Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्ह्यात १०९ गावांत पाणी टंचाई शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्च ते जून २०१९ या कालावधीतील संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. यंदा जिल्ह्यातील २९७ गावे आणि वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता आहे. या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी एक कोटी ८९ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा आराखडा मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील १०९ गावांत आणि १८८ वाड्या-वस्त्यांमध्ये मार्च ते जून या कालावधीत पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी नऊ प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक विहीरींतील गाळ काढणे, कूपनलिका खोदणे, पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तात्पुरत्या स्वरुपात पाणी योजना यांचा समावेश आहे. खासगी विहिरी आणि कूपनलिकाही आवश्यकतेनुसार ताब्यात घेतल्या जातील.

जिल्ह्यातील विशेषत डोंगराळी भागातील गावे व वाड्या वस्त्यामध्ये उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेल्या पर्जन्यमानाच्या आधारे पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. आराखडा तयार करताना भूवैज्ञानिकांचे मत विचारात घेतले जाते. डिसेंबरअखेर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता नाही. मात्र, जानेवारी ते जून २०१९ या कालावधीत एकूण २९७ गावे आणि वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आराखड्यामध्ये २०६ नवीन कूपनलिका प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कुपनलिका राधानगरी तालुक्यात असणार आहेत. विविध तालुक्यात मिळून ७५ खासगी विहिरी ताब्यात घेण्याची शिफारस आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाते. आराखडा बनविण्याअगोदर तालुका पंचायत समिती पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व इतर लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्याचा सर्वेक्षणाआधारे पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेकडून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अहवाल पाठविल्याचे कळविण्यात आले आहे. टंचाई उद्भवू नये यासाठी उपाययोजना करू.

- एम. एस. बसर्गेकर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग)

तालुकानिहाय गावे आणि वाड्या पुढीलप्रमाणे

तालुका गावे वाड्या एकूण

आजरा २ १४ १६

भुदरगड ८ २४ ३२

चंदगड १३ १२ २५

गडहिंग्लज २१ ०१ ३०

गगनबावडा ०१ ०४ ०५

हातकणंगले १० १० २९

करवीर ०६ ०६ १२

कागल ०० २५ २५

पन्हाळा १२ १२ २४

राधानगरी ०२ ४२ ४४

शाहूवाडी ०७ १० १७

शिरोळ १२ २० ३२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मळगेचे मेंगाणे दांपत्य मानाचे वारकरी

$
0
0

फोटो

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले,' असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.

महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी दांपत्य असणाऱ्या मेंगाणे यांना विठ्ठल - रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि एसटीचा पास देण्यात यावेळी आला.

मंत्री पाटील म्हणाले, 'राज्यात यंदा खूपच तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पण फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आता एक पाऊस झाला तर या समस्येवर उपाय निघू शकेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास आहे.'

याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त

जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ रेल्वे दिल्लीला धडकणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे ३० नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी दिल्लीत संसदेवर धडक मारणार आहेत. तेथील मोर्चात सहभागी होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या पैशांतून मिरजहून स्वतंत्र रेल्वे बुक केली. स्वाभिमानी एक्स्प्रेस नावाने ही रेल्वे २८ नोव्हेंबर रोजी निघेल. २० खासगी बसमधूनही जाण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. राज्यभरातून २५ हजारांहून अधिक शेतकरी दिल्लीला जातील.

देशभरातील २०७ शेतकरी संघटनांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन केली. समितीचे समन्वयक खासदार शेट्टी वर्षभर देशभर फिरून शेतकऱ्यांत जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गेल्या अधिवेशनात संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालास दीडपट हमीभाव हे दोन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले. विधेयकास आतापर्यंत भाजप वगळता लहान, मोठ्या २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. दोन्ही विधेयके मंजूर होण्यासाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी विविध शेतकरी संघटनांच्या मदतीने सरकारवर दबाव आणत आहेत. याकडे मोर्चातून लक्ष वेधण्यात येणार आहे.

दरम्यान,'स्वाभिमानी'चा प्रभाव असलेल्या कोल्हापूर, सांगलीतून दोन हजार शेतकरी रेल्वेने जात मोर्चात सहभागी होतील. त्यासाठी रेल्वेभाडे, चार दिवस जेवण, नाष्टा, चहासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पैसे रेल्वे प्रशासनाकडे भरले आहेत. मिरजेहून निघणारी ही स्वतंत्र रेल्वे २८ नोव्हेंबर रोजी निघून ३० नोव्हेंबर रोजी पोहोचेल. १ डिसेंबरला तेथून परत निघेल. ३ नोव्हेंबर रोजी रेल्वे मिरजेत पोहोचेल. याशिवाय २० खासगी बस ट्रव्हल्समधून एक हजार शेतकरी जाणार आहेत. परभणी, नांदेड, बुलढाणा, सोलापूर, नंदूरबार यांसह उर्वरीत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मेघालय, उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली अशा ठिकाणचे शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत.

