Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कृष्णेत मुलाचा मृतदेह सापडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

पलूस तालुक्यातील चोपडेवाडीत सोमवारी मगरीने ओढून नदीत नेलेल्या अजय शहाजी यादव (वय १३) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी पाण्यावर तरंगताना सापडला. मगरींचा मुक्काम असलेल्या हाळ (महावीरनगर) भागात सकाळी शोध कार्य सुरू केल्यानंतर शोधपथकाला अजयचा मृतदेह पाण्यावर आल्याचे दिसले. आजअखेर जितक्या माणसांचा मगरीने बळी घेतला, त्या सर्वांचे मृतदेह सापडल्याने मगर माणसाचा जीव घेते. पण ती खात नाही, असा दावा करण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अजयचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या डाव्या खांद्याजवळ आणि बरगडीजवळ मगरीने पकडल्याच्या जखमा आढळल्या. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, तलाठी, पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वन विभागाने नदीकाठच्या प्रत्येक पाणवठ्यावर फलक लावून मगरींपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नदीवर जाण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून वन विभागाला जबाबदारी टाळता येणार नाही. संबधित मगरींचा बंदोबस्त करण्याची उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मगरीची दहशत कायम

मंगळवारी सकाळी सांगलीत नदीकाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी करत वन विभागाने नदीकाठी लावलेले फलक फाडून टाकले. शहराच्या ठिकाणी कृष्णेत मगरीचा वावर इतका वाढला आहे की, पावलो पावली मगरीचे दर्शन होत आहे. आजवर असा मगरीचा वावर होत नव्हता. मगरीने कृष्णाकाठ धास्तावला आहे. वन विभागाने नेमलेले दोन कर्मचारी नागरिकांना केवळ आवाहन करण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत., असा दावा करत नागरिकांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच जणांना अटक, सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव तालुक्यातील हातणूरनजीक विसापूर योजनेचा कालवा फोडल्याच्या संशयावरुन पोलिसांनी सोमवारी रात्री पाच जणांना अटक केली. गावच्या शेतकऱ्यांवर विनाकारण अटकेची कारवाई केल्याच्या निषेधार्थ हातणूरच्या ग्रामस्थांनी मंगळवारी दिवसभर गाव बंद ठेवले. दरम्यान, मंगळवारी दुपारी कोर्टाने पाचही शेतकऱ्यांची जामिनावर सुटका केली आहे.

विसापूर योजनेचा कालवा फोडून पाणी घेतल्याप्रकरणी पाटबंधारे खात्याने तासगाव पोलिसात तक्रार केली होती. पाणी फोडल्याचे समजताच पाटबंधारे खात्याने त्या योजनेच पाणीच बंद केले. या प्रकरणी संशयावरून मच्छिंद्र बाबूराव पाटील, शंकर काकासो पाटील, भास्कर धोंडीराम पाटील, नामदेव भगवान माने आणि सतीश सदाशिव माने या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना अटक झाल्याचे समजताच हातणूरकरांनी गाव बंद ठेवून तासगावात न्यायालयाच्या बाहेर ठिय्या मारला होता. दरम्यान, परिसरात उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत लेखणी बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

महापालिकेच्या सोमवारच्या सभेत नगर सचिवांना धक्काबुक्की केल्याचा निषेधार्थ कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केले. आयुक्त आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे महापालिका कामगार सभेचे सरचिटणीस दिलीप शिंदे आणि सहसचिव विजय तांबडे यांनी पत्रकारांना सांगितले.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत मंगळवारी सकाळी प्रशासकीय कामाला सुरुवात होताच सर्व अधिकारी, कर्मचारी कामगार सभेच्या आवाहनानुसार महापालिकेच्या गेटसमोर एकत्रित आले. जोरदार निदर्शने करत त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर उपायुक्त प्रशांत रसाळ यांना मागणीचे निवेदन देवून आयुक्तांची भेट होईपर्यंत लेखणीबंद ठेवून नेमणुकीच्या ठिकाणी बसून राहण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळपर्यंत आयुक्त आले नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरुच राहिले होते.

'कोणतीही लपवाछपवी नााही'

सोमवारच्या सभेतला गदारोळ, नगरसचिवांना धक्काबुक्की, महापौर गेले पण, सत्ताधाऱ्यांसह बहुसंख्य सदस्य जागेवरच बसून राहिले. महापौरांनी सभा गुंडाळून पळ काढल्याचा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर बोलताना महापौर कांबळे म्हणाले, 'आपण एक विषय वगळता सर्व विषय मंजूर असल्याचे जाहीर करून सभा संपल्याचे सांगून सभागृह सोडले आहे. पीठासन अधिकाऱ्याने सभागृह सोडल्यानंतर नगर सचिवांनी तेथे थांबण्याचे कारण नाही. पण, नगर सचिव चंद्रकांत आडके यांना धक्काबुक्की करून आडविण्यात आले. हा प्रकार बरोबर नाही. आपण ३१ जानेवारीला महापौर म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. सदस्यांना ज्या आयत्यावेळच्या विषयांवर आक्षेप घ्यावा, असे वाटते. ते विषय आपल्या काळातील नाहीच. ऑगस्ट २०१४मधील सभेच्या इतिवृत्तात आलेले आहेत. तेराव्या वित्तआयोगातील सहा कोटी चौथीस लाखाच्या निधी वाटपाचा विषय आहे, तो उघड आहे. त्यात कोणतीही लपवाछपवी केलेली नाही. त्यामुळे आपण कोणताही विषय बेकायदा घुसडलेला नाही. सोमवारच्या सभेत काहींनी हेतुपूर्वक गोंधळ घातला. या बाबत माजी मंत्री मदन पाटील यांची भेट घेऊन वस्तूस्थिती मांडणार आहे. सोमवारच्या सभेच्यावेळी नेमके कोण कोणत्या हेतूने गोंधळ निर्माण करत, हेच कळत नसल्याने आमचेही सदस्य बसून होते. म्हणून बुधवारी चार वाजता काँग्रेसच्या सदस्यांसमोर वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे सदस्य येतील त्यांना वास्तव कळेल. आपल्याबाबत मुद्दाम गैरसमज पसरविले जात आहेत. खरी वस्तूस्थिती लवकरच समोर येईल.'
महापौर वस्तूस्थिती मांडणार

