Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्नाटकातील गुळाच्या गाड्या फोडण्याचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकातील साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापूरच्या दर्जेदार गुळाची बदनामी होत असल्याने बाजार समितीने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा कर्नाटकातील गुळाच्या गाड्या फोडल्या जातील, असा इशारा स्थानिक गूळ उत्पादकांनी दिला. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत या इशाऱ्यामुळे काही काळ वातावरण तप्त झाले. दरम्यान पुढील वर्षी गुळासाठी कोल्ड स्टोअरेज उभारले जाईल, अशी घोषणाही बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांनी यावेळी केली.

राजर्षी शाहू मार्केट येथे शुक्रवारी गूळ उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व संबंधित घटकांची संयुक्त बैठक झाली. यावेळी शेतकरी संघटनेने श्रीकांत घाटगे म्हणाले, 'कर्नाटकाच्या साखरमिश्रित गुळावर शाहू मार्केट यार्डचा शिक्का मारला जात असल्याने हा गूळ कोल्हापूरचा म्हणून ओळखला जातो. बाजार समितीने हस्तक्षेप करून कर्नाटक गुळाच्या खरेदी विक्री व्यवहाराचा वेगळा प्लॉट करावा अन्यथा कर्नाटक गुळाच्या गाड्या फोडल्या जातील.' घाटगे यांच्या इशाऱ्यानंतर संचालक नंदकुमार वळंजू यांनी दरवर्षी कर्नाटकातून सात ते आठ लाख गुळाचे रवे येत असल्याने हा गूळ नाकारला जाणार नाही. कर्नाटकाचा गूळ कोल्हापूरच्या नावावर खपवला जात नाही. अशी गोष्ट निदर्शनास आली तर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावर गूळ उत्पादक भूषण पाटील यांनी असा प्रकार उघडकीस आला तर दुकानाचा परवाना रद्द करणार का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर गूळ व्यापारी विक्रम खाडे यांनी कर्नाटक व कोल्हापूरातील गूळ वेगळा खरेदी केला जातो असे स्पष्ट केले. आजही कर्नाटक गुळाला प्रतिक्विंटल ३१०० रुपये तर जिल्ह्यातील गुळाला ५२०० रुपये दर देत असल्याचे निदर्शनास आणून दिले. व्यापारी कोल्हापूरचा ब्रँड कायमपणे जपतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

बैठकीला उपसभापती अमित कांबळे, सदस्य़ परशराम खुडे, उदयसिंह पाटील, दशरथ माने, बाबूराव लाड, उत्तम धुमाळ, शेखर येडगे, संजय जाधव, शशिकांत आडनाईक, सदानंद कोरगांवकर, बाबूराव खोत, नेताजी पाटील, नाथाजी पाटील, भगवान काटे, आनंदराव पाटील, नाना पाटील, उपसचिव राजेंद्र मंडलिक उपस्थित होते.

०००००

अन्न व औषध प्रशासनाचा ससेमिरा थांबवा

गुळात अधिक प्रमाणात रासायनिक घटक आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडून गेल्यावर्षी बडगा उगारल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला होता. यावर्षी हंगाम सुरू होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा ससेमिरा थांबवण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. गूळ तयार करताना हायड्रो पावडरचा वापर केला जातो. पावडरमध्ये सल्फर असते. सल्फरचे प्रमाण गुळात जास्त असल्याने अन्न व औषधकडून कारवाई केली जाते. गूळ तयार करताना हायड्रो पावडरचा वापर टाळावा, अशी सूचना पणन अधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दसऱ्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर पाणीपुरवठा विभागाने विभागनिहाय तयार केलेल्या वेळापत्रकावर शुक्रवारी महापौर शोभा बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. दसऱ्यानंतर वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच शहरवासीयांना दोन तास मुबलक पाणी देण्याबरोबरच आवश्यक ठिकाणी नवीन व्हॉल्व्ह बसवण्याच्या सूचना दिल्या.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचे पडसाद प्रथम स्थायी समिती आणि महासभेत उमटले. पण त्यावर उपाययोजना काढण्यात प्रशासनाला अपयश आले. पाणीपुरवठा नियोजनाबाबत बोलाविलेल्या विशेष सभेत प्रशासनाला लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परिणामी प्रशासनाने वेळेच्या नियोजनासाठी तातडीने पावले उचलली. दोन दिवसांपूर्वी सर्व गटनेत्यांना सोबत घेऊन वेळपत्रक तयार करण्याचे सूतोवाच केले होते. परिणामी शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने तयार केलेले वेळापत्रक बैठकीत सादर केले. बैठकीतही वेळापत्रकावर चर्चा होऊन उपाय सुचवत काही सूचनाही केल्या. स्थायी सभापती आशीष ढवळे यांनी आयआरबीच्या रस्त्याखाली किती पाइपलाइनला गळती आहे, किती दिवसात दुरुस्ती करणार असा प्रश्न उपस्थित केला. परिवहन सभापती राहुल चव्हाण यांनी केवळ कागदावर नियोजन न करता मोटर लावून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यापूर्वी वेळापत्रकात बदल केल्यानंतर जेथे पाणी मिळत होते, तेथे बंद झाले होते. नवीन वेळापत्रक तयार करताना याचा विचार करावा, असे मत गटनेते विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

गटनेता शारगंधर देशमुख म्हणाले, 'काही ठराविक भागात पाण्याची समस्या आहे. परिणामी दिवसाआड पाणीपुरवठ्याला विरोध आहे. जेथे पाणीपुरवठ्याची समस्या आहे, तेथे सदस्यांना विश्वासात घेऊन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार करा. नगरसेवक वेळापत्रकाशिवाय व्हॉल्व्ह सोडताना जबरदस्ती करत असतील, तर संबंधित गटनेत्यांना माहिती द्यावी.'

जलअभियंता सुरेश कुलकर्णी म्हणाले, 'यापूर्वीच्या नियोजनात काहीसा बदल केला आहे. दुरुस्तीसाठी वर्क ऑर्डर काढली आहे. सणामुळे शटडाउन घेतलेले नाही. नवीन वेळापत्रक शाखा अभियंता व पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तयार केले आहे.'

सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गळतीच्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आदेश दिले. परस्पर व्हॉल्व्ह सोडले जात असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दसऱ्यापर्यंत विविध ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्याबरोबर नादुरुस्त व्हॉल्व्ह बदलण्याची सूचना केली. उपमहापौर महेश सावंत, शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, माजी नगरसेवक आदिल फरास, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, सभागृहनेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, प्रभाग समिती सभापती प्रतीक्षा पाटील, माधवी गवंडी, राजसिंह शेळके यांनी बैठकीत सूचना मांडल्या.

