Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुस्लिम दफनभूमीत समतेचे तत्त्व

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

कमी जागा, नवीन जागा मिळण्यात अनेक अडचणीमुळे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानामध्ये रिसायकल पद्धतीने दफनविधी करण्याची पद्धत अवलंबली जात आहे. मूळ जागेत पाच ते सहा वर्षानंतर पुन्हा त्याच जागेत दफन केले जाते. दफनभूमीत सर्वांसाठी समानतेचे तत्त्व अवलंबिण्यात आले आहे.

बागल चौक, कसबा बावडा व रमणमळा येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. मात्र, बागल चौकातील पाच एकर जागेतील कब्रस्तानातच गेली शंभरहून अधिक वर्षे दफन केले जाते. पूर्वी विविध व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांच्या नावाने स्मशानभूमीत जागा आरक्षित होती. आई, वडील, मुले, मुली, आजी, आजोबा अशांच्या कबरी होत्या. मात्र लोकसंख्या वाढल्याने दफनभूमीसाठी जागा कमी पडू लागली. बागल चौकातील कब्रस्तानातून चार नाले गेले आहेत. त्यापैकी दोन नाल्यांचे सपाटीकरण करून जागा दफनासाठी उपयोगात आणली गेली. तरीही जागा कमी पडू लागली.

बागल चौक कब्रस्तानाचे व्यवस्थापन मुस्लिम बोर्डिंगकडे आहे. शंभर वर्ष जुन्या असलेल्या सर्वसामान्यांबरोबर श्रीमंत, साहित्यिक, नामवंत व्यक्तींच्या कबरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला सुरवातीला विरोध झाला. मात्र जागेचे महत्व लक्षात घेऊन विरोध मावळला. अनेकांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुस्लिम बोर्डिंग ठाम राहिली. बोर्डिंगच्या मालकीची जागा असल्याने सर्व कबरी हटवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. पाच एकरात ३६०० प्लॉट पाडण्यात आले. प्रत्येक प्लॉटकडे जाण्यासाठी पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता करण्यात आला आहे. ज्या प्लॉटमध्ये दफन केले जाते त्याच प्लॉटमध्ये पाच ते सहा वर्षांनी पुन्हा नव्या मृतदेहाचे दफन केले जाते. पूर्वी दफन केल्यावर मीठाचा वापर करून फरशी टाकली जात होती. सध्या मीठाचा वापर बंद केला गेला आहे. फरशीऐवजी लाकडाच्या फळ्या टाकल्या जातात. महिन्याला सुमारे ३० ते ३५ मृतदेहांचे दफन केले जाते.

मुस्लिम बोर्डिंगने ४५० नारळाची झाडे लावून कब्रस्तानाचे सुशोभिकरण केले आहे. दफनविधीवेळी नमाजासाठी हॉल बांधण्यात आला आहे. तसेच स्वच्छतागृह, पाण्याची सोय केली आहे. महानगरपालिकेच्यावतीने विद्युत व्यवस्था केली आहे. कब्रस्तान विकास समितीचे अजिज जमादार, साजिद खान, जावेद बागवान, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी स्मशानभूमीचे काम पाहतात.

गरीबांचा खर्च महापालिकेने उचलावा

मृत व्यक्तीच्या दफनविधीचा खर्च त्यांच्या वारसांनी करावा अशी धार्मिक शिकवण आहे. सध्या दफनविधीचा खर्च सुमारे १८०० रुपये येतो. बेवारस व गरीब लोकांचा खर्च मुस्लिम समाजाच्यावतीने केला जातो. महानगरपालिकेने यातील काही खर्च उचलावा, अशी मागणी मुस्लिम धर्मियांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महालक्ष्मी’ची अविरत ४४ वर्षे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भकाभक धूर सोडत जाणारे कोळशाचे इंजिन, मरुन रंगाचे डबे, लाकडी फळ्यांची बाकडी, पिवळ्या बल्बचा अंधूकसा प्रकाश अशा डौलात कोल्हापुरातून मुंबईला जाणारी व रेल्वेच्या नकाशावर कोल्हापूरच्या एक्सप्रेस रेल्वेची पहिली निशाणी उमटवणारी महालक्ष्मी एक्सप्रेस सोमवारी (११ मे) ४४ वर्षाची सेवा पूर्ण करत आहे. या कालावधीत किरकोळही अपघातग्रस्त न झालेली अशी या रेल्वेची ख्याती आहे. सध्या चकाचक लाईटस, मोबाइल चार्जिंगची सुविधा, चांगल्या प्रकारचे कुशन, फॅन अशा सुविधा निळा रंगाच्या डब्यांमध्ये असल्याने मुंबईला जाताना अजूनही अनेकजण महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवासालाच प्राधान्य देत असतात. त्यामुळेच अजूनही दिड ते दोन म​हिने बुकिंग फुल्ल असते.

शाहू महाराजांनी मिरजेतून कोल्हापूरपर्यंतचे रेल्वेचे कनेक्शन जोडल्यापासून स्वातंत्र्यानंतरही मीटरगेजची रेल्वे अस्तित्वात होती. ब्रॉडगेज रेल्वे सुरु झाल्यानंतर पहिली रेल्वे सुरु झाली ती महालक्ष्मी एक्सप्रेसच्या रुपानेच. ११ मे १९७१ साली 'महालक्ष्मी' मुंबईसाठी धावू लागली. त्यावेळी बेंगलोरहून आणखी एक महालक्ष्मी एक्सप्रेस मिरजेपर्यंत येत होती. त्यावेळी हा सारा परिसर दक्षिण मध्य विभागात असल्याने त्या रेल्वेतून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी कोल्हापूरच्या 'महालक्ष्मी' शी कनेक्शन जोडले होते. त्यामुळे अनेकवेळा कोल्हापुरातून सुटलेली 'महालक्ष्मी' मिरजेत लवकर पोहचायची व ​बेंगलोरच्या 'महालक्ष्मी' ची वाट पहात प्रवाशांना बसावे लागत. अनेकवेळा दोन दोन तास ती रेल्वे लेट असायची. त्यामुळे ही रेल्वे कल्याणमध्ये उशीरा पोहचायची. तिथून मुंबईत पोहचण्यासाठी बराच वेळ लागायचा. १९९५ च्या आसपास ही साथ सुटली व कोल्हापूरची 'महालक्ष्मी' आपल्या वेगाने धावू लागली.

