Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र महत्त्वाचे ठरणारे आहे. महिलांच्या सर्व समस्या पोलिसासमोर येत नाहीत. अशा वेळी महिला समुपदेशन केंद्र अनेक दृष्टीने उपयोगी ठरणार असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले.

राज्य महिला आयोग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या मान्यतेने स्वयंप्रेरिका ग्रामीण महिला (स्वग्राम) संस्था संचलित महिला समुपदेशन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागालगत समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, भगवान पाटील उपस्थित होते. सीईओ मित्तल यांनी समुपदेशन केंद्रामुळे महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत होईल, असे नमूद केले. देवयानी ठाकरे यांनी 'शाळा व कॉलेजमध्ये समुपदेश केंद्रे सुरू करावीत. तसेच स्वसंरक्षण उपक्रम राबवावेत'असे आवाहन केले.

महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी जिल्ह्यातील समुपदेशन केंद्राची माहिती दिली. राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. 'स्वग्राम'च्या अध्यक्षा श्रृतिका काटकर यांनी स्वागत केले. अॅड. शाहू काटकर यांनी आभार मानले. याप्रसंगी विलास देसाई, रोहिणी घोसाळकर, कल्याण निंबाळकर, रुपाली पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाचणीविना घंटागाड्या खरेदीचा घाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्यरीत्या विघटन करण्यासाठी सरकारने इचलकरंजीसाठी मंजूर २७ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या निधीतून ४.६ कोटींच्या घंटागाड्या घाईगडबडीने खरेदीचा घाट घातला जात आहे. परंतु त्याची मान्यताप्राप्त संस्थांमार्फत तांत्रिक क्षमतेची चाचणी गरजेची असताना ते घडलेले नाही. आता हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने वाहन अधीक्षकांसह कर्मचाऱ्यांवर तांत्रिक क्षमता अहवाल देण्यासाठी दबाव टाकला जात आहे,' असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी केला.

इचलकरंजी शहरासाठी सरकारने २७ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत ६८ घंटागाड्या, ५ कॉम्पॅक्टर वाहने खरेदी केली जात आहेत. त्यासाठी राज्य सरकारने टाटा कन्सल्टन्सीच्या वतीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक वाहनांची खरेदी सरकारच्या जीईएम पोर्टलवरून करणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेला ४ कोटी ६ लाख मंजूर झाले आहेत. त्याची नोंदणीसुद्धा पोर्टलवर केली आहे. या निधीतून ६८ घंटागाड्या खरेदी करण्यासाठी पोनोक्स इंजिनीअरिंग अँड फॅब्रिकेटस कंपनीला काम सोपविण्यात आले असून २८ सप्टेंबर २०१८ रोजी वर्कऑॅर्डर दिली आहे. तीन महिन्यात सर्व वाहने पुरविण्याचे कराराद्वारे कंपनीने मान्य केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १० घंटागाड्या आणण्यासाठी नगरपालिकेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांची पोर्टलवर दिलेल्या निर्देशानुसार तपासणी करण्यासाठी वालचंद महाविद्यालय, आयटीआय आदींसह मान्यताप्राप्त संस्थांकडून तांत्रिक क्षमता चाचणी करून घेणे गरजेचे होते. परंतु, तसे काहीच केले नाही. शिवाजी विद्यापीठाच्या तांत्रिक विभागाकडून वाहनांसाठी मान्यता घेतली असली तरी त्यांनी दिलेल्या पत्राद्वारे तांत्रिक क्षमतेची कोणतीही स्पष्टता होत नाही. हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने नगरपालिकेच्या वाहन अधीक्षक तसेच कर्मचाऱ्यांवर तांत्रिक क्षमता अहवाल देण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यासाठी प्रशासन आणि प्रशासनबाह्य व्यक्ती षङयंत्र रचत असल्याचा आरोप बावचकर यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बसेस पाटगाव पर्यटनस्थळापर्यंत न्या

$
0
0

कोल्हापूर : पाटगाव (ता. भुदरगड) येथील प्रसिद्ध स्थळे नदीपलीकडे आहेत. पर्यटक ही स्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, गारगोटी आगाराच्या गारगोटी-भटवाडी मार्गावरील सर्वच एसटी बसेस पाटगाव येथील नदीपलीकडील पर्यटनस्थळांपर्यंत जात नाहीत. तरी एसटी प्रशासनाने सर्वच बसेस पर्यटनस्थळापर्यंत जाण्याची व्यवस्था करावी. या पर्यटन स्थळांपर्यंत एसटी बस जाण्याची सोय एसटी प्रशासनाने केली आहे. पण गारगोटी आगाराच्या सर्वच बसेस पर्यटनस्थळाजवळ जात नाहीत. मोजक्याच बसेस नदीच्या पलीकडे जातात. त्यामुळे बस थांब्यावर उतरून पर्यटकांना अर्धा किलोमीटर चालत जावे लागते. सर्व गाड्या नदीपलीकडे पर्यटनस्थळापर्यंत जाण्यासंदर्भात एसटीच्या कोल्हापुरातील प्रादेशिक कार्यालयाने गारगोटी आगाराला सूचना दिल्या. मात्र, गारगोटी आगाराकडून अद्याप तशी कार्यवाही झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण भागाच्या विकासात गोकुळचा मोलाचा वाटा

$
0
0

कोल्‍हापूर टाइम्स टीम

सहकारामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्‍या विकासामध्‍ये गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा असून, लोकांचे जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील यांनी केले.

