Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टाकीत पडून भावंडांचा मृत्यू

$
0
0

साताराः घरासमोर खेळत असताना शौचालयाच्या टाकीत पडून दोन भावंडांचा मृत्यू झाला. ही घटना शेंद्रे (ता. सातारा) येथे शनिवारी सायंकाळी घडली. संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

संकेत नरेंद्र तिगाडे (वय ४), समर्थ नरेंद्र तिगाडे (५, सध्या रा. आदर्श कॉलनी, शेंद्रे, ता. सातारा. मूळ रा. व्हन्नूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी शौचालयाच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. या मुलांचे वडील नरेंद्र तिगाडे हे गेल्या एक वर्षांपासून शेंद्रे येथे वास्तव्यास आहेत. लिंबखिंड येथील क्रशरवर ते ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. शेंद्रे येथे ते भाड्याची खोली घेऊन राहत आहेत. त्यांच्या घरासमोर अर्धवट बांधकाम केलेले घर आहे. या घराच्या पाठीमागे तीन शौचालयाच्या टाक्या आहेत.

या टाक्यांवर सुरक्षेसाठी झाकण ठेवण्यात आले नव्हते. तिगाडे यांची मुले संकेत आणि समर्थ हे दोघे शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत होते. तर त्यांची आई यल्लावा या घरामध्ये पाणी भरत होत्या. घरातील कामे आटोपून मुले कुठे गेली, हे पाहण्यासाठी त्या बाहेर आल्या; परंतु त्यांना दोन्ही मुले कुठेच दिसली नाहीत. त्यांना संकेत टाकीत तरंगताना दिसला. संकेतला शेंद्रेतीलच एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. समर्थ सुद्धा त्याच टाकीमध्ये पडला आहे का, हे कोणालाही माहिती नव्हते. दोन्ही मुले एकाच टाकीत पडली असावीत, अशी लोकांना शंका आल्याने त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टाकीच्या तळाला समर्थही सापडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पैरा’ फेडला; पण क्रॉस व्होटिंगने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून विद्यमान संचालक धैर्यशील देसाई व विलास कांबळे यांनी विजय संपादन केला. मात्र मधुकर देसाईंसारख्या नवख्या उमेदवाराने अगदी काट्याची टक्कर दिली. येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा 'पैरा' असल्याने क्रॉस व्होटिंग होणार नाही, अशी शक्यता होती. तरीही या तालुक्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचे निकालानंतर समोर आले.

'गोकुळ' ची निवडणूक पहिल्या टप्यात सतारूढ गटासाठी एकतर्फी असेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र निकालानंतर विरोधी आघाडीने सतारूढ गटाला चांगलाच धक्का दिल्याचे समोर आले. विरोधी आघाडीचा उमेदवार विजयी झाला नसला तरी माजी मंत्री सतेज पाटील यांची उमेद मात्र या निवडणुकीने वाढली. भुदरगड तालुक्यात पैऱ्यांचे राजकारण सुरु असल्याने या तालुक्यात क्रॉस व्होटिंग होणार नाही याची चांगली जुळणी सतारूढ गटाच्या नेत्यांनी केली होती.

तालुक्यात दोन उमेदवार दोन पक्षांचे होते. आणि तोंडावर बिद्रीची निवडणूक आहे. त्याचबरोबर अंगारा ते भंडारा शपथा झाल्यामुळे तालुक्यात किमान १०० ते १२५ मताधिक्य सतारूढ गटाला असेल असा अंदाज होता. पण, निकालानंतर मधुकर देसाई यांनी धैर्यशील देसाई यांना चांगलीच टक्कर दिल्याचे दिसले. मधुकर देसाई यांच्यासाठी स्वतः सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार केला. दुसऱ्या बाजूला माजी आमदार बजरंग देसाई, के. पी. पाटील, के. जी. नांदेकर यांनी धैर्यशील देसाई व विलास कांबळे यांची प्रचार यंत्रणा राबविली. दोन्ही गटाकडून आपले ठरावधारक चार दिवस अगोदर सहलीवर पाठविले. तरीही क्रॉस व्होटिंग झालेच. यात सतारूढ गटाचे क्रॉस व्होटिंग जादा झाले. पण, विजयाची सीमारेषा मात्र मधुकर देसाई यांना पार करता आली नाही.

मधुकर देसाईंचे कसब

मधुकर देसाई यांची वैयक्तिक संपर्क यंत्रणा जी होती. ती या निवडणुकीत कामी आल्याचे दिसले. के. एच. कॉलेजचे जनरल सेक्रेटरी ते मौनी विद्यापीठाचे संचालक असा त्यांचा प्रवास आहे. या विद्यापीठात येणारा विद्यार्थी मधुकर देसाई यांच्या संपर्कात येतोच. कारण देसाई यांनी आपली संपर्क यंत्रणा चांगली ठेवली आहे आणि एखाद्या व्यक्तीला पहिल्या भेटीनंतर नावासह कायमचे लक्षात ठेवण्याचे त्यांचे कसब आहे. हे कसब त्यांना या निवडणुकीत काही प्रमाणात कामी आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारशे शेकरूंचे अस्तित्व

$
0
0

चंद्रशेखर कांबळे, राधानगरी

देशात अनेक महत्वाचे वन्यप्राणी दुर्मिळ होत असताना राधानगरी-दाजीपूर अभयारण्यात मात्र राज्यप्राणी म्हणून मान्यता असलेल्या ४०० शेकरुंचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार दिवसांपूर्वी वन्यजीव खात्याअंतर्गत झालेल्या गणतीमध्ये विशेष पथकास यावेळी १५२ शेकरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले असून येथे शेकरूंची दोन हजार घरटी असल्याची नोंद मिळाली आहे.

तपकिरी, पिवळसर रंगाचा व अंगावर पांढरे पट्टे असणारा हा प्राणी दुर्मिळ असून राज्यात भीमाशंकर अभयारण्य वगळता त्याचे अस्तित्व अन्यत्र कमी-अधिक प्रमाणात आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा आणि कोकणच्या हद्दीत ३५२ चौरस कि.मी. अंतरापर्यंत पसरलेल्या व गव्यांसाठी राखीव असलेल्या दाजीपूर अभयारण्यात त्यांची संख्या विपुल असल्याचे या गणतीत उघड झाले आहे. वन्यजीव विभागाकडून १८ ते २२ एप्रिल दरम्यान या अभयारण्यात प्रथमच अशी शेकरू गणती करण्यात आली. त्यावेळी पथकास अभयारण्यातील सुरंगी पठार, पवनेश्वर मंदिर, पाट्याचा डंग, कोकण दर्शन, सांबरकुंड आदी ठिकाणी शेकरूची २००८ घरटी आढळली. प्रत्येक शेकरूची चार-पाच घरटी असल्याने अभयारण्यात सुमारे ४०० शेकरुंचे अस्तित्व असल्याचा प्राथमिक अंदाज वन्यजीव विभागाने व्यक्त केला आहे. तर यावेळी गणती पथकाला १५२ शेकरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले. यापूर्वी अनेकदा झालेल्या वन्यजीव गणतीमध्ये शेकरुंचा इतका सखोल तपशील उपलब्ध झालेला नव्हता.

