Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाटील प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

$
0
0

रविवारी हुपरी येथे होणार वितरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हुपरी (ता.हातकणंगले) येथील स्वातंत्र्यसेनानी एल.वाय.पाटील प्रतिष्ठानचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार वितरण रविवारी (ता.१५) होणार असून प्रा. श्याम येडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ.पी.जी.कुलकर्णी या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून प्राचार्य टी. एस. पाटील, श्याम कुरळे आणि सामाजिक कार्यकत्या वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराव बापूसो पाटील आणि सचिव बाळासाहेब खैरे यांनी दिली.

प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी आणि डॉ. शिवाजीराव हिलगे, आदर्श गृहिणी पुरस्कार संगीता कामते, समाजसेवा पुरस्कार राजेश तावडे, प्रफुल्ल पांढरे, बाळासाहेब इंग्रोळे आणि दगडू शेंडे यांना देण्यात येणार आहे.

या प्रसंगी प्रा. श्याम येडेकर लिखित 'जैनधर्म उदगम आणि वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पी.जी. कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर वरदविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरीब, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्याथ्यांना मदत प्रदान केली जाणार आहे. शेतीमाल प्रक्रिया संस्था हुपरी, केंद्र प्राथमिक शाळा येथे होणाऱ्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन पाटील आणि खैरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजरेकरांची स्वप्नपूर्ती

$
0
0

नगरपंचायतीसाठी केलेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना मिळणार यश

रमेश चव्हाण, आजरा

१९९०च्या सुमारास युवा स्थितीत असलेल्या अनेकांना गेल्या काही वर्षांपासून आजरा शहराच्या सर्वंकष विकासाची आस लागलेली होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या अथक प्रयत्नांना मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिसादाने सगळेच घटक अस्वस्थ होते. ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधी आघाडीच्या अनेक सदस्यांचाही त्यासाठी नेहमीच आग्रह राहिलेला. गेल्या दहा-बारा वर्षांपासून आजरेकर येथील ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा मिळावा व त्याअनुषंगाने मिळणाऱ्या सोयी-सुविधांसह सरकारच्या विविध योजनांच्या आधारे संपूर्ण चेहरा-मोहरा बदलून शहराला एक वेगळे स्वरूप प्राप्त व्हावे, हे येथील ग्रामस्थांचे स्वप्न होते. अखेर सरकारच्याच तालुकास्थळास नगरपंचायत स्थापण्याच्या धोरणामुळे का असेना आजरा नगरपंचायतीचे स्वप्न अखेर सफळ झाले. या निर्णयाचे आजरावासीयांकडून स्वागत होत आहे.

सन २०११ नुसार आजरा शहराची लोकसंख्या साधारणतः १७ हजार, तर क्षेत्रफळ ७८८ हेक्टर आहे. तरीही या गावात सुमारे पंधरा उपनगरांसह नजीकच्या चित्री धरणामुळे विस्थापित झालेल्या आवंडी वसाहतीचाही समावेश होतो. अशा सर्व घटकांना समाविष्ट करीत तोकड्या निधीच्या आधारे मूलभूत तरीही कमाल गरजा पुरविण्याचे महत्कार्य येथील प्रशासन करते आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी स्व. बाबासाहेब कुपेकरांच्या सहाय्याने नवी पाणीयोजना राबविल्याने येथील नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना वेगळेच धुमारे फुटले, पण सरकार दरबारी आजरा नगरपंचायतीचा प्रस्ताव पुढे जात नसल्याचे शल्य होते.

गेल्या काही वर्षांत सरकारच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांबाबतच्या योजनांमुळे येथे नागरिकांच्या वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर येत होता. नगराची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता येथे विकासाला फार संधी नाही. तरीही आजूबाजूच्या गावांमधील क्षेत्रात सध्या वसाहती विस्तारत आहेत, पण भविष्यात याचा फायदा संबंधित ग्रामपंचायतींनाच मिळू शकतो. अशा स्थितीत नगरपंचायत स्थापन करीत येथील गावची हद्द वाढवून संबंधितांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नांना आता यश मिळू शकते. या शक्यतेने संपूर्ण आजरावासीयांत उत्साहाचे वातावरण आहे.

काशिनाथ चराटींच्या दूरदृष्टीचे यश

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसह वसाहतींच्या मूलभूत सुविधा पुरविणे प्रस्थापित ग्रामपंचायतीला अशक्य असल्याने पंचवीस वर्षांहूनही अधिक काळ आजरा ग्रामपंचायतीची सत्ता हातात ठेवणाऱ्या स्व. काशीनाथ चराटी यांनीच नगरपंचायतीचे स्वप्न पाहिले व त्या दृष्टीने प्रयत्न केले. मात्र, राजकीय पटलावरील घडामोडींच्या अनुषंगाने ते मागे राहिले. सध्या त्यांचे पुत्र अशोक चराटी ग्रामपंचायतीचा गाडा स्वनेतृत्वाखाली हाकत आहेत. या निर्णयाने आता शहरवासीयांना सुविधा पुरविणे शक्य होणार असून, स्व. चराटी यांचे स्वप्न साकार होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.

पर्यटनालाही मिळणार चालना

आजरा नगरपंचायतीचे स्वप्न अखेर साकार होणार असल्याने आजरेकरांत उत्साहाचे वातावरण आहे. नगरपंचायत झाल्याने विकासाची प्रचंड क्षमता असणाऱ्या या शहराचा वेगाने विकास होण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने निधी खेचण्यातही मदत होणार आहे. निसर्गरम्य परिसर असणाऱ्या आजऱ्याच्या पर्यटनविकासाला नगरपंचायत झाल्यास चालना मिळणार आहे. अनेक वर्षांच्या मागणीला या निर्णयामुळे पूर्णत्व येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा बॅँकेतर्फे 'सावित्री' योजना

$
0
0

कोल्हापूर : महिला दिनाच्या औचित्याने वारणा बॅँकेत महिलांसाठी सुवर्ण महोत्सवी सावित्री वाहन कर्ज योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेतील पहिल्या ग्राहक श्रद्धा सबनीस यांना कारच्या चाव्या तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभा कोरे यांच्या हस्ते देण्यात आल्या. विलासराव कोरे कला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा कोरे आणि वारणा महिला पतसंस्थेच्या शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते कारचे पूजन झाले.

