Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तत्कालीन इस्टेट अधिकाऱ्यांची खरडपट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या जागांबाबत 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्याचा अधिकारी तुम्हाला आहे का? कोणीही प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर देणार का, कोण आहेत रामचंद्र काटकर?,' अशी विचारणा करत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तत्कालीन इस्टेट अधिकारी काटकर यांना चांगलेच फैलावर घेतले. जेम्सस्टोन व्यापारी संकुलावर काढलेल्या कर्जप्रकरणाची आणि त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या 'ना हरकत प्रमाणपत्रा'ची गंभीर दखल घेत आयुक्तांनी त्यांना धारेवर धरले.

सोमवारी महापालिकेच्या विभागप्रमुखांची आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. 'कोण आहेत काटकर' अशी विचारणा करतच त्यांनी बैठकीत प्रवेश केला. शहरात महापालिकेच्या अनेक जागा आहेत. अशा जागांबाबत कोणीही 'ना हरकत प्रमाणपत्रा'ची मागणी केल्यावर देणार आहात का, तसा तुम्हाला अधिकार आहे का? अधिकाराच्या कक्षेत येत नसताना प्रमाणपत्र दिलेच कसे? अशी प्रश्नांची सरबत्ती करत आयुक्तांनी तत्कालीन इस्टेट अधिकारी काटकर यांना धारेवर धरले. आढावा बैठकीत प्रथमच आयुक्त संतप्त झाल्याने बैठकीतील वातावरण बदलले.

गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली असताना नाले व गटर्समधून पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले. तर रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे निदर्शनास आणून देत नाल्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

'शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम परवाना देताना किंवा भोगवटा प्रमाणपत्र देताना पार्किंगसाठी आवश्यक प्रमाणात जागा सोडली आहे अथवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज आहे. बांधकाम झालेल्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा सोडलेली नसल्यास उपअभियंत्यांची गय केली जाणार नाही,' अशा इशाराही आयुक्तांनी बैठकीत दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२४४४ कोटी जीएसटी वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य कर वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभागाने दिलेल्या उद्दिष्टापैकी ५४ कोटी रुपये जादा गोळा करत आर्थिक वर्षात २४४४ कोटी जीएसटी वसूल केला. तसेच १६४० व्यापाऱ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत नव्याने नोंदणी केली आहे. या आर्थिक वर्षातही जीएसटी वसूलीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. गतवर्षी जीएसटीकडे ८७ हजार २०० व्यापाऱ्यांची नोंदणी झाली होती. यंदा त्यामध्ये १६४० व्यापाऱ्यांची वाढ झाली असून ८८ हजार ८४० जण जीएसटी भरतात. वार्षिक ४० लाखांवर व्यवहार असणाऱ्या व्यापारी, उद्योजक, कारखानदार आणि सेवा देणाऱ्या संस्थांना जीएसटी भरण्याचे बंधन आहे.

कोल्हापूर विभागाला मार्च २०१९ पर्यंत २३८७ कोटी रुपये जीएसटी जमा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. वसुलीसाठी जीएसटी विभागाने नियोजनबद्ध काम केले. जानेवारी २०१९ पासून धडक मोहीम राबवण्यात आली. जीएसटी कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी व अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामांवर प्रतिनियुक्तीवर असतानाही विभागाने जीएसटी विवरणपत्र कसुरदारांकडून सातत्याने पाठपुरावा केला. ४५ मोठ्या करदात्यांकडून १५ कोटी ६७ लाख रुपयांचा जीएसटी शेवटच्या टप्प्यात वसूल केला. सामूहिक प्रोत्साहन योजनेखालील व्यापाऱ्यांना विभागामार्फत हप्तेबंदी सवलत मिळते. त्यांच्याकडून ६६ कोटी रुपयांची वसुली झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे एकूण उद्दिष्टापैकी ५७ कोटी रुपये जादा वसुली झाली. २.४० टक्के जादा कर वसुली झाली.

.........

अन्य विभागात वसूल झालेला जीएसटी

विभाग उद्दिष्ट जमा टक्केवारी

मुंबई ६२,१५० ५४८२९ -११.७८

ठाणे २८४१ २६३६ -७.१९

रायगड ६४१० ६२३२ -२.७८

पालघर १३७५ १३८८ ०.९१

पुणे १७९९५ १६११४ -१०.३५

सोलापूर ३६१ ४१० १३.६६

कोल्हापूर २३८७ २४४४ २.४०

नासिक २२१८ २०७२ -६.५९

धुळे ४८७ ४६४ -४.७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेम्सस्टोनप्रश्नी द्विसदस्यीय चौकशी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मालकीच्या जेम्सस्टोन व्यापारी संकुलावर कर्ज काढण्यासाठी दिलेल्या 'ना हरकत प्रमाणपत्रा'ची चौकशी करण्यासाठी सोमवारी (ता.१) आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी द्विसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर व मुख्यलेखापाल धनंजय आंदळे या समिती सदस्यांना चौकशी करुन अहवाल त्वरीत सादर करण्याची सूचना केली.

मुंबई येथील जयहिंद कॉन्ट्रॅक्टर्स लिमिटेड, डिव्हीजन ऑफ भारत उद्योगाचे संचालक श्रीचंद कुकरेजा यांनी जेम्सस्टोन व्यापारी संकुलाची उभारणी केली. त्याबाबतचे बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र नोव्हेंबर २००६ मध्ये दिले. त्यामुळे व्यापारी संकुलावरील त्यांचा हक्क संपुष्टात आला आहे. तरीही मुंबई येथील करुर वैश्य बँकेच्या मुंबई व राजारामपुरी शाखेतून कर्ज मिळण्यासाठी महापालिकेकडे 'ना हरकत प्रमाणपत्रा'ची मागणी केली. तत्कालीन इस्टेट अधिकारी रामचंद्र काटकर व सहायक आयुक्त संतोष जिरगे यांनी प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्राचा आधार घेवून कंपनीचे ठेकेदार श्रीचंद कुकरेजा व संचालक सूर्यकांत कुकरेजा यांनी ८,९०३.१ चौ. मी. वर बँकेकडून ७३ कोटीचे कर्ज उचलले. यावेळी सार्वजनिक वापराच्या पार्किंगच्या जागेवरही त्यांनी आठ कोटीचे कर्ज घेतले.

