Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उद्योजकांना चाळीस टक्के बांधकाम सक्ती

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींतील मध्यम आणि लघु उद्योजकांसमोर आणखी एक नवे संकट आले आहे. मिळालेल्या भूखंडावर चाळीस टक्के बांधकाम न केल्यास उर्वरित भूखंड परत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. बांधकामाचे प्रमाण दहा टक्क्यावरून थेट चाळीस टक्के करण्याच्या या निर्णयाने मुळातच मंदीत असलेल्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. दोन वर्षांत बांधकाम करेपर्यंत विना वापर म्हणून कर भरावा लागणार असल्याने उद्योजकांची अवस्था 'दुष्काळात तेरावा महिना', अशी झाली आहे.

अलिकडे अनेक कारणांनी औद्योगिक क्षेत्रावर सध्या मंदीचे सावट आहे. इतर राज्यात कमी दरात मिळणारा कच्चा माल, तेथील सरकारकडून मिळणाऱ्या सवलती आणि महाराष्ट्रात वीज दरात झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य उद्योजक अडचणीत आहेत. यात मध्यम व लघु उद्योजकांची संख्या मोठी आहे. या परिस्थितीत रिकाम्या भूखंडावर बांधकाम करण्याचा आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिला आहे. विशेष म्हणजे 'सेझ' मधील मोठ्या उद्योजकांना यातून सूट दिली आहे.

भूखंडावर दहा टक्के बांधकाम करण्याची सक्ती आहे. पण नव्या नियमानुसार चाळीस टक्के बांधकामाचा आदेश देण्यात आला आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा कमी चटई क्षेत्राचा वापर असलेल्या भूखंडाचे येत्या वीस दिवसांत सर्वेक्षण करून संबंधित भूखंडधारकांना नोटीस देण्यात येणार आहे. बांधकामासाठी दोन वर्षांची मुदत दिली आहे. तोपर्यंत विना वापराबद्दलचा कर भरावा लागणार आहे. या काळात बांधकाम न केल्यास भूखंड परत घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. शिवाय यापुढे वाटप होणाऱ्या सर्व भूखंडांना किमान चाळीस टक्के एफएसआय बांधकाम करणे सक्तीचे केले आहे.

या निर्णयातून मोठे प्रकल्प वगळले आहेत. ज्यांनी शेकडो एकर जमीन घेऊन त्याचा वापर न करता ठेवले आहेत त्यांच्या जमिनी परत घेण्याऐवजी लघु उद्योजकांच्या जागेवर सरकारने डोळा ठेवला आहे. मंदीमुळे नव्या गुंतवणुकीसाठी पैसे नसताना दोन वर्षांत बांधकाम करण्याचा आदेश देणे अन्यायकारक असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'नवीन उद्योगांना जमीन मिळवून देण्याच्या गोंडस नावाखाली लघु उद्योजकांवर अन्याय केला जात आहे. यापेक्षा ज्यांनी अनेक वर्षापासून घेतलेल्या जमीनींचा वापरच केला नाही, त्यांच्या जमिनी परत घ्याव्यात.'

सरकारच्या या नव्या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व उद्योजकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन जुलै रोजी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुढाकाराने मुंबईत बैठक बोलावली आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे.

.. ...

बरेच उद्योजक जागा घेतल्यानंतर किरकोळ दिखाऊ बांधकाम करून भूखंड अडवून ठेवतात. यामुळे ज्यांना उद्योग उभारायचे आहेत त्यांना सरकार जागा देऊ शकत नाही. यामुळे या जागांचा वापर उद्योगवाढीसाठी व्हावा, यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

अविनाश सुभेदार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी

.. ..

वीजदरवाढ आणि उत्पादन खर्चातील वाढ तसेच स्पर्धांमुळे उद्योजकांची अवस्था बिकट झाली आहे. अशावेळी खुल्या भूखंडावर बांधकाम करण्याचा आदेश अन्यायकारक आहे. याविरोधात सरकार पातळीवर तातडीने पाठपुरावा करण्यात येईल.

ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

. .. . .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन वर्षांत सहा महापौर

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : पक्षीय निवडणुका झाल्या तर महापालिकेला शिस्त लागेल, नगरसेवकांच्या घोडेबाजाराला चाप लागून पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल ही राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा महानगरपालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोल ठरविली आहे. या सभागृहाला चार वर्षे पूर्ण होण्याआधीच सहा महापौर आणि गेल्या नऊ वर्षांत १३ महापौर करण्याची किमया आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. पदांची खांडोळी केल्याने कार्यकर्त्यांचे समाधान झाले तरी शहराच्या विकासाला मात्र खीळ बसली आहे.

'ना साडेतीन महिन्याचा महापौर', 'ना पदांची खांडोळी' अशा वल्गना करत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेत सत्ता काबीज केली. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत पदांच्या वाटणीचा सिलसिला कायम आहे. वर्षात दोन महापौर, उपमहापौर यामुळे महापालिकेत पदाधिकारी उदंड, मात्र शहर विकासाचे तीनतेरा अशी स्थिती बनली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सत्तास्थापनेपासून म्हणजे २०१० पासून आजअखेर गेल्या नऊ वर्षांत तेरा महापौर आणि दहा स्थायी समिती सभापती झाले.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे महापालिकेची सत्ता असताना तीन महिन्यांपर्यंत महापौरपदाची अधोगती झाली होती. त्यावर प्रचंड टीका झाली मात्र, त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. पक्षीय लेबल न घेता लढायचे आणि पदाधिकारी निवडीवेळी घोडेबाजार करायचा असा काहींसा प्रकार महापालिकेत सुरू होता. याची शहराला उबग आली होती. याला लगाम घालायचा म्हणून माजी मंत्री विनय कोरे यांनी महापालिकेत रस घेतला मात्र, त्यांचेही हात पोळल्याने त्यांनी महापालिकेच्या राजकारणातून अंग काढून घेतले. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आघाडी करून महापालिकेच्या राजकारणात बस्तान बसविलेले आमदार हसन मुश्रीफ यांच्या आघाडीनेही महाडिक यांच्या राजकारणाचा कित्ता गिरविला आहे. महापालिकेतील कारभारावर आणि पदांची खांडोळी करण्याच्या प्रवृत्तीवर टीका करत मुश्रीफ आणि पाटील यांनी महापालिका जिंकली. पण अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्याच्या नावाखाली महापौर आणि स्थायी समिती सभापतिपदाची वाटणी केली.