अखिल भारतीय सहकार सप्‍ताहानिमित्त जिल्हा दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) आयोजित केलेल्या महिला मेळाव्‍यात ते बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले की, सहकारी संस्‍थांमुळे राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्‍य शेतकरी व दूध उत्‍पादकांचा विकास झालेला आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारात अग्रेसर असून यामध्‍ये गोकुळचा मोठा वाटा आहे. यावेळी कथाकथनकार प्रा. आप्‍पासाहेब खोत यांनी 'माणसाच्‍या व्‍यथा आणि कथा' या विषयावर व्‍याख्‍यान दिले. तसेच ग्रामीण भागाशी निगडीत 'महापूर' ही भावाबहिणींची भावनिक कथा सादर केली.

स्वागत गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. राज्य सहकारी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्‍तम इंदलकर, पुदमचे सहायक निबंधक डॉ.गजेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, संचालक विश्‍वास जाधव, बाळासो खाडे, पी.डी. धुंदरे, दीपक पाटील, उदय पाटील, संचालिका जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, सौ. उर्मिला विश्‍वासराव पाटील, संघाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामीण भागातील महिला उपस्थित होत्‍या.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कातवरे, कुंभार यांचा सत्कार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रिक्षा व्यावसायिक व वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे खडतर परिस्थितीवर मात करत आयआयटीतर्फे (पवई)पीएचडी पदवी प्राप्त अनिकेत कातवरे आणि 'आसमा'या जाहिरात संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार विजय कुंभार यांचा सत्कार झाला.

न्यू करवीर अॅटो रिक्षा युनियन, श्री शाहू रिक्षा मित्र मंडळ व कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या हस्ते व जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस असोसिएशनचे किरण व्हनगुत्ते, रघुनाथ कांबळे, न्यू करवीर अॅटो रिक्षा व शाहू रिक्षा मिक्ष मंडळाचे राजेंद्र थोरवडे, गजानन विभुते,शाल, श्रीफळ देऊन दोघांना गौरविले.

अनिकेत हा न्यू करवीर अॅटो रिक्षा युनियनचे पदाधिकारी व रिक्षाचालक वसंत कातवरे यांचा चिरंजीव आहे. त्याने खडतर परिस्थितीवर मात करत शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवले आहे. त्याने डांबरी रस्त्यावर संशोधन केले. पर्यावरणपूरक रस्त्यासाठी उपयुक्त डांबर व रस्त्याचा दर्जा या संदर्भात अभ्यास केला. आयआयटी पवईतर्फे देण्यात येणारी पीएचडी प्रदान केली आहे. कार्यक्रमाला सुरेश ब्रह्मपुरे, गजानन नाकील, नंदू सुतार, निवास ब्रह्मपुरे, जयपाल सोळांकुरे, मधुकर चित्रुक, प्रदीप जाधव, रमेश सूर्यवंशी, प्रशांत आतकिरे, विनायक माजगावकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष सुर्वे यांनी केले. महादेव विभुते यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा वधूवरांचा राज्यव्यापी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

त्र्यंबोली वधू-वर सूचक केंद्र, कोल्हापूर जिल्हा मंगल कार्यालय संघ, जिल्हा मंडप लायटिंग डेकोरशन असोसिएशन व सर्व जाती धर्म वधू-वर सूचक संस्थेतर्फे रविवारी, ता.२५ रोजी मराठा वधूवरांचा राज्यव्यापी मेळावा आयोजित केला आहे. समर्थ मंगल कार्यालय, दत्त साखर कारखाना समोर शिरोळ येथे सकाळी दहा वाजता मेळावा होणार आहे. मेळाव्याचा इच्छुक वधूवरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मंगल कार्यालयाचे अध्यक्ष सागर चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर, रुबेला लसीकरणमोहीम २७ रोजी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यात २७ नोव्हेंबरला आरोग्य प्रशासनाकडून १० लाख बालकांना गोवर, रुबेला लस देण्यात येईल. या मोहिमेत एकही बालक वंचित राहू नये, त्याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या, अंगणवाडी तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना लस देण्याचे नियोजन आहे. लसीकरणासाठी ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सुमारे ९ लाख ९१ हजार ८३ लाभार्थींची नोंद झाली. लस देण्यासाठी ८ हजार ८३१ केंद्रे निश्चित केली.

