Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उन्हाच्या झळांनी सोलापूरकरांची दैना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उन्हाच्या झळांनी सोलापूरकरांची पुरती दैना उडाली आहे. उन्हामुळे शहरवासियांना घराबाहेर पडणेसुद्धा मुश्कील झाले आहे. झळांनी वाहनधारकसुद्धा हैराण झाले आहे. एरव्ही वाहनांच्या गर्दीने फूलून जाणारे रस्ते सामसूम दिसत आहेत. बाजारपेठांवरही परिणाम झाला असून, बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. पत्र्यांच्या घरांत राहणाऱ्यांची झोप उडाली आहे. वातानुकूलीत यंत्रणाही कडक उन्हापुढे तोकडी पडत आहे. उन्हाच्या चटक्यांनी सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

उन्हामुळे रस्ते प्रचंड तापले आहेत. वाहनधारकांचे सर्वाधिक हाल होत आहेत. उन्हाच्या झळांमुळे वाहनधारकांना घराबाहेर पडताना तोंडाला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे लागत आहे. दुचाकी वाहन चालविणे तर अधिकच त्रासदायक ठरत आहे.

कडक उन्हाचा परिणाम शहरातील प्रमुख बाजारपेठांवरही झाला आहे. लग्नसराईचे दिवस सुरू असूनही, बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नवी पेठ, मधला मारुती, टिळक चौक, सराफ बाजार, कुंभारवेस, फलटण गल्ली, चाटी गल्ली आदी ठिकाणांच्या दुकानांमध्ये दुपारी कोणीही फिरकताना दिसत नाही.

गर्दीने फुलून जाणारे शहरातील रस्तेही उन्हामुळे ओस पडले आहेत. सात रस्ता, पार्क चौक, भैय्या चौक, विजापूर रोड, होटगी रोड, एसटी स्थानक, पुणानाका, तुळजापूर रोड, मार्केट यार्ड आदी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी पूर्णपणे ओसरली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा कायम असतो. अनेक जणांनी घरामध्ये कुलर तसेच वातानुकूलीत यंत्रणा बसवली आहे. परंतु, यंदाच्या उन्हाळ्याने वातानुकूलीत यंत्रणेलाही हात टेकायला लावले आहेत. उन्हामुळे हवा गरम झाल्यामुळे एसी आणि कुलरमधूनही गरम हवा बाहेर पडू लागली आहे.

जलतरणसाठी गर्दी

उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना वेद लागतात ते पोहण्याचे. ज्याला पोहोता येते तो आणि ज्याला पोहता येत नाही परंतु, शिकण्याची इच्छा आहे, अशी लहान-मोठी मुले जलतरण तलावावर गर्दी करताना दिसत आहेत. वीर सावरकर आणि मार्कंडेय या दोन्ही तलावावर पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिकच्या जाळ्या रोखणार मगरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

कृष्णानदीवरील चार-पाच गावांच्या पाणवठ्यांवर जिल्हा नियोजन मंडळाच्या विशेष निधीतून जास्त काळ ठिकणाऱ्या प्लास्टिकच्या जाळ्या तातडीने बसविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मगरींच्याबाबतीत नागरिकांना दिला मिळेल, अशी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. वन्यजीव तज्ञ्जांशी आणि वनखात्यांशी झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार मगरींचा सध्याचा काळ अंडी घालण्याचा असल्याने त्या नदीकाठी जागा शोधत असतात. पाण्याबाहेर येतात. शिवाय मगरींची संख्याही अधिक असल्याने त्या पकडून अन्य ठिकाणी सोडणे हा उपाय होऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या विशेष निधीतून अधिक काळ टिकणाऱ्या प्लास्टिकच्या जाळ्या घाट आणि पाणवठ्यांच्या ठिकाणी बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे,' असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

कृष्णाकाठच्या गावांचा आंदोलनाचा इशारा

पलूस तालुक्यातील नागठाणे-ब्रम्हनाळ दरम्यानच्या कृष्णा नदीतील मगरी आणि सुसरीचा त्वरीत बंदोबस्त करावा, अन्यथा नदीकाठच्या सर्व गावांना रस्ता रोको, गावबंद, धरणे, मोर्चा यासारख्या आंदोलनांचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा बुधवारी जिल्हा परिषद सदस्य, अनेक गावच्या सरपंचांनी निवेदनाद्वारे केला आहे. गुरुवारी संबधितांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले.

मगरी आणि सुसरींचा उपद्रव वाढला आहे. सुमारे तीस वेळा मगरींने ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यामध्ये दहा जणांचा बळी गेला आहे. महिला, मुले, शेतमजुरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाणवठ्यांच्या ठिकाणी मगरी पाण्याबाहेर येवून हल्ले करीत आहेत. या परिसरात मगरींच्या संख्या चारशेपेक्षा अधिक असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.

आठ लाखांची मदत

मगरीने बळी घेतलेल्या चोपडेवाडीतील अजय शहाजी यादव याच्या वडिलांना बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आठ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी वना अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबधितांना त्वरीत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘NCP च्या सल्ल्याने सहकारमंत्र्यांचे धोरण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या साखर सम्राटांवर कारवाई करण्याऐवजी सहकारमंत्री त्यांच्याच सल्ल्याने घोरण ठरवित आहेत. त्यांच्या सोबत पुण्यात साखर परिषद घेणाऱ्या सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आपले मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रसकडे द्यावे. शेतकऱ्यांना सहकारमंत्र्यांच्या दलालीची गरज नाही,' अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला.

कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ४० सहकारी कारखाने खासगी केले आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले आहे. मात्र, सत्तेवर आलेले नवे सरकार आणि सहकारमंत्री त्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी सहकार परिषद नसून, दरोडेखोरांची परिषद आहे. सरकारचे हे बेगडी रूप जनतेसमोर आणण्यासाठी स्वाभिमानी ३, १० आणि १७ मेरोजी अनुक्रमे सांगली, मंगळवेढा आणि भूम-परंडा येथे शेतकरी वाचवा सहकार वाचवा परिषद होणार आहे, असा इशाराही खोत यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांनी पाणी अडवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'आजपर्यंत सरकारने केवळ आश्वासने दिली. विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरकार उदासीन आहे. राज्यात तीन लाख कुटुंब प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी नवीन मागण्या नाही तर मंजूर केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी ११ जिल्ह्यात बुधवारपासून विविध ठिकाणच्या धरणातील पाणी अडविण्यात आले. सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील उरमोडी धरणावर शेकडो धरणग्रस्तांनी समुहाने जात सरकारचा धिक्कार करत गेटवरच निदर्शन देत ठिय्या मांडला.

आंदोलना बाबत बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, '६ एप्रिलपासून राज्यातील ११ जिल्ह्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, आजअखेर मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अथवा बैठकीलाही बोलावले नाही. आता आमचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करणे अपरिहार्य झाले आहे. म्हणून बुधवारपासून राज्यात विविध ठिकाणी धरणातील पाणी अडवले गेले आहे. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना न अडवता निदर्शन करू दिली. तारळी, उरमोडी, कोयना धरणातील पाणी अडवण्यात आले आहे.'

उजनी धरणावर कार्यकर्ते-पोलिसांत झटापट

पंढरपूरः धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी उजनी धरण ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून पुढील अनर्थ टाळला. राज्यातील दीड लाख धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी गेली अनेक वर्षे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. बुधवारी पाच जिल्ह्यांतील १२ धरणाचा ताबा घेवून धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार सकाळी जवळपास ५०० कार्यकर्ते उजनी धरण परिसरात जमले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धरणावर फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.

या आंदोलकांना उजनी धरणावरील कार्यालयाजवळ रोखण्यात आले. या ठिकाणी आंदोलकांनी तातडीने धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडून धरणाकडे जाण्याचा प्रयत्न सुरू करतच पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रोखले आणि त्यांना ताब्यात घेतले. या वेळी मोठी झटापट झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना अटक करून धारण परिसर मोकळा केला. यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले. या वेळी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करूनही प्रशासनाने आंदोलन हाणून पडल्याने आता पुढच्या वेळी छुप्या पद्धतीने आंदोलन केले जाणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे वेळापत्रक कोलमडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, म‌िरज/सातारा

पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील आदर्की रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी पहाटे साखर वाहून नेणाऱ्या मालगाडीचे १६ डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत मालगाडीच्या डब्यांचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे या मार्गावरील संपूर्ण रेल्वे वाहतूक बुधवारी दिवसभर ठप्प झाली. दुर्घटनाग्रस्त डबे बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. हे काम गुरुवारी दुपारपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या अपघातामुळे मिरज ते पुणे आणि कोल्हापूरपर्यंतची सर्व वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे मिरजेतून कुर्डुवाडीमार्गे गाड्या वळविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

आदर्कीजवळ यापूर्वीही अनेकदा अपघात झाले आहे. येथे असलेला यू टर्न धोकादायक असून त्याबाबत रेल्वे खात्याने उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. बुधवारच्या अपघातामुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड कुचंबणा झाली आहे. ही मालगाडी पुण्याच्या दिशेने निघाली होती. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास आदर्कीजवळ गाडीचे डबे रुळावरून घसरले. अपघाताचे ठिकाण साताऱ्यापासून सुमारे ३५ किमी तर पुण्यापासून शंभार किमीवर आहे.

दुर्घटनेमुळे डब्यांसह रेल्वेमार्गाचेही नुकसान झाले आहे. घसरलेले डबे अस्ताव्यस्त झाल्यामुळे घटनास्थळी भीषण चित्र दिसत होते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. डबे बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मिरज व पुणे येथून महाकाय क्रेन्स घटनास्थळी आल्या असून बुधवारी दिवसभर त्यांचे काम सुरू होते. हे काम अगदी उद्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

रेल्वेमार्गाचेही प्रचंड नुकसान

सांगलीतून आसामकडे साखर घेऊन ही मालगाडी निघाली होती. या अपघातामुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या मार्गावरुन बुधवारी दिवसभर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या कुर्डूवाडी व पंढरपूरमार्गे सोडण्यात आल्या. दोन एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मालगाडीला अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतून अपघात मदतीसाठीची विशेष रेल्वे ५० कर्मचाऱ्यांच्या पथकासह घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली. मिरजमार्गे धावणाऱ्या वास्को- हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, चंढीगड-यशवंतपूर एक्सप्रेस, एलटीटी कुर्ला-हुबळी या रेल्वेगाड्या कुर्डुवाडी, पंढरपूरमार्गे मिरजेला सोडण्यात आल्या. सकाळी साडेदहा वाजता मिरज स्थानकात येणारी गांधीधाम-बेंगळुरु एक्सप्रेस सुमारे सात तास उशिरा पोहोचली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेळोली’मुळे अवैध कारनामे उजेडात

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

शेळोली (ता. भुदरगड) येथे अवैधरित्या सुरु असलेल्या शाडू कारखान्यावर प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी छापा टाकून कारवाई केल्यानंतर तालुक्यात सुरू असलेला अवैध व्यवसाय व त्यांना प्रशासनाकडून मिळणारे अभय हा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला आहे. या धाडसी छाप्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी आता तालुका स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या तालुक्याला आता अवैध व्यावसायिकांची नजर लागली आहे.

