिस्टिक्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राज्य पातळीवर गुणानुक्रम पडताळणीत सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला ८७.५ गुण मिळाले आणि पहिल्या २० शहरांत सांगलीची निवड झाल्याचे आयुक्त अजिज कारचे यांनी गुरुवारी सांगितले.

ते म्हणाले, ''विशेष म्हणजे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी कोणतीही बाहेरील सल्लागार एजन्सी नेमली नव्हती. मंत्रालयातील या सादरीकणात राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या महापालिकांबरोबरच काही नगरपालिकांनीही भाग घेतला होता. एकूण चाळीस पालिकांनी सादरीकरण केले. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर हे सादरीकरण झाले. त्यात वित्त सचिव, नियोजन सचिव, नगरविकास सचिव, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी होते.''

''घनकचरा व्यवस्थापन, शहर स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, मनपाने राबविलेले प्रकल्प, घरपट्टी-पाणीपट्टी वसूली, ई-गव्हर्नन्स, ई-पोर्टल, नवीन इमारत बांधणी, महापालिका अर्थसंकल्प या स्पर्धेतील निकषांनुसार महापालिकेला स्वयंमूल्यांकनात ५७ गुण मिळाले होते. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या प्रात्यक्षिकांमध्ये पडताळणी समितीने ८३ गुण दिले होते. आता या गुणांत आणखी साडेचार गुणांची वाढ होऊन ते ८७.५ टक्के इतके झाले आहेत. राज्यातून जी १० शहरे निवडली जाणार आहेत त्यात सांगलीचा क्रमांक लागला तर ठीक अन्यथा पुढील वर्षी तो लागेल. यासाठी आम्ही प्रयत्नात कोणतीही कसूर केली नाही,'' असेही आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक पोहोचवताहेत खेड्यापाड्यात आरोग्य सुविधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

बांबवडे येथील रणवीरसिंह गायकवाड युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी दीड वर्षांपासून दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या गरजू लोकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे व्रत जोपासले आहे.

या उपक्रमांसाठी युवकांनी इस्लामपूरातील राजारामबापू फोरमचे माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे. युवा शक्तीचे अध्यक्ष संग्राम खराडे यांच्या पुढाकाराने येळवण जुगाईतील इस्माईल महात, किशोर वागवेकर, मंगेश चाचे, ईश्वरा पोवार, करंजफेण येथील पृथ्वीराज खानविलकर व करुंगळे येथील प्रकाश कांबळे या युवकांनी पांढरेपाणी, येळवण जुगाई, मांजरे व करंजफेण या अति दुर्गम व डोंगराळ भागातील लोकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत. गेल्या वर्षभरात फोरमच्या माध्यमातून या भागातील पन्नास रुग्णांच्या हर्निया, डोळे व महिलांच्या पिशवीच्या शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत. हे युवक महिन्यातून एकदा सर्वरोगनिदान शिबिर घेतात. या शिबिरात दोषी आढळलेल्यावर हे युवक कार्यकर्ते स्वतः खर्च करून त्यांच्यावर उपचार करवून देतात. नेत्रशिबिराच्या माध्यमातून त्यांनी दीडशे रुग्णांना चष्म्याचे वाटप केले आहे. बांबवडे येथे रक्तदान शिबिरही भरविले होते.

गरजूंना आरोग्याच्या सेवा देण्याबरोबरच युवा शक्तीच्या हे कार्यकर्ते यात्राकाळात पाणीटंचाई भासू नये म्हणून बांबवडे परिसरात असलेल्या वाड्यावस्त्यावरील लोकांना पाणी पुरवितात. या युवकांनी मिळून गतवर्षी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी आठ ट्रक चारा पाठविला होता. तालुकापातळीवरील आधार कार्ड काढण्याच्या केंद्रात होत असलेल्या सावळागोंधळाच्या पार्श्वभूमीवर या युवकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे गावोगावी आधार कार्डे काढण्याची युनिट्स पोहोचली. त्यामुळे दूरवरच्या लोकांना त्याचा मोठा फायदा झाला. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी युवा शक्तीच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये ५०० विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सराव परीक्षाही घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या नावाला लाल फितीचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या विकासाला गती देण्याच्या दूरदृष्टीतून छत्रपती राजाराम महाराजांनी उभ्या केलेल्या विमानतळास राजाराम महाराजांचेच नाव देण्यासाठी शहरवासीयांना झगडा द्यावा लागत आहे. दहा वर्षांपासून सातत्याने उपोषण केली. मात्र, केवळ आश्वासनेच मिळाली. यापुढे जाऊन राज्य सरकारने ठराव करूनही ती माहिती भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे पोहोचत नसल्याची मोठी खंत आहे. लालफितीच्या कारभाराने उजळाईवाडी विमानतळ छत्रपती राजाराम महाराजांच्या नावापासून वंचित आहे.

