Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष आघाडीचे वर्चस्व कायम राहील. जि.प.चा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,'असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शनिवारी कोल्हापुरात दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेत्यांच्या उपस्थितीत जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीची चर्चा होणार आहे. त्यानंतर रविवारी किंवा सोमवारी भाजप व मित्रपक्ष आघाडीतील सदस्यांची बैठक होईल. सध्या सत्तेत असणाऱ्या आघाडीचे नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार महाडिक, माजी आमदार अमल महाडिक हे करत आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. यासंदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष महाडिक यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, 'अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात नेते मंडळीसोबत चर्चा सुरू आहे. भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांच्या नेते मंडळीसोबत चर्चा होईल. गेल्या वेळेला सत्ता स्थापन करताना जे घटक भाजप सोबत होते, त्या साऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविली जाईल. यामुळे भाजपचाच अध्यक्ष होईल. यापूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार होती. त्यामुळे १३ डिसेंबरला भाजप व आघाडी सदस्यांची बैठक घेण्याचे ठरले होते. आता निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे बैठक काही दिवस पुढे ढकलली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरः ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार सखा कलाल यांचे ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ‘सांज’, ‘ढग’ यांसारख्या गाजलेल्या कथासंग्रहांबरोबर त्यांनी अगदी मोजक्या कथा लिहिल्या. त्यांच्या दर्जेदार कथांमुळे मराठी साहित्यात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी असा परिवार आहे.

रायबाग (जि. बेळगाव) येथे १० डिसेंबर १९३८ रोजी जन्मलेले कलाल शिक्षणानिमित्त कोल्हापुरात आले. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ शिवाजी विद्यापीठात लिपिक म्हणून नोकरी केली. ग्रंथालयशास्त्रातील उच्चशिक्षणानंतर ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून रुजू झाले आणि तेथून निवृत्त झाले. लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. कमी आणि कलात्मक लिहिणाऱ्या कलाल यांची पहिली ‘कात’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रुपं प्रतिकात्मकरित्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. दोन कथासंग्रहातील २८ कथा आणि काही अप्रकाशित अशा ४० कथा कलाल यांनी लिहिल्या,तरीही ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांव्यतिरिक्त त्यांचा ‘पार्टी’ हा ललितलेखसंग्रही प्रकाशित आहे. १९६० नंतर लिहिणाऱ्या चारुता सागर, महादेव मोरे, आनंद यादव, बाबा पाटील यांच्याबरोबरीचे कलाल हे महत्त्वाचे लेखक होते. त्यांच्या कथांमधून निसर्गाची वेगवेगळी रुपे पाहता मराठी कथेचा तो काव्यात्म आविष्कार होय. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमश: वाचनही झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किक ऑफ...

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : खचाखच भरलेल्या गॅलरीतून हजारो चाहत्यांच्या घोषणा, टाळ्या, शिट्ट्यांनी घुमणारा आसमंत आणि प्रतिस्पर्ध्याला नमविण्यासाठी सुरू असलेली अटीतटीची लढत अनुभववण्याची संधी फुटबॉलप्रेमींना मिळणार आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्यावतीने केएसए लीगच्या माध्यमातून बहुप्रतिक्षित फुटबॉल हंगामाला रविवारी (ता. १५) छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात होत आहे. साधारणतः सहा महिने फुटबॉल हंगाम सुरू राहणार आहे.

कोल्हापूरची ओळख केवळ कुस्तीपुरती मर्यादित न राहता फुटबॉल खेळातही अनेक दर्जेदार खेळाडू कोल्हापूरने देशाला दिले आहेत. स्थानिक फुटबॉल खेळाडूंच्या वाढत्या गुणवत्तेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. गुणवान खेळाडू आणि त्यांच्यावर निरतिशय प्रेम करणारे चाहते केवळ इथेच आढळतात. अगदी आयपीएलच्या धर्तीवर भरणाऱ्या सामन्यांना जशी गर्दी होते तसाच अनुभव फुटबॉल मैदानावर येतो. अंतिम सामन्यात तर मैदान भरगच्च असते. लहानग्यांपासून ज्येष्ठांच्या नसानसांत फुटबॉल भिनला आहे. सामन्यादरम्यान नव्वदी गाठलेले माजी खेळाडूही मैदानात उपस्थित राहून नव्या पिढीचे बळ वाढवतात. साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये फुटबॉल हंगाम सुरू होतो. जून महिन्याच्या अखेरपर्यंत स्पर्धा रंगतात. गतवर्षी अंतिम सामन्यानंतर हुल्लडबाजानी केलेल्या दगडफेकीमुळे यंदाचा हंगाम लांबला होता. मात्र, पोलिस प्रशासन आणि क्रीडामार्गदर्शकांच्या बैठकीनंतर फुटबॉल हंगामाचा मार्ग मोकळा झाला.

कुस्तीएवढेच फुटबॉलवरही प्रेम

शहरातील पेठांसाठी आपला फुटबॉल संघ म्हणजे अस्मिता आणि वेगळी ओळख वाटते. पेठे, तालीम मंडळाच्या नावावरून फुटबॉल संघ ओळखला जातो. समर्थकांची मैदानात बसण्याची जागाही संघानुसार ठरलेली आहे. फुटबॉल संघामागे राजकीय गणिते व आराखडे ठरलेले असतात. आपल्या आवडत्या संघाची लढत असेल तर नोकरीत हमखास सुट्टी टाकून मैदानावर उपस्थिती दर्शवणारे समर्थक कमी नाहीत. शाळकरी मुले व महिलाही मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी गर्दी करतात. लहान मुले गोल झाल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना खुन्नस देतात. अशी कितीतरी चाहत्यांची अनेकविध रुपे सामन्यांदरम्यान पाहायला मिळतात. आपल्या पाठीराख्यांचा सन्मान राखला जावा, यासाठी जीव तोडून खेळणारे खेळाडू, देखील कोल्हापुरातच अनुभवायला मिळतात. एखाद्या उत्सवासारखे आनंदाचे वातावरण संपूर्ण फुटबॉल हंगामादरम्यान पाहायला मिळते. आघाडीचा भारतीय फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने कोल्हापुरातील गर्दी पाहून भारावून कौतुक केले होते.

फुटबॉलची शतकी परंपरा

जशी कोल्हापूरच्या कुस्तीला शतकी परंपरा आहे तशीच फुटबॉललाही लाभली आहे. छत्रपती घराण्याने कुस्तीबरोबर फुटबॉलला राजाश्रय दिल्याने शहरासह जिल्ह्यात फुटबॉल खेळ रुजण्यास मदत झाली. जवळपास नव्वद वर्षांपूर्वी जगभरात फुटबॉल उदयाला येत असताना कोल्हापुरात त्याची जोमाने सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धापूर्वी शेती व शैक्षणिक विषयांची माहिती घेण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी महाराज इंग्लंडला गेले होते. तेथे त्यांनी फुटबॉल खेळ पाहिला आणि त्यांना तो आवडला. असा रांगडा खेळ आपल्या संस्थानातही खेळला जावा, या द‍ृष्टीने त्यांनी फुटबॉल कोल्हापुरात रुजवण्यासाठी प्रयत्न केले. प्रिन्स शिवाजी महाराज स्वत: फुटबॉल खेळाडू होते. छत्रपती घराण्याच्या पुढाकाराने जामदार फुटबॉल क्लब हा कोल्हापुरातील पहिला फुटबॉल क्लब उदयाला आला. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात साधारणतः १९४० च्या दरम्यान कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना झाली. असोसिएशनच्या माध्यमातून फुटबॉल खेळाचा उत्तरोत्तर विकास होत गेला. १९६० साली असोशिएनच्यावतीने भव्य अशा राजर्षी शाहू स्टेडियमची उभारणी करण्यात आली. १९९९ नंतर स्टेडियमची अत्याधुनिक बांधणी करण्यात आली. शाहू स्टेडियमची बैठक क्षमता तब्बल ३५ हजाराहून अधिक आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैदान खचाखच भरते. दिवसेंदिवस फुटबॉलची वाढती क्रेझ पाहता शाहू स्टेडियम अपुरे पडू लागले आहे.