'वन्यजीव'चे मुख्य संरक्षक जी. साईप्रकाश, प्रादेशिकचे मुख्य वनसरंक्षक एम. के. राव व वन अधिकारी एस. एल. झुरे यांनी या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते. त्यानुसार भीमाशंकर अभयारण्यातील शेकरु अभ्यासक सहाय्यक, वनसंरक्षक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वनक्षेत्रपाल एस.एस.पाटील, महेश परब आणि त्यांच्या तीस कर्मचाऱ्यांचे पथक पाच दिवस भटकंती करीत होते. त्यानंतर त्यांच्या निरीक्षण आणि नोंदीनुसार ही आकडेवाडी समोर आली आहे. शेकरू हा अत्यंत भित्रा, लाजाळू असून जंगलात उंच झाडावर त्याचा अधिवास असतो.

शेकरु हा राज्यप्राणी असून त्याच्या या विशेष गणतीमुळे अभयारण्यातील त्याच्या आधिवासाचा प्राथमिक अंदाज आला आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे अधिक सोपे होईल.

- एस. एल. झुरे, विभागीय वन अधिकारी, दाजीपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्यशोधकी स्त्रिया ग्रंथरुपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेत सत्यशोधक चळवळीचा वाटा मोठा राहिला आहे. सत्यशोधक चळवळीत पुरुषांच्या बरोबरीनेच महिला कार्यकर्त्याही सक्रिय होत्या. सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने कार्य केलेल्या बहुजन समाजातील स्त्रियांचे कार्य कर्तृत्व ग्रंथरूप होणार आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातंर्गत 'सत्यशोधक चळवळीतील स्त्रिया' या विषयावर ग्रंथ लेखन होणार आहे. 'बार्टी'ने नाइट कॉलेजमधील मराठीचे प्रा. डॉ. अरुण शिंदे यांच्या जबाबदारी सोपवली आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून बहुजन स्त्रियांचे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनातील योगदान अधोरेखित होणार आहे.

बार्टीकडून 'राष्ट्रनिर्माते' प्रकल्पातंर्गत समाजसुधारकांचे जीवनकार्य व विचार यावर भारतीय भाषांमध्ये ग्रंथ प्रकाशित केले जाणार आहेत. त्यानुसार संस्थेने ग्रंथ लेखन प्रकल्पासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागवले होते. तज्ज्ञ समितीकडून छाननी व प्रत्यक्ष मुलाखतीनंतर डॉ. शिंदे यांची या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून गेल्या १५० वर्षातील सत्यशोधक चळवळीतील बहुजन स्त्रियांचा सहभाग व त्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान उजेडात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे यांच्यापासून सत्यशोधक चळवळीची मोठी परंपराला लाभली आहे. विविध टप्प्यात अनेक महिलांनी सत्यशोधक चळवळीचे काम केले आहे. यामध्ये सावित्रीबाई रोडे, तानुबाई बिर्जे, शांताबाई बनकर, जनाबाई रोकडे, अहिल्याबाई रोकडे, विमला बागल, चंद्रा बागल, शारदाबाई पवार, ते सुमती पाटील यांच्यापर्यंत पन्नासहून अधिक ​स्त्रियांच्या जीवनकार्यावर संशोधनपर लेखन होणार आहे. विशेष म्हणजे मराठीतील या ग्रंथांचे अन्य भाषेत भाषांतर होणार आहे. त्याची प्रक्रिया त्यावेळी होईल.

सत्यशोधक विचारधारेच्या स्त्रियांच्या कार्य कर्तृत्वाचे संशोधन आणि ग्रंथनि​र्मिती हा मुख्य उद्देश आहे. ग्रंथ लेखनाचा हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण होईल. लेखन 'बार्टी'कडे जमा केले जाईल. 'बार्टी'कडून मराठीत ग्रंथ प्रका​शित करतानाच त्याचे वितरण आणि अन्य भाषांतील अनुवादही होईल.

-प्रा. डॉ. अरूण शिंदे, नाइट कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीसाठी सरसावले कोल्हापूरकरांचे हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नेपाळमधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांचेही हात सरसावले आहेत. आपत्तीग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याबरोबरच वैद्यकीय मदतीसाठी येथील विविध संघटनांनी तयारी चालवली आहे. कणेरीतील सिद्धगिरी मठ, जीवनमुक्ती संघटना, केमिस्ट असोसिएशनच्यावतीने नेपाळमध्ये अडकलेले स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी व्हाइट आर्मी तसेच डॉक्टर तसेच अन्य मदतीची पथके जाणार आहेत. याशिवाय जनकल्याण समितीने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

नेपाळला जाण्यासाठीचे रस्ते, रेल्वे तसेच विमान वाहतूक बंद आहे. तसेच तिथे कोणत्या परिसरात जास्त मदतीची आवश्यकता आहे, याची कल्पना अजून आलेली नाही. कुठे मदतकार्य करता येईल यासाठी सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी नेपाळला रवाना झाले आहेत. केमिस्ट असोसिएशन, जीवनमुक्ती संघटना, सिद्धगिरी मठाच्या संयुक्त विद्यमाने मदत केली जाणार आहे. त्यासाठी अशोक रोकडेही सोमवारी नेपाळला रवाना होणार आहेत.

रोकडे म्हणाले, 'तिथे आवश्यकता पाहून कॅम्प सुरू करण्यात येणार आहे. सध्या मदतकार्याची तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार आहे. नेपाळमधून निरोप मिळताच ही पथके नेपाळकडे येतील. तिथे उपचारासाठी हॉस्पिटल उभारण्याची योजना आहे. त्याचबरोबर रिलीफ सेंटरही चालवण्याचे नियोजन आहे. यासाठी औषधे जमा करण्यास सुरुवात केली आहे. येथून मदत घेऊन तिथे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे येथे आर्थिक मदत केल्यास त्यातून तिथे धान्य अथवा विविध मदतीचे साहित्य आपत्तीग्रस्तांना देता येतील.'

