Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जलसिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा

$
0
0

सरकारच्या निर्णयावर इरिगेशन फेडरेशन असमाधानी, पुन्हा आंदोलनाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव वीजदराचा फटका बसू नये यासाठी उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना प्रति युनिट एक रुपया १६ पैसे असा सवलतीचा वीजदर लागू करण्यास मंत्रीमंडळ बैठकीने मंजुरी दिली. सरकारच्या मंजुरीनंतर दोन दिवसाच्या आत ऊर्जा विभागाने तातडीने वीज दर सवलतीचा अध्यादेश काढला. मात्र सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशन समाधानी नाही. कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पुन्हा आंदोलनाचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे.

'सरकारने सवलतीच्या वीजदरात लघुदाब उपसा जलसिंचन योजनेचा विचार केला नाही, तसेच राज्यातील ४१ लाख वैयक्तिक कृषी पंपधारकांच्या वीज बिलात दुरुस्ती करण्याविषयी निर्णय घेतलेला नाही. यामुळे सरकारच्या विरोधात स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल. सरकारने अंशत: शब्द पाळला, वीज दर सवलतीचा पूर्णत: निर्णय घेतला नाही,'अशी टीका महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांनी दिला. ऊर्जा विभागाच्या अध्यादेशानंतर इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. फेडरेशनचे बाबासाहेब पाटील भुयेकर, आर.जी.तांबे, जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

दरम्यान, कृषीपंपांच्या अन्यायी वीज दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनतर्फे २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलानजीक चक्का जाम आंदोलन पुकारले होते. लघुदाब (१०० हॉर्स पॉवरपर्यंतचे) व उच्चदाब उपसा जलसिंचन (१०० हॉर्स पॉवरपासून पुढे) योजनांना एक जून २०१५ ते २०२० मार्चपर्यंत एक रुपया १६ पैसे असा सवलतीचा वीज दर लागू करावा, राज्यातील वैयक्तिक कृषीपंपधारकांच्या वीज बिलात दुरुस्ती करावी यासह अन्य मागण्या केल्या होत्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या सर्व मागण्या मान्य केल्याची ग्वाही दिली होती. तसेच ३१ जानेवारीपर्यंत याबाबत सरकारी अध्यादेश काढू ,असे पत्र डॉ. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर फेडरेशनने चक्का जाम आंदोलन स्थगित केले होते.

........

ऊर्जा विभागाचा अध्यादेश

ऊर्जा विभागाच्या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता पूर्वलक्षी प्रभावाने एक नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०२० हा वीजदर लागू राहणार आहे. या निर्णयाचा फायदा अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. २९ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. दरम्यान, उच्चदाब उपसा जलसिंचना योजनांना सवलतीच्या दरातील वीजेमुळे महावितरणवर पडणाऱ्या आर्थिक भाराची जबाबदारी सरकारने उचलली आहे. सरकारकडून महावितरणला १०७ कोटी ७३ लाख रुपये देण्यात येणार आहेत. वीजदर कमी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

...............

कोट

'सरकारने पाणी पुरवठा योजनांना सवलतीचा वीज दर लागू करण्याबाबतचा शब्द पाळला नाही. वैयक्तिक कृषीपंपधारकांचा विचार केला नाही. एक जून २०१५ पासून सवलतीचा वीज दर लागू करण्याची मागणी होती. मात्र सरकारने एक नोव्हेंबर २०१६ पासून सवलतीचा वीज दर लागू केला आहे. सरकारने पुन्हा एकदा फसगत केली असून येत्या दोन दिवसांत डॉ. एन.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.

विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन

.............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारागृहाला शिस्त लावण्याचे आव्हान

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : कळंबा कारागृहात खुलेआम होणाऱ्या ओल्या पार्ट्या, कैद्यांकडे सापडणारा गांजा, मोबाइल यांसह कारागृहात टोळ्यांमधील मारामारीच्या प्रकारांना चाप लावण्याचे आव्हान नूतन अधीक्षक दत्ताजी गावडे यांच्यासमोर आहे. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. कारागृहात व्हिडिओ चित्रीकरण करून एका कैद्याने व्हायरल केलेल्या क्लिपच्या प्रकाराने १६ कर्मचारी निलंबित झाले आहेत. राज्यात बदनाम झालेल्या या कारागृहाची प्रतिमा सुधारावी लागणार आहे.