००००००

बंद मीटरमधून पाणीचोरी

हॉटेल्स व मंगल कार्यालयांची ५० टक्के मीटर बंद आहेत. नियमानुसार मीटर बंद असल्यास ११०० ते १२०० रुपये भरून घेतले जातात. प्रत्यक्षात १० ते १२ हजारांचे पाणी वापरले जाते. अशा व्यावसायिक हॉटेल्स व मंगल कार्यालयांवर कारवाई करा. मीटर बंद असल्यास त्यांना कमीत कमी २५ हजार रुपये दंड वसूल करा, अशी सूचना सत्यजित कदम यांनी केली. यामुळे पाणी चोरीला आळा बसेल असा विश्वासही व्यक्त केला.

००००००

पॉइंटर

नियोजनाचा आठ दिवसांनंतर आढावा घेणार

गळतीचे काम त्वरित पूर्ण होणार

वेळापत्रकाची जबाबदारी सुपरवाझरवर

दिवसाआड पाणीपुरवठ्याला विरोध

०००००

चौकट

बैठकीत तयार झालेले व्हॉल्व्हचे ठिकाण (वेळ)

शेंडा पार्क : रात्री १.२०

कळंबा फिल्टर हाउस : रा. १२ ते स. ७ व स. ७ ते दु. १.३० वा.

कळंबा : स. ७ ते १० वा. व दु. १.३०

आयटीआय : दु. ११ ते रात्री १.३० वा., सा. ५ ते रा. ९ वा., रा. ९ ते स. ६ वा.

साळोखेनगर : दु. १.४५ ते ५ बंद.

शेंडापार्क : रा. १.३० ते ६ वा.

राजेंद्रनगर : रा. ९ ते १.३० पर्यंत

सुभाषनगर : स. ६.३० वा. ते स. १० वा.

राजारामपुरी : रा. १.३० ते स. १० वा.

कावळा नाका : स. १० ते १.३० वा.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन इंच पाइपसाठी ‘ना हरकत’ करा

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोठ्या जलवाहिनीवर एक ते दोन इंच पाणीपुरवठा कनेक्शन दिल्यानंतर त्याचा परिणाम पुढील भागाच्या पाणीपुरवठ्यावर होतो. परिणामी नगररचना विभागाने मोठ्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी देताना पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करावे, अशी मागणी सभापती आशिष ढवळे व सदस्या प्रतीक्षा पाटील यांनी केली. याबाबत अभियंत्यांना योग्य सूचना देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

शहरात डेंगीचे प्रमाण कमी झाले असताना, स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरातील अनेक कचरा कोंडळे नादुरुस्त झाले असून वेळेत कचरा उठाव होत नाही. चिकन व मटण यांचा कचरा कोंडाळ्यात टाकला जात असल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. नादुरुस्त झालेल्या कोंडाळ्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सत्यजित कदम केली.

शहरात ३७ व ग्रामीण भागात ९० रुग्ण आहेत. शहरातील स्वाइन फ्लूचे २४ रुग्ण बरे झाले असून, नऊ रुग्णांचे निधन झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील ३९ रुग्ण बरे झाले आहेत, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. टॅमी फ्लू गोळ्या दिल्या जात आहेत. औषधसाठा पुरेशा प्रमाणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.

कचरा संकलनासाठी नवीन वाहने कधी घेणार, प्रत्येक बैठकीत यावर केवळ चर्चा होते, प्रशासन प्रत्यक्ष कार्यवाही कधी करणार, असा प्रश्न सभापती ढवळे यांनी उपस्थित केला. याबाबतचा डीपीआर तयार केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक घरामागे ७०० किलो कचरा गृहीत धरून निविदा काढली आहे. पहिल्या टप्प्यात १०४ टिपर्स येणार आहेत. आयुक्त डॉ. चौधरी यांच्याशी चर्चा करून मोठ्या क्षमतेची वाहने घेण्यात येथील असे प्रशासनाने स्पष्ट केले. बैठकीत प्रतिज्ञा निल्ले, दीपा मगदूम यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलास जरग यांचे निधन

$
0
0

विलास जरग

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी सचिव विलास दिनकरराव जरग यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातंवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१४) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळती काढल्यानंतर काही भागात पाणीपुरवठा

$
0
0

म . टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साळोखेनगर येथील मुख्य जलवाहिनीची गळती काढण्यासाठी बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा शनिवारी दुपारपासून सुरू झाला. ए, बी, वार्डातील पाणीपुरवठा नियमित सुरू झाला असला, तरी 'ई' वॉर्डात अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. रविवारपासून नियमित पाणीपुरवठा होण्याची शक्यात आहे.

डी. वाय. पाटील कॉलेज रिंगरोड येथील मुख्य जलवाहिनीची गळती काढण्यासाठी शुक्रवारपासून ए, बी व ई वॉर्डातील पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारी मध्यरात्री गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी सातपासून पाणीपुरवठ्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी सकाळच्या सत्रात येणाऱ्या अनेक भागात पाणीपुरवठा होऊ न शकल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. कळंबा फिल्टर हाऊस येथून दहा व कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून १२ टँकरच्या फेऱ्या झाल्या. विशेषता 'ई' वॉर्डात अपुरा पाणीपुरवठा झाला. परिणामी सदर बझार, मेरी वेदर, मराठा बोर्डिंग हाऊस, एनसीसी कँप, टाकाळा, शिवाजी पार्क, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, मोहिते पार्क व जवाहरनगर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. तर कळंबा फिल्टर हाऊस येथून राजेंद्रनगर, वेताळमाळ परिसर, संभाजीनगर, नाळे कॉलनी व फिरंगाई हॉस्पिटल येथे टँकरने पाणीपुरवठा केला. रविवारपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे शहर पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित शिक्षकांचे जेलभरो आंदोलन

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारचा धिक्कार असो, कायम विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजला तत्काळ १०० टक्के अनुदान मिळावे, शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सर्किट हाउस परिसरात जेलभरो आंदोलन केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षकांची उपेक्षा करू नये, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली. कृती समितीचे राज्याध्यक्ष तानाजी नाईक, राज्य सचिव चंद्रकांत बागणे, विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. याप्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीकाही करण्यात आली. आंदोलनात बी. एस. बरगे, एस. व्ही. पारळे, जयसिंग जाधव, विलास साठे, शेखर देसाई, व्ही. व्ही. म्हस्के, एन. बी. मुल्ला आदींनी सहभाग घेतला.