उजळाईवाडी विमानतळासाठी राजाराम महाराजांनी १९३० ते ३५ दरम्यान काम सुरू केले होते. त्यासाठी १७० एकरांचा परिसर ठरविण्यात आला होता. १९४० साली त्याचे उद्घाटन झाले. १९७९ दरम्यान त्याचे विस्तारीकरण केले. आता पुन्हा विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर मोठी विमाने उतरतील, दळणवळणाचे मोठे साधन उपलब्ध होईल; पण राजाराम महाराजांचा विसर पडू नये म्हणून त्यांचे नाव विमानतळास देण्यासाठी सातत्याने आंदोलने केली जात आहेत. त्याला सरकारकडून फार चांगला प्रतिसाद मिळत नाही. राजाराम महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून सातत्याने उपोषण केली जात आहेत. त्यावेळी मंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी नाव देण्यासाठी ठोस आश्वासन देत आले आहेत.

२०१३ मध्ये आंदोलन केल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य मंत्रिळाच्या बैठकीत राजाराम महाराजांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव केला. यासाठी जिल्हा परिषद, महापालिकांचे ठराव होऊनही सरकारी निर्णयाची माहिती विमानपत्तन प्राधिकरण व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे पाठविण्यास विलंब होत आहे. आतापर्यंत निर्णय व्हावा म्हणून आंदोलन केले जात होते. आता निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी यासाठीही आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

व्हीनस कॉर्नर चौकात आज धरणे

विमानतळास राजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी उदयसिंह राजेयादव यांच्या नेतृत्वाखाली अनेक राजाराम महाराजप्रेमी शहरवासीय शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता व्हीनस कॉर्नर चौकातील राजाराम महाराजांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सलग दहा वर्षांपासून उपोषण करून नाव देण्यासाठी राजारामप्रेमींना झगडावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेरेमहालाच्या पदरी उपेक्षाच

$
0
0

अमित जगताप, पन्हाळा

पुरातत्त्व खात्याच्या यादीतून निसटलेली आणि पन्हाळा नगरपरिषदेच्या ताब्यात असणारी एकमेव टोलेजंग ऐतिहासिक इमारत म्हणजे डेरे महाल अर्थात रेडे महाल. इतिहासाची साक्ष देत, सुंदर कलाकुसर असणारी इमारत पन्हाळा नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. कागदोपत्री ही इमारत नगरपालिकेकडे आहे मात्र या इमारती शेजारी पुरातत्व खात्याने ही इमारत संरक्षित वास्तू असल्याचा फलक लावल्याने याकडे ना पुरातत्व खाते लक्ष देते ना नगरपरिषद.

पुर्वी गडावर येण्यासाठी पन्हाळ्याच्या दक्षिण बाजूने घाटाचा रस्ता होता. या घाटाला रेडेघाट म्हणतात. याच रेडेघाटातून रेड्यांच्या पाठीवरून गडावर अन्नधान्य वाहतूक व्हायची. आजही रेडेघाट अस्तित्वात आहे. यावरूनच अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या रेड्यांना बांधण्यासाठी ही रेडेमहलची इमारत बांधली असावी असे सांगितले जाते. पण या दोनमजली इमारतीचे बांधकाम, आतील कोरीव मोठमोठे दगडी खांब अणि भव्य कमानी, उंचच्या उंच नक्षीदार छत पाहिले की ही इमारत एकतर निवासी असावी ‌किंवा येथे तत्कालिन प्रशसानाचे कार्यालय असावे असा अंदाज बांधला जातो. सरदार, मानकरी यांना विश्रामासाठी बांधलेल्या या 'डेरे महाल'चा पुढे अपभ्रंश रेडेमहाल झाला असावा असेही बोलले जाते. संस्थानकाळात या इमारतीचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला जाई. कैद्यांच्या हातापायांना बेड्या असत. या बेड्यांचा साखळदंड बांधण्यासाठी पुर्वी या इमारतीत जागोजागी खुंट्याही होत्या.

संस्थाने विलिन झाल्यानंतर ही इमारत रिकामी पडली होती. त्यानंतर ही इमारत कोल्हापूर येथील जनता कझ्युमरला भाड्याने दिली आहे. ही संस्थाही डबघाईला आल्याने काही वर्षापुर्वी जोमाने चाललेला येथील जनता बझार आता बंद पडला आहे. फक्त येथून रॉकेत वितरण चालू आहे. याच ठिकाणी असलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्यामुळे या परिसरात उंदीरघुशींचा सुळसुळाट आहे. इमारतीतील शहाबादी फरशाही घुशीनी उलथून टाकल्या असून ठिकठिकाणी मातीचे वारूळासारखे ढीग लावले आहेत. इमारतीवर झाडेझुडपे वाढली आहेत. इमारतीची बऱ्याच दिवसांत किरकोळ दुरुस्तीही नसल्याने पूर्व दक्षिण बाजूच्या कोपऱ्यातून ही इमारत ढासळली आहे. पावसाचे पाणी मुरून ही इमारत आणखीच खचत आहे. वेळीच लक्ष न दिल्यास येत्या काही वर्षातच ही इमारत जमीनदोस्त होण्याची चिन्हे आहेत. पुरातत्व खाते आणि नगरपालिकेने वेळीच लक्ष देऊन ऐतिहासिक ठेवा जतन केला पाहिजे अशी मागणी लोकांतून होत आहे. इमारतीचा उपयोग सरकारी कार्यालयासाठी किंवा वास्तूसंग्रहालयासाठी केल्यास वास्तू सुस्थितीत राहील शिवाय नगरपालिकेला उत्पन्नाचे साधन होईल. पुरातत्व खात्याने या इमारतीची डागडुजी करून नगरपालिकेने एखाद्या सरकारी ऑफिसला भाड्याने देण्याची तयारी दर्शविल्यास या ऐतिहासिक वास्तुचा चांगल्या रितीने उपयोग होऊ शकतो.

इमारत न्यायप्रविष्ट

ही इमारत नगरपरिषदेने जनता कंझ्युमरला भाडेतत्वावर दिली होती. आता येथे केवळ रॉकेल विक्री सुरू आहे. ही इमारत नगरपरिषदेकडून ताब्यात घेण्यासाठी पुरातत्व खात्याने न्यालयालात धाव घेतली आहे. मात्र, जनता कंझ्युमरला वेगळी जागा देऊन ही इमारत तत्काळ रिकामी करावी व ताबा द्यावा असे पुरातत्व खात्याचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड तहसीलदारला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खून, मारामारी व संघटित गुन्हेगारीचे गुन्हे नोंद असणाऱ्या एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल संजय तहसीलदारच्या महाडिक माळ येथील बंगल्यात घुसून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून व्हाइट कॉलर म्हणून स्वप्ने पाहणाऱ्या तहसीलदारला आरक्षण जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी अटक करून शहरातील गुंडांच्या टोळ्यांना इशारा दिला आहे.

तहसीलदारने मुक्त सैनिक वसाहत येथे २ मे २०१५ रोजी जंगी वाढदिवसाचे आयोजन केले होते. शाहूपुरी पोलिसांनी विनापरवाना मंडप, डॉल्बी लावणाऱ्या तहसीलदाराचा वाढदिवस उधळून लावला होता. यावेळी तो व त्यांच्या गँगने पोलिसांना विरोध केला होता. तसेच मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे वाढदिवसाचे आयोजन केले होते. पोलिसांनी हाही वाढदिवसाचा प्रयत्न उधळून लावला होता. या प्रकरणी तहसीलदारविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारामारी, दहशत माजवणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात पोलिसांनी तहसिलदारला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगली होती. याकूब मेमनच्या फाशीनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सदर बझार ते शाहू कॉलेज परिसरात संचलन केले. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १२५ पोलिसांसह महाडिक माळ येथे मोर्चा वळवला. यावेळी स्वप्निल घरात होता. पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्यास सांगितला असता त्याने नकार दिला. पोलिसांनी दारावर लाथा मारून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करताच त्याच्या आईने दरवाजा उघडला. पोलिस स्वप्निलला नेत असताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.