भुदरगड तालुका हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात बंद असलेला इंदिरा गांधी साखर कारखाना वगळता मोठा प्रकल्प नाही. त्यामुळे या तालुक्यात प्रदुषणाचे प्रमाण फार कमी आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी या तालुक्यात अनेक लोक स्थायिक होतात. मात्र अलिकडील काळात या तालुक्यात खाण माफिया, वाळू माफिया, जंगलतोड माफिया यांनी पर्यावरणाचा ऱ्हास सुरू केला आहे आणि या साऱ्याकडे सबंधित खाती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मंगळवारी या तालुक्यातील शेळोली येथे अवैधरित्या सुरू असलेल्या शाडू कारखान्यावर प्रांताधिकाऱ्यांनी धाड टाकली त्यावेळी या कारखान्यातील शाडूच्या गोळ्या परदेशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र या गोळ्यांचा वापर कश्यासाठी होतो हे समोर आले नाही. हा कारखाना चालवणाऱ्या मालकांची नावेसुद्धा समोर आली नाहीत. इतकेच नव्हे तर असा कारखाना चालविण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेतल्या आहेत का याविषयीदेखील शंका आहे.

हा कारखाना ऑल्युकेम या नावाने तालुक्यात डोंगराळ भागात मागील सात वर्षांपासून चालविला जातो. या कारखाना परिसरात कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त सामान्य माणसाला फिरूनसुद्धा दिले जात नाही. कामगारांच्यावर सीसीटीव्हीचा वॉच असतो. या कारखान्यात काय तयार होते या विषयी बाहेर माहिती देण्यासदेखील कर्मचाऱ्यांच्यावर बंधने आहेत. त्यामुळे कारखान्यात काय चालते याविषयी परिसरातील नागरिकांना उत्सुकता होती.

याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा सबंधित विभागाकडे तक्रारीसुद्धा केल्या होत्या. पण, कोणत्याही अधिकाऱ्याने मागील सात वर्षात या कारखाना परिसरात पाय ठेवण्याचे सुध्दा धाडस दाखविले नव्हते. मंगळवारी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धाड टाकली आणि चौकशी केली असता या कारखान्याची वार्षिक ५० कोटींची उलाढाल असून या कारखान्यात तयार होणाऱ्या शाडूच्या गोळ्या परदेशात निर्यात होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याचबरोबर या कारखान्याकडे मागण्यात आलेली महसूलसह प्रदूषण मंडळाच्या परवानगीची कागदपत्रेही आढळून आली नाहीत. त्याचबरोबर हा कारखाना शेळोली गावाच्या गायरान जागेतील ३२ गुंठे क्षेत्रात बेकायदेशीर अतिक्रमण करून उभारल्याचे समोर आले आहे.

अवैध धंद्यांचा पर्दाफाश करा

इतकी वर्षे हा कारखाना सुरु असताना पोलिस, महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ यापैकी कोणीच का कारवाई केली नाही, असा प्रश्न आता समोर येत आहे. या कारवाई न करण्यामागील नेमके कारण काय हा मुद्दाही उपस्थित होत आहे. या कारखान्याबरोबरच तालुक्यात बॉक्साईट उत्खनन, नदी पात्रातील वाळू चोरी, जंगलतोड आदींसह तालुक्यातील अनेक अवैध धंद्यांचा पर्दाफाश करण्याची मागणी लोकांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समितीसाठी ७९ हरकती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप यादीवर ७९ हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वात जास्त ५८ हरकती विकास संस्थांमधील यादीवर दाखल झाल्या आहेत. २८ एप्रिल रोजी हरकतीवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊन गुरुवारी (ता.३०) अंतिम निकाल दिला जाणार आहे. निकालानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी राधानगरीच्या प्रांताधिकारी मोनिका सिंग यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. बाजार समितीच्या १९ जागांसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रारुप यादी प्रसिद्ध केली होती. यादीवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (ता.२०) होती. नावात बदल, ठरावांमध्ये बदल अशा आशयाच्या हरकती आहेत. यामध्ये सर्वात जास्त विकास सेवा संस्थांच्या यादीवर हरकती दाखल झाल्या आहेत.

दाखल झालेल्या सर्व हरकतींवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर एक आठवड्याच्या आत अंतिम मतदार प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर सहा ते सात दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. साधारणत: दहा मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी राधानगरीच्या प्रातांधिकारी मोनिका सिंग यांची निवडणूक अधिकारी तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार शिवाजी शिंदे यांची नियुक्ती केली आहे. दोन मे रोजी निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची बैठक झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेतून २६ हजारांची रक्कम हातोहात लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नोटांवरील सिरीयल नंबर चुकीचे असल्याची बतावणी करुन महिलेकडील २६ हजारांची रक्कम हातोहात लंपास करण्यात आली. ही घटना बुधवारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या गावभाग शाखेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सपना उल्हास पुजारी (वय ३३, रा. विठ्ठल मंदिर मागे) यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या गावभाग शाखेतून बुधवारी दुपारी सपना पुजारी यांनी आपल्या खात्यावरील ४९ हजार रुपये काढले. तसेच पतीच्या नावे असलेल्या खात्यावरुन २० हजार रुपये असे मिळून ६९ हजार रुपये काढले. ही रक्कम मोजत असताना त्यांच्या जवळच असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तुमच्याकडील नोटांचे सिरीयल नंबर चुकीचे असून काही फाटक्या नोटाही आहेत असे सांगून पुजारी यांच्याकडील रक्कम काढून घेतली. मोजण्याचा बहाणा करुन या व्यक्तीने त्यातील २६ हजार रुपयांची रक्कम हातोहात लांबवली.

हा प्रकार निदर्शनास येताच पुजारी यांनी आरडाओरड केली. पण तोपर्यंत भामट्याने तेथून पोबारा केला होता. फसवणुकीबाबत पुजारी यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे. इचलकरंजी शहर व परिसरात वारंवार घडणा‍ऱ्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लालफितीत अडकले स्थलांतर

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणात निमशिरगांव (ता.शिरोळ) येथील प्राथमिक शाळा जमीनदोस्त करावी लागणार आहे. अडचण ओळखून शाळेच्या नव्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने जागा दिली. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाचा नकाशा तहसीलदारांकडे सादर न झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून काम रखडले आहे. रस्त्यासाठी शाळेची इमारत पाडल्यास जून महिन्यात विद्यार्थ्यांना बसवायचे कोठे असा प्रश्न निर्माण होणार आहे.