०००००

गवंडी, सलून काम करण्याची वेळ

विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक विनावेतन काम करत आहेत. पंधरा-वीस वर्षे नोकरी करूनही शिक्षकांना न्याय मिळाला नाही. कुटुंबांचा गाडा ओढण्यासाठी हुपरी येथील विलास साठे गवंडीकाम करत आहेत. शिराळा येथील सुनील काशीद सलून काम करत आहे. शालेय वेळेत शिक्षक आणि शाळा सुटल्यानंतर लहानसहान कामे करुन कुटुंबांचा गाडा ओढत आहेत. राज्यातील ३१०० शाळांमधील २२५०० शिक्षकांना 'विना अनुदानित'चा फटका बसला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ७००० शिक्षकांची परवड सुरू आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाखावर भाविकांनी घेतले दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी शनिवारी दोन लाखावर भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. ललिता पंचमीनिमित्त अंबाबाईची गजारुढ रुपातील जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने मुंबई, पुण्यासह परराज्यातील भाविकांनी दर्शन घेतले. चारचाकी वाहनांची गर्दी वाढल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

हत्तीवर अंबारीत बसून अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीस जात असल्याचे दर्शविणारी पूजा शनिवारी बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक सारंग मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. सकाळी साडेदहा वाजता आणि सायंकाळी साडेसहा वाजता महिलांची दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत पोचली होती. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पूर्व दरवाजातून ४१ हजार ४८३ महिला तर २७ हजार १५८, पश्चिमेकडील महाद्वारात ४२ हजार २१, दक्षिण दरवाजात ४९ हजार ३३१, तर उत्तरेकडील घाटी दरवाजातून ३७ हजार ४६१ भाविकांची नोंद झाली आहे. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा झाला. पाच शिखराच्या स्वरुपात फुलांनी पालखी सजवण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांनी मारला तीनशे कोटींवर डल्ला

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा गैरफायदा घेत जिल्ह्यातील डॉक्टरांनी पाच वर्षांत तब्बल ३०० कोटींवर डल्ला मारला. शस्त्रक्रिया व उपचाराचा प्रत्यक्ष खर्च कमी असताना जादा खर्चाची कागदपत्रे रंगवून डॉक्टरांनी केलेली ही लूट सरकारी अधिकाऱ्यांच्या छाप्यामुळे पुढे आली. सरकारी निधीबरोबरच रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही या योजनेत प्रचंड लूट होत आहे. यासाठी अनेक ठिकाणी एजंट कार्यरत झाले आहेत. काहींच्या साखळीने होत असलेल्या या प्रकारामुळे वैद्यकीय व्यवसाय बदनाम होत असला तरी डॉक्टर मात्र मालामाल होत आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुरुवात २०१३ मध्ये झाली. पाच वर्षांत जिल्ह्यात एक लाख २१ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियांसह विविध उपचारासाठी सरकारने हॉस्पिटलना ३०६ कोटी रुपये मंजूर केले. जिल्ह्यातील ३४ हॉस्पिटलना हा निधी मिळाला. या योजनेच्या रकमेवर डल्ला मारण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात साखळीच तयार झाली आहे. रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला की डॉक्टर, योजनेचे प्रमुख, कर्मचारी ते एजंटापर्यंत असणारी ही साखळी कार्यरत होते. या योजनेंतर्गत दोन लाख, तर आयुष्यमान योजनेत पाच लाख रुपये निधी देण्याची तरतूद आहे. उपचाराचा खर्च कितीही असला तरी योजनेची संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी सर्वांच्या संगनमताने कागदपत्रे रंगवली जातात. याशिवाय हे नियमात बसत नाही, ते नियमात बसत नाही असे सांगून नातेवाइकांकडून वरकमाई केली जाते. यावरच दवाखान्याचा खर्च भागवला जातो.

सरकारी रकमेवर सगळे मिळून डल्ला मारतात. यावरून जिल्ह्यात ३०६ कोटींची डॉक्टरांनी लूट केल्याचे पुढे आले आहे. अनेकदा याबाबत तक्रार करूनही संगनमतामुळे त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे लुटीचा आकडा वाढत गेला. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पथकाने टाकलेल्या छाप्यामुळे हा सामूहिक दरोडा पुढे आला आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या दुकानांतूनच औषध खरेदीची सक्ती, भरमसाठ औषधांचा मारा व अनावश्यक वैद्यकीय तपासण्या करायला लावून होणारी लूट वेगळीच आहे. या लुटीत पॅथॉलॉजिस्ट, काही कर्मचारीसुद्धा सहभागी झाले आहेत. यामुळे मृत्यू परवडला, पण दवाखाना नको असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.

००००

चौकट

अशी होते लुबाडणूक ...

अनावश्यक औषधे, तपासण्यांची सक्ती

फार्मासिस्ट व डॉक्टरांची मिलिभगत

खर्च वाढवून रंगवली जातात कागदपत्रे

डॉक्टर व पॅथॉलॉजिस्ट यांची साखळी

वापर किरकोळ साधनांचा, दर मात्र चांगल्या उपकरणांचा

००००

बहुतेक सर्वच मोठ्या हॉस्पिटलनी औषधांची दुकाने थाटली आहेत. लिहून न देता आपल्याच दुकानातील औषधे घेण्याची सक्ती केली जाते. अनावश्यक व भरमसाठ औषधे खरेदी करायला लावून नातेवाइकांना लुटले जाते. डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांची ही मिलिभगत रुग्णांना त्रासदायक होत आहे.

उपमहापौर महेश सावंत, औषध दुकानदार

००००

सरकारच्या निधीबरोबरच हे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांच्या खिशावरही डल्ला मारत आहेत. काही औषधे व वैद्यकीय साहित्य या योजनेत समाविष्ट नाही असे खोटे सांगून त्यांच्याकडून जादा पैसे उकळत डॉक्टरांची दुहेरी लूट सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य रुग्णांची ससेहोलपट होत आहे.

राजेश क्षीरसागर, आमदार

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा हॉस्पिटलवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील १० हॉस्पिटल वगळण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली. या योजनेतून मोफत उपचार देण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील ३४ हॉस्पिटलवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले होते. पैकी १० बड्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैसे उकळल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाने कारवाई केली. हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईचे सामान्य जनतेतून स्वागत होत आहे. सोमवारी (ता.१५) हॉस्पिटलची नावे जाहीर होण्याचे संकेत आहेत.

महात्मा फुले आरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडे कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी ऑनलाईन व पत्राच्या माध्यमातून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या विभागाने गेले महिनाभर सर्व जिल्ह्यांत महात्मा फुले आरोग्य योजना राबवणाऱ्या हॉस्पिटलची तपासणी सुरु केली. शुक्रवारी (ता.१२) विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी २० डॉक्टरांच्या पथकासह जिल्ह्यातील ३४ हॉस्पिटलवर छापे टाकले. तेथील गैरव्यवहार व अनियमिततेची माहिती घ्यायला सुरुवात केली. शुक्रवारी सायंकाळी डॉ. शिंदे यांना अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा घेणाऱ्या रुग्णांकडून जादा रक्कम उकळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या हॉस्पिटलला योजनेतून तत्काळ निलंबित केले.