सध्या धावणाऱ्या 'महालक्ष्मी' ला २१ डबे आहेत. त्यातून आसनसंख्येप्रमाणे दररोज १४३० प्रवाशी प्रवास करतात. पण जनरल डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बसत असल्याने दररोज जाणाऱ्या प्रवाशांची संख्या १७०० पर्यंत जाते. रेल्वे धावताना पाहतो, पण तिला डिझेल प्रचंड लागत असते. इंजिन सुरु करण्यासाठी केवळ २५ लिटर डिझेल लागते. मुंबईच्या एका फेरीसाठी २८०० लिटर डिझेल लागते. या प्रवासातून प्रवाशी व पार्सलमधून दररोज सहा लाख अकरा हजार २२० रुपयांचे उत्पन्न हमखास असते. त्यामध्ये ८० हजार रुपये पार्सलचे उत्पन्न असते. गाडीचा वेग वाढवला जावा असे प्रयत्न सुरु आहेत. पण सध्या प्रवासाचा वेळ व किलोमीटर पाहता 'महालक्ष्मी' सरासरी ४७ किलोमीटर वेगाने धावताना दिसते.

वाढदिवस स्टेशनवर

कोल्हापूर रेल्वे स्टेशन शतकोत्तर रौप्यमहोत्सव समितीच्यावतीने 'महालक्ष्मी एक्सप्रेस' चा ४४ वा वर्धापनदिन सोमवारी रात्री आठ वाजता रेल्वे स्टेशनवरच साजरा करण्यात येणार आहे. केडीसीसीचे नूतन संचालक अनिल पाटील यांच्या हस्ते केक कापून 'महालक्ष्मी'ला शुभेच्छा देण्यात येणार आहे, असे शिवनाथ बियाणी व मोहन शेटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूसाठ्याची शोधशोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

कवठे एकंद येथील दारू कारखान्यातील स्फोटाने अकरा जणांचा बळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी जिल्हाभर शोभेच्या दारू साठ्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. फटाके उत्पादन करणारे कारखाने आणि विक्रेते यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने त्या सर्वांचे व्यवसाय त्वरीत बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. रविवारी सांगलीतील तीन विक्रेत्यांकडे परवान्यापेक्षा अधिक साठा असल्याचे समोर आल्याचे पोलिस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.

कवठेएकंदमध्ये दारू साहित्याच्या उत्पादनासाठी दिलेले परवाने मर्यादीत कालावधींकरीता आहेत. केवळ दसऱ्याच्या निमित्ताने एकदाच संबधितांना मोजके साहित्य उत्पादन करण्याची मूभा आहे. असे असताना संबधितांनी फटाके उत्पादनाचा व्यवसायच उघडला आहे. त्यामुळे अशा गंभीर घटना वारंवार घडत आहेत. फटाक्यांच्या कारखान्यासाठी आवश्यक असणारे नियम पाळले गेलेले नाहीत. दुर्घटनेपासून बचाव होण्यासाठीची उपाययोजना नाही. असे असताना त्यांचे परवाने नुतनीकरण कसे झाले. त्यासाठी कोणत्या कागदपत्रांचा आधार घेतला गेला. याचा शोध घेतला जात आहे. पण आवश्यक ती कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. कवठेएकंदमध्ये तीन आणि भाळवणी येथे एक असे फटाके उत्पादनाचे परवाने दिले गेले आहेत. त्यापैकी भाळवणी येथे वर्षांतून एकदाच म्हणजे दिवाळीत फटाक्यांचे उत्पादन केले जाते. एरवी तो कारखाना बंद ठेवला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, कवठेएकंद येथे मात्र वर्षभर फटाक्यांचे उत्पादन केले जात होते. संबधित व्यावसायिक इतरांकडूनही साहित्य तयार करून घेत होते, अशीही माहिती पुढे येत आहे. पहिल्या टप्प्यात सर्वच ठिकाणचे फटाक्यांचे उत्पादन रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय ज्यांच्याकडून नियमांचे पालन केले गेले नाही. योग्य ती काळजी घेतली गेली नाही, अशांचे परवाने त्वरीत रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याची माहिती नुकतीच जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी दिली.

परवान्यापेक्षा अधिक साठा

सांगली पोलिसांच्या शोध मोहिमेत सांगलीतील गणपती पेठेतील दतात्रय शंकर शेटे जनरल स्टोअर्स, गोदरेज फटाका स्टॉल, सुमन राखी सेंटर, संजय राखी सेंटर आदी फटाके विक्रेत्यांकडे परवान्यापेक्षा अधिक साठा असल्याचे समोर आले आहे. परंतु, संबधित विक्रेत्यांनी संबधित फटाक्यांमधील स्फोटकाच्या साठ्याचे मोजमाप झाले पाहिजे. संपूर्ण फटाक्याचे वजन घेतल्यास साठा जास्तच येणार, असा युक्तीवाद केल्याने या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या संबधित दुकानांची पोलिस दप्तरी नोंद करून ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोणी वधू देता का वधू?

$
0
0

संपत पाटील, चंदगड

विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वांत महत्वाचा प्रसंग. मुलगा किंवा मुलगी उपवर झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते त्यांच्या विवाहाचे. मात्र सद्यस्थितीला मुलासाठी मुलगी शोधणे म्हणजे एखादी अवघड मोहीम फत्ते केल्याचा अनुभव वर पक्षाला येत आहे. तालुक्यामध्ये मुलींचे प्रमाण चांगले असले तरी नोकरी या एका कारणासाठी अनेकांचे विवाह रखडले आहेत. सर्वत्र नोकरीअभावी विवाहाला अडचण येत असल्याने अनेकजण वधूच्या शोधासाठी कर्नाटकाकडे धाव घेताना दिसत आहेत.

