Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ट्रक पासिंग प्रमाणपत्र त्वरीत द्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साखर हंगामाला सुरुवात होत असताना मुदत संपलेल्या मालवाहतूक ट्रकचे पासिंग प्रमाणपत्राची त्वरित निर्गत होत नाही. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने प्रमाणपत्राअभावी व्यवसाय करण्यात अडचणी येणार आहेत, त्यामुळे कर्मचारी संख्या वाढून त्वरित प्रमाणपत्र देण्याची मागणी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक पहिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये असंख्य ट्रकांचे पासिंगची मुदत संपुष्टात आली आहे. पासिंग मुदत संपलेल्या अनेक वाहनमालकांनी परिवहन कार्यालयाकडे निर्धारित शुल्क जमा केले आहे. शुल्क जमा करून महिना झाला, तरी पासिंगसाठी वेळ दिला जात नाही. जिल्ह्यातील एकून १६ हजार ट्रक व्यवसायिकांपैकी सुमारे आठ हजार व्यवसायिक ऊस वाहतूक करतात. सर्वच वाहनधारकांनी ऊस तोडणी मजुरांना सुमारे दहा ते १५ लाखांची अॅडव्हान्स दिला आहे. पण हंगामा तोंडावर आलेला असताना पासिंगची कागदपत्रे मिळत नाहीत. जर मुदतीत पासिंग न झाल्यास वाहन चालवणे मुश्कील बनणार आहे. वाहनधारकांची अडचण लक्षात घेऊन जादा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबर सुटी दिवसीही पासिंग करण्याची व्यवस्था करावी.'

यावेळी बोलताना परिवहन अधिकारी शिंदे म्हणाले, 'मोटर वाहन निरीक्षक, वाहन तपासणी निरीक्षकांची जादा नियुक्ती करण्याबरोबरच प्रतिदिन कार्यालयीन कामापेक्षा दोन तास अधिक वाहन तपासणी करतील. प्रथम वाहन तपासणी निरीक्षक २३ ट्रकची तपासणी करत होते, त्यांच्या कामाचे तास वाढवल्याने ते २८ ट्रकची तपासणी करतील. चार निरीक्षकांकडून दिवसभरात ११२ ट्रकची तपासणी करुन पासिंग प्रमाणपत्र त्वरित दिली जातील. त्यामुळे हंगामापूर्वी सर्व ट्रकचे पासिंग करुन दिले जाईल असे, आश्वासन त्यांनी दिले. शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, प्रकाश केसरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टाचा ‘सेल्फी पॉईंट’

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : पोस्टाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, त्याचा जनमानसात प्रसार व्हावा, यासाठी विभागाने नामी शक्कल लढविली आहे. टपाल वितरणासोबतच'पोस्टमन'च्या सायकलीवरून योजनांचा प्रसार होणार आहे. पोस्टातर्फे येत्या १५ दिवसांत पोस्टमन आणि योजनांवर आधारित 'सेल्फी पॉईंट'ची निर्मिती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच सेल्फी पॉईंटची उभारणी प्रस्तावित आहे. शिवाय योजनांच्या प्रचारासाठी तीस सायकली तयार केल्या आहेत.

कसबा बावडा रोडवरील मुख्य पोस्ट ऑफिस, न्यू पॅलेस परिसर, रेल्वे स्टेशन, कणेरी मठ आणि पन्हाळा या ठिकाणी 'सायकलीसह पोस्टमनच्या प्रतिकृती'चे सेल्फी पॉईंट असणार आहेत. केंद्र सरकारच्या टपाल खात्यातंर्गत कार्यरत असणाऱ्या पोस्टाच्या विविध प्रकारच्या चौदा योजना आहेत. सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते, मासिक उत्पन्न योजना, ग्रामीण डाक जीवन विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनांचा समावेश आहे. पोस्टमन टपाल वितरणाचे काम सायकलवरून करतात. त्यांच्या माध्यमातून पोस्टाच्या योजनांचा प्रसार करण्याचे कोल्हापूर विभागाने ठरविले आहे.

'पोस्टमन हा पोस्ट खात्याचा ब्रँड आहे. त्यांच्यामार्फत सायकलीवरून विविध योजनांचा प्रसार करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० सायकली तयार केल्या आहेत. कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीमध्ये पहिल्यांदा हा प्रयोग होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रमुख शहरात त्या धर्तीवर योजनांचा प्रचार करण्यात येईल.'असे पोस्ट ऑफिस कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक आय. डी. पाटील यांनी सांगितले. सेल्फी पॉईंट हा खास आकर्षण असेल. योजनांची माहिती दर्शविणारे सायकल आणि सोबत पोस्टमॅनचा पुतळा अशी संकल्पना आहे.

दृष्टिक्षेप

५६३ (४६७ शाखा डाकघर)

जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस

११,९७,६२८

विविध योजनेतील खातेदार

५६४,१६,७६,१७६

ठेवीची रक्कम :

६२९०१

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गतखाती

६८

आधार कार्ड सुधारणा केंद्रे

५७,३८६

पासपोर्ट'साठी प्रक्रिया पूर्ण केलेल्या अर्ज

२६५७

इंडियन पोस्ट पेमेंट बँक अतंर्गत खातेदार

चौदा कार्यालयात 'लेट अवर'सेवा

पोस्टाची कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन अशी आहे. या कालावधीत नागरिकांना टपाल पाठविण्यास विलंब झाला वितरणास एक दिवसाने विलंब व्हायचा. नागरिकांची गैरसोय टाळावी, त्यांना जलद सेवा मिळावी यासाठी पोस्ट खात्याने 'लेट अवर'सेवा सुरू केली आहे. त्यातंर्गत दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत टपाल, कुरिअर, स्पीड पोस्ट, रजिस्टर करता येतील. पहिल्या टप्प्यात चौदा पोस्ट ऑफिसमध्ये 'लेट अवर' सेवेला प्रारंभ झाला आहे. त्यामध्ये कोल्हापूर रेल्वेस्टेशन येथील पोस्ट ऑफिस, कसबा बावडा रोडवरील मुख्य ऑफिस, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, राजारामपुरी, शिवाजी विद्यापीठ, मार्केट यार्ड, इचलकरंजी मुख्य ऑफिस, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कागल, गारगोटी, वडगाव पोस्ट ऑफिस येथे सेवा उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन मतदार नोंदवणे, वगळणे, नाव, पत्यात दुरूस्ती करण्यासाठीच्या प्रक्रियेचा आज, (बुधवारी) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गर्दी होणार असल्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक प्रशासनाने तयारी केली आहे. आतापर्यंत सुमारे ७५ हजार मतदारांनी अर्ज केले आहेत. मतदारयादी शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरणाची मोहीम सप्टेंबरपासून सुरू आहे. त्यात बीएलओंतर्फे अर्ज स्वीकारले जात आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतो. संकेतस्थळावर सुमारे १५ हजार तर ऑफलाइन ७५ हजार मतदारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये शेवटच्या दिवशी केलेल्या अर्जदारांची भर पडणार आहे. आगामी लोकसभेला मतदान करण्यासाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे संबंधितांनी नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचे वाढले राजकीय वजन

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

Tweet@gurubalmaliMT

कोल्हापूर : एखाद्या राज्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच असणाऱ्या कोल्हापूरला सध्या दोन कॅबीनेट, चार राज्यमंत्रीपद दर्जाची पदे मिळाल्याने राज्यात जिल्ह्याचे राजकीय वजन वाढले. त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा कोल्हापूर केंद्रबिंदू ठरले आहे. सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना चार हजार कोटींचा निधी मिळाल्याचा दावा केला जात असला तरी पदांच्या तुलनेत कामांचा धडाका लागलेला नाही. खंडपीठ, राजर्षी शाहूंचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणी, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अन्य प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे अनेक प्रश्नांना उर्वरित वर्षभर सरकारकडून पूर्णविराम मिळावा ही अपेक्षा वाढली आहे.

गेल्या तीस वर्षात कोल्हापूरला मंत्रिपदाचा नेहमीच दुष्काळ असायचा. शेजारच्या सांगली जिल्ह्यात मंत्र्यांचा ताफा नेहमीच ठरलेला. पंधरा वर्षांपूर्वी आघाडी सरकारचा अपवाद वगळता एखाद्या राज्यमंत्रीपदासाठी व महामंडळासाठी नेत्यांना सतत झगडावे लागायचे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारमध्ये दिग्विजय खानविलकर, जयवंतराव आवळे, विनय कोरे, हसन मुश्रीफ व प्रकाश आवाडे हे पाच मंत्री व बाबासाहेब कुपेकर हे आधी राज्यमंत्री आणि नंतर विधानसभा अध्यक्ष होते. जिल्ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पदांची लॉटरी त्यापूर्वी आणि नंतर कधीच लागली नाही. पण युती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात कोल्हापूरचे वजन पुन्हा वाढले आहे.

कोल्हापूरला चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने एक कॅबीनेट मंत्रीपद मिळाले. महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि कृषी यांसारखी महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. राज्यात दोन नंबरचे मंत्रिपद त्यांच्याकडे असल्याने कोल्हापूरचा दरारा वाढला. भाजप वाढवण्यासाठी त्यांनी महामंडळांचा वापर केला. त्यामुळे समरजित घाटगे, योगेश जाधव, महेश जाधव, हिंदूराव शेळके यांना महामंडळे मिळाली. शिवसेनेने संजय पवार यांना संधी दिली. त्यामुळे जिल्ह्यात योगेश जाधव यांच्या रुपाने कॅबीनेट तर इतर चौघांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेली महामंडळे मिळाली. त्यातून कोल्हापूरचे राजकीय वजन वाढले.

चार वर्षांत जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका या पक्षाच्या ताब्यात आल्या. पूर्वाश्रमीच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ आले. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे महापालिका आणि काही साखर कारखान्यांची सत्ता कायम आहे. विधानसभेत दणदणीत यश मिळवलेल्या शिवसेनेला मात्र चार वर्षात इतरत्र ताकद वाढवता आलेली नाही. स्वाभिमानी पक्षाची अवस्था तीच राहिली. जनसुराज्य शक्ती पक्ष अजून चाचपडत आहे. पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अशावेळी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकीय वजन वाढले, पण कामे मात्र म्हणावी तेवढी झाली नाहीत.

सरकार सत्तेवर आल्यानंतर चार वर्षात चार हजार कोटींचा निधी जिल्ह्यात आणल्याचा दावा केला जात आहे. पण, दोन-तीन कामे वगळली तर इतर कामांचा नारळ फुटलाच नाही. टोलमुक्तीच्या अभिनंदनाचे फलक झळकले. पण खंडपीठ, राजर्षी शाहूंचे स्मारक, तीर्थक्षेत्र आराखडा या रखडलेल्या प्रश्नांचे खापर या सरकारवरच फोडले जात आहे. त्यामुळे याची जबाबदारी घेत उर्वरित कालावधीत या प्रश्नांना पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न व्हावेत ही जनतेची अपेक्षा आहे.

मंत्री पाटीलच केंद्रबिंदू

राज्यातील अनेक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महसूलमंत्री पाटील यांच्यावरच सोपवत असल्याने प्रश्न अनेक.. उत्तर एक अशी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांची अवस्था झाली आहे. महसूल, बांधकाम, कृषी खाते याबरोबरच महाराष्ट्र व कर्नाटक सीमाप्रश्नाचे, भाजप व सेना युतीचे समन्वयक, मराठा आंदोलन मंत्रीगट उपसमितीचे अध्यक्ष, दुष्काळ निवारण समितीप्रमुख, कर्जमुक्ती समितीचे प्रमुख त्यांच्याकडे आहे. ऊस दराची कोंडी फोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याची मोठी जबाबदारी पाटील यांच्या खांद्यावर आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील दुवा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे पाटील यांच्या रुपाने कोल्हापूरच राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

कोल्हापूरला मिळाली ही पदे

चंद्रकांत पाटील : महसूल, सार्वजिनक बांधकाम, कृषी

योगेश जाधव : अध्यक्ष, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ

महेश जाधव : अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

समरजित घाटगे : अध्यक्ष, पुणे विभागीय म्हाडा

हिंदूराव शेळके : अध्यक्ष, वस्त्रोद्योग विकास महामंडळ

संजय पवार : उपाध्यक्ष, आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा कर्मचाऱ्यांना मोफत फराळ्याचे साहित्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बोनस परंपरा खंडित झाल्याने अडचणीत आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणात आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. कर्मचाऱ्यांची सणासुदीतील निकड दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या विविध तीन पतसंस्थांनी मोफत फराळाचे साहित्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे, तर प्रशासनाने महागाई भत्ता व तसलमात रक्कम दिल्याने ऐन दिवाळीपूर्वी त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस दिला जात होता. पण गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने बोनस देण्याची परंपरा खंडित झाली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत होते. सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी केली जात असताना महापालिका कर्मचारी मात्र काहीसे नाराज दिसत होते. कर्मचाऱ्यांची ही स्थिती लक्षात घेऊन कर्मचारी पतसंस्था, आरोग्य कर्मचारी पतसंस्था आणि गार्डन व पवडी पतसंस्थेने फराळाचे साहित्य मोफत देण्याची घोषणा केली. त्यानुसार महापालिका कार्यालय व कामगार कार्यालय येथून मोफत फराळाचे साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

तीनही पतसंस्थांनी सुमारे २,६०० कर्मचाऱ्यांना १० किलो साखर, सात किलो तेल, रवा-मैदा, खोबरे, शेंगदाणे, सुगंधी साबण, तेल, उटणे असे दोन हजार रुपये किमतीचे साहित्य कर्मचाऱ्यांना मोफत देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून साहित्य वाटप सुरू आहे. कर्मचारी पतसंस्थांबरोबर प्रशासनाने ऐन दिवाळीचा मुहूर्त साधत १४ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार तसलमात रक्कम देऊन त्यांच्या आनंदात आणखी भर घातली. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार, तर तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीचा भार प्रभारीवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या परिवहन उपक्रम (केएमटी) विभागामध्ये कार्यरत असलेल्या सर्वच प्रमुख पदांचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. एका अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा कार्यभार असल्याने त्याचा परिणाम केएमटीसेवेवर होत आहे. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पदावरील पूर्णवेळ अधिकारी गेल्या दहा वर्षांपासून विभागाला मिळालेला नाही. तोट्यात अडकलेली केएमटीची चाके बाहेर काढण्यासाठी प्रमुख पदांसह इतर अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ही चाके अधिक खोलवर रुतण्याची शक्यता आहे.

महापालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सेवाभावी पद्धतीने चालवली जाते. पहिल्यापासून सेवाभावी वृत्ती असली, तरी केएमटी नेहमीच फायद्यात राहिली. पण नंतरच्या काळात अवैध प्रवासी वाहतुकीबरोबरच कायमस्वरुपी अधिकारी नसल्याचाही फटका केएमटीला बसू लागला. काही कार्यक्षम परिवहन सभापतींच्या योग्य नियोजनामुळे मध्यंतरी काहीशी उर्जितावस्था आली, पण ती तात्पुरती ठरली. सातत्याने केएमटीचा तोटा वाढत असताना पूर्णवेळ अधिकारी देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे.

सद्य:स्थितीला केएमटीला दररोजचा दोन ते अडीच लाखांचा तोटा होत आहे. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदी पंडितराव चव्हाण २००५ पर्यंत पूर्णवेळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत केएमटी फायद्याच्या मार्गावरून धावत होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर राज्य महामंडळाकडील व्ही. एन. मोहिते यांची तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती केली. त्यानंतर एकदाही पदावर पूर्णवेळ अधिकारी रजू झालेला नाही. मोहिते यांची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सहायक आयुक्त संजय भोसले यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली. गेल्या पाच वर्षापासून ते या पदावर कार्यरत असले, तरी तेही नऊ महिन्यापासून वैद्यकीय रजेवर गेले आहेत. सध्या या पदाचा कार्यभार संजय सरनाईक यांच्याकडे दिला आहे. त्यांच्याकडे या पदाबरोबर मुख्य लेखाधिकारी व सहायक आयुक्तपदाचा पदभार आहे. या मुख्य पदाबरोबरच कार्यालयीन, वाहतूक अस्थापना व वर्कशॉप विभागातील सर्वच प्रमुख पदांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवला आहे. एका-एक अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा कार्यभार असल्याने केएमटी प्रभारींवर चालली आहे.

प्रमुख पदांबरोबर चालक-वाहक यांच्याबरोबर लिपिकांचीपदेही रिक्त आहेत. १९९२ नंतर भरतीच केलेली नसल्याने अनेक पदे रिक्त आहेत. चालक-वाहकांची पदे रोजंदारीवर भरली जातात. पण नियमित कर्मचाऱ्यांसह त्यांचेही वेतन वेळेत होत नसल्याने केवळ चालकांअभावी बस बंद ठेवण्याची नामुष्की केएमटी प्रशासनावर येते. त्याच्या परिणाम केएमटीच्या तोटा वाढण्यावर होत आहे.

केएमटीकडील कार्यालयीन प्रभारी पदे

अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक

अंतर्गत लेखापरिक्षक

लेखापाल

अधीक्षक इश्यू कॅश विभाग

खरेदी भांडार अधिकारी

जनसंपर्क अधिकारी

सांख्यिकी अधिकारी

०००

वाहतूक आस्थापना

वाहतूक निरीक्षक

सहायक निरीक्षक

वाहतूक नियंत्रक

वर्कर्स व्यवस्थापक

................

चौकट

ऑगस्टच्या वेतनाच्या प्रतीक्षेत कर्मचारी

गेल्या अनेक वर्षापासून केएमटी तोट्यातून मार्गक्रमण करत असल्याने या विभागाकडील कर्मचाऱ्यांचे कधीही नियमित वेतन होत नाही. जुलै-ऑगस्ट महिन्याचे वेतन प्रलंबित राहिल्यानंतर महापौर शोभा बोंद्रे यांनी सूचना केल्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात जुलै महिन्याचे वेतन दिले. आता दिवाळी तोंडावर आलेली असताना कर्मचाऱ्यांना अद्याप ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. सर्वत्र खरेदीची लबगब सुरू असताना कर्मचारी मात्र आपण दिवाळीची खरेदी कधी करायची या विवंचनेत सापडले आहेत.

..........................

कोट

महापालिकेच्या आस्थापनावरील खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त झाला आहे. पदभरती न केल्याने रिक्तपदे निर्माण झाली आहेत. रिक्त पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.

संजय सरनाईक, प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ अध्यक्ष बदला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) तब्बल साडेतीन वर्षे अध्यक्षपदावर कार्यरत असणाऱ्या विश्वास नारायण पाटील यांना बदलून नवीन अध्यक्ष नेमावा यासाठी ज्येष्ठ संचालक एकवटले आहेत. ज्येष्ठांना नवीन संचालकांचा पाठिंबा असल्याने 'गोकुळ'चे नेते भाकरी फिरवणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर अध्यक्ष पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रोसिडिंगचे काम पूर्ण झाले आहे. गेली दोन वर्षे संघाच्या सर्वसाधारण सभा वादळी ठरल्या होत्या. दोन्ही सभेवेळी पाटील अध्यक्ष होते. यंदा मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करताना संचालक मंडळाची अक्षरश: कसोटी लागली होती. सर्वसाधारण सभेपूर्वी विभागीय बैठका आयोजित केल्या होत्या. करवीर विभागीय बैठकीत राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांना सत्ताधारी समर्थकांकडून मारहाण झाली होती. मारहाणीत अध्यक्षांचे नातलग आघाडीवर होते. या मारहाणीचे पडसाद कसबा बावड्यात उमटल्यावर 'गोकुळ'चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना नेजदार यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. या घटनेनंतर अध्यक्ष पाटील यांच्याविरोधात संचालक मंडळात विरोधी सूर उमटण्यास सुरुवात झाली. नेजदार यांच्या मारहाणीचे पडसाद 'गोकुळ'च्या सर्वसाधारण सभेत चप्पलफेकीपर्यंत गेल्याची कुजबूज सुरू आहे. 'गोकुळ'च्या इतिहासात प्रथम अभूतपूर्व गोंधळात सभा गुंडाळावी लागल्याने ज्येष्ठ संचालकांत नाराजी होती. यापूर्वी झालेल्या सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देईपर्यंत सभा चालत होत्या, याचे दाखले काही संचालकांकडून खासगीत दिले जात आहेत.

विद्यमान अध्यक्ष साडेतीन वर्षे पदावर असल्याने बदल करावा यासाठी काही ज्येष्ठ संचालकांनी नेतेमंडळींची भेट घेतली होती. सर्व संचालकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन नेतेमंडळींनी दिले. अध्यक्ष पाटील हे महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांना जवळचे आहेत. त्यामुळे त्यांचे स्थान बळकट आहे. पण सलग तीन वर्षे एकच व्यक्ती अध्यक्षपदावर असल्याने ज्येष्ठ संचालकांत अस्वस्थता पसरली आहे. एक ज्येष्ठ संचालक विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे, तर अन्य दोन संचालक कागल विधानसभा मतदारसंघाशी संबंधित आहेत. नवीन अध्यक्ष निवडायचा असेल तर त्याला महाडिक व पी.एन. यांची सहमती असण्याची आवश्यकता आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेतेमंडळी विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ देणार की बदल करणार, याची चर्चा संचालक मंडळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुसखोरीला भारताचे सडेतोड प्रत्युत्तरः लष्करप्रमुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार आगामी काळात पाकिस्तानातून काश्मीरसह इतर ठिकाणी घुसघोरी वाढू शकते. त्याला सडेतोड उत्तर देण्याची भारताची तयारी आहे. त्यासाठी भारतीय लष्कराकडे सर्व ती अत्याधुनिक यंत्रणा सज्ज आहे,’ अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बुधवारी येथे दिली. मराठा लाइट इन्फंट्रीच्या येथील टेंबलाई परिसरात माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रावत यांची पत्रकार परिषद झाली.

लष्कर प्रसंगानुरूप शत्रूंवरील चढाईचे आडाखे बदलत असते. त्यामुळे स्नायपरच्या मदतीने दहशतवादी भारतीय लष्कराचे डावपेच टिपतात, असे म्हणणे चुकीचे असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘लष्कराचे नियोजन अत्यंत गोपनीय असते. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय लष्कर अत्यंत सतर्क केले आहे. पाकिस्तानात सुरू असलेल्या हालचालीनुसार आवश्यक ते बदल केले जात आहेत. भारतीय लष्कराची कोणत्याही क्षणी जशास तसे उत्तर देण्याची तयारी आहे. अत्याधुनिक हत्यारांबरोबरच लष्करात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.’ ते म्हणाले, ‘नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी भारतीय जवानांनी हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही. त्यासाठी स्थानिक पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत. म्हणूनच नक्षलवादी हतबल झाले आहेत. समाजातील कमकुवत घटक, परिसरातील पत्रकार, कॅमेरामनवर ते हल्ला करीत आहेत. वन रँक वन पेन्शनवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. या विषयावर राजकीय पक्ष करीत असलेल्या आरोपांसंबंधी काही भाष्य करायचे नाही. वीरमाता, वीरपत्नी आणि माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लष्कर प्रशासन प्रयत्नशील आहे.’

मराठा लाइट इन्फंट्रीच्या पराक्रमाचा गौरव करून रावत म्हणाले, ‘इन्फंट्रीला यावर्षी २५० वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांत इन्फंट्रीच्या जवानांनी रणभूमीत प्रचंड मोठी कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आदर्श घेत ते युद्धभूमीत उतरतात. निडर होतात. शत्रूला भिडून त्यांनी अनेकदा विजयश्री खेचून आणली आहे. म्हणूनच मराठा सैनिकांविरोधात लढताना शत्रूही थरथर कापतो. पराक्रमाचा हा आलेख यापुढील काळातही असाच उंचावत जाईल.’

सैनिक टाकळीचा अभिमान

कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीतील जवान मोठ्या संख्येने मराठा लाइट इन्फंट्रीत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. या गावातील तरुणांची लष्करात जाण्याची ओढ अनुकरणीय आहे. अशी गावे दुर्मिळ असतात. या भागातील माजी सैनिकांना तत्पर वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या जातील, असेही रावत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहन खरेदीचा बार उडणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सहज अन् तत्काळ होणारे अर्थसहाय्य, सुलभ हप्ते, अत्यंत कमी डाऊन पेमेंट आणि विक्री पश्चात मिळणाऱ्या सेवेमुळे दिवाळी सणात वाहन खरेदी-विक्री उद्योग चांगलाच पिकअप घेणार आहे. अनेक कंपन्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला नवीन आकर्षक मॉडलचे लाँचिंगही केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी शहरातील अनेक शोरुममध्ये बुकिंगसाठी ग्राहक कुटुंबासह गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वीच अनेक शोरुम्समध्ये विद्युत रोषणाईचा झगमगाट आहे. बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांचे अगत्याने स्वागत केले जात आहे.

चोखंदळ अन् हौशी ग्राहक म्हणून कोल्हापूरवासियांची ओळख. कपडे, वाहन, मोबाइलपासून अनेक वस्तूंचा संग्रह आणि छंद जोपासण्यात येथील ग्राहक सर्वात आघाडीवर आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या वाहनाच्या क्रमांकावरुनही होते. प्रथम हौस म्हणून घेतली जाणारी वाहने आता कुटुंबाची गरज म्हणून घेतली जाते. म्हणून कोल्हापूरात वाहन खरेदी उद्योगातून प्रत्येक सणासुदीत कोट्यवधींची उलाढाल होत असते. गेल्या दोन दशकात वाहन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य मिळवताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र बँकिंग क्षेत्रात प्रचंड निर्माण झालेली स्पर्धा, त्यातून सुलभ झालेला कर्जपुरवठा यामुळे वाहन खरेदी अत्यंत सोपी झाली आहे. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्यांच्या गाड्या हमखास येथे धावताना दिसतात. यामध्ये कार, बाइक अन् मोपेड बाइकचा हमखास समावेश असतो. विक्रीपश्चात मिळणाऱ्या सुविधांमुळे प्रत्येक कुटुंबात एक चारचाकी मोटार व मोटारसायकलचा वापर होताना दिसतो.

आता ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक कंपन्यांनी डाऊन पेमेंट कमी केले आहे. तर वाहन विक्री करताना विमा संरक्षण, अॅक्सेसिरीज अन् सुलभ हफ्त्यांची सोय उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे वाहन खरेदीकडे दिवसेंदिवस ग्राहकांचा अधिक कल वाढत आहे. त्याचबरोबर चारचाकी अन् मोटारसायकलच्या नवीन मॉडेल्स दसरा, दिवाळीच्या पूर्वसंध्येला लाँच केले जाते. त्यामुळे कोल्हापूरवासिय ग्राहक नवीन मॉडेलचे वाहन खरेदी करण्यासाठी हमखास पसंती देतात. विशेषत: युवकांमध्ये स्पोर्टस बाइकची क्रेज असताना युवती व महिला मोपेडला अधिक पसंती देत आहेत. दिवळीला अद्याप चार दिवसांचा अवधी असला, तरी बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळत आहे. शोरुमला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याने सर्व कंपन्यांचे शोरुम्स विद्युत रोषणाईने उजाळून गेली आहेत.

वाहनाच्या एखाद्या मॉडेलवर कोल्हापूरवासियांचा विश्वास बसला की, त्याच मॉडेलला अधिक प्रसंती दिली जाते. त्यामुळे वाहन खरेदीला येथे नेहमीच चांगलाच प्रतिसाद मिळतो. कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा ग्राहकांना चांगला फायदा होत आहे.

- राजेंद्र गुरव, व्यवस्थापक, मोहिते सुझुकी

स्कोडा मॉडेलमध्ये दोन नवी मॉडेल्स लाँच झाली आहेत. फॅमिली ड्राइव्हसाठी ग्राहक चारचाकी खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दसऱ्यानंतर ग्राहकांचा असलेला प्रतिसाद कायम असल्याने दिवाळीसाठी अनेक बुकिंग झाले आहेत. त्यामुळे वाहन उद्योगात चांगली उलाढाल होईल.

- यासर नदाफ, कार्यकारी संचालक, स्कोडा शाइन

दसऱ्याप्रमाणे दिवाळी सणासाठी चांगला प्रतिसाद मिळेल. अनेक ग्राहक बुकिंग करत आहेत. दिवाळीला अद्याप सहा दिवसांचा अवधी आहे. परिणामी अखेरच्या दोन दिवसांत बुकिंगला आणखी जास्त प्रतिसाद मिळेल.

- प्रिया पाटील, सीईओ, मिलेनियम होंडा

ग्राहकांची मागणी वाढत असल्याने दिवाळी सणात चांगली उलाढाल होईल. ग्राहकांची आवड समोर ठेऊन कंपन्यांनी नव्या मॉडेल्सचे लाँचिंग केले आहे. सँट्रोचे नवीन मॉडेलचे लाँच झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची प्रचंड मागणी वाढत आहे.

- विशाल वडेर, सरव्यवस्थापक, माई ह्युंडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक विकासासाठी बचत गट प्रभावी माध्यम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आर्थिक विकासासाठी महिलांना बचत गटाचे प्रभावी माध्यम उपलब्ध आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून दर्जेदार, नेटके आणि चोख व्यवहार करून व्यवसाय उद्योगात यशस्वी व्हावे. महिलांना आर्थिक सहकार्यासाठी बँका त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील,' अशी ग्वाही बँक ऑफ इंडियाचे उपक्षेत्रीय प्रबंधक विजय परळीकर यांनी दिली.

महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीविषयी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या बचत गटांचे अध्यक्ष, सचिवांच्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि फिल्ड आउटरीच ब्युरो यांच्यावतीने मेळाव्याचे आयोजन केले होते.

परळीकर म्हणाले, 'व्यवसाय आणि उद्योग हाच महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याचा प्रभावी मार्ग आहे. आजच्या घडीला सर्वच क्षेत्रांत महिलांचे योगदान वाढले आहे. महिलांच्या प्रगतीत समाजाने सहकार्यरुपी हातभार लावल्यास त्यांना मोठी झेप घेता येईल. महिला बचत गटांना आर्थिक सहकार्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.'

महापालिकेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे म्हणाले, 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे. कोल्हापूर शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांनी जनजागृतीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा.'

माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे म्हणाले, 'जिल्ह्यात माविमच्या बचत गटांची मोठी चळवळ उभी राहिली आहे. माविमने २४०० बचत गटांद्वारे ४२ हजार महिलांचे संघटन केले आहे. जिल्ह्यात माविमच्या वतीने ५ तालुक्यांत ६ लोकसंचलित साधनकेंद्रे कार्यान्वित असून १०८ गावांमध्ये या साधनकेंद्राच्या माध्यमातून काम होत आहे.'

शाहीर देवानंद माळी यांनी स्वच्छता अभियानाविषयी शाहिरी पोवाड्यातून जनजागृती केली. लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी भ्रष्टाचाराविषयी जनजागृती, ॲन्टी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली व भ्रष्टाचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने व आर्थिक साक्षरता केंद्राचे शशिकांत किणिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माविमचे लेखाधिकारी विनायक कुलकर्णी, उमेश लिंगणूरकर, विजय कलगुटकी, सारिका पाटील, जितेंद्र जाधव उपस्थित होते. सुनीता तेली यांनी सूत्रसंचालन केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या छळ, चौघांवर गुन्हा

$
0
0

जयसिंगपूर : माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींनी छळ केल्याची फिर्याद पूजा लक्ष्मण खिलारे (रा. जांभळी, ता.शिरोळ) हिने पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती लक्ष्मण हिंदुराव खिलारे, सासू रुक्मिणी हिंदुराव खिलारे, सासरा हिंदुराव अण्णा खिलारे, नणंद निकिता हिंदुराव खिलारे अशी त्यांची नावे आहेत.

०००

विवाहितेचा मृत्यू

जयसिंगपूर : शिरोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. मुमताज अस्लम सनदी (वय २५, रा. नंदीवाले वसाहत रोड, लक्ष्मीनगर शिरोळ) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. सनदी यांना थंडी, ताप आल्याने उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत नेले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सकाळी साडेदहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची वर्दी पती अस्लम सनदी यांनी शिरोळ पोलिसांना दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीतील लबाडीला वेतनवाढीचा ‘ब्रेक’

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

............

१०८ शिक्षकांकडून चुकीची माहिती , प्रशासनाकडून दोन दिवसात नोटिसा

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet : Appasaheb_MT

कोल्हापूर :

नव्या शैक्षणिक वर्षारंभी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १०८ शिक्षकांनी चुकीची माहिती सादर करुन बदलीचा लाभ घेतल्याने त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखली जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान संबंधित शिक्षकांनी सरकार व प्रशासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून तालुकानिहाय शिक्षकांची यादी निश्चित केली असून दोन दिवसात त्यांना नोटिसा लागू होतील.

प्रशासनाला खोटी माहिती देऊन सोयीच्या ठिकाणी रुजू होणाऱ्या शिक्षकांची चलाखी संबंधितांच्या अंगलट आली आहे. यामध्ये तीन मुख्याध्यापकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यावर ऑनलााइन बदली प्रकिया राबवली. जिल्ह्यातील बदली प्रक्रियेंतर्गत चुकीची माहिती देऊन अनेकांनी बदलीचा लाभ घेतला. यामध्ये शिक्षक पती, पत्नी, आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. काहीजणांनी अपंग असल्याची खोटी सर्टिफिकेट जोडली आहेत. हात, पाय मोडल्याचे दाखले दिले आहेत. काहींनी हृदयविकराचा त्रास असल्याने नमूद केले आहे. तर काही शिक्षकांनी चुकीची तारीख नमूद केली आहे.

सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी कागदी चलाखी करणाऱ्या शिक्षकांमुळे बदलीसाठी पात्र खरे शिक्षक मात्र वंचित राहिले आहेत. ऑनलाइन बदली प्रकियेत संबंधित शिक्षकांनी दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे झाल्या होत्या. प्रशासनाने या संदर्भात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविले. ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती सादर करुन बदलीचा लाभ घेतला आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम तीनचा भंग केला म्हणून कारवाई करावी असे आदेश मिळाले. दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी केली. गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांमार्फत तपासणी मोहिम राबवली. यामध्ये १०८ शिक्षक दोषी आढळले आहेत.

...........

म्हणणे मांडण्यास चार दिवसाचा कालावधी

प्रशासनाने राबविलेल्या तपासणी मोहिमेत गगनबावडा तालुका वगळता अन्य ठिकाणी शिक्षकांनी दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील २५, हातकणंगलेतील ३४, गडहिंग्लजमधील १३, करवीरमधील ७, कागलमधील सहा, भुदरगड व चंदगडमधील ५ तर राधानगरी तालुक्यातील दोन शिक्षकांनी चुकीची माहिती दिली. शाहूवाडी तालुक्यातील एका शिक्षकाचाही त्यामध्ये समावेश आहे. या साऱ्या शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई निश्चित झाली आहे. त्या अगोदर त्यांना नोटीसा पाठवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसात संबंधितांनी गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत प्रशासनाला म्हणणे सादर करावयाचे आहे. दोन दिवसात प्राथमिक शिक्षण विभागाकडून नोटिसा लागू होणार आहेत. शिरोळ तालुक्यातील ४० शिक्षकांसंदर्भात तक्रारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याअगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासमोर सुनावणी होईल.

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटी कर्मचाऱ्यांच्या वाटाघाटी फिसकटल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याच्या पगारासह अॅडव्हान्स देण्याच्या मागणीसाठी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व स्थायी समिती सभापती अशिष ढवळे यांच्याशी म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन व रोजंदारी कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स देण्याचे प्रशासनाने मान्य केले. पण सर्वच कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार आणि अॅडव्हान्स देण्याची मागणी अखेरपर्यंत लावून धरली. परिणामी बुधवारी कर्मचाऱ्यांतची प्रशासनासोबत झालेली बैठक निष्पळ ठरली.

केएमटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्याचा पगार थकीत आहे. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचा पगार व प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची मागणी युनियनने केली. मंगळवारी झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. चौधरी यांच्या सूचनेनंतर अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी एक महिन्याचा पगार देण्याचे मान्य केले. पाच नोव्हेंबरपूर्वी पगार देण्याचे मान्य करताना केएमटीच्या आर्थिक स्थितीबाबत संपूर्ण माहिती दिली. तरीही बुधवारी युनियनच्या नव्या कार्यकारिणीने दोन महिन्यांचा पगार व अॅडव्हान्स देण्याची मागणी केली. प्रशासनाने स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून मागणी लावून धरली. मात्र रात्री उशीरापर्यंत त्यांना यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीच्या ताफ्यात २० सीटर नव्या बसेस

$
0
0

उत्पन्नवाढ व अवैध वाहतूक रोखण्यासाठी परिवहन समितीचा निर्णय

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

केएमटीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी २० सीटर दहा नवीन बसेस ताफ्यात आणण्याचे नियोजन सुरू आहे. बुधवारी केएमटीच्या वर्कशॉपमध्ये नवीन बसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नवीन बसेस खरेदीसाठी परिवहन समितीने मंजुरी दिली आहे.

केएमटीची चाके गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात रुतली आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीचे आव्हान, दांडी बहाद्दर कर्मचारी यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. केवळ चालक-वाहकांअभावी दररोज किमान २० ते २५ केएमटी बसेस वर्कशॉपमधून बाहेर पडत नाहीत. वेळेवर मिळत नसलेले वेतन कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीमागील प्रमुख कारण असले, तरी यामुळे केएमटीला दररोज सुमारे दोन ते अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागतो. अवैध प्रवासी वाहतुकीला राजकीय नेत्यांचाच आशीर्वाद मिळत असल्याने केएमटी प्रशासन हतबल होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तरीही केएमटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात.

अशाच प्रयत्नातून परिवहन समितीने केएमटीच्या ताफ्यात २० सीटरच्या दहा बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. सभापती राहुल चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करुन पोलिस प्रशासनाकडे थकीत असलेले दोन कोटी १८ लाख रुपये मिळवले आहेत. या रकमेतून सुमारे १३ ते १४ लाख रुपये किंमतीच्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. ३५ सीटरच्या बस शहरात सरासरी तीन ते साडेतीन प्रतिकिमी अॅव्हरेज देत असताना नवीन बसेस मात्र प्रतिकिमी १२ किमी अॅव्हरेज देणार असल्याने इंधन खर्चामध्ये चांगलीच बचत होणार आहे. त्यामुळे केएमटीच्या उत्पन्नात हमखास वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी केएमटीच्या वर्कशॉपमध्ये प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित चाचणी घेतली. नवीन बस सर्वांच्याच पसंतीस उतरली असल्याने लवकरच या बसेस ताफ्यात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, केएमटीच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नाही. किमान दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी युनियन प्रशासनाबरोबर गेल्या चार दिवसांपासून चर्चा करत आहे. केएमटीची सध्याची आर्थिक स्थिती पाहून प्रशासन एक महिन्याचे वेतन देण्यास तयार झाले आहे. कर्मचारी दोन महिन्यांच्या वेतनासाठी अडून बसले आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास आर्थिक स्थिती आडवी येत असेल, तर बसेसची खरेदी कशी केली यावरुन प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

.........................

चौकट

जोतिबा, पन्हाळा मार्गावर

धावणार विशेष बस

केएमटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर-जोतिबा बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या नव्या बसेस जोतिबासह पन्हाळा मार्गावर सोडण्याचे नियोजन समितीने केले आहे. जोतिबा व पन्हाळ्याला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या जास्त असते. उत्पन्नवाढीचे हमखास साधन असल्याने या दोन्ही मार्गावर २० सीटर बस सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

......................

कोट

'केएमटीचा तोटा भरुन काढण्यासाठी छोट्या नवीन बसेस घेण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबत समितीमध्ये सदस्य ठराव झाला आहे. बुधवारी नव्या बसची चाचणी घेतली आहे. तसेच बंद असलेल्या १८ बसेस मार्गावर आणण्यासाठी समितीमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत.

राहुल चव्हाण, सभापती, परिवहन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा व शहर युवक काँग्रेसतर्फे विविध ठिकाणी आंदोलने झाली. मिरजकर तिकटी येथे सकाळी नऊ ते दहा या वेळेत कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात निषेधासन केले.

सरकारने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत नागरिकांची फसवणूक केली आहे. सरकारच्या सामान्य नागरिकांविरोधी कामगिरीचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी महागाई आसन, राफेलासन, गजरासन, फसविणासन, धमकीआसन, मौनासन, बेरोजगारासन करत सरकारचा धिक्कार केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, शहराध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी दिली.

मिरजकर तिकटी येथील आंदोलनात जयदीप शिंदे, दयानंद कांबळे, एनएसयूआयचे अध्यक्ष पार्थ मुंडे, मंदार वाडकर, वैभव तहसीलदार, योगेश कांबळे, विश्वजित हप्पे, वैभव देसाई आदींचा समावेश होता. युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी कॉमर्स कॉलेज, दसरा चौक येथे आंदोलने केली. कार्यकर्त्यांनी 'फसवणीस सरकार, चौकीदार चोर है' अशा घोषणा दिल्या. भुदरगड, जयसिंगपूर, इचलकरंजी येथेही भाजप सरकारचा निषेध केला.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भाऊसिंगजी रोडवर खानविलकर पेट्रोल पंपाजवळ खोदाई करताना फुटलेली मुख्य जलवाहिनी दुरुस्त करण्यास बुध‌वारी पहाटे यश आले. दुरुस्तीनंतर तत्काळ पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी ई वॉर्डात दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. गुरुवारपर्यंत ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड दूर होणार असल्याने शुक्रवारपासून (ता. २ नोव्हेंबर) शहराचा पाणीपुरवठा नियमित होणार आहे. दुरुस्तीचे कम पूर्ण झाल्याने नागरिकांसह शहर पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे.

शिंगणापूर येथील पंपिंग स्टेशनमधील चार ट्रान्सफॉर्मरपैकी एकामध्ये बिघाड झाल्याने २२ नोव्हेंबरपासून निम्म्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. निम्म्या शहराला अपुऱ्या पाण्याचा झळा सोसाव्या लागत असताना खानविलकर पेट्रोलपंपाजवळ गटर खोदाई करताना कसबा बावड्याकडे जाणाऱ्या शिंगणापूरची मुख्य जलवाहिनी फुटली. परिणामी ई वॉर्डातील पाणीपुरवठा बंद पडला. जलवाहिनीच्या दुरुस्तीला सोमवारी रात्री सुरुवात झाली. मात्र, मंगळवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ई वॉर्डातील नागरिकांना टँकरने पाणी दिले जात होते. ऐन सणासुदीत पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. घरोघरी फराळ तयार करण्याची लगबग सुरू असताना नागरिकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे भागात टँकर आल्यानंतर नागरिकांची पाण्यासाठी मोठी गर्दी होत होती.

काल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने बुधवारीही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण दुरुस्ती करण्यासाठी यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न केले. जेसीबीच्या सहायाने कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून बुधवारी पहाटे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तरीही उलपेमळा, शुगरमील, कसबा बावडा, लाइन बाजार, नागाळा पार्क, कनाननगर, ताराबाई पार्क, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी, सदर बजार, कदमवाडी, बापट कँप, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, साईक्स एक्स्टेंशन, विक्रमनगर, टेंबलाईवाडी आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. मात्र, गुरुवारी ई वॉर्डाला नियमित पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेला बिघाड अद्याप दूर झालेला नाही. गुरुवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस ए, बी व ई वॉर्डाला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

'जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली असून ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती अंतिम टप्प्यात असल्याने शुक्रवारपासून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल,' असे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

अक्षम्य बेफिकीरी कारणीभूत

दरम्यान, भाऊसिंगजी रोडवर खानविलकर पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेल्या एका खासगी इमारतीनजीक गटरचे काम महापालिकेच्या पवडी विभागाकडून सुरू होते. कसबा बावड्याकडे जाणाऱ्या या रस्त्यावर मुख्य जलवाहिनी असल्याचे पाणीपुरवठा विभागाला माहिती होते. मात्र, महापालिकेने पवडी आणि पाणी पुरवठा या दोन्ही विभागांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. पाणीपुरवठा विभागाने तेथे जलवाहिनी असल्याची माहिती पवडीच्या कर्मचाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे बेफिकीरीने केलेल्या कामामुळे जलवाहिनी फुटली. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना तीन दिवस पाण्यासाठी धावाधाव करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाजीपूर अभयारण्य खुणावतेय

$
0
0

लोगो : दिवाळी पर्यटन

०००

आनंद चरापले, राधानगरी

प्रत्येक ऋतू आपल्या परीने सृष्टीला नवे रूप देत असतो. हिरवागर्द परिसर, रंगीबेरंगी रानफुलांच्या दुनियेने दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना खुणावते आहे. दाजीपूर (ता. राधानगरी) अभयारण्य जून ते ऑक्टोबरच्या विश्रांतीनंतर आज, एक नोव्हेंबरला पर्यटकांना खुले केले जात आहे. जंगलात भटकंती करण्यासाठी दाजीपूर अभयारण्य सज्ज झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मी. आहे. समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ९०० ते १००० फूट असून, येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मि. मी. असते. राधानगरी अभयारण्यातील एक भाग म्हणजे दाजीपूर. येथे पर्यटकांना सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वन्यजीव विभागाचे तिकीट घेऊन प्रवेश दिला जातो. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले दाजीपूर हे महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य. गवे आणि सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवी वनस्पती हे इथले प्रमुख आकर्षण असले तरी हे निमसदाहरित जंगलवेली, झुडपे, झाडे आपल्या विविध रूपांचे दर्शन घडवितात.

कोल्हापूरपासून ८० कि.मी.वर असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यात आढळणारे पक्षीविश्व, प्राणीसंपदा, औषधी वनस्पती, तसेच फुलपाखरे इथल्या संपन्न जैवविविधतेचे दर्शन घडवते. पर्यटकांना दाजीपूर अभयारण्याबरोबरच आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे अभयारण्याची ओळख करून देणारे माहिती केंद्र, टेहाळणी मनोरे त्याच बरोबर शिवगड, हत्तीमहाल येथील साठमारी, राधानगरी धरणाच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला बेंझील व्हिला, उगवाई देवराई, हसणे देवराई आणि राधानगरी येथे नव्याने सुरू केलेले फुलपाखरू उद्यान हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.

कोल्हापूरहून दाजीपूरला जातेवेळी खिंडी व्हरवडे घाटापासून निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराची झलक पाहायला मिळते. अभयारण्याच्या मध्यापर्यंत खुरटे जंगल, त्यानंतर उंच झाडे आणि शेवटी सडा. अशा तीन टप्यांत विखुरलेल्या या जंगलात औषधी वनस्पती, कीटकांपासून ते बिबट्यापर्यंतच्या जीवांच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हजारोंच्या संख्येने आढळणारी ब्लू टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राइप टायगर ही फुलपाखरे पाहायला मिळतात. अभयारण्यात भरउन्हात जाणवणारा नैसर्गिक गारवा, हिवाळ्यातील गुलाबी थंडी, सह्याद्रीच्या कुशीतील वृक्षवल्ली आणि समृद्ध जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी दाजीपूरला एकदा भेट द्यायलाच हवी. सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यटनासाठी राधानगरीतील राधानगरी नेचर क्लब व बायसन क्लबतर्फे अभयारण्य परिसरातील पर्यटनस्थळी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे. भोजन, वाहन व निवासाच्या सोयीसाठी राधानगरी नेचर क्लबकडून नेहमीच सहकार्य मिळते.

०००००

कसे जाल?

कोल्हापूर ते राधानगरी अंतर : ५५ कि.मी. (एस.टी.बस किंवा स्वतःच्या गाडीने)

राधानगरी ते दाजीपूर अंतर : २५ किलोमीटर

दाजीपूर ते अभयारण्य मनोरा : २२ किलोमीटर (चारचाकी कार भाडेतत्त्वावर मिळतात.)

राहण्याची सुविधा : दाजीपूर येथे पर्यटन मंडळाची हॉटेल, खासगी हॉटेल उपलब्ध. शिवाय राधानगरी येथे हॉटेल आणि राहण्याची सुविधा.

खाद्य पदार्थ : कोकणी पद्धतीचे जेवण, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, शाकाहारी दूध आमटी हे पदार्थ परिसरात ऑर्डरप्रमाणे मिळतात.

०००००

राधानगरी दाजीपूर हा सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य, सुरक्षित परिसर यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. राधानगरी नेचर क्लबच्या वतीने पर्यटकांना सुविधा देण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. येथे गवे, रान कोंबडे, अस्वल, ससे असे प्राणी फिरताना पाहण्यास मिळतात. नोव्हेंबरपासून सुरू होणारे अभयारण्य पर्यटकाना नवे दालन असणार आहे.

संदेश म्हापसेकर, राधानगरी नेचर क्लब, राधानगरी

००००

दाजीपूर अभयारण्य देश-विदेशातील पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात विहार आणि मनमोहक दृश्ये पाहून भान हरपून ठेवणारा परिसर आहे. यावर्षी नव्याने सुरू झालेले फुलपाखरू उद्यान आणि दाजीपूर जंगल परिसर अनेक वनस्पती आणि प्राणी यांचे हमखास दर्शन मिळते. पर्यटकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.

