Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वादळी वाऱ्यासह पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांची घबराट उडाली. कागल, गडहिंग्लज, शिरोळ भागात अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे नुकसान झाले.

जयसिंगपुरात झाडे कोसळली

जयसिंगपूर शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोळाव्या गल्लीत नारळाचे झाड कोसळल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या. झाडामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने जयसिंगपूर -शिरोळ रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

परिसरात दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. चार वाजण्याच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले. सोळाव्या गल्लीतील शांतीनाथ पाटील यांचे सुमारे ८० फूट उंचीचे नारळाचे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. मात्र झाड पडल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या. यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. शिरोळ तालुक्यायात कुरूंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, अर्जुनवाड, घालवाडसह अन्य ठिकाणीही विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तसेच झाडे कोसळली.

गडहिंग्लजमध्ये मुसळधार पाऊस

गडहिंग्लज शहर व परिसरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वारा व मेघ गर्जनांसह पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर सुरु असलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. कधी ऊन तर कधी ढग दाटून आलेले दिसून येत होते. मागील दोन दिवस पावसाचे सावट शहर व परिसरात दिसत होते. अखेर शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. महालक्ष्मी यात्रेदरम्यान कोणताही अडथळा निर्माण न करता यात्रेनंतर आलेल्या पावसामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केली. अचानक आलेल्या पावसामुळे फुटपाथवरील विक्रेते व व्यापाऱ्यांसह महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल झालेल्या अनेक छोट्या-छोट्या दुकानदारांची तारांबळ उडाली. पावसादरम्यान काही काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. मात्र काही वेळातच व्यवहार सुरळीत सुरु झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिराच्या आवारात स्टॉल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धार्मिक संस्था असल्याचे किंवा धार्मिक कार्य करत असल्याचे सांगून त्यासाठी अंबाबाई मंदिराच्या आवारात दुकानदारी सुरू करणाऱ्यांच्या प्रस्तावाला आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नकार दिला आहे. मंदिरातील भाविक व पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिराच्या आवारात स्टॉल मिळावा या मागणीच्या पत्रांचा भविष्यात विचार केला जाणार नाही. त्यामुळे मंदिराच्या आवारातील 'दुकानदारी'ला कुलूप लागणार आहे.

भाविकांना प्रसाद वाटप करणे, धार्मिक कार्यासाठी निधी संकलन अशाप्रकारचे काम करणाऱ्या संस्थांकडून मंदिराच्या आवारात स्टॉलची मागणी करणारे प्रस्ताव देवस्थानकडे आले आहेत. सध्या मंदिराच्या आवारात पूजेचे साहित्य मिळणारे १७ स्टॉल आहेत. मात्र सध्याच्या गाळेधारकांचा गेल्या तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरू आहे. मंदिरातील ओवऱ्यांमध्ये सुरू असलेल्या या दुकानांबाबतही मध्यंतरी वाद सुरू होता. नव्या प्रस्तावानुसार मंदिराच्या आवारात संस्थेच्या धार्मिक कार्याची माहिती देण्यासाठी स्टॉल मिळावा अशी मागणी केली जात आहे. या प्रस्तावाना परवानगी न देण्याच्या निर्णयावर देवस्थान व्यवस्थापन ठाम आहे.

मंदिराच्या आवारात पूजासाहित्य दुकानां​व्यतिरिक्त इमिटेशन ज्वेलरीचे एक दुकान आणि लॉटरीचा एक स्टॉल सध्या आहे. लॉटरीचे दुकान हटवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. मंदिराच्या आवारात असलेल्या या लॉटरी दुकानाला राजकीय अभय असल्याचे सांगितले जाते. भाविकांकडूनही मंदिरातील दुकानांना देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या आवारात अन्य कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक संस्थेच्या स्टॉलकडून येणाऱ्या प्रस्तावांवर देवस्थान समितीने कडक भूमिका घेतली आहे.

सुरुवात सुवर्णपालखी ट्रस्टपासूनच

गेल्याच महिन्यात अंबाबाईच्या सुवर्णपालखीसाठी सोने संचय व निधीसंकलन करण्यासाठी महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टतर्फे भाविकांकडून सोने व आर्थिक मदत स्वीकारण्यासाठी मंदिराच्या आवारात स्टॉल मिळावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र देवस्थान व्यवस्थापनाने या प्रस्तावाला नकार दिला. सुवर्णपालखी ट्रस्टने मंदिराच्या आवारात स्टॉलची मागणी केल्याचे समजताच अन्य काही धार्मिक मंडळांसह प्रसादवाटप केंद्रांनीही अशाप्रकारचे प्रस्ताव देवस्थानकडे पाठवले होते.

अंबाबाई मंदिरातील भाविकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी स्टॉल मागणी वाढली आहे. मात्र स्टॉलच्या माध्यमातून सुरू होणारी दुकानदारी भविष्यात धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मंदिराच्या आवारात कोणत्याही स्टॉलला परवानगी दिली जाणार नाही.

- संगीता खाडे, सदस्या, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नातवाला वाचवताना आजीही बुडाली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे कृष्णा नदीत आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडणाऱ्ऱ्या नातवाला वाचविताना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काशिबाई जगन्नाथ डोंगरे (वय ५५, रा. अर्जुनवाड) असे आजीचे तर वैभव शिवाजी शेळके (वय १०, रा. बेडग, ता. मिरज) असे नातवाचे नाव आहे.