महाडिक यांच्या 'साडेतीन महिन्याचा महापौर' या नीतीची खिल्ली उडवत वातावरण तयार केल्यानंतर २०१० मधील महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने सत्ता मिळवली. निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून शहर विकासाच्या संकल्पना, पदांच्या वाटण्यांना फाटा, राखीव जागेवरील आरक्षण हटविणार नाही, अशी आश्वासने शहरवासियांना दिली. मात्र कालांतराने पक्षांतर्गत धुसफूस, नगरसेवकांतील सत्ता स्पर्धा यामुळे महापौर आणि स्थायी समिती सभापती पदाच्या वाटण्या झाल्या आणि महाडिक यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे.

\Bशब्द दिला, अपेक्षा उंचावल्या

\Bमहापालिका निवडणुकीत उमेदवारांची जुळवाजुळव करताना नेत्यांनी प्रत्येकाला शब्द दिला आहे. कुणाला महापौर, कुणाला स्थायी समिती सभापती यामुळे पक्ष निष्ठा, पक्षीय धोरणांशी कसलेही संबंध नसलेल्यांनी पक्षात प्रवेश केला. आता प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या. सत्ताधारी दोन्ही काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांना पक्षात घट्ट बांधून ठेवण्यासाठी नेत्यांनी सहा महिन्यांचा महापौर आणि वर्षभराच्या सभापतिपदाची टूम काढली. एरव्ही राजकीय साधनसुचितेचा गप्पा मारणारे भाजपची नेते मंडळी सत्तेसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत. ताराराणी आघाडीच्या सोबतीने भाजपने महापौर आणि स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या फोडाफोडीचे राजकारण केले. पक्षीय राजकारणामुळे महापालिका राजकारणाला शिस्त लागेल ही आशा फोल ठरली आहे.

\Bकामगिरीपेक्षा पदातच धन्यता

\Bसहा आणि वर्षभराचा कालावधी मिळत असल्यामुळे नगरसेवकांना महापौर आणि सभापती म्हणून प्रभावी कामगिरी करण्यात अडचणी येत आहेत. गेल्या दहा वर्षांतील काही पदाधिकाऱ्यांचे अपवाद वगळता इतरांची शहर विकासात भर घालणारी कामगिरी काय हे तपासले तर हाती शून्य लागेल. गेल्या सभागृहात एका महिला सदस्याचा चार महिन्यांत महापौरपदावरुन पायउतार व्हावे लागले. तर आमदार मुश्रीफ यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला एक वर्षांचा कालावधी मिळाला. त्यामुळे पद मिळविणे एवढे एकमेव ध्येय नगरसेवकांचे असल्यासारखी परिस्थिती आहे. काही पदाधिकाऱ्यांनी टोल विरोधी आंदोलन, शिवाजी पुलासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग दाखविला. पण त्या पलीकडे शहर विकासाच्या नवीन संकल्पना, चालू स्थितीतील प्रकल्प पूर्णत्वासाठी ठोस भूमिका याविषयी पदाधिकाऱ्यांच्या पातळीवर कृतीशून्यता आहे.

नेत्यांची सोयीची भूमिका

पदांच्या खांडोळीत ठरलेल्या वेळी राजीनामा द्यायचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार बहुतांश पदाधिकाऱ्यांनी इमानेइतबारे ठरलेल्या वेळी राजीनामे दिले. मात्र, याला अपवाद ठरला तो आदिल फरास आणि त्यांच्या आई हसीना फरास यांचा. आदिल फरास हे आमदार हसन मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते. त्यामुळे मागील वेळी स्थायी समिती सभापती असताना त्यांनी मुदतीत राजीनामा दिला नाही. मात्र, त्याबद्दल राष्ट्रवादीत फारसे कुणी उघड बोलले नाही. या दुसऱ्या सभागृहात आदिल यांच्या आई हसीना फरास महापौर झाल्यानंतर त्यांना सहा महिन्याऐवजी वर्षभराचा कालावधी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत खदखद होती. आमदार सतेज पाटील यांनी शारंगधर देशमुख यांना २०१२-१३ या काळात स्थायी सभापतिपदावर संधी दिली होती, त्यानंतर पुन्हा या सभागृहात झुकते माप देत पुन्हा सभापती केले. या प्रकाराची आत्ता उघड चर्चा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किसान सन्मान’साठी३७ हजार नव्याने अर्ज

$
0
0

कोल्हापूर : केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील विशेष मोहिमेच्या रविवारी अंतिम दिवसअखेर ३७ हजार ३१२ शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज दाखल झाले. महसूल प्रशासनाकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. यामुळे अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठीशी संपर्क साधावा, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. मोहिमेचा रविवारी शेवटचा दिवस होता. तालुकानिहाय अर्जांची संख्या अशी : आजरा १५१८, गगनबावडा ७७४, भुदरगड १६०३, चंदगड २७३१, गडहिंग्लज ३४९६, हातकणंगले ६७००, कागल २०३४, करवीर ५३७९, पन्हाळा ४२५१, राधानगरी २१९३, शाहूवाडी ३५९४, शिरोळ २८३९.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिले राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन होणार मंगळवेढ्यात