अशा होतील लढती

हंगामातील पहिली लढत कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ ब यांच्यात दुपारी दोन वाजता तर पाटाकडील तालीम मंडळ 'अ' विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यात दुपारी चाहता दुसरा सामना होईल अन्य सामान्य असे : सोमवार (ता.१६) पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स (२ वा.), प्रॅक्टिस फुटबॉल क्लब 'अ' विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ (४ वा.) मंगळवार ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ (२ वा.), शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ (४वा.), बुधवार मंगळवार पेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ (२ वा.) बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ) (४ वा.), गुरुवार: कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्स (२ वा), पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ (४ वा.), शुक्रवार: पाटाकडील तालीम मंडळ (ब) विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ- ब(२ वा.), प्रॅक्टिस फुटबॉल क्लब- अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ(४ वा.), शनिवार: ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ (२ वा.), शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ (४ वा.), रविवार मंगळवार पेठ फुटबॉल संघ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ (२ वा.), बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ (४ वा.)

होणार कठोर कारवाई

गतवर्षी झालेल्या हुल्लडबाजी व दगडफेकीनंतर कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली. त्यानुसार नियमांचे पालन न केल्यास संघाला आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे. सामना वेळेत सुरू झाला नाही तर संघास १० हजार रुपये दंड, दंडातील अर्धी रक्कम उपस्थित संघाला देण्यात येईल. खेळाडू नोंदणीबाबत सामन्याबाबतची तक्रार संघ व्यवस्थापनाने सामना सुरू होण्यापूर्वी किवा सामना संपल्यानंतर ३० मिनिटांत के.एस.ए. कार्यालयात ५०० रुपये भरून देणे बंधनकारक आहे. यात दोषी आढळल्यास त्या खेळाडूला पाच हजार, तर संघास १५ हजार दंड आणि समोरील संघास तीन गोल व तीन गुण दिले जातील. लीग स्पर्धेत मैदानावर व मैदानाबाहेर संघ, खेळाडू व्यवस्थापक समर्थकांनी हुल्लडबाजी केल्यास संबंधितांवर कारवाई व आर्थिक दंड होणार आहे. सामना संपल्यानंतर मैदाबाहेरील कारवाईसाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या संघास खेळत असलेल्या सामन्यातून बाद करून शून्य गुण व शून्य गोल दिले जातील. याशिवाय विरुद्ध संघास विजयी घोषित केले जाईल. घटनेचे स्वरुप गंभीर असेल तर लीगमधून बाद केले जाईल. सोबत हा संघ 'बी' डिव्हिजनमध्ये जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास विनाप्रेक्षक हा सामना घेतला जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या फुटबॉल संघाचे नाव खेळाडू व पदाधिकारी यांच्या नावांची यादी पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. दरम्यान सर्व संघांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलि प्रशासनाने बैठक घेऊन वादविवाद कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास होणाऱ्या परिणामांची कल्पना दिली आहे. मैदानात सीसीटीव्ही बसवण्यात आले असून फुटेज आधारे दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर चर्चा

फुटबॉल हंगाम सुरू होणार असल्या बाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. आपल्या आवडत्या खेळाडूच्या समर्थनात संघाचे चाहते पोस्ट करू लागले आहेत. खेळाडूंचे जुने सामन्यादरम्यानचे चित्रित क्षण व्हिडिओच्या माध्यमातून फॉरवर्ड केले जात आहेत. वाढती चुरस पाहता यंदाचा हंगाम 'हाय होल्टेज' होण्याची शक्यता आहे. खेळाडूंसोबत समर्थकांनी यासाठी कंबर कसली आहे. मात्र, गतवर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून हुल्लडबाजीला प्रोत्साहन मिळत असल्याने यंदा सायबर विभागाच्या पोलिसांमार्फत सोशल मीडियावर वॉच ठेवला जाणार आहे. सामाजिक असंतोष पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

परदेशी खेळाडूंची क्रेझ कायम

दरवर्षी आपल्या संघात परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यावर स्थानिक संघांनी भर दिला आहे. दोन वर्षांपासून पाटाकडील तालीम संघातील परदेशी खेळाडू चांगली कामगिरी केल्याने त्याचे अनुकरण सर्वच संघाने करत परदेशी खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. यामध्ये नायजेरियन खेळाडूंचा सर्वाधिक समावेश आहे. चांगले मानधन आणि कोल्हापूरकडून मिळणारा मानसन्मान पाहता परदेशी खेळाडू येथे एकरूप होताना दिसतात. यंदाच्या हंगामात पीटर सीए (लिबेरिया), चिजिको इगवीबुके (नायजेरिया), बेटाट रोमरिक (कॅम्रोनियन), जेरोमे येबाह (घाना), डेव्हिड इथोह अकिम अबियो (नायजेरिया), अराफत हरूना घाना, अल्विन तेह लिबेरिया, सोमटोचुकुवू अगमू, मायकेल नोवोकू नायजेरियन, रिचमंड अवेटी घानीयन, जोशूला जॉन्सन फेस्टक लागोस सहभागी होत आहेत. सामन्यादरम्यान परदेशी खेळाडू पाहण्यासाठी बालचमू मैदानावर गर्दी करतात.

पिटीएमपुढे आव्हान

मागील दोन वर्षांपासून पाटाकडील तालीम मंडळाने बहारदार कामगिरी करत हंगामावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी पाटाकडील संघाचे खेळाडू ताकतीने मेहनत घेतात. हंगामापूर्वी संघ निवडीचा बारकाईने विचार करून संघाची मजबूत बांधणी केली जाते. संघातील खेळाडूंचा उत्साह, सहकारी वृत्ती आणि मजबूत डिफेन्सच्या जोरावर पाटाकडीलने आपले वर्चस्व कायम राखले आहे. गत हंगामात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ यांनीही चांगली कामगिरी केली होती. यंदा पाटाकडील तालीम मंडळाला शह देण्यासाठी इतर संघांनी कंबर कसली आहे. ताकदीने कमी समजले जाणारे संघही सरस ठरू शकतात.