बेडग येथील वैभव शेळके हा अर्जुनवाड येथे आजी काशिबाई डोंगरे यांच्याकडे सुट्टीला आला होता. शनिवारी दुपारी काशिबाई डोंगरे जनावरे धुण्यासाठी कृष्णा नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत वैभवही होता. नदीत पोहताना वैभव पाण्यात बुडू लागला. काशिबाई यांना हे लक्षात येताच त्यांनी पाण्यात धाव घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने नातवाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याही बुडाल्या. दरम्यान पुलावरून जाणाऱ्ऱ्या भरत येवारे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी नदीपात्रात बुडणाऱ्ऱ्या काशिबाई डोंगरे यांना पाण्यातून बाहेर काढले. वैभवलाही वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो पाण्यात बुडाला. खासगी वाहनातून उपचारासाठी मिरज सिव्हील रुग्णालयात नेत असतानाच काशिबाई डोंगरे यांचा मृत्यू झाला. अर्जुनवाडमधील तरुणांनी वैभवचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काशिबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना असा परिवार आहे. वैभव इयत्ता चौथीत शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’चे संचालक पाटील अपघातात ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भोगावती नदीवरील कसबा बीड ते महे दरम्यानच्या पुलाच्या कठड्याला स्कॉर्पिओ मोटार धडकून झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे (गोकुळ) संचालक सुरेश पाटील (वय ५६) हे ठार झाले. गडहिंग्लजहून परत येत असताना शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या पत्नी, मुलगा, सून व नात जखमी झाले.

पाटील हे पत्नी उषा, मुलगा सत्यजित, सून रेवती, नात स्नेहा यांच्यासह शुक्रवारी दुपारी चार वाजता गडहिंग्लजला मुलीकडे गेले होते. तेथून रात्री अकरा वाजता ते गावाकडे परत निघाले. मुलगा सत्यजित चालवत असलेली स्कॉर्पिओ मोटार मध्यरात्री एकच्या सुमारास भोगावती नदीवरील कसबा बीड ते महे दरम्यानच्या पुलाजवळ आली. भरधाव असलेली मोटार ताबा सुटल्याने सुरुवातीच्या कठड्याला जोरात धडकली. त्यानंतर मोटार नदीपात्रातील उतारावर उलटली. यावेळी सुरेश पाटील मोटारीबाहेर फेकले गेले. नंतर मोटार त्यांच्या अंगावर कोसळली. हात फ्रॅक्चर झालेल्या नऊ वर्षाची नात स्नेहा हीचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या गावातील काही जणांना अपघात झाल्याचे लक्षात आले. जखमींना तातडीने कोल्हापूरला हलविण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या पाटील यांचा मृत्यू झाला​. अन्य कुटूंबियांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव कसबा बीडमध्ये आणण्यात आले. अकराच्या सुमारास मुलीने अंत्यसंस्कार केले. यावेळी आमदार महादेवराव महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, पी. एन. पाटील, वैभव नाईक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआर बचावसाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या समस्यांबाबत सीपीआर बचाव कृती समितीच्यावतीने टाळे ठोक आंदोलनाचा निर्णय शनिवारी शाहू स्मारक भवनात झालेल्या बैठकीत घेतला. बुधवारी (ता. १३ मे) सकाळी ११ वाजता सीपीआरचे अधिष्ठाता दशरथ कोठुळे यांच्या दालनाला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

सीपीआरच्या समस्यांबाबत दोन वर्षांपूर्वी तेरा संघटनांनी एकत्र येत सीपीआर बचाव कृती समितीची स्थापन केली आहे. यादरम्यान पालकमंत्री, आमदारांसमवेत अनेक बैठका घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र आश्वासानांशिवाय काहीच न मिळाल्याने शनिवारी समितीच्या बैठकीमध्ये आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. भगवान काटे म्हणाले, 'सीपीआरचा निधी परत जाणे किंवा सुविधा नसणे याबाबत जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे. प्रशासनाला समितीचे वचक असणे आवश्यक असून पालकमंत्री, खासदार आणि आमदारांना याबाबत जाब विचारला पाहिजे.'

वसंत मुळीक म्हणाले, 'कोल्हापूरला कोणतीही गोष्ट लढल्याशिवाय मिळत नाही. सीपीआरचे प्रश्न लवकर सोडविण्यासाठी तीव्र आंदोलन करू.'

दिलीप पवार म्हणाले, 'दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत सीपीआरचे प्रश्न सोडविण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही. यासाठी टप्प्याटप्याने आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.' सीपीआरचे प्रश्न सोडविणे ही पालकमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांना भेटून याबाबत कैफीयत मांडण्याची गरज असल्याचे किशोर घाटगे यांनी सांगितले. बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. समीर नदाफ यांनी आभार मानले.

हे आहेत रेंगाळलेले प्रश्न

वैद्यकीय महाविद्यालयातील, रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरा

रुग्णालयासाठी अत्यावश्यक असणारी यंत्रसामुग्री तातडीने खरेदी करा

औषधासाठी निधी उपलब्ध करावा

शेंडा पार्क इमारतीमध्ये अंतर्गत बदल करण्यासाठी निधी उपलब्ध करावा

औषधामधील गैरप्रकार थांबवावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळीव पावसाचा पुन्हा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवस जाणवणाऱ्या प्रचंड उष्म्यानंतर शनिवारी सायंकाळी झोडपून काढलेल्या वळीव पावसाने शहरात पुन्हा झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरात जवळपास ५० हून अधिक झाडे व मोठ्या फांद्या कोसळल्या. शहराच्या बऱ्याच भागात ठिकठिकाणी मोठी झाडे व फांद्या कोसळल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या होत्या. शाहूपुरीत झाड पडल्याने वीजेचा खांब पूर्ण वाकल्याने वीज पुरवठा खंडीत.