$
0
0

पहिले राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन होणार मंगळवेढ्यात

सोलापूर :

मसाप शाखा दामाजीनगर, अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा मंगळवेढा व सुरसंगम ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवेढा येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बाबत नुकतीच एक बैठक मसाप शाखा दामाजीनगरच्या कार्यालयात माजी सभापती अ‍ॅड. नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संमेलनाचे नियोजन करण्यात आले आहे. तीन ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय निमंत्रित महिलांचे साहित्य संमेलन होणार असून, चार ऑगस्ट रोजी पुरुष व महिला यांचे राज्यस्तरीय संगीत संमेलन होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनात मंगळवेढ्यातील इतर स्वयंसेवी संस्थांना देखील सहभागी करून घेण्यात येणार आहे. या बैठकीस मसाप शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अशपाक काझी, बालाजी शिंदे, दामाजीनगरचे उपसरपंच अ‍ॅड. दत्तात्रय तोडकरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या

$
0
0

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या याद्या

पंधरा दिवसांत होणार पूर्ण

डॉ. भारत पाटणकर यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या परिपूर्तीचा टप्पा आता सुरू झाला आहे. कोयना धरणग्रस्तांना सांगली जिल्ह्यातील टेंभू प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमिनी देण्यात येत आहेत. त्यासाठी ज्या धरणग्रस्तांना अजिबात पर्यायी जमीन वाटप अद्याप झालेले नाही, त्यांना प्राधान्याने जमीन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी संबधित खातेदारांच्या याद्या बनविण्यात येत आहेत. पंधरा जुलैपर्यंत जमीन वाटपासाठी याद्या पूर्ण होतील, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी येथे दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

टेंभूच्या लाभ क्षेत्रातील जमिनी कोयना धरणग्रस्तांना द्यायचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला होता. या पार्श्वभूमीवर ४ जुलै रोजी सांगली जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक होत असून, या बैठकीत जमीन पसंतीचा कार्यक्रम ठरणार आहे. त्या नंतर प्रत्यक्ष धरणग्रस्तांच्या गाव समितीची जमीन पसंतीची तारखेची मागणी, सर्व गाव समितींच्या जमीन मागण्यांचे अर्ज व पत्र चार जुलैच्या सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठकीत देण्यात येणार आहेत. ज्या खातेदारांना अजिबातच जमिनी देण्यात आल्या नाहीत, त्या खातेदारांना जमिनी देण्यात येत आहेत. ज्या कोयना धरणाच्या पाण्यामुळे बागायती जमिनी झाल्या आहेत. त्याच पाण्याने भिजणारी जमीन देण्यात येत आहे. कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसमवेत पहिली व दुसरी बैठक झाली होती. त्या नुसार मागण्यांच्या अंमलबजावणीचा पूर्तीचा कार्यक्रम सुरू होत आहे, असेही पाटणकर म्हणाले.

..........

सवादेत काका-बाबा गटाची सत्ता कायम

कराड :

सवादे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीवर माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली आहे. ग्रामपंचायतीच्या सहा जागांसाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली, त्यामध्ये बाबा-काका गटाला चार जागा मिळाल्या तर विरोधी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायतीच्या सन २०१५मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंच व दोन सदस्य निवडून आले होते.

साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर नाट्यमय वळणावर उंडाळकर व भोसले गटाची आघाडी संपुष्टात आली. त्या वेळी बाबा व काका गट एकत्र होऊन अतुल भोसले समर्थक उपसरपंचांवर अविश्वास ठराव आणला. पण प्रशासनाने ७-० ने ठराव पारीत असताना ही जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात उपसरपंचांच्या बाजूने निकाल दिला. या वरून बाबा व उंडाळकर गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाच्या निषेधार्थ आपल्या सदस्यपदांचा राजीनामा दिला. त्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यामध्ये बाबा-काका गटाला ४ व भोसले गटाला २ जागा मिळाल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सत्ता समीकरणात बाबा-काका गटाकडे सरपंचासह ५ जागा व भोसले गटाकडे उपसरपंचासह चार जागा आहेत. संख्यात्मक बलाबल पाहता बाबा व काका गटाची सत्ता कायम राहिली आहे.

...........

कराड दक्षिणमधील

विकासकामांसाठी १३ कोटी

कराड :

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून अर्थसंकल्पात १३ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिणमधील दळणवळण व्यवस्था आणखी गतिमान होणार असून, ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी डॉ. भोसले सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या बाबत त्यांच्यामार्फत दाखल झालेल्या प्रस्तावांची आणि मागण्यांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सदर विकासकामांच्या पूर्ततेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. या निधीच्या माध्यमातून कराड-चचेगाव, रयत कारखाना-जिल्हा हद्द, येवती-भुरभुशी-जिल्हा हद्द, येणके-कोळे, सुपने-किरपे आणि आणे-अंबवडे, राष्ट्रीय महामार्ग-कालवडे, शेणोली स्टेशन-शिरसगाव, येवती-पाटीलवाडी, गोंदी फाटा-रेठरे बुद्रुक आणि खुबी-कृष्णा कारखाना या मार्गांचे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.

........

