Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘चेन स्नॅचिंगचे वाढते प्रमाण धक्कादायक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चेन स्नॅचिंग वाढलेले प्रमाण धक्कादायक आहे', अशी कबुली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी दिली. चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी विशेष मोहीम आखणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावकारी करणाऱ्या गुंड टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची घोषणाही त्यांनी केली.

पानसरे हत्या तपासाबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा म्हणाले, 'स्थानिक पोलिस तपास करीत आहेत. एसआयटीचे प्रमुख संजयकुमार हे निष्णात अधिकारी असल्याने तपासाला वेग येईल. परिक्षेत्रातील पोलिसही पूर्वीप्रमाणेच जोमाने या प्रकरणाचा तपास करीत आहेत. महानिरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर आढावा घेतला असता, कोल्हापूर परिसरात चेन स्नॅचिंग प्रमाण वाढल्याचे दिसले. हे चिंताजनक आहे.'

दोघे चेन स्नॅचर्स जाळ्यात

शाहूपुरी पोलिसांनी दत्तात्रय रामा चौगुले (वय २७, रा. क्रशर चौक, राधानगरी रोड, सानेगुरूजी वसाहत) आणि प्रमोद पांडुरंग चौगुले (२४, रा. लोळगे लॉन शेजारी, शिवाजी पेठ) या दोघा संशयितांना अटक केली. त्यांनी एका महिलेची सोन्याची चेन पळवून नेल्याची कबुली दिली. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुनील कवळेकर, रवी पाटील, समीर मुल्ला, अमर आडूळकर, ओंकार परब, विशाल बंद्रे हे सदरबाजार परिसरात बुधवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना दोन तरुण मोटारसायकलवरून संशयास्पद फिरताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चेन लंपास केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेवा संस्थांत मैत्रीपूर्ण लढती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी रात्रीपासून ‌शुक्रवार दुपारपर्यंत चर्चा करून तालुका पातळीवरील विकास सेवा संस्था गटातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर सात गटांतील ९ जागांसाठी श्री छत्रपती शेतकरी विकास आघाडीची ‌स्थापना केली. यात चार राष्ट्रवादीला, चार काँग्रेसला तर प्रत्येकी एक जागा माजी मंत्री सतेज पाटील आणि ‌माजी मंत्री विनय कोरे यांना असे जागावाटप करण्यात आले. ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शिवसेनेला एकत्र घेवून पॅनल केले असल्याची घोषणा केली.

कृषी पणन आणि शेतीमाल प्रकिया संस्था गटातील दोन जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीच्यावतीने बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांना संधी देण्यात आली. या गटातील दुसरी जागा प्रा. मंडलिक यांना देण्यात आली. महिलांसाठीच्या दोन उमेदवारांपैकी एक माजी खासदार निवेदिता माने यांना तर काँग्रेसची जागा उदयनी साळुंखे यांना देण्यात आली. पतसंस्था आणि अर्बन बँक गटातून राष्ट्रवादीचे प्रा. जयंत पाटील, पाणीपुरवठा, दूधसंस्था, गृहनिर्माण संस्थांतून राष्ट्रवादीच्यावतीने प्रताप उर्फ भैय्या माने यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. काँग्रेसच्यावतीने भटक्या विमुक्त जाती-जमातीतून आप्पी पाटील, मागासवर्गीय गटातून राजीव आवळे, इतर मागासवर्गीय गटातून विलास गाताडे हे उमेदवार आहेत.

अप्पी पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीने विरोध दर्शविला होता. तरीही त्यांची उमेदवारी कायम राहिली. गाताडे यांना उमेदवारी देऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. सेवा-संस्था गटातून गगनबावडा येथून माजी मंत्री सतेज पाटील यांना माघार घेतली. तेथे मानसिंग पाटील यांना पूर्वी शब्द दिल्याने माघार घेतल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. केडीसीसीत स्वत:चे पॅनल न देण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला असल्याचे ते म्हणाले.

सेवा संस्थांतील लढती

सेवा संस्था गटातून आमदार महादेवराव महाडिक (हातकणंगले), माजी आमदार पी. एन. पाटील (करवीर), माजी मंत्री विनय कोरे (पन्हाळा), ए. वाय. पाटील (राधानगरी) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अन्य तालुक्यांचा विचार केल्यास आजरा तालुक्यातून अशोक चराटी यांच्याविरोधात जयवंतराव ‌शिंपी, भुदरगड तालुक्यात माजी आमदार के. पी पाटील यांच्या विरोधात नंदकुमार ढेंगे, चंदगड तालुक्यात गोपाळराव पाटील यांच्याविरोधात माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील, गडहिंग्लज येथे संतोष पाटील यांच्याविरोधात बाबासाहेब आरबोळे, गगनबावडा तालुक्यात मानसिंग पाटील यांच्याविरोधात पी. जी. शिंदे, कागल तालुक्यात माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दत्तात्रय वालावलकर, शाहूवाडी तालुक्यात मानसिंगराव गायकवाड यांच्याविरोधात पृथ्वीराज खानविलकर, सर्जेराव पाटील तर शिरोळ तालुक्यात विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात राजेंद्र पाटील-यड्रावकर अशी लढत होईल.

कृषी पणन

संजय मंडलिक यांच्याविरोधात नामदेवराव नार्वेकर, दिलीप पाटील, बाबासाहेब पाटील.

नागरी सहकारी बँक

प्रा. जयंत पाटील यांच्या विरोधात अनिल पाटील, व्ही. बी. पाटील, गजानन देसाई, यशवंत सोनार.

शेतीसंस्था आणि व्यक्ती

प्रताप माने यांच्याविरोधात विलास पाटील, रघुनाथ पाटील, सातगोंडा पाटील, सितराम रवंदे आणि के. एस. चौगुले.

इतर मागासवर्गीय

विलास गाताडे विरोधात अविनाश पाटील, शाहू चव्हाण, सुधीर मुंज.

अनुसूचित जाती

राजू आवळे यांच्याविरोधात आमदार सुजित मिणचेकर, शिवाजी कांबळे, व्यंकट कांबळे आदी.

विमुक्त जाती

अप्पी पाटील यांच्या विरोधात परशराम तावरे, नाळे उदय इत्यादी.

महिला

माजी खासदार निवेदिता माने, उदयानी साळुंखे यांच्याविरोधात जयश्री रेडेकर, सुजाता सातवणेकर.

यांनी घेतली माघार

खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी, माजी मंत्री सतेज पाटील, अरुंधती महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, अमरीश घाटगे, बाबूराव हजारे, भगवान काटे,

निलेश सरनाईक, प्रकाश आवाडे, आनंद माने, शेखर मंडिलक, भैय्यासाहेब कुपेकर, अरुण डोंगळे, सुनील मोदी.

