Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नदी प्रदूषण मुक्तीसाठी ‘पंचगंगा नमोस्तुते’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

'पंचगंगा नदीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करूया,' असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसंदर्भात येथील नदीतीरावरील वरदविनायक मंदिरामध्ये विविध सेवाभावी संस्थांची बैठक झाली. त्यामध्ये नदी प्रदूषणमुक्ती संघर्ष समितीच्या माध्यमातून 'पंचगंगा नमोस्तुते' हे ब्रीद घेऊन पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बैठकीला प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी, दीपस्तंभ युवा मंच, इचलकरंजी नागरिक मंच, निसर्गमित्र प्रतिष्ठान, सुसंस्कार मंच, सहयोग सेवा फाउंडेशन, शिवमंदिर कमिटी, माणुसकी फाऊंडेशन, मारवाडी युवा मंच, जयहिंद मंडळ आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आवाडे म्हणाले, 'इचलकरंजीचे औद्योगिक प्रदूषण व सेव्हरेजचे प्रदूषण १०० टक्के बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नदी शुद्ध झालीच पाहिजे. त्याचे पावित्र्य जपलेच पाहिजे. आपण ज्यावेळी घाटावर जाऊन पंचगंगा नमोस्तुते म्हणून पात्रातील पाणी आपल्या मुखामध्ये घेऊ, त्यावेळी त्यामध्ये एक पवित्रता व मनाला प्रसन्नता मिळाली पाहिजे. इतपत पंचगंगा शुद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी लागेल ते सर्वतोपरी सहकार्य व आवश्यक ते प्रयत्न करणार आहे. प्रदूषणमुक्ती संघर्ष समितीची पुढील बैठक टाकवडे वेस परिसरातील काळा ओढ्याजवळ होणार असून तेथून पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या लढ्याला सुरुवात होणार आहे. लढ्यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.'

यावेळी नदी प्रदूषणमुक्तीसाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना व पुढील दिशा यावर चर्चा झाली. बैठकीस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वबळावर लोकसभेसाठी भाजपची हातकणंगलेत चाचपणी

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ताठर भूमिकेने गोंधळात पडलेल्या भाजपच्या नेत्यांनी राज्यात सर्वत्र स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. सोमवारी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सत्यानंद मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हातकणंगले मतदारसंघातील मोजक्या नेते, कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

आजच्या बैठकीसाठी मतदारसंघातील मोजक्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील बूथ प्रमुख व मंडल प्रमुख तसेच उपस्थितीत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मतदारसंघांचा आढावा घेतला. शिवसेनेबरोबर युती होऊ दे अथवा नाही, प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करुन भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन दानवे यांनी केले. त्याबरोबर सांगली येथे पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणाऱ्या जाहीर सभेसाठी नियोजन, सभा यशस्वी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आमदार सुरेश हाळवणकर, जेष्ठ नेते बाबा देसाई, तालुका अध्यक्ष पी. डी. पाटील, हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाट, नूतन उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे, पेठवडगाव नगराध्यक्ष मोहनलाल माळी, आण्णासाहेब शेंडूरे, महावीर गाट, डॉ. अशोक चौगुले, बंडा गोंदकर, सयाजी पाटील, सुदर्शन खाडे, नानासाहेब जाधव आदीसह सहा तालुक्यांतील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सत्यानंद मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हातकणंगले मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी उपस्थितीत कार्यकर्ते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्याच्या उमेदवारीविषयी मार्चमध्ये बोलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीबद्दल व साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपसोबतची जवळीक व उमेदवारीच्या चर्चेविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'मार्च'मध्ये बोलू असे सांगत राजकीय संदिग्धता कायम ठेवली. आगामी लोकसभा निवडणुकीची एप्रिल महिन्यात अधिसूचना निघेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

प्रदेशाध्यक्ष दानवे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात दानवे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर, हातकणंगले व सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यांनी सोमवारी सर्किट हाऊस येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. दोन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली. यानंतर पत्रकार परिषद झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी पालकमंत्री पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक करत आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेकडून प्रा. संजय मंडलिक यांची तयारी सुरू आहे.

भाजप व सेनेची युती न झाल्यास पक्षाकडून पालकमंत्री पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आढावा बैठकीत चर्चा झाली का असा प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले, 'भाजपने प्रत्येक मतदारसंघनिहाय बूथ रचना केली आहे.२८८ विधानसभा मतदारसंघात २८८ विस्तारक तर ४८ लोकसभा मतदारसंघात तितकेच विस्तारक नेमले आहेत. शिवाय एका बूथची २५ प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे सेनेसोबत युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. समविचारी पक्ष सोबत आले नाहीत तर स्वतंत्र लढण्याची तयारी भाजपने केली आहे. पालकमंत्री पाटील व खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीविषयी आता काही भाष्य करणार नाही. मार्च महिन्यात या विषयासंदर्भात बोलू. भाजपमध्ये पक्षाचा आदेश हा महत्वाचा असतो. पक्ष जो आदेश देईल तो कार्यकर्त्यासाठी अंतिम असतो. पक्षाने आदेश दिल्यास कार्यकर्त्याला निवडणूक लढवावी लागते.' दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

पत्रकार परिषदेला आमदार सुरेश हाळवणकर, म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजित घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, गोकुळचे संचालक बाबा देसाई, भाजपचे पदाधिकारी मकरंद देशमुख, विजय पुराणिक आदी उपस्थित होते.

