Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सूर्यनमस्काराचा सर्वांगसुंदर योग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

योगासनातील विविध आसनांचा संगम आणि आरोग्यदायी व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराकडे पाहिले जाते. पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ योग, महाराष्ट्र टाइम्स आणि पद्माराजे हायस्कूलच्यावतीने सुरू असलेल्या योगोत्सवात शनिवारी दुसऱ्या दिवशी शेकडो विद्यार्थिनींनी एकत्रित सूर्यनमस्कार घातले. पद्माराजे हायस्कूलच्या रामगणेश गडकरी सभागृहात योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी उत्सवाचा समारोप होणार आहे.

उत्सवाच्या पहिल्या सत्रात समंत्र सूर्यनमस्कार मंत्राचा अर्थ समजावून सांगताना योगाचार्य विदुला शेंडे म्हणाल्या, 'सर्वांगीण विकासासाठी सूर्यनमस्कार उपयोगी आहे. सूर्य उगवता तेजस्वी असतो. त्यामध्ये तेज आणि ओज असते. मुलींमधील हार्मोनल बदलांमध्ये सूर्यनमस्कार उपयोगी ठरतो. निरामय, निरोगी जीवन जगण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. त्यामुळे बुद्धिमत्तेला तेज येऊन एकाग्रता साधण्यास मदत होते.'

संजीव पाध्ये म्हणाले, 'सध्या मधुमेहाचा विळखा घट्ट होत आहे. मधुमेह कमी व्हावा यासाठी सूक्ष्म व्यायाम पद्धतीची गरज आहे. यासाठी आहाराबरोबरच शशांकासन, मंडूकासन, उष्ट्रासन, वक्रासन, अर्धमच्छेंद्रासन प्रभावी ठरते. त्याचा दैनंदिन जीवनशैलीत समावेश व्हावा.'

पाध्ये यांनी चंद्र कपालभाती, सूर्य कपालभाती, कपालभाती, चंद्रविलोम, सूर्यविलोम, चंद्रभेदन, सूर्यभेदन, अनुलोम-विलोम, नाडी शुद्ध आदी प्रकारांची माहिती देत प्राणायामाचे महत्त्व समजावून दिले.

दुपारच्या सत्रात ओंकार कुलकर्णी म्हणाले, 'भारतीय वनस्पतींचे औषधी महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुळस, दुर्वा, बेल, शमा, आपट्याची पाने, जास्वंद, केवडा या वनस्पती आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. पुष्पौषधी वनस्पतींना अध्यात्माची जोड देण्यामागे त्याचा आरोग्याशी संबंध होता. दैनंदिन आयुष्यात स्तोत्रांचे पठण फायद्याचे ठरते.'

स्वामी स्वास्थ्यानंद म्हणाले, 'शरीरात १४ महामार्ग आहेत. त्यातून ऊर्जेचे संक्रमण होते. त्यात बिघाड झाला की रोग होतात. तो बिघाड रोखण्यासाठी ॲक्युप्रेशर तंत्र दैनंदिन आचरणात आणावे. प्रत्येक गृहिणीने हे तंत्र शिकले पाहिजे. जेणेकरून रोगाला कायमचा आळा घालता येईल.'

अखेरच्या सत्रात समीर लिमये म्हणाले, 'यशस्वी होण्यासाठी मन मेंदू आणि मनगट यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. सदृढ मनाने घेतलेला प्रत्येक निर्णय अचूक ठरतो. त्यासाठी सूर्यनमस्कार, योग यांचे आचरण करावे. मन आणि शरीर बळकट झाल्यास संकटांना निर्भीडपणे सामोरे जाता येते.'

याप्रसंगी विश्वास शेंडे, दिगंबर मकोटे, गोविंद पाटील, रामदासी काळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंदा एकरकमी एफआरपी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खासगी कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा एफआरपीचे तुकडे पडणार नाहीत. एकरकमी एफआरपीपेक्षा जादा दर हवा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली असल्याने एफआरपेक्षा वाढीव दर किती मिळणार? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष असेल.

कारखानदारांची दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. बैठकीत ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्याबरोबर पूर आलेल्या भागातील ऊसतोड अग्रक्रमाने करण्याचा निर्णय यावेळी झाला.

बैठकीत कर्जमाफीवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महापूर, अवकाळी, परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने उसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बिलेही मिळाली पाहिजेत आणि कर्जमाफीही मिळाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी होण्याची अपेक्षा आहे. ज्यांची कर्जे नाहीत, कर्जमाफीचा लाभ ज्यांना नको आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीप्रमाणे बिले जमा करण्यात येणार आहेत. कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही एफआरपीप्रमाणे बिले दिली जातील.

साखरेचा दर प्रतिक्विंटल ३६०० रुपये झाल्याशिवाय कारखानदारी टिकणार नाही. त्यामुळे हा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. यंदाचा हंगाम लवकर संपणार आहे. तसेच उत्पादनही घटणार आहे. त्यामुळे बँकांची कर्जे फिटणार नाही. त्यामुळे कर्जांचे सात वर्षाचे पुनर्गठन करुन सरकारने थकहमी आणि व्याज द्यावे, निर्यात साखरेसाठी कर्जाला कमी पडणारी रक्कम राज्य आणि जिल्हा बँकांनी कर्जरुपाने देऊन अनुदानाची रक्कम भरणा करण्याच्या अटीवर साखर सोडण्यात यावी, अशी मागणी करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. पुढील बैठक ३० डिसेंबरला घेण्यात येणार आहे.

०००००

साखर उतारा आणि एफआरपी

कारखाना उतारा निव्वळ एफआरपी

कुंभी १२.६३ २९२८

दूधगंगा बिद्री १२.८८ २९६३

भोगावती १२.१९ २८३७

दत्त, शिरोळ १२.५० २८३८

गडहिंग्लज १२.०० २७३५

शाहू, कागल १२.६३ २८७७

जवाहर १२.७५ २८७३

राजाराम १२.१५ २७७४

आजरा १२.२० २७२२

गायकवाड १२.५३ २७८३

मंडलिक १२.९६ २९७६

शरद नरंदे १२.५० २८२७

अथणी १२.१८ २५८९

डी.वाय.पाटील १२.२५ २७१५

दालमिया १३.१५ २९४२

गुरुदत्त १३.४१ ३०६९

हेमरस १२.८५ २८४४

महाडिक शुगर्स १०.९२ २३४०

घोरपडे १२.२१ २६६८

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांच्या सोयीसाठी बॅटरीवरच्या गाड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बॅटरीवरील दोन गाड्या घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्टेशन येथून थेट अंबाबाई मंदिरापर्यंतचा प्रवास या गाड्यातून होणार आहे. लवकरच या दोन्ही वाहनांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन ते भाविकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक येतात. बारा महिने भाविकांची वर्दळ असते. या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या दोन गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. बॅटरीवरील गाड्यांमुळे हवा प्रदूषण होणार नाही. शिवाय इंधन खर्चातही बचत होणार आहे. समितीच्या सदस्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीत यासह शहरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुरू करावयाच्या पॅथॉलॉजी लॅबच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. गायन समाज देवल क्लब परिसरात ही लॅब सुरू करण्यात येणार आहे. लॅबसाठी जागा निश्चित केली आहे. याठिकाणी आरोग्यविषयक १६ प्रकारच्या मोफत चाचण्या होतील. शहरातील सर्व मिळकतधारकांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळवून देण्याचे नियोजन आहे' असे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

देवस्थान समितीचे वार्षिक उत्पन्न वीस कोटी रुपये आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न अंबाबाई मंदिरापासून मिळते. या उत्पन्नातून विविध संस्थांना आर्थिक मदत केली जाते. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटला, कसबा बावडा येथील रुग्णालयाला मोठी मदत केली आहे. ग्रामीण भागातील ४२ शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय समितीने केली आहे.