याबाबतची संपूर्ण माहिती उपमहापौर भूपाल शेटे यांनी घेत आयुक्तांकडे तक्रार केली. तक्रारीदरम्यान त्यांनी सर्व कागदपत्रेच आयुक्तांना दाखवली. त्याची दखल घेत त्यांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर व मुख्यलेखापाल आंदळे यांची द्विसदसीय समिती स्थापन करत चौकशी करण्याचे आदेश दिले.

'ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 'ना हरकत प्रमाणपत्र' दिले. दस्त नोंदणी करताना तत्कालीन करवीर सहा. दुय्यम निबंधक एस. के. कुलाल यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक होते. पण त्यांनी कागदपत्रे न पाहताच दस्त नोंदणी केली. यातून सरकारी अधिकाऱ्यांची निष्क्रियता दिसत असली, तरी यामध्ये महापालिका, बँक अधिकारी व दुय्यम निबंधक यांनी सामुदायिकपणे भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उपमहापौर शेटे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सण, उत्सवांमध्ये धार्मिकता जपायला हवी

$
0
0

०००

जगद्गरू श्री विद्यानृसिंह भारती, शंकराचार्य, करवीर पीठ

०००

गणपती ही बुद्धीची देवता आहे. या देवतेची आराधना करायची असते. त्यासाठी धर्माने सण कसा साजरा करायचा हेही सांगितले आहे. गणेश चतुर्थीला घरी मातीची मूर्तीच पूजली पाहिजे. ही मूर्ती दहा इंचाची अथवा एक फूट उंचीची असावी. मूर्ती रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाने रंगवलेली असावी. गणेशचतुर्थी या सणादिवशीच मूर्तीची प्रतिष्ठापना झाली पाहिजे. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना हे धर्मशास्त्राला अमान्य आहे.

००००

हिंदू धर्मात श्रावण आणि भाद्रपद हे महिने सणासुदीचे असतात. या महिन्यात हिंदू धर्मियांनी सात्विक आचरण ठेवून देवतांची आराधना करायची असते. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी हा महत्वाचा सण असतो. गणपती ही बुद्धीची देवता आहे. या देवतेची आराधना करायची असते. त्यासाठी धर्माने सण कसा साजरा करायचा हेही सांगितले आहे. गणेश चतुर्थीला घरी मातीची मूर्तीच पूजली पाहिजे. ही मूर्ती दहा इंचाची अथवा एक फूट उंचीची असावी. मूर्ती रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाने रंगवलेली असावी. रासायनिक रंगांमुळे पाणी प्रदूषणाचा धोका असतो. त्यामुळे मूर्ती मातीची, एक फूट उंचीची व नैसर्गिक रंगाने रंगवलेली असावी असा संकेत आहे.

हिंदू धर्मात गणेश चतुर्थी हा एकच दिवसाचा सण आहे. पण हल्ली तो सात दिवसांचा आणि अकरा दिवसांचाही साजरा केला जातो. मातीचा गणपती तयार करून एक दिवसानंतर तो नदीत विसर्जित करायचा असतो. माती पाण्यात विरघळते आणि ती परत शेतात जाते. प्लास्टरपासून तयार केलेली मूर्ती कोणालाच मान्य नाही. प्लास्टर पाण्यात विरघळत नाही. जरी कालांतराने विरघळले तरी त्याचा शेतीला काही उपयोग होत नाही. पूर्वी मातीचा गणपती केला जात असे. त्यामागे एक कारण आहे. मातीची मूर्ती थोडी ओली असते. देवघरातील उष्णता आणि हवेतील आद्रतेमुळे मूर्तीला तडे जाऊ शकतात. त्यामुळे पूर्वी एक ते दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात असे. तडे गेलेल्या मूर्तीची पूजा शास्त्राला मान्य नसते.

गणेशचतुर्थी या सणादिवशीच मूर्तीची प्रतिष्ठापना झाली पाहिजे. सध्या दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गणेशमूर्ती वाजत गाजत आणून मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. हे धार्मशास्त्रात बसू शकत नाही. पूर्वी गणेशमूर्तीची घरीच प्रतिष्ठापना केली. पण लोकमान्य टिळकांनी समाजहितासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे सार्वजनिक उत्सवातील मूर्ती व धार्मिक विधी कसे असावेत हे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही. तरीही सार्वजनिक उत्सवात मातीपासून तयार केलेल्या व नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जावी. शहरातील पाणवठ्यांचे स्वरुप लक्षात घेऊन मूर्तीची उंची असावी. जलाशयात पूर्ण बुडावी एवढ्याच उंचीची मूर्ती असावी.

गणपतीची आरती म्हणताना टाळ, झांज, घंटा, मृदुंगाचा वापर करावा. पारंपरिक वाद्याचा वापर हवा. सध्या कणकर्कश असलेल्या उच्च ध्वनी यंत्रणेमुळे ध्वनीप्रदूषण होते. भारतातील मृदंग, ढोल, डफ, ढोलकी या वाद्यांपासून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी या आडव्या जातात. त्यांचा आवाजही मधुर असतो. तर परदेशी वाद्ये ही उभी असतात. त्यामुळे त्यांच्या ध्वनीलहरी आकाशाच्या दिशेने, वर जातात. त्यांचा आवाज मोठा असतो.

उत्सवकाळात गणपती देवतेच्या आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक काढली जाते. खरेतर गणेश मिरवणूक न म्हणता शोभायात्रा म्हटले पाहिजे. शोभायात्रेत शोभा वाढवायची असते. पण हिडिसफिडिस नृत्य करून शोभायात्रेची शोभा घालवायची नसते. शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचाच वापर केला पाहिजे. श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्याचे हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. या दोन महिन्यातील येणाऱ्या सणांमध्ये धार्मिकता असली पाहिजे. पर्यावरणाचे महत्व जाणून सण साजरे केले पाहिजेत असे धर्मशास्त्र सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सकल मराठा’ करणार मान्यवरांचा सत्कार