आपण कोणताही बेकायदा ठराव घुसडलेला नाही. ज्या आयत्यावेळच्या विषयांच्या संदर्भात सदस्यांना संशय आहे, ते विषय आपल्या कार्यकाळातील नाहीत, त्याचे कर्तेकरविते दुसरेच आहेत. नेमकी वेळ येताच आणि आवश्यकता भासल्यास त्या विषयीचे वास्तव आपण चव्हाट्यावर आणणार असल्याचा इशारा महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलाताना दिला. संशयित विषयांबाबत वस्तूस्थिती सांगण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक बोलविली असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांचा तुटवडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

महालक्ष्मी यात्रेची धामधूम आता सुरू झाली आहे. सर्वसामान्य जनता, नगरपालिका, प्रशासन व यात्रा कमिटी यांची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. मात्र या धामधुमीच्या कालावधीत प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.

महालक्ष्मी यात्रा १ ते ७ मे या कालावधीत होत आहे. पंधरा वर्षानंतर होणारी ही यात्रा म्हणजे गडहिंग्लजकरांसाठी लोकोत्सवच आहे. यात्रा सुकर व्हावी यासाठी बांधकाम, मंडप डेकोरेशन, स्वयंपाक, स्वच्छता कामगार यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. शहरातील बहुतांशी व्यापारीवर्गाकडे स्थानिक कर्मचारी काम करतात. या कामगारांना यात्रा कालावधीत सुटी मिळणे गरजेचेच आहे. मात्र त्यामुळे ऐन सिझनमध्ये व्यापाऱ्यांना पर्यायी सक्षम व्यवस्था उभी करणे अडचणीचे ठरू लागले आहे. मंदीच्या काळात यात्रेच्या निमित्ताने हालचाल सुरु झाली आहे. मात्र कामगारांच्या तुटवड्याने व्यापाऱ्यांची 'दैव देते आणि कर्म नेते' अशी अवस्था झाली आहे.

स्थानिक कर्मचाऱ्यांसोबतच कुशल कामगारांची देखील वानवा जाणवत आहे. यात्रेनिमित्ताने बहुतांश लोकांनी कित्येक वर्षांपासून रेंगाळलेली घरांची डागडुजी सुरु केली. मात्र गवंडी, सेंट्रिग, फरशी, प्लंबर, पेंटर, सुतार तसेच अंतर्गत सजावट करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आचारी सुद्धा उपलब्ध होईनासे झाल्याचे अनुभवास येत आहे. जेवणावळीचे मुख्य आकर्षण असणाऱ्या भाकरी अथवा चपाती करण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांचे दुप्पट पगार देऊन महिन्यापूर्वीच बुकिंग झालेले असून आता आयत्या वेळी स्वयंपाकासाठी महिला शोधणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

शहरातील महिला वर्गासमोर सफाई कर्मचाऱ्यांचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. कारण त्यांना घरेलू कामगारांचा पर्याय शोधणे अवघड होत आहे. शहरातील बहुतांश घरात सफाई कामगार म्हणून स्थानिक महिला काम करतात. मात्र त्यांच्याही घरी यात्रा असल्याने २५ एप्रिलपासूनच त्यांनी काम बंदचा इशारा दिला आहे. 'कामवाली बाई'च्या इशाऱ्याने भल्याभल्यांना घाम फुटला असून नियमित स्वयंपाक आणि धुणी-भांडी करायची कोणी असा प्रश्न महिलावर्गासमोर उभा ठाकला आहे. नोकरदार महिलांची तर सर्वात जास्त पंचाईत झाली आहे. यासाठीही शोधमोहीम सुरु आहे.

स्थानिक कर्मचाऱ्यांना सुटी

यात्रेच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज नगरपालिकेने सर्व स्थानिक कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर केली आहे. तसेच या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शहराची ओळख व्हावी यासाठी यात्रेच्या आठवडाभर आधीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वच पातळ्यांवर कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनरुज्जीवन होणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

पर्यावरण व निसर्गप्रेमी नागरिकांसह कृषी विभागाच्या कल्पक अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे साकारलेला आजऱ्याचा वनौषधी पार्क वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडला. नजिकच्या शेतीवाडी परिसरात लागलेला हा वणवा वनौषधी पार्कपर्यंत पोहोचण्यामागे सरकार, प्रशासनाची अनास्थाच कारणीभूत ठरली आहे. अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या या प्रकल्पाचे उदघाटन झाल्यानंतर याची निगा राखण्यासाठी आवश्यक तरतूदच झालेली नाही. परिणामी शेकडो काजू व पामसह दुर्मिळ वनौषधी लागवडही या दुर्घटनेत खाक झाली आहेत. यामुळे लाखों रूपयांची हानी तर झालीच, शिवाय आता नव्याने या पार्कचे पुनरूज्जीवन करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर असणार आहे.

राज्य सरकारच्या कृषी व पणन विभागाच्या सहकार्याने आजऱ्यानजिकच कृषी विभागाच्या मालकीच्या १८ एकर जागेत हा सुगंधी व वनौषधी वनस्पती पार्क साकारला. त्यासाठी सुमारे ६५ लाखांचा निधी गुंतविण्यात आला.

विशेषत: पश्चिम घाटात आढळणाऱ्या दुर्मिळ औषधी व स्थानिक प्रजातींच्या वृक्षांच्या लागवडीबरोबरच वैशिष्ठ्यपूर्ण नक्षत्र बन, चाफा बन, सुगंधी भाताचे वाण, विविध प्रकारची फुले, वेली, कमळपुष्पे आदींची कलात्मक लागवड तसेच जैवविविधता संवर्धन, शेती पर्यटन आणि पर्यावरण रक्षणाबरोबरच अभ्यासकांनाही पूरक ठरणारे उद्देश या पार्कच्या उभारणीमागे होते. मात्र उदघाटनादरम्यान जाहीर केल्याप्रमाणे पुढील टप्प्यातील पन्नास लाखांचा निधी अद्यापही मिळालेला नाही.