आरोग्य विभागासह शिक्षण, महिला, बाल विकास, रेल्वे, गृह, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स, रोटरी, लायन्स क्लब, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेची मदत घेण्यात येणार आहे. माता बाल अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी स्वागत केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. ज्योती लांडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, डॉ. अशोक जाधव, डॉ. हेमंत भारती, कादर मलबारी आदी अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर पार्किंगमुळेवाहतुकीचा बोजवारा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात सुरळीत वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेची आहे. पण या दोन्ही घटकांत समन्वयाचा अभाव आणि जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंग नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेतील मार्गांवर चारचाकी, दुचाकी वाहने पार्क केली जातात. बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतुकीलाच 'ब्रेक'लागत असल्याचे चित्र आहे.

मात्र महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखा वर्षानुवर्षे नियोजनाचे कागदी घोडे नाचवत आहेत. शहरातील अनेक हॉटेल्स, मंगल कार्यालय, हॉस्पिटल्स, यात्री निवास, सांस्कृतिक कार्यालयाकडे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही. नियमानुसार बांधकाम, पार्किंगची व्यवस्था तपासण्याची जबाबदारी महापालिकेच्या नगररचना विभागाची आहे. मात्र, अनेक प्रकरणात अधिकारी आणि व्यावसायिकांची मिलीभगत होऊन नियम धाब्यावर बसविले आहेत. पार्किंगची जागा अडविल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. वाहने लावण्यास जागाचा नसल्याने पार्किंगसाठी रस्त्याचा वापर सुरू आहे. अनेक दुकानदार स्वत:ची वाहने, ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क करतात. परिणामी केएमटी बसेस, मोठ्या वाहनांना जागाच न मिळाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शहर वाहतूक शाखेकडून क्रेनद्वारे वाहने उचलली जातात, मात्र, अनेकदा ती कारवाई जुजबी ठरते.

दोन्ही बाजूच्या पार्किंगने रस्ता अडविला

सुरळीत वाहतुकीसाठी शहरातील विविध मार्गावर सम, विषम तारखेला वाहनांच्या पार्किंगचे नियोजन केले आहे. मात्र त्याची सक्षमपणे अंमलबजावणी होत नाही. भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते महापालिका चौक, बिंदू चौक ते आईसाहेब महाराज चौक, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन ते व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी बाजारपेठ या मार्गावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. महाद्वार रोड मुळात अरुंद, नेहमी गजबजलेला आहे. मात्र या मार्गावरही दोन्ही बाजूनी दुचाकी वाहनांच्या रांगा लागतात. दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर या मार्गावर वाहतूक कोंडी वाढली आहे. सीपीआरच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या केबिन्स, मोबाइल व कटलरी साहित्य विक्रीच्या केबिन, वडा सेंटर, घड्याळ विक्रीच्या केबिनसमोर वाहतुकीला अडथळा होतील या पद्धतीने वाहने लावलेली असतात. शिंगोशी मार्केटचे पार्किंग रस्त्यावर झाले आहे. यामुळे सकाळी, संध्याकाळी वाहतूक कोंडी ठरलेली आहे.

प्लॅन पार्किंगचा, वापर दुकानगाळे म्हणून

महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत बांधकाम परवाना दिला जातो. सांस्कृतिक कार्यालय, मंगल कार्यालय, हॉटेल व्यावसायिकाकडून बांधकाम डिझाइनमध्ये मोठ्या स्वरुपात पार्किंगचा आराखडा सादर होतो. बांधकाम परवाना घेताना बेसमेंटमध्ये पार्किंग दाखवले जाते. कालांतराने बेसमेंट व पार्किंगच्या ठिकाणी दुकानगाळे काढले जातात. शिवाय प्रत्यक्ष बांधकाम करताना पार्किंगची जागा मर्यादित ठेवल्याची असंख्य बांधकामे आहेत. त्यावर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून कारवाईच होत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वत: तपासणी करून पार्किंगचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी नागरिकांनी तक्रारी कराव्यात या प्रतीक्षेत आहेत.

रस्त्यावरच्या थांब्यांचा अडथळा

शहरातील केएमटी बस थांबे वाहतुकीला मोठा अथडळा बनत आहे. या थांब्यावर काही रिक्षाचालक रिक्षा लावून उभे असतात. परिणामी केएमटी बस भररस्त्यात उभी करून प्रवासी घेतले जातात. त्यामुळे जवळपास पाच मिनिटे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होते. अनेकदा थांबा रिकामा असला तरी केएमटीचे चालक रस्त्यातच बस उभी करतात. याबाबत अनेकदा वादावादीचे प्रसंग उभे राहतात, केएमटी प्रशासनाने थांबे रिकामी करून चालकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात. बेशिस्त पार्किंग, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई चालू आहे. पार्किंग नियोजनाविषयी महापालिकेशी चर्चा सुरू आहे. सांस्कृतिक कार्यालय, हॉटेल, मंगल कार्यालयाची पार्किंग व्यवस्था, संबंधित व्यवस्थापनने पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे का यासंदर्भात दोन दिवसांत महापालिकेला पुन्हा पत्र दिले जाईल.

