Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिकेतही ‘भूसंपादन’ वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विकासकामांसाठी मंजूर असलेला निधी देण्याऐवजी आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठी खर्च करण्यास नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र विरोध केला. प्रशासनाचा ठराव एकमताने फेटाळण्यात आला. भूसंपादनासाठी तरतूद केलेल्या निधीतून केएमटी आणि शिक्षण मंडळाला निधी देण्याची मागणीही नगरसेवकांनी केली.

शहर विकास आराखड्यातंर्गत ए वॉर्डातील आरक्षित जागा संपादित करण्याच्या कार्यालयीन प्रस्तावावरून नगरसेवक आणि प्रशासन या दोन्ही बाजूंनी परस्परांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नियमांवर बोट ठेवत प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. मात्र, 'प्रभागांतील विकासकामासाठी निधी हवा आहे. आम्ही घरच्या कामांसाठी सभागृहात भांडत नाही,' अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. जागा संपादनासाठीचा १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. महापौर तृप्ती माळवी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

शहरातील खुल्या जागांचे संपादन करण्याबाबतचा नगररचना विभागाचा प्रस्ताव आणि नगरसेवकांच्या मालकीच्या खुल्या जागेवरील आरक्षण उठविण्याच्या प्रस्तावावावरून बुधवारी सकाळी पक्ष बैठकीतही जोरदार चर्चा झाली.

पाच वर्षांनंतर संपादन

२०१० मधील विकास आराखड्यातंर्गत आरक्षित जागा संपादनासाठी प्रशासनाने जानेवारी २०१५ मध्ये खरेदी नोटिस काढल्या. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार वर्षभरात आरक्षित जागा संपादित करणे गरजेचे आहे. अन्यथा, जागा मूळ मालकाला परत जाते, असे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी निदर्शनास आणले. आयुक्तांनी केलेल्या खुलाशानेही नगरसेवकांचे समाधान झाले नाही.

आरक्षित जागा संपादनासाठी पाच वर्षांत नियोजन करणे गरजेचे होते. विकासकामांना निधी देण्याऐवजी प्रशासन जागा खरेदीसाठी पैसा खर्च करणार असल्यास त्याला मंजुरी देणार नाही.

- राजू लाटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते

नगरसेवकांच्या बजेटला कात्री लावू नका. प्रशासनानेच प्रस्तावाबाबत मार्ग काढावा.

- प्रा. जयंत पाटील, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात भारी कोल्हापुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत कोल्हापूरच्या तेजश्री पवार व सांगलीच्या शशांक कदम यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शशांकने ३०० पैकी २४६, तर तेजश्रीने २०५ गुण मिळवले. बुधवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर कदम व पवार कुटुंबीयांमध्ये जणू दिवाळीच साजरी करण्यात आली.

शशांक कदम सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा आहे. २४ वर्षीय शशांकने वारणा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीनंतर इंजिनीअरिंग शाखेकडे जाण्याचा निर्णय घेतला. कराड येथील दौलतराव आहेर कॉलेजमध्ये बी.ई. कम्प्युटरची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने वारणानगर येथील आमदार विनय कोरे स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला. गेली दोन वर्षे शशांकने अभ्यासात झोकून दिले. केंद्रातील शिक्षक एस. आर. कुलकर्णी, रवींद्र कांबळे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. रोज आठ तास अभ्यास करताना शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले. सहा फूट उंची लाभलेल्या शशांकने अजित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक चाचणी परीक्षेसाठी वर्षभर तयारी केली. त्यात त्यात १०० पैकी ९९ गुण मिळाले आहेत. शशांकचे वडील प्रा. अशोक कदम यांनी त्याला प्रोत्साहन दिले. आई गृहिणी असून, बहीण गीतांजलीने एमएस्सी केमिस्ट्रीची पदवी मिळवली आहे.

शेतकरी कुंटुबाची पार्श्वभूमी असलेल्या आणि घरात शिक्षणाचा कोणताही गंध नसताना तेजश्री धनाजी पवारने पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत २०५ गुण मिळवत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विवाहानंतर मुलीचा सांभाळ करत मिळवलेले तेजश्रीचे यश निश्चितच प्रेरणादायी असेच मानावे लागेल.

मार्डी (ता. माण, जि. सातारा) येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तेजश्रीला शालेय जीवनापासूनच पीएसआयपदाचे वेध लागले होते. त्यांनी मार्डी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. दहिवडी कॉलेज येथे बारावी आणि बीएडचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह माजगाव (ता. राधानगरी) येथील प्राथमिक शिक्षक विनायक चौगुले यांच्याशी झाला. सुशिक्षित कुटुंब असलेल्या चौगुले कुटुंबीयांनी तेजश्रींच्या स्वप्नाला बळ देण्याचा निर्णय घेतला. बीए व एमए (समाजशास्त्र) चा अभ्यास करताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नितीन पाटील-मांगोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दररोज आठ ते दहा तास अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षेत यश मिळवले. त्यानंतर झालेल्या मुख्य व शारीरिक चाचणी परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत २०५ गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले.

हॉस्पिटलमध्येच आनंद

तेजश्रींचे पती पोटदुखीमुळे शिवाजी पेठेतील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. बुधवारी पोलिस उपनिरीक्षकपदाचा निकाल जाहीर झाल्याची माहिती त्यांना मिळाली. परीक्षेत पत्नी तेजश्री यांनी अव्वल क्रमांक मिळविल्याचे समजताच त्यांनी कुटुंबासह हॉस्पिटलमध्येच आनंद साजरा केला. त्यांच्या आनंदामध्ये डॉक्टरांसह सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने हॉस्पिटलमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

लहानपणापासून पोलिस दलाचे आकर्षण होते. आजोबा कुंडलिक कदम स्वातंत्र्यसैनिक होते. चुलत आजोबा यशवंत कदम पोलिस उपनिरीक्षक होते. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन मी पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. मला डीवायएसपी व्हायचे असून, पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा माझ्या दृष्टीने अर्धविराम आहे. डीवायएसपी झाल्यानंतर पूर्णविराम होणार आहे.

- शशांक कदम

प्रथम आई-वडिलांचे आणि पती विनायक चौगुले यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाल्याने यश मिळाले. ही तर यशाची सुरुवात असल्याने पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करून पोलिस उपअधीक्षकपदी विराजमान होणार आहे.

