Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘अभिजात दर्जासाठी मराठीची फरफट दुर्दैवी’

$
0
0

कोल्हापूर : 'मराठीला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. १३ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. पण आजच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना व विद्वानांना आजही जमलेले नाही, ही दुर्दैवी बाब आहे', असे मत केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी व्यक्त केले. गोखले कॉलेजमध्ये आयोजितत केलेल्या मराठी भाषा ​गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. माळी म्हणाले, 'मराठीचा अभिमान जरुर बाळगा, पण इतर भाषांचा द्वेष करु नका. मराठी भाषा आत्मसात करुन प्रभूत्व मिळवा. त्यानंतर इतर भाषेतून ज्ञानसाधना करा. मराठी भाषा जगातील क्रमवारीत उच्च स्थानावर नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मातृभाषा या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत.'

कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. प्रा. आर. एच. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. आर. एस. बिसुरे यांनी परिचय करुन दिला. शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, कौन्सिल सदस्य दौलत देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. डॉ. मंजिरी देसाई मोरे यांचे प्रोत्साहन लाभले. प्रा. आर. बी. भुयेकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. आर. के. हराळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जागतिकीकरणाच्या प्रभावाने भारतातील चळवळी दिशाहीन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जागतिकीकरणाच्या प्रभावाने भारतातील चळवळी दिशाहीन झाल्या आहेत', असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रा. श्रुती तांबे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र परिषद आणि न्यू कॉलेज समाजशास्त्र विभाग आयोजित भारतातील सामाजिक चळवळी योगदान आणि आव्हाने या परिषदेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील होते.

तांबे म्हणाल्या, 'भारतातील सामाजिक चळवळी थंडावल्या असून जागतिकीकरणाच्या प्रकियेत सामाजिक चळवळी दिशाहीन झाल्या आहेत. बुद्धीवंत आणि अभ्यासक सामाजिक चळवळींकडे गांभीर्याने पाहत नाहीत, त्यामुळे चळवळींची सैद्धान्तिक मांडणी होत नाही, तसेच चळवळीच्या विश्लेषणावर मर्यादा निर्माण झाल्या आहेत.'

डी. बी. पाटील म्हणाले, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खुनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.' डॉ. एस. एन. पवार यांनी समाजशास्त्र परिषदेची स्थापनेमागी कल्पना स्पष्ट केली.

परिषदच्या सत्रांत प्राचार्य एन. व्ही. नलवडे, डॉ. आर. बी. पाटील, आर. बी. जाधव, डॉ. मच्छिंद्र सकटे, डॉ. उषा पाटील, डॉ. जगन कराडे, डॉ. अर्जुन जाधव, डॉ. टी. के. सरगर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. ए. ए. घोडके यांनी स्वागत केले. डॉ. कविता गगराणी आणि मिनल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अर्चना जगतकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर कॉर्नर ते सासने मैदान आणि वायल्डर मेमोरियल चर्चसमोरील रस्ता दुरुस्तीचे काम गेले काही दिवस बंद आहे. हे काम तत्काळ सुरू करण्यात यावे याकरिता नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी सोमवारी (ता. ९ मार्च) रास्ता रोको आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर आहे. मात्र ठेकेदाराने काम सुरू केले नाही. रस्ता दुरुस्तीचे काम रखडल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दाभोळकर कॉर्नर ते किरण बंगलापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती अनेक वर्षापासून रखडली होती. नगरसेविका पल्लवी देसाई, सरस्वती पोवार व नगरसेवक नाईकनवरे यांच्या प्रभागात रस्ता समाविष्ठ होतो. तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दुरुस्तीसाठी ६० लाखांचा निधी मंजूर केला. दुरुस्तीचे काम सुरू करण्याअगोदर रुंदीकरण केले गेले. दरम्यान काही जणांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आयुक्त बिदरी यांनी काम बंद पडले तर निधी परत घेण्याचा इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारी योजनांचा लाभ त्या-त्या लाभार्थ्यांनाच द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थीना होण्यासाठी या योजना त्या-त्या लाभार्थीपर्यंत पोहोचवाव्यात' असे आदेश खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा समितीच्या सभेत दिले. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभा समितीचे अध्यक्ष खासदार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, समितीचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील, समितीचे अशासकीय सदस्य वैभव कांबळे, रामराजे देसाई, विठ्ठल मोरे, यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सभापती, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना या विषयांचा आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडी, कलिंगडाने बहरली बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाच्या कडाक्याने शीतपेयांसह शहाळे, कलिंगड व रसवंतीगृहांवर ग्राहकांची गर्दी वाढत असून आठवडा बाजारात उन्हाळी काकडीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, ऋणमुक्तेश्वर, राजारामपुरी, शिवाजी मार्केट, कसबा बावडा येथील मंडईंमध्ये काकडी विक्री करणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांचे स्टॉल लागले आहेत. सरासरी पंचवीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत काकडीचा दर होता.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारी रस्त्यावर नागरिकांची व वाहनधारकांची वर्दळ कमी होत आहे. त्याचप्रमाणे सकाळी व सायंकाळी मंडईमध्ये गर्दी चांगली होती. पण दुपारी सर्वच मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी प्रमाणात होती. साधारणतः मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढत जाते. उन्हाळ्याच्या दिवसात काकडी जास्त मागणी असल्याने शेतकरी नियोजन करून काकडीची लागण करत असतात. शहराशेजारील इस्पूर्ली, निगवे, दिंडनेर्ली, आडूर, कोपार्डे, आसुर्ले-पोर्ले आदी गावांमध्ये काकडीचे मोठे उत्पादन घेतले जाते. काकडी उत्पादक गावातील सर्व शेतकऱ्यांकडील माल एकाचवेळी बाजारात आल्याने अनेक ठिकाणी स्टॉल लागले होते. मिरज भागतून गाजरांचीही मोठी आवक झाली होती.