सतेज पाटील यांची हुशारी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनलचा निर्णय झाल्यानंतर सतेज पाटील आणि विनय कोरे यांना अन्य गटांतील नऊपैकी एक जागा देण्याचा निर्णय झाला. आपल्या वाटणीची जागा प्रा. संजय मंडलिक यांना देण्याचा आग्रह धरत सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ तसेच महाडिक गटावर कुरघोडी केली. त्यांच्या इच्छेनुसार संजय मंडलिक यांना श्री छत्रपती शेतकरी विकास आघाडीत स्थान देण्यात आले. मंडलिक यांना उमदेवारी देण्यासह सतेज पाटील यांनी स्वत: माघार घेत गगनबावडा येथून मानसिंग पाटील यांना संधी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी मंडलिक गट आपल्यासोबत जोडून घेतला.

समझोता एक्स्प्रेस!

श्री छत्रपती शेतकरी विकास आघाडीचे मुख्य संकल्पक माजी मं‌त्री मुश्रीफ आहेत. त्यांचे विरोधक प्रा. मंडलिक यांना स्थान मिळाल्याने कागल तालुक्यातून सेवा-संस्था गटातून मुश्रीफ यांना निवडून येण्यास अडथळा उरलेला नाही. त्यामुळे भविष्यात मंडलिक गटाशी तह करण्याचा मार्ग मुश्रीफ यांनी खुला केल्याची चर्चा होती. दुसरीकडे करवीर तालुक्यातून नरके गटाने र्यकर्त्यांचे अर्ज मागे घेत पी. एन. पाटील यांचा मार्ग मोकळा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई विकास आराखडा चर्चेविना मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या २५५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. तीन टप्प्यांत हा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. या आराखड्याला महासभेने मान्यता द्यावी अशी शिफारस स्थायी समितीने केली होती. मात्र सर्वसाधारण सभेत आराखड्याविषयी चर्चेविना मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.

सभेत आराखड्यावर चर्चा न करता केवळ मंजूर... मंजूरच्या गजर झाला. या विषयाला सभागृहाने काही मिनिटांत मान्यता दिली. मात्र, या विषयावर सखोल चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आराखड्यात परिसरातील पुर्नवसन, भूसंपादनविषयक बाबींचा समावेश आहे.

दरम्यान, कर्तव्यात कसूर व कामकाज व्यवस्थित करीत नाहीत या कारणावरून सहायक उपायुक्त शीला पाटील यांना सरकारकडे परत पाठवावे असा ठराव सभागृहाने मंजूर केला. नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी हा ठराव मांडला. अन्य अधिकाऱ्यांनीही कामकाजात सुधारणा केली नाही तर त्यांच्याविरोधात ठराव करू असा इशारा यावेळी देण्यात आला. शहरातील विविध भागात अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे. अवेळी पाणी येते. हॉटेल्स असलेल्या मार्गावर मुबलक पाणी आणि रहिवासी क्षेत्रात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी झाल्या. नगरसेवक देशमुख, यशोदा मोहिते यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

लीला धुमाळ, मुरलीधर जाधव, राजू लाटकर, महेश कदम हेही या चर्चेत सहभागी झाले. नगरसेविका जयश्री साबळे यांचे पती राजेंद्र यांच्या एज्युकेशन सोसायटीला क्रीडांगणासाठी आरक्षित जागा देण्याचा कार्यालयीन प्रस्ताव मागे घेण्यात आला. या ठरावाला नागरिकांनी विरोध केला होता. प्रस्ताव मागे घेतल्यामुळे महापालिकेचे तीन कोटींचे प्रस्तावित नुकसान वाचले असे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जागा बिनविरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तर, सेवासंस्थासाठी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला. तालुकापातळीवरील सेवा संस्था गटातील १२ पैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. याच पॅनलमध्ये शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनाही उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत फूट पडली. आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री विनय कोरे आणि ए. वाय. पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. अखेरच्या दिवशी २१ जागांसाठी ५७ जण रिंगणात राहिले आहेत.

शिवसेनेचे नेते संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवडणुकीत पक्षाला महत्त्व न देता तालुक्यातील राजकारणाला महत्त्व देत सोयीची भूमिका घेतली. शिवसेनेच्या आमदारांतच फाटाफूट होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे शेवटी भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुरेश हळवणकर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

सतेज पाटील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पॅनलसोबत राहतील की विरोधी पॅनल उभे करतील यावरही पडदा पडला आहे. सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातून माघार घेत मानसिंग पाटील यांना मदत करण्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बाजू प्रबळ झाली आहे. खासदार धनंजय महाडिक 'केडीसीसी'ची निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या एकत्रित पॅनलमध्ये त्यांना जागा सोडणे कठीण झाले होते, त्यामुळे खासदार महाडिक यांनी एक पाऊल मागे येत आपला अर्ज मागे घेतला.

विरोधकांचा मार्ग सुकर

जिल्ह्याच्या राजकारणात कडवे विरोधक असलेले मुश्रीफ आणि संजय मं‌डलिक एकाच पॅनलमध्ये आहेत. आमदार चंद्रदीप नरके गटाने त्यांच्या उमेदवारांची माघार घेत त्यांचे पारंपरिक विरोधक पी. एन. पाटील यांची बिनविरोध सुकर केली आहे. तर अरुण नरके गटाने पन्हाळ्यातून विनय कोरे यांना मार्ग सुकर करून दिला आहे. शिरोळमध्ये राष्ट्रवादीचेच विठ्ठलराव नाईक निंबाळकर आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यात लढत होत आहे, त्याचप्रमाणे आजरा येथून राष्ट्रवादीचेच जयवंतराव ‌शिंपी आणि अशोक चराटी यांच्यात लढत होणार आहे. ५ मे रोजी मतदान होणार असून ७ मे रोजी मतमोजणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तयारी महापालिकेची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आठवड्यामध्ये प्रभाग रचना निश्चित करण्याच्या कामास सुरुवात केली जाणार असून, त्याचबरोबर मतदार याद्या निश्चित करून त्या प्रभागाला संलग्न केल्या जाणार आहेत. यंदा प्रथमच निवडणूक पूर्णपणे कम्प्युटराइज्ड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

निवडणुकीसाठी अवघा पाच महिन्यांचा कालावधी राहिला आहे. यापूर्वीच्या प्रभाग रचनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याने प्रभाग पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी २०११ साली झालेल्या जनगणनेचा आधार घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्याप्रमाणे प्रभाग रचना यंदा पूर्णपणे कम्प्युटराइज्ड पद्धतीने करण्यात येणार असल्याने महापालिका प्रशासनाने प्राथमिक तयारी सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयुक्त शिव शंकर व उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यात सहारिया यांनी पालिकेच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रभाग रचना व मतदार यादीच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले.

प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेले सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. जनगणना हा या कामकाजाचा पाया आहे. त्यासाठी शहरात नेमलेले ९३० प्रगणक गट महत्वाचे आहेत. लोकसंख्येनुसार जवळपास ११ प्रगणक गटाचा (गटात ६०० लोकसंख्या) एक प्रभाग तयार केला जाण्याची शक्यता आहे. या गटांनुसार तयार होणारे ब्लॉक सॉफ्टवेअरमध्ये टाकून गुगल मॅपवर प्रत्येक प्रभागाच्या सीमारेषा निश्चित केल्या जातील. प्रत्यक्ष पाहणीही करण्यात येणार असून, नदी, नाल्यामुळे काही अडथळा येत असेल, तर अशा अपवादात्मक स्थितीत मॅपवरील रचनेत बदल होऊ शकतो. २०११ च्या जनगणनेनुसार ८१ प्रभाग तयार होतील, असे दिसते.