जयवंत शुगर्सकडून २५६ रुपयांचा तिसरा हप्ता

कराड :

धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने सन २०१८-१९ या हंगाम काळात गळितास आलेल्या उसासाठी २५६ रुपयांचा तिसरा हप्ता शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग केला असल्याची माहिती जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

जयवंत शुगर्स सातारा जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना ठरला असून, कारखान्याने आतापर्यंतची एकूण एफआरपी २९५६ रुपये शेतकरी सभासदांना दिलेली आहे. तसेच कारखान्याचा गेल्या हंगामातील सरासरी साखर उतारा १३.०२ टक्के राहिला असून, तोही जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा ठरला आहे. जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. जयवंत शुगर्सने या पूर्वी एफआरपीच्या एकूण रक्कमेपैकी २४०० रुपयांची पहिली;तर ३०० रुपयांची दुसरी उचल शेतकरी सभासदांना अदा केली होती. त्या नंतरचा २५६ रुपयांचा हा तिसरा हप्ता देण्यात आला आहे. हंगामात कारखान्याने एकूण ६ लाख ४१ हजार ९७९ मेट्रीक टन ऊस गाळप केले आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धामना, जुई, केळणा नद्यांना पूर

$
0
0

भोकरदन, जाफराबाद,बदनापूर तालुक्यात दमदार पाऊस

म. टा. प्रतिनिधी, जालना

उशीरा पडत असलेल्या पावसाने जालना जिल्ह्यातील सगळ्या भागात समाधानकारक वातावरण निर्माण केले आहे. शनिवारी रात्री व रविवारी झालेल्या पावसाने भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यातील धामना, जुई, केळणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा तालुक्यात दमदार हजेरी झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

जालना जिल्ह्यात सगळ्या भागात पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मान्सूनच्या आगमनाची यंदाच्या वर्षी खूप मोठी वाट बघावी लागली. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. जून महिन्याच्या अखेरीस गुरुवारपासून पाऊस सुरू झाला आहे. भोकरदन, जाफराबाद वगळता जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यात भीज पाऊस होतोय. त्यामुळे तापलेल्या जमिनीची धूप संपली आहे. भोकरदन ते धावडा, सिल्लोड, बुलढाणा, जाफराबाद तालुक्यात विदर्भाच्या सीमेवर जोरदार पाऊस झाला. भोकरदन ते राजूर महागणपती या भागात तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे.

भोकरदन तालुक्यातील जुई धरणात १२ फुट पाणी साठा झाला आहे. हे धरण शंभर टक्के कोरडे पडले होते. तालुक्यातील धामना, केळणा, पदुमावती, रायघोळ या सगळ्या नदीच्या पात्रातून दुथडी भरून पाणी चालले आहे. या नद्या जाफराबाद तालुक्यात पूर्णेला मिळत असल्याने खडकपूर्णा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. भोकरदन जाफराबाद तालुक्यात केळणा नदी गेल्या चार वर्षांपासून कोरडीठाक पडली होती. आता थेट चार वर्षानंतर या नदीच्या पात्रात काठोकाठ पाणी दिसते आहे. हे पाणी बघण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी या पाण्याचे पूजन केले. तालुक्यातील सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे. सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे. भोकरदन, जाफराबाद तालुक्यात जनावरांच्या छावण्या नव्हत्या. जाफराबाद तालुक्यातील देऊळगांव उगले, देऊळगांव झरी, मंगरूळ, सिपोरा, पिपंळखुटा या सगळ्या भागात मिरचीची मोठी लागवड करण्यात आली आहे.

परतूर, मंठा तालुक्यात शुक्रवारी रात्री पासून चांगला पाऊस पडला आहे. तालुक्यात कापूस आणि त्यानंतर सोयाबीन पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, कोणत्याही धरणात पाणी साठा वाढला नाही. घनसावंगी आणि अंबड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामात पाणी साचले असून तालुक्यातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

भोकरदन, बदनापूर जाफराबाद तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात जनावरे कवडीमोड किंमतीत साधारणपणे चाळीस हजार रुपयांत बैलजोडी विकली. आता तीच जनावरे ऐंशी हजार रुपयांत बाजारात घेण्याची वेळ आली आहे. याचे कारण या सगळ्या भागात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या.

प्रभाकर सुसर, शेतकरी सामखेडा, ता. जाफराबाद.

खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहराच्या पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या पाइपलाइनचे काम जाफराबादपर्यंत आले आहे. तिथे गेल्या चार महिन्यांपासून काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान भाजपचे मंत्री बाळासाहेब विखे यांच्या संस्थेचे २५ टॅँकर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा करत आहेत.

तालुका २४ तासांतील पाऊस. .........एकूण पाऊस

जालना. ......१३.२५....... ....६२.८४

बदनापूर. ..८.४० ...........८४.४०

भोकरदन. १६.८८ ......१३६.५२

जाफ्रराबाद १५.४०.........७१.००

परतूर. १३.६०............९३.२७

मंठा. १५.७५ ....८४.७५

अंबड....४.५७....८२.२५

घनसावंगी. .११.८६ ....७७.२८

फोटो ओळी..

भोकरदन तालुक्यातील धामना नदी दुथडी भरून पाणी वाहत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. लाखे- पाटील यांचा काँग्रेसचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,जालना

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशिवाय विखे, आमदार अब्दुल सत्तार यांच्या गटामध्ये विभागलेली महाराष्ट्रातील काँग्रेस संघटना मुक्त झाल्याशिवाय पक्षाला चांगले दिवस येणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करून जालन्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी काँग्रेसच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवाला जबाबदार असलेले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना तातडीने बाजूला काढले पाहिजे. चव्हाण यांना महाराष्ट्रातील सर्वमान्य जनता त्यांचे स्वप्न, प्रश्नांबाबत यांना काहीही सोयरसुतक नाही. शेतकरी, युवक, दुष्काळ, पिकविमा, बँक, सिंचन विकास, मराठा- धनगर- मुस्लीम आरक्षणासह दलित- आदिवासींच्या प्रश्नांबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून तळागाळातील जनतेचे प्रश्न समजवून घेऊन त्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची त्यांची कोणतीही तयारी नसल्याचा आरोप डॉ. लाखे पाटील यांनी केला आहे.

