Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

यूपीएससीत आशेचा किरण

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

राज्य सरकारने प्री-आयएएस सेंटरच्या कोल्हापूर आणि नागपूर केंद्राला वीस कोटींची तरतूद केली आहे. या तरतुदीमुळे कोल्हापूरच्या सेंटरमध्ये अन्य सोयी सुविधांसह विद्यार्थी प्रवेश क्षमता ८० वरुन १०० होण्याची शक्यता आहे. क्षमता वाढल्यास विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था होण्यासाठी सेंटरला नव्याने प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भरघोस निधी मिळाल्याने यूपीएससीत मराठी टक्का आणखी वाढणार आहे. शंभर क्षमता झाल्यास मुंबईनंतरचे दुसरे सेंटर कोल्हापूर ठरणार आहे.

राज्य सरकारने कोल्हापूर आणि नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी सुमारे वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांना मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्व प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्यही देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संदर्भ ग्रंथासह अद्यावयत अभ्यासिका स्थापन करण्यात येणार आहे. राजाराम कॉलेज परिसर कॅम्पसमधील प्री-आयएएस सेंटरमध्ये सध्या ७६ विद्यार्थी यूपीएससीचा अभ्यास करीत आहेत. यात ३२ मुली आणि ४४ मुले आहेत. लेक्चर हॉल, कंम्प्युटर, रिडिंग हॉलची सुविधा आहे. सुमारे नऊ हजार पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. एन्ट्रन्स परीक्षा घेऊन प्री-आयएएस सेंटरमध्ये प्रवेश निश्चित केला जातो. दरवर्षी या केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी दोन हजार विद्यार्थी एन्ट्रस देतात. या वर्षी ८० वरुन १०० प्रवेश संख्या झाल्यास अधिकाधिक उमेदवारांना लाभ मिळणार आहे. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रति महिना दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. निधी मिळाल्यास विद्यावेतनातही वाढ शक्य आहे.

निधी मंजूर झाल्याने केंद्रात निवासाच्या व्यवस्थेसाठी अतिरिक्त मजला शक्य आहे. केंद्रात आणखी दर्जेदार सुविधा आणि अध्यापनाचा दर्जा, ग्रुप डिस्कशन वाढल्यास पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या तीनही टप्प्यापर्यंतचा लाभ विद्यार्थ्यांना होऊ शकतो. दरवर्षी यूपीएसएसीत झेंडा फडविणाऱ्या मराठी मुलांचा टक्का आणखीन वाढणार आहे.

वीस विद्यार्थी क्षमता वाढीचा प्रस्ताव दिला आहे. सध्या केंद्रात ७६ विद्यार्थ्यांची निवासाची आणि प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. राज्य सरकारने केलेल्या तरतूदीच्या विनियोगाची कोणतेही आदेश अद्याप नाहीत. अत्याधुनिक आणि वाढीव सुविधांसाठी आग्रही आहोत. आदेश मिळाल्यानंतर तातडीने सुविधांची कार्यवाही केली जाईल.

सुनेत्रा महाराज-पाटील, संचालिका, प्री-आयएएस सेंटर

केंद्र विद्यार्थी क्षमता

मुंबई १००

कोल्हापूर ८०

नागपूर ८०

औरंगाबाद ८०

नाशिक ७०

अमरावती ७०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भविष्यातील सुविधांचे काय?

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ग्रामीण भागांतून होत असलेल्या स्थलांतराचा मोठा मुद्दा आहे. या लोकसंख्येला सामावून घेण्याची शहराची क्षमता संपल्याने आता नवीन सुविधा देण्यांसाठीही जागेचा शोध घ्यावा लागत आहे. शहरवासीयांबरोबर नव्याने दाखल होत असलेल्या जनतेसाठी सुविधा द्यायच्या, तर हद्दवाढ अपरिहार्य आहे. पण शहराच्या सीमेवरील गावांना जोडून भौगोलिक सलगता जोपासण्याबरोबरच शहर आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांच्यादृष्टीने विचार केला, तर या हद्दवाढीला अर्थ राहणार आहे.

महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधांवरील ताण १९८० ते २००० सालापर्यंत फारसा जाणवत नव्हता. पण त्यानंतर सुविधांचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. तेव्हापासून महापालिकेच्या कुचंबनेला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. घनकचरा व्यवस्थापनासाठी लँडफिल जागा, आधुनिक कत्तलखाना, मेडिकल​ सिटीसारखा प्रकल्प, प्रशासकीय इमारतींसाठी अथवा नवीन उद्योगांसाठी जागा मिळाल्या नाहीत. महापालिकेला शोध घेण्याबरोबर सरकारकडे मागणी करण्या​शिवाय व काही जागांवरील आरक्षणे उठवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हा प्रकार पाहता शहरात निवासी प्रकल्पांसाठी नव्हे तर सरकारी प्रकल्पांसाठीही जागा शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले.

आगीतून फुफाट्यात!

हद्दीवरील गावांचा विचार पालकमंत्री चंद्रकांत पाटील करीत आहेत, तिथे जागा कमी आणि समस्या जास्त आहेत. केवळ भौगोलिक सलगतेचा फायदा घेऊन शहराची लोकसंख्या वाढवून महापालिकेची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखी होणार आहे. उत्पन्न कमी, पण सुविधांवर जादा खर्च अशी महापालि‌केची अवस्था होणार आहे. या लोकसंख्येची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विविध प्रकल्प राबवण्यासाठी ज्या जागांची आवश्यकता आहे, तीही या गावांतून सध्या पूर्ण होऊ शकेल की नाही याबाबत साशंकता आहे. परिणामी सर्व व्यवस्थेवर ताणच येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ दुचाकीस्वारांना आरटीओची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र टाइम्स'च्या डेंजरस पीपल या मोहिमेची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या ७५ वाहनधारकांना नोटिसा दिल्या आहेत. सात जणांकडून ६२०० रुपये दंड वसूल केला आहे. दरम्यान, सर्व पोलिस ठाण्यांनी शहरात वाहन तपासणी मोहीम राबवत वाहनचालकांवर कारवाई केली.

नियम मोडणाऱ्या वाहनधारकांमुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव 'महाराष्ट्र टाइम्स'ने 'डेंजरस मोबाइल पीपल'च्या माध्यमातून करून दिली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मोहिमेची दखल घेत ८४ वाहनचालकांवर कारवाईचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवले. त्यांनी ७५ वाहनचालकांना नोटीस पाठवली आहे. नऊ वाहनांची नोंदच नसल्याने ही चोरीची वाहने असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. सात वाहनचालकांकडून सहा हजारावर दंड वसूल केला आहे. अन्य वाहनचालकांकडूनही दंड वसूल करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी सांगितले. फॅन्सी नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबर वाहनांच्या नंबरप्लेट जप्त करण्याबरोबरच फिल्मिंग केलेल्या वाहनधारकांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षयरोगाचा विळखा सुटेना

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

प्रभावी औषधांना दाद न देणाऱ्या टीबीच्या जंतूप्रकारातील 'एक्सडीआर' (एक्सटेन्सिव्ह रेझिस्टंट टू अँटी टीबी ड्रग्ज) टीबीचे दोन रुग्ण तर कोणत्याही औषधांना न जुमानणाऱ्या एमडीआर टीबीचे (मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स) शहरात तीन महिन्यात ६ रुग्ण आढळले आहेत. टीबीचे एकूण ४२३ रुग्ण आढळले असून कोल्हापुरात सध्या एमडीआर आणि एक्सडीआर प्रकारच्या टीबीचा विळखा वाढत असल्यामुळे त्याला प्रतिबंध करणे आव्हानात्मक बनले आहे.

मुळात टीबी हा संसर्गजन्य रोग असल्याने रुग्णांकडून तो पसरला जाऊ नये यासाठी डॉट उपचार पद्धतीचा सरकारने अवलंब केला आहे. यासाठी खासगी दवाखान्यात कुणी अशा लक्षणाचा रुग्ण आढळल्यास तो त्वरित सरकारी यंत्रणेकडे पाठवण्याचे बंधनकारक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २०१४ मध्ये टीबीचे एकूण ३१७७ रुग्ण असून २०१५ मध्ये ४२३ रुग्ण आढळले आहेत. गेल्या ‌तीन वर्षांची टीबी, एमडीआर आणि एक्सडीआर टीबीच्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दुर्लक्षामुळे वाढतो धोका

पेशंट अनेकदा टीबीचे उपचार अर्धवट सोडतात. नंतर पुन्हा सुरू करतात. त्या वेळी शरीरातील जंतू त्या औषधांना प्रतिसाद देत नसल्याने पेशंटला रेझिस्टंट निर्माण होतो. त्या प्रकाराला 'एमडीआर' टीबी (मल्टी ड्रग रेझिस्टंट) म्हणतात. 'एमडीआर' वरील उपचार सुरू असताना ते बंद केले. तर त्या औषधांनाही जंतू दाद देत नाहीत. तेव्हा निर्माण होणाऱ्या आजाराला 'एक्सडीआर' टीबी असे म्हटले जाते. तर टीबीचा उपचार कमीत कमी ६ ते ९ महिने आणि जास्तीत जास्त दोन ते अडीच वर्ष कालावधीचा असतो. पण, रुग्ण सुरवातीस १ ते २ महिने औषधे घेतात व काही दिवसांनी औषध सोडून देतात, पुन्हा आजार उद्धवला की थोडे महिने औषध घेतात आणि नंतर बंद करतात. अशा प्रकारे औषधांची नियमितता नसल्यामुळे आजारांचे जंतू वाढतात व रुग्ण नेहमीच्या औषधांना प्रतिसाद देत नाही यातूनच एमडीआरसारखा गंभीर आजार जडतो.

कोल्हापूर तीन महिन्यांत एमडीआरचे ६ तर एक्सडीआरचे २ रुग्ण आढळले आहेत. ही स्थिती गंभीर असून वेगवेगळ्या उपाययोजनांनी टीबीवर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्याच्या दंडाला पन्नास टक्के सवलत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत घरफाळा २७ मार्चपर्यंत एक रक्कमी भरल्यास १८ टक्के दराने आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच २८ ते ३१ मार्च या कालावधीत घरफाळ्याची संपूर्ण रक्कम भरल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये २५ टक्के सवलतीची घोषणा घरफाळा विभागाने केली आहे. महापालिकेने मालमत्ता करावरील सवलत योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात सहा ते २० मार्चपर्यत थकीत रक्कमेवरील दंडामध्ये ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. महापालिकेच्या आवाहनास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांना मालमत्ता करावरील सवलत योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ५० टक्के सवलत योजना २७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलविरह‌ित शौचालय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

केवळ गरजेपुरता अत्यल्प पाण्याचा वापर, वापरलेल्या सांडपाण्याचाही सदुपयोग तसेच मानवी विष्ठेचाही खत म्हणून चांगला उपयोग होतोय जलविरहीत शौचालयाच्या माध्यमातून. जयसिंगपूर येथील उत्कर्ष फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने हा प्रयोग यशस्वी केला आहे. या अनोख्या शौचालयामुळे पाण्याची बचत तर होतेच, परंतु त्याचबरोबर जलप्रदुषणही टाळण्यास मदत होते.

सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉ. सुरेश एन. पाटील व प्रा. मोहन केतकर यांनी जलविरहीत शौचालयाची निर्मिती केली आहे. प्रचलित शौचालयात पाण्याचा अधिक वापर होतो. सांडपाण्यामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कमी पाणी व मानवी मलमूत्राचा योग्य वापर करून जलविरहीत उत्कर्ष शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

पत्रा व लोखंडी अँगलच्या रचनेतून उभारण्यात आलेल्या या शौचालयात वेगळे शौचकूप असून यातून मानवी विष्ठा खाली बसविण्यात आलेल्या ट्रॉलीत जाते. ट्रॉलीत मातीचा वापर केला जातो. मातीमुळे विष्ठेची दुर्गंधी येत नाही. तसेच ती कोरडी होण्याला मदत होते. विशिष्ट दिवसांनंतर ही ट्रॉली बाहेर काढून रिकामी केल्यानंतर त्यातून सेंद्रिय खत मिळते.

ट्रॉलीला हाताळण्यासाठी हॅण्डेलची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रॉलीतील मैलायुक्त मातीवर पालापाचोळा टाकल्यास त्यातून निर्माण होणारे सेंद्रिय खत शेतीसाठी उपयुक्त ठरते. शौचकुपाच्या पुढील भागात अंग धुण्याची व मूत्र वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील जलनिस्सारणासाठी स्वतंत्र पाइपद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. या पाइपमधून बाहेर येणारे सांडपाणी गांडूळ खतासाठी तयार केलेल्या वाफ्यावर अथवा अन्यत्र सोडल्यास त्याचाही उपयोग होतो. या शौचालयामुळे सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार, सेफ्टिक टँक, पाइपलाइन अशा उपाययोजनेंची गरज भासत नाही. पाणी टंचाई असलेल्या ठिकाणी व शेतीवाडीच्या भागात हे शौचालय अधिक उपयुक्त असून दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत याची उभारणी होऊ शकते.

'अनेक प्रयोगांनंतर शौचालयाची उभारणी करण्यात यश मिळाले. त्याच्या अधिक वापरासाठी राज्य व केंद्र सरकारकडे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या प्रकल्पाचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.'

- डॉ. सुरेश पाटील, प्रा. मोहन केतकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मी राजारामपुरी खड्ड्यांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खराब रस्ते आणि धुळीने त्रस्त बनलेल्या राजारामपुरीतील नागरिकांची अजूनही खड्डेमय रस्त्यातून सुटका झाली नाही. राजारामपुरीतील मुख्य मार्गाची अवस्था तर निम्म्या रस्त्यात डांबरीकरण आणि निम्मा खड्ड्यांचा रस्ता अशी बनली आहे. अपुऱ्या कामामुळे या भागातील नागरिकांना धुळीने त्रस्त केले आहे. राजारामपुरीची तिसरी गल्ली ते जनता बझारपर्यंच्या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. रस्त्याच्या मुद्यावरून या भागातील राजकारण चांगलेच तापले. काही जणांनी रस्ते कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी रस्त्याचे काम रखडत गेले.

वाहतुकीची कोंडी होऊ नये, पार्किंगची समस्या निर्माण होऊ नये असा विचार करून राजारामपुरीतील मारुती मंदिर ते जनता बझार हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीची समस्या सुटली पण, खराब रस्त्याने नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारी वाढल्या. सात ते आठ महिन्यांपासून या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. डांबरीकरणाचा अभाव आणि खडी उखडल्याने ​या मार्गावर खड्डे पडले. खड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना डर्ट ट्रॅकचा अनुभव घ्यावा लागला. खराब रस्त्यातून वाहने चालवल्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.

धुळीचा फटका वाहनधारकासोबतच दुकानदारांनाही बसला. धुळीमुळे दुकानातील वस्तू खराब होऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागल्याचे दुकानदार मुनाफ मोमीन व संजय हिराणी यांनी सांगितले. गेल्या महिन्यात राजारामपुरीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. मारुती मंदिर ते आठव्या गल्लीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला. आठवी ते सातवी गल्लीतील रस्त्याच्या डाव्या बाजूचे डांबरीकरणच करण्यात आले नाही. फक्त उजव्या बाजूचा रस्ता ठीकठाक करण्यात आला. पुढे पाचवी ते तिसरी गल्लीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था निम्मा रस्ता डांबरीचा आणि निम्मा खड्ड्यांचा अशीच आहे. तिसरी गल्ली ते जनता बझारपर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय बनली आहे. डांबरीकरणाचा पत्ता नाही, कुठे पॅचवर्क करण्यात आले नाही. यामुळे खड्ड्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

अंतर्गत रस्त्यांची चाळण

जनता बझारच्या पिछाडीस असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोरील रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. दुसरी गल्ली ते १३ व्या गल्लीपर्यंतचा रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. मार्गावर रस्त्याच्या कडेलाच चारचाकी वाहने, दुचाकी, रिक्षा लावलेल्या आहेत. अनेकांनी रस्त्याच्या कडेला खाद्याचे स्टॉल लावलेले आहेत. राजारामपुरीतील मुख्य मार्गाला पर्याय असलेल्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. मात्र रस्त्याकडेला वाहने लावली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

राजारामपुरीतील बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मुख्य मार्गावरील काही रस्त्यांचे एका बाजूला डांबरीकरण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूचे सपाटीकरण करून डांबरीकरण होणार आहे. आरईइन्फ्रा कंपनीकडे कामाचा ठेका आहे. रस्ता दर्जेदार आणि नागरिकांच्या सोयीसाठी जलदगतीने काम पूर्ण करण्यासंदर्भात ठेकेदाराला कळविले आहे.

- मुरलीधर जाधव, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निखिलचे भारतीय संघात ‘कदम’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ढाका (बांगला देश) येथे होणाऱ्या एएफसी २३ वर्षाखालील चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्यया भारतीय संघात कोल्हापूरच्या निखिल कदमचा समावेश झाला आहे. निखिल सध्या पुणे एफसीकडून खेळत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक सेविओ मदिरा यांनी संघाची घोषणा केली असून भारतीय संघात निवड होणारा निखिल हा कोल्हापूरचा पहिलाच खेळाडू आहे. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये असताना निखिल फुटबॉलकडे आकर्षित झाला. त्याने अल्पावधीत फुटबॉलचे कौशल्य प्राप्त करत १४, १७ व १९ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय स्पर्धेत चमक दाखवली.

फुटबॉलमधील त्याची घोडदौड पाहून फुटबॉल खेळाडू असलेल्या वडील सुरेश यांनी त्याला पुणे क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. स्थानिक कामगिरी पाहून त्याला पुणे एफसी संघाने करारबद्ध केले. त्याने संघाला १२ वर्षाखालील आय-लीगचे विजेतेपद एकहाती मिळवून दिले. याच कामगिरीने त्याची वरिष्ठ संघात निवड झाली. गेल्यावर्षी झालेल्या आय-लीग स्पर्धेत सर्वाधिक सहा गोलची नोंद त्याने केली. याच कामगिरीने त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरात निवड झाली. दोन आठवड्याच्या शिबिरानंतर संघाची घोषणा केली. यामध्ये त्याचा समावेश झाला. २७ मार्चला रोजी भारतीय संघाचा पहिला सामना उझबेकिस्तान संघाबरोबर होणार आहे. भारताच्या गटात सीरिया व बांगला देश संघाचा समावेश आहे.

२००६ मध्ये पुणे क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले होते. निखिलने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करावे, अशी इच्छा होती. पुणे एफसीकडून खेळताना देदीप्यमान कामगिरी केल्यानेच त्यांची संघात निवड झाली आहे. त्याच्या निवडीने आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे.

- सुरेश कदम, निखिलचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिस्तुलाचा प्रकार उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे हत्येच्या तपासातील महत्त्वाचा पुरावा असलेला बॅलेस्टिक रिपोर्ट सोमवारी कोल्हापूर पोलिसांना प्राप्त झाला. या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशील असल्याने रिपोर्टचा तपशील देण्यास तपास अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी नकार दिला. पानसरेंच्या हत्येसाठी फासेपारधी समाजातील एकाला २५ लाखाची सुपारी दिल्याचे वृत्त निराधार असल्याचा खुलासा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

पानसरे यांच्यावर दोन हल्लेखोरांनी स्वतंत्र पिस्तुलांतून गोळ्या झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये पिस्तुले कोणत्या बनावटीची होती, हे स्पष्ट झाले आहे. या रिपोर्टच्या आधारे कोल्हापूर परिक्षेत्रात यापूर्वी गोळीबाराच्या किती घटना घडल्या याची माहिती घेऊन तपास सुरू राहणार आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या इचलकरंजीच्या मनीष नागोरीने विक्री केलेल्या पिस्तुलातून झाल्याचा असा संशय होता.