अनिल गुजर, पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखा

पार्किंगची जागा खुली ठेवली पाहिजे. बेसमेंटमध्ये दुकानगाळ्यांना परवानगी नाही. पार्किंगचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाईची तरतूद आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यास तपासणी करुन संबंधितांवर महापालिका नियमानुसार कारवाई करू.

आर. एस. महाजन

सहायक संचालक नगररचना विभाग

मटा भूमिका

वाहतुकीचे योग्य नियोजन हवेच

कोल्हापूर शहरात सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुलनेने पार्किंगच्या जागा अपुऱ्या असल्याने रस्त्यावरचे पार्किंग हा वाहतुकीतील मोठा अडथळा ठरत आहे. शहरात वर्षभर पर्यटक, भाविकांचा ओघ असतो. शहरातील वाहनांची वाढती संख्या, भाविक पर्यटकांचा विचार करुन शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंगचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहरात मोठा वाहनतळ नाही. बहुमजली वाहनतळाचा प्रस्ताव रखडला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून तीन ठिकाणी वाहनतळे प्रस्तावित केली आहेत, मात्र अजून कामाला सुरुवात नाही. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने एकत्र येऊन शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंगचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. महापालिकेने शहरातील पार्किंग स्थळे विकसित करण्याची गरज आहे. ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केल्यास शहरातील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावांतील पाण्याच्या उधळपट्टीला चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजनांद्वारे घरोघरी दिलेल्या नळ कनेक्शनला ना मीटर, ना कॉक. त्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होतो. यंदा संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे, यासाठी ग्रामीण भागातील नळाला तोटी (कॉक) बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेनंतर या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतींना कळविली जाईल. त्यानंतर नळाला तोटी (कॉक) बसविण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. संबंधीत नागरिकांना महिनाभराची मुदत देण्यात येणार आहे. या कालावधीत जे नळ बसविणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय झाला. सद्यस्थितीत प्रत्येक कनेक्शनसाठी मीटर बसविणे शक्य नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात तोट्या बसविल्या जातील असे यावेळी ठरले.

बैठकीत जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईवर चर्चा झाली. अध्यक्षा महाडिक यांनी संबधित गावे आणि वाड्या वस्त्यांच्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या. प्रशासनातर्फे पाणी टंचाईचा आराखडा तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर केल्याची माहिती देण्यात आली. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, सदस्या बंडा माने, शिवाजी मोरे, हेमंत कोलेकर, राणी खमलेट्टी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

अधिकाऱ्यांची चालढकल

पन्हाळा तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेण्यासाठी चालढकल केली. यावरुन सभापती महापुरे, सदस्य मोरे यांनी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा दिला.

आचारसंहितेपूर्वी योजना पूर्ण करा

अध्यक्षा महाडिक यांनी मंगळवारी सायंकाळी सर्व खात्याच्या विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाच्या योजनांच्या सध्यस्थितीची माहिती घेतली. येत्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळतील या पध्दतीने नियोजन करावे. विविध योजना आणि विकास कामासाठी उपलब्ध निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. योजनांच्या अंमलबजावणीअभावी निधी परत जाणार नाही यासंबंधी खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हा नियोजन मंडळाकडील सर्व योजनांची कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण करावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक फंडास भरीव मदत

$
0
0

माळी समाजाच्या मेळाव्यात देवस्थानचे अध्यक्ष जाधव यांची ग्वाही

कोल्हापूर टाइम्स टीम

'वीरशैव लिंगायत माळी समाजाचे काम इतर समाजांना प्रेरणादायी आहे. समाजातील सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून संघटनेने जे शैक्षणिक फंड उभारण्याचे काम सुरू केले आहे, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यासाठी भरीव मदत करू,' असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी काढले. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने आयोजित वधू वर पालक व समाज मेळावा तसेच जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात जाधव ते होते. यावेळी समाजाच्यावतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार पोपट माळी यांना मरणोत्तर तर नलिनी दिनकर माळी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे निवृत्त पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सांगलीचे माजी महापौर विजयराव धुळूबुळू यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोपट माळी यांच्या कुटुंबियांनी जाधव यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार स्वीकारला. नलिनी माळी यांना महापौर बोंद्रे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्राचे वाचन बाबासाहेब माळी व साधना माळी यांनी केले.यावेळी महापौर बोंद्रे व पोळ यांनी आपल्या मनोगतात माळी समाजाच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. नलिनी माळी, रूपाली माळी, अनिता माळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिस निरीक्षक मनीषा माळी, स्नेहल माळी, शेखर माळी, स्नेहल कुदळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी समाजाचे अध्यक्ष अशोक माळी यांनी स्वागत तर शिवानंद माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उद्योजक राजेंद्र माळी, स्मॅकचे उपाध्यक्ष गोरख माळी, अण्णासाहेब माळी, रंगराव इरळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन संतोष माळी, संभाजी माळी व श्रुती माळी यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष संतोष माळी यांनी आभार मानले.