सम्राट केरकर, अध्यक्ष, बायसन नेचर क्लब, राधानगरी

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुद्वादशीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

गुरुद्वादशीनिमित्त

विविध कार्यक्रम

कोल्हापूर : येथील आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालिंग स्थानाच्यावतीने गुरुद्वादशी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहतील.

गुरुवारी (ता. १ नोव्हेंबर) रिदम स्टुडिओ सुनील तिवारी प्रस्तुत भावगीते व भक्तीगीतांचा कार्यक्रम, शुक्रवारी (ता. २) नागाळा पार्कातील राधाकृष्ण महिला भजनी मंडळाचे भजन, शनिवारी (ता. ३) राजेंद्र मेस्री यांच्या नाद सुरमईतर्फे अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल. दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळात कार्यक्रम होईल. उत्सवकाळात दररोज दुपारी एक ते तीन या वेळात श्री दत्त भिक्षालिंग भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. ४) सकाळी ९ वाजता गोवत्सवपूजनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी १ वाजता महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. उत्सवकाळात सकाळी ६ ते ७ वाजता श्रींस रुद्राभिषेक, सकाळी ९ ते १२ गुरुचरित्र वाचन वाचक-मोहन भोसले, सकाळी ११ ते १२ महापूजा व आरती, सायंकाळी ५ ते ६ तांबे यांचे पुराण वाचन, सायंकाळी ६ ते ८ भजन, भक्तीगीते, भावगीते गायन, रात्री ८ वाजता आरती, रात्री ८.३० वाजता जप होईल. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त भिक्षालिंग देवस्थानने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळी पाडव्याला ‘ती फुलराणी’भेटीला

$
0
0

कल्चर क्लबचा लोगो व २९९ रुपयांचा बॉक्स वापरावा

............

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी म्हणजे हर्ष, उल्हासाचा सोहळा. दिवाळीला घरोघरी मांगल्याचे वातावरण असते. या सणाचा गोडवा आणखी वाढविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे 'ती फुलराणी'नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. सुगुण नाट्यसंस्था निर्मित व 'रंगनाद' प्रकाशित हा नाट्यप्रयोग दीपावली पाडव्याला गुरुवारी (ता. ८) सकाळी ६.३० वाजता होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे नाटक होईल.

पु.ल.देशपांडे लिखित 'ती फुलराणी' हे नाटक आणि मराठी नाट्य प्रेक्षक यांच्यामध्ये आगळेवेगळे नाते तयार झाले आहे. या नाटकावर मराठी माणसांनी भरभरुन प्रेम केले. मराठीतील ख्यातनाम अभिनेत्रींनी 'ती फुलराणी'नाटक गाजविले. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी साकारलेली 'मंजुळा'ची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली आहे.

पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त 'सुगुण'ने हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले आहे. राज्य नाट्य स्पर्धेत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत 'सुगुण'ने आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. 'सुगुण'ने यापूर्वी 'विच्छा माझी पुरी करा, नटसम्राट, शांतता कोर्ट चालू आहे, अग्निपंख, नागमंडल' अशी वेगवेगळया विषयांवरील नावाजलेली नाटके सादर केली आहेत.

स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन 'ती फुलराणी'नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन सुनील घोरपडे यांनी केले आहे.

'फुलराणी'ची भूमिका याज्ञसेनी घोरपडेने केली आहे. नाटकात प्रफुल्ल गवस, सचिन मोरे, सुनील घोरपडे, सन्मती घोरपडे, मंजीत माने, समीर भोरे, मुजीब मुल्ला, शेखर बारटक्के यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. रोहन घोरपडे यांनी नेपथ्य, अनुपमा दाभाडे यांनी पार्श्वसंगीत तर आनंद कुलकर्णी यांनी निर्मिती सूत्रधाराची जबाबदारी पेलली आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने दीपावली पाडव्यानिमित्त या नाटकाचे आयोजन केले आहे. 'मटा कल्चर क्लब'चे नव्याने सभासद होणाऱ्यांना दोन तिकिटे मोफत देण्यात येणार आहेत.अधिक माहितीसाठी ९७६७८९०६२६ या क्रमाकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार आगामी काळात पाकिस्तानातून काश्मीरसह इतर ठिकाणी घुसघोरी वाढू शकते. त्याला सडेतोड उत्तर देण्याची भारताची तयारी आहे. त्यासाठी भारतीय लष्कराकडे सर्व ती अत्याधुनिक यंत्रणा सज्ज आहे,' अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बुधवारी येथे दिली.

मराठा लाइट इन्फंट्रीच्या टेंबलाई परिसरात माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रावत यांची पत्रकार परिषद झाली.

लष्कर प्रसंगानुरूप शत्रूंवरील चढाईचे आडाखे बदलत असते. त्यामुळे स्नायपरच्या मदतीने दहशतवादी भारतीय लष्कराचे डावपेच टिपतात, असे म्हणणे चुकीचे असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'लष्कराचे नियोजन अत्यंत गोपनीय असते. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय लष्कर अत्यंत सतर्क केले आहे. पाकिस्तानात सुरू असलेल्या हालचालीनुसार आवश्यक ते बदल केले जात आहेत. भारतीय लष्कराची कोणत्याही क्षणी जशास तसे उत्तर देण्याची तयारी आहे. अत्याधुनिक हत्यारांबरोबरच लष्करात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.'

ते म्हणाले, 'नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी भारतीय जवानांनी हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नाही. त्यासाठी स्थानिक पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत. म्हणूनच नक्षलवादी हतबल झाले आहेत. समाजातील कमकुवत घटक, परिसरातील पत्रकार, कॅमेरामनवर ते हल्ला करीत आहेत. वन रँक वन पेन्शनवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. या विषयावर राजकीय पक्ष करीत असलेल्या आरोपांसंबंधी काही भाष्य करायचे नाही. वीरमाता, वीरपत्नी आणि माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लष्कर प्रशासन प्रयत्नशील आहे.'

मराठा लाइट इन्फंट्रीच्या पराक्रमाचा गौरव करून रावत म्हणाले, 'इन्फंट्रीला यावर्षी २५० वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांत इन्फंट्रीच्या जवानांनी रणभूमीत प्रचंड मोठी कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आदर्श घेत ते युद्धभूमीत उतरतात. निडर होतात. शत्रूला भिडून त्यांनी अनेकदा विजयश्री खेचून आणली आहे. म्हणूनच मराठा सैनिकांविरोधात लढताना शत्रूही थरथर कापतो. पराक्रमाचा हा आलेख यापुढील काळातही असाच उंचावत जाईल.'

.. .. ..

सैनिक टाकळीचा अभिमान

कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीतील जवान मोठ्या संख्येने मराठा लाइट इन्फंट्रीत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. या गावातील तरुणांची लष्करात जाण्याची ओढ अनुकरणीय आहे. अशी गावे दुर्मिळ असतात. या भागातील माजी सैनिकांना तत्पर वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या जातील, असेही रावत यांनी सांगितले.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images