पानसरे यांच्या हत्येची २५ लाखाची सुपारी घेतल्याबाबतच्या वृत्ताचा पोलिस अधीक्षक शर्मा यांनी खुलासा केला. एका दैनिकात ('मटा' नव्हे) आलेल्या या वृत्ताबाबत राज्यातील फासेपारधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्मा यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. गोविंदराव पानसरे व नागनाथअण्णा नायकवडी यांनी फासेपारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कष्ट घेतले असताना त्यांच्या हत्येप्रकरणी फासेपारधी समाजाचे नाव आल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तपासात या समाजातील कुणालाही ताब्यात घेतले नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. रोज ४० संशयितांची तपासणी केली जात आहे. आजअखेर चारशे वाहनांचा तपास केला असून, या हत्येसंबधी काहीही धागेदोरे सापडले नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांचे शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाने शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या समर्थकांनीही अर्ज दाखल केले. गोकुळसाठी अनेक अर्ज अनपेक्षितपणे दाखल करण्यात आले असून विद्यमान संचालकांच्या वारसदारांनीही उमेदवारी दाखल केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी न मिळाल्यास विरोधी गटात जाण्याची तयारीही अनेक उमेदवारांनी दाखविली आहे. गोकुळच्या १८ जागांसाठी २५० उमेदवारांनी ३८३ अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी मंगळवारी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

अरुण नरके यांचे पुत्र संदीप, स्नुषा नीता नरके यांनी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान अध्यक्ष दिलीपराव माने पाटील यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रवींद्र आपटे, उदय पाटील, धैर्यशील पाटील, दीपक पाटील आणि ज्योती पाटील, दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील आणि पत्नी जयश्री पाटील यांचा अर्ज महिला राखीवमधून दाखल करण्यात आला आहे. अंबरिशसिंह घाटगे आणि त्यांच्या मातोश्री विद्यमान संचालक अनुराधा घाटगे, दिवंगत राजकुमार हत्तरगी यांचे पुत्र सदानंद हत्तरकी, राष्ट्रवादीचे अरुण इंगवले, भाजपचे बाबा देसाई, के. एस. चौगुले, वैशाली देसाई यांच्यासह बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले, रामराज कुपेकर, राहुल अशोक देसाई, भूषण पाटील, राजेश नरसिंगराव पाटील, राहुल आवाडे, बाळासाहेब कुपेकर, कर्णसिंह गायकवाड, विश्वासराव इंगवले, अंजना रेडेकर, संजीवनीदेवी गायकवाड, राजू जयवंतराव आवळे आदींनी उमेदवारी दाखल केली आहे.

गोकुळसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी मंगळवारी सकाळी ११ पासून करण्यात येणार असून त्यासाठी फक्त उमेदवार किंवा त्याने प्राधिकृत केलेला सूचक यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

- अशोक पाटील, मुख्य निवडणूक अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतील तोडफोड प्रकरणी नऊ जणांना पोलिस कोठडी

$
0
0

नितीन खैरमोडे, पाटण

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयनानगर येथील कोयना धरणाच्या प्रकल्पावर ठेकेदार कंपनी म्हणून काम करत असलेल्या पटेल इंजिनिअरींग कंपनीच्या नवजा (कोयनानगर) मधील कार्यालयामध्ये स्थानिकांनी घुसून तोडफोड केली होती. याप्रकरणी अटक केलेल्या नऊ जणांना पाटण कोर्टाने मंगळवारी पोलिस कोठडी दिली आहे.

स्थानिकांना कंपनीमध्ये कामास घेण्याच्या कारणावरून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये कंपनीचे सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी कंपनीने कोयनानगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत रवींद्र शंकर शेलार, सत्यजित उर्फ बंटी राजाभाऊ शेलार, अंकुश रामचंद्र कदम, महेश रामचंद्र शेलार, संदीप शेलार, गणेश कदम, हेमंत चव्हाण, बापू देवळेकर, आनंदा कदम यांना अटक करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी दुपारी पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारी कोयनानगर येथे सातारा मुख्यालयातून १५ पोलिस, मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, पाटणचे चार अतिरीक्त पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी कोयनानगरला ठाण मांडून होते. कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी मितेश घट्टे यांनी कोयनानगर व घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंक्यतारा किल्ल्यावर पुन्हा आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

अजिंक्यतारा किल्यावरील स्मृतिवनास मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा आग लागली. ही आग सायंकाळपर्यंत धूमसत होती. किल्ल्याच्या पश्चिम बाजूकडील समर्थ मंदिराच्या वरील भागात ही आग लागली होती.

किल्यावरील स्मृतिवनास या हंगामात लागलेली ही तिसरी आगीची घटना आहे. अज्ञातांच्या विघातक कृत्यांनी हजारो पक्षी, किटक, वनस्पती यांना या आगीत जळून खाक झाले. आगीच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाने अनेकदा जाहीर आवाहने केली आहेत. तरीही अज्ञाताने या परिसरात पेटत्या काड्या टाकल्याने आग लागली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दुपारी एकपासून आगीच्या ज्वाळा उंचच उंच गेलेल्या दिसत होत्या. तर अवकाशात उंचावर धुराचे लोळ गेले होते.