जानेवारीपासून पालेभाज्यांची व फळभाज्यांची आवक वाढल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे वांगी, भेंडी, दोडका, कारली या फळभाज्यांचे व मेथी, चाकवत, पोकळा, पालक भाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र कोथंबिरीच्या मागणी आणि दरातही वाढ झाली आहे.

परदेशी सफरचंद शहरात

शहरात प्रामुख्याने काश्मिरी सफरचंदाची आवक होत असते. मात्र तेथील बहर संपल्याने सध्या बाजारपेठेत हिमाचल प्रदेश व वॉशिंगटन येथील सफरचंदांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. काश्मिरी सफरचंदापेक्षा परदेशी सफरचंदांचा दर ३० ते ४० रुपये जास्त आहे. त्यामुळे सरासरी १६० ते १८० रुपये किलो दराने सफरचंदांची विक्री होत आहे.

फळभाज्या (दर किलोचे)

वांगी - २०

दोडका - ५०

भेंडी - ४०

गवार - ५०

हिरवावाटाणा- ४०

हिरवीमिरची - ४०

टोमॅटो - १५

काकडी - २५-४०

फळे (दर किलोचे)

सफरचंद - १६० ते १८०

डाळिंब - ५०

मोसंबी - ३०

संत्री - ४०

द्राक्षे - ४०

चिकू - ४०

डाळी (दर किलोचे)

तुरडाळ - ९०

मुगडाळ - १२०

मसूरडाळ - ८०

शेंगदाणे -८०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, गडहिंग्लज

मुस्लिम समजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी येथील 'हिंदी है हम... हिंदोस्ताँ हमारा' परिषदेतर्फे करण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे याबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने अध्यादेश काढून मराठा व मुस्लिम समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद केली. या आरक्षणाच्या धोरणाबाबत उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द तर मुस्लिमांना फक्त शिक्षणातील आरक्षणाची तरतूद मान्य केली होती. तसेच या आरक्षणाचे विधेयक नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने सहा महिन्यांच्या आत कायद्यात रुपांतर करून घेणे गरजेचे होते.

हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या विधेयकाला कायद्यात रुपांतर करण्याची मंजुरी दिली गेली आणि मुस्लिम समाजाच्या विधेयकाला मात्र डावलले गेले. सद्यस्थितीत मराठा-मुस्लिम आरक्षणाची बाब ही न्यायप्रविष्ठ असताना देखील मुस्लिमांचे आरक्षणच रद्द करण्याचे पाप या सरकारने केलेले आहे. 'सबका साथ सबका विकास' म्हणणाऱ्या सरकारने मुस्लिम समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. आरक्षणाचा हक्क परत मिळवण्यासाठी आ‌ण‌ि लढा उभा करण्यासाठी मुस्लिम समाजाची एकजूट करून मोठा लढा दिला जाईल उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचा अवमान करणाऱ्या व मुस्लिम समाजाचे मूलभूत हक्कच नाकारणाऱ्या सरकारच्या जातीयवादी, धर्मवादी व पक्षपाती धोरणांचा समस्त मुस्लिम बांधवांच्यावतीने जाहीर निषेध करीत आहे. या घटनेचा गांभीर्याने लक्षात घेऊन तत्काळ नवा अध्यादेश काढून मुस्लिमांना पूर्ववत आजरक्षण द्यावे. अन्यथा न्यायहक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर प्रा.आशपाक मकानदार, राजू जमादार, प्रा.आझाद पटेल, राजू खलिफा आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस सहीने निघाला ‘अवैध’ आदेश

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

सेनापती कापशी (ता. कागल) येथील किसान विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या उमेदवारीचा एक अर्ज अवैध आणि वैध असे दोन्ही आदेश आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी -विरोधकांत आरोप प्रत्यारोपांचे वार होत आहेत. कागल निबंधक कार्यालयाने बोगस आदेशाबाबत हात वर केल्याने दुसरा आदेश निबंधकांच्या सहीने काढला कोणी? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. संस्थेची निवडणूक १३ मार्च रोजी होत आहे. २३८ सभासदांपैकी ५७ मयत आहेत. १८१ जणांना मतदानाचा अधिकार आहे.

सत्ताधारी संजय घाटगे गटाचे दत्तोपंत वालावलकर तर विरोधी विक्रमसिंह घाटगे,आमदार हसन मुश्रीफ व पाटील गटाचे शहांजहान देसाई नेतृत्व करीत आहेत.१३ जागांपैकी विरोधी गटाचे मधुकर कांबळे बिनविरोध निवडून आले असून १२ जागांसाठी आता २४ उमेदवार रिंगणात आहेत. छाननीवेळी सत्ताधारी गटाच्या बाळासो व्हनबट्टे यांचा अर्ज पतसंस्थेत काम करीत असल्याचे कारण दाखवत निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध केला. याची तक्रार व्हनबट्टे यांनी कागल निबंधक कार्यालयाकडे केली. या कार्यालयाने २३ फेब्रुवारीला म्हणणे मांडण्यासाठी २९ जणांना बोलावले आणि त्यापूर्वीच २० फेब्रुवारीला अर्ज वैध असल्याचा आदेश दिला. याच तारखेला दुसरा आदेश व्हनबट्टेंचा अर्ज फेटाळल्याचा मिळाला असून त्यामध्ये संस्थेचे नाव हनुमान विकास सेवा संस्था, म्हाकवे आणि वादी म्हणून व्हनबट्टे ऐवजी एकनाथ ज्ञानदेव पाटील असा उल्लेख आहे.

