Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सार्वजनिक नळ द्या

$
0
0

लोणार वसाहतीतील नागरिकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजीव गांधी वसाहत व लोणार वसाहत या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक नळ सुरु ठेवावेत, यासाठी गुरुवारी थेट महापालिकेवर धडक मारली. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. दरम्यान, महापालिकेच्या अनधिकृत नळ कनेक्शन शोध पथकाने गुरुवारी ३७ कनेक्शन तोडली. आता या पथकांना पोलिस संरक्षण देण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर विचार सुरु आहे.

महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु केली आहे. सार्वजनिक नळ कनेक्शनही तोडण्यात येत आहेत. उचगावच्या हद्दीलगत असलेल्या लोणार वसाहत व राजीव गांधी वसाहत परिसरात गुरुवारी पथक गेले होते. तिथे वैयक्तिक कनेक्शन नाहीत. पूर्वी असलेले सार्वजनिक नळ काढण्यात आले आहेत. त्यालाच पाइप जोडून पाणी घेतले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ते नळ काढण्यात येणार होते. पथक गेल्यानंतर महिला व स्थानिक नागरिक जमले. जमावाने नळ कनेक्शनसाठी दहा हजार रुपये भरण्याची आर्थिक ताकद नाही. त्यामुळे सार्वजनिक नळ कनेक्शन देण्यात यावीत अशी मागणी केली. पथकाच्या प्रमुखांनी हा अधिकार वरिष्ठांकडे असल्याचे सांगितल्याने तेथील सर्व नागरिक व महिला ट्रकमधून महापालिकेच्या दारात आले. सार्वजनिक नळ कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी जमावाकडून करण्यात आली. यासाठी महापालिकेच्या दारातच ठिय्या मारला. या मागणीबाबत विचार करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

दरम्यान, महापालिकेच्या पथकांनी लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा टॉवर, टिंबर मार्केट, गवत मंडई, गणेश कॉलनी, रावजी मंगल कार्यालय, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस, लक्ष्मीपुरी, बागवान गल्ली, पद्मा टॉकीज परिसरातील ३७ कनेक्शन तोडली. या पथकांना नागरिकांकडून अडथळा होत असल्याने पोलिस संरक्षण देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर आमचाच, युती अभेद्य

$
0
0

महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक कोणत्याही अमिषाला बळी पडून फुटणार नाहीत. यापूर्वी जे गेले ते कावळे होते आणि राहिलेत ते मावळे आहेत. त्यामुळे युती अभेद्यच राहील. महापौर आमचाच होईल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी व्यक्त केला. जिल्हा बँकेत पत्रकारांशी ते बोलत होते. स्थायी समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फुटून भाजपला मतदान केले. भाजपकडे सभापतिपद गेले. हाच पॅटर्न राबवत महापौरपद आपल्याकडे घेण्यासाठी भाजप मोर्चेबांधणी करीत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुश्रीफ म्हणाले, घोडेबाजाराला कंटाळून पक्षीय पातळीवर निवडणूक लढवलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला कोल्हापूरच्या जनतेने कौल दिला. राष्ट्रवादीचे नगरसेवक नाराज नाहीत. त्यांना पैशाची अपेक्षा नाही. त्यामुळे महापौर काँग्रेस, राष्ट्रवादीच आघाडीचाच होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्याचा जीव वाचला

$
0
0

फोटो

.........