राहुल गांधींना निमंत्रण

आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार शेट्टी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अहमद पटेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, नितीशकुमार, रामविलास पासवान, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, शरद यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, जयललिता, चंद्राबाबू नायडू यांना निमंत्रित केले आहे.

संसदेवरील मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी स्वतंत्र रेल्वे बुक केली. स्वाभिमानी एक्स्प्रेक्स नावाने ती रेल्वे निघेल. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातून २५ हजार तर देशभरातून ५ ते ६ लाख शेतकरी सहभागी होतील.

- राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचा दौरा खासगी, चर्चा राजकीय शक्य

$
0
0

२२ व २३ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीची जुळवाजुळव सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. एका लग्नाच्या निमित्ताने त्यांचा हा खासगी दौरा असला तरी दोन दिवसांच्या मुक्कामात बऱ्याच राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे आहेत. त्यांचा २२ व २३ नोव्हेंबर रोजी मुक्काम असून उमेदवारीच्या वादावर यावेळी चर्चा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून या पक्षात वाद सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांना विरोध होत असला तरी पक्षाकडे सध्या तरी दुसरा पर्याय नाही. प्रा. संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने दोन्ही काँग्रेससमोर उमेदवारीचा प्रश्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर मार्ग काढण्यासाठी पवार दोन दिवस विविध नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. येथील जाधव कुटुंबातील एका लग्नकार्यासाठी ते कोल्हापुरात येणार आहेत. २२ ला ते रात्री मुक्कामाला येणार असून २३ ला दिवसभर ते कोल्हापुरात आहेत. २४ ला परत जाणार असल्याने २३ ला रात्री ते काही नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार असून कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. यामुळे उमेदवारीच्या वादावर तातडीने मार्ग काढण्यासाठी हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. महाडिक हेच पवारांना प्रबळ उमेदवार वाटतात. पण त्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांचाही पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांना ते भेटणार आहेत. लोकसभा मार्चमध्ये होणार असल्याने लवकरात लवकर हा वाद मिटवण्याच्या दृष्टीने या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र क्रांतीसेना राज्यातील सर्व जागा लढवणार

$
0
0

५० टक्के उमेदवारी महिलांना देण्याचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे प्रमुख सुरेश पाटील यांनी, लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. राज्यातील अनेक मतदारसंघांतून इच्छुकांकडून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे विचारणा होत असून ५० टक्के उमेदवारी महिलांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रायरेश्वर मंदिर येथे नुकतीच महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची स्थापना करण्यात आली असून लवकरच या पक्षाला नोंदणी मिळणार आहे.

सुरेश पाटील म्हणाले,'राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली असून भाजप शिवसेना युतीसाठी चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राज्यात अनेकजण इच्छुक असून महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे पक्षाने राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा आणि १० विधानसभा मतदारसंघात मेळावे घेऊन पक्षबांधणी केली जाणार आहे. त्यासाठी पहिला मेळावा २५ नोव्हेंबर रोजी पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे होणार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षाची कार्यकारिणी घेणार आहे.' पत्रकार परिषदेला राज्य कार्यकारणी सदस्य मदन चव्हाण, प्रवक्त्या राणी पाटील, जयदीप शेळके, भरत पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य परेश भोसले, राहुल इंगवले, चंद्रकांत लोंढे, चंद्रकांत पाटील, मोहन मालवणकर, प्रविण माळी, एस.पी.कांबळे आदी उपस्थित होते.

................

उदयनराजेंना पक्षाची ऑफर

'खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यास त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी विनंती केली आहे. मंगळवारी (ता. २०) सातारा येथे त्यांच्याबरोबर चर्चा होणार आहे. उदयनराजेंनी आमच्या पक्षाला आशिर्वाद दिला आहे', असेही सुरेश पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिक ग्राहकांचा महिन्यात सर्व्हे करा

$
0
0

महापौर शोभा बोंद्रे यांचे प्रशासनाला आदेश, दंड आकारणीचा प्रस्ताव पुढील मिटिंगमध्ये

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्व प्रकारच्या ग्राहकांचे पाणी मीटर बंद असल्यास २५ हजाराची दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत सादर झाला. पण घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या मीटर संख्येत तफावत असल्याने सदस्यांनी व्यावसायिक वापराच्या मीटरची संख्या निश्चित करण्याची मागणी केली. त्यानंतर दंड आकारणीचा प्रस्ताव पुढील मिटिंगमध्ये घ्यावा तसेच शहरातील व्यावसायिक मीटरचा महिन्यात सर्व्हे करण्याचे आदेश महापौर शोभा बोंद्रे यांनी सोमवारी झालेल्या महासभेत प्रशासनाला दिले.

पाणीपुरवठा विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये बंद मीटरमधून पाणीचोरी होत असल्याचे निदर्शनास आले होते. पाणीचोरीला अटकाव करण्यासाठी विभगाने बंद मीटरला २५ हजारांचा दंड करण्याचा प्रस्ताव महासभेसमोर सादर केला. प्रस्ताव सादर करताना घरगुती ९७,१३८, व्यापारी १,६७० व औद्योगिक वापराची १,३६५ कनेक्शन असल्याचे स्पष्ट केले. सदस्यांनी सादर झालेल्या आकडेवारीवरुन प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील हॉस्पिटल, हॉटेल, यात्रीनिवास, मंगल कार्यालये आदींची संख्या सुमारे पाच हजार असताना बोगस आकडेवारी सागंत असल्याचा दावा करत मीटर रीडर आणि अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला. अशा अधिकारी व मीटर रीडरवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली.

बंद मीटरची वस्तुस्थितीदर्शक माहिती सभागृहाला मिळण्यासाठी पाणीपुरवठा व घरफाळा विभागाचे संयुक्त पथक स्थापन करुन सर्व्हे करण्याची मागणी प्रा. जयंत पाटील यांनी केली. शारगंधर देशमुख यांनी थकबाकी वसुलीसाठी सवलत देण्याची सूचना केली. यावेळी दिलीप पवार, नियाज खान, रत्नेश शिरोळकर व राजाराम गायकवाड यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर बोलवलेल्या बैठकीत व्यावसायिक वापरच्या बंद मीटरला ५० हजार दंड करण्याची सूचना सदस्यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव तयार केला असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. त्यानंतर महापौर बोंद्रे यांनी शहरातील व्यावसायिक वापराच्या मीटरचा सर्व्हे एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

...........

चौकट

बोअरिंग मशिन्स गायब

पाणीपुरवठा कनेक्शन घेताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लाइनवर बोअरिंग केले जात होते. पण गेल्या काही वर्षांपासून विभागातील बोअरिंग मशिन्स गायब असून प्लंबर स्वत:च बोअरिंग करत आहेत. क्षमतेपेक्षा मोठे बोअरिंग करुन अनधिकृत कनेक्शद्वारे पाणीचोरी केली जात असल्याचा आरोप शेटे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस तोडणीसह गुऱ्हाळघरांना फटाका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी पहाटेपासून अचानक विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस झाला. ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे ऊस वाहतूक आणि गुऱ्हाळघरांना याचा फटका बसला.

राधानगरी, भोगावती परिसरात सोमवारी पहाटेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक विजांचा कडकडाट आणि जोराचा पाऊस यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोराच्या पावसामुळे ऊस तोडणी आणि वाहतूक बंद झाली. जोरात सुरू असलेली गुऱ्हाळ घरेही पावसामुळे बंद झाली.

राधानगरी तालुक्यातील ऊस भोगावती, बिद्री, फराळे, बावडा या कारखान्यांना पाठवला जातो. पावसामुळे शेतीच्या वाफ्यात पाणीच पाणी झाल्याने ट्रॅक्टर ,ट्रक, बैलगाड्या चिखलात अडकण्याचे प्रकार घडले. त्यामुळे ऊस तोडणी आणि वाहतूक बंद करण्यात आली. बगॅस ,चिपाडे पावसात झाल्याने गुऱ्हाळघरे बंद करण्यात आली. डोंगर भागात सुरू असलेली गवत कापणी शेतकऱ्यांनी थांबवली. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारीही पावसाची रिपरिप होती. अवकाळी पडलेला पाऊस वातावरणातील हवेच्या दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने पडला की परतीचा पाऊस या विषयी तर्क सुरू होते.

पावसामुळे शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गुऱ्हाळघरांचा बगॅस, चिपाडे पावसात भिजल्याने गुऱ्हाळघरे बंद ठेवावी लागत आहेत. अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघरातील तीस लोकांचे काम बंद पडले.

- पंडीत चौगले, गुऱ्हाळघर मालक, अर्जुनवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून शाळेचा लूक बदलला

$
0
0

प्रविण कांबळे, हुपरी

हुपरी (ता. हातकणंगले) येथील शतकोत्तर असलेली केंद्रीय प्राथमिक शाळेचा डौल अद्यापही कायम आहे. याला शहरवासियांच्या सहभागाला मिळालेली शिक्षकांची जोड कारणीभूत ठरली आहे.