फोटो ओळी

वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने नलिनी माळी यांना महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी महेश जाधव, गुलाबराव पोळ, विजयराव धुळुबुळू, अशोक माळी, राजेंद्र माळी आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीने दुसऱ्या दिवशीही झोडपले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर परिसर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गुऱ्हाळ घरे बंद राहिली. ऊसतोडणीवर परिणाम झाला. वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले. अचानक हवेतील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले, वयोवृद्ध किरकोळ आजाराने त्रस्त झाले आहेत.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नोव्हेंबर महिना सुरू होताच अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली होती. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. थंडी गायब होऊन उष्मा वाढला. आकाशात ढगाची गर्दी झाली. रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसानंतर काहीकाळ गारवा, त्यानंतर उष्णता अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, अंगदुखीने त्रस्त असलेल्यांची संख्या वाढली आहे. उपचारासाठी सरकारी, खासगी दवाखाने फुल्ल दिसत आहेत. शहरात काही घरांची पडझड झाली आहे.

पावसाने ऊसतोडणीच्या कामात व्यत्यय आला. अनेक ठिकाणी तोडणीचे काम बंद ठेवावे लागले. कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांत पाणी घुसले. त्यांच्या प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. वीटभट्टीधारक नुकसानीने हवालदिन बनले आहेत. गुऱ्हाळ घरे बंद आहेत. रब्बी पिकांवर किडीच्या प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने संबंधित शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. शाहूवाडी, राधानगरी, चंदगड तालुक्यातील भात कापणी, मळणीला ब्रेक लागला. भाताची वैरण भिजल्याने उत्पादक चिंताग्रस्त बनला आहे. याउलट तूर, पाण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणच्या रब्बी पिकांना पाऊस वरदान ठरला.

रस्त्यावर दलदल

पावसाळा झाल्यानंतर शहरातील काही रस्त्यावरील खड्डे माती, मुरूमाने भरण्यात आली. हे रस्ते पावसामुळे दलदलयुक्त बनले. पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे.

दुपारच्या पावसाने तारांबळ

मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे शहरातील चौकाचौकांतील विक्रेते, फेरीवाले, ढकलगाडीवरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पादचारी, दुचाकीधारक पावसापासून बचावासाठी मिळेल तिथे आश्रय घेतला. तीन वाजता पाऊस थांबला. मात्र, सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा पाऊस...

$
0
0

जोतिबावर भााविक, व्यापाऱ्यांची तारांबळ

पन्हाळा : तालुक्यात कोतोली, कोलोली, पिंपळे, बोरगाव वगळता पन्हाळागडावर तुरळक अवकाळी पाऊस झाला, तर श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर जोरदार पाऊस झाल्याने व्यापाऱ्यांसह भाविकांची त्रेधातिरपीट उडाली. अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांबरोबरच व्यापारीवर्गाची धांदल उडाली. पन्हाळा पश्चिम भागात मात्र चांगलाच पाऊस झाला असून, परिसरातील गुऱ्हाळघरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. जोतिबा डोंगरावर सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. सामानाची उचलाउचल करण्यात दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागली. डोंगरावर पाल मारून राहिलेल्यांच्या पालामध्ये पाणी घुसल्याने त्याचे अंधरूण-पांघरून भिजल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी मंदिरांचा आसरा घेतला.

००००

\Bराधानगरीत शेतीची कामे खोळंबली\B

राधानगरी : राधानगरी तालुक्यात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दिवसभरात अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोराच्या पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे ऊसतोडणी, ऊस वाहतूक खोळंबली, शिवाय गुऱ्हाळ घरे दोन दिवस बंद ठेवण्यात आली. तालुक्यात मंगळवारी सकाळपासून अवकाळी पावसाने थैमान घातले. गेले तीन दिवस पावसामुळे सर्वत्र चिखलमय स्थिती निर्माण झाली आहे. राधानगरी, भोगावती, सरवडे, धामोड परिसरात सुरू असलेल्या ऊसतोडणी थांबल्या आहेत. शेतवडीत चिखल निर्माण झाल्याने ऊस वाहतूक ठप्प झाली आहे. अर्जुनवाडा, चंद्रे परिसरात असलेली गुऱ्हाळघरे चिपाडे आणि इतर इंधन भिजल्याने बंद ठेवण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाळासदृश स्थिती निर्माण झाली. ऊसतोडणी थांबल्याने ऊस हंगाम वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा फायदा रब्बी हंगामातील शाळू, हरभरा तसेच बागायती ऊस पिकाच्या वाढीस फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, पण सध्या शेतीकामात व्यत्यय निर्माण झाला आहे.

000

फोटो...

बांबवडे परिसराला झोडपले

शाहूवाडी : तालुक्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडविली. पावसाने चरण, भाडळे, साळशी, पिशवी, शित्तूर-मलकापूर या बांबवडे परिसराला दोन तास झोडपले. परिसरात जिरायती क्षेत्र अधिक असल्याने या पावसाचा शेतीसाठी फायदा होणार आहे. सरुड परिसरात काही कमी प्रमाणात पाऊस झाला असला तरी दोन दिवसांच्या पावसाने येथील बागायती शेतकरी विचलित झाले आहेत. अनेक ठिकाणची ऊसतोडी खोळंबल्या असताना लावण झालेल्या क्षेत्रालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग झालेल्या पावसाने नाल्यांबरोबरच डोंगर कपारीतील ओढेही खळखळून वाहिले. दरम्यान, सोमवारी सरासरी १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सरूड, भेडसगाव विभागात सर्वाधिक पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस जोड...

$
0
0

फोटो...

वारणानगरला मुसळधार

वारणानगर : वारणानगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. शनिवारपासून थंडीचे दिवस असूनही वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. रविवारी रात्रीपासून वातावरण ढगाळ होते. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुसळधार पावसास सुरुवात झाली. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पाऊस थांबला. मंगलवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारी बाराच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. राहुट्या बांधून राहिलेल्या ऊसतोडणी मजुरांचे मात्र मोठे हाल झाले. पावसामुळे ऊसतोडणीही बंद ठेवावी लागली.

०००

चंदगडला हलक्या सरी

चंदगड : चंदगड शहरासह परिसरात दुपारी तीनच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शिरगाव, नागनवाडी, नांदवडे, हेरे, कानडी, वाळकोळी, हिंडगाव, कार्वे, हलकर्णी, दाटे या तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची कापून ठेवलेले भात भिजून काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार आहे.

००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओ मित्तल रमले अंगणवाडीतील मुलांसोबत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आयएएस अधिकारी म्हणजे सुटाबुटातील व्यक्तिमत्त्व, सोबतीला अधिकाऱ्यांचा फौजफाटा आणि प्रशासकीय बैठकीत व्यस्त असे सर्रास चित्र पाहावयास मिळते. प्रशासकीय कामकाजाचा डोलारा सांभाळताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल वसगडे (ता. करवीर) येथील अंगणवाडीतील मुलांसोबत रमले. जमिनीवरच बसून त्यांनी मुलांसोबत गप्पा मारल्या. संवाद साधत मुलांना इंग्रजीतून बोलते केले. मुलांच्या गाणी, गोष्टींनी प्रभावित झालेल्या सीईओंनी चॉकलेट वाटून मुलांचा आनंद द्विगुणित केला.

वसगडेतील अंगणवाडी क्रमांक ६७ मध्ये हा अनोखा कार्यक्रम झाला. ग्रामपंचायतीमधील बैठका संपल्यानंतर सीईओंनी अंगणवाडी पाहण्याचा मनोदय व्यक्त केला आणि दोनच मिनिटात ते अंगणवाडीत पोहोचले. सुपरवायझर सुरेखा कदम, अंगणवाडी सेविका अश्विनी पाटील यांनी सर्व मुलांचा गणवेश एकसारखा, वर्ग डिजिटल, मुलांना आकर्षित करून घेण्यासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

मित्तल यांनी अधिकारपदाची झूल बाजूला ठेवत थेट मुलांशी संवाद साधला. कधी मराठीत, कधी हिंदीमध्ये संवाद साधताना त्यांनी चिमुकल्यांनाही बोलते केले. कुणी इंग्रजीत नाव सांगितलं, तर कुणी इंग्रजीत कविता, गाणी ऐकवू लागले. मुलांच्या 'रेन रेन कम अगेन ते सायकल माझी झोकात, भरभर जातो शाळेत'या कविता ऐकून मित्तल यांनी प्रत्येक मुलाला चॉकलेट भेट दिले, तसेच बुके देऊन त्यांचा हुरूप वाढविला. जवळपास दीड तास ते अंगणवाडीत रमले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, गटविकास अधिकारी सचिन घाटगे, सरपंच नेमगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार साधणार नेत्यांशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात अनेक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पवार यांचा दोन दिवस मुक्काम असून ते गुरुवारी (ता. २२ नोव्हेंबर) दुपारी शहरात येणार आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवरून पक्षात वाद आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे मागितला आहे. हा दावा करताना प्रा. संजय मंडलिक, पी. एन. पाटील, सतेज पाटील यांची नावे उमेदवारीसाठी पुढे करण्यात आली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला आहे. महाडिक यांना विरोध करण्यासाठी विरोधकांनी प्रा. मंडलिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा वेगावली आहे. या पार्श्वभूमीवर पवार कोल्हापुरात येत असल्याने त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