$
0
0

पालकमंत्री पाटील, नारायण राणे यांच्यासह संभाजीराजेंचा होणार गौरव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा आरक्षणासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार नारायण राणे यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार, तज्ज्ञ, अभ्यासकांचा सत्कार पुढील आठवड्यात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे', अशी माहिती सत्कार समितीचे निमंत्रक जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुस्लिम बोर्डिंग येथे झालेल्या बैठकीला शहर व जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना दिलीप पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षण आंदोलनाचे मुख्य केंद्र कोल्हापूर येथे होते. इथूनच रस्त्यावरील व कायदेशीर लढाईसाठी रसद पुरवण्यात आली. मराठा आरक्षण कार्यान्वित होण्यासाठी राज्य सरकारच्या समितीचे अध्यक्षही पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. २०१४ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमधील नारायण राणे यांनीही आरक्षणांसाठी पुढाकार घेतला होता. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यांचा निर्णय कोर्टात टिकला नसला तरी त्यांचे मोठे योगदान आहे. खासदार संभाजीराजे यांनी राज्यभर मराठा आरक्षण मागणीसाठी जनजागृती केली होती. तसेच राज्यसभेतही त्यांनी आवाज उठवला. श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही मराठा आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देत मार्गदर्शन केले होते. कोल्हापुरातील आजी माजी खासदार, आमदारांनीही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील लढाईत आणि सभागृहात आवाज उठवला होता. मराठा आरक्षण हे हायकोर्टाने वैध ठरवले आहे. त्यामुळे यापूर्वी झाली टीका, मतभेद विसरुन मराठा आरक्षणात ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार समारंभासाठी समिती नियुक्ती केली असून पुढील आठवड्यात तारीख जाहीर केली जाणार आहे.'

पत्रकार परिषदेला मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अॅड गुलाबराव घोरपडे, शाहीर दिलीप सावंत, माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, राजू सावंत, संजय वाईकर आदी उपस्थित होते.

......

बैठकीत झालेले प्रमुख ठराव

सुप्रीम कोर्टात न्यायालयीन लढाईसाठी वकील नेमणे

मराठा आंदोलकांवरील गुन्हे काढून टाकावेत.

सारथी संस्थेचे कार्यालय कोल्हापुरात करावे.

जिल्हा पोलिस प्रशासनाचा सत्कार करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आरपारची लढाई

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज मिळावी आणि वीजबिलात दुरुस्ती करावी अशी मागणी करत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता आरपारची लढाई करण्याची इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी, 'राज्य सरकार हे फसवे असून त्यांच्याविरोधात निर्धाराने लढा देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ बांधावी. शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे सरकारचे कोणतेही कलम आणि हुकूम चालणार नाही. जनशक्तीसमोर राज्यकर्ते टिकू शकत नाहीत' असा सज्जड इशारा दिला.

यावेळी झालेल्या भाषणांमध्ये सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली. वयाच्या ९४व्या वर्षी डॉ. एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारविरोधात एल्गार पुकारताच उपस्थितांनी 'डॉ. एन. डी. पाटलांचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

'शेतीपंपाला त्वरित वीज कनेक्शन मिळावीत, घरगुती वीजबिलात झालेली वाढ त्वरित मागे घ्यावी, शेतीपंपाला प्रतियुनिट एक रुपयाप्रमाणे वीज आकारणी करावी आणि उच्चदाब सिंचन योजनेला प्रतियुनिट एक रुपया १६ पैसे या दराने वीजपुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यांसह चौदा प्रमुख मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य संघटनांच्यावतीने काढलेल्या या मोर्चाने राज्य सरकारविरोधात आक्रमक लढाईचा इशारा दिला. 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी आसूड ओढत सरकारच्या विरोधातील रोष व्यक्त केला.

'स्वाभिमानी'चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी बाबासाहेब पाटील, प्रताप होगाडे, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालय चौकापासून मोर्चा ताराबाई पार्कातील 'महावितरण'च्या कार्यालयावर आला. महावितरणच्या कार्यालयासमोर सभा झाली. सभेला प्रारंभ होताच ज्येष्ठ नेते डॉ. पाटील यांचे तेथे आगमन झाले. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले.

कोण खोटे बोलते? मुख्यमंत्री की पालकमंत्री...

'शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्याबाबत पंधरा दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीचे पत्र त्यांनी २१ जानेवारी २०१९ रोजी दिले. मात्र या घटनेला सहा महिने दहा दिवस झाले तरी सरकारने काही शब्द पाळलेला नाही. याप्रश्नी मुख्यमंत्री खोटे बोलतात की पालकमंत्री?' असा खडा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 'याप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर आल्यावर त्यांना जाब विचारू. वाटल्यास त्यांनी कितीही पोलिस, फौजफाटा लावावा' असे आव्हानही राजू शेट्टी यांनी दिले.

कर्तृत्ववान पालकमंत्री, बावनखुळे की बावनखुळं

वीज दराच्या निर्णयावरुन शेट्टी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांची खिल्ली उडविली. ते म्हणाले, 'चंद्रकांत पाटील हे 'कर्तृत्ववान' पालकमंत्री आहेत. त्यांची आणि माझी बिंदू चौकात आमनेसामने भेट होणार आहे. पण ती होईना झालीय. शेतकऱ्यांना चुकीची बिले दिली आहेत. ती दुरुस्त करावीत ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना फुकटची वीज नको आहे. फक्त त्यांना सवलतीच्या दरात वीज हवी आहे. मात्र ऊर्जामंत्री बावनकुळे हे थकबाकीवरुन वेगळेच अकलेचे तारे तोडत आहेत. बावनकुळे की बावनखुळं हेच आम्हाला समजत नाही' असा टोलाही त्यांनी लगाविला.

सहकारमंत्र्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

'राज्य मंत्रिमंडळातील एक एक मंत्री म्हणजे नग आहेत. भाजपाचा एक आमदार वीज चोरतो. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यामुळे सतीश सुंदरराव सोनवणे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्या शेतकऱ्याने सहकारमंत्र्याच्या कारखान्याला १५० टन ऊस घातला. सहा महिने झाले तरी अद्याप बिले मिळाली नाहीत. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी सहकारमंत्र्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. पोलिसांकडे ती चिठ्ठी आहे. पण गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस सांगत आहेत. सहकारमंत्र्यांच्या मुलाने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांतील सदस्यांना गायब केले आहे' असा आरोप शेट्टी यांनी केला.

मोर्चातील लक्षवेधी घोषणा

- महावितरणचा दाबाय लागतोय खटका, राज्य सरकारला द्यायला लागतोय झटका

- यंत्रमाग अडचणीत, सरकार झोपेत

- या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ल्यातील जखमी कैद्याचा मृत्यू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कळंबा जेलमध्ये बराकमधील कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला कैदी सुनील मारुती माने (वय ३५, रा. नातेपुते, जि. सोलापूर) याचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये सोमवारी (ता. १) दुपारी मृत्यू झाला. जेलमधील बराक क्रमांक एकमध्ये गुरुवारी (ता. २७) दुपारी माने याच्यावर हल्ला झाला होता. कैदी परमेश्वर उर्फ देवा नानासाहेब जाधव (वय २४, रा. कोरेगाव, जि. सोलापूर) याने माने याच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केला होता.

तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोन वर्षांपूर्वी सुनील माने याला सोलापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याला ९ डिसेंबर २०१७ मध्ये कळंबा कारागृहात ठेलण्यात आले होते. त्याच्याच बराकमध्ये परमेश्वर जाधव हा 'मोक्का' गुन्ह्यातील आरोपी होता. १९ एप्रिल २०१७ पासून तो कारागृहात आहे. गुरुवारी दुपारी माने हा बराकमध्ये झोपलेला असता, जाधवने डोक्यात दगड घालून माने यास गंभीर जखमी केले. जखमी माने याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान सोमवारी दुपारी माने याचा मृत्यू झाला. हल्लेखोर परमेश्वर उर्फ देवा याने सुपरी घेऊन भावावर हल्ला केला आहे, असा आरोप माने याचा भाऊ आणि लष्करातील जवान अनिल मारुती माने याने पत्रकारांशी बोलताना केला. सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वारंट आदेशाने परमेश्वर जाधव याला ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्यात अटक करणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू ; दोघे गंभीर जखमी

$
0
0

सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू ; दोघे गंभीर जखमी

सोलापूर :

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोराचा पाऊस आल्यामुळे शेतातील एका पत्र्याच्या शेडखाली पाच जण थांबले होते. त्या दरम्यान शेडवर वीज कोसळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये पंतूसिंग जीवनसिंग रजपूत, संकेत शिवानंद चोरमोले, पार्वती मलप्पा कोरे यांचा समावेश आहे. रविकांत राजकुमार मुळे आणि धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे हे दोन जण जखमी आहेत. मंद्रुपपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप-टाकळी रस्त्यालगतच्या दरेप्पा म्हेत्रे याच्या शेतात ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली आडोशाला खाली थांबलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्काळ घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची तातडीने विचारपूस केली. मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात असल्यामुळे फोनवरून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या समवेत सदर घटनेविषयी चर्चा करून तत्काळ पंचनामे करून सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या, सरकारकडून मृतांच्या वारसांना लवकरच मदत देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष सभेत आज महापौर निवड

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेची विशेष सभा मंगळवारी (ता. २) सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. सभेत महापौरपदी माधवी गवंडी यांची औपचारिक घोषणा होईल. पीठासन अधिकारी तथा सभाध्यक्ष जिल्हा परिषद सीईओ अमन मित्तल महापौरपदाच्या निवडीची घोषणा करतील. महापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवड सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी नगरसेविका माधवी गवंडी व अॅड. सुरमंजिरी लाटकर इच्छुक होत्या. शुक्रवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी गवंडी यांच्या नावाला पक्षश्रेष्ठीनी संमती दिली. लाटकर यांच्या ऐवजी गवंडी यांना उमेदवारी निश्चित झाल्यानंतर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्यावतीने महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी महापौरपदासाठी गवंडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक कार्यक्रमानुसार आज, मंगळवारी होणाऱ्या सभेत त्यांची महापौरपदी रितसर घोषणा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कृषीपंपांच्या वीजदरात सवलत मिळावी आणि चुकीची बिले तातडीने दुरुस्त करावीत अन्यथा क्रांतिदिनी, नऊ ऑगस्ट रोजी पंचंगंगा पूल येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू आणि बेमुदत काळासाठी महामार्ग बंद पाडू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. तर शेतकऱ्यांच्या वीज दराच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास विलंब लावल्यास मंत्रालयाला घेराओ घालण्यात येईल, असा इशारा प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांनी दिला.

राज्यातील ४२ लाख शेतीपंपांच्या वीज बिलात दुरुस्ती करावी, कृषीपंपासाठी युनिटला एक रुपया सोळा पैसे व लघुदाबाच्या सिंचन योजनेसाठी युनिटला रुपया दराने वीज पुरवठा करावा, यासाठी सोमवारी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, 'फसवणूक करणे हा भाजप सरकारचा मंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी नागरिकांच्या बँक खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याच्या खात्यावर पंधरा लाख जमा झाले, असा कुणी भाग्यवान असेल तर समोर या त्यांच्या पायाचे तीर्थ घेतो. राज्यातील मंत्री एक बोलतात, मुख्यमंत्री दुसरेच बोलत असतात. पाच वर्षात एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. राज्यकर्त्यांकडू शेतकऱ्यांचा होणारा अपमान चीड आणणारा आहे.'

शेट्टी म्हणाले, 'दुरुस्त बिले जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकही शेतकरी वीज बिल भरणार नाही. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्राकडून मिळालेले अनुदान सगळे नागपूरला पळवले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर, सांगली दौऱ्यात जाब विचारु.'

.. .. ..

'ध्यानात ठेवलंय!'

शेट्टी म्हणाले, 'लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचणार नाही, आत्महत्या करणार नाही. मला घरात बसवले म्हणून टाळ्या पिटणाऱ्यांना पश्चाताप होईल, अशी आंदोलन करु. शेतकऱ्यांसाठी पुढचा संघर्ष टोकाचा असेल. माझ्या पराभवासाठी कुणी काय भानगडी केल्या ते ध्यानात आहे. आरपारच्या लढाईसाठी पूर्णवेळ मोकळा आहे. '

.... ... ... ....

शेतकऱ्यांची बदनामी कशासाठी?

प्रा. एन. डी. पाटील यांनी बिलाच्या थकबाकीवरुन अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी सांगलीची थकबाकी ७९२ कोटी ९२ लाख तर कोल्हापूर जिल्ह्याची थकबाकी २६० कोटी अशी १०५३ कोटीपर्यंत असल्याचे सांगितले. त्यावर पाटील यांनी थकबाकीचे प्रमाण कमी असताना शेतकऱ्यांचा वारंवार अपमान का करता? असा सवाल करताच अधिकारी निरुत्तर झाले.

०० ०० ० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा

$
0
0

दरड कोसळून घर, पिठाची गिरणी व दुकान जमीनदोस्त

सातारा :

हरिजण गिरीजण सहकारी गृहनिर्माण संस्था, केसरकर पेठ सातारा येथे दरड कोसळून घर, पिठाची गिरण व दुकान जमीनदोस्त झाले. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जिवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती इंताज अय्याज इनामदार यांनी दिली आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे इनामदार व त्यांचे कुंटुबीय हादरून गेले. या घटनेची माहिती मिळताच सातारा नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे , नगरसेविका अनिता घोरपडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तातडीने पालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेल्या दरडीमधून इनामदार यांचे दुकान तसेच घरावरील दरड काढण्याचे सुरू करण्यात आले.