जायकवाडीत समन्यायी कायद्यानुसार पाणी येऊ न देणे, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देणे, तेलंगणाला अतिरिक्त पाणी देऊन कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देता येणार नाही. या सिंचन मंत्र्यांच्या विधानसभेतील अन्यायाविरोधात आवाज उठवून मराठवाड्याच्या हिताला आणि प्रत्यक्ष शंकरराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाला व स्वप्नांना सुरुंग लावणाऱ्या निर्णयाविरोधात आवाज प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी उठविला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यावसायाचा पर्दाफाश

$
0
0

कराड :

वारणा हॉटेलवर पोलिसानी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांसह आणखी दोघांना ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत हॉटेल मालकासह मॅनेजर ,रूमबॉय व एक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मालक बिलाल पठाण, मॅनेजर प्रमोद नंदकुमार सातपुते, रूमबॉय विनायक ज्ञानदेव पाटोळे व एक महिलेवर गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. शहराला लागूनच असलेल्या मलकापूर येथील वारणा हॉटेलमध्ये एका महिलेने वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन महिलांना आणले असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफाळा भरण्यास झुंबड

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने मिळकतदारांना घरफाळा जमा करण्यासाठी दिलेल्या सवलत योजनाला लाभ घेण्यासाठी शहरवासियांची रविवारी नागरी सुविधा केंद्रात झुंबड उडाली. सवलतीच्या अखरेच्या दिवशी १,५०५ मिळकदारांनी घरफाळ्यापोटी ७८ लाख, ५२ हजार रुपये तिजोरीत जमा केले. सवलत योजना लागू झाल्यापासून ३८ हजार, ७१३ मिळकतदरांनी १७ कोटी, ३८ लाखाचा घरफाळा जमा करून योजनेला प्रतिसाद दिला. नागरिकांना योजनेतून ७८ लाख ५५ हजाराची सवलत मिळाली.

शहरातील मिळकतींना लागू असलेला घरफाळा जमा करण्यासाठी शहरवासीय आर्थिक वर्षाच्या शेवटी नागरी सुविधा केंद्रामध्ये गर्दी करतात. अनेकदा वेळेत घरफाळा न भरल्याने थकीत जाण्याचेही प्रमाण वाढते. हे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर घरफाळ्यामध्ये सूट देणारी सवलत योजना सुरू केली. त्याचा फायदा दरवर्षी शहरातील मिळकदार घेत आहेत.

एक एप्रिल पासून ३० जूनपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्या मिळकदारांना घरफाळ्याच्या सहा टक्के सवलत दिली जाते. सवलत योजनेद्वारे तीन महिन्यांत १७ कोटी, ३८ लाखाचा घरफाळा जमा झाला. योजनेतील अखेऱ्या आठवड्यात घरफाळा जमा करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रावर मोठी गर्दी केली होती. शहरवासियांचा मिळणारा प्रतिसाद पाहून प्रशासनाने सुट्टीदिवशीही केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

परिणामी रविवार असूनही घरफाळा जमा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर मिळकदरांची झुंबड उडाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत १,५०५ मिळकतदरांनी ७८ लाख, ५२ हजाराचा घरफाळा जमा केला. घरफाळा जमा करण्यासाठी सर्वच सुविधा केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तर काही मिळकदरांनी ऑनलाइनद्वारे घरफाळा जमा केला. ऑनलाइनद्वारे घरफाळ्यापोटी आठ लाख, ७५ हजार रुपये जमा झाले. तर तीन महिन्यांत ३८ हजार मिळकतदारांनी १७ कोटी, ३८ लाखांचा घरफाळा जमा केला. घरफाळा जमा करण्यासाठी सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने अनेकपातळीवर संपर्क मोहीम राबवली होती. अखेरच्या दिवसी कमर्शिअल मिळकदारांना फोनद्वारे घरफाळा जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग व मेडिकल कॉलेजने १२ लाख, १५ हजार, ७८० रुपयाचा घरफाळा जमा केला.

सप्टेंबरअखेर चार टक्के सवलत

सवलत योजनेतंर्गत घरफाळा जमा करण्याचा शेवटच्या दिवशी कावळा नाका येथील नागरी सुविधा केंद्रात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट देवून कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. 'सप्टेंबरअखेर मिळकतदारांना एकूण घरफाळ्याच्या चार टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळकतदारांनी घ्यावा.' असे आवाहन त्यांनी केले.

ऑनलाइनला चांगला प्रतिसाद

नोटाबंदी निर्णयानंतर सर्वच क्षेत्रात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार प्रशासनाने मिळकतदारांना घरबसल्या घरफाळा जमा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली. या सुविधाचा मिळकतदारांनी लाभ घेत तब्बल एक कोटी ६६ लाखाचा घरफाळा जमा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणक्षेत्रात धुवाँधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धरणक्षेत्रात झालेल्या धुवाँधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ओढे, नाले वाहू लागले असून नदी पाणी पातळीतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी चोवीस तासात सहा फुटांनी वाढली आहे. जिल्ह्यातील आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर - गारगोटी तसेच गडहिंग्लज- चंदगड रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. राधानगरी सोळांकूर रस्त्यावर दोन ठिकाणी कोसळलेल्या दरडी हटवण्यात आल्या.