पवार गुरुवारी सकाळी पुण्यातून निघणार असून दुपारी साडेबारा वाजता कोल्हापुरात येणार आहेत. सर्किट हाऊस येथे ते नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दिवसभर ते कोल्हापुरात असतील. गीता जाधव यांच्या कुटुंबातील एका लग्नाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. २३ नोव्हेंबर रोजी ते रुकडी व कुंभोज येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते कृषी प्रकल्पाचे व कर्मवीर स्मृतीभवनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. २४ नोव्हेंबरलाही ते कोल्हापुरात आहेत. तीन दिवस ते येथे असल्याने जिल्ह्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर आल्याने उमेदवारीचा घोळ तातडीने मिटवण्यासाठी पवार या दौऱ्यात प्रयत्न करतील. ते यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार विनय कोरे, कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. खासदार महाडिक यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनंदी सेवा निवृत्ती दिन साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनुभव जिल्हा परिषदेला मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या कामाचा अनुभवाचा फायदा अन्य कर्मचाऱ्यांनी घ्यावा' असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

जिल्हा परिषदेत एक मार्च ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत २०२ कर्मचारी निवृत्त झाले. जिप प्रशासनातर्फे मंगळवारी या कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. आनंदी सेवानिवृत्तीदिनी ९९ जणांचा सत्कार झाला. राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. शाल, श्रीफळ व पुस्तक असे सत्काराचे स्वरुप आहे. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांच्यासह विविध समित्यांचे सभापती, सदस्य उपस्थित होते. प्रा. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक दत्तात्रय केळकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णात चरापले यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

कौलव (ता. राधानगरी) येथील प्रगतशील शेतकरी कृष्णात चरापले यांना एकावडे ट्रस्टमार्फत आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शेतीमधील विविध प्रयोग आणि कृषी यांत्रिकीकरंण या कार्याची दखल घेऊन आदर्श शेतकरी पुरस्कार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

कौलव येथील प्रगतशील शेतकरी कृष्णात भाऊ चरापले यांनी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग यशस्वी केले आहेत. रासायनिक सेंद्रिय असा संयुक्त वापर (एसेरा) पद्धतीचा प्रचार आणि प्रसार, पट्टा पद्धत, आंतरपिके असे प्रयोग यशस्वी राबवले असून शेतीविषयक व्याख्याने, कृषी प्रदर्शनात सहभाग, कृषी यंत्रे निर्मिती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे एकावडे ट्रस्टमार्फत कृष्णात चरापले यांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. गोकुळचे माजी अध्यक्ष व संचालक अरुणकुमार डोंगळे यांच्यासह प्रल्हाद एकावडे, मधुकर मुसळे, रामचंद्र चौगले, आनंदराव लोहार, शामराव चरापले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीच्या पश्चिम भागात टस्करचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

तालुक्याच्या उत्तरेकडील मांजरे, मोसम, अणुस्कुरा भागात पुन्हा शिरकाव केलेल्या टस्करने गेले चार दिवस ऊस, केळी पिकांवर ताव मारत शेतीच्या नुकसानीचे सत्र सुरूच ठेवले आहे. टस्कर नेमका रात्रीच्या वेळी बाहेर पडत असल्यामुळे वनविभागालाही अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. गेले दोन दिवस अवकाळी पाऊस पडत असल्याने टस्करच्या पायाचे ठसे मिळतील असा वनविभागाचा कयास असून त्यादृष्टीने कार्यरत पथके टस्करच्या मागावर असल्याचे वनाधिकाऱ्यांकडून समजले.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी मांजरे परिसरात आढळलेल्या टस्करला स्थानिकांनी फटाके फोडून पिटाळून लावले. त्यानंतर टस्करने लगतच्या मोसम व अणुस्कुरा भागाकडे मोर्चा वळवला. अणुस्कुरा (ता.शाहूवाडी) येथे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी दारात अचानक टस्कर प्रकटलेला पाहून कमल गायकवाड भीतीने बेशुद्ध झाली. नंतर शुद्धीवर आल्या तरी त्या व त्यांचे पती नाना गायकवाड भीतीपोटी शेजारच्या घरात वास्तव्यास जात आहेत. याच दरम्यान येथीलच वसंत पाटील यांच्या ऊस पिकाचा टस्करने फडशा पाडला, तर भाताच्या पिंजराची गंजीही विस्कटली. कोळी हवालदार, ठम्मू फिरमा सोनावळे यांचा अनुक्रमे २० व १५ गुंठे ऊस, तर बर्की (ता. शाहूवाडी) येथील चंद्रकांत शंकर कोटकर यांचा १० गुंठे ऊस आशा सव्वा एकर ऊसशेतीचे टस्करकडून नुकसान झाले आहे. तसेच विनायक पाटील (रा. अणुस्कुरा) यांच्या पाण्याच्या टाकीचेही टस्करने नुकसान केले. रात्री-अपरात्री परिसरातील कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकू येताच टस्करच्या अनाहूत भासाने नागरिकांची भीतीने गाळण उडत आहे. गेल्यावेळी मंद वाटचाल ठेवलेल्या टस्करची यावेळी चालण्याची गती वाढली असल्याने रात्रीत एका भागातून दुसऱ्या भागात तो सहज विसावत आहे. त्यामुळे पश्चिमोत्तर भागातील नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास धजावत तर नाहीतच शिवाय शेतकरी दिवसाही शेतात जाणे बऱ्याचदा टाळत आहेत.