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मोबाइल, गांजासह अवैध वस्तू पुरविल्या जात असल्याच्या कारणावरुन पश्चिम विभागाच्या कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी कळंबा कारागृहातील १६ कर्मचारी निलंबित केले आहे. सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा, मोबाइल उपलब्ध करून देण्यास मदत, कामात कुचराई केल्याचा ठपका निलंबित कर्मचाऱ्यांवर ठेवला आहे. यामध्ये तत्कालीन अधीक्षक शरद शेळके, तुरुंगाधिकारी सचिन पाटील यांच्यासह हवालदार, सुभेदारांचा समावेश आहे. वाईमधील सीरियल किलर कैदी डॉ. संतोष पोळ याला मोबाइल पुरविल्याच्या प्रकरणात कारागृह अधीक्षकांची बदली झाली. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई तसेच राज्यातील नामचीन गुंड, खून, मारामारी, सशस्त्र दरोडा आदी गुन्ह्यांसह संघटित टोळीतील मोक्का लावलेले, बॉम्बस्फोट खटला, सक्तमजुरी झालेल्या कैद्यांसह एकूण १८८३ कैदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र कारागृहात मोबाइल तपासणीसाठी स्कॅनरची सुविधा नाही. वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या, कारागृहाबाहेर नातेवाईकांच्या भेटीगाठीचे प्रसंग, धान्यासाठी येणारे ट्रक, कारागृहात काम सुरू असलेले रस्ते, बागकामावेळी कैद्यांना काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वस्तू पुरविल्या जात असल्याचा संशय आहे. दाढी करण्यासाठी दिलेले ब्लेड लपवून अंगावर वार करून घेण्याचे प्रकार कैद्यांकडून घडले आहेत. सोमालिया येथील काही दहशतवादी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांचा आणि अन्य कैद्यांचा वाद सुरू असल्याचे समजते. काही कैद्यांना मारहाण करणे, त्यांच्याकडून मसाज करवून घेणे, बराकी साफ करून घेणे अशी कामे अन्य कैदी करवून घेतात असा आक्षेप आहे.

२०१५ मध्ये जामिनावर सुटलेल्या एका कैद्याने कारागृहात सुरू असलेली दारु पार्टी, गांजा सेवनाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्याने कारागृहात कैद्यांना मोबाइल जवळ बाळगण्यासाठी ३ हजार आणि चार्जिंगसाठी दीड हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप केला होता. काही कैद्यांनी बूटातून मोबाइल आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेताना एक यंत्रणाच काम करते असा आरोप आहे. मुंबईतील टोळीयुद्धातील कैदी, 'मोक्का' लागू झालेल्या कैद्यांना थेट काही वस्तू मिळत असल्याचे समजते. कैदी डॉ. संतोष पोळ याने कारागृहात खोटे पिस्तूल तयार करून २७ नोव्हेंबर २०१८ रोजी व्हॉट्सअॅपवरुन त्याची क्लिप व्हायरल केली होती. या प्रकरणाने प्रशासन हडबडून गेले. त्यानंतर कारवाई करण्यात आली. अशा गोष्टींवर चाप लावण्याची जबाबदारी नूतन अधीक्षकांवर आहे.

कर्मचाऱ्यांवर कारवाई

२०१५ मध्ये कारागृहातील गांजा पार्टी, कैद्यांकडे मोबाइल सापडल्यानंतर तत्कालीन अधीक्षकांसह ३ कारागृह रक्षक निलंबित करण्यात आले होते. तर दोन तुरुंगाधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही कैद्यांकडे मोबाइल आढळल्याचे ६ गुन्हे उघडकीस आले होते. तर पोळ व्हिडिओ प्रकरणानंतर २०१८ मध्ये १६ कर्मचारी निलंबित करण्यात आले.