असे झाले संघात बदल

यंदा वरिष्ठ गटातील सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंमध्ये बदल केले आहेत. प्रॅक्टिसने हरियाणाकडून प्रवीण हा गोलकीपर आणला आहे. तर दिलबहार तालीम मंडळाने रोमरिक नवा खेळाडू घेतला आहे. यंदा शिवाजी तरुण मंडळाकडे फुलेवाडीकडून संकेत साळुंखे, पाटाकडीलकडून डेव्हिड ओला तर झारखंडहून आलेला दीपक चिरकी व खंडोबाकडून मयुरेश चौगुले, रणवीर जाधव यांचा संघात समावेश केला आहे. पाटाकडील तालीम मंडळाने गोव्यातून सुशांत बोरकर, फुलेवाडीकडून रियान व नायजेरियातून अराफत तर प्रॅक्टिसकडून गोलकीपर अल्ताफ हकिमला घेतले आहे. बालगोपालने गोव्याकडून मनीष हा खेळाडू घेतला आहे. तर फुलेवाडीने संघाची मजबूत बांधणी करून जर्मनीहून आलेला अनिकेत वरेकरला आपल्याकडे घेतले असून मंगळवार पेठेकडून त्यांच्याकडे निलेश खापरे, भारत पाटील, करण जाधव आले आहेत. संयुक्त जुना बुधवार पेठने रिचर्ड ओलुशेला व पुण्याहून शीबु सनी, मयूर शेलारला तर शिवाजी तरुण मंडळकडून गोलकीपर आकाश मिस्त्रीला आपल्याकडे घेतले आहे. खंडोबानेही लिबिरीयातून अल्विनजे, नाशिककडून विकास बहारे व बेळगावकडून किरण चौकाशीला घेतले आहे.

संघांचे स्टार खेळाडू

प्रॅक्टिस फुटबॉल क्लब : कैलास पाटील (कर्णधार), स्टार खेळाडू : ओमकार मोरे, जय कामत, दिग्विजय वाडेकर

दिलबहार तालीम मंडळ : सचिन पाटील (कर्णधार) स्टार खेळाडू : राहुल तळेकर, जावेद जमादार, पवन माळी

शिवाजी तरुण मंडळ : सुमित जाधव (कर्णधार), स्टार खेळाडू : करण चव्हाण- बंदरे, संकेत साळुंखे

पाटाकडील तालीम मंडळ : सैफ हकीम (कर्णधार) स्टार खेळाडू : ओंकार पाटील, ऋषिकेश मेथे- पाटील, ओमकार जाधव

बालगोपाल तालीम मंडळ : प्रतीक पवार (कर्णधार), स्टार खेळाडू : रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, सुरज जाधव

फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ : रोहित मंडलिक (कर्णधार) स्टार खेळाडू : रिचर्ड, राजा दास, मायकेल

संयुक्त जुना बुधवार पेठ : हरीश पाटील (कर्णधार), स्टार खेळाडू : सुमित घाटगे, अखिलेश पाटील, प्रसाद सरनाईक, सचिन बारामते, अमित सावंत

खंडोबा तालीम मंडळ : शकील पटेल (कर्णधार), स्टार खेळाडू : माणिक पाटील, विकी सुतार, ऋतुराज संकपाळ

कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेला साजेसा खेळ प्रत्येक खेळाडूने करावा. चुकीच्या घटना टाळून सहकार्यवृत्तीने खेळ वाढीस लागावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यमातून फुटबॉलच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत. अधिक चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी काम सुरू आहे. सर्वांनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करत केएसएने बनवलेल्या नियमांचे पालन करून हंगाम यशस्वी करावा.

मालोजीराजे छत्रपती, अध्यक्ष कोल्हापूर फुटबॉल असोसिएशन

कोल्हापूरच्या खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांनी आत्मविश्वासाने खेळ करून कामगिरीत सातत्य राखावे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. स्थानिक खेळाडूंनी बाहेरील स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या क्षमता तपासाव्यात. क्रीडा क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाताना शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रयत्न व्हावेत.

अनिकेत जाधव, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

यंदा सर्व फुटबॉल संघांनी आपल्या खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यामुळे सुरुवातीला समन्वय साधणे काहीसे कठीण जाईल. त्यासाठी खेळाडूंनी सरावाला प्राधान्य देत त्यात सातत्य ठेवावे. त्याचा फायदा संपूर्ण हंगामात संघाला होईल. खेळाडू व संघ व्यवस्थापनाने सामन्याची वेळ पाळावी. त्यामुळे शिस्त लागण्यात मदत होईल.

राजेश राऊत, प्रशिक्षक

नवीन फुटबॉल हंगामात खेळाडूंसोबत प्रेक्षकांनीही खिलाडूवृत्ती जोपासावी. त्यामुळे हुल्लडबाजीला कायमचा आळा बसेल. १९८०-८५ मध्ये प्रेक्षक मैदानाच्या आसपास उभे असायचे. मात्र, त्यावेळी चुकीच्या घटना कधीही घडत नव्हत्या. अलीकडे काहीजणांच्या वर्तनामुळे संपूर्ण फुटबॉलला बदनामीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रेक्षक व खेळाडू दोन्ही घटकांनी सहकार्यवृत्ती दाखवून फुटबॉलच्या वाढीसाठी खेळावे.

प्रदीप साळोखे, अध्यक्ष रेफ्री असोसिएशन

कोल्हापुरात महिला फुटबॉल खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. हंगामादरम्यान अंतिम सामन्यात खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होते. गेल्या काही वर्षांपासून हुल्लडबाज मैदानावर गैरवर्तन करून अश्लिल घोषणा देतात. याकडे व्यवस्थापनाने लक्ष द्यावे. यंदाचा हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी प्रयत्न करावा.

सुचिता पाटील, खेळाडू

साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात फुटबॉल हंगाम चालू होतो. गतवर्षी झालेल्या चुकीच्या प्रकारामुळे यंदा फुटबॉल हंगाम सुरू होईल की नाही अशी शंका मनात होती. मात्र, फुटबॉल हंगाम सुरू होत असल्याचे ऐकून समाधान वाटले. समर्थक प्रेक्षकांनी कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. चुकीचे वर्तन करू नये. त्यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम होत आहे.

सौरभ भोईटे, क्रीडाप्रेमी

यंदाचा हंगाम

५६

सामने

१६

संघ

३२०

खेळाडू

१३

आंतरराष्ट्रीय खेळाडू

१३

राष्ट्रीय खेळाडू

१५

राज्यस्तरीय खेळाडू

६ महिने

हंगाम कालावधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजसाठी सरसावले ‘न्यू’चे माजी विद्यार्थी

$
0
0

लोगो : मटा सोशल कनेक्ट

कोल्हापूर टाइम्स टीम

ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो. जिथे करिअरसाठी योग्य दिशा मिळाली. संस्कार आणि शिस्तीची रुजवात घालून आयुष्य घडविण्यासाठी नवी ऊर्जा निर्माण केली त्या कॉलेजसाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून येथील न्यू कॉलेजमधील माजी विद्यार्थी संघ पुढे सरसावला आहे. गेल्या ५० वर्षांच्या कालावधीत उच्च शिक्षण घेत विविध क्षेत्रात भरारी घेतलेले माजी विद्यार्थी एकत्र येऊन कॉलेज विकासाचा 'न्यू'पायंडा पाडत आहेत.

१९७१ मध्ये स्थापन झालेल्या या कॉलेजने गेल्या पाच दशकाच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 'क्वॉलिटी कॉलेज'म्हणून नावलौकिक मिळवला. येत्या जून महिन्यापासून कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त, माजी विद्यार्थी संघ कॉलेजला भरीव मदत करणार आहे. त्याचा श्रीगणेशा शनिवारी (ता.१४ ) कॉलेजच्या प्रागंणातील पार्किंगच्या काँक्रिटीकरणाच्या कामाने होत आहे. न्यू कॉलेज माजी विद्यार्थी संघ व न्यू कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी स्नेहमेळावा होत आहे. माजी विद्यार्थी संघाची २००४ मध्ये स्थापना झाली. संघाची १८ जणांची कार्यकारिणी आहे. संस्थेचे चेअरमन आर. डी. पाटील वडगावकर आणि प्राचार्य व्ही. एम. पाटील हे निमंत्रित सदस्य आहेत.