अर्ज भरेपर्यंत मतदार नोंदणी

पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मतदारयादी एकत्र केली जाईल. त्यानंतर प्रभाग निश्चित झाल्यानंतर मतदार यादींची विभागणी केली जाईल. त्या याद्या संबंधित प्रभागाशी संलग्न केली जाणार आहेत. अर्ज भरेपर्यंत मतदार नोंदणी सुरू ठेवण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिऊसाठी एक घास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँक्रिटच्या जंगलाच्या होत असलेल्या बेसुमार वाढीमुळे ​विविध पक्ष्यांचा निवाराच गायब होऊ लागला आहे. निवाऱ्याबरोबर त्यांचा अन्न, पाण्याचा शोध म्हणजे एक संघर्षच सुरू असतो. त्यांचा हा संघर्ष कमी करण्यासाठी विविध प्राणी, पक्षी​ मित्र पुढे येऊन विविध उपाय करत असतात. त्याप्रमाणेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घराजवळ अन्नाचा एक घास व पाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच घरटे व अन्न, पाण्यासाठीची भांडी देण्याचे नियोजन केले आहे.

पक्ष्यांबाबत सर्वांच्याच मनात एक दयाभाव असतो. अनेकांचा पशुपक्ष्यांना मदत करण्याचा स्वभाव असल्याने ते स्वतःहून मदत करत असतातच, पण अनेकांना कशा प्रकारे मदत करायची याची कल्पना सूचत नाही. ब्राह्मण महासंघाने जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे. पक्षी वाचवा अभियानाची मुहूर्तमेढ रोवली असून परशुराम जयंतीदिनी घरोघरी प्रबोधन पत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पक्ष्यांचे महत्त्व पटवून दिले आहे. अन्न, पाण्याविना जाणारे अशा लहान लहान पक्ष्यांचे जीव आपणच वाचवू शकतो अशी भावनात्मक साद घालत ब्राह्मण महासंघाने घराच्या अंगणात किंवा गच्चीवर एका वाटीत धान्य व एका वाटीत पाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे. यातून पक्ष्यांना उन्हाच्या तडाख्यापासून वाचवता येऊ शकणार आहे.

पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. जीवनातील त्यांचे महत्त्व समजवून सांगण्यासाठी अन्यही काही उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण करण्याबरोबरच घरटी, अन्न व पाण्यासाठी भांडी नागरिकांना वाटप करण्याचा उपक्रम या अभियानांतर्गत राबवण्यात येणार आहे. राज्यभर हे अभियान राबवण्यात येत आहे.

- शाम जोशी, अध्यक्ष, महासंघाचे प्रदेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाण मांडलेल्यांच्या बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकाच विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची आता अन्य विभागात उचलबांगडी होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदलीचा प्रश्न गाजला. स्थायी स​मिती सभापती आदिल फरास बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच महापालिकेचे बजेट मंजूर झाल्याने प्रशासनाने तत्काळ विकास कामांचे एस्टीमेट करावे आणि अल्प मुदतीच्या निविदा मागवून रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करावीत. एस्टीमेट केल्याशिवाय कोणत्याही कनिष्ठ अभियंत्यांची बदली करू नये. १५ मे पूर्वी रस्त्यांची कामे करणे गरजेचे असल्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्यानंतर प्रशासनाने पाच लाख रुपयांच्या विकासकामांचे एस्टीमेट सोडण्याची कार्यवाही सुरू केल्याचे सांगितले.

महापालिकेच्या बहुतांश विभागात ठराविक कर्मचारी वर्षानुवषे काम करत आहेत. एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. काही कर्मचारी अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत. कार्यालयीन वेळेतही ऑफीसबाहेर असतात. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. नगरसेवक सचिन चव्हाण यांनी कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे काही विभाग सक्षम बनलेत तर काही विभाग कमकुवत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करावी अशी सूचना केली. यावर प्रशासनाने बदली करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले. नगरसेविका माधुरी नकाते यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे दिवस वाढविण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यावर प्रशासनाने आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

आयत्यावेळचे विषय

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत रस्ते पॅकेज १/१ मधील १६ व १९ क्रमांकाची रस्ते करण्यासाठी निर्माण कन्स्ट्रक्शनची ७५.७५ टक्के अधिकची निविदा मंजूर करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाकडील ऊर्जा जल उपसा केंद्र पंपींग मशिनरीचे ऊर्जा लेखा परीक्षण व ऊर्जा संवर्धन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच अॅक्वाक्रॉप्ट कंपनीच्यावतीने शहरात २० ठिकाणी एटीएम मशीनच्या धर्तीवर पाण्याचे मशिन बसविण्यास मंजुरी मिळाली. एक रुपयात एक लिटर पाणी देण्याची योजना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचाराचा झाला पर्दाफाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा पंचनामा करत नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. २००३ पासून शहरातील मिळकतींचे अॅसेसमेंट झाले नसून घरफाळा घोटाळ्यात कर्मचाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांनी ढपला पाडल्याचा आरोप करण्यात आला. नगरसेवक भूपाल शेटे व आर. डी. पाटील यांनी घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली. अ​धिकाऱ्यांनी १६५ मिळकतींच्या बांधकामाचे भोगवटा प्रमाणपत्र न घेता, त्यांना एकेरी दराने मालमत्ता कराची आकारणी केल्याने महापालिकेचे २६ लाख ३४ हजार ३६८ रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. घरफाळा विभागातील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सर्वच विभागाच्या कामकाजाची अंतर्गत तपासणी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याच्या सूचना सभागृहाने केल्या. महापौर तृप्ती माळवी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डी मार्टला सवलत

नगरसेवक शेटे यांनी मिळकतींच्या नोंदीवरून अ​धिकाऱ्यांना लक्ष्य केले. शहरात १ लाख ७० हजार ८५६ वीज कनेक्शन आहेत. मात्र, मिळकतीची संख्या १ लाख ३४ हजार ६५५ आहे. त्यामुळे अद्याप ३० हजार मिळकतीच्या नोंदी केल्या नाहीत. अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने नोंदी झाल्या नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. रंकाळा येथील डी मार्टचे बांधकाम क्षेत्र कमी दाखवून घरफाळ्यात सवलत दिली आहे. तसेच व्यावसायिक दराने पार्किंग आकारणी न करता रहिवासी क्षेत्र दाखवल्याचा आरोपही शेटे यांनी केला.