आगीत गुलमोहोर, नील माहोर, सुबाभूळ, सागवान, निलगिरी, चंदन, सावर, शेवरी, ओक आदी जातीचे अनेक वृक्ष जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचा पत्ता सायंकाळपर्यंत लागला नव्हता. मात्र, अशा कृत्यांना वेळीच आवरणे गरजेच आहे. आग सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन युवती ठार

$
0
0

कराड : भरधाव ट्रॅक्टरने दोन वेगवेगळ्या सायकलवरून निघालेल्या दोन महाविद्यालयीन युवतींच्या सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक युवती जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना वाठार ते रेठरे बुद्रूक रस्त्यावरील रेठरे खुर्द बसथांब्याजवळ घडली. सारिका अर्जून नलवडे (१९, रा. रेठरे खुर्द) असे मृत युवतीचे नाव आहे. या अपघातात ऋतुजा सतीश नलवडे (१७, रा. रेठरे खुर्द) ही युवती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रेठरे खुर्द (ता. कराड) येथील मुले व मुली सायकलवरून वाठार ते रेठरे कारखान्याला जाणाऱ्या रोडवरून शिवनगर(रेठरे बुद्रूक)येथे शाळेला व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ये-जा करत असतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यानंतर सारिका अर्जून नलवडे व तिची मैत्रिण ऋतुजा सतीश नलवडे या दोघी आपआपल्या सायकलवरून शिवनगर येथून रेठरे खुर्द येथील घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. रेठरे खुर्द येथील बसथांब्याजवळ आल्यानंतर ऋतुजा हिची सायकल पुढे तर सारिकाची सायकल काही अंतर मागे होती. या वेळी अचानक पाठीमागून मळी भरून आलेल्या ट्रॅक्टरने (एम एच ५० सी ४८८) दोघींच्या सायकलला जोराची धडक दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड तालुका झाला ऑनलाइन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

कराड तालुक्यातील सर्व ७/१२ संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. फेरफार नोंदणीचे कामही ऑनलाइन होणार असून, येत्या ३० मार्च २०१५पासून कराड तालुक्यात ऑनलाइन ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. कराड तालुक्यातील ई-फेरफार प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. अद्यावत अधिकार अभिलेखाचा डेटा स्टेट डाटा सेंटर मुंबई येथे ठेवण्यात आला आहे. कराड तालुक्यासाठी ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी ३० मार्चपासून करण्यात येणार आहे. ३०मार्च पासून हस्तलिखित ७/१२, फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवहीमधील हस्तलिखीत कामकाज बंद करण्यात येणार आहे. कराड तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी त्यांच्या सझातील हस्तलिखीत ७/१२, फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही कराड तहसील कार्यालयात जमा कराव्यात. हस्तलिखीत ७/१२ व ३० मार्चपासून होणारे फेरफाराचे उतारे व ८ अ नोंदवहीचे हस्तलिखीत वितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांचे ७/१२ संगणकीकरण व ई-फेरफार आज्ञावलीचे कामकाजही प्रगती पथावर असून, लवकरच इतर तालुक्यांसाठीही या आज्ञावलीचा वापर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली महापालिकेवर फौजदारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

दहा लाखाच्या बँक गॅरंटी जप्तीच्या कारवाईनंतरही सांडपाणी आणि घन कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या विरोधात प्रदूषण महामंडळाने अखेर फौजदारी दाखल केली. प्रादेशिक प्रदूषण महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने सांगलीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दहा मार्च रोजी फौजदारी केल्याची माहिती महामंडळाचे सांगलीतील अधिकारी जयवंत हजारे यांनी सांगितले. दरम्यान, पालिका प्रशासन या बाबत अजून अनभिज्ञच आहे.

महापालिका क्षेत्रातील सांडपाणी विविध नाल्यांतून थेट कृष्णा नदीच्या पाण्यात मिसळत आहे. त्याच नदीचे पाणी पिण्यासाठी संपूर्ण शहराला पुरविले जाते. दुषित पाण्यामुळे वारंवार साथीचे आजार पसरुन नागरिकांचा जीव धोक्यात जातो. या संदर्भात कारवाईचा बडगा उगारताना प्रदूषण महामंडळाने महापालिकेकडे दहा लाख रुपयांची बँक गॅरंटी भरण्यास भाग पाडले होते. बँक गॅरंटीनंतर नियोजित कालावधित सांडपाणी नदीत मिसळण्याने रोखले गेले नाही, किंवा त्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारली नाही. म्हणून महामंडळाने दहा लाखाची बँक गॅरंटी जप्त केली. पुन्हा पंचवीस लाखांची बँक गॅरंटी देण्याचे आदेश दिल्यानंतर आजतागायत महापालिकेने त्याची पुर्तता केलेली नाही. त्याबाबत न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढूले होते. या पार्श्वभूमीची दखल घेऊन प्रदूषण महामंडळाने थेट फौजदारी दाखल केली आहे. यामध्ये महापालिकेचे आयुक्त, ड्रेनेज आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान प्रदूषण महामंडळाने फौजदारी दाखल केल्याबाबत महापालिकेशी संपर्क साधला असता आरोग्याधिकारी डॉ. सुनील अंबोळे यांनी संबधित फौजदारीबाबत अद्याप आपल्याकडे कोणतीही माहिती आली नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय कबड्डीपट्टूची जामिनावर मुक्तता