या आठवड्यात दोन दिवसानंतर पावसाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. गुरुवारी जिल्ह्यात अनेक भागात जोरदार वळीव कोसळला. शनिवारी साडेपाचच्या सुमारास ​विजांच्या कडकडाटाला प्रारंभ झाला. जोरदार वाऱ्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. अनेकजण मिळेल तो आसरा घेऊन पाऊस जाण्याची प्रतीक्षा करत उभे होते. त्यानंतर पावसालाही सुरुवात झाली. मंगळवारी झालेल्या पावसाप्रमाणे जोर नव्हता, पण वळीवच असल्याने शहर व परिसराला झोडपून काढले. या काळात अनेक ठिकाणची झाडे कोसळली. त्याबाबत अग्निशमन दलाकडे शहरभरातून जवळपास तासभर फोन येत होते. त्यामुळे शहरातील चारही फायर स्टेशनच्या गाड्या व कर्मचारी मुख्य कार्यालयाकडून जसे आदेश मिळतील, तसे ठिकठिकाणी पोहचत होते. ​तेथील झाडे रस्त्यावरुन तसेच धोकादायक स्थितीतून दूर करत होते. शास्त्रीनगर, शाहूनगर, राजारामपूरी, शिवाजी पार्क, बापट कॅम्प, नेहरुनगर, शाहूपुरी, साईक्स एक्स्टेंशन, शाहू मिल कॉलनी या भागात मोठी झाडे कोसळली. त्यामुळे अनेक भागातील विजेच्या तारा तुटण्याबरोबर खांबही वाकले. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरु होते. रात्री आठ वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंची सवलत रेल्वेकडून बंद

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

देशातंर्गत क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडूंना रेल्वेकडून तिकीट दरात दिली जाणारी पन्नास टक्के सवलत मध्य रेल्वेचा पुणे विभाग नाकारत आहे. त्याचा फटका पुण्याला स्पर्धांसाठी जाणाऱ्यांना बसत आहे. देशभरात अन्यत्र कोठेही ही सवलत नाकारली जात नसताना, पुणे विभागाच्या या तुघलकी कारभारामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे.

राष्ट्रीय, अखिल भारतीय, राज्यस्तरीय आणि निमंत्रितांच्या स्पर्धांना येणाऱ्या खेळाडूंना सरकारी सवलती मिळतात. यात रेल्वे तिकीटामध्ये संयोजकांकडून भत्ता दिला जातो. तसेच निवास व भोजनाची सुविधा दिली जाते. मात्र, मार्च महिन्यापासून मध्ये रेल्वेच्या पुणे विभागाने ही सवलत बंद केली आहे. स्पर्धा संयोजक, खेळाडू सवलतीचा अध्यादेश घेऊन रोज या विभागाशी संपर्क साधत आहेत. मात्र, 'वर्षातून एकदाच आणि फक्त राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिकीट दरात सवलत दिली जाईल,' अशी भूमिका रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. रेल्वेच्या मुंबई आणि अन्य विभागांकडून खेळाडूंना सवलत मिळत असताना, केवळ पुणे विभागाची आडकाठी का, असा प्रश्न खेळाडू आणि संयोजक विचारत आहेत.

भत्त्याची भरपाई बक्षिसातून

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे खेळाडूंबरोबरच संयोजकांनाही फटका बसत आहे. खेळाडूंच्या प्रवास भत्ता आणि निवास व्यवस्था, भोजन यावर जादा खर्च होत असल्याने स्पर्धांच्या आयोजनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. काही संयोजकांनी हा खर्च भरून काढण्यासाठी बक्षिसांच्या रक्कमेत कपात केली आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

याबाबत पुणे विभागाच्या कमर्शिअल मॅनेजरांशी संपर्क होऊ शकला नाही. रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी 'पुण्यातील कार्यालयाशीच संपर्क साधा. त्यांच्याकडेच माहिती मिळेल,' असे सांगत हात झटकले.

पुणे विभाग वगळता राज्यात अन्यत्र खेळाडूंना तिकीट दरात सवलत मिळते. येथे सवलत मिळत नसल्याने विविध स्पर्धांच्या आयोजकांना प्रवास भत्त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

- राजेंद्र आंदेकर, जनरल सेक्रेटरी, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईच्या कष्टावर मुलांची गगनभरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पतीच्या अकाली निधनाने हुपरीच्या रंजना इंग्रोळे यांच्यावर आभाळच कोसळले. मात्र, शिकवण्या, नोकरी आणि नंतर हँडलूमचा व्यवसाय करीत त्यांनी संसारगाडा सावरला. आज त्यांचा एक मुलगा अमेरिकेत पीएच.डी करीत आहे, तर दुसरा ब्रिटनमध्ये नोकरी करतो आहे. मुलांची ही गगनभरारी पाहून रंजना इंग्रोळेंचे डोळे समाधान पावतात.

रंजना यांच्या वयाच्या तेहतिसाव्या वर्षी पती अरविंद इंग्रोळे यांचे निधन झाले. त्यावेळी मोठा मुलगा अनिकेत हा पाचवीला तर लहान मुलगा आदित्य साडेतीन वर्षांचा होता. सुरुवातीला शिकवण्या, त्यानंतर खासगी नोकरी आणि नंतर हँडलूमचा व्यवसाय करून रंजना यांनी मुलांचे पालनपोषण केले. मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी हँडलूमचे मोठे दुकान न थाटता घरीच व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांना सोलापूरच्या बहिणीची मदत झाली. कॉटन साड्या आणि सोलापुरी चादरी, तसेच हँडलूमच्या वस्तू उत्पादित करून त्या विकत. या काळात त्यांची दोन्ही मुले शाहू विद्यालयात शिकत होती. केआयटीमध्ये शिकताना मुलांनी शिक्षणातही चमक दाखविली. मोठा मुलगा अनिकेत अमेरिकेत पीएच. डी. करीत आहे. धाकटा मुलगा आदित्य ब्रिटनमध्ये नोकरी करतो.

मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढल्यानंतर नोकरी, व्यवसायातून मिळणारे उत्पन्नही अपुरे पडू लागले. मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी रंजना यांनी कर्ज काढले. त्यासाठी दिवंगत श्यामराव शिंदे यांचीही त्यांना मदत झाली. त्या कर्जावर मुलांनी पुढील शिक्षण घेऊन परदेशात चांगली नोकरीही मिळविली.

पतीच्या निधनानंतर कुटुंब चालवणे थोडे जड गेले. मात्र, बी. कॉमपर्यंत शिक्षण झाल्याने किमान नोकरी करता आली. नोकरीत कमी पैसे मिळत असले तरी मुलांकडे दुर्लक्ष नको म्हणून हँडलूम व्यवसाय केला. आज याकडे पाहिले तर घेतलेले कष्ट मुलांनी सार्थकी लावल्याचे दिसते.

- रंजना इंग्रोळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्र धोक्याची आहे, पण...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पादचाऱ्यांच्या सोयीसाठी केलेले, मात्र बहुतांश ठिकाणी दिवसभर विक्रेत्यांच्या ताब्यात राहणारे फुटपाथ, रस्त्याशेजारील मोकळ्या जागा रात्री अनेकांचा निवारा बनत असल्याचे चित्र शहरात कायमच पहायला मिळते. परगावाहून रोजी-रोटीसाठी आलेल्या गरजवंतांना महागाईच्या दिवसात निवाऱ्यासाठी झोपडीही नशिबी नसल्याने रस्त्याशेजारील जागा म्हणजे दिवसभरातील मजुरीपेक्षाही मोठी वाटते. अनेकांना फुटपाथ हाच मोठा आधार आहे. मात्र, अशा स्थितीत एखाद्या बेफिकीर 'सलमान'कडून फुटपाथवर झोपणाऱ्यांना धोका होऊ शकतो, हे वास्तव आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या चौघांना अभिनेता सलमान खान याने चिरडले होते. तेरा वर्षानंतर याप्रकरणी न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे फुटपाथवर झोपणाऱ्यांचा प्रश्न चर्चेत आला. वास्तविक शहराची लोकसंख्या साडेपाच लाखांच्या आसपासच आहे. मात्र, प्रमुख मार्गांवर रात्री फेरफटका मारल्यानंतर अनेकांनी फुटपाथचा, रस्त्याशेजारील जागांचा आसरा घेतल्याचे दिसून आले. त्यामध्ये महिलांचीही संख्या जास्त असल्याचे पहायला​ मिळाली. दिवसभर धडपडणाऱ्या या श्रमजिवी वर्गाला गाढ झोप लागत असली तरी रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या भरधाव वाहनांची त्यांना फिकीर नव्हती. त्यातून निश्चिंतपणे झोपलेल्या गरजवंतांना मृत्यू कधी कवटाळेल हे सांगता येत नाही.

या फेरीत रेल्वे स्टेशनच्या परिसरात पथारी पसरणारे अनेकजण पहायला मिळाले. त्यातील काहीजण पुढील प्रवासापूर्वीची विश्रांती घेत होते. अनेकजण शहरात दिवसभर इतर ​ठिकाणी मोलमजुरी करून विसाव्यासाठी स्टेशनचा परिसर निवडणारे आहेत. रोडवर कायम वर्दळ असते. तेथील दुकानाच्या पायऱ्या झोपण्यासाठी अनेकांनी निवडल्या होत्या. दिवसभर विविध साहित्याची विक्री करून गुजराण करणारी काही कुटुंबे जयंती नाल्याशेजारील खानविलकर पेट्रोलपंपानजीक राहतात. फुटपाथला लागूनच उभी राहिलेली झोपडी. या रस्त्यावरूनही सुसाट वेगाने वाहने जातात. वळणरस्ता असल्याने वाहनांचा ताबा सुटण्याची शक्यता अधिक.

टेंबलाई नाक्याकडून राजारामपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकाळा खणीशेजारी रस्त्यालगत अनेक वर्षांपासून छोटी घरे आहेत. त्यांच्या दारात रस्ते प्रकल्पामुळे आता फुटपाथ झाला आहे. तेथे अनेक नागरिक फुटपाथवर झोपलेले पहायला मिळाले. रंकाळ्याजवळील डी मार्ट परिसरात सध्या बांधकाम सुरु आहे. तेथील काही कामगारही निवाऱ्यासाठी फुटपाथचा आधार घेत असल्याचे दिसून आले. या दोन्ही ठिकाणी वाहनांचा वेग प्रचंड असतो. त्यातील एखादे वाहन जरी भरकटले तर जीवाला धोका होऊ शकतो. सदरबाजार, विचारेमाळ झोपडपट्टीमध्येही मुख्य रस्त्यालगत अनेकांनी दारातच पथाऱ्या पसरलेल्या पहायला मिळाल्या. येथे फुटपाथ नाही, रस्त्यावरील वीजपुरवठाही गायब अशी स्थिती. त्यामुळे वाहन भरकटले तर अपघाताचा धोका अधिक. लक्ष्मीपुरीसारख्या मध्यवस्तीतही अनेकांसाठी दुकानांच्या फळ्या, पायऱ्यांचा आधार आहे.

