Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

म टा


सत्ताधाऱ्यांचा २२४० ठरावांचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी तीन विद्यमान संचालक आणि संस्थापक अध्यक्षांच्या मुलाने बंड केल्यानंतरही सत्ताधारी संचालक मंडळाने २२४० ठराव जमा झाल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात सहनिबंधक दुग्ध विभागात अंदाजे १६०० ठराव दाखल झाले आहेत. विरोधी गटाकडून मंगळवारी ठराव गोळा करण्यात येणार आहेत. बुधवारी (ता.२२) ठराव दाखल करुन घेण्याची अंतिम मुदत आहे.

सत्ताधारी संचालक मंडळाकडून सोमवारी आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांच्याकडे 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ठराव दाखल करण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात सकाळी साडेनऊच्या सुमारास माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी वेगळी चूल मांडत सहनिबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे ठराव जमा केले. पाटील यांनी २९३ तर डोंगळे यांनी २०६ ठराव दाखल केले. तसेच १०० ठराव पुढील दोन दिवसांत दाखल करण्याची घोषणा केली. गोकुळच्या हितासाठी आम्ही एकत्रित झालो असून आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार राजेश पाटील यांनीही सवतासुभा मांडत ११० ठराव दाखल केले. आपण मुंबईत असून आपल्या कार्यकर्त्यांनी ठराव दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तिघांच्या बंडामुळे सत्ताधारी गटात खळबळ उडाली असून पी.एन. आणि महाडिक यांनी अन्य संचालकांशी संपर्क साधत २२४० ठराव गोळा केल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात सोमवारी निवडणूक कार्यालयात १६०० ठराव दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सोमवारी किती ठराव दाखल केले याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारी ठराव दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विरोधकांनी कंबर कसली असून मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ठराव गोळा केले जाणार आहेत. हे ठराव रमणमळा वॉटरपार्क येथे जमा केले जाणार आहेत.

...

एकच ठराव अनेक संचालकांकडे

नेत्यांचा मान राखण्यासाठी ठरावधारक संस्थांनी एकाच ठरावाच्या झेरॉक्स काढून नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे सहनिबंधक दुग्ध विभाग चक्रावला आहे. सोमवारी अनेक संस्थांनी दोन ते चार ठराव जमा केले आहेत. ठरावाचा फॉर्म हिरव्या रंगाचा असून ठरावधारकांनी कलर झेरॉक्स काढून संचालकांना ठराव दिले आहेत. या ठरावांची खातरजमा करुन मतदारयादी तयार केली जाणार आहे. एकाच संस्थेने दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे ठराव दिला असेल तर त्याची सहाय्यक दुग्ध निबंधक खातरजमा करणार आहेत. ठरावाबाबत एकमत झाले नाही तर मतदानाचा हक्क रद्द होणार आहे, असे विभागीय निबंधक सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.

....

सत्ताधाऱ्यांकडे जमा झालेले ठराव

तालुका एकूण सभासद जमा ठराव

आजरा २३३ १७८

भुदरगड ३७५ १९५

गडहिंग्लज २७३ २००

चंदगड ३४७ २०६

गगनबावडा ७६ ३९

हातकणंगले ९६ ७४

कागल ३८३ २७३

करवीर ६४२ ३१८

पन्हाळा ३५४ २२०

राधानगरी ४५९ २४०

शाहूवाडी २८७ २०२

शिरोळ १३४ ९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: भीषण अपघातात १ ठार, ३ जखमी

$
0
0

कोल्हापूर: पुणे-बेंगळुरू महामार्गावर सांगली फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ जण जखमी आहेत. जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भरधाव कार आणि ट्रॅक्टरची टक्कर झाल्याने हा अपघात झाला.

भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठिमागून जोराची धडक दिली. हा अपघात मध्यरात्रीनंतर पावणे दोनच्या सुमारास झाला.

कारमधील सर्व प्रवासी हे इचलकरंजीला जात होते अशी माहिती मिळत आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या, तसेच जखमी असलेल्यांची नावे कळू शकली नाहीत. मात्र, चालकाचे नाव वैभव अनंत बडबडे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १७ दिवसांत १२१ अपघात

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : एक ते १७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आले. अभियानादरम्यान १२१ अपघातांची नोंद झाली, तर १५जण ठार झाले. दीडशेहून अधिक लोक जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षता घेण्याच्या काळातही अपघातांचे प्रमाण गंभीर बनत असल्याचे हे निदर्शक आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.

देशात वर्षभर होणारे दहशतवादी हल्ले आणि सीमेवर शत्रूसोबत होणाऱ्या चकमकींमध्ये शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या खुपच जास्त आहे. भरधाव वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी रोज एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. अपघातांची संख्या कमी होऊन प्रवास सुरक्षित बनावा यासाठी पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाकडून दरवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते.

एक ते १७ जानेवारीदरम्यान विविध उपक्रमांनी जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियान राबवले. प्रबोधन फेरी, वाहनधारकांना मार्गदर्शन, गांधीगिरी पद्धतीने नियम मोडणाऱ्या वाहन धारकांना आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातही वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. प्रत्यक्षात, रस्त्यांवर मात्र याचे नेमके काय परिणाम झाले? असा प्रश्न उपस्थित व्हावा असे अपघातांचे प्रमाण आहे.