शनिवारीही हॉस्पिटलची तपासणी सुरू होती. पथकाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. रुग्णांना शस्त्रक्रियेच्या बऱ्याच आधी दाखल करणे आणि वेळाने डिस्चार्ज दिल्याच्या बाबी निदर्शनास आल्या. औषधोपचाराने रुग्ण बरा होता असताना काही रुग्णांवर अनावश्यक शस्त्रक्रिया केल्याची गंभीर बाबही उघड झाली. औषधासाठी अव्वा ते सव्वा दर आकारुन रुग्णांकडून रक्कम वसूल केल्याची प्रकरणे उघडकीस आली. राजारामपुरी, कदमवाडी तसेच राष्ट्रीय महामार्गावरील हॉस्पिटलमध्येही कसून तपासणी करण्यात आली. दहा हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून लुबाडणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर या हॉस्पिटलना महात्मा फुले आरोग्य योजनेतून वगळण्यात आले. वगळलेल्या या हॉस्पिटलची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

.. .. ..

कोट्यवधी लाटले...

महात्मा फुले आरोग्य योजनेतून गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील एक लाख २१ हजार १०८ रुग्णांवर उपचार झाले आहेत. आजअखेर उपचारापोटी ३०५ कोटी ९५ लाख ३० हजार रुपये हॉस्पिटलना देण्यात आले आहेत. यावर्षी सप्टेंबरअखेर उपचारापोटी ६९ कोटी ८२ लाख रुपये बिल देण्यात आले आहे. यातील काही रक्कम अशाच पद्धतीने लुटली असल्याची शक्यता आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांच्या कार्यालयावरउद्या श्रमिक महासंघाचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने कामगार विमा योजना (ईएसआयएस) राज्यातील २० जिल्ह्यांना लागू केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश असून, याद्वारे कामगारांकडून प्रतिमहा वर्गणी जमा केली जाते, पण औषधोपचार मिळत नाहीत. याच्या निषेधार्थ राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका परिसरातील कार्यालयावर सोमवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला विक्रमनगर येथून सुरुवात होईल, अशी माहिती अध्यक्ष अतुल दिघे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

दिघे म्हणाले, 'शहरात शंभर बेडचे ईएसआय हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून कामगारांवर उपचार करण्यासाठी दरवर्षी एक टक्का निधी त्यांच्या वेतनामधून कपात होत होता. सध्या १.७५ टक्के कपात होत असताना वैद्यकीय सुविधा मात्र मिळत नाहीत. जिल्ह्यातील कामगारांकडून तब्बल २०० कोटी रुपये वसूल होत असतात, पण सुविधा मात्र कोणत्याच दिल्या जात नाहीत. वैद्यकीय सुविधा देत नसताना स्टाफ आणि उपचारांची कोणतीही सुविधा नसताना दुरुस्तीवर तीनवेळा खर्च करुन निधीची उधळपट्टी सुरू आहे.' पत्रकार बैठकीस प्रकाश कांबरे, सुरेश पाटील, सुनील बारवाडे, धोंडिबा कुंभार, अनंत कुलकर्णी, गोपाल पाटील, संजय अवघडे, संजय जगताप आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललिता पंचमी सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी शनिवारी टेंबलाई टेकडीवर भाविकांच्या अलोट गर्दीत ललिता पंचमी सोहळा उत्साहात झाला. अंबाबाईची उत्सवमूर्ती व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यानंतर कोल्हासुर दैत्याचा प्रतीकात्मक वध करताना कुमारिकेने कोहळा फोडण्याचा विधी केला. यावेळी खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे या राजघराण्यातील सदस्यसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

दरम्यान, कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांमध्ये तुंबळ रस्सीखेच पाहायला मिळाली. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. रात्री उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

त्र्यंबोली देवीच्या ललिता पंचमी सोहळ्यासाठी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. प्रदीप गुरव, शिवदीप गुरव, युवराज गुरव, नंदू गुरव, संजय गुरव, सागर गुरव यांनी देवीची पूजा बांधली. भाविकांसाठी बुधवारी रात्री अकरापासून केएमटी बसेसची सोय केली होती. शनिवारी सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू होती.

ललिता पंचमीनिमित्त शनिवारी सकाळी दहा वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरातून देवीच्या पालखीने टेंबलाई टेकडीकडे प्रस्थान केले. त्याचबरोबर भवानीदेवी आणि गुरू महाराज वाड्यातील पालख्या निघाल्या. जागोजागी फुलांच्या रांगोळ्यांनी अंबाबाई पालखीचे स्वागत झाले. बागल चौकात राजर्षी शाहू मिल आणि टाकाळा येथील अनुकामिनी मंदिराजवळ पालखीने काही काळ विसावा घेतला.

दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबाबाई पालखीचे टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसरात स्वागत झाले. यावेळी भाविकांनी अंबाबाईचा जयघोष केला. अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची त्र्यंबोली देवीच्या पालखीची भेट घडवली. दरम्यान राजघराण्यातील युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजेंचे टेकडीवर आगमन झाले. देवस्थानच्या वतीने त्यांना मानाचे विडे देण्यात आले. मंदिरासमोर मानाचा शेंदूर लावलेला पाषाण आणि कोहळा घोंगड्यावर ठेवला होता. देवीच्या आरतीनंतर राजघराण्यातील सदस्यांनी कोहळ्याचे पूजन केले. त्यानंतर मंगळवार पेठ गुरव गल्लीतील आर्या विक्रम गुरवने त्रिशुळाने कोहळा फोडला. कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांत रस्सीखेच झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. टेंबलाई टेकडीवर जत्रा भरली होती. मंदिरावर आकर्षक रोषणाईबरोबरच लहान मुलांसाठी खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटले होते. रविवारपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे.

००००

हुल्लडबाजांवर पोलिसांचा लाठीमार

पोलिसांनी कोहळा फोडण्याच्या विधीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांनी कडे केले होते. फोडलेल्या कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी पोलिस व कार्यकर्त्यांत रस्सीखेच झाली. विक्रमनगरातील एका मंडळाच्या कार्यकर्त्याला कोहळ्याचा मोठा भाग मिळाला. तो घेण्यासाठी परिसरातील मंडळाचे कार्यकर्त्यांत झोंबाझोंबी सुरू झाली. यावेळी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औंदुबर पाटील यांनी थेट लाठीमार केल्याने कार्यकर्त्यांत पळापळ सुरू झाली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयांचा गोरखधंदा

$
0
0

सचिन पाटील, कोल्हापूर :

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना उपचाराची नवसंजीवनी मिळावी यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे सुरक्षा कवच दिले. युती सरकारच्या काळात त्याचे महात्मा फुले जन आरोग्य अभियान असे त्याचे नामकरण झाले. सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेचा गैरफायदा खासगी रुग्णालयांनी उठवला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पैसे घेऊन उपचार केल्याबद्दल जिल्ह्यातील एकूण ३४ रुग्णालयांची तपासणी करण्यात आल्याने या योजनेमागील आर्थिक लुटीची वस्तुस्थिती समोर आली आहे.

चाचण्यांच्या शुल्कावर डल्ला

रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बसविण्यासाठी विविध तपासण्या सुचवल्या जातात. काही तपासण्या मुद्दाम बाहेर करायला सांगितल्या जातात. त्याचे भरमसाठ शुल्क आकारले जाते. तपासणीत आजाराचे निदान झाल्यास त्या रुग्णाची नोंद रीतसर योजनेत केली जाते. अनेक रुग्णालयांकडून एकाच छताखाली मेडिकल, तपासण्या, आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामागे पैसे बाहेर जाऊ नयेत हा उद्देश असल्याची चर्चा आहे. तसेच प्रत्येक तपासणीचे कमिशन मिळत असल्याने हॉस्पिटल आणि लॅबोरेटरीधारकांचे उखळ पांढरे होते. नियमानुसार रुग्णाने तपासणीवर झालेल्या खर्चाचा दावा केल्यास त्याला रुग्णालयाकडून पैसे मिळतात. अनेकदा याबाबत कोणतीच कल्पना रुग्णाला तसेच नातेवाइकांना दिली जात नाही.

योजनेत असाल तर अधिक काळजी

विविध तपासण्या झाल्यानंतर रुग्णाचा आजार महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत येत असेल तर रुग्णाला व्हीआयपी वागणूक दिली जाते. यामागे रुग्ण हातातून जाऊ नये याची काळजी घेतली जाते. तसेच ज्या डॉक्टरांकडून पेशंट पाठविण्यात आला, त्याला कमिशन स्वरूपात खारीचा वाटा देण्यात येतो. काहीवेळा रुग्णाने आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगताच काळजी करू नका, योजनेत बसवू, असे सांगितले जाते. यासाठी रेशनकार्ड कोणत्या रंगाचे आहे असे आवर्जून विचारले जाते. योजनेतील रुग्णाला महागड्या सेवा पुरवल्या जातात. यामध्ये एसी, डिलक्स असे प्रकार पडतात.

लाभार्थ्यांकडूनच पैशाची मागणी

रुग्ण दारिद्र्यरेषेखाली असला तरी त्याला अँजिओग्राफीसाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले जाते. त्याशिवाय तपासणीच होत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गरीब रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हृदयरोगाच्या रुग्णांत वाढ झाल्याने तो रोग आता गरिबांच्या घरातही दिसू लागला आहे. त्यामुळे योजना येऊनही उपचाराचे जास्त संकट बीपीएलधारकांना वाटत आहे. काही ठिकाणी अँजिओग्राफीत दोषी आढळल्यानंतर पुढील शस्त्रक्रिया केल्यावर रुग्णाला अँजिओग्राफीसाठी आकारलेले शुल्क परत दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. बीपीएलच्या रुग्णांवर नि:शुल्क उपचाराचे आदेश असतानाही पैसे उकळण्याचा गोरख धंदा सर्रास चालतो.

शस्त्रक्रियेची घाई

रुग्णाच्या प्राथमिक तपासणीनंतर त्याला आजाराबाबत कल्पना दिली जाते. हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांना अनेकदा तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले जाते. आजच्या आज शस्त्रक्रिया झाली नाहीतर रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याची भीती नातेवाइकांना घातली जाते. त्यामुळे तणावात येऊन नातेवाईक शस्त्रक्रियेला परवानगी देतात. इतर कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला न घेता शस्त्रक्रियेसाठी घाई केली जाते. 'काहीवेळा शस्त्रक्रियेची कितपत आवश्यकता आहे हे गांभीर्याने तपासले जात नाही. काही आजार औषधोपचाराने बरे होणारे असतात,' असे नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरांनी सांगितले.

'आयुष्यमान भारत'चे काय होणार?

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पैसे घेऊन उपचार केल्याचे आरोप झाल्याने सरकारची महत्त्वाकांक्षी असलेल्या आयुष्यमान भारत योजनेचे काय होणार, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दहा कोटी कुटुंबांतील ५० कोटी लोकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य सुरक्षा कवच मिळणार आहे. यासाठी सरकार वर्षाला पाच हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेत अॅडमिट होण्याच्या आधीचा आणि नंतरचा झालेला खर्चही अंतर्भूत करण्यात आला आहे. यात मेडिकल तपासणी, शस्त्रक्रिया याचा समावेश आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांची वस्तुस्थिती समोर येत असल्याने 'आयुष्यमान भारत'चे भविष्य काय असणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तक्रारीसाठी पुढे यावे

महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत काही अडचण जाणवल्यास तक्रारीसाठी रुग्णांच्या नातेवाइकानी पुढे येणे गरजेचे आहे. याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करता येते. तक्रारीसाठी ८००२३३२२०० व १५५३८८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. कलाम यांचा जन्मदिन 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा

$
0
0

कोल्हापूर:

पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस यंदापासून 'वृत्तपत्र विक्रेता दिन'म्हणून साजरा होत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा आमच्या कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत. वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

कोल्हापुरात जवळपास ४८० वृत्तपत्र विक्रेते आहेत. जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या १३०० हून अधिक आहे. इमानेइतबारे व्यवसाय करणारा ह घटक तसा उपेक्षित राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. काही जणांची तिसरी, दुसरी पिढी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात आहेत. वडील, मुलगा आणि नातवंडे असे तीन पिढ्या व्यवसायात आहेत. पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसराीतल सुरेश रामचंद्र ब्रम्हपुरे हे १९७४ पासून वर्तमानपत्र वितरीत करत आहेत. या क्षेत्रातील हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. ब्रह्मपुरे हे चार दशकाहून अधिक काळ या व्यवसायात आहेत. त्यांचा मुलगाही क्षेत्रात आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या

- विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी

- पेन्शन योजना लागू करावी

- एसटी महामंडळाचा पास मिळावा

- प्रत्येक जिल्ह्यात भवन बांधण्यासाठी जागा

- सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपघात विमा उतरविला पाहिजे

वृत्तपत्र विक्रेता हा घटक दुर्लक्षित आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. काहीजण वृत्तपत्र विक्रेत्यांचा 'एकेरी'उल्लेख करतात. तर काहीजण आदरही करतात. प्रामाणिकपणाने काम करणारा हा वर्ग आहे. या घटकाकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी.