आयुर्वेदिक हब, २५० खोल्यांचे भक्तनिवास

यासंदर्भात अध्यक्ष जाधव म्हणाले, 'समितीतर्फे भाविकांच्या निवासासाठी २५० खोल्यांचे भक्तनिवास बांधण्याचे नियोजन आहे. याशिवाय रोज पाच हजार भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करणार आहे. महत्वाचे म्हणजे, कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक हब स्थापण्याचे उद्दिष्ट आहे. भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा दिल्यास कोल्हापूरच्या पर्यटनालाही चालना मिळेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आघाडी भक्कम, जि. प. अध्यक्ष आमचाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेत आकाराला आलेली भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची आघाडी एकसंघ आहे. आगामी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही आघाडी भक्कम ठेवण्याचा आणि अध्यक्ष भाजपचाच करण्याचा निर्धार नेत्यांच्या बैठकीत झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे नेते व सदस्य आघाडीसोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बैठकीत सांगितले.

दरम्यान, नाराज घटकांशी संवादाची जबाबदारी काही नेत्यांवर निश्चित केल्याचेही सांगण्यात येते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विरोधी दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी रणनिती निश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजप व आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. बैठकीला आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे नेते व माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके, बाबा देसाई, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांची संयुक्त बैठक झाली.

हे गट भाजपसोबत

शनिवारी झालेल्या बैठकीवेळी जनसुराज्य, आवाडे गट, ताराराणी आघाडी, माजी आमदार संजय घाटगे गट भाजपसोबत असल्याचे स्पष्ट झाले. ताराराणी विकास आघाडीचे तीन सदस्य असून ते भाजपसोबत राहणार आहेत. विकास आघाडीच्या जि. प. सदस्या सुनीता रेडेकर यांचे पती रमेश यांनी भाजप नेते सुरेश हाळवणकर यांच्यासोबत प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली.

संख्याबळ असलेल्यांनाच पाठिंबा

चंदगड तालुक्यातील युवक क्रांती दलाचे दोन सदस्य आहेत. या गटाचे सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. गेल्या अडीच वर्षात गटाला एकही पद मिळाले नाही. आगामी काळात सभापतीपद हवे. ज्यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ त्यांना युवक क्रांती दलाचा पाठिंबा राहिल असे सांगितल्याचे समजते. गेल्या आठवड्यात त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसमोरही अशीच भूमिका मांडली.

शिवसेनेचे नेते गैरहजर

माजी आमदार चंद्रकांत नरके, माजी आमदार सत्यजित पाटील व डॉ. सुजित मिणचेकर गटाचे सहा सदस्य आहेत. गेली अडीच वर्षे ते भाजप आघाडीसोबत आहेत. दरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीला या तिन्ही गटाचे नेते उपस्थित नव्हते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्यही गैरहजर होते. दरम्यान, स्वाभिमानीचा पाठिंबा कायम राहावा याची जबाबदारी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे सोपविल्याचे सांगण्यात आले. अपक्ष सदस्यही गैरहजर होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धीबळपटू सम्मेद बनला आंतरराष्ट्रीय मास्टर

0
0

म. टा .प्रतिनिधी, कोल्हापूर

मलेशिया मधील पिनांग हेरीटेज सिटी इंटरनॅशनल खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या सम्मेद शेटेने आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळवून आंतरराष्ट्रीय मास्टर पात्रता पूर्ण केली. त्याने स्पर्धेत नऊपैकी सात गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्म बुद्धिबळ स्पर्धेत खेळल्यानंतर ठराविक आवश्यक कामगिरी झाल्यास नॉर्म मिळतो. अशा प्रकारचे तीन नॉर्म व २४०० आंतरराष्ट्रीय गुणांकनाचा टप्पा पार करणे आवश्यक असते. या दोन्ही अटी पूर्ण झाल्यावर आंतरराष्ट्रीय मास्टर किताब जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (फिडे) बहाल करण्यात येतो. सम्मेदने २४०० गुणांकनाचा टप्पा सहा महिन्यांपूर्वीच पार केला होता. गेल्यावर्षीच्या दिल्ली ग्रँडमास्टर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत त्याचा पहिला नॉर्म झाला. त्यानंतर रशिया मधील एरोफ्लोट आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा नॉर्म कमवला होता. स्पर्धेत पहिल्या तीन फेरीत कमी गुणांकन असलेल्या स्पर्धकांना सहजपणे हरवित नवव्या मानांकित सम्मेदने तीन गुणासह आघाडी घेतली. नंतरच्या चौथ्या फेरीत द्वितीय मानांकित ग्रँडमास्टर कोर्निव्ह ओलिगला बरोबरीत रोखले. त्यानंतरच्या पाचव्या फेरीत चौथा मानांकित स्पर्धा विजेता अझरबैजानचा मिर्झोव्ह अझरकडून सम्मेद पराभूत झाला. त्यानंतर पुन्हा सावरत त्याने सलग तीन विजय नोंदविताना अनुक्रमे सहाव्या फेरीत जर्मनीच्या ओल्फ वॉल्टर, सातव्या फेरीत इंडोनेशियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर फर्मान फँरीड तर आठव्या फेरीत इंडोनेशियाच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर शेत्याकी जोदीचा पराभव करून पुन्हा आघाडी घेतली. शेवटच्या अंतिम नवव्या फेरीत किमान बरोबरी केल्यास नॉर्म मिळण्याची संधी ओळखून सम्मेदने फारसा धोका न पत्करता इंडोनेशियाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर नोविता अँजसला बरोबरीत रोखले व महत्त्वाचा तिसरा नॉर्म हस्तगत करुन स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.

सम्मेद विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत अंतिम वर्षात शिकत आहे. त्याला माजी मंत्री चंद्रकांत पाटील, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे विश्वविजय खानविलकर, प्रा. अरुण मराठे, भरत चौगुले, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. एस. वाय्. होनगेकर, जिमखाना प्रमुख किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदार शिवाजीराव दत्तात्रय पाटील यांचे निधन

0
0

कोल्हापूर: प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते माजी आमदार शिवाजीराव दत्तात्रय पाटील (अण्णा ) (वय ९०) यांचे रविवारी पहाटे ४.०० वाजता उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या पंधरा दिवसा पासून कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या मूळ गांवी येलूर ता. वाळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्यभर ते शिक्षक नेते शि. द. पाटील या नावाने परिचीत होते. त्यांचे निकटवर्तीय त्यांना 'शि. द. अण्णा" या नावाने ओळखायचे. अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेते म्हणून देश पातळीवर त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले. त्यांनी १९७५ ते १९९४ या कालावधीत राज्याच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना शिक्षकांची संघटना बांधली. त्यांच्या संघटना बांधनीच्या कौशल्यामुळेच त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

१० फेब्रुवारी २००२ ला आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या जनरल कौन्सील मध्ये महासंघाचे अध्यक्ष म्हणून पाटील यांची निवड झाली. तर २२ एप्रिल २००२ मध्येच त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली होती. फिलीपाईन्स येथे १९७९ साली झालेल्या जागतिक शिक्षक परिषदेत त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले होते.
त्यांच्या पश्यात तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याच्या विविध भागातून त्यांचे शिक्षक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येलूर येथे येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत साहित्य संमेलनानिमित्त दिंडी स्पर्धा

0
0

कोल्हापूर : वारकरी साहित्य परिषदेतर्फे आठवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत गांधी मैदान येथे होणार आहे. संत साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने दिंडी स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्यांना रोख बक्षीसांनी गौरविण्यात येणार आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराजवळून २८ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता दिंडी स्पर्धेला सुरुवात होईल. दिंडीचा समारोप गांधी मैदान येथे होणार आहे. दिंडी सोहळ्यामध्ये ४०० दिंड्या सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव पाटील सडोलीकर यांनी दिली आहे. दिंडी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील दिंड्यांनी सहभाग घ्यावा. स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या दिंडीला ५१००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३१०००, तृतीय क्रमांकास २१००० रुपयांचे बक्षीस आहे. ११००० रुपयांची पाच बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी यादव महाराज मठ साकोली कॉर्नर येथे नावे नोंदवावीत असे संयोजकांनी आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बटाटाही महागला

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

या आठवड्याच्या बाजारात कांद्यापाठोपाठ बटाटाही महागला असून दरात प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली आहे. फळभाज्या, पालेभाज्यासह फळांची मोठी आवक झाली आहे. आवक मोठ्या प्रमाणावर आल्याने पालेभाज्यांचे दर आवाक्यात आले असून मेथी, हरबरा, पालक, करडा या भाज्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला.

कांद्याचा दर उतरला असला तरी तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांकडून मोजून मापून खरेदी केली जात आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो ४० ते ८० रुपये इतका होता. बटाट्याच्या दरात प्रतिकिलो पाच १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो २५ ते ३० रुपये दर असलेला बटाटा प्रतिकिलो ४० रुपयांवर पोचला आहे. फ्लॉवर गड्ड्याचा दर १५ ते ४० रुपये होता. गाजराची आवक झाली असून प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांनी विक्री झाली. संत्री, अॅपल बोरे, चमेली बोरे, सिताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. संत्र्यांचा दर प्रतिकिलो ६० ते १५० रुपये तर अॅपल बोरांचा ३० ते ४० रुपये इतका आहे. जवारी केळी या आठवड्यात महागली असून प्रतिडझन ३० ते ६० रुपये असा दर होता.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४०

टोमॅटो : २०

भेंडी : ४०

ढबू : ४०

गवार : ६०

दोडका : ४० ते ६०

कारली : ४०

वरणा : ४०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : ४०

लसूण : ८० ते १००

कांदा : ४० ते ८०

आले : ८०

मुळा : १० (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १५

कोथिंबीर : १५ ते २०

पालक : १०

शेपू :१०

चाकवत : १०

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

डाळिंब : ६० ते ८०

सिताफळ : ५० ते १००

संत्री : ५० ते १५०

अॅपल बोर : ३० ते ४०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोजिमाशित लाड यांची अरेरावी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'जास्तीत जास्त संचालकांना पदावर बसवण्यासाठी पदाच्या कालावधीचे तुकडे करून पाच वर्षात दहा चेअरमन करण्याच्या प्रकाराने कोजिमाशि पतसंस्थेची बदनामी झाली आहे. या पदावर एखादी व्यक्ती जास्त काळ न बसू नये तसेच कारभारातील माहिती होऊ नये व आपली अरेरावी चालावी म्हणून सत्ताधारी आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांची खेळी आहे' असा आरोप विरोधी संचालक समीर घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत केला. घोरपडे यांच्यासह तीन विरोधी संचालकांनी या पद्धतीला विरोध करत सभेवर बहिष्कार घातला.

घोरपडे म्हणाले, 'गेल्यावेळी विरोधी आघाडीचे राजेंद्र रानमाळे यांना चेअरमन केले गेले. ते पद उर्वरित कालावधीसाठी असेल असे वाटत असतानाच रविवारी नवीन चेअरमन निवडीचा कार्यक्रम लावला. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागणार असल्याने ते आता अवघे तीन महिन्यांसाठी असतील. सभासद हितासाठी आघाडी बदलत असल्याचे सांगून रानमळे गेले होते. पण ते ज्या सभासद कर्ज व्याजदर कमी करणे, शेअर्स रक्कम किमान ५० हजार करणे, कर्जमुक्ती ठेव परत देणे अशा सभासदांच्या हितासाठी भांडत होते, त्यातील एकही मागणी चेअरमनपदाच्या कालावधीत त्यांना पूर्ण करता आली नाही.'

घोरपडे म्हणाले, 'तज्ज्ञ संचालक असलेल्या लाड यांनी गेल्या चेअरमन निवडीच्या सभेला उपस्थिती लावून सही केली होती. पण नंतर इतिवृत्तावर व्हाइटनर लावून त्या सह्या पुसल्या आहेत. तसेच यापूर्वीच्याही काही निवडीच्या सभेचा भत्ता उचलला असेल तर त्याबाबत आक्षेप घेणार आहोत. स्वत:ची अरेरावी चालवण्यासाठी लाड यांनी पदांची खांडोळी केली आहे. पाच वर्षात दहा चेअरमन झाले असून यातून सत्कार, स्वागत, आदरातिथ्य यातून संस्थेचे म्हणजेच सभासदांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून संस्थेची बदनामीही होत असून विश्वासार्हता कमी झाली आहे. लाड यांना कायम प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय लागली आहे. ते कारभारावरुन सभासदांचे लक्ष विचलीत करुन दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.'

पत्रकार परिषदेस विरोधी संचालक संदिप पाटील, शहाजी पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकही रस्त्यावर उतरणार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षाचालक हे आमच्या कुटुंबातील एक सदस्यच आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोयीची आणि ती आम्हाला परवडणारी आहे. ती बंद झाल्यास प्रसंगी नागरी कृती समितीच्या सोबत रस्त्यावर उतरून जनआंदोलनात सहभागी होऊ अशी ग्वाही ग्वाही पालकांनी रविवारी दिली. हायकोर्टाने रिक्षातून सुरू असलेली असुरक्षीत विद्यार्थी वाहतूक रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी जिल्हा काँग्रेस भवनात रिक्षाचालक आणि पालकांचा मेळावा झाला. त्यामध्ये पालकांनी याप्रश्नी पाठबळ देत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची ग्वाही दिली. अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.

महापौर अ‍ॅड. लाटकर म्हणाल्या, 'शैक्षणिक वर्ष संपण्यास अद्याप चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी केल्यास ते रिक्षाचालक आणि पालकांना गैरसोयीचे ठरणारे आहे. शाळा, पालक आणि रिक्षाचालकांच्या भावनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी. प्रसंगी जनआंदोलन उभारल्यास त्यात महापौर या नात्याने मी सहभागी होईन.'

विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले, 'सरकारने बारा वर्षाखालील किमान दहा मुलांना रिक्षातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी. त्यासह पालकांनाही दोन मुलांना दुचाकीवरून शाळेत ने-आण करण्याची सवलत द्यावी, अशी आव्हान याचिका १७ डिसेंबर रोजी हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीवेळी दाखल केली जाईल. जिल्हा बार असोसिएशनच्या प्रतिनिधींना घेऊन रिक्षा आणि पालक संघटनेचे पदाधिकारी यासाठी जाणार आहेत. कोर्टाने कायदा करून रिक्षा वाहतूक थांबवावी, असा निर्णय दिल्यास रिक्षाचालक प्रसंगी विद्यार्थी वाहतूक बंद करतील.'

यावेळी सर्व शाळांतील पालकांनी, 'तुम्ही आमच्या कुटूंबातील एक सदस्य आहात. तुमचा व्यवसाय करताना विद्यार्थ्यांना चांगली सुविधा देत असताना विरोधातील कायदा झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू' असे सांगितले. शाळांत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या तुलनेत रिक्षातील वाहतूक पालकांना परवडणारी आहे. रिक्षा दारात येऊन विद्यार्थ्यांना घेऊन जातात. त्यामुळे रिक्षाचालकांचाही सहानभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे अशी मते मांडण्यात आली.

यावेळी नगरसेवक अशोक जाधव, शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, मुस्लिम बोर्डिंग अध्यक्ष गणी आजरेकर, कादर मलबारी, रिक्षाचालक संघटनेचे शशिकांत ढवण, आण्णा जाधव, प्रताप शिंदे, हणमंत पोवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळांतील पालक उपस्थित होते.

शिक्षण उपसंचालकांना आज भेटणार

शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने सोमवारी (ता. १६ डिसेंबर) सायंकाळी साडेचार वाजता शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट घेतली जाणार आहे. विद्यार्थी रिक्षा वाहतूक आणि पालकांची होत असलेली गैरसोय याप्रश्नी शिक्षण विभागाने ठोस भूमिका घ्यावी. आगामी शैक्षणिक वर्षापासून नियमांची अंमलबजावणी करावी, अशी शिक्षण विभागाच्या सचिवांना विनंती करण्याबाबतचे निवेदन दिले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाने आठवडाभरात काय कार्यवाही केली, याची विचारणा करण्यासाठी कृती समिती भेट घेणार असल्याची माहिती निमंत्रक अशोक पोवार, रमेश मोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुष्प प्रदर्शनाला गर्दीचा बहर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मनाला मोहवून टाकणारा फुलांचा टवटवीतपणा, आबालवृद्धांना आकर्षित करणारी नानाविध जातीची रंगीबेरंगी फुले, अतिशय सुबकपणे केलेली पुष्परचना यामुळे ४९ व्या पुष्प प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी गर्दीला बहर आला. महावीर गार्डन येथे आयोजित हा फ्लॉवर शो नागरिकांसाठी आकर्षण ठरला आहे.

गार्डन्स क्लब व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय उद्यान स्पर्धा व पुष्पप्रदर्शन भरविले आहे. रविवार हा प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता. शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे पुष्प प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. अनेकांनी सहकुटुंब पुष्पप्रदर्शनस्थळी भेट देत फुलांच्या दुनियेची सैर केली. दुपारनंतर गर्दीला बहर आला. लहान मुलांचा उत्साह ओसांडून वाहत होता. विविध जातीच्या फुलांची माहिती, पुष्परचनेविषयी आकर्षणाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या.

विविध नर्सरीज, शैक्षणिक संस्थांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. विविध जातींच्या फुलांची सजावट, विशिष्ट संकल्पनेवर आधारित पुष्परचना प्रमुख आकर्षण ठरले. यासाठी सर्व तऱ्हेच्या फुलांचा वापर केला होता. प्रदर्शनाच्या मुख्य ठिकणी प्रवेश करताच विविध जातीच्या गुलाबाची फुले नजरेत भरतात. प्रदर्शनामध्य वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित कलाकृती प्रदर्शनाचे वेगळेपण दर्शवित आहेत. रोपे, खत, उद्यान निर्मितीसाठी आवश्यक साहित्यांच्या स्टॉलवर गर्दी होती. पर्यावरणपूरक झाडांची कुंडी, लाकडापासून बनविलेल्या कलाकृती प्रदर्शनात आहेत.

पर्यावरणपूरक वनदेवता

फुलांचा, पानांचा वापर करुन मूर्ती सजावट ही संकल्पना प्रदर्शनात साऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. विविध वस्तूंचा वापर करुन वनदेवतासह अन्य रुपातील मूर्ती साकारल्या आहेत. गार्डन्स क्लबमध्ये अभ्यासक्रम शिकणाऱ्या सुनीता निल्ले, आरती महेकर, दिप्ती मानकर, निशिगंधा कुलकर्णी, गीता डोईजड यांनी पानाफुलांचा अतिशय कल्पकतेने वापर करत 'वनदेवते'ची मूर्ती सजवली आहे.

कॉफीच्या झाडापासून गृहसजावटीच्या साहित्य

कॉफीच्या झाडापासून कलात्मकरित्या तयार केलेले गृहसजावटीचे साहित्य प्रदर्शनात आकर्षण ठरले आहे. चिकमंगळूर येथील कारागिरांनी या वस्तू तयार केल्या आहेत. डायनिंग टेबल, फ्लॉवर स्टँड, टीपॉय, सोफासेटपासूनचा समावेश आहे. शिवाय देवदेवतांच्या मूर्ती, लहानमोठ्या आकारातील मुखवटे आहेत.

चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

प्रदर्शनाच्या निमित्ताने सकाळी नऊ ते दहा यावेळेत खुली चित्रकला स्पर्धा झाली. किशोर गट व यंग सिनीअर्स अशा दोन गटात स्पर्धा झाली. लहान मुलांनी महावीर उद्यानातील निसर्गसौंदर्यच कागदावर उतरविले. उद्यान, पुष्प प्रदर्शनातील फुलांची सजावट रेखाटली. चित्रकार विलास बकरे, स्मिता पाटील, चिनार भिंगार्डे यांनी प्रात्यक्षिके झाली. तर डॉ. श्रीराम आंबड यांची 'इकोफ्रेंडली होम गार्डन्स'विषयी कार्यशाळा झाली.

पुष्प प्रदर्शनाला गेल्या दोन दिवसात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फुलांच्या आगळ्या दुनियेविषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. फुलांची माहिती घेताना अनेकांनी दुर्मिळ वनस्पतींच्या रोपांची खरेदी केली.

- शशिकांत कदम, उपाध्यक्ष, गार्डन्स क्लब

प्रदर्शनात आज

सकाळी नऊ ते ११ : किचन कंपोस्ट, फ्रूट इंझायम्स डीकंपोजर कार्यशाळा

सकाळी ११ ते १ : पर्यावरणपूरक निवारा कार्यशाळा, वक्ते - आर्किटेक्ट मोहन वायचळ

सायंकाळी पाच वाजता : फ्लॉवर शो स्पर्धेचा बक्षीस समारंभ

फोटो अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष अहवालावर समांतर सभेत आक्षेप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या अहवालातील ताळेबंदासह कामकाज ठराव दडपशाहीने मंजूर करत बैठक गुंडाळल्याचा आरोप संचालकांकडून समांतर सभेत करण्यात आला. अहवालातील त्रुटी, सदोष अहवाल, राष्ट्रगीताचा अवमान यामुळे महामंडळाची सभा बेकायदेशीर झाली असून अपूर्ण अहवाल मंजूर करणाऱ्या सभेविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे संचालक विजय पाटकर यांनी जाहीर केले. सुरुवातीपासूनच प्रचंड गोंधळात सुरू झालेली सभा दुपारी अडीच वाजता गुंडाळल्यानंतर पाच संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या समांतर सभेत महामंडळाच्या जुन्या जागा विक्रीसह अहवालातील त्रुटींचा मुद्दा गाजला. विजय पाटकर, वर्षा उसगावकर, रणजित जाधव, पितांबर काळे व सतीश रणदिवे यांच्या उपस्थित समांतर सभेवेळीही सदस्यांनी गोंधळ केला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मार्केटयार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली. सकाळी साडेअकरा वाजता सभास्थळी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार संजय ठुबे यांच्यासह सर्व संचालक व सभासदांचे आगमन झाले. यानंतर राजेभोसले यांचे प्रास्ताविक सुरू असतानाच माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे न्यायालयीन निर्णया सिद्ध होऊनही त्यांचे रद्द झालेले सदस्यत्व पुन्हा का दिले या विषयाला तोंड फोडले. सांगावकर यांना साथ देणाऱ्या अर्जुन नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांचेही सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. रणजित जाधव यांनी न्यायालयीन निकालाची प्रत वाचून दाखवत अष्टेकर यांच्या विधानला पुष्टी दिली. मात्र पुढचा एक तास अष्टेकर यांच्या समर्थकांनी याच विषयावरून गोंधळाला सुरूवात केली.

दरम्यान दुपारी एकच्या सुमारास अध्यक्ष राजेभोसले यांनी जेवणासाठी सभेमध्य ब्रेक घेण्याची सूचना केली असता या काही सभासदांनी हरकत घेतली. सदस्यत्व रद्द करण्याची मागणी कायम ठेवत गोंधळ कायम राहिल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. कार्यवाह सुशांत शेलार यांनी नियमावलीप्रमाणे कामकाज होईल, असे सांगत विश्रांतीचे समर्थन करीत राहिले. पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. राजेभोसले सभागृहातून भोजनकक्षाकडे जात असताना त्यांना सभासदांनी घेराव घातला. त्यांना सभा सुरू ठेवण्याचा एकच आग्रह केला.

सदस्यांनी वादाची परिस्थिती कायम ठेवली. संचालक सतीश रणदिवे, अभिनेत्री संचालिका वर्षा उसगावकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी सभासदांनी सभा सुरू करा अशा घोषणा सुरूच ठेवल्या त्यामुळे अखेर राजेभोसले पुन्हा मंचावर आले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सभासदांना खाली जाण्यास सांगितले. यानंतर सभा सुरू झाली मात्र तरीही कायदेशीर बाबींवरून वाद, घोषणाबाजी सुरूच राहिली.

अखेर संचालक मंडळाने राष्ट्रगीत सुरू करून सभा संपल्याचे जाहीर केल्यामुळे काही संचालकांनी सभासदांच्या उपस्थितीत सभागृहात समांतर सभा घेतली. खासबागेतील जुनी जागा विकून मुंबईची जागा घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे सांगत पाटकर यांनी मुंबईच्या मुदतबंद ठेवीतील सात कोटी रुपयांपैकी रक्कम वापरून नवी जागा घ्यावी असे जाहीर केले. प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांना राष्ट्रगीत म्हणताना 'तव शुभ आशिष मागे' ही ओळ न आठवल्याने ती चुकीची म्हटल्याचा आरोप केला. ज्या सभेचा अहवाल सदोष आहे, राष्ट्रगीताचा अवमान करून गुंडाळलेली सभाच जर कायदेशीर नसेल तर याविरोधात आवाज उठवण्यात येईल असा पवित्रा समांतर सभेत घेण्यात आला.

विकासाच्या मुद्यावर चर्चाच नाही

साडेतीन तास सुरू असलेल्या या सभेत महामंडळाच्या भावी योजना, निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, वृद्ध कलाकार, कर्मचारी यांच्या बाबत एकाही प्रश्नावर संपूर्ण सभेत चर्चा झाली नाही. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या सभासदांनी गोंधळ सुरू केला. 'आम्ही कशासाठी सभेला यायचे? दोन संचालकांच्या व्यक्तीगत भांडणाचा हा आखाडा आहे का?' असे सवाल उपस्थित करण्यात आले. त्यामुळे गोंधळाची दरवर्षीची री ओढत महामंडळाची सभा गुंडाळल्यानंतर परगावच्या सभासदांनी घरचा रस्ता धरला.

.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचन-लेखनामुळे जीवन समृद्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मानवी भावभावनांचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. वाचन आणि लेखनामुळे जीवन समृद्ध बनते. लेखनातून एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभते. हे समाधान आयुष्यभरासाठी एक प्रकारचे संचित ठरणारे आहे,' अशा भावना श्रीमती कुमुदिनी कदम यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाचा समारोपप्रसंगी शनिवारी त्या बोलत होत्या. साहित्यिक चंद्रकुमार नलगे अध्यक्षस्थानी होते. भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी श्रीमती कदम यांनी बाबा कदम यांच्यासोबतच्या आठवणी जागविल्या. त्या म्हणाल्या, 'माझ्या लेखनकलेचा प्रवास हा बाबा कदम यांच्या प्रेरणेमुळे झाला. त्यांच्या स्मृती मनात कायम आहेत. वाचन आणि लेखनामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते. वाचनामुळे सुख तर लेखनामुळे आंतरिक समाधान लाभते.'

साहित्यिक चंद्रकुमार नलगे म्हणाले, ' ग्रंथालयांनी वाचनसंस्कृती वृद्धिगंत करण्याचे कार्य केले आहे. करवीर नगर वाचन मंदिराला १६९ वर्षाची परंपरा लाभली आहे. वाचन चळवळीचे काम नेटाने चालविणाऱ्या अशा संस्थांना सरकारने विशेष बाब म्हणून अनुदान द्यावे.'

संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अभिवाचनाने झाली. प्रख्यात साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या 'फकिरा' या कादंबरीचे वाचन सरिता खोत यांनी केले. याप्रसंगी डॉ. हिमांशू स्मार्त यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 'सोशल मीडिया व साहित्य'याविषयी परिसंवाद झाला. यामध्ये विनायक पाचलग व विनय गुप्ते यांनी सहभाग घेतला. प्रा. विकास कुलकर्णी, हेमा गंगातीरकर आणि दीपक भागवत यांच्या कथाकथनाला साहित्येप्रमींनी दाद दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदुकमार जोशी यांनी स्वागत केले. संचालक आशुतोष देशपांडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोजिमाशि’च्या चेअरमनपदी कैलास सुतार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या (कोजिमाशि) चेअरमनपदी कैलास निवृत्ती सुतार (इंदिरा गांधी विद्यानिकेतन, कोल्हापूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन राजेंद्र रानमाळे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.

शाहूपुरी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली. सहाय्यक उपनिबंधक टी. बी. बल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. 'कोजिमाशी'पतसंस्थेवर शिक्षक नेते दादासाहेब लाड गटाची सत्ता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी निवड प्रक्रियेचे वाचन केले. चेअरमनपदासाठी सुतार यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सुतार यांच्या नावासाठी आनंदराव काटकर हे सूचक तर सुलोचना कोळी यांनी अनुमोदन दिले.

निवडीवेळी व्हाइस चेअरमन सुभाष पाटील, बाळ डेळेकर, कृष्णात खाडे, एस. जी. देसाई, कृष्णात हावळे पाटील, अरविंद किल्लेदार, रावसाहेब कारंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.'शिक्षक नेते लाड यांनी ४०० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या संस्थेच्या चेअरमनपदाची जबाबदारी सोपविली आहे. संस्था व सभासद हित जोपासत हा विश्वास सार्थ ठरवू,'अशी ग्वाही नूतन चेअरमन सुतार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय क्षेत्रासाठी ‘दि मेडिकल थीसॉरस’ उपयुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वैद्यकीय क्षेत्र हे समाजजीवनाशी निगडीत घटक आहे. या क्षेत्रामधील नव संशोधन, उपचारपद्धतीमुळे रुग्णांच्या सोयी सुविधेत वाढ झाली. साऱ्यांनाच वैद्यकीय क्षेत्राबद्दल उत्सुकता आहे. अभ्यासक, डॉक्टरना प्रत्येक गोष्टीतील अद्ययावत ज्ञान ठेवावे लागते. यासाठी त्यांना 'दि मेडिकल थीसॉरस'हा वैद्यकीय ज्ञानकोष अत्यंत उपयुक्त ठरेल,' असे प्रतिपादन राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

येथील डॉ. सफिया सिराज मोमीन व सिराज जमाल मोमीन यांनी लिहिलेल्या 'दि मेडिकल थीसॉरस'या ज्ञानकोशाचे प्रकाशन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. स्टेट नर्सिंग सुपरिटेंडट शोभा चाटसे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवन येथे रविवारी दुपारी कार्यक्रम झाला.

डॉ. लहाने म्हणाले, 'लेखिका सिराज मोमीन या सीपीआरमधील नर्सिंग कॉलेजमधून प्राचार्यपदावरून सेवानिवृत्त आहेत. तर सिराज मोमीन हे राजर्षी शाहू हायस्कूलमधून उपमुख्याध्यापकपदावरून निवृत्त आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अतिशय कष्टपूर्वक वैद्यकीय ज्ञानकोश तयार केले आहे. हा ज्ञानकोश विद्यार्थ्यापासून डॉक्टरांना फायदेशीर ठरेल. वैद्यकीय क्षेत्रातील भाषा, उच्चार यासंबंधी ज्ञान वाढविणारा हा ज्ञानकोश आहे,' असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. अधिष्ठाता गजभिये यांनी लेखिकेचा शिक्षणापासून लेखन निर्मितीपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

नाझिमा जिया मोमीन यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. अमन मोमीन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला 'नॅब'कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष शकील मोमीन, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभांगी फुटाणे, तेजस्विनी गायडोळे, चिन्मयी गायडोळे यांनी स्वागतगीत सादर केले.

फोटो ओळी

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते 'दि मेडिकल थीसॉरस'या वैद्यकीय ज्ञानकोशचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डावीकडून प्रकाशक एस. जे. मोमीन, डॉ. सफिया मोमीन, डॉ. मीनाक्षी गजभिये, शोभा चाटसे, एम. आय. मोमीन आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपकडून राहुल गांधीचा निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँगेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपावतीने बिंदू चौकात निषेध करण्यात आला. यावेळी गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

गांधी यांनी दिल्ली येथे भारत बचाव रॅलीत सावरकरांविरोधात वक्तव्य केले. त्याविरोधात भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रविवारी दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौक येथे एकत्र येऊन 'राहुल गांधी माफी मांग', 'राहुल गांधी यांचा धिक्कार असो', 'सावरकर का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'अशा घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, 'सावरकरांबद्दल अनुद्गार काढणे म्हणजे काजव्याने सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.' सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 'सावरकर माने त्याग, 'सावरकर माने तप, 'सावरकर माने तत्व, असे गौरवोद्गार काढले होते. देशाप्रती जाज्वल्य भक्ती कशी असावी, हे ज्या सावरकरांनी दाखवून दिली त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे राहुल गांधी यांची यातून वैचारिक पातळी दिसून येते.'

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'सावरकरांनी देशप्रेमाची अनेक काव्ये रचली आहेत. पुन्हा पुन्हा माझा जन्म या देशामध्ये होऊ दे असे म्हणणाऱ्या सावरकरांविरोधात राहुल गांधी खोडसाळ वक्तव्य करतात. त्यांना देशाचा इतिहास माहीत नसल्याने सावरकरांचा इतिहास माहीत असणे शक्य नाही. सावरकर नाव लावण्यासाठी देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागते.'

हेमंत आराध्ये यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राहुल गांधी यांना सावरकर यांच्या विचारांचे पुस्तक भेट स्वरुपात देण्यात यावे, अशी मागणी केली.

यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, दिग्विजय कालेकर, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, प्रदीप पंडे, भारत काळे, आशिष कपडेकर, भारती जोशी, गायत्री राऊत, वैशाली पोतदार, सुजाता पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच बालके अत्यवस्थ

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या पाच बालकांना चुकीचे इंजेक्शन दिल्याने ती अत्यवस्थ बनली. या बालकांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने रुग्णालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

चैतन्य सुनील खवरे (वय ९, रा. महागाव, ता. गडहिंग्लज), समर्थ रामचंद्र कोल्हे (वय ४, अलबादेवी, ता. चंदगड), रोहित काशिनाथ शेषनाईक (वय १०, दुंडगे, ता‌. गडहिंग्लज), सर्वेश दिगंबर पाटील (वय ४, गवसे, ता. आजरा), समर्थ बाबुराव गुरव (वय ८, खानापूर, ता. आजरा) अशी अत्यवस्थ बालकांची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी, सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांची पुनर्वसन केंद्राच्या पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान हार्निया व लघुशंकेबाबत तक्रार असलेल्या पाच बालकांवर १४ डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात त्यांच्यावर रीतसर उपचार सुरू होते. शनिवारी (ता.१५) सकाळी शस्त्रक्रिया झालेल्या बालकांना अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले; पण इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच बालके बेशुद्ध पडली. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने पालकही सैरभैर झाले. त्यामुळे रुग्णालयातील वातावरणही तणावपूर्ण बनले. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले आणि बालकांना कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

०००

रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना देण्यात येणारी वागणूक, त्यांच्यावर होणारे उपचार याबाबत नेहमी टीका होत असते. नेमकी हीच परिस्थिती बालकांवर ओढवल्याने रुग्णालयाच्या कारभाराचा पंचनामा होत आहे. बालकांबाबत घडलेल्या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.

सध्या बालकांवर सीपीआरमध्ये बालरोग विभागामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे घडला, याबाबत माहिती घेऊन वरिष्ठांनाही माहिती दिली जाईल.

दिलीप आंबोळे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्टॅगचा गोंधळात गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोल नाक्यांवरील विलंब टाळून टोल वसुलीत सुसूत्रता येण्यासाठी रविवारपासून सुरू केलेल्या 'फास्टॅग' च्या अंमलबजावणीचा किणी आणि तासवडे टोल नाक्यावर रविवारी सावळा गोंधळ उडाला. बहुतांशी वाहनधारकांनी 'फास्टॅग' लावला नसल्याने कर्मचाऱ्यांनी केवळ प्रबोधन केले. टोल आकारणीसाठी स्वतंत्र चार रांगाची तयारी करून जुन्या पद्धतीने टोलची वसुली करण्यात आली. रात्री आठ वाजेपर्यंत दोन्ही टोल नाक्यांवर सुमारे ६० हजार वाहनांकडून टोल आकारणी झाली.

देशातील सर्व टोल नाक्यांवर वाहनधारकांकडून रोख रक्कम घेताना होणारा विलंब आणि प्रदूषण टाळण्यासह टोल वसुलीत सुसूत्रता यावी, यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांकडून फास्टॅगद्वारे टोल वसुली करण्यास रविवारपासून सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयानुसार सर्व प्रकारच्या वाहनांना (दुचाकी वगळून) फास्टॅग वापरणे बंधनकारक केले आहे. एक डिसेंबरपासून टॅगची अंमलबजावणी करण्याचे नियोजन होते. मात्र १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.

रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून टोल नाक्यांर कर्मचाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी टॅग तपासणीसाठी स्वतंत्र चार रांगा ठेवण्यात आल्या. तर एक रांग रोख रक्कमेच्या टोलवसुलीसाठी ठेवण्यात आली. टोल नाक्यांवरील २५ कर्मचाऱ्यांसह अन्य अतिरिक्त २५ असे एकूण ५० कर्मचारी तैनात केले होते. त्यांना तपासणीसाठी स्वतंत्र मशीन देण्यात आले होते. मात्र बहुतांशी वाहनधारकांनी फास्टॅग बसविला नसल्याने वाहनधारक आणि टोलच्या कर्मचाऱ्यांच्या मोठा सावळा गोंधळ निर्माण होऊन काहींच्या वादावादीचे प्रकार घडले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून रोख रक्कम स्वीकारण्यात आले. त्यांना येत्या दोन दिवसांत फास्टॅग बसविण्याच्या सूचना करून टोलची रक्कम दुप्पट आकारण्याचा इशारा दिला. दोन्ही टोल नाक्यांवर सोमवारपासून रोख रक्कम स्वीकारण्यास केवळ एकच स्वतंत्र रांग खुली ठेवण्यात येणार आहेत. सुमारे तीन महिने ही रांग सुरू राहणार आहे. मात्र त्यानंतर ही रांग बंद केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी जय्यत तयारी केली होती. मात्र वाहनधारकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारपासून ही तपासणी प्रभावी पद्धतीने केली जाणार आहे. फास्टॅग हा सक्तीचा आहे. फास्टॅगच्या रांगेतून वाहने आल्यास दुप्पट दंड केला जाणार आहे.

बी. एस. साळुंखे, अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर

प्रतिसाद नाही

टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी टाळून प्रवास गतिमान करण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्यात आली. जास्तीत जास्त वाहनांनी फास्टॅग घ्यावे, घेण्यासाठी एक नोव्हेंबरपासून २२ बँकांसह अन्य यंत्रणाकडे फास्टॅगची विक्री सुरू केली आहे. सर्व टोल नाके आणि आरटीओ कार्यालयातही विक्री सुरू करण्यात आली. मात्र बहुतांशी वाहनधारकांनी फास्टॅग घेतला नसल्याचे रविवारी उघड झाले.

५० टक्के सवलत

फास्टॅगद्वारे टोलच्या रकमेत अडीच टक्के, तर २४ तासांत त्याच टोल नाक्यावरून परत आल्यास रिटर्न टोलमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे, यामुळे वाहनधारकांनी तातडीने फास्टॅग घ्यावे, असे आवाहन महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टोल देणाऱ्या वाहनांची जिल्ह्यातील संख्या

कार: १,२६,१३६

जीप, ओमनी : २४,६६७

खासगी ट्रॅव्हल्स : १३७०

मिनीबस : १७२०

स्कूलबस : ६५१

टेम्पो : २०,३६१

टँकर : ९६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोंधळातच महामंडळ सभेचे पॅकअप