हेल्पिंग हॅन्डमुळे मिळाले कर्मचाऱ्याला जीवदान

फिट येऊन निपचित पडलेल्या कर्मचाऱ्याच्या मदतीला धावली यंत्रणा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठका, सुनावणींची धांदल उडाली होती. त्याचवेळी जिल्हा पुरवठा कार्यालयातील कर्मचाऱ्याला चक्कर आली आणि तो कोसळला. तोंडातून रक्ताची धार वाहू लागली. अशा परिस्थितीत जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ताबडतोब यंत्रणा राबवत कर्मचाऱ्याला हॉस्पिलमध्ये दाखल केले. सर्व यंत्रणा धावून आल्याने आणि तातडीने उपचार मिळाल्याने जिल्हा पुरवठा कार्यालयातील शिपाई उमेश भोसले यांच्या जिविताचा धोका टाळण्यात यश आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात इचलकरंजी पाणीप्रश्नी एका व्यक्तीने आत्मदहनाचा इशारा दिल्याने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा पुरवठा कार्यालयात कर्मचारी जेवणासाठी बसले. प्रत्येकांनी डबे उघडण्यास सुरुवात केली. शिपाई उमेश भोसले जेवणाचा डबा उघडत असताना त्यांना फीट आल्याने ते जमिनीवर वेगाने कोसळले. त्यांच्या तोंडातून रक्ताची धार वाहू लागली. ते निपचित पडले होते. फरशीवर पडलेल्या रक्ताच्या थारोळ्यामुळे महिला कर्मचारी किंचाळू लागल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे त्यांच्या कार्यालयात अॅस्टर आधारच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर आयेशा राऊत यांच्यासोबत चर्चा करत होते. कर्मचाऱ्यांचा आवाज ऐकून दोघेही बाहेर आले. भोसले यांच्या तोंडातून रक्त असल्याने महिला कर्मचारी त्यांना पाणी पाजण्यासाठी घेऊन आल्या. पण राऊत यांनी श्वसननालिकेत पाणी अडकण्याचा धोका लक्षात घेऊन पाणी न पाजण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आगवणे यांनी गॅलरीत धाव घेत आत्मदहन रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून बोलावण्यात आलेल्या रुग्णवाहिकेला बोलावून घेतले.

पुरवठा कार्यालयातील कर्मचाऱ्याला अॅटॅक आला अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पसरली. पोलिस कर्मचारीही धावून आले. आधारच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर राऊत यांनी हॉस्पिटलशी संपर्क साधून वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची विनंती केली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी पुरवठा कार्यालयात धाव घेत स्ट्रेचरवरुन भोसले यांना खाली आणले. आगवणे व शिंदे यांनी भोसले यांच्या घरी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देत भोसले यांच्या वैद्यकीय उपचाराची फाईल घेऊन येण्यास सांगितले. हॉस्पिटलकडे जाताना रुग्णवाहिकेतच राऊत यांनी तोंडातील रक्त श्वसन नलिकेत जाऊ नये याची काळजी घेत रक्त तोंडातून बाहेर काढले. हॉस्पिलमध्ये भोसले यांना ताबडतोब आयसीयूमध्ये हलवण्यात आल्यावर डॉ. अजय केणी यांनी उपचार सुरु केले. भोसले यांच्या डोक्याचे ताबडतोब स्कॅनिंग करण्यात आले. फीट आल्याने भोसले यांच्या जीभेचा तुकडा तुटला होता तिथे टाके घालून रक्तप्रवाह थांबवला. भोसले यांचा वाढलेला २१९ रक्तदाब खाली आणण्यात आला. स्कॅनिंगमध्ये मेंदूमध्ये थोडासा रक्तस्त्राव झाला होता हे निदर्शनास आल्यावर उपचार सुरु करण्यात आले. भोसले यांचा जीव वाचवण्यासाठी सर्व यंत्रणा धावून आल्याने व डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा जोरदार तडाखा

$
0
0

कनाननगरात घर कोसळले; शहरात झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुरुवारी सायंकाळी शहरात वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाच्या तडाख्यामुळे कनाननगर येथे एक घर कोसळले तर काही ठिकाणी वाहनांवर झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले. काही घरांची कौले, पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे साकोली कॉर्नर,नागाळा पार्कात झाड कोसळले तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यात तुटून पडल्या. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली तर रात्री उशिरापर्यंत वीज गेल्याने शहर अंधारात होते.

हैराण करणारा उष्म्यानंतर सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने धुळीचे लोट उठले. तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर घरांवरील कौले, पत्रे उडून गेले. सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत विविध भागात पाऊस सुरू होता. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

वाऱ्यामुळे साकोली कॉर्नर येथे मोठे झाड वीजवाहिनीवर कोसळल्याने तारांबळ उडाली. येथील रहिवाशांनी एमएसईबीला कळविल्यानंतर कर्मचारी दाखल झाले. या ठिकाणचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. नागाळा पार्कातील जिल्हा परिषदेजवळील रस्त्यावर झाड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जोरदार पावसामुळे देवकर पाणंद परिसरात रोडवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. लक्ष्मीपुरी चौक, परिख पूल येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शाहू स्टेडियमवर उभा केलेला मंडप उडून गेला. राजारापुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी भागात वीजवाहिनीवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. उमा टॉकिज येथील सिद्धिविनायक मंदिराच्या आवारातील झाडांच्या फांद्या रोडवर पडल्या. येथील एका अपार्टमेंटजवळ झाड कोसळले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांबरोबरच पर्यटक, श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली.


शहर अंधारात

वादळी पावसाने शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजवाहिनीवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ११ आणि ३३ केव्ही वीजवाहिनीवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने शहरात रात्री सहानंतर अनेक भागांत अंधार होता. साकोली कॉर्नर येथे वीजवाहिनीवर झाड पडल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. वीज पुरवठाही तत्काळ बंद करण्यात आला. शाहू मिल ते शाहू मिल सबस्टेशन परिसरात झाड कोसळल्याने वीज पुरवठा तीन ते चार तास बंद राहिला. शिरोली एमआयडीसी मधील रेणुका आणि चिंतामणी या ११ केव्ही वीज वाहिन्यावर बिघाड झाला. चंदूर (ता. हातकणंगले) येथील ३३ केव्हीचे सात वीजेचे खांब वादळी वाऱ्यामुळे वाकल्याने काही खांबावरील वीजवाहिन्या तुटून पडल्या. या परिसरातील वीज पुरवठा सुमारे सहा तास बंद करण्यात आला. अनेक ठिकाणी पर्यायी वीज पुरवठा करण्याची व्यवस्था नसल्याने शहर सायंकाळनंतर अंधारात राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन तहसीलदारांना बढती

$
0
0

तीन तहसीलदारांना बढती

कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तहसीलदार उत्तम दिघे, पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे आणि व विशेष कार्यकारी दंडाधिकारी रामचंद्र उगले यांना उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळाली आहे. राज्यसरकारने आदेश काढला असून ज्येष्ठता क्रमांकानुसार ४८ जणांना बढती दिली आहे. प्रकाश राऊत, रमेश पवार, चंद्रकांत मोहिते, अजित नैराळे, व्ही. एस. देवकर, अनुप खांडे, मोहिणी चव्हाण, सुरेखा माने, नागेश पाटील, भैरप्पा माळी, दीपक शिंदे, इंदिरा चौधरी, राजेश्वर हांडे, वंदना सवरंगपते, विजया यादव, कृष्णकांत चिकुर्ते, गोविंद शिंदे, प्रमोद भामरे, संदीप आहेर, वैशाली परदेशी (ठाकूर), एस.व्ही. उंबरकर, सुशांतकिरण बनसोडे, एम. ए. किरवले, वैशाली माने, आरती सरवदे, प्रसाद मते, आर. के. रजपूत, एस.जी. समर्थ, पी. व्ही. कापसे, संदीप माने, जगदीश काकतकर, पवन चांडक, विश्वास गुजर, सुनील भुताळे आदी तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात कृषी सल्लागार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर सांगली रोडवर अतिग्रेजवळ कार रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झालेल्या कृषी सल्लागाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. कृष्णा भाऊ मिठारी (वय ६८, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. भरधाव रुग्णवाहिकेने रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर उडविल्याने गुरुवारी हा अपघात झाला होता. मिठारी व त्यांचे मित्र सुनील सिसाळे जयसिंगपूरला गेले होते. कोल्हापूरला परतताना रस्त्यावर साचलेले पाणी एका रुग्णवाहिकेने त्यांच्या कारवर उडविले. पुढील रस्ता न दिसल्याने त्यांची कार दुभाजकाला धडकली होती. त्या ते गंभीर जखमी झाले होते. मिठारी गोकुळ शिरगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल क्राइम - ११

$
0
0

कीटकनाशक प्राशनाने मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंबलाई नाका परिसरातील मधुकर किसन कांबळे (वय ५०) यांनी रविवारी (ता. ६) राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. मात्र, शुक्रवारी (ता. ११) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी घसरून तरुण जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जुना जैन धाबा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. शशिकांत राजू कदम (वय २६, रा. वर्षानगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. बुधवारी (ता. ९) रात्री हा अपघात झाला. खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर गुरुवारी रात्री जखमी कदम याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

कोतोलीत दाम्पत्यास मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कोतोली (ता. पन्हाळा) येथे वृद्ध दाम्पत्यास चौघांकडून मारहाण झाली. शुक्रवारी (ता. ११) सकाळी हा प्रकार घडला. दगडू महादेव पाटील (वय ८०) आणि हिराबाई दगडू पाटील (६०) अशी जखमींची नावे आहेत. नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयातात दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

दुचाकीवरून पडून जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भावाच्या दुचाकीवरून जाताना पाठीमागे डोक्यावर पडल्याने बाळासाहेब महादेव पाटील (वय ३५, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) हे जखमी झाले. शुक्रवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास आष्ट्याजवळ हा अपघात झाला. प्रमोद पाटील यांनी जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

नजरचुकीने फिनेल प्राशन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणी समजून नजरचुकीने फिनेल प्राशन केल्याने शुभांगी सदाशिव माळी (वय २६, रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव) ही महिला अत्यवस्थ झाली. उलट्यांचा त्रास सुरू होताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. शुक्रवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन फाउंड्री उद्योगाला चालना द्यायची असेल तर वीस वर्षांवरील जुन्या वाहनांचे स्क्रॅप धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच स्कॅपसाठी वस्तू व सेवा करात सवलत देण्याबरोबरच निर्यातीसाठी आगाऊ परवाना देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या मागण्यांची तत्काळ दखल घेऊन निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी गरजेची आहे, अशी मागणी दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेनचे मानद सचिव, उद्योजक विजय मेनन यांनी पत्रकार परिषदेत केली.

मेनन म्हणाले, 'कोल्हापूर, सांगली, मिरज परिसरात ४७५ फाउंड्री आहेत. कोल्हापूर ही फाउंड्री उद्योगाची जननी आहे. या उद्योगाला भरारी देण्याासाठी सरकारने विविध धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने २० वर्षांवरील जुनी वाहने स्क्रॅप करण्याच्या निर्णय घेतला. स्क्रॅप केलेल्या वाहनधारकांना करात सवलत देण्याची घोषणा केली आहे. देशभरात २५ टक्के वाहने वीस वर्षांवरील आहेत. जेसीबी, ट्रकसह सर्व प्रकारची अवजड वाहने आहेत. जाहीर केलेल्या स्क्रॅप धोरणाची अंमलबजावणी केल्यास फाउंड्री उद्योगाला मोठ्या प्रमाणात कास्टिंग मिळू शकते. त्याचा उपयोग नवीन वाहनांच्या निर्मितीसाठी होऊ शकेल. सीजीएसटी आणि एसजीएसटी १४ ते २८ टक्के आहे. त्या तुलनेत रेल्वेत स्क्रॅपसाठी केवळ पाच टक्के जीएसटी घेतला जातो. ही तफावत दूर करण्याची गरज आहे. नवीन फाउंड्री उद्योग सुरू करण्यासाठी सबसिडी दिली जात होती. मात्र नवीन योजनेत हा फायदा दिला जात नाही. त्यासाठी नवे धोरण जाहीर करण्याची गरज आहे. धोरण जाहीर न केल्यास या उद्योगात आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. निर्यातीसाठी उद्योजकांना आगाऊ परवाना देण्यात यावा. त्याची मुदतही एक वर्षावरून दोन वर्षे करण्याची गरज आहे. कोल्हापूर आणि कोईमतूर या दोन ठिकाणी फाउंड्री उद्योग मोठे आहेत. ऑटोमोबाइल, शेती अवजारांसाठी मोठे योगदान आहे. मात्र उत्पादकांना अन्य राज्यापेक्षा जादा दराने वीज दिली जात आहे. कच्चा मालाची किंमतही वाढली असून ग्राहकांना कडून मुबलक दरात मागणी केली जात असल्याने फाउंड्री उद्योगाची कोंडी झाली आहे. या वेळी द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेनचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सुरेश चौगुले, उपाध्यक्ष सुमीत चौगुले, खजिनदार समीर पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केदारलिंग बेकरीचे मालक खाडे यांचे निधन

$
0
0

फोटो आहे.

राजाराम खाडे यांचे निधन

कोल्हापूर

येथील केदारलिंग बेकरीचे मालक राजाराम दत्तोबा खाडे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ऑल इंडिया बेकर्स असोसिएशनचे सचिव सत्यजित, सुशांत यांचे ते वडील होत. शनिवारी (ता.१२) शिवाजी पेठेतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. रक्षा विसर्जन रविवारी (ता.१३)सकाळी ९ वाजता आहे. राजाराम खाडे लायन्स क्लब व बेकरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. दर रविवारी रंकाळा बसस्थानकासमोर ते २०० लोकांना जेवण देत होते. दोन्ही हात नसलेल्या माऊली नावाच्या मुलीचे त्यांनी पालकत्व स्वीकारले होते. पूरग्रस्तांना मदतीसाठी ते पुढाकार घेत होते. बेकरीत कामावर घेताना अंध, अपंगाना प्राधान्य देणे, गरीब विद्यार्थ्यांना वह्या, ड्रेस देण्यासाख्या सामाजिक कार्यात ते आघाडीवर होते.

-----------------------------------------------------------

फोटो आहे.

सुलोचना घाटगे

कोल्हापूर

येथील एसएससी बोर्डाजवळील म्हाडा कॉलनीतील सुलोचना घाटगे (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

-----------

संदीप पाटील

कोल्हापूर

हळदी (ता. करवीर) येथील संदीप सुरेश पाटील (वय ३६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आजी, आई वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१३) सकाळी ९ वाजता आहे.

...............

प्रमिला पाटील

कोल्हापूर

खाटांगळे (ता. करवीर) येथील प्रमिला पांडुरंग पाटील (वय ६७) यांचे निधन झाले. कमलाकर पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे १४ मे जेलभरो आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी कर्जवसुली मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. सरकारच्या या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी बारा वाजता मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे, ही माहिती माजी आमदार आणि राज्य शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे संयोजक संपतराव पवार-पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे नामदेवराव गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, 'राज्यातील शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे ३८ जिल्ह्यात हुतात्म्यांना अभिवादन आणि शेतकरी जनजागरण यात्रा पूर्ण केली. तरीही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात निकष, अटी, शर्ती लादून कर्जमुक्तीऐवजी कर्ज वसुलीची मोहीम सुरू केली आहे. कर्जमाफीच्या यादीतून शेतकऱ्यांना वगळले आहे. केवळ पीककर्ज कर्जमाफीच्या निकषात आहे. सूक्ष्म कर्ज, बचतगट, मध्यम मुदतकर्ज या कर्जमाफीतून वगळली आहेत. कर्जमाफी हा कायमस्वरुपी शेतकरी आत्महत्येवरचा उपाय नाही. त्यासाठी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, या सूत्राप्रमाणे शेतीमालाचे दर ठरविणे गरजेचे आहे. मात्र या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. सध्याही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. १९९६ पासून राज्यात राज्यात ७५ हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्याचे कोणालाही गांभीर्य नसून शेतकऱ्यांचा कैवार घेणाऱ्यांची संख्येत वाढ झाली आहे. या सर्व मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. आंदोलनात सुमारे दहा हजारांहून अधिक जण सहभागी होतील.' मोर्चापूर्वी इच्छुकांनी महावीर गार्डन जवळ जमावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी केरबा पाटील, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, संतराम पाटील, आनंदराव लांडगे, नामदेव पाटील, चंद्रकांत खाडे, वाय. एन. पाटील, प्रशांत आंबी, आनंदा मोरे, प्रकाश जाधव, सुवर्णा तळेकर, मोहन पाटील, बी. एल. बरगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा योजनेप्रश्नी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या वारणा नळ पाणी योजनेसंबंधी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली असून, सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इचलकरंजी शहरासाठी अमृत योजनेतून मंजूर वारणा नळपाणी पुरवठा योजनेला दानोळीसह वारणाकाठावरील अनेक गावांनी विरोध दर्शविल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. या संदर्भात गुरुवारी नगरपालिकेत झालेल्या बैठकीत खासदार शेट्टी यांनी या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याबाबत बैठक घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष तात्या बालवडकर आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी योजनेसंदर्भात संयुक्त बैठक घेऊन सुवर्णमध्य साधू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

इचलकरंजी नगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी ७० कोटींची वारणा नदी उद्भव धरुन योजना मंजूर केली आहे. या कामाला प्रत्यक्ष सुरवात होत असताना ज्या ठिकाणाहून पाणी उपसा होणार आहे त्या दानोळी गावातून या योजनेसाठी विरोध होऊ लागला आहे. योजनेसाठी पाणी उपसा झाल्यानंतर वारणा काठावरील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कमी पडून भविष्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होईल, या भितीने या योजनेला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा काठावरील ४० हून अधिक गावांनी विरोध केला आहे.

या विरोधानंतर गेल्या आठवड्यात सरकारकडून पोलिस बंदोबस्तात योजना सुरु करण्यात प्रयत्न झाला. मात्र परिसरातील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत काम बंद पाडले. या प्रकारामुळे शहर विरोधात ग्रामीण असा संघर्ष विनाकारण उभा राहत आहे. वास्तविक, पंचगंगा नदी प्रदूषणामुळे इचलकरंजी शहरात पाच वर्षांपूर्वी काविळीमुळे ४० लोकांना प्राण गमवावा लागला होता. शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा असल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अमृत योजनेत मार्ग काढण्यासाठी प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारणा बचाव कृती समिती व इचलकरंजी नगरपालिका प्रतिनिधी व संबंधित लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीत अॅड. घाटगेंची आघाडी

$
0
0

पहिल्या टप्प्यात अॅड. घाटगेंची आघाडी

बार काउन्सिल निवडणुकीचा अंतिम निकाल मेअखेर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिशय चुरशीने लढलेल्या महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात अॅड. विवेक घाटगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन दिवसांत मोजलेल्या २३८० मतांपैकी ८२७ मते घाटगे यांना मिळाली आहेत. उर्वरित ७१५ मतांची मोजणी सोमवारी (ता. १४) होणार आहे. मताधिक्यामुळे घाटगे यांची बार काउन्सिलच्या संचालकपदी वर्णी निश्चित मानली जात आहे.

महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या संचालक मंडळासाठी दोन्ही राज्यात २९ मार्चला मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातून या निवडणुकीसाठी १० उमेदवार रिंगणार उतरले होते. निवडणुकीची मतमोजणी मुंबईत सुरू असून, गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील मतांची मोजणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३०३५ वकिलांपैकी २९९५ वकिलांनी मतदान केले होते. यातील कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल आणि गारगोटी तालुक्यातील २३८० मतांची मोजणी पूर्ण झाली. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतमोजणीत अॅड. विवेक घाटगे यांनी ८२७ मतांसह आघाडी घेतली. अॅड. शिवाजीराव राणे यांना ३७४, संपत पवार यांना १८८ मते मिळाली. उर्वरित उमेदवारांना शंभराच्या आतच मते मिळाली आहेत.

उर्वरित ७१५ मतांची मोजणी सोमवारी होणार आहे. आणखी ३०० मते मिळाल्यास घाटगे यांची निवड निश्चित मानली जाते. ११०० हून अधिक मते मिळाल्यास प्राधान्य क्रमाने मिळणाऱ्या मतांनुसार घाटगे यांना संचालकपदी संधी दिली जाते. मे महिन्याच्या अखेरीस मुंबईत बार काउन्सिल निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर होणार आहे.

उमेदवारांना मिळालेली मते

विवेक घाटगे :८२७

शिवाजीराव राणे : ३७४

संपत पवार :१८८

विनय कदम : ६१

इंद्रजित कांबळे : ४७

संग्राम देसाई : ३३

अविनाश भिडे : २८

वसंत चव्हाण : २७

किरण पाटील : २२

विल्सन नाथन : १२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठात रोजगार मेळाव्याचे आयोजन

$
0
0

रोजगार मेळाव्याचे

विद्यापीठात आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात शनिवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील नामवंत खासगी आस्थापनाबरोबरच सातारा, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यातील उद्योजकानाही निमंत्रित केले आहे. रोजगार मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्याचा सहभाग असून अंदाजे दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. रोजगार मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, एम्प्लॉयमेंटचे ऑनलाईन कार्ड, तसेच पात्र पदांसाठी विभागाच्या www.mahaswayam.in या संकेतस्थळावर जाऊन तीन ठिकाणी अर्ज भरणे आवश्यक आहे. या संधीचा उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील सहाय्यक संचालक विजय माळी, समन्वयक प्रा. ए.एम. गुरव , समन्वयक डॉ. जी. एस. राशीनकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह निषेध आंदोलन

$
0
0

सोमवारी आंदोलन

कोल्हापूर: जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक (भूविकास) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गुरुवारी (ता. १०) बैठक बोलावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १४) सकाळी ११ ते चार पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब निषेध आंदोलन करणार आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे श्रीकांत कदम यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वारे दिली आहे. 'भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. सरकारने आदेश देवूनही मालमत्ता विक्री करून कर्मचाऱ्यांची देणी भागविलेली नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या या वेळकाढूपणाबद्दल महाराष्ट्र दिनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. तत्पुर्वी पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी (ता. १०) मंत्रालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांनी ते आश्वासन पाळले नाही, त्यामुळे आंदोलन करण्यात येणार आहे.' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी जमिनीवर वॉच

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जमिनीसह स्थावर मालमत्तेवर सरकारी वॉच राहणार आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष जागेवर न जाता लाइव्ह वॉच ठेवता येणार आहे. यामुळे सरकारी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास त्याची माहिती त्याक्षणी जिल्हा प्रशासनाला समजणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर भुदरगड तालुक्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. तो लवकरच संपूर्ण जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे ही यंत्रणा तयार केली असून आपत्ती व्यवस्थापनासाठीही याचा उपयोग होणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडे प्रत्येक गावातील जमिनीच्या माहितीबाबतचे गाव नकाशे तयार आहेत. पण, हे नकाशे जुने आहेत. त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. शिवाय अलिकडे वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचा वापरही वाढला आहे. यामध्ये गावागावांतील सरकारी जमिनीवर अतिक्रमण वाढत आहे. शिवाय नदीकाठ, जंगल किंवा डोंगरावरही हे अतिक्रमण वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न होत असला तरी त्याला मर्यादा येतात. गावपातळीवरील राजकारणामुळे काही ठिकाणी दुर्लक्ष होते, तर काही ठिकाणी मॅनेज होत असल्याने अनेकदा जमीन बळकावण्याचे प्रकार घडत आहेत. यातून सरकारी जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील इंच न‌‌् इंच जमिनीवर लाइव्ह वॉच ठेवण्याची यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेमुळे प्रत्यक्ष जागेवर न जाताही तेथील सद्यस्थिती कळणार आहे.

या यंत्रणेनुसार गुगल अर्थवर उपलब्ध गाव नकाशे सुपर इम्पोज करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जमिनीवर सध्या काय सुरू आहे, हे ऑनलाइन दिसणार आहे. जिल्हा प्रशासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाने हा संयुक्त प्रकल्प तयार केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर भुदरगड तालुक्यातील गाव नकाशे सुपरइम्पोज करण्यात आले आहेत. गुगलवर अॅप तयार केल्याने कोणत्याहीक्षणी जमिनीचा वापर कार्यालयात बसून कळणार आहे. यामुळे सरकारी जमिनीचा गैरवापर झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला कळणार आहे. विभागप्रमुख एस. एस. पन्हाळकर व अभिजित पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या मदतीने हा प्रकल्प आता संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.

आपत्तीव्यवस्थापनास मदत

या यंत्रणेचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनासाठीही होणार आहे. महापूर, जमीन खचली किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक दुर्घटना घडली तर ती ते नेमक्या कोणत्या ठिकाणी घडली, याची माहिती कळणार आहे. शिवाय पीक परिस्थितीही दिसणार आहे. यामुळे या यंत्रणेचा उपयोग महसूल बरोबरच इतर विभागांनाही होणार आहे.

...................

महसूल प्रशासनाच्यावतीने सध्या सातबारा ऑनलाइनसाठी डिजिटायझेशनचे काम जोरात सुरू आहे. याचाच पुढील भाग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या मदतीने नवीन अॅप तयार केला आहे. यामुळे प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसून जागेच्या वापराची माहिती समजणार आहे.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

............

नव्या यंत्रणेमुळे एका क्लिकवर जमिनीचा गटनंबर, मालक, जमिनीचा वापर अशी सर्व माहिती मिळणार आहे. सध्या भुदरगड तालुक्यातील ११४ गावांची माहिती संकलित करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्याची माहिती या पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रा. डॉ. एस. एस. पन्हाळकर, भूगोल विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मिशन समाधान’मुळे एनपीएमध्ये घट

$
0
0

'मिशन समाधान'मुळे एनपीएमध्ये घट

बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मोहपात्रा यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एनपीएची समस्या भेडसावत असताना बँक ऑफ इंडिया याला अपवाद ठरली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) निर्देशानुसार बँकेने 'मिशन समाधान'अंतर्गत एकरकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) राबवली. योजनेमुळे गेल्या तिमाहीमध्ये बँकेने नऊ हजार कोटींची कर्जवसुली केली आहे. त्यामुळे इतर बँकेच्या तुलनेत बँक ऑफ इंडियाचे एनपीएचे प्रमाण कमी असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिनबंधू मोहपात्रा यांनी पत्रकार बैठकीत दिली. डिजिटल बँकिंग प्रमाणालीसाठी खास युवकांसाठी मेट्रोसिटीमध्ये 'डिजी बँकिंग' पायलट प्रोजक्ट राबवण्यात येणार असल्याचे मोहपात्रा यांनी सांगितले.

मोहपात्रा म्हणाले, 'नोटाबंदीमध्ये बँकिंग व्यवसायावर परिणाम झालेला असताना याकडे एक आव्हान म्हणून पाहिले. त्यामुळे बँकेच्या खातेदारांच्या संख्येत वाढ झाली. ११२ वर्षांपासून ग्राहकांशी नाते दृढ झालेले असल्याने बँक कर्मचारी मालक म्हणून आपली सेवा बजावतात. ग्राहकांभुमिख सेवा दिल्याने बँकेचा व्यवसाय नऊ लाख कोटींवर पोहोचला आहे. कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदूर्ग विभागात हा व्यवसाय ७० हजार कोटींपर्यंत गेला असून यामध्ये मुंबई विभाग सर्वात आघाडीवर आहे. बँकेने व्यवसायात भरारी घेत असताना कर्जवसुलीकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले. बँकेचे एनपीए प्रमाण कमी राखण्यासाठी आरबीआयच्या निर्देशानुसार ओटीएस योजना राबवली जात आहे. 'मिशन समाधान' योजनेच्या माध्यमातून नऊ हजार कोटींची कर्जवसुली झाली असल्याने इतर बँकेच्या प्रमाणात बँक ऑफ इंडियाच्या एनपीए प्रमाणात घट झाली आहे.'

'कृषी देशाचा आर्थिक विकासाचा पाया असल्याने कृषी पतपुरवठ्यावर विशेष भर दिला आहे. यासाठी खास शेतकऱ्यांसाठी गोल्ड लोन सुविधा अल्पदरात सुविधा सुरू केली आहे. युवकांना आधुनिक तंत्रज्ञान सेवा देण्यासाठी डिजी बँकिंगचा पायलट प्रोजेक्ट मेट्रो सिटीत ११२ ठिकाणