Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिरोळची पावसाळी तयारी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी यांत्रिक बोटीतून पाहणी केली. सर्वच विभागांनी समन्वय ठेवून महापुराचा सामना करावा, पाटबंधारेसह महत्त्वाच्या विभागांनी मरगळ झटकून कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी अमित सैनी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सचिन गिरी, उपसरपंच अभिजित जगदाळे यांच्या उपस्थितीत नृसिंहवाडी येथे तीन यांत्रिक बोटींच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी कृष्णा नदीपात्रात प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोट, जॅकेट, रिंग्ज, रोप यांसह तत्सम यंत्रणेची माहिती घेतली.

यावेळी सैनी यांनी महापुराचा सामना करण्यासाठी सात बोटी, ५० रिंग्ज, ७७ लाइफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे म्हणाल्या, 'शिरोळ तालुक्यात सरासरी पाऊस कमी असला तरी नदीपात्रात पाणी फुगवटा जास्त असतो. यासंदर्भात नियोजनासाठी दोन बैठका घेतल्या असून, महापुराच्या काळात सांगली पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवून शिरोळ नियंत्रण कक्षास वेळोवेळी माहिती देणे गरजेचे आहे.'

बैठकीत कुरुंदवाडचे मुख्याधिकारी अतुल पाटील, उपनिरीक्षक डी. एस. हाके, शिरोळचे पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, गटविकास अधिकारी देसाई, नृसिंहवाडीचे उपसरपंच अभिजित जगदाळे, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील यांनी महापुराचा पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाळपोळप्रकरणी १० अटकेत

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, चंदगड

सुपेजवळ एव्हीएच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर दगडफेक करुन वाहनांची जाळपोळ केल्याप्रकरणी काल दहा संशयितांना अटक केली होती. त्यांना येथील सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

एव्हीएच कंपनीला तालुक्यातून प्रदूषणाच्या मुद्यावर विरोध आहे. या विरोधात नागरीकांनी वेळोवेळी मोर्चे, आंदोलनेही केली आहेत. २ जूनला एव्हीएच कंपनीची गाडी कर्मचाऱ्यांना घेऊन बेळगावच्या दिशेने जात असताना सुपे फाट्यानजीक आली असता अज्ञातांनी गाडीवर दगडफेक करुन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्याचबरोबर दोन्ही गाड्या पेटवून दिल्या. या प्रकरणी संशयित म्हणून लक्ष्मण गुरव, हेमंत पाटील, सदाशिव पाटील, वैजनाथ तनगनकर, अशोक कांबळे, सटुप्पा नाईक, रामु नाईक, संजय नाईक, युवराज नाईक, दिपक पाटील यांना अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणीप्रश्नी तक्रार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मैलायुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याच्या प्रकाराबद्दल महापालिकेवर कायदेशीर कारवाईची नोटीस बजावल्यानंतर महापालिका प्रशासनाने गुरुवारी घाईगडबडीने जयंती नाल्यावर मातीची पोती टाकून बंधाऱ्याची तात्पुरती उंची वाढवली आहे. सायंकाळनंतर जयंती नाल्यातून नदीत मिसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह थांबविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल करून पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात विविध घटकांकडून कार्यवाही होत नसल्याचे कळविले आहे.

हायकोर्टाने आदेश देऊनही विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कमिटी प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले आहेत. जयंती नाल्यात मैलायुक्त सांडपाणी सोडल्याप्रकरणी आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अ​धिकारी नरसिंग शिवांगी यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील वस्तुस्थिती मांडली. जयंती नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मैलायुक्त सांडपाणी सोडण्याचा प्रकार, महापालिकेला बजावलेली नोटीस, महापालिकेकडून उपाययोजना करण्यासंदर्भात दिलेले पत्र याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असे सांगितल्याचे शिवांगी यांनी सांगितले.

दरम्यान, नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. हायकोर्टाने आदेश देऊनही महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही नाही. प्रदूषणप्रश्नी गुरुवारी जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे ठरले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी अ​धिकाऱ्यांना वेळ मिळाला नाही. नाल्यात मिसळलेल्या सांडपाण्या पंचनामा करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात लक्ष्मीपुरी व शाहूपुरी पोलिसांना कळविले असता त्यांनी ते आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत पंचनाम्यास नकार दिला. नंतर जिल्हा पोलिस अधिक्षकांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी मॉनिटरींग कमिटीकडे (विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कमिटी) तक्रार दिल्यास गुन्हा नोंद करू असे सांगून कारवाई करण्याचे टाळले असा आरोप प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांना मेल करून कारवाईची मागणी केली आहे.

महापालिकेकडून दिवसभरात प्रदूषण रोखण्यास विविध उपाययोजना केल्या आहेत. जयंती नाल्यावर तात्पुरत्या बंधारा उभारला असून मातीची पोती टाकून सांडपाणी अडविले आहे. दुधाळी पंपिंग स्टेशन बंद ठेवले आहे. याशिवाय जयंती नाला पंपिंग स्टेशनमधील तिसरा पंप सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - आर. के. पाटील (पर्यावरण अभियंता, महापालिका)

रस्त्यांचा अहवाल

रस्ते विकास प्रकल्पाच्या रस्त्यांचा दर्जा, अपुरी कामे यासंदर्भात फेर मूल्यांकन समितीच्या शुक्रवारी (ता. ५ जून) बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे एमएसआरडीसीच्या कार्यालयात दुपारी बारा वाजता ही बैठक होईल. मूल्यांकन समिती सदस्यांसह एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित राहतील. रस्त्यासाठी वापरलेले मटेरियल, त्याच्या क्षमतेसंदर्भात अहवाल शुक्रवारी उपलब्ध होणार आहे.

आयआरबी कंपनीच्या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा आणि अपुरे असल्याचा आक्षेप टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे. रस्त्यांचा सर्व्हे आणि प्रकल्पाचे फेरमूल्याकंन सध्या सुरू आहे. आयआरबीने कोल्हापुरात तेरा रस्ते तयार केले आहेत. या रस्त्यासाठी वापरलेले साहित्य दर्जेदार आहे का ? करारानुसार त्या क्षमतेचे मटेरिअर वापरले आहे का ? रस्ते दर्जेदार आहेत का ? यासंदर्भात तपासणी केली जात आहे. प्रत्येक रस्त्याचे नमुने घेऊन एमएसआरडीसीच्या पुणे येथील प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली. गुरूवारी दिवसभर त्याची तपासणी (टे​स्टींग) केली.

अधिक्षक अभियंत्याकडून शुक्रवारी अहवाल दिला जाणार आहे. मूल्यांकन समितीचे सदस्य व आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र सावंत व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून नोबेलक कंपनीने सादर केलेल्या रस्त्यांचा सर्व्हेची सध्या फेरतपासणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात तेरा रस्त्यांचे नमुने घेण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मे प्रभाग महिलांसाठी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या ऑक्टोबर महिन्यात महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८१ प्रभागापैकी ३३ प्रभाग हे इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय गटासाठी राखीव होणार आहेत. त्यापैकी २२ प्रभाग हे इतर मागासवर्गीयासाठी तर ११ प्रभाग हे मागासवर्गीयासाठी राखीव असतील. नव्या सभागृहात महिला सदस्य पन्नास टक्के असणार आहेत. विविध गटात मिळून महिलासाठी राखीव प्रभागांची संख्या ४१ असेल. येत्या आठ दिवसात या प्रभाग रचनेवर निश्चितीची मोहर उमटणार आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन निवडणुकीची तयारीला लागली असून निवडणूक कामासाठी अ​धिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ता केल्या जात आहेत. आधार कार्ड लिं​किंग, मतदार जागृती यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रशासनाकडून पुढील आठवड्यात निवडणूक कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

महापालिकेची आगामी निवडणूक ही २०११ च्या लोकसंख्येनुसार होणार आहे. त्या लोकसंख्येच्या आधारे प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रभाग निश्चिती होणार आहे. सध्या सभागृहातील सदस्य संख्या ७७ इतकी असून आगामी निवडणुकीसाठी त्यामध्ये चारची भर पडणार आहे. ८१ सदस्यापैकी ४१ महिला सदस्य असणार आहेत. ८१ प्रभागापैकी ४८ प्रभाग खुल्या गटासाठी असणार आहेत. ४८ खुल्या गटातील प्रभागापैकी २४ प्रभाग महिलासाठी राखीव असणार आहेत. इतर मागासवर्गीय गटासाठी (ओबीसी) २२ प्रभाग आरक्षित असून त्यामध्ये पन्नास टक्के प्रभाग (११) महिलासाठी असतील. मागासवर्गीय गटासाठी (एससी) आरक्षित प्रभागाची संख्या ११ इतकी असून यापैकी सहा प्रभाग महिलासाठी राखीव असणार आहेत.

एकूण प्रभाग - ८१

खुले - ४८

पैकी महिलांसाठी - २४

इतर मागासवर्गीय - २२ (ओबीसी)

यापैकी महिलांसाठी - ११

मागासवर्गीय गट - ११

यापैकी महिलांसाठी - ६

काँग्रेस : विद्यमान सभागृहात काँग्रेसचे ३२ नगरसेवक आहेत. निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने माजीमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. जून महिन्यात समितीची बैठक होईल. मात्र पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस : राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या २७ नगरसेवक आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यासोबत मित्रपक्ष जनसुराज्य शक्ती होता. या पक्षाचे नऊ नगरसेवक आहेत. सध्या महापौरांच्या लाचखोरीच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीची पूरती बदनामी झाली असली तरी आगामी निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्र लढतील अशी चिन्हे आहेत.

शिवसेना : विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यात दणदणीत यशानंतर सध्या शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. सेनेचे विद्यमान चार नगरसेवक आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सेनेत जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आणि आमदार क्षीरसागर असे तिन्ही गट स्वतंत्र आहेत. त्यामुळे दुफळीची शक्यता आहे.

भाजप : केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्तेनंतर भारतीय जनता पक्षाने वातावरण नि​र्मिती सुरू केली आहे. पक्षाची प्रदेश कार्यकारिणी परिषद घेऊन त्याची सुरूवातही केली. सध्या भाजपचे तीन नगरसेवक आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीसंदर्भात सर्वाधिकार दिले आहेत. ताकत वाढविण्यासाठी पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

पुरस्कृत : मावळत्या सभागृहात सेना आणि भाजप पुरस्कृत दोन नगरसेवक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमावादात अडकला विकास

$
0
0


‍म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ताराबाई पार्कची ओळख आहे. शहरात अगदी केंद्रस्थानी असलेला हा प्रभाग आहे. सासने ग्राउंड तसेच ताराबाई गार्डन अशी महत्त्वाची ठिकाणे या प्रभागात येतात. प्रभागाचे प्रतिनिधीत्व पल्लवी देसाई करत आहेत. ताराबाई गार्डनचा विकास, सासने ग्राउंडच्या भवतीचे चॅनलचे काम याशिवाय विविध रस्ते ही त्यांची महत्त्वाची कामे त्यांच्या कालावधीत झाली आहेत. पण भागातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आयलँड आणि रोड डिव्हायडर बसवणे, तसेच काही परिसरातील गटारींची कामे होऊ शकलेली नाहीत.

येथील नागरिकांच्यादृष्टीने ताराबाई गार्डन हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या ठिकाणी योगासनांसाठी चौथरा, खेळणी, सँडपीट, कंपाउंड वॉलचे काम पूर्ण झाले आहे‍. याशिवाय सासने ग्राउंडच्या भवतीने चॅनल बांधण्याची आवश्यकता होती, ते काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथील सांडपाण्याची निर्गत चांगल्या पद्धतीने होत आहे. येथील दिलीप देसाई सभागृहात अत्याधुनिक व्यायामशाळा उभी राहत असून त्यासाठीचे साहित्य आणण्यात आले आहे. याशिवाय दाभोळकर कॉर्नर ते अदित्य कॉर्नर हा रस्ता, बेकर गल्लीतील रस्ता, धैर्यप्रसाद हॉल ते कृष्णा सेलेब्रिटी इमारतीपर्यंचे ड्रेनेज लाईन, अमर गांधी यांचा बंगला ते शशी गजवाणी यांच्या बंगल्यापर्यंतचा रस्ता, तात्यासाहेब मोहिते हाउसिंग सोसायटी ते तेंडुलकर बंगला तसेच तेंडुलकर बंगला ते हिंद नगर पर्यंत ड्रेनेजेच काम पूर्ण झाली आहेत. याशिवाय इतर ही रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत, तसेच ज्या ठिकाणी ट्यूब लाइट होत्या त्या बदलून सोड‌ियम व्हेपर बसवल्याने रात्री रस्त्यावर चांगला उजेड मिळतो.

अर्थात ही कामे होत असतानाचा इतर बरीच कामे होऊ शकलेली नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. विशेषत: आदित्य कॉर्नरच्या चौकात आयलँड तसेच स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत अशी नागरिकांची मागणी आहे. या मार्गावर वाहने अत‌िशय भरधाव वेगाने येत असतात. या ठिकाणी पूर्वी आयलंड होता, तो रस्ता बनवताना काढावा लागला. पण आयलँड काढल्यामुळे या चौकातील वाहतुकीची शिस्त बिघडली आहे.

तसेच पर्ल हॉटेलच्या मागील न्यू शाहुपुरी येथील रस्ता खराब झाला असून त्यावर डांबरीकरण होण्याची आवश्यकता आहे. हा रस्ता म्हणजे ताराबाई पार्क परिसरातील सीमावाद असल्याचे नागरिक सांगतात. एक बाजू ताराबाई पार्क तर एक बाजू शिवाजी पार्कमध्ये असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण, ड्रेनेज लाइन बदलणे, गटर बसवणे ही कामे रखडलेली आहे. याशिवाय यामार्गावर फक्त एकाच बाजुला गटर आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचून राहिलेले असते. तसेच घरकुल योजनेच्या मागील बाजूला ही गटारी झालेल्या नाहीत. या‌शिवाय काही अंतर्गत रस्त्यांवर काँक्रीटीकरण करण्याची गरज आहे. दाभोळकर कॉर्नर ते सासने ग्राउंडपर्यंतच्या रस्त्यावर अनेकवेळा रस्त्यावरच सांडपाणी वाहत असते, यावर ही उपययोजना होणे आवश्यक आहे.

भागात दोन कोटींपेक्षा जास्त कामे झालेली आहेत. बैलगोटा येथे असलेल्या ओपनस्पेसवर उद्यान विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच न्यू शाहुपुरी ते पर्ल हॉटेलपर्यंतचा रस्ता होणार आहे. सासने ग्राउंडच्या भवतीचे चॅनलचे काम पूर्ण झाले असून सासने ग्राउंडचा चांगला विकास करण्याचे नियोजन आहे. ताराबाई गार्डनमध्ये चांगली कामे केली असून तेथे मारुती मंदिर आणि महादेव मंदिरही बांधले आहे. मुख्य रस्त्यांची तसेच अंतर्गत रस्त्यांची जवळपास सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. - पल्लवी देसाई, नगरसेविका

नगरसेवकांचा भागातील संपर्क चांगला आहे. फोनवरही ते तत्परतेने उपलब्ध असतात. ताराबाई गार्डन चांगल्यापद्धतीने विकसित केली आहेत. याशिवाय अंतर्गत रस्त्यांची कामे ही पूर्ण झाली आहेत, तसेच सासने ग्राउंडच्या भवतीने चॅनल बांधल्याने महत्त्वाचे काम मार्गी लागले आहेत. स्वच्छतेचा फारसा प्रश्न भेडसावत नाही. काही मुख्य रस्त्यांवर रोड डिव्हायडर बसवणे आणि पर्ल हॉटेलपासून ते न्यू शाहुपुरीपर्यंता रस्ता डांबरी व्हावा तसेच येथील गटारींची कामे व्हावीत, अशी मागणी आहे. - चंद्रकांत बेनाडे, नागरिक

इच्छुक उमेदवार - मंगला कुलकर्णी, राजू भोरे, संजय घाटगे, दिग्विजय पाटील कौलवकर, आरीफ शेख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयांची वानवा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे सर्वाधिक प्रमाण असल्याबद्दल कौतुकास पात्र ठरलेल्या कसबा बावड्यातील हनुमान तलाव या प्रभागात स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भागातील ३० ते ४० वर्षापूर्वी जुन्या असलेल्या तब्बल दीडशे शौचालये मोडकळीस आली आहेत. महिन्याकाठी केवळ २५ हजार रूपयांच्या तुटपुंज्या निधीत या सार्वजनिक शौचालयांची देखभाल शक्य नसल्याने अवस्था बिकट झाली आहे. १०० फूटी डीपीरोडमध्ये स्मशानभूमीची जागा गेली आहे. तर स्मशानभूमीतील रक्षा थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे हा धोका वाढला आहे. गेल्या तीन वर्षापासून स्मशानभूमीचे काम रखडले आहे.

या प्रभागातील संकपाळ नगर, निगवे नाका, दत्तमंदिर अशा तीन झोपडपट्ट्यांसह आंबेडकरनगर, सावरकर नगर, जय शिवराय कॉलनी, हनुमान तलाव, पिंजार गल्ली, शिंदे गल्ली, वाडकर गल्ली, जयभवानी गल्ली, कागलवाडी, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा, हनुमान तलाव या भागाचा समावेश या प्रभागात आहे. नगरसेवक संदीप नेजदार या भागात प्रथमच निवडून आले आहेत. त्यांचा संपर्क भागात चांगला आहे. राजाराम बंधाऱ्यापासून ते प्रिन्स शिवाजी शाळेपर्यंत तसेच मूळ गावठाणातील काही गल्ल्यांमध्ये हा प्रभाग विस्तारलेला आहे. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक नागरिकांशी संपर्क साधून नागरी वस्तीपर्यंत पोहोचताना नगरसेवकाला तारेवरची कसरत करावी लागते. मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांची याठिकाणी जास्त वस्ती आहे. प्रभागात (राजाराम बंधाऱ्याजवळ) स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीवर प्रस्तावित शंभरफुटी रस्ता डीपी रोडच्या जागेत जात असल्याने स्मशानभूमीचे दोन भाग होणार आहेत. त्यामुळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे म्हणावे तसे पालिकेचे लक्ष नाही. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी आंदोलने झाली, निधीची घोषणा झाली; परंतु स्मशानभूमीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मशानभूमीतील राख सध्या थेट पंचगंगा नदीत सोडली जाते. नगरसेवकांनी काही प्रमाणात स्मशानभूमीचे काम केले आहे; परंतु ते अपूर्ण आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे. या प्रभागात सुमारे १५० सार्वजनिक शौचालये व दहा मुताऱ्या आहेत. ही शौचालये २५ ते ४० वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आलेली आहेत. किरकोळ दुरुस्ती करण्याऐवजी ही शौचालये पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. प्रभागात ठिकठिकाणी दहा मुताऱ्या आहेत. त्यांचीही मोडतोड झालेली आहे. काही मुताऱ्यांना आडोसा नाही. यात प्रभागातील हनुमान तलाव, मिनी चौपाटीचीही काही प्रमाणात दूरवस्था झालेली आहे. नगरसेवकांनी खेळण्यांची दुरुस्ती करून काही ठिकाणी विद्युत बल्ब बसविले आहेत; परंतु तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. तसेच त्या पाण्याच्या बाजूला गवत, झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा येते. रस्ते, पाणीपुरवठा, रस्त्यावरील दिवे यांची स्थिती ठीक आहे मात्र, मोडकळीस आलेली स्मशानभूमी, शौचालये, आंबेडकरनगरमधील खराब झालेले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रभागातील प्रिन्स शिवाजी नगर झोपडपट्टीतील नागरिक प्रॉपर्टी कार्डाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ७/१२ मिळावा म्हणून ते प्रतीक्षेत आहेत. नगरसेवकांनी अशा ३७० फाइल्स जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या आहेत; परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. प्रभागात अन्य ठिकाणाचे रस्ते चांगले आहेत. पिण्याच्या पाण्याची तक्रार नाही. रस्त्यावरील दिव्यांची सोयही चांगली आहे.

भागात पाइपलाइन टाकून पिण्याचा पाण्याची चांगली सोय केली आहे. दहा लाख रुपयांचे एलईडी बल्ब बसविले आहेत. भागातील रस्ते केले. आंबेडकरनगरमधील रस्ते लवकरच केले जातील. प्रभागात ४८ घरकुल योजना मार्गी लावल्या. दत्तमंदिर, निगवेनाका आणि संकपाळनगर झोपडपट्टीतील ३७० प्रकरणे प्रॉपर्टीकार्डासाठी केली आहेत, मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाहीत. लोकवर्गणीतून १६ लाख रूपये निधी उभारून महापालिकेची पहिली शाळा असलेली शिवाजी विद्यालयाचा विकास केला. - डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक

आंबेडकर उद्यानाचे गेट नादुरूस्त झाल्याने येथे फिरस्त्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २५० फुटावरून पाइपलाइनबाबतही कार्यवाही झालेली नाही. अंतर्गत रस्त्यांबाबत उदासीनता आहे. भागात सार्वजनिक शौचालये आहेत, मात्र त्यांच्या दुरूस्ती आणि स्वच्छतेबाबत कोणतेही काम होत नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. स्मशानभूमीमध्ये शेडची अवस्था वाईट झाली आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत दखल घेतली जात नाही. - धीरज मोरे, नागरिक

इच्छुक उमेदवार - डॉ. संदीप नेजदार, सुरेश पाटील, सुरेश उलपे, सचिन कोटकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशपूजेतून सामाजिक संदेश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ओढ्यावरील सिद्धी विनायकाच्या मंदिरात प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला अलंकार पूजा बांधली जात आहे. प्रत्येक महिन्यातील सण, महिन्याच्या वैशिष्ट्याला अनुसरून पूजा बांधत असताना या पूजेतून सामाजिक प्रबोधनपर संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे जयंती नाल्यावर सिद्धीनियक मंदिर आहे. २०११ मध्ये देवस्थानचे पुजारी अदिनाथ सांगळे यांनी अलंकार पूजा बांधण्यास सुरूवात केली. गणेश जन्मकाळ रूपातील पूजा बांधली. त्यानंतर महाशिवरात्रीला महादेवाची पूजा गणराय करत आहेत या रूपातील पूजा बांधली होती. भाविकांनाही अलंकार पूजा व त्या मागच्या संकल्पना आवडल्या.