स्वप्निलवर हद्दपारीसाठी हालचाली

स्वप्निल तहसीलदार, त्याचा सहकारी विठ्ठल काशिनाथ सुतार, संजय ऊर्फ माया महावीर किरवणे, तुषार शिवाजी डवरी, राकेश किरण कांरडे, रामचंद्र विलास सावरे यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिसांनी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा हद्दपारीचा प्रस्ताव यांना पाठवला आहे. या प्रस्तावाच्या सुनावणीसाठी शर्मा यांनी गडहिंग्लजे पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांना पाठवला आहे. सुनावणीला उपस्थित रहावे यासाठी तहसीलदार व त्याच्या सहकाऱ्यांना चार वेळा नोटिसा पाठवल्या आहेत. शेवटची सुनावणी नऊ ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर हद्दपारीचा निर्णय होणार आहे. दोन खुन, मारामारी, खंडणी असे गुन्हे त्याच्या नावावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीला ‘टायमिंग’ची प्रतीक्षा

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

काँग्रेस पक्षाशी आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगरपालिकेतील सत्ताधारी बनला. आघाडीमध्ये ठरल्याप्रमाणे पक्षाच्या वाट्याला आलेल्या महापौरपदापासून इतर पदांवर जास्तीत जास्त नगरसेवकांच्या नेमणूक करुन समतोल साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जाहीरनाम्याप्रमाणे नागरिकांच्या सुविधांसाठी प्रशासनाशी कधी थेट टक्कर देत तर कधी सामंजस्याच्या भूमिकेतून पाठपुरावा करून सुविधा पुरविण्यात यश साधले. पक्षासोबत जनसुराज्य शक्ती व अपक्षांच्या आघाडीला बरोबर ठेवताना त्यांनाही पदाचा लाभ देण्यात यश आले. मात्र, माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने राष्ट्रवादीने चार वर्षात केलेल्या चांगल्या कामांमध्ये एक डाग लागला आहे. सध्याच्या निवडणुकीत या सर्वांच्या पाठबळावर राष्ट्रवादी कितपत भरारी मारते? यावर गेल्या पाच वर्षातील टायमिंग साधले का हे स्पष्ट होणार आहे.

महानगरपालिका म्हणजे ताराराणी आघाडीची सत्ता असे समीकरण असलेल्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने २६ जागा पटकावल्या. यावेळी जनसुराज्य शक्ती, अपक्ष, शिवसेना, भाजप या पक्षांचेही नगरसेवक निवडून आलेले असताना पक्षाने जनसुराज्य, अपक्षांची आघाडी करत काँग्रेसबरोबर सत्ता मिळवली. या सत्तेतील भागीदारीमध्ये महापौर तसेच विविध पदांच्या वाटण्याही केल्या. महापौरपद ​महिलांसाठी राखीव असल्याने तीन पदे मिळाली. त्याशिवाय विविध पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्ती करताना नेत्यांनी योग्य समतोल राखल्याने नगरसेवकांमध्ये पदांवरून फार मोठी खळखळ झाल्याचे दिसून आले नाही. यासाठी एक पद मिळालेल्या नगरसेवकाला, दुसऱ्या पदाचा लाभ न देण्याचे पाळलेले धोरण महत्वाचे ठरले. तसेच पद व स्थायी समितीतील सदस्यपद देतानाही विचार केला गेला. यामुळे जवळपास निम्म्या नगरसेवकांना पदावर बसवता आले. सर्वच सदस्यांना कोणती ना कोणती समितीवर जाता आले. मात्र, पक्षातील या सभागृहात ज्येष्ठ असलेले जालंदर पोवार, भूपाल शेटे, सर्जेराव पाटील यांना पद मिळाले नाही. त्याचवेळी पक्षाबरोबर असलेली जनसुराज्यशक्ती अपक्ष या आघाडीतील मधुकर रामाणेही पदापासून वंचित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय समतोल राखत असताना विकासकामाबाबतही आखलेले धोरण कामकाजात दिसत होते. नागरिकांना सुविधा देण्याचे धोरण प्राधान्यक्रमावर होते. त्याप्रमाणे पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन या क्षेत्रात पक्षाचा पाठपुरावा महत्वाचा ठरला. आरक्षण उठवणार नाही हा मुश्रीफ यांनी प्रचारांमध्ये दिलेला शब्द पाळण्याचे काम केले. त्याचवेळी जनतेच्या भावना लक्षात घेऊन मुश्रीफ हे त्यावेळी मंत्री असतानाही राष्ट्रवादीच्या तत्कालिन महापौर सुनीता राऊत व इतर नगरसेवकांनी टोल आंदोलनात घेतलेला पुढाकार जनतेच्या प्रश्नाशी पक्ष निगडीत असल्याचे दाखवून दिले. यावेळी महापौरांना धक्काबुक्कीही झाली होती. मात्र टोल आंदोलनातील पक्षाचा सहभाग नागरिकांना भावला.