मुलगा शेती करत असेल तर विवाह होणे फारच कठीण. सुख-सोयींमुळे माणूस सुखासीन बनला असून कष्ट कमी झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक वधूपित्याला वाटते की, आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे, त्यामुळे नोकरदाराला प्राधान्याने पसंती दिली जाते. ग्रामीण भागामध्ये मुलगी पहायला गेल्यानंतर वधू पक्षाकडून विचारला जाणारा पहिला प्रश्न मुलाला सरकारी नोकरी आहे का? या प्रश्नांचे उत्तर नोकरी करतोय असे आल्यानंतर पर्मनंट आहे का? पगार कीती आहे.? हे सगळे झाल्यानंतर शेती आहे का?मुलगी शेतात काम करत नसली तरीही शेतीची विचारणा केली जाते.

नोकरीच्या आशेने शिकत असताना वय वाढत जाते. जसजसे वय वाढत जाते, तसा घरच्या मंडळीच्या आग्रहास्तव विवाहासाठी होकार दिला जातो. त्यानंतर सुरु होतो वधूचा शोध. मात्र ज्या ठिकाणी जातो, तेथे नोकरी या एका कारणामुळे मुलगा निर्व्यसनी व चांगला,एकुलता एक, घरची शेती, उत्पन्नही चांगले असले तरीही वधूपक्षाकडून वराला नोकरी नसल्यामुळे नकार मिळतो. मुलगा उच्चशिक्षित व भविष्यात नोकरीच्या संधी असल्या तरीही सद्यस्थितीवरच मुलगी द्यायची कि नाही याचा विचार होतो. मात्र मुलगी देताना वधूपक्ष असलेली मंडळी स्वतःच्या मुलाला मुलगी शोधताना मात्र कशाला पाहिजे नोकरी घरची एवढी शेती असताना असा विचार करतात. साहजिकच मुलीबाबतचा विचार आणि मुलाबाबतचा विचार करताना फरक दिसून येतो.

पूर्वीच्या काळी वधूला-वर पक्षाकडून नकार दिला जात होता. हीच परिस्थिती आज उलटलेली आहे. वरपक्षाची आर्थिक स्थिती, त्याची नोकरी, नोकरीचा दर्जा, वराचे व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध या सर्व गोष्टीचा अभ्यास करूनच वधूच्या पित्याकडून वरपक्षास होकार अथवा नकार दिल्यामुळे आजच्या परिस्थितीत वरपक्षापेक्षा वधूपक्षास मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यामध्ये एक हजारी मुलांपाठीमागे मुलींचे प्रमाण ९८० असले तरी नोकरीच्या कारणामुळे वधूपक्ष मुलगी देत नाही.

कर्नाटक राज्यामध्ये मुलगी देताना मुलाचा स्वभाव, उत्पन्न, घरची शेती अन्यथा व्यवसाय चांगला असल्यास मुलगी दिली जाते. नोकरीची अटही असते. मात्र मुलाची आर्थिक स्थिती चांगली असल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. चंदगड तालुक्यामध्ये चांगली शेती, मुबलक पाणी व सधन भाग असल्याने या भागात कर्नाटकातील मुलींचे प्रमाण गेल्या पाच वर्षात वाढले आहे. येथे घरची परिस्थिती व घरची मंडळी वागण्यास चांगली असल्यास नोकरीचा फारसा विचार होत नसल्याने तालुक्यातील अनेक लोक तालुक्यामध्ये फिरुन थकल्यानंतर हमखास कर्नाटकातील वधूपक्षाकडे आपला मोर्चा वळवितात.

शहरी राहणीमानाचे आकर्षण

ग्रामीण भागातील लोकांना शहरातील राहणीमानाचे आकर्षण आहे. मुलगा नोकरीसाठी बाहेरगावी असेल तर आपली मुलगी त्याच्यासोबत सुखात राहू शकते, असा काहींचा समज आहे. मुलगा शेती करत असल्यास मुलीलाही शेतात काम करावे लागणार त्यामुळे तिला सुख मिळणार नाही अशी कल्पना केली जाते. त्यामुळे नोकरदार मुलांना लग्नांच्या बाजारात अधिक पसंती दिली जाते. त्यानंतर व्यवसाय असलेल्यांना प्राधान्य मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल नाक्यांवर चित्रीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास महामंडळ, महापालिका, आयआरबी कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक २५ मे रोजी होत आहे. या बैठकीतच टोलबाबत निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शहरातील नऊही टोल नाक्यावर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मुंबईतील समर्थ सॉफ्टटेक या कंपनीला काम सोपविले आहे. १८ तारखेपर्यंत हा सर्व्हे केला जाणार आहे. दरम्यान, कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहळ हे रविवारी संध्याकाळी कोल्हापूरात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांचे’ नारळ बिनपाण्याचे

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाचगावातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या उदघाटन कार्यक्रमात राजकीय सलामीच झडली. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी या कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. 'शहरालगत असलेल्या पाचगावचा विकास चांगला झाला असता, पण लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे विकास खुंटला' असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला. तर आमदार अमल महाडिक यांनी 'विरोधकांनी विकासकामांचे अनेक नारळ फोडले. पण हे सगळे नारळ पाण्याविना कोरडे होते' अशी टीका केली.

राष्ट्रीय पेजजल योजनेंतर्गत पाचगाव येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेचा उदघाटन सोहळा रविवारी शिक्षक कॉलनीत झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाडिक गटाने पाचगावात शक्तीप्रदर्शन केले.