परिणामी एक आदर्शवत प्रकल्प साकारूनही त्याची देखभाल व निगा राखण्यासह संरक्षणासाठीची कोणतीही तजवीज झालेली नव्हती. यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच अंधकारमय झाले होते. याचीच प्रचिती आता या पार्कला लागलेल्या आगीने आली आहे. प्रकल्पालगतच्या परिसरात लागलेल्या वनव्याने या पार्कला काही मिनिटातच वेगाने आपल्या कवेत घेतले. काही शेतकरी व अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनीही नुकसान टळले नाही.

काजू, पाम व विविध प्रकारची वनौषधी मिळून पावणेदोन हजार झाडे या आागीत खाक झाली. याशिवाय पार्कमध्ये बसविलेली तीन लाख रूपयांची संपूर्ण ठिबक सिंचन यंत्रणाही जळून गेली आहे. किमान दहा लाखापर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अजूनही पंचनाम्याचा घोळ संपलेला नाही, हे विशेष. या दुर्घटनेमागील नेमके कारण समजलेले नसले तरी अतिउष्णता व मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज असल्याचे कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांनी सांगितले.

प्रशासन ढिम्मच

हा आदर्शवत प्रकल्प साकारल्यानंतर अत्यावश्यक निधी पुरवठा न झाल्यामुळे दोन वर्षांतच याला अवकळा यायला सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यानंतरही याबाबत प्रशासन व सरकार ढिम्मच राहिले. वेळीच याबाबत कार्यवाही तत्परतेने झाली असती तर या दुर्घटनेस टाळता आले असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपामुळे ‘बीएसएनएल’ विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोबाइलचे रिचार्ज व बिल भरणा नाही, सेवा खंडित झाली असली तरी त्याची दुरूस्ती झाली नाही. बीएसएनएलच्या रक्षणासाठी दोन दिवसांच्या देशव्यापी संपामध्ये उतरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे बीएसएनएल ग्राहकांची पहिल्याच दिवशी गैरसोय झाली. बुधवारी (ता. २२) संप सुरुच राहणार असून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी सकाळी बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.

बीएसएनएल कंपनी वाचवा, देश वाचवा या मागणीसाठी बीएसएनएलमधील १९ संघटनांनी एकत्र आल्या आहेत. दोन दिवसांच्या संपामध्ये जिल्ह्यातील ११५० कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. सकाळी बीएसएनएल कार्यालयासमोर सर्वजण जमून सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचाऱ्यांबरोबर वरिष्ठ अधिकारीही संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणच्या नागरी सुविधांमध्ये शुकशुकाट होता.

तसेच मुख्य कार्यालयांमध्येही तीच परिस्थिती होती. बिले भरुन घेणे, मोबाइलचा रिचार्ज ठप्प झाला. तर ब्रॉडबँड सेवेमध्ये अथवा अन्य सेवेमध्ये कुठे अडथळा आल्यास ती दुरुस्ती करण्यास कुणी कर्मचारी गेले नाहीत. त्यामुळे किमान दोन दिवस तरी दुरुस्ती होणार नाही. त्याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

कंपनीविरोधातील सरकारच्या धोरणामुळे बीएसएनएलची सेवा बंद झाली तर सामान्य ग्राहकांना प्रायव्हेट ऑपरेटर्सची सेवा घ्यावी लागणार आहे. त्यातून ग्राहकांनाच फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी केल्या जाणाऱ्या संपातून गैरसोय होत असल्यास संघटनांच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब कदम, सुरेश देसाई, अमृत माने, मोहिरे, मुल्लाणी, कालूगडे यांनी केले. उद्याही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

'बीएसएनएल कंपनी वाचवा, देश वाचवा' या प्रमुख मागणीसाठी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. आजपासून सुरू झालेला हा संप उद्याही (बुधवार) असेल. संपामध्ये १९ संघटना सहभागी झाल्या असून देशातील अडीच लाख कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याची माहिती बीएसएनएलच्या सूत्रांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाटलीबंद पाण्याची गुणवत्ता तपासा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात विक्री होत असलेल्या बाटलीबंद पाण्याची तपासणी केली जावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. बाटली बंद पाणी खरोखरच शुद्ध असते का? याची तपासणी केली जावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त देशमुख यांनी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, 'दूषित पाण्याच्या भितीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरच सर्व स्तरातील नागरिक बाटलीबंद पाणी घेत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही व्यावसायिक बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत आहेत. काहीजण सर्व नियम धाब्यावर बसवून आणि कायदे पायदळी तुडवून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करत आहेत. अशा प्रकारचा व्यवसाय करण्यास काहीच हरकत नाही. परंतु व्यवसाय कायदेशीर असावा आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचू नये, तसेच नागरिकांची लुबाडणूक होवू नये.'

यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने बाटलीबंद पाण्याची निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांची तपासणी दहा दिवसांत करून बाटलीबंद पाणी खरोखर शुद्ध आहे का याची तपासणी करावी, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, दिलीप पाटील कावणेकर, सुजीत चव्हाण, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुगडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएडच्या पेपरमध्ये झाला नवा गोंधळ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने घेतल्या गेलेल्या बी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दुसरा भाग छापण्यास शिवाजी विद्यापीठ विसरल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. दुसरा भाग विद्यापीठाच्यावतीने हस्तलिखित स्वरूपात बारा परीक्षा केंद्रांवर ईमेलद्वारे पाठवून विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची जवळपास तासभर गैरसोय झाली.