रस्ते सुरक्षा अभियानादरम्यान जिल्ह्यात १७ दिवसात लहान-मोठ्या १२१ अपघातांची नोंद झाली. गंभीर अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला, तर १६० लोक जखमी झाले. पुणे-बेंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगावजवळ झालेल्या अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गडहिंग्लज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. गगनबावड्यात खराब रस्त्यावर दुचाकी घसरून तरुण ठार झाला. चंदगडमध्ये उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार झाला, तर तिघे जखमी झाले. हुपरीमध्ये उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत महिला ठार झाली. कागलमध्ये रस्त्यातील खड्डा चुकवताना दुचाकीवरील तरुणाचा जीव गेला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाच्या अपघातात तरुण ठार झाला. शहरात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रतिनिधिक अपघातांमध्ये बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था ही प्रमुख कारणे समोर आली आहेत.

अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्‌धवस्त होते. जखमींना आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकते. आयुष्याची पुंजी उपचारामध्ये खर्च होते. विशेष म्हणजे अपघाताची अनेक उदाहरणे रोजच आसपास दिसत असूनही वाहनधारकांना याचे गांभीर्य नाही. हेल्मेट वापरासही विरोध होतो. पोलिस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, आदी सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रवास सुरक्षित बनू शकतो. वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीसह रस्ते सुस्थितीत ठेवणे, आवश्यक ठिकाणी सूचनाफलक लावणे, ट्रॅफिक सिग्नल, पांढरे पट्टे, स्पीड ब्रेकर, सदोष वाहनांवरील कारवाया यातून अपघातांची संख्या कमी होऊ शकते. मात्र, यासाठी इच्छाशक्ती गरजेची आहे.

रस्त्यांवर पांढरे पट्टेही नाहीत

रस्ते सुरक्षा अभियानात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सहभाग नोंदवला. मात्र, रस्त्यांवर याचे परिणाम दिसलेच नाहीत. शहरात गर्दीच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे नाहीत. सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे गायब आहेत. सूचनाफलकांचा अभाव आहे. ब्लॅक स्पॉट दुरुस्तीसाठी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात धुके आणि उसाच्या वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढते. अपघात कमी करून सुरक्षित प्रवासासाठी प्राधान्य दिले जात आहे. वाहनधारकांनी स्वत:हून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या निम्म्याने कमी होईल.

- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

अपघातांची कारणे

- चालकांची बेशिस्त

- अरुंद आणि सदोष रस्ते

- सूचना फलकांचा अभाव

- सदोष वाहनांचा वापर

- धुके, पाऊस

- रस्त्यांवरील भौमितिक अडथळे

- बेशिस्त अवजड वाहतूक

- वाहतूक नियमांबाबत अज्ञान

गेल्या १७ दिवसांतील अपघात

१२१

अपघात

१६०

जखमी

१५

मृत्यू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समरजितसिंह घाटगे यांचे समाधी स्मारकाला अभिवादन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज व भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मंगळवारी नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकास अभिवादन केले. महापालिकेने उभारलेल्या समाधी स्मारकाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. टाऊन हॉल परिसरातील गंगाराम कांबळे यांच्या स्मारकाचेही त्यांनी दर्शन घेतले.

राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. मात्र भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व शाहू महाराजांचे वंशज घाटगे यांना उपस्थित राहता आले नाही. यासंदर्भात महापालिकेकडून निमंत्रण न आल्याची टीका घाटगे यांनी केली होती. वंशज असूनही महापालिकेने बोलावले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी समाधी स्मारकाचे सकाळी दर्शन घेवून अभिवादन केले. 'महापालिकेने बऱ्याच वर्षांनी समाधी स्मारक उभारून, त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.'

यावेळी गंगाराम कांबळे यांचे नातू अरुण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अॅड. भास्करराव साळुंखे, जयंत रावण, संजय पाटील, उमेश सावंत, दीपक मगर, आप्पासाहेब भोसले, राजू जाधव, सुनील मगदूम, सुनीलराज सूर्यवंशी, बाबगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, 'राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व मान्यवरांना निमंत्रणपत्रिका दिल्या होत्या. लोकोत्सव साजरा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेते, तालीम संस्था, बोर्डिंग्ज, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये विविध जबाबदाऱ्या देऊन देशातील शाहूप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. लोकोत्सवाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा अथवा कोणालाही डावलण्याचा महापालिकेचा हेतू नव्हता.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य परिचरांचे ठिय्या आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेतील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात काम करणाऱ्या आरोग्य परिचरांच्या प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा परिषदेसमोर बुधवारी ठिय्या आंदोलन झाले.

अनेक कर्मचारी गेली तीस वर्षे कमी वेतनावर काम करत आहेत. यामध्ये गरीब, भूमहीन, शेतमजूर, परितक्त्या व बेघरांचा समावेश आहे. त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन व सरकारने सकारात्मक विचार करुन त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्याकडे केली.