- तेजश्री पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या कुंकवाला कम्प्युटरचा टच

$
0
0

मळवटाचे डिझाइन तयार होतेय ऑनस्क्रिन, आकर्षक रूपाला जोड

>> अनुराधा कदम

नवरात्रौत्सवातील प्रत्येक दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची विविध रूपातील सालंकृत पूजा पाहणे हा भाविकांसाठी वेगळा सोहळाच असतो. याशिवाय सध्या श्रीपूजक वर्षभरही देवीच्या वैविध्यपूर्ण पूजा बांधून मूर्तीचे सौंदर्य खुलविण्यावर भर देत आहेत. अंबाबाईच्या पूजेच्या रूपाला साजेशा अशा साडीपासून ते गाभाऱ्यातील दृश्यापर्यंत पूजा दर्शनीय होत आहे. आता श्रीपूजकांच्या नव्या पिढीने अंबाबाईच्या पूजेत महत्त्वाचे स्थान असलेल्या कुंकवाच्या डिझाइनला कम्प्युटरचा टच दिला आहे. संस्कृतीतील पदचिन्हांच्या डिझाइन्सचे कम्प्युटरच्या सहाय्याने ​कटिंग करत ते मूर्तीच्या कपाळावर रेखाटले जात आहे. अत्यंत बारकाव्यांनिशी ऑनस्क्रिन तयार होणाऱ्या या मळवट नक्षीने अंबाबाईच्या पूजेतील रूपाला देखणे बनवले जात आहे.

सध्या देवस्थान व्यवस्थापनाने अंबाबाईच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे देवीचे लाइव्ह दर्शन आणि पूजारूप ऑनलाइन पाहण्याची सुविधा जगभरातील भाविकांसाठी खुली केली आहे. अंबाबाईला साडी नेसवण्याची विशिष्ट पद्धत, नित्यालंकारांपासून केली जाणारी सजावट हा रोजच्या पूजेचा भाग असला तरी खास नवरात्रकाळात आणि महत्त्वाच्या सण समारंभादिवशी देवी विविध देवादिकांच्या रूपात पूजेतून साकारण्यासाठी श्रीपूजक आग्रही असतात. यात देवीच्या कपाळावर रेखाटल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या आकारातील कुंकवानेही भाविकांचे लक्ष वेधले आहे.

देवीच्या कपाळावर हळदीचा मळवट भरल्यानंतर त्यावर हळदीच्या कुंकवाने पदचिन्हांचा आकार रेखाटला जात आहे. यामध्ये पूजेतील रूपाच्या संदर्भाने कुंकवाचे डिझाइन ठरवले जाते. तसेच एखादी तिथी, सण यांचा विचार करूनही कुंकवासाठी पदचिन्ह निवडले जाते. शंख, स्वस्तिक, गदा, जास्वंदीचे फूल, अंबाबाईचे यंत्र, ज्ञानकमळ, नाग, महादेवाची पिंड, गणपती, कमळफूल अशा विविध आकारांचे कटिंग कम्प्युटरवर केले जाते. चैत्रांगणात समाविष्ट असलेल्या अनेक पदचिन्हांचा वापर अंबाबाईच्या कुंकवाच्या रेखाटनासाठी आवर्जुन केला जात असल्यामुळे देवीच्या कुंकवाला कलात्मक जोड मिळत आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रातील डिझाइन कॉम्प्युटरवर होत असताना अंबाबाईच्या कुंकू डिझाइनलाही झालेल्या कम्प्युटरच्या स्पर्शामुळे धार्मिक विधी आणि तंत्रज्ञानाची करामत यांचे नवे समीकरण जुळले जात आहे.

डिझाइन केलेला पातळ कागद मूर्तीच्या कपाळावर ठेवला जाताे. त्यामध्ये कुंकू भरले की कागद हलक्या हाताने काढला जातो. कुंकू रेखाटण्याचे काम अतिशय हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक करावे लागते. पूर्वी अंबाबाईचा मळवट आणि कुंकवाची कलाकुसर हाताने केली जायची. आता कम्प्युटरने डिझाइनचे काम सोपे झाले आहे.

-गजानन मुनिश्वर, श्रीपूजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आता बनवा क्वॉडकॉप्टर!

$
0
0

क्वॉडकॉप्टर मेकिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर टाइम्स टीम

‌थ्री इडीयट्स सिनेमात आमीर खानने तयार केलेले क्वॉडकॉप्टर पाहिले की आपल्यालाही असे क्वॉडकॉप्टर बनवण्याची, ते उडवण्याची संधी मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते. कॉलेजमध्ये इंजिनीअरिंग क्षेत्रात गेले की क्वॉडकॉप्टर बनविण्यास मिळेल. पण त्याआधी शालेय जीवनात क्वॉडकॉप्टर तयार करण्याची कला जाणून घेण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एक्सेल टेक्नॉलॉजी'ने कोल्हापुरात उपलब्ध करून दिली. त्याला उत्साही प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची कला अवगत होण्यासाठी आणि विविध नव्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी दोन बॅचमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून क्वॉडकॉप्टर मेकिंग कार्यशाळेला सुरूवात झाली. प्रत्येकी सहा दिवसांची कार्यशाळा असून २० ते २५ मे आणि २६ मे ते १ जून या दरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजता कार्यशाळा घेतली जात आहे. दोन्ही बॅचसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यशाळेसाठी 'महाराष्ट्र टाइम्स' मी‌डिया पार्टनर आहे.

दोन दिवस विद्यार्थ्यांना क्वॉडकॉप्टर आणि हेलिकॉप्टरमधील नेमका फरक काय आहे?, क्वॉडकॉप्टर तयार करण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते?, कोणती मोटर वापरणे आवश्यक आहे?, याची तांत्रिक माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात येत आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः क्वॉडकॉप्टर तयार करण्याचा अनुभव घेतला. सहा दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांना क्वॉडकॉप्टर तयार करण्याचे संपूर्ण टेक्नीक शिकवले जाणार आहे. कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि ऑरगॅनिक या तिन्ही विषयांची माहिती दिली जात आहे. १० वर्षांपुढील विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

‌विनायक सुतार, चिन्मय ओक, अमित नरहरी, ओंकार गोखले, संजय खडका, आर्य पोतदार, निखिल निबांळकर मार्गदर्शन करीत आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एक्सेल टेक्नॉलॉजी, प्लॅट नं.३०१, डी विंग, दत्ताजी पार्क, जननी हॉस्पिटलजवळ, राजारामपुरी ८ वी गल्ली येथे विनायक सुतार (८१४९०००४४३) यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि ऑरगॅनिक अशा तिन्ही विषयाची माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यांनचा चांगला प्रतिसाद आहे. सध्याचे विद्यार्थीही अपडेट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यशाळेमध्ये पहिल्या दोन दिवसात क्वॉडकॉप्टर तयार करण्याची माहिती दिली जात आहे. त्यांना स्वतः क्वॉडकॉप्टर बनवता येईल याविषयीचे मार्गदर्शन दिले जाईल.

-विनायक सुतार, एक्सेल टेक्नॉलॉजी

या कार्यशाळेमध्ये नवीन टेक्नकनीक आणि माहिती शिकायला मिळेल या दृष्टीकोनातून मी क्वॉडकॉप्टर कार्यशाळेत सहभागी झाले. गेल्या दोन दिवसात वेगवेगळी माहिती मिळाली.