0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अडीच तास सुरू असलेल्या गोंधळ व वादावादीतच गुंडाळण्यात आली. विनयभंगप्रकरणी छाया सांगावकर व मिलिंद अष्टेकर यांचा वाद, न्यायालयाचे निकालपत्र कार्यवाह शेलार यांच्यावर भिरकावण्याचा प्रकार, त्यावरून सभासदत्व रद्दच्या मागणीवरून घमासान, भोजनकक्षातून व्यासपीठावर येण्यासाठी अध्यक्ष राजेभोसले यांनी लावलेल्या विलंबाचा निषेध, वार्षिक अहवालातील त्रुटी, अहवाल मंजुरीची गडबड, कोल्हापूरची जुनी जागा विकून मुंबईच्या जागेच्या खरेदीवर आक्षेप अशा वादंगातच संपलेल्या महामंडळाच्या सभेत संभाव्य योजना, कलाकार, निर्मात्यांचे प्रश्न, नवे उपक्रम याची चर्चा केवळ कागदावरच राहिली. रविवारी मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेली सभा संचालक मंडळाने आटोपती घेतल्यानंतर काही संचालकांच्या उपस्थितीतच समांतर सभा घेण्यात आली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेला रविवारी सकाळी सुरूवात झाल्यापासूनच गोंधळ व्हायला सुरूवात झाली. माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रश्नी न्यायालयाने अष्टेकर यांना निर्दोषमुक्त केले. दरम्यान, खोटा गुन्हा दाखल केल्याने सांगावकर यांचे रद्द केलेले सभासदत्व पुन्हा दिल्याच्या कारणाने अष्टेकर यांनी अध्यक्ष राजेभोसले यांचे प्रास्ताविक सुरू असतानाच गोंधळाला सुरूवात केली. सभेच्या नियमानुसार प्रास्ताविक, अहवाल वाचन या प्रक्रियेला फाटा देत सभेचा आखाडा झाला. अष्टेकर यांच्या बाजूने संचालक रणजित जाधव यांनीही कार्यकारणीला धारेवर धरले. तर वकीलांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत केलेला प्रयत्नही फसला. सभासदांनी वकील बदलण्याची मागणी केली. व्यासपीठासमोरील माइकवर सभासदांचा गोंधळ सुरू असतानाच शेलार यांनी अहवाल वाचन सुरू ठेवल्याने एकीकडे सभासदांची आरडाओरड तर दुसरीकडे अहवाल वाचन असा आखाडाच सुरू होता. जोपर्यंत सदस्यत्व रद्द करण्याचा विषय निकालात निघत नाही तोपर्यंत पुढील विषय चर्चेला येऊ देणार नाही असा पवित्रा अष्टेकर, जाधव, गणेश शिंदे, हेमसुवर्णा मिरजकर यांनी घेतल्यानंतर गोंधळ शिगेला पोहोचला. अध्यक्ष, कार्यवाह यांच्यासह संचालकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. दुपारचा एक वाजल्याने भोजनासाठी ब्रेक घेण्याची सूचना करत अध्यक्ष राजेभोसले भोजनकक्षाकडे जात असताना त्यांच्यासमोर अष्टेकर व्यासपीठावरच आडवे पडल्याने सभेचा नूरच पालटला. त्याचवेळी पोलिसांनी ध्वनीचालकाला माइक बंद करण्याच्या सूचना दिल्याने सभासद संतापले. म्हणणे मांडण्यासाठी आवाज दडपणाऱ्या संचालकांचा निषेध करण्यास सुरूवात झाली. संचालकांच्या विरोधातील सदस्यांनी भोजनावर बहिष्कार टाकत अध्यक्ष सभागृहात येण्याची प्रतीक्षा सुरू केली. मात्र एक तास उलटून गेला तरी अध्यक्ष राजेभोसले व्यासपीठावर येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत सभासदांनी ओरड केली. अखेर सव्वादोन वाजता राजेभोसले यांच्यासह संचालक व्यासपीठावर आल्यावर सभा सुरू झाली. यावेळी अष्टेकर व सांगावकर यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्याच्या तोडग्याला सभासदांनी आक्षेप घेतला. यावेळी न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राचे कागद रणजित जाधव यांनी शेलार यांच्या अंगावर भिरकावले. दरम्यान, पुणे, मुंबई, नागपूर,नाशिक येथून आलेल्या सभासदांनी सभेतील गोंधळावर नाराजी व्यक्त करत आमचे प्रश्न चर्चेला येणार नसतील तर आम्ही सभेला कशासाठी यायचे असा सूर व्यक्त केला. दरम्यान, पावणेतीन वाजता शेलार यांनी थेट राष्ट्रगीत सुरू करत सभा संपल्याचे घोषित करत अध्यक्षांसह सभागृह सोडले.

...

कोट

'अशाप्रकारे सभेत गोंधळ घालणे दुर्दैवी आहे. विनयभंगप्रश्नी न्यायालयीन विषयावर मत घेऊन निर्णयाला आक्षेप घेणे चुकीचे आहे. यामुळे महामंडळाची नाहक बदनामी होत आहे. नियोजित विषयांना मंजुरी मिळाल्याने त्यावर काम केले जाईल.

मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, चित्रपट महामंडळ

....

'महामंडळाच्या कोल्हापुरातील जुन्या जागेला फार मोठा इतिहास आहे. ती जागा विकून मुंबईची जागा खरेदीचा घाट खपवून घेतला जाणार नाही. मुंबईकडे सात कोटींच्या ठेवी आहेत. त्यातून जागा खरेदी करावी. तसेच यंदाच्या अहवालात आर्थिक ताळमेळबाबत प्रचंड त्रुटी आहेत.

विजय पाटकर, संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ ठरावांची प्रकिया उद्यापासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार नोंदणीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी ठरावांची प्रक्रियेस सोमवारपासून (ता. १६) सुरुवात होत आहे. दुग्ध सहनिबंधक कार्यालयाकडून ठरावाचा नमुना दूध संस्थांना स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात येणार आहे. 'गोकुळ'ची एप्रिल २०२० मध्ये निवडणूक होणार आहे.

'गोकुळ'च्या निवडणुकीसाठी प्रारुप यादी तयार करण्यासाठी विभागीय उपनिबंधक सूनील शिरापूरकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सहायक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांची ठराव प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारपदी नेमणूक केली आहे. संघाचे ३६५९ क्रियाशील सदस्य असून त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. दूध संस्थांनी क्रियाशील सदस्याच्या नावे ठराव पाठवायचा असून ठरावाचा नमुना सहनिबंधक कार्यालयाकडून पाठवण्यात येणार आहे. २१ डिसेंबरपर्यंत ठरावाचा नमुना स्पीड पोस्टने पाठवण्यात येणार आहे.

स्पीड पोस्टने नमुना पोचल्यावर संचालक मंडळाने बैठक घेऊन ठरावदारांचे नाव निश्चित करायचे आहे. ठरावावर दूध संस्थेचा अध्यक्ष आणि सचिवांची सही आवश्यक आहे. २३ डिसेंबर ते २२ जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीत दूध संस्थांनी ठराव सहनिबंधक कार्यालयाकडे देण्यास मुदत दिली आहे. ठराव प्राप्त झाल्यानंतर इंग्रजी वर्णाक्षरानुसार प्रारुप मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यावर हरकती घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राधिकरणाकडून निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. त्यानंतर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. १३ किंवा २० एप्रिल २०२० रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.

गोकुळचे मतदार

२०१५ मधील मतदार: ३२६३

नवीन सभासद: ३९६

२०२० क्रियाशील मतदार: ३६५९

सर्वसाधारण गटातील संचालक: १६

राखीव गटातील संचालक: ०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images