जयसिंगपूर शहरात कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणास विरोध झाल्याने सरकारने जयसिंगपूर शहरातून दुपदरी तर तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, जयसिंगपूर रेल्वेस्थानक, अंकली टोल नाका हा रस्ता दुपदरी करण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम इन्फ्रास्ट्र्क्चर कंपनीकडून या रस्त्याचे काम सध्या संथगतीने सुरू आहे. निमशिरगांव येथे कुमार व कन्या विद्यामंदिर ही शाळा रस्त्यात येत असल्याने जमीनदोस्त करावी लागणार आहे. या इमारती कमकुवत झाल्याने कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांना धोका आहे. रस्त्यात येत असल्याने शाळा व्यवस्थापनास या इमारतींची दुरूस्तीही करता येत नाही अशी स्थिती आहे.

सहा महिन्यांपूर्वी या शाळेच्या नव्या इमारतीसाठी ग्रामपंचायतीने एक हेक्टर जागा दिली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील जागेची मोजणी करून प्रस्तावही पाठविण्यात आला. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाने अद्याप तहसीलदार सचिन गिरी यांच्याकडे नकाशा सादर केलेला नाही. परिणामी शाळेच्या नव्या इमारतीचे काम रखडले आहे.

रस्त्याच्या कामासाठी इमारत पाडल्यास जून महिन्यात शाळेचे वर्ग घ्यायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. रस्त्याचे काम सुरू होऊन अडीच वर्षे झाली मग शाळेच्या नव्या इमारतीबाबत का निर्णय घेतला नाही असा सवालही करण्यात येत आहे. याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे.

ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत

चौपदरीकरणासाठी निमशिरगांवच्या शेतकऱ्यांनी मुरूम दिला. त्याऐवजी माती देण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली होती. मात्र शेतकऱ्यांना अद्याप माती मिळाली नाही की नुकसान भरपाई मिळाली नाही. रस्त्याचे काम रेंगाळत असून धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. शाळा इमारत बांधकामाकडेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामस्थ प्रसंगी रस्त्याचे काम रोखण्याच्या तयारीत आहेत.

वारंवार पाठपुरावा करूनही शाळेचे काम रखडले आहे. सरपंच सुनीता पाटील, पं. स.सदस्य सर्जेराव शिंदे यांच्यासमवेत तहसीलदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अद्याप आपल्याकडे नकाशाच आला नसल्याचे सांगितले. तर भूमिअभिलेख कार्यालयाने चार दिवसांत नकाशा देऊ, असे सांगितले आहे.

- अजित सुतार, माजी पं. स.सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोते, धामोडमध्ये मूर्तींची विटंबना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यातील कोते व धामोड येथे मंगळवारी (ता. २१) मध्यरात्री अज्ञात समाजकंटकानी मूर्तींची विटंबना केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. अज्ञातांनी मंदिरांची कुलपे तोडून मूर्तींची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने या घटनेविषयी तालुक्याच्या जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोते येथे पुरातन मंदिर असून मंदिरातील मूर्ती अत्यंत दुर्मिळ व प्राचीन आहेत. गावात मंगळवारी रात्री वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने पहाटे तीनपर्यंत भजनाचा कार्यक्रम सुरु होता. मात्र अज्ञाताने त्यानंतर मंदिरात प्रवेश करून मूर्तींची मोडतोड केली. मुर्तींचे अवयव तोडून आजूबाजूला फेकून दिले. तर असाच प्रकार धामोड येथील मूर्ती बाबतही झाला आहे. बुधवारी सकाळी मंदिराच्या मार्गावरून कॉलेजला जाणाऱ्या काही तरुणांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी गावकऱ्यांना याची कल्पना दिली. त्यामुळे मंदिरासमोर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात एकत्र झाले. हळूहळू घटनेचे वृत्त समजताच नजीकच्या गावातील ग्रामस्थही अधिक संख्येने जमा झाल्याने दोन्ही गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंधरा दिवसांपूर्वी जवळच असलेल्या तुळसी धरणावर मूर्तीची अशीच विटंबना झाली होती. त्यावेळी पोलिसांनी या घटनेचा योग्य तपास न केल्यानेच अशा घटना घडत आहेत, असा आरोप करीत उपस्थितांनी पोलिसांच्यावर आपला रोष व्यक्त केला. श्वानपथकालाही अज्ञातांचा मार्ग सापडला नाही. दुपारनंतर दोन्ही गावात विविध हिंदुत्ववादी संघटना व वारकरी मंडळी जमा झाल्याने तणाव अधिकच वाढत गेला. पोलिस उपअधीक्षक के. बी. गवळी यांनी मोठ्या फौजफाट्यासह दोन्ही गावांना भेट दिली. तर पोलिस निरीक्षक अनिल गाडे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी ठाण मांडून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रान्सिस लोबोचे ‘यूपीएससी’त लख्ख यश

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेत नागाळा पार्क, कोल्हापूर येथील फ्रान्सिस लोबो यांनी सुधारित यादीत स्थान पटकावले. जून २०१४ मध्ये अवघ्या सात गुणांच्या अंतराने कटऑप लिस्टमधून बाहेर पडलेल्या फ्रान्सिस यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या यादीत स्थान पटकावून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विशेष म्हणेज सीआयएफएस (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) परीक्षेतही उत्तीर्ण होत त्यांची असिस्टंट कमांडरपदी नियुक्ती झाली आहे. दुसऱ्याच प्रयत्नात मिळवलेल्या दुहेरी यशामुळे लोबो कुटुंबीय आनंदीत झाले आहे.

