Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

५४ बागांसाठी २० लाखांचीच तरतूद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतर्फे दरवर्षी शहरातील ५४ बागांसाठी केवळ २० लाख रुपयांची तरतूद केली जाते. या तुटपुंज्या तरतुदीमुळे बहुतांश बागा बकाल बनल्या असून, या बागांमधील दुर्मिळ वृक्षसंपदेचीही हेळसांड होत आहे.

या उद्यानांची नियमित देखभाल करून वृक्षसंपदेचे जतन केल्यास ती नागरिकांचे आकर्षण ठरतील. मात्र, प्रशासनाच्या स्तरावर त्याबाबत गांभीर्य दिसत नाही. रंकाळा चौपाटी उद्यान, संध्यामठासमोरील पद्माराजे उद्यान, पंचगंगा घाटावरील पिकनिक पॉइंट ही उद्याने पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतात. प्रशस्त परिसर, विविध प्रकारची झाडी, पक्षी वैभव यामुळे रंकाळा चौपाटी आणि पद्माराजे उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा, कारंजा, मिनी ट्रेन अशा बाबी तेथे असल्या तर निश्चितच गर्दी वाढेल. माफक फी आकारल्यास उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च वसूल होईल. मात्र महापालिकेने उद्यान विभागातील कर्मचारी अन्य खात्यांकडे वळविले आहेत. अपुरा निधी दिल्याने अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. रंकाळा चौपाटी, पदपथ उद्यानाची अवस्थाही बिकट आहे. हुतात्मा गार्डनचा मोठा परिसर असूनही त्याकडे दुर्लक्ष आहे.

स्थानिक नगरसेवकांचा पुढाकार

महापालिका प्रशासनाने हात आखडता गेल्यामुळे उद्यानांची दुरवस्था होत असताना स्थानिक नगरसेवक, नागरिकांनी एकत्र येत परिसरातील उद्याने फुलवली आहेत. सिद्धाळा गार्डन, सम्राटनगर, फुलेवाडी, ताराराणी गार्डन, नाना नानी पार्क, पिकनिक पॉइंट, शाहूपुरीत नव्याने विकसित होत असलेले उद्यान ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकामांना येणार अच्छे दिन

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

गेल्या महिनाभरात सिमेंटचे दर पोत्यामागे तब्बल शंभर ते एकशे वीस रुपयांनी आणि वाळूच्या ट्रकचे दर तब्बल दहा हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे गेले काही महिने बंद पडलेली कोल्हापुरातील चार ह​जारांहून अधिक बांधकामे पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येण्याची शक्यता आहे.

सहा महिन्यांपूर्वी सिमेंटचे दर साधारण पोत्याला २५० ते २७० रुपये होते. डिसेंबरमध्ये हा दर ३५० रुपयांपर्यंत पोहोचला. तो नंतर ४५० रुपयांवर गेला. दुपटीपेक्षा जादा दर वाढल्याने बांधकाम व्यावसायिकांसह किरकोळ बांधकामे करीत असलेले नागरिक हवालदिल झाले. अनेकांनी बांधकामांचे नियोजन पुढे ढकलले. ज्यांची बांधकामे सुरू होती, तीही अनेकांनी थांबवली. सिमेंटबरोबरच वाळूचे दरही या काळात गगनाला भिडले. सहा महिन्यांपूर्वी वाळूच्या एका ट्रकचा दर १४ ते १५ हजार रुपये होता. तो नंतर २० हजार रुपयांपर्यंत गेला. गेल्या दोन महिन्यात तर हा दर २४ ते २५ हजार रुपयांपर्यंत गेला. जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा लिलाव न काढल्याने वाळू मिळेना. त्यामुळे एवढी रक्कम मोजूनही वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामावर त्याचा विपरीत परिणाम झाला.

सध्या ४५० रुपयांवरून सिमेंटचे दर पोत्यामागे ३०० रुपये असे कमी झाले आहेत. वाळूचे दर नऊ ते दहा हजार रुपयांनी कमी झाले आहेत. एक ट्रक वाळू आता १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

सिमेंट आणि वाळूचे दर प्रचंड वाढल्याने गेल्या तीन-चार महिन्यांत बांधकाम व्यावसायावर मोठा परिणाम झाला होता. आता दर कमी झाल्याने पुन्हा एकदा नव्याने बांधकामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- राजीव पारीख, उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणाचा शिरोळकरांना धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कोल्हापूर येथील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असून नदीतील मासे व अन्य जलचर प्राणी मृत होत आहेत. परिणामी शिरोळकरांच्या आरोग्यास धोका वाढला आहे. पाटबंधारे विभागाकडून शिरोळ तालुक्यातील तेरवाड तसेच राजापूर बंधाऱ्यास बरगे घालण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील उद्योगांचे सांडपाणीही मिसळत असल्याने पंचगंगेतील पाण्याला काळसर रंग आला आहे. इचलकरंजीपासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात जलपर्णी पसरली आहे. प्रदूषणामुळे मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत. नदी प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका वाढला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काही दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र, कोल्हापूर येथून सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडण्यात येत असल्याने पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यास पुन्हा बरगे घातले आहेत. यामुळे शिरोळ तालुक्यातील नांदणी, धरणगुत्ती, टाकवडे, शिरदवाड, शिरढोण, शिरोळ या गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे नदी परिसरात मोठी दुर्गंधी असून पंचगंगेचे पाणी जनावरेही पित नाहीत अशी स्थिती आहे. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने बुधवारपासून शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यास बरगे घालण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले. शनिवारपर्यंत हे काम पूर्ण होईल असे कर्मचाऱ्यानी सांगितले. शुक्रवारी येथील पाण्याची पातळी सात फूट इतकी होती.

नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी हवे. मात्र, कोल्हापूर व इचलकरंजी पालिकेकडून पंचगंगेचे प्रदूषण टाळण्यासाठी योग्य उपाययोजना होत नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळही गांधारीची भूमिका घेते. यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल.

-विश्वास बालिघाटे, स्वाभिमानी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५६ कोटींची विक्रीकरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विभागीय विक्रीकर कार्यालयाने गेल्यावर्षाच्या तुलनेत १५६ कोटी रुपयांचा जादा विक्रीकर गोळा केला आहे. मात्र, कार्यालयाला दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ६१ कोटी ९१ लाख विक्रीकर जमा करता आलेला नाही. कोल्हापूर जिल्ह्याने मात्र उद्दिष्टापेक्षा १८ कोटी रुपयांचा जादा विक्रीकर जमा केला असून सांगली, सातारा, रत्नागिरी व सिधुदुर्ग हे जिल्हे उद्दिष्ट गाठण्यात कमी पडले आहे.

कोल्हापुरातील विभागीय विक्रीकर कार्यालयाच्या कक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या कार्यालयातून महाराष्ट्र व्हॅट, सेंट्रल सेल्स टॅक्स, ऊस खरेदी कर, व्यवसाय कर, सेवा कर अशा विविध करांची वसुली, नियमनाचे कामकाज चालते. विभागीय कार्यालयाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात विक्रीकराचे १७९० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात १७२२ कोटी रुपये जमा झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १९४१ कोटी रुपये विक्रीकर जमा करण्याचे मोठे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ३१ मार्चअखेर १८७९ कोटी रुपये विक्रीकर जमा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ८५३ कोटी ३५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. कोल्हापूर जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा १८ कोटी रुपये अधिक विक्रीकर जमा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ८७१ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहे.

सांगली जिल्ह्याला ४६० कोटी ३९ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ४०८ कोटी ६६ लाख रुपये विक्रीकर जमा झाला आहे. उद्दिष्टांपेक्षा ५१ कोटी ७३ लाख रुपये कमी जमा झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उतरल्याने राज्य सरकारने ऊस खरेदी कर माफ केला. त्यामुळे या कराच्या रुपाने होणारा ३० कोटी रुपये कर जमा झाला नाही. सातारा जिल्ह्यातून ३७८ कोटी ७३ लाख रुपये विक्रीकर जमा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर तुम्ही नोकऱ्या सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तीन महिन्यांच्या थकीत पगारासाठी महापालिकेच्या दारात आलेल्या केएमटीच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या असंवेदनशीलपणाचा अनुभव शुक्रवारी आला. 'आमच्या हक्काच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजेत, पगार दिला पाहिजे' असे आक्रमकपणे बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'हमरीतुमरी करून, तावातावाने बोलून काही होणार नाही. तुम्हाला जमत नसेल तर नोकऱ्या सोडा. केएमटी बंद करणार असाल तर करा' असे उत्तर उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांना धक्का बसला. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्नही केला.

केएमटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०१४ आणि फेब्रुवारी-मार्च २०१५ या तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. थकीत वेतनासाठी शुक्रवारी २०० कर्मचारी महापालिकेत दाखल झाले. आयुक्त उपस्थित नसल्याने कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त अश्विनी वाघमळे यांची भेट घेतली. शिष्टमंडळातील रवींद्र इंगवले, राजू निगवेकर, आनंदा आडके, निलेश डोईफोडे, सचिन गवळी आदी कर्मचाऱ्यांनी उपायुक्तांसमोर थकीत पगारामुळे भेडसावणाऱ्या समस्य मांडल्या.

यावेळी उपायुक्त वाघमळे म्हणाल्या 'केएमटी सध्या तोटात आहे. अर्थसंकल्पात साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाला की, पगार दिला जाईल. पगारासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत'. यावेळी कर्मचाऱ्यांनी 'काम करूनही पगार मिळाला नाही तर कुटुंबांचा गाडा कसा हाकणार?' अशी भूमिका मांडली. उपमहापौर मोहन गोंजारे, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे, राजू पसारे, जहाँगीर पंडत, प्रकाश कुंभार यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. उपमहापौर गोंजारे यांनी, 'बजेटवर महापौरांची सही झालेली नाही. त्यामुळे पगार होण्यात अडचणी आहेत. तुम्ही महापौरांच्या केबिनसमोर आंदोलन करा' असे कर्मचाऱ्यांना सांगितले.

व्यथा कर्मचाऱ्यांच्या

पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसी बंद पडल्या आहेत. पोस्टाचे पैसे भरलेले नाहीत. प्रशासनाने, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरली नाही. कर्मचाऱ्यांना हक्काच्या पगारासाठी झगडावे लागत असल्याचे चालक बी. पी. काळे यांनी सांगितले. वर्षभर पगाराच्या तक्रारी आहेत. कुटुंबियांसोबत भाड्याच्या घरात राहतो. नियमित पगार नसल्यामुळे घराचे भाडे थकीत आहे अशी व्यथा कर्मचारी अरविंद पोतदार यांनी मांडली.

सोमवारपर्यंत निर्णय

कर्मचाऱ्यांनी महापौर तृप्ती माळवी यांची भेट घेऊन वस्तु​​स्थिती सांगितली. महापौर माळवी यांनी आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांशी पगाराबाबत चर्चा करू. सोमवारपर्यंत या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाझर तलावाने पाणीप्रश्न सुटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

शित्तूर तर्फ मलकापूरपैकी तळपवाडी येथे पाझर तलावाची उभारणी गतीने होत आहे. मे अखेर हे बांधकाम पूर्ण होऊन पावसाळ्यात पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे या भागातल्या लोकांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.

तळपवाडीच्या पश्चिमेकडील डोंगरभागात ४२ वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ च्या सुमारास पाण्याचा बंधारा बांधला गेला होता. निकृष्ट बांधकामामुळे या बंधाऱ्याने दुसरा पावसाळाही पाहिला नव्हता. एका वर्षात या बंधाऱ्यातून पाण्याचा लोंढा वाहू लागल्याने या बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहात नव्हता. ४२ वर्षानंतर पुन्हा या ठिकाणाला नवसंजीवनी मिळून येथे पाझर तलावाची उभारणी होत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती भाग्यश्रीदेवी गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या फंडातून ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत.

या तलावामुळे तळपवाडीसह शित्तूर गाव, मानकरवाडी, सोनवडे व साळशी या गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय या भागातील ३० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

पाचशे लोकसंख्या असलेल्या तळपवाडीतील नागरिकांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. वाडीकरांच्या नशिबी नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी नाही. तीन ठिकाणी मारलेल्या बोअर्सना पाण्याचा पत्ताच नाही. मे महिन्यामध्ये तर येथील नागरिकांना पाण्याच्या एका एका तांब्यासाठी तिष्ठत बसावे लागते. इथले लोक जनावरांना पाण्यासाठी अडीच - तीन किलोमीटरची पायपीट करीत बजागेवाडी किंवा गोगवे येथील पाझर तलावाकडे जात असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाला वाहतुकीची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

अनेक वर्षांपासूनची लोकांची मागणी आणि कोट्यवधी रुपये खर्चून कागल आणि भुदरगड तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्वाच्या वेदगंगा नदीवरील वाघापूर पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पण पुलाच्या मुरगूड व वाघापूर या दोन्ही बाजूंनी भराव करुन रस्ता करण्याची गरज आहे. दोन्ही बाजूंनी पुलाला जोडून काढण्यात येणाऱ्या रस्त्यासाठी जमीन संपादनाचे काम हाती घेण्यात आले. पण आपल्या शेतजमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्यासाठी जमीन देणार नसल्याची ताठर भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे. परिणामी पूल पूर्ण झाला पण तो वाहतुकीसाठी वापरता येत नाही. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था या पुलाची झाली आहे. शेतकरी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाल्याशिवाय यावर तोडगा काढणे अशक्य आहे.

कागल आणि भुदरगड तालुक्यातील लोकांची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेवून दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या अथक प्रयत्नातून वेदगंगानदीवर सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचा पूल मंजूर झाला. गेले दोन वर्षे त्याचे काम सुरु होते. ते या

महिन्यात पूर्ण झाले आहे. आठ मीटर रुंदीचा आणि ७५ मीटर लांबीच्या या पुलाला ३७ फुटाच्या दोन भागात एक पिलर व दोन अपार्टमेंट पध्दतीने आठ मीटर उंचीने हा पूल होऊन वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.

या पुलामुळे गारगोटी, पाटगाव कोकणात जाण्यासाठी अनके किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. विशेष म्हणजे कागल तालुक्यातील आणि भुदरगड तालुक्यातील लोकांना सर्वदृष्टीने हा पूल सोयीचा होणार आहे.

पण या पूलापासून मुरगूड व वाघापूरकडे जाण्यासाठी करावे लागणारे रस्त्याचे कामच बंद पडल्याने हा पूल असून अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत सापडला आहे. या पुलापासून मुरगूडकडील बाजूस आठ मीटर रुंदीचा हा रस्ता करावा लागणार आहे. त्यासाठी सुमारे १७ ते १८ गुंठे जमीन पूर्व पश्चिम पट्ट्याची सुमारे एक किलोमिटर लांबीची गरजेची आहे. तर वाघापूरकडील बाजूस जुन्या रस्त्यापासून या पुलाला जोडावयाचा रस्ता आठ मीटर रुंदीने केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक एकर जमिनीची गरज आहे.

दोन्ही बाजूच्या रस्त्यासाठी जमिनी देण्यास शेतकरी तयार आहेत. पण जमीन ताब्यात घेताच त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही मागणी सरकार पूर्ण करु न शकल्याने या रस्याचे काम रखडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर रविवारी तोफेची सलामी

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

नारळाची ओली शेंडी घ्यायची, त्यात महिनाभर तयार करून ठेवलेली शोभेची दारू ठासून ती तोफेच्या वरच्या बाजूला असलेल्या लहान छिद्रातून आत सरकवायची. त्या दारूच्या पिशवीला छिद्र पाडून बत्ती दिल्यानंतर तोफेच्या आवाजाने दख्खनचा राजाचा परिसर थरारतो.

जोतिबा डोंगरावर पोर्णिमा, शिलंगण आणि चैत्र पोर्णिमेसह दर रविवारी जोतिबाला अशी सलामी दिली जाते. गेल्या पंचवीस वर्षांपासून देवस्थान समितीकडे कार्यरत असलेले सुधाकर डबाणे हे जोखमीचे काम पार पाडतात. त्यांनी यासाठी कोणतेही विषेश प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र, जोतिबाची परंपरा इनामइतबारे सांभाळण्याचे ते काम करतात.

दख्खन राजा जोतिबाची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांसह आंध्रप्रदेश, कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवस्थानाची वैशिष्ट्ये आहेत. दर रविवारी आणि पोर्णिमेला भाविकांचा मेळाच भरतो. याच दिवशी रात्री जोतिबाची पालखीतून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिरात जाण्यापूर्वी पालखी गोमातेजवळील सदरेवर ठेवली जाते. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिली जाते.

सध्या मंदिरात दोन तोफा आहेत. त्यापैकी एक तोफ बंदिस्त ठेवली आहे. आवाजाची तोफ देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर ठेवलेली आहे. बंदिस्त तोफेवर इतिहासकालीन शिलालेख आहे. शिलालेखावर जुन्या इतिहासकालीन संदर्भाचा उल्लेख आहे.

तोफेला सलामी देण्यासाठी देवास्थान समितीने सुधाकर डबाणे यांनी नियुक्ती केली आहे. त्यांना काही दिवसांपू्र्वी सेवामुक्त करण्यात आले होते. हे जोखमीचे काम करण्यासाठी त्यांची मानधनावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. सलामीसाठी वेगळी तोफ आहे. वर्षात लाखो भाविक जोतिबाचे दर्शन घेत असतात. डोंगरावरील दुसरी तोफही खुली केल्यास ऐतिहासिक ठेवा पाहण्याची संधी मिळेल, असे इतिहास अभ्यासक अमित अडसुळे यांनी सांगितले.

जोखमीचे काम

तोफ उडवणे जोखमीचे काम. अशा प्रकारे तोफेची सलामी देणारे काही मोजकेच जाणकार सध्या आहेत. डाबणे यांचा तोफ उडविण्यातील हातखंडा पाहून त्यांच्यावर युवराज संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या विवाह समारंभात २१ तोफांच्या सलामीची जबाबदारी देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांबाबत निर्णय घेण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाच प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्याबाबत तीन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. उपमहापौर मोहन गोंजारे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

महापौर माळवी यांच्यावर १७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रति​बंधक विभागाने कारवाई केली होती. त्यांच्यावरील कारवाईमुळे शहराची बदनामी होत असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवकांवतीने करण्यात येत होती. त्यानंतरही माळवी यांनी राजीनामा दिला नसल्याने शेवटी कायद्याचा अधिकार घेत संपूर्ण सभागृहाने, अगदी स्वतः महापौरांनीही कारवाई करण्याबाबतचा एकमताने ठराव केला होता. त्या ठरावानंतर महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारने माळवी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरची रेल्वे सुसाट !

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

शतकोत्तर रौप्यमहोत्सव सुरु होत असलेल्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनशी प्रवाशांचा स्नेहबंध वाढू लागला आहे. कोल्हापूर स्टेशनमधून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने उत्पन्नात २०१३ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा ८ कोटी ०७ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. यामुळे दररोजच्या उत्पन्नातही सरासरी १ लाख ३९ हजारांची वाढ झाली आहे. यामुळे कोल्हापूर स्टेशनचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी नव्या इमारतीची आवश्यकता पुन्हा अधो​रेखित झाली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या कोल्हापूर ते मिरज रेल्वे सेवा व कोल्हापूर स्टेशनच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला २० एप्रिलपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचे आर्थिक वर्षही संपले असून वर्षभराचा लेखाजोखा समोर आला आहे. येथून सुटणाऱ्या रेल्वेंबरोबर इतर ठिकाणी जाण्यासाठी कोल्हापुरातून होत असलेल्या आरक्षणाची स्थिती चांगली बनत आहे. २०१३ च्या आर्थिक वर्षापेक्षा २०१४ च्या वर्षामध्ये येथून जाणाऱ्या प्रवाशांमुळे उत्पन्नात ३ कोटी ३५ लाख २ हजार रुपयांची वाढ झाली होती. पण २०१४ च्या तुलनेत २०१५ चे उत्पन्न पाहता यावर्षी ४ कोटी ७२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. २०१३ वर्षात या आरक्षणातून १९ कोटी ९४ लाख २४ हजार मिळाले होते. २०१४ मध्ये तेच उत्पन्न २३ कोटी २९ लाख २७ हजारावर पोहचले. तर यंदा २०१५ च्या मार्चअखेरपर्यंत २८ कोटी १ लाख ८९ हजारापर्यंत गेले आहे.

थेट कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सरासरी २६५ इतकी वाढ झाली असून सरासरी उत्पन्नही १ लाख ३९ हजाराने वाढले आहे. पण दररोजच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर आरक्षणासाठी केले जाणारे अर्ज, त्यातून सेवा मिळणाऱ्या प्रवाशांच्या संख्येबरोबरच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्न या साऱ्यांची सरासरी काही अंशी कमी झाली आहे. इतर स्टेशनवरुन केल्या जाणाऱ्या आरक्षणामध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी ४ लाख २५ हजार प्रवाशांनी आरक्षण केले असताना यंदा ती संख्या ३ लाख ६५ हजारापर्यंत घसरले आहे. त्यामुळे उत्पन्नही १७ कोटी ८४ लाखावरुन १६ कोटी ४४ लाखावर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट दस्त करून बहिणीची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट दस्त तयार करून बहिणीची फसवणूक करण्याचा प्रकार केर्लीत घडला. सरदार बबन पाटील यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, दस्त नोंदणी प्रकरणातील सरकारी कर्मचाऱ्यांना या प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रत्नमाला साळोखे यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा साळोखे आणि शंकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रत्नमाला साळोखे यांची माहेरी (केर्ली) वडिलोपार्जित सामायीक एक एकर साडेसतरा गुंठे जमीन आहे. रत्नमाला साळोखे आणि त्यांच्या तीन बहिणी तसेच एक भाऊ आणि आईच्या नावावर ही जमीन वारसाहक्काने झाली. भाऊ सरदार पाटील हक्कसोड पत्र करून घेतले. मात्र रत्नमाला यांच्या जागी दुसऱ्याच महिलेला उपस्थित ठेवले. याप्रकरणी सरदारसह प्रकरणातील दोन साक्षीदार तानाजी पाटील, मारुती उत्रेकर, कथित बहिण आनंदी पाटील यांना अटक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपचालकांचा संप स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांचा शनिवारी रात्री ८ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतचा संप मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संप मागे घेण्यात आल्याचे कोल्हापूर जिल्हा पेट्रोल आणि डिझेल पंप मालक संघाचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.

पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांच्या विविध मागण्या गेली अनेक महिने प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा इशारावजा संप पुकारण्यात आला होता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर या मागण्यासंदर्भात ताताडीने बैठक घेण्याच आश्वासन इंडियन ऑइल कंपनी लिमिटेडेने दिले असल्याचे माणगावे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळीव पुन्हा बरसला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन आठवड्यापासून उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासियांना शनिवारी झालेल्या वळीव पावसाने थोडासा दिलासा दिला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. यामध्येही शहराच्या पूर्व व उत्तर परिसरात पावसाचा थोडा जोर राहिला. पण दक्षिण व पश्चिम परिसरात केवळ हलकासा शिडकावा झाला.

एप्रिलच्या सुरुवातीपासून उष्म्याचा कडाका जाणवू लागला आहे. वाऱ्याचे प्रमाणही कमी असल्याने तगमग वाढत आहे. या परिस्थितीत वळवाच्या पावसाची आवश्यकता नागरिकांकडूनच व्यक्त होत होती. जोतिबा यात्रेदरम्यान वळीव पावसाची हजेरी असते. पण यंदा यात्रा होऊन आठवडा झाला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने उष्मा हैराण करत होता. आठवडाभर निरभ्र असलेल्या आकाशात शनिवारी सकाळपासून मात्र थोडे ढग दिसू लागले व वातावरणातील उष्माही वाढू लागला. यामुळे सायंकाळी पाऊस हजेरी लावणार असेच वाटत होते. दुपारी शहरातील कसबा बावडा, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सीपीआर तसेच जुना बुधवार पेठ परिसरात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. पण त्याचवेळी इतरत्र केवळ हलक्या सरी पडून निघून गेल्या. सायंकाळी पाचच्या सुमारासही शहरात पावसाच्या किरकोळ सरी पडल्या. पावसामुळे वातावरणात पुरेसा गारवा झाला नसला तरी वारा सुटल्याने उष्म्यामुळे होणारी तगमग कमी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी पुन्हा आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी शनिवारी शहरातील वकिलांनी महालोक अदालतीसाठी जिल्ह्यातून आलेल्या पक्षकारांना जिल्हा न्यायालयाच्या आवारात येण्यास मज्जाव केला. जिल्हा न्यायालयाला कुलूप ठोकण्याचाही प्रयत्नही वकिलांनी केला. आंदोलनातील २९ वकिलांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांना सोडून दिले.

मुंबई उच्च न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सुमारे ४ हजार १०७ खटले सोडविण्यासाठी शनिवारी महालोक अदालतीचे आयोजन केले होते. त्याला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने विरोध केला. कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यातील वकील या आंदोलनात सहभागी झाले होते. महालोक अदालतीचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही काळ कामकाज चालले. त्यानंतर वकिलांनी दसरा चौकात एकत्र येऊन तेथून जिल्हा न्यायालयाच्या आवारात धडक दिली. महा लोकअदालतीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पक्षकारांना जिल्हा न्यायालयाच्या आवारात येण्यास त्यांनी मज्जाव केला. अकरा वाजण्याच्या सुमारास वकिलांनी न्यायालयाचे प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतले.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात झाले तर सहा जिल्ह्यांतील प्रलंबित खटले मार्गी लागतील. त्यासाठी सरकार आणि नेतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. न्यायालयाच्या पातळीवरही काहीच हालचाल नाही. यामुळेच निषेध करण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले होते. लोकांच्या समस्या सुटू नयेत असा आमचा हेतू नव्हता असे वकिलांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात लोक अदालत

जिल्ह्यातील प्रलंबित खटले - ४१०७

निकाली खटल्यांची संख्या - ११००

वसूल रक्कम - ४० लाख २९ लाख ४०२

दाखल पूर्वकामे - ६५३१

निकाल - १२४

रक्कम - ३१ हजार ६५०

जिल्हा न्यायालयाला दोन गेट आहेत. त्यातील एक गेट बंद करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमचे आंदोलन प्रतिकात्मक होते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात झाले पाहिजे असा संदेश आम्हाला द्यायचा होता.'

-विवेक घाटगे, अध्यक्ष, बार असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५४ बागांसाठी २० लाखांचीच तरतूद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतर्फे दरवर्षी शहरातील ५४ बागांसाठी केवळ २० लाख रुपयांची तरतूद केली जाते. या तुटपुंज्या तरतुदीमुळे बहुतांश बागा बकाल बनल्या असून, या बागांमधील दुर्मिळ वृक्षसंपदेचीही हेळसांड होत आहे.

या उद्यानांची नियमित देखभाल करून वृक्षसंपदेचे जतन केल्यास ती नागरिकांचे आकर्षण ठरतील. मात्र, प्रशासनाच्या स्तरावर त्याबाबत गांभीर्य दिसत नाही. रंकाळा चौपाटी उद्यान, संध्यामठासमोरील पद्माराजे उद्यान, पंचगंगा घाटावरील पिकनिक पॉइंट ही उद्याने पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतात. प्रशस्त परिसर, विविध प्रकारची झाडी, पक्षी वैभव यामुळे रंकाळा चौपाटी आणि पद्माराजे उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा, कारंजा, मिनी ट्रेन अशा बाबी तेथे असल्या तर निश्चितच गर्दी वाढेल. माफक फी आकारल्यास उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च वसूल होईल. मात्र महापालिकेने उद्यान विभागातील कर्मचारी अन्य खात्यांकडे वळविले आहेत. अपुरा निधी दिल्याने अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. रंकाळा चौपाटी, पदपथ उद्यानाची अवस्थाही बिकट आहे. हुतात्मा गार्डनचा मोठा परिसर असूनही त्याकडे दुर्लक्ष आहे.

स्थानिक नगरसेवकांचा पुढाकार

महापालिका प्रशासनाने हात आखडता गेल्यामुळे उद्यानांची दुरवस्था होत असताना स्थानिक नगरसेवक, नागरिकांनी एकत्र येत परिसरातील उद्याने फुलवली आहेत. सिद्धाळा गार्डन, सम्राटनगर, फुलेवाडी, ताराराणी गार्डन, नाना नानी पार्क, पिकनिक पॉइंट, शाहूपुरीत नव्याने विकसित होत असलेले उद्यान ही त्यापैकी काही उदाहरणे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकामांना येणार अच्छे दिन

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

गेल्या महिनाभरात सिमेंटचे दर पोत्यामागे तब्बल शंभर ते एकशे वीस रुपयांनी आणि वाळूच्या ट्रकचे दर तब्बल दहा हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे गेले काही महिने बंद पडलेली कोल्हापुरातील चार ह​जारांहून अधिक बांधकामे पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, बांधकाम व्यवसाय तेजीत येण्याची शक्यता आहे.

सहा महिन्यांपूर्वी सिमेंटचे दर साधारण पोत्याला २५० ते २७० रुपये होते. डिसेंबरमध्ये हा दर ३५० रुपयांपर्यंत पोहोचला. तो नंतर ४५० रुपयांवर गेला. दुपटीपेक्षा जादा दर वाढल्याने बांधकाम व्यावसायिकांसह किरकोळ बांधकामे करीत असलेले नागरिक हवालदिल झाले. अनेकांनी बांधकामांचे नियोजन पुढे ढकलले. ज्यांची बांधकामे सुरू होती, तीही अनेकांनी थांबवली. सिमेंटबरोबरच वाळूचे दरही या काळात गगनाला भिडले. सहा महिन्यांपूर्वी वाळूच्या एका ट्रकचा दर १४ ते १५ हजार रुपये होता. तो नंतर २० हजार रुपयांपर्यंत गेला. गेल्या दोन महिन्यात तर हा दर २४ ते २५ हजार रुपयांपर्यंत गेला. जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा लिलाव न काढल्याने वाळू मिळेना. त्यामुळे एवढी रक्कम मोजूनही वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामावर त्याचा विपरीत परिणाम झाला.

सध्या ४५० रुपयांवरून सिमेंटचे दर पोत्यामागे ३०० रुपये असे कमी झाले आहेत. वाळूचे दर नऊ ते दहा हजार रुपयांनी कमी झाले आहेत. एक ट्रक वाळू आता १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.

सिमेंट आणि वाळूचे दर प्रचंड वाढल्याने गेल्या तीन-चार महिन्यांत बांधकाम व्यावसायावर मोठा परिणाम झाला होता. आता दर कमी झाल्याने पुन्हा एकदा नव्याने बांधकामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- राजीव पारीख, उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रयत’ची वाटचाल क्लस्टर युनिव्हर्सिटीकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'रयत शिक्षण संस्थेने स्वायत्त होण्याच्या दृष्टीने पावले टाकली असून, रयतची वाटचाल क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे. टप्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण होईल. पहिल्याच टप्प्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून साताऱ्याचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय लवकरच जाहीर होईल,' अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी दिली.

डॉ. अनिल पाटील म्हणाले, 'मराठी शाळांचा दर्जा टिकवणे ही अत्यंत अवघड गोष्ट झाली आहे. इंग्रजी शाळांमध्ये आपली मुले शिकली तरच त्यांना भवितव्य आहे, अशी पालकांची भावना झाली आहे. त्या शिक्षणासाठी किती खर्च येतो याचा विचार न करताच इंग्रजी माध्यमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आपण जे शिक्षण घेतो त्याचा उपयोग आपल्याला भविष्यात होत नसेल तर त्याकडे जाण्याचा कल कमी होतो. त्यामुळे बीएड, डीएड, इंजिनिअरिंगच्या हजारो जागा आता रिक्त राहिल्या आहेत. रयतच्या अनेक शाळांमधून गुरुकुल पद्धत सुरू करून मराठी भाषांच्या शाळेमधूनही उच्च दर्जाचे शिक्षण मिळू शकते, हे आम्ही सिद्ध केले आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात रयतची महाविद्यालये स्वायत्त करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण संस्थेचे कामकाजच स्वायत्त करण्यावर आमचा भर राहील. त्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यासक्रम तयार करण्याचे आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा पद्धती राबवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजच्या काळाप्रमाणे शिक्षणाची रचना आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अभ्यासक्रम तयार केले जातील. त्याला जर सीए व्हायचे असेल तर पदवीच्या तीन वर्षांचा कार्यकाळ त्यासाठी निश्चित केला जाईल आणि त्यामध्येच त्याला आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाईल. पदवी पूर्ण केल्यानंतर त्याला जे शिक्षण घ्यावे लागते ते घेण्याची आवश्यकता असणार नाही इतक्या उच्च दर्जाचे अभ्यासक्रम तयार केले जातील. इंग्रजी भाषांच्या शाळांना पर्याय म्हणून आम्ही उच्च दर्जाची सेमी इंग्रजी पद्धती अस्तित्वात आणली आहे. आम्ही फक्त सामाजिक शास्त्रे हा एकच विषय मराठीमधून शिकवत आहोत. हा विषयही आम्हाला इंग्रजीमधून शिकवण्याची परवानगी द्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयानंतर श्रीरामपूर येथील एक महाविद्यालय आणि साताऱ्याचे यशवंतराव चव्हाण विज्ञान इन्स्टिट्यूटला स्वायत्त दर्जा मिळेल. त्यानंतर शिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया आणि पद्धती बदलून टाकण्यात आम्हाला यश येईल.' रयतमधील वादग्रस्त शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'नगरपालिकेच्या शाळा चालवायला द्या'