घरफाळाप्रकरणी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अॅसेसमेंट अहवालावर वरिष्ठ अधिकारी ऑफीसात बसून सह्या करतात. दोन उपायुक्त, सहायक आयुक्त, विभागप्रमुख हे केवळ खुर्च्या सांभाळत आहेत. अधिकारी आर्थिक हितसंबंधातून बड्या थकबाकीधारकांवर कारवाई करत नाहीत असा हल्ला स्थायी सभापती आदिल फरास, नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख यांनी प्रशासनावर हल्ला चढविला. मधुकर रामाणे यांनी घरफाळा घोटाळ्याची चौकशी दिवाकर कारंडे यांच्या वजी अन्य अधिकाऱ्यांकडे द्यावी अशी मागणी केली. नुकसानीला जबाबदार कोण आहे ? एचसीएल कंपनीवर महापालिकेचे नियंत्रण नाही. कंपनीच्या कामकाजाविषयी तक्रारी असताना प्रशासनाने कंपनीची बिले देण्याचे आदेश कसे काढले ? असा थेट हल्ला निशिकांत मेथे व प्रकाश नाईकनवरे यांनी चढविला.

घर टू घर सर्व्हे

नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची भंबेरी उडाली. राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे आयुक्त पी. शिव शंकर त्यांच्यासोबत होते. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त अश्विनी वाघमळे, संजय भोसले, कर निर्धारक दिवाकर कारंडे, मुख्य लेखापरीक्षक गणेश पाटील यांच्या उत्तरांनी नगरसेवकांचे समाधान झाले नाही.

त्यानंतर उत्तर देताना सभागृहात अतिरिक्त आयुक्त देसाई म्हणाले, 'घरफाळा विभागातील घोटाळ्याची आयुक्त चौकशी करत आहेत. मिळकती शोधण्यासाठी आगामी काळात घर टू घर सर्व्हे केला जाईल. त्यातून कर वाढेल.'

नोकरीवरून कमी केल्यानंतरही वसुली

ए वॉर्डातील लिपीक संदीप लकडे याने घरफाळा वसुलीत सात लाखांचा भ्रष्टाचार केला असून बोगस पावती पुस्तके छापली आहेत. नोकरीवरून कमी केल्यानंतरही त्याच्याकडून वसुली सुरू होती. त्याच्याकडून कितीची वसूल केली असे विचारत आर. डी. पाटील यांनी अधिकारी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

नोकरीवरून कमी केल्यानंतरही वसुली

ए वॉर्डातील लिपीक संदीप लकडे याने घरफाळा वसुलीत सात लाखांचा भ्रष्टाचार केला असून बोगस पावती पुस्तके छापली आहेत. नोकरीवरून कमी केल्यानंतरही त्याच्याकडून वसुली सुरू होती. त्याच्याकडून कितीची वसूल केली असे विचारत आर. डी. पाटील यांनी अधिकारी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोकुळ’ही महाडिकांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचंड उत्सुकता, तणाव आणि धाकधूक अशा वातावरणात कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) शुक्रवारी झालेल्या मतमोजणीवेळी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने बाजी मारली. राजाराम कारखान्यापाठोपाठ महाडिकांनी सलग दुसरा विजय मिळवल्यामुळे समर्थकांनी ताराबाई पार्कातील सिंचन भवन इमारतीसमोर प्रचंड जल्लोष केला. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सत्ताधारी राजर्षी शाहू पॅनेलला १६ तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलने दोन जागांवर विजय मिळविला. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत अत्यंत चुरस पहायला मिळाली. तर, विरोधी मतदानामुळे मतमोजणीचा कालावधी सुमारे चार तासाने वाढला. चंद्रकांत बोंद्रे आणि अंबरिश घाटगे यांच्या माध्यमातून माजी मंत्री सतेज पाटील यांना दोनच जागांवर समाधान मानावे लागले. विद्यमान अध्यक्ष दिलीपराव माने-पाटील आणि सदानंद हत्तरगी यांना पराभवाचा धक्का बसला.

सकाळी आठ वाजता सुरू होणारी मतमोजणी पत्रिका जुळविण्यास उशीर झाल्याने साडेनऊ वाजता सुरू झाली. त्यामुळे पहिल्या फेरीत सर्वसाधारण गटाचा निकाल हाती यायला साडेबारा वाजले. कधी सत्ताधारी गटाच्या उमेदवाराची आघाडी तर कधी विरोधी उमेदवाराचे पारडे जड अशी स्थिती शेवटच्या टप्प्यापर्यंत राहिली. अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, इतर मागास आणि महिला गटातील उमेदवारांची मतमोजणी सर्वसाधारण गटाच्या तुलनेत लवकर झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी संध्याकाळी निकाल जाहीर केला. निवडणुकीत ३१११ मते वैध तर १११ मते अवैध ठरली.

पॅनेल टू पॅनेल मतदान होईल अशी सत्ताधाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, ती पूर्णपणे फोल ठरली. सतेज पाटील गटाने सत्ताधारी गटाच्या मतदारांत फूट पाडल्याचे दिसले. त्यामुळे सुमारे ६० ते ७० टक्के मतदान सत्ताधाऱ्यांविरोधात गेले. तरीही विरोधी पॅनेलला दोनच जागांवर समाधान मानावे लागले.

अध्यक्षांचा पराभव

मतमोजणीवेळी मतांचे पारडे सातत्याने वरखाली होत होते. विद्यमान अध्यक्ष दिलीपराव माने-पाटील, किशोर पाटील आणि वसंत खाडे यांच्यात चढाओढ सुरू होती. मतांचा फरक पडत असल्याचा संशय आल्याने किशोर पाटील यांनी समोरच अंतिम आकडेवारी निश्चित करण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांच्या समोरच आकडेमोड करण्यात आल्याने प्रक्रियेत पुन्हा दीड तास गेला. दरम्यानच्या काळात वसंत खाडे यांच्या मतात दोनवेळी फरक पडला. कधी ३७ मतांचा तर शेवटी ४२ मतांच्या फरकाने ते विजयी झाले. महाडिक यांच्या पॅनेलचे १६ उमेदवार निवडून आले असले, तरी विद्यमान अध्यक्षांना मात्र पराभव पत्करावा लागला.

सत्ताधाऱ्यांना धक्के

मतमोजणीचा कल बाहेर येईल तसा सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरील तणाव वाढत होता. विरोधी मतदानाच्या माध्यमातून त्यांना धक्क्यावर धक्के बसत होते. मतमोजणी केंद्रातही सुरुवातीला सत्ताधारी चिंतातूर आणि विरोधकांचे चेहरे फ्रेश दिसत होते, पण दुपारनंतर परिस्थिती बदलली. सत्ताधारी गटाला विजय टप्प्यात दिसू लागला. सत्ताधारी गटाच्या महिला, इतर मागास, अनुसूचित जाती- जमाती आणि भटके-विमुक्त गटातील पाचही जागा आल्याने सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले.

मत मोजणीत शंभरावर मतदान बाद झाले आहे. ते झाले नसते तर नक्कीच वेगळा निकाल लागला असता. मतदारांनी जो कौल दिला त्यापासून धडा घेऊन आता तरी आपला कारभार सुधारावा. दूध उत्पादकांना जास्त दर द्यावा आणि वासाचे दूध काढायचे बंद करावे.