महापालिकेत थेट पाइपलाइन योजना असो, नगरोत्थानचे रस्ते, नवीन बसेस असतील व कचरा उठावसाठी केलेली यंत्रणा याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रयत्नशील राहिले. प्रशासनावर वचक ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून होत राहिला. या कामकाजाच्या जोरावर व नगरसेवकांना दिलेल्या विविध पदांच्या संधींमुळे पक्षाकडे पुढील निवडणुकीसाठी नक्कीच उमेदवारांची पसंती असण्याची शक्यता आहे. पण नवीन निवडणुकीला सामोरे जात असताना जाहीरनामा काय देणार आहे? हेही महत्वाचे ठरणार आहे.

माळवींच्या लाचखोरीचा फटका

एकीकडे जास्तीत जास्त नगरसेवकांना पदाधिकारी बनवण्याचा प्रयत्न सुरू असताना तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने पक्षाच्या प्रतिमेला चांगलाच तडा गेला. शहराच्या प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या या पदावरील व्यक्तीच लाचसारख्या प्रकरणात सापडण्यावरुन पक्ष बराच बॅकफूटवर गेला. त्यातून सावरण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली. मात्र त्यांनी राजीनामा न देता पक्षालाच आव्हान दिले. लाचप्रकरणानंतर राजीनाम्याचे नाट्यही रंगले. सरकार, हायकोर्टापर्यंत पोहचलेल्या या नाट्यातून गेल्या पाच वर्षात पक्षाने जपलेल्या प्रतिमेला चांगला धक्का बसला आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीतही उमटणार आहेत.

शेवटच्या टप्प्यात धुसफूस

गेल्या पाच वर्षात काँग्रेसमध्ये पदे देण्यावरुन बरीच धुसफूस झाली असली तरी तुलनेत राष्ट्रवादी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीत फार तणाव झाला नव्हता. मात्र, स्थायी सभापती आदिल फरास यांचा राजीनामा काही दिवसानंतर घेण्यावरुन मात्र पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये काही विसंगती दिसली. पक्षातील नवे, जुने असे म्हणण्यापर्यंत वाद गेला. फरास व लाटकर यांच्यातील प्रकारामध्ये मुश्रीफांना हस्तक्षेप करावा लागला. शेवटच्या टप्प्यात ही धुसफूस दिसली.

पक्षातील पदाधिकारी

महापौर - कादंबरी कवाळे, सुनीता राऊत, तृप्ती माळवी उपमहापौर - प्रकाश पाटील, सचिन खेडकर, परिक्षित पन्हाळकर, ज्योत्स्ना मेढे स्थायी सभापती - महेश सावंत, राजेश लाटकर, रमेश पोवार, आदिल फरास बालकल्याण सभापती - शारदा देवणे, रोहिणी काटे शिक्षण मंडळ सभापती - रशीद बारगीर, महेश जाधव परिवहन सभापती - प्रकाश कुंभार गटनेता - प्रकाश पाटील, राजेश लाटकर ....