बॅँकेचे चेअरमन निपुण कोरे म्हणाले, 'कॉलेज युवतींपासून ते गृहिणींनादेखील या योजनेत दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करता येणार आहे. फक्त ११ टक्के व्याजदाराने वाहनाच्या मूळ किंमतीच्या १०० टक्के कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. या कर्जासाठी मासिक हप्ता प्रती हजारी २१ रुपये इतका आहे.'

२०१५ आणि २०१६ हे बॅँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध योजना राबवल्या आहेत. यावेळी उपाध्यक्ष उत्तम पाटील, ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड, बँकेचे एम. डी. विकास लंगरे, जनरल मॅनेजर नंदन माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एव्हीएच’चे कोट्यवधींचे नुकसान

$
0
0

प्रकल्पस्थळी तिसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्त, बंदी आदेश जैसे थे

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

पाटणे फाटा येथील औद्योगिक वसाहतीमधील एव्हीएच प्रकल्पावर शनिवारी आंदोलनकांनी तोडफोड करुन जाळपोळ केली. कंपनीच्या गाड्या, रेस्ट हाऊस, कर्मचाऱ्यांना मारहाण, अधिकाऱ्यांच्या गाड्यांची जाळपोळ करुन पोलिसांच्या गाड्यांचीही मोडतोड केली. या प्रकरणी ५०० आंदोलकांवर गुन्हा नोंद केला असून चंदगड पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. कंपनी परिसर व पाटणे फाट्यावर बंदी आदेश लागू करण्यात आला असून घटनास्थळी २०० पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार पावणेपाच कोटीचे नुकसान झाल्याचे चंदगड पोलिस निरिक्षक अंगद जाधवर यांनी सांगितले.

कंपनीच्या म्हणण्यानुसार २५ कोटींचे तर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास पावणेपाच कोटींचे नुकसान झाले असल्याची माहीती आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदाताई बाभूळकर, अॅड. संतोष मळविकर, रामराजे कुपेकर, रवि नाईक आदींसह ५०० आंदोलकावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मान्यता सरकारी नियमानुसार असल्याचा कंपनीचा खुलासा

दरम्यान, सरकारच्या सर्व नियम व अटींचे पालन करुन हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीमध्ये एव्हीएच प्रकल्प उभारल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एव्हीएच विरोधात लोकांच्यामध्ये जो गैरसमज पसरविला जात आहे. त्याविषयी कंपनी स्पष्टीकरण देण्यास तयार आहे. एव्हीएच विरोधात नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून अफवा पसरविण्याचे काम सुरु आहे. ते समाजात चुकीची माहीती पसरवून समाजाच्या एका वर्गाला भडकविण्याचे काम करत आहेत. त्यानूच शनिवारची घटना घडली असल्याचे कंपनी दिलेल्या खुलासावजा प्रसिध्दी पत्रकामध्ये म्हटले आहे. पत्रकात म्हटले आहे, कंपनीचे हलकर्णी येथील युनीट जपानी तंत्रज्ञानावर आधारित आहे. कंपनीतून कोणत्याही मानवी व पर्यावरणात्मक धोका व गंभीर परिणाम दिसून आलेले नाहीत. ही कंपनी देशातील एकमेव कंपनी असून जिला योग्य पर्यावरणात्मक मान्यता मिळालेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’च्या संचालकांनी मागितली मुदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना सुरु करण्यासाठी संचालक मंडळाने २५ मार्चपर्यंत मुदत मागितली आहे. या कालावधीमध्ये दौलत कारखाना चालविण्यासाठी सक्षम पार्टी न आणल्यास स्वतःहून आम्ही सर्व संचालक मंडळ तहसिलदार यांच्याकडे सामूहिक राजीनामे देण्याचे मान्य केले आहे. याबाबतचे पत्र संचालक मंडळाने तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना दिले आहे.

चंदगड येथे सभासद, दौलत बचाव संघर्ष समिती व दौलतचे संचालक मंडळ यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी 'दौलत'साठी पार्टी आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून यामध्ये अपयश आल्यास आपण स्वतःहून राजीनामे देणार अशी आशयाचे पत्र संचालक मंडळाने तहसीलदारांकडे दिले. हे पत्र तहसीलदार श्री. समिंदर यांनी दौलत बचाव संघर्ष समितीचे डॉ. सुभाष जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. जाधव यांनी या पत्राचे वाचन सर्वांसमोर केले. त्यामुळे अंतिम मुदत २५ मार्चचीच असून त्यापुढील काळात दौलत बचाव संघर्ष समिती आपल्या पध्दतीने निर्णय घेईल, असे सांगितले. यावेळी अ

अॅड. संतोष मळविकर, प्रा. जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, महादेव फाटक, विजयभाई पाटील यांच्यासह कामगार व सभासद उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदासीनतेमुळेच उद्रेक

$
0
0

एव्हीएच कंपनीची मुजोरी आणि प्रशासनाचे धोरण नडले

संपत पाटील, चंदगड

एव्हीएच प्रकल्पाविरोधात लोकांच्या भावना तीव्र असताना सरकारी दरबारी त्यांची दखल घेतली गेली नाही. केवळ आश्वासने देवून जनतेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. प्रकल्पाविरोधात मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे आदी मार्ग अवलंबिले गेले, मात्र कोणत्याही मार्गाला यश मिळत नव्हते. कंपनी आपल्या जीवावर उठल्याची भावना लोकांच्यात होती. त्यातूनच लोकभावनेचा शनिवारी उद्रेक झाला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन काहीही पदरात पडत नाही, हे पाहून चंदगडकरांनी रुद्रावतार धारण करत कोणत्याही नेतृत्वाशिवाय हिंसक आंदोलन केले. मात्र याला सर्वस्वी कंपनीसह सरकारी यंत्रणा व नेतेमंडळी जबाबदार आहेत.

चंदगड तालुका हा निसर्गसंपन्न असून तो सह्र्याद्रीच्या पश्चिम घाटात येतो. येथील निसर्ग मनाला भुरळ घालणारा आहे. येथील जनता कष्टाळू आणि सहनशील आहे. मात्र सहनशीलतेचा बांध फुटला की, काय अनर्थ घडतो, याचे उदाहरण म्हणजे शनिवारची घटना.