हुपरी परिसरात प्रथम निर्माण झालेली केंद्रीय प्राथमिक शाळा १६ डिसेंबर १८७० रोजी स्थापन झाली. शाळा परिसरातील एकमेव अनेकांनी याच शाळेत शिक्षण पूर्ण केले. गावभागातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली केंद्रीय शाळा व परिसर प्रशस्त आहे. खासगीकरणाच्या रेट्यात अनेक स्थित्यंतरे झाली. सर्वत्र जिल्हा परिषदेच्या शाळा संपण्याच्या मार्गावर असताना २०१० साली तत्कालीन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिवंगत सुहास माळी, धनंजय खाडे, अश्विनी लोहार, प्रशांत गायकवाड, मुख्याध्यापक रावसाहेब माने व अन्य शिक्षकांनी केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी अविरत कष्ट घेतली. 'शाळा माझी... मी शाळेचा...' ही अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. यातून शाळेचा लूक बदलून तिला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न सुरू केला. याला हुपरीकरांनीही मोलाची मदत केली. शाळा वाचली पाहिजे, फुलली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. यामुळे शाळेचे अंतरंग आणि बाह्यरंग बदलून गेला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांच्या फंडातून शाळेच्या सभोवताली दगडी संरक्षक भिंत बांधण्यात आली. खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून चार संगणक, आमदार सुजित मिणचेकर यांनी पेव्हींग ब्लॉक, समाजकल्याणचे माजी सभापती किरण कांबळे यांनी तीन खोल्यांमध्ये फरशी बसवली. समृद्ध योजनेतून शाळेला वीस हजारांची पुस्तके, संगीत साहित्य दिले. त्याबरोबरच सध्याच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडूरे यांनी सांस्कृतिक हॉलची फरशी बसवून खिडक्या, स्वच्छतागृहे दुरुस्ती करून घेतली. चांदी कारखानदार असोसिएशनने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, श्रीनिवास पालकर यांनी शालेय गणवेश, भरत गाट यांनी वाचनालयासाठी साहित्य दिले.

शिवाय शहरातील निलावती नेमिनाथ शेटे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चांदी उद्योजक राजेश शेटे व त्यांची बहीण नंदाताई शेटे यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी एलइडी व डिव्हीडी तसेच शाळेच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिष्यवृत्ती, अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मासिक ६ हजार रुपये अनुदान, शाळेच्या पटसंख्येत वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत सहलींचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रम राबवल्यामुळे केंद्रीय शाळेच्या प्रगतीत नेहमीच वाढ होत आहे.

तुटपुंजे अनुदान

खासगी शाळांच्या स्पर्धेत शाळा टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषदने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा परिषदेकडून शाळांना फक्त १५ हजार रुपये असे तुटपुंजे अनुदान दिले जाते. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीला शाळा चालवणे मोठे जिकिरीचे बनले आहे. तरीही लोकसहभागातून शाळेचा लूक बदलला आहे.

बगीचा, ग्रंथालय, संगणक विभाग

शहरातील अनेक दातृत्ववान व्यक्तींनी केलेल्या मदतीने शाळेत आकर्षक बागबगीचा, ग्रंथालय व संगणक विभाग स्वतंत्ररित्या चालू केला आहे. त्याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उपयोग झाला. त्यामुळे इंग्रजी माध्यमाकडे वळणारे अनेक विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत आहेत.

परिसरात सर्वात जुन्या असलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळेला लोकसहभागातून गतवैभव प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेने अशा चांगल्या शाळांना मदत करणे गरजेचे आहे. यासाठी अध्यक्षा शौमिका महाडिक व शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेऊन शाळेच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रयत्न करणार.

- स्मिताताई शेंडूरे

जिल्हा परिषद सदस्या, हुपरी

शहरातील शंभर वर्षे पूर्ण केलेली केंद्रीय प्राथमिक शाळा ही जुन्या ऐतिहासिक घटनांची महत्वपूर्ण साक्षीदार आहे. या शाळांना गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने वेळीच प्रयत्न केले पाहिजेत.

- बाळासाहेब घोरपडे

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सनी आवळे खूनातील आरोपींना फाशी द्या

$
0
0

फोटो - अनंतसिंग

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सनी आवळे याचा खून परिसरात वर्चस्व ठेवण्याच्या वादातून झाला आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालून गुन्हेगारीच्या उच्चाटनासाठी आवळे खून प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी या मागणीसाठी नेहरुनगर परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलकांनी प्रांताधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार ढकलून मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या मारला. जोरदार घोषणाबाजी, शंखध्वनी व आक्रोशामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला.दरम्यान, नागरिकांनी इचलकरंजी बार असोशिएशनलाही निवेदन देण्यात आले असून आरोपींचे वकिलपत्र कोणीही घेऊ नये अशी मागणी केली आहे.

तीन दिवसांपूर्वी नेहरुनगर झोपडपट्टीत सनी संजय आवळे याचा त्याचेच मित्र अक्षय कोळी, आकाश बेळगावकर यांनी चाकू व कोयत्याने वार करुन निर्घृण खून केला. पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. संबंधित आरोपींविरोधात तातडीने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नेहरुनगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक अब्राहम आवळे, शरद बोंद्रे, सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांताधिकारी कार्यालय येथे आला. पोलिसांनी प्रवेशद्वारातच मोर्चा अडविला. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, सनीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी नागरिकांनी परिसरात दणाणून सोडला. येथे काही काळ गोंधळ निर्माण झाला. आंदोलनात आयुब बागवान, नंदकुमार साठे, जमीर काझी, योगेश कांबळे, अमर शिंगे, पिराजी आवळे, संजय आवळे, मिराबाई हाके, सुलभा चंदनशिवे, कांताबाई पारसे, सुधा चंदनशिवे, छाया कांबळे, इंदुबाई आवळे, मालन कांबळे, शबाना मुल्ला आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानप्रकाश यात्रा सुरू

$
0
0

इचलकरंजीत 'ज्ञानप्रकाश यात्रा'

इचलकरंजी : लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनाच्या निमित्ताने मनशक्तीच्यावतीने इचलकरंजीत १९ ते २३ या काळात ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले आहे. या काळात विविध शाळा, कॉलेज, संस्था, ऑफीस या ठिकाणी विविध विषयांवर विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. २१ ते २२ नोव्हेंबर रोजी नामदेव भवन, दाते मळा येथे सायंकाळी ६.३० वाजता विनामुल्य व्याख्यानमाला होणार आहे. २१ रोजी 'मत्सरघात आणि वास्तूशुद्धी' या विषयावर आणि २२ रोजी 'सुजाण पालकत्व' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून दागिने लंपास

$
0
0

किरकोळ कारणांवरुन मारहाण

करून ५० हजाराचे दागिने लंपास

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी

किरकोळ कारणातून घरात घुसून मारहाण करुन ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात पिंटू रॉय, मिंटू रॉय (दोघे रा. तुळजाभवानी अपार्टमेंट), तौफिक शिरगुप्पे, अनिल मोळे व अजित माळी (तिघे रा. तारदाळ) या पाचजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मंगल शिवानंद हांजिगे (वय ४५ रा. जेकेनगर तुळजाभवानी अपार्टमेंट शहापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हांजिगे व पिंटू रॉय हे जेकेनगर परिसरातील तुळजाभवानी अपार्टमेंटमध्ये शेजारी राहतात. रविवारी रात्रीच्या सुमारास पिंटू व मिंटू रॉय यांनी हांजिगे यांची नातवंडे दंगा करतात या कारणावरुन भांडण काढले. त्यातूनच त्यांनी तीन सहकाऱ्यांना बोलावून घेतले. पाचजणांनी हांजिगे यांच्या घरात घुसून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे नेकलेस व मंगळसूत्र काढून घेतले. हांजिगे यांची मुलगी व सून यांनाही लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. आम्ही अमोल माळी गँगची माणसे असून आमच्याकडे बंदूक आहे, तुम्हाला जिवंत सोडत नाही अशी धमकीही दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचंगी धरणाची घळभरणी १५ जानेवारीपूर्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजरा तालुक्यातील उचंगी धरणाच्या घळभरणी कामाला १५ जानेवारी २०१९ पूर्वी सुरूवात करून पाणी अडविण्याचा निर्णय सोमवारी शिवसेना शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर होते.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले, 'भूसंपादन, पुनर्वसन अशा विविध कारणांनी गेल्या १८ वर्षांपासून धरणाचे काम रखडले आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही काम सुरू झाले नाही. सरकार आवश्यक निधी देणार आहे. यामुळे १५ जानेवारीपूर्वी घळभरणीचे काम चालू करावे. सांडव्यासाठी स्वतंत्र निविदा काढावी लागणार आहे. याच्याही कामाला प्रारंभ करावी. चाफवडे- जेऊर रस्त्याच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. त्यासाठी निधीही प्राप्त आहे. काम सुरू करण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. धरणात पूर्ण क्षमतेने पाणी थांबल्यानंतर धोका पातळीतील १५० घरांच्या पुनर्वसनासाठी मंजुरी द्यावी. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरील अडथळे दूर कराव्यात. पूर्वीच्या ठेकेदाराकडून काम करून घेणार असाल तर तशा सूचना आताच त्यांना द्याव्यात.'

अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर म्हणाले, 'प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ५० हेक्टर जमीन देण्यासाठी २० कोटींच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर धरणाच्या कामाचा विरोध कमी होईल. प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधण्यासाठी आजरा येथे स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. नव्या नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ४० लाख रुपये देण्यात येणार आहे. जमिनीला जमीन देण्याचीही प्रक्रिया गतीमान केली आहे. १५ जानेवारीपूर्वी घळभरणीच्या कामाला प्रारंभ होईल. '

पाटबंधारे विभागाच्या अभियंता स्मिता माने म्हणाल्या, 'घळभरणीचे काम पूर्वीच्या ठेकेदारांकडून करून घेतले जाईल. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेण्याचे काम अंतिम टप्यात आहे. चाफवडे - जेऊर रस्ता, सांडव्याचे कामही घळभरणीच्या कामासोबतच केली जाईल. १५ जानेवारीपूर्वी सर्व परवानग्या घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात करता येईल.'

यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी विनोद निवाडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, संभाजी भोकरे, संदीप पाटील, प्रतिक क्षीरसागर, भिकाजी हळदकर, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा राजीनामा २६ नोव्हेंबरला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्चित झालेल्या फॉर्म्युलानुसार विद्यमान महापौर शोभा बोंद्रे यांची मुदत २४ नोव्हेंबर रोजी संपत आहे. सोमवारी तहकूब झालेली सभा पुन्हा पुढील सोमवारी, २६ नोव्हेंबर रोजी होणार असून सभेत महापौर बोंद्रे राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.

आघाडीच्या सत्ता फॉर्म्युलानुसार पुढील एक वर्षासाठी महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महापौर बदलाची चर्चा सुरू असली, तरी सोमवारी झालेल्या सभेत महापौर बोंद्रे राजीनामा देण्याची कोणतीही शक्यता नव्हती. मात्र सभा तहकूब झाल्यानंतर राजीनाम्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राजीनामा सादर करण्यासाठी सभा तहकूब केल्याची चर्चा सभेनंतर सुरू होती. पुढील सभेत महापौरांनी राजीनामा दिल्यास महापौर निवडीच्या हालचाली गतिमान होणार आहेत. महापौर निवडीबाबत आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यामध्ये बैठक झालेली नाही. मात्र राष्ट्रवादीचे इच्छूक आमदार मुश्रीफ यांची भेट घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त केएमटी कर्मचाऱ्यांचा महापालिकेवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचव्या वेतन आयोगातील फरक, महागाई भत्ता, घरभाडे अशा थकीत रकमेसाठी केएमटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. मोर्चा प्रवेशद्वारावर अडवल्यानंतर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त व्यवस्थापक संजय सरनाईक यांना देण्यात आले. सरनाईक यांनी सेवानिवृत्तांच्याप्रश्नी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

सकाळी ११ वाजता शेकाप कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. बिंदू चौक, शिवाजी रोड मार्गे मोर्चा महापालिकेवर आल्यानंतर कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडवण्यात आले. सरनाईक यांनी निवेदन स्वीकारुन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना सुभाष सावंत म्हणाले, 'केएमटी सेवेत कार्यरत असताना मिळालेल्या उत्पन्नातून आयकर जमा केला असून १२ टक्के बोनसही घेतला आहे. त्याच कर्मचाऱ्यांना निवृतीनंतर अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत. फरकाच्या रक्कमा प्रशासनाकडे थकीत असताना केवळ ८०० रुपयावर उदरनिर्वाह करावा लागत आहे. यापैकी अनेकजण मृत्यू पावले, तरीही प्रशासन देय रक्कम देत नाही. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.'

संभाजीराव जगदाळे म्हणाले, 'सेवानिवृत्तांना लाभाची रक्कम वेळेत देण्याचा सरकारचा आदेश असताना केएमटी तोट्यात असल्याचे कारण देत रक्कम दिली जात नाही. केएमटी तोट्यात असण्यामागे निवृत्त कर्मचाऱ्यांचा दोष नाही. ६० लाख इतकी नगण्य रक्कम असताना का दिली जात नाही ?'

'निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम दिली आहे. मात्र पाचव्या वेतन आयोगातील फरक रक्कम कोणत्याच कर्मचाऱ्यांना दिली नसून त्यासाठी प्रशासनाने धोरण निश्चित केले आहे. महापालिका व केएमटी प्रशासनाला वेगवेगळा न्याय देता येणार नसल्याचे स्पष्ट करत इतर मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.'मोर्चात बाबूराव कदम, श्रीकृष्ण कुंभार, कुमार जाधव, दस्तगीर पकाले, सुशांत बोरगे, मधुकर हरेल, असल्म बागवान, स्वप्नील पाटोळे यांच्यासह निवृत्त कर्मचारी सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीतील प्रकल्पाविरोधात पाचव्या दिवशीही आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजीतील बौद्ध विहारलगतच्या जागेत होत असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पास स्थगिती देण्याच्या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी पाचव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. दुपारी आंदोलक अचानक रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे कळताच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात केला.

दुपारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी आंदोलकांची बैठक झाली. बौद्ध समाजासाठीच्या स्मशानभूमीसाठी जागेचा सर्व्हे करून देण्याचे आदेश त्यांनी इचलकरंजीतील प्रांताधिकाऱ्यांना दिले. यावेळी दिलीप कुरणे, संजय कांबळे, अमर कांबळे, प्रकाश कांबळे, दयानंद माळगे आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रकल्पाला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, मागणीची दखल न घेतल्यास रस्ता रोको, आत्मदहनासारखी आंदोलने टप्याटप्याने केली जातील, अशी माहिती दीपक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठेकेदाराला फायदा तर महापालिकेला तोटा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

बिंदू चौक येथील पार्किंग ठेक्यात ठेकेदाराची वार्षिक कमाई ६५ लाखांची असताना केएमटी प्रशासनाने स्वत: वसुली सुरू केल्यानंतर मात्र यामध्ये घट झाली आहे. दररोज सरासरी २० हजारांची वसुली करताना केएमटी कर्मचारी मेटाकुटीला येत आहेत. जमा झालेल्या रकमेतून कर्मचाऱ्यांचे वेतन वजा जाता केवळ आठ हजार रुपये शिल्लक राहत असल्याने पार्किंगमधूनही केएमटीला तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, वसुलीसाठी वाहकांची नेमणूक केली जात असल्याने, बस मार्गस्थ होण्यावरही परिणाम होत आहे.