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या दोन निवडणुकांपासून पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सुरुवात केली आहे. यंदाही तीच पद्धती कायम ठेवत एकहाती सत्ता घेण्याचे उद्दिष्ट असेल. गेल्या पंचवार्षिकमध्ये शहरात पक्षाच्या माध्यमातून विविध कामे केली आहेत. इतिहासात कधीही आला नाही, इतका निधी या पाच वर्षात महापालिकेला मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता सहकार्य करेल. निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर पक्षाचा जाहिरनामा जाहीर करणार आहोतच. हसन मुश्रीफ, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस

प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून चांगले काम

घोडेबाजार रोखण्यासाठी पक्षाने निवडणूक लढवली व सत्ता मिळवली. या सत्तेनंतर जे जे पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी बनले. त्यांनी पक्षाची छाप उमटवली. सुनीता राऊत यांचे टोल आंदोलनातील नेतृत्व असो, प्रकाश कुंभार परिवहन सभापती असताना केएमटीच्या जागांवर लावण्यात आलेली नावे व जागेवरील काढण्यात आलेली अतिक्रमणे, शारदा देवणे महिला व बालकल्याण सभापतीपदावर असताना घेतलेल्या विविध स्पर्धा अशी उदाहरणे सांगता येतील. थेट पाइपलाइन योजना, तेराव्या वित्त आयोगातून आरोग्य विभागाकडे यंत्रणा उभी करुन कचरा उठाव महापालिकेमार्फत सुरू करणे, झोपडपट्टी विकासासाठी, नगरोत्थानमधील रखडलेल्या रस्त्यांच्या कामासाठी, केएमटीच्या बसेस आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच यामध्ये यश मिळाले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही राष्ट्रवादीने आघाडी घेतली. कोणतीही आरक्षणे उठवायची नाहीत हे पक्षाने धोरण ठरवले होते. त्याची या पाच वर्षांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करुन शहरवासियांना विश्वास दिला आहे. आगामी सभागृहातही चांगले काम करण्यासाठी प्रयत्न असेल. कोल्हापूरचे वेगळेपण जपून शहराची राजकारणात उंची वाढवण्याचा प्रयत्न असेल. राजेश लाटकर, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस .... राष्ट्रवादी, जनसुराज्य अपक्ष आघाडीचे सदस्य

राष्ट्रवादी - २६, जनसुराज्य - ४, अपक्ष - ५ ... अपुऱ्या कामांसाठी प्राधान्य

गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे घेऊन पक्षाने वाटचाल केली. त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. त्यातून ज्या योजना राबवण्यात येत आहेत, त्यातील काहींची कामे अपुरी आहेत. आगामी सभागृहात पक्षाच्यावतीने ती पूर्ण करण्याचा विश्वास शहरवासियांना देण्यात येणार आहे. शहरवासियांना चांगल्या सुविधांसाठी पक्ष प्रयत्नशील आहे. स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराचा समावेश झाला नाही तरी महापालिकेच्या पातळीवर शहर स्मार्ट करण्याचा प्रयत्न असेल. मंदिर विकास आराखड्याबाबतही सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.

आर. के. पोवार, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुक उमेदवारांत कमालीची धाकधूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची वेळ जवळ येऊन ठेपल्याने इच्छुकांत प्रचंड धाकधूक वाढली आहे. संभाव्य उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला प्रारंभ होणार आहे.

प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची रंगीत तालीम गुरूवारी पुन्हा घेण्यात आली. प्रभाग रचनेसाठी आवश्यक टेबलाची मांडणी करण्यात आली. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला सुरूवात होईल. यावेळी शहरातील ८१ प्रभागांचे नकाशे, व्याप्ती व चारही बाजूच्या सीमा नागरिकांना पाहण्यासाठी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. आरक्षण सोडतीत पारदर्शकता आणण्यासाठी पारदर्शक ड्रम आणण्यात आला आहे. तसेच संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सभागृह परिसरात दोन ठिकाणी स्क्रीनची सोय केली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्याकडून सोडतीच्या तयारीचा आढावा घेतला. आरक्षण सोडतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्यांदा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी सोडत काढण्यात येईल. त्यानंतर नागरिकांचा इतर मागास प्रवर्गासाठी सोडत निघेल. त्यानंतर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सोडतीचे थेट प्रक्षेपण

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वेबसाइटवर सकाळी नऊ वाजता प्रभागाचा आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. एसपीएन चॅनेलवर सोडतीचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुपरी नगरपरिषदेला तत्त्वत: मंजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हुपरी ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. तसे पत्र त्यांनी कृती समितीकडे गुरुवारी सुपूर्द केले. हुपरी नगरपरिषद मंजुरीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. मुंबईत कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, बाळासो कांबळे यांच्यासह आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषदेला तत्वत: मंजुरीचे पत्र दिले. ही माहिती हुपरीत समजताच जल्लोष करण्यात आला.

हुपरी चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. सद्या ६० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या झाल्यामुळे नागरी सुविद्या पुरविणे व विकासकामे करणे अशक्य झाले होते. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पत्रकारांनी एकत्रित येत सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करत कृती समिती स्थापन केली. त्याद्वारे सरकार दरबारी मोठया प्रमाणात पाठपुरावाही केला. पंरतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून लोकचळवळ उभा करत लाक्षणिक उपोषण, सह्यांची मोहीम,१५ दिवस साखळी उपोषण त्याबरोबरच तीन दिवस बेमुदत उपोषण करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानासाठी ‘महापालिका’ रस्त्यावर

$
0
0

कोल्हापूर ः महापालिकेला आधी दीडशे कोटींचे अनुदान द्या मगच एलबीटी रद्द करा, अशी मागणी करत महापालिकेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. महापौरांसह पदाधिकारी, नगरसेवक आणि हजारो कर्मचारी भर पावसात रस्त्यावर उतरले होते.

आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला एलबीटी रद्द होणार असल्याने महापालिकेची स्वायत्तता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने सरकारने विनाविलंब अनुदानाची तरतूद करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारने आर्थिक उत्पन्नाबाबतची स्वायत्तता ताबडतोब स्पष्ट करावी आणि महापालिकेला न्याय द्यावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला. महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी संगीता चौगले यांच्याकडे निवेदन‌ दिले.

आवाज बुलंद

एलबीटीला समर्थ पर्याय मिळावा आणि राज्य सरकारने तत्काळ अनुदान द्यावे, या मागणीसाठी महापालिकेचा आवाज बुलंद झाला. एलबीटीसंदर्भात काढलेल्या मोर्चात पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांची एकत्रित ताकद दिसली. आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख कणाच मोडणार असल्याने महापालिका टिकणार कशी? असा सवाल सरकारला करण्यात आला. 'आधी अनुदान द्या, मगच एलबीटी रद्द करा' या घोषणांनी मोर्चाचा मार्ग निनादला. पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी एकवटल्याचे चित्र गुरुवारी दिसले.

महापालिका चौकात सकाळी ११ वाजता सर्व विभागाचे कर्मचारी जमले. मोर्चासाठी हजेरी लावल्याने महापालिका चौक खचाखच भरला होता. मोर्चाला प्रारंभ होण्याअगोदर एलबीटी बंद होणार असल्यामुळे महापालिकेची आर्थिक व्यवस्था कोलमडणार असल्याची जाणीव पदाधिकाऱ्यांनी करून दिली. महापौर वैशाली डकरे, उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार, परिवहन व बालकल्याण समिती सभापती अजित पोवार, महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाला सुरुवात झाली. महापालिका गटनेता शारंगधर देशमुख, प्रभाग समिती अध्यक्ष मधुकर रामाणे, प्रदीप उलपे, संगीता देवेकर यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक मोर्चात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत ६९.४९ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. तुरळक पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा ६९.४९ टीएमसी इतका झाला आहे. गेल्या सप्ताहापासून धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही अल्प प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोयनानगर येथे ३४, नवजा येथे ३३ आणि महाबळेश्वरात ३२ मि. मी पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला लिपिक लाचप्रकरणी अटकेत

$
0
0

सांगलीः गुंठेवारीतील प्लॉट अकृषिक (एन.ए.) करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला लिप‌िक पद्मजा रवींद्र यादव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. नागरी कमाल जमीन धारणा कार्यालयात त्या अव्वल कारकून म्हणून त्या काम पाहतात.जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून पद्मजा यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

शिवाजी स्टेडियम परिसरातून एका तर बनवडी कॉलनी (ता. कराड) येथून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले आहेत. बनवडी कॉलनी येथील दूधगंगा स्टॉप परिसरातून १८ जुलै रोजी एका १४ वर्षीय मुलीस तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. या बाबतची फिर्याद मुलीच्या नातेवाईकांनी येथील शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरातूनही १५ वर्षीय मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी २९ रोजी घडली आहे. या बाबत मुलीच्या कुटुंबियांनी गुरुवारी रात्री शहर पोलिसांत फिर्याद दिल्याने अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images