..........

उन्हाळ्यात धुळीचा

पावसाळ्यात चिखलाचा त्रास

सातारा

दोन वर्षांपासून उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास होत सातारकरांना होत आहे. सातारा-पंढरपूर महामार्गच्या ठेकेदाराच्या धोरणामुळे शिंदेवाडी, पिंगळी, गोंदवले, सत्रेवाडी, महिमानगड या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवून त्या बाजूच्या साईडपट्ट्या व नाले न केल्याने अनेक घरात पाणी जात आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन याला पाठिशी घालत असल्याने संबंधित ठेकेदाराची मुजोरी वाढत चालल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

रविवारी रात्री पाऊस झाल्यानंतर पिंगळीनाजिक एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना शेजारील नागरिकांनी धावत जाऊन त्याला वाचवले. ही घटना घडताच येथील नागरिकांनी रस्त्यावरत उतरत महामार्ग प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन चालू केले होते. नागरिकांनी दोन तास रस्त्यावर ठिय्या मांडला होता.

.........

प्रतापगडावर होणार 'रोप वे'

सातारा

छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर जाणे आता पर्यटकांसाठी सोपे होणार आहे. जावळी गाव (ता. महाबळेश्‍वर) ते प्रतापगड अशा रोप वे प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. जावळी गाव-लॅडविक पॉईंट-प्रतापगड असा हा ५.६ कि.मी. लांबीचा विशाल रोप वे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असून, गडावर जाणे सोयीचे होणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी सरकार व्यापक प्रयत्न करीत आहे.

प्रतापगडावर होणारा रोप वे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल, असेही रावल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठी भरती प्रक्रिया आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील रिक्त ६७ तलाठी पदाच्या जागांसाठी भरतीची प्रक्रिया आज, मंगळवारपासून सुरू होत आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा २ ते २६ जुलैअखेर ऑनलाइन परीक्षा होणार आहे. दहा केंद्रांवर ही परीक्षा चालेल.

सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ई महापरीक्षा पोर्टलवरून तलाठी पदासाठी परीक्षा घेतली जात आहे. यासाठी उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज केले आहेत. मात्र सरकारी पातळीवर पुढील प्रक्रिया झाली नव्हती. आता मराठा आरक्षणातील न्यायालयीन अडचणही दूर झाली आहे. रिक्त पदांमुळे महसूल प्रशासन गतिमान करण्यात अडचणी येत आहेत. म्हणून यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांची राज्यात एकाचवेळी परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, मतदान ओळखपत्र, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र म्हणून सोबत आणणे बंधनकारक आहे. अर्ज स्वीकारण्यापासून परीक्षेपर्यंत प्रथमच ऑनलाईन भरतीची प्रक्रिया होत आहे.

........

चौकट

परीक्षा केंद्रे अशी

अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी (पेठवडगाव), सायबर (कोल्हापूर), डीकेटीईस यशवंतराव चव्हाण, पॉलिटेक्निक (इचलकरंजी), डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज (साळोखेनगर, कोल्हापूर), डॉ. जे. जे. मगदूम इजिनिअरिंग कॉलेज (जयसिंगपूर), केआयटी कॉलेज (गोकुळ शिरगाव, कोल्हापूर), संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज (पन्हाळा), संत गजानन महाराज कॉलेज (महागाव, ता. गडहिंग्लज), शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यड्राव), श्री विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पाल, ता. भुदरगड).

----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅटमधील तफावतीला व्यापाऱ्यांचा विरोध

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना एलबीटी आणि दंड, व्याज भरण्यासाठी 'अभय' योजना लागू केली. व्यापाऱ्यांना एलबीटी रक्कम देताना व्हॅटची आकारणी करुन नोटीस दिली जात असल्याने रकमेमध्ये तफावत निर्माण झाली आहे. याबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे सीए पॅनेल व व्यापारी महासंघासोबत लवकरच बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी ४५० व्यापाऱ्यांना प्रशासनाने करनिर्धारणपूर्व नोटीस बजावली आहे.

एलबीटी रद्द झाल्यानंतर थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने दंड व व्याजामध्ये सवलत देणारी 'अभय' योजना सुरू केली. शहरात सुमारे १२ हजार व्यापारी असताना केवळ ८,५०० व्यापाऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली. परिणामी सुमारे साडेतीन हजार व्यापारी योजनेबाहेर राहिले. सत्तेवर आलेल्या युती सरकारने ५० लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारने निर्णयानंतर महापालिकनेने व्यापाऱ्यांची पडताळणी करण्यासाठी चार्टड अकाउंटंट पॅनेलची नियुक्ती केली. त्यानंतर २,२०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १,२०० व्यापाऱ्यांनी १२ कोटी जमाही केला. मात्र उर्वरीत व्यापाऱ्यांनी अद्याप मुद्दल जमा केली नाही. अशा व्यापारी व फर्म यांना करनिर्धारण पूर्व नोटीस बजावली. कागदपत्रे जमा करुन एलबीटी जमा करण्याचे वारंवार आवाहन केले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

'अभय' योजनेतील थकबाकीदारांना व्हॅटमधील डिमांडनुसार एलबीटी रकमेची मागणी केली जाते. या रकमेला व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने त्यांच्यासोबत प्रशासनाने बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीस सीए पॅनेल व व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाचाही समावेश आहे.

राज्यात एलबीटी लागू झाल्यानंतर प्रत्येक वस्तूच्या विक्रीतून कर वसूल केला जात होता. हा कर ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांच्यावर बसत होता. याप्रमाणे व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून एलबीटी घेतला. पण हा कर महापालिकेकडे जमा केला नाही आणि अभय योजनेत सहभागही घेतला नाही. एकीकडे ग्राहकांची लूट केली असताना महापालिकेच्या महसूल बुडवण्यात व्यापाऱ्यांनी धन्यता मानली. अशा व्यापाऱ्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असेल.

...................................................