तीन वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाले. प्रारंभी प्रकल्प काय आहे हे कोणालाही माहीत नव्हते. दोन-तीन सुशिक्षित तरुण व काही जाणकार मंडळींनी कंपनीचा 'एव्हीएच केमिकल्स' असा फलक पाहून कंपनीविषयी चौकशी केली असता कंपनीमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती घेवून जनतेला सूचित केले. त्यावेळी पहिले आंदोलन होऊन कंपनीचे बांधकाम सुरु असताना बांधकामाची मोडतोड करण्यात आली. तरीही कंपनीने विरोध न जुमानता नेतेमंडळी व सरकारी यंणत्रेला हाताशी धरुन आपले काम सुरुच ठेवले. या विरोधात वेळोवेळी जनतेने मोर्चे, आंदोलने, उपोषणे व रास्ता रोको करुन लोकभावना सरकारला दाखवून दिल्या. दरम्यान, सरकार बदलल्यानंतर आपले गाऱ्हाणे सरकारी दरबारी ऐकले जाईल अशी लोकांना आशा होती. मात्र वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांना अपयशच पदरी पडले. विरोध डावलून कंपनीचे बांधकाम पूर्ण झाले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत डोके व समितीने प्रकल्पस्थळी पाहणी करुन १६ त्रुटी दाखविल्या. त्यानंतर मात्र काहीच दिवसात कंपनीला `कंन्सेट टू ऑपरेट` या तत्वावर कंपनीला उत्पादनाला परवानगी देण्यात आली. त्याअगोदर ट्रायलच्या नावाखाली कंपनीतून उत्पादन सुरु होते. उत्पादन परवाना मिळाल्यानंतर एव्हीएच विरोधी जनआंदोलन कृती समितीच्या वतीने मोर्चे, आंदोलने, उपोषण व रास्ता रोको करुन विरोध दर्शविला. मात्र त्याचाही कोणताही परिणाम झाला नाही. मात्र सर्वत्र पातळीवर आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली जायची. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चंदगड पंचायत समितीमध्ये झालेल्या बैठकीत प्रातांधिकारी कुणाल खेमनार यांनी दोन्ही बाजू एकून घेवून कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली. मात्र त्यांनी दिलेली स्थगिती एवघ्या दोन तासातच उठविली. जनआंदोलन कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर चंदगडकरांनी मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश मिळाला नाही, कंपनीला स्थगितीचा आदेश देण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे लोकांच्या असंतोषात भरच पडली.

...अन्यथा पुन्हा पुन्हा आंदोलने

नेत्यांच्या आश्वासनावरील लोकांचा विश्वास उडाला असून जोपर्यंत कंपनी हद्दपार होणार नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा व नेतेमंडळी यांनी लोकांच्या भावना लक्षात घेवून सर्वसमावेशक निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा-पुन्हा अशा आंदोलनांना सामोरे जावे लागेल यात शंका नाही.

हाताला काम दूरच उलट आजाराला निमंत्रण

एव्हीएच कंपनी हलकर्णी एमआयडीसीतील ८५ एकर क्षेत्रात पसरली आहे. या कंपनीसाठी हलकर्णी नाईकवाड्यातील लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या आहेत. हाताला काम मिळेल या भावनेने लोकांनी एमआयडीसीसाठी जमिनी दिल्या. मात्र कामाचे दूरच उलट कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे येथील लोक आजारी पडू लागले. एकीकडे दोनवेळच्या जेवणाची तजवीज कशीबशी होत असताना आजारासाठी पैसे कोठून आणायचे याची चिंता लोकांना सतावू लागली. कोठेतरी जाऊन काम करायचे झाल्यास आजारपणामुळे कामही होत नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरावेचकांसाठी घरकुल योजना हवी

$
0
0

एकटी संघटनेचे जिल्हाधिका‍ऱ्यांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील कचरावेचकांच्या वस्त्यामधील बेघरांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी घरकुल योजना मंजुर करावी यासह अन्य मागण्यांसाठी एकटी संस्थेच्यावतीने नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना देण्यात आले.

जिल्ह्यातील कचरावेचक कुटुंबातील मुलांना सरकार निर्णयानुसार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती मिळावे, कचरावेचक कुटुंबाला अंत्योदय कार्ड मिळावे, या महिला असंघटीत क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना सरकारतर्फे ओळखपत्र द्यावे, त्यांना शूज, हातमोजे, सनकोट, टोपी देण्यात यावी, पुणे मॉडेलप्रमाणे रोजगार उपलब्ध करून द्यावेत, कचरावेचक कुटुंबाच्या शाळाबाह्य मुलांचा सर्वेक्षण करून शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे शिक्षणाचा हक्क द्यावा यांसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मागण्यांबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे अश्वासन दिले. आंदोलनामध्ये अनुराधा भोसले, शरयू भोसले, जैनुद्दीन पन्हाळकर, अमोल माने, मनीषा पोटे, पुष्पा कांबळे, राणी कांबळे, राजश्री गोसावी यांसह महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक काँग्रेसचा मूक मोर्चा

$
0
0

पानसरे यांच्या खुन्यांना अटक करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आठ दिवसात अटक करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला आता एक महिना होत आला तरी त्याचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. त्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने स्टेशन रोडवरील कांग्रेसचे जिल्हा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. मारेकऱ्यांना आठ दिवसात पकडता येत नसेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही पदे भूषविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

दिवंगत पानसरे यांनी पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार जोपासला आणि वाढविला. अन्यायाच्या विरोधात आणि गोरगरीब जनतेच्या बाजूने लढा उभा केला. कष्टकरी कामगारांचे, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, वंचित महिला, बेघर, अल्पसंख्यांकांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचे मारेकरी आणि त्यामागे असलेल्या शक्तीचा शोध घेतलाच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मूकमोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंभूराज देसाई, विद्याधर गुरबे, विष्णू पाटील, जितेंद्र यशवंत, रुपाली पाटील, योगशे कांबळे, राम पाटील, सरदार पाटील, उत्तम आंबवडेकर, वैभव तहसिलदार, संदीप पाटील, दीपक थोरात, कृष्णात धोत्रे, अमर देसाई आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनाअनुदानित शाळांचे मुंबईत आंदोलन

$
0
0

जयसिंगपूर : त्रयस्थ समितीमार्फत घेण्यात आलेल्या मूल्यांकनात अनेक त्रुटी राहिल्याने राज्यातील हजारो विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी अपात्र ठरल्या. या शाळांतील सुमारे ४० हजार शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ सोमवारपासून मुंबईत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू झाले आहे. समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी ही माहिती दिली.