कोल्हापूर जिला आरोग्य परिचर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड बाबा यादव, आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड एस. बी. पाटील, महासचिव कॉम्रेड दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आरोग्य परिचर मोर्चाने जिल्हा परिषदेत आले. त्यांनी प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी साळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सध्या मिळणारे वेतन व वाढत्या महागाईचा ताळमेळ बसत नाही. अनेकजण कुटुंबांचा खर्च चालविण्यासाठी व्याजाने कर्ज घेतात. त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. परिचरांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात 'परिचरांना सेवेत कायम करावे, तसेच या कर्मचाऱ्यांना निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी,वेतन रक्कम थेट बँकेत जमा करावे, शिपाई भरतीवेळी परिचरांना अग्रक्रम द्यावा, दिवाळी बोनस मिळावा, त्यांना ड्रेस मिळावे' या मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनात बाळाबाई कांबळे, सुमन कुंभार, द्रौपदी सुतार, लता चव्हाण, मंगल कांबळे, आनंदी नागटिळे, शांता जाधव, छाया भगत आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रेस मार्कांसाठी प्रस्तावासाठी विद्यार्थ्यांची धांदल

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : शालेय अभ्यासक्रमांसोबत खेळ, कला, राष्ट्रीय छात्रसेना यामध्येही चमकदार कामगिरी करून जिल्ह्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणाऱ्या विद्यार्थ्यांचे सध्या बारावीच्या अभ्यासासह ग्रेस मार्क मिळवण्यासाठी मिशन प्रस्ताव सुरू झाले आहे. आजपर्यंतच्या स्पर्धांमधील प्राविण्य प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांसह ग्रेस मार्कांची सवलत घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची शाळा प्रशासनासोबत संपर्क यंत्रणा वाढली आहे.

अभ्यासातील प्रगतीप्रमाणेच शालेय वयात मुले मैदानी खेळांमध्ये सहभागी होत असतात. विविध कलाप्रकारांमध्ये त्यांना रुची असेल तर पालकांकडून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा फायदा हा शाळेलाही होत असल्याने शाळेच्यावतीने जिल्हा स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत होणाऱ्या वैयक्तिक व सामूहिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात. अशा स्पर्धांमधील सहभाग, पारितोषिके, पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डातर्फे ग्रेस गुणांची सुविधा आहे. जिल्हा स्तरावर यश मिळवणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तीन गुण, राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना ५ गुण, देशपातळीवर चमकलेल्या विद्यार्थ्यांना ७ गुण बोर्डाच्या परीक्षेत अतिरिक्त मिळतात. राष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा तर या स्पर्धेतील सहभागासाठी ७ गुणांची सवलत मिळते.

विद्यार्थी जर आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात यशस्वी झाला असेल तर त्याला २५ गुणांचा लाभ मिळतो. यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनाही या ग्रेस गुणांचा फायदा मिळणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत प्रस्ताव पाठवण्याचा नियम आहे. शाळांकडे स्पर्धांमधील प्रमाणपत्रे, पदके, चषक याबाबतचे तपशील देण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी सर्व प्रकारच्या खेळाडू विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

गायन, वादन, चित्र, शिल्प, अभिनय यांसारख्या कलांमध्ये सहभागी होणाऱ्या, स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवणाऱ्या किंवा ग्रेड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही बोर्डाकडे देण्यासाठी प्रस्ताव मागवण्याचे काम शाळास्तरावर सुरू आहे. छात्रसेनेतील सहभाग हादेखील विद्यार्थ्यांना ग्रेसगुण देण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असल्याने शाळांच्या एनसीसी टीममध्ये सहभागी होणाऱ्या, परेडचे नेतृत्व करणाऱ्या, स्काऊट, गाईड या माध्यमातून विविध राज्य व देशपातळीवरील उपक्रमांमध्ये कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ग्रेसगुणांमुळे फायदा होतो.

कोट

विद्यार्थीदशेत खेळ, कला, देशसेवा यातील सहभागामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. विविध स्पर्धांमधील सहभाग व यश यातून शाळा, शहर यांचे नाव गाजवण्यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा असतो. याचा फायदा विद्यार्थ्यांना दहावी व बारावीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत मिळावा यासाठी ही ग्रेस गुणांची सवलत आहे. यासाठीचा प्रस्ताव शाळेमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून बोर्डाकडे येतो. प्रस्ताव पाठवण्याची मुदत एप्रिलअखेर आहे.

- सुधीर हावळ, अधीक्षक, बारावी परीक्षा, एसएससी बोर्ड

खेळाडू व कला

३ गुण

जिल्हास्तर

५ गुण

राज्यस्तर

७ गुण

देशस्तर

१० गुण

राष्ट्रीयस्तर

२५

आंतरराष्ट्रीय

एनसीसी व स्काउट

१५ गुण

राष्ट्रीय स्तर

२० गुण

आंतरराष्ट्रीय स्तर

असा द्यावा प्रस्ताव

ज्या स्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असेल तर त्यातील प्रमाणपत्र, पदक, चषक याचे तपशील, प्रमाणपत्राच्या झेरॉक्सकॉपींसह ग्रेसगुणांच्या कक्षेत येत असल्याचा पुरावा प्रस्तावअर्जासह शाळेकडे दाखल करावा. शाळेमार्फत हे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे द्यावेत. प्रमाणपत्र आवश्यक असून दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रे जपून ठेवावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्गदर्शन, प्रेरणा व संधी ही त्रिसूत्री वापरा’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सखोल मार्गदर्शन, प्रेरणादायी व्यक्तींचा आदर्श व योग्य संधी या त्रिसूत्रीची सांगड घालावी' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी केले. न्यू कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रिन्स मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील होते.

बोर्डिंगचे चेअरमन वडगावकर म्हणाले, 'कष्ट व जिद्द या बळावर विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाचे शिखर गाठावे. संस्कारांच्या पायावर वाटचाल केल्यास सुजाण नागरिक होता येते याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवावे.

यावेळी पळसे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ए.