...

जालन्यातून मीच उमेदवार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर थेट भाष्य करण्यास दानवे यांनी नकार दिला. मात्र जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचा उमेदवार मीच असणार. मी निवडणूक लढणार हे निश्चित आहे. कोण काय बोलतंय हे महत्वाचे नाही. जे सोबत येतील त्यांना घेऊ, जे आडवे येतील त्यांना ठीक करु ,असा सज्जड दमही त्यांनी भरला. दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

......................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवसांपूर्वी एकरकमी एफआरपीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा ऊस आणि तोडणी मजुरांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर राज्य सरकारकडे एकरकमी एफआरपी देण्यासाठी संयुक्त पाठपुरावा करण्याबरोबर सरकारकडून अनुकूल निर्णय होईपर्यंत पुढील बिले प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

एकरकमी एफआरपीची मागणी असताना कारखानदारांनी तुकडे पाडून पहिला हप्ता २३०० रुपये जमा केला. त्यामुळे स्वाभिमानीने आंदोलन सुरु केले. त्याला हिंसक वळण लागले. आंदोलनाचा फटका कारखाने, शेतकऱ्यांना बसू नये यासाठी सोमवारी कसबा बावडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात कारखानदार व स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

कारखान्यांनी बँकेकडून उपलब्ध असलेल्या रकमेतून २३०० रुपयेचा पहिला हप्ता जमा केला आहे. एफआरपी देण्याची तयारी असल्याचे कारखानदारांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. तथापि, एफआरपीसाठी कमी पडणारी रक्कम सरकारकडून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र सरकारकडून निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, म्हणून पहिला हप्ता दिल्याचे कारखानदारांनी स्पष्ट केले.

यावेळी एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी स्वाभिमानीने केली. ज्यांनी पहिला हप्ता दिला त्याला विरोध नाही. मात्र सरकारकडून अनुकूल निर्णय होईपर्यंत पुढील बिले प्रलंबित ठेवावीत, एकरकमी एफआरपी द्यावी, अशीा मागणी संघटनेने केली. त्यावर एकमत झाले. तसेच शेतकरी व ऊस तोडणी कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला. तथापि, स्वाभिमानीच्यावतीने २८ रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.

बैठकीला आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, माजी आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील, पी.जी. मेढे यांच्यासह स्वाभिमानीकडून जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, सागर शंभू शेटे यांच्यासह कारखानदारांचे प्रतिनिधी, स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

०००००

ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मजुरांचे नुकसान होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित केले आहे. एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. सरकारचा निर्णय होईपर्यंत पुढील बिले देऊ नयेत, यावर एकमत झाले.

भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी

.. .. ..

जमत नसेल तर शेतकऱ्यांना साखर द्या

पुणे : 'साखर कारखानदारांना थकीत रास्त आणि किफायतशीर भावाची (एफआरपी) रक्कम द्यायची नसेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना त्यांची साखर द्यावी. शेतकरी ती साखर स्वीकारण्यास तयार आहे. ती साखर बाजारात विकून शेतकरी पैसे उपलब्ध करतील,' अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केली. शेतकऱ्यांच्या थकीत 'एफआरपी'बाबत खासदार शेट्टी यांनी साखर संकुल येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन ही मागणी केली.

.. .. ..

...२

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमच्याकडे डाटा आहे, कर भरा

$
0
0

मुख्य प्राप्तीकर आयुक्त आशु जैन यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संगणकीकरणामुळे प्राप्तीकर भरण्यात सुलभता आली असल्याने आमच्याकडे सर्वांचा डाटा उपलब्ध आहे. करदाते कोणतीही माहीती लपवू शकत नाहीत. त्यामुळे करदात्यांनी कर भरुन देशाच्या विकासात सहभागी व्हावे', असे आवाहन पुणे विभागाचे प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त आशु जैन यांनी केले. शाहूपुरी येथे आयसीएआय भवन येथे आयोजित केलेल्या व्यापारी संघटनांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयकर विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आयुक्त जैन म्हणाले, 'गतवर्षी देशात दहा लाख कोटी प्राप्तीकर जमा झाला. करदात्यांचे प्रमाण तीन कोटींवरुन सहा कोटींवर गेले आहे. यंदा ११ लाख ५० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. पुणे विभागात दरवर्षी चांगला कर जमा होतो. या विभागाला आर्थिक वर्षात ६६ हजार कोटी रुपये कर वसूल करण्याचे उद्दिष्ठ दिले आहे. पण डिसेंबरअखेर ५० टक्के जमा झाला आहे. त्यामुळे करदात्यांनी कर भरुन सहकार्य करावे.'