बिंदू चौक येथील २६ लाखांचा पार्किंगचा ठेका नऊ वर्षापूर्वी केएमटी प्रशासनाने ठेकेदाराला दिला. दरवर्षी यामध्ये १५ टक्क्याची वाढ झाल्यानंतर २०१७-१८ मध्ये ठेक्याची रक्कम ६८ लाखांपर्यंत पोहोचली. त्याची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर केएमटीने पार्किंग वसुली स्वत: करण्यास सुरुवात केली. दररोज दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी दहा ते १२ कर्मचाऱ्यांकडून पार्किंग शुल्क वसुली होत असून दिवसाला सरासरी १९ ते २० हजार रुपयांची वसुली होते. दररोजची वसुली पाहता केएमटीला वर्षाला ७२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने त्यांच्या वेतनापोटी प्रशासनाला १४ ते १६ लाख रुपये खर्च येणार आहे. मिळणाऱ्या उत्पन्नातून वसुली वजा जाता केएमटीला ५६ ते ५८ लाख रुपये शिल्लक राहणार आहे. मात्र ठेकेदारांतून जेवढी रक्कम मिळणार त्यापेक्षा कमी रक्कम मिळणार असेल, तर केएमटीने स्वत: वसुली का करायची? की ठेकेदाराच्या भल्यासाठी जाणिवपूर्वक यंत्रणा राबवायची असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

केएमटीच्या बिंदू चौकसह कपिलतीर्थ मार्केट, सीपीआर हॉस्पिटल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, गोकुळ हॉटेल आदी ठिकाणावरुन पार्किंग शुल्क वसूल केले जाते. बिंदू चौक वगळता इतर ठिकाणी दिवसाला कसेबसे एक हजाराचे उत्पन्न मिळते. यातून कर्मचाऱ्याचे वेतनही भागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व ठिकाणी वसुलीसाठी वाहकांची नेमणूक केली जाते. केएमटीकडे १२९ बसेस असताना सकाळी ९८ बसेस मार्गस्थ होतात. दुपारी यामधील आणखी सहा ते सात बसेस कमी होतात. नादुरुस्त बसेस वगळता वसुलीला असलेल्या वाहकांची नेमणूक त्यांच्या मूळ जागेवर केल्यास आणखी दहा ते बारा बसेस मार्गावर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी केएमटीच्या दैनंदिन तोट्यामध्ये घट होऊ शकते. यासाठी वाहकांऐवजी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पार्किंग वसुलीसाठी नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.

ठेक्याची आज अंतिम मुदत

बिंदू चौकाच्या पार्किंग ठेक्यामध्ये ३० टक्क्यांची वाढ केली आहे. परिणामी हा ठेका ६८ लाखांवर पोहोचला आहे. यावर १२ लाख जीएसटी आणि १४ लाखांची बँक गॅरंटी अशी एकूण एक कोटी चार लाखांवर ठेका जाणार आहे. ठेक्यासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. २०) आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूलमध्ये वडिलांचा मुलाकडून खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

अनैतिक संबंधांच्या कारणातून घरातील सततच्या वादावादीला कंटाळून सोमगोंडा आप्पासाहेब देसाई (वय ३०, रा. नूल) या मुलानेच वडिलांच्या डोक्यात लाकडी बांबूने प्रहार करून खून केला. आप्पासाहेब बाबू देसाई (वय ५८) असे मृताचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे रविवारी (ता. १८) रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. खून केल्याप्रकरणी संशयित मुलगा सोमगोंडा आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रकारात साथ देणारा मृत आप्पासाहेब यांचा मेव्हणा बाबासाहेब भिमगोंडा देसाई (रा. मुगळी, ता. गडहिंग्लज) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत नूल येथील पोलिस पाटील परशराम सरनाईक यांनी सोमवारी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, आप्पासाहेब देसाई यांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातून ते नेहमी मुलासह पत्नीबरोबर वाद घालीत होते. रविवारी सायंकाळीही याच कारणातून देसाई यांनी घरात वाद घातला. त्यातून चिडलेल्या सोमगोंडा याने वडिलांच्या डोक्यात लाकडी बांबूने, पाठीत व पायावर मारहाण करुन त्यांना जबर जखमी केले. आप्पासाहेब बेशुद्ध झाल्याचे पाहून सोमगोंडा याने तत्काळ बाबासाहेब देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या दुचाकीवरुन सोमगोंडा हे जखमी वडिलांना घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आले. तेथे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने दोघांनीही त्यांना घेऊन गावी नेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रस्त्यातच आप्पासाहेब यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी आप्पासाहेब यांना रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आल्याने ते मृत झाल्याचे भासवून त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ व २०१ नुसार गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विश्वास कुरणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनवरून धान्य मागणीसाठी गुरुवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँक खात्यावर थेट अनुदान नको, रेशन पुरवठाच कायम ठेवा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर्स फेडरेशन आणि रेशन बचाव समितीतर्फे गुरूवारी (ता. २२ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील सहभागी होतील, अशी माहिती फेडरेशनचे मुख्य सचिव चंद्रकांत यादव यांनी सोमवारी दिली.

