Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टपऱ्या, हौद, झाडे जमीनदोस्त

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळे ठरत असलेली अनेक अतिक्रमणे काढण्याची धडक मोहीम हुपरी पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी राबविली. यावेळी रस्त्यावरील मोठी झाडे, टपऱ्या, हौद काढून टाकण्यात आले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

हुपरी शहरातील मुख्य रस्त्यावर पानटपऱ्या, दुकाने, डिजिटल फलक, वाहने, आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. त्यातच ऊस हंगामामुळे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडून अनेक छोटे-मोठे अपघात सर्रासपणे घडत आहेत. गावभागातील शिवाजी चौकात मोठी झाडे व त्यांच्या फांद्यांमुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक नदाफ यांनी बुधवारी सहकारी पोलिस तसेच होमगार्डना सोबत घेऊन जवाहर साखर कारखान्यांच्या चौपाटीपासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी ही अतिक्रमणांची धडक मोहीम सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या धडाक्यात चालू ठेवली. यावेळी शिवाजी चौकातील रस्त्यातील मोठी झाडे, पाण्यांचे हौद जेसीबी मशिनच्या सहाय्याने काढून टाकले. यावेळी कारवाईला कोणीही विरोध केला नाही. नदाफ यांच्या धाडसी कारवाईने जवाहर साखर कारखाना ते गावभागातील सिद्धार्थ नगरपर्यंतच्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. पोलिसांची ही कारवाई सकाळी दहापासून सायंकाळी सहापर्यंत सुरू होती.

०००

कारवाईचे स्वागत

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. यामुळे वाहतुकीची शिस्त बिघडली होती. परंतु सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी सर्वांशी चर्चा करून दोन दिवसांत पूर्णवेळ देऊन केलेल्या दणकेबाज कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. कोणाचाही मूलाहिजा न बाळगता संपूर्ण शहरात ही बेधक मोहीम राबवावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधन वृत्त...

$
0
0

फोटो...

रामचंद्र राबाडे

कोल्हापूर : रामानंदनगर येथील रामचंद्र कृष्णाजी राबाडे (वय ६५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते अनंत राबाडे यांचे ते वडील होत.

००००

प्रा. शशिकांत सोनवणे

कोल्हापूर : येथील प्रा. शशिकांत आनंदराव सोनवणे (वय ६५) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

०००००

शांता सुतार

कोल्हापूर : आर. के. नगर सोसायटी ५ मधील शांता श्रीराम सुतार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१८) आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्री प्रकल्पग्रस्तांपुढे प्रशासन नमले

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, आजरा

पुनर्वसनासह प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चित्री प्रकल्पस्थळावर ठिय्या मारलेल्या प्रकल्पग्रस्तांचा विरोध मोडून काढण्यासाठी आणि प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी गुरुवारी मोठा पोलिस बंदोबस्त आंदोलनस्थळी नेला. सकाळच्या सत्रात बळाचा वापर करून पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाचे होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे प्रशासनाने पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित केली.

दरम्यान, या प्रश्नावर आजरा तहसील कार्यालयात उपस्थित असलेले आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारी यांच्याशी प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळाने चर्चा करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आजरा तहसील कार्यालयात गेलेल्या शिष्टमंडळाशी पूर्ण चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे प्रांताधिकारी खिलारी यांनी शिष्टमंडळास जाण्यास सांगितले. त्यामुळे शिष्टमंडळाने 'प्रांताधिकारी हटाव'चा नारा दिला. शनिवारी (ता.१९) विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आजरा दौऱ्यावर येणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना त्याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे पत्रक देण्यात आले आहे.

गेले चार दिवस चित्री प्रकल्पग्रस्त आपल्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी येथे ठिय्या देऊन आहेत. याची दखल घेऊन तेथे चर्चेसाठी गेलेल्या आजरा तहसीलदारांनी अधिकारी व प्रकल्पग्रस्तांची १९ जानेवारीला चर्चा होत नाही, तोपर्यंत चित्रीमधून शुक्रवार (ता.१८) पासून सोडण्यात येणारे पाणी थांबविण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करीत पाणी बंद केले होते. मात्र, गुरुवारी आकस्मिकरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयातून पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागास दिल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार प्रशासनाने प्रभारी पोलीस निरीक्षक उदय डुबल आणि पोलिस उपनिरीक्षक घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसफाटा प्रकल्पस्थळावर नेला. प्रसंगी तेथे ठिय्या मारलेल्या आंदोलक प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेऊन पाणी सोडण्यात येणार होते. त्यामुळे चित्री प्रकल्पस्थळावर तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, यावर तोडगा म्हणून प्रांताधिकारी यांच्याशी चर्चेचे आवाहन प्रकल्पग्रस्तांना करण्यात आले. मात्र त्यानुसार चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. पाटबंधारे विभागाचे सूचना मिळल्याप्रमाणे चित्रीमधून पाणी सोडावे, असे पाटबंधारे विभागाचे आनंद नाडकर्णी आणि मळगेकर यांना सांगण्यात आले. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू केल्याने आणि पालकमंत्री पाटील यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करण्याचे नियोजन केल्याने पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित केली आहे. दरम्यान, २० जानेवारीला प्रकल्पग्रस्त व प्रशासन यांच्यात होणारी द्विपक्षीय चर्चा वादळी होण्याचे संकेत मिळत आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घानवडेत चालतेय महिलाराज

$
0
0

युवराज पाटील, कुडित्रे

लोकशाही शासनपद्धतीत स्थानिक स्वराज्य संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण असो वा शहरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या की, निकालानंतर जेथे महिलांची संख्या जास्त असते, तेथे महिलाराज निर्माण झाले असे आपण मानतो. करवीर तालुक्यातील घानवडे गावात सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदार पाच पदांवर महिलाच कार्यरत असून, त्या गावगाडा सांभाळत आहेत. राज्यातील हा दुर्मिळ योगायोग म्हणावे लागेल.

घानवडे हे कोल्हापूर शहरापासून ३० किलोमीटरवरील करवीर तालुक्यातील गाव. येथे सरपंचपदी बाळाबाई पांडुरंग चव्हाण, उपसरपंच उज्ज्वला संतोष मरळकर, पोलिसपाटील महादेवी रवींद्र लव्हटे, तलाठी सुरेखा जयकुमार नेजकर, तर ग्रामसेविका पदावर सुरेखा सुनील गिरीबुवा कार्यरत आहेत.

घानवडे-चव्हाणवाडी-घुंगुरवाडी-मांजरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०१५ मध्ये झाली. पहिली अडीच वर्षे झाल्यावर दुसऱ्या टर्ममधील अडीच वर्षांसाठी सरपंच म्हणून घानवडेच्या बाळाबाई चव्हाण यांना संधी मिळाली, तसेच उपसरपंच म्हणून मांजरवाडीच्या उज्ज्वला मरळकर यांना संधी मिळाली. गेले एक वर्ष चव्हाण व मरळकर सरपंच व उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

दीड वर्षापूर्वी झालेल्या पोलिसपाटील पदाच्या भरतीत घानवडेच्या नूतन पोलिसपाटील म्हणून महादेवी लव्हटे यांची निवड झाली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून येथे तलाठी म्हणून सुरेखा नेजकर काम पाहत आहेत. सात महिन्यांपूर्वी सुरेखा गिरीबुवा ग्रामसेविका म्हणून रुजू झाल्या आहेत.

ग्रुप ग्रामपंचायत घानवडेची लोकसंख्या सुमारे ३५४३ आहे. ११ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच , उपसरपंचांबरोबर उषा विलास पाटील, चंद्राबाई सुरेश गुरव, रूपाली संतोष कांबळे या महिला सदस्या कार्यरत आहेत. घानवडे येथे हसूर दुमाला पीएससीअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, तेथे सुमारे २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावात हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजही आहे. गावचे ग्रामदैवत रासाईदेवी व प्राचीनकालीन स्वयंभू मंदिर आहे. दरवर्षी गावात स्वयंभू यात्रा उत्सव एप्रिलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गावात दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. बाजारात परिसरातील गावांसह वाड्यावस्त्यांवरील लोकांची मोठी गर्दी असते.

ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गाव हागणदारीमुक्त झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शौचालय स्वच्छता स्पर्धेचा भाग म्हणून शौचालय रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. करवीरच्या पश्चिम भागातील घानवडे हे तसे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव मानले जाते. गावात सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील, तलाठी व ग्रामसेविका या अत्यंत जबाबदारीच्या पदावर महिला कार्यभार सांभाळत आहेत. महिलाराजचा योगायोग जुळून येणारे घानवडे महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरेल यात शंका नाही.

००००

कोट...

घानवडे गावात सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील, तलाठी व ग्रामसेविका या पदांवर महिला असणे हा अनोखा योगायोग घडून आला आहे. याद्वारे महिलासुद्धा गावचा कारभार सांभाळू शकतात हे सिद्ध झाले आहे. अशा पद्धतीचा योगायोग आमच्यासाठी एक आनंदी काळ आहे. त्यामुळे महिलांचा एकप्रकारे गावच्या वतीने सन्मानच केला आहे. गावच्या विकासात महिलांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

बाळाबाई चव्हाण, सरपंच

००००

फोटो :१) सरपंच बाळाबाई चव्हाण

२) उपसरपंच उज्ज्वला मरळकर

३) पोलीस पाटील महादेवी लव्हटे

४)तलाठी सुरेखा नेजकर

५)ग्रामसेविका सुरेखा गिरीबुवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्रॅप गाड्यांनी अडवला बाजार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारात अवजड वाहनांना बंदी घालून रस्ते खुले करण्यात आले. मात्र शेजारील जुन्या लोखंड बाजारातील ८० फूट रुंदीचा रस्ता स्क्रॅप आणि बंद पडलेल्या वाहनांनी अडविला आहे. महानगरपालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांच्या 'आशीर्वाद' असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा स्थानिक नागरिकांत आहे.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने लक्ष्मीपुरीतील धान्य बाजारात अवजड व मध्यम माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी आणली. सध्या लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार विक्रमनगरात स्थलांतर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र धान्य बाजारापलिकडील गल्लीत जुना लोखंड बाजार आहे तसाच आहे. बाजारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंद पडलेली आणि अक्षरश: स्क्रॅप झालेली वाहने आहेत. येथे अनेक वाहने धूळ खात पडल्याचे दिसते. त्यामुळे रस्त्याकडेला वाहने पार्क करण्यासाठीही जागा नसते. दोन्ही बाजूला बंद वाहनांची गर्दी असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. वाहतुकीची कोंडी होत असताना शहर वाहतूक शाखेकडून या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. महानगरपालिकेनेही या रस्त्याकडे दुर्लक्षच केले आहे.

जुना लोखंड बाजार रस्त्यावर प्रादेशिक साखर सहनिबंधक कार्यालय, विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक, श्रमिक कार्यालय, हरिहर विद्यालय, जैन श्राविका श्रम आदी संस्था आहेत. या रस्त्यावरच चारचाकी - दुचाकी वाहने स्क्रॅप करण्याचा व्यवसाय चालतो. वाहनांचे भाग सुट्टे करताना काचा रस्त्यावर पसरतात. मोठ्या हातोड्याने मशिन तोडताना नट-बोल्ट उडून नागरिक जखमी होण्याचे प्रकारही घडतात. हरिहर विद्यालयातील विद्यार्थ्यांना व जैन श्राविकाश्रममधील मुली, युवतींना पायात खिळे व काचा घुसण्याचे प्रकार घडतात. भंगार साहित्यामुळे वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोखंड तोडताना त्यातून निघणाऱ्या वायूचाही फटका नागरिकांना बसत आहे. दुकानदारांकडून स्क्रॅप वाहनांचे सुटे पार्ट, टायर रस्त्यावरच मांडले जातात. इतरत्र दररोज टोळधाड टाकणारा महापालिकेचा अतिक्रमण विभाग इकडे फिरकतही नाही अशी स्थिती आहे.

लोखंडी बाजारातील विक्रेत्यांची घरे व दुकाने एकाच ठिकाणी असल्याने यापूर्वी स्थानिकांकडून तक्रारी झाल्या नाहीत. मात्र दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा त्रास होऊ लागल्याने नागरिकांकडून कारवाईची मागणी होऊ लागली आहे. हरिहर विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामावेळी परिसरातील सर्व स्क्रॅप दुकानदारांना गाडीअड्ड्यात गाळे देण्यात आले. तरीही मूळ बाजारातील दुकाने कायम राहिली. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असल्याने महानगरपालिका, लक्ष्मीपुरी पोलिस, शहर वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

चोरीच्या वाहनांकडे दुर्लक्ष

स्क्रॅप बाजारात काही विक्रेते चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावतात अशी चर्चा आहे. अशा प्रकारांची माहिती स्थानिक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याला असूनही पोलिस कारवाई करत नसल्याचे सांगितले जाते. पोलिसांना दर महिन्याला 'भेट' पोहोचत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते अशी चर्चा परिसरात आहे.

हरिहर विद्यालयासमोर अतिक्रमण

हरिहर विद्यालयासमोरील वीस वर्षांपूर्वी २७ स्क्रॅप दुकाने हटवण्यात आली. ही दुकाने दसरा चौकातील जुन्या पूलाजवळील गाडी अड्ड्यावर हलवण्यात आली. पण परिसरातील काही राजकीय व्यक्तींनी पुन्हा हरिअर विद्यालयासमोर केबिन उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. चार ते पाच केबिन परिसरात आणून ठेवण्यात आल्या आहेत.

जुन्या लोखंड बाजारातील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा काढण्याची गरज आहे. पण, महानगरपलिकेच्या मालकीचा हा रस्ता असल्याने त्यांची मदत घ्यावी लागेल. त्यासंदर्भात लवकरच महापालिकेशी पत्रव्यवहार करून कारवाई केली जाईल.

- अनिल गुजर, निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा

सध्या शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे. सध्या महाद्वार रोड, ताराबाई रोडवर मोहीम सुरू असून फेरीवाले तेथे पुन्हा बसत असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. जुन्या लोखंड बाजारातील अतिक्रमणेही काढण्यात येणार असून पुढील आठवड्यात कारवाई केली जाईल.

- पंडित पोवार, प्रभारी अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅगिंग करणारे सात विद्यार्थी ‘आऊट’

$
0
0

कोल्हापूर:

कागल येथील नवोदय विद्यालयात रॅगिंग करणाऱ्या अकरावीच्या सात विद्यार्थ्यांवर कारवाई झाली असून त्यांना सातारा, रायगड, गोवा येथील नवोदय विद्यालयात स्थलांतर होण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिला आहे. यापैकी पाच विद्यार्थी जाण्यास तयार झाले असून दोघांनी नकार देऊन स्थानिक खासगी शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, निष्काळजीपणा आणि दुर्लक्षपणा, कर्तव्यात कसुरीमुळे रेक्टर व्ही. व्ही. शहापूरकर, ए. के. गवळी, एस. व्ही. वाघमारे, एस. एस. गुंजाळ यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याची माहिती प्राचार्य श्रीनिवास राव यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली. विद्यालयामधील वसतिगृहातील अकरावीच्या सात विद्यार्थ्यांनी १४ डिसेंबर २०१७ रोजी रात्री सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्या, काठ्या, लोखंडी रॉड, विटांनी मारहाण करीत रॅगिंग केले होते. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला होता. अहवालात रॅगिंग केल्याचे समोर आल्यामुळे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी रॅगिंग करणाऱ्या सात विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढावे, असा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठवला. त्यावर आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. सातजणांना विद्यालयातून काढण्याचा आदेश प्राचार्य राव यांनी दिला. गुरूवारी विद्यार्थ्यांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले.

'नवोदय विद्यालयातील रॅगिंग प्रकरणातील दोषी सात विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना दुसऱ्या विद्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे. ठोस भूमिकेमुळे वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त झाला. दोषी रेक्टरनाही प्राचार्यांनी नोटीस काढली आहे.

-अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वर मुळे लोकसभेच्या आखाड्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशाच्या परराष्ट्र खात्यात सचिव म्हणून पासपोर्ट विभागाची जबाबदारी सांभाळत असलेले ज्ञानेश्वर मुळे यांचा राजकारणातील प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या ३१ जानेवारीला ते सरकारी सेवेतून निवृत्त होत असून निवृत्तीनंतर ते लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुळे यांच्या राजकारण प्रवेशाची गेले सहा महिने चर्चा सुरू आहे. मध्यंतरी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चेला अधिक गती आली. त्यांनीही काही राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. राजकारणात चांगल्या व्यक्तीची गरज असते, असे सांगत त्यांनी राजकारण प्रवेशाचे सातत्याने संकेत दिले आहेत. आता तर त्यांचा हा प्रवेश निश्चित झाला आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून त्यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. भाजपला या मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार हवा आहे. यामुळे मुळे यांचे नाव या मतदारसंघातून पुढे येण्याची शक्यता आहे.


'राजकारणातील प्रवेश निश्चित आहे. त्यादृष्टीने काही नेत्यांशी चर्चा झाली आहे. निवृत्तीनंतर चोवीस तासांत पक्ष आणि लोकसभा मतदारसंघाची घोषणा करण्यात येईल.'
ज्ञानेश्वर मुळे, परराष्ट्र खात्यातील सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समितीकडून आजपासून मोफत चहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत मोफत चहावाटप करण्यात येणार आहे. देवस्थानच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्रस्तावावर झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी पाच वाजता या उपक्रमाची सुरुवात देवस्थानच्या कार्यालयासमोरील कारंजा चौकात करण्यात येणार आहे.

अंबाबाई मंदिरात दररोज सायंकाळच्या वेळेत भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमांसाठी श्रोते म्हणून ज्येष्ठ भाविक उपस्थित असतात. तसेच पर्यटक भाविकांची संख्याही वाढत आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त मंदिरात कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दिवाळीनंतर मंदिरात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे प्रमाण वाढते. थंडीच्या दिवसात सायंकाळी चहाच्या सुविधेमुळे ज्येष्ठांना फायदा होणार आहे. कायमस्वरूपी मोफत चहासेवा सुरू राहणार आहे. मंदिरात येणाऱ्या स्थानिक व पर्यटक भाविकांना चहा देण्याची सुविधा राज्यातील अनेक मंदिर व्यवस्थापनाने सुरू केली आहे. या धर्तीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही मोफत चहा देण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
यासाठी देवस्थानच्या कार्यालयाशेजारी चहाचे मशिन बसविण्यात आले आहे. दररोज किमान ५०० कप चहाची व्यवस्था करण्यात येणार असून, ही सेवा सेल्फ सर्व्हिस धर्तीवर सुरू करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिरातील मोफत चहा उपक्रमानंतर वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथे जोतिबा मंदिरातसुद्धा ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दांडी बहाद्दरांच्या नोकरीवर गंडांतर

$
0
0

आप्पासाहेब माळी,कोल्हापूर :

वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सातत्याने गैरहजर राहणाऱ्या महापालिकेच्या ३३ कर्मचाऱ्यांवर नजीकच्या काळात नोकरीवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. संबंधित वैद्यकीय अधिकारी, झाडू कामगार, मुकादम, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, वॉर्डबॉय, कनिष्ठ लिपिक यांची सध्या खातेनिहाय चौकशी सुरू आहे. दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमार्फत सध्या खातेनिहाय चौकशीचे काम सुरू आहे. तीन व सहा महिन्यांच्या कालावधीत चौकशीची प्रक्रिया पूर्ण करुन अहवाल देण्याच्या सूचना आहेत. त्या चौकशी अहवालानंतर दोषी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे समजते.

महापालिकेची विविध विभागातील कर्मचारी प्रशासकीय मान्यता न घेता सातत्याने गैरहजर राहण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. काही कर्मचारी तर सहा, सहा महिने ऑफिसकडे फिरकत नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना चाप बसावा, म्हणून प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. जुलै २०१८ मध्ये सहा झाडू कर्मचाऱ्यांना गैरहजेरीच्या कारणाावरुन नोकरीतून बडतर्फ केले.

नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत दहा कर्मचाऱ्यांना नोटीस काढून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये वर्कशॉपमधील कर्मचारी नवनाथ मुंढे, शिपाई अशोक आयवळे, झाडू कामगार महेश लाड, अमित सोळंकी, विद्या छपरीबंद, विजय दंदे, प्रदीप कांबळे, सुरेश माकडवाले आदींचा समावेश आहे. तत्पुर्वी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत २३ कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रचना व कार्यपद्धती कार्यालयाकडून कारवाईचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. सफाई विभागात गैरहजेरीचे प्रमाण जास्त आहे.

वेतनवाढ रोखली अन् दंडात्मक कारवाई

सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत साठ दिवस गैरहजर राहिले म्हणून भारती राऊत यांच्या दोन वेतनवाढी दोन वर्षासाठी बंद केल्या आहेत. फूटपाथ स्वच्छता मोहिमेमध्ये कामगार पाठविले नाही म्हणून प्रकाश चव्हाण या कर्मचाऱ्याला ५०० रुपयांचा दंड केला. सफाई कामगार प्रियेश लाड, शोभा पंडत, सुभाष कांबळे, सूरज कराडे यांच्या तीन वेतनवाढ रोखण्याची कारवाई झाली. वंदना भालकरच्या दोन वेतनवाढी रोखल्या आहेत. घरफाळा विभागातील अधीक्षक नितीन नंदवाळकर यांनी डिक्लेरेशनचे काम प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांना नोव्हेंबर महिन्यात ५००० रुपयांचा दंड ठोठावला. १३ कोटी वृक्ष लागवडीची नस्ती मुख्य लेखापरीक्षकांच्या परवानगीशिवाय कार्यालयाबाहेर दिल्याबद्दल एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नऊ महिन्यांत १२१ कर्मचाऱ्यांची चौकशी

कामात कुचराई, वरिष्ठांच्या मान्यतेशिवाय निविदा प्रक्रिया राबवणे, आयुक्तांची मंजुरी नसताना कब्जेपट्टीचे काम, चुकीच्या पद्धतीने घरफाळा आकारणी आणि पूर्वकल्पना न देता रजेवर जाणे अशा विविध कारणाखाली एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १२१ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यापैकी कुणावर वेतनवाढ रोखण्याची तर काहींवर दंडात्मक कारवाई झाली.

एप्रिलपासून झालेली कारवाई

७४ अधिकाऱ्यांवर वेतनवाढ रोखण्याची व दंडात्मक कारवाई

१२ झाडू कामगारांची खातेनिहाय चौकशीनंतर बडतर्फी

एका पवडी कामगाराचा बडतर्फीचा आदेश

कनिष्ठ लिपिक, फायरमनसह एक हेल्पर निलंबित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी सभापतीपदी शारंगधर देशमुख ?

$
0
0

स्थायीसह महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीतील सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड संबंधित पक्षांच्या व्हीपनुसार शुक्रवारच्या महासभेत झाली. विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जानेवारीअखेर स्थायी सभापतीपदाची निवड होईल. निवड झालेल्या सदस्यांमधून गटनेते शारंगधर देशमुख यांची स्थायी सभापतीपदी वर्णी निश्चित मानली जात आहे.

समितीचे नऊ सदस्य निवृत्त होत असल्याने समिती प्रवेशासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. सदस्यत्वासाठी देशमुख यांच्यासह राहुल माने व प्रतापसिंह जाधव यांनी जोरदार प्रयत्न केले होते. पण माने व जाधव यांना स्थामीमध्ये प्रवेशच मिळाला नाही. त्यामुळे देशमुख यांचा सभापतीपदाचा मार्ग अधिक सुकर झाला. देशमुख यांच्यासोबत काँग्रेसच्या माधुरी लाड, छाया पोवार, प्रवीण केसरकर, राष्ट्रवादीचे संदीप कवाळे, माधव गवंडी, ताराराणी आघाडीचे राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे व भाजपच्या सविता भालकर यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली.

सभेत महिला बालकल्याण समितीच्या सर्वच नऊ सदस्यांची निवड झाली. समितीमध्ये काँग्रेसच्या शोभा कवाळे, छाया पोवार, जयश्री चव्हाण, राष्ट्रवादीच्या मेघा पाटील, अनुराधा खेडकर भाजपच्या मनीषा कुंभार, अश्विनी बारामते तर ताराराणी आघाडीच्या सीमा कदम व मेहजबीन सुभेदार यांची निवड झाली. महिला बालकल्याण सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने पाटील किंवा खेडकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. स्थायी समिती सभापती निवडीचा कार्यक्रम पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून जाहीर होणार आहे. ३० किंवा ३१ जानेवारी रोजी सभापतीपदासाठी मतदान होण्याची शक्यता आहे. सभापती निवडीमुळे पुन्हा एकदा महापालिकेचे राजकारण ढवळून निघणार आहे.

.......................................

चौकट

जाधव , माने अनुपस्थित

स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक राहुल माने व प्रतापसिंह जाधव इच्छूक होते. मानेंचा कार्यकाळ संपला असला, तरी पुन्हा स्थायीमध्ये येण्यासाठी तर जाधव यांनी सदस्यत्वासह सभापतीपदासाठी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली होती. दोघांनाही स्थायीमध्ये सदस्यत्व दिले गेले नाही. त्यामुळे आजच्या महासभेला दोघांनी अनुपस्थिती दाखवली. जाधव हे थेट नाराजी व्यक्त करत बैठकीतून निघून गेल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांकडे २५ कोटी थकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांची भाडेआकारणी रेडिरेकनरप्रमाणे सुरू झाल्यानंतर अनेक गाळेधारकांनी भाडेपट्टीला विरोधा केला. तसेच काहींनी कोर्टातही धाव घेतली असून त्यामुळे २५ कोटींची थकबाकी गाळेधारकांकडे आहे, अशी माहिती प्रशासनाने शुक्रवारच्या महासभेत दिली. सुविधा देत नसाल, तर रेडीरेकरन पद्धतीने भाडेपट्टी कशाला आकारता, असा प्रश्न उपस्थित करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

महापालिकेच्या रिकाम्या दुकानगाळ्यांची निविदा मागवून गाळे भाड्याने देण्याबाबतचा इस्टेट विभागाचा प्रस्ताव चर्चेला आला. इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांनी याबाबतची माहिती दिली. तौफिक मुल्लाणी यांनी नगररचना व शिवाजी मार्केटमध्ये लिफ्टची सुविधा नसताना रेडीरेकनरप्रमाणे दर आकारणी कशासाठी करता, अशी विचारणा केली. तर किरण नकाते यांनी हॉकी स्टेडियमच्या दुकानगाळ्यांचा विकास कधी करणार?, असा सवाल केला. संतोष गायकवाड यांनी स्टेडियमचे मालक कोण असा मुद्दा उपस्थित केला. दुकानगाळ्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले. यावेळी बराले यांनी महापालिकेचे २,९३८ गाळे असून १,३०० गाळ्यांची मुदत संपली आहे. रेडिरेकन दराप्रमाणे भाडे भरण्यास विरोध केल्याने २५ कोटीची थकबाकी असल्याचे सांगितले. चर्चेत सुनील कदम, रुपाराणी निकम, उमा बनछोडे, अजित ठाणेकर, आशीष ढवळे, प्रतिज्ञा निल्ले यांनी सहभाग घेतला

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेची कोणतीही इमारत भाडेतत्वावर अथवा विक्री करताना रेडिरेकनर दराप्रमाणेच करावी लागेल. गाळेधारकांनी याबाबत सरकारला निवेदने सादर केली आहेत. सरकारकडून सद्य:स्थितीत आदेश आल्यास गाळ्यांचे मूल्य ठरवू.' त्यावर महापालिका ढबघाईला आली आहे, स्वत: पत्रव्यवहार करा, अशी सूचना उपमहापौर शेटे यांनी केली.

...

चौकट

व्यंगचित्रातून व्यथा

नगररचना व शिवाजी मार्केट येथील लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. नगररचना विभागात तर अभ्यागतांना धापा टाकतच जीने चढावे लागतात. त्याचे चित्रण काही सदस्यांनी व्यंगचित्रातून सभागृहात मांडले. तौफिक मुल्लाणी, प्रवीण केसरकर व लाला गायकवाड यांनी ही व्यंगचित्रे महापौर व आयुक्तांना दाखवली. त्यावर प्रशासनाने सोमवारपासून शिवाजी मार्केटमधील लिफ्टच्या कामाला सुरुवात होणार असल्याचा खुलासा केला.

...

विविध प्रस्तावांना मंजुरी

करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखड्यामधील दर्शन मंडप बांधण्यासाठी रिसनं ४६२/३ या मिळकतीमधील आरक्षण क्र. ५५ नुसार वाहनतळासाठी आरक्षित जागा अशा बदलाचा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात आला. महावीर गार्डनमध्ये भगवान महावीर यांचा पुतळा बसविणे, कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प, २०० चौ. मी. बांधकाम परवाना विभागीय कार्यालयाने देणे आदी प्रस्तावांना सभेने मंजुरी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’साठी मंडलिक, ‘डीवाय’ची निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना, डॉ. डी.वाय पाटील कारखान्यासह चंदगड तालुका खरेदी विक्री संघाने निविदा भरली आहे. जिल्हा बँकेने कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा भरलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींची शंका निरसन करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा बँकेत बैठक झाली.

जिल्हा बँकेने दौलत कारखाना भाड्याने देण्यासाठी जाहिरातीद्वारे निविदा मागवल्या आहेत. मंडलिक कारखाना, डी.वाय. पाटील कारखाना आणि चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ या तीन संस्थांनी कारखाना चालवण्यासाठी निविदा भरली आहे. निविदा भरलेल्या कारखाने व संस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली. बैठकीत तीनही संस्थांच्या प्रतिनिधींनी कायदेशीर बाबी, शेतकऱ्यांची देणी, कामगारांची देणी याबाबत शंका उपस्थित केल्या. बँकेच्या वतीने त्यांचे निरसन केले. बैठकीला संचालक अनिल पाटील, आसिफ फरास, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्राधिकृत अधिकारी विकास जगताप, कायदा विभागाचे प्रमुख आर. जे. पाटील, कर्ज विभागाचे रणवीर चव्हाण, बँकेच्या वतीने ॲड. रमेश बदी, सीए महेश गुरव सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदाजण निर्दोष

$
0
0

इचलकरंजी : जमावबंदी आदेशाचा भंग करुन रास्ता रोको आंदोलन केल्याच्या आरोपातून येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांसह १४ जणांची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये जयवंत लायकर, सागर चाळके, नितीन जांभळे, विठ्ठल चोपडे, उदयसिंग पाटील आदींचा समावेश आहे. येथील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाचे उपरोक्त चौद जणांची निर्दोष मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेचे उमेदवार पक्ष चिन्हांवर

$
0
0

कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेचे उमेदवार पक्ष चिन्हांवर

अपक्षांना मेणबत्ती, कपबशी, गॅस सिलेंडर, शिट्टी, नारळ, हॅट

म. टा. वृत्तसेवा, कराड

मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत गुरुवारी, १७ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. या मुदतीत नगराध्यक्ष पदाच्या तीन तर नगरसेवक पदाच्या १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून उमेदवारांना चिन्ह वाटप केले आहे.

अंतिम यादीनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सारीका प्रशांत गावडे तर कॉंग्रेसच्या नीलम धनंजय येडगे यांचे अर्ज अंतिम झाले आहेत.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी भाजप व कॉंग्रेस उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. तसेच नगरसेवक पदासाठी कॉंग्रेसचे १९, भाजप १८, अपक्ष ७ व शिवसेनेचा १ उमेदवार रिंगणात आहेत. यातील कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवत असून, अपक्ष उमेदवारांना मेणबत्ती, कपबशी, गॅस सिलेंडर, शिट्टी, नारळ, हॅट अशी चिन्हे देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्याच्या कार्यालयावर वृत्तपत्र विक्रेत्यांचा २१ ला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांना विविध लाभ देण्याची अंमलबजावणी त्वरित करावी, कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, आदी मागण्यांसाठी येथील राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पुढाकाराखाली पाच जिल्ह्यांतील वृत्तपत्र विक्रेत्यांचा २१ जानेवारीला ताराराणी चौकातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष शिवगोंडा खोत, सचिव रघुनाथ कांबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्र वृत्तपत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गतवर्षी संघटनेच्या अधिवेशनात पालकमंत्र्यांनी मागण्यांसंबंधी सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही ते पूर्ण झालेले नाही. सरकारने कल्याणकारी मंडळाऐवजी वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा मंडळातर्फे सुविधा देण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.'

पालकमंत्री पाटील यांनी मागण्यांबाबत पाठपुरावा केलेला नाही. दिलेले आश्वासन पाळले नाहीत. त्यामुळे २१ जानेवारीला महावीर गार्डनपासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चात कोल्हापूर शहर, जिल्हा, सांगली, इचलकरंजीसह पाच जिल्ह्यांतील विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित होईल. त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर नागपुरात २७ जानेवारीला होणाऱ्या राज्य अधिवेशनात पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल. यावेळी शंकर चेचर, श्रीपती शियेकर, किरण व्हणगुत्ते, मारुती नवलाई, रणजित आयरेकर, विकास सूर्यवंशी, प्रशांत जगताप, सचिन चोपडे आदी उपस्थित होते.

००००

महत्त्वाच्या मागण्या अशा : सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करावा, विक्रेत्यांची अधिकृतपणे नोंदणी करून घ्यावी, मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत मिळावी, शहरात सरकारने किंवा महापालिकेने स्टॉलसाठी जागा द्यावी, आरोग्य विमा लागू करावा.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट पाईपलाईन टेंडरमध्ये घोडेबाजार

$
0
0

सुनील कदम यांचा आरोप, आठवड्यात सुकाणू समितीची बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना नोव्हेंबर २०१६ पर्यंत कार्यन्वित करण्याची मुदत होती. मात्र ती अद्याप पूर्णत्वाकडे गेली नसून कामाची माहिती सभागृहासह नागरिकांना नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कामाला दिरंगाई होत असल्याने महापालिकेवर ४२ कोटी ५० लाखांचा अतिरिक्त बोजा पडला असून योजनेच्या टेंडरमध्ये घोडेबाजार झाला असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत नगरसेवक सुनील कदम यांनी केला. योजनेच्या कामाचा प्रशासनाने आढावा घेतल्यानंतर सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी पुढील आठवड्यात सुकाणू समितीची बैठक घेण्याबरोबरच संपूर्ण कामाची पाहणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

महासभेत थेट पाईपलाईन योजनेची श्वेत पत्रिका काढण्याचा सदस्य ठराव आला होता. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता होती. योजनेची उपयुक्तता लक्षात घेऊन गांभीर्याने प्रश्न मांडण्यात आले. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी योजनेचा संपूर्ण आढावा घेत दिरंगाईबद्दल कंपनीला दंड केला असून लवकरच जॅकवेलच्या कामाला सुरुवात होईल, असे स्पष्ट केले. पण दिरंगाईबाबत कोणतेच स्पष्टीकरण न मिळाल्याने नगरसेवक संतप्त झाले. शिंगणापूर योजनेतील ९० टक्के जलवाहिन्या बदलण्यात आल्याचा आरोप करताना कदम म्हणाले, 'कामाला दिरंगाई होत असताना ठेकेदार व कंपनीशी कितीवेळा पत्रव्यवहार केला. २५ लाखांच्या ब्रीजचे बिल अडीच कोटी काढणाऱ्या कंपनीवर गुन्हा का दाखल केला नाही. शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना आयुक्त म्हणून आपण कितीवेळा भेट घेतली. पाईपलाईन टाकली असली, तरी अद्याप विद्युत पुरवठ्यासाठी पाठपुरवा केलेला नसून केवळ टेंडरमध्ये घोडेबाजार करण्यात धन्यात मानली.' यावेळी काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली. अजित ठाणेकर म्हणाले,' आढावा बैठकीत २९८ कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. पंधरा दिवसांत १५ कोटी खर्च वाढला.' चर्चेत मुरलीधर जाधव, विजय खाडे-पाटील, शेखर कुसाळे, प्रा. जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

.....

चौकट

जागा आरक्षणाचा ठराव

पंचगंगा नदी प्रदुषणामध्ये शहरातील नाले मोठी भर घालतात. अशा सात नाल्यांवर केटीवेअर पद्धतीचे बंधारे बांधून सांडपाणी रोखण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा आरक्षित करण्याची आवश्यकता आहे. याबाबतच्या कार्यालयीन प्रस्तावाला सभागृहाने उपसूचनेसह मंजुरी दिली. सभागृहाचा ठराव सरकारकडे पाठवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. केटीवेअर बंधाऱ्यांमुळे सांडपाणी थेट नदीत मिसळण्यास पायबंद बसून पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

...

चौकट

योजनेतील पैशांवर दरोडा

थेट पाईपलाईन योजनेमध्ये प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'जलअभियंता कुलकर्णी यांची कनिष्ठ पदावर नियुक्ती झाली असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या योजनेचा जबाबदारी कशी दिली आहे? योजनेचे समन्वयक बी. एम. कुंभार यांचा मुलगा युनिटी कन्सलटंटमध्ये नोकरीस असून मुलगा बिल काढणार आणि वडील मंजूर करणार अशी स्थिती असून एक प्रकारे योजनेतील पैशांवर दरोडा टाकला जात आहे. परवानगीसाठी आपण सर्वजण वनखात्याच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसूया.'

...

तर हत्तीवरुन मिरवणूक काढू

थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठ्यासाठी शहरातील माता-भगिनी आतुरतेने वाट पाहत आहेत. वैयक्तिक लक्ष घालून काम पूर्ण करा, असे आयुक्तांना आवाहन करताना कमलाकर भोपळे यांनी हत्तीवरुन मिळवणूक काढण्याचे आश्वासन दिले. यावर सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी त्वरीत यु टर्न घेत 'वर्षाच्या आत' असे म्हणताच पुन्हा हस्याचे फवारे उडाले. यावेळी आयुक्तांनीही हसून दाद दिली.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ कारखान्यांकडून ५९७ कोटी जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विभागातील २५ साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून पहिल्या हप्त्यापोटी ५९७ कोटी ५४ लाख २२ हजार रुपये जमा केले आहेत. विभागातील ३६ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, शरद, जवाहर, पंचगंगा, वारणा, घोरपडे, तर सांगली जिल्ह्यातील महाकाली, वसंतदादा, केन अॅग्रो, निनाईदेवी या कारखान्यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे कमी झालेले दर, साखरेचा कमी उठाव आणि बँकेकडून मिळणाऱ्या कर्जातून एफआरपी देण्यास कारखानदारांनी असमर्थता दर्शविली आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. एफआरपी देण्यासाठी कमी पडणारे ५०० रुपये राज्य सरकारने अनुदानपोटी सरकारच्या खात्यावर जमा करण्याची मागणी कारखानदारांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच साखरेचा भाव प्रतिक्विंटल २९०० वरून ३४०० रुपये करण्याची मागणी केली आहे. पण राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून प्रतिटन २३०० रुपये ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे.

गेल्या दोन महिन्यांत कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांनी ९३ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. २५ कारखान्यांनी २३०० रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे. या घटनेने स्वाभिमानीने आंदोलन पुकारल्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यालयांना शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. तसेच सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांची कार्यालये पेटवून दिली. या घटनेनंतर कारखानदार व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन आंदोलन मागे घेतले. यापुढे कोणत्याही कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून भरणा करू नये, असा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान दत्त, गुरुदत्त, शरद, जवाहर, पंचगंगा, वारणा, घोरपडे या कारखान्यांनी अजूनही पहिला हप्ता जमा केलेला नाही. त्यामुळे ते २३०० रुपयांचा भरणा करणार की एकरकमी एफआरपी देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर विभागातील २०४५ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हेमरसने पहिल्या हप्त्यापोटी ३६ कोटी ३४ लाख, दालमियाने ३२ कोटी ३० लाख, कुंभी-कासारीने ३० कोटी ५८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.