दृष्टिक्षेपात कळंबा कारागृह

२४ एकर

कारागृहाचा एकूण परिसर

४०

बरॅक

२००

कर्मचारी

१७८९

कैद्यांची क्षमता

१८८३

एकूण कैदी

६२३

सक्तमजुरी

२०

परदेशी

१४७

मोक्का

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’चा फैसला सोमवारी

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा बँकेकडे थकबाकीपोटी तारण असलेल्या दौलत साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयट्स कंपनीकडे जाणार, याबाबतचा निर्णय सोमवारी (ता.४) होण्याची शक्यता आहे. दौलत कारखाना थकबाकीपोटी जिल्हा बँकेकडे तारण आहे. बँकेने तो भाडे करारावर न्यूट्रीयंट्स कंपनीला चालविण्यास दिला. ठरल्याप्रमाणे हप्ते न दिल्याने बँकेने कारखान्याचा ताबा घेतला. हा वाद सध्या न्यायालयात आहे. कारखान्याबाबतची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. सोमवारी त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही काँग्रेसला हवाय ‘स्वाभिमानी’चा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचा विधानसभेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या बदल्यात लोकसभेचा मार्ग खुला करत राष्ट्रवादीने मोठी खेळी केली आहे. मात्र, विधानसभेच्या हक्काच्या मतदारसंघांवर संघटना अडून बसल्यास आघाडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. सध्यातरी लोकसभेला आघाडी होणार असल्याने त्याचा फायदा खासदार राजू शेट्टी यांना होणार आहे.

लोकसभेसाठी होणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार हे निश्चित आहे. त्याचा एक भाग म्हणून हातकणंगले मतदारसंघ या संघटनेसाठी सोडण्यात येणार असून राज्यात आणखी एक मतदारसंघ देण्यात येणार आहे. ही आघाडी केवळ लोकसभेसाठी नाही तर विधानसभेलाही असेल अशी चिन्हे आहेत. लोकसभेला हातकणंगले मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस नसल्याने मतदारसंघ देण्यात अडचणी येणार नाहीत. पण, लोकसभेच्या बदल्यात दोन्ही काँग्रेसला विधानसभेवेळी 'स्वाभिमानी'ची मदत हवी आहे. दहापैकी किमान पाच ते सहा मतदारसंघांत संघटनेची चांगली ताकद आहे. ही ताकद मिळाल्यास दोन्ही काँग्रेसचे उमेदवार विजयापर्यंत पोहाचणे शक्य आहे. त्यामुळेच लोकसभेवेळी एक पाऊल मागे घेत आघाडी केली जात आहे.

विधानसभेला आघाडी करताना शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, चंदगड, राधानगरी अशा पाच मतदारसंघांवर 'स्वाभिमानी' हक्क सांगू शकते. या बदल्यात करवीर, इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण व कागल या चार मतदारसंघांत मदतीचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. जागावाटप झाल्याप्रमाणेच सध्या दोन्ही काँग्रेसचा विधानसभेचा प्रचार सुरू आहे. कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ यांसह 'कोल्हापूर उत्तर'वर राष्ट्रवादीचा दावा आहे. दक्षिण, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले हे काँग्रसचे हक्काचे मतदारसंघ असतील. याशिवाय ते 'शिरोळ' व 'उत्तर'ची मागणी हा पक्ष करेल. त्यामुळे सध्याच्या संभाव्य जागा वाटपानुसार 'स्वाभिमानी'ला देण्यासाठी आघाडीकडे फारसे मतदारसंघ नाहीत. पन्हाळा मतदारसंघात दोन्ही काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नसल्याने त्याचा विचार संघटनेसाठी होऊ शकेल. शिवाय 'शिरोळ'ची जागा स्वाभिमानी काही केल्यास सोडणार नाही. येथेच वादाचा केंद्रबिंदू असेल.

मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 'स्वाभिमानी'ची मोठी मदत होणार आहे. साखर कारखानदारांविरोधातील धार कमी करून संघटनेने आघाडीचा संदेश दिला आहे. ग्रामीण भागात संघटनेची हवा असल्याने राष्ट्रवादीला ते पोषक ठरणार आहे. याशिवाय विधानसभेला शिरोळ वगळता इतर काही ठिकाणी स्वाभिमानीचा आधार दोन्ही काँग्रेसला मिळणार आहे. त्यासाठीच सध्या आघाडीची चर्चा सुरू आहे. 'शिरोळ'साठी राष्ट्रवादी हटून बसणार आणि स्वाभिमानी ही जागा सोडणार नाही. पण तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुला केल्यास स्वाभिमानीचा फायदा इतर ठिकाणी होणार आहे.

