Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संसदरत्न पुरस्काराने खासदार महाडिक सन्मानित

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संसदेच्या दोन्ही सभागृहात समाज आणि देशहिताचे काम चालावे ही नागरिकांची अपेक्षा असते. संसद सुरळीतपणे चालली तर लोकहिताचे अनेक महत्वाचे कायदे मंजूर होतात हा अनुभव आहे. त्यामुळेच खासदारांची संसदेतील सक्रियता महत्वाची आहे. सातत्याने अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे लोकशाहीचा पाया आणखी बळकट करणे होय' असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले. चेन्नईत राजभवनमध्ये आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, भ्रातहरी महाताब, अनुराग ठाकूर, श्रीरंग बारणे, विरप्पा मोईली आणि राजीव सातव यांनाही संसदरत्न पुरस्कार देण्यात आला.

पीआरएस इंडिया, प्रोसेंन्स प्राइम पॉईंड फाऊंडेशन आणि केंद्रीय संसदरत्न समितीतर्फे संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कार दिला जातो. संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक के. श्रीनिवासन यांनी पुरस्कारीमागील भूमिका विषद केली. पुरस्कार विजेत्या खासदारांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. आणि सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाडिक यांचे विशेष कौतुक केले.

'पहिली टर्म असतानाही महाडिक यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत, सर्व खासदारांमध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल अभिमान वाटतो' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमुद केले. सत्काराला उत्तर देताना खासदार महाडिक म्हणाले, 'खासदार म्हणून निवडून आल्यापासून विकासात्मक आणि विधायक दृष्टीने काम केले. अनेक वर्षे रखडलेले जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लावले. हा पुरस्कार आपण कोल्हापूरच्या नागरिकांना समर्पित करत आहे.'

सोहळ्याला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेंदाळमधील ७३० कुटुंबांचा प्रश्न मार्गी

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मानेनगर वसाहतीत गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मिळकतधारकांची नावे सातबारा पत्रकी नोंद नव्हती. त्यामुळे त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनाने शनिवारी तत्काळ तहसील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महसूल प्रशासनाने महिन्याभरात मिळकतदारांची नावे सातबारा पत्रकी नोंद केली जातील, अशी सकारात्मकता दाखविली.

प्रांताधिकारी समीर शिंगटे व तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या सकारात्मक निर्णयाने तसेच भाजप नेते महावीर गाट यांच्या प्रयत्नाने सुमारे ४४९ मिळकतधारक व ७३० कुटुंबांचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार सुरेश हाळवणकर यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले होते. महावीर गाट यांनी शिष्टमंडळासह प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन याप्रकरणी बैठक घेण्याची मागणी केली होती. शनिवारी सकाळी हातकणंगले तहसील कार्यालयात प्रांताधिकारी शिंगटे व तहसीलदार सुधाकर भोसले, अतिरिक्त तहसीलदार सविता सावंत यांनी सर्व मिळकतधारकांशी सकारात्मक चर्चा केली. त्यामध्ये एक महिन्यात प्रत्यक्ष मालकाच्या खरेदी पत्राप्रमाणे कागदपत्रांची छाननी करून नावे नोंद करण्याचे आश्वासन शिंगटे यांनी दिले तसेच याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मंडल अधिकारी व संबंधित तलाठ्यांना दिले. त्यामुळे सकारात्मक चर्चा झाल्यामुळे वसाहतीतील रहिवाशांनी उपोषण मागे घेत असल्याचे लेखी पत्र तहसीलदार भोसले यांना दिले.

बैठकीस हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, महावीर गाट, रेंदाळचे सरपंच विजय माळी, महेश कोरवी, अमित गाट, अभिषेक पाटील, अॅड. संदीप कदम, आदींसह वसाहतीतील रहिवासी उपस्थित होते.

००००

कोट...

मानेनगर वसाहतीचा ४० वर्षांपासूनच प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. येथील रहिवाशांनी आपल्याकडे असलेली कागदपत्रे, खरेदीदस्त घेऊन स्वतंत्र बैठक घ्यावी, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आणण्याची जबाबदारी माझी राहील.

महावीर गाट,भाजप नेते

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक विभागाकडून ११ व्हिडिओ गेम सील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करमणूक विभागाने शहरातील ११ व्हिडिओ गेम सेंटरवर कारवाई करून ते सील केले. लक्ष्मीपुरीतील लिबर्टी, शुभ लिबर्टी, श्री आर. किंग, यादगार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मंगेश, मंगेश लिबर्टी, गोखले कॉलेजजवळ लकी, आपटेनगर परिसरातील रॉयल, ओम श्री या गेम झोनवर कारवाई करण्यात आली. करमणूक विभागाकडून नागरिकांचे मनोरंजन व करमणुकीसाठी व्हिडिओ गेम पार्लरमध्ये ऑनलाइन कम्प्युटर गेमझोनसाठी परवानगी दिली जाते. पण सेंटरच्या मालकांकडून जुगार सुरु असलेल्या तक्रारी मिळाल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी करमणूक विभागाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर विभागाच्या पथकांनी सेंटरला भेट दिली. त्या ठिकाणी जुगार सुरू असल्याचे सिद्ध झाल्याने ११ सेंटर सील करण्यात आली.