-गौरी यादव, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैलकुलीचा मुलगा बनला पीएसआय

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

वडिलांचेही जेमतेम पाचवीपर्यंतचे शिक्षण, त्यातच सार्वजनिक बांधकाम खात्यात तुटपुंज्या पगाराची मैलकुलीची नोकरी, कुटुंबात शिक्षणाची कोणतीही परंपरा नाही, अशा आर्थिक प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आणि स्वतः मार्केट बझारमध्ये कॅशिअरची नोकरी, एमएसईबीचे मीटर रीडरचे काम करून शिंगणापूर (ता. करवीर) येथील प्रमोद आवळे या तरुणाने बुधवारी जाहीर झालेल्या पीएसआय परीक्षेत बाजी मारली. मित्रांकडून स्पर्धा परीक्षेची पुस्तके मिळवून परीक्षेत यश मिळाल्याने तरुणांपुढे त्याने आदर्श ठेवला आहे.

कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळत प्रमोद आवळे या तरुणाने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून कॉमर्स शाखेतील पदवी घेतली. त्यानंतर खासगी नोकरी करीतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी लागणारी संदर्भ पुस्तके आणि अन्य साहित्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. प्रमोदची जिद्द पाहून मित्रांनीही मदत करायची ठरविली. त्यांच्या मदतीसह प्रमोदने एमएसईबीच्या मीटर रीडिंगचे काम हाती घेतले. त्यातून पुस्तकांसाठी लागणाऱ्या खर्चाची पूर्तता होऊ लागली. सन २०१२ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या दोन प्रयत्नांत यशाने हुलकावणी दिली. मात्र, अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने तयारी केली. पूर्वपरीक्षेत यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढला. अभ्यासासाठी ग्रंथालयात जायला मिळाला नाही. मात्र, स्वयंअध्ययन आणि अवांतर वाचनावर सातत्याने भर दिला. त्यामुळे पीएसआय परीक्षेत यशाची बाजी मारली.

आवळे कुटुंबात शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. वडिलांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे, तर आईने शाळाही पाहिलेली नाही. मोठा भाऊही खासगी नोकरी करतो. मुलाने सरकारी खात्यात शिपाई बनावे, अशी वडिलांची इच्छा होती. मात्र, प्रमोदने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. पोरगा फौजदार झाल्याचे समजताच प्रमोदच्या वडिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे पहिल्यापासूनचे ध्येय नव्हते. आर्थिक परिस्थिती पाहता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य होते. मात्र कोणत्याही मूलभूत सुविधा नसतानाही स्पर्धा परीक्षेत यश मिळविता येते. आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेपासून दूर राहू नये. गरिबी ही प्रगतीसाठीची संधी आहे. कोचिंग क्लासेस, ग्रंथालय, हायफाय सुविधाच हव्यात, असा आग्रह कोणत्याही विद्यार्थ्यांना नसावा. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केल्यास शंभर टक्के यश मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाचा नफा जातो कुठे?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुका संघाचा कारभार नेमका कसा चालला आहे, याबाबत सर्वसामान्यांनाही माहिती झाली आहे. रस्त्याच्या कडेला पानटपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यालाही दोन-तीन लाख रूपयांची कमाई होते. पण ३५ कोटींची उलाढाल असणाऱ्या संघास केवळ दोन-चार लाखांचाच नफा होतो. याचा पर्दाफाश करण्यासाठी संघाच्या निवडणुकीत सक्षम पॅनेल उभे करीत असल्याची घोषणा जिल्हा बॅंकेचे संचालक अशोक चराटी यांनी केली. चराटी गटासह समविचारी गटा-तटाची आघाडी करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येथील आजरा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हा मेळावा झाला. 'गोकुळ'चे संचालक रवींद्र आपटे अध्यक्षस्थानी होते. तर आजरा पंचायत समितीचे सभापती विष्णू केसरकर प्रमुख उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये साकारण्यात आलेल्या आघाडीच्या माध्यमातून आगामी सर्व संस्थांच्या निवडणुका लढविण्याचे ठरविण्यात आले. विशेषत: पुढील महिन्यात होऊ घातलेल्या तालुका संघाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी संघाचे वैभव लोपविले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित न जोपासता संघ लुटण्याचेच काम सुरू आहे. याबाबतचे पुरावे गोळा केले आहेत. सेवा संस्था गटातील पन्नासहून अधिक ठराव हातात आहेत. त्यामुळे मताधिक्य वाढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

महादेव पाटील-धामणेकर म्हणाले, 'चराटी व मुकुंद देसाई यांच्या मैत्रीत दुरावा कोणी आणला हे सर्वांना माहित आहे. नेत्यांच्या कानाशी लागत आपल्या पोळ्या भाजून घेण्याच्या य वृत्तीमुळेच विरोधाची भूमिका घ्यावी लागली.' केसरकर म्हणाले, 'गेल्या निवडणुकीमध्ये वारसांच्या हाती संघाची सत्ता सूपुर्द केली. पण तेथील परिवर्तनाशिवाय पर्याय राहिलेला नाही.' आपटे म्हणाले, 'तालुक्याच्या भवितव्याचा व विकासाचा विचार करूनच चराटी यांना जिल्हा बॅंकेत मदत केली आहे. समविचारींना सोबत घेऊन लढण्याचे हेच सूत्र यापुढेही जपले जाईल.'

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, संभाजी तांबेकर, डॉ. इंद्रजित देसाई आदींची भाषणे झाली. विलास नाईक यांनी प्रास्ताविक केले. राजू होलम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओळखा करिअरची दिशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र टाइम्स' आणि अॅस्टर आधार हॉस्पिटलतर्फे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी करिअर सेमिनार होत आहेत. शनिवारी (ता. २३) 'सी. ए. चे क्षेत्र' आणि रविवारी (ता. २४) 'अॅप्टीट्यूट टेस्ट' या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सेमिनारमधून विद्यार्थी आणि पालकांना करिअरची एक निश्चित दिशा मिळणार आहे. या सेमिनारचे अॅस्टर आधार हॉस्पिटल प्रायोजक आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे करिअरच्या विविध संधींची माहिती देणारी सेमिनार होत आहेत. येत्या शनिवारी आणि रविवारी विद्यार्थी, पालकांसाठी सी. ए आणि अॅप्टीट्यूड टेस्ट विषयावर मार्गदर्शनाची पर्वणी मिळणार आहे. सेमिनारमध्ये विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश आणि करिअरसंबधी येणाऱ्या विविध शंकाचे निरसन केले जाणार आहे. सी. ए. विषयावर शनिवारी (ता. २३) सायंकाळी पाच ते सात या वेळेत दाभोळकर कॉर्नर, शाहुपूरी येथील आयसीएआय भवनात सेमिनार होईल. यात 'सी. ए. मधील विविध संधी' या विषयावर सी. ए. अनिल चिकोडी,' सी. ए. अभ्यासक्रमाची रचना आणि नवे बदल' या विषयावर गंगाधर हळदीकर हे मार्गदशन करणार आहेत. तर 'सी. ए. अभ्यासक्रम आणि परीक्षेची तयारी' विषयावर असोसिएशनचे सेक्रेटरी सी. ए. नितीन हारुगडे तर ' सी. ए. साठी उपलब्ध असलेल्या सोयी आणि सुविधा' विषयावर असोसिएशनचे अध्यक्ष इम्रान मुल्ला मार्गदर्शन करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध शंकाचे निरसन तज्ज्ञांच्याकडून केले जाणार आहे.