मंदिराचे पुजारी पंकज दादर्णे म्हणाले, प्रत्येक संकष्टीला सकाळी अभिषेक व आरती झाल्यानंतर सकाळी दहा वाजता अलंकार पूजा बांधण्यास सुरूवात केली जाते. अर्धा ते दोन तासात पूजा बांधली जाते. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी अलंकार पूजा ठेवली जाते. पूजेसाठी स्वतः पूजारी, कलाकार, भाविक वस्तू आणून देतात. कोणी मूर्ती देतात तर कोणी फळे देतात. कोणी दागिने उपलब्ध करून देतात. या वस्तू पुन्हा भाविक व मदत करणाऱ्यांना दिल्या जातात. गेल्या चार वर्षात कमळातील गणेश, रिद्धी सिद्धीसमवेत गणेश, जास्वंदीच्या फुलातील गणेश, गरूड रूपातील, बालाजी, खंडोबा म्हाळसा, तबला वादन करणारे गणेश पूजा बांधण्यात आली आहे. सणाचे औचित्य साधताना रंगपंचमीला रंग खेळणारा गणेश, चैत्र पोर्णिमेला जोतिबा रूपातील गणेशाची पूजा बांधली जाते. गतवर्षी संकष्टी चतुर्थी शाळा सुरू होण्याच्या सुमारास आली होती. 'स्कूल चले हम' हा संदेश देण्यासाठी गणरायांच्या मांडीवर शाळेच्या गणवेशातील दप्तरासह एक मुलगा बसून गणराय त्याला शाळेला घेऊन जाणार असल्याची पूजा मांडण्यात आली होती. दुर्वांचे आयुर्वेदातील महत्त्व हे लक्षात घेऊन दुर्वांची पूजा बांधण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इको टुरिझम वाढवू

$
0
0


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये पर्यावरण संवर्धनाबरोबरच संरक्षणासाठीही बरेच उपक्रम राबवावे लागत आहेत. त्यामुळे निसर्गसंपन्नतेने व जैवविविधतेने नटलेला जिल्हा म्हणून आपण अभिमानाने सांगत असलो तरी काही अयोग्य बाबींचा शिरकाव होत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील पर्यावरण स्थिती व आगामी योजनांबाबत उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे यांच्याशी केलेली बातचीत... (शब्दांकन - उदयसिंग पाटील)

निसर्गसंपन्न कोल्हापूर अशी सर्वदूर ओळख असलेल्या जिल्ह्यात पर्यावरणाची नेमकी स्थिती कशी आहे?

हवा प्रदूषणाबाबत बोलायचे झाल्यास अजून स्थिती नियंत्रणात आहे. पण जिल्ह्यातील जी जी शहरे आहेत, तिथे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत ही वस्तुस्थिती आहे. पश्चिम घाट हा जैवविविधतेच्यादृष्टीने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून संरक्षित केला आहे. त्यामुळे जंगल किती आहे यापेक्षा ते किती किमती आहे हे महत्त्वाचे आहे. इतर जिल्ह्यांमध्ये किमती जंगल संपदा पहायला मिळेल. पण जिल्ह्यातील वनस्पती, प्राणी यांचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना हव्यात?

जिल्ह्यात इको टुरिझमसाठी पोषक असे वातावरण आहे. त्यामध्ये देशात प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवायचे उद्दिष्ट आहे. विमानतळ असल्यास त्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणासाठी जे वनविभागाचे सहकार्य आवश्यक आहे. त्यानुसार पुढाकार घेऊन दोन ते तीन महिन्यात विस्तारीकरणाला चालना दिली जाईल. इको टुरिझम विकासासाठी विमानतळाचा अडथळा येऊ ​देणार नाही. याशिवाय पन्हाळा ते विशाळगड यासारख्या अनेक ठिकाणी ट्रेक सुरु करण्याची परिस्थिती आहे. तिथे केवळ ट्रेक न होता, निसर्ग वाचन झाले पाहिजे, यादृष्टीने काम केले जाणार आहे. देवराई या स्थानिकांच्या धार्मिक अधिष्ठान आहेत. स्थानिकांना सोबत घेऊन तिथे वेगळी योजना राबवता येणे शक्य आहे. जंगलाच्या सीमेवर सोलर फेन्सिंग, धार्मिक पर्यटन आराखडा, जैवविविधता उद्यान, मेस काठीचा नुकसानभरपाईत समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पर्यावरण रक्षणासाठी नेमकी सामाजिक व वैयक्तिक जबाबदारी कोणती आहे?

जंगलसंपदा वाचवण्याची ही कुणा एकट्याची जबाबदारी नसून सामुहिक जबाबदारी आहे. त्याकरिता त्या जंगलाचे महत्त्व प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत कसे आहे व ते नसल्यास जीवन चालू शकणार नाही याची जागृती पटवून देण्याची गरज आहे. वनसंरक्षक समिती, ग्रामसभा, ग्रामपंचायत समितीच्यावतीने सामुहिक पद्धतीने काम करता येते. त्याशिवाय वैयक्तिक पातळीवर आवश्यक तितकाच वीजेचा वापर, त्याच पद्धतीने पाण्याचा वापर करण्याबरोबरच वाहनांचाही अति​रेकी वापर टाळला पाहिजे. सायकल चालवणे हे स्टेटस सिम्बॉल बनले पाहिजे.

सामान्य नागरिकांना समजण्यासाठी पर्यावरणाची नेमकी व्याख्या काय?

जिथे पाणी अथवा हवेतील प्रदूषणामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असते, तेथील पर्यावरण चांगले हे ढोबळमानाने समजण्यास हरकत नाही. अनेक ठिकाणी पाण्यातील प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कायम असते. हीच परिस्थिती हवा प्रदूषणाबाबतही आहे. यामुळे फुफ्फुसाबाबतचे आजार वाढतात व बळावतात. ज्या ठिकाणी या दोन्ही कारणांनी आजारी असणाऱ्यांची संख्या कमी असते, तिथे साहजिकच प्रदूषण कमी असून पर्यावरण चांगल्या प्रकारचे आहे असे समजण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विम्यातून रुग्णांची लूट

$
0
0


सतीश घाटगे, कोल्हापूर

जीवनामध्ये विमा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली गेली आहे. आर्थिक सुरक्षिततेबरोबरच अचानक उद्‍भवणाऱ्या परिस्थितीला आरोग्य विमा गरजेचा असला तरी या योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. यामध्ये काही डॉक्टर्स पुढे आहेत. विमा कंपनीकडून जेवढे वसूल करता येईल तेवढे करायचे आणि रूग्णालाही चुना लावायचा असा दुहेरी डल्ला हे डॉक्टर्स मारत आहेत. यामध्ये गरीब आणि ज्यांनी आपल्या कमाईचे पैसे घालून विमा उतरवला आहे, अशांची फरफट होत आहे. या लुटालुटीत डॉक्टर मात्र, मालामाल होत आहेत.