०००

हाकारा आणि सूर बॉम्ब..

वन विभागाने टस्करच्या शोधमोहिमेवर नियुक्त केलेला हाकारा गट रोज रात्री वन विभागाच्या वाहनातून गस्त घालीत असून टस्करला पिटाळून लावण्यासाठी सूर बॉम्ब या सौम्य स्फोटक फटाक्यांचा वापरही केला जात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते.

०००

फोटो ओळ :

अणुस्कुरा (ता.शाहूवाडी) येथे टस्करने नुकसान केलेले ऊसाचे क्षेत्र व संबंधित शेतकरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवीर तालुक्यातील २१ लाभार्थ्यांचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रधानमंत्री आवास योजना ही महत्वाकांक्षी असून कोणताही पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहणार नाही. आवास योजनेसंदर्भात कसलीही अडचणी असल्यास थेट संपर्क साधावा,' असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

केंद्र सरकारने २० नोव्हेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली. त्यामुळे वीस नोव्हेंबर हा दिन आवास दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त करवीर पंचायत समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी करवीर तालुक्यातील २१ लाभार्थ्यांचा सत्कार झाला. गावपातळीवर नेमून दिलेल्या उद्दिष्टांपैकी १०० टक्के घरकुल पूर्ण केलेल्या पाच ग्रामसेवक आणि पंचायत समिती स्तरावर काम करणाऱ्या दोन डाटा ऑपरेटरांचा सत्कार झाला.

करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, '३० वर्षापूर्वी सरकारच्या अन्य योजनांद्वारे ज्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला होता, त्यांची घरकुले आता पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र सरकारी धोरणामुळे त्यांना नवीन घरकुल योजनेचा लाभ मिळत नाहीत. यासाठी नियमामध्ये बदल करण्याची गरज आहे.'

गटविकास अधिकारी सचिन घाटगे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती भालकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष ओतारी यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, पंचायत समिती सदस्य शरद भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ रेल्वे दिल्लीला धडकणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे ३० नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी दिल्लीत संसदेवर धडक मारणार आहेत. तेथील मोर्चात सहभागी होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या पैशांतून मिरजहून स्वतंत्र रेल्वे बुक केली. स्वाभिमानी एक्स्प्रेस नावाने ही रेल्वे २८ नोव्हेंबर रोजी निघेल. २० खासगी बसमधूनही जाण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. राज्यभरातून २५ हजारांहून अधिक शेतकरी दिल्लीला जातील.

देशभरातील २०७ शेतकरी संघटनांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन केली. समितीचे समन्वयक खासदार शेट्टी वर्षभर देशभर फिरून शेतकऱ्यांत जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गेल्या अधिवेशनात संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालास दीडपट हमीभाव हे दोन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले. विधेयकास आतापर्यंत भाजप वगळता लहान, मोठ्या २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दोन्ही विधेयके मंजूर होण्यासाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी विविध शेतकरी संघटनांच्या मदतीने सरकारवर दबाव आणत आहेत. याकडे मोर्चातून लक्ष वेधण्यात येणार आहे.

दरम्यान,'स्वाभिमानी'चा प्रभाव असलेल्या कोल्हापूर, सांगलीतून दोन हजार शेतकरी रेल्वेने जात मोर्चात सहभागी होतील. त्यासाठी रेल्वेभाडे, चार दिवस जेवण, नाष्टा, चहासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पैसे रेल्वे प्रशासनाकडे भरले आहेत. मिरजेहून निघणारी ही स्वतंत्र रेल्वे २८ नोव्हेंबर रोजी निघून ३० नोव्हेंबर रोजी पोहोचेल. एक डिसेंबरला तेथून परत निघेल. तीन डिसेंबर रोजी रेल्वे मिरजेत पोहोचेल. याशिवाय २० खासगी बस ट्रॅव्हल्समधून एक हजार शेतकरी जाणार आहेत. परभणी, नांदेड, बुलढाणा, सोलापूर, नंदूरबार यांसह उर्वरित महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मेघालय, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली अशा ठिकाणचे शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत.

राहुल गांधींना निमंत्रण

आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार शेट्टी यांनी राहुल गांधी, शरद पवार, अहमद पटेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, नितीशकुमार, रामविलास पासवान, शरद यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, जयललिता, चंद्राबाबू नायडू यांना निमंत्रित केले आहे.

संसदेवरील मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी स्वतंत्र रेल्वे बुक केली. स्वाभिमानी एक्स्प्रेक्स नावाने ती रेल्वे निघेल. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातून २५ हजार तर देशभरातून ५ ते ६ लाख शेतकरी सहभागी होतील.

- राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images