रविवारी (ता. २४) राजारामपुरी येथील रायझिंग लर्निंग सेंटरतर्फे 'अॅप्टीट्यूट टेस्ट' या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. राजारामपुरी येथील अप्पाज कॉम्प्लेक्स येथे सकाळी ११ वाजता सेमिनारची सुरुवात होईल. शिवाजी विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख चैत्रा रानडे मार्गदर्शन करणार आहेत. आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही टेस्ट आहे. या टेस्टमुळे विद्यार्थ्यांला मिळालेले गुण, आवड, कल ओळखता येऊ शकतो. त्यांच्या बुद्ध्यांक आणि आवडते क्षेत्राचे ठामपणे मत सांगता येते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि अॅस्टर आधारतर्फे आयोजित सेमिनारमधून एक निश्चित दिशा मिळत आहे. एक चांगल्या करिअरचा मार्ग निवडण्यासाठी सेमिनार दिशादर्शक ठरत आहे. - शिवानंद अपराज, सीनिअर मॅनेजर, अॅस्टर आधार हॉस्पिटल

दहावी आणि बारावीनंतर करिअरसाठी शाखा निवडीचा गोंधळ विद्यार्थी आणि पालकांच्यासमोर आहे. भविष्यात पश्चाताप होण्यापेक्षा अॅप्टीट्यूड टेस्ट केल्यास योग्य करिअरच्या मार्गाची शंभर टक्के खात्री देता येते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही टेस्ट करण्याची गरज आहे. - चैत्रा रानडे, मानसशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांची खेळी असफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (केडीसीसी) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि त्यातही आमदार हसन मुश्रीफ यांना मिळू नये यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली खेळी असफल ठरली. बँकेच्या काही संचालकांशी त्यांनी संपर्क साधून, पी. एन. पाटील यांना अध्यक्षपद द्यावे, त्या बदल्यात बँकेला सरकारी पातळीवर मदत करू अशी ऑफरही देल्याचे समजते. मात्र, काँग्रेस- राष्ट्रवादीने मंत्री पाटील यांची ही ऑफर धुडकावून लावत हसन मुश्रीफ यांचीच अध्यक्षपदी वर्णी लावली.

दरम्यान, केडीसीसीतील समझोत्यानुसार पहिले दोन वर्षे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पुढील दोन वर्षे काँग्रेसकडे अध्यक्षपद असेल. केडीसीसीची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती आणि शिवसेनेचे नेते प्रा. संजय मंडलिक यांनी एकत्र येऊन लढवली होती. काल दुपारी माजी मंत्री विनय कोरे यांनीही मुश्रीफ यांना अध्यक्षपद घ्यावे अशी भूमिका मांडली. त्यानंतर मुश्रीफांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या गोटात उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच होती.

सुरुवातीला राजू आवळे यांचे नाव चर्चेत होते. माजी मंत्री प्रकाश आवाडे हे विलास गाताडे यांच्यासाठी तर विनय कोरे हे त्यांचे समर्थक सर्जेराव पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर काँग्रेसच्या गोटातून विनायक उर्फ अप्पी पाटील यांचे नाव निश्चित झाले. पाटील पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी संध्यादेवी कुपेकरांविरोधात बंडखोरी केली. पाटील यांची गडहिंग्लज तालुक्यात लक्षणिय ताकद आहे, हे लक्षात घेऊन त्यांना उपाध्यक्षपद दिले गेले. गुरुवारी सकाळी पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत श्रीपतरावदादा सहकारी बँकेत संचालक मंडळाची बैठक झाली.

त्यानंतर मुश्रीफ, पी. एन. पाटील आणि के. पी. पाटील हे आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत कारने बँकेत आले. संचालक मंडळाच्या बैठकीत पी. एन., महाडिक, कोरे आणि मुश्रीफ एकत्रच होते. मुश्रीफ यांना विनय कोरे सूचक आणि पी. एन. पाटील अनुमोदक होेते.

'गायकवाड', 'दौलत' कारखान्याचे काय?

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर स्वागताचे भाषण करताना विनय कोरे यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या कर्जांचा उल्लेख केला. त्यात प्रामुख्याने उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना आणि दौलत सहकारी साखर कारखान्यांचा उल्लेख होता. गेल्या सहा वर्षात सभासदांना लाभांश मिळाले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

... त्यांची राष्ट्रवादीविरोधाची भूमिका काय ?

निवडीनंतर मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'केंद्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात लढाई सुरू आहे. मात्र कोल्हापुरात चंद्रकांत पाटील आणि पी. एन. पाटील हे समिकरण कसे काय जमू शकते हे समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद जाऊ नये यासाठी मंत्र्यांनी प्रयत्न केले. पालकमंत्री प्रामाणिक गृहस्थ आहेत. राष्ट्रवादीला विरोधाची त्यांची नेमकी भूमिका काय आहे? हे समजून घेण्यासाठी त्यांची भेट घेणार आहे.

कामाबद्दल समाधानी

'कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेल्या कामाबद्दल पूर्ण समाधानी आहे,' अशी प्रतिक्रिया बँकेचे प्रशासक प्रताप चव्हाण यांनी व्यक्त केली. चव्हाण म्हणाले, 'बँक पूर्णपणे तोट्यातून बाहेर काढून लाभांश देता आला नाही. ही खंत मात्र राहिली आहे. प्रशासक म्हणून काम करताना बँकेचे लायसन्स वाचवणे हीच सुरुवातीची प्राथमिकता होती. मी यापूर्वी सोलापूर, नांदेड, औरंगाबाद येथील जिल्हा बँकात काम केले आहे. पण कोल्हापुरात काम करताना विलक्षण समाधान मिळाले. कोणताही लाभांश देता येत नसताना सेवा सोयायट्या आणि शेतकऱ्यांनी जवळपास ४० कोटींचे शेअर भांडवल जमा केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१८४२ ग्राहकांनी नाकारली सबसिडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरेसे उत्पन्न असल्याने सबसिडीचे सिलिंडर घ्यायची अनेकांची इच्छा नाही. पण त्यासाठी एजन्सीमध्ये जाऊन अर्ज भरुन देण्याची त्रासदायक प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने त्याकडे लक्ष ​देत नव्हते. ही प्रक्रियेतील अडचण दूर करण्यासाठी आता पेट्रोलियम कंपन्यांनी ऑनलाइन तसेच मोबाइलवरुन ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८४२ ग्राहकांनी सबसिडी नको असल्याचे कळवले आहे. हा आकडा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मोठा आहे.

ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यांनी सिलिंडरची सबसिडी घेऊ नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार देशभरात अनेकांनी सबसिडी नको असल्याचा अर्ज दिला. जिल्ह्यातीलही अनेक अधिकारी व नागरिकांनी अर्ज दिले होते. पण एजन्सीत येऊन हा अर्ज द्यावा लागत असल्याने या प्रक्रियेकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. त्यांची अडचण लक्षात येऊन गॅस कंपन्यांकडून त्याबाबतचे सॉफ्टवेअर बनवण्याचे काम सुरू होते. सध्या एजन्सीत जाऊन पाच क्रमांकाचा अर्ज देण्याबरोबर ऑनलाइन तसेच मोबाइलवरुन ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

मोबाइलवरुन ९७६६८९९९८९९ या क्रमांकावर कॅपिटल लेटर्समध्ये GIVEITUP हा एसएमएस पाठवायचा आहे. त्यानुसार सबसिडी नको असल्याची प्रक्रिया केली जाते. त्याशिवाय पेट्रोलियम कंपन्यांच्या ऑनलाइनवरुनही सबसिडी नको असल्याचा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा चांगला फायदा होत आहे.

सध्या रेशनकार्डधारकांचे कम्प्युटरायझेशन करून डाटा एकत्रित केला जात आहे. या डाटाच्या माध्यमातून गॅस कनेक्शन व बँक अकाउंट लिंक करून संपूर्ण पुरवठा विभागाचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. त्याचे काम सध्या गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पुरवठा यंत्रणेतील काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी जिल्ह्यात सबसिडी नाकारलेल्या नागरिकांची संख्या कमी वाटत असली तरी इतर काही जिल्ह्यात शेकड्याचा तसेच दोन आकडीही टप्पा पूर्ण केलेला नाही. त्यामुळे येथील संख्या चांगलीच आहे असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ, तुम्ही कुठे विकला गेला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरची जनता गेली चार वर्षे टोलविरोधात लढा देत आहे. हा लढा हा संपूर्ण टोलमुक्तीसाठी आहे. या आंदोलनात हसन मुश्रीफ यांची भागीदारी काय आहे ? त्यांनी टोलविरोधी कृती समिती आणि आंदोलनावर शेरेबाजी करण्याच्या फंदात पडू नये. कृती समिती विकली गेलेली नाही. हसन मुश्रीफ, तुम्ही कुणाला विकला गेलाय ते तुम्ही ठरवा' अशी सणसणीत चपराक ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी लगाविला.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार मुश्रीफ यांनी बुधवारी कृती समितीच्या आंदोलनाबाबत साशंकता व्यक्त करत, कृती समिती विकली गेल्याचा आरोप केला होता. मुश्रीफ यांच्या आरोपाला डॉ. पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 'मुश्रीफांच्या मेहेरनजरवर कृती समितीचे आंदोलन आधारीत नाही. आंदोलनासाठी आम्ही समर्थ आहोत. मुळात या आंदोलनात मुश्रीफांची भागीदारीच काय ? नदीच्या काठावर बसायचे आणि पाण्यात बुडणाऱ्या माणसाला, पाय हलवा, हात हलवा असे सांगायचे ही मुश्रीफांची प्रवृत्ती आहे. फुकटचे सल्ले देणारे भरपूर आहेत. काँग्रेस आघाडीच्या सरकारकडून मुश्रीफ, सतेज पाटील यांनी टोल पंचगंगेत बुडवणार अशी वल्गना केली होती. त्याचे काही झाले नाही. आंदोलनात फुकटचे सल्लागार नको आहेत.'

प्रा. एन. डी. पाटील यांनी रोखठोक भूमिका घेऊन समिताला बळ दिले आहे.

सतेज पाटलांनाही टोला

प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, 'टोल आंदोलनाप्रसंगी हसन मुश्रीफ आणि तत्कालीन मंत्री सतेज पाटील यांनी प्रश्न निकालात काढू, टोल पंचगंगेत बुडवणार असे सांगितले होते. आज पंचगंगा तेथेच आहे. पण त्यात टोलनाके बुडताना कुठे दिसले नाहीत. आमदारांना टोलमध्ये सवलत असते. तरीही सतेज पाटील यांनी टोलची पावती फाडली. त्यांना बरे वाटले. पण लोकभावनेच्या विरोधात काम केले केले की काय होते याची प्रचिती त्यांना आली. लोकांनी निवडणुकीत त्यांचे काम केले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलचे खोकेही दिसायला नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकनाचे काम सध्या सुरू आहे. आयआरबी कंपनीने यापूर्वीच्या सर्व्हेवेळी समितीला सहकार्य केले नाही. ही कंपनी जनता आणि सरकारपेक्षा मोठी नाही. कोल्हापुरात आयआरबीचे खोकेही बघायला आवडत नाही' अशी भूमिका टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत मांडण्यात आली. कृती समितीचे नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

बैठकीला विविध पक्षाचे, संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेना, भाजपच्या प्रतिनिधींनी बैठकीला हजेरी लावली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आर. डी.पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यासोबतच्या चर्चेचे निमंत्रण द्यायला आल्याचे सांगितले. टोलबाबत सकारात्मक निर्णय होणार असल्याचा त्यांनी निरोप दिला. यावेळी 'एखादी कंपनी किती वेळा आव्हान देणार आहे. टोलमुक्तीसाठी लढाई एकदिलाने सुरू आहे. टोलविरोधी आंदोलन हे जनतेचे आहे, एकट्या दुकट्याचे नाही' अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आयआरबी कंपनीची कामे निकृष्ट, अपुरी आहेत. युटिलिटी शिफ्टींगचा प्रश्न आहे. फेरसर्व्हेत हे समोर आणणे आमच्यादृष्टीने महत्वाचे होते. मूल्यांकन समिती सदस्य आणि आर्किटेक्ट इंजिनीअरिंग असोसिएशचे पदाधिकारी राजेंद्र सावंत हे सर्व्हेच्या कामावर लक्ष ठेवून आहेत असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, चंद्रकांत यादव, सतीश कांबळे, नामदेव गावडे अशोक पोवार, संभाजी जगदाळे दिलीप देसाई आदींनी चर्चेत भाग घेतला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मुश्रीफांनी तसे वक्तव्य केले नसल्याचे सांगत दिल​गिरी व्यक्त केली. शिवसेनेचे शिवाजी जाधव, पदमाकर कापसे उपस्थित होते.