धास्ती सीरिअल किलरची

मे-जून २०१३ मध्ये कोल्हापुरात एका सीरिअल किलरने फुटपाथचा आसरा घेणाऱ्यांची झोप उडवली होती. पोलिसांनी संशयित सीरिअल किलर दिलीपसिंह कुवरसिंह लहरियाला अटक केल्यानंतर हे प्रकार थांबले. यादरम्यान १७ जणांचा मृत्यू झाला तरी, लहरियाने दोन भिकाऱ्यांचाच खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणाच्या तपासात हयगय झाल्याचे उघड झाल्यावर दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत केले गेले. याकाळात, रात्री फुटपाथवर झोपणाऱ्यांना पोलिसांनी हाकलून दिले होते. काही भिकाऱ्यांना सांगली, मिरजलाही पाठविण्यात आले. या काळात रस्त्याकडेला झोपणाऱ्यांची संख्या घटली होती.

नाइट शेल्टरचा फार्स

साधारण एक लाख लोकसंख्या असलेल्या गावात पन्नास ते शंभरजणांच्या वस्तीचे एक निराधारगृह असावे असा निकष केंद्रीय नगरविकास विभागाचा आहे. त्यानुसार कोल्हापूर शहरात महापालिकेने निराधारगृह होते. राजेंद्रनगर झोपडपट्टीतील हे निराधारगृहच काहीच दिवस सुरू राहिले. सीरिअल किलर प्रकरणानंतर महापालिकेने मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील जेम्स स्टोन इमारतीतील महापालिकेच्या मालकीच्या सहा खोल्या आणि सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल अशा दोन ठिकाणी रात्रनिवारा करणार असल्याचे सांगितले होते. नंतर तेही बारगळले. सध्या एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केटमध्ये अशी सोय केली आहे. एकटी या संस्थेला हे नाइट शेल्टर चालविण्यास दिले आहे. मात्र, तेथेही गैरसोयीच अधिक आाहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक

$
0
0

सांगली : मायाप्पाचीवाडी (ता. मिरज) येथील शेतकरी रंगराव आकराम चव्हाण (वय ६२) यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून मिरज ग्रामीण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चव्हाण यांनी तीन मे रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. चारही संशयित आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी झाली. चव्हाण यांना शरद रंगराव शिंदे, अमित रंगराव शिंदे, रंगराव बाळूराव शिंदे, सुरेश तुकाराम शिंदे यांनी धमक्या देऊन त्यांचा छळ सुरू केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकृष्ट ‘यूपीएस’ देऊन एक कोटींची फसवणूक

$
0
0

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या यांना निकृष्ठ दर्जाचे यूपीएस पुरवल्याबद्दल मुंबईतील 'एझेड' कंपनीचे मालक, भागीदार एम. के. गुजराथी आणि कंपनी प्रतिनिधी अनिल पाटील यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा नोंद झाला. सुमारे १ कोटी ७६ लाख रुपयांची ही फसवणूक असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित 'एझेड' इलेक्ट्रॉनिक्सवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र अडसूळ यांनी तक्रार दिली आहे. संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेअंतर्गत सांगली-कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना संगणक आणि यूपीएस पुरवण्याची प्रक्रिया सरकार स्तरावर दर-करार पद्धतीने झाली होती. सात कोटी रुपयांचा हा एकूण घोटाळा होता.ग्रामपंचायती, पंचायत समितीला 'एझेड' कंपनीने संगणक व यूपीएस पुरवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळधार वादळी पावसाने कराड, पाटणमध्ये दैना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

मागील दोन दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. कराड शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या परिसरात शनिवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दैना उडवली. पावसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने शहरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरली होती. अनेक ठिकाणी पडझड झाली असून, रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते तर वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबांचे व तारांचे मोठे नुकसान होवून रात्री उशीरापर्यंत वीजपुरवठा खंडीत झाला होता.

शनिवारी सायंकाळी साडेसहानंतर अचानक वादळी वाऱ्यास सुरूवात झाली. वाऱ्यामुळे सर्वत्र धुरळा उडाला होता. धुरळ्याने नागरिकांसह वाहनधारकही त्रस्त झाले होते. वाऱ्याने शहरातील उंच इमारतींवर लावलेले काही डीजिटल फलक फाटून तर डिश अँटेना मोडून रस्त्यावर पडले. वादळी वारे सुरू असतानाच विजांचा कडकडाट सुरू झाला. विजांच्या कडकडाटात पावसाने सुरूवात केली. प्रांरभी तुरळक सरी पडणारा पाऊस वाढत जाऊन मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशीरापर्यत पाऊस सुरूच राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या या पावसाने शहरातील उघड्यावर भरणारी भाजी मंडई विस्कळित झाली. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, येथील ग्रामीण परिसरात वादळी वाऱ्याने काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्यामुळे तारा तुटुन वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू असतानाच, अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने कराड शहरासह परिसर सुमारे दोन-तीन तास अंधारात होता. पावसापूर्वी जोरदार वारा वाहिल्याने शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांची धावपळ उडाली.

कराड तालुक्यातील वाठार, काले भागात जोरदार पाऊस झाला. काही भागात झाडे उन्मळून पडली तरी काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे विद्युत तारा तुटल्याने काही भागांत वीजपुरवठा गायब होता तर काही ठिकाणी खंडित करावा लागला. पाटण तालुक्याच्या काही भागात जोरदार सरी कोसळल्या. कोयनानगर, ढेबेवाडी परिसर बहुतांशी वेळ अंधारात होता. सोसाट्याचा वारा असल्यामुळे अनेक उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही घरांवरील पत्रेही वाऱ्याने उडून गेली. कराड-ढेबेवाडी मार्गावर विंग येथे आणि कराड-चिपळूण मार्गावर वसंतगड येथे रस्त्याकडेचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत थांबली होती.