खासदार महाडिक म्हणाले, 'पाचगावकरांच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार महादेवराव महाडिक यांनी दिली होती. पाचगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वी विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले. आम्ही पुढाकार घेऊन कूपनलिका खोदून दिल्या. मात्र, विरोधकांनी पाणीप्रश्नाचे राजकारण करत जनतेच्या तोंडाचे पाणी हिसकावले. अमल महाडिक यांनी गेल्या महिन्यात सातत्याने पाठपुरावा करून पाचगावसाठी सहा कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे'

अमल महाडिक म्हणाले, 'पाचगाववासियांनी दहशतीला बाजूला सारून विकासकामांच्या बाजूने कौल दिला आहे. विरोधकांनी यापूर्वी विकासकामांचे अनेक नारळ वाढविले. मात्र ते पाण्याविना कोरडे गेले. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे येत्या काही काळात पाचगाववासियांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.' या कार्यक्रमाला सरपंच शोभा भालकर, ग्रामपंचायत सदस्य मनिषा पाटील, भिकाजी गाडगीळ, अमर कारंडे, सुनील घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे ठिकाणांचे सॅम्पल घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या टोलमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल पडत आहे. रस्ते प्रकल्पाचे फेरमूल्यांकन राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून सुरू असतानाच रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महापालिकेनेही स्वतंत्रपणे फेरमूल्यांकन सुरू केले आहे. टोलवसुलीतून ​मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती संकलित केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर कर्मचारी नेमून तासागणिक वाहनांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. आयआरबी कंपनीच्या रस्ताची गुणवत्ता तपासण्यासाठी २०० ठिकाणचे नमुने घेतले जाणार आहेत.

कोल्हापूर टोलमुक्त करण्यासाठी राज्य सरकार विविध प्रस्तावांवर विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ३१ मेपर्यंत टोलबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

महापालिकेतर्फे शुक्रवारी मध्यरात्रीपासून नऊही टोल नाक्यावर सर्व्हे सुरू केला आहे. यासाठी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक नाक्यावरून होणारी वाहतूक, कंपनीकडून होणारी टोलवसुली, वाहनांची नोंद घेतली जात आहे. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांची आणखी चार पथके रस्त्यांचे मोजमाप करत आहेत. प्रत्येक रस्तानिहाय अपुरी व अर्धवट कामांची यादी तयार केली जात असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यानी दिली. आयआरबी कंपनीने केलेल्या कामाच्या गुणवत्तेविषयी टोल विरोधी कृती समिती, आर्किटेक्ट व इंजिनीअरिंग असोसिएशनेही आक्षेप नोंदविले आहेत. महापालिकनेही स्वतंत्रपणे रस्त्यांचा दर्जा व गुणवत्ता तपासणी सुरू केली आहे. आयआरबीने शहरात १३ रस्ते केले आहेत. या रस्त्यावरील कामाचे २०० ठिकाणी नमुने घेतले जात आहेत. मशिनने दोन ते अडीच फूट खुदाई करून नमुने घेण्याचे काम सुरू आहे. महापालिकेकडून सुरू असणारे सर्वेक्षण २० मे पर्यंत सुरू असणार आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्वेक्षणचे काम सुरू होते. दरम्यान, सर्व टोल नाक्यांवर व्हिडीओ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपदासाठी शेट्टींची लाचारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ऊस दरावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीच तोंडसुख घे‍णारे खासदार राजू शेट्टी मंत्रिपद आणि महामंडळाचा एखादा तुकडा मिळण्यासाठी 'वर्षा'वर लाचार होवून गुडघे टेकत आहेत,' अशी घणाघाती टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. केवळ पदाच्या लालसेने खासदार शेट्टी भाजपच्या गोटात दाखल झाले असून त्यांना शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, 'देशात व राज्यात आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच संसदेमध्ये विविध प्रश्न उपस्थित करुन धोरणात्मक निर्णय घेतले. मात्र केवळ प्रसिद्धी आणि सत्तेच्या हव्यासापोटी खासदार शेट्टी यांनी पवार यांच्यावर टीका करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर हंगामी आंदोलन करणाऱ्या शेट्टींची या हंगामातील ऊस परिषद कोणत्याही निर्णयाविना झाली. त्यांची ही अगतिकता म्हणजे सत्तेसाठी चाललेली लाचारीच आहे. केंद्र सरकारने कारखान्यांसाठी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र या पॅकेजमधील एक छदामही कारखान्यांना मिळालेला नाही. यामुळे हंगाम संपला असताना ऊस उत्पादकांना ऊस बिलांची प्रतीक्षा लागलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तोंडसुख घेणारे खासदार शेट्टी आता मूग गिळून गप्प का आहेत? सांगली येथे परिषद घे‍वून सरकारवर टीका केल्यानंतर पुन्हा त्यांना मंत्रीपदाचे आणि महामंडळाचे गाजर दाखवण्यात आले आहे. चळवळीतील योगदानाबद्दल खासदार शेट्टी यांच्याबद्दल आदर होता. पण त्यांची सत्तेसाठी चाललेली लाचारी पाहून त्यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही.'

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक प्रा. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मानसिंग गायकवाड यांचा पराभव दुर्दैवी असून या पराभवाची कारणमीमांसा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. बँकेच्या पदाधिकारी निवडीची सभा लवकरच होणार आहे. निवडीच्या सभेपूर्वी सर्वसंचालकांची बैठक घे‍वून तोडगा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार फंडातून खाती

दरम्यान, केंद्र सरकारच्यावतीने नुकतीच पंतप्रधान जीवन ज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मतदारसंघातील गरजू व्यक्तींची खाती आमदार फंडातून मिळालेल्या रक्कमेतून काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार मुश्रीफ यांनी ययावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याने शोधले हुमणी किडीवर औषध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यातील मांगले गावातील राजेंद्र दशवंत या तरुण प्रगतशील शेतकऱ्याने शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या पिकावरील हुमणी किडीवर हुकूमी आण‌ि यशस्वी प्रतिबंधक उपाय शोधून काढला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनाही या किडीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्यांनी तयार केलेले औषध त्यांनी विक्रीसाठीही उपलब्ध करून दिले आहे. मूळवर्गीय ऊस, मका, भुईमुग, सोयाबीन, तांदुळ या पिकांवर प्रामुख्याने हुमणी कीड पडते.