- सतेज पाटील, नेते, राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल

सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. दोन जागांवर अगदी कमी मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाले आहेत. काही गोष्टी घडल्याशिवाय शहाणपण येत नाही. 'गोकुळ' देशातील आघाडीचा दूध संघ आहे. त्याच्या लौकिकात भरच घालू.

आमदार महादेवराव महाडिक, नेते, राजर्षी शाहू पॅनेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यापुढे शिक्षकभरती नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे लवकरच कमी केले जाईल. ई-बालभारती मंडळ सुरु करण्यात येईल. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील उर्वरित निधी लवकर दिला जाणार आहे. परीक्षा पद्धतीत सुसुत्रता आणली जाईल. पाचवी आणि आठवीचे वर्ग या वर्षी जोडले जातील. यापुढे नव्याने शिक्षक भरती केली जाणार नाही' अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री तावडे म्हणाले, 'महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारने राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान लागू केलेले नव्हते. या अंतर्गत ३५ टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. येत्या काही दिवसांत विद्यापीठ आणि सरकारी महाविद्यालयांच्यासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे. अधिकधिक विद्यार्थी केंद्री आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र सरकारने यासाठी ५५० कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. परीक्षा पद्धतीत सुसुत्रता आणण्याचा विचार सुरू आहे. प्रत्येक विद्यापीठांत अभ्यासक्रमांची संख्या वेगळी आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी येत्या काही दिवसांत कुलगुरू आणि कुलसचिव यांची समिती नेमली जाईल. त्यांच्याकडून परीक्षा पद्धतीचा आढावा घेतला जाणार आहे.'

मंत्री तावडे म्हणाले, 'आरटीईच्या कायद्याचा प्रत्येकाने वेगळा अर्थ लावल्याने संस्थाचालकांच्यात संभ्रमावस्था आहे. शिक्षणमंत्री संस्थाचालकांच्या विरोधात नाही. या वर्षी चौथी पर्यंत पाचवीचा वर्ग आणि सातवीला आठवीचा वर्ग जोडला जाणार आहे. काही संस्थात भौतिक सुविधा नसल्यास काही अवधी देण्यात येईल. ग्रंथालयांना इ ग्रंथालयाचे स्वरुप दिले जाईल. बोगस ग्रंथालयाची तपासणी केली जाईल. इ बालभारती लवकर सुरु होत असून या मंडळाचे अध्यक्ष विज्ञान क्षेत्रातील असतील. पूर्व प्राथमिकसाठीही धोरण ठरविले जाईल. सीबीएसई, आयसीएसई मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षणाचा फायदा होण्यासाठी विचार केला जाईल.'

सीपीआरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू

'सीपीआरने सिटी स्कॅन, व्हेन्टिलेटरसाठी वेळेत प्रस्ताव सादर केलेला नाही. राज्य सरकारने यासाठी निधी मंजूर होता. काही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणामुळे हा प्रस्ताव दिला नाही. त्याबाबत संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. सीपीआरमध्ये टप्याटप्याने सर्व गोष्टींची पूर्तता करू', असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर पोलिसांकडून दहा घरफोड्या उघडकीस

$
0
0

​म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चौघा संशयितांना ताब्यात घेऊन गांधीनगर पोलिसांनी घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणले. संशयितांकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, मोबाइल, मोटारसायकल असा पाच लाखांचा माल हस्तगत केला.

तावडे हॉटेल परिसरात चौघेजण मोबाइल विक्रीसाठी आल्याची माहिती गांधीनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. जी. गोमारे यांना मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीचा मोबाइल मिळाला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. सिद्धू बाळा चव्हाण (वय २१, शांतीनगर, उचगाव, ता. करवीर), राजू पैजल काळे (२८, रा. दावतनगर गल्ली, इचलकरंजी), मल्लू सिद्धू चव्हाण (२२, शांतीनगर उचगाव), शिवाजी उत्तम काळे (३८, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी उचगाव, मणेरमळा, चिंचवाड, गडमुडशिंगी या परिसरात दहा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोमारे, हवालदार कृष्णात पिंगळे, प्रदीप जाधव, रमेश धादवड, आदींनी तपास केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’साठी एक कोटी अर्थसाह्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते एक कोटी रुपयांचा धनादेश तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यात सतत उद्भवणारी टंचाईसदृश परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत आहे. अभियानामध्ये दरवर्षी पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने सरकारकडून मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासास मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला न्यासाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे करण्यासाठी राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये याप्रमाणे अर्थसाह्य करण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. अभियानाबाबत जनजागृतीसाठी मोबाइल व्हॅनचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजाराम माने आणि न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते करण्यात आले. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. २० मेपर्यंत ही मोबाईल व्हॅन जिल्हाभर फिरणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) विद्युत वरखेडकर, ट्रस्टचे विश्वस्त सर्वश्री प्रवीण नाईक, हरीश सनस, न्यासाचे सहाय्यक पर्यवेक्षक मंगेश कुंटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांना इशारा देणारा निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गावातील दूध उत्पादक सोसायटी, बांधावरचा शेतकरी ते राज्याचा नेता या सर्वांसाठी 'गोकुळ'ची निवडणूक प्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची मानली जाते. 'गोकुळ' मध्ये चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याचा आरोप करत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पॅनेल उभे केले आणि परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला. राजकीय डावपेच पणाला लावत त्यांनी मातब्बर राजकीय नेत्यांना घाम फोडला. पण, हे राजकीय कसब विजयात रुपांतरीत करण्यात त्यांना यश आले नाही. तर सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक आपल्या कारभारात सुधारणा करण्याची इशारा देणारीच ठरली.

'गोकुळ' ची निवडणूक सहकार विभागाने नवीन प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर होणारी पहिली निवडणूक. संचालक मंडळाची मुदत संपली तरी साडेसात वर्षे प्रशासक न येता गोकुळचा कारभार चालला. महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ चालत असताना त्यामध्ये चुकीचा कारभार होत असल्याचा आरोप करत सतेज पाटील यांनी पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या टप्प्यात पॅनेलसाठी उमेदवार मिळतील का नाही अशी शक्यता होती पण माजी आमदार विनय कोरे, खासदार राजू शेट्टी, संजय मंडलिक, संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर यांची उघड सहकार्य तर काहीजणांचा छुपा पाठिंबा घेऊन पॅनेल तयार झाले.

सत्ताधारी गटाने संधी न दिलेल्या घाटगे गटातील संजय घाटगे यांना त्यांनी सोबत घेतले, त्याचवेळी जयश्री चुयेकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या आणि पॅनेलमध्ये येऊ इच्छिणाऱ्या शशिकांत पाटील यांनी मागितलेली उमेदवारी त्यांची निवडून येण्याची शक्यता असली तरी ठामपणे नाकारली. कोणाच्याही घरात भांडणे लावणे योग्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

राजाराम सहकारी साखर कारखान्यात सतेज पाटील यांनी पॅनेल करून महाडिक यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या. त्याचप्रमाणे ३२६३ पैकी २३०० ठराव आपल्याकडे आहेत असे सांगणाऱ्या महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या बालेकिल्ल्यात घुसूनच त्यांनी मतदार फोडले. त्यामुळे सुमारे ६० ते ७० टक्के विरोधी मतदान झाले. मतदानाच्या दिवशी सर्व पिवळ्या टोप्या पाहून सतेज पाटील यांना एखादी जागा मिळाली तरी खूप असे वाटले होते. पण, मतमोजणीवेळी वेगळाच चमत्कार पहायला मिळत होता. महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील या मुरब्बी नेत्यांना तोंड देताना त्यांनी त्यांचेच ठरावधारक फोडून त्यांना घामही फोडला.