फ्रान्सिस यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट झेवियर्समध्ये, तर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशची केआयटी कॉलेजमधून पदवी मिळवली. २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. याचवेळी ते केंद्रीय पातळीवरील सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, मेडिकल अनफीटमुळे संधी थोडक्यात हुकली. आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करण्यास सुरुवात केली. दिल्ली येथे वर्षभर अभ्यास केल्यानंतर कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल झाले. दररोज सरासरी बारा तास अभ्यास करत त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवायचेच असा निश्चयच केला.

मे २०१३ मध्ये १२२८ जागांसाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. पूर्व व डिसेंबरमधील मुख्य परीक्षेतून ते मुलाखतीसाठी पात्र ठरले. मुलाखतीनंतर आयोगाने जून २०१४ मध्ये अंतिम निकाल प्रसिद्ध केला. ७७५ गुणांवर कटऑप लिस्टवर ११२२ जागांची यादी जाहीर केली. यामध्ये फ्रान्सिसना ७६८ गुण मिळाल्याने मुख्य यादीत निवड होण्यासाठी केवळ सात गुण कमी पडले. निराश न होता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली असतानाच यूपीएससीने शुक्रवारी सुधारित १०५ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात फ्रान्सिस यांनी स्थान पटकावले. यूपीएससीच्या नवीन यादीनुसार त्यांना कोणत्या पदावर नियुक्ती होणार हे जूनमध्ये स्पष्ट होणार आहे.

केंद्रीय सेवेत रुजू होण्यासाठी कठोर प्रयत्न केले. मात्र, सलग दोनवेळा अपयश आल्याने निराश झालो. मात्र, त्याचवेळी सीआयएफएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आशा निर्माण झाली होती. सुधारित यादी प्रसिद्ध होऊन यश मिळाल्याने केंद्रीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

- फ्रान्सिस लोबो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅनेलसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकत्रित पॅनेल देण्याच्या प्रयत्नांना गती आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मुश्रीफ यांनी काँग्रेसचे नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह राजेंद्र पाटील-यड्रावकर, अरुण इंगवले, आदी उपस्थित होते.

यासंदर्भात मुश्रीफ गुरुवारी दुपारी पुन्हा पी. एन. पाटील आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुश्रीफ माजी मंत्री विनय कोरे आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करतील.

पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'केडीसीसी बँकेत सर्वांना एकत्र घेऊन पॅनेल देण्याचा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव पी. एन. पाटील यांना दिला असून त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. जिल्हा दूध संघाची (गोकुळ) आणि केडीसीसीची तुलना करता येणार नाही. गोकुळमध्ये शेतकऱ्यांकडून घेतलेल्या दुधावर प्रकिया केली जाते, पण केडीसीसीमध्ये ठेवीदारांनी ठेवी ठेवणे आवश्यक आहे. जर आम्ही आपासात भांडत बसलो तर त्याचा परिणाम बँकेवर होईल. सध्या बँकेची स्थिती चांगली नाही, त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने बँक चालवणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून एकत्रित पॅनेल देण्याचा प्रयत्न आहे.'

बुधवारी मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्याशी चर्चा केली. घाटगे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांच्या गटासाठी ते उमेदवारी मागू शकतात. आमदार सत्यजित पाटील हे मानसिंगराव गायकवाड यांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची सॅम्पल तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनासाठी रस्त्यांच्या सर्व्हेला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तीन रस्त्यांची मोजमापे घेण्यात आली. रस्त्याची लांबी, रुंदी मोजतानाच काही ठिकाणचे मटेरियलही तपासणीसाठी घेण्यात आले. नोबेल इंटरेस्टस कन्सल्टिंग इंजिनीअर्स या कंपनीमार्फत तीस दिवसांत सर्व्हे पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व्हेदरम्यान पहिल्याच दिवशी रस्त्याची अपुरी कामे, फूटपाथचा अभाव हे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्व्हेला सुरुवात करताना महापालिकेचे आयुक्त व शहर अभियंत्यांशी चर्चा केली.

समितीला अहवाल देणार

करारानुसार कामे झाली आहेत की नाही, प्रत्यक्षात झालेली कामे, अपुरी कामे, फूटपाथ, युटिलिटी शिफ्टिंग अशा विविध घटकांचा सर्व्हे होणार आहे. रस्ते प्रकल्पाच्या कामाचा सर्व्हे करतानाच मूल्यांकनही निश्चित केले जाणार आहे. नोबेल कंपनीने तीस दिवसांत हे काम पूर्ण करावयाचे आहे. यासंबंधीचा अहवाल एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे सुपूर्द केला जाणार आहे.

तीन रस्त्यांवर काम सुरू

'नोबेल...'च्या प्रतिनिधींनी बुधवारी दुपारनंतर शहरातील प्रमुख तीन रस्त्यांवर सर्व्हेचे काम केले. यामध्ये शिये फाटा ते जिल्हा पोलिस अ​धीक्षक कार्यालय चौक, तावडे हॉटेल ते शिवाजी पूल, शाहू जकात नाका ते रेल्वे उड्डाण पूल या मार्गावर सर्व्हे केला. रस्त्यांची लांबी, रूंदी अशी मोजमाप घेतली जात आहेत. तसेच रस्ता डांबरीकरणाचा आहे की सिमेंटचा हे तपासले जात आहे. रस्ता तयार करताना वापरण्यात आलेल्या मटेरियलचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

सर्व्हेसाठी चार पथके

आयआरबी कंपनीने शहरात सुमारे ४९ किलोमीटर लांबीचे १३ रस्ते तयार केले आहेत. आयआरबीची रस्त्याची कामे आणि टोल वसुलीच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात रस्ते प्रकल्पाचे फेरमूल्यांकन करण्यात येईल असे घोषित केले होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. रस्त्याचे प्रत्यक्ष सर्व्हे आणि मूल्यांकन ठरविण्याचे काम निविदा प्रक्रियेद्वारे पुणे येथील नोबेल इंटरेस्टस कन्सल्टिंग इंजिनीअर्स कंपनीकडे सोपविले आहे. कंपनीने बुधवारपासून सर्व्हेला सुरुवात केली. सर्व्हे करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती केली आहे. एका पथकात दोघांचा समावेश आहे. दोन दिवसांनंतर आणखी चौघांचा यामध्ये सहभागी होणार आहे.