$
0
0

कराड : कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिला कबड्डी खेळाडूवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग रामचंद्र आडके (रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांची कराड कोर्टाने मंगळवारी जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, आडके विरोधात कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित युवतीने या बाबत फिर्याद दिली आहे.

काशिलिंग याने लग्नाचे अमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर बळजबरीने कॅम्पवर व रूमवर नेऊन बळजबरी केली. त्याच्या सोबतचे फोनवरील रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. शरीर संबंधास नकार दिल्यास ठार मारण्याची धमकीही तो देत होता. फोनवरून शिव्या देणे, धमकी देणे असे प्रकार त्याने सुरू केले आहेत. तो मला आत्महत्येला तो प्रवृत्त करीत आहे, असेही संबधित तरुणीने म्हटले आहे. आमचे प्रेम प्रकरण आडकेच्या घरीही माहित असल्याचे तिने सांगितले आहे. कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात काशिलिंगवर ३७६(२), ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ कोटींची घरपट्टी, पाणीपट्टी वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत ४२ कोटी रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी दिली.

अडसूळ म्हणाले, 'ही वसुली अंदाजे ८० टक्के इतकी आहे. मार्चअखेर ती ९० टक्क्यांपेक्षा अधिक होईल अशी अपेक्षा आहे. या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच या वसुलीसाठी गावपातळीवर नळजोडणी तोडणे, दाखले-उतारे देणे बंद करणे आदी पावले देखील उचलण्यात आली आहेत. निरनिराळ्या मार्गानी जास्तीत-जास्त वसुली करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.'

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची एकूण पाणीपट्टी २२ कोटी ३२ लाख रुपये इतकी होती. फेब्रुवारीअखेर यापैकी १७ कोटी ३२ लाख रुपये वसूल झाले. मार्च महिन्यात वसुलीला चांगली प्रतिसाद मिळत आहे. घरपट्टीची एकूण मागणी २८ कोटी ३६ लाख होती, त्यापैकी २० कोटी ३६ लाख रुपये फेब्रुवारीअखेर वसूल झाली. थकबाकी न भरणाऱ्यांच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित थकबाकीदारांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे.

पवनचक्क्यांची थकबाकी मोठी

अनेक ठिकाणी पवनचक्क्यांकडेही मोठ्या प्रकाणात कर थकबाकी आहे. काही कंपन्यांवर २०१०पूर्वीचीही थकबाकी आहे. या पवनचक्क्यांच्या चालकांनी जर त्वरित थकित रक्कम भरली नाही, तर त्यांच्या जमिनीवरही बोजा चढविला जाईल. येत्या मे अखेर सर्व प्रकारची कायदेशीर कारवाई करून १०० टक्के वसुली करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासगावमध्ये बावीस अर्ज दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १९ जणांनी २२ उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार सुमन रावसाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात कोणाताही राजकीय पक्ष निवडणुकीत उतरला नसला तरी अपक्षांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये भाजप नेत्यांच्या कट्टर समर्थकांचा समावेश असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारच्या अखेरच्या दिवशीच इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली. यामध्ये केवळ तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज बरोबरच मुंबई, सातारा, सांगोला, मंगळवेढा आदी ठिकाणाहून इच्छुक धावत आले होते. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मंगळवारी सकाळपासूनच तासगावात एकत्र येत होते. दुपारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, मदन पाटील, वसंत डावखरे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, आमदार दीपक शिंदे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसच्या शैलजा प्रकाशबापू पाटील, यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. तासगावच्या मार्केट यार्डातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली. अत्यंत शांतपणे, कोणत्याही घोषणा न देता सुमन पाटील, आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता, चिरंजीव रोहित हे सर्व नेत्यांबरोबर रॅलीत अग्रभागी होते. अर्ज दाखल केल्यानंतर तटकरे यांनी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले.

दरम्यान, अपक्षांमध्ये स्वप्नील दिलीप पाटील (सावर्डे) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कवठेमहांकाळचे सरपंच सुनील माळी, ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर झांबरे उपस्थित होते. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अखेरपर्यंत ही निवडणूक पक्षाने लढवावी, असा आग्रह धरला होता. शिवाय पक्ष उमेदवार देणार नसेल तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे सध्यातरी दिसत नाही. २५ मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून, २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अर्ज माघारीनंतरच या निवडणुकीचे नेमके चित्र समोर येणार आहे.

राज्यभरातून अपक्ष अर्ज दाखल

अपक्ष म्हणून स्वप्नील पाटील, संजय विलास बाबर (सांगोला), भारत दिगंबर गडहीरे (सांगोला), आनंदराव ज्ञानू पवार (तासगाव), अलंकृता अभिजीत आवाडे (सातारा), सुभाष वसंत अष्टेकर (तासगाव), विजयकुमार आप्पासो सगरे (कवठेमहांकाळ), नानासाहेब आनंदराव शिंदे (जरंडी), विक्रातसिंह माणिकराव पाटील (अंजनी), रावसाहेब शिवाजी पाटील (मणेराजुरी), किशोर दिनकर उनउने (सावळज), सतीश भूपाल सनदी (मालगाव), गुलाब शंकर माने (आगळगाव), सरिता रामचंद्र लांडगे (मणेराजुरी)आदींनी अर्ज भरले.

अनामत रक्कम उद्या भरतो...

मंगळवेढ्याहून उमेदवारी अर्ज घेऊन आलेल्या एकाला उमेदवारी अर्जाबरोबर अनामत रक्कम भरायची असते हेही ठाऊक नव्हते. अर्ज देताना हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तेथून तो परत फिरला. काही वेळाने पुन्हा येवून अधिकाऱ्यांना म्हणाला, 'नुसता अर्ज घेऊन ठेवा की, अनामत रक्कम उद्याला आणून भरतो,' अशा हौशी अपक्ष इच्छुकही पहावयास मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबावर सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने जय्यत तयारी केली असतानाच पोलिस प्रशासनाने पालखी मिरवणुकीचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान संपूर्ण मिरवणुकीवर १६ सीसी ​टीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. गर्दीचा फायदा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानेही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

३ एप्रिल रोजी वाडी रत्नागिरीत होणाऱ्या जोतिबा यात्रेच्या पा​र्श्वभूमीवर ​जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मानकरी, स्वयंसेवकांची बैठक सोमवारी घेण्यात आली. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

दरम्यान, जोतिबा यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक येत असल्यामुळे नियोजनावर भर देण्यात येणार आहे. यासाठी फोल्डिंग पूल असलेली दर्शनरांग तयार करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात ऑनस्क्रिन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच जोतिबा मंदिराच्या दक्षिण दरवाजा आणि सेंटर प्लाझा याठिकाणीही स्क्रिन लावण्यात येणार आहेत. यात्रेदिवशी पार्किंगचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर असतो.

यावर्षी पार्किंग जागेवर वाहनांचा गोंधळ होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी लाईट आणि स्पीकर्सची सोय करण्यात आली आहे. भाविकांसाठी २० वैद्यकीय अधिकारी सज्ज ठेवण्यात येणार असून दोनशे कर्मचारी प्रथमोपचारासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

संपूर्ण यात्राकाळात ४०० पोलिस तर देवस्थानचे अडीचशे कर्मचारी सुरक्षेसाठी कार्यरत असतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून यावर्षी यात्रेच्या काळात जोतिबा मंदिर परिसरातील सर्व हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते यांना अन्न औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू स्मारकासाठी ४० लाख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

गेल्या पंधरा वर्षापासून अधिक काळ केवळ आर्थिक निधीच्या अभावी प्रलंबित असलेल्या राधानगरी धरणस्थळावरील नियोजित शाहू स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी तब्बल ४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

त्यातून धरणाच्या पायथ्याशी म्यूरल शिल्पाच्या माध्यमातून शाहूंचा इतिहास उभारला जाणार असल्याने शाहूप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या राधानगरी धरणाची उभारणी तत्कालीन काळातील करवीर संस्थांनाचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी केली. त्यामुळे धरणावर त्यांच्या यथोचित स्मारकाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आर्थिक निधीची कमतरता आणि जागेचा अभाव यामुळे तालुका व परिसरातील जनतेने वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांना याकामी मर्यादाच येत होत्या. त्यातच नियोजित जागेवर एका खासगी कंपनीने अतिक्रमण केल्याने स्मारकाच्या आशा पूर्णपणे मंदावल्या होत्या. मात्र जिल्हा परिषदेच्या निर्णयाने स्मारकाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या मंगळवारी मांडलेल्या ६२ कोटींच्या अर्थ संकल्पात अर्थ व शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे यांनी या स्मारकासाठी तब्बल ४० लाखांची विशेष तरतूद केली. अध्यक्ष विमल पाटील,उपाध्यक्ष शशिकांत खोत व पदाधिकारी यांच्यासह सर्व सभागृहाने त्यास एकमताने मान्यता दिल्याने स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. धरणाच्या पायथ्याशी आकर्षक बाग-बगीचा,विद्युत रोषणाई,शाहूंच्या अर्धपुतळा व म्यूरल शिल्पांतून शाहू महाराज व राजाराम महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास स्मारकातून उभारला जाणार आहे. त्यासाठी लोकसहभाग आणि तज्ज्ञांची समिती गठीत केली जाणार असल्याचेही तायशेटे यानी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>