०००

(मूळ कॉपी)

करमणूक विभागाकडून

११ ऑनलाइन जुगार सील

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक विभागाने शहरातील ११ऑनलाइन जुगार सेंटरवर कारवाई करुन सील करण्यात आले. लक्ष्मीपुरीतील लिबर्टी, शुभ लिबर्टी, श्री आर. किंग, यादगार, मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील मंगेश, मंगेश लिबर्टी, गोखले कॉलेजजवळ लकी, आपटेनगर परिसरातील रॉयल, ओम श्री या गेम झोनवर कारवाई करण्यात आली.

करमणूक विभागाकडून नागरिकांची करमणूक व मनोरंजनासाठी ऑनलाईन कॉम्प्युटर गेम झोनसाठी परवानगी दिली जाते. पण सेंटरच्या मालकांकडून जुगार सुरु असलेल्या तक्रारी मिळाल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी करमणूक विभागाला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर विभागाच्या पथकांनी सेंटरला भेट दिली. त्या ठिकाणी जुगार सुरु असल्याचे सिद्ध झाल्याने ११ सेंटर सील करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टी शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत, असे पत्रक राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धिस दिले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कोल्हापूर दौऱ्यात अडवणार, असे वक्तव्य शेट्टी यांनी केले होते. त्याला विरोध करताना भाजप कार्यकर्त्यांनी जे पत्रक काढले ते अत्यंत दुर्दैवी आहे अशी टीका मुश्रीफ यांनी केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीचा लढा पुकारला असून त्यांनी कारखानदारांबरोबर कोणतीही तडजोड केलेली नाही. एफआरपीप्रश्नी त्यांनी आंदोलन करून कारखाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यावेळी एका विशिष्ट धर्माच्या लोकांचा ऊस गेला आहे; बहुजनांचा राहिला आहे, असे जातीय वक्तव्य करणारे पत्र प्रसिद्धीस दिले गेले. ते अत्यंत दुर्देवी असून त्याला माझा आक्षेप आहे. कारखाने जात पाहून ऊस नेत नाहीत, तो क्रमपाळीप्रमाणे नेतात. गेल्या चौदा-पंधरा वर्षांमध्ये उसाचे जादा पैसे शेट्टी यांच्यामुळे मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या मनातील ही भावना कोणीही पुसून काढू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून कारखानदारांनाही शेतकऱ्यांचा योग्य मोबदला दिल्याशिवाय पर्याय नाही, हे मान्य करण्यास भाग पाडले आहे. ही सर्व चळवळ संघर्ष करून त्यांनी निरपेक्षपणाने केली. कारखानदारांबरोबर त्यांनी कधीही जुळते घेतलेले नाही ही वस्तूस्थिती आहे. माझा आणि राजू शेट्टींच्या मतभेदाचा मुद्दा इतका आहे इतकाच आहे की ते व्यावहारिक दृष्टिकोन ठेवत नाहीत, हट्टीपणा करतात. ज्याप्रमाणे दूध संघ काढून त्या व्यवसायातील गमक त्यांना कळाले, त्याप्रमाणे त्यांनी साखर कारखाना काढावा किंवा चालवायला घेतला तर त्यातीलही गमक त्यांना कळेल.

मतभेद कायम राहतील...

'ऊस दर, पहिली उचल, ऊस परिषद, एकरकमी एफआरपीवरुन माझे आणि खासदार शेट्टी यांच्याशी आजही मतभेद आहेत. ते पुढेही कायम राहतील. केंद्र आणि राज्य सरकार केवळ शेट्टी यांची कोंडी करण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण ते फक्त गोड बोलतात. सरकारला साखर उद्योगातून दरवर्षी हजारो कोटींचे उत्पन्न जीएसटीच्या रुपात सरकारला मिळते. उत्तरप्रदेश, पंजाब आदी राज्यांनी हजारो कोटींचे पॅकेज ऊस उत्पादकांना दिले. या सरकारने काही केले नाही. साखरेचा किमान भाव २९०० रुपयांवरून ३४०० रुपये प्रतिक्विंटल करावा, ही एक मागणी मान्य केली तरीही सरकारला कारखान्यांना मदत करण्याची वेळ येणार नाही' असे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी निवडीसाठीतारीख निश्चिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण सभापतीच्या निवडीसाठी शनिवारी महापालिका प्रशासनाने पुणे विभागीय आयुक्तांकडे तारीख व वेळ देण्यासाठी पत्र पाठविले आहे. दोन्ही सभापतींसोबत गांधी मैदान प्रभाग समिती सभापतींचीही निवड यावेळी निवड होणार आहे. स्थायी समितीचे सभापती आशीष ढवळे आणि महिला - बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दोन्ही सभापतिपदे रिक्त आहेत. तर गांधी मैदान प्रभाग समिती सभापतिपदाचा प्रतीक्षा पाटील यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त आहे. रिक्त पदांवर निवडीसाठी समिती सदस्यांना कार्यक्रम पत्रिका देणे, नामनिर्देशनपत्रे तयार करणे व स्वीकारणे यासाठी कालावधी निश्चित करून विशेष सभा घेणे आवश्यक आहे. सभेसाठी तारीख व पिठासन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी शनिवारी महापालिका प्रशासनाने पुणे विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील चारवीरपत्नींना शेतजमीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील चार वीरपत्नींना मोफत शेतजमीन देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात दिली. २६ जानेवारीपूर्वी त्यांच्या ताब्यात जमीन देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी तहसीलदारांना दिले. याशिवाय आणखी तीन वीरपत्नी पसंतीच्या जमिनीचा शोध घेत आहेत.

चंदगड तालुक्यातील कार्वे येथील राजेंद्र तुपारे हे जम्मू काश्मीर येथील 'ऑपरेशन रक्षक'वेळी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये शहीद झाले. त्यांच्या पत्नी शर्मिला यांना दाटे येथे दोन हेक्टर जमीन मिळणार आहे. चंदगड तालुक्यातीलच महिपाळगड येथील महादेव तुपारे हेसुद्धा ९ मार्च २०१७ रोजी 'ऑपरेशन रक्षक' मोहिमेवेळी शहीद झाले. त्यांच्या पत्नी रुपाली यांना दाटे येथील दोन हेक्टर जमीन मिळणार आहे. प्रविण येलेकर (रा. बहिरेवाडी, ता. आजरा) हेही ऑपरेशन रक्षकवेळीच १० नोव्हेंबर २०१७ मध्ये शहीद झाले. त्यांच्या पत्नी पूनम यांना देवकांडगावमधील १ हेक्टर ४४ गुंठे जमीन मिळेल. तर १८ जानेवारी २०१८ मध्ये अनंत धुरी (रा. बेळेभाट, ता. चंदगड) हे ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झाले. त्यांच्या पत्नी अस्मिता यांना दाटेमधील २ हेक्टर जमीन मिळेल. त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

दरम्यान, शहीद नायक सुनील जोशीलकर (रा. लिंगनूर, कसबा नूल, ता. गडहिंग्लज) यांच्या पत्नी संध्या, शहीद नायब सुभेदार दुरदुंडी कंकनवाडी यांच्या पत्नी सुवर्ण आणि शिपाई उत्तम भिकले (रा. हडलगे, ता. गडहिंग्लज) यांच्या पत्नी सुगंधा यांनाही जमीन मिळणार आहे. सरकारी मुलकीपडमधील त्यांच्या पसंतीच्या जमिनींचा शोध घेतला जात आहे. त्यांना होकार असलेली जमीन देण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील सात वीरपत्नींना शेतजमीन मिळणार आहे.

लोगो : गुड न्यूज लोगो घेणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा मृत्यू

0
0

कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील बिऊर येथील रुपाली पोपट पाटील या विवाहितेचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. विष प्राशन केल्यामुळे उपचारासाठी त्यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची सीपीआर पोलिस चौकीत नोंद आहे. पोलिसाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यापासून क्रीडा स्पर्धा

0
0

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेला मंगळवारी (ता.२२) सुरूवात होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. जिल्हा परिषद अध्यक्षा शाौमिका महाडिक अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील प्रमुख उपस्थित राहतील. कसबा बावडा रोडवरील पोलिस मुख्यालय येथील क्रीडांगणावर तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. बुधवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद कर्मचारी कलामंचतर्फे 'माझी कला' हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर गुरुवारी (ता.२४) सायंकाळी चार वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युती झाल्यास आबिटकर उमेदवार

0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास आमदार प्रकाश आबिटकर हेच युतीचे उमेदवार असतील,' असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाबार्ड योजनेतून पूर्ण झालेल्या भोगावती नदीवरील कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मारुती धोंडी पाटील होते.

मंत्री पाटील म्हणाले, 'भाजप सरकारने चार वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला असताना सहकारी पक्षाकडून केली जाणारी टीका हास्यासपद म्हणावी लागेल. जर आमच्या घोषणा खोट्या आहेत तर त्यांचे आमदार कोणत्या विकासकामांची उद्घाटने करत आहेत. केवळ राज्य चालवायचे म्हणूनच मुंबई महापालिकेत शिवसेनेला महापौरपदाची संधी दिली, अन्यथा भाजप मुंबईत महापौर करू शकला असता याची नोंद शिवसेनेच्या नेत्यांनी घ्यायला हवी. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना आमची गरज लागणार आहे याची त्यांनी जाणीव ठेवावी.

ते पुढे म्हणाले, 'सांडपाण्याच्या निर्गतीसाठी चार-पाच गावांतील पाणी एकत्रित करून लवकरच एसटीपी योजना कार्यान्वित करणार असून, १७०० कोटी बजेट असणाऱ्या खात्याला एक लाख पाच हजार कोटी बजेट उपलब्ध करून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. ही विकासकामे पूर्ण होताना सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच माझे समाधान आहे. केवळ सहा खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पंतप्रधानपदाची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. आम्ही केलेल्या रस्त्यांच्या कामामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना सेल्फी वुईथ खड्डा काढण्याची गरज भासणार नाही.'

यावेळी राहुल देसाई, व्ही. टी. जाधव, सुरेश बावडेकर, मधुकर किरूळकर, अशोक सरनोबत यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर रोडवर आज हॅपी स्ट्रीट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक खेळ आणि करमणुकीचा मिलाफ साधणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम रविवारी (ता.२०) सायबर रोडवर रंगणार आहे. अबालवृद्धांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असलेल्या या कार्यक्रमाला सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ होईल.

सायबर रोड ते एनसीसी भवनपर्यंतच्या मार्गावर 'हॅपी स्ट्रीट'ची धमाल अनुभवता येणार आहे. बालपणातील खेळाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. या उपक्रमात पारंपरिक खेळाची रेलचेल असेल. यामध्ये लगोरी, रस्सीखेच, दोरीवरील उड्या, टायर पळविणे, पोत्यात पाय घालून पळणे, लेझीम पथक, विटी दांडू या खेळांचा समावेश आहे. अंगभूत कुलागुणांच्या सादरीकरणाचे हक्काचे व्यासपीठ म्हणून 'हॅपी स्ट्रीट'ला नागरिकांची पसंती मिळत आहे.

'हॅपी स्ट्रीट'चे टायटल प्रायोजक फ्रू स्टार...फ्रूटड्रिंक-संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय स्पॉन्सर दि आयडियल कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल पार्टनर श्री ट्रॅव्हल्स, फिटनेस पार्टनर एफ थ्री जीम, लगेज पार्टनर बॅग ट्रॅव्हल बॅग ऑन रेंट हे आहेत. उपक्रमाचे उद्घाटन आयुक्त अभिजित चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे, शिक्षण सहसंचालक अजय साळी, विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, प्रवीण केसरकर, मुरलीधर जाधव, लाला भोसले, जयश्री जाधव, रुपाराणी निकम, प्रतिज्ञा निल्ले, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कोल्हापूरच्या सामाजिक स्वास्थासाठी कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे.

पारंपरिक खेळ, गीत आणि नृत्यांचा आविष्काराची पर्वणी ठरलेल्या 'हॅपी स्ट्रीट'मध्ये विविध संस्था, संघटनांचा सहभाग वाढला आहे. मिमिक्री, नकला, समृहनृत्य, लोकनृत्य, पथनाट्य अशा विविध कलाप्रकारांचे धमोकदार सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरत आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ अपहाराच्या चौकशीसाठी ऑडिटरची नियुक्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ शाखेतील ३७ लाखांच्या अपहारप्रकरणी ऑडिटर सी. जी. चौगुले यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांची फेर लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आहे. चौगुले यांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांनी दिले आहेत.

संघाच्या शिरोळ शाखेतील ३७ लाखांच्या अपहारप्रकरणी प्रमुख संशयित शाखाधिकारी अमर गुरव, तपासणी प्रमुख दीपक देसाई, निरीक्षक शहाजी जाधव आणि प्रकाश काळे व मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गुरव याने मिश्र खत तसेच साबणासह अन्य पदार्थांची परस्पर विक्री करुन ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. संशयित गुरववर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑडिटर चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना दोन दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा आधार घेऊन नवीन सहकारी कायद्यानुसार जिल्हा निबंधकांची परवानगी घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोलापूर विद्यापीठानेजागतिक क्रमवारीत स्थान निर्माण करावे’

0
0

'सोलापूर विद्यापीठाने

जागतिक क्रमवारीत स्थान निर्माण करावे'

सोलापूर :

'सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून, आतापर्यंत या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. आता या विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत,' अशी अपेक्षा नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केली.

सोलापूर विद्यापीठाच्या चौदाव्या दीन्क्षात सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सहस्त्रबुद्धे बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. या प्रसंगी मंचावर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिष्ठाता उपस्थित होते. १२ हजार ८५६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. १३९ जणांना पीएच.डी. पदवी तर ५४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत घरफाळाप्रश्नी चार मिळकती सील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत घरफाळाप्रश्नी महापालिकेने शुक्रवारपासून मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली. शनिवारी चार मिळकती सील केल्या. कारवाईचा धडाका कायम ठेवण्यात येणार असून सोमवारी सतरा मिळकती सील करण्याचे नियोजन केले आहे. मोहिमेमुळे शनिवारअखेर १२ लाख २१ हजाराची वसुली झाली.

थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेने थकबाकी दंडामध्ये ५० टक्के सवलत देणारी 'सवलत योजना' लागू केली आहे. तरीही थकबाकी न भरलेल्या मिळकतदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एक लाखापेक्षा जास्त थकीत रकमेप्रश्नी चार मिळकती सील केल्या. ई वॉर्ड घरफाळा विभागाच्यावतीने रफिक शेख (मुक्तसैनिक वसाहत), वृषाली दिलीप लगडे (ट्रेड सेंटर), मातोश्री प्लाझा (व्हिनस कॉर्नर), दुकानमालक दिवंगत सुरेश तुकाराम घोसाळकर (महालक्ष्मी चेंबर) यांच्या मिळकती सील केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेलप्रश्नी काँग्रेसचा खोटारडेपणा जनता नाकारेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राफेलप्रश्नी सरकारला सुप्रिम कोर्टाने क्लिन चिट दिली आहे. संसदेत अर्थमंत्री अरुण जेटली व सरंक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सरकारच्यावतीने उत्तर दिले आहे. फ्रान्स सरकार आणि संबंधीत कंपनीने खुलासा केला आहे. राफेलचा व्यवहार पारदर्शी झाला असतानाही काँग्रेस गोबेल्स नितीचा वापर करीत प्रचार करीत आहे. काँग्रेसचा खोटारडेपणा जनता नाकारेल,' असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

'कारगील युद्धानंतर सैन्यदलाने अत्याधुनिक विमानाची मागणी केली होती' याकडे लक्ष वेधत उपाध्ये म्हणाले, '२००४ ते २०१४ या कालावधीत सत्ता असूनही राष्ट्रीय सुरक्षेशी खेळण्याचा प्रकार काँग्रेसने करत सरंक्षण सिद्धतेशी हेळसांड केली. २००८ ते २०१४ या कालावधीत काँग्रेसने राफेल खरेदीसाठी प्रयत्न केले. मध्यस्तांशिवाय व्यवहार करता येत नसल्याने काँग्रेसने विमानखरेदी केली नाही. २०१६मध्ये सैन्यदलाने तातडीने राफेलच्या खरेदीची गरज व्यक्त केल्यावर १२६ पैकी फक्त ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. खरेदीपूर्वी ७४ बैठका झाल्या असून सरंक्षण खात्यातील तज्ज्ञांच्या संमतीनंतर खरेदीची प्रक्रिया पार पडली. विमान खरेदीची प्रक्रिया, किंमत, ऑपसेट पार्टनर या बाबी योग्य असल्याचा निकाल सुप्रिम कोर्टाने दिला आहे. संसदेत अर्थमंत्री जेटली, संरक्षणमंत्री सितारामण यांनी सरकारच्यावतीने योग्य उत्तर दिले. पण आमचेच बरोबर आहे, सरकार, सुप्रिम कोर्ट चुकीचे आहे, असा हेका धरत काँग्रेसने रडीचा डाव सुरू केला आहे. पण काँग्रेसचा खोटारडेपणा नाकारून जनता भाजपच्या पाठीशी राहील.'

'राफेल विमान तयार करुन देण्याबाबत एचएएलने विश्वास दाखवला नसल्याने रिलायन्सला ऑपरेसट पार्टनर म्हणून मान्यता दिली आहे' असा खुलासा उपाध्ये यांनी केला. 'रिलायन्सला विमान बनवण्याचा अनुभव नाही अशी टीका काँग्रेसकडून होत आहे. पण रेल्वेचे डबे तयार करण्याचा अनुभव नसताना मेट्रोसाठी डबे तयार करण्याचा करार काँग्रेसने यापूर्वी रिलायन्सशी कसा केला? दसॉल्ट कंपनी विमान तयार करून भारतात पाठवणार असल्याने रिलायन्सला विमान तयार करावे लागणार नाही. फक्त करारानुसार ऑपसेट पार्टनर म्हणून रिलायन्सचे नाव पुढे आले आहे' असे उपाध्ये म्हणाले.

पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, उपाध्यक्ष अमोल पालोजी, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे आदी उपस्थित होते.

निवडणूक विकासाच्या मुद्दावर

'राममंदिर हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे. आम्ही घटनात्मक बाबींचा विचार करुन राम मंदिर उभारणार आहोत. पण २०१४ प्रमाणे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूका लढवणार आहोत. 'बोलो दिलसे, मोदी फिरसे' ही आमची घोषणा राहील. खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्याची पक्षनेतृत्व दखल घेत आहे,' असा खुलासाही उपाध्ये यांनी काकडे यांनी केला.

कोल्हापुरात मोदी विचारांचा खासदार

'कोल्हापुरात नरेंद्र मोदी यांच्या विचारांना साथ देणारा खासदार असेल,' असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले. राज्यात शिवसेनेशी युती होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी, 'युती रुळावर आहे,' असे सांगितले. कोल्हापूरच्या खासदारकीच्या प्रश्नावर उपाध्ये यांनी स्पष्टपणे भाजपचाच खासदार असेल असे वक्तव्य केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर: फिरायला गेलेल्या वृद्धेला लुटले

0
0

कोल्हापूर :

रुईकर कॉलनी येथील टॉवरजवळील गणपती मंदिराजवळ फिरायला आलेल्या वृद्धेचे चोरट्यांनी अडीच तोळ्याचे दागिने लुटले. सीमा तिमाप्पा शेट्टी (वय ६८ रा. हायवे पार्क अपार्टमेंट, ब्लॉक क्रमांक सी १, २, महालक्ष्मी हॉलजवळ, कावळा नाका) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत अज्ञात दोन चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, शेट्टी या १९ जानेवारीला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील गणपती मंदिर परिसरात फिरायला आल्या होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारुन लंपास केली. अचानक झालेल्या या प्रकाराने त्यांनी आरडाओरडा सुरु केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठ्ठल मंदिरात केलेल्या बेशिस्त बांधकामामुळे पुरातन मंदिर वास्तू धोक्यात

0
0

पंढरपूर

लाखो वारकरी संप्रदायाचे आराध्य असणारे विठ्ठल मंदिराच्या मूळ वास्तूला नंतरच्या काळात झालेल्या बेशिस्त बांधकामामुळे धोका निर्माण झाला असून हि सर्व चुकीची बांधकामे हटवून गाभाऱ्यातही बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज केला आहे. विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेली अस्ताव्यस्त बांधकामे यामुळे छतावरील वाढलेला लोड मूळ मंदिरावर येऊ लागल्याने मूळ मंदिर वास्तूस धोका निर्माण झाल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे . आता संपूर्ण मंदिराचे स्टक्चरल ऑडिट करायचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार असून यानंतर नेमके काय बदल करावे लागतील याचा अहवाल ते मंदिर समितीपुढे ठेवणार आहेत. राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक विलास वहाणे आणि त्यांच्या टीमने आज विठ्ठल मंदिराची पाहणी केली .

विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचे मानले जात असले तरी अनेक अभ्याकांच्या मते हि वास्तू त्याही पूर्वीची असल्याचे सांगितले जाते. मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून ते यादवकालीन साधर्म्याचे अनेक शिल्पकलेवरून दिसून येते. वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातील असले तरी यानंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो आहे. यानंतरच्या काळात मात्र मूळ मंदिराच्या छतावर जाडजूड स्लॅब टाकण्यात आल्याने मूळ मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातच हवा खेळण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणाची मूळ दगडे काढून तेथे हवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या आकाराची सवणे केल्याने वास्तूचे छत कमकुवत झाले आहे. यातच छतावर विविध प्रकारची बांधकामे, वातानुकूलित यंत्रणेचा बेस अशा पद्धतीचा बोजा वाढत गेल्याने मूळ मंदिरावरील बोजा वाढला आहे. यामुळे मंदिराचे दगडी बीम क्रॅक झाले असण्याची भीती पुरातत्व विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. याचबरोबर मूळ मंदिरातील पुरातन दगडू काही ठिकाणी निसटू लागली असून काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगा पडू लागल्या आहेत .

अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचे मूळ मंदिर हे विठ्ठल गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते मात्र नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला. मंदिराचा मुख्य भाग असणाऱ्या विठ्ठल गाभाऱ्यात देखील नंतरच्या काळात अस्ताव्यस्त दुरुस्त्या केल्याने मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका निर्माण झाला आहे. गाभाऱ्यात भितींवर लावलेल्या ग्रॅनाईट व संगमरवरी फरशामुळे गाभाऱ्यातील ह्युमिडिटी मूर्तीस घातक बनू लागली आहे. गाभाऱ्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचे स्वरूपाचं सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता हे सर्व पूर्ववत करावे लागेल असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे . मंदिरातील दगडांना दिलेले रंग दगडी वास्तवात इतर नव्या बांधकामांचे टाकलेले बोजे , धोकादायक वायरिंग हे सर्व घटक अकराव्या शतकातील मूळ मंदिर आणि विठुरायाच्या मूर्तीसाठी आयुष्य कमी करणारे ठरत आहेत . याबाबत तातडीने संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेत असून एसाव हा अहवाल समितीसमोर ठेवला जाणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर हे केंद्र आणि राज्य यापैकी कोणत्याच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक आणि मारक बांधकामे होत आली आहेत . आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारचा झाल्यावर तरी हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्यांनी घात केला, त्यांना साथ नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सध्या लोकसभेचा फिव्हर सुरू झाला आहे. काही लोक पुन्हा घरी येतो म्हणत आहेत. पण, विश्वासघात करणाऱ्यांना आणि पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना पुन्हा साथ नाही. आमचं ठरलंय' अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा नामोल्लेख न करता व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा व्यक्त केला. प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने परिवर्तन अभियान सांगता समारंभात ते बोलत होते. जवाहर नगर चौकात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे होते. 'पश्चिम महाराष्ट्राने काँग्रेसला नेहमीच बळ दिले. विधानसभेची निवडणूक एकसंघपणे लढवून जिल्ह्यातून सहा आमदार निवडून देऊ' अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

काही दिवसांपूर्वी आयोजित एका पत्रकार बैठकीत खासदार महाडिक यांनी, 'पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आदेश दिल्यास आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊ' असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या समारंभात आमदार पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. प्रदेश काँग्रेसच्या अभियान सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात काँग्रेस पक्ष बळकटीचे आवाहन करताना आमदार पाटील म्हणाले, 'जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवडे, जयवंतराव आवळे, आम्ही एकत्र येऊन ताकदीने जिल्ह्यातून सहा आमदार निवडून आणणार आहे. विधानसभेपूर्वी लोकसभा निवडणुकीचा फिव्हर निर्माण झाला आहे. साडेचार वर्षानंतर काहींना आमची व तुमची आठवण येऊ लागली असून काही लोक घरी येतो म्हणतात. पण मी तुम्हालाच विचारतो, ज्यांनी विश्वासघात केला त्यांना मदत करायची का?' यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी नाही.. नाही... असा जोरदार प्रतिसाद दिला.

त्यावर 'आपलं ठरलयं, ज्यांनी घात केला त्यांना साथ नाही' अशी स्पष्ट भूमिका आमदार पाटील यांनी मांडली. पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळातील निर्णयांवर जोरदार टीका केली. २०१४ची निवडणूक ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जिंकली, त्याच माध्यमांद्वारे बाजू उलटवली जाणार असल्याच्या भीतीने व्हॉट्सअॅप व फेसबुकवरील राजकीय संदेशावर सरकारकडून बंदी घातली जात आहे' असा आरोपही त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले, 'बेरोजगारांना नोकरी, १५ लाख बँक खात्यात जमा, शिवस्मारक, डॉ. आंबेडकर स्मारक अशा अनेक घोषणा भाजप सरकारने केल्या. पण सरकारने कोणत्याही घोषणेची पुर्तता केलेली नाही. घोषणा करणारे जुमलेबाज सरकार आघाडी सरकारने भूमिपूजन व उद्घाटन केलेल्या प्रकल्पांच्याच फीत कापत आहेत.'

धीरज देशमुख म्हणाले, 'काँग्रेस पक्षाने जे ७० वर्षांत केले, त्या प्रकल्पांचे चार वर्षांत उद्घाटन करण्याचे काम भाजपने केले. युवकांना रोजगार देण्यास सपशेल अपयशी ठरलेले हे सरकार अभियंता, वकील अशा उच्चविद्याविभूषित युवकांना पकोडे विकण्याचा सल्ला देत आहेत. हे दुर्दैवी आहे.'

उपमहापौर भूपाल शेटे, तौफिक मुल्लाणी, कल्याणी माणगावकर, बयाजी शेळके, मकरंद कवठेकर, सनी नरके, किशोरी पसारे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रतिमा पाटील, महापालिकेतील काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, हरिदास सोनवणे, प्रवीण केसरकर, राहुल चव्हाण, लालासाहेब भोसले, सर्जेराव साळोखे, दिलीप भुर्के, नंदकुमार सुर्यवंशी, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते. युवक जिल्हाध्यक्ष दीपक थोरात यांनी स्वागत केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मुंबई-कोल्हापूर विमान सेवेसाठी प्रयत्न

'जिल्ह्याच्या उद्योगाचा विस्तार वाढण्यासाठी व युवकांना रोजगार मिळण्यासाठी मुंबई ते कोल्हापूर विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. मात्र विमानसेवेची वाट पाहून नागरिकांची मान दुखू लागलीय' असा टोला लगावत आमदार पाटील यांनी 'पूर्वीप्रमाणे विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी इंडिगो कंपनीकडे पाठपुराव सुरू आहे' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरंजनाचा सुपर संडे

0
0

अमित गद्रे

...

भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, भरतनाट्यमपासून झुंबा डान्सपर्यंतचा बहारदार नृत्याविष्कार आणि प्रत्येक कला व क्रीडा प्रकाराला हात उंचावून दाद देणारे हजारो कोल्हापूरकर असा जल्लोषी माहोल रविवारी सायबर चौक ते एनसीसी भवनपर्यंतच्या मार्गावर निर्माण झाला. रस्सीखेच, विटी दांडू, दोरी उड्या अशा पारंपरिक खेळामुळे 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅपी स्ट्रीट' उपक्रम हा मनोरंजनाचा सुपर संडे ठरला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या तरुणाईने 'हॅपी स्ट्रीट...हॅपी स्ट्रीट'च्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. जवळपास अडीच तास कला, क्रीडा आणि मनोरंजनाची रेलचेल नागरिकांनी अनुभवली. यंदाच्या या तिसऱ्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित नागरिकांनी गर्दीचा नवा रेकॉर्ड तयार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आजपासून दोन दिवस पाणीबाणी

0
0

म. ट. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा पंपिंग हाऊस आणि नागोजीराव पाटणकर हायस्कूल येथील मुख्य जलवाहिनी दुरुस्तीला सोमवारपासून (ता. २१) सुरुवात होणार आहे. दोन दिवस दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने शहरातील ए., सी., डी. व ई वॉर्डामध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर बुधवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

गणेशोत्सवापासून शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरुळीत करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनी व उपजलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. साळोखेनगर येथील मुख्य जलवाहिनीची गळती दूर झाल्यानंतर पाणी वितरणामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्यात बालिंगा पंपिंग हाऊस येथे दुरुस्ती करून मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्ती करण्यात आली. व्हॉल्व दुरुस्तीनंतर मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहे. तेथील ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीबरोबर नागोजीराव पाटणकर हायस्कूल येथील ४०० मिलीमीटरच्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सोमवार व मंगळवारी, दोन दिवस दुरुस्तीचे काम सुरू राहील. परिणामी शहराच्या निम्मा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी अपुरा व कमी दाब्याने पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठा सुरळीत होऊपर्यंत बंद भागात महापालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची वास्तू धोकादायकपुरातत्व विभाग करणार मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या मूळ वास्तूला नंतरच्या काळात झालेल्या बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. धोकादायक आणि चुकीची बांधकामे हटवून गाभाऱ्यात बदल केल्यानंतर मंदिर आणि मूर्तीचे आयुष्य वाढणार आहे,' असे मत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. विठ्ठल मंदिराच्या छतावर टाकण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी केलेल्या अस्ताव्यस्त बांधकामांमुळे मंदिराच्या छतावर भार येऊ लागल्याने मूळ मंदिराच्या वास्तूला धोका निर्माण झाल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. 'आता संपूर्ण मंदिराचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचे काम पुरातत्त्व विभाग हाती घेणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर नेमके काय बदल करावे लागतील, याचा अहवाल विभाग मंदिर समितीपुढे ठेवणार आहे,' अशी माहिती राज्य पुरातत्त्व विभागाचे औरंगाबाद येथील सहायक संचालक विलास वहाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विठ्ठल मंदिराची पाहणी केल्यानंतर दिली.

विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील असल्याचे मानले जाते, तर काही अभ्याकांच्या मते ही वास्तू त्यापेक्षा ही पुरातन आहे. मूळ मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी पद्धतीने झाले असून, ते यादवकालीन असल्याचे शिल्पकलेवरून दिसून येते. वास्तविक मंदिर जरी अकराव्या शतकातील असले तरी या नंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा पुरातत्त्व विभागाचा अंदाज आहे.

'अकराव्या शतकात विठ्ठल मंदिराचे मूळ मंदिर, विठ्ठलाचा गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी एवढेच मर्यादित होते. मात्र, नंतरच्या काळात मंदिराचा विस्तार वाढत गेला. मंदिराचा मुख्य भाग असणाऱ्या विठ्ठल गाभाऱ्यातही नंतरच्या काळात दुरुस्त्या केल्याने मूळ वास्तूच्या स्ट्रक्चरलाच धोका निर्माण झाला आहे. गाभाऱ्यात भितींवर लावलेल्या ग्रॅनाइट व संगमरवरी फरशांमुळे गाभाऱ्यातील आद्रर्ता घातक बनू लागली आहे. गाभाऱ्यात अनेक ठिकाणी मूळ वास्तूचे स्वरूप सुधारणेच्या नावाखाली झाकून टाकल्याने आता सर्व वास्तूच पूर्ववत करावी लागेल,' असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. मंदिरातील दगडांना दिलेले रंग, नव्या बांधकामांचा टाकलेला भार, धोकादायक वायरिंग हे सर्व घटक अकराव्या शतकातील मूळ मंदिर आणि विठूरायाच्या मूर्तीचे आयुष्य कमी करणारे ठरत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल मंदिर समितीसमोर ठेवला जाणार आहे. विठ्ठल मंदिर केंद्र आणि राज्य सरकार यापैकी कोणत्याच पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत नसल्याने अशा पद्धतीची धोकादायक बांधकामे होत आली आहेत. आता या संपूर्ण मंदिराचा ताबा राज्य सरकारकडे आल्यावर तरी मंदिर पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्याची मागणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केली आहे.

हे आहे धोकादायक...

- मूळ मंदिराच्या छतावर जाड स्लॅब टाकण्यात आल्याने मूळ मंदिरावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

- मंदिरात हवा खेळण्यासाठी मंदिराच्या छतावरील अनेक ठिकाणाचे मूळ दगड काढून तेथे हवा बाहेर जाण्यासाठी मोठ्या आकाराची सवणे (झरोका) केल्याने छत कमकुवत झाले आहे.

- छतावर विविध प्रकारची बांधकामे, वातानुकूलित यंत्रणेचा बेस, अशा पद्धतीचा बोजा वाढत गेल्याने मूळ मंदिरावरील भार वाढला आहे. परिणामी मंदिराचे दगडी बीम क्रॅक झाले असण्याची भीती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

- मूळ मंदिरातील पुरातन दगड काही ठिकाणी निसटू लागले असून, काही ठिकाणी दगडी वास्तूला भेगा पडू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images