'गोकुळ'ची निवडणूक एकतर्फी होईल असे सर्वच नेते सांगत होते. पण, किमान दोन जागा सतेज पाटील यांना मिळतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता, घडले देखील त्याप्रमाणेच. पी. एन. पाटील यांना करवीर तालुक्यातील पाचही जागा निवडून आणण्यात यश आले आहे. तर शिरोळ आणि गडहिंग्लज तालुक्याला आता 'गोकुळ'मध्ये प्रतिनिधीत्व असणार नाही.

'गोकुळ' साठी गावागावातील दूध उत्पादक सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी मतदान केले असले तरी या मतदारांना विकत घेण्याचा प्रकार गोकुळसारख्या निवडणुकीत होतो. हे बंद करण्यासाठी सर्व दूध उत्पादकांना मतदान करण्याचा अधिकार देण्याची गरज आहे. त्याबरोबरच नेत्यांनी आपला कारभार सुधारावा असा कौलही मतदारांनी दिला आहे. विरोधात उभे राहिलेले पॅनेल, मतदारांनी दिलेला कौल यातून आता संचालकांनी आणि नेत्यांनी आपला कारभार सुधारण्याची गरज आहे. वासाचे दूध बाजूला काढणे, आपले टँकर वाहतुकीसाठी लावणे, गरज नसताना वाहतूक करणे अशा टीकांवर लक्ष देऊन नेमके आपले काय चुकते हे समजून घेतले पाहिजे.

कुणाचा गेम तर, कुणाला विरोधी मतांचा फटका

विद्यमान अध्यक्ष दिलीपराव माने यांचा नेत्यांकडूनच गेम झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातच सदानंद हत्तरकी यांच्याकडेही नेत्यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यांचे नाव शेवटी असल्याने त्यांना विरोधी मतांचा फटका बसला असल्याचे संचालक सांगत असले तरी नेमके काय झाले याबाबत नेतेच काय ते सांगू शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरणप्रकरणी संभ्रम कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

ट्रेडिंग व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या अमोल आदीनाथ पडसलगे (वय २४, रा. कबनूर) याला शनिवारी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पडसलगे याने या अपहरणाबाबत मात्र वेगळेच कथन केले. त्यामुळे पोलिस चक्रावले आहेत.

दाते मळा परिसरातील महेश सेवा समिती येथे साखरपुडा समारंभातून ट्रेडिंग व्यापारी श्रीकांत बलदवा यांचा अडीच वर्षांचा मुलगा आरव याला घेऊन त्यांचाच दिवाणजी अमोल पडसलगे हा सकाळपासूनच बेपत्ता झाला होता. सायंकाळच्या सुमारास आयको स्पिनिंग मिलजवळील एका पडक्या घरात आरव हा बांधलेल्या अवस्थेत मिळून आला होता. मात्र अपहरणकर्ता पडसलगे मात्र फरारी झाला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास तो घरी परतल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पडसलगेने पोलिसांना सांगितले, आरव हा आईस्क्रीम मागू लागल्याने त्याला विकली मार्केट परिसरात घेऊन गेलो होतो. तेथून परतत असताना दोघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत आमच्या सोबत असलेल्या अन्य व्यक्तीसमवेत बोरगावकडे जाणाऱ्या एसटीत बसण्यास भाग पाडले. आयकोनजीक संबंधित व्यक्तींनी मला व आरवला उतरण्यास सांगितले. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या एका मारुती व्हॅनमधील अन्य चौघांनी मला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यावेळी त्यांची नजर चुकवून मी आरव याला घेऊन तेथून पसार झालो आणि नजीकच असलेल्या एका पडक्या घरात जाऊन लपलो. आरव हा दंगा करुन लागल्याने मी त्याचे हातपाय बांधले. या दरम्यान मी बाहेर कोणी आहे का बघण्यासाठी बाहेर पडलो असता संबंधित चौघांनी पुन्हा पकडून चाकूचा धाक दाखवत एका अनोळख्या ठिकाणी खोलीत डांबून ठेवले. यावेळी संबंधित एकाचा मोबाईल खोलीत विसरल्याचा फायदा घेत मी त्यावरुन मदतीसाठी बलदवा यांना मेसेज पाठवून फोनही केला. त्यानंतर रात्री आरव हा हाती लागला नसल्याने अज्ञात व्यक्तींनी मला पुन्हा इचलकरंजी-निपाणी रस्त्यावरील एका निर्जनस्थळी ओढ्यानजीक आणून सोडले.

पोलिसांसमोर आव्हान

हिंदी भाषेत बोलणाऱ्या सहाजणांनी माझे व आरव बलदवाचे अपहरण केल्याचे पडसलगे याने पोलिसांना सांगितले. यामुळे या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. पडसलगे याने सांगितलेली घटना आणि शुक्रवारचा घटनाक्रम याची संगती लावण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. इचलकरंजीतील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षीपात्रांचा मोलाचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्वत्र नवनव्या इमारती, त्यांच्याभोवती झालेले काँक्रीटीकरण, लोकांबरोबर वाढत चाललेली वाहनांची गर्दी अशा गजबजलेल्या शहरात पर्यावरणाच्या साखळीतील एक घटक असलेल्या पक्ष्यांसारख्या छोट्या जिवांची अन्न, पाण्यासाठी दैना उडते. उन्हाळ्यात तर त्यांचे हाल आणखीनच वाईट होतात. अशावेळी त्यांच्यासह त्यांच्या पिलांसाठी थेंबभर पाणी व अन्नाचे चार दाणे जरी त्यांना मिळाले तर या जिवांची होणारी परवड सहज थांबू शकते. याच भावनेतून समर्पण सोशल फाउंडेशनच्यावतीने उन्हाळ्यामध्ये पक्षीपात्रांचे वाटप करण्यात येत आहे.

कॉलेजियन्स व नुकतीच नोकरी करु लागलेल्या तरुणाईचे हे फाउंडेशन आहे. जवळपास ८० तरुणांचा हे फाउंडेशन स्वतःच्या पगारातून अथवा स्वखर्चातील काही रक्कम बाजूला काढून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. दरवर्षी एक उपेक्षित घटक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी काही करता येईल का याचा विचार ते करत असतात. त्यानुसार यंदा पक्ष्यांना वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. वेगाने होत चाललेल्या नागरिकरणामुळे शहरातील अनेक ठिकाणची झाडे गायब झाली आहेत. त्यामुळे तेथील सावली व गारवाही नाहीसा झाला आहे. परिणामी उन्हाळ्याच्या काळात पक्ष्यांचा अधिवासच कमी होत चालला आहे. हे पक्षी शांत व झाडांच्या ठिकाणी जाऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न व पाण्यासाठीही त्यांना धावाधाव करावी लागत असते.

फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले की, 'आमच्यापर्यंत ज्यांची मागणी येते, त्यांना आम्ही पक्षीपात्र तयार करुन देतो. बाजारात प्लास्टिकच्या प्लेट मिळतात. ते अडकवण्यासाठी त्याला दोरी लावून दिली जाते. तसेच केवळ पाणी, अन्न ठेवून पक्षी तिथे येतीलच असे नाही. त्यामुळे त्या पक्षीपात्राकडे आकर्षित करण्यासाठी कृ​त्रिम फूल लावण्यात येते. त्यामुळे त्याला आकर्षित होऊन पक्षी येतील व तेथील पाणी, अन्न खातील. आतापर्यंत आम्ही आमचे नातेवाईक, मित्रपरिवार अशा ५५ जणांना ही आकर्षक पक्षीपात्रे दिली आहेत. तसेच मी स्वतःही माझ्या घराच्या गच्चीत पक्षीपात्र ठेवून पाणी, अन्न ठेवतो.'

स्वखर्चाने उपक्रम

ही तरुणाई स्वतःच्या खर्चाने हा उपक्रम राबवत आहेत. अनेक मित्र हे पाहून घरात पक्षीपात्र ठेवण्यासाठी ते घेऊन जात आहेत. त्या पक्षीपात्राचा उपयोग लोकांना समजेल, तसे त्याकडे गांभीर्याने पाहतात हा अनेकांचा अनुभव आहे. कडक उन्हात पक्ष्यांना दिलासा देण्यासाठी घरावर, गच्चीवर, अंगणात पाणी व अन्न ठेवावेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६ मुलांच्या विक्रीचा प्रकार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या बाल कल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) परवानगीशिवाय गोव्यातील पणजी येथे बेकायदेशीररित्या पाठविलेल्या सहा मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांची गोव्यात विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याबाबत बालकल्याण समितीने चौकशी सुरू केली आहे.

१६ एप्रिल रोजी या मुलांची गोवा पोलिसांनी ब्रिटीश नागरिकांच्या तावडीतून सुटका केली होती. याबाबत माहिती घेतली जात असल्याचे समितीच्या अध्यक्ष प्रिया चोरगे यांनी सांगितले. यासंदर्भात चोरगे यांनी सांगितले की, शहरातील मेरी वॉलनेस हॉस्पिटल परिसरातील अगापे टोटल मेडिकेअर एन्टरप्रायजेस संस्थेत एचआयव्ही-एड्सग्रस्त मुलांवर उपचार केले जात होते. याबाबतची परवानगी जुलै २०१४ मध्ये संपुष्टात आली होती. नंतर यातील काही मुलांना पुणे आणि गोव्याला पाठविण्यात आले. मात्र, याबाबत कोणतीही माहिती बाल कल्याण समितीला देण्यात आली नव्हती. अशा प्रकारे मुलांना बाहेर पाठविणे बेकायदेशीर आहे. इमॅन्युअल गायकवाड याने या मुलांना गोव्याला पाठविले होते, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, या मुलांची विक्री केली होती किंवा काय याबाबत चौकशी करण्यात येत आहे. शाहुपूरी पोलिसांनीही याप्रकरणी बाल कल्याण समितीला मदतीची भूमिका घेतली आहे. मात्र सुटका झालेल्या मुलांच्या पालकांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असे शाहुपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ए. डी. चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसीवरील मक्तेदारी मोडू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी भाजप आणि शिवसेना स्वतंत्र पॅनेल करणार आहे. सहा उमेदवारांच्या माध्यमातून ही निवडणूक लढविणार आहे' अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर आणि सुजित मिणचेकर यांनी दिली. ठरावधारकांऐवजी सभासदांना मतदानाचा अधिकार आणि नेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार हाळवणकर म्हणाले, 'जिल्हा बँकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने कारभार केला. त्यांच्यामुळे बँकेचे १४९ कोटी रुपये थकले आहेत. यापुढील काळात त्यांना अशी संधी मिळू नये यासाठी भाजप आणि शिवसेनेच्यावतीने पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. निवडणुकीत दोन्ही पक्षांनी मिळून सहा उमेदवार उभे केले असून पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार आहे. पॅनेलमध्ये परशुराम तावरे, दिलीप पाटील, केरबा चौगुले, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, अनिल पाटील, सुधीर मुंज यांचा समावेश आहे.'

'ठरावधारकांनाच मतदानाचा अधिकार असल्यामुळे सहकारातील मोठ्या संस्था काही ठराविक नेत्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे संस्थेच्या सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार असावा यासाठी सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे' असे सांगून हाळवणकर म्हणाले.

ते म्हणाले, 'भाजप मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरणार असून सेना-भाजपचे आमदार सोबत आहेत. पक्षीय पातळीवर निवडणूक लढवत असताना भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याने वेगळी भूमिका घेतली तर त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.

आमदार डॉ. सुजीत मिणचेकर म्हणाले, 'जुन्या संचालकांच्या कारभाराबाबत प्रचंड राग असल्यामुळेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. सेना - भाजपच्या पॅनेल आणि जनतेच्या सहकार्याने या निवडणुकीत यश मिळेल. पक्षाच्या सर्व आमदारांची मदत असल्यामुळे पहिल्या प्रयत्नातच यश मिळेल असा विश्वास आहे.'

मंडलिक, नरकेंबद्दल काय बोलणार?

खासदारपदाचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत वेगळीच भूमिका घेतली आहे. स्थानिक राजकारणामुळे वेगळ्या भूमिका घ्याव्या लागत असल्याचे सांगितले जात असले तरी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांची विचारसरणी पाहता प्रा. संजय मंडलिक यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसते. मात्रण, 'याबाबत आपल्याला फार काही बोलायचे नाही. लोकांनी भावना समजून घ्याव्यात' असे आमदार हाळवणकर म्हणाले. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि मंडलिक यांनी वेगळी चूल मांडल्याच्या प्रश्नावर 'आता आपल्याच लोकांबद्दल काय बोलणार?' अशी अगतिकताही त्यांनी व्यक्त केली.

व्ही. बी. पाटील यांची माघार

केडीसीसीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या व्ही. बी. पाटील यांनी माघार घेतल्याचे शनिवारी जाहीर केले. ज्यांनी बँक अडचणीत आणली, त्यांच्याच हातात पुन्हा बँक देण्याचा संगनमताने प्रयत्न होत आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यात अर्थ नसल्याचे सांगत निवडणुकीतून माघार घेत आहे असे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्काळ वीजला जागेचा खोडा

$
0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

शहरवासियांना तत्काळ वीज कनेक्शन देणारी आणि पायाभूत सुविधांमध्ये महत्वपूर्ण ठरणारी महावितरणची 'इन्फ्रा टू' योजना बारगळली आहे. कोल्हापूर परिमंडळासाठी ५१३ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा या योजनेंतर्गत ही कामे होणार होती. मात्र, नवीन उपकेंद्रे उभारण्यासाठी कळंबा, मंगळवार पेठ, न्यू शाहुपूरी आणि एमआयडीसी शिरोली याठिकाणी जागा न मिळाल्याने ही योजना बारगळली आहे. ४८ पैकी केवळ १८ केंद्रांचे काम सुरू असून इतर उपकेंद्रांना जागा मिळत नसल्याने या सुविधांपासून शहरातील भविष्यातील सुमारे १ लाख ५६ हजार ८६२ हून अधिक ग्राहक वंचित राहणार आहेत.