४८ पर्यटक गंगटोकमध्ये सुखरूप

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले जयसिंगपूर येथील रत्नदीप कदम यांच्यासह त्यांचे तीन मित्र सुखरूप असल्याचा निरोप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मिळाला आहे. भूकंपामध्ये ते अडकले नाहीत. कदम यांना तेथील परिस्थितीबाबत धक्का बसला होता. सध्या ते परतीच्या प्रवासात आहेत. याशिवाय समर्थ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सिक्कीम, गंगटोक, दार्जिलिंग येथे पर्यटनासाठी गेलेले ४० पर्यटक गंगटोक येथे आहेत. त्यांच्यासोबत असलेले कृष्णात तोडकर म्हणाले, 'या भागातही भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीती पसरली होती. पण सर्वजण एकत्र असल्याने एकमेकांना सांभाळून घेतले आहे. सोमवारी दार्जिलिंग येथे जाणार आहोत. तसेच, डॉ. नंदकुमार जोशी व त्यांचे कुटुंबीय असे आठजण गंगटोक येथे होते. ते पेलिंग येथे गेले आहेत.' याशिवाय कागल येथील हिरवे दाम्पत्य वैष्णोदेवीला गेले आहेत. त्यांच्याशी अजून संपर्क झाला नसल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे त्यांच्या नातेवाईक श्रीमती सुषमा हिरवे यांनी माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुणाराजे भोसले यांचे निधन

$
0
0

साताराः अजिंक्य उद्योग समुहाचे शिल्पकार दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या पत्नी आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मातोश्री अरुणाराजे भोसले यांचे (वय ६६) रविवार सकाळी साडेसात वाजता निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अभयसिंहराजे यांच्या पश्चात शिवेंद्रराजे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून अजिंक्य उद्योग समुहाची घौडदौड सुरू ठेवण्यात अरुणाराजे यांचा मोलाचा वाटा होता.

महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी त्यांनी अजिंक्यतारा महिला सहकारी बँकेची स्थापना करुन ही बँक नावारुपास आणली. तसेच सहजीवन महिला औद्योगिक सहकारी संस्थेचीही त्यांनी उभारणी केली. त्यांनी समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मुकबधीर, अंध मुलांसाठी त्यांनी भरीव काम केले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे, महाराष्ट्र स्टेट अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, मुंबई या संस्थांचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते.

अरुणाराजे भोसले यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९४७ रोजी कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दूर घराण्यात झाला होता. त्या श्रीमंत बाबाराजे खर्डेकर-निंबाळकर यांच्या कन्या होत. २६ फेब्रुवारी १९७० रोजी त्यांचा विवाह साताऱ्याच्या छत्रपती घराण्यातील अभयसिंहराजे भोसले यांच्याशी झाला होता. अरुणाराजे यांच्या पश्चात विवाहित कन्या ओजस्वीताराजे गायकवाड (बडोदा), पुत्र शिवेंद्रराजे, स्नुषा वेदांतिकाराजे, नात ऋणालीराजे आणि नातू रुद्रनिलसिंहराजे असा परिवार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा लाखांचा तरुणाला गंडा

$
0
0

कुपवाड : सांगली महापालिकेतील अतिक्रमण निर्मुलन पथक आणि पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे अमीष दाखवून सहा लाखाना गंडा घातल्याप्रकरणी संदीप तुकाराम पाटील (वय ३५, सांगलीवाडी) याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. मुंबईच्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा सदस्य असल्याचे ओळखपत्र दाखवून त्याने गंडविले असल्याचे समोर आले आहे.

कुपवाडमधील शरदनगरमध्ये राहणारे रमेश पांडुरंग आंबी यांच्याकडून संदीप पाटीलने सहा लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आंबीच्या दोन्ही मुलांना नोकरी लावण्याचे अमीष दाखविले. पैसे लुबाडल्यानंतर विभागीय आयुक्त पुणे आणि मॅट प्राधिकरण यांच्या नावे नोकरीचे बनावट पत्र तयार करून आंबी यांना दिले. त्या पत्रावर तेराव्या महिन्यांतील तारीख टाकली होती. आंबींची मुले पत्रे घेऊन मुंबईत गेल्यानंतर स्वतःच त्यांना संबधित पत्रे बोगस असल्याचे सांगून पैसे परत देण्याची तयारी दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याची आवक घटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्चपासून आंब्याच्या सुरू झालेल्या आवकेत घट झाली आहे. यंदा आंबा उत्पादन क्षेत्रात झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असल्याने आवक कमी झाली आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वाढणारी आवक जेमतेमच राहिली आहे. यामुळे दर अजुनही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. हापूस आंब्यासोबत मद्रास येथील हापूस व पायरी आंबा बाजारात दाखल झाला आहे. हापूस आंब्याच्या अडीच डझनाच्या बॉक्सची किमंत ५०० ते एक हजार रुपयांवर स्थिर आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी हापूस आंब्याची पाच डझनाच्या ९१७ पेट्यांची तर अडीच डझनाच्या पाच हजार ३३८ बॉक्सची आवक दररोज होत आहे. एका पेटीचा दर ७०० ते तीन हजार तर बॉक्सचा दर २५० ते १२०० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र किरकोळ बाजारात या दरामध्ये दुप्पटीने वाढ होत आहे.

याच बरोबर कलिंगड व काकडीच्या आवक प्रचंड वाढली आहे. ७० ते ८० रुपयांवर स्थिर झालेल्या कलिंगडचा दर आवक वाढल्यामुळे घटला आहे. यामुळे लहान-मोठ्या नगाची किमंत २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. काकडीच्या दरातही आवक वाढल्यामुळे घसरण झाली आहे. सरासरी ३० ते ४० रुपये किलोने काकडीची विक्री होत आहे.

फळभाज्यांचे दर स्थिर

बाजार समितीसह किरकोळ बाजारात फळभाज्यांची आवक कायम राहिल्याने दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यात फेब्रुवारीमध्ये ८० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचलेला फळभाज्यांचा दर ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी आला आहे. कोबीच्या दरात घरात घट झाली असली, तरी फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पालेभाज्यांची आवक अत्यंत कमी झाली आहे. मेथी वगळता पोकळा, चाकवत, पालक भाजीची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे मेथीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मेथीची एक पेंढी १५ तर जुडीचा दर २५ ते ३० रुपयांवर पोहोचला आहे.

रानमेव्याची एन्ट्री

एप्रिल, मे महिन्यामध्ये बाजारपेठेत रानमेव्याची आवक होत असते. गेल्या आठवड्यापासून रानमेवा बाजारात दाखल झाला असला, तरी त्याची आवक जेमतेम आहे. लक्ष्मीपुरीसह भाऊसिंगजी रोडवर तुरळक ठिकाणी जांभळे, करवंदे व फणस विक्रीचे स्टॉल लागले आहेत. जांभळे, करवंदे खरेदी करण्यासाठी लहान मुलांची गर्दी होऊ लागली आहे. जांभळे ५० रुपये किलो तर करवंदाचे दहा रुपयांना मिळत आहेत. फणस सरासरी २० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवे सीबीएसचे विस्तारीकरण

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

दररोज वीस हजाराहून अधिक प्रवाशी व पंधराशेच्या आसपास बसची वर्दळ असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात महामंडळाने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. स्थानकात प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था दिसत नसल्याने बसमध्ये चढण्यासाठी तसेच बसमधून उतरुन बाहेर जाण्यासाठी प्रवाशांनीच चौकस राहिले पाहिजे. अन्यथा शनिवारच्या अपघाताच्या पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. वस्तूतः स्थानकाच्या विस्तारीकरणाशिवाय पर्याय नाही हे अपघाताच्या प्रकारातून सामोरे आले आहे.