राजेंद्र दशवंत म्हणाले, 'शिराळा तालुक्यातील शेतकरी गेल्या १० वर्षांपासून हुमणी किडीच्या त्रासाने त्रस्त आहे. चांगले आलेले पीक या किडीने फस्त केलेले पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरला नव्हता. शिराळा तालुक्याचे कृषी अधिकारी बी. डी. माने यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली मी प्राथमिक टप्प्यात तीन प्रयोग केले.' 'सर्वप्रथम हुमणीचे भुंगे मारण्यासाठी एरंडीच्या बिया भरड करून त्यामध्ये पाच लिटर पाण्यासह एक डब्यात ठेऊन तो पिकात ठेवला. डब्यातील मिश्रणाच्या वासामुळे शेतातील सर्व भुंगे डब्यात येऊन पडले. त्यानंतर हुमणी अळी मारण्याचे आव्हान होते त्यासाठी धारवाड अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमधून मेटारायाझियम अँनिसोपली बुरशी आणून ती शेणखतामध्ये चमचाभर प्रमाण ठेवून मिसळली त्यानंतर धान्यातील आळ्या गोळा करून या मिश्रणात सोडल्या. पसरट भांड्यात सोडलेल्या आळ्या एका आठवड्यानंतर मेल्याचे दिसून आले, असेही दशवंत यांनी सांगितले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी माने यांच्यासोबत हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आँफ प्लँन्ट मँनेजमेंटच्या डॉ. सुनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या शेतातील माती गोळा करून ती वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरून त्यामध्ये धान्यातील आळ्या गोळा करून सोडण्यात आल्या मातीमध्ये असणाऱ्या सुक्ष्म सूत्रकृमींमुळे मातीत सोडलेल्या आळ्या मृताअवस्थेत गेल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर पेट्री डिशमध्ये वॉच ग्लास उलटा ठेऊन त्यावर फिल्टर पेपर ठेऊन त्यावर पाणी सोडून तो ओला करण्यात आला. त्या पेपरवर मृताअवस्थेतील अळ्या १० दिवस ठेवल्यानंतर त्या भांड्यातील पाण्यात सूत्रकृमी गोळा झाले. तयार केलेल्या दहा पेट्री डिशमधून १०० ते १५० मिली पाणी मिळाले. त्यानंतर तयार झालेले मिश्रण १० लिटर पाण्यामध्ये ५० मिली या प्रमाणात मिसळून चांगले औषध तयार झाले. हे तयार केलेले औषधाचे मिश्रण शेतामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने सोडण्यात आले. यामुळे शेतात सूत्रकृमी पोहोचण्यास मदत झाली.

सूत्रकृमी म्हणजे काय?

सूत्रकृमी म्हणजे जमिनीतील ओलसर मातीत राहणारे सुक्ष्मकृमी आहेत. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनातील जैविक कीड नियंत्रणासाठी एपीएन ही परोपजीवी सुक्ष्म सूत्रकृमी अतिशय उपयुक्त आहे. सूत्रकृमींचा उपयोग करूनच हुमणी किडीवर प्रतिबंधात्मक औषध शोधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके निर्मितीसाठी सुधारित नियमावली

$
0
0

सांगली : 'कवठे एकंद येथे शोभेची दारू बनविणाऱ्या ईगल फायर वर्क्स या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत ११ जणांचे बळी गेले, या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लवकरच सुधारित नियमावली तयार करण्यात येणार आहे,' असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

ते म्हणाले , 'ही नियमावली तयार करताना कवठे एकंदमधील शोभेची दारू बनविणारे कारखान्यांचे चालक व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली जाईल. दरम्यान, ईगल फायर वर्क्स या कारखान्याचा मालक रामचंद्र तुकाराम गुरव यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. कवठे एकंद प्रमाणेच सांगलीही शोभेची दारू विक्री करणाऱ्या होलसेल दुकानांची पोलीस पाहणी करीत आहेत.' दरम्यान, 'कवठे एकंद गावातील चारही परवानाधारकांच्या-शोभेची दारू बनविणाऱ्या कारखान्यांचे-परवाने रद्द करण्यात यावेत,' अशी मागणी पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात हरवले मुरगूड बसस्थानक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुरगूड एसटी बसस्थानकावरील डांबरीकरणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसल्यावर जागे झालेल्या एसटी प्रशानाने आठ दिवसात डांबरीकरण करण्याचे आश्वासन देवून पंधरा दिवस होत आले तरी या डांबरीकरणासाठी मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे नागरीकांतून संताप व्यक्त होत असून मुरगूडकर पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

मुरगूड एसटी बसस्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघरच आहे. प्रवाशांच्यासाठीची कोणतीच चांगली सुविधा या बसस्थानकावर मिळत नाही, त्यातच एसटी बसस्थानकावर खड्डेच खड्डे असल्याने एसटी चालकासह प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. यासाठी डांबरीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. त्याची दखल घेत एसटी बसस्थानकावरील डांबरीकरणाऐवजी केवळ खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. ते कामही निकृष्ट दर्जाचे होते म्हणून लोकांनी ते काम बंद पाडून आंदोलन उभारले. याची दखल घेत गारगोटी डेपोचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दोन दिवसात डांबरीकरण करण्याचे प्रशासकीय उत्तर देऊ लागले. त्यावेळी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी एसटीचे जिल्हा वाहतूक नियंत्रक आंदोलकाशी चर्चा करायला आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्यावर दुसऱ्या दिवशी हे अधिकारी मुरगुडात आले आणि आंदोलकाशी चर्चा करुन मुरगूड बसस्थानक राज्यात आदर्श बसस्थानक बनवण्याचे लेखी आश्वासन देवून गेले. हे काम आठ दिवसात सुरु करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. आठ दिवसात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन देवून जवळपास महिना संपत आला तरी अद्याप हे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे प्रवाशातून नाराजी व्यक्त होत आहे. या कामासाठी मुहूर्त कधी मिळणार अशी विचारणा होत आहे.