अधिकारी, समिती सदस्यांचे सहकार्य

कंपनीला सर्व्हे दरम्यान महापालिकेचे अभियंता व कनिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. एमएसआरडीचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीतील सदस्यही कंपनीला मदत करणार आहेत. आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स असोसिएशनचे पदाधिकारी आ​णि समिती सदस्य राजेंद्र सावंत हेसुद्धा सर्व्हेच्या कामावर लक्ष ठेवताना संबंधित प्रतिनिधींना याकामी सहकार्य करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचे हायटेक ग्रंथालय

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाळासाहेब ग. खर्डेकर ग्रंथालय म्हणजे नव्या जुन्या पुस्तकांचा खजिना. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजतागायत या ग्रंथालयाने अनेक पिढ्यांची ज्ञानाची भूक भागविली आहे. आता काळाबरोबर बदलण्याचे आव्हान स्वीकारत शिवाजी विद्यापीठाने ग्रंथालय हायटेक केले आहे. तसेच, नवीन अभ्यासिकेची क्षमता वाढवल्याने ८०० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. हायटेक ग्रंथालयाला नूतन अभ्यासिकेची जोड मिळाल्याने वाचकांचा टक्का आणखीनच वाढणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीही दुप्पट जागा झाल्या असून, दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ हाेणार आहे.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात बी. टेकसह अन्य विनाअनुदानित कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नूतन इमारतीतही विद्यार्थ्यांसाठी हायटेक सुविधा दिल्या जाणार आहेत. इको ट्यूब, फॅन आणि लॅपटॉप चार्जिंगची सोय उपलब्ध आहे. वायफाय यंत्रणाही कार्यन्वित राहणार आहे. ई-बुक्स, ई डेटा बेस, ई जर्नल अॅक्सेसचा फायदा घेता येणार आहे. ई बुक रिडिंगची वेगळी सोय असून, दहा कंम्प्युटरवर ई बुक लोड केले जाणार आहे. सध्या विद्यापीठाच्या आवारातील प्लेनमध्ये २००, मुख्य ग्रंथालयाच्या इमारतीत ६००, पिरिऑडिकल विभागात ५०, संदर्भ ग्रंथांसाठी ५० आणि टेरेस रिडिंगमध्ये १५० विद्यार्थ्यांची सोय आहे. नूतन इमारतीत ८०० विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध होणार असल्याने सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा लाभ होणार आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. अभ्यासिका पहाटे सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत खुली राहणार आहे. सुवर्णमहोत्सव योजनेतील निधी, विकास निधी आणि इतर निधीतून सुमारे सहा कोटी रुपये खर्चून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राज्यपाल सी. व्ही. राव यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्‍घाटन होत आहे.

शिवाजी विद्यापीठाने सतत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. नूतन अभ्यासिकेत हायटेक व्यवस्थेमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ होईल.

- डॉ. नमिता खोत, ग्रंथपाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’साठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) १८ जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. यासाठी दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनीही सहलीवर पाठविलेल्या ठरावधारकांना शहरातील विविध ठिकाणी एकत्रित आणले आहे. गुरुवारी सकाळी सर्वांना एकत्रितपणे मतदानासाठी सेंट झेविअर हायस्कूल येथे आणण्यात येणार आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी पाचदरम्यान मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजाराम कारखान्यानंतर आता 'गोकुळ'​च्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

'गोकुळ'च्या १८ जागांसाठी ३,२६३ मतदार मतदान करणार आहेत. एक मतदाराला १८ मते देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी सेंट झेवियर येथे दहा मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सात कर्मचारी असे ७० कर्मचारी आणि दहा पोलिस कर्मचारी असे एकूण ८० कर्मचारी कार्यरत असणार आहे. 'गोकुळ'साठी निवडणूक अधिकारी म्हणून अशोक पाटील तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अरुण चौगुले, विकास भालेराव, सुनील धायगुडे काम पाहत आहेत.

शुक्रवारी मतमोजणी

शुक्रवारी सकाळी सात वाजता सिंचन भवन येथे मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत सर्व गटांचा निकाल जाहीर होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील म्हणाले.

'गोकुळ' मध्येही राजाराम कारखान्याप्रमाणे आमचेच पॅनेल निवडून येईल, असा विश्वास आहे.

- महादेवराव महाडिक, नेते, राजर्षी शाहू पॅनेल

'गोकुळ'ला परिवर्तनच चांगले भवितव्य देऊ शकते. त्यामुळे मतदार विश्वासाने 'गोकुळ' आमच्याकडे सोपवतील.

- सतेज पाटील, नेते, राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टक्केवारीसाठी पगार थांबवला

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

पगारातील सहा टक्के रक्कमेसाठी कागल तालुक्यातील शेंडूर येथील संस्थाचालकाने २८ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यापासून ८० लाख रुपयांच्यावर पगार थांबवला आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीतील फरकाची रक्कमही १० ते १२ वर्षे ५० टक्के पाहीजेच्या नावाखाली थांबवली आहे. याला नकार दिला म्हणून काहीही कारण काढून शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापकांनी राजीनामा दिला असून शिक्षणाधिकारी संस्थेवर प्रशासक आणण्याच्या तयारीत आहेत.

शेंडूरमध्ये मानव शिक्षण प्रसारक मंडळाची १९८६ साली स्थापना झाली. मानव हायस्कूल शेंडूर आणि कांडगाव हायस्कूल कांडगाव (ता.करवीर) अशा त्यांच्या शाखा आहेत. २००५ पासून शिक्षकांना पगारातील रकमेसाठी वेठीस धरुन चार सहा महिन्यांनी पगार काढणे,वारंवार मेमो काढणे, मेडिकलची बले थांबविणे, दीर्घ मुदतीच्या रजा थांबवणे आणि मानसिक खच्चीकरण करणे असे प्रकार केल्याचे शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी मांडले आहे.

बाबासो गायकवाड या शिक्षकाचे मे २००९ ते जुलै २०१० अशा १४ महिन्यांचे 'मस्टर' थांबविले आहे. परंतु तत्कालिन शिक्षण अधिकाऱ्यांमुळे पुन्हा सह्या घेण्यात आल्या. या सगळ्याला वैतागून मुख्याध्यापक संभाजी बापू पाटील यांनी २४ मार्च रोजी राजीनामा दिला तर त्यांना आर्थिक बाबी वगळून कामकाज करण्याचे पत्र देवून घरातून सह्या केल्या जात आहेत. संस्थाध्यक्ष मारुती वडगांवकर म्हणाले, 'ऑनलाईन व ऑफलाईन यादी फायनल होण्यास अजून महिना लागेल म्हणूनच पगार थांबवण्यात आला आहे. मी कुणाच्याही पगारातील सहा टक्के रक्कम मागितलेली नाही. येत्या आठ दिवसात ज्येष्ठ शिक्षकाला चार्ज घ्यायला लावून शिक्षकांचा पगार काढण्याची व्यवस्था केली जाईल.'

पगार थांबण्याचे कारण चुकीचे

सरकारच्या नवीन धोरणानुसार शाळेतील पाच शिपाई, एक लिपिक आणि एक डी.एड. शिक्षक अतिरिक्त झाला आहे. परंतु शिक्षक वगळता इतर सहाजण पै पाहुण्यातले असल्याने अद्याप शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगूनही ऑनलाईन व ऑफलाईन यादी पाठवण्यात आलेली नाही. पगार थांबण्याचे हे कारण सांगितले जात असले तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी या कारणाचा इन्कार केला आहे.

मुख्याध्यापक नसतील आणि उपलब्ध शिक्षकातील एखाद्या ज्येष्ठ शिक्षकाने जबाबदारी घेतल्यास आम्ही त्यांच्या सहीने सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याची व्यवस्था करु. परंतु संस्था व्यवस्थापन सक्षम नसेल तर संस्थेवर प्रशासक नेमण्यात येईल.

- ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोस्टर’ बॉईजवर कारवाईची गरज

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

कोणताही सण असो उत्सव. एखाद्याचा वाढदिवस असो वा अभिनंदन. त्यासाठी मोठ्या संख्येने फ्लेक्स उभारले जात आहेत. फ्लेक्सवर आपली प्रतिमा झळकाविण्याची सवय राजकारण्यांपासून गल्लीबोळातील तरुणांपर्यंत सर्वांना लागली आहे; पण या पोस्टर्समुळे वादावादीचे प्रसंग वाढले आहेत. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी सदरबाजारमध्ये राष्ट्रपुरुषाच्या फलकाच्या विटंबनेच्या कथित प्रकारानंतर हुल्लडबाजांनी शहराला वेठीला धरले होते. बस, बँका, हॉटेल्सवर दगडफेक करण्यात आली. शहराच्या आर्थिक व्यवहारावर काही काळ परिणामही झाला. दुसऱ्या दिवशी फलकाची विटंबना प्रेमप्रकरणातून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी, शनिवारी रात्री पुन्हा राष्ट्रपुरुषाच्या जयंतीचा फलक लावण्यावरून बागल चौकात पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी फलकांवर आक्षेप घेऊन परवानगी घेण्याचा आग्रह धरला. त्यातून झालेला वाद नंतर मिटविण्यात आला. फ्लेक्स किंवा डिजिटल बोर्ड लावण्याच्या हौसेतून कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली आहे.

फलक उभारण्यात राजकीय नेते आघाडीवर असतात. त्यापाठोपाठ कॉलेजच्या तरुणांचा, गल्लोगल्लीच्या मंडळांचा क्रमांक लागतो. शहरात नगरसेवक, कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी फलक उभारतात. यातही ईर्षा असते. एका गटाने वीस फलक लावले की, त्याचे विरोधक २५ फलक लावतात. फलकांवर कार्यकर्त्यांचेही फोटो लावले जातात.

डिजिटल फलक उभारणीसाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, परवानगीकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यांवर फलक उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आहे. इस्टेट विभागाकडून फलकांसाठी प्रती स्क्वेअरफूट भाडे आकारले जाते. मात्र, नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या दबावापोटी इस्टेट विभागाकडून भाडे आकारणीस दुर्लक्ष केले जाते. मात्र, अशा फलकांनी शहराचे सौंदर्य बिघडत आहे. कायदा व सुव्यवस्थेवरही ताण पडत आहे. विरोधकांकडून फलक फाडणे, फलकांवर घाण फेकणे असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त उभारलेल्या फलकावर नेते, कार्यकर्त्यांचे फोटो मोठे असे चित्र दिसते. राष्ट्रपुरुषांच्या फलकाची विटंबना झाल्यावर फलक उभारणारेच हुल्लडबाजी करायला पुढे येतात. त्याचा फटका सर्वसान्यांना बसतो. फलकांवरून वाद किंवा दंगलीचे प्रकार धुळे, मिरज येथे घडले आहेत. त्यानंतर फलक लावताना पोलिसांची परवानगीची बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, आता त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सहा महिन्यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सध्या फलकांची संख्या वाढू लागली आहे. मध्यंतरी उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी बेकायदेशीर फलकांविरोधात मोहीम हाती घेतली होती. नंतर ती थंडावली. आता अशा मोहिमेची पुन्हा गरज आहे.

नियम काय आहे...

विनापरवाना डिजिटल फलक लावलेले आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५अंतर्गत तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, अशा प्रकारच्या नियमाचे पाठबळ असूनही महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची स्थिती आहे.