टोलमधून एमएच ०९ वाहनांना सवलत, चारचाकी वाहनासह मोठ्या वाहनांनाही सवलत, त्याचबरोबर कोल्हापूरचे रहिवाशी असलेले पण इतर शहरातून वाहन खरेदी केले असल्यास त्यांनाही सवलत देण्याच्या पर्यायाबाबत सरकार विचाराधीन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे डॉ. पाटील यांनी कार्यकर्त्यासमोर सांगितले. कोल्हापूरला टोलमुक्त करण्याचा हा पर्याय नाही. अशी भूमिका डॉ. पाटील यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यातून वीज प्रकल्पासाठी जागा

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

तब्बल दिड वर्षापासून जागेअभावी खोळंबलेला कचऱ्यातून वीज प्रक्रियेच्या प्रकल्पाला महापालिकेने अखेर झूम प्रकल्पाजवळील नवीन जागा दिली. यामुळे प्रकल्प उभारणीचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहरात दररोज जवळपास १६० टन कचरा निर्माण होतो. तो टाकण्यासाठी जागा नसल्याने महापालिकेने झूमच्या बंद पडलेल्या प्रकल्पात कचऱ्याचे ढिग टाकले होते. त्यानंतर टोप खण व टाकाळा लँडफिल साइटच्या कामाला गती आली. याबाबतही अडथळे आल्याने अजूनपर्यंत पूर्वीचा साठलेला कचरा टाकता आलेला नाही. परिणामी २०१३ मध्ये कचऱ्यातून वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी नेमलेल्या रोकेम कंपनीसाठी जागा उपलब्ध करुन देता आली नव्हती. वीज निर्मितीसाठी झूममधील कचऱ्याची चाळणी करुन इनर्ट मटेरियल इतरत्र टाकण्याचा प्रयत्न झाला. पण त्यातूनही एक ते दोन एकर जमीनच उपलब्ध झाली. प्रत्यक्षात रोकेमसाठी किमान चार एकराची जागा हवी होती. त्यामुळे गेल्या आयुक्तांच्या पातळीवर रोकेमला जागा देण्याचा विचार होता.

एसटीपी परिसरात जवळपास ३२ एकर जागा उपलब्ध आहे. त्यामध्ये दोन एसटीपी आहेत. झूम प्रकल्पावरील जागेसाठी परवानगीची पूर्तता झाली आहे. झूम प्रकल्पाच्या रिव्हीजन सर्व्हेमधीलच एसटीपीजवळील पाच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहे.

डिसेंबर २०१३च्या सर्वसाधारण सभेत प्रकल्पाला मंजुरी

नोव्हेंबर २०१३ मध्ये रोकेमच्या पुण्यातील प्रकल्पाची पाहणी

प्रकल्पाला ४ एकर जागेची गरज

एसटीपीजवळ ३२ एकर जागा

१८ महिन्यांत प्रकल्प सुरू होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हेला हवीय मुदतवाढ

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

राज्य सरकारची कोल्हापूरच्या टोलसंदर्भात ३१ मेपर्यंत निर्णय घेण्याची घोषणा हवेत विरण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. कारण, सरकारने रस्ता प्रकल्पाच्या सर्व्हेसाठी नेमलेल्या नोबेल इंटरेस्ट इंजिनीअर्सकडून शहरातील रस्त्यांचा सर्व्हे पूर्ण झाला नाही. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व्हेचे काम पूर्ण होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडे १५ जूनपर्यंत वाढीव मुदत मागितली आहे.

मेअखेर सर्व्हेचे कामच पूर्ण होणार नसल्यामुळे प्रकल्पाचे नेमके मूल्यांकन ठरणार नाही. परिणामी एक जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करण्यासंदर्भातील सरकारची घोषणा अंमलात येणार नाही हे स्पष्ट झाले.

रस्ते विकासप्रकल्पातंर्गत आयआरबी कंपनीने कोल्हापुरात ४९ किलोमीटर लांबीचे १३ रस्ते तयार केले आहेत. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने आणि टोल देण्यास विरोध असल्याने सततच्या आंदोलनांमुळे राज्य सरकारकडून सध्या प्रकल्पाचा फेरसर्व्हे आणि मूल्यांकन सुरू आहे. पुण्यातील नोबेल कंपनीकडून प्रकल्पाच्या कामाचा सर्व्हे सुरू आहे. नोबेल कंपनीने २० मेपर्यंत अहवाल द्यायचा होता. मात्र कंपनीकडून अद्यापही सर्व्हेचे काम सुरू आहे. तेरा रस्त्यांपैकी आतापर्यंत सात रस्त्यांच्या सर्व्हेचे काम झाले आहे. नोबेल कंपनीने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पत्र पाठवून सर्व्हेच्या कामाला १५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली आहे. एमएसआरडीच्या पुणे कार्यालयाने दहा जूनपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले पाहिजे, असे कंपनीवर बंधनकारक केले आहे. मुदतवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून पुणे कार्यालयाने प्रस्ताव मुंबई ऑफीसला सादर केला आहे. दुसरीकडे नोबेल कंपनीने सात रस्त्यांचा सर्व्हे केला असला तरी कंपनीकडून आणखी तीन रस्त्यांचा अहवाल तपासणीसाठी आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशनकडे सादर केला आहे.

सर्व्हे केलेले रस्ते

सायबर चौक ते कळंबा फिल्टर हाउस

कळंबा फिल्टर हाउस ते मोहिते पार्क

शाहू जकात नाका ते जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय चौक

कळंबा जकात नाका ते कळंबा फिल्टर हाउस

खानविलकर पेट्रोल पंप ते लाइन बाजार

दसरा चौक ते हॉकी स्टेडियम चौक

बागल चौक ते शिवाजी विद्यापीठ पोस्ट ऑफीस चौक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोरणात्मक निर्णय घेऊ

$
0
0

राज्य प्रदेश कार्यकारिणीची बैठक कोल्हापूरमध्ये घेण्याचा उद्देश काय?

भाजपची राज्य प्रदेश कार्यकारिणी बैठक ही दरवर्षी राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत असते. त्याप्रमाणेच कोल्हापुरमध्ये ही बैठक घ्यावी, असा प्रस्ताव दिला होता. तो मान्य करण्यात आला. गेल्या काही वर्षात कोल्हापुरात भाजपचा फार विस्तार होत नव्हता. २००९ सालच्या निवडणुकीत भाजपचा एक आमदार निवडून आला आणि त्यानंतर २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आले. या निवडणुकीत भाजपने ५ जागा लढविल्या होत्या. त्यांना पडलेले मतदान पाहता भाजपची ताकद वाढत असल्याचे दिसू लागले आहे. त्याला आणखी चालना देण्याच्या उद्देशाने ही बैठक फायदेशीर होईल, अशी अपेक्षा आहे.