शनिवारी दुपारी एका महिलेला बसने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये ती महिला ठार झाली. यामध्ये ती महिला चालत जात असताना पाठीमागून धडक दिल्याने त्याचा दोष प्रथमदर्शनी चालकावर जातो. महिला चालत जात असल्याने चालकाला बस थांबवता येणे शक्य होते. याबाबत एसटी महामंडळ चौकशी करुन त्याबाबत योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल. पण त्या महिलेचा जीव हकनाक गेला. यातून पुन्हा एकदा एसटी महामंडळाची स्थानकाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. मुळात बसस्थानकातील एसटी बस तसेच प्रवाशांच्या वर्दळीत प्रचंड वाढ झाली आहे. पण स्थानकाचा आवार पूर्वीइतकाच आहे. दररोज १५०० च्या आसपास बसेस ये जा करत असतात. २५ हजारावर प्रवाशांची वर्दळ स्थानकामध्ये असते. यामुळे केंव्हाही गेल्यास स्थानक गजबजलेले असते. मध्यंतरी या वर्दळीमुळे बस आत येण्याचा मार्ग मोठा केला. त्यामुळे तिथे बस थांबून होणारी गर्दी काही अंशी कमी झाली. मात्र अजूनही बाहेरुन येणाऱ्या बहुतांश बस तिथेच थांबतात. त्याच ठिकाणी प्रवाशांना उतरतात. त्यामुळे प्रवास करुन थकलेल्या तसेच नवीन असलेल्या प्रवाशाला कुठून कुठे जायचे हे प्रथम समजत नाही. तिथेच समोरुन बस आल्यावर अनेकदा प्रवाशांची धावपळ उडते. अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. यासाठी प्रथम प्रवाशांना उतरण्यासाठी सुरक्षित अशी जागा तयार करण्याची गरज आहे.

याशिवाय पुणे, मुंबई प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी जुन्या प्लॅटफॉमसमोरील रस्ता ओलांडून जावे लागते. त्यावेळीही आगारातून येणाऱ्या किंवा बाहेरुन बस वेगाने येत असतात. बसचालकांना आपण स्थानकामध्ये आलो आहेत याचे भान नसते. त्यामुळे अनेकवेळेस प्रवाशांच्यासमोर जाऊन करकचून ब्रेक मारणारेही चालक पहायला मिळतात. यासाठी प्रवाशांना सुरक्षितपणे ये जा करण्यासाठी पादचारी पुलासारखी यंत्रणा उभी करणे शक्य आहे. बस प्लॅटफॉर्मवर पाठीमागे घेताना प्रवाशांचा धोका वाढत असल्याने आता तोंड प्लॅटफॉर्मच्या दिशेने करुन लावली जाते. पण बस सोडली जात असताना पाठीमागे घेतल्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी बस थांबलेली आहे, असे समजून प्रवाशी इतर बसची प्रतिक्षा करत असतात. चालकाने अचानक बस सुरू करुन पाठीमागे घेण्यास सुरुवात केली की प्रवाशांची पळापळ होते. त्यातून अनेकदा प्रवाशांना बसचे धक्केही बसले आहेत. जीवितहानी होऊ नये यासाठी वाहकाने बसच्या पाठीमागे जाऊन प्रवाशांना इशारा देण्याची आवश्यकता असते. महामंडळानेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवारात यंत्रणा उभारण्याची नितांत गरज भासत आहे.

स्थानकाचा व्याप आता वाढलेला असल्याने वाढलेली यंत्रणा राबवण्याबरोबर प्रवाशांना सेवा देताना थोडीशी अडचण येते. त्यासाठी स्थानकाचे विस्तारीकरण गरजेचे आहे. स्थानकामध्ये नियम पाळण्याच्या सूचना चालक व वाहकांना दिल्या जातील. प्लॅटफॉर्मवर काही दुरुस्तीही चालवल्या आहेत.

-सुहास जाधव, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनधन योजनेत २.५ लाख खातेदार

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केल्यानंतर आठ महिन्यांत जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार २२८ खातेदार विविध राष्ट्रीयीकृत बँकेशी जोडले आहेत. यांपैकी बँक ऑफ इंडियात चार कोटी ७५ लाख व बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तीन कोटी ७५ लाखांची बचत केली आहे. गॅस, शिधापत्रिका व अन्य सरकारी अनुदान मिळण्यासाठी बँक खात्याचा वापर होत असल्याने सामान्य ग्राहक बँकेशी संलग्न झाले आहेत. याचा सर्वाधिक फायदा बँकिंग क्षेत्राला झाला आहे. याच योजनेतून जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ६११ खातेदारांना रुपे कार्डचे वितरण करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केल्यानंतर २८ ऑगस्टपासून योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. सर्वसामान्य खातेदारांना बँकिंग प्रणालीत आणण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. उद्दिष्टांपेक्षा जास्त खातेदार जोडण्यात जिल्ह्यातील ३१ राष्ट्रीयीकृत बँकांना यश आले आहे. जिल्ह्यातील दोन लाख ३७ हजार खातेदारांनी बँक खाते उघडले असून, यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे एक लाख ६६ हजार १९८ खातेदार आहेत.

जनधन योजनेत खाते उघडण्यामध्ये किरकोळ विक्रेते, अकुशल कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा समावेश आहे. केवळ बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये साडेआठ कोटी रुपयांची बचत झाली असून, योजनेतून विमा संरक्षण मिळत असल्याने ग्राहकही वाढल्याचे स्पष्ट होत आहे. एक लाख ६९ हजार ६११ खातेदारांना रुपे कार्डचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांत जास्त एक लाख १६ हजार ३३९ रुपे कार्डचे ग्रामीण भागात वितरण झाले आहे.

४४ टक्के महिला

जनधन योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ६११ रुपे कार्ड दिली आहेत. यामध्ये ४४ टक्के महिलांचा समावेश आहे. सहा महिन्यात रुपे कार्डवर व्यवहार केल्यास त्यांना एक हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट मिळतो. पुन्हा वर्षभर व्यवहार सुरळीत ठेवल्यास पाच हजारांचा ओव्हर ड्राफ्ट मिळतो. महिला स्वावलंबनासाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे.

जनधन योजनेतील खातेदारांना विमा संरक्षण मिळते. मात्र, विमा परतावा मिळण्यासाठी किमान ४५ दिवसांत व्यवहार होण्याची आवश्यकता आहे.

- एम. जी. कुलकर्णी, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, तसेच द्राक्षबागेकरिता काढलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असलेल्या तासगाव तालुक्यातील डोगंरसोनीच्या बजरंग तथा भाऊ जगन्नाथ झांबरे (वय ५५) या शेतकऱ्याने रविवारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथील एका शेतात हा प्रकार उघडकीस आला.