चंद्रकांत यादव म्हणाले, 'सरकार टप्याटप्याने रेशनव्यवस्था मोडीत काढत आहे. पहिल्या टप्यात शिधापत्रिकेवरील धान्याऐवजी बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांचे बँकेत खाते नाही, त्यांना पैसेही नाही आणि धान्यही नाही असे होणार आहे. रेशन दुकानदारांवरही बेकारीची वेळ येणार आहे, त्यास विरोधासाठी रेशन दुकानदार, शिधापत्रिकाधारकांचा मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चा सकाळी साडेबारा वाजता मिरजकर तिकटी चौकातून निघेल. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनचे मुख्य सचिव विश्वंभर बसू, काकासाहेब देशमुख, डी. एन. पाटील नेतृत्व करतील. बिनखांबी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, आईचा पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईल. तेथे सरकार विरोधात निदर्शने करण्यात येतील.'

पत्रकार परिषदेस फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष शौकत महालकरी, रविंद्र मोरे, गजानन हवालदार, अशोक सोलापूरे, राजेश मंडलिक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीपी प्रकल्पासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

टाकवडे वेस परिसरातील एसटीपी प्रकल्प (मलनि:स्सारण केंद्र) रद्द करुन या प्रकल्पासाठीची महार वतनातील जागा समाजाला परत मिळावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली. केंद्रीय मंत्री आठवले यांच्या सूचनेवरुन याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी वेळ दिली आहे. सकारात्मक चर्चा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रिपब्लीकन पार्टीचे शहर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कांबळे म्हणाले, 'टाकवडे वेस परिसरात महार वतनातील जागेवर नगरपालिका १८ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाला परिसरातील नागरीकांनी प्रारंभापासून विरोध दर्शविला आहे. परंतु, नगरपालिकेच्यावतीने बळाचा वापर करून प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. प्रकल्पाविरोधात भागातील नागरिकांनी वेगवेगळ्या आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन हा एसटीपी प्रकल्प रद्द व्हावा आणि प्रकल्पासाठीची महार वतनातील जागा समाजाला परत मिळावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. आठवले यांनी महार वतन आणि अल्पभूधारकांच्या जागेवरील आरक्षण रद्द करून ही जागा समाजाला परत करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. चर्चेनुसार मुख्यमंत्र्यांनी बुधवार २१ नोव्हेंबर रोजी बैठकीची वेळ दिली आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन करू.'

दरम्यान, २७ डिसेंबर २०१८ रोजी प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या जाग्यावरच जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. या जगातिक परिषदेसाठी चीन, जपान, श्रीलंका यांसह विविध देशातील भंतेजी उपस्थित राहणार आहेत. नगरपालिका प्रशासनाने एसटीपी प्रकल्पाचे काम थांबवून त्यासाठी पर्यायी जागा शोधावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

याप्रसंगी अरुण कडाळे, किरण नामे, सिद्धराम कांबळे, पांडुरंग लाखे, अॅड. राहुल सडोलीकर, निशांत कांबळे, विजय नामे, प्रज्योत सूर्यवंशी, प्रकाश कोले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यजीव कायदा रद्द करण्याची रघुनाथ पाटील यांची मागणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

‘वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे प्राण्यांची संख्या वाढली आहे. प्राण्यांचा उपद्रव वाढल्यामुळे सरकारने तातडीने हा कायदा रद्द करावा. याशिवाय बेगडी प्राणीप्रेम दाखवणाऱ्या ‘पेटा’सारख्या संस्थांवर बंदी घालावी, या मागणीसाठी संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) विधानभवनवर मोर्चा काढणार असल्याची माहिती ’ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.

नरभक्षक अवनि वाघिणीची शिकार केल्याने सुरू असलेल्या वादात आता शेतकरी संघटनेने उडी घेतली आहे. अवनी वाघिणीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करणाऱ्या प्राणीप्रेमींना वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे दु:ख कळणार की नाही? असा सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथ पाटील म्हणाले, ‘नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. मात्र, ठार झालेल्या १३ शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाही. राजर्षी शाहू महाराजांनी स्वत: नरभक्षक वाघिणीची शिकार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत केली होती. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळेच प्राणीप्रेमी संघटना, पोलिस शेतकऱ्यांना लक्ष्य करीत आहेत.’

वन्यजीव संरक्षण कायदा व पेटासारख्या संस्थांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढत असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘डुक्कर, गवे, हत्ती, बिबट्या, हरीण, ससा, माकड, आदी प्राण्यांकडून शेतीचे मोठे नुकसान होते. वाढत्या संखेमुळेच प्राणी नागरी भागात येत आहेत. हिंस्र प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होतात. याची नुकसानभरपाई वेळेत मिळ‌त नाही. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे जनावरांच्या किंमती कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आला. याकडे लक्ष वेधण्यासह वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करावा. या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला राज्यभरातील शेतकरी ठाण्यात पोहोचतील. ठाण्यातून मोर्चाला सुरुवात होईल. सायन किंवा दादर येथे मुक्काम करून २६ नोव्हेंबरला विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images