०००००

कोल्हापूर विभागातील एकूण कारखाने : ३६

पहिला हप्ता जमा करणारे कारखाने : २५

एफआरपी न दिलेले कारखाने : ११

पहिला हप्ता जमा झालेली रक्कम : ५९७ कोटी ५४ लाख रुपये

थकीत एफआरपी रक्कम : २०४५ कोटी रुपये

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहिद प्रदिप कुंभारकर अंत्यसंस्कार

$
0
0

इस्लामपूर,

वाळवा तालुक्यातील कोरेगाव (जि. सांगली) येथील शहीद जवान प्रदीप शिवाजी कुंभार यांच्यावर आज कोरेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीप कुंभार अमर रहे, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जवान प्रदीपच्या आई आणि पत्नीने केलेला आक्रोश पाहून उपस्थितीतही हेलावले. त्याच्या सात महिन्यांच्या मुलीकडे पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रदीप यांचे पार्थिव कोरेगाव येथे आणण्यात आले. सर्वप्रथम प्रदीप यांच्या घरी काहीवेळ पार्थिव ठेवण्यात आले. कुटुंबियांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर गावातील मुख्य चौकात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सजवलेल्या वाहनातून पार्थिवाची गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील लोक जमा झाले होते. अंत्ययात्रेत उपस्थितांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सैन्यातील अधिकारी आणि जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली. कोरेगाव आणि बहादुरवाडी दरम्यानच्या राजारामनगर (माळवाडी) परिसरात ग्रामस्थांनी तयार केलेल्या चबुतर्‍यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीपचे लहान भाऊ प्रशांत कुंभार यांनी भडाग्नी दिला.

जवान प्रदीप कुंभार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मुलगा गेल्याचे समजल्यापासून प्रदीपचे वडील शिवाजी कुंभार यांना धक्का बसला आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी प्रदीपचा विवाह झाला आहे. त्याला सात महिन्यांची मुलगी आहे. आज शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी आदरांजली वाहिली. प्रांताधिकारी नागेश पाटील, अप्पर तहसिलदार सुनील शेरखाने, शिवसेनेचे धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष संग्राम पाटील, कुंभार समाज्याचे नेते नंदकुमार कुंभार, राहुल महाडीक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड्. विश्वासराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, सरपंच मयूर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बी. के. पाटील, आदर्श अ‍ॅकॅडमीचे दिलीपराव देसावळे यांनी आदरांजली वाहिली. सांगली येथील डॉ. डी. बी. पाटील (दूधगावकर) यांनी यापुढे कुंभार कुटुंबियांचा सर्व वैद्यकीय खर्च उचलणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उकळत्या रसाच्या काहिलीत पडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील गुऱ्हाळातील उकळत्या रसाच्या काहिलीत उडी घेऊन गौतम मल्लू कांबळे (वय २२, रा. तामगाव, ता. करवीर) या कामगाराने आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी सात वाजता घडलेल्या या घटनेत गौतम ९५ टक्के भाजल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी : गौतम कांबळे ऑक्टोबर २०१८ पासून कसबा वाळवे येथील सचिन शिवाजी पाटील यांच्या गुऱ्हाळात काम करतो. तो गुऱ्हाळगृहातच राहात होता. तो गुऱ्हाळात चुलीमध्ये चिपाडे टाकण्याचे काम करत होता. शुक्रवारी पहाटे चार वाजता गुऱ्हाळघरातील सर्व कामगारांनी काम सुरू केले. सातच्या सुमारास सर्व कामगार चहा पिण्यासाठी एकत्र आले. यावेळी गौतम तेथून अचानक उठला आणि पळतच रस उकळत असलेल्या काहीलीकडे वळला. काही कळायच्या आत त्याने उकळत्या रसात उडी घेतली. घडलेला हा प्रकार त्याच्या सोबत काम करणारा कामगार रघुनाथ वाळवेकर यांनी पाहिला. त्यांनी आरडाओरड केली. काहीलीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने अन्य कामगारही धावले. मात्र, उकळत्या काहीलीत जाण्याचे धाडस कोणी केले नाही. त्याला काहीलीतून बाहेर काढण्यास उशीर झाला. कामगारांनी याबाबतची माहिती गुऱ्हाळघरमालक पाटील यांना दिली. त्यानंतर ते तातडीने तेथे आले. त्यानंतर त्यांच्यासह कामगारांनी गौतमला काहीलीबाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. गौतम मरण पावल्याची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवारांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद सीपीरआर पोलिस चौकीत झाली आहे.
दरम्यान, गुऱ्हाळगृहावर राधानगरी पोलिसांनी भेट देऊन कामगारांचे जबाब घेतले. गौतमने आत्महत्या की घातपात केला, याबाबत राधानगरी पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात आई, विवाहित भाऊ असा परिवार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा २८ जानेवारीला कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा २८ जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जानेवारीपासून परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या कामकाजाचा पर्दाफाश केला जात आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

निर्धार परिवर्तन यात्रेची सुरूवात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघांतील गावांमधून होणार आहे. जिल्ह्यातील पहिली परिवर्तन सभा चंदगड येथे सकाळी ११ वाजता होईल. त्यानंतर कागल व राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील गावामधून यात्रा जाणार आहे. दुपारी दोन वाजता मुदाळ येथे सभा होईल. कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर सायंकाळी पाच वाजता तर शिरोळ रात्री ७.३० वाजता परिवर्तन सभा होणार आहे.

विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के. पी. पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित राहतील अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images