'स्वाभिमानी' हक्क सांगू शकेल असे मतदारसंघ

शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, चंदगड, राधानगरी

राष्ट्रवादीचा दावा

कागल, चंदगड, राधानगरी, शिरोळ, 'कोल्हापूर उत्तर'

काँग्रेसची मागणी

दक्षिण, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले, 'शिरोळ' व 'उत्तर'

वादाचा केंद्रबिंदू

शिरोळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाला पाठिंबा

$
0
0

कोल्हापूर: जनलोकपाल, लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी त्वरित करावी, शेतकरी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषणला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनात नारायण पोवार, एच. बी. देसाई, प्रल्हाद बट्टेवार, डॉ. आनंद गुरव यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदी राज्यनाट्य स्पर्धा आजपासून

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ५८ व्या हिंदी नाट्य स्पर्धेला आजपासून केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता प्रारंभ होणार आहे. पुण्याच्या संक्रमण या नाट्यसंस्थेच्या 'थोडा है थोडे की जरूरत है' या नाटकाने प्रारंभ होत आहे. सलग ३३ दिवस होणाऱ्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील नाट्यसंस्था कडून तब्बल ६५ हिंदी नाटकांची मेजवानी कोल्हापूरच्या नाट्य रसिकांना मिळणार आहे. या स्पर्धेत रोज दोन नाटकांचे सादरीकरण सकाळी ११:३० वाजता आणि सायंकाळी सात वाजताहोईल. प्रेक्षकांसाठी १५ व १० रुपये तिकीटदर आहे. सकाळी ९ व सायं. ५ वाजता तिकीट सुरू होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डी वॉटरिंग’ने निघणार जलतरण तलावाची गळती

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या गळतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 'डी वॉटरिंग' पद्धतीने गळती काढण्याच्या सूचना तज्ज्ञानी दिल्या आहेत. मुंबई आयआयटीकडून जलतरण तलावाची पाहणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास प्राप्त झाला आहे.

आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार जलतरण तलावासाठी ७१ लाख, ६९ हजार, ५९६ रुपये व डायव्हिंग तलावासाठी एक कोटी, पाच लाख, २३ हजार, ३१५ रुपये खर्च करण्यात आला. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संकुलाच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्यातील पाणी झिरपून तलावात येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तलावातील गळती काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. जुलै महिन्यामध्ये मुंबई आयआयटी येथील तज्ज्ञांना बोलावून जलतरण तलावाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात आयआयटी पथकाने जलतरण तलावाची तपासणी केली होती.

आयआयटीच्या पथकाने जलतरण तलावाची गळती काढण्यासाठी २१ पानी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. त्याची प्रत २२ जानेवारीला जिल्हा क्रीडा कार्यालयाला प्राप्त झाली आहे. यामध्ये जलतरण तलावात नऊ इंचाचा कॉंक्रिट राफ्ट तयार करण्यात येणार आहे. ओढ्यातून तलावात झिरपून येणारे पाणी बाजूला नाले तयार करून दोन सबवेलमध्ये काढण्यात येणार आहे. या तपासणीत जलतरण तलावाची भार क्षमता पडताळण्यात आली. याबरोबर इतर तांत्रिक बाबी आयआयटीच्या पथकाने सुचवल्या आहेत.

मुंबई आयआयटी तज्ञानी सुचवलेल्या बाबींचा अपेक्षित खर्च किती आहे याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेणार आहोत. सुचवण्यात आलेले पर्याय खात्रीशीर असतील तर आयआयटी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खर्च करण्यात येईल. याबाबत लवकरच निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी यादृष्टीने प्रयत्न करणार आहे.

चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॅक’ व शाहू ग्रुपतर्फेउद्या महाआरोग्य शिबिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कामगार हाच उद्योगधंद्यांचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे हित सांभाळणे आजची गरज आहे. मॅक व राजे फाउंडेशनच्या माध्यमातून २ फेब्रुवारीला मोफत महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शाहू कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

घाटगे म्हणाले, 'शिबिरात मुंबई व कोल्हापूर येथील ख्यातनाम २० रुग्णालयांचा सहभाग राहणार आहे. नामवंत व विशेष तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी केल्यानंतर गरजू रुग्णांवर उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय यांच्यामार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत. पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत महाआरोग्य शिबिर प्रथमच होत आहे. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व विशेष कार्य कक्षप्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंत्रालय मुंबईचे ओम प्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत होणार आहे.'

