Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मराठा इन्फंट्रीचा देशाला गर्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा लाइट इन्फंट्रीचा इतिहास पराक्रमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा मंत्र घेऊन जवान रणभूमीत उतरतात. शत्रूला नमवतात. त्याचा देशाला गर्व आहे', असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बुधवारी केले.

१०९ मराठा लाइट इन्फंट्रीला २५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्त इन्फट्रीच्या येथील टेंबलाई परिसरात आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनरल रावत म्हणाले, ' लष्कराने यापूर्वी केलेल्या लढाईत, कारवायांत मराठा सैनिकांचे योगदान मोठे आणि उच्च आहे. त्यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. म्हणून त्यांची ओळख साहसी, निडर आणि शौर्यवान अशी आहे. रणभूमीच्या इतिहासात असे एकही युध्द नाही, जे ११४ मराठा रेजिमेंन्टला मिळाले नाही. दिवसेंदिवस सैन्यदलात तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सामुग्रीचा वापर वाढत आहे. सेवानिवृत्तीनंतरही जवानांची, त्यांच्या कुटुंबियाची काळजी घेतली जाते.'

लेफ्टनंट पीजेएस पन्नू म्हणाले, 'मराठा लाइट इन्फंट्रीची कोल्हापूर ही कर्मभूमी, राजधानी आहे. या इन्फंट्रीचे काम स्फुर्तीदायक आहे. प्रत्यक्षात रणांगणात लढताना व शत्रूशी दोन हात करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. म्हणूनच ते शत्रूला नमवून विजयी होतात, असा इतिहास आहे.'

कर्नल आर. एस. लेहल म्हणाले, 'माजी सैनिकांच्या पेन्शनसह विविध अडचणी, समस्या सोडवण्यासाठी मेळाव्याच्या निमित्ताने स्टॉल्स लावण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.'

यावेळी जनरल बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, ब्रिगेडिअर संजीव तिवारी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एन. एन. पाटील, उपाध्यक्ष बी. एस. पाटील यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.

वीरमाता, वीरपत्नी भारावल्या

जनरल रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका यांनी वीरमाता व वीरपत्नींशी थेट संवाद साधला. भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. त्यावेळी वीरमाता, वीरपत्नी भारावून गेल्या. त्यांना काही अडचणी आहेत का, अशी विचारणाही त्यांनी केली. याप्रसंगी सीमेवर कार्यरत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांना तीन चाकी गाडीची चावी प्रदान करण्यात आली.

लष्करी बँन्डची धून

कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत लष्करी बँन्ड वाजवून केले जात होते. देशभक्तीपर गीते आणि बँन्डची धून यामुळे एक स्फूर्तीदायी वातावरण तयार झाले होते. मेळाव्यात मांडण्यात आलेल्या पेन्शन, शैक्षणिक मार्गदर्शन, पोलिस मदत केंद्र, आरोग्य शिबिर, वाहन खरेदी मार्गदर्शन स्टॉलचा लाभ अनेक माजी सैनिकांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्दीने फुलला लक्ष्मीपुरीचा धान्यबाजार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दीपावली सण काही दिवसांवर आला असून शहरातील मध्यवर्ती लक्ष्मीपुरी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. धान्यबाजार गर्दीने फुलल्याचे दिसत असून मसाले, खाद्यतेलासह घाऊक किराणा मालाला सर्वाधिक मागणी आहे.

दिवाळी मांगल्याचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी बाजारपेठ सज्ज झाली असून यंदा खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. धान्य बाजारपेठेसह लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून होलसेल मालाची खरेदी करण्यासाठी किराणा दुकानदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे यंदा बाजारपेठेत चांगला उठाव होऊन कोट्यावधी रुपयांची उलाढाल होईल असे सकारात्मक चित्र आहे.

फराळ साहित्याची खरेदी

फराळ साहित्य खरेदीचा केंद्रबिंदू म्हणून लक्ष्मीपुरी परिसराला ओळखले जाते. परिसरात धान्य, खाद्य तेल व इतर पदार्थांचे साहित्य विक्री करणारे व्यापारी आहेत. येथे रवा, पिट्टी, तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, साखर आदी किराणा मालाची खरेदी अधिक होत आहे. सध्या येथील गूळ विक्रीच्या व्यवहारात वाढ झाली आहे. त्याचबरोबर भाजके पोहे, फुटाणा डाळ, शेंगदाणे चिवडा, विविध मसाले विक्रीवरही अधिक भर आहे. ग्राहक तयार चिवडा तसेच पॅकबंद पदार्थांना अधिक पसंती देत आहेत. दिवाळीत मिरची व मिरचीपूड खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होणार असल्याने आधीच खाद्यपदार्थ वस्तू खरेदी करून ठेवल्या जात आहेत. त्याचबरोबर किरकोळ स्वरुपात लागणारी पूजेच्या वस्तू, नारळ, खाउची पाने, सुपारी, कापूस, उदबत्ती विक्रीत वाढ झाली आहे. तुलनेने बाजारपेठेत पदार्थांचे दर स्थिर असल्याने इतर बाजारासह धान्य खरेदी केली जात आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनीदेखील रांगोळी तसेच इतर साहित्याचे स्टॉल लावले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात व कोकणातील व्यापाऱ्यांनाही माल पाठवण्याची तयारी सुरू आहे. अवजड आणि दुचाकी वाहनांची गर्दी होत असल्याने येथे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कपडे खरेदी

दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जाते. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू घरी आणण्याकडे नागरिकांचा अधिक कल असतो. यामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हेन, अत्याधुनिक प्युरीफायर अशा होम अप्लायन्सेसचे दिवाळी पाडव्यासाठी बुकिंग केले जात आहे. तसेच विविध आकारातील आकाशकंदिलांची खरेदी केली जात असून आकर्षक रंगसंगती असणारे आकाश कंदीलांना मागणी वाढली आहे. यावर्षी स्वदेशी आकाशकंदिलास अधिक पसंदी दिली जात आहे. यांसह कपडे खरेदीसाठी कुटुंबीयांसह गर्दी होत आहे. तरुणाईच्या कपड्यांवर आकर्षक डिस्काउंटचे फलक लागल्याचे दिसतात. यामध्ये जीन्स, विविध फॅशनचे जॅकेट खरेदी केले जात आहेत. महिलांना पैठणी, कांजीवरम, सिल्क, अशा साड्या आकर्षित करत आहेत. त्याचबरोबर तरुणींसाठी तयार ड्रेस मटेरियल उपलब्ध आहे. नामांकित कंपन्यांचे कापड खरेदी करून कपडे शिवून घेण्याला प्राधान्य दिले जात आहे.