आम्ही या बसस्थानकाचे पॅचवर्क करणार होतो. परंतु संपूर्ण डांबरीकरण व्हावे अशी मागणी आहे. तसा सुमारे ४० लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव आम्ही पुणे आणि मुंबई कार्यालयाला पाठवला आहे. मंजुरी आल्यानंतरच कामाला सुरुवात होईल.

- सुहास जाधव, विभागीय नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपूरला वळवाने झोडपले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी वळवाने झोडपून काढले. सोसाट्याछया वाऱ्यासह सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे कोल्हापूर सांगली मार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली तसेच विद्युत खांब वाकले. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

मंगळवारी दिवसभर हवेत प्रचंड उष्मा होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला तसेच आकाशात ढग जमले. पावणेसहा वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे भाजी विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. फेरीवाल्यांचेही मोठे नुकसान झाले.

कोल्हापूर सांगली मार्गावर मादनाईक पेट्रोल पंपाजवळ महावीर रोप वाटिकेसमोर तसेच अन्य ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली. यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या तसेच खांब वाकून रस्त्यावर पडले. परिणामी कोल्हापूर सांगली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन या मार्गावरील वाहतूक जयसिंगपूर रेल्वेस्टेशन मार्गाने बायपास रस्त्यावरून वळविली.

जयसिंगपूर शहर व परिसरात सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील लक्ष्मी रोड, मर्चंट असोसिएशन परिसरात पाणी साचले. जयसिंगपूर बसस्थानकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले. कोल्हापूर सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. शहरात अनेक ठिकाणी वाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. परिणामी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

वीजवितरणची तत्परता

तासभर झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जयसिंगपूर आणि परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. काही ठिकाणी ही झाडे विद्युतवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. परंतु वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेऊन वीज पुरवठा सुरळीत केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवे ग्रामस्थांना पोस्टाचा ‘निवारा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय डाक विभागाच्या ग्रामीण डाक जीवन बीमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केंद्र सरकारच्या महसुली उत्पन्नामध्ये मोलाची भर घालत भविष्यातील जीवन सुखकर होण्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सातवे ग्रामस्थांना पिकअप् शेडच्या माध्यमातून निवारा दिला आहे. सातवे ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासामुळे केंद्र सरकारकडून त्यांना प्रथमच मुलभूत पायाभूत सुविधेचा निधी त्यांना मिळाला आहे.

पोस्ट खात्याच्या ग्रामीण जीवन बीमा योजनेवर विश्वास ठेवून सातवे गावातील ८८२ कुटुंबापैकी तब्बल ३७५ खातेदारांनी या योजनेत रक्कम गुंतवली आहे. पोस्ट खात्याच्या योजनेत २०१२ पासून सरासरी तीन लाख रुपये ग्रामस्थांनी जमा केले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील या सर्व खातेदारांनी जमापुंजी जमा केल्याने त्यांचे कौतुक जिल्हा पोस्ट कार्यालयाने केला आहे. यावर्षीपासून केंद्र सरकारने डाक विभागाला मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी निधीची तरतुद केली आहे. प्रथमच मिळालेला निधी सातवे ग्रामस्थांना मिळाली आहे. पोस्ट खात्याने हा निधी सातवे गावातील मुख्य चौकात पिकअप् शेड उभारुन निवाऱ्याची सुविधा दिली आहे.

याबाबत वरिष्ठ अधीक्षक आर. पी. पाटील म्हणाले, 'सातवे गावात जीवन बीमा योजना व बचत बँक खात्यात मोठी बचत केली आहे. ग्रामस्थांनी पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यानेच त्यांना प्रथमच मिळालेला निधी दिला आहे.' त्यांनी शाखा डाकपाल टी. आर. इंगवले यांचेही कौतुक केले. यावेळी सरपंच ए. बी. गरज, व्ही. एस. कापसे, संजय कोळी, डी. जी. पाटील, माणिक पाटील, अशोक पोवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी घेणार दत्तक

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

राज्यातील शाळाबाह्य, अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी प्रत्येकी दोन मुलांचा शोध घेऊन त्यांना दत्तक घेण्याचा नवा उपक्रम राज्यात राबविला जाणार आहे. याबाबत ३० एप्रिलपर्यंत अहवाल मागविण्यात आला असून त्यानंतर हा अभिनव उपक्रम सुरू होईल. त्यातून शिक्षण हक्क कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होईल.

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी ही संकल्पना मांडली आहे. शाळेत येणारा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष असणारा विद्यार्थी तसेच शाळेत येऊ न शकणाऱ्या मुलांचा सर्व्हे करण्याची जबाबादारी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तारअधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांनी प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांची केस स्टडी करून तो अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे सादर करायचा आहे. त्यानंतर तो अहवाल पुण्यातील संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.

यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी दोन मुले किंवा मुलींचा सर्व्हे केला, त्यांनी त्या मुलांना दत्तक घेऊन विद्यार्थी शाळेत का येत नाही?, त्यांच्या पालकांना सरंपच, शिक्षक, मुख्याध्यापकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे अशा जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत. जर विद्यार्थी अप्रगत असेल तर त्या मुलांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे हजारो मुलांना मानसिकदृष्ट्या आधार मिळणार आहे. त्यांचे शैक्षणिक आयुष्य फुलविण्यासाठी, शाळांची गळती रोखण्यासाठी ही दत्तक योजना उपयुक्त ठरणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे.

राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थी, शिकत असलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांचा केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शोध घेऊन त्यांची जबाबादारी घ्यावी, त्यांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घ्यावे अशी संकल्पना आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.