डी. सासने यांनी अहवाल वाचन केले. व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार, संचालक ए. जी. वणिरे, वाय. एस. चव्हाण, सविता पाटील, उदय पाटील, टी. के. सरगर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लवकरच धावणार पुणे-कोल्हापूर ई-बस

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्यभरात पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रयत्नशील असून लवकरच पुणे- कोल्हापूर मार्गावर इलेक्ट्रिक एसटी धावणार आहे. त्यासाठी चार्जिंग पॉईंटसह बस उभी करण्यासाठी जागेच्या व्यवस्थेची पाहणी मुंबईच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानकात केली. राज्याच्या प्रमुख मार्गांवर या बसची चाचणी घेतली जात आहे. ४३ आसन क्षमता असलेली इ-बस येत्या तीन महिन्यात कोल्हापुरातून सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रदूषण कमी करण्यासह इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक बस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक बस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे परिवहन महामंडळाच्या ताफ्यात (पीएमपी) फेब्रुवारी २०१९ मध्ये २५ इलेक्ट्रिक बस शहरात दाखल झाल्या आहेत. यापैकी काही एसटी पुणे-कोल्हापूर मार्गावर धावणार आहेत. ही सेवा सुरू करण्यासाठी मुंबईच्या एका पथकाने नुकतीच सीबीएसची पाहणी केली आहे. चार्जिंग सेंटरची जागा, त्यासाठी लागणारा स्वतंत्र वीजपुरवठा, प्रशिक्षित कर्मचारी, स्वतंत्र केबिनची पाहणी केली आहे.

एसटीने सुरू केलेल्या शिवशाही बसला मिळालेल्या प्रतिसादानंतर 'शिवाई' नावाची नवीन इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०१९मध्ये ही बस नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे सुरू झाली. या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महामंडळाने इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील महत्त्वाच्या आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सुरू केली जाणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे-कोल्हापूर मार्गावर येत्या काही दिवसांत ही बससेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गाचे अंतर २५० किलोमीटर असून इ-बसची बॅटरी चार्जिंग केल्यानंतर सुमारे ३०० किलोमीटरचा टप्पा गाठते. सीबीएससह मार्गावर काही पेट्रोल पंपावर चार्जिग सेंटर उभारणीची पाहणी मुंबईच्या पथकाने केली.

कोल्हापूर ते पुणे मार्गावर इलेक्ट्रिक बसच्या चार्जिग सेंटरसाठी विभागीय कार्यालय परिसरातील यंत्रशाळेत लागणाऱ्या आवश्यक बाबींची पाहणी पूर्ण झाली आहे. या बसमुळे एसटीच्या डिझेलच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्यामुळे एसटीचा तोटाही कमी होईल.

- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एसटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी, परिवहनसह समित्यांवर सदस्यांची निवड

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागांवर बुधवारी महासभेत नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या. निवड झालेल्या सदस्यांमधून एका सदस्याची सभापतीपदी निवड होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सभापतिनिवडीसाठी निवडणूक होईल.

स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी संपुष्टात आला होत्या. त्यामुळे रिक्त झालेल्या सदस्यपदी काँग्रेसकडून सुभाष बुचडे, भूपाल शेटे व जय पटकारे यांची निवड झाली. भाजपाकडून विजय सूर्यवंशी, विजय खाडे-पाटील, राष्ट्रवादीचे अजित राऊत, ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम व शिवसेनेच्या नियाज खान यांची निवड झाली. प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी नवीन सदस्यांची नावे सभाध्यक्षांकडे सादर केली.

परिवहन समितीच्या सहा सदस्यांमध्ये काँग्रेसचे यशवंत शिंदे, राष्ट्रवादीचे प्रसाद उगवे, भाजपचे आशिष ढवळे, ताराराणी आघाडीचे नामदेव नागटिळे, शेखर कुसाळे व सेनेच्या प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी काँग्रेसच्या जयश्री चव्हाण, शोभा कवाळे, छाया पोवार, राष्ट्रवादीच्या मेघा पाटील, वहिदा सौदागर, भाजपाच्या भाग्यश्री शेटके, उमा इंगळे, ताराराणी आघाडीच्या स्मिता माने व रुपाराणी निकम यांची निवड झाली. फेब्रुवारी महिन्यामध्ये या तिन्ही समितींच्या सभापतींची निवड होणार आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडीची प्रक्रिया होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘५५७७’ गाडीचा चर्चेचा प्रवास