झांबरे यांची डोंगरसोनी येथे द्राक्षबाग आहे. त्याचप्रमाणे तिसंगी हद्दीत पाच एकर शेत खरेदी करून तेथेही त्यांनी द्राक्षबाग लावली होती. या द्राक्षबागोसाठी, तसेच जमीन खरेदीसाठी बँकेकडून त्यांनी मोठे कर्ज (अंदाजे ४० लाख रुपयांहून अधिक) काढले होते. दुर्दैवाने पहिल्या वर्षी कमी उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षीही अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्षबागेचे अतोनात नुकसान झाले. सलग तिसऱ्या वर्षीही खूपच कमी उत्पन्न हाती आले. त्यामुळे बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत गेला. काढलेले कर्ज कसे फेडायचे ही एकच विवंचना त्यांना सतावत होती. प्रचंड कर्जामुळे ते अस्वस्थ झाले होते.

त्यांच्या एका मुलीने अभियांत्रिकी पदवी घेतली आहे, तर मुलगा बीएस्सी अॅग्रीच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी कर्ज काढले होते. बँकेचे हप्ते थकल्याने ते अक्षरश: कर्जबाजारी झाले होते. दरम्यान, झांबरे हे गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर होते. त्यांचा मोबाइलही बंद होता. त्यानंतर शोधाशोध केल्यानंतर तिसंगी जवळील त्यांच्या शेतातील झोपडीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्याकडे एक चिट्टीही मिळाली असून, कर्जबारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रमुद’ आंदोलन तीव्र करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाचे गेल्या २२ दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराड दौऱ्यावर आले होते. परंतु, त्यांनी आंदोलनस्थळी भेट देणे सोडाच पण, त्यांनी त्यावर विधान सुद्धा केलेले नाही. त्यामुळे संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेपासून तीव्र आंदोलनास सुरूवात करण्यात येणार आहे,' अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पाटणकर म्हणाले, 'आंदोलनाची जास्त तीव्रता असणारा हा जिल्हा असल्याची कल्पना असतानाही मुख्यमंत्र्यांनी भेटणे टाळले. त्यांनी दौऱ्यात या आंदोलनावर बोलणे अपेक्षित होते. आंदोलनाची परिस्थिती पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विषय पत्रिका मागवून बैठकीची तयारीही केली आहे. पण, मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्याची मानसिकता नसल्याने नाईलाजास्तव आंदोलन करावे लागत आहे. यामध्येही त्यांना एक संधी देण्यात येणार आहे. ३० रोजी मुख्यमंत्री पुन्हा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे एक मेपासून तीन टप्प्यात आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

असे होईल आंदोलन

एक मे रोजी धरणग्रस्त धरणातील पाणी फुलपात्रात घेऊन मूळ राहणाऱ्या ठिकाणची माती घेऊन मशाल तयार करणार आहेत. सरकारने जे दु:ख दिले त्याची प्रतिकृती म्हणून ही ज्योत तयार करणत येणार आहे. तसेच जिल्ह्यातील जे १०५ हुतात्मे आहेत, त्यांची प्रतिकृती आंदोलनस्थळी लावून शपथ घेणार आहेत. चार मे रोजी दुसरा टप्पा सुरू होणार असून, कराड तालुक्यात आगशिव डोंगरात असणार प्राचीन बौद्ध लेण्यात प्रेरणा घेण्यासाठी जाणार आहोत. पाच मे रोजी तिसरा टप्पा असून, सोलापूर जिल्हा वगळता बाकीच सर्व जिल्ह्यातील आंदोलकांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्च काढून कोयना माईच्या कुशीत जाणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील आंदोलक उजनी धरणातील पाणी विठूरायाच्या पायी घालणार आहेत. त्यानंतर ते चंद्रभागेच कुशीत जाणार आहेत.

'पाण्यासाठी आंदोलनाची गरज'

सांगली : टेंभू सिंचन योजनेच्या पाण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी दिघंची येथे बोलताना सांगितले. पाटणकर म्हणाले, 'आता आंदोलन केले नाही तर कधीच पाणी मिळणार नाही. आटपाडी तालुक्यातील या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना योजनेचे पाणी मिळायलाच हवे. दिघंचीसह पळसखोल, लिंगीवरे, राजेवाडी, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव आदी गावे टेंभूच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यासाठी जनरेट्याची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेनेरिक’ची तीनशे दुकाने उघडणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

औषधांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना औषधोपचार घेणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी राज्यभरात जेनेरिक औषधांच्या तीनशे दुकानांची साखळी उभारण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली. औषध व्यावसायात काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. असेही ते म्हणाले.

मिरजेतील जनता मेडीकलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार सुरेख खाडे, सुधीर गाडगीळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

बापट म्हणाले, 'सध्या औषधांना मागणी वाढली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध व्याधींवर औषधोपचार घेणे गरजेचे असते. मात्र, सध्या औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना औषधोपचार घेणे शक्य होत नाही. सर्वसामान्यांनाही औषधोपचार घेणे शक्य व्हावे, यासाठी राज्य सरकार राज्यभरात जेनेरिक औषधांच्या तीनशे दुकानांची साखळी उभारणार आहे. औषध व्यावसायात काही लबाड लोकही आहेत. त्यांचा त्रास चांगल्या लोकांना होतो. काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. कालबाह्य औषधांची विक्री करणे, जादा दराने औषधांची विक्री करणे, फार्मासिस्ट न घेता व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोबऱ्यासाठी भांडणारे एकत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'माजी मंत्री जयंत पाटील यांनी अनेकदा डबऱ्यात घातले तरीही मदन पाटील यांचे त्यांच्याशी कसे जमले, हे माहित नाही. खोबऱ्यासाठी भांडणारी मंडळी एकत्र येतात म्हणजे काहीही करायचे., पण सत्ता मिळवायची असाच हेतू दिसतो आहे. बँकेची आवस्था वाईट होण्याला तत्कालीन संचालकच जबाबदार असतात. एकदा सुरू झालेली चौकशी थांबत नाही. पाच वर्षे सहकार मंत्री राहिल्याने सर्वांच्या कुंडल्या आपल्याला माहित आहेत, असा इशारा माजी मंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.

कदम म्हणाले, 'जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेली युती कसली आहे, सांगलीलाच काय संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. जिल्हा बँकेचे खोबरे होऊ नये, याची काळजी लोक निश्चितच घेतील. सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचार न करता बँक पुढे नेणारे कोण आहेत, हे न समजण्याइतपत जनता अडाणी राहिलेली नाही. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी आपल्याला फोनवरुन दोन टोळ्या एकत्र आल्याचे सांगितले. बँकेची आवस्था वाईट होती म्हणून नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने प्रशासक आणला. त्यामुळे कोणी टिमकी वाजविण्याचे कारण नाही. प्रशासकांमुळे बँक सक्षम झाली आहे.'