साताऱ्यात नुकसान

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा वादळासह झालेल्या गारांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्री साडेसात वाजता सोसाट्याच्या वाऱ्याला सुरूवात झाली. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे रस्त्याकडेचे बॅनर्स, होर्डिंग्ज उडून गेले. त्यात वीज गेल्यामुळे नागरिकांची धास्ती वाढली. प्रवासी जीव मुठीत धरुन घराच्या ओढीने पळू लागले. बसस्थानकही अंधारात बुडाले होते. आठच्या सुमारास गारांच्या पावसाला सुरूवात झाली. अनेकांच्या घरावरील छपरे उडून गेली. पत्रे अँगलसह उडून संसार उघड्यावर पडले. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निबंधक कार्यालयाला एजंटांचा गराडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

निर्सगाचे वरदान लाभलेल्या पाटण तालुक्याची भुरळ अनेकांना पडत आहे. पाटण तालुक्यात गुंतवणूक करणाऱ्या धनिकांचा आणि दलालांचा गराडा पाटण दुय्यम निबंधक कार्यालयाला पडला आहे. अनेक दलालांना पायघड्या घातल्या जात असल्याने धनिकांचे व्यवहार सहीसलामत पार पडत आहेत, तर सर्वसामान्यांना कायद्यावर बोट ठेवत कार्यालयीन कारभाराचा नमुना अनुभवास येत आहे.

पाटण तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले असून, या निसर्गरम्य तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करण्यात येत आहे. त्यासाठी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. मोठ्या प्रमाणात जमिनीच्या खरेदीचा सपाटा धनिकांनी लावला असल्याने विविध व्यवसायिक, उद्योजक, उच्चपदस्थ नोकरशाहपासून राजकीय क्षेत्रांतील मान्यवरही यात मागे नाहीत. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठींच्या सर्व यंत्रणा धनिकांसाठी राबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व सोपस्कर व्यवस्थित पार पाडल्यानंतर खरेदी विक्रीचा शेवटचा व्यवहार पार पाडण्यासाठी दलालमंडळी संबंधितांच्या सहाय्याने फिल्डिंग लावत असून धनिकांचे व्यवहार सहीसलामत पार पाडत आहेत. धनिकांच्या व्यहारासाठी संबंधित यंत्रणा पायघड्या घालत असताना सर्वसामान्य माणसांना साध्या कामांसाठी ताटकलत बसाव लागत आहे. जुने उतारे, खरेदी दस्त मागणी करणाऱ्या नागरिकांना आठ-पंधरा दिवसानंतर येण्याबाबत सुनावले जात आहे.

पाटण तालुक्यातील सर्वसामान्य माणसांच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी चोख कारभाराचा नमुना दाखविणारे संबंधित ओळख पटवताना सर्वसामान्यांना घाम फोडत आहेत. यामुळे सर्वसामान्य माणसांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार, तर धनिकांची कामे विनासायास होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री इंटर्नशिपमधून रोजगाराची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी काम कसे चालते, योजना आणि धोरणे कशी ठरविली जातात आणि त्याची अंमलबजावणी कशी होते. याची माहिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रतिमहिना २० हजार रुपये मानधन देण्यात येणार असून यशस्वीरित्या एकवर्षे इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर त्याबाबत अनुभवाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रमाअंतर्गत कोणत्याही विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले २५ वर्षापेक्षा कमी वयाचे उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. केवळ पदवीधरांसाठी १ वर्षाच्या अनुभवाची अट घालण्यात आली आहे. तर आयआटी, आयआयएम, सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये, एनआयटी, जेबीआयएमएस, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी याठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनुभवाची अट शिथील करण्यात आली आहे.

शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि सामाजिक काम करण्याची आवड असलेल्या मुलांना या कामाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शेतीसंबंधी आवड आणि सरकारी कार्यालयांबाबत त्यांच्या मनामध्ये असलेले माहितीबाबत योग्य मार्गदर्शन होण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सरकार सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना सरकारी कामकाजाची पद्धती समजून घेता येईल. त्याबरोबरच तरुणांमध्ये व्यावसायिक कौशल्य वाढविणे, जबाबदारी वाढविणे आणि पूर्ण व्यावयायिक क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. राज्य सरकारच्या सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सरकारला विविध धोरणांची अंमलबजावणी करताना नवीन मुलांकडून आलेल्या कल्पना, त्यांचा उत्साह आणि धाडस याचा उपयोग करून घेता येणार आहे. तर युवकांना सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. त्याबरोबरच भविष्यात सरकारी नोकरी निवडायची किंवा खासगी याबाबत त्यांना निर्णय घेता येणार आहे.

या संधीचा फायदा १५ मे २०१५ पर्यंत घेता येणार असून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. २० आणि २१ तारखेला प्राथमिक चाचणी होणार असून २२ ते २७ मे दरम्यान प्राथमिक चाळणी परीक्षा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानशूरांचा मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जगण्याची नवी उमेद घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांना समाजातून मदतीचा हात मिळू लागला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी एचआयव्ही-एड्सची लागण झालेल्या मुलांना मदतीचा हात देऊ केला आहे.

१२७ मुलांपैकी नऊ मुलांच्या आहाराची जबाबदारी समाजातील दानशूरांनी घेतली आहे. या मदतीवर मुलांचे आयुष्य घडणार आहे. मात्र, अद्याप उर्वरित मुलांना मदतीची गरज आहे. 'मटा'मध्ये ५ मे रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

एचआयव्ही-एड्सची लागण झालेली अनेक मुले पालकांविना आहेत. अनेकदा आई-वडील नसल्याने त्यांचा सांभाळ आजी-आजोबांकडून होत असतो. विहान या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने अशा मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र, सर्वच मुलांना पोषक आहार देणे शक्य होत नाही. विहान संस्था सुमारे ५५० मुलांचा सांभाळ करत आहे. यातील १२७ मुलांना पोषक आहाराची गरज आहे. यात एका मुलासाठी त्यांना महिन्याला केवळ ४०० रुपयांची गरज असते. कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातून काही दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या मदतीमुळेच या मुलांचे आयुष्य वाढणार आहे.