कोट

'एलबीटीमध्ये सवलत देणारी अभय योजना सुरू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी केवळ कागदपत्रे सादर केली. मूल्यांकन न करता पुन्हा त्याबाबतचा पाठपुरावा केला नाही. अशा व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ज्या व्यापाऱ्यांच्या एलबीटीबाबत तक्रारी आहेत. त्यांना कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सुनील बिद्रे, एलबीटी अधिकारी

................

२,२००

'अभय' योजनेतील नोंदणीककृत व्यापारी

१,२००

व्यापाऱ्यांकडून एलबीटी जमा

१२ कोटी

जमा रक्कम

७००

एलबीटी थकीत व्यापारी

४५०

व्यापाऱ्यांना करनिर्धारणपूर्व नोटीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना भूकंपप्रवण क्षेत्राला मिळणार विकास निधी

$
0
0

कोयना भूकंपप्रवण क्षेत्राला मिळणार विकास निधी

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक सोमवारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुबई येथे विधान भवनात झाली. या वेळी भूकंप प्रवण क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी वाटपा बाबत चर्चा झाली. समितीच्या शिल्लक निधीपैकी २० कोटी निधींचा वापर भूंकप प्रवण क्षेत्रातील सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांसाठी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, सदानंद चव्हाण, शशिकांत शिंदे, शंभूराजे देसाई, समितीचे सचिव सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

..........

आनेवाडी टोल नाक्यावर एकाचा मृत्यू

कराड :

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावरती ट्रॅक स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे (वय ५५, रा. मोरेवाडी, ता. जावली) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

आनेवाडी टोलनाक्यावरती हैबत मोरे साफसफाईचे काम करीत होते. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ते बुथ व ट्रॅकची साफ सफाई करण्यासाठी ट्रकमध्ये उतरले होते. ट्रॅक नंबर सातमध्ये सफाई करताना पाठीमागून आलेल्या मालट्रक (के ए २५ ए ९४३८) चा धक्का लागल्याने कामगार ट्रक खाली पडला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला, परंतु ट्रकच्या चालकाने तसाच ट्रक पुढे घेतल्याने हैबत मोरे यांचे डोके ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडल्याने ते जागीच ठार झाले. अपघाता नंतर ट्रक चालकास भुईंज पोलिसांनी अटक केली असून, मृत हैबत मोरे याचा मृतदेहाचे शवविच्छेदन भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

.........

वृक्षारोपणाचा प्रारंभ

कराड :

राज्य सरकारच्या वतीने ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक जुलै रोजी येथील शहराला लागून असलेल्या मलकापूर सोमवारी सकाळी वृक्षारोपणाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी येथील उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड विभागीय वनअधिकारी एम. एन. मोहिते, वन्यजीव विभागाचे डॉ. अजित साजणे, वन परिक्षेत्र अधिकारी निलम येडगे, मलकापूरच्या नगराध्यक्षा विद्याताई थोरवडे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

........

ज्या प्रदेशात वृक्ष जास्त,तिथे पाऊस जास्तःजास्तीत जास्त झाडे लावू,जिल्हा हरित करुःजिल्हाधिकारी श्वेता सिंघल

सातारा :

'ज्या प्रदेशांत वृक्षांची संख्या कमी, तेथे पाऊस कमी, जेथे वृक्षांची संख्या जास्त त्या प्रदेशात जास्त पाऊस हा निसर्गाचा नियम आहे. पाऊस पडण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन कमीत कमी एक तरी झाड लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. तसेच जास्तीत जास्त झाडे लावू व आपला जिल्हा हरित करू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.

शिवाजीनगर (कुसवडे, ता. जि. सातारा) येथे सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्ह्यात करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.

...........

'कृष्णा'चे सभासद प्रशिक्षणासाठी रवाना

कराड :

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ४२ शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. दर वर्षी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे प्रशिक्षण दिले जाते. या शिबीरात सहभागी होण्याची संधी कारखान्याने ४२ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्ट लोनसाठी पाच वर्षांची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याची योजना बँकांसाठी आणली होती. सॉफ्ट लोनची एका वर्षात परतफेड होणार नसल्याने त्याला पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे पत्रक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची शनिवारी सभा झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेस सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बैठकीत सॉफ्ट लोनवर चर्चा झाली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याची योजना बँकांसाठी आणलेली होती. त्यासाठी केंद्र सरकारकडून सात टक्केच व्याज मिळणार आहे. सॉफ्ट लोनची एका वर्षात परतफेड होणार नाही. हे कर्ज राज्यातील इतर जिल्हा बँकांप्रमाणे पाच वर्षे मुदतीचे करण्याचे ठरले. सॉफ्ट लोनची पहिल्या वर्षात परतफेड न झाल्यास पुढील चार वर्षांत समान वार्षिक हप्त्यांनी कारखान्यांनी करण्याची आहे. ऊसतोडणी यंत्रासाठी यावर्षी जिल्हा बँकेने २३ शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला आहे. या यंत्राच्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी राज्य सरकारकडे ठरावाद्वारे मागणी करण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील धरणांना पाण्याची प्रतीक्षा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : ऐन पावसाळ्यातही जिल्ह्यातील सर्वच धरणांत मागील वर्षीच्या एक जुलैच्या तुलनेत कितीतरी पटीने पाणीसाठा कमी आहे. सहा लहान धरणांत अजूनही डेडस्टॉक वगळता शून्य टक्के पाणीसाठा आहे. दोन मोठ्या धरणांतील पाणीसाठा दहा टक्यांपेक्षा कमी तर आठ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठी ३० टक्यांपेक्षा कमी आहे. गेल्या पाच वर्षात जुलै महिन्यात पहिल्यांदाच असे चित्र आहे. यामुळे धरणांत समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आणि टंचाईगस्त गावांतील नैसर्गिक पाणीस्रोत पूर्ववत होण्यासाठी दीर्घकाळ संततधार पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा उन्हाळ्यात एकही जोरदार वळीव पाऊस झाला नाही. पाणी वापर वाढल्याने मेच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणांनी तळ गाठला. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने दडी मारली. त्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. मात्र संततधार नसल्याने भूगर्भातील आणि धरणातील पाणी पातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. याउलट प्रचंड उष्मा वाढल्याने शेतीसाठीच्या पाणी मागणीत वाढ राहिली. परिणामी गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच पाणी पातळी निच्चांकी झाली.

एक जूनपासून आतापर्यंत एकूण ६२७७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी एक जुलैपर्यंत एकूण ४०, ७९६ मिलीमीटर पाऊस झाला होता. २८ जूनपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली. राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी धरणात वाढत आहे. लहान धरणांत मात्र, अजूनही पाणीसाठा वाढलेला नाही.