या बोगस आदेशावरुनच आता वादंग उठले आहे. विरोधी गटाकडून सत्ताधारी गट राजकीय दबाव वापरत सभासद मृत व पुरुषाला स्त्री असे उलटे दाखवतात. शालन पाटील यांचे १० हजार २०५ रुपये भागभांडवल असताना मतदानाला नावच नाही. संस्थेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ७१ हजार ६९८ रु.तोटा असताना २१ हजाराने फायद्यात दाखवली आहे. डिव्हीडंट वाटला जात नाही, चेअरमनची सही संचालक वालावलकर करतात असे पुराव्यानिशी आरोप केले आहेत. तर सत्ताधारी गटाने नजरचुकीने यादीत पुरुषाला स्त्री असे पडल्याचे सांगत दुरुस्ती केली आहे. संस्था ३१ मार्चला तोट्यात असली तरी ३० जूनला २१ हजार इतकी फायद्यात आहे. संस्थेने नियमांच्या अधिन राहून व्यवहार केल्याने १२ लाख ४० हजार शेअर्स भांडवल आहे. सर्वांना कर्जे देवून १०० टक्के वसुली केल्याचे व संचालकाला सहीच्या अधिकाराचे ठरावाचे पुरावे दाखवले आहेत. त्यामुळे विरोधकांचे आरोप निराधार व राजकीय सुडबुध्दीचे असल्याचेही म्हटले आहे.

चौकशी सुरू आहे ...

याबाबत कागलच्या सहाय्यक निबंधक ए.व्ही.पाटील म्हणाल्या,'कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अधिन राहून मी चौकशीअंती व्हनबट्टे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना रितसर अर्ज वैध असल्याचे पत्र दिले आहे. माझ्यासारख्याच सहीने संस्था,व्यक्ती आणि गावही वेगळे असणारा आदेश कुठून आला याबाबत मला माहिती नाही. याबाबत मी देखील चौकशी करीत आहे.

व्हनबट्टे यांच्याबाबत निबंधकांनी योग्य निकाल एकाचवेळी दिला असता तर आमचा एक उमेदवार निवडून आला असता. हे लोकशाहीविरोधी असून जावक नंबरचा विचार करता व्हनबट्टे निवडणुकीस अवैध असल्याचा आमचाच निकाल योग्य आहे.

शहाजहान देसाई, विरोधी गटनेते

व्हनबट्टेंची उमेदवारी फेटाळल्याचा आदेश बोगस आहे. आदेशातील संस्था,व्यक्ती आणि गावही वेगळे आहे. एकाच तारखेला एका संस्थेबाबत दोन वेगवेगळे निकाल होऊच शकत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आता दिशाभूल थांबवावी.

दत्तोपंत वालावलकर, सत्ताधारी गटनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक दोष असताना ‘बिद्री’ला पुरस्कार का?

$
0
0

म. टा. वृतसेवा, गारगोटी

बिद्री साखर कारखान्यात अनेक तांत्रिक दोष असतानादेखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बिद्रीच्या दूधगंगा - वेदगंगा साखर कारखान्यास दिलेला 'तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार' हा संशयास्पद असून या पुरस्काराची निपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर व कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, 'राज्याच्या साखर उद्योगातील शिखर संस्था असणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करत असते. हे पुरस्कार कारखान्यांची तपासणी करून दिले जातात. मात्र बिद्री साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार गतवर्षीच्या कार्यक्षमतेसाठी मिळाला आहे. गतवर्षी गळीत हंगामात २१ दिवस हा कारखाना बंद पडलेला असताना हा पुरस्कार मिळतो कसा ? तोडणी हंगामात शेतकऱ्यांकडून टाळे, कामगार, उत्पादक, शेतकरी, सभासदात असंतोष सुरु असताना हा पुरस्कार दिलाच कसा जातो, हे कोडे आहे.'

मारुती जाधव यांनी तीन वर्षात एकाही वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नाही. मग पुरस्कार कसा मिळाला,असा प्रश्न केला. पत्रकार परिषदेस मधुकर देसाई, दत्ताजीराव उगले, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, सत्यजित जाधव, धैर्यशील भोसले, मदन देसाई, कल्याण निकम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ती…तिची बाइक…तिचा रस्ता!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महिला एकत्र येत नाहीत', हा समज खोडून काढत कोल्हापुरात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बाइक रॅलीच्या प्रवासात महिलांनी एकजुटीचा वेगळा अध्याय रचला. महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'ऑल विमेन्स बाइक रॅली'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून या उपक्रमाला जणू स्त्रीशक्तीच्या सोहळ्याचे स्वरूप लाभले. गांधी मैदान ते राजाराम कॉलेजचे मैदान हा आठ किलोमीटरचा रस्ता रविवारी कोल्हापुरातील हजारो महिलांनी दणाणून सोडला. ती...तिची बाइक आणि तिचा रस्ता, असेच चित्र रॅली मार्गावर दिसले.

एकाहून एक सरस वेशभूषेसह आपल्या बाइकलाही सजवून महिलांनी गांधी मैदान गाठले. पारं​परिक वेशभूषेतील महिला लक्ष वेधून घेत होत्या. पावणेनऊ वाजता गांधी मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली. लेक वाचवा, महिला सुरक्षितता, महिलांवरील अत्याचाराच्या घटना, महिलांविषयक कायदे अशा फलकांनी रॅलीला एक सामाजिक आशयही मिळाला.

मिरजकर तिकटी येथे रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर हिंदू एकता आंदोलनातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. संपूर्ण रॅलीच्या मार्गावर महिलांनी एकच जल्लोष करत आणि 'मटा रॅली'चे झेंडे फडकावत 'महिलाराज'चा माहौल निर्माण केला. खरी कॉर्नर, बिनखांबी गणेशमंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, दसरा चौक, टायटन शोरूम कॉर्नर, उमा टॉकीज, पार्वती टॉकीज, बागल चौक, कमला कॉलेज, टाकाळा, सायबरमार्गे रॅली साडेनऊ वाजता राजाराम कॉलेजच्या मैदानावर आली. या ठिकाणी महिलांनी डान्स फ्लोअरवर धमाल करत स्पॉट गेमचा आनंदही लुटला. पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ते सत्तर वर्षांच्या आजीपर्यंत सर्व जण उत्साहाने भारलेले होते. शेवटी सर्वांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा देत 'दिवस सार्थकी लावल्याचे' समाधान घेऊन घरचा रस्ता धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणावरील कार्यवाहीचा लेखाजोखा आज कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत हायकोर्टाने सातत्याने दिलेल्या आदेशानंतर महापालिका व इचलकरंजी नगरपालिका या दोन्हीच्या पातळीवरील अंमलबजावणीच्या प्रगतीचा लेखाजोखा सोमवारी होणाऱ्या सुनावणीवेळी मांडला जाणार आहे. महापालिकेच्यावतीनेही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबतचा कार्यक्रम तसेच इचलकरंजी नगरपालिकेचा कृती कार्यक्रमाबाबत हायकोर्ट निर्देश देण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाने पंचगंगा प्रदूषणाबाबत 'नीरी' या संस्थेकडून अहवाल तयार करून घेण्याबरोबरच विभागीय आयुक्तांकडून त्याबाबतच्या अंमलबजावणीचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करून उपसमित्या नेमल्या होत्या. या उपसमित्यांनी गेल्या दीड महिन्यात केलेल्या पाहणीनंतर प्रदूषण करणाऱ्या घटकांबाबतचा अहवाल दिला होता. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने साखर कारखाने, डिस्टलरी, वीजनिर्मिती प्रकल्प अशा १७ युनिटवर बँक गॅरंटी जप्त करण्याबरोबर उत्पादन बंद करण्याचा, परवाना रद्दच्या इशारा नोटिसाही दिल्या आहेत.

पालिकेला सोमवारच्या सुनावणीपूर्वी एसटीपी केव्हा सुरू होईल याची डेडलाइन सादर करण्यास सांगितले होते. १५ एप्रिलपर्यंत पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू होईल, असे नियोजन आहे. तर, इचलकंरजीतील विविध घटकांना नोटीस देऊन त्यांच्याकडून प्रदूषण रोखण्याबाबतचा कृती कार्यक्रम मागितला होता. या सर्वांकडून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा अहवाल विभागीय आयुक्तांकडून सुनावणीपूर्वी मांडणे आवश्यक होते. त्यानुसार सोमवारी कदाचित सुनावणीवेळी हा अहवाल हायकोर्टासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्ते माने व मलाबादे यांचे वकील धैर्यशील सुतार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिणचे खुर्दमध्ये हत्तीचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृतसेवा, गारगोटी

भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द विभागात जंगली हत्तीने मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घातल्याने व शेतातील पिकांचे मोठे नुकसान केल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. शनिवारी (ता.७) रात्री ग्रामस्थांनी हत्तीचा थरार अनुभवला. काही ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने हत्तीला हुसकावून लावले.

शनिवारी संध्याकाळी मिणचे खोऱ्यातील गिरगावचे काही ग्रामस्थ रात्रीच्या वेळी उसाला पाणी देण्यासाठी चालले होते. यावेळी गिरगाव गावाच्या वरील जंगलाकडील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ जंगली हत्तीचे दर्शन झाले. रात्रीची वेळ असल्याने गवा असावा अशी शक्यता गृहीत धरून या शेतकऱ्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते ग्रामस्थ पाणी पाजण्यास निघून गेले. मात्र थोड्या वेळाने पुन्हा हा हत्ती या मार्गावर आल्यानंतर गावाबाहेर राहणाऱ्या ऊसतोड कामगारांना त्याचे दर्शन झाले. त्यांनी ग्रामस्थांना गावात येऊन या बाबतची कल्पना दिली. यानंतर ग्रामस्थ व तरुणांनी एकत्र येऊन हत्तीला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे भयभीत हत्तीने ग्रामस्थ व तरुण पाठलाग करत असल्याने गावात व पिकातून धुमाकूळ घातला.

गावाच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या गिळा नावाच्या शेतातील रविंद्र धोंडीराम देसाई यांच्या केळी पिकाचे हत्ती व ग्रामस्थांच्या पाठलागामुळे मोठे नुकसान झाले. तर गावात घुसून ज्ञानदेव गणपती देसाई यांच्या घराच्या मागील गोबर गॅसचे नुकसान करत घराच्या शेजारील छप्पर तोडून गावच्या वस्तीत हत्तीने प्रवेश केला. त्यामुळे लहान मुले, महिला यांच्यात घबराट पसरली. सुमारे दोन तास हत्ती व ग्रामस्थांमध्ये पाठशिवणीचा खेळ सुरु होता. मोठ्या प्रयत्नाने ग्रामस्थ व तरुणांनी हत्तीला उशिरा भूमकरवाडीकडील जंगलात हुसकावून लावले. मात्र ग्रामस्थ आणि हत्तीच्या पाठशिवणीच्या खेळाने परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाकीघोल परिसरातील हत्ती?

रात्री उशीरा घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र वनविभागाचे कर्मचारी येण्यापूर्वीच हत्तीला भूमकरवाडी, भाटीवडे जंगलाच्या हद्दीत हुसकावून लावले होते. यापूर्वी वाकीघोल परिसरात आरेकर नावाच्या शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला करून ठार केले होते. तर बागलवाडी येथील तरुणावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. हाच हत्ती वाकीघोल परिसरातून आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केआयटी’ला ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन

$
0
0

कोल्हापूर : 'केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅकचे ए मानांकन मिळाले आहे. तसेच ३.१२ सीजीपीए सह राज्यात टॉप पाच महाविद्यालयामध्ये समावेश आहे' अशी माहिती प्राचार्य डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राचार्य कार्जि‌न्नी म्हणाले, 'बेंगळुरूच्या राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्ययन परिषदेने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने जानेवारीत केआयटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला भेट दिली होती. यामध्ये त्यांनी वन केआयटी, मुडल, स्टुडंटस प्लेसमेंट, इआरपी, विद्यार्थी शिक्षक सुसंवाद, उद्योगजगातशी सामंजस्य करार, कन्सल्टन्सी, स्टुडंट डायरी उपक्रमांची माहिती घेतली. तसेच प्राचार्यांसोबत चर्चा, संशोधनाचे सादरीकरण, अंतर्गत गुणवत्ता शाश्वती समितीसोबत चर्चा, आजी-माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विविध उपक्रमामुळे केआयटी अभियांत्रिकी कॉलेजला नॅकचे ए मानांकन मिळाले.'

'विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील नोकरीच्या संधी आणि इंडस्ट्रीजची गरज ओळखून त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केआयटी करत आहे' असे अध्यक्ष सचिन मेनन यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, समन्वयक ममता कलस, सहसमन्वयक डॉ.महेश शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एव्हीएच’ परिसरात बंदी आदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील एव्हीएच कंपनीवर शनिवारी संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये कंपनीची व क्वार्टर्सची नासधूस करुन पेटवून दिले. यामध्ये कंपनीच्या ३५ दुचाकी, १५ चारचाकी गाड्या, ७ टँकर, जनरेटर,१० विविध कार्यालये,१०० संगणक, फर्निचर, ५० वातानुकुलित संच, ५ सायकली, संरक्षक भिंत, इलेक्ट्रीक साहित्य, सुरक्षा रक्षकांची केबीन आगीच्या भक्षस्थानी पडली. सुमारे २५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी या परिसरात पोलिसांनी बंदी आदेश लागू केला आहे.

पोलिसांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. सुरक्षेसाठी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या. कंपनीमध्ये शिरुन कंपनीची मोडतोड व जाळपोळ केल्याप्रकरणी डॉ. नंदा बाभूळकर, अॅड. संतोष मळविकर, रामराजे कुपेकर, संजय नाईक, शिवाजी सावंत, सुभाष देसाई, रवि नाईक यांच्यासह ५०० आंदोलकावर चंदगड पोलिसांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

एव्हीएच प्रकल्प हा मानवी आरोग्य व पर्यावरणाला हानी पोहोचविणारा प्रकल्प असल्याने तालुक्यातील जनतेतून त्याला तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प अन्यत्र हलवावा अशी मागणी जनतेची आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषणे व न्यायालयीन लढाई सुरुच होती. मात्र सरकारी यंत्रणा व प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेतल्या नाहीत. प्रकल्पाला दोनदा स्थगिती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात हा आदेश कंपनीपर्यंत पोहोचविण्याच्या अगोदरच स्थगिती उठत होती. त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोष होता.जनतेच्या आंदोलनाला केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे लोकांनी चिडून शनिवारी आपला राग कंपनीवर दगडफेक करुन, वहाने जाळून, एव्हीएच कर्मचाऱ्यांना मारहाण करुन हिंसक पध्दतीने व्यक्त केला. प्रदूषण मंडळाच्या सूर्यकांत डोके व मनिष होळकर या अधिकाऱ्यांना तब्बल साडेपाच तास कोंडून ठेवले.

दरम्यान, रविवारी दुपारी एव्हीएच प्रकल्पस्थळी पोलिस महानिरिक्षक राकेश कुमार यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी करत तपासाबाबत सूचना केल्या. तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी स्थगितीचा आदेश कंपनीला लागू केला. एव्हीएच कंपनीची वाहने जाळून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी महादेव मनोहर काळे यांनी डॉ. नंदा बाभूळकर, अॅड. संतोष मळविकर, रामराजे कुपेकर, संजय नाईक, शिवाजी सावंत, सुभाष देसाई, रवि नाईक यांच्यासह ५०० आंदोलकांविरुध्द फिर्याद दाखल केल्याने आंदोलकावर गुन्हा नोंद केला आहे. कॉन्स्टेबल मारुती टिकारे यांनी आंदोलकांनी दगडफेक करुन स्वतःसह पो. नि. माळके, स. पो. नि. हंडे, स. पो. नि. पटेल यांना जखमी केल्या प्रकरणी आंदोलकांविरुध्द फिर्याद दिली आहे. बंदी आदेश असताना आदेशाचा भंग करुन ३०० ते ४०० लोकांनी आंदोलन करुन जाळपोळ केल्याप्रकरणी या आंदोलकावर कॉन्स्टेबल संग्राम पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हे नोंद केले आहेत. आंदोलकावर १४३/१४७ कलमानुसार तीन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. पोलिस निरीक्षक अंगद जाधवर, पोलिस उपनिरिक्षक शरद माळी व पी. एन. घोडके तपास करीत आहेत.

परिसरात तणावपूर्ण शांतता

दरम्यान, रविवारी पाटणे फाट्यावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कंपनीचा आवार व फाट्याला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पाटणे फाट्यावर तणावपूर्ण शांतता होती. पोलिस यंत्रणेकडून पंचनाम्याचे काम सुरुच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अडचणींतही घोरपडेचा उच्चांक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'साखर कारखान्याला जागा घेण्यापासून ते आजच्या इथेनॉल प्रकल्पापर्यंत अनंत अडचणी पार करीत चाचणी हंगामातच कारखान्याने उच्चांक निर्माण केला आहे. हे सभासदांचे वैभव हिंमतवान कार्यकर्त्यांमुळेच उभा राहीले आहे. या संपूर्ण प्रकल्पाची पूर्ती म्हणजे आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे,' असे प्रतिपादन घोरपडे कारखान्याचे संस्थापक,आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्प आणि चार लाख ७५ हजार साखर पोती पूजनप्रसंगी बोलत होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'हा साखर कारखाना उभाच राहू नये यासाठी नाना तऱ्हेचे प्रकार विरोधकांनी करुन पाहिले. परंतु महत्वाकांक्षेने भारलेला नेता आणि त्याच्या मागे ठामपणे उभी असणारी सर्वसामान्य जनता आगळावेगळा प्रयोग करुन साखर तयार करु शकते हे दाखवून देत सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याने खऱ्या अर्थाने विरोधकांचा नि:पात केला आहे. मुश्रीफ गटाच्या माणसाला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला. साखर बंद केली, ऊस जाळून नेला. म्हणूनच माळावर डोंगरात प्रकल्प उभारुन मी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सज्ज आहे.'

भैय्या माने म्हणाले,' दोन महिने जाणीवर्पूक त्रास देवून कारखाना उशीरा सुरु करुनही कारखान्याची गरुडझेप विरोधकांसह सर्वांनाच आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. विनाधुराची चिमणी आणि रोज चार लाख युनिट वीज अशा अद्यायावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या कारखान्याला प्रदूषणावरुन त्रास देणाऱ्या कारखान्यांच्या धुरांसाठी आता जनसुनावण्या होतील. घोरपडे कारखाना देशात रोल मॉडेल ठरेल.'

यावेळी युवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत नाविद मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी कारखान्याच्या अल्पावधीतल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमास कागलच्या नगराध्यक्षा आशाकाकी माने, गडहिंग्लजमया नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे,कावेरी चौगुले, गणपतराव फराकटे, पं.सं. सदस्य शशिकांत खोत, रघुनाथ कुंभार,अंकुश पाटील,नेताजी मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारीशक्तीचा आविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरातील महिलाविश्वात सुरू असलेली बाइक रॅलीची उत्सुकता रविवारी या रॅलीला मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादाने संपली. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या ऑल विमेन बाइक रॅलीमध्ये विविध वयोगटासह गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार महिला सहभागी झाल्या. गांधी मैदानापासून सुरू झालेल्या या रॅलीची सांगता राजाराम कॉलेज मैदानावर झाली आणि महिलांनी कलागुणांचा आविष्कार घडवत एकमेकींवर महिलादिनाच्या शुभेच्छांची बरसात केली.

महिला दिनानिमित्त गेल्यावर्षी 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रथमच विमेन्स बाइक रॅलीची संकल्पना मांडली. यंदाही या रॅलीला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. पारंपरिक वेशभूषेसह विशिष्ट रंगाचे ड्रेस, साड्या, टोप्या, स्कार्फ, स्टोल अशा हटके लूकसह बाइकसोबत महिला सकाळी साडेसात वाजताच शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथे पोहोचल्या. बुलेटस्वार महिलांनी केलेले भारदस्त पोषाख लक्षवेधी ठरले. दरम्यान, 'नारीशक्तीचा विजय असो', 'लेक वाचवा', महिला सुरक्षा, महिलांविषयक कायदे अशा विषयांवरील फलक घेऊन रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी या उपक्रमाला सामाजिक विचारांची जोड दिली.

रॅलीच्या मार्गावर हिंदू एकतातर्फे अशोक देसाई यांनी रॅलीवर पुष्पवृष्टी केली तर बिनखांबी गणेश मित्रमंडळ आणि शाहू मॅरेथॉन ग्रुपच्यावतीने गुलाबपुष्प देऊन रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीतील महिलांसाठी मार्गावरील वाहतूक थांबवण्यासाठी वाहतूक निरीक्षक पोलिसांनी सहकार्य केले. बाइक चालवताना महिला रोज नव्या अनुभवाची शिदोरी मिळवतात. घर, नोकरी व्यवसाय यांच्यातील जबाबदाऱ्यांचे पूल सांधताना बाइकच्या चाकावर महिला त्यांच्या आयुष्याच्या अनेक गोष्टींचा समतोल साधतात. ऑल विमेन्स बाइक रॅलीच्या औचित्याने या समतोल आणि समन्वयाला सलाम करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसांतर्गत बंडाळी

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्यावरून महापालिकेत सुरू असलेला सत्तासंघर्ष राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा झाला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला महापौरपद मिळू नये, यासाठी आमदार महादेवराव महाडिक गटांनी उघड प्रयत्न सुरू केले आहेत. आता त्यांना माजी आमदार मालोजीराजे गटाचीही साथ मिळाली आहे. महापौर माळवी यांना पाठिंबा देण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. महाडिक गटाच्या कारभाऱ्यांनी यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांची बैठक घेऊन महापौर माळवी यांना सभागृहात आणि सभागृहाबाहेरील कार्यक्रमांतही पाठिंबा देण्याचा ​निर्णय घेतला आहे. महापौरांच्या राजीनाम्याचे कारण पुढे करीत माजी मंत्री पाटील यांच्या विरोधात काँग्रेस अंतर्गत बंडाळी सुरू झाली आहे.

महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. आघाडी धर्मानुसार महापौर माळवी यांची आठ फेब्रुवारीपर्यंत महापौरपदाची मुदत होती. त्यानंतर महापौरपद काँग्रेसला अर्थात माजी मंत्री सतेज पाटील गटाला मिळणार होते. दरम्यनाच्या काळात महापौर माळवी लाचखोर प्रकरणात सापडल्या. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आदेश देऊनही माळवींनी राजीनामा दिला नाही. परिणामी राष्ट्रवादीचा एक गटही माळवी यांच्या विरोधात आहे. राष्ट्रवादीत आज हसन मुश्रीफ विरूद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्यातही सुप्त संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे.

महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक गट तटात विखुरले आहेत. माजी मंत्री पाटील, मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार महाडिक यांना मानणारे नगरसेवक आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील गटाला झुकते माप मिळाल्याचा इतर गटांचा आरोप आहे. राजकारणातील जुना वचपा काढण्यासाठी सतेज पाटील विरोधात अन्य गट एकवटले आहेत. त्यात महाडिक गटाने पुढाकार घेत पाटील गटाला काटशह देण्याची खेळी सुरू केली आहे.

महाडिक गटाच्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक

महाडिक गटाचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील मोदी, सुनील कदम आणि सुहास लटोरे यांनी शनिवारी रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुमारे १५ नगरसेवकांची बैठक घेतली. नगरसेवक किरण शिराळे, सतीश घोरपडे, सत्यजित कदम, प्रकाश नाईकनवरे हे काँग्रेसचे तर मालोजीराजे गटाचे तीन नगरसेवक उपस्थित होते. तसेच, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हजेरी लावली आहे. बैठकीत महापौरांना पाठिंबा देताना त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविण्याचे ठरले. त्यानुसार या आठवड्यापासून दोन्ही काँग्रेसमधील काही नगरसेवक आघाडीचे नेते मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा आदेश डावलून महापौरांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

'जनसुराज्य-अपक्ष आघाडी'चीही साथ!

महापालिकेत जनसुराज्य-अपक्ष आघाडीचे नगरसेवक नऊ नगरसेवक आहेत. जनसुराज्यचे महापालिकेतील नेते प्रा. जयंत पाटील सध्यातरी आमदार महाडिक यांच्या जवळचे मानले जातात. जनसुराज्य-अपक्ष आघाडीतील काही नगरसेवक महाडिक गटाचे म्हणून ओळखले जातात. तेही महापौरांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू माफिया सक्रिय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव येथील अधिकृत वाळू लिलाव झालेल्या ठेक्यावर मध्यरात्री वाळू चोरांच्या जमावाने सशत्र हल्ला केल्याने अधिकृत ठेकेदाराकडील एक कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर एक कामगार गंभीर जखमी आहे. इतर चार कामगारांनाही जबर मारहाण झाल्याने त्यांच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर एक कामागार बेपत्ता होता. त्याचामृतदेह आज सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्याच्या आरोपावरून पंढरपूर तालुक्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोहोरगाव आंबे येथील वाळू ठेका अभिजित पाटील यांनी नऊ कोटी १५ लाख रुपयाला घेतला आहे. या ठिकाणी काही स्थानिक वाळू चोरांनी रात्री उशिरा वाळू चोरीच्या उद्देशाने ट्रॅक्टर नदीपत्रात घातले होते. त्याला ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध केला. यानंतर भडकलेल्या वाळू माफियांनी धारदार हत्यारांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. दहशत माजविण्यासाठी येथे उभा असलेला जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड करीत त्यांनी कर्मचाऱ्यांना तुफान मारहाण केली.

मारहाणीत किरण बनसोडे या कामगाराच्या डोक्यात मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर उपचार सुरू आहेत. तर दोन दिवसांपासून गायब झालेल्या विकी वाघमारे या कर्मचाऱ्याचा मृतदेह सोमवारी भीमानदीत सापडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. याच प्रकरणात जखमी असणाऱ्या इतर चार कामगारांवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दलित संघटना आक्रमक

या घटनेत मरण पावलेला आणि गंभीर जखमी असणारे कामगार दलित असल्याने आता दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. या वाळू माफियांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, रात्री उशीरा पंढरपूर तालुका पोलिसात नऊ जणांवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी समाधान गायकवाड, भारत गायकवाड, बंडू घुले बाबासाहेब पाटील यांना रात्री उशिरा अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षक बँक डबघाईला

$
0
0

पुरोगामी शिक्षक संघटनेची टीका

म. टा. वृत्तसेवा, कागल

'कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत गेल्या पाच वर्षांत गरज नसताना कोअर बँकिंग सुविधा सुरू करून त्यात कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. बँकेचा कारभार मनमानी आणि हुकूमशाहीने करून स्वहित जोपासत वैभवशाली असणारी बँक रसातळाला नेली,' अशी घणाघाती टीका पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केली. मुरगूड येथे झालेल्या पुरोगामी शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, 'कर्मचाऱ्यांना अकरा कोटीचे देणे आहे. बँक तोट्यात असूनही ती कृत्रिमरीत्या फायद्यात असल्याचे भासवून सभासदांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहेत. चेअरमनपद एकाच व्यक्तीकडे का? बँकेतील कोणत्याही प्रकारचा भत्ता घेणार नाही असे आश्वासन देणाऱ्यांनी ते पाळले का?'

गोविंद पाटील म्हणाले, 'शिक्षक नेहमी आनंदी आणि प्रसन्न कसा राहील व त्यांच्याकडून चांगले ज्ञानदान कसे होईल या दृष्टीने पुरोगामी शिक्षक संघटना विविध उपक्रम राबवते. प्राथमिक शिक्षकांनी अशा संघटनेच्या पाठीशी ठामपणे राहणे गरजेचे आहे.' माजी शिक्षणविस्तार अधिकारी एम. टी. सामंत यांचेही भाषण झाले.

यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते एस. के. पाटील यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्राचार्य महादेव कानकेकर यांच्या हस्ते झाले. मेळाव्यास आर. एस. पाटील, अरुण पाटील, किरण वंडकर, आर. बी. पाटील, रामचंद्र संकपाळ,आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस. के. पाटील यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहप्रकल्पांसाठी चार कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेकडून बांधल्या जात असलेल्या जयभीमनगर व नेहरुनगर येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अनुदानाचा चार कोटी आठ लाख रुपयांचा दुसरा धनादेश सोमवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, गृहनिर्माण विभागाचे सचिव श्री. बडगेरी, म्हाडाचे उपअभियंता श्री. बनकर तसेच मुख्याधिकारी सुनील पवार, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे उपस्थित होते.

केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत नगरपरिषदेच्या वतीने जयभिमनगर व नेहरुनगर येथे घरकुले बांधण्याचे काम सुरु आहे. १४८८ झोपडपट्टीवासियांना स्वमालकीची घरे या प्रकल्प अंतर्गत बांधून मिळणार आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत वाढल्याने राज्य सरकारच्या निर्णयानुसार नगरपालिकेने १४ कोटी ५० लाख रुपये अतिरिक्त अनुदान मिळावे या मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी करण्यात आल्यानंतर त्यास मंजुरी देण्याचे आदेश मंत्री मेहता यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार हा धनादेश देण्यात आला.

तसेच या योजने अंतर्गत अद्याप बांधकाम सुरु न झालेल्या ७२० घरकुलांबाबत सविस्तर चर्चा झाली. ही घरकुले नगरपरिषदेकडील अन्य उपलब्ध जागांवर बांधण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी देण्यात येईल असेही मेहता यांनी स्पष्ट केले. या बैठकीवेळी शहरातील उर्वरीत झोपडपट्टीवासियांना पक्की घरे बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असे आमदार हाळवणकर यांनी सुचविले. त्यावर झोपडपट्टीमुक्त शहर संकल्पनेनुसार केंद्र सरकार नवीन योजना आखत असून त्या अंतर्गत नगरपरिषदेने प्रस्ताव दिल्यास त्याचा पाठपुरावा करु, असे मेहता यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादन विधेयकाविरोधात निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

केंद्र सरकारने भूसंपादन विधेयक आणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कुटील डाव रचला आहे. हे विधेयक भांडवलदार व मोठ्या उद्योजकांसाठीच असल्याने या विधेयकामुळे शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेनेने भूसंपादन विधेयकाच्या विरोधात आपली लढाई चालू ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेतर्फे सोमवारी प्र्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन प्र्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, देशातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यानंतर न्याय मिळत नसल्याची ओरड होत असतानाच केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधातील हे विधेयक मंजूर करण्याचा प्र्रयत्न चालविला आहे. गारपीट, अवकाळी, अतिवृष्टी यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. कर्जाच्या विळख्याने राज्यातील सहा हजार शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे, असे असताना याकडे दुर्लक्ष करीत शेतकरी विरोधी भूसंपादन विधेयक आणून पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्र्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत आहेत. केंद्र सरकारने भूसंपादन विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर केल्यास कोणत्याही शेतकऱ्याची परवानगी न घेता त्यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आत्महत्त्येची वेळ येणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे. यावेळी शहरप्र्रमुख धनाजी मोरे, महादेव गौड, आनंदा शेट्टी, मलकारी लवटे, महेश बोहरा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images