वार्षिक पाच हजार रुपये मदतीने या मुलांच्या वर्षाचा आहाराचा खर्च होऊ शकतो. विहानच्या माध्यमातून मुलांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. महालक्ष्मी अन्नछत्रच्यावतीने १०० मुलांना पोषक आहार देणे सुरू केले आहे. त्याबरोबरच इचलकरंजीच्या सुनील लाहोटी यांनी सात मुलांच्या पोषक आहाराच्या खर्चाची तर अनिल नाईक यांनी दोन मुलांची एक वर्षासाठी जबाबदारी घेतली आहे. त्याप्रमाणे आपणही मुलांना मदतीचा हात देऊ शकता. त्यासाठी विहानचे प्रकल्प अधिकारी संजय साऊल यांच्याशी ०२३१-२६८०७०७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मुलांना मदत करावी असे वाटले. महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली बातमी वाचल्यानंतर मदतीचा निर्णय घेतला.

- सुनील लाहोटी, इचलकरंजी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या वर्षीच्या हंगामात नैऋत्य मोसमी पावसाच्या विलंबामुळे सोयाबीनची उशिरा पेरणी झाली. शेंगा भरतेवेळी पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे चालू खरीप हंगामातील सोयाबीन शिल्लक आहे त्यांनी बाजारात विक्री न करता, स्वत:कडे साठवणूक करून ठेवावे. स्वतःकडील बियाणे वापरावे, असे आवाहन कोल्हापूर कृषि विभागाने केले आहे.

एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ ते ३ वर्षापर्यंत वापरता येते. फक्त पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी स्वत:कडील अथवा गावातील अन्य शेतकऱ्यांकडील बियाणाची उगवणशक्ती पहावी. त्यासाठी वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात. तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्यांची गुंडाळी करावी. अशा रीतीने १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथीन पिशवीत चार दिवस ठेवाव्यात. चार दिवसांनंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यात बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. ती संख्या ५० असेल तर उगवण क्षमता ५० टक्के आहे, असे समजावे. जर ती संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के आहे असे समजावे. उगवणक्षमता चांगली म्हणजेच ७० ते ७५ टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवणक्षमता कमी असेल तर त्याच्या प्रमाणात अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळभाज्यांचे दर स्थिरावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फळभाज्यांची आवक आणि मागणी कायम असल्याने दरही स्थिर राहिले आहेत. मात्र हंगामाच्या मध्यावधीत हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात सरासरी १०० ते १५० रुपयांनी घसरण झाली आहे. रब्बी हंगामातील बटाटा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला असला, तरी त्याची प्रतवारी कमी असल्याने किलोमागे दहा रुपयांची घसरण झाली आहे.

गळीत हंगाम संपल्यामुळे मोकळ्या झालेल्या शेतीत भाजीपाल्याची उत्पादन घेतले जात असल्याने गेल्या दोन महिन्यापासून फळभाज्यांसह पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत फळभाज्यांचे दर ७० ते ८० रुपये किलो होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून फळभाज्यांचे दर निम्य्याने कमी आले आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसत असला, तरी ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून रब्बी हंगामातील बटाट्याची आवक वाढली आहे. मात्र, बटाटा उत्पादन क्षेत्रातील अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उत्पादन कमी प्रतीचे निघाले आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून २५ ते ३० रुपयांवर स्थिर असलेल्या बटाट्याची किमंत १० ते १५ रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

आंब्याची आवक वाढली

मार्च महिन्यापासून कोल्हापुरात दाखल झालेल्या हापूस आंब्याची आवक या आठवड्यात दुप्पटीने वाढली आहे. रत्नागिरी, देवगड हापूससह तोतापुरी, लालबाग, मद्रास पायरी आंब्याची आवक कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात डझनाचे दर शंभर ते १५० रुयपांनी कमी झाले आहेत.

डाळींची दरवाढ

सर्व प्रकारच्या डाळींची आवक कायम असताना दरात सरासरी पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांनी डाळी खरेदीकडे काहीशी पाठ फिरवल्याचे दिसले. त्यामुळे डाळ विक्रेते अडचणीत आले आहेत. मागणी नसतानाही डाळीचे दर वाढल्याने विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत तांत्रिक चुका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठामध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी रविवारी ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. केआयटी आणि सातारा वाढे फाटा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस केंद्रावर तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली. ऑनलाइन बिघाडामुळे प्राणिशास्त्र विषयाचा पेपरही पाऊणतास उशीरा विद्यार्थ्यांना देण्यात आला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १९४७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १०८३ जणांनी ऑनलाइन आणि ८६४ जणांनी ऑफलाइन परीक्षा दिली.

विद्यापीठाने काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये बदल केल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर देण्याची व्यवस्था केली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी एसएमएस मिळाले नसल्याचे सांगितले. प्राणीशास्त्र विषयाचा सकाळी ११ वाजता पेपर होता. काही तांत्रिक कारणामुळे हा पेपर विद्यार्थ्यांना वेळेवर मिळाला नाही. मात्र पुन्हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन तीन जिल्ह्यातील काही केंद्रावर पावणेबारा वाजता पेपर देण्यात आला. शिवाजी विद्यापीठ विविध अभ्यासक्रमासाठी एंट्रन्सची सुरुवात झाली आहे. पहिला टप्प्यात एम. एस्सी. प्राणीशास्त्र, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, इनव्हॉरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. इनव्हॉमेंटल सायन्स, एम. एस्सी. फुड सायन्स या विषयांच्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन पध्दतीने झाल्या. ऑफलाइन पध्दतीने बीजेसी, एमजेसी, एम. ए. एन्ट्रस फॅकल्टी चेंज, एम. ए. मास कम्युनिकेशन, एम. बी. ए. डिस्टन्स मोड या विषयांच्या प्रवेश परीक्षा झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा घनसाळ ‘पेटंट’कडे

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

आजऱ्याची खरीखुरी ओळख म्हणून आपल्या अंगभूत अस्सल सुवासिकतेसह चवदारपणामुळे सर्वदूर पसरलेल्या आणि जातीवंत खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या घनसाळचे पेटंट येथील आजरा तालुका शेतकरी मंडळाला मिळण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे.