मोठ्या धरणांतील १ जुलै रोजीचा पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)

२०१४ : ३१७.२८

२०१५ : ८४९.१०

२०१६ : ७९.८७

२०१७ : ३०८

२०१८ : ५७७.५७

२०१९ : १६०.७४

सहा धरणांत शून्य टक्के

जिल्ह्यात ५४ लघुपाटबंधारे प्रकल्प म्हणजे लहान धरणे आहेत. यातील येणेचवंडी, तेरणी (ता. गडहिंग्लज), हणबरवाडी, कणेरीवाडी (ता. करवीर), बेनिक्रे (ता. कागल), कळसगादे (ता. चंदगड) धरणांत डेडस्टॉक वगळता शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामुळे परिसरातील गावांतील लोकांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या गावांतील रहिवाशांना खासगी कुपनलिका, विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे.

मोठ्या, मध्यम धरणांतील (कंसात गतवर्षीचा पाणीसाठी)

राधानगरी : २२(२८)

तुळशी : २७(४६)

वारणा : ६ (३४)

दूधगंगा : ६(३०)

कासारी :२२(३९)

कडवी :३९(५७)

कुंभी :३०(४८)

पाटगाव :३०(४१)

चिकोत्रा :२८(१२)

चित्री :१७(२२)

जंगमहट्टी : १०(२८)

घटप्रभा :७७(४६)

जांबरे : १७(२२)

(मोठ्या चार धरणांत एकूण ५. ६८ तर नऊ मध्यम धरणांत ५.७० टीएमसी पाणी आहे.

६७

जिल्ह्यातील एकूण धरणे

नऊ टक्के

मोठ्या धरणातील शिल्लक पाणी

३१ टक्के

मध्यम धरणातील शिल्लक पाणी

१७ टक्के

लहान धरणातील पाणीसाठा

तीन दिवसांत

चार टीएमसी पाणी

२७ जून अखेर मोठ्या आणि मध्यम धरणांत सात टीएमसी होते. तीन दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने चार टीएमसी पाणी वाढले. यामुळे सध्या ११ टीएमसी पाणीसाठा आहे. याउलट ५४ लहान धरणांत केवळ एक टक्यांनी पाणीसाठा वाढला.

जून महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस नसल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. पण चार दिवसांपासून होत असल्याने पाण्यामुळे प्रमुख धरणात पाण्याची आवक चांगली आहे. नद्यांतील पाणीही वाढले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जमिनीतून पाणी बाहेर पडले. ते नाला, ओढ्याद्वारे धरणात मिसळेल. त्यानंतर सर्वच धरणांतील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होईल.

रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू

$
0
0

सोलापुरात वीज पडून तिघांचा मृत्यू

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोराचा पाऊस आल्यामुळे शेतातील एका पत्र्याच्या शेडखाली पाच जण थांबले होते. त्या दरम्यान शेडवर वीज कोसळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पंतूसिंग जीवनसिंग रजपूत, संकेत शिवानंद चोरमोले, पार्वती मलप्पा कोरे यांचा समावेश आहे. रविकांत राजकुमार मुळे आणि धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे हे दोन जण जखमी आहेत. मंद्रुपपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप-टाकळी रस्त्यालगतच्या दरेप्पा म्हेत्रे याच्या शेतात ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली आडोशाला खाली थांबलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने सोमवारी काही काळ उसंत घेतली. सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी ऊन आणि सायंकाळी पाऊस असे दिवसभरातील वातावरण होते. गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले तर काही बंधारेही पाण्याखाली गेले आहेत.

भोगावती व तुळशी नदीचे पाणी पात्राबाहेर

कुडित्रे: तीन-चार दिवसांच्या पावसाच्यया हजेरीमुळे भोगावती व तुळशी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोगे आणि बहिरेश्वर येथील बंधारे पाणीखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिला हळदी, शिंगणापूर आदी बंधारेही पाण्याखाली जाऊ शकतात. भोगावती व तुळशी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. करवीरच्या पश्चिम भागातील कोगे व बहिरेश्वर येथील बंधारे पाण्याखाली गेल्याने परिसरातील ग्रामस्थांना व प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

आजऱ्यात काही ठिकाणी पडझड

आजरा: गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसाने सोमवारी उसंत घेतली. दरम्यान गेल्या दोन दिवसांत तालुक्यात चार ठिकाणी घराच्या भिंतींची पडझड झाल्याची नोंद झाली आहे. यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात सरासरी ७२.५० मि.मी. पाऊस झाला. गवसेत सर्वात जास्त ९० मि.मी. पाऊस झाला. आजरा ७४, मलिग्रे ६०, तर उत्तूर भागात ६६ मि.मी. पाऊस झाला. आजअखेर १२७७ मि. मी. पाऊस झाला. दरम्यान, तालुक्यात छाया कांबळे (रा.बुरूडे) यांच्या घराच्या भिंतीची पडझड होऊन अंदाजे २५ हजार, सरिता रेडेकर (रा. लाकडवाडी) यांच्या घराच्या भिंतीच्या पडझडीने २० हजार, शिवाजी रावण (रा. सरंबळवाडी) यांचे ५० हजार, गंगाराम रावण (रा. सरंबळवाडी) यांच्या विहिरीचा कठडा पडल्याने एक लाखाचे नुकसान झाले.

चंदगडमध्ये शेतीकामांना वेग

चंदगड: गेले चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीकामांना वेग आला होता. जनजीवनही विस्कळीत झाले होते. मात्र आज दिवसभर पावसाने काहीशी उसंत दिली. गेले दोन तीन दिवस पाऊस सुरु असल्याने शेतीकामांना वेग आला होता. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या २४ तासांत तालुक्यात सरासरी ६६.०० मि. मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान रविवारी सायंकाळी मौजे शिरगाव येथील सुरेश कुंदेकर यांच्या गोठ्यावर झाड पडून अंदाजे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार

राधानगरी: तालुक्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. तालुक्यात इतरत्र मात्र पावसाची उघडझाप आहे. सलग चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे नदी, ओढे,नाले दुथडी भरून वाहत आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पर्यायी पुलामुळे वाहतूक सुरळीत झाली.

राधानगरी तालुक्यात दाजीपूर, राधानगरी आणि धामोड परिसरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून राधानगरी लक्ष्मी जलाशय परिसरात आज अखेर ६८५ मि. मी.ची नोंद झाली आहे. राधानगरी लक्ष्मी जलाशयाची पाण्याची पातळी साडे पाच फुटांनी वाढली आहे.