दरम्यान गेल्या पाच दशकात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. राजकारण, समाजकारण, प्रशासन, पोलिस, संरक्षण, साहित्य, सिनेमा, क्रीडा क्षेत्रात ठसा उमटविला आहे. कॉलेजमध्ये ११ वीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून शिकण्याची संधी आहे. कॉलेजने विद्यापीठीय गुणवत्ता यादीत स्थान निर्माण करताना क्रीडा क्षेत्र गाजवले. विद्यार्थी संख्या ५५०० आहे.

विविध क्षेत्रांत चौफेर कामगिरी

असंख्य माजी विद्यार्थी देशात आणि देशाबाहेर उच्चपदावर कार्यरत आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील, लेखक विश्वास पाटील, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव बी. एम. हिर्डेकर, माजी महापौर सागर चव्हाण, 'नॅक'चे माजी सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, भारतकुमार पत्रावळे आदींचा समावेश आहे. उद्योगपती वैभव नायकवडी, सचिन मेनन, अजय सप्रे, विजय बुधले, पारस ओसवाल यांनी उद्योग क्षेत्रात नाव कमविले आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात न्यायाधीश होण्याचा मान पटकाविला. यामध्ये न्यायाधीश तानाजी नलवडे, पी. आर. भावके, श्रीमती अश्विनी बाचूळकर, रणजित मोरे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, शिक्षण संचालक दिनकर पाटील, आरबीआयमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर दीपक कुलकर्णी, प्रांताधिकारी सुबराव पाटील, पोलिस उपअधीक्षक श्रीधर जाधव, रवी साळोखे, शिरीष सासने यांचे कॉलेजचे शिक्षण 'न्यू'मध्ये झाले. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सिनेमा, नाटकातही नाव कमविले आहे. अभिनेत्री पूजा पवार, अभिनेता संजय मोहिते, विकास पाटील असा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू आहे. क्रीडा क्षेत्रात कॉलेजचा दबदबा आहे. १३ विद्यार्थी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

माजी विद्यार्थी संघामार्फत कॉलेज विकासाला चालना आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविले आहेत. एच. टी. अपराध यांनी ग्रंथालय इमारती बांधकामासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली. कॉलेजमधील गरीब मुलांना बस पास, शैक्षणिक शुल्क भरले आहे. खेळाडूंना आर्थिक सहाय्य केले आहे. कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात रचनात्मक काम करण्याचे विद्यार्थी संघाने ठरविले आहे.

अमर सासने, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ

संस्थेचे शताब्दी महोत्सवी वर्ष, कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला जूनमध्ये होणारा प्रारंभ आणि 'नॅक'ची तयारी या पार्श्वभूमीवर कार्यक्रम होत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. संस्थेने नेहमीच गुणवत्ता वाढ व विद्यार्थी केंद्रीभूत कार्यक्रमांना प्राधान्यक्रम दिले. भविष्यात जुन्या इमारतीचे नव्याने बांधकाम, नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात केली जाणार आहे.

डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य न्यू कॉलेज

माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी कार्यकारिणी

माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी अमर सासने, उपाध्यक्षपदी अशोक वणकुर्दे, सचिवपदी उदय कापसे, खजानिसपदी प्रा. टी. के. सरगर आहेत. सहसचिव म्हणून सचिन कुंभार, चेतन पाटोळे आहेत. कार्यकारिणीत डॉ. नागेश नलवडे, आण्णासाहेब नालंग, दिलीप साळोखे, लाला गायकवाड, फत्तेसिंह सावंत, प्रकाश सरनाईक, श्रीमती डॉ. एस. जे. पवार, दिग्विजय मळगे, राहुल दुकांडे, विशाल बोंगाळे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक उपक्रम

$
0
0

कोल्हापूर

येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व स्मार्ट एज्युकेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्याससाठी मटेरियल उपलब्ध करुन दिले. तसेच मॉडेल प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिली. सरावासाठी तीन प्रश्नपत्रिका दिल्या. या विद्यार्थ्यांची, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्ममिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेच्या धर्तीवर स्मार्ट एज्युकेशनतर्फे एकत्रित सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ११०००, ७००० व ५००० रुपयांचे रोख बक्षीस व मानचिन्हांनी गौरव होणार आहे. या शैक्षणिक साहित्याचा संपूर्ण खर्च श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने केला आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी असा उपक्रम दरवर्षी राबविण्याचा निर्णय ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी जाहीर केला. याप्रसंगी संस्थेचे संचालक एस. के. कुलकर्णी, प्रविण कुलकर्णी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू-वर-पालक मेळावा

$
0
0

कोल्हापूर

येथील सारस्वत विकास मंडळातर्फे वधू-वर परिचय व पालक मेळावा झाला. या मेळाव्याला मुंबई, पुणे, गोवा व कोकणातील पालकांनी व इच्छुक वधू-वरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला शीतल इंगनहळ्ळी, स्नेहल कामत, शरद प्रभावळकर, जयंत साळगावकर, प्रिया सातोस्कर, मोहन दळवी, अनुराधा तेंडूलकर, भाऊ ठाकूर यांचा सहभाग लाभला. दसरा चौक येथील सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनएसएस शिबिर

$
0
0

कोल्हापूर

येथील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथे विशेष श्रम संस्कार शिबिर झाले. शिबिरांतर्गत गावातील रस्ते दुरुस्ती, नदी घाट व स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. शिबिरात सहभागी स्वयंसेवकांनी गुऱ्हाळघरे, सेंद्रीय शेती प्रकल्प, सेंद्रीय गूळ निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली. मुलांनी अंधश्रद्धा निर्मूलन, कन्या बचाव अभियान, पाणी बचत, जल साक्षरता याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य पी. के. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. एच. पिसाळ, सरपंच अनिता पोतदार, उपसरपंच अर्चना पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन झाले. प्रा. भिकाजी लाड यांचे 'घराचे घरपण व गावाचं गावपण हरवत चाललय', प्रा. बी. डी. कुडाळकर यांचे 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे', प्रा. कृष्णात बसागरे 'माझी गाणी माझी वाणी सारेगामा', प्रा. मोहन निकम-पाटील यांचे 'कथाकथन', विजय जाधव यांचे 'युवाशक्ती व शिवविचार' याविषयी व्याख्यान झाले. शिबिराला सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, विभागीय समन्वयक प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी सदिच्छा भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे निधन

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार सखा कलाल यांचे ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने आर. के. नगर येथील राहत्या घरी निधन झाले. सांज, ढग यांसारख्या गाजलेल्या कथासंग्रहांबरोबर त्यांनी अगदी मोजक्या कथा लिहिल्या. मात्र, त्यांच्या दर्जेदार कथांमुळे मराठी साहित्यात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी असा परिवार आहे.

रायबाग (जि. बेळगाव) येथे १० डिसेंबर १९३८ रोजी जन्मलेले कलाल शिक्षणानिमित्त कोल्हापुरात आले. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ शिवाजी विद्यापीठात लिपिक म्हणून नोकरी केली. ग्रंथालय शास्त्रातील उच्चशिक्षणानंतर ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून रुजू झाले आणि तेथून निवृत्त झाले. कलाल हे लेखन, वाचन, चिंतनात रमणारे होते. कमी आणि कलात्मक लिहिणाऱ्या कलाल यांची पहिली 'कात' ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रुपे प्रतिकात्मकरित्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. दोन कथासंग्रहातील २८ कथा आणि काही अप्रकाशित अशा ४० कथा कलाल यांनी लिहिल्या. मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून त्यांची ओळख होती. कोल्हापुरात भरलेल्या पहिल्या कथा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० नंतर लिहिणाऱ्या चारुता सागर, महादेव मोरे, आनंद यादव, बाबा पाटील यांच्याबरोबरीचे कलाल हे महत्त्वाचे लेखक होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावकारांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल

$
0
0

फाइल फोटो

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMt

कोल्हापूर

सर्वसामान्य व्यक्ती, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिकांसह उद्योगपतींवर खासगी सावकारांचा वरवंटा सुरू आहे. या मोकाट सावकारांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सावकारांनी निवडणूक लढवत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अशी पदे मिळवून व्हाईट कॉलरची झूल पांघरली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना राजाश्रय दिल्याने सर्वसामान्य व्यक्ती घायाकुतीला आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सावकारांच्या तक्रारीला कंटाळून कर्जदाराने पोलिस, सहकार विभाग आणि राज्य सरकारकडे तक्रार अर्ज केल्यानंतर सहकार खात्याला जाग आली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील बारा सावकारांच्या घरावर छापे टाकून कोरे चेक, कोरे स्टँप, खरेदीखत, संचकार पत्रे जप्त केली आहेत. ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक आहे. आज शहरासह ग्रामीण भागात पावलापावलांवर खासगी सावकार सर्वसामान्यांना नाडण्यासाठी टपून बसले आहेत. त्यांच्या दहशतीपुढे तक्रार देण्यासाठी कोणी धजावत नसल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात ते 'व्हाईट कॉलर' म्हणून धुमाकुळ घालत आहेत.

पोलिसांनी यापूर्वी खासगी सावकारांना अटक करुन कारवाई केली आहे. त्यामध्ये शहरातील माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, अस्लम शेख, इचलकरंजी माजी नगरसेवक बादशहा बागवान, उमेश जाधव यांच्यावर कारवाई झाली आहे. कवाळे आणि राजारामपुरी, पाचगावमधील वास्कर बंधूंवर यापूर्वी मोक्काची कारवाई झाली आहे. शहरातील जुन्या पेठा, राजारामपुरी, शाहूपुरीत गल्लीबोळात खासगी सावकार असून ते जनतेला नाडत आहेत.

माणसाला अडचणीतून सुटका करुन घेण्यासाठी अनेकांपुढे हात पसरावे लागतात. त्यामुळे गरजेला पैसा उपलब्ध व्हावा म्हणून खासगी सावकारांच्या वळचणीला जावे लागते. सावकारांकडून पाच ते २० टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केली जाते. शहरातील अनेक नागरी आणि सहकारी बँका बंद झाल्याने सामान्यांना खासगी सावकारांचे उंबरे झिजवावे लागतात. अनेकजणांना पतसंस्थांचा आधार आहे. पण काही सावकार पतसंस्थेच्या माध्यमातूनही खासगी सावकारकी करत आहेत. सावकारीमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

सावकारकीच्या विरोधात विधानसभेतही आवाज उठला आहे. यावेळी मंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करताना 'सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढणार' अशी घोषणा केली होती. पण सोलून काढणारी यंत्रणाच सावकारांच्या घरी पाणी भरत असल्याने दिवसेंदिवस त्यांची दादागिरी वाढत चालली आहे.

२०१६ मध्ये स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून विम्याची रक्कम लाटण्यासाठी मजूराचा खून करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला कर्ज देणाऱ्या १५ खासगी सावकारांची नावे सोमवारी पोलिसांनी जाहीर केली होती. प्रकाश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तसेच दोन सावकारांसह स्वरुप पाटील, अशोक तनवाणी, प्रफुल्ल शिराळे, बिपिन ओमकारलाल परमार, सूरज साखरे, जयसिंगराव जाधव, निलेश जाधव, दत्ता बामणे, पांडुरंग पाटील, प्रशांत सावंत, रणजित चव्हाण, खोत अण्णा (इंगळी) या सावकारांची नावे पोलिसांनी जाहीर केली. यातील एक सावकार नगरसेवकाचा सख्खा भाऊ आहे. तर एका सावकाराच्या पत्नीला २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्यात सावकारांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर एक चांगला संदेश गेला असता. पण त्यांनी संधी गमावली. या गुन्ह्यातील सूरज साखरे वगळता बहुतांशी सावकारांची व्याजाची पिसणी जोरात सुरू आहे. सूरज साखरेवर दोन महिन्यांपूर्वी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. तरीही सावकारांची दहशत कायम आहे. महिन्याला एक ते दोन तक्रारी सावकारांविरोधात होतात. गेल्या दोन वर्षात कर्जाची परतफेड न करणाऱ्या सावकारांनी कर्जदाराच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल आहे. मुलीच्या विवाहासाठी पैसे घेणाऱ्या डॉक्टर महिलेला सावकारांनी त्रास दिल्याची घटना घडली आहे.

......

४० टक्के आजी, माजी

नगरसेवक करतात सावकारकी

शहरातील आजी माजी नगरसेवक सावकारकी करत असून त्यांचे प्रमाण ४० टक्के आहे. या सावकारांना राजकीय पक्षांनी मानाची पदेही दिली आहेत. नगरसेवकपदाच्या आडून त्यांचे व्यवहार सुरू असतात. जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे नातेवाईक सावकारकीत सक्रीय आहेत. राष्ट्रीय पक्षांनी सावकारांच्या नातलगांना तिकीटे देऊन त्यांची तळी उचलल्याचे चित्रही पहायला मिळत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची सावकारांची तयारी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारांचे जाबजबाब सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकार विभागाने छापे टाकलेल्या सावकारांचे जाबजबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवस हे काम सुरू राहणार असून सोमवारी (ता. १६) त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. १२) सहकार विभागाने पोलिस बंदोबस्तात नारायण गणपतराव जाधव, त्याचा मुलगा तुळशीदास,नातू अभिजीत, किशोर सुर्वे आणि त्याचा मुलगा रुपेश, राहुल अवधूत, आनंदा चिबडे, बबलू घुंगरे पाटील, दगडू शेणवी, संजीवकुमार सूर्यवंशी, अरविंद एकल, विजय पाटील, तानाजी पाटील, अमित चव्हाण, मारुती जाधव या सावकारांच्या घरावर छापे टाकले. नारायण जाधव याच्या घरी रोख २७ लाख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने मिळाले. रोख रक्कमेबाबत सहकार विभागाने प्राप्तीकर खात्याला कळवले आहे.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संशयित सावकारांचे जाबजबाव घेण्यात आले. टेंबे रोडवरील रुपेश सुर्वे याचा सुमारे एक तास जबाब घेण्यात आला. सोमवारी तुळशीदास जाधव आणि त्याचा मुलगा अभिजीत यांचे जबाब घेण्यात येणार आहेत. राहुल अवधूतचा जबाब शनिवारी (ता.१४) होणार आहे. राधानगरी सहाय्यक निबंधकांनी आनंदा चिबडे याचा जबाब घेतला. तो स्टँप व्हेंडर असून त्याच्याकडे ३० स्टँप मिळाले आहेत. जप्त केलेले स्टँप मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले असून त्याचा अहवाल सोमवारी येणार आहे. दुसऱ्यांच्या सह्यांचे स्टँप स्वत:च्या घरी स्टँप व्हेंडरला ठेवता येतात का, याबाबत मत मागविले आहे. संजीवकुमार शर्मा, कृष्णात पाटील, अरविंद एकल, तानाजी पाटील यांचे जबाब घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुर्कस्थान, इजिप्तमधील कांद्याची आवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भडकलेल्या कांद्याचे दर आवाक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्कस्थानमधील कांद्यांची आवक केली आहे. दोन्ही देशातील कांदा शुक्रवारी मार्केट यार्डमधील शेती उत्पन्न बाजार समितीत आला.