बीएड अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवारपासून (ता. २० एप्रिल) सुरू झाली आहे. उदयोन्मुख समाजातील शिक्षक व शिक्षण या विषयाची तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात मंगळवारी केवळ मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा पहिलाच भाग पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा तासभर गोंधळ उडाला. कोल्हापुरात बारा केंद्रावर सुरू असलेल्या या परीक्षेतील हा प्रकार लक्षात येताच परिक्षकांनी तत्काळ शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविले. विद्यार्थ्यांचा वेळ जाऊ नये यासाठी लिखित स्वरूपातील प्रश्नपत्रिकेचा दुसरा भाग बारा केंद्रावर बारा वाजेपर्यंत पोहचवून झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या. परीक्षकांनी आणि क्लार्कनी सेट केलेल्या प्रश्नपत्रिका तपासून न पाहिल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे परीक्षा विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एचसीएल कंपनीच्या प्रतिनिधीची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत घरफाळ्याच्या वसुलीत नियमबाह्यरित्या सवलत प्रकाराची चौकशी करताना आयुक्त पी. शिव शंकर यांनी मंगळवारी एचसीएल कंपनीच्या प्रतिनिधीकडेही विचारणा केली. थकीत घरफाळ्याची रक्कम भरून घेतल्यानंतर अनेक मिळकतीमध्ये शिल्लक रक्कम शून्य दाखवली जात आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार मिळकतींचा घरफाळा शून्य दाखविण्यात आला आहे. वास्तविक त्यांच्याकडे थकबाकी आहे. या अनुषंगाने आयुक्तांनी एचसीएल कंपनीच्या प्रतिनिधींशी तांत्रिक बाबीबाबत चौकशी केली आहे. दुसरीकडे घरफाळा विभागाकडून दंड न आकारता १२०० हून अधिक मिळकतींना सवलती दिल्याची माहिती सामोरी आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

कर निर्धाकर दिवाकर कारंडे यांना घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य रित्या दिलेल्या सवलतीची चौकशी करून याबाबत सविस्तर चौकशी अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. कारंडे यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेऊन माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसात अंतिम अहवाल देण्यात येणार असल्याचे कारंडे यांनी सांगितले.

बागल चौकातील आमले मार्केटला नियमबाह्यरित्या सवलत दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयुक्तांनी घरफाळा विभागाकडून गेल्या काही वर्षात ज्या मिळकतींच्या घरफाळ्यात सवलत दिली आहे त्याची चौकशी सुरू केली आहे. काही मिळकतीचा घरफाळा थकीत असताना उर्वरित रक्कम दाखवण्याऐवजी शिल्लक शून्य दाखवली जात आहे. या बाबत तांत्रिक दोष निर्माण झाला आहे की, अन्य काय वाटा शोधण्यात आल्या आहेत याची आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. घरफाळा विभागाकडे ६०० जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारीच्या धडकेत कामगार ठार

$
0
0

कोल्हापूर : मोटारीच्या धडकेत अमित जयवंत कांबळे (वय २५, रा. प्रियदर्शनी कॉलनी, उचगाव, ता. करवीर) हा कामगार ठार झाला. मंगळवारी साडेचारच्या दरम्यान कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अपघात झाला.

अमित हा घाटगे पाटीलच्या युनिट दोनच्या फाउंड्रीमध्ये जॉब इन्सपेक्टरपदी कार्यरत होता. मंगळवारी सायंकाळी चार वाजता शिफ्ट संपल्यानंतर तो अन्य मित्रासमवेत चहा घेऊन मोटारसायकलवरून घरी जात असताना त्याला मोटारीने धडक दिली. कारखान्यापासून काही अंतरावरच हा अपघात झाल्याने युनिटमधील कामगारांनी अपघातस्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील अमितला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले होते. सीपीआर पोलिस चौकीत अपघाताची नोंद झाली आहे. अमितच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीपी १०० टक्के सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेले सांडपाणी पंचगंगा नदीपर्यंत वाहून नेणाऱ्या पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण असल्याने सोमवारी रात्रीपासून जयंती नाल्याचे १०० टक्के सांडपाण्यावर एसटीपीमध्ये प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. जयंती नाल्यामधून शहरातील वाहणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी साधारणतः ७० टक्के सांडपाणी येते. या सांडपाण्यावर प्रकिया करण्यास महापालिकेला यश आले आहे. एसटीपी प्लँटमधून प्रतिदिन ५० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येत आहे.

राष्ट्रीय नदी कृती योजनेतंर्गत कसबा बावडा परिसरात ७६ दश लक्ष लिटर क्षमतेचे अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. जुलै २०१४ मध्ये एसटीपीचे उदघाटन झाले होते. मात्र सहा बेसिनपैकी पहिल्या टप्प्यात दोनच बेसिन कार्यान्वित करण्यात आल्या. त्यानंतर काही महिन्यांच्या कालावधीने चार बेसिनमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येऊ लागली. मात्र, प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली नव्हती. परिणामी एसटीपी प्रकल्प पूर्ण होऊनही त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. एसटीपी प्रकल्पापासून पंचगंगा नदीपर्यंत दोन किलोमीटर लांबीच्या आणि पाच फूट व्यासाच्या आरसीसी पाइपलाइन टाकण्याचे काम गेले काही महिने सुरू होते. पाणंद परिसरातून पाइपलाइन टाकण्यात येत असताना परिसरातील शेती क्षेत्राचे नुकसान झाले होते.यामुळे या कामात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

महापालिकेला एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू न करता आल्यामुळे विभागीय आयुक्तांच्या बैठकीतही हा प्रश्न गाजला होता. विभागीय आयुक्तांनी आठवड्याभरात पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका यंत्रणेने गेले तीन दिवस पाइपलाइन टाकण्याचे काम वेगाने पूर्ण केले आहे.

सोमवारी रात्रीपासून जयंती नाल्यातील १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडले जात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले असून यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी मोठी मदत होणार आहे.

जयंती नाल्यावर संपूर्ण मैला, सांडपाण्यावर आता पूर्णपणे नव्या एसटीपी प्लान्टमध्ये आधुनिक पद्धतीने (सेकंडरी) प्रक्रिया केली जाणार आहे. जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्यात आले आहे.

-सुरेश कुलकर्णी, उपजल अभियंता (ड्रेनेज विभाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठरावधारकांचा भाव वधारला

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

'गोकूळ' च्या मतदानाला अवघा एक दिवस राहिलेला असताना मतदान करण्यासाठी ठरावधारकाचा आकडा आता दोन लाखात गेला आहे. शेवटच्या टप्यात इतकी रक्कम सुद्धा देण्याची तयारी उमेदवारांची आहे. मात्र ठरावधारक मतदार तळपत्या उन्हातून सुटका करून घेण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी गेला आहे. त्यामुळे उमेदवार दारात आणि ठरावधारक मतदार सहलीवर असे तालुक्यात चित्र आहे. तालुक्यातील ९० टक्के ठरावधारक सहलीवर दाखल झाले आहेत. उमेदवारांनी मतदानापर्यंत पोहोचणारी संपर्क यंत्रणा सुद्धा बंद केली आहे.मात्र कोडवर्डच्या भाषेत बोलून ठरावधारक अंदाज घेत आहेत. यात एका ठरावधारकाने 'गाईला गिऱ्हाईक आले आहे का?' असे विचारून ठरावाला किती मागणी आली आहे याचा अंदाज काढला.

भुदरगड तालुक्यात विधानसभा निवडणुकीपासून 'पैरा' फेडण्याचे राजकारण सुरु झाले आहे. आणि हा पैरा फेडण्यासाठी दोन्हीही बाजूनी प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. या व कागल तालुक्यातील पैरा फेडण्यासाठीच राष्ट्रवादीने गोकूळ निवडणूक लढविली नाही. आणि या बदल्यात सतारूढ गटाने भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीला अर्थात माजी आमदार के. पी. पाटील गटाचे विलास कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. तालुक्यात एकूण ३५७ ठरावधारक आहेत. यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी किमान २३० मते दोन उमेदवारांची असून विद्यमान संचालक दिनकरराव कांबळे यांची मते आपल्या पारड्यात पडतील अशी तयारी केली आहे. हे सारे ठरावधारक सहलीवर पाठविल्याचे सतारूढ गटाकडून सांगितले जात आहे. सतारूढ गटातून विद्यमान संचालक धैर्यशील देसाई व विलास कांबळे हे दोन उमेदवार आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याने येथे क्रॉस व्होटिंग होणार नाही, असा नेत्यांचा होरा आहे.

माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी आघाडीतून पाटील यांचे विश्वासू साथीदार मधुकर देसाई हे लढत देत आहेत. त्यांना माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी आपले १४५ ठराव दिल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर आमदार प्रकाश आबिटकर यांनीही मधुकर देसाई यांच्या विजयासाठी जिल्हा पिंजून काढला आहे. मात्र शेवटच्या टप्यात दोन्हीही गटातील नेत्यांनी आपले ठरावधारक सहलीवर पाठविल्याने उमेदवार व नेते केवळ ठरावधारकांचे उंबरे झिझवत आहेत.

गाईला गिऱ्हाईक आहे का?

जनावरांचा व्यापार करणारा एक ठरावधारक सध्या सहलीवर आहे. ठराविक वेळातच फोन होत असल्याने त्यांना आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर बोलता येत नाही. त्यामुळे त्याने एक युक्ती केली आणि भावाला फोन करून तालुक्यातील निवडणुकीचा अंदाज घेताना विचारले 'अरे गोठ्यातल्या गाईला गिऱ्हाईक आलेय का? त्यावेळी भावाने सांगितले, 'आले होते तर दोन मोठं व्याज देतो म्हणत होते. तू मात्र एका कैल्यावर सांगून गेलास. एका कैल्याच नुकसान केलंस बघ.' म्हणजे तुझ्या ठरावाला दोन लाखाची मागणी झाली होती. आणि तु मात्र लाखात गेलास. लाखच नुकसान केलास. आता बोला?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सत्ताधाऱ्यांनी उत्पादकांना लुटले’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) उत्पादकांनाच लुटण्याचा प्रकार सुरू आहे. हा बंद करून उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये जादा दर देणे हाच निवडणूक लढण्यामागील उद्देश आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी सभासद पाठिंबा देतील आणि परिवर्तन पॅनेलचे सर्व सभासद निवडून येतील, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पाटील म्हणाले, 'गोकुळ दूध संघात आवश्यकता नसताना दूधाची लांबच्या पल्ल्यासर वाहतूक करणे त्यामध्ये वाहतुकदारांची ठेकेदारी वाढविणे आणि त्याचा ठेका आपल्याच जवळच्या लोकांना देणे हा उद्योग महाडिकांनी केला आहे. सध्या अमल आणि स्वरुप महाडिक यांच्या नावावर एक तर राजन शिंदे यांच्या नावावर २ टँकर आहेत. गोकुळचा मूळ ठेका कोल्हापूर आइस आणि कोल्ड फॅक्टरीच्या माध्यमातून मंगल महाडिक आणि राजन शिंदे यांच्या नावावर आहे हे खरे आहे का याचाही खुलासा महाडिक यांनी करणे आवश्यक आहे.

आमचे पॅनेल विजयी झाल्यास संचालकांच्या सर्व गाड्या काढून घेतल्या जातील आणि हा १२ कोटी रुपयांचा खर्च वाचविण्यात येईल. त्याबरोबरच वासाचे दूध परत पाठविणे पूर्णपणे बंद, वारसा हक्काने चाललेला संघ चालविण्याचा प्रकार थांबविणे, खरेदीमध्ये पारदर्शकता आणणे, नितळ दूधाचा प्रश्न सोडविणार असल्याचेही पाटील म्हणाले.

पॅनेल केले आणि सर्वजण सोबत आले

पॅनेल करताना सुरूवातीला उमेदवार मिळतील का अशी भीती होती. पण हळूहळू नेतेही सोबत आले. सध्या संजय मंडलिक, संजय घाटगे, विनय कोरे यांच्यासोबतच खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आबिटकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राजेंद्र यड्रावकर हे एकत्र आल्यामुळे पॅनेलची ताकद वाढली आहे. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला मदत करणाऱ्या ठरावधारकांची संख्या वाढलेली आहे. विरोधकांमधीलही काही ठरावधारक संपर्कात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गड राखताना झाली दमछाक

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

अतंत्य प्रतिष्ठेच्या आणि जिल्ह्याच्या लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्व जागा जिंकून आमदार महादेवराव महाडिक यांनी गड राखला असला तरी, गड शाबूत ठेवताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. कट्टर विरोधक माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कडवी लढत दिली असली, तरी त्यांना विजयापर्यंत पोहोचणारी मतदानाची गोळाबेरीज करण्यात अपयश आले. शेवटच्या क्षणी काही ठिकाणचे त्यांचे अडाखे चुकल्याने त्यांचे दोन उमेदवार तर केवळ शंभर ते दीडशे मतांनी पराभूत झाले. राजारामच्या निकालावरुन दोन्ही गटांना गोकुळच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र व्यूहरचना करावी लागणार आहे.

१९८९ मध्ये आमदार महाडिक यांना तत्काल‌िन चेअरमन भगवानराव पोवार यांनी तज्ज्ञ संचालक म्हणून घेतले. दिग्व‌ीजय खानविलकर यांना रोखण्यासाठी पोवार यांनी महाडिक यांना घेऊन आपला गट अधिक सक्षम केला होता. मात्र त्यानंतरच्या पोवार व महाडिक यांच्यामध्ये राजकीय संघर्ष झाल्याने १९९३ मध्ये महाडिक यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. यावेळी पोवार यांच्यासोबत केवळ दोनच विद्यमान संचालक राहिले होते. व्हाईस चेअरमन विश्वास नेजदार यांच्यासह २१ संचालकांना घेऊन त्यांनी पोवार यांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर मात्र महाडिक आणि राजारम कारखाना असे समीकरणच झाले. महाडिक आणि नेजदार यांच्यामध्ये वितुष्ट आल्यानंतर त्यांनी नेजदारांना बाजूला करत २००८ च्या निवडणुकीत बाजी मारली. नेजदार यांचा सारखा कसबा बावड्यातील तगड्या आणि कारखान्याची नस माहित असलेल्या व लाटवडेचे सर्जेराव माने यांना सोबत घेऊन माजी मंत्री सतेज पाटील यांनी पॅनेल उभे केले.

मात्र या निवडणुकीत ऐनवेळी माने गटाची रसद कमी पडल्याने निसटता पराभव पत्करावा लागला. पुन्हा जोमाने बांधणी करत मंत्री पाटील पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू केली. पण याचवेळी सावध झालेल्या महाडिक यांनी पद्धतशीररीत्या आपल्या बालेकिल्ल्यात सभासदांची संख्या वाढवली. याच जोरावर त्यांनी तब्बल बारा विद्यमान संचालकांना डावलण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर विद्यमान संचालकांबाबत नाराजी असल्याने हा निर्णय घेतला, तरी त्यांचे मताचे पॉकेट स्ट्राँग असल्याने त्यांच्यावर हा डाव उलटण्याची शक्यता होती. राधानगरी व पट्टणकडोली, हुपरीमध्ये मंत्री पाटील यांना चांगली ताकद मिळाली. पण विनय कोरे यांचा प्रभाव असलेल्या पन्हाळा तालुक्यातील सात व हातकणंगले तालुक्यातील गावांतून त्यांना जास्त ताकद मिळाली नाही. तरीही त्यांनी दिलेली लढत महाडिक यांना आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे.

महाडिक यांना हजार ते दीड हजारचे लीड अपेक्षित असताना केवळ त्यांना शंभर ते ३०० मतांचे लीड मिळाले. महाडिकांचा हा निसटता विजय असला, तरी सलग पाचव्यांदा कारखाना ताब्यात राखण्यामध्ये त्यांना यश आले आहे. मंत्री पाटील यांनी जाहीर सभामधून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. यामुळे मंत्री गटाचा चंचू प्रवेश होईल असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात होता. पण सभांना मिळणारा पाठिंबा मतामध्ये परिवर्तन करण्यास अपयश आल्याने त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदकांचा मृत्यु विषारी पदार्थामुळे?

$
0
0

कोल्हापूरः रंकाळा तलावात बदक नेमके कशामुळे मृत्यूमुखी पडले यासंदर्भात वेगवेगळ्या शक्यता व्यक्त होत आहेत. तलावातील बेडूक आणि माशांना धोका पोहचला नसल्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे बदकांचा मृत्यू झाला नसावा अशी शक्यता पर्यावरण अभ्यासक आणि महापालिका अधिकारी व्यक्त करत आहेत. उष्माघात, विषारी पदार्थामुळे अथवा शिकार या कारणामुळे बदकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. करवीरच्या वनअधिकाऱ्यांनी रंकाळा परिसराला भेट दिली. त्यांना त्या परिसरात पक्षी आढळले नाहीत. महापालिका कर्मचाऱ्यांनी मृत पक्षी अन्यत्र टाकल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात महापालिका अ​धिकारी बोलायला तयार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज तोडण्याची आज कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज कनेक्शन तोडण्यासाठी काही प्रोसेर्स चालकांनी मागितलेली २४ तासाची वाढीव मुदत दिली जाणार नसल्याने बुधवारी राजाराम सहकारी साखर कारखान्याबरोबर नऊ प्रोसेर्सचे वीज कनेक्शन तोडले जाणार आहे. या सर्व कारखान्यांना मंगळवारी दुपारी वीज तोडण्याची नोटीस मिळाली.

शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. अनबालगन यांनी हे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश इरिगेशन व महावितरणच्या कार्यालयांना दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री पाणीपुरवठा तोडण्याचे काम इरिगेशन विभागाने केले. पण इतक्या तातडीने वीज कनेक्शन तोडता येत नसल्याने नियंत्रण मंडळाच्या आदेशानंतर २४ तासाची मुदत ग्राहकांना द्यावी लागते. त्यानुसार महावितरणने संबंधित विभागांना अशा प्रकारची नोटीस देण्याबाबत कळवले होते. हे आदेश मंगळवारी मिळाल्यानंतर तिथून प्रत्येक कारखान्याला २४ तासाची मुदत ​देत आहोत. त्यानंतर वीज कनेक्शन तोडले जाईल, अशी नोटीस दिली. यानुसार बुधवारी दुपारपर्यंतचा वेळ आहे. पण काही प्रोसेर्सधारकांनी कपड्यांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात असल्याने आणखी २४ तासाची मुदत मिळावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत महावितरणच्या कार्यालयाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विचारणा केली गेली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ बँकांचा एनपीए शून्य टक्के

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

जिल्ह्यातील ४८ नागरी सहकारी बँकांपैकी ३८ बँकांची नॉन परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) ही शून्य टक्के राहिली आहे. उर्वरित बँकांचा 'एनपीए' रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार राहिला आहे. आरबीआय नियमांनुसार ग्रॉस एनपीए ७ टक्के तर नेट एनपीए ३ टक्के असावा लागतो. कोल्हापुरातील नागरी सहकारी बँकांनी ही शिस्त घालून घेतल्याने हे यश मिळाले आहे. त्यामुळे या बँकांना नव्या शाखा सुरू करणे, नवीन एटीएम सुरू करण्यासाठी आरबीआयची परवानगी मिळू शकते.

नियमांनुसार थकीत कर्जाची तरतूद बँकांना करावी लागते. त्यालाच एनपीए किंवा अनुउत्पादक मालमत्ता असे म्हटले जाते. नागरी बँका शेतीसाठी कर्ज देत नाहीत, पण शेतकऱ्यांनी अन्य कारणांसाठी नागरी बँकाकडून कर्ज घेतलेले असते. २००७ आणि २००८ मध्ये वसुली अधिकाऱ्यांना मारहाण, बँकावर हल्ले असे प्रकार घडत होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघाची स्थापना झाली. नुकतीच या संघटनेने स्वतंत्र नोंदणी घेतली आहे. किरण कर्नाड हे संघाचे संस्थापक व सध्या नागेश कुंभार संघटनेचे अध्यक्ष आहेत. सध्या संघटनेत दीडशेच्या आसपास वसुली अधिकारी आहेत. वसुली अधिकाऱ्यांच्या सबलीकरणाचा मोठा फायदा बँकांची वसुली वेगाने होण्यास झाला आहे.

याबाबत कर्नाड म्हणाले, 'जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनकडे वसुलीसंदर्भात चार हजारच्या आसपास तक्रारी असायच्या. ही संख्या आता बाराशेच्या आसपास आहे.'

वीरशैव-को-ऑपरेटिव्ह बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेंद्र कोरे म्हणाले, 'कर्ज देतानाच कर्जदाराची परतफेडीची क्षमता त्याची पात्रता नीट पाहिली जाते. तसेच, बँकेतील त्यांचे व्यवहारही तपासले जातात. कर्ज दिल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांनी कर्ज खात्याचा अभ्यास होतो.'

महिला वसुली अधिकारी

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स वसुली अधिकारी संघाच्या अखत्यारित महिला अधिकाऱ्यांचा स्वतंत्र सेलच आहे. अनेकदा बायकोच्या नावावर कर्ज घ्यायचे आणि त्याची परतफेडच करायची नाही असे प्रकार होतात. अशा प्रकारांत महिला अधिकारी चांगली कामगिरी बजावतात. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बॅँकर्सच्या मासिकानेही या अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाजी कोण होता’वर पोवाडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर सैरभैर झालेल्या एका जवळच्या मित्राने दिलेले आव्हान थळेंद्र लोखंडे या अवलिया कवी आणि शाहिराने लिलया पेलले. त्यांनी आपल्या खड्या आवाजात 'शिवाजी कोण होता' या पानसरेंच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू सांगत प्रथमच साताऱ्याच्या दर्दी श्रोत्यांसमोर पोवाडा सादर केला. थळेंद्रच्या पहाडी सुरांनी थरारलेला टोपेवाडा पुन्हा एकदा नव्या क्रांतीला सज्ज झाल्याचा अनुभव या निमित्ताने आला.

टोपेवाडा साताऱ्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे. हीच त्याची ओळख शनिवारी रात्री थळेंद्रच्या पोवाड्याच्या निमित्ताने एका वेगळ्या अर्थाने अधोरेखीत झाली. टोपेवाड्याच्या प्रांगणात दर्दी श्रोत्यांनी भारतीय बैठकीवर बसून थळेंद्रच्या या अनोख्या शाहिरीचा आस्वाद घेतला. कोणतीही औपचारिकता न पाळता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

प्रारंभी काही कविता सादर केल्यानंतर मुख्य पोवाड्याला थळेंद्रच्या खड्या आवाजात प्रारंभ झाला. या क्रांतिकारी पोवाड्याची कुळकथा पोवाड्यातून मांडताना थळेंद्रने श्रोत्यांच्या पकड घेतली. तब्बल ४५ मिनिटे त्यांचा पोवाडा सुरू होता. पानसरे यांनी आपल्या 'शिवाजी कोण होता' या छोटेखानी पुस्तकात मांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पैलूवर नव्याने प्रकाश टाकणाऱ्या या पोवाड्यातून थळेंद्रने आपल्या अनोख्या प्रतिभेचा अविष्कार सादर केला.

या कार्यक्रमास डॉ. हमीद दाभोळकर, प्रकाश टोपे, डी. एस. कुलकर्णी, राजू मोरे, नारायण पवार, सुनील कारंजकर, गजानन वाडेकर, चंद्रकांत कांबिरे, प्रा. नेरकर, माधव सुर्वे, मकरंद गोसावी, मनोज जाधव यांच्यासह मोजकेच श्रोते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपयशातून साकारली यशाची वाट

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

बारावी परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी एकतर शिक्षणाला रामराम ठोकतात किंवा अपयशाने आपली जीवनयात्रा संपव़िण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा नैराश्याच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम यळगूड (ता.हातकणंगले) येथील अस्लम जमादार या युवकाने केले आहे. बारावी परीक्षेत तब्बल पाच विषयांत नापास झालेल्या अस्लमने पुढे यशाचे टप्पे पार करीत नायब तहसीलदार पदाला गवसणी घालताना सारे काही शक्य असते, फक्त म़नाची तयारी करणे आवश्यक असल्याचे दाखवून दिले.