- मकरंद गोंधळी, शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ठेवी दुप्पट करण्याची संधी, अधिक व्याजदर, वारसांना फायदा होईल अशा अनेक योजना सांगत सध्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची बनावट खासगी गुंतवणूक कंपन्यांकडून फसवणूक केली जात आहे. आर. के. नगरमधील ज्येष्ठ नागरिकांची तब्बल १५ लाख ७८ हजार ६८८ रुपयांची फवणूक झाल्याची माहिती राष्ट्रीय ऐक्य व्यासपीठाचे अध्यक्ष अॅड. रंनजीतसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. घाटगे म्हणाले, आर. के. नगरातील ७२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना फोनद्वारे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती देत दुप्पट रक्कम करण्याच्या योजना सांगितल्या. मोठ्या प्रतिष्ठीत कंपन्यांचा सहभाग असल्याने तसेच आयआरडीएच्या ईमेलद्वारे माहिती मिळत आल्यामुळे या गुंतवणुकीबाबत फसवणूक होईल असे त्यांना वाटले नाही. त्यांनी सांगितलेल्या स्कीमसाठी ‌डिसेंबर आणि जानेवारी या काळात १५ लाख ७८ हजार ६८८ रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर याबाबत बनावट इ-मेलद्वारे मोठ्या रक्कमेचे धनादेश स्कॅन कॉपी करून लवकरच धनादेश पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात एकही धनादेश आला नाही. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, याबाबत पोलिस अधिक्षकांकडे १७ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली आहे.'

याबाबत पोलिस प्रशासनाने अशा टोळ्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी संघटनेने केली. राज्यासह भारतात फसवणूक करणारी टोळी कार्यरत असून नागरिकांनी गुंतवणूक करताना माहिती घेऊन खात्री करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शैलेश सवदी, अरुणा सवदी, अॅड. स्नेहल पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सतेज पाटील यांची टीका वैफल्यातूनच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खुनशी आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्या सतेज पाटील यांचा जनाधार गेल्याने वैफल्यातून वक्तव्ये करत आहेत. महाडिक गटाचा उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केलेल्यांनी आता पक्ष सोडून निवडून दाखवा असे वक्तव्य हास्यास्पद आहे' अशी असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी टीका केली आहे.

पाचगावच्या पाणीपुरवठा योजनेवरून सतेज पाटील व महाडिक गटात आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. पाचगावची योजना मंजूर केल्याचे सतेज पाटील यांनी सांगितल्यानंतर खासदार महाडिक यांनी या योजनेची मंजुरीची कागदपत्रे प्रसिद्धीपत्रकासोबत दिली आहेत. त्यानुसार या योजनेसाठीची तांत्रिक मान्यता १९ डिसेंबर २०१४ रोजी तर प्रशासकीय मान्यता २ जानेवारी २०१५ रोजी मिळाली आहे. त्यावेळी पाटील हे आमदार, पदावर नव्हते. सतेज पाटील यांनी मंत्री असताना हेलिकॉप्टरचा अनिर्बंध वापर केला. सामान्यांना ते रुचले नाही म्हणून जनतेने त्यांना जमिनीवर उतरवले. अमल महाडिक हे कोणत्या लाटेवर नव्हे तर महाडिक कुटुंबियांबाबत आत्मियता व सतेज पाटील यांच्याविरोधातील रोषाने निवडून आले. अमल महाडिक यांनी सहा महिन्यांत पाणी योजना मंजूर करुन आणली. खासदार म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर कर्मचाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कार्यालयीन वेळेत ऑफीसबाहेर फिरणाऱ्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आयुक्त पी. शिव शंकर यांनी झटका दिला. आयुक्तांनी मंगळवारी दुपारी कसलीही पूर्व कल्पना न देता शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाची तपासणी केली. त्यांनी जवळपास दीड तास विविध कार्यालयांची तपासणी करत कामाची पाहणी केली.

विविध कार्यालयातील ११० कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. आयुक्तांच्या तपासणीने विभागीय कार्यालयंातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेकांनी धावत कार्यालय गाठले.

दुपारच्या सुमारास आयुक्तांनी ​शिवाजी मार्केट कार्यालय गाठले. तेथे जाऊन नगरसचिव उमेश रणदिवे यांना बोलावून घेतले. यानंतर राजीव आवास योजना, कार्यकारी अभियंता विभाग, राष्ट्रीय शहर उपजिविका अभियान, विवाह नोंदणी कार्यालय, विधी विभाग, इस्टेट विभाग, विद्युत विभाग, भविष्य निर्वाह निधी विभाग, पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, आस्थापना विभाग, प्राथमिक शिक्षण मंडळाची तपासणी केली. कर्मचाऱ्यांची कार्य विवरण नोंदवही, हालचाल नोंदवहीची तपासणी केली. यावेळी जल अभियंता मनीष पवार, प्रभारी उप शहर अभियंता एस. के. पाटील तेथे होते. आयुक्तांनी उपस्थित नागरिकांकडेही 'काही डचणी येतात का ?' अशी चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग पुनर्रचनेचा धसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

ऑक्टोबर २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या प्रभागांची फेररचना अद्याप निश्चित झाली नसली तरी त्याचा धसका घेत अनेक इच्छुकांनी शेजारच्या एक-दोन नव्हे तर तीन-चार प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. आरक्षणाने संधी हुकल्यास अनेकांनी पत्नीला निवडणुकीसाठी उभे करण्याची योजना तयार ठेवली आहे.

नवा प्रभाग कसा होणार?, हक्काचा भाग पूर्ववत राहणार की तो शेजारच्या कोणत्या प्रभागाला जोडला जाणार?, तिथे विजयापर्यंतची मजल कशी मारू शकतो? याचे आडाखे इच्छुकांकडून बांधले जात आहेत. सध्याच्या प्रभागात बदल झाला नाही तर ठीकच अन्यथा निवडणूक हातातून जाऊ नये म्हणून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महापालिकेच्या निवडणुकांच्या निकषांनुसार दर दहा वर्षांनी प्रभाग पुनर्रचना होते. त्यानुसार यंदा प्रभाग पुनर्रचना होणार आहे. लोकंख्या वाढीमुळे प्रभागांची संख्या वाढणार हे स्पष्ट आहे. मात्र लोकसंख्येनुरूप त्यांची संख्या वाढणार असल्याने इच्छुक अजूनही द्विधा मनःस्थितीत असल्याचे चित्र शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह उपनगरांतील प्रभागांमध्ये दिसते. ​जुन्या प्रभागातील लोकसंख्या किती कमी होईल?, कमी होणारी लोकसंख्या कोणत्या प्रभागात जाणार हे अनिश्चित असल्याने पेच निर्माण झाला आहे. शेजारील प्रभागाची तयारी करण्यास काहीच हरकत नसते. तेथील समस्यांबरोबर लोकांचाही परिचय असतो. पण, लोकसंख्येनुसार प्रभाग फुटल्यास तो शेजारील एक, दोन नव्हे तर तीन ते चार प्रभागातसुद्धा विखरू शकतो, असे महापालिकेच्या सूत्रांचे मत आहे. अद्याप आरक्षणाची निश्चिती नसल्याने 'मी इच्छूक आहेच, पण महिला आरक्षण असेल तर माझी पत्नी रिंगणात असेल' असेही इच्छुक स्पष्टपणे सांगत आहेत.

प्रभाग फुटीचा धोका

जनगणनेसाठी बनवलेले प्रगणक गट हे प्रभाग रचनेचे मूळ सूत्र असल्याने नवीन प्रभाग तयार होताना प्रभागाच्या सीमेवरील सहाशे लोकसंख्येचा गट शेजारील प्रभागात जोडले जाऊ शकतो. यात शहराच्या मध्यवस्तीतील दाट लोकवस्तीच्या प्रभागांना हा फटका बसू शकतो. त्यामुळे इच्छुक तसेच विद्यमान नगरसेवक त्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. मध्यवस्तीतील काही चौकांमध्ये चार प्रभागांच्या सीमा आल्या आहेत. त्यासाठी इच्छुकांनी प्रभागाच्या सीमेवरील भागामध्ये भेटीगाठीचा वेळ वाढवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी दूध संघ अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महालक्ष्मी दूध संघाच्या मालमत्ता विक्रीची नोटीस स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्धीला दिली आहे. ११ कोटी ४३ लाख रुपयांच्या वसुलीसाठी ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार आहे. पुढील महिन्यात १२ जून रोजी ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव होणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी दूध संघ सुरू करण्याच्या प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रयत्नांत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

गोकुळ दूध संघला सक्षम पर्याय देण्यासाठी दिवगंत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी हा दूधसंघ सुरू केला होता. जेव्हा हा दूध संघ सुरू झाला, त्यावेळी मंडलिक आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ एकत्र काम करत होते. सुरुवातीच्या टप्प्यात दरदिवशी एक लाख लिटर दूध संकलन करण्यात महालक्ष्मी दूध संघाला यश आले होते. मात्र नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यामध्ये फूट पडल्याने महालक्ष्मी दूध संघाला दूधसंकलन करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यातून दूध संघ अडचणीत आला. सध्या महालक्ष्मी दूध संघावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्याजासह सुमारे पाच कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे एकूण कर्ज जवळपास ११ कोटी ४३ लाख रुपये आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावाची नोटीस दिली आहे. द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट अशॅफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ नुसार बँकेने ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. लिलावात महालक्ष्मी दूध संघांची ह‌मीदवाडा, हलकर्णी आणि वाशी येथील सर्व मशिनरी, जागा यांचा या लिलावात समावेश आहे. केडीसीसी निवडणुकीच्या काळात प्रा. मंडलिक यांनी केडीसीसीच्या कर्जाची परतफेड करून महालक्ष्मी दूध संघ पुन्हा सुरू केला जाईल, अशी घोषणा केली होते. मात्र स्टेट बँकेने लिलावाची नोटीस काढून, महालक्ष्मी दूध संघ पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना खो बसला आहे. यासंदर्भात प्रा. मंडलिक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर तीस क्लार्कना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत घरफाळा वसुलीदरम्यान परस्पर दंड व व्याजात सवलत देऊन महापालिकेचे २ कोटी ६५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. संबंधित मिळकतधारकांकडून उर्वरीत रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासनाने दिले आहेत. घरफाळा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी १ हजार ३२७ मिळकतींना दंडाच्या रक्कमेत नियमबाह्य सवलत दिल्याचे सामोरे आले आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने तीसहून अधिक असेसमेंट क्लार्कना मिळकतधारकांकडून रक्कमा वसूल करण्यासंदर्भात नोटिसा काढल्या आहेत.

महापालिकेने २०१४-१५ याआर्थिक वर्षात थकीत घरफाळ्यावरील दंडाच्या रक्कमेत २५ ते ५० टक्के सवलत दिली होती. घरफाळावसुली दरम्यान घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी नियमांना बाजूला सारत बड्या थकबाकीधारकांना सवलत देत लाखो रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार आयुक्त पी. शिव शंकर यांच्याकडे करण्यात आली होती. आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते. काही कर्मचाऱ्यांनी वसुलीदरम्यान निव्वळ घरफाळा भरून घेत दंड व व्याजात परस्पर सवलत दिल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकारात काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक डल्ला मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परस्पर सवलत दिल्याप्रकरणी आणि थकीत रक्कमेच्या वसुलीसंदर्भात तीस असेसमेंट क्लार्कना नोटिसा काढल्या आहेत. आयुक्तांनी या साऱ्या प्रकाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. मिळकतधारकाकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. परिणामी घरफाळा प्रकरणात नियमबाह्य कामकाज करणाऱ्या व सवलत देणाऱ्या कर्मचाऱ्यांची पळती भुई थोडी झाली आहे. मिळकतधारकांचा शोध घेऊन रक्कम भरण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

कर्मचाऱ्यांना पळता भुई...

दरम्यान, घरफाळा विभागातील काही कर्मचाऱ्यांना रूबाब औरच आहे. बडे थकबाकीधारक शोधायचे, सेंटलमेंट करायची अशी त्यांच्या कामाची पद्धत बनली आहे. थकीत घरफाळा आणि दंडासहित रक्कम वसूल करण्याऐवजी केवळ घरफाळाची रक्कम भरून घेतली आहे. कच्च्या पावतीद्वारे ही रक्कम भरून घेतली आहे. उर्वरित थकबाकीची नोंद करण्याऐवजी शिल्लक थकबाकी शून्य दाखवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images