मुंबईच्या अरिहंत ट्रेडर्सने मार्केट यार्डातील जे हरी अॅन्ड सन्स या दुकानात दोन्ही देशातील कांदा पाठवला आहे. इजिप्तमधील २५ किलोच्या ४२० पिशव्या तर तुर्कस्थानमधील २० किलो वजनाच्या ५०० पिशव्यांची आवक झाली आहे. इजिप्तमधील कांद्यांचा दर प्रतिकिलो ८० तर तुर्कस्थानच्या कांद्यांचा दर ९० रुपये आहे.

गेल्या आठवड्यात चांगल्या प्रतिच्या कांद्याचा दर प्रतिकिलो १५० रुपये होता. बाजारात मध्यम ते लहान आकाराचा कांदा ५० ते ७० रुपये इतका होता. गेल्या दोन दिवसात कांद्याचे दर चांगलेच उतरले आहेत. प्रतिकिलो १० ते ७७ रुपये कांद्याला दर मिळाला. मार्केट यार्डातील सरासरी दर प्रतिकिलो ३८ रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची मुलांसहकोयनेत आत्महत्या

$
0
0

कराड : माहेरी आलेल्या महिलेने दोन मुलांसह नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सांगवड (ता. पाटण) येथे शुक्रवारी घडली. यातील एका बालकाचा मृतदेह सापडला असून, महिला आणि एका बालकाचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. राधिका मनोजकुमार माने (वय २७), श्रावण (वय ३) आणि शिवराज (वय नऊ महिने) अशी तिघांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पाटण पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनधारक महासंघाने साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिन्यात शहरातील खड्डे भरुन दर्जेदार पॅचवर्क करु व अत्यंत खराब रस्ते नवीन करु, असे आयुक्तांनी लेखी आश्वासन दिले होते. पण आजतागायत रस्त्यांची अवस्था वाईटच आहे. त्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी गंगावेश चौकात केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करुन प्रतिकात्मक आंदोलन केले. वाहनचालकांनी रस्त्यातील खड्ड्यामध्ये बसून साजऱ्या केलेल्या या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

रंकाळा स्टँड, गंगावेश ते मटण मार्केट चौक हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. पापाची तिकटी ते रंकाळा स्टँडपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे पाहिल्यानंतर शहरातील हा महत्वाचा रस्ता आहे असे कुणालाही पटणार नाही. जवळपास अर्धा फूट खोलीच्या खड्ड्यांमधून दुचाकीपासून अवजड वाहने चालवताना चालकांना कसरतच करावी लागत आहे. धुळीने तर या त्रासामध्ये आणखी भरच पडत आहे. महिनाभरापासून या रस्त्याकडे महापालिकेने लक्ष दिले नसल्याने वाहनधारक महासंघाने सुरू केलेल्या जनआंदोलनात शुक्रवारी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करुन निषेध केला. त्यासाठी गंगावेश चौकातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढण्यात आल्या. तसेच तेथील एका खड्ड्यात सर्व पदाधिकारी व वाहनधारक बसले व महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत केक कापण्यात आला. खड्ड्यांना वाढदिवसाचे गाणे गात दिलेल्या शुभेच्छांमुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे तेथील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, प्रकाश पोवार, किशोर कांबळे आदी उपस्थित होते. यानंतर निवेदन देण्याबरोबरच पुढील आठवड्यात होणाऱ्या महासभेला वाहनांचा घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महामंडळाची उद्याची सभा गाजण्याची चिन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १५) होत आहे. महामंडळाचे कोल्हापुरातील मुख्य कार्यालय हायटेक करण्यासाठी दोन कोटी रूपयांची जागा खरेदी केली असली तरी खासबाग परिसरातील महामंडळाचे स्वमालकीच्या कार्यालयाच्या जागा विक्रीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. याशिवाय अहवालातील त्रुटी, आर्थिक ताळमेळ, खर्चाचा तपशील तसेच कर्मचारी भरती व मंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांची विनयभंग आरोपातून झालेली मुक्तता, त्यानंतरचे होर्डिंग लावण्यावरून झालेला वाद व या प्रकरणी सभासदत्व रद्दची मागणी या विषयावर महामंडळाची वार्षिक सभा गाजणार आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान संचालक मंडळ समर्थ पॅनेलचे आहे. मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली गेल्या साडेतीन वर्षापासून महामंडळाचा कारभार सुरू आहे. गेल्यावर्षीच्या सभेत महामंडळाच्या पुणे, मुंबई व कोल्हापूर येथील जागा खरेदीचा मुद्दा कळीचा झाला होता. कोल्हापुरात रेल्वेस्थानक समोरील एका व्यावसायिक संकुलात महामंडळाने जागा खरेदी केली आहे. या जागेचा व्यवहार दोन कोटी रूपयांचा असून त्यापैकी काही रक्कम भरणे बाकी असल्याने अद्याप जागा ताब्यात आलेली नाही. नव्या जागेच्या आर्थिक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर महामंडळाची गेल्या अनेक वर्षापासून ताब्यात असलेली स्वमालकीची खासबागेतील कार्यालयाची जागा विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळ घेत असल्याची कुणकुण सभासदांना लागली आहे. काहीही झाले तरी जुनी जागा विकू देणार नाही असा पवित्रा सभासदांनी घेतला आहे. सभासदांना ओळखपत्र देण्यात नियमाचा भंग केल्याचा आरोप गेल्या सभेत संचालक मंडळावर ठेवण्यात आला होता. त्यामध्ये काही सुधारणा झाली आहे का, कामाच्या दर्जानुसार सभासद नोंदणी, महामंडळ उत्पन्नवाढीचे पर्याय यावरूनही सभेत तू तू मै मै होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताळेबंदाला मंजुरीसह १३ ठराव मान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवारी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत प्राचार्य डॉ. धनाजीराव कणसे यांनी विद्यापीठाचा वार्षिक ताळेबंद सादर केला. आस्थापनेवरील खर्चात वाढ व उत्पन्नात घट या मुद्द्यावरून ताळेबंदातील आकडेवारीवर सदस्यांनी शंका उपस्थित केल्याने गोंधळ झाला.