गेली काही वर्षे यासाठी येथील मंडळाचे धडपडे शेतकरी व कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे येत्या २७ मे रोजी याबाबतचे अंतिम प्रेझेंटेशन तज्ज्ञ पॅनेलसमोर होणार आहे. याआधीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे पेटंट कोणाकडेही नसल्याने कोणाच्या हरकतीही आलेल्या नाहीत. त्यामुळे आता आजऱ्याचा सुवासिक घनसाळ आजरेकरांच्याच मालकीचा राहणार असल्याची माहिती 'आत्मा'चे अॅग्रो मार्केटींग एक्स्पर्ट धनराज पाटील व नितीन सुकळीकर यांनी 'मटा'ला दिली.

आजरा म्हटले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातील खवय्यांना आठवण येते ती घनसाळ तांदळाची. येथील लाल मातीत स्वाभाविकतेने रुजलेल्या आणि या वातावरणातील अंगभूत गुणवैशिष्ठ्यांची खासियत घेऊन उगवणाऱ्या घनसाळचे वाण काही वर्षांपूर्वी अस्तंगत होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा कृषी विभागाचे तत्कालीन अधिक्षक उमेश पाटील, मोहन आटोळेंसह तालुका कृषी विभाग व धडपड्या शेतकऱ्यांनी हे वाण जिद्दीने संवर्धित केले. केवळ एवढेच नव्हे तर विक्रमी उत्पादनही घेतले. यातूनच घनसाळचा आदर्शवत दाभिल प्रकल्प साकारला.

गेली काही वर्षे घनसाळचे उत्पादन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असताना येथील अस्सल वाण असलेल्या घनसाळचे पेटंट भलत्याकडेच जाण्याची भिती होती. त्यासाठी आजरा शेतकरी मंडळाचे संभाजी सावंत, संताजी सोले आदींनी पुढाकार घेत पेटंट मिळविण्यासाठी कंबर कसली. क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया वर्षभरापूर्वी पूर्ण करीत या वाणाची माहिती ऑनलाईन प्रकाशित करीत हरकती मागविण्यात आल्या. या वाणातील अंगभूत घटकद्रव्यांबाबतची माहिती प्रसारित करीत अशा घटकद्रव्यांनी युक्त ज्याला आजरा घनसाळ म्हणतात त्याचे पेटंट जगात कोणाकडे आधीच असल्यास त्याबाबतच्या हरकती वर्षभरापूर्वीच मागविण्यात आल्या. मात्र अशा कोणत्याही हरकती आल्या नसल्याने आता या वाणबाबतचे भू-जैवशास्त्रीय तांत्रिक माहीतीचे प्रेझेंटेशन दिल्ली येथे होईल. तज्ज्ञांच्या या पॅनेलसमोर हे प्रेझेंटेशन झाल्यावर आजरा घनसाळचे पेटंट आजरेकरांच्याच ताब्यात राहण्याचा मार्ग मोकळा होईल.

मिर्च मसाला व काळा घेवडा पेटंट घेणार

येत्या २७ मे रोजी दिल्ली येथे पेटंटसाठीच्या प्रेझेंटेशनमध्ये जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील महिला गटाच्या मिर्च मसाला उत्पादनासह नजिकच्या सातारा जिल्ह्याचे स्वाभाविक वाण असणाऱ्या काळा घेवडा या कडधान्याचाही घनसाळप्रमाणे पेटंट मिळविण्यासाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या तीन उत्पादनांसह राज्यातील अन्य पंधरा उत्पादनांचेही प्रेझेंटेशन संबंधीत शेतकऱ्यांच्या वतीने २७ मे रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखान्यांच्या आयकर नोटिसांना स्थगिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

साखर कारखान्यांना आयकर खात्याने बजावलेल्या नोटिसांना तत्काळ स्थगिती देण्याचा आदेश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थमंत्रालयाला दिले. एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या नोटिसा हा चिंतेचा विषय बनलेला होता, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

उचित आणि लाभकारी मूल्यापेक्षा (एफआरपी) जास्त उसाचा दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाने आयकराबाबत नोटसा पाठविल्या होत्या. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत भेट घेऊन विनंती केलेली होती, त्यावेळी हे आदेश देण्यात आले. केंद्र सरकार उसाला उचित आणि लाभकारी मूल्य (एफआरपी) संपूर्ण देशाला जाहीर करीत असते. परंतु राज्यनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. साखर नियंत्रणमुक्त करणाऱ्या सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक राज्याने एफआरपीपेक्षा जादा भाव किती निघतो हे पाहण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे सुचविले होते.

शिष्टमंडळाने अर्थमंत्र्यांना विनंती केली की, केंद्र व राज्य सरकारच्या समितीने सुचविलेल्या दराएवढी उसाची किंमत देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकरच्या नोटिसा देण्यात येऊ नयेत अशी मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या नोटिसा हा चिंतेचा विषय झालेला होता. त्यामुळे हा विषय निकाली निघण्याचे मार्ग खुले झाले आहेत. या शिष्टमंडळात विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी व खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images