कोल्हापूर शहराचा 'इन्फ्रा टू' मध्ये समावेश झाल्याने शहरवासियांना तत्काळ आणि योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार होता. नवीन उपकेंद्राची उभारणी, उच्चदाब आणि लघूदाब अंतर्गत वाहिनी टाकणे, नवीन रोहित्र उभारणे अशी कामे 'इन्फ्रा टू' अंतर्गत केली जाणार होती. त्यामुळे विनाअडथळा वीज मिळण्याची ग्राहकांना आशा होती. याअंतर्गत शहरात सुमारे ८० कोटी रुपयांची वीजेसंदर्भातील कामे होणार होती.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ५१३ कोटींपैकी ५१० कोटींच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. या निविदा निघाल्यानंतर २०१५-१६पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, अद्याप ४८ पैकी २० उपक्रेंद्रांचेही काम पूर्ण झालेले नसल्यामुळे काहीच उपयोग होणार नाही. सध्या शहरी भागात वीज कनेक्शनची मागणी केल्यानंतर ७ दिवसात वीज कनेक्शन देण्याची व्यवस्था आहे. भविष्यात मागताक्षणी काही तासांतच कनेक्शन उपलब्ध करून दिले जाऊ जाईल अशी तत्परता या इन्फ्रा टू योजनेमुळे येणार होती. त्याबरोबरच अंतर्गत वाहिन्या टाकल्या जाण्यामुळे अपघाताचे प्रमाणही घटणार होते. यासर्व प्रकारांसह महत्वाची गोष्ट म्हणजे चोरून वीज वापरण्याच्या प्रकारांना आळा बसणार होता. शॉर्टसर्किटसह अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता होती. मात्र, जागेच्या अभावी योजनेतील महत्वाच्या केंद्रांची कामे रखडली आहेत. त्याचा परिणाम योजनेच्या परिणामकारकतेवर आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांवर होणार आहे असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

'इन्फ्रा टू' दृष्टिक्षेप

शहरात ३३/११ केव्हीची चार नवीन उपकेंद्रे

मंगळवार पेठ, शाहुपूरी, कळंबा, एमआयडीसीत केंद्रे

नवीन उच्चदाब वाहिन्या - ७१ किलोमीटर

भूमिगत उच्चदाब वाहिन्या - ८८ किलोमीटर

लघुदाब वाहिन्या - ११२ किलोमीटर

नवीन रोहित्रांची उभारणी - २३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकच्या शेतकऱ्यांकडून पाण्यावर डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील कृषीपंपाची वीज बंद ठेवून महाराष्ट्राचे महावितरण आपल्याच शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे शेतकरी मात्र २४ तास नदीतील पाण्याचा बेसुमार उपसा करीत आहेत. कर्नाटकचे शेतकरी महाराष्ट्राच्या पाण्यावर राजरोस डल्ला मारत आहेत. मात्र, राज्य सरकार मात्र, धृतराष्ट्राची भूमिका घेऊन गप्प बसले आहे.

तेलगावपासून भीमा नदीच्या दुसऱ्या नदीकाठावर कर्नाटक सीमा भागातील गावे आहेत. बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकर, औज, कुरघोट, टाकळी या महाराष्ट्राच्या नदीकाठच्या कृषीपंपांची महावितरणे वीज बंद ठेवल्याने शेतातील उभी पिके पाण्याविना करपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसानही होत आहे. जनावरांचेही हाल होत आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्यातील उंब्रज, उंबराणी, टाकळी, शिरनाळ या कर्नाटकातील गावांच्या काठावर नागरिकांना तब्बल १६ तास वीज उपलब्ध असून, शेतकरी या सर्व वेळेत मोठ्या प्रमाणावर पाणी खेचत आहेत. या शिवाय त्या ठिकाणच्या भारनियमनाच्या काळआत डिझेलवर चालणाऱ्या मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येतत आहे. त्यामुळे भीमेचे पाणी वेगाने कमी होत आहे. कर्नाटक सरकारची त्यांच्या शेतकऱ्यांवर कृपादृष्टी आहे. या उलट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र, ना घर का.., ना घाट का.., अशी झाली आहे.

सोलापूरसह अनेक गावांवर जलसंकट

भीमा नदीवर सोलापूर शहरासह दक्षिणमधील शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सुमारे १५ लाख जनतेची तहान भीमानदी भागवित आहे. मात्र, कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी नदीतील बेसुमार पाण्याचा उपसा करण्याचा विडा उचलला आहे. तसेच उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन नदीपात्र कोरडे पडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गावांना जलसंकटांना सामोरे जावे लागणार आहे. पाण्याची कमतरता अस्यामुळे पिके वाळून चालली आहेत. परिणामी जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. शिवाय भारनियमन आणि पाणीटंचाईमुळे ऊस, द्राक्ष यांसह विविध पिके पाण्याविना करपून जात आहेत. नदीकाठी व गावात किमान सहा तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेटलमेंट’ करणाऱ्यांना शिवसेनेतून हाकला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'किसन वीर साखर कारखाना, जावली बँक निवडणुकीत पक्षाचा अर्ज मंजूर करून घेईपर्यंत खटाटोप करणारे आणि 'सेटलमेंट' होताच अर्ज मागे घेणाऱ्यांना त्याबाबत विचारणा करा. पक्षाची विश्वासार्हता गमावलेल्यांना शिवसेनेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अशांवर सक्त कारवाई करून त्यांना तातडीने पक्षातून हाकलून द्या,' असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत.

किसन वीर सहकारी साखर कारखाना व जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवतारे यांनी येथील विश्रामगृहावर शिवसैनिकांची बैठक घेतली. उपनेते नितीन बानुगडे- पाटील, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार घाडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, दिनेश बर्गे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, 'किसन वीर कारखाना शिवसैनिक लढवत आहेत, याची माहिती उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने ताकदीने लढले पाहिजे. 'सेटलमेंट'साठी गोडगोड बोलणारे, आमदार शंभूराज देसाईंकडे जात नाहीत; पण पाटणकरांच्या वाढदिवसाला जातात, असे चाटूगिरी करणारे आपल्याला नको आहेत. तरुण, नव्या दमाचे कार्यकर्ते द्या. त्यांना ताकद देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. तुम्ही पुढे आला पाहिजे. सत्ता आपली आहे, याची जाणीव तुम्हालाही झाली पाहिजे. तुम्ही विकासकामे सुचवत जावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images