करदात्याला दंड करणे हे प्राप्तीकर खात्याचे काम आहे, असा समज काही वर्षांपूर्वी होता असे सांगून आयुक्त जैन म्हणाले, 'प्राप्तीकर विभागाचे अत्याधुनिकरण झाले असून संगणकीकरणामुळे सुटसुटीतपणा आला आहे. प्रत्येकाचा डाटा विभागाकडे आहे. कर चुकवणाऱ्यांची यादी केली जात असून त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे.' यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, क्रेडाई कोल्हापूरचे महेश यादव, संजय तगारे यांनी जैन यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे मुख्य आयुक्त आयुक्त एम.एल. कर्मकार, शिवराज मोरे उपस्थित होते. संयुक्त आयकर आयुक्त शिवानंद कलाकेरी यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरी विभागाचे शिल्पकार

$
0
0

डोंगरी विभागाचे शिल्पकार

म. टा. वृत्तसेवा शिराळा

डोंगरी विभागाचे शिल्पकार असा नावलौकिक असलेले, अजातशत्रू, संयमी व्यक्तिमत्व ही आमदार शिवाजीराव देशमुख यांची ओळख. शिराळा या डोंगरी तालुक्याच्या विकासाची पाऊलवाट रचत त्यांनी आपली ओळख सार्थ ठरवली.

देशमुख यांचा जन्म तिळवणी ( ता हातकणंगले) येथील. १ सप्टेंबर १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकरूड येथे तर माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलमध्ये झाले. बीएचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये घेतले. त्यांनी शिरा‌ळा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून नऊ वर्षे नोकरीही केली. नंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन १९६७मध्ये बिळाशी जिल्हा परिषद मतदारसंघातून ते निवडणुकीस उभे राहिले. मात्र त्यांची बिनविरोध निवड झाली. १९६७ ते १९७२ यांदरम्यान पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले. यांदरम्यान त्यांनी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम केले. १९७२ ते १९७४ दरम्यान सांगली जिल्हा परिषदेत ते कृषी विभागाचे सभापती होते. या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होते.

देशमुख यांनी १९७८ला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली ती अपक्ष म्हणून. नंतर सलग चार वेळा विजयी झाले. १९८० साली महाराष्ट्रातील पहिली डोंगरी परिषद घेऊन त्यांनी राज्यातील सुमारे ४० तालुक्यांचा डोंगरी विकास योजनेंतर्गत समावेश करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. १९८३ ते १९८५मध्ये सामान्य प्रशासन, गृह राज्यमंत्री म्हणून काम केले. १९८५ला कृषी, ऊर्जा व परिवहन राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कारभार होता. १९८५-१९८६ मध्ये त्यांनी पाटबंधारे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिले. १९८८-१९९०मध्ये पुनर्वसन व ग्रामविकास मंत्री, १९९१-१९९२मध्ये ते सहकार, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण व परिवहन मंत्री होते. १९९३-१९९४ ला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. १९९२ -१९९६ यांदरम्यान त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. अखिल भारतीय काँग्रेसचे ते सदस्य होते १९९६-२००२ यांदरम्यान त्यांची विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. २००२ मध्ये पुन्हा त्यांची निवड झाली.

२००१मध्ये विधानपरिषदेत उत्कृष्ट भाषणाबद्दल त्यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि महाराष्ट्र शाखेकडून पुरस्कार देण्यात आला. २००४ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली. २००५मध्ये युनायटेड किंगडम संसदेत, ५२व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अबूजा नायजेरिया येथे संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ते गेले होते. २००७ मध्ये इस्लामाबाद, पाकिस्तान येथे तिसऱ्या आशिया भारत परिषदेला राष्ट्रकुल संसदीय मंडळाचेही ते प्रतिनिधी होते. २००८मध्ये त्यांची तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. ते सलग तीन वेळा विधानपरिषदेचे सभापती होते. यांदरम्यान त्यांनी उल्लेखनीय काम केले. २००९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय संसदीय कारकिर्दीसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ते आजअखेर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार यांच्याकडून मुश्रीफ यांचे सांत्वन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मुश्रीफ कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मुश्रीफ यांच्यासह निवृत्त विशेष पोलिस महासंचालक शमशुद्दीन मुश्रीफ, प्रगतशील शेतकरी अन्वर मुश्रीफ आदींसह कुटुंबियांशी संवाद साधला.

पवार यांनी मुश्रीफ यांच्या आई-वडिलांबाबतची माहिती जाणून घेतली. तालुक्यातील शेती, कागल व मुरगूड नगरपालिकांची स्थापना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, एफआरपीबाबतचे शेतकरी आंदोलन आदींबाबत उपस्थितांसोबत चर्चा केली. मुश्रीफ यांनी, आई सकिनाबी या मनमिळाऊ आणि शिस्तप्रिय होत्या असे सांगितले. वडील प्रगतशील शेतकरी असल्याचे आणि स्वत:चे गुऱ्हाळघर असल्याची माहिती त्यांनी पवार यांना दिली. खासदार धनंजय महाडिक, आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, ए. वाय. पाटील आदींसह कार्यकर्ते, नातेवाईक उपस्थित होते.

फोटो

कागल : आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धैर्यशील माने यांची विनय कोरेंशी चर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा वारणानगर

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे नेते धैर्यशील माने यांनी सोमवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्याशी बंद खोलीत

लोकसभेची साखरपेरणी केली. माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते वारणेत दाखल झाले.