अण्णासाहेब कल्याणी शाळेत आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा. त्यासाठी तुकडी वाढवावी, अशी पालकांची मागणी असल्याकडे डॉ. अनिल पाटील यांचे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, 'तुकडी वाढवता येईल, पण जागा कुठून आणणार? जागा दिली तर तुकडी वाढवता येईल. जागा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळा आम्हाला चालवायला द्याव्यात., आम्ही त्यांचा दर्जा रयतच्या शाळांसारखा करून दाखवायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. मात्र, सरकार त्यावर काहीच निर्णय देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणविचार व्याख्यानमाला

रयतच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांचा मेळावा १९ एप्रिल रोजी होणार आहे. विद्यालयातर्फे २१ ते २७ एप्रिल या कालावधीत शिक्षणविचार व्याख्यानमाला होणार आहे. अपर्णा रामतीर्थकर, विवेक वेलणकर, विशाखा वेलणकर, डॉ. श्रुती पानसे, व्ही. टी. पाटील, डॉ. अजयकुमार लोळगे, गणेश शिंदे आणि प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे विविध विषयांवर व्याख्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये ओढाजोड प्रकल्प

$
0
0

राम जगताप, कराड

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावात पावसाचे पडणारे पाणी साठवून प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून गावात हिरवाई साकारण्याची किमया साधणाऱ्या कराड तालुक्यातील किवळ गावात लोकसहभागातून देशातील पहिलाच ओढाजोड प्रकल्प साकारत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी टी. आर. साळुंखे यांच्या प्रयत्नातून तसेच जलयुक्त शिवार अभियान, सह्याद्री कारखाना, जैन इरिगेशन, कृषी विभाग यांच्या विद्यमाने व लोकसहभागातून साकारणारा हा ओढाजोड प्रकल्प देशात रोलमॉडेल ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

किवळ गावचे टी. आर. साळुंखे यांनी आपल्या जन्मभूमी असलेल्या किवळ गावासह परिसराला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी सुरू केलेल्या जलसंवर्धनाच्या चळवळीचे फलित आता मिळू लागले आहे. जलयुक्त शिवार अभियान आता सुरू झाले असले तरी दोन वर्षांपूर्वी साळुंखे यांनी गावातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर लोकांना एकत्रित करुन लोकसहभागातून गाव जलयुक्त बनविण्याचा विडा उचलला होता. गावाशेजारील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडून सहकार्य घेत कृषी विभागाच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी पाउले टाकण्यात आली. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेतकरी ग्रामस्थांमध्ये जागृती करण्याबरोबरच जैन इरिगेशन कंपनीचे प्रकल्पासाठी सहकार्य घेण्यात आले आहे.

या प्रकल्पाची माहिती देताना किवळचे उपसरपंच सुनील साळुंखे म्हणाले, 'या गावचे सुपूत्र टी. आर. साळुंखे यांच्या अथक प्रयत्नाने व सह्याद्री सहकारी साखर कारखाना तसेच जलयुक्त शिवार अभियान, जैन इरिगेशन सिस्टिम, तालुका कृषी विभाग, लोकसहभाग व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातून हा प्रकल्प १५ दिवसांत पूर्णत्वास जात आहे.'

संबधित कामाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेवून या ओढाजोड प्रकल्पास सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्याची दखल घेत अश्विन मुदगल यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विशेष बाब म्हणून या कामाचा समावेश केला. त्याचबरोबर जैन इरिगेशन कंपनीनेही सहकार्याची भावना व्यक्त केली. प्रकल्पाला लोकसहभागाची आर्थिक साथ मिळाली असून, ओढ्याखालील विहिरधारकांनी प्रत्येकी ५ हजाराची मदत केली. तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून आर्थिक निधी जमविला. या सर्वांच्या सहकार्याने सुमारे साडेसात लाख रुपयांचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहे. या कामामुळे सुमारे २०० हेक्टर क्षेत्र बारमाही बागायती होणार आहे. ओढ्याकाठी असलेल्या २५ व त्याखालील सुमारे १०० विहीरींना पाणी पाझराचा फायदा होणार आहे. तसेच त्याखाली असणाऱ्या सिमेंट साखळी बंधाऱ्यातही भरपूर पाणीसाठा राहणार आहे. किवळ येथे सुरू असलेले ओढा जोड प्रकल्पाचे काम.