सहकारातील 'आदर्श ब्रॅण्ड ' म्हणून यळगूड गावची ओळख सातासमुद्रापार पोहोचली आहे. अशा या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम अस्लमने केले आहे. वडील साहेबलाल जमादार यांचे मूळ गाव हिंगणगाव (ता.हातकणंगले). मात्र शिक्षकी पेशातील नोकरीनिनित्त ते यळगूड येथेच वीस वर्षांपूर्वी स्थायिक झाले. हलाखीच्या परिस्थितीतून वाटचाल केलेल्या साहेबलाल जमादार यांनी मुलाच्या शैक्षणिक प्रवासात नेहमीच दीपस्तंभाची भूमिका बजावली.गावातीलच शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अस्लमने पुढे ११ वी १२ वी साठी कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र १२ वी च्या परीक्षेत त्याचे तब्बल पाच विषय राहिले. आई वडील शिक्षक असताना अस्लमचे परीक्षेतील अपयश सर्वांनाच निराश करून गेले. पण नाऊमेद न होता त्याने पुढच्या वर्षी जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर हुपरी येथून परीक्षा देत ६७ टक्के गुण मिळवले. त्यानंतर शिक्षकी पेशाची नोकरी सुखाची म्हणत त्याला मनाविरुद्ध डी.एड. ला जावे लागले. मात्र सहा सात महिन्यातच डी.एड.ला रामराम करीत त्याने प्रशासकीय अधिकारीच बनायचे स्वप्न पाहत कोल्हापूर गाठले.

कोल्हापुरात राहून एकाच वेळी पुणे विद्यापीठाची बी.सी.ए व शिवाजी विद्यापीठाची दूरशिक्षण केंद्रातून बी.ए.(इंग्रजी) ही पदवी घेतली. नंतर शिवाजी विद्यापीठातूनच एम.सी.ए. पदवी घेताना संगणक प्रशिक्षक म्हणूनही काम केले. या दरम्यानच स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती. इथपर्यंतच्या प्रवासात त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. बाप की कमाई पोरगं उडवतयं, बारावीचे पेपर ज्याला सुटले नाहीत तो काय अधिकारी होणार असे बोचरे वार स्वकियांकडून झेलावे लागले. तरीसुध्दा न डगमगता स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तो धडपडत राहीला.

स्वत:वरील या विश्वासाने त्याने एम.सी.ए. नंतर पुणे गाठले. तेथे 'यशदा' या संस्थेत एक वर्षासाठी प्रशिक्षण घेतले. दरम्यान दोन वेळा पी.एस.आय. च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनसुध्दा शारीरीक परीक्षा देण्याचे टाळले. २०१४ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत ८ गुणांनी उपजिल्हाधिकारी पद हुकले आणि नायब तहसीलदारपदी त्याची निवड झाली. आज या निवडीने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बारावी परीक्षेत अपयश आले म्हणून न थांबता त्याने केलेला हा प्रवास प्रेरणादायी आहे.

बारावीच्या परीक्षेत अपयश आलेला काळ माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या अपयशाने मला बरेच शिकायला आणि पहायला मिळाले. आज मिळालेल्या या यशावर न थांबता पुढे आएएस होण्याचे आपले स्वप्न असून त्यासाठी अभ्यासाला सुरूवात केली आहे.

- अस्लम जमादार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावती कच्ची; मात्र कमाई पक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कामकाजाचे संगणकीकरण झालेले असले, तरी घरफाळ्याची वसुली अजूनही परंपरागत पद्धतीने सुरू आहे. घरफाळ्याची रक्कम भरून घेताना मिळकतधारकांना कच्ची पावती दिली जाते. या पावतीचा पद्धतशीर उपयोग काही कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. कच्ची पावती अनेकांच्या वरकमाईचे पक्के साधन झाले आहे तर अनेकांकडून मिळकतधारकाकडून जमा केलेली रक्कम सवडीने खात्यात भरले जात आहे.

शहरातील घरफाळा आकारणीअंतर्गत महापालिकेकडे दरवर्षी ३३ कोटी रुपयांच्या आसपास कर जमा होतो. यापैकी ६५ ते ७० टक्के म्हणजे जवळपास २२ कोटी रक्कम साध्या पावतीद्वारे (मॅन्युअल पद्धत) जमा होते. घरफाळा विभागाच्या कामकाजाच्या सोयीसाठी घरफाळा आकारणारी आणि वसूल करणारी अशा दोन यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतात. यामध्ये दोन्ही टप्प्यांवर काहींनी कमाई सुरू केली आहे. घरफाळा लागू करतानाही मिळकतीचे मोजमाप, कच्च्या आणि पक्क्या बांधकामाच्या नोंदी करताना तडजोडी केल्या जातात. नव्याने बांधकाम केलेल्या मिळकतीची नोंद व्हावी, यासाठी नागरिक हेलपाटे मारतात, पण कर्मचाऱ्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत त्रुटी दाखवत हेलपाटे मारायला लावणारी यंत्रणा आहे.

घरफाळा विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे बदल्या झालेल्या नाहीत. घरफाळा विभागाकडून वसुली मोहीम राबविताना प्रभागात जाऊन पावती पुस्तकाद्वारे रकम भरून घेतली जाते. मात्र, भरलेली रक्कम कधीच रेकॉर्डवर येत नाही. पावती बिलात एक रक्कम भरून घेतली जाते तर रजिस्टरवर दुसरी रक्कम नोंदवली जाते. पावती पुस्तकावरील बिल मिळकतधारकांना दिले जाते. कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन रजिस्टरवर बिलाची नोंद करतात. या दोन्हींचा कधीच ताळमेळ घातला जात नाही.

पावती बिलावर दहा हजार रुपयांची रक्कम भरून घेतली, तर रजिस्टरवर त्यापेक्षा कमी रक्कम नोंदवली जाते. अनेक मिळकतींमध्ये घरफाळ्याची रक्कम आणि जमा रक्कम यात तफावत आढळते. मिळकतधारकांना पुढील वर्षीचा घरफाळा आल्यावरच हा प्रकार लक्षात येतो. मात्र, अनेकजण पावती जपून ठेवत नाहीत. एखादा नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे आला, तर त्याला पहिल्यांदा पावती बिलाबाबत विचारणा केली जाते. बिल नसेल तर तक्रारीला वावच नाही.

शहरातील मिळकतीवर दृष्टीक्षेप

१,३४,२५५ एकूण मिळकती

१,०८,६२४ रहिवासी

५३२ औद्योगिक

२५,६३१ वाणिज्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images