भुदरगडमध्ये मुसळधार पाऊस

गारगोटी: भुदरगड तालुक्यात आज दिवसभर उघडीप दिली. दिवसभर स्वच्छ वातावरण होते. पण सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वेदगंगा नदी पात्राबाहेर आली आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

पश्चिम पावसाचा जोर

शाहूवाडी: शाहूवाडीत आंबा, मलकापूर, करंजफेण या पश्चिमेकडील भागात मात्र काहीप्रमाणात पावसाचा जोर कायम आहे. सलग दोन तीन दिवस पाऊस सरी दमदार कोसळत राहिल्यामुळे शेत शिवारात पाणीचपाणी साचले आहे. दरम्यान तालुक्यात पडझड अथवा नुकसानीची कोणतीही घटना घडली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

पन्हाळ्यावर दुपारनंतर जोरदार

पन्हाळा: रविवारी आणि सोमवारी दुपारपर्यंत विसावलेल्या पावसाने दुपारनंतर पन्हाळा परिसरात पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली. सोमवारी सकाळ पर्यंतच्या २४ तासांत पन्हाळा तालुक्यात एकुण १३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोतोली येथे सर्वात जास्त ३२ मिमी., पन्हाळ्यात ३०मिमी. पावसाची नोंद झाली. पन्हाळ्यावर पावसाळी पर्यटकांचा ओघ कायम असून आजही पन्हाळा रस्त्याला चारचाकी वाहनांची अक्षरश: रीघ लागली होती.

दुपारपर्यंत पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. दोन दिवसापूर्वी सुरू झालेल्या ओढ्या ओघळांचे पाणी कमी झाले होते. पण दुपारी तीन नंतर पन्हाळ्यावर धुक्याने एकदम अंधारून आले. आणि थोड्यावेळाने मोठ्या पावसाला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणी चालकांकडून२८ कोटींची मागणी

$
0
0

छावणी चालकांकडून

२८ कोटींची मागणी

सोलापूर

जिल्ह्यात सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्यांवर मेअखेर ३० कोटी ७७ लाख १६ हजार १२४ रुपयांचा खर्च झाला आहे. यातील २ कोटी ६३ लाख ३२ हजार ५४९ रुपये छावणी चालकांना वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित २८ कोटी १३ लाख ८३ हजार ५७५ रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व पशूपालकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या जनावरांकरिता चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु छावणी सुरू करण्यासाठी जाचक अटी व निकष लावल्यामुळे कोणीही पुढे येईना. शेवटी मार्चमध्ये छावण्यांबाबतचा निर्णय होऊन प्रत्यक्षात एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात ५६, मंगळवेढा तालुक्यात ३५, करमाळा तालुक्यात ७ आणि बार्शी तालुक्यात १ अशा एकूण ९९ ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्या. यात जवळपास लहान मोठी मिळून ५८ हजार ७७४ जनावरे दाखल झाली. यासाठी २ कोटी ६३ लाख ३२ हजार ५४९ रुपये खर्च झाले आणि ही रक्कमही संबंधित चारा छावणी चालकांच्या बँक खात्यावर जमा केली. मे महिन्यात चारा टंचाईने गंभीर रुप धारण केल्याने छावण्यांची संख्या वाढवावी लागली. मे महिन्यात जवळपास १७४ ठिकाणी छावण्या सुरू झाल्या. यात सुमारे १ लाख ९६ हजाराच्या आसपास जनावरे दाखल झाली. याचा खर्च २८ कोटी १३ लाख ८३ हजार ५७५ इतका झाला असून, या रक्कमेची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. ही रक्कम प्राप्त होताच संबंधित चारा छावणीचालकांना वितरीत केली जाईल. तसेच जून महिन्यातही जवळपास छावण्या आणि जनावरांची संख्या मे महिन्या इतकीच असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील यांनी सांगितले.

.........

सोलापुरात तुरळक पाऊस

सोलापूर :

सोलापूर शहर आणि परिसरात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. हवेत गारवा ही जाणवत होता. दुपारी दोन वाजल्यानंतर मात्र पावसाला सुरुवात झाली. दुपारपासून सायंकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात तुरळक पाऊस सुरु होता. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावसाच्या पाण्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडत आहे. सिटी सर्व्ह, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, ग्राहक न्याय मंच तसेच ट्रेझरी शेजारील रस्त्यावर मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्या दलदलीतूनच ये-जा करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी ग्रंथदिंडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्या जिल्हा शाखेतर्फे शिवाजी विद्यापीठात सोमवारी ग्रंथदिंडी काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रग्रंथसह विविध पुस्तके ठेवून विद्यापीठ प्रांगणात फेरी काढण्यात आली. ग्रंथदिंडीनंतर शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व कुलसचिव विलास नांदवडेकर यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयी करण्यात आलेल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवसेनेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा शाखेतील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी विद्यापीठात एकत्र आले. भगवे झेंडे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीचे फलक हातात होते. फुलांनी सजवलेली पालखी व त्यात ठेवलेल्या पुस्तकांचे पूजन करण्यात आले. नंतर ग्रंथदिंडी विद्यापीठाच्या संपूर्ण प्रांगणात फिरवण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, 'मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी शिवसेनेने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मराठी संवर्धनाच्या समितीच्यावतीने मराठी भाषेचा इतिहास व संदर्भ याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे देण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकारला तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. याबाबत सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.'

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, 'देशात कन्नड बंगाली तमिळ यांसह काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिचे महत्त्व पाहता मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. मराठीतील साहित्य कला लोककला तमाशा भजन-कीर्तन शाहिरी यांची जोपासना होण्यासाठी अभिजात दर्जा विषयी विधेयक अमलात घेणे आवश्यक आहे. शासकीय जाहिरातींमध्ये मराठी भाषेला प्राधान्य मिळाले पाहिजे. दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे. तसेच न्यायालयासह प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेला प्राधान्य दिले पाहिजे .यासाठी सरकारने आश्वासक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.'

स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावे, शालेय स्तरावर मराठी भाषा सक्तीची करावी, मराठी भाषा सर्व व्यवहारात पहिल्या क्रमांकावर ठेवावी या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. शिवाजीराव जाधव ,सुजित चव्हाण, विराज पाटील, मंजीत माने, सुनीता हनिमनाळ ,दिनेश परमार, सिद्धी कोठारी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images