रस्ता हा महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या मालकीचा असतो. त्यामध्ये रस्त्यावर फलकाला परवानगी देण्याची जबाबदारी त्या-त्या लोकल बॉडीची असते. मात्र एखादा फलक आक्षेपार्ह असेल तर पोलिस त्यावर नक्कीच कारवाई करतील.

- अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

कायमस्वरूपी होर्डिंग्ज, फलकांसाठी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस, पोलिस प्रशासनाचा अहवाल आल्यानंतर परवानगी दिली जाते. वाढदिवस, जयंती, अभिनंदनाच्या फलकांना तात्पुरती परवानगी दिली जाते. मात्र, अशा तात्पुरत्या परवानगीसाठी येणाऱ्या अर्जांचे प्रमाण कमी आहे.

- मीरा नगिने, इस्टेट ऑफिसर, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएडच्या गोंधळाचा धडा सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत मंगळवारी झालेला घोळ पुन्हा बुधवारी झालेल्या बीएडच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेत झाला. बुधवारीही माध्यमिक शिक्षण या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या भागाची छपाई झालेली नाही. टंकलेखन करुन पुन्हा एकदा ई-मेलद्वारे केंद्राने प्रश्नपत्रिका पाठविल्या.

बीएडच्या परीक्षेत मंगळवारी हाताने लिहून प्रश्नपत्रिका केंद्राना पाठविल्या. बुधवारी रिपीटर विद्यार्थ्यांचा बीएडच्या माध्यमिक शिक्षण विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यानंतरही प्रश्नपत्रिकेचा एकच भाग छपाई केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी काही केंद्रावरील परीक्षकांनी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी परीक्षा भवनच्या यंत्रणेकडून टंकलेखन करून ई-मेलद्वारे परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. साडेअकराच्या सुमारास केंद्रावर प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्यामुळे अर्धा तास विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. सलग दुसऱ्या दिवशी प्रश्नपत्रिकेचा गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे परीक्षा विभागाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

खुलासा मागिवला

मंगळवारी बीएडच्या प्रश्नपत्रिकेचा एकच भाग छपाई झाल्याने परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी संबंधित घटकांकडून अहवाल मागविला आहे. परीक्षा विभागाचे कर्मचारी आणि पेपर सेट करणाऱ्या परीक्षकांकडून खुलासा मागविला आहे. तो दोन दिवसांत प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजाराम’ची वीज तोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी महावितरणने बुधवारी राजाराम सहकारी साखर कारखान्यासह इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सची वीज तोडली. पाण्यानंतर वीज कनेक्शनही तोडल्याने या सर्वांचे उत्पादन ठप्प होणार आहे. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश येत नाहीत तोपर्यंत वीज जोडली जाणार नाही. दरम्यान, राजाराम कारखान्याचे अधिकारी गुरुवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबालगन यांची भेट घेणार आहेत.

विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना पंचगंगा प्रदूषणाची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईची माहिती घेतल्यानंतर प्रस्ताव अनबालगन यांच्याकडे पाठवल्याचे समजले. त्यानुसार चोक्कलिंगम यांनी थेट चर्चा केल्यानंतर त्याच सायंकाळी राजाराम कारखान्यासह नऊ प्रोसेसर्सचे वीज व पाणी कनेक्शन तोडून उत्पादन बंद करण्याची नोटीस लागू केली होती. सोमवारी पाणी कनेक्शन तोडले होते. पण वीज तोडण्यासाठी २४ तासांची मुदत द्यावी लागते. त्यानंतर नोटिशीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी दुपारी कारवाई करण्यात आली.

कारखान्याचे उत्पादन ३० मार्चपासून बंद आहे. त्यामुळे सांडपाणी नदीमध्ये मिसळण्याचा प्रश्नच येत नाही. याप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांची गुरुवारी भेट घेण्यात येणार आहे.

- पी. जी. मेढे, सल्लागार व माजी कार्यकारी संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांना फेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आदर्की स्टेशनजवळ बुधवारी पहाटे मालगाडी घसरल्याने बुधवारी कोल्हापुरातून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात येणार असल्याने अनेक प्रवाशांनी पुण्यापर्यंतचा प्रवास एसटी तसेच खासगी वाहनांमधून केला. मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे कुर्डूवाडी, दौंडमार्गे पुण्याला सोडण्यात आल्या.

साखर घेऊन जाणाऱ्या ४२ वॅगन्सच्या मालगाडीचे १६ वॅगन्स घसरल्या. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने मिरजेकडे व कोल्हापूरकडे येणाऱ्या तसेच कोल्हापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. तसेच, काही अन्य मार्गांवरून वळवण्यात आल्या. सकाळी सुटणारी कोयना तसेच दुपारी सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आले. कोयना एक्स्प्रेसच्या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देण्यात आले. तर, ऑनलाइन आरक्षण केलेल्या प्रवाशांच्या खात्यावर ते पैसे जमा करण्यात आले. गोंदियाहून कोल्हापूरला येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यात थांबवण्यात आली होती. तिथूनच ती परत सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे अनेक प्रवाशी एसटी तसेच खासगी वाहनातून पुण्यापर्यंत गेले.

पुण्याकडून मिरजेकडे येणाऱ्या दादर त्रिनेवेल्ली एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, धनबाद कोल्हापूर एक्स्प्रेस या रेल्वे दौंड, कुर्डूवाडीमार्गे मिरज तसेच कोल्हापूरला सोडण्यात आल्या. बुधवारी रात्री कोल्हापुरातून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेसही मिरज, कुर्डूवाडी, दौंडमार्गे पुणे व तिथून मुंबईला सोडण्यात आल्या.

आज दुपारपर्यंत काम पूर्ण

दुर्घटनाग्रस्त डबे बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम गुरुवारी दुपारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथे असलेला यू टर्न धोकादायक असून त्याबाबत रेल्वे खात्याने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images