'आमच्यात वाद नव्हता'

वसंतदादा पाटील घराण्यात आणि आपल्यात कधीच वाद नव्हता. आम्ही त्यांना नेहमीच बरोबर घेतले आहे. पण, आता घराण्यातील वाद बघून 'हे काय माझ्या नशिबाला आले' असे वसंतदादा स्वर्गात म्हणत असतील. माजी मंत्री मदन पाटील यांच्या बाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असेही कदम यांनी सूचित केले.

कपबशी विरोधात टेबल

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी सोमवारी चिन्ह वाटप झाले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलला कपबशी तर मोहनराव कदम, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील रयत सहकार परिवर्तन पॅनेलला टेबल चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, सोमवारी कदम-पाटील यांनी आपल्या पॅनेलच्या सतरा गटांतील सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. बॅकेच्या निवडणुकीत एकोणीस जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोन्ही पॅनेलचे उमेदवार वगळता अन्य सतरा जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

'मदन पाटील दादाविरोधक'

'खासदार संजय पाटील यांनी आपली भेट घेतली. घरात वाद नको, असे सुचविले होते. मदन पाटील यांना तसे वाटत असेल तर त्यांनी ते पॅनेल सोडून बाहेर पडावे. त्यांना जाहीर पाठिंबा देवू, असे सांगत मी यासाठी त्यांना सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंतचा वेळ दिला होता, मात्र ते आले नाहीत. म्हणून त्यांना वगळून आम्ही पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. मदन पाटील हे शंभर टक्के वसंतदादांच्या विचारांच्या विरोधात आहेत. हेच पुढे कायम राहील, अशी कार्यकर्त्यांमध्ये भिती आहे. सर्वसामान्य आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा दृष्टिकोन ठेवून आम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चेला तयार झालो होतो. ते त्यांना मान्य नव्हते. ते सगळे मोठे एकत्र आले असले तरी जनता त्यांना दणका देवू शकते. याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे.

दरम्यान मोहनराव कदम म्हणाले, 'लाचारीचे राजकारण कधीच केले नाही आणि करणार नाही. सामान्य आमच्याबरोबर आहे. आमच्यातही कोणीही भानगडबाज नसल्याने आम्हीच सत्तेत जाणार आहोत. तिकडे भानगडबाजांचा भरणा अधिक आहे.'

'वसंतदादा-कदम गटाला आम्ही बाजूला केले नाही'

कॉँग्रेसने केलेले गुंडगिरीचे आरोप वैयक्तिक पातळीवरचे नाहीत. ज्या वेळी तसे आरोप वैयक्तिक पातळीवर येतील त्यावेळी जशास-तसे उत्तर देवू. अद्याप हालगी तापलेली नाही. हालगी तापूदे, मग आम्ही तोंड उघडू, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. वसंतदादा-कदम गटाला आम्ही जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेले नाही. चर्चेत ते मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे चर्चा थांबली. विशाल पाटील यांच्याकडे जावून आपण भावा-भावांत वाद नसावा, असा प्रयत्न केला होता. आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, यांची समजूत काढली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शतकमहोत्सवी वाचनालय

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे स्वातंत्र्यपूर्व काळात वाचनालय सुरू करण्यात आले. चळवळीच्या बातम्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा यामागचा उद्देश होता. लोकसेवा संघाच्या या वाचनालयाने गेल्या शंभर वर्षात ग्रामस्थांची वाचनाची भूक भागवली, त्याचबरोबर मेंदू अन् मनगट बळकट केले. शतक पूर्ण करणारे हेच वाचनालय आता नव्या पिढीचे भविष्य घडविण्यासाठी दिशा देत आहे.

१९०६ साली स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. लोकसेवेची स्फूर्ती घेवून ज.वा.दाते, भाऊराव सुरणीस या तरूणांनी गणेश वाचनालय सुरू केले. यानंतर १५ एप्रिल १९१६ रोजी सभा घेऊन विद्यार्थी सहाय्यक मंडळ स्थापण्यात आले. राजकारणापासून अलिप्त राहून या संस्थेत सर्वांना प्रवेश देण्यात आला. ९ मे १९२१ रोजी महासभेने या संस्थेचे लोकसेवा संघ असे नामकरण केले.

सुरूवातीच्या काळात या वाचनालयात मोजकी वृत्तपत्रे येत असत. स्वमालकीची इमारत नव्हती. गणेशवाडीत वाचनालय घराघरात फिरत होते. यामुळे मराठे यांनी जागा दिली. तर उमाबाई बोरकर यांनी बांधकाम साहित्य दिले. १९२४ साली ३५० रूपयांत वाचनालय इमारत साकारली. व्यायामशाळा व वाचनालय उभारताना झालेले कर्ज तेव्हांच्या तरूणांनी कसरतीचे प्रयोग करून फेडले. कै.श्रीपाद मराठे यांच्याकडे तरूणांनी कारभार सोपविला होता. २२ मार्च १९७१ मध्ये वाचनालयाला 'क' वर्ग दर्जा मिळाला.

कोल्हापूर जिल्हा ग्रंथालयाच्या पहिल्या अधिवेशनात ग्रामीणस्तरामध्ये गणेशवाडीच्या ग्रंथालयास दुसरा क्रमांक मिळाला. हा पुरस्कार त्या काळात गणेशवाडीकरांची मान उंचावणारा होता. या वाचनालयास लोकमान्य टिळक, साहित्यसम्राट न.चिं.केळकर, बाळासाहेब महाराज अधिपती यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. ४३ वर्षे कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या कै. जयपाल गोरवाडे यांनी वाचनालय, व्यायाम शाळेच्या उभारणीत मोठे योगदान दिले.

कै. श्री. ज. मराठे, कै. जयपाल गोरवाडे यांचे परिश्रम व प्रेरणेतून संस्थेचे कार्य १०० वर्षे अखंडपणे चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष गुंडाप्पा तासगावे, ग्रंथपाल चिंतामणी भट्ट, आण्णासाहेब मुदगावे, कार्यवाह सुधाकर वास्कर, आण्णासो गावडे हे व्यवस्थापन पहातात. आज वाचनालयातील ग्रंथसंग्रह वाढला असून २० हजारांहून अधिक ग्रंथ आहेत. १९१६ पासूनचे दुर्मिळ ग्रंथ येथे पहायला मिळतात. त्याचबरोबर काळाची गरज ओळखून स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शक पुस्तके याचबरोबर संदर्भ ग्रंथ वाचनालयात आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात वाचनाची भूक भागविणारे हे वाचनालय आता नव्या पिढीला दिशा देत आहे.

अशीही सामाजिक बांधिलकी

वाचनालयाबाबत माहिती देताना उपसरपंच बळवंत गोरवाडे म्हणाले, 'वाचनालयाच्यावतीने दरवर्षी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात येतात. वाचनालय व व्यायामशाळेमुळे मुलांचा बौध्दिक व शारिरीक विकास होत आहे. गेल्या शंभर वर्षापासून येथील कर्मचारी विनावेतन काम करीत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात वळवाची दमदार हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सुमारास वळीव पावसाने हजेरी लावली. गडहिंग्लज, शाहूवाडी, कागल, चंदगड परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे अर्धा ते एक तास पाऊस सुरू होता.

गडहिंग्लज : शहर आणि परिसरात सायंकाळच्या सुमारास वळीव पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांची धावपळ सुरु असताना पावसाने उष्म्यापासून मुक्तता मिळाली. मात्र अनेकांच्या तयारीत व्यत्यय आला. कडगाव रोड येथील निलगिरी वृक्ष मुख्य रस्त्यावर कोसळल्याने काही काळ कडगाव रोड बंद होता. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील गारगोटी परिसरात वळीव पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. यावेळी वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले. केळी पिकाचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पण, हा पाउस शेती साठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे. या पावसाने कूर, मिणचे परिसराला मात्र हुलकावणी दिली.

मागील चार दिवस वातावरणात कमालीची उष्णता जाणवू लागली होती. तापमानाचा मारा ३७ अंशापेक्षा अधिक झाला होता. परिणामी शेतीकामांच्या वेळा बदलल्या होत्या. शेतकरी वळीव पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. सोमवारी दुपारनंतर वातावरणात उष्णता वाढल्याने वळीव पावसाची चाहूल लागली होती. सायंकाळी उशिरा गारगोटी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाउस झाला. या वाऱ्यात अनेक वृक्ष उन्मळून पडले. हे वृक्ष विद्युत वितरण कंपनीच्या तारांवर पडल्याने काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हा वळीव पाउस पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

चंदगड : शहर परिसरात दुपारी चारच्या दरम्यान सुमारे तासभर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. गेले चार दिवस उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. माणगाव, कार्वे, जंगमहट्टी, इसापूर, कानूर व चंदगड परिसरात पावसाने हजेरी लावली. दुचाकी प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली.

कधी ढगाळ वातावरण, कधी पाऊस, कधी थंडी तर कधी कडक उन्हाळा अशा विचित्र वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नेमका कोणता ऋतू चालू आहे, याबाबत शंका निर्माण व्हावी अशा प्रकारे हवामानात बदल होत आहेत. पंधरा दिवसांमध्ये अधून-मधून तालुक्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे लग्नसमारंभातही अडथळे निर्माण होत आहे. मृगाच्या अगोदर शेतीची मशागत करण्यात गुंतलेला शेतकरीही पावसाच्या भितीने दचकूनच घरातून बाहेर पडत आहेत. क्षणात ऊन व क्षणात पाऊस पडत असल्याने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांना पाऊसातून भिजत मार्गक्रमण करावे लागत आहे. हा पाऊस काजू व उसासाठी उपयुक्त आहे.

मात्र काही ठिकाणी गारांसह पाऊस झाल्याने काजू खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर्षी काजू पिक पन्नास टक्यांवर आल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे. त्यातच वातावरणातील बदल, धुके व गारामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जात आहे.

कागल-निढोरी मार्गावर झाड कोसळले

सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने कागल निढोरी राज्य मार्गावर सिध्दनेर्लीनजीक रस्त्यावरच झाडे तुटून पडली. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली. सेनापती कापशी येथील विद्युत उपकेंद्रावर झाड पडल्याने तसेच वडगाव येथेही विजेच्या खांबावर झाडे पडल्याने वीजपुवठा खंडीत झाला. तालुक्यात इतर ठिकाणीही झाडांची पडझड झाली. सोमवारी दिवसभरात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारा व गारांसह झालेल्या अर्धा तास पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांना कसरत करावी लागली. कापशी परिसरात गाराही पडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूठभर दाणे, ग्लासभर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्ष्यांबद्दल माणसांना कायमच कुतूहल राहिले आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पक्षांचे दिसणे आणि आवाजाबद्दलचे कुतूहल असते. लहान असताना पक्षांना पकडण्याचा प्रयत्न करत अल्लड खेळ खेळला जातो तर समज आल्यानंतर दाणे टाकून त्यांना जवळ बोलविले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष्यांसाठी दाणे आणि चारा देण्याचा प्रयत्न पाचगाव येथील महालक्ष्मी पार्कमध्ये केला जात आहे. चारूशीला विजय देसाई या पक्षांसाठी अन्न देणे आणि भांड्यात पाणी ठेवून त्यांची अन्न पाण्यासाठी होणारी तगमग कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे धकाधकीच्या जीवनातही पक्ष्यांच्या सहवासाचा आणि ते अंगणात येत असल्याचा आनंद या संपूर्ण कुटुंबाला घेता येतो.

देसाई यांच्या घरातील जवळपास सर्व व्यक्ती नोकरदार आहेत. त्यामुळे घरी कोणीही नसते. सकाळी उठल्यानंतर अंगण झाडताना घरातून चार दाणे हातात घेऊनच त्या अंगणात येतात. एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात तांदूळ किंवा ज्वारीचे दाणे. अंगण साफ केले की, त्या जागी पक्ष्यांसाठी अन्नाची व्यवस्था करून ठेवायची हा त्यांचा नियमच आहे. त्यांच्याबरोबरच घरातील इतर सदस्यही न चुकता दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे हे काम करत असतात. अंगणात पक्ष्यांसाठी दाणे आणि वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून अन्न आणि पाण्याची व्यवस्था या देसाई कुटुंबाकडून केली जाते.

सकाळी ठेवलेले अन्न दुपारपर्यंत पक्ष्यांकडून फस्त केले जाते. नोकरीवर गेलेले घरचे सदस्य घरी आले की, पुन्हा संध्याकाळी या पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली जाते. सकाळ, संध्याकाळ देसाईंच्या घरात पक्ष्यांचा राबता असतो. काही पक्षी तर त्यांच्या ओळखीचे असल्याचे त्यांना वाटते.

नियमित येणारे आणि कधीतरी अधूनमधून येणारे असे दोन गटच पडले आहेत. चिमण्यांबरोबरच, बुलबुल, साळुंखी, पोपट, कबूतर असे वेगवेगळे पक्षी दारात येत असल्यामुळे या पक्ष्यांच्या किलबिलाटानेच देसाई कुटुंबियांची सकाळ उजाडते. त्यामुळे अजूनही सिमेंटच्या जंगलात पक्षांचा किलबिलाट जपून ठेवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्याप्रमाणेच शहरातील अन्य लोकही आपली सकाळ आनंददायी करण्यासाठी असा प्रयोग करू शकतात. त्यासाठी हवे फक्त मूठभर दाणे आणि ग्लासभर पाणी.