'मॅक'चे अध्यक्ष धोत्रे म्हणाले, 'महाआरोग्य शिबिरासाठी नोंदणीचे काम जलदगतीने सुरू आहे. एमआयडीसीतील कामगारांसाठी सध्या कोल्हापुरात रुग्णालय सुरू आहे. तेथे फक्त रुग्ण तपासले जातात. जोखमीचा रुग्ण असेल तर त्यास दाखल करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचप्रमाणे कागल केंद्रस्थानी समजून येथे लवकरच सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे.'

यावेळी योगेश कुलकर्णी, शाहू साखरचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, आदींसह उद्योजक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ख्रिश्चन बांधवांचाआजऱ्यात मूक मोर्चा

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, आजरा

कोल्हापुरातील होलीक्रॉस शाळेवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आजरा शहरातून मूकमोर्चा काढून हल्लेखोरांचा निषेध करण्यात आला. मोर्चामध्ये तालुक्यातील ख्रिश्चन समाज आणि संविधानप्रेमी संघटनांचा सहभाग होता. अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजावरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. संबंधित समाजकंटकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

होलीक्रॉस शिक्षण संस्थेवर गेल्या आठवड्यात काहीजणांनी हल्ला करून तेथील मुख्याध्यपिका आणि शाळेच्या कार्यालयाची मोडतोड केली. तसेच कार्यालयात असलेल्या येशू ख्रिस्तांच्या प्रतिमेचीही मोडतोड करण्यात आली. अल्पसंख्याक समाजाविरोधात दहशत माजविण्याची ही वृत्ती असून, अशा वृत्तीला वेळीच चाप बसविणे गरजेचे असल्याची मते निवेदनातून व्यक्त केली आहेत. याचा निषेध म्हणून ख्रिस्ती बांधवांनी आजरा शहरातून मोर्चा काढला. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मूक मोर्चा मुख्य बाजारपेठेतून संभाजी चौकमार्गे तहसील कार्यालय परिसरात आला. येथे तहसीलदार अनिता देशमुख यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी ख्रिस्ती समाजाच्या पॅरिश कौन्सिलचे अध्यक्ष मोतेस बारदेस्कर, मनवेल बारदेस्कर, मायकेल फर्नांडिस, आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टिचर्स असो.चा रविवारी प्रारंभ

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनच्या नोंदणीकृत संघटनेचा प्रारंभ आणि सभासद प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी (ता. ३) होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. एस.पाटील व उपाध्यक्ष प्रा. दीपक खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ताराबाई पार्क येथील चंदवाणी हॉल येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. रवींद्र फडके, सचिव डॉ. प्रशांत कुलकर्णी आणि खजिनदार प्रा. सुधाकर सावंत, सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांची प्रमुख उपस्थिती असेल. याप्रसंगी 'शिक्षकरत्न' पुरस्काराचे वितरण होणार आहे. शाळा व कॉलेजमध्ये नियमित नोकरीत असणारे पंधराहून अधिक शिक्षक-प्राध्यापक खासगी क्लास घेतात. त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप असोसिएशनचे सदस्य प्रा. तानाजी चव्हाण यांनी केला.

कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, ' खासगी क्लासेस नियंत्रण कायदा प्रस्तावित असून त्याबाबत जागृती निर्माण करणे. कायद्यात खासगी क्लास संचालकांच्या हिताच्या योग्य त्या सुधारणा हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात २०० खासगी क्लासचालक आहेत. त्यापैकी १२५ जण संघटनेचे सभासद आहेत.' पत्रकार परिषदेला सचिव सुरेश कातवरे, खजानिस शहाजी पाटील, संघटक मोहन गावडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालेकिल्ला कला महोत्सव आजपासून

$
0
0

कोल्हापूर: 'बालेकिल्ला तरुण मंडळ व योगदान फाउंडेशनच्यावतीने एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान निसर्गपार्क, जुनी मोरे कॉलनी येथे 'बालेकिल्ला कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १) सायंकाळी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.' अशी माहिती नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