असा आहे प्रकल्प

खोडजाईवाडी पाझर तलावाच्या खालून वाहत येणाऱ्या व कोरडवाहू अभियानांतर्गत काढलेल्या लोंढूर या खडकाळ ओढ्यातील पाणी मोठ्या सिमेंट पाईपच्या मदतीने सुमारे ३२०मीटर अंतरावर असलेल्या व गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळून वाहत जाणाऱ्या मांसल ओढ्यात सोडण्यात येणार आहे. लोंढूर ओढ्यावर साखळी सिमेंट बंधारा बांधून ते पाणी अडविण्यात आले आहे. तर ते पाणी सोडण्यात येणाऱ्या मांसल ओढ्यातही साखळी सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसाला घेणार आढावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'महालक्ष्मी यात्रा अवघ्या दोन आठवड्यावर येऊन ठेपली असून आता कागदोपत्री कामे थांबवा व प्रत्यक्ष फिल्डवर्कला प्राधान्य द्या,' असा सल्ला तहसीलदार हनुमंतराव पाटील यांनी दिला. तसेच दर दोन दिवसाला विभागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेऊ असेही त्यांनी सांगितले. महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, पोलिस उपअधीक्षक डॉ.सागर पाटील, पोलिस निरीक्षक रामदास इंगवले व मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेच्या सुरवातीला पोलिस निरीक्षक इंगवले यांनी महालक्ष्मी यात्रा कालावधीत शहरातील वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्थेची माहिती दिली. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शहरातून एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी वाहतूक आराखड्याविषयी सूचनांचे स्वागत आहे असे सांगून किरकोळ बदल करता येतील मात्र मोठा बदल नको असे स्पष्ट केले. यात्रा कालावधीत शहरात ठिकठिकाणी पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या पार्किंगच्या ठिकाणी हॅलोजन बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा घुगरे यांनी यावेळी दिली. तहसीलदार पाटील यांनी याठिकाणी कामगारांची नियुक्ती, तसेच कुंभार वाडा ते डॉक्टर्स कॉलनीत स्ट्रीट लाईट सुरु करा अशा सूचना दिल्या. महालक्ष्मी यात्रेच्या आमंत्रण पत्रिकेच्या पाठीमागे वाहतूक नियंत्रण व पार्किंग आराखडा द्यावा जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना इच्छितस्थळी पोहचणे सोयीचे होईल, असे आवाहन इंगवले यांनी केले आहे.

शहरातील अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी नरळे यांना विचारले असता त्यांनी शहरात एकूण ७२ ठिकाणी अतिक्रमण असल्याची माहिती दिली. तसेच काही अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. तर सोमवारी उर्वरित अतिक्रमण हटविण्यात येतील असे सांगितले. तसेच यात्रेनिमित्त बऱ्याच ठिकाणी घरांचे बांधकाम सुरु आहेत त्यामुळे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले आहे. बांधकाम करणाऱ्या संबधित नागरिकांना साहित्य काढून घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक इंगवले यांनी कुणालाही डिजिटल बोर्ड अथवा कमानींची परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी तहसीलदार पाटील यांनी एकामुळे शिस्त बिघडता कामा नये यासाठी या नियमाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, नायब तहसीलदार शीतल देसाई, दादू पाटील यांच्यासह सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष आरोग्य पथके

उपजिल्हा अधीक्षक डॉ सुनील कुरुंदवाडे यांनी यात्रा कालावधीत विशेष आरोग्य पथकाचे आयोजन केले असून शहरातील विविध आरोग्य संस्थांची मदत घेऊ असे सांगितले. यावेळी डॉ. एम.एस.बेळगुद्री यांनी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तर्फे यात्रा कालावधीत आरोग्य सुविधा मोफत दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या आरोग्य पथकात शहरातील तज्ञ डॉक्टरांचा सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक वॉर्डनुसार कमिटी

यात्रा कालावधीत शहरातील प्रत्येक वॉर्डनुसार कमिटी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. या कमिटीमध्ये विभागातील सर्वाना सहभागी करून घ्यावे आणि यात्रा सुरळीतपणे पार पडावी, असे आवाहन यावेळी यात्राकमिटी मार्फत करण्यात आले. तसेच गणराया अॅवॉर्डच्या धर्तीवर यात्रा कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या वॉर्ड कमिटीला 'महालक्ष्मी अवार्ड' देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती यात्रा कमिटीचे बाबासाहेब गुरव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साखर कारखान्यांनी आता दर द्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारने साखर कारखानदारी वाचविण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आता एफआरपीप्रमाणे दर द्यायला काहीच हरकत नाही. जर कारखान्यांनी दर देण्यास मागे पुढे केले आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही तर सरकारच्या मानगुटीवर बसू,' असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

खासदार शेट्टी म्हणाले, ' सरकारने केवळ दोन हजार कोटी रुपयेच दिले नाहीत तर मळीवरील निर्बंधही उठविले आहेत. त्यामुळे आणखी किमान १२५ रुपयांचा फरक पडणार आहे. वीज निर्मितीचे पैसे लवकर देणे, कच्ची साखर निर्यातीवरील बंदी उठविणे आणि बफर स्टॉकचा भविष्यात होणार निर्णय यामुळे कारखान्यांना काहीच अडचणी राहिलेल्या नाहीत. कारखान्यांनी आता विनाविलंब शेतकऱ्यांना उसाची बिले दिली पाहिजेत. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाईची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने एफआरपी प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई न करता त्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला तर सरकार विरोधातही आक्रमक आंदोलन करू असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

राज्याचा ऊस हंगाम आता संपत आला आहे. उसाचे चांगले उत्पादन झाले असून उताराही चांगला मिळाला आहे. भविष्यात साखरेला चांगला दर मिळेल अशी आशाही निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना दर देणे अवघड नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images