कर्मचारी, प्राध्यापक भरती बंदी असल्याने रोजंदारीवर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामुळे आस्थापनाचा खर्च वाढत असल्याच्या ताळेबंदातील नोंदीवर सदस्यांनी आक्षेप घेतला. कायम कर्मचारी व प्राध्यापकांच्या तुलनेत रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा खर्च कमी असूनही ताळेबंदात दाखवण्यात आलेली खर्चवाढ चुकीची असल्याचे मनोज गुजर यांनी मांडले. तर विद्यार्थी वसतिगृहातील फर्निचर खरेदीबाबत तातडीने निर्णय घेतल्याने झालेल्या खर्चावर लेखापरीक्षकांकडून लाल शेरा दिल्याच्या मुद्द्यावरून लेखा विभागप्रमुख व्ही. टी. पाटील यांच्यावर सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मार्चअखेरीच्या तोंडावर कागदोपत्री काही आर्थिक मंजुरी घेतल्या आहेत, तसेच खर्च झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने गोंधळ झाला. ही चूक लेखाविभागातर्फे मान्य करून पाटील यांनी येत्या मार्चअखेर प्रलंबित प्रस्ताव योग्यपणे सादर करून मंजुरीसाठी ठेवले जातील, असे सांगितले.

ताळेबंद अहवालानंतर सदस्यांनी मांडलेल्या ठरावांवर चर्चा झाली. अधिसभेत शिक्षणाच्या विकासाबाबत एकूण २७ ठराव मांडण्यात आले. त्यापैकी सात ठराव प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आले जे सदस्यांकडून मंजूर केले. क्रीडा विभागाचा वार्षिक अहवाल सभेत विचारार्थ ठेवण्यात आला. यावेळी प्रताप माने हे खेळाडूंच्या प्रगतीविषयी बोलत असताना मनोज गुजर यांच्याकडून हस्तक्षेप झाल्यामुळे माने व गुजर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. कुलगुरूंनी मध्यस्थी केल्यानंतर हा विषय थांबला. प्रताप पाटील यांनी, शिवाजी विद्यापीठात सहकार अध्यासन करण्यासाठी राज्य सरकार व वारणा सहकार यांच्या सहकार्याने अध्यासन निर्मिती करण्याचा ठराव मांडला, तांत्रिक कारणामुळे हा ठराव मागे घ्यावा अशी विनंती करून अध्यासननिर्मितीसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले. पंकज मेहता अनुपस्थित असल्याने त्यांच्यावतीने दिनेश जंगम यांनी बायोवेस्टपासून गॅसनिर्मिती प्रकल्पाचा ठराव मांडला. मात्र याबाबत सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात प्रकल्प सुरू असल्याने हा ठराव मागे घेण्यात आला. क्रीडा विभागातर्फे खेळाडूंना भत्ता द्यावा, संगणक विषयक अभ्यासक्रमात बदल करावेत, शोधनिबंध प्रकाशनाचा खर्च विद्यापीठाने द्यावा, पीएचडी शोधनिबंध सादर केल्यापासून सहा महिन्यात मूल्यांकन व्हावे यासह १३ ठरावांना मान्यता देण्यात आली. अमान्य केलेले सर्व ठराव तांत्रिक त्रुटींमुळे रद्द करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारने फेरयाचिका दाखल करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाने रिक्षातून सुरू असलेली विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव कोर्टासमोर हजर करावेत. शाळा आणि पालकांची भूमिका लक्षात घेऊन सरकारने फेरयाचिका दाखल करावी. १७ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीचा निकाल विरोधात गेल्यास प्रसंगी शाळा बंद करण्यासह जनआंदोलन उभारण्याचा इशारा शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात शनिवारी ही बैठक झाली.

यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले, 'हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा कोणीही अवमान करणार नाही. मात्र त्यातून ठोस तोडगा काढण्याची गरज आहे. राज्यातील शालेय व्यवस्थापन समितीने या निर्णयासंदर्भात ठराव करावेत. हे ठराव मुख्यमंत्री, राज्याचे शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांना पाठवावेत. राज्यभरातील शाळांतून शिक्षण विभागाला निर्णयासंदर्भात पत्रे पाठवावीत. पालक आणि शाळांची भूमिका लक्षात घेऊन सरकारने कोर्टात फेरयाचिका दाखल करावी. कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी. यासाठी प्रसंगी नागरी कृती समिती, पालक, मुख्याध्यापक संघातर्फे जनआंदोलन उभारले जाईल.'

माजी प्राचार्य आनंदराव कचरे यांनी, 'शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव या ठिकाणीच तत्काळ घ्यावा' असे सांगितले. या ठरावाला सर्वांनी हात उंचावून मान्यता दिली.

दरम्यान, ही बैठक वेळेत सुरू झाली नसल्याचा आरोप करुन समितीचे अशोक पोवार म्हणाले, 'या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी.'

रमेश मोरे म्हणाले, 'कृती समितीची लढाई न्यायव्यवस्थेसोबत नाही. मात्र सरकारने विद्यार्थी आणि शाळांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. १८ डिसेंबरनंतर पुन्हा शाळेशी संबधित असलेल्या सर्व घटकांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तसेच शिक्षक संघटनांनीही रस्त्यावर उतरुन आक्रमक बनावे.'

खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे म्हणाले, 'शाळेपर्यंत कोणत्या वाहतूक व्यवस्थेची सोय करावी, हा पालकांचा निर्णय आहे. सध्या रिक्षाचालक पालकांकडून हमीपत्र घेण्याची मोहीम राबवित आहेत. त्यापेक्षा पालकांनी ठोस निर्णय घ्यावा.' पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे म्हणाले, 'रिक्षा बंद झाल्यास त्याचा मोठा परिणाम विद्यार्थी संख्येवर होणार आहे. महापालिकेच्या शाळा बंद होतील. त्यामुळे शाळांपर्यंत वाहतूक करण्यासाठी सरकारने बस उपलब्ध करुन द्यावी.आ

मुख्याध्यापक नानासाहेब पाटील, महावीर हिरुगडे आदींची भाषणे झाली. रिक्षा संघटनेचे शिवाजी पाटील, महादेव पाटील, अंजुम देसाई, राजू मालेकर, विनोद डुणुंग, कादर मलबारी, उत्तम वंदुरे यांच्यासह जिल्ह्यातील १२० शाळांचे मुख्याध्यापक, पालक, रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

मुख्याध्यापकांनी रिक्षा, सायकल आणि बसमधून किती विद्यार्थ्यांनी शाळेत येतात याचा अहवाल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. याबाबत महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव म्हणाले, 'कृती समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती शिक्षण उपसंचालकांतर्फे सरकारला पाठविली जाईल. त्यासंदर्भात सरकारने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. '

कृती समितीचे म्हणणे

- विद्यार्थी वाहतूकीसाठी योग्य तोडगा काढा

- सरकारनेच बस उपलब्ध करुन द्यावी

- निर्णयाविरोदात जनआंदोलन उभारणार

- शाळा व्यवस्थापन समित्यांचा ठराव देणार

- विद्यार्थी संख्या घटण्यासह शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू ग्रामीण सहकारी संस्थेत२३ लाख ४० हजारांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हणमंतवाडी (ता. करवीर) येथील शाहू ग्रामीण शेतकरी सहकारी संस्थेत व्यवस्थापकाने रक्कम कीर्दमध्ये जमा न करता सभासदांना बोगस पावत्या देवून २३ लाख ४० हजार ९८ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. उत्तम जोतिराम शिंदे (रा. हणमंतवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी लेखापरीक्षक संजय दिनकर चौगले (रा. खटांगळे, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. लेखापरीक्षणात हा अपहार उघडकीस आला.