आपले आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आपण दक्ष असलो तरी, अचानक असा एखादा आजार उद्‍भवतो की, खर्चाच्या कल्पनेने आपण हैराण होतो. अशा वेळी आपल्या मदतीला धावून येतो तो आरोग्य विमा. मात्र, हाच आरोग्य विमा काही डॉक्टरांच्या लुटमारीचे केंद्र होत आहे. तुमचा आरोग्य विमा असेल तर भरमसाठ बिल करून ती रक्कम वसूल केली जाते. काही वेळा विमा कंपनीनीने नाकारलेली रक्कम हट्टाने रूग्णाच्या नातेवाईकाकडून वसूल करतात. अशा वेळी डॉक्टर साळसूद भूमिका घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना पुढे लावतात. त्यामुळे नातेवाईक हतबल होतात.

आरोग्य विम्यामध्ये जागृती होत असल्याने त्याचा फायदा रूग्णाला होत असला तरी हॉस्पिटल व डॉक्टरांची चांगलीच चांदी होत आहे. आरोग्य विम्यामुळे डॉक्टरांच्या खात्यात भारी रक्कम सहज पडत असल्याने डॉक्टर मंडळीच विमा काढण्यासाठी रूग्णांचे मन वळवू लागले आहेत.

हॉस्पिटलच्या खर्चामुळे रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडते. पण सध्या आरोग्य विमा काढण्याबाबत चांगलीच जागरूकता झाली आहे. सरकारी नोकरीत आयुर्विम्यासह आरोग्य विमाही उतरवला जातो. बड्या कंपन्या व खासगी कंपनीतही कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरवले जात आहे. आरोग्य विम्यामध्ये आयुर्विमाप्रमाणे परतफेड होत नाही पण अचानक उद्‍भवलेल्या आजारांमध्ये उपचार करण्यासाठी हा विमा उपयोगी पडतो. आरोग्य विमा पॉलिसी करणाऱ्यांना उपचार, तपासण्या, शस्त्रक्रिया, औषधे, सेवा यांची भरपाई मिळते.

आरोग्य विम्याच्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांनी प्रत्येक शहरातील नामांकित हॉस्पिटल पॅनेलवर ठेवली आहेत. वर्षातून एक वेळ स्वतःसाठी अथवा कुटुंबातील सदस्यांच्या उपचारावरील भरपाई विम्याद्वारे मिळू शकते. विम्याची भरपाई दोन प्रकारे मिळते. एक स्वतः उपचाराची रक्कम खर्च करून कंपनीकडे क्लेम करणे अथवा पैसे न भरता नियमानुसार कॅशलेस सुविधा घेऊन रूग्णांचा खर्च परस्पर हॉस्पिटल व कंपन्या करारानुसार देतात.

कॅशलेस सुविधेवेळी काही डॉक्टर भरमसाठ बिले करून घेतात आणि त्यातील काही रक्कम विमा कंपनीने नाकारली तर ती रुग्णाकडून वसूल केली जाते. आरोग्य विमा असल्याचे सांगितल्यावर हॉस्पिटलमधील यंत्रणा कामाला लागते. आरोग्य विम्याची खातरजमा झाल्यावर विम्याचे रूग्ण व सर्वसाधारण रूग्ण यांच्यावरील बिलांची भिंत रूंद होत जाते. तपासणी, शस्त्रक्रिया, औषधे, आरोग्य सेवेचा खर्च नेहमीच्या रूग्णांच्या खर्चापेक्षा वीस ते तीस टक्के अधिक आकारला जातो. अधिक दर लावल्याने त्याचा फटका रूग्णाच्या नातेवाईकांना बसतो. शस्त्रक्रियेच्यावेळी हॅन्डग्लोव्हज, कॉटन (कापूस) हे साहित्य मोठया प्रमाणात लागते. हा खर्च विम्यामध्ये धरला जात नाही. तो खर्च हॉस्पिटल प्रशासन रूग्णांकडून डिस्चार्जच्यावेळी वसूल करतात. विम्याची रक्कम कंपनीकडून मिळत असली तरी रूग्णांच्या खिशातून जादा रक्कम करण्यासाठी काही डॉक्टर फंडे वापरत असल्याने आरोग्य विम्याविषयी रूग्णांच्या नातेवाईकांचे मत कलुषित होते. आरोग्य विमा हा सर्वांच्यादृष्टीने फायदा असताना त्याच्याकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले जात असल्याने आरोग्य विमा चांगला असूनही त्याची बदनामी डॉक्टर मंडळींच्यामुळे जास्त होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विमा हा रूग्णांच्या हितासाठी असतो. आरोग्य विमा आहे म्हणून डॉक्टर अथवा हॉस्पिटल बिल वाढवत नाहीत. विमा कंपन्यांचे जे स्टँडर्ड असते त्याप्रमाणे बिल केले जाते. उलट काही रूग्णांकडून महागड्या रूमची व सेवांची मागणी केली जाते. बिल जादा असेल तर त्याची माहिती जाते. - डॉ. अभय चौगुले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसासाठी कोल्हापूर सज्ज

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन तातडीने व्हावे यासाठी गावपातळीवर गट तयार करण्यात आले असून १२९ गावांचा तातडीने आराखडा तयार करण्यात आला आहे. हे गट अत्याधुनिक संवाद साधनांच्या माध्यमातून जोडण्यात आले आहेत. आपत्तीचा फटका बसणारी सर्वांत जास्त गावे शिरोळ तालुक्यात असल्यामुळे याठिकाणी नुकतीच प्रात्यक्षिके घेण्यात आली.

२००५ मध्ये आलेल्या पुरामुळे प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्या वर्षीपासून प्रत्येक पावसाळ्याच्या सुरूवातीलाच आपत्ती व्यवस्थापन सज्ज असते. यावर्षी अधिक पावसाची शक्यता नसली तरीही आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. माळीणच्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील २० गावांत काळजी घेतली आहे. दऱ्याखोऱ्या, डोंगर आणि गडाच्या पायथ्याशी ९८६ घरे, ११११ कुटुंबे आणि ५ हजार २३१ लोक धोकादायक परिस्थितीत आहेत. सरकारी पातळीवर याठिकाणी कोणत्याही उपाययोजनांबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर संबंधितांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गावपातळीवर वेगवेगळे आठ गट तयार केले आहेत. यामध्ये पूर्वसूचना गट, शोध व सुटका गट, प्रथमोचार, अन्न व निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था, पोहणाऱ्यांचा गट, वाहनधारकांचा गट अशा गटांचा समावेश आहे. हे सर्व गट संवादाच्या साधनांनी जोडले आहेत. हे गट आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सर्व घटनांची माहिती कळवत राहतील. आपत्ती व्यवस्थापन कक्षात असलेल्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधून ही माहिती कळविली जाणार असल्यामुळे या विभागाचे काम अधिक सोपे होणार आहे.

रस्त्यांवर उन्मळून पडलेली झाडे, घरांची पडझड, पुराचा वेढा, पुरात अडकलेले लोक, बंद रस्ते, त्याबरोबरच पावसाचे प्रमाण वाढू लागल्यास काळजी म्हणून काय उपाययोजना करता येतील याबाबतही आपत्ती विभाग काम करणार आहे. त्यासाठी बोटी, जीवरक्षक जॅकेट, जीवरक्षक रिंग, टॉर्च सर्च लाइट, मेगाफोन वापरले जाणार आहेत.


उपलब्ध साधनसामग्री

इनफ्लेटेबल मोटरबोट १०

आऊट बोट मशीन १०

लाइफ जॅकेट १५०

लाइफ रिंग १६०

टॉर्च सर्च लाइट ४०

लाइफ बॉइज ३०

सेफ्टी हेल्मेट ४०

बी. ए. सेट ५

मेगाफोन ७०

फ्लोटींग पंप ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईसाठी सुवर्णपालखी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

सप्टेंबर २०१५मध्ये अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच राज्यातील अन्य देवस्थानच्या धर्तीवर अंबाबाईसाठी सुवर्णपालखी तयार करण्याचा मनोदय भाविकांच्यावतीने करण्यात आला आहे. याअंतर्गत महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून भाविकांकडून शुद्ध सोने व रोख रक्कम स्वरूपात देणगी स्वीकारली जात आहे. सुवर्णसंचय आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

अंबाबाईच्या सध्याच्या लाकडी पालखीवर सुवर्णसाज चढवण्यासाठी ४० किलो सोन्याची आवश्यकता आहे. यामध्ये पालखीसोबत सोन्याच्या चवऱ्या आणि सोन्याचे मोर्चेल आणि अब्दागिरी प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यातील भाविकांकडून सोने, रोख रक्कम देणगी स्वरूपात ट्रस्टकडे जमा होत आहे. भाविकांकडून देणगी स्वीकारण्यासाठी कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर येथे ट्रस्टचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा झाल्यानंतर भाविकांना पावती देण्यात येत आहे. सोने दानस्वरूपात देणाऱ्या भाविकांसाठी कॅरोटोमीटरची सुविधा आहे. जेणेकरून २४ कॅरेट सोने असल्याची पाहणी करून ते स्वीकारले जाते. कार्यालयात सीसीटिव्ही कॅमेऱ्याची सोय असून सोने, रोख रक्कम स्वीकारताना ती पारदर्शी रहावी याचा विचार करण्यात आला आहे.

पालखीवर धर्मशास्त्रीय संदर्भानुसार अंबाबाईच्या परिवारातील सुवर्णप्रतिमा साकारण्यात येणार आहेत. सध्या पालखीचे काम कोल्हापुरातील वाय. पी. पोवार नगर येथील कारागीर गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पालखी घडवणारे सर्व कारागीर शाकाहारी आणि व्यसनमुक्त आहेत. आजमितीला ट्रस्टकडे साडेचार किलो सोने जमा झाले असून पालखीचे प्राथमिक काम सुरू होण्यासाठी सात किलो सोन्याची आवश्यकता आहे. पालखी बनवण्याच्या संपूर्ण कामाचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

येथे जमा करा सोने किंवा रोख रक्कम

सुवर्ण पालखीसाठी भाविक ट्रस्टच्या खात्यात रोख रक्कम थेट जमा करू शकतात. त्यासाठी कॅनरा बँकेमध्ये श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट, कोल्हापूर या नावे खाते क्रमांक ०३००१३२०००००१, आयएफएससी कोड सीएनआरबी ००००३०० या क्रमांकावर किंवा स्टेट बँक ऑफ ​इंडियाच्या दसरा चौक शाखेत ३४९१०६०६४९२ या खाते क्रमांकावर पैसे जमा करण्याची सुविधा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौगुलेंची 'सायकल' फॅमिली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वृक्षारोपण हा निसर्ग संवर्धनाचा महत्वाचा भाग. पण, त्याबरोबर पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण रोखण्याचेही महत्व तितकेच आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर हा चांगला पर्याय. त्यासाठी सायकल वापर हा स्वस्त व निरोगी राहण्यास मदत करणारा एक चांगला पर्याय आहे. या पर्यायाकडे अनेकजण हळूहळू वळू लागले असून काहींनी सर्व साधने हाताशी असताना सायकलचा वापर कायम ठेवला आहे. काही व्यावसायिक, नोकरदारही व्यायामासाठी म्हणून सायकलीकडे वळू लागले असले तरी भविष्यात तेच सायकलचा वापर इतर कामासाठी करण्याची शक्यता जास्त आहे.

महालक्ष्मीनगरमधील चौगुले कुटुंब सायकलसारख्या पर्यावरणपूरक साधनाचा वापर करण्यात आघाडीवर आहे. आज सत्तरीत असलेले ज्ञानदेव चौगुले अजूनही शिरोलीसारख्या गावाला जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. ते हॉटेल एलिगंटजवळ असलेल्या कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीत असल्यापासून सायकल चालवतात. पूर्वीपासून सायकल हेच त्याचे प्रवासाचे माध्यम वापरत असल्याने यावयातही ते आरामात सायकलवरून प्रवास करतात. त्यांची तीन मुले व नातवंडेही सायकलचाच वापर करतात. त्यांच्या घरात अकरा सायकली आहेत. वडील, तीन मुले, तीन नातवंडे यांचा शहरातील प्रवास सायकलचाच असतो. सकाळी दूध टाकण्याबरोबरच नोकरीला जाण्यासाठी सायकलचाच वापर करतात. मुलांनाही शाळेसाठी रिक्षा वगैरे न लावता सायकलनेच ये-जा करतात. जीवनशैली पर्यावरणपूरक करण्यासाठी या कुटुंबांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. कमी गरजा ठेवून साधनांचा मर्यादित वापर करण्याची शैली अंगीकारल्याने चौगुले कुटुंबिय शारीरीकदृष्ट्याही सक्षम आहे, असे अनिल चौगुले यांनी सांगितले.

फुलेवाडी येथील भिमराव साळोखे हेही ७८ वयाचे असले तरी अजूनही सायकलचाच वापर करतात. चौथीपासून सायकल चालवणाऱ्या साळोखे यांनी शाहू मिलमधील नोकरीही सायकलच्या आधारावरच केली. मुलांनाही शाळेपासून सायकलचीच सवय लावली. साळोखे सध्या निवृत्त असले तरी त्यांनी अजूनही सायकल सोडलेली नाही.

नोकरदारांची पसंती सायकलला

अनेक व्यावसायिक, नोकरदार व्यायामासाठी सायकलीचा वापर करू लागले आहेत. सकाळी सायकल घेऊन फिरती करत व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकजण सायकल चालवण्यासाठी जोतिबासाठी जाणारेही आहेत. भटकंतीबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी थोडे सहाय्य करण्याचा उद्देश त्यामध्ये आहे. 'पर्यावरण रक्षणाचे महत्व हळूहळू सर्वांपर्यंत पोहोचत आहे', असे एचएकेसीसीचे सुचीत हिरेमठ यांनी सांगितले.

पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ५ जून) शहरातील झाडांवर लावण्यात आलेले फलक, बॅनर हटवण्यात येणार आहेत. सकाळी आठ वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर राजारामपूरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी यासह अनेक भागात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अवधूत अपराध यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा टोलनाका मालामाल

$
0
0


आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील नऊ टोल नाक्यांद्वारे आयआरबी कंपनीला रोज दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, अशी माहिती महापालिकेने केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे. कोल्हापूर पासिंगची वाहने टोल भरत नाहीत, अशा वाहनांची दैनंदिन संख्या ३६,४२४ आहे, असेही स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूरच्या टोलप्रश्नी विविध पर्यायावर विचार आणि मूल्यांकनाचे काम सुरू आहे. ‌याचदरम्यान शहरातून होणारी वाहतूक आ​णि त्या माध्यमातून जमा होणाऱ्या टोलचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. महापालिका आ​णि राज्य रस्ते विकास महामंडळ अशा दोन पातळीवर टोलबाबत सर्व्हे झाला आहे. महापालिकेच्या सर्व्हेनुसार, कोल्हापूर पासिंगसह सरसकट सगळ्याच वाहनांकडून टोल आकारणी झाल्यास रोज सुमारे २२ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. मात्र सध्या कोल्हापूर पासिंगचे (एमएच ०९) वाहनधारक टोल देत नाहीत. टोलची पावती न फाडता वाहतूक करणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांची रोजची संख्या ३६,४२४ इतकी आहे. टोलच्या माध्यमातून रोज जवळपास ९ लाख ८० हजार रुपयांची कात्री कोल्हापूरकरांच्या खिशाला लागली असती. अन्य पासिंगची वाहने, विविध प्रकारचे पासेसच्या माध्यमातून आयआरबी रोज दहा लाख रुपयांहून अ​धिक टोल वसूल करते. महापालिका हा अहवाल फेरमूल्यांकन समितीसमोर मांडणार आहे.

३० वर्षांत २४१२ कोटी!

आयआरबीने बीओटी तत्त्वावर रस्ते बांधले आहेत. तीस वर्षांचा करार आहे. ​सरसकट टोल वसुली झाली असती तर रोज २२ लाख रुपये वसुली झाली असती. या दरम्यान दर तीन वर्षांनी टोल दरात वाढ केल्यामुळे ३० वर्षांत २४१२ कोटी रुपये टोल जमा झाला असता, असा अंदाज आहे.

कशी केली पाहणी?

स्वतंत्रपणे नऊही टोलनाक्यांवर मोजणी

१२ ते १९ मे या कालावधीत १५० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम

आठ दिवसांत कोल्हापूर पासिंगच्या वाहनांची नोंद २,९१,३९०

रोजची वाहतूक ३६,४२४

सर्वाधिक वाहनामध्ये कार आणि जीपचा समावेश

आठ दिवसांत वाहतूक झालेल्या कार आणि जीपची संख्या १,९३,७१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ सख्ख्या बहिणींचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आटके (ता. कराड) येथे मामाकडे आलेल्या दोन सख्या बहिणी कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीवर गेल्यानंतर नदीत बुडून दोघींचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली. श्रद्धा संजय पाटील (१४), गायत्री संजय पाटील (९, दोघी रा. साळशिरंबे, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघींचेही मृतदेह रात्री उशिरा नदीपात्रातून बाहेर काढले. त्यामुळे रात्री उशिरा या बाबतचा गुन्हा ग्रामीण पोलिसांत नोंद झाला. या घटनेमुळे आटके व साळशिरंबे या दोन्ही गावांत शोककळा पसरली आहे.

सध्या मे महिना सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून शाळांना उन्हाळी सुट्या सुरू आहेत. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी साळशिरंबे येथील श्रद्धा संजय पाटील व तिची बहिण गायत्री या दोघी सख्ख्या बहिणी काही दिवसांपूर्वी आटके येथील जोतीराम शामराव पाटील या आपल्या मामाकडे आल्या होत्या. या दोन्ही मुली गावातील इंग्लिश मेडीयम स्कूलच्या पाठिमागील बाजूस असलेल्या कृष्णा नदीकाठी गुरुवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे मामाच्या कुटूंबातील लोकांनी अन्य ग्रामस्थांना सोबत घेऊन नदीकाठी शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्या पाण्यात बुडाल्याचा संशय व्यक्त करून ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. येथील ग्रामीण पोलिसांनी व ग्रामस्थांनी नदीपात्रात शोध घेतल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह सापडले.

पुन्हा दिसली मगर

सांगलीः औदुंबर येथे कृष्णा नदीकाठी अंकलखोपच्या काही तरुणांना १२ फूट लांबीची मगर, तिची पिले आणि अंडी आढळून आली आहेत. औदुंबर (अंकलखोप) येथील हे तरुण नदीकाठावर आंबे काढण्यासाठी गेले होते. त्यांना जवळच्या पोटमळीमध्ये विद्युत पंपाजवळ १२ फूट लांबीची ही मगर नजरेस पडली. ते सर्व तरुण तिला पाहताच भयभीत झाले. जवळजवळ तासभर ती मगर आक्रमकपणे तेथे वावरत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरज तालुक्यातील कदमवाडीत बिबट्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरज पूर्व भागातील कदमवाडी व डोंगरवाडी परिसरात जुना पन्हाळा या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने पायाच्या ठशाची तपासणी करून हा बिबट्याच असण्याचा अंदाज वर्तविला आहे.

मिरज पूर्व भागात कदमवाडी, डोंगरवाडी, खंडेराजुरी, बेळंकी तर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी या परिसरात असणाऱ्या डोगरास जुना पन्हाळा म्हणून ओळखले जाते. या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कदमवाडी परिसरात बिबट्या सदृष्य प्राण्याचे गेल्या चार दिवसांपासून दर्शन हेत आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या बाबत सांगली वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर वनक्षेत्रपाल एस. एम. खोत, जिल्हा विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण, वनरक्षक विष्णू ओमासे, सुनील कणसे आदींसह प्राणीमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोन दिवसांपूर्वी या भागात पाऊस झाला आहे. त्यामुळे या प्राण्याचा वावर असणाऱ्या भागांना भेटी देऊन अधिकाऱ्यांनी बिबट्यासदृष्य प्राण्याच्या पायांच्या ठशांची पाहणी केली. दंडोबा आणि जुन्या पन्हाळा डोंगराच्या परिसरात तरसांची संख्या मोठी आहे. तसर आणि बिबट्याच्या पायांच्या ठशात साम्य असते. त्यामुळे हा प्राणी बिबट्या का तरस या बाबत खात्री झालेली नव्हती. मात्र, रात्री उशिरा वन विभागाने हा बिबट्याच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या परिसरात यापूर्वी अनेक जंगली प्राणी आले आहेत. बिबट्याच्या दर्शनाने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे मुक्काम ठोकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा करणार नाही; करू देणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी मी कचरा करणार नाही आणि करू देणार नाही, असा संकल्प करा,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाबळेश्वर येथील गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार मकरंद पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, शिक्षण विभागाचे उपसंचालक मकरंद गोंधळी, नगराध्यक्ष उज्ज्वला तोष्णीवाल, मुख्याधिकारी सचिन पवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'जगासमोर आणि मानवतेसमोर आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली गेली. नैसर्गिक साधन सामुग्रीचे शोषण केले गेले. त्यामुळे वातावरणात बदल झाला व त्याचा जीवनावर विपरीत परिणाम होतोय. कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. आपण जेवढा प्राणवायू घेतो, तेवढी झाडे लावू, असा संकल्प आज आपण करूया त्याचबरोबर मी कचरा करणार नाही आणि करू देणार नाही, असा संकल्पही करा, तरच आपला देश सुजलाम सुफलाम होईल.'

महाबळेश्वर पर्यावरण पुरक करू

पर्यावरण पुरक महाबळेश्वर करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पर्यावरण मूल्य समजावे. या साठी महाबळेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळच माहिती देणारे केंद्र तयार करा. त्यासाठी अनुदान दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राजभवन येथे झालेल्या 'माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. पृथ्वीतलाला निर्माण झालेला धोका हा मानव निर्मित आहे. त्यावरचा उपायही आपल्या जवळ आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जी शिकवण दिली ती शिकवण अंगीकारली पाहिजे. ग्राम गीतेच्या माध्यतातून गाव विकास सांगितला गेला आहे. महानगरपालिका, नगर पालिका या सर्वांनी निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्यांवर प्रक्रिया केंद्र निर्माण केले पाहिजेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास स्वत: करीत आहे. या बाबतचे तंत्रज्ञान नगरपालिकांना पुरविले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये गटारींचे काम निकृष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल नगरपालिकेच्यावतीने अनंत रोटोस्पिन परिसरात सुरू असलेली गटारीची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार आज नगरसेवक भैय्या इंगळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर केली. स्थानिक इलेक्ट्रानिक माध्यमांना त्यांनी गटारीचे बांधकाम पायाने धक्का लावून किती निकृष्ट दर्जाचे आहे ते पटवून दिले. नगरपालिकेने सर्वच गटारींचे बांधकाम तक्रार करूनही सुधारलेले नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

इंगळे म्हणाले, 'कागल शहरात झालेल्या गटारींच्या बांधकामात बऱ्याच गटारी निकृष्ट दर्जाच्या आहेत. कायद्याप्रमाणे स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. गटारीच्या बांधकामात सिमेंटचे प्रमाण अत्यल्प असल्याने चारच दिवसात बांधकाम कोसळत आहे.

याबाबत नगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात.'

याबाबत कंत्राटदार शंकर पोवार म्हणाले, 'पश्चिम भागात सुरू असलेल्या गटार बांधकाम संथ आहे, पण चांगल्या पध्दतीने सुरू आहे. इतर कुठल्याही नागरिकांची तक्रार नाही; परंतु काम पूर्ण झाल्यानंतर नगरसेवक इंगळे यांनी केलेली तक्रार निराधार आणि निरर्थक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीत दूरध्वनी सेवा रामभरोसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

गेल्या वर्षभरापासून तालुक्याचा उपप्रबंधक पदाचा कार्यभार वारणानगर कार्यालयाकडे आहे. मलकापूरचे कार्यालय कोल्हापूरशी जोडले आहे. मलकापुरातील प्रमुख कार्यालयात वॉचमनसह केवळ पाच कर्मचारी आहेत. त्यामुळे दूरध्वनी सेवेसाठी तालुक्याला कोणीच वाली नाही. तालुक्यातली एकूणच दूरध्वनी सेवा बेभरवशाची बनली आहे.

इथला कारभार वारणानगरमधून चालत आहे. कोल्हापूर कार्यालयाला इथल्या ग्राहकांच्या समस्यांविषयी काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे ग्राहक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सध्या मलकापुरातील कार्यालयात एक जे. टी. ओ., एक सहायक, एक लाइनमन, एक शिपाई व एक वॉचमन असे पाच कर्मचारी कार्यरत आहेत. तालुक्यात कार्यरत असणारे लाइनमन फोनच्या दुरुस्तीचे काम स्वतः न करता रोजंदारीवरील कामगारांकडून करवून घेत असल्यामुळे काम वेळेत होईल याचाही भरवसा नाही. ग्राहकांचे नादुरुस्त फोन तक्रारीनंतरही पंधरा दिवस ते एक महिन्यानंतर दुरुस्त होतात. त्यामुळे दीड हजारांहून अधिक असलेली इथली कनेक्शन्स अवघी दीड दोनशेच राहिली आहेत. ग्राहकांनी तक्रार केली तर तक्रार वारणानगर किंवा कोल्हापूर येथे जाऊन नोंदवा, अशी उत्तरे मिळत असल्याने इथल्या ग्राहकांची दूरध्वनी सेवेवर पूर्ण नाराजी आहे.

येथील कार्यालय कोल्हापूर कार्यालयाला जोडल्यामुळे नवीन दूरध्वनी कनेक्शन्स, फॅक्स, इंटरनेट कनेक्शन्स, एस. टी. डी. सेवा वेळेत मिळत नाहीत. मलकापूर व शाहूवाडी परिसरात दूरध्वनीचे बिघाड उत्तरोत्तर वाढू लागल्याने सर्व सरकारी कार्यालये, बँका, पतसंस्था इथले इंटरनेटसह चालणारे सर्व कारभार राम भरोसे चालू होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक बल्लाळ अपघातात ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल-निढोरी राज्यमार्गावर व्हन्नूर फाट्यानजीक थांबलेल्या महिंद्रा मॅक्स गाडीला दुचाकीचे हँडल धडकल्याने दुचाकीवर मागे बसलेले बाजार समितीचे विद्यमान संचालक अशोक भाऊसाहेब बल्लाळ (वय ५८) ठार झाले. बल्लाळ रस्त्यावर डोके आपटल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.

याबाबत माहिती अशी ः महिंद्रा मॅक्स (एम.एच.०९ बी.एम. ६३४९) सिद्धनेर्लीहून कागलकडे जाताना व्हन्नूर गावच्या मागे थांबली होती. बल्लाळ यांची दुचाकी (एम.एच.०९ डी.सी.९४१६) शहाजी पाटील चालवत होते. दुचाकीचे हँडल थांबलेल्या मॅक्स गाडीला धडकले. दुचाकीच्या मागे बसलेले बल्लाळ गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कागल पोलिसांत झाली आहे. बल्लाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार मानधन द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

शहराची हद्दवाढ व्हावी, ज्येष्ठ मोलकरणींना दहा हजार मानधन मिळावे, यांसह विविध मागण्यांसाठी येथील दारिद्र्य, निराधार, विधवा व परितक्त्या संघटनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्याकडे देण्यात आले.

सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारने मोलकरणींच्या मुलांना लॅपटॉप व टॅब देण्याची घोषणा केली होती. मात्र, युती सरकारने ही योजना बंद केली. त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या मुलांचा अपेक्षाभंग झाला. तेव्हा ही योजना पूर्ववत सुरू करावी. ज्येष्ठ मोलकरणींना सन्मानधन म्हणून १० हजार रुपये देण्यात येतात. संघटनेच्या पहिल्या यादीतील महिलांना मंजूर झालेले पैसे मिळाले. मात्र, दुसऱ्या यादीतील महिलांना सन्मानधन देण्यास टाळाटाळ होत आहे. तरी सन्मानधन पात्र असलेल्या, पण वेळेवर सन्मानधन न मिळालेल्या मोलकरणींना तातडीनं ते मिळावे. मोलकरणीच्या ओळखपत्राच्या नूतनीकरणाची अट रद्द करून एकदाच नाव नोंदणी झालेल्या मोलकरणीना विविध लाभ मिळावेत. निराधार पेन्शनमध्ये भरीव वाढ करून त्यांना किमान मासिक एक हजार रुपये द्यावेत. तसेच मॅगी खाद्यावर महाराष्ट्रातसुद्धा तातडीने बंदी घालावी.

तहसीलदार हनुमंतराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील काही लाभार्थी खोटी कागदपत्रे सादर करून अनुदान हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या बोगस लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू आहे, मात्र, यामुळे पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. तेव्हा या पात्र लाभार्थ्यांना पुन्हा त्यांचे पेन्शन चालू व्हावी.यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमजान अत्तार, परशुराम कांबळे, आप्पासाहेब भडगावकर, प्रा. पी. डी. पाटील, आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images