यंदा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने आता दमदार एंट्री केली आहे. जिल्ह्यात शनिवारपाठोपाठ रविवारीही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात दुपारनंतर पावसाने काही काळ उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु होता. रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत घटप्रभा (ता. चंदगड) धरणक्षेत्रात सर्वाधिक २६५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. याच तालुक्यातील जांबरे धरणक्षेत्रात १८५, जंगमहट्टी धरणक्षेत्रात १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटगाव धरणक्षेत्राला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून त्या ठिकाणी १९५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी तालुक्यात दूधगंगा, राधानगरी, तुळशी ही तीन धरणे आहेत. तुळशी धरणक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने २१० मिली मीटर पाऊस पडला आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १३७ तर दूधगंगा धरण क्षेत्रात ९० मिली मीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यातील कुंभी धरणक्षेत्रात १५९, कोदे धरणक्षेत्रात १७४ मिली मीटर पाऊस पडला आहे. शाहूवाडी तालुक्यातही पावसाने चांगलाच दणका दिला आहे. कासारी धरणक्षेत्रात १६० तर कडवी धरणक्षेत्रात १०० मिली मीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक कमी पाऊस चित्री धरणक्षेत्रात ५५ मिली मीटर पडला.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणवर आज शेतकऱ्यांचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषिपंपासाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १) महावितरणवर मोर्चा काढण्यात येणार आहे. इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता दसरा चौक येथून मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक ते ताराबाई पार्क येथील महावितरणचे कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंपधारक वीज ग्राहकांची बिले तपासून, दुरुस्त करून द्यावीत. वीज बिले दुरुस्त केल्यानंतर अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषी संजीवनी योजना राबवावी. नोव्हेंबर २०१६ पासून दरवर्षी होणारी दरवाढ कमी करून १ रुपया १६ पैसे युनिट या दराने मार्च २०२३ पर्यंत वीजदर कायम करावा. त्यासाठी आवश्यक १३४ कोटी इतकी रक्कम कृषिपंपाच्या वीज बिलापोटी राज्य सरकारने महावितरणला अनुदान स्वरुपात द्यावे, या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनात वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील यांचा सहभाग असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठोसेघर खळाळू लागला

$
0
0

ठोसेघर खळाळू लागला

सातारा :

गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने या परिसरातील ओढे नाले खळाळू लागले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा ठोसेघर धबधबाही फेसाळला आहे. या बरोबरच वजराई-भांबवली, केळवली-सांडवली धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा पावसाने उशीरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यामुळे शेतीची कामे थोडी उशीरा सुरू झाली गेल्या ते पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडल्याने पश्चिमेकडे हिरवाई पसरली आहे. ओढे नाले वाहू लागले आहेत. कासच्या पाणीपातळीत पंधरा फुटांनी वाढ झाली असून, ठोसेघर पठारावरील तलावांतील पाणी पातळी वाढू लागली आहे. ठोसेघर धबधबा परिसरात पावसाळी पर्यटकांसाठी धबधब्या बरोबरच गुहा बनवण्यात आली आहे. परिसरातील सुशोभिकरण करण्यात आले आहे. भांबवली-वजराई देवीची पर्यटनासाठी येणारी पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता बनविण्यात आला असून, सोयी-सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.

..........

गांधीं विचारांना मरण नाही

सातारा :

'सत्य, अहिंसा, विश्वासार्हता, प्रेम, सत्य, चांगुलपणा ही मूल्ये समाजात जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत महात्मा गांधींना मरण नाही,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत व शेतकऱ्यांचे नेते चंद्रकांत वानखेडे यांनी सातारा येथील मुक्तांगण येथे बोलताना व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त सातारा शहर काँग्रेस कमिटीने आयोजित गांधी विचार जागर व्याख्यानमालेतील ८ वे पुष्प गुंफतांना गांधी मरत का नाही? या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.

या वेळी विचारमंचावर सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भारती, प्रा. दत्ताजीराव जाधव, शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या तावडीत जोपर्यंत राम होता, तोपर्यंत तो हिंसक बनला नाही. मात्र इतरांच्या तावडीत राम गेल्यानंतर तो हिंसक बनला आहे. राम, गाय ही प्रतिके जोपर्यत गांधींकडे होती, तोपर्यंत ती हिंसक नव्हती. महात्मा गांधी राम मानतात पण सेवाग्राममध्ये रामाची मूर्ती नाही, राम मंदिर नाही. शहिद भगतसिंग यांची फाशी रद्द व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी सात वेळा लेखी पत्र दिल्याचा पुरावा आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या व्यक्तींनी काय केले? हा प्रश्न उरतोच, असेही वानखेडे म्हणाले.

.........

साताऱ्यात जोरदार पाऊस

सातारा :

सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील पाटण, जावली महाबळेश्‍वर व वाई तालुक्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडला. सातारा शहरातही दिवसभर संततधार सुरू होती. महाबळेश्‍वर तालुक्यात पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले तर घरांच्या, शेतातील ताली वाहून गेल्या. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. ७ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होणे अपेक्षित असताना मात्र तब्बल २८ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी राजा मान्सूनच्या आगमनाने सुखावला आहे.

संततधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. खरीप हंगामातील सर्वच पेरण्यांना आता वेग येणार आहे. काही ठिकाणी भाताच्या पेरणीबरोबरच भुईमूग, सोयाबीन, चवळी, दारकू, पावटा, नाचणी, वरी, कारळा व अन्य कडधान्ये यांची पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पावसाने खऱ्याअर्थाने सुरुवात केली असून, दिवसभर पावसाची जोरदार रिपरिप सुरू होती. त्यामुळे नद्या, नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल खचल्याचा व्हिडिओ व्हायरल

$
0
0

भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथील पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पर्यायी वाहतुकीसाठी पुलाला लागूनच रस्ता होता तो वाहून गेल्याचे माहिती समोर आली आहे. या पुलावरून चारचाकी गाडी जात असताना हा पुल खचला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाहन चालकाने गाडीचा वेग वाढवत गाडी जोरात चालवल्याने चालकासह गाडीत असलेल्या प्रवाशांचा सुदैवाने जीव वाचल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिन्यांच्या कामांत अनागोंदी

$
0
0

जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा घराचा आहेर

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामाचा बृहतआराखडा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आलेला नाही. या सगळ्या कामाची कोणत्याही प्रकारची माहिती नगरसेवकांना देण्यात आलेली नाही. हे कंत्राट ९.९२ टक्के वाढीव दराने कोणाच्या परवानगीने देण्यात आले आहे, याचा खुलासा केला जात नाही. सगळ्या गोष्टी परस्पर चाललेल्या आहेत, असा सनसनाटी आरोप नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला. पावसाळा सुरू झाला असून शहरातील जलसंकट अधिकच गंभीर होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामांची तक्रार करून पालिकेला हा घरचाच आहेर दिला.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात निर्माण झालेल्या गंभीर जलसंकटाची सगळी माहिती घेतली असता अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीची मुदत केव्हांच संपलेली त्यांना आढळून आली. शहरातील विविध भागात अंथरण्यात आलेले पाइप प्रकल्प आराखड्यानुसार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. तातडीने संबंधित कंत्राटदाराला पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात यावी, असे पालिकेच्या प्रशासनाला दोन महिन्यापूर्वी सूचना दिल्या आहेत. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी पालिकेच्या वतीने करण्यात आलेली नाही. उलट संबंधित कंत्राटदाराला पालिकेच्या वतीने ९६ कोटी रुपयांची देयके देण्यात आली आहे.

उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंत्राटदार कंपनीच्या कोणत्याही कामावर पालिकेच्या वतीने नियंत्रण नाही. टेंडर किमंतीच्या ९.९२ टक्के वाढीव दराने वर्कऑर्डर कोणाला विचारून देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या वाढीव थराला मान्यता दिली आहे काय आणि कोणत्या आधारावर याचे पालिकेच्या वतीने स्पष्टीकरण कोणीही देत नाही.

कंत्राटदार कंपनी शहरातील विविध भागात पाइप आणून टाकून देत आहे आणि त्यावरच पंच्याहत्तर टक्के बिल उचलून घेत आहे. त्यानंतर काही नगर परिषदेच्या राजकारणात बाहूबली झालेल्या खासगी गुत्तेदारांना रस्ता खोदून पाइपलाइन अंथरण्याच्या कामात हिस्सा देऊन सगळी बिले उचलण्याचा गोरख धंदा राजरोसपणे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. स्थानिक गुत्तेदारांच्या दबावाखाली पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आलेले आहेत. मात्र, यामुळे जालना शहरातील नागरिकांचे कायमस्वरूपी नुकसान होत आहे असा आरोप राजेश राऊत यांनी केला आहे.

अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामाची हायड्रोलिक चाचणी अद्याप कोठेही झालेली नाही. हा अत्यंत महत्त्वाचा गंभीर मुद्दा आहे. पाइपलाइन जमिनीवर अनेक ठिकाणी सहा इंच अंतरावररून टाकण्यात आली आहे. त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचा थर देण्यात आलेला नाही, असे यावेळी तक्रारीत राऊत यांनी म्हटले आहे.

अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामांच्या संदर्भात तक्रार असेल तर लेखी स्वरुपात द्यावी. ज्याठिकाणी पाइपलाइन अंथरण्याच्या कामात रस्ता खोदण्याचे काम करण्यात आले आणि त्यानंतर तो रस्ता पूर्वीसारखा करून देण्यात आला नसेल तर त्याची तक्रार करावी. ते काम पूर्ण करून घेण्यात येईल.

- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी.

व्यापार उद्योगात मग्न असलेले जालन्यातील प्रभावी नागरिक पाणी टंचाईवर अजिबात बोलत नाहीत. टॅँकरवर लाखो रुपये खर्च करतात. कोणत्याही राजकीय नेत्याला दुखवायचे नाही आपला कामधंदा महत्त्वाचा समजणारे असल्याने सामान्य माणूस भरडला जातो आहे.

- चंद्रकांत गायकवाड, कन्हैयानगर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 0


२८ मंदिरांचा समावेश क वर्गात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील २८ मंदिरांना दरवर्षी लाखावर भाविक भेट देतात. त्यांना सरकारने नुकताच 'क' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा दिला आहे. यामध्ये सर्वाधिक मंदिरे कागल तालुक्यातील आहेत. 'क' वर्ग मान्यता मिळाल्याने सेवा, सुविधांसाठी सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग खुला झाला. आवश्यकतेनुसार या मंदिरांना एक कोटीपर्यंत आणि त्यावरही निधी उपलब्ध होऊ शकतो. यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.

पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी मंदिरनिहाय भाविकांच्या संख्येचा सर्व्हे केला जातो. एक लाखावर भाविक दर्शनासाठी येणाऱ्या मंदिरांचा समावेश 'क' वर्ग यात्रास्थळामध्ये होतो. अशा ४७८ मंदिरांना आतापर्यंत 'क' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळाला आहे.

नव्याने 'क' वर्गाचा दर्जा मिळालेल्या मंदिरांची तालुकानिहाय नावे : आजरा : श्री रवळनाथ, अमृतेश्वर बसवान्ना (निंगुडगे), भैरवनाथ (व्हन्याळी) भुदरगड : बाटम (वासनोली), त्रिपुरेश्वर (पाचवडे), जोतीर्लिंग (मडूर), गडहिंग्लज : बसवेश्वर (हिटणी), कलेश्वर (कौलगे), हनुमान (कडगाव), नारायण (करंबळी), हातकणंगले : सिद्धोबा (हेरले), हनुमान (कोरोची), करवीर : विठ्ठल, मारूती (निगवे, दुमाला), नागनाथ (वडगाव), कागल : मरिआई बिरदेव (करनूर), हनुमान (वाळवे), महादेव, हनुमान (पिराचीवाडी), चिमाकाईदेवी (चिमगांव), भावेश्वरी (करंजिवणे), चौडेश्वरी(हळदी), अंबाबाई (बानगे), पन्हाळा : जोतिर्लिंग (घरपण), राधानगरी : खुळोबा (बुजवडे), अंबाबाई (आमजाई व्हरवडे), राधानगरी : नागेश्वर (राशिवडे बुद्रुक).

-- --

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखिल भारतीय नौजवान सभेचे निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उच्च पदवीधारक उमेदवारांनी पवित्र पोर्टलमध्ये भरलेली माहिती दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय नौजवान सभेने शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.

प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे उमेदवारांना फटका बसत आहे. सीमाभागातील असंख्य गावातील उमेदवारांना त्याचा फटका बसला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. निवेदनात ड्राफ्ट कॉपी सर्टिफाय करुन मिळावी, सर्व प्रकारच्या चुका सर्व उमेदवारांना दुरुस्त करुन मिळाव्यात, विषय आणि माध्यमांचा घोळ दुरुस्त करावा, यांसह आठ मागण्या केल्या आहेत. शिष्टमंडळात गिरीश फोंडे, जावेद तांबोळी, सूरज पठाण, संतोष पोवार, नीलेश शिंदे, दत्तात्रय कमलाकर, गिरीश कोळी, नानासो पाटील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी मूकबधिरांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी नोकरीतील मूकबधिरांचा अनुशेष भरावा, जिल्हा नियोजन समितीमधून कर्णबधिरत्व तपासणी यंत्र उपलब्ध करावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील मूक, कर्णबधीर असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. केवळ हातवारे करत शांतपणे उपोषणकर्त्यांनी मागण्या मांडल्या. नेहमीपेक्षा वेगळे उपोषण असल्याने अनेकजण त्याकडे कुतूहलाने पाहत राहिले. मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनातून, पंच्याहत्तर, शंभर टक्के मूकबधिरत्व आहे, त्यांनाच सरकारी नोकरीत प्राधान्य द्यावे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील ३ टक्के निधी दिव्यांग योजनांवर खर्च करावा. मूक, कर्णबधिराची तपासणी करताना डॉक्टरांनी त्यांना कळेल, अशा भाषेत लिहून सांगावे. प्रमाणपत्र देताना मनमानीपणे पैसे घेऊ नयेत. सरकारच्या आदेशानुसार वाहन चालवण्याचा परवाना विनाअट देण्यात यावा. प्रत्येक महिन्यास ६०० ऐवजी ३ हजार पेन्शनवाढ करावी. उत्पन्नाचा दाखला मोफत द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. उपोषणात असोसिएशनचे अध्यक्ष उध्दव पन्हाळकर, गौरव शेलार, तेजस मुरगुडे, राहुल चव्हाण आदी सहभागी झाले .

....

१९९८ पासून निवेदनांना केराची टोपली

असोसिएशनतर्फे १९९८ ते २०१८ पर्यंत १४ वेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र सरकारी यंत्रणेने त्यांच्या निवेदनास केराची टोपली दाखवली. म्हणून त्यांच्यावर अखेर उपोषण करण्याची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरासह, जिल्ह्यात वृक्ष लागवडीस सुरूवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शहर आणि जिल्ह्यात सोमवारपासून १ कोटी १३ लाख २२ हजार वृक्ष लागवडीस प्रारंभ झाला. स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

न्यू कॉलेजतर्फे हणबरवाडीत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या हस्ते झाडे लावण्यास प्रारंभ करण्यात आले. यावेळी प्रा. नरके, प्रा. विनय पाटील यांनी झाडांचे महत्व विशद केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यानी प्रास्ताविक केले. उदघाटन कार्यक्रमानंतर कॉलेजतर्फे चिंच, बांबू, पिंपळ, आंबा, चिक्कू, फणस, काजू अशा २०० झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रा. टी. के. सरगर, प्रा. डॉ. एस. व्ही. शेटके यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते कमला कॉलेजतर्फे आयोजित वृक्ष लागवड उपक्रमास सुरूवात झाली. प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य प्रा. पी. एस. जाधव, प्रा. अनिल घस्ते, प्रा. वर्षा साठे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम, भोगवटा प्रमाणपत्रे मुदतीत द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे शहरवासियांना बांधकाम परवानगी अथवा भोगवटा प्रमाणपत्रांना मुदतीत मंजुरी द्यावी. त्यानंतर कनिष्ठ अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांनी मुदतीत परवानगी द्यावी,' अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी नगररचना विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिली. शहरात होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामाबाबत नगररचना व उपशहर अभियंता यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, असे आदेशही दिले.

आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी राजारामपुरी येथील नगररचना विभागाच्या कार्यालयात कामकाजाविषयी आढावा बैठक घेतली. 'नगररचना विभागाकडे प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगी, विकास परवानगी प्रकरणांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी कार्यालयात ठळकपणे लावावी. नागरिकांशी सौजन्याने वागताना त्यांच्या कामांचा वेळेत निपटारा करावा. अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमणे होत असताना नगररचना व उपशहर अभियंता यांनी संयुक्तपणे कारवाई करावी.' अशी सूचना त्यांनी केली.

'अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांमुळे पाणी निचरा होत नसेल, अशा ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. आठवड्यातील एक दिवस मी स्वत: नगररचना कार्यालयात येवून दाखल झालेल्या प्रकरणांचे निर्गतीकरण करणार आहे. कामाचा वेळेत निपटारा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधणकारक आहे. कामात हयगय केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल' असा इशाराही आयुक्तांनी दिला. आढावा बैठकीस सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन. एस. पाटील, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, आर. के. जाधव, आरोग्य निरिक्षक, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images