यंदा खाद्यपदार्थांच्या वस्तूंचे दर तुलनेने स्थिर आहेत. होलसेल खरेदी करण्यासाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत. येथील बाजारपेठेतील साहित्याचा दर्जा अधिक चांगला असल्याने ग्रामीण भागासह लोक खरेदीसाठी लक्ष्मीपुरीला महत्व देतात. यावर्षी ग्राहक तसेच व्यापाऱ्यांसाठी दिवाळी चांगली जाण्याची अधिक आशा आहे.

- नंदकुमार काळे, व्यापारी

येथील बाजारपेठेत अगदी फराळापासून कपडे, इलेक्ट्रोनिक वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांना अधिक धावपळ करावी लागत नाही. मालाचा दर्जा चांगला असल्याने ग्रामीण भागातून येऊन आम्ही लक्ष्मीपुरीत खरेदीसाठी प्राधान्य देतो.

- सौरभ भोईटे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन खरेदीचा बार उडणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सहज अन् तत्काळ होणारे अर्थसहाय्य, सुलभ हप्ते, अत्यंत कमी डाऊन पेमेंट आणि विक्री पश्चात मिळणाऱ्या सेवेमुळे दिवाळी सणात वाहन खरेदी-विक्री उद्योग चांगलाच पिक्अप घेणार आहे. अनेक कंपन्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवीन आकर्षक मॉडलचे लाँचिंगही केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्ताने वाहन खरेदीसाठी शहरातील अनेक शोरुममध्ये अगाऊ बुकिंगसाठी ग्राहक कुटुंबासह गर्दी करु लागला आहे. दिवाळीपूर्वीच अनेक शोरुम्स विद्युत रोषणाईने झगमगाटून गेली असून बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांचे अगत्यांने स्वागत केले जात आहे.

चोखंदळ अन् हौशी ग्राहक म्हणून कोल्हापूर वासियांची ओळख. कपडे, वाहन, मोबाइल पासून अनेक वस्तूंचा संग्रह आणि छंद जोपासण्यात येथील ग्राहक सर्वात आघाडीवर. एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या वाहनांच्या क्रमांकावरुनही होते. प्रथमता हौस म्हणून घेतली जाणारी वाहने सद्य:स्थितीत कुटुंबाची गरज म्हणून घेतली जाते. म्हणून गेल्या दशकापासून कोल्हापूरात वाहन खरेदी उद्योगातून प्रत्येक सणासुदीत कोट्यवधींची उलाढाल होत असते. गेल्या एक ते दोन दशकात वाहन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य मिळवताना ग्राहकांना अनेक दिव्यांना सामोरे जावे लागत होते. पण बँकिंग क्षेत्रात प्रचंड निर्माण झालेली स्पर्धा त्यातून सुलभ झालेल्या कर्जपुरवठ्यामुळे वाहन खरेदी अत्यंत सोपी झाली आहे. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्याच्या गाड्या हमखास कोल्हापूरच्या रस्त्यावर धावताना दिसतात. यामध्ये चारचाकी, मोटारसायकल अन् मोपेड बाईकचा हमखास समावेश असतो. विक्री पश्चात मिळणाऱ्या सुविधांमुळे प्रत्येक कुटुंबात एक चारचाकी व मोटारसायकलचा वापर होताना दिसतो.

ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक कंपन्यांनी डाऊन पेमेंट कमी केले आहे. तर वाहन विक्री करताना विमा संरक्षण, अॅक्सेसिरीज अन् सुलभ हप्त्याची सोय उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे वाहन खरेदीकडे दिवसेंदिवस ग्राहकांचा अधिक कल वाढत आहे. त्याचबरोबर चारचाकी अन् मोटारसायकलच्या नवीन मॉडेल दसरा, दिवाळीच्या पूर्वसंध्येला लाँचिंग केले जाते. त्यामुळे कोल्हापूरवासिय ग्राहक नवीन मॉडेलचे वाहन खरेदी करण्यासाठी हमखास पसंती देतात. विशेषत: युवकांमध्ये स्पोटर्स बाईकची क्रेज असताना युवती व महिला मोपेडला अधिक पसंती देत आहेत. दिवळीला अद्याप चार दिवसांचा अवधी असला, तरी बुकिंगला उंदड प्रतिसाद मिळत आहे. शोरुमला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याने सर्वच कंपन्यांचे शोरुम्स विद्युत रोषणाईने उजाळून गेली आहेत.

एखाद्या मॉडेलवर कोल्हापूर वासियांचा विश्वास बसला की, त्याच मॉडेलची तो खरेदी करतो. त्यामुळे वाहन खरेदीला येथे नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा ग्राहकांना चांगला फायदा होत आहे.

- राजेंद्र गुरव, व्यवस्थापक, मोहिते सुझुकी

स्कोडा मॉडेलमध्ये दोन नवी मॉडेलस् लाँच झाली आहेत. फॅमिली ड्राइव्हसाठी ग्राहक चारचाकी खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दसऱ्यानंतर ग्राहकांचा असलेला प्रतिसाद कायम असल्याने दिवाळीसाठी अनेक बुकिंग झाले आहेत. त्यामुळे वाहन उद्योगात चांगली उलाढाल होईल.

- यासर नदाफ, कार्यकारी संचालक, स्कोडा शाइन

दसऱ्याप्रमाणे दिवाळी सणासाठी चांगला प्रतिसाद मिळेल. अनेक ग्राहक आगाऊ बुकिंग करत आहेत. दिवाळीला अद्याप सहा दिवसांचा अवधी आहे. परिणामी अखेरच्या दोन दिवसांत बुकिंगला आणखी जास्त प्रतिसाद मिळेल.

- प्रिया पाटील, सीईओ, मिलेनियम होंडा

ग्राहकांची मागणी वाढत असल्याने दिवाळी सणात चांगली उलाढाल होईल. ग्राहकांची आवड समोर ठेऊन कंपन्यांनी लाँचिंग केले आहे. सँट्रोचे नवीन मॉडेलचे लाँचिंग झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची प्रचंड मागणी वाढत आहे.

- विशाल वडेर, सरव्यवस्थापक, माई ह्युंडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर अर्बन बँकेला सहकार भूषण पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँकेला सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून राज्यस्तरीय 'सहकार भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष उमेश निगडे-देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. ५१ हजार रुपये, गौरवचिन्ह असे स्वरूप आहे.

अध्यक्ष निगडे म्हणाले, 'बँकेचे सभासद, ग्राहक, कर्जदार, कर्मचारी व संचालक यांच्या सहभागामुळेच सरकारचा हा पुरस्कार मिळवता आला. तेच या पुरस्काराचे मानकरी आहेत. सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.'

उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या सहकारी बँकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी आलेल्या प्रस्तावांची जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर गुणवत्तेच्या आर्थिक निकषांच्या आधारे छाननी केली जाते. त्यातून राज्यातून सर्वांत जास्त गुण बँकेला मिळाले.

बँकेच्या ८०४ कोटींच्या ठेवी असून, ४७४ कोटींचे कर्जवाटप केले. बारा वर्षांत एनपीए शून्य आहे. डेटा सेंटर, एटीएम, रूपे कार्ड, मोबाइल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, सीटीएस अशा सेवा देत बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.'

यावेळी सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, उपायुक्त सतीश सोनी, बँकेचे उपाध्यक्ष राजन भोसले, संचालक शिरीष कणेरकर, रवींद्र धर्माधिकारी, मधुसूदन सावंत, जयसिंग माने, विश्वास काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष कुत्ते, जिल्हा उपनिबंधक विजय तोडकर, अरुण काकडे, अधिकारी सत्यजित जगदाळे उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी लोहारांना सभेला मनाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावरील कारवाईवरुन जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत जोरदार पडसाद उमटले. सीईओंना कारवाईचे अधिकार असताना, त्यांनी कार्यमुक्तीला स्थगिती कुठल्या आधारावर मिळवली यासंबंधी प्रशासनाने खुलासा करावा असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी घेतला. दरम्यान, सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सभेत कुठलाही वाद उदभवू नये म्हणून अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेला बसू नये अशी सूचना केली होती. त्यानुसार लोहार हे सभेला उपस्थित नव्हते.

पन्हाळा येथील रेस्ट हाऊस भाडेतत्वावर चालविण्यास देण्यावरुन सदस्यांत मतभेद आहेत. सभेत रेस्ट हाऊस भाडेतत्वावर देण्यावरुन उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्यामध्ये खडाजंगी उडाली. उपाध्यक्ष पाटील यांनी रितसर ठराव होऊन ठेका दिला असताना पुन्हा विरोधाचे कारण काय, पुन्हा निविदा प्रकिया होणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्याला सदस्य निंबाळकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. बहुसंख्य सदस्यांचा विरोध आणि बांधकाम व समाजकल्याण समिती सभापतींनी त्यासंबंधी तक्रार दिली असताना रेस्ट हाऊस भाडेतत्वावर चालवायला देण्याची प्रकिया का राबवली, अशी विचारणा निंबाळकर यांनी केली. यावरुन वाद वाढत जाऊन दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.

सदस्य अरुण इंगवले यांनी इचलकरंजी येथे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत महिला लाभार्थ्याकडून ५०० रुपयांची लाच मागितली आहे. त्यावर काय कारवाई केली अशी विचारणा केल्यावर प्रशासनाकडून चौकशीची ग्वाही देण्यात आली. कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील ग्रामपंचायत विभागाची जुनी इमारत कसलीही परवानगी न घेता पाडल्याचे व खासगी जागेत विना परवाना बांधकाम सुरू असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईप्रश्नी २७ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्टापुढे भक्कम कागदपत्रे सादर करु असे उत्तर प्रशासनाने दिले. दरम्यान, लोहार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले 'दिवाळी सणामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळावे म्हणून प्रस्तावाच्या मंजुरीचे काम सुरू असल्याने कार्यालयात होतो. अध्यक्षांनी तुमचा विषय उपस्थित झाल्यावर बोलवू असे सांगितले होते.'

...............

सभेतील महत्वाचे निर्णय

भाऊसिंगजी रोडवरील प्रस्तावित व्यापारी संकुलासाठी डिसेंबरअखेर निविदा प्रक्रिया

प्राथमिक आरोग्य केंद्राकडे शिपायांच्या नियुक्त्या करणे

प्रत्येक कार्यालयातील ७५ टक्क्यांपेक्षा जादा शिपायांच्या बदल्या

लोकवर्गणीतून शाळेभोवती कंपाऊंड बांधणी

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावांची मिळकतींचा शोध

पाझर तलावाच्या जागेवरील अतिक्रमण हटविणे, नेमकी जागा निश्चित करणे

................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीभ्रष्टाचार निमूर्लनाची शपथ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भ्रष्टाचाराबाबत तीन नोव्हेंबरअखेरच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थितीत महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

ते म्हणाले, 'प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सचोटी, पारदर्शकपणे कामकाज करावे. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी मदत करावी. दरम्यान, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंद लाटकर, पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस निरीक्षक मारुती पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहल भोसले, तहसीलदार सविता लष्करे, स्नेहल मुळे-भांमरे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित

होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाखलेत जलयुक्तशिवारमुळे पाणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पन्हाळा तालुक्यातीत जाखले गावात जलयुक्त शिवार अभियानातून साडेचार कोटींची कामे झाली. त्यातील ५४ लाखांची कामे लोकसहभागातून करण्यात आली. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत चांगल्या पद्धतीने मुरले. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी वाढल्याची, माहिती उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांनी सोमवारी सांगितले.

तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोधळी, सरपंच सागर माने यांनी गावातील कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सरपंच माने म्हणाले, 'गावकऱ्यांनी एकीने जलयुक्त शिवार अभियान राबवले. लोकसहभागातून तलावाचे पुनर्जिवन केले. ओढ्यांवर सिमेंटचे साखळी बंधारे बांधण्यात आले. डोंगर उतारावरील ओघळ जोडणी उपचार, सीसीटी, वनतळी खोदण्यात आले.'

उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील म्हणाले, 'गावातील तलावातील गाळ २०१६ मध्ये काढण्यात आला. यामुळे पाणी पातळी ३५ मीटरनी वाढली. यंदा तलावात ६० टक्के पाणीसाठा झाला. परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढली. ओढे वाहत आहेत. सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहोपयोगी साहित्य खरेदीला बहर

$
0
0

फोटो अमित गद्रे

....

गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला गर्दी

कंपन्यांतील स्पर्धामुळे उत्पादनांच्या किंमती कमी, आकर्षक ऑफर्समुळे बहर

कोल्हापूर टाइम्स टीम

नवीन कपडे, फराळांची रेलचेल या सोबतच दिवाळी सणात गृहोपयोगी साहित्य खरेदीला बहर येतो. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन्स, मिक्सर, ओव्हन, गिझर अशा वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. बाजारपेठेत यंदा नामवंत कंपन्यांच्या उत्पादनांची ग्राहकांना भुरळ घातली आहे. कंपन्यांतील वाढत्या स्पर्धेमुळे उत्पादनांच्या किंमती झाल्या आहेत. उत्पादनांच्या कमी झालेल्या किंमती आणि खरेदीवर ऑफर्स यामुळे गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत खरेदीची झळाळी लाभली आहे.

नागरिकांना अर्थपुरवठा करण्यासाठी अनेक वित्तीय संस्थांनी शोरुम्समध्ये स्वतंत्र कक्ष उघडले आहेत. चौदा महिने, दोन वर्षे या कालावधीच्या मुदतीवर ग्राहकांना कर्ज पुरवठा केला जातो. डेबिट व क्रेडिट कार्डवर कॅशबॅकची सुविधा आहे. ठिकठिकाणी शून्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा सुरू आहे. सोबत ग्राहकांना आकर्षित करुन घेण्यासाठी दुकानदारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती घोषित केल्या आहेत.

शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरीतील शोरुम्समध्ये धांदल सुरू आहे. गृहोपयोगी वस्तूंची शोरुम्स सजली आहेत. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन्सची स्वतंत्र दालने तयार केली आहेत. या तीनही वस्तूमध्ये व्हरायटी आहेत. प्रत्येक उत्पादक कंपनीने स्वतचे उत्पादन हटके बनविण्यावर भर दिला आहे. सणासुदीच्या कालावधीत सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटतात. या कालावधीत गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोल्हापुरात नामवंत कंपन्यांच्या शोरुम्स आहेत. एकाच ठिकाणी वेगवेगळी उत्पादने पाहावयास मिळतात. यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांची पहिली पसंती कोल्हापुरातील बाजारपेठेला मिळत असल्याचेही दुकानदारांचे म्हणणे आहे.

दिवाळी सणाला वस्तूंची खरेदी आणि त्यावर ऑफर्स अशी संधी ग्राहकांना आहे. सणासुदीच्या कालावधीत नागरिक गृहोपयोगी वस्तूंची हमखास खरेदी करतात. नागरिकांच्या आवडी निवडी विचारत घेत विविध कंपन्यांनी उत्पादने बाजारात आणली आहेत. फ्रीज, वॉशिंग मशिन्स, एलईडी, मिक्सर अशा विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्या उत्पादनावर वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आहेत.

महेश ओटवानी, भारत इलेक्ट्रिकल्स

नामवंत कंपन्यांची उत्पादने आणि वेगवेगळ्या ऑफर्समुळे हे यंदाचे वैशिष्ट्य आहे. यंदा दिवाळीनिमित्त ग्राहकांना, एका वस्तूवर एक वस्तू मोफत अशी योजना जाहीर केली आहे. यामध्ये काही एलईडीटी टीव्ही, वॉशिग मशिंन खरेदीवर भेटवस्तूंसह फ्रीज, टीव्हीही मोफत देण्यात येणार आहे. विशिष्ट किंमतीच्या उत्पादनावर आकर्षक ऑफर्स आहेत. योजनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सचिन मांगले, सिद्धी होम अप्लायनसेस

वॉशिग मशिन, टीव्ही खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठराविक वस्तूंवर चाळीस टक्क्यापर्यंत सवलत असल्यामुळे ग्राहक खरेदीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्था अर्थपुरवठा करत आहेत. गेल्या काही वर्षात सणासुदीच्या कालावधीत नवीन वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. गृहोपयोगी वस्तू खरेदीवर नागरिकांसाठी ऑफर्स आहेत.

श्रीनिवास कुलकर्णी, सारस इलेक्ट्रॉनिक्स

दीपावली सणाच्या निमित्ताने बाजारपेठ गृहोपयोगी वस्तूंनी सजली आहे. गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनातील वाढत्या स्पर्धेमुळे यंदा खरेदीवर ग्राहकांना बक्षीस योजना जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे, नामवंत कंपन्यांची उत्पादने माफक किंमतीत उपलब्ध आहेत. दहा हजार रुपयांत एलईडी टीव्ही खरेदीचा आनंद ग्राहकांना मिळू शकतो.

दीपक केसवानी, राजाकाका ई मॉल व राजाकाका प्रिमियम स्टोअर्स लक्ष्मीपुरी

नवीन उत्पादनांची खरेदी करुन सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. कंपन्यांनी ग्राहकांच्या आवडीचा विचार करुन उत्पादनामध्ये नाविन्य, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज, मायक्रोओव्हन या वस्तूंना मागणी आहे. सर्वच घटकांना खरेदीचा आनंद लुटता यावा म्हणून वित्तीय संस्था कमी दरात वित्त पुरवठा करत आहेत.

योगेश हेडा, हेडा एंटरप्रायझेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माळी समाजाचा १८ ला वधू-वर मेळावा

$
0
0

कोल्हापूर : वीरशैव माळी समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने १८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता वधू-वर व समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी समाजाच्यावतीने देण्यात येणाऱ्या समाजभूषण व जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. मेळावा राजारामपुरी येथील कमला कॉलेज परिसरातील व्ही. टी. पाटील सभागृहात होईल. मेळाव्याचे उद्घाटक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील असून, यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, निवृत्त पोलिस महासंचालक गुलाबराव पोळ, उद्योजक राजेंद्र माळी, मॅकचे उपाध्यक्ष गोरख माळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समाजाचे अध्यक्ष अशोक माळी व उपाध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपुलकीची भिंत’ व्दारे आज नवीन कपडे वाटप

$
0
0

दहा हजार लोकांना नवीन कपडे

महाडिक उद्योग समूहाचा उपक्रम, दसरा चौकात कार्यक्रमाचे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सणासुदीच्या कालावधीत गरीब लोकांनी नवीन कपडे परिधान करावेत या उद्देशाने खासदार धनजंय महाडिक यांनी 'आपुलकीची भिंत'ही संकल्पना राबविली आहे. महाडिक उद्योग समूहातर्फे या संकल्पनेंतर्गत शुक्रवारी (ता.२) दहा हजार लोकांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. दसरा चौक मैदान येथे सकाळी १०.३० वाजता या उपक्रमाला प्रारंभ होईल.

'दिवाळी सणात प्रत्येकजण नवीन कपडे परिधान करतात. मात्र गरीबांना नवीन कपडे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी त्यांना वापरलेली जुनी कपडे देण्यापेक्षा नवीन कपडे वाटप करुन सणाचा गोडवा वृध्दिगंत करण्यासाठी 'आपुलकीची भिंत'संकल्पना राबविली आहे,'अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. पुरुष, महिलांसह सातवर्षाखालील व चौदा वर्षाखालील मुले-मुली अशा वेगवेगळया गटांसाठी नवीन कपडे वितरित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या उपक्रमासाठी समाजातील वेगवेगळया घटकांनी मदत केली आहे. दातृत्वाची प्रचिती घडविताना नवीन कपडे जमा केले आहेत. गरजू लोकांना या कपड्यांचे वाटप होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दसरा चौक मैदान येथे कपडे वाटपाचे नियोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारीत सानेगुरुजी कथामाला अधिवेशन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जिल्हा समितीतर्फे येत्या जानेवारी महिन्यात तीन दिवसीय तीन दिवसीय अधिवेशन आयोजित केले आहे. या कार्यालयासाठी डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी केव्हीज प्लाझा येथील पहिला मजल्यावरील जागा मोफत दिली आहे. त्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन व पल्लवी कोरगांवकर यांच्या हस्ते कार्यालयाच्या नामफलकाचे अनावरण झाले.

कोल्हापुरात १८ ते २० जानेवारी कालावधीत ५२ वी कथामाला अधिवेशन होत आहे. समाजवादी कार्यकर्ते बाबूराव मुळीक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त अधिवेशनाचे आयोजन केले आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत विविध वक्त्यांनी सहकार्याची ग्वाही दिली. पल्लवी कोरगांवकर यांनी कोरगांवकर ट्रस्ट व आंतरभारती शिक्षण संस्थेतर्फे अधिवेशनाला सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. डॉ. हेंद्रे यांनी अधिवेशनासाठी मदतीचे आश्वासन दिले. संजय कुमठेकर यांनी साहित्य भेट दिले.

जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन देसाई यांनी प्रास्ताविक केले. आर. जी. कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी मिरासाहेब मगदूम, गणपतराव हितारे, अशोक चौगले, शशिकांत पाटील, जगन्नाथ कांदळकर, अॅड. आर. एम. जाधव, बापूसाहेब कांबळे, एकनाथ जाधव, बाबा मगदूम, एम. एस. पाटोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिनियमानुसारच म्युनिसिपल ट्रान्सपोर्टची सभा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनची सभा घेण्यासाठी २० दिवसांपूर्वी अध्यक्षांना नोटीस दिली होती. मात्र अध्यक्षांनी सभा न बोलवल्याने श्रमिक संघ अधिनियम १९२६ नुसार विशेष सभा बोलवून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणी २०२० पर्यंत कार्यरत राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक नव्या कार्यकारिणीने दिले आहे. पत्रकात म्हटेल आहे, 'अध्यक्षांनी युनियनची ३२ वर्षे सत्ता भोगली, मात्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्या हुकूमशाही व स्वार्थीपणाला कंटाळूणच सभासदांनी स्वत: सभा घेण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षांना सभा घेवून पदच्युत करण्याचा निर्णय बहुमताने घेतला, असताना जॉइन सेक्रेटरी यांनी बेकायदेशीरपणे पत्रक काढून संघटनेच्या घटनेचा भंग केला आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सभासदांनी अशा स्वार्थी व ढोंगीपणाला बळी पडू नये, असे पत्रकात नमूद केले आहे.' पत्रकावर अध्यक्ष, खजानीस व जॉईन सेक्रेटरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांच्या विरोधात तक्रारींचा पाढा

$
0
0

चौकशी समितीची बैठक, पाचजणांनी मांडल्या व्यवथा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाच्या विरोधात चौकशी समितीसमोर पाचजणांनी तक्रारींचा पाढा वाचला. सेवाज्येष्ठता डावलणे, माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी संबंधितांनी केल्या. संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्याची शहानिशा होणार आहे. यासाठी दोघांची नियुक्ती केली आहे.

कागदपत्रांची पडताळणी करुन नियमांचा भंग झाला आहे का यासंदर्भातील माहिती चौकशी समितीला द्यावयाची आहे. चौकशी समिती अध्यक्ष व शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील आणि समिती सचिव रवीकांत आडसूळ यांच्या चौकशी समितीकडून चौकशी सुरू आहे. गुरुवारी पाच तक्रारदारांना बोलाविले होते. त्यामध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांचा समावेश होता. एका शिक्षिकेनेही प्रस्ताव मान्यतेवरुन चौकशी समितीकडे दाद मागितली आहे. चौकशी समितीसमोर संबंधित तक्रारदारांनी भावना मांडल्या.

सेवाज्येष्ठता, वेतन प्रस्तावात कशा प्रकारे अन्याय झाला हे समितीसमोर मांडताना काहींना अश्रू अनावर झाले. यानंतर १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा चौकशी समितीची बैठक होणार आहे. चौकशीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी १३ नोव्हेंबरपासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी चौकशी समिती तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. त्यानुसार तक्रारदारांना आगाऊ कल्पना द्यावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ काहीजणांनी प्रशासनाकडे पत्रे पाठविली आहेत. चौकशी समिती त्या प्रकरणी पाचजणांचे म्हणणे ऐेकणार आहे. दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी 'मॅट'समोर सुनावणी आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सक्षमपणे बाजू मांडण्यात येणार आहे.

.............................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळ्यातील रेस्ट हाऊस खासगी तत्वावर नको

$
0
0

कोल्हापूर

पन्हाळा येथील रेस्ट हाऊस खासगी तत्वावर भाड्याने देऊ नये. जिल्हा परिषदेमार्फतच ती चालवावीत, असे पत्र जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले. जि. प सदस्य, अधिकारी पदाधिकाऱ्यांना फिरती, दौऱ्याच्या प्रसंगी विश्रांतीसाठी रेस्ट हाऊस बांधणीचा मुख्य उद्देश होता. रेस्ट हाऊस भाडेतत्वावर दिल्यामुळे मूळ हेतू बाजूला पडला आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. स्थायी समिती सभेत रेस्ट हाऊस भाडेतत्वावर देण्याच्या विषयावर सदस्यांमध्येच खडाजंगी उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकची दडपशाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

बेळगावसह अन्य मराठी भाषिक भूभाग कर्नाटकला जोडल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 'काळा दिन' पाळण्यात आला. त्यावेळी सायकल रॅलीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांवर पोलिसांनी तुफान लाठीमार केला. लाठीमारात अनेक तरुण जखमी झाले आहेत. कन्नड पोलिसांच्या या दंडुकेशाहीविरोधात सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. बेळगावमध्ये कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने डांबल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन पाळण्यात आला. त्यानिमित्त भव्य सायकल रॅली काढण्यात आली. गेली ६२ वर्षे कर्नाटक राज्योत्सव दिनी समितीतर्फे काळा दिन पाळण्यात येतो. यानिमित्त संभाजी उद्यान येथून सुरू झालेल्या या रॅलीत हजारो मराठी भाषिक सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान 'बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,' 'रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में,' 'जय भवानी, जय शिवाजी,' अशा घोषणांनी रॅलीचा मार्ग दणाणून गेला. रॅलीतील तरुणांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते. अनेकांनी काळे शर्ट, टी शर्ट आणि दंडावर काळ्या फिती बांधल्या होत्या.

शिवसेना, बेळगाव बिलाँग्ज टू महाराष्ट्र, युवा मंच आदी अनेक पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत ठिकठिकाणी सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत होती. त्यात महिला आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी महिलांचे नेतृत्व केले. जोरदार घोषणाबाजीमुळे रॅलीत चैतन्य निर्माण झाले होते. रॅली शेवटच्या टप्प्यात असताना पोलिसांनी सहभागी तरुणांना झोडपून काढण्याचा सपाटा सुरु केला. त्यामुळे गोवा वेस परिसरात तणाव निर्माण झाला. शांततेत निघालेल्या सायकल फेरीत घुसण्याचा प्रयत्न काही कन्नड हुल्लडबाजांनी केला. त्याला मराठी तरुणांनी आक्षेप घेतला. त्यावेळी पोलिसांनी निष्पाप तरुणांवरही लाठीमार सुरू केला. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

दरम्यान, रॅलीची सांगता मराठा मंदिर येथे झाली. यावेळी झालेल्या सभेत कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी शिवसेना सदैव सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचे सांगून सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय झाल्यास त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा दिला. व्यापीठावर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावर ट्रक उलटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

उजळाईवाडीच्या हद्दीत मयूर पेट्रोल पंपासमोर सुकी मासळी घेऊन जाणाऱ्या चालकाचे धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात घडला.

याबाबत माहिती अशी : सुकी मासळी घेऊन जाणारा ट्रक (एम एच -४७ -वाय ४०५४ ) वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या लोखंडी साइडपट्टीला व दुभाजकाला धडक बसल्याने उलटला. उजळाईवाडी महामार्ग पोलिस, गोकुळ शिरगाव पोलिस, रस्ते विकासकडील पेट्रोलिंग कर्मचारी यांनी तातडीने तेथे धाव घेऊन मुख्य महामार्गावरील वाहतूक सेवामार्गावरून वळवली व क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला केला. यावेळी सेवामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अपघातामुळे उजळाईवाडी उड्डाण पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, चालकाला ट्रकसह ताब्यात घेतले आहे.

०००००

फोटो ओळ : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गवरील मयूर पेट्रोल पंपासमोरच्या मुख्य महामार्गावरील धोकादायक वळणावर सुकी मासळी घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींना पाठिंबा दिल्यास ‘जय महाराष्ट्र’

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

'जिल्ह्याच्या राजकारणात माने गटाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळाली. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळीक करणारे व शरद पवारांना नेहमीच शिवीगाळ करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करू,' असा निर्वाणीचा इशारा माने गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला तसेच लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या मागे ताकद उभी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

रुकडी (ता. हातकणंगले) येथील लोकनेते बाळासाहेब माने सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माने गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या. मेळाव्यासाठी माजी आमदार अशोक जांभळे, राजीव आवळे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नगरसेविका प्रविता सालपे, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, नगरसेवक रवींद्र माने, नितीन जांभळे, पंचायत समिती उपसभापती सुलोचना देशमुख, घुणकीच्या सरपंच राजवर्धन मोहिते, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी धैर्यशील माने म्हणाले, 'हातकणंगले हा राष्ट्रवादीचा हक्काचा मतदारसंघ असताना येथे सत्तेसाठी व पदासाठी कोणाशीही सोयरिक करणाऱ्या उपऱ्या उमेदवाराचा विचार केल्यास तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. निष्क्रिय खासदार राजू शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी तर कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.'

निवेदिता माने म्हणाल्या, 'आतापर्यंत माने गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर अनेक निवडणुका सहज लढविल्या. येत्या काळात माने गट भक्कम करून कार्यकर्त्यांच्या भावना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणार असून, लोकसभा निवडणूक लढवून माने गटाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.'

मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी येत्या काळात माने गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वेगळा विचार करणे गरजेचे असून, राष्ट्रवादीने धैर्यशील माने यांना उमेदवारी न दिल्यास अन्य पक्षातून लढण्याचा आग्रह धरून माजी खासदार निवेदिता माने व धैर्यशील माने जो निर्णय घेतील तो मान्य करून कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवायचीच, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. निवेदिता माने यांना राष्ट्रवादीचा दबाव असल्यास त्यांनी खुशाल पक्षाचे काम करून धैर्यशील माने यांना स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी केली.

माजी आमदार राजीव आवळे यांनी, माने गटाच्या अस्तित्वासाठी माजी मंत्री विनय कोरेंशी चर्चा करून जनसुराज्य पक्ष माने गटाच्या

पाठीशी ठामपणे राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

००००००००

★सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती

मेळाव्यास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, जनसुराज्य शक्ती, आदी पक्षांत असलेल्या माने गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून धैर्यशील माने यांना पाठिंबा दर्शवित प्रसंगी पक्ष सोडू, पण माने गट टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

००००००००

★निवेदिता माने गहिवरल्या

गेल्या अनेक वर्षांपासून माने गट मोठ्या प्रमाणात इतर पक्षांत विखुरला, तर अनेक जुने कार्यकर्ते अजूनही तटस्थ राहिले. मेळाव्याला सर्वच कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून बाळासाहेब माने यांच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून निवेदिता मानेंना गहिवरून आले.

०००००००००००

फोटो ओळी

रुकडी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या माने गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना धैर्यशील माने. शेजारी निवेदिता माने, अशोकराव जांभळे, राजीव आवळे, रवींद्र माने, प्रविता सालपे, नितीन जांभळे आदी.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वालाख मतदार वाढणार

$
0
0

नोव्हेंबरअखेर अर्जांची छाननी, ३० लाख मतदार होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने राबवलेल्या मोहिमेत दोन महिन्यात तब्बल १ लाख १७ हजार ८७८ मतदारांनी नाव नोंदणीसाठी ऑनलाइन, ऑपलाइन अर्ज केले. या अर्जांची छाननी महिनाअखेर करण्यात येणार आहे. ४ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिध्द होईल. यादीत नाव असलेल्यांनाच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.

२०१९ च्या अंदाजीत जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३९ लाख २३ हजार ६३३ आहे. त्यापैकी २९ लाख ६५ हजार ३१४ मतदार आहेत. १८ ते १९ वर्षे वयोगटातील १ लाख २२ हजार ३८१ युवक, युवती आहेत. सर्व पात्र मतदारांनी नाव नोंदणी करावी, स्थलांतर, मयत असलेली वगळण्यात यावी, नाव, प्रत्त्यात दुरूस्तीसाठीची प्रक्रिया करावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. यासाठी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरअखेर मोहिम राबवण्यात आली.

मोहिमेत १७ हजार ७३६ जणांनी ऑनलाइन तर १ लाख १४२ ऑफलाइन अर्ज केले. ऑफलाइन अर्ज आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ६१ हजार ६४६ अर्जांची डाटा एंट्री झाली आहे. अजून ३८ हजार ४९६ अर्जांची एन्ट्री करायची आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आलेल्या अर्जांची संख्या अशी : चंदगड :१११५१,राधानगरी :९८८९, कागल : ९३५८, कोल्हापूर दक्षिण :१६२२१, करवीर :९०७५, कोल्हापूर उत्तर : १२०४५, शाहूवाडी :१००२७, हातकणंगले : ८५१५, इचलकरंजी :१६३०३, शिरोळ :११७८७८.

---------

मतदार यादीवरील दावे, हरकती निकालात काढणे : ३० नोव्हेंबर

पुरवणी मतदार यादीची छपाई : ३ जानेवारी २०१९ अखेर

अंतिम मतदार यादी प्रसिध्दी : ४ जानेवारी

--------------

शिरोळ नंबर वन

मतदार नोंदणीच्या मोहिमेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना पक्षाचे कार्यकर्तेही सक्रिय होते. ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनासह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अधिक सक्रिय राहिले, तेथे नाव नोंदणी अर्जांची संख्या अधिक आली आहे. शिरोळ मतदारसंघात सर्वाधिक १६ हजार ३०३, त्यापाठोपाठ कोल्हापूर दक्षिणमध्ये १६ हजार २२१ मतदारांनी अर्ज केले आहेत. सर्वात कमी हातकणंगले मतदारसंघातून अर्ज आले आहेत.

..............

कोट

'दोन महिने मतदारयादी अद्ययावतीकरणाचे काम बीएलओतर्फे झाले आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाधिक युवक, युवतींनी अर्ज करावेत, यासाठी निवडणूक प्रशासनाने व्यापक प्रमाणात जाणीव, जागृती केली. कॉलेजमध्ये जावून आवाहन केले. यामुळे नव्याने मतदार नोंदणी चांगली झाली आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितासाठी आजपासून ‘माणुसकीची भिंत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नको असेल ते द्या, हवे ते घेवून जा' या ब्रीदवाक्यानुसार यंदाही 'माणुसकीची भिंत' संकल्पना सीपीआर चौकात राबविली जाणार आहे. शुक्रवारपासून दोन दिवस होणाऱ्या या उपक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. जुनी कपडे घेऊन ती गरजूंना वाटप करण्यात येणार आहेत.

महापौर शोभा बोंद्रे व विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उपक्रमाची सुरुवात होईल. गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. मागील दोन वर्षात तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहोच झाल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.

'या उपक्रमासाठी कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन द्यावेत. पुरुष, महिला आणि मुलांचे कपडे अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरजूंना अधिक चांगल्या पध्दतीने देता येतील. सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत कपडे जमा व वाटप केले जाणार आहेत. कपडे शिल्लक राहिल्यास ते ऊस तोडणी कामगारांना वाटप केले जातील. तसेच फिरस्त्यांसाठी गोधडी शिवून दिली जातील. महिला बचत गटाच्या माध्यमातून कपड्यांच्या पिशव्या तयार करुन त्याचे मोफत वितरण केले जाईल. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखाने बंद; शेतकरी कामगारांची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातून जनावरे आणि कुटुंबासह आलेले ऊसतोड मजूर कारखाना परिसरात विनाकाम बसून आहेत. तोडगा कधी निघणार, कारखान्यांची धुराडी कधी पेटणार, या चिंतेत ते आहेत. काही मजूर तर दिवाळीसाठी गावाकडे परतत आहेत.

कसबा बावडा राजाराम आणि कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखाने पूर्णक्षमतेने सुरू केले होते. यंत्राच्या सहाय्यानेही ऊसतोडणीही केली जात होती. उर्वरित कारखान्यांनी अजून धुराडे पेटवलेले नव्हते. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेनंतर 'स्वाभिमानी'चे कार्यकर्त्यांनी ऊसतोड रोखणे, वाहने अडविण्याचे आंदोलन व्यापक केले. उसाची वाहने अडविण्याचे आंदोलन तीव्र केले. त्यात शिवसेनेनेही उडी घेतली. सुरू असलेले कारखानेही बंद झाले. विरोध डावलून कारखाने चालवणे अशक्य झाले. परिणामी सरकारवर दबाव आणून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी कारखाने बंद करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला. तोडग्यासाठी शेतकरी संघटना, सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.

ऊसदरासाठीच्या कारखानदार आणि शेतकरी संघटनांतील भांडणात मजुरांची परवड सुरू आहे. हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यांत कमी पावसाने, तर नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या उसाचे पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरासरी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याउलट सर्वच कारखान्यांना निश्चित गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. ऊसतोड मजुरांच्या खर्चाचा बोजाही कारखाना व्यवस्थापनाला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे अधिक दिवस कारखाने बंद ठेवणे परवडणारे नाही. ऊस चांगल्या पद्धतीनेने परिपक्व होण्यास अजूनही एक महिना आहे, त्यामुळे थांबू, काहीही नुकसान होणार नाही, असा उत्पादकांचा सूर आहे.

कुटुंबातील सदस्य, जनावरांसह पाच दिवसांपूर्वी आलो. उदरनिर्वाहासाठी शाळेत जात असलेल्या मुलेही सोबत घेतले. मात्र, आता ऊसतोडणी बंद असल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जवळचे पैसेही संपले आहेत. खर्च वाढला आहे. दिवसभर रिकामे बसून काय करायचे, असा प्रश्न भेडसावत आहे.

बाळू तुपे, भयाळा, जि. बीड

गप्पांच्या फडात

छत्रपती राजाराम कारखाना परिसरात बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातून दहा दिवसांपूर्वी आलेले शेतमजूर झोपडी बांधून राहिलेत. सुमारे ५०० हून अधिक झोपड्या आहेत. ऊसतोडी बंद असल्याने मजुरांची आर्थिक ओढाताण होत आहे. जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला असून, काम नसल्याने मजुरांचा दिवसभर गप्पांचा फड रंगलेला दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images