$
0
0

फोटो आहे

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

महापालिकेतील राजकारण नेहमीच विविध किश्श्यांनी चर्चेत राहते. यामध्येही खासकरून आपल्या नेत्यांवरील विशेष प्रेम दाखवण्यासाठी अनेकजण स्थायी किंवा महासभेचा आधार घेतात. त्यांची चाललेली धडपड अनेकजणांना माहित असते. त्याचे चवितचर्वणही होत असते. नेत्यांवरील आपले हे प्रेम व्यक्त करण्यासाठी दोन वर्षांपासून महापालिकेत नंबर गेम सुरू आहे. या नंबर गेममुळेच नवीन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आलेल्या विजय सुर्यवंशी यांच्या दिमतीला ५५७७ क्रमांकाची झेस्ट गाडी दाखल झाली. अतिरिक्त आयुक्तांकडे असलेली ही गाडी पुन्हा पदाधिकाऱ्यांच्या ताफ्यात आल्याने त्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते आपल्या वाहनांसाठी ठराविक क्रमांकाला पसंती देतात. त्यांच्या ताफ्यात अनेक वाहने असली, तरी विविध वाहनांचे क्रमांक एकच असतात. त्यामुळे हे वाहन क्रमांक नेत्यांची खास ओळख निर्माण करणारे ठरत आहे. वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या नंबर गेमची कॉपी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते करत असतात. यामुळे त्यांचीही ठराविक नेत्यांचे समर्थक म्हणून ओळख बनली आहे. त्याला महापालिकेतील पदाधिकारी अपवाद ठरलेले नाहीत.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप -ताराराणी आघाडी सत्तासंघर्षामध्ये २०१८ मध्ये भाजपच्या आशिष ढवळे यांनी स्थायी समितीचे सभापतीपद खेचून आणले. स्थायीचा पदभार स्वीकारल्याबरोबर झेस्ट कंपनीची कार त्यांच्या दिमतीला हजर झाली. त्याचा क्रमांक ५५७७ होता. या क्रमांकाची सर्व वाहने माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वाहनांची असल्याने त्यांच्या कारची चांगलीच चर्चा झाली. वर्षभर त्यांच्या ताफ्यात ही कार होती. २०१९ मध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे शारंगधर देशमुख स्थायी सभापतीपदी विराजमान झाले. आमदार सतेज पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याने त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे असलेली 'मांझा' त्यांनी वापरण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून ती त्यांच्याकडे होती.

गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या विजय सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यांनी लगेचच माजी विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांच्याकडे असलेली गाडी पुन्हा अतिरिक्त आयुक्तांना देवून त्यांच्याकडील ५५७७ क्रमांकाची कार आपल्याकडे घेतली. गेल्या चार दिवसांपासून राजर्षी शाहू समाधीस्मारक लोकार्पण सोहळ्याची धामधूम सुरू असताना त्यांच्याकडील कार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. महापालिकेची निवडणूक पुढील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात महासभेच्या माध्यमातून अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील आणि हळूहळू निवडणुकीचे वातावरण तापू लागेल.

.....

अतिरिक्त आयुक्त सॉफ्ट टार्गेट

ढवळे यांनी नवीन कार खरेदी केल्यानंतर पूर्वीची कार अतिरिक्त आयुक्त देसाईंना देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्याकडील कार स्थायी समिती सभापतींना देण्यात आली व त्यांना ढवळे यांच्याकडे असलेली कार दिली. आता त्यांच्याकडील कार पुन्हा विरोधी पक्षनेत्यांकडे आली असून पूर्वीच्या विरोधी पक्षनेत्यांची कार देसाईंना दिली आहे. त्यामुळे कारच्या आदलाबदलीमध्ये अतिरिक्त आयुक्त सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागाळा पार्क रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

खानविलकर पेट्रोल पंपाजवळ क्रॉस ड्रेन व ड्रेनेज लाइनच्या कामासाठी सहा महिने बंद राहिलेला भाऊसिंगजी रोड ते कसबा बावडा रस्ता महिन्यापूर्वी सुरू झाला. मात्र महिन्यानंतरही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने वाहनधारकांचा प्रवास खाचखळग्यांतून सुरू आहे. वाहनांची वर्दळ जास्त असल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी रस्त्याची पाहणी करून काम सुरू करण्याबाबत आढावा घेतला. आठवड्यात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भाऊसिंगजी रोड ते कसबा बावडा रस्त्यावर खानविलकर पेट्रोल पंपानजिक येथे क्रॉस ड्रेन, ड्रेनेज लाइनसाठी सहा महिने वाहतूक बंद ठेवली होती. पाणीपुरवठा विभागाने पावसाळ्यापूर्वी नियोजन न करता काम सुरू केले. त्यानंतरच्या महापुरात कामात मोठा अडथळा आला. त्यातून काम पूर्ण होण्यास विलंब झाला. त्याचा त्रास वाहनधारक, परिसरातील नागरिकांना झाला. विविध संघटनांनी दिवाळीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता सरनोबत, उपशहर अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन कामाचा निपटारा करण्यासाठी ठेकेदाराला वेळोवेळी सूचना केल्या. अखेर नोव्हेंबमध्ये काम पूर्ण झाले.

मात्र खोदाईमुळे ठिकठिकाणी मुरुमाचे ढीग आणि मोठे दगड तसेच पडून राहिल्याने रस्ता बंदच राहिला. शेवटी यातूनच वाहनधारकांनी वाट काढली. रस्त्यावरील अडथळे दूर करून सपाटीकरणानंतर डिसेंबरमध्ये अंशत: वाहतुकीला सुरुवात झाली. मात्र अद्याप डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावर ठिकठिकणी मोठे दगड आणि मुरुम असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिसरात काळी माती असल्याने दोनवेळा मुरुम टाकून सपाटीकरणाचे नियोजन होते. त्यानुसार मुरुम टाकण्यात आला. पण त्यानंतरही डांबरीकरण झालेली नाही. त्यामुळे धूळ अधिकच उडत आहे. वातावरणातील बदल आणि रस्त्यावरील धुळीमुळे परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुलीकणामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.

दरम्यान, डांबरीकरणासाठी १९ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. निधीची तरतूद करुन कामाला सुरुवात करण्यासाठी सकाळी शहर अभियंता सरनोबत यांनी पाहणी केली. सपाटीकरणानंतर आठवड्यात डांबरीकरणाला सुरुवात होऊ शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनाची धास्ती

दोन वर्षांपूर्वी शहर पाणीपुरवठा विभागाने काम केल्यानंतर त्वरीत डांबरीकरण करण्यात आले. मात्र येथील काळ्या मातीमुळे रस्ता खचला. त्यामुळे आंदोलने झाली. नंतर पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे यावेळी त्वरीत डांबरीकरण करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. रस्त्यावर दोनदा मुरुम टाकून वाहतूक व रोलिंग करुन रस्ता मुजबूत झाल्यानंतरच डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता लगेच खराब झाल्यानंतर नागरिकांचा येणारा रोष टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापोर्टलबाबत मंत्री पाटील यांची मुंबईतील विद्यार्थ्यांशी चर्चा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महापोर्टलच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि महापोर्टलचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व मुद्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार असून लवकरच या विषयावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

यापूर्वीच्या भाजप रकारकडून सरकारी पदभरतीसाठी तयार केलेल्या महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षांमध्ये अनेक गोंधळ आणि भ्रष्टचाराचे आरोप स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केले होते. पोर्टलविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. सामूहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नांची पुनरावृत्ती होणे, परीक्षेत मोबाइल, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, योग्य बैठक व्यवस्था नसणे, वेळेवर परीक्षा न होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, डमी उमेदवारांना पकडल्यानंतर कोणतीही कारवाई न होणे अशा अनेक घटनांमुळे महापरीक्षा पोर्टलचा भ्रष्ट कारभार उघड झाला होता.

सतेज पाटील यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून या विषयाचे गांभीर्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोर्टलअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांना स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी मुंबईत बैठक घेतली. महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, महाआईटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद कोलते, दिनेश पाटील, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक मदन नागरगोजे, महाआयटीचे रौनक सराफ आदींसह विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मार्गदर्शन, प्रेरणा व संधी ही त्रिसूत्री वापरा'

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम 'विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सखोल मार्गदर्शन, प्रेरणादायी व्यक्तींचा आदर्श व योग्य संधी या त्रिसूत्रीची सांगड घालावी' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी केले. न्यू कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रिन्स मराठा बोर्डिंगचे चेअरमन आर. डी. पाटील होते. बोर्डिंगचे चेअरमन वडगावकर म्हणाले, 'कष्ट व जिद्द या बळावर विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाचे शिखर गाठावे. संस्कारांच्या पायावर वाटचाल केल्यास सुजाण नागरिक होता येते याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवावे. यावेळी पळसे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ए. डी. सासने यांनी अहवाल वाचन केले. व्हाइस चेअरमन डी. जी. किल्लेदार, संचालक ए. जी. वणिरे, वाय. एस. चव्हाण, सविता पाटील, उदय पाटील, टी. के. सरगर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट हाउस रोडवर रंगणार हॅपी स्ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेले पारंपरिक खेळ, सहकुटुंब आनंदाचे क्षण अनुभवण्याचे निमित्त, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि कलागुणांना मिळणारे व्यासपीठ असा जल्लोषाचा रविवार येत्या आठवड्यात सर्किट हाउस रोडवर उगवणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या हॅपी स्ट्रीटचा माहोल आता रविवारी, २६ जानेवारी रोजी ताराबाई पार्कातील सर्किट हाउस ते लाइन बाजार रोड येथे फुलणार आहे. सकाळी सात वाजता हॅपी स्ट्रीटची चैतन्यदायी सुरूवात होणार आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्र टाइम्सतर्फे हॅपी स्ट्रीट उपक्रम घेण्यात येतो. रस्त्यावर सर्व प्रकारचे खेळ आणि मंचावर कलागुणांचा आविष्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. यानिमित्ताने लहान मुलांसाठी तर खेळाचे अनेक प्रकार असतातच, पण चाळीशीपासून सत्तरी ओलांडलेल्या कोल्हापूरकरांच्या लहानपणाचे खेळ खेळण्याचा आनंदही त्यांना हॅपी स्ट्रीटवर मिळतो. आल्हाददायक थंडी आणि सोबत आजच्या मोबाइलयुगात मागे पडत चाललेले खेळ खेळण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे.

यंदा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मार्ग, रंकाळा पदपथ उद्यान व सायबर रोड येथे झालेल्या 'हॅपी स्ट्रीट' मध्ये शहरवासियांना मनोरंजनाचा आस्वाद लुटता आला. येत्या रविवारी सर्किट हाउस रोडवर नागरिकांना या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची आणि मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

'हॅपी स्ट्रीट'चे मुख्य प्रायोजक फ्रूस्टार संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय प्रायोजक गोकुळ, एज्युकेशन पार्टनर विश्वकर्मा कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, रियल इस्टेट पार्टनर मेट्रो लाइफ सिटी डेव्हलपर्स व पायताण डॉट कॉम हे स्टार्ट अप पार्टनर आहेत. या उपक्रमासाठी कोल्हापूर पोलिस प्रशासन, कोल्हापूर महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांचे सहकार्य लाभले आहे. 'हॅपी स्ट्रीट'मधील पारंपरिक खेळ हे प्रत्येकाच्या आवडीचे खेळ ठरले आहेत. जुन्या काळातील या खेळांविषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. रस्सीखेच, जिबली, लंगडी, पोत्यात पाय घालून पळणे, भोवरा खेळणे, टायर पळविणे या खेळात शाळकरी मुलांसह महिला व पुरुषही सहभागी होत आहेत. आपत्कालीन प्रसंगात काय काळजी घ्यावी, अचानक हृदयविकाराचा झटका आला तर प्रथमोपचार कसे करावेत याचीही माहिती यावेळी देण्यात येणार आहे. याशिवाय मर्दानी खेळांचा थरार, एनसीसी प्रात्यक्षिके,सायकलिंग, स्केटिंग, ब्रेनगेम असे अनेक खेळ आहेत.

...

चौकट आहे ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलइडी प्रोजेक्ट अतंर्गत शहरात २५,०६४ बल्ब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्यावतीने (इइएसएल) शहरात राबवण्यात येत असलेल्या एलइडी प्रोजेक्ट अतंर्गत २५,०६४ बल्ब बसवण्यात आले आहेत. कंपनीसोबत झालेल्या करारापेक्षा २,१९० जास्त बल्ब बसवण्यात आले आहेत,' अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी बुधवारी महासभेत दिली.

इइएसएल कंपनीचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी स्थायी समितीने महासभेला शिफारस केली होती. महापालिकेच्या देखरेखेखाली सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देताना सरनोबत म्हणाले, 'सरकारने कंपनीमार्फत एलइडी प्रोजेक्ट राबवण्याबाबत अध्यादेश काढल्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये महापालिकेसोबत करार झाला. तत्पूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार शहरात २२,८७४ दिवे बसवण्यात येणार होते. त्यामध्ये २४, ३५, ७५ व ११० च्या वॅटच्या बल्बचा समावेश होता. रस्त्यांची लांबी-रुंदी आणि उंचीनुसार बल्बची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे करारापेक्षा २,१९० बल्ब जास्त बसवण्यात आले आहे. अजून १,७५७ बल्बची आवश्यकता आहे. ८० टक्के काम पूर्ण झाले असून प्रत्येक प्रभागातील समस्या निर्गत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.' मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप सभागृहात सदस्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यावरण रक्षणाची समाजात जागृती व्हावी, या उद्देशाने 'महाराष्ट्र टाइम्स'ने हाती घेतलेल्या 'पृथ्वीरक्षण' या उपक्रमाला राज्य सरकारच्या पुढाकाराने बळ देत राज्यातील सर्व शाळांमध्ये बुधवारी पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांनी या सामूहिक पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभाग देत शपथ घेतली.

पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृतीपर सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने नववर्षात शाळांमध्ये पर्यावरण रक्षण शपथ घेण्याची मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला. या स्तुत्य मोहिमेची दखल राज्य सरकारने घेतली व बुधवारी राज्यातील सर्व शाळांच्या प्रार्थनेवेळी पर्यावरण रक्षणाची शपथ घ्यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यानुसार ही शपथ देण्यात आली. कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील शाळांमध्येही पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.

पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या घटकांना दैनंदिन आयुष्यात फाटा देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याच्या हेतूने राबवण्यात आलेला हा उपक्रम राज्य सरकारसाठीही दिशादर्शक ठरल्याने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुढाकाराबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. 'मटा'च्या पुढाकाराने गेल्या १५ दिवसांत राज्यातील महत्त्वाच्या शहरात सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली आहे. राज्य सरकारने या उपक्रमाला साथ दिल्यामुळे राज्यातील प्रत्येक शहर, गाव येथील शाळांमध्येही पर्यावरण रक्षणाच्या शपथेचा आवाज घुमला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरे सरंजामच्या जमिनींसीठीआठ उपजिल्हाधिकारी नियुक्त

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाममधील जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. या कामांसाठी ८ उपजिल्हाधिकारी आणि ९६ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांनी आठ उपजिल्हाधिकाऱ्यांची उद्या, (शुक्रवारी)सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.

चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम अंतर्गत ४७ हजार एकर जमीन शेतीच्या प्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग एक म्हणून नोंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांना महिन्यापूर्वी दिले आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. पारदर्शकपणे संबंधीत जमीन शेतकऱ्यांची नावे करण्यासाठी आठ पथके तैनात करण्यात येणार आहे. राधानगरीचे प्रांताधिकारी श्रीराम भोसले, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हेमंत निकम यांच्या नेतृत्वाखाली हे काम चालणार आहे. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाकडे हेलपाटे मारावे लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १८५ कोटींच्या निधी खर्चाचे आव्हान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या आर्थिक वर्षातील सरकारकडून मंजूर जिल्हा विकास आराखड्यातील १८५ कोटी रूपये मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्यास परत सरकारकडे पाठवण्याची नामुष्की प्रशासनावर येणार आहे. जिल्ह्यातील तीन मंत्री, आमदार, खासदारांनी समन्वयाने प्रशासन गतिमान करून वेळेत निधी खर्च करण्याची गरज आहे.

जिल्हा नियोजन समितीने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या २७१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार कामांची निवड होऊन प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. आतापर्यंत ८२ कोटी ५३ लाखांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांपैकी काही कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात कामांना सुरूवात झालेली नाही. त्यामुळे मंजूर आराखड्यातील निधी कमी वेळात खर्च करण्याचे नियोजन करताना प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, आमदार, खासदार फंड, स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विकासकामांसाठी आतापर्यंत १२२ कोटी रुपये संबंधित यंत्रणांकडे वर्ग केले आहेत. यापैकी ८२ कोटी ५३ लाख रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित ८० कोटी रुपये पडून आहेत. निधी वर्ग करूनही संबंधीत विभागाने कामांना सुरूवात केलेली नाही. सरकारकडून आराखडा मंजूर केल्यानंतर खर्चानुसार निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे वर्ग केला जातो. दिलेला सर्व निधी खर्च न झाल्याने नव्याने निधी देण्याकडे सरकारनेही दुर्लक्ष केले आहे. सध्या सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शिल्लक निधी मार्चअखेर खर्च न केल्यास परत जाऊ शकतो. मंजूर आराखड्यातील सर्व कामे सुरू झाली असती तर २७१ कोटींपर्यंतचा निधी जिल्ह्यास मिळू शकला असता. तसे न झाल्याने मंजूर आराखड्यातील निम्मी कामेही पूर्ण झालेली नाहीत.

प्रशासनावर मर्यादा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रशासन निवडणूक प्रक्रियेत दीर्घकाळ व्यस्त राहिले. ऑगस्ट महिन्यात महापूर आणि अतिवृष्टी झाली. त्यामध्ये प्रशासन विस्कळित झाले. त्यामुळे यावर्षी विकासकामे मार्गी लावण्यावर प्रशासनास मर्यादा आल्याचे स्पष्ट झाले. खासदार, आमदारांनाही निवडणुकीमुळे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात यश आले नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक राहिला आहे.

शून्य खर्चाचे विभाग

मत्सबीज केंद्राचे बांधकाम करणे, सुधारणा आणि अत्याधुनिकरण आदी कामांसाठी ३ कोटी ४८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मत्स्य विभागाकडे ८९ लाख रुपये वितरित केले आहे. मात्र, त्यांनी एक दमडीही खर्च केलेली नाही. लघू सिंचन प्रकल्पासाठी २ कोटी ४४ लाख रुपये निधी मिळूनही खर्च झालेले नाहीत. वनपर्यटन, इको टुरिझम वाढीसाठी ९६ लाखांचा निधीही अखर्चित आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंत्रसामुग्री पुरवणे, आधुनिकरणासाठी ४२ लाख रुपये मिळूनही खर्चाकडे दुर्लक्ष झाले आहे. उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवा, सुविधांचे ३ कोटी ३७ लाखांचा निधी खर्च झालेला नाही. गृहनिर्माण, नगरविकास, माहिती व प्रसिध्दी, महिला, बालकल्याण विकास, व्यावसाय शिक्षण, जिल्हा परिषद आरोग्य विभागानेही निधी असूनही खर्च करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मृद, जलसंधारण, पशुसंवर्धन, वन, पाटबंधारे, रेशीम, लघुउद्योग हे विभाग निधी खर्च करण्यात मागे आहेत. यामुळे जिल्ह्याचा विकास मंदावला आहे.

२७१ कोटी

एकूण मंजूर निधी

१६२ कोटी २५ लाख

प्राप्त निधी

१८५ कोटी ११ लाख

प्रशासकीय मान्यता दिलेला निधी

१०३ कोटी ७ लाख

संबंधीत यंत्रणाकडे वर्ग निधी

८५ कोटी १३ लाख

खर्च निधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवगर्जना महानाट्याचा मंच आजपासून खुला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा महानाट्यातून मांडणाऱ्या 'शिवगर्जना' या महानाट्याच्या प्रयोगांना संभाजीनगर येथील निर्माण चौक येथे शुक्रवारापासून (ता. २४ जानेवारी) प्रारंभ होणार आहे. २८ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता नाट्यप्रयोग होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजना महानाट्याचे उदघाटन होणार असून त्यानंतर नाटकाचा पहिला प्रयोग सादर करण्यात येणार आहे' अशी माहिती यावेळी दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी दिली.

स्वप्नील यादव म्हणाले, 'उदघाटनप्रसंगी मान्यवरांना रोप देण्यात येणार आहे.तसेच यावेळी शिवाजी महाराजांच्या वृक्षसंवर्धनाच्या आज्ञापत्राचे वाचन करण्यात येणार आहे. मंचस्थळी हे आज्ञापत्र फलक स्वरूपात उभारण्यात आले आहे. नाटक पहायला येणाऱ्या ९००० प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सहा वर्षानंतर कोल्हापुरात या महानाट्याचे प्रयोग होत आहेत. त्यासाठी नव्याने तयारी करण्यात आली आहे. प्रेक्षकांना या नाटकाचा भव्य अनुभव मिळावा यासाठी कलाकारांची तयारी पूर्ण झाली आहे. शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य या महानाट्यातून उलगडले आहे. कलादिग्दर्शक अमर मोरे यांच्या संकल्पनेतून एकशे वीस फूट लांबीचा व साठ फूट उंचीचा भव्य फिरता सेट त्यासाठी साकारला जाणार आहे. पन्नासहून अधिक तंत्रज्ञ, हत्ती, घोडे, उंटांबरोबरच अद्ययावत प्रकाश योजना, आतषबाजी ही या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत. देशभरात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत आजवर महानाट्याचे ५५ प्रयोग सादर झाले आहेत. ४०० स्थानिक कलाकरांचा ताफा असून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील चित्तथरारक लढाईचे प्रसंग उभारण्यात आले आहेत. या नाटकात विनायक चौगुले शिवाजी महाराजांची भूमिका करत आहेत.'

पत्रकार परिषदेस लेखक इंद्रजित सावंत, निर्मात्या रेणू यादव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images