आनंददायी मेळा

चिमण्या, बुलबुल, साळुंखी, पोपट आदी पक्षी सध्या कमी प्रमाणात पहावयास मिळतात. शहरातील सिमेंटच्या जंगलात तर त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. देसाई यांच्यासारखे उपक्रम राबविल्यास पक्ष्यांचा असा आनंददायी मेळा प्रत्येकास अनुभवयास मिळू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्याय सुचवा, जागा देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बागल चौक परिसरातील कब्रस्तानातून जाणाऱ्या रस्त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या ठिकाणी पर्यायी जागा सुचवा. त्या ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल' अशी ग्वाही आयुक्त पी. शिव शंकर यांनी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला दिली. लोकांना विश्वासात न घेता आणि नियम डावलून काम होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी ​अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. भूसंपादनाआधी टेंडर प्रक्रिया, नुकसानभरपाई यासंदर्भात माहिती देण्याची सूचना त्यांनी केली.

बागल चौक परिसरातील ड्यूक कॉर्नर ते स्टर्लिंग टॉवरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला होता. मुस्लिम समाजाच्या मालकीच्या कब्रस्तानातून रस्त्याचा काही भाग जाणार आहे. रस्त्यासाठी ही जागा अंमलात आणताना त्याबदल्यात दुसरी जागा प्रथम उपलब्ध करून द्यावी अशी समाजाची मागणी आहे. सार्वजनिक रस्त्यासाठी जागा ताब्यात घेताना अधिकारी व कंत्राटदारांनी कुणालाच विश्वासात न घेता कामाला सुरुवात केल्याने वाद निर्माण झाला होता. मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कादर मलबारी, हाजी शौकत मुजावर, रफीक मुल्ला आदींची सोमवारी आयुक्तांशी याप्रश्नी चर्चा केली. कब्रस्तानची २६० चौरस मीटर जागा रस्त्यासाठी वापरली जाणार आहे.त्याचबरोबर इतरांच्या पाच ते सहा मिळकती आहेत.

गणी आजरेकर, कादर मलबारी यांनी, 'कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आम्ही कायम सहकार्य करतो. यापूर्वी सुध्दा रस्त्याची कामे व विकास कामासाठी मस्जिद व दर्गाहची जागा दिली आहे. मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येने कब्रस्तानाची जागा अपुरी पडत आहे. रस्त्यासाठी कब्रस्तानची जागा घेताना पर्यायी जागा द्यावी' असा मुद्दा मांडला. आर. के. नगर, सुभाषनगर, राजेंद्रनगर, सरनाईक वसाहत येथे महापालिकेच्या जागा असल्याचे मलबारी यांनी निदर्शनास आणून दिले.

आयुक्तांनी यासंदर्भात माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. पर्यायी जागेच्या मागणी संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी साजिद खान, मुसा पटवेगार, लियाकत मुजावर, अस्लम झांजी आदी उपस्थित होते.

विकास आराखड्यानुसार की ?

बागल चौक ते पार्वती टॉकीजकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पर्यायी मार्ग तयार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विकास आराखड्यानुसार अंमलबजावणी होत असल्याचे राजारामपुरी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या संकुलासाठी रस्ता तयार केला जात असल्याची चर्चा आहे. महापालिकेने २०१३ च्या रेडीरेकनरच्या दरानुसार या रस्त्याच्या भूसंपादनासाठी तीन कोटी ४६ लाखांची तरदूत केली आहे. २०१५ मध्ये कामाला सुरूवात केल्यामुळे सध्याच्या रेडीरेकनरनुसार आवश्यक १८४८ चौरस मीटर जागेसाठी महापालिकेला सुमारे सात कोटी रुपये भूसंपादनासाठी मोजावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिलांचे मंगळसूत्र लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा (ता. करवीर) परिसरातील महाराष्ट्रनगर परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तृप्ती सुशांत सावंत (वय २९, रा, सुर्वेनगर, कळंबा) यांचे गळ्यातील तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. त्यानंतर याच रस्त्यावर चोरट्यांनी सुनीता रवींद्र वाळवेकर (३९, दत्त भगीरथीनगर) यांचे चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले.

सोमवारी दुपारी दीड ते पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. कळंब्यातील अमृतसिद्धी मंगल कार्यालयातील विवाह आटोपून सावंत व त्यांची मैत्रिण दीपा निकाडे घरी परतत होत्या. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी सावंत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून पळवले. दोघींनी आरडाओरड केल्यावर कॉलनीतील प्रमोद शिंदे यांनी मोटारसायकलवरून चोरट्यांचा साळोखेनगर परिसरात पाठलाग केला. यावेळी त्यांनी मोटारसायकलचा ४७३८ असा क्रमांक पाहिल्याचे सांगितले. दरम्यान, याच रस्त्यावर सुनीता वाळवेकर यांचे शिवप्रभू नगरजवळ चार तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यासाठी मुश्रीफांची आम्हाला गरज नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महालक्ष्मी दूध संघ येत्या वर्षाभरात पुन्हा सुरू करू, त्यासाठी माजी मंत्री हसन मुश्रीफ किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची काही गरज नाही', असे प्रतिपादन प्रा. संजय मंडलिक यांनी सोमवारी येथे केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्यपक्ष आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी स्थापना केली आहे. या आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना प्रा. मंडलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, आम्ही बाजूला गेल्यानंतर महालक्ष्मी दूध संघाला दूध संकलन करण्यात फार अडचणी येऊ लागल्या. त्यातूनच महालक्ष्मी दूध संघाचे काम ठप्प झाले. मात्र महालक्ष्मी दूध संघात कोणताही आर्थिक गैरव्यवहार नाही. महालक्ष्मी दूध संघाने केडीसीसी बँकेला व्याजापोटी एकरकमी ८० लाख रुपये भरले आहेत. सध्या व्याजासह जवळपास पाच कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. यासंदर्भात कोर्टात केसही सुरू आहे.'

प्रा. मंडलिक म्हणाले, 'वन टाइम सेटलमेंट झाली तर कर्जाची रक्कम तातडीने भरण्याची तयारी आहे. त्यानंतर दूध संघ पुन्हा सुरू केला जाईल. बाहेरील संस्थेचे सहकार्य घेतले तरी दूध संकलन करून देण्याची जबाबदारी आमचीच असेल. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सहकार्यानेचे दूध संघ पुन्हा सुरू करून दाखवू.'

दरम्यान, केडीसीसी बँकेवर ‌बिनविरोध निवड झालेले बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बँकेचे थकीत कर्ज वसुलीसाठी जोमाने प्रयत्न होतील असे सांगितले. ते म्हणाले, 'जवळपास २७ संस्थांची १५० कोटींच्या आसपास थकबाकी आहे. या संस्थांच्या संचालकांशी चर्चा केली आहे. कर्ज वसुलीसाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढले जातील. ही कर्ज वसुली करण्यात कसलीही अडचण येणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images