- किरण व्हनगुत्ते, अध्यक्ष जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटना

वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती हा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस हा 'वृत्तपत्र विक्रेता दिन'म्हणून साजरा होतो. हा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सन्मानाचा दिवस आहे. त्यांनाही समाजात सन्मान लाभावा अशी अपेक्षा आहे.

- शंकर चेचर, संघटक कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधे, अनावश्यक चाचण्यांतून लूट

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविल्या जाणाऱ्या विविध हॉस्पिटलमधून रुग्णांची होत असलेली पिळवणूक कारवाईचा बडगा उगारल्यानंतर समाजासमोर आली. सेवाक्षेत्र समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय व्यवसायात आर्थिक फायदा मिळवण्याचे अनेक अजब प्रकार असून औषधे, चाचण्या आणि वैद्यकीय साहित्यातून दोनशे टक्क्यांहून अधिक नफा मिळवला जात असल्याचा आरोप हॉस्पिटल आणि औषध विक्रेत्यांवर होत आहे.

सरकारी योजना असोत वा इतर कोणतीही सेवा देताना हॉस्पिटलकडून रुग्णाची होणारी 'व्हाइट कॉलर लूट' चिंताजनक आहे. एखादा रुग्ण बड्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर विविध प्रकारच्या चाचण्या केल्याशिवाय प्रत्यक्ष उपचाराला सुरुवातच केली जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लॅबोरेटरी, मेडिकल, आदी सुविधांची सोय एकाच छताखाली केलेली आहे. विविध तपासण्यांसाठी तर पैसे आधीच भरून घेतले जातात. विशेषकरून हृदयरुग्णांना अँजिओग्राफी चाचणीत असा अनुभव येतो. हॉस्पिटलकडून आकारलेल्या शुल्काचा परतावा रुग्णाला दिला जात नाही. त्याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांना कोणतीच माहिती दिली जात नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या औषधांच्या विक्रीवर कोणाचेही नियंत्रण नसते. औषधे बाहेरून आणली तर चालतील का? असे रुग्णाच्या नातेवाइकांनी विचारले तर त्याचा काही अपाय झाल्यास आम्ही जबाबदार नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात असल्याचे नातेवाईक सांगतात. आजाराचे निदान होण्यासाठी विविध तपासण्यांचा धडाका लावला जातो. हॉस्पिटलची लॅबोरेटरी नसल्यास टक्केवारी आकारून बाहेरून चाचण्या करून घेतल्या जात असल्याचे एका लॅबोरेटरीधारकाने सांगितले.

०००

नफेखोरीला चाप लावण्याची गरज

अनेकदा औषध कंपन्या, हॉस्पिटल आणि विक्रेते अधिक नफा मिळवत असल्याचा आरोप संबंधित यंत्रणा धुडकावून लावतात. औषध तसेच इतर वैद्यकीय साधनांची खरेदी किंमत कमी असते. तसेच घाऊक खरेदी केल्यामुळे विक्रेत्याला जास्त डिस्काउंट मिळतो. मोठ्या आजारांवरील औषधात तर नफ्याचे प्रमाण अधिक असते. विक्री करताना रुग्णाला इंजेक्शन, औषधे, सर्जिकल साहित्य एमआरपी दराने विकले जाते. त्यामुळे विक्री किमतीवर कोणताही आक्षेप घेता येत नाही. त्याचा फायदा उचलून अनेकपट नफा मिळवला जातो. काहीवेळा एमआरपीत काहीशी सूट देऊन रुग्णाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण अवाजवी मिळणारा नफा विचारात घेता मिळणारी सवलत अल्पप्रमाणात असते. नेमका किती नफा मिळवायचा याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने पिळवणूक सुरूच राहते. त्यामुळे राष्ट्रीय औषधे किंमत नियंत्रण प्राधिकरणाने याबाबत लक्ष घालून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

०००

औषध कंपन्यांची आमिषे

डॉक्टरांनी आपल्याच कंपनीची औषधे घ्यावीत व रुग्णांना सुचवावीत यासाठी औषध कंपन्यांकडून मोठी आमिषे दाखवली जातात. यामध्ये कंपनीकडून परदेशवारी, महागडे गिफ्ट अशा काही वस्तू पुरवल्या जातात. यामधून मिळणारे प्रॉफिट मार्जिन अधिक असल्याने ठराविक कंपन्यांच्या औषधांचा मारा रुग्णांवर केला जातो. शहरातील काही डॉक्टर स्वत:ची निर्मिती असलेल्या पावडर रुग्णांच्या गळ्यात मारत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक प्रकरणातील दुसऱ्या संशयिताला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

महिपाळगड (ता. चंदगड) येथील सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पसार झालेला दुसरा संशयित आरोपी अजित प्रभाकर पाटील (रा. इंदरलोड, ता. खानापूर, जि. बेळगाव) याला चंदगड पोलिसांनी शनिवारी सापळा रचून अटक केली. रविवारी त्याला गडहिंग्लज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य संशयित संदीप सावंत हा देखील पोलिसांच्या ताब्यात असून तोही पोलिस कोठडीत आहे.

लैंगिक अत्याचाराबाबत संतराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संदीप सावंत व अजित पाटील या दोघांची नावे होती. त्यानुसार पोलिसांनी सावंतला अटक केली. तक्रारीनंतर अजित पाटील हा २४ दिवस फरारी होती. अखेर शनिवारी सायंकाळी शिनोळी-देवरवाडी रोडवर शिनोळी एमआयडीसीजवळ त्याला पोलिसांनी पकडले. रविवारी त्याला गडहिंग्लज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूजा साहित्य खरेदी विक्रीत मोठी उलाढाल

$
0
0

पूजा साहित्य खरेदी विक्रीत मोठी उलाढाल

कोल्हापूर टाइम्स टीम

नवरात्र उत्सवात पूजा साहित्य खरेदी विक्रीत मोठी उलाढाल होत आहेत. झेंडूच्या फुलापासून, नारळ, उदबत्ती, कापूर, नाडापुडी, खाऊच्या पानांना मोठी मागणी आहे. अंबाबाई मंदिरासह नवदुर्गा मंदिराच्या आवारात पूजा साहित्य विक्रीची दुकाने उभारली आहेत.

जिल्ह्यातील सर्व मंदिरे नवरात्र उत्सवानिमित्त विद्युत रोषणाईने झळकली आहेत. तसेच घरोघरी देवघरात घटांची प्रतिष्ठापना केली आहे. रोज देवाची पूजाअर्चा, आरती हे धार्मिक कार्यक्रम सुरू असून देवदर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. नवरात्रोत्सवात तेल घालण्यासाठी येणारे भाविक उदबत्ती, कापूर खरेदी करत असल्याने मंदिरांबाहेर हे स्टॉल लागले आहेत. खास नवरात्रोत्सवानिमित्त नाडापुडी, उदबत्तीचे झाड याला मोठी मागणी आहे. पाच ते दहा रुपयाला नाडा पुडीची विक्री केली जात आहे. नाडापुडीमध्ये उदबत्ती, लाल पिवळ्या धागांनी बांधून हळदी कुंकवाच्या पुड्या मिळतात. लाल पिवळा धागा हा समई अथवा दिव्यांना बांधल्या जातो. मंदिरातील समईला खाद्य तेल घालून वात कायम प्रज्वलित ठेवली जात आहे. कुलदैवत आणि मंदिरात भाविकांकडून मंदिरे, देवालयातील दिवे व समयांना तेल अर्पण केले जात आहे. उत्सव काळात नारळ फोडला जात नसल्याने मंदिराला नारळ अर्पण केला जातो. त्यामुळे नारळ विक्रीत मोठी उलाढाल सुरु आहेत. १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत नारळाची विक्री सुरु आहे. तसेच मंदिरात काही भाविकांकडून विडा अर्पण केला जात असल्याने खाऊच्या पानांना मोठी मागणी आहे. १० रुपयाला ५० खाऊची पाने अशी विक्री सुरू आहे. कपिलतीर्थ मार्केटसह पानलाइन येथे खाऊच्या पानाची विक्री सुरू आहे.

नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना झाली असून घरोघरी घटाला रोज झेंडूंच्या फुलांची माळ बांधली जाते. सध्या ४० ते ६० रुपये प्रतिकिलो झेंडू फुलांची विक्री सुरू आहे. मंदिराच्या आवारात पूजा साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. अंबाबाई मंदिर, भवानी मंडपातील तुळजा भवानी मंदिरासह शहरातील नवदुर्गा मंदिराबाहेर पूजा साहित्य विक्रीत मोठी उलाढाल होत आहे. नवरात्रात देवीची ओटी भरली जाते. ओटीची किंमत ४० रुपयांपासून २०० रुपये इतकी आहे. साडीच्या दर्जा व किंमतीवरून ओटीचा कमी जास्त दर ठरत असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण...मटा भूमिका

$
0
0

विश्वास संपादन करण्याची गरज

हद्दवाढीला पर्याय म्हणून 'प्राधिकरण'स्थापण्याची घोषणा झाली. हद्दवाढीअभावी शहराच्या विस्तार आणि विकासावर मर्यादा आल्या आहेत. नोकरी, उद्योग, व्यवसाय, शिक्षणासाठी कोल्हापुरात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरावर नागरिकीकरणाचा ताण पडत आहे. कोल्हापूर शहरासह आसपासच्या गावांच्या नियोजनबद्ध विकास, शहराच्या धर्तीवर ग्रामाीण भागात सुविधा असा व्यापक उद्देश प्राधिकरण स्थापन्यामागे आहे. राज्य सरकारने, प्राधिकरणच्या माध्यमातून नागरी विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नांच आवश्यकता आहे. पायाभूत सुविधांची उपलब्धता, मोठ्या प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास प्राधिकरणला होणारा विरोध मावळेल. स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांच्या अधिकारावर गडांतर येणार नाही या पद्धतीने कामकाज करत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्रदानात अंधश्रद्धेचा अडसर

$
0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : नेत्रदान हे जगातील सर्वोत्तम दानांपैकी एक समजले जाते. मात्र, समाजाच्या दृष्टीवर अंधश्रद्धांचे झापड आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्रदान चळवळीला ब्रेक लागला आहे. सीपीआरमध्ये गेल्या तीन वर्षात केवळ २९४ दात्यांनी नेत्रदान केले असून ११६ लोकांवर बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

अवयवदानाच्या माध्यमातून आपण नेत्ररूपी जिवंत राहू शकतो ही भावना रुजवण्यात जिल्ह्यातील नेत्रदान चळवळीला फारसे यश आले नाही. नेत्रदानाला सर्वात मोठा अडसर अंधश्रद्धेचा ठरत आहे. जन्म- मृत्यू, मोक्ष याचा जनमानसावर असलेला पगडा अवयवदानात आडकाठी ठरत आहे. त्याबरोबर अज्ञान, आळस, सामाजिक जाणिवांची कमतरता यामुळे दृष्टिदान करण्यात पुढाकार घेतला जात नाही. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि नेत्रदात्यांचे कुटुंबीय यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने नेत्रदान इच्छापत्र भरूनही काहीवेळा नेत्रदानात यश येत नाही.

जगभरात नेत्रदानात श्रीलंका देश आघाडीवर आहे. भारतासह तब्बल २५ देशांना श्रीलंकेतील नेत्रपेढीतून नेत्र पुरवठा केला जातो. श्रीलंकेत नेत्रदानावर १०० टक्के भर दिला जातो. तेथून दरवर्षी भारताला अंदाजे १० हजार नेत्रपुरवठा केला जातो. अवयवदानाबाबत कोल्हापुरात जनजागृती वाढत आहे. तरीही त्याची व्यापकता वाढवण्यासाठी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. तसेच अवयवदानाचे संमतीपत्र भरूनही अनेकदा दाता मृत झाल्यास नेत्रपेढीशी त्याचा संपर्क होत नाही. यासाठी नेत्रदान करणाऱ्याने त्याबाबत पुरेशी कल्पना कुटुंबियांना देणे गरजेचे आहे. नेत्रपेढी, दाता आणि कुटुंबीय यांच्यात समन्वय झाल्यास दृष्टिदान चळवळ अधिक व्यापक करता येईल.

काय आहेत अडथळे

नेत्रदानाबाबत समाजात अनेक गैरसमजुती आहेत. यात नेत्रदान केल्यास पुनर्जन्म मिळणार नाही, मोक्ष तसेच स्वर्गात जागा मिळणार नाही अशा समजुती अधिक आहेत. तसेच मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप दिसेल अशी भीती नातेवाईकांत असते. पुढच्या जन्मात त्याला दृष्टी न मिळता तो कायमचा अंध राहील अशी अंधश्रद्धा आहे.

कोट

नेत्रदानाबाबत मनात कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. तो एक वैज्ञानिक पुनर्जन्म असतो. अनेकजण दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापुरात बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढे यायला पाहिजे. त्यामुळे नेत्ररुपी आपण मृत्यूपश्चात जिवंत राहू ही भावना रुजली तर ते फारच महत्त्वाचे ठरेल.

- डॉ. अतुल राऊत, विभागप्रमुख, नेत्र शल्यचिकित्सक सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराव्यावरचाच इतिहास महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बखर कुणी लिहिली त्याचा शोध न लावता त्यामधील संदर्भ आणि सनावळींच्या आधारे लिहिलेला इतिहास खरा नसतो. त्यामुळे गैरसोयीचे, लपवलेले संदर्भ, पुरावे शोधून खरा इतिहास समोर आणणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास छत्रपती संभाजीराजेंसारख्या पराक्रमींच्या बदनामीचे धाडस होणार नाही,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले.

'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी होईल, असे लिखाण लेखिका डॉ. शुभा साठे यांनी शालेय पुस्तकात केले. त्यांच्यावर कारवाई करावी, संभाजीराजेंची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा देण्यासाठी आयोजित शंभूराजे सन्मान परिषदेत ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात परिषद झाली.

डॉ. पाटील म्हणाले, 'काहीजण संस्कृती आणि इतिहासाचे विषारीकरण करीत आहेत. त्यांना चोख उत्तर देण्यासाठी सिद्धांतावर आधारित इतिहासाची मांडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी देशात जाणीवपूर्वक नष्ट केलेले आणि परदेशात उपलब्ध पुरावे शोधून इतिहास लेखन झाले पाहिजे. विदेशातील काही संशोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, औरंगजेबावर पुराव्याच्या आधारे लिखाण केले आहे. याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे.'

इतिहास संशोधक डॉ. इंद्रजित सावंत म्हणाले, 'छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी वारंवार केली जात आहे. सध्याचे सरकार त्यास जाणीवपूर्वक खतपाणी घालत आहे. यामध्ये विशिष्ट जातीतील वर्ग आघाडीवर आहे. आता शालेय पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण करून संभाजीराजेंची बदनामी केली आहे. या पुस्तकाची सरकार जाहीर होळी करीत नाही, तोपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरू ठेवावे लागेल.' डॉ. वसंतराव मोरे म्हणाले, 'संभाजीराजे अतिशय पराक्रमी, लढवय्ये होते. मात्र, त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते. हे थांबायला हवे.' पी. बी. पोवार, डॉ. विलास पोवार यांची भाषणे झाली. बबन रानगे यांनी स्वागत केले. आयोजक वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गणी आजरेकर, दिलीप देसाई, भगवान काटे, छाया पोवार, इंद्रजित माने आदी उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष जाधव यांनी आभार मानले.

०००००

महत्त्वाचे ठराव असे : छत्रपती संभाजीराजेंची बदनामी होईल असे लिखाण करणाऱ्या लेखिका डॉ. शुभा साठे, प्रकाशक, पुस्तकास मंजुरी देणाऱ्या समितीवर कारवाई करावी, संभाजीराजेंचे अधिकृत चरित्र सरकारने प्रकाशित करावे, राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता द्यावी, जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर भव्य स्मारक व्हावे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह लिखाण असलेल्या पुस्तकावर बंदी आणावी.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र विक्रेता दिन

$
0
0

वृत्तपत्र विक्रीचे आम्ही वारकरी

किंवा...

वृत्तपत्रांनी दिले आम्हा बळ

००००

आज १५ ऑक्टोबर, डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. हाच दिवस वृत्तपत्र विक्रेता व्यवसायाचा जन्मदिन म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाचक व वृत्तपत्रांनी आम्हाला बळ दिले, प्रेरणा दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टमय जीवनाचा उत्कर्ष झाला. एका नव्या प्रवाहाचा प्रारंभ झाला. त्यानिमित्त...

०००००

दररोज पहाटे ऊन, वारा, पाऊस, थंडी, आपत्ती-विपत्ती, संप-बंद दिवस कसाही असो आमची जनसेवा भल्या पहाटेपासून सुरू होते. कोणी रस्त्यावर उभा राहून, कोणी स्टँडवर दैनिकांचा पुकारा करीत, कोणी टपरीवर, कोणी फुटपाथवर, तर कोणी वळचणीला, कोणी एखाद्या कोपऱ्यावर वारा खात, ऊन सोसत, बोचरी थंडी अंगावर झेलत वृत्तपत्र विकत असतो. वृत्तपत्र विक्रीतून आमचा तोडका मोडका संसार उभा असतो ग्राहकांच्या उदारतेवर, त्यांच्या विचारावर त्यांच्या वाचन संस्कृतीवर.

आपले काम करण्यासाठी, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी, वाचकांची वाचनाची तहान भागविण्यासाठी आमची पायपीट सुरू असते. या क्षेत्रात वृद्ध, तरुण, मुली आणि विधवासुद्धा आहेत. महाविद्यालयात जाणारा तरुण आहे, अर्धकाळ नोकरी करणारा आहे. पूर्णवेळ नोकरी करणारा आहे. हे सारे पोटासाठी, श्रमाच्या पायावर स्वत:च्या जीवनाचा विकास व्हावा यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे.

उंच उंच इमारतींच्या पायऱ्या चढताना-उतरताना गती मिळते. पुढच्या घरी जाण्यासाठी किमान दोन-तीन तास आमचे पाय ठेचा खात फिरत असतात. कोणी पायी, कोणी सायकलवरून, खूप ग्राहक असतील तर कमी किमतीच्या दुचाकीवरून वृत्तपत्र वाटप करत असतो. वाचकांची वाचनमय भूक भागविणे हेच आमचे कर्तव्य असते.

आम्हाला हा आदर्श दिला तो डॉ. कलाम यांनी. तेसुद्धा वयाच्या आठव्या वर्षापासून घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटत असत. त्यांचा हा वसा आणि वारसा आम्हाला लाभला आहे. त्यांच्या जन्मदिनी वृत्तपत्र विक्री व्यवसायाचा जन्मदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हा छोट्या वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळते, हेच आमचे भाग्य.

वाचक आमचा आधार, आमचा दाता वृत्तपत्रसमूह, आमचा स्रोत आणि अखंड परिश्रम ही आमची जीवनवाहिनी. या मंत्र सामर्थ्याने आम्ही वृत्तपत्र विक्रेते एकसंध समाजसंस्कृतीच्या जडणघडणीला एक वात बनून छोटासा प्रकाश देण्याचा प्रयत्न करू लागलो. या दीपस्तंभातील ज्योतीची प्रेरणा आहे, डॉ. अब्दुल कलाम. त्यांच्या स्मृतींना आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांचे लाख लाख प्रणाम!

- मारुती नवलाई, संचालक, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images