जगदाळे म्हणाले, 'एकूण १३४३ शाळांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने त्रयस्थ समितीमार्फत मूल्यांकन करण्याचे ठरवले. त्यानुसार या समितीने जे मूल्यमापन केले, ते मनमानीपणाने केले. अधिकाऱ्यांनी सरकारची दिशाभूल करून राज्यभरातील ९० टक्के शाळांना अपात्र ठरवले. याचा परिणाम म्हणून विनाअनुदानित शाळांतील राज्यभरातील सुमारे चाळीस हजार शिक्षक व त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. अनेक शिक्षक अध्यापनाबरोबरच मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजराण करतात. त्यामुळे या शाळाबाबतच्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी पाठिंबा जाहीर केला आहे.'

यावेळी समितीचे मनोहर पवार, एम. एस. जाधव, एस. एस. चावरे, व्ही. जे. कोठावळे, आर. एस. काळे, इम्रान कोठीवाले, अमर पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाइट शेल्टरसाठी लवकर सर्व सुविधा

$
0
0

लक्ष्मीपुरीत इमारतीचे उद‍्घाटन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्यावतीने समाजातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांसाठी देण्यात आलेल्या नाइट शेल्टर इमारतीमध्ये लवकर सर्व सुविधा देऊ' असे आश्वासन महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आदिल फरास यांनी दिले. 'एकटी' सामाजिक संस्थेच्यावतीने समाजातील निराधार महिलांसाठी महापालिकेच्या सहकार्याने लक्ष्मीपुरी येथे नाइटशेल्टरची सुविधा करण्यात आली आहे. या इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागिरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक होत्या.

सभापती आदिल फरास म्हणाले, 'एकटी संस्थेच्या उपक्रमांमध्ये आम्ही नेहमीच सहभागी आहोत. त्यांच्या उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी महापालिकेने ही नाइट शेल्टरची सुविधा पुरवली आहे. नाइट शेल्टरच्या इमारतीमध्ये या पाणी, शौचालय आणि लाइटची सुविधा लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अन्य निराधार महिलांसाठी नाइट शेल्टरची सोय व्हावी यासाठी प्रयत्न करू.'

भागिरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा महाडिक म्हणाल्या, 'भागिरथी महिला मंडळाच्या माध्यमातून एकटी संस्थेला सर्व ते सहकार्य करू. या निराधार महिलांच्या सबलीकरणासाठी निश्चितच प्रयत्न करू.' यावेळी डॉ. सूरज पवार, डॉ. मंजुळा पिशवीकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे आदी उपस्थित होते. 'एकटी'च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविक केले. सचिव शरयू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. जैनुद्दीन पन्हाळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट सर्व्हेसह केला स्वतंत्र अभ्यास

$
0
0

'केएमसी'च्या विद्यार्थ्यांची अभ्यासापलीकडे झेप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एखाद्या विषयातील सखोल आकलन करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये(केएमसी) अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. बी. कॉम. भाग-१ च्या अभ्यासक्रमामध्ये 'प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग' हा विषय सेमीस्टर १ व सेमीस्टर २ करिता पूर्णपणे थेअरी स्वरूपात असून त्याकरिता विद्यापीठस्तरावर कोणत्याही प्रकारचा मार्केट सर्व्हे किंवा प्रोजेक्ट वर्क अनिवार्य नाही. असे असताना देखील या विषयातील सखोल आकलनासाठी स्वतंत्रपणे कोल्हापूर शहरात मार्केट सर्व्हे आणि स्टडी करण्यात आला.

केएमसी महाविद्यालयात या उपक्रमांतर्गत बी. कॉम. भाग १ च्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरामध्ये मार्केट सर्व्हे करून शहरातील मॉल्स, बझार, किराणा दुकाने, बेकरी दुकाने, इलेक्ट्रॉनिक शोरूम्स यांना भेटी देऊन विविध उत्पादनांची मार्केटिंगबाबतची माहिती गोळा केली. विविध संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मार्केट सर्व्हे करूनच समजून घेतल्या.

मार्केट सर्व्हेतून विद्यार्थ्यांनी सुमारे ३६० विविध नामवंत ब्रँड्सची मार्केटिंगबाबतची माहिती मिळवली. बी. कॉम भाग—१ करिता 'प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग' हा विषय केवळ थेअरी स्वरूपात असतानाही व मार्केट सर्व्हे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट याला कसलेही अतिरिक्त गुण नसताना देखील विषयाच्या सखोल ज्ञानासाठी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमामागील संकल्पना व त्यासाठीचे मार्गदर्शन हे प्रा. राजेंद्र मोगणे यांचे होते तर या उपक्रमास कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. व्ही. के. तिवाटणे व प्राचार्य एस. एस. गवळी यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफडीआय’विरोधात निदर्शने

$
0
0

विम्यातील परकीय गुंतवणूक देशाला घातक असल्याचा आरोप

‌म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमाक्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्केपर्यंत वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना विरोध म्हणून लाईफ इंडिया कॉर्पोरेशनच्या (एलआयसी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी एकदिवसांचा लाक्षणिक संप केला. या संपात जिल्ह्यातील चारशेहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. मंडोडी चौकातील एलआयसीच्या विभागिय कार्यालसमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

कोल्हापूर डिव्हिजन ऑफ इंडियन इन्शुरन्स युनियनचे जिल्हासचिव नरेंद्र फडके, नॅशनल ऑर्गनायझेशन इशन्शुरन्स वर्करसचे जिल्हासचिव नारायण लळीत, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे जिल्हासचिव संजय वडगावकर, क्लास ३ वर्करस फेडरेशनचे जिल्हासचिव सुधीर गद्रे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

फडके म्हणाले, 'लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये परकीय गुंतवणुकीच मर्यादा विनाकारण आणि बाह्य दबावामुळे वाढवली जात आहे. हा निर्णय सर्वसमान्य विमेदार आणि अर्थव्यवस्थेच्या हिताविरोधात आहे, हे लक्षात घेऊनच सर्व संघटनांनी विमाक्षेत्रात परकीय गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्याच्या विरोधातील भूमिका घेतली आहे. विमा आणि सर्वसाधारण विमा या दोन्ही क्षेत्रात ४२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांचे भारतीय मालक या कंपन्यांना आणखीन निधी उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. एआयसी आणि जीआयसी या दोन्ही महाकाय कंपन्या खासगीकरणच्या खाईत लोटून मोडून काढण्याचा सरकारचा डाव आहे. सन २००० मध्ये खासगी कंपन्यांचा भारतीय विमा क्षेत्रात शिरकाव झाला. या स्पर्धेतही एलआयसीने जागतिक पातळवरील प्रथम क्रमांक कधीही सोडलेला नाही. खासगी कंपन्यांचे दावे नकारण्याचे प्रमाण जवळपास १५ ते ७० टक्के आहे. हे लक्षात घेतले तर सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य विमेदारांच्या हिताच्या विरोधात आहे हे लक्षात येते.'

फडके म्हणाले, 'देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आतापर्यंत एलआयसीने २५ लाख कोटींचा निधी कर्जपुरवठा आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून सरकारला उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसाठी परकीय गुंतवणुकीची गरज आहे, हा मुद्दा योग्य वाटत नाही. हा मुद्दा सरकारने लक्षात घेतला पाहिजे. हा निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा घातक आहे, हे जनतेसमोर नेण्यात येईल.'

करकरेंनाही भरपाई नकारली!

'२६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तत्कालिन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. करकरे यांची एलआयसीकडे तसेच एका खासगी कंपनीत विमा घेतला होता. त्यात एलआयसीने करकरे यांच्या कुटुंबियांना तत्परतेने विम्याची रक्कम, भरपाई देऊ केली. मात्र, संबंधित खासगी कंपनीने मात्र दहशतवादी हल्ल्यात मृत्यू ओढवल्यास भरपाईची तरतूद नसल्याचे सांगून विम्याचा दावा नकारला' असे जिल्हासचिव नरेंद्र फडके यांनी सांगितले. ते म्हणाले, 'करकरे यांच्यासारख्या शहीदांचा विम्याचा दावा जर खासगी कंपन्या नकारत असतील तर इतरांची काय स्थिती असेल याचा ‌विचार करावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिष्कारास्त्र मोडीत

$
0
0

नगरसेवकांच्या उपस्थितीत महापौरांकडून कार्यक्रमांचे उद‍्घाटन

आप्पासाहेब माळी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत काँग्रेसअंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणाची धार वाढत चालली आहे. सोमवारी काँग्रेस आ​णि राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी, महापौर तृप्ती माळवी यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन बहिष्काराचे अस्त्र मोडीत काढत आहेत. नगरसेवकांच्या पुढाकारातून महापौरांच्या हस्ते विकासकामांचा धडाका लावला आहे. सोमवारी संभाजीनगर प्रभाग आणि शाहूपुरीतील तीन विकासकामांच्या उदघाटनाचे श्रीफळ वाढविण्यात आले. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात आमदार महादेवराव महाडिक गटाला आता माजी आमदार मालोजीराजे गटाच्या नगरसेवकांचे पाठबळ मिळाले.

महापौर माळवी राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कार्यक्रमावरील बहिष्कार आंदोलन सुरू राहील अशा इशारा दोन्ही काँग्रेसने दिला आहे. मात्र नेत्यांचा आदेश डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सुरूवात केली आहे. नगरसेविका माधुरी नकाते यांच्या प्रभागात नगरोत्थान अंतर्गत संभाजीनगर एनसीसी भवन येथील रस्ता आणि यल्लम्मा मंदिर येथील रस्ता दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन तसेच शाहूपुरी प्रभागाचे नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांच्या भागातील गटारीच्या कामाचा शुभारंभ सोमवारी सकाळी महापौर माळवी यांच्या हस्ते करण्यात आले. नाईकनवरे हे जनसुराज्य अपक्ष आघाडीचे नगरसेवक आहेत. नगरसेवक सतीश घोरपडे, किरण शिराळे, सत्यजित कदम, दिगंबर फराकटे, राजाराम गायकवाड, रविकिरण इंगवले,किरण नकाते सहभागी झाले. फराकटे आणि गायकवाड हे दोघे मालोजीराजे गटाचे आहेत. त्यांच्या सहभागाने मालोजीराजे गटही सतेज पाटील यांच्या विरोधात कार्यरत झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे नगरसेवक सुभाष रामुगडे हे शाहूपुरी येथील कार्यक्रमात सहभागी झाले.

मालोजीराजे-महाडिक भेट

दरम्यान, सोमवारी मालोजीराजे यांची त्यांच्या गटाच्या चार नगरसेवकांनी भेट घेतली. त्यांच्याशी महापालिकेतील घडामोडींसंदर्भात चर्चा केली. मालोजीराजे हे यासंदर्भात गुरुवारी आमदार महा‌देवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स प्रॉपर्टी': मोठा प्रतिसाद

$
0
0

मोठी उलाढाल; बुकिंगसाठी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाच्यावतीने ७ ते ९ मार्चअखेर झालेल्या 'टाइम्स प्रापर्टी शो २०१५'ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सायंकाळी प्रदर्शनाचा समारोप झाला. प्रॉपर्टीला ग्राहकांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला असून, सहभागी बांधकाम व्यावसायिकांना चांगल्या संख्येने बुकिंग मिळाले. प्रदर्शन पॅव्हेलियन हॉटेल येथे उत्साहात पार पडले.

'टाइम्स प्रॉपर्टी शो'ला शहरातून तसेच जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सहभागी बांधकाम व्यावसायिकांना चांगले बुकिंग मिळाल्याने प्रदर्शनात मोठी उलाढाल झाली तसेच बांधकाम व्यसायाला चालना मिळण्यासही फायदा झाला. गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी हे प्रदर्शन झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणीवर सॉफ्ट लाँच ऑफर, कार भेट, दरांत सवलत अशा विविध ऑफर्सही दिल्याने त्याचा ग्राहकांना मोठा लाभ झाला. अन्य शहरांतून नोकरी-व्यवसायानिमित्त कोल्हापुरात राहण्यास आलेल्या नागरिकांना या प्रदर्शनाचा चांगला फायदा झाला. विविध भागातील गृहप्रकल्प पाहून त्यांची तुलना करणे या प्रदर्शनामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक अमोल वडियार म्हणाले, 'प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांमध्ये ज्यांना घर खरेदी करायचे आहे, अशाच ग्राहकांचा सहभाग जास्त होता. प्रदर्शन काळात काही साइट व्हिजीटही झाल्या. प्रदर्शनामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचता आले.'

सीएमई हायटेकचे अद्वित दीक्षित म्हणाले, 'प्रदर्शनाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूक तसेच वापरासाठी म्हणून व्यावसायिक प्रापर्टी घेण्यासंदर्भात जागृती वाढत असून, त्यादृष्टीने कल निर्माण होण्यासाठी प्रदर्शनाचा फायदा झाला.'

नाशिक येथून वर्षभरापूर्वी कोल्हापुरात कामानिमित्त आलेले उमेश मोटे म्हणाले, 'एकाच ठिकाणी विविध परिसरातील फ्लॅटस, त्यांचे दर पाहता आले, तसेच अॅमेनिटजी तुलनाही करता आली. प्रदर्शनामुळे नागरिकांचेही समाधान झाले. त्यांना प्रत्यक्ष प्रदर्शन पाहता आले.' पाचगाव येथील अमित पाटील पुण्यात फ्लॅट घेण्यास इच्छुक होते. या प्रदर्शनात पुण्यातील काही बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याने प्रदर्शनाचा लाभ झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

'महाराष्ट्र टाइम्स'चे मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांच्या हस्ते सायंकाळी सहभागी बांधकाम व्यावसायिकांना स्मृतिचिन्हांचे वाटप करण्यात आले.

रॉपर्टी खरेदी करताना इमारतीचे आयुष्य वाढवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने कोणती काळजी घेतली आहे, याचा विचार करावा. बांधकाम व्यावसायिकांनी काय सुविधा दिल्या आहेत, बांधकाम कसे केले आहे, नियोजन कसे आहे याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवता आली. कसबा बावडा येथे जामदार टॉवर्स या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने आम्ही व्यवसायात पदार्पण करत आहोत.

- जयदीप जामदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १६ मार्चला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आणि इचलकरंजी पालिकेने केलेल्या उपाययोजनेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने सोमवारी दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाच मार्चला प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. पण त्यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे हायकोर्टाने प्रदूषणाची सुनावणी सोळा मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. यासंबंधी विभागीय आयुक्ताचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले.

महापालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ड्रेनेज लाइनची व्यवस्था तत्काळ करणे आवश्यक आहे. जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे अपग्रेड करणे आवश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोर्टासमोर सांगितले. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने उपाययोजना सुचवून त्या अनुषंगाने कार्यवाहीचे आदेश हायकोर्टाने पूर्वीच दिले आहेत. पंचगंगा प्रदूषणप्रकरणी हायकोर्टात विविध याचिका दाखल आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वितरण व्यवस्थेतील गोंधळ थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रोख सबसीडी न देता गोरगरिबांना धान्य द्या, गहू, तांदूळ याबरोबरच डाळी, खाद्य तेल, साखर शिधापत्रिकांधारकांना द्या, केशरी शिधापत्रिकांधारकांनी प्रत्येकी वीस किलो गहू व तांदूळ द्या आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सावळा गोंधळ थांबवा या मागणीचे निवदेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहर पुरवठाधिकारी डी. एम. सणगर यांना दिले. सणगर यांनी 'वरिष्ठांना आपल्या भावना कळवतो,' असे सांगून वेळ मारून नेली. शिष्टमंडळाचे नेतृत्व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.

युपीए सरकारने अन्न सुरक्षा कायद्याची अमंलबजावणी केल्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांना गहू, तांदळाचे वितरण केले जात होते. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये नव्याने समावेश करण्यासाठी २०१५ ची लोकसंख्या गृहीत धरुन पुन्हा नवीन यादी तयार करावी. अन्न सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर अनेक केशरी शिधापत्रिकांना धान्यच मिळत नाही. तसेच त्यांचा अन्न सुरक्षा कायद्यात समावेश झालेला अशांना शिधापत्रिकाधारकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. गहू, तांदूळ याचप्रमाणे डाळी, खाद्यतेल व साखर शिधापत्रिकांधारकांना द्यावे अशी मागणी केली. शिष्टमंडळात नागेश शिंदे, प्रभाकर पाटील, नितीन मस्के, सचिन चौगले, राजू हरवंदे, शशिकांत शिंदे, सुनील सुतार, चंद्रकांत गायकवाड, विशाल पाटील, बजरंग पाथरवट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँकेसाठी ५०४ अर्ज

$
0
0

वरुटेंना शह देण्याच्या हालचाली; 'पुरोगामी' व शिक्षण समिती येणार एकत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सोमवारी १७ जागांसाठी ५०४ असे विक्रमी अर्ज दाखल झाले. बँकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून ३ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलमध्ये फुट पडण्याची चिन्हे दिसत आहे. एकास एक लढत देण्यासाठी विरोधी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघ व शिक्षण समिती हे दोन पॅनल एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्यामुळे वेगवेगळ्या गटांनी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून उपनिबंधक कार्यालयामध्ये गर्दी केली होती. मंगळवारी या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर बुधवारी दाखल झालेल्या अर्जांपैकी वैद्य आणि अवैद्य ठरलेल्या अर्जांची यादी जाही करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ दिवस अर्ज माघारीसाठी असून ३ एप्रिलला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

यंदा बँकेचे अध्यक्ष आणि शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या सत्ताधारी शिक्षक संघ पॅनेल यांच्या विरोधात शिक्षक समिती आणि पुरोगामी शिक्षक संघटना एकत्र आली आहे. शिक्षक संघातच वरुटे आणि नेते संभाजी थोरात यांच्यामध्ये फुट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर 'पुरोगामी'चे प्रसाद पाटील, शिक्षण समितीचे जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल असून करवीरचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील हे संघाचे नेते संभाजीराव थोरात गटाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षक संघाचे ६८२२ सभासद असून १७ जागांसाठी ५०४ विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर हे निवडणूक अधिकारी तर प्रदीप मालगावे सहाय्यक अधिकारी आहेत.

राखीव गटातील अर्ज

इतर मागासवर्गीय गटात - ६०

महिला गटात - ५३ अर्ज

भटक्या विमुक्त गटात- ३४

अनुसूचित जाती-जमाती गट - ५५

तालुकानिहाय अर्ज

करवीर- २१

शिरोळ - ३१

हातकणंगले- २६

राधानगरी - ४३

भुदरगड - २१

कागल - २४

गडहिंग्लज - २३

आजरा - २५

चंदगड - १६

गगनबावडा - १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीशक्तीला सलाम

$
0
0

जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था, महापालिका, कॉलेज, शाळांमध्ये विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. कर्तृत्वान महिलांचा सत्कार, महिलांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.

जिल्हा परि‌व‌िक्षा व अनुरक्षण संघटना

जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व जिल्हा परिव‌िक्षा व अनुरक्षण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी संरक्षण अधिकारी अॅड.आशिष पुंडपळ उपस्थित होत्या. त्यांनी कायदेविषयक ज्ञानामध्ये महिला महिला व मुलींनी स्वसंरक्षण कायद्याने गर्भलिंग तपासणी बंदी, प्रत्येक स्त्रीला शिकण्याचा अधिकार, सायबर काइम, अल्पवयात लग्न करणे व करविणे गुन्हा हुंडाबंदी विषयक कायदा, कौटुंबिक हिंसाचार, मिळकतीवरील अधिकार इत्यादी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मानद सहसचिव पद्मा तिवले, परिव‌िक्षा अधिकारी एस. एच. बेंद्रे, अलका मोरे, पी. के. डवरी, द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, मुली, महिला व कर्मचारी उपस्थित होत्या. पद्मजा गारे यांनी आभार मानले.

लोटस वुमन्स असोसिएशन

महिला दिनानिमित्त लोटस वुमन्स असोसिएशनच्यावतीने कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सत्यजीत कदम, माजी महापौर सई खराडे, अरूंधती महाडिक, नगरसेविका भारती पोवार, शितल खराडे, समीरा पोवार, अलका दबडे, नलिनी सातवेकर, पद्मावती पाटील, शारदा देवणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला. अध्यक्षा संजीवनी भरडे यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले.

समिधा प्रतिष्ठान

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने गरजू महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरामध्ये १७५ महिलांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निलेश ठाणेकर, नंदन जोशी, संदेश कातवरे, योगेश जोशी, वरदराज दशिंगे, संतोष जोशी, अभिजीत रेणावीकर, रोहन दातार, उर्मिला ठाणेकर आदींनी परिश्रम घेतले.

यशोदर्शन चॅरिटेबल फाउंडेशन

यशोदर्शन चॅरिटेबल तर्फे कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनच्या संस्थापक योगेश अग्रवाल यांच्या हस्ते सात महिलांचा फाऊंडेशनच्यावतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी अॅड.शशिकला पाटील, डॉ.अभिनंदन पाटील, गौरीशंकर संगोळी उपस्थित होते. अॅड.शैलजा चव्हाण यांनी आभार मानले.

देशभक्त सामाजिक सेवा संस्था

राजेंद्रनगर येथील देशभक्त सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने महिला दिनानिमित्त कचरावेचक महिला कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान रांगोळी स्पर्धा व जनजागृतीपर पथनाट्या सादर करण्यात आले. यावेळी प्रसाद पाटोळे, उपाध्यक्ष ‌अमित नागटीळे, सचिव बळीराम रोडगे, देवराज लोंढे, अमोल लोंढे, अर्जुन कांबळे, संजय दनाने, ‌मयुरी कारंडे, आप्पासाहेब पाटील, स‌ुप्रिया वाघमारे आदी उपस्थित होते.

क्रांत‌िगुरू सोशल फाउंडेशन

मल्हारपेठ येथील क्रांत‌िगुरू सोशल फाउंडेशनच्यावतीने महिला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉ. छाया साठे यांचे स्त्र‌ियांचे आजार व घ्यावयाची काळजी यावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा नाईक होत्या. यावेळी लक्ष्मण सोनुले, सदाशिव तांदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फँड्री फाउंडेशनतर्फे फळे वाटप

फँड्री फाउंडेशनच्यावतीने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील महिला रूग्णांना फळे व वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल देसाई, डॉ. वाडेकर, डॉ. रोहिदास आदी उपस्थित होत्या.

परिवर्तन फाउंडेशन

कर्तृत्वान महिलांचा सत्कार भागिरथीच्या अध्यक्षा अरूंधती महाड‌िक यांच्या हस्ते व अॅड. धनंजय पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी डॉ. रेश्मा पोवार, शैलजा पाटील, प्रा. सुरेखा कांबळे, प्रा.वृषाली कदम, तेजस्विनी इंगवले, मनीषा नाईक, अॅड. धनंजय पठाडे, अध्यक्ष अमोल कुरणे, शरद कांबळे आदी उपस्थित होते.

माझी शाळा, कदमवाडी

कदमवाडी येथील माजी शाळा, सुसंस्कार हायस्कूल, अभिनव बालक मंदिर यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. रुपा शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या माजी विद्यार्थीनी प्रा. दीपाली राणे, मिनाज पठाण, अश्विनी पाटील, अश्विनी केंबळे, पालक आशा शिंदे. मंगल दिडोले, अंजली गवळी, विद्या चौगुले मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. उषा पाटील, मुख्याध्यापक अरुणा हुल्ले, संस्थापक एम. एच. मगदूम, भरत लाटकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक पी. आर. गवळी यांनी केले तर सागर पाटील यांनी आभार मानले.

कंजारभाट स्पोर्टस् क्लब

महिलांनी आपली निर्णय क्षमता वाढवून समाजातील स्थान बळकट करावे, असे मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनानिमित्त बरखा मछले, कोल्हापूर कंजारभाट स्पोर्टस् क्लब व सखी सहेली ग्रृप यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात सई खराडे, जयश्री सोनवणे, कांचन कवाळे, वंदना बुचडे, कादंबरी कवाळे, सविता माने, वंदना दळवी, संयोगिता पाटील, वंदना दळवी, संयोगिता पाटील, प्रा. डॉ. शैलजा मंडले, कृष्णा नेतले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. चंद्रकुमान नलगे, व्यंकाप्पा भोसले, वसंतराव मुळीका आदी उपस्थित होते.

आरोग्य उपकेंद्र, बालिंगा

बालिंगा (ता. करवीर) आरोग्य उपकेंद्रात जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या उपवस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेस कमिटी

जागतिक महिला दिनानिमित्त काँग्रेस कमिटीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराअध्यक्षा संध्या घोटणे, शेतकरी सेल अध्यक्ष सुलोचना नाईकवाडे, शारदा पाटील, वैशाली महाडिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गंगा गौरी ग्रुप-गिजवणे, वरदविनायक ग्रुप-उत्तूर, दुर्गा ग्रुप-मंदोली या गटांनी गौरी गणपती, झिम्मा फुगडी कार्यक्रम झाला. यामध्ये लेक वाचवा या विषयावर नाट्य सादर करण्यात आले. यावेळी लीला धुमाळ, सरस्वती पोवार, रेखा आवळे, रुपाली पाटील आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीपी अधिभार कशासाठी?

$
0
0

प्रकल्प बंद असताना भुर्दंडाचा युतीच्या शिष्टमंडळाने विचारला जाब

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरळीत नसताना देखील ठेकेदारांशी हातमिळवणी करून जनतेची लूट सुरू असल्याची थेट टीका भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. एसटीपी प्रकल्पावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांडपाणी अधिभार प्रश्नी ​निवेदन सादर केले.

महापालिकेकडून एक एप्रिल २०१३ पासून सांडपाणी अधिभारची आकारणी सुरू आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधी शहरवासियाकंडून सांडपाणी अधिभाराच्या नावाखाली ८ कोटी २० लाख रुपये गोळा केले आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमेतेने सुरू नसताना अधिभार आकारणे चुकीचे आहे. महापालिकेने जमा केलेल्या निधीचा वापर पायाभूत सुविधासाठी करावा, उपनगरातील नागरिकांना रस्ते, ड्रेनेजलाइन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी केली.

महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत आहे. महापालिकेने ठेकेदारांशी करार योग्यपणे केला नाही. ठेकेदार कंपनीला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यामागील गौडबंगाल काय? ३१ जानेवारी, २०१५ ही अंतिम मुदत होती. ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे काय झाले, अशी विचारणा अशोक देसाई यांनी केली. ठेकेदाराची महापालिकेकडे चार कोटीची बँक गॅरंटी आहे. ठेकेदाराला आतापर्यंत ६५ लाख रुपयांचा दंड केला असल्याचे अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळात अॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, हेमंत आराध्ये, संजय सावंत, अशोक लोहार, अमोल पालोजी यांचा समावेश होता.

सांडपाणी प्रक्रिया यंत्रणाकार्यान्वित करावी आणि प्रकल्प सुरू होईपर्यंत अधिभाराची आकारणी करू नये, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, उदय पोवार, गजानन भुर्के, अनिल पाटील, किशोर घाटगे आदींचा समावेश होता. एसटीपीचे काम बंद असल्याने सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोंड भाजले आता ताकही फुंकून!

$
0
0

पानसरेंच्या हत्येनंतर कोल्हापुरातील पोलिस यंत्रणा सक्रिय

सतीश घाटगे, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येमुळे खडबडून जागे झालेले कोल्हापूर पोलिस आता प्रत्येक बारीक-सारीक प्रकरणांत सक्रिय झाले आहेत. शहरात नुकतेच घडलेले अपहरणनाट्य आणि पेठ वडगावमधील चार मुली पळून गेल्याच्या घटनेत पोलिसांची ही तत्परता ठळकपणे दिसून आली. अशीच तत्परता फॅन्सी नंबरप्लेटवरील कारवाईबाबत पाळली असती तर कदाचित पानसरेंचे मारेकरी सापडले असते. या घटनेने तोंड भाजलेले पोलिस आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत.

हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकलला फॅन्सी नंबरप्लेट असल्याची शक्यता लक्षात घेऊन अशा मोटारसायकलस्वारांवर सलग महिनाभर कारवाईचा आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिला होता, पण त्याला शहर वाहतूक शाखेने केराची टोपली दाखवली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिस अधिकारी रात्रीचा दिवस करत आहेत. रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत तपासाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. हल्लेखोरांनी मोटारसायकल वापरल्याचे लक्षात आल्यानंतर मोटारसायकल शोधण्यासाठी काही पथके कार्यरत आहेत. पण गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलला फॅन्सी नंबरप्लेट असल्याच्या शक्यतेने तपास अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

रितेशकुमार यांनी फॅन्सी नंबरप्लेट तयार करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाईचे आदेश दिले होते, पण त्याचा विसर वाहतूक शाखा आणि पोलिस ठाण्यांना पडला आहे. वाहतूक शाखेचे पन्नास पोलिस नियमित रस्त्यावर असतात. प्रत्येकी रोज दहा फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाई केल्यास महिनाभरात कोल्हापूर फॅन्सी नंबरप्लेटमुक्त शहर होऊ शकते. गेल्या दोन वर्षांत फॅन्सी नंबरप्लेटवर प्रामाणिकपणे व कठोरपणे कारवाई केली असती तर पानसरे यांच्यावरील हल्ल्यात वापरलेल्या मोटारसायकलचा क्रमांक ओळखला असता.

पोलिसही फॅन्सीच्या प्रेमात

पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईकही फॅन्सी नंबरप्लेट वापरतात. पोलिस मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये अशा नंबरप्लेट दिसतात. राजारामपुरी पोलिस ठाण्यात पानसरे यांच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एका उपनिरीक्षकाच्या महागड्या व दणकट मोटारसायकलची नंबरप्लेटही फॅन्सी आहे. चेन स्नॅचिंग, चोरी आणि गंभीर गुन्ह्यात ओळख पटू नये म्हणून गुन्हेगार बनावट किंवा फॅन्सी नंबरप्लेट वापरतात. या पार्श्वभूमीवर तीन वर्षे फॅन्सी नंबरप्लेटवर कारवाईचे आदेश पोलिस प्रशासन देते, पण तेवढ्यापुरती कारवा होते आणि नंतर ती थंडावते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images