माने यांचे स्वागत कोरे यांनी केले. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेतून लोकसभा निवडणुकीसाठी माने इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघातील नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे. वारणा परिसरात जनसुराज्य शक्ती पक्षाचा दबदबा आहे. आजपर्यंत कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. माने व कोरे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. माजी खासदार निवेदिता माने यांच्या विजयासाठी कोरे यांनी यापूर्वी परिश्रम घेतले होते. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांच्याशी कोरे यांचे ऊस आंदोलनावरून असलेले वितुष्ट या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. यावेळी जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंह जाधव, हर्षवर्धन माने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजळाईवाडीत गुंडांच्या दहशतीचा फेरीने निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

उजळाईवाडी (ता. करवीर) येथे सातत्याने गुंडांची दहशत सुरू आहे. सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. व्यावसायिक गुंडाच्या दहशतीने भयभीत झाले आहेत. गुंडांचा बिमोड करण्यासाठी व वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी गावातून आणि विविध कॉलन्यांतून निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीने ग्रामस्थांनी पोलिसांचे लक्ष वेधले. फेरीला मोठा प्रतिसाद दिला.

उजळाईवाडीत काही गुंडांची दहशत आहे. हे गुंड हप्ता वसुली करतात. ते खंडणीखोर आहेत. सामान्य लोकांना अडवून त्यांच्याकडील रक्कम काढून घेऊन भुरट्या चोऱ्या करत असतात. सातत्याने गाव व उपनगरात लोकांना शस्त्राचा धाक दाखवून त्रास दिला जात आहे. या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गुंडांविरोधात जिल्हा पोलिसप्रमुख व गृहमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना गावातून तडीपार करण्याची मागणी केली जाणार आहे. सोमवारी यासाठी निषेध फेरी काढण्यात आली. माजी सरपंच संजय माने, अशोक पाटील, विश्वास पाटील, नारायण माने, तंटामुक्त अध्यक्ष सचिन पाटील, डी. जी. माने, उत्तम आंबवडे, नंदकुमार मजगे, सारंगा नाईक, राजू माने, नायकू बागणे, उपसरपंच राजू गवाळकर, अजय पाटील, बाबासाहेब माने, चंद्रकांत पंडित, एकनाथ माने, संदीप पोवार, राजेंद्र माने, राजाराम माने, संपत दळवी, प्रकाश मेटकरी, पोलिस पाटील विनायक भानुसे आदी उपस्थित होते.

यावेळी 'लोकशाही मार्गाने गुंडगिरी मोडीत काढा, लोकांनी पुढाकार घ्यावा. गुंडांची दहशत लोकांच्या मनात घर करून असेल तर पोलिसांनी येथे तातडीने लक्ष घालून गुंडाच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. गुंडगिरी जनरेट्याने मोडीत काढण्यासाठी एकत्र लढा द्यावा लागेल' असे कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी सांगितले.

गुंडाचा मास्टरमाईंड कोण?

गुंड नागरिकांना धमकावण्यासाठी तीक्ष्ण शस्त्रांचा वापर करतात. वाहनांची तोडफोड करतात. जामिन मिळवून बाहेर आल्यानंतर पुन्हा दहशत निर्माण करतात. या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक आहे. या गुंडाचा मोहरक्या कोण आहे? याचा शोध घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

फोटो

उजळाईवाडी येथे सातत्याने गुंडांची दहशत सुरू आहे. त्याविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध फेरी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुंदवाड पालिकेवर शिवसेनेचा गाजर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सुधारीत नळ पाणीपुरवठा योजनेचे रेंगाळलेले काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी कुरूंदवाड नगरपालिकेवर शिवसेनेच्यावतीने गाजर मोर्चा काढण्यात आला. एक महिन्यात काम सुरू न झाल्यास मुख्याधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू, नगरसेवकांच्या घरापुढे शंखध्वनी करू, असा इशारा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला.

कुरुंदवाड शहरात १३ कोटी ८४ लाख रुपये खर्चुन पाणीयोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र गेली अडीच वर्षे काम रेंगाळले आहे. अद्याप १० टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे मोर्चा काढण्यात आला. महाराणा प्रताप चौकातून हलगी, ताशा, ढोल या वाद्यांचा निनादात मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. नगरपालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

नगराध्यक्ष जयराम पाटील, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी निवेदन स्वीकारले. पाणी योजनेचे काम त्वरीत मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांची उद्या भेट घेणार आहे असे त्यांनी आंदोलकांना सांगितले.

शिवसेनेचे शहराध्यक्ष राजू आवळे म्हणाले, 'कुरुंदवाड नगरपालिकेची पाणीपट्टी अन्य पालिकांच्या तुलनेत अधिक आहे. नळपाणी पुरवठा योजना होणार म्हणून नागरिकांनी वाढीव पाणीपट्टीस मंजूरी दिली. अडीच वर्षे झाली तरी १० टक्केही काम पूर्ण नाही.'

तालुकाप्रमुख सतीश मलमे, आण्णासाहेब बिल्लोरे, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, रामचंद्र माळी, आप्पा भोसले, माहेश्‍वरी आवळे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी सुहास पासोबा, संतोष नरके, आप्पा गावडे, वैभव तोडकर, संतोष धनवडे, रामचंद्र माळी, सौरभ जासुद, प्रदीप धनवडे, राजू बेले, नजीर मखमल्ला, बाबासाहेब सावगावे, सुनिता जाधव, रेखा जाधव, अफझल महात आदी उपस्थित होते.

फोटो

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपडे वाटप

$
0
0

कोल्हापूर : प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोपार्डे येथील वीटभट्टी कामगारांना कपडे वाटप करण्यात आले. महिला, पुरूष कामगार व मुलांना उबदार कपडे, साड्या देण्यात आल्या. सुरेखा राजेशिर्के यांनी संयोजन केले. यावेळी मनीषा होणकळसे, कविता देव, वैशाली माने, रश्मी माने, उषा महाजन, अन्नपूर्णा महाजन, ऋचिता राजेशिर्के आदी उपस्थित होत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारस्वत बोर्डिंगमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

कोल्हापूर : दसरा चौकातील श्री सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वसतिगृहाचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, विश्वस्त अॅड. धनंजय देशपांडे, श्यामसुंदर घोलकर, संजय वाघापूरकर, डॉ. गजानन आसगेकर, संजीव बोरकर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक उमेश हासोळकर, मुरलीधर पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी प्रयत्न, अन्यथा स्वबळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप, शिवसेना युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची भूमिका आहे. मात्र जे सोबत येणार नाहीत, त्यांना आडवे करण्याची ताकद पक्षात आहे. युती न झाल्यास लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढवू. त्या सर्व जागा जिंकण्याची तयारी आहे,' अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाची रणनीती स्पष्ट केली. त्याचवेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या प्रश्नांना बगल दिली.

दानवे म्हणाले, 'आपल्याच नेत्यापेक्षा अन्य कुठलाही नेता मोठा होऊ नये, ही काँग्रेसची मानसिकता आहे. त्या मानसिकतेतूनच ते देशातील एक गरीब पंतप्रधान झाला या रागापोटी मोदी यांच्यावर टीका करत आहेत. सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो हे काँग्रेसला मान्य नाही. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसने कितीही आघाड्या केल्या, पक्ष एकत्र आले तरी संघटना आणि विकासकामांच्या बळावर भाजप पुन्हा जिंकणार आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.'

शेतकऱ्यांची कर्जमाफी, देशभर रस्त्यांचे जाळे, मोठ्या शहरात मेट्रो सुविधा, शेतकऱ्यांना मुबलक खत पुरवठा, आयुष्मान भारत योजना अशा क्रांतिकारी योजनेमुळे भाजपला पोषक वातावरण आहे. या कामांच्या बळावरच 'फिर एक बार मोदी सरकार,' असा नारा दिला आहे. राज्यात मतदारसंघनिहाय बूथ रचना केली आहे.'

पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील कलगीतुरा आणि भाजप सेनेच्या संभाव्य युतीविषयी विचारल्यावर प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, 'शहा यांनी शिवसेनेला उद्देशून 'पटक देंगे,' असा इशारा दिला नव्हता. शिवसेनेशी युती झाली पाहिजे यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे. शिवाय आजवर युतीचा निर्णय आजपर्यंत मुंबईत झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे तत्कालीन नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या कालावधीपासून हा फॉर्म्युला सुरू झाला. युतीबाबत काही वाद निर्माण झाला तर ते विषय केंद्रीय पातळीवर सोडवावेत, असे सूत्र ठरले आहे. आगामी निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र काम करावे, सेनेसोबत युतीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. जे समविचारी सोबत येतील त्यांचा मानसन्मान ठेवू. जे सोबत येणार नाहीत, विरोधात जातील त्यांना आडवे करु.'

.. .. .. .

तर जयंत पाटलांना भाजपमध्ये घेणार!

सांगली : 'दुसऱ्या विचारधारेच्या पक्षातही काही मंडळी चांगली आहेत. भाजपमध्ये आम्ही त्यांचे स्वागतच करू. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही व्यक्तिगत पातळीवर चांगलेच आहेत. त्यांनी आम्हाला दिसू नये. दिसले तर आम्ही त्यांना पक्षात घेऊ,' असे विधान दानवे यांनी सोमवारी सांगलीत केले. दानवेंच्या या विधानाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

शेतकऱ्याची आत्महत्या

सातारा

उदय कांतिलाल कदम (वय ३६) या तरुण शेतकऱ्याने गोळेवाडी गावच्या हद्दीत उसाच्या शेतालगत असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती त्याचा भाऊ अरुण कदम याने कोरेगाव पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे. एका पायाने काहीसे अपंगत्व असलेला उदय हा मुळातच जिद्दी व कष्टाळू होता. वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलीसह ते एकत्र राहात होते. वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या उदयने जोडधंदा म्हणून गावोगावी आठवडा बाजारात फळभाज्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, अलीकडे वाढत्या गरजा व आवक कमी असल्याने तो चिंतेत आसायचा. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घरातून बाहेर गेलेला उदय रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने रात्री सर्वांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. रविवारी गोळेवाडी गावच्या हद्दीतील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

..........

'सत्याचे राजकारण करणारे

कधीच सत्तेत आले नाहीत'

सातारा :

'सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) गावचे तपस्वी स्वातंत्र्यसैनिक कै. र. वि. तथा राघूअण्णा लिमये हे खऱ्या अर्थाने दिशादर्शक होते. आपली तत्वे, ध्येयापासून ते कधीच ढळले नाहीत. त्याचा हा चरित्र ग्रंथ नव्या पिढीसाठी स्फूर्ती ग्रंथ आहे. स्वातंत्र्य संग्रामातील अनेक सैनिक हे स्वातंत्र्य मिळाल्यावर अज्ञात राहिले. कारण, या माणसांनी आपल्या तत्त्वांना सांगड घातली नाही आणि सत्याचे राजकारण करणारे कधीच सत्तेत आले नाहीत. तसेच पेन्शन खाण्यासाठी यांनी देशसेवा केली नाही. अलौकिक व्यक्तिमत्वाचे हे लौकीक दर्शन या पुस्तकाने आपणाला घडत आहे,' असे उद्गार डॉ. रामचंद्र देखणे यांनी काढले.

स्वातंत्र्य सैनिक कै. र. वि. तथा राघूअण्णा लिमये यांच्या जीवनावरील मसूरची संज्योत, या पुस्तकाचे प्रकाशन श्री. छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. देखणे बोलत होते.

....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारोंनी अनुभवला अक्षता सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'सत्यम सत्यम, दित्यम दित्यम,' असे मंगलाष्टकातील वाक्ये कानावर पडताच ऐतिहासिक भुईकोट किल्याच्या साक्षीने विस्तीर्ण अशा श्री सिद्धरामेश्वर मंदिर व तलाव परिसरात लाखो वऱ्हाडींच्या उपस्थितीत एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रच्या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी श्री. सिद्धरामेश्वर यांचा प्रतीकात्मक विवाह सोहळा सोमवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सम्मती कट्ट्याजवळ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. कुंभारकन्येचा विवाह योगदंडाशी लावत पारंपरिक पद्धतीने विधी पूर्ण करण्यात आले. या अक्षता सोहळ्याला महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

दर वर्षी अक्षतेला दुपारचे साडेतीन वाजायचे मात्र, यंदा साडेबारा वाजता अक्षता सोहळा पार पडल्याने हजारो सिद्धेश्वर भक्तांनी सुटकेचा निश्वास सोडला. यापुढे हीच परंपरा कायम रहावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. पाच दिवसांच्या यात्रेतील दुसरा आणि महत्वाचा सोमवारचा विधीचा दिवस होता. कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून सकाळी मानाचे सातही नंदीध्वज वाजतगाजत सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले. नंदीध्वज सम्मती कट्ट्याजवळ आल्यावर कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्याकडून मानाचा विडा देण्यात आला. योगदंडाच्या साक्षीने पूजा झाली. मानकरी सुहास व तम्मा शेटे यांच्याकडून मंगलाष्टका दिल्या जातात. सम्मती कट्टा येथे सुहास शेटे यांनी सम्मतीवाचन केले. अक्षता सोहळ्या नंतर ६८ शिवलिंगातील पहिले अमृतलिंगाचे पूजन झाले. अक्षता सोहळा पार पडल्यानंतर डबे आणलेल्या महिलांनी मंदिर परिसरात बसून बाजरीची भाकरी, शेंगा पोळी, भात अशा कानडी पद्धतीच्या पदार्थांची लज्जत नातेवाइकांसमवेत चाखली.

सुगडी पूजनाचे महत्त्व

सिद्धेश्वर तलावातील पाणी १४ सुगंधीत (मडक्यात) गंगा पूजनासाठी घेण्यात आले. सिद्धरामेश्वरांनी स्व:हस्ते तलाव खणून येथे सर्व नद्यांना वास करण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जाते. गंगा पूजनानंतर कुंभार समाजातील मानकऱ्यांना विडा देण्यात आला. त्या वेळी अक्षतेस मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर विधीला प्रारंभ झाला.

सिद्धेश्वर महायात्रेतील अख्यायिका

सिद्धरामेश्वर योगसाधनेत मग्न असत. ते जेव्हा साधना स्थळाच्या बाहेर येत, तेव्हा त्यांना अंगणात सडा घालून रांगोळी रेखलेली दिसे. हे काम कोण करते हे त्यांना कळेना. एके दिवशी ते नेहमीच्या वेळेआधी साधना गृहाबाहेर आले तेव्हा एक सुंदर तरुणी सडा घालून रांगोळी रेखत असलेली त्यांना दिसली. तिने ही विस्मयचकित होऊन नमस्कार केला. शिवयोगी सिद्धरामांनी त्या तरुणीला प्रश्न केला. तू कोण आहे, आणि हे काम का करीत आहे. तेव्हा मी एक कुंभारकन्या आहे, आपली सेवा घडावी म्हणून मी रोज अंगणात सडा घालून रांगोळी काढते, असे उत्तर त्या तरुणीने दिले. सिद्धरामांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांना कळले की, त्या कुंभारकन्येची त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तिने आपली इच्छा व्यक्त केल्यावर सिद्धाराम म्हणाले, 'मी लिंगांगी आहे. मल्लिकार्जुन माझे पती असून, मी त्यांची सती आहे. अशास सती- प्रतिभावाने मी साधना करीत आहे. मग एक स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीशी विवाह कसा होऊ शकेल? सिद्धरामांनी तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. तेव्हा तिने अत्यंत व्याकुळतेने त्यांची विनवणी केली. शेवटी सिद्धरामांनी तिला आपल्या हातातील योगदंडाशी प्रतीकात्मक लग्न करण्यास सुचविले. त्या प्रमाणे कुंभार कन्येने योगदंडाशी विवाह केला. या प्रतीकात्मक विवाह सोहळ्यात स्वतः सिद्धरामेश्वर सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी हरिद्रालेपन, तैलाभिषेक होऊन विवाह विधींना आरंभ झाला. सिद्धरामांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांना व देवदेवतांना अक्षता दिल्या. दुसऱ्या दिवशी सम्मती काट्टयावर अक्षताविधी पार पडला. सिद्धरामांनी स्वतः रचलेली पाच मंगलाष्टके म्हटली. अक्स्तविधीनंतर वरात निघाली. ६८ शिवलिंगांना भेटी दिल्या. तिसऱ्या दिवशी मकर संक्रमणाच्या पर्वकाली योगदंडाला पवित्र तळ्यात स्नान घालण्यात आले. कुंभारकन्या सचैल स्नान करून सौभाग्य लेणे लेऊन सती जाण्यास सिद्ध झाली. आपल्याला अध्यात्मिक मुक्ती मिळाली, असे मानून होमकुंडात उडी घेऊन ती सती गेली. हा विवाह विधी दर वर्षी यात्रेच्या वेळी सर्व तपशिलांसह साजरा केला जातो. नंदीध्वज हा सिद्धरामांच्या योगदंडाचे प्रतीक होय. नंदीध्वज, अक्षतासोहळा आणि होमप्रदीपन सोहळा या प्रथेमागे, अशी आख्यायिका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रीडा महोत्सव

$
0
0

कोल्हापूर : तोरणानगर येथील सरस्वती चुनेकर विद्यामंदिराच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. जलतरणपटू स्वप्नील पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेतंर्गत मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेतला. मुख्याध्यापिका पूजा आपटे यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघू नका; तुम्हाला घरी बसविणारअतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना इशारा

$
0
0

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघू नका; तुम्हाला घरी बसविणार

अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना इशारा

कराड :

'मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत परिवर्तन अटळ असून, मलकापूरच नव्हे तर येत्या काळात कराड दक्षिणवरही भाजपचाच झेंडा फडकणार आहे. त्या मुळे माजी मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने बघत असतील, तर त्यांनी ती सोडून द्यावीत. कारण, आता येत्या विधानसभेला त्यांनाही घरी बसविण्याचा चंग कराड दक्षिणच्या जनतेने बांधला आहे,' असा इशारा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना दिला.

मलकापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते होते. व्यासपीठावर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका प्रशांत गावडे आदी उपस्थित होते.

भोसले म्हणाले, 'रेठरे बुद्रुक, मुंढे, गोळेश्वरसह कराड दक्षिणमधील ५१ गावांसाठी भाजप सरकाच्या माध्यमातून नळपाणी योजना मंजूर करवून आणली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक रस्त्यांना दर्जोन्नती देत, त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेला निधी बघवत नसल्याने विरोधकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे ते आता विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी ज्या कृष्णा हॉस्पिटलमुळे मलकापूरचा उत्कर्ष झाला त्या हॉस्पिटलच्या मालमत्ता कराचा मुद्दा उपस्थित करीत आहेत.' ज्या कृष्णा हॉस्पिटलवर ते टीका करीत आहेत, त्याच संस्थेमध्ये स्वत:च्या मुलीला प्रवेश मिळविण्यासाठी किती वेळा उंबरे झिजवले ते ही त्यांनी सांगावे, असे म्हणत मनोहर शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

...................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटपाथ, रस्त्यांनी घेतला श्वास

$
0
0

फोटो आहे

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून शहरात गेल्या १५ दिवसांपासून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे. ठिकठिकाणचा विरोध मोडीत काढत पथकाने शहरातील अनधिकृत व विनापरवाना १५०० अतिक्रमणांवर हातोडा घातला आहे. पथकाच्या धडक कारवाईमुळे अनेक रहदारीचे रस्ते मोकळे झाले असून पादचाऱ्यांना फूटपाथचा वापर करता येऊ लागला आहे. परिणामी सर्वसामान्य शहरवासियांकडून कारवाईचे जोरदार स्वागत करून कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे.

अनधिकृत व विनापरवाना जाहिरात फलकांमुळे शहराला विद्रुपीकरण प्राप्त झाले असतानाच अनेक महत्त्वाच्या चौकात व रहदारीच्या रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले होते. विशेषत: महाद्वार, ताराबाई रोड, दसरा चौक, लक्ष्मीपुरी परिसर, व्हीनस कॉर्नर व राजारामपुरी आदी ठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीला सामारे जावे लागत होते. शहरात दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या अतिक्रमणांकडे अतिक्रमण विभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नगरसेवक व नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.

१९ डिसेंबरच्या महासभेत अतिक्रमण विभागाच्या भोंगळ कारभारवर टिकेचा भडिमार करताना संपूर्ण विभाग बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने व महापौर सरिता मोरे यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकांने शहरात कारवाईचा धडाका लावला. शहर विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक, बॅनर्स हटवण्याबरोबरच अनधिकृत हातगाड्या व केबिन्सवर कारवाई केली. फेरीवाल्यांच्या हातगाड्या व केबिन्स हटवताना काही ठिकाणी विरोध व वादही झाला. पण पथकाने विरोध मोडीत काडत अतिक्रमणावर हातोडा घातला. शहरात सुरू असलेल्या या मोहिमेचे शहरवासियांकडून स्वागत होत असताना शिवसेना फेरीवाला संघटनेने मोर्चा काढून विरोध केला. पण प्रशासनाने त्याला कोणताही प्रतिसाद न देता कारवाई सुरूच ठेवली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जाहिरात फलक, अनधिकृत केबिन्स, हातगाड्या हटवल्यानंतर लवकरच मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

शहरातील ब्लॅक स्पॉट मोकळे

अपवाद वगळता विरोधाशिवाय कारवाई

अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी

उपशहर अभियंत्याची फिरती आवश्यक

रहदारीच्या रस्त्यावर वॉच ठेवण्याची गरज

पंधरा दिवसांत अतिक्रमणमुक्त ठिकाणे

सीपीआर चौक, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा परिसर, पापाची तिकटी, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोड, गंगावेश, रंकळा स्टँड, न्यू शाहूपुरी, फिरंगाई मंदिर परिसर, जुना वाशीनाका, अंबाई टँक, राजारामपुरी, खरी, कॉर्नर, पाण्याचा खजिना, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर.

अतिक्रमण विभागावर दबाव येत असल्याने अतिक्रमण निर्मूलन कारवाई होत नव्हती. महापौर व आयुक्तांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. पण कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी विभागीय कार्यालय, नगररचना, किंवा उपशहर अभियंत्यावर जबाबदारी निश्चिती केली पाहिजे.

अजित ठाणेकर, नगरसेवक

कोणताही पक्षपात न करता अतिक्रमण निर्मूलन मोहीम कायम ठेवावी. कारवाई केलेल्या ठिकाणांची पथकाने नियमित पाहणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. महाद्वार, ताराबाई रोड व राजारामपुरी अशा अत्यंत रहदारीच्या ठिकाणी पथकांने वारंवार पाहणी करावी. तसेच अतिक्रमण विभाग सक्षमपणे कार्यन्वित ठेवावा.

विजय खाडे-पाटील, नगरसेवक

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमध्ये किरकोळ स्वरुपाचा अडथळा वगळता कारवाईला फारसा विरोध झालेला नाही. कारवाईनंतर दोनवेळा पाहणी करुन पुन्हा अतिक्रमणे हटवली आहेत. कारवाईचा धडाका असाच सुरू राहणार आहे. प्रशासनाच्या पाठबळामुळे कारवाईला जोरात सुरू आहे.

पंडित पवार, अतिक्रमण विभागप्रमुख

अतिक्रमण हटवलेले साहित्य

डिजिटल बोर्ड : ९०

बॅनर व स्टँडी : १,१७४

शेड : १०५

केबिन्स : ५३

हातगाड्या : ७८

कारवाईत सहभागी कर्मचारी

उपशहर अभियंता : चार

अतिक्रमण विभाग प्रमुख : एक

नियमित कर्मचारी : ५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो महिला विठुरायाच्या दरबारात

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

शेतात पिकलेले सर्व प्रकारचे नवधान्य विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी राज्यभरातून हजारो महिलांनी आज विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी केली आहे. हजारो महिला भाविक आज पहाटेपासून ताटात हळद , कुंकू , तिळगुळ आणि शेतात आलेले ऊस , बोर, गाजर, हुरडा यासह सर्व प्रकारची धान्य अर्थात शेतातील पहिले पीक देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या आहेत. महाराष्ट्रासह , गुजरात, आंध्रप्रदेश , तेलंगणा आणि राजस्थान मधून देखील भाविक मोठ्या संख्येनी आज मंदिरात आले आहेत. विठुरायाच्या चरणी हे धान्य अर्पण केल्याने पुढील वर्षभर शेतात भरघोस पीक येऊन शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट संपून जाते, असे या शेतकरी महिलांची भावना असते.

मंदिरात आज विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला दागिन्याने सजविण्यात आले असून विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. रुक्मिणी मातेला नवधान्याचे वाण अर्पण करीत महिला इतर सवाष्ण महिलांना हे वाण देतात. मंदिर समितीने आज खास महिलांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था केली असून रुक्मिणी मंदिरात फक्त महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज खास महिलांना वाणवसा करायचा दिवस असल्याने पुरुषांनी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडीच्या जवानाचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

आडी, (ता. निपाणी) येथील जवान रोहित सुनील देवर्डे (वय२५) यांचा गंगटोक (सिक्कीम) येथे दरड कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दरड कोसळल्याने सोमवारी सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात त्यांचे निधन झाले. बुधवारनंतर त्यांचे पार्थिव गावी आणण्याची शक्यता आहे.

जवान देवर्डे मूळचे इचलकरंजीचे असून आई आणि भावासोबत ते मामाच्या गावी आडी येथे राहत होते. ७ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात भरती झाले होते. एएससी ५१७ बटालियन, बंगळूर येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. सध्या ते सिक्कीम येथे होते. ते ९ जानेवारीला सुटी घेऊन गावी येणार होते. पण त्यांनी सुटी पुढे ढकलली होती.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images