या बैठकीत स्थानिक प्रश्नांवर काही चर्चा होणार का?

होय, नक्कीच. राज्य कार्यकारिणीची बैठक कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र‌िमंडळ कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने पक्ष संघटनेच्या पातळीवर काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील. त्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्नही आम्ही प्राधान्यांने मांडणार आहे.

टोलच्या प्रश्नाबाबत नेमकी भूमिका काय आहे?

टोलबाबत भाजपची भूमिका सुरूवातीपासून स्पष्ट आहे. आम्ही देखील पूर्णपणे टोलमुक्तीसाठी प्रयत्नशील आहोत. पण, त्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात काही दिलासा म्हणून कोल्हापूर पासिंगचा मार्ग सुचविला होता. तो मान्य झालेला नाही. त्यामुळे आता काही दिवस वाट पहावी लागेल. समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

धोरणात्मक निर्णयासाठी कोणते प्रश्न प्राधान्याने मांडणार?

कोल्हापूरचा टोल हीच प्रमुख मागणी असणार आहे. खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आहे. त्याबरोबरच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविणे, विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणे, केंद्र सरकारकडे कोल्हापूरच्या काही कामांबाबत पाठपुरावा करणे अशा कामांना या बैठकीच्या माध्यमातून गती येईल.

कोल्हापूरच्या दृष्ट‌ीने या बैठकीचे महत्त्व किती आहे?

राज्याचे मंत्रिमंडळ आणि केंद्रातील मंत्री कोल्हापूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे साहजिकच कोल्हापूरचे वेगवेगळे प्रश्न मार्गी लागतील. त्याबरोबरच काही महत्त्वपूर्ण निर्णय होतील ते कायम कोल्हापूरशी जोडले जातील. येथील निर्णय कोल्हापूरच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत झाला, असा शिक्का त्यावर पडणार असल्याने कोल्हापूरच्या दृष्ट‌ीने बैठक महत्त्वाची आहे.

दीपक शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेच्या अध्यक्षपदी माजी कामगार मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते विनायक उर्फ अप्पी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत निवड झाली.

केडीसीसी बँकेची यापूर्वीची निवडणूक २००७ मध्ये झाली होती. त्यानंतर लगेचच बँकेवर प्रशासक आले. बँकेची नुकत्याच झालेल्या निवडणुकीत २१ पैकी १९ जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्षप्रणीत छत्रपती शाहू विकास आघाडीने विजय मिळवला. एका जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. एका जागेचा निकाल राखीव आला आहे. बँकेच्या थकीत कर्ज वसुलीचे आव्हान लक्षात घेता मुश्रीफ किंवा काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारावे असा सूर होता. त्यानुसार नवनिर्वाचित संचालक मंडळाची गुरुवारी सकाळी बैठक झाली. त्यात नावे निश्चित करण्यात आली. बँकेच्या सभागृहातील बैठकीत दोन्ही पदांसाठी अनुक्रमे मुश्रीफ आणि पाटील यांचे नाव सुचविण्यात आल्याने कदम यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

मुश्रीफ १९९७ मध्ये बँकेचे अध्यक्ष होते. सध्या काँग्रेससोबत असलेले अप्पी पाटील जिल्हा परिषदचे सदस्य आहेत. निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी, बँकेचे कामकाज अत्यंत कठोरपणे चालवले जाईल. थकीत कर्ज वसुलीत कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ कोल्हापुरात

$
0
0

मटा प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाची प्रदेश राज्य कार्यकारिणी बैठक शुक्रवारी (२२ मे) रोजी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे बारा मंत्री शुक्रवारी सायंकाळी शहरात दाखल होतील. विविध संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

कार्यकार‌िणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २२ मे रोजी सायंकाळी पाच वाजता रेसिडेन्सी क्लबमध्ये होईल. बैठकीमध्ये कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या प्रस्तावांना अंतिम रूप देणे, झालेल्या आणि होणाऱ्या निवडणुकांचा आढावा आणि भविष्यातील योजना, सदस्य नोंदणी, महासंपर्क अभियान, प्रशिक्षण व अन्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येईल. शनिवारी सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कोल्हापुरात येणार आहेत.

सकाळी साडेसात वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन पेटाळा येथील मैदानावर ते पायी जाणार आहेत. सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन या वेळेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करतील. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत मार्गदर्शन करतील.

समारोपाला नितीन गडकरी

रविवारी (दि. २४) राज्य परिषदेच्या अधिवेशनाने कार्यकारणीचा समारोप होईल. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या कालावधीत मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील. दुपारी १२ ते २ या वेळेत कार्यकारणीचा समारोप होईल. प्रदेशाध्यक्ष दानवे, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करतील असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर पूर्ण टोलमुक्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथे आजपासून (शुक्रवार) सुरू होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना टोलमुक्तीची अपेक्षा आहे. सरकारने चर्चेला बोलावल्यामुळे टोलविरोधी कृती समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच मुख्यमंत्र्यांशी शनिवारी होणाऱ्या चर्चेत सकारात्मक निर्णय व्हावा, अशीच सर्वांची भावना आहे.

टोलप्रश्नी तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती समितीला शनिवारी (ता. २३ मे) चर्चेचे निमंत्रण दिले आहे. कृती समितीचे नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जणांचे शिष्टमंडळ शनिवारी चार वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

'आयआरबीचे नाके शहरात दिसू नयेत आणि रास्त कामापेक्षा कंपनीला चार आणेही जादा मिळू नयेत. आमची लढाई संपूर्ण टोलमुक्तीसाठी आहे,' अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यासह डझनभर मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. राज्य सरकारने टोलला पर्याय देण्याऐवजी तो रद्द करावा यासाठी कृती समिती आक्रमक होती. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी बंद, काळे झेंडे दाखविण्याचा इशाराही देण्यात आला होता. समितीच्या आक्रमकपणामुळे भाजपच्या अधिवेशनावर आंदोलनाचे सावट होते. गुरुवारी सकाळी डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी कृती समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलाना डॉ. पाटील म्हणाले, 'पालकमंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी फोन करून मुख्यमंत्री फडणवीस हे टोलप्रश्नी कृती समितीशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्याने कृती समितीच्या कार्यकर्त्यानी चर्चेचा निर्णय घेतला. काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत एकच चर्चा झाली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कृती समितीला टाळले.'



सरकारने बोलावल्यास चर्चेला जायचे हे आमचे धोरण आहे. पहिल्याच चर्चेत निकालाची अपेक्षा नाही. सध्या प्रकल्पाचे मूल्यांकन सुरू आहे. आम्ही सर्व्हेला वेळ द्यायला तयार आहोत. घाईगडबडीने निर्णय नको. कंपनीला रास्त किंमतीपेक्षा चार आणेही जादा जाऊ नयेत. - प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशपांडे अकादमीवर मंगला बनसोडेंची निवड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

मागील ५५ वर्षें लोककलेची अविरत सेवा करणाऱ्या येथील तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांची पु. ल. देशपांडे कला अकादमी मुंबईच्या सल्लागार समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले असून, बनसोडे यांच्या रूपाने पहिल्यांदाच तमाशा कलावंताला या अकादमीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाची पु. ल. देशपांडे कला अकादमी अकरा सदस्यांची असून, सांस्कृतिक कार्यमंत्री या अकादमीचे अध्यक्ष आहेत. या आकादमीमध्ये मंगला बनसोडे करवडीकर यांच्यासह प्रमोद पवार, अभिराम भडकमकर, योगेश सोमण, राजेश सावंत, उज्ज्वल निरगुडकर, पुरुषोत्तम लेले, उत्तम पाचारणे, भगवान रामपूरे, सतीश जकातदार, अशा प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजाची निवड केली आहे. प्रकल्प संचालक या अकादमीचे सदस्य सचिव असून ही निवड तीन वर्षांसाठी आहे. १२ जून रोजी अकादमीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये अकादमीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन व उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

सरकारने यापूर्वी अनेक पुरस्कार देवून गौरविले आहे. पण, या निवडीतून लोककला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांचे प्रश्न, त्यांच्या अडअडचणी सोडविण्यासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सरकारची ऋणी आहे.

- मंगला बनसोडे करवडीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

देवसरे (ता. महाबळेश्वर) येथे एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. मेढा पोलिस ठाण्यात या बाबतची तक्रार पीडिताने दिली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे या प्रकाराची कसून चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे वाळीत टाकण्याच्या या प्रकाराने देवसरे येथील महिला सरपंचांना राजीनामा देण्याची वेळ आली.

या बाबत संबंधित पीडिताने मेढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जानुसार, देवसरे परिसरात सावित्रा हरी पार्टे यांची जमीन आहे. संतोष तुकाराम जाधव हा त्यांचा नातेवाईक आहे. सावित्रा पार्टे व संतोष जाधव यांनी पार्टे यांची जमीन पुणे येथील एका व्यक्तीला विकली आहे. जमीन विक्रीच्या याच कारणावरून गावातील काही जणांनी आक्षेप घेतला असून, त्यातून आपणासह कुटुंबीयांना वाळीत टाकणे, धमकी देणे, असे प्रकार गावातून सुरू असल्याचे संतोष जाधव यांनी म्हटले आहे. जमीन विक्री केल्यानंतर विक्री करण्यासाठी मदत केली म्हणून गावच्या सरपंच कोमल जाधव यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिस ठाण्यात तक्रार देणारे संतोष जाधव यांच्या कोमल जाधव या पत्नी आहेत.

जमीन अंतिमत: विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावातील काही लोक संतप्त झाले. त्यांनी बैठका घेण्याचे सत्र सुरू केले. दरम्यान, त्यावेळी कोमल जाधव या सरपंच होत्या. रात्री अपरात्री बैठक बोलावून सर्वांसमोर त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. संबंधितांनी बैठका घेण्याचा सपाटा लावला व त्याद्वारे अपमानीत करणे, दमदाटी करण्याचा प्रयत्न चालवला. मार्च २०१४मध्ये सरपंच झाल्यानंतर काही गावकऱ्यांच्या हट्टामुळे जमीन विक्रीच्या कारणावरून त्यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला. पंधरा दिवसांपासून संतोष जाधव यांच्या कुटुंबीयांशी देवसरे गावातील लोकांनी संपर्क ठेवलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच फुटांपेक्षा लहान गणेशमूर्तीं

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा शहरातील तळ्यांचे प्रदूषण, रासायनिक रंगांमुळे उद्भवणारे धोके, आरोग्यावरील दुष्परिणाम, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा लाभलेला वारसा या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शाडूच्या गणेशमूर्तींसाठी सुरू केलेल्या मोहिमेस सातारकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होताय प्रबोधनाचा, समंजसपणाचा हाच कित्ता गिरविण्यास सातारकर यावर्षीही उत्सुक आहेत. पालिकेने तब्बल सव्वाशे दिवस आधीच मूर्तिकार, स्टॉलधारकांची बैठक शुक्रवारी घेतली. या बैठकीत यंदा पाच फुटांपेक्षा लहान गणेशमूर्तींची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला सातारा शहरातील गणेशोत्सव मंडळांनीही पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी मंगळवार तळ्याच्या प्रदूषणामुळे झालेल्या दुष्परिणामांपासून 'चला... बाप्पांचं पावित्र्य जपूया' ही मोहिम राबविण्यात आली. या चळवळीचे खूपच सकारात्मक परिणाम दिसून आले. तब्बल अडीच हजार घरांमध्ये शाडूच्या मूर्ती बसविण्यात आल्या होत्या. पालिकेने शाडूमूर्ती विकणाऱ्यांना खास सवलती देऊन प्रोत्साहित केले होते. कर्तव्य सोशल ग्रुप, मंगळवार तळे मित्र मंडळ आणि गणपती ट्रस्ट यांसारख्या सामाजिक संस्थाही हिरीरीने चळवळीत उतरल्या होत्या. घरच्या घरी विसर्जन करणाऱ्यांची संख्याही शेकडोंमध्ये पोहोचली होती.

चार महिने अगोदरपासूनच तयारी

यंदाच्या गणेशोत्सावाला अद्याप साडेचार महिन्यांचा अवकाश आहे. मूर्तीकार आणि मंडळांनी अद्याप कोणतेच नियोजन केले नाही. त्यांनी असे काही नियोजन करण्याअगोदरच पालिकेने पुढाकर घेतला आहे. पालिकेच्या पुढाकाराचे शहरात कौतुक होत आहे. मूर्ती पाच फूटांपेक्षा कमी उंचीची ठेवल्याने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या आभियानासा मोठे यश मिळणार आहे. दरम्यान, नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'महागणपती'ची मूर्ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय गेल्या वर्षी सम्राट मंडळाने घेतला. अजिंक्य गणेश मंडळासारखी अनेक मंडळे पूर्वीपासूनच कायमस्वरूपी मूर्ती ठेवतात, तर काही मंडळे या वर्षीपासून हा पर्याय निवडणार आहेत. मुंबईत महाकाय मूर्तींच्या विसर्जनासाठी समुद्र उपलब्ध आहे. पुण्यासह अनेक शहरांत तशी व्यवस्था नसल्याने कायमस्वरूपी मूर्तींचाच पर्याय चांगला ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, साताऱ्याचे पर्यावरणीय वेगळेपण, पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने असलेले महत्त्व ओळखून उत्सवाची आखणी आवश्यक असल्याचे मत शेकडो सातारकरांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images