पोलिसांनी सांगितले की, २०१३ पासून संशयित उत्तम शिंदे हा सहकारी संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने सभासदांनी दिलेल्या ठेव पावत्या, रोख रक्कम कीर्दमध्ये जमा केल्या नाहीत. अनेकदा सभासदांना बोगस पावत्या दिल्या. संस्थेच्या लेखापरीक्षणात मोठी तफावत आढळली. शिंदेने तीन वर्षांच्या कालावधीत २३ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. लेखापरीक्षकांनी हा प्रकार संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाला सांगितला. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनता जोशी यांचा नमन विरतेला कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे देशभक्तीपर विचार तरुण पिढीत रुजावेत यासाठी त्यांची नात, विनता जोशी यांचा 'नमन वीरतेला' हा देशभक्ती जागृत करणारा कार्यक्रम सोमवारी (ता. १६) पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. जोशी यांनी देश-विदेशात १०२१ कार्यक्रम केले असून कोल्हापुरात त्यांचा हा पहिलाच प्रयोग आहे.

स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य व विज्ञान मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती अध्यक्ष नितिन वाडीकर यांनी दिली. जोशी यांनी १९८३ मध्ये सावकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने पोवाडे आणि सावकरांची गीते कार्यक्रमांना सुरुवात आहे. देश-परदेशात १०२१ प्रयोग झाले आहे. यावर्षी २० फेब्रुवारीला अंदमान येथे एक हजार कार्यक्रम झाला होता. कोल्हापुरात होणाऱ्या सावरकरांची देशभक्तीपर गीते, शिवाजी महाराजांवरील आरती, कविता सादर केल्या जाणार आहेत. तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या विषयावर स्वरचित पोवाडाही सादर करणार आहेत. हा कार्यक्रम मोफत असून त्याच्या प्रवेशिका श्रीराम लाँड्री राजारामपुरी, श्री अत्री आठवी गल्ली राजारामपुरी, महालक्ष्मी धर्मशाळा ताराबाई रोड येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे अवाहन अध्यक्ष वाडीकर यांच्यासह उपाध्यक्ष एस. के. कुलकर्णी, कार्यवाह शालनताई शेटे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडली फुलांची दुनिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यावरणाच्या विविध अंगांची इत्यंभूत माहिती देत आकर्षक रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत रमायला लावणाऱ्या ४९ व्या पुष्प प्रदर्शनाला शनिवारी महावीर उद्यानात सुरुवात झाली. कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन्स क्लबने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शन सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे.

महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिकार्जुन कलशेट्टी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड प्रमुख उपस्थित होते. गार्डन्स क्लबच्या 'रोजेट' पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले. तीन दिवसीय महोत्सवामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने, सजावटी यांची रेलचेल असणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, 'कोल्हापूर शहर स्वछ, सुंदर, हरित करण्यासाठी जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नागरिक आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून करवीरनगरी हरित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. तसे झाले तर कोल्हापूरकडे पर्यटकांची रिघ लागेल.'

'शहरातील प्रत्येक उद्यानात असे प्रदर्शन भरवले पाहिजे. तरच लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजेल' अशी अपेक्षा महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी व्यक्त केली. यावेळी 'किंग ऑफ द शो' पुरस्कार आजरा येथील अण्णा भाऊ सूतगिरणी आणि 'क्वीन ऑफ द शो' पुरस्कार संजय घोडावत ग्रुपला प्रदान करण्यात आले. सायंकाळी 'निसर्ग संगीत संध्या' ही सुश्राव्य गाण्यांची मैफिल झाली. आयआयआयडीचे चेअरमन संदीप घोरपडे, नगरसेवक राहुल चव्हाण, उमा इंगळे, शशिकांत कदम, पल्लवी कुलकर्णी, सीमा कदम, राज अथणे उपस्थित होते.

प्रदर्शनात काय पहाल

पुष्प प्रदर्शनांमध्ये नर्सरी बगीच्याचे साहित्य आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स आहेत. विविध जातीची अनेक मनमोहक फुले उपलब्ध आहेत. गुलाब, लिमोनियम, जरबेरा, आर्केड, लॅटीस, पिंक पॉंग, टॉर्च झिंजर अशा तब्बल ५० प्रकारच्या फुलांचा प्रदर्शनात समावेश आहे. बागकामासाठी लागणारी अवजारे उपलब्ध आहेत. नैसर्गिकरित्या पिकवलेली सेंद्रिय उत्पादने आहेत. गार्डन फर्निचरमध्ये झुला गार्डन, स्टँड, सोफासेट, बेड, स्कूल बेंचेस पाहायला मिळते. गांडूळखत प्रकल्पात जीवामृत, व्हर्मी वॉश हे मातीच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे टॉनिक आहे. कोकेडमा गांडूळ खतापासून बनवलेल्या वस्तू आहेत. टेरेटीयमपासून बनवल्या लाइटवेट कुंड्या व टेराकोटा मातीपासून हाताने बनवलेल्या मूर्ती, वॉलपीस, बोनसाई डिश, कापडी ग्रो बॅग, लहान मुलांसाठी डिश गार्डन, लाकडापासून बनवलेल्या विविध वस्तू स्टॉलवर पाहायला मिळतात.

व्हर्टिकल गार्डन आकर्षण

टिशू कल्चरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले व्हर्टिकल गार्डन आकर्षण ठरले. यामध्ये इनडोअर, आउटडोअर गार्डन उपलब्ध आहे. त्याचे १०० हून अधिक प्रकार असून त्याच्या वाढीसाठी केवळ पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अनेक पर्यावरणप्रेमींनी प्रदर्शनात या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती घेतली.

आजचे कार्यक्रम

रविवारी लहान मुले व जेष्ठांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरणविषयक लघूपट स्पर्धा, बोटॅनिक फॅशन शो असे कार्यक्रम होतील. पर्यावरण विषयक कार्यशाळा, प्रात्यक्षिके, घरगुती बाग-बगीचा, किचन कंपोस्ट, पर्यावरणपूरक निवारा अश्या विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होईल. तरी उद्यानप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे आवाहन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालतमध्ये ३९०४ खटले निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३९०४ प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. पक्षकारांना सुमारे १४ कोटी ६१ लाख १९ हजार ६६१ रुपयांची तडजोड रक्कम देण्यात आली.

जिल्हा कोर्टासह तालुक्यातील सर्वच कोर्टांत लोकअदालतीचे कामकाज झाले. सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. वैवाहिक वाद, दिवाणी खटल्यांसह मोटार अपघात, एनआय अ‍ॅक्ट, कामगार, औद्योगिक वाद, घरफाळा, पाणीपट्टी आदी प्रकरणांवर न्यायनिवाडा झाला. जिल्ह्यात १३ समित्या व ४३ पॅनल्सवर निवाड्याचे काम झाले. ३९२३ प्रलंबित खटले निवाड्यासाठी ठेवण्यात आले होते. तर २९ हजार ३०१ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. सहकार कायद्यासंबंधातील १० खटले आणि कामगार कोर्टातील १७ खटले निकाली निघाले. शिवाय कलम १३८चे २९० खटले मिटविण्यात आले.

प्रलंबित ५९२ खटल्यांच्या तडजोडीतून ११ कोटी ४६ लाख ४२ हजार ४५६ रुपये व दाखलपूर्व खटल्यातील ३ कोटी १४ लाख ६७ हजार २०५ रुपयांची तडजोड करून ३३१२ खटले निकाली काढले गेले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर, प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश पंकज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज झाले. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह जिल्हा बार असोसिएशन, कार्यकारी अभियंता, प्राधिकरणाचे एस. पी. मिठारी, करवीरचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images