नगरसेवक खाडे-पाटील म्हणाले, 'महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले असून त्यामध्ये फॅन्सी ड्रेस, रांगोळी, चित्रकला, होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहेत. त्याचबरोबर योग शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर मिस व मिसेस २०१९ सौंदर्य स्पर्धा होणार आहे. शनिवारी (ता. २) सायंकाळी सात वाजता 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भार्गवी चिरमुले यांचा विनोदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.' पत्रकार बैठकीस नगरसेवक किरण नकाते, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिषेक साळुंखे, उपाध्यक्ष डॉ. सूर्यकांत माने, सनी धुमाळ, ह्रषिकेश मेणके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ गावात कचऱ्यापासून खत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण होत नसल्याने त्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. यावर पर्याय शोधताना ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प प्रस्तावित केली आहे. जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात नऊ गावात खत निर्मितीचे मशिन बसविण्याची योजना आखली आहे. यासाठी चाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झाला आहे. या निधीच्या वितरणास जिपच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. उपलब्ध निधीतून आठ गावासाठी प्रत्येकी एक मशिन पुरविण्याचे निश्चित केले होते. दरम्यान क्लीन इंडिया व्हेन्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली या कंपनीकडून ४ लाख, ३६ हजार, ९०० रुपयांना एक मशिन मिळणार आहे. यामुळे शिल्लक निधीतून आणखी एका गावाला मशिन देण्याचा निर्णयावर स्थायी समिती सभेत शिक्कामोर्तब झाले. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, करवीर तालुक्यातील मोरेवाडी, उचगाव, शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे, हातणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची व नागाव, शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट, पन्हाळा तालुक्यातील कळे ही गावे निश्चित केली आहे. या गावातील मशीन खरेदीसाठी ३९ लाख ३२ हजार १०० रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

जिल्हा नियोजन समितीतून कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पासाठी पहिल्यांदाच निधी मिळाला आहे. हा निधी वेळेत खर्ची पडून संबंधित गावात खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संबंधित गावांना मशीन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कंपनीला केल्या आहेत. नऊपैकी आठ गावांत पहिल्यांदा मशीन बसविल्या जातील. तर हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे मशीन बसविण्याच्या प्रस्तावाला जानेवारी महिन्यात मंजूर मिळाली. त्याठिकाणी आठ गावानंतर काही कालावधीने मशिन उपलब्ध होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिपतर्फे शुक्रवारपासून क्रीडा स्पर्धा

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शुक्रवारपासून (ता. १) दोन दिवसाीय जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात मिळून २४०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे स्पर्धा होणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा दोन गटात या स्पर्धा होत आहेत. सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकाराचा समावेश आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते आणि जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी मांडवकर

$
0
0

कोल्हापूर: श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले राजे प्रतिष्ठानच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी सागर सखाराम मांडवकर यांची निवड करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पृथ्वीराज पाटील, सुनील काटकर, संतोष पोवार, सत्यजित घोरपडे, माजी परिवहन समिती सभापती अजित मोरे, सुहास गाडगीळ, जावेद शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूनेचा छळ, हायप्रोफाइल सासू-सासऱ्यावर गुन्हा

$
0
0

पंढरपूर

पंढरपूरमधील हायप्रोफाइल कुटुंब म्हणून ओळख असलेल्या विरधे यांच्या सूनेने बॅंक अधिकारी सासरा व प्राध्यापिका सासूवर हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. सायली सिद्धिविनायक विरधेने सासरच्या मंडळीविरोधात पंढरपूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पती सिद्धिविनायक उमेश विरधे हा नपुंसक असल्याचा धक्कादायक आरोपही तिने केला आहे. तसंच लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येत असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.

केवळ स्वतःचं नंपुसकत्व लपवण्यासाठी ठार मारण्याच्या धमक्या नवरा देत होता. त्याचे वडील उमेश विरधे, आई उज्ज्वला विरधे, नणंद प्रियांका बट हे त्याला असं वागण्यास प्रवृत्त करत होते, असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. आम्हाला नोकरी करणारी मुलगी हवी होती. तसंच पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन पैशाची मागणी करावी, असा तगादा त्यांनी लावला होता. सर्व माहिती सायलीने आपल्या आई-वडिलांना दिली. त्यांनी विरधे कुटुंबीयांकडे विचारणा केली. आमचा मुलगा पांढऱ्या कावीळने आजारी आहे. त्यामुळे हायपरटेन्शनमुळे त्याला मनोविकाराने ग्रासले आहे. त्यावर उपचार सुरू आहेत, असं मोघम उत्तर विरधे कुटुंबीयांकडून देण्यात आलं. सायलीने काही दिवस व्यतीत केल्यानंतरही एक दिवस सिद्धिविनायकने तिच्या पोटात लाथ मारली. या घटनेनंतर सायलीच्या आई-वडिलांनी तिला माहेरी आणले. या प्रकरणामध्ये सायलीने सासरच्या मंडळींवर मुलगा नपुंसकत्व असलेला माहीत असूनही लपवणे, पतीचे दुसरे लग्न लावून देऊ असे धमकावणे, उपाशी ठेवणे, दमदाटी करणे, फ्लॅट घेण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करणे, असे आरोप केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी कलम ४९८-अ, ४१७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी सायली यांचे सासरे उमेश विरधे शहरातील नावाजलेल्या बॅंकचे सीईओ आहेत. तर सासू उज्ज्वला विरधे या प्राध्यापिका आहेत. एका हायप्रोफाइल कुटुंबाकडून घडलेल्या घृणास्पद प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमृत योजना बातमीला कोट

$
0
0

थेट पाइपलाइनला अनुसरून अमृत योजना कार्यन्वित करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील आवश्यकतेनुसार जुन्या जलवाहिन्या बदल्यासोबत अनेक ठिकाणी नव्या जलवाहिन्या टाकण्यात येतील. तसेच नगरसेवकांच्या मागणीनुसार ड्रेनेज व पाणीपुरवठा लाइन टाकण्याचे काम करण्यात येईल.

सुरेश कुलकर्णी, जलअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थलांतरणाला मूहूर्त कधी

$
0
0

महापालिकेचा लोगो

कोल्हापूर टाइम्स टीम

राजर्षी शाहूकालीन प्रसिद्ध नगरअभियंता रावबहादूर दाजीराव विचारे यांच्या नावाची शाळा बोंद्रेनगर परिसरात स्थलांतरित करण्याच्या हालचाली वर्षभर सुरू आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या ठिकाणी शाळा सुरू करावयाची झाल्यास स्थलांतरण प्रक्रियेला तत्काळ मंजुरी मिळणे अत्यावश्यक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता महिनाभरात लागू झाल्यास स्थलांतर रखडणार आहे. सद्यस्थितीत स्थलांतरण झाल्यास जून महिन्यापासून उपनगरातील मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. भागात शाळा सुरू करावी यासाठी पालक व लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत आहेत.

फुलेवाडी रिंगरोड, बोंद्रेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, सत्याईनगर, गंगाई लॉन परिसरात महापालिकेची एकही शाळा नाही. या भागात महापालिकेच्या मालकीची प्राथमिक शाळा सुरू होण्यासाठी तत्कालिन शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांनी प्रयत्न केले. शिक्षण समितीतील अधिकाऱ्यांनी या भागाचा सर्व्हे करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला. या भागातील एका इमारत मालकाने दोन आरसीसी इमारती शाळेसाठी भाडेतत्वावर देण्यास तयारी दर्शविली आहे.

महादेवनगरी येथे या इमारती आहेत. शिवाय मुलांना खेळण्यासाठी महादेव मंदिरासमोरील मोकळी जागा उपलब्ध होऊ शकते. सध्या सासने विद्यालयाच्या इमारतीत रावबहादूर विचारे विद्यालय सुरू आहे. हे विद्यालय अन्यत्र स्थलांतर करुन पूर्ण क्षमतेने चालविल्यास रावबहादूर विचारे यांच्या स्मृती जपल्या जातील. शिक्षण समितीकडून १५ नोव्हेंबर, २०१८ रोजी विचारे विद्यालय स्थलांतरण करण्याबाबतचा अहवाल मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर केला आहे.

'डिस्कस'नंतर हवी तत्काळ मान्यता

दरम्यान आयुक्त अभिजित चौधरी यांनी प्रारंभापासून सकारात्मक भूमिका घेतली आहे. शिक्षण समितीच्या त्या प्रस्तावावर आयुक्तांनी 'डिस्कस'असा शेरा मारून अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. आता अतिरिक्त आयुक्त व शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी तत्काळ चर्चा करुन संबंधित प्रस्ताव आयुक्तांकडे पुन्हा मंजुरीसाठी सादर होणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला मान्यता मिळाली तर शिक्षण समितीला शाळेचा नव्याने श्रीगणेशा करणे सुलभ होणार आहे. शिवाय बोंद्रेनगर, फुलेवाडी रिंगरोड परिसरातील मुलांचा शोध घेऊन पहिलीची पटसंख्या वाढविता येईल.

पालकांनी घेतली आयुक्तांची भेट

बोंद्रेनगर परिसरात शाळा सुरू करावी यासाठी या भागातील पालकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यामध्ये अभिषेक मिठारी, ईर्शाद वडगावकर, सागर पाटील, निखील कुंभार आदींचा समावेश होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शाळा प्रवेश होतात. प्रशासनाने त्या अगोदर स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून शाळेचे उद्घाटन करायला हवे. यामुळे प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होईल असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ खेळाडू पिसे यांचा आज सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ज्येष्ठ फुटबॉल व क्रिकेट खेळाडू रघू पिसे यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त आणि क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल शनिवारी (ता. २) सायंकाळी पाच वाजता बालगोपाल तालीम मंडळाच्या सभागृहात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, गोकुळचे संचालक अरुण नरके, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बाळ पाटणकर, उद्योगपती चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती बालगोपाल तालमीचे अध्यक्ष निवासराव साळोखे यांनी दिली.

न्यू हायस्कूलचे विद्यार्थी असलेले रघू पिसे यांचे वडील गोपाळराव पिसे हे फुटबॉलपटू होते. त्यानंतर रघू पिसे, त्यांचे बंधू वसंत, दत्तात्रय, गजानन हे फुटबॉलपटू होते. त्यानंतर संभाजी, सुनील, उमेश, निलेश या पिढीने फुटबॉल खेळाची परंपरा पुढे चालवली. आज त्यांचा नातू स्वरूप पिसेही फुटबॉलमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. रघू पिसे यांच्या नेतृत्वाखाली गोखले महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ संघाने अजिंक्यपद पटकावले. बालगोपाल तालीम मंडळ आणि एसटी संघात रघू पिसे यांनी प्रतिनिधित्व केले. अजातशत्रू म्हणून ओळख असलेले पिसे हे ७५ वर्षात पदार्पण करणार असल्याने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला बाळासाहेब नचिते, बबन थोरात, राजू कुरणे, केशव पोवार, विजय भोसले, हिंदूराव घाटगे,सुनील पाटील, संजय साळोखे, नंदकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमगार्डसचे धरणे आंदोलन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर परिक्षेत्रातील होमगार्डवर झालेला अन्याय दूर करुन आगामी काळात होणारी होमगार्ड भरती स्थगित करावी, या मागणीसाठी होमगार्ड अन्याय निवारण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले. त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे, सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी जिल्ह्यातील ५८७ होमगार्डना कामावरून कमी केले. त्यांना बाजू मांडण्याचीही संधी दिली नाही. या होमगार्डना त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. तोपर्यंत नवीन होमगार्ड भरती थांबवावी. तसेच कामावरून कमी केलेल्या होमगार्डना पुन्हा कामावर घ्यावे. होमगार्डना पुरेसे काम, वेतन, आहार, निवासाची सोय करावी, त्यांना कॅशलेस विमा द्यावा, ७०० रुपय मानधन द्यावे, एसटी प्रवास मोफत मिळावा, बढतीसाठी नवीन प्रणाली निर्माण करावी, निवृत्तीचे वय ५८ वरुन ६२ करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. कामावरुन कमी केलेल्या होमगार्डना परत कामावर रुजू करुन घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात सुनील सामंत, अभिनव गिरी, शुभांगी थोरात, प्रमोद सावंत, विजयकुमार पाटील आदी कार्यकर्ते सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे चक्री उपोषण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य राखीव पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरु केले आहे. संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, राज्य राखीव पोलिस दलाच्या कोल्हापूर परिक्षेत्रातील क गटात मध्ये २०० पदे रिक्त असल्याचे समजते. रिक्त पदे असतानाही ड गटातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिले जात नसल्याची भावना कर्मचाऱ्यांत झाली आहे. या संदर्भात १६ मे २०१८ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षकाबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी लवकरच पदोन्नती दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर सात महिने पूर्ण होऊनही पदोन्नती झालेली नाही. 'ड' वर्गातील कर्मचाऱ्यांना 'क' वर्गात पदोन्नती द्यावी, अशी मागणी संघटनेने केली होती. पण त्यासाठी प्रशासनाने पावले न उचलल्याने शुक्रवारपासून चक्री उपोषणास सुरुवात केली आहे. आंदोलनात शंतनु गायकवाड, सुभाष गोरे, रमेश भोसले, राजन राऊत, विनायक लुगडे, मारोतराव चव्हाण, सागर चव्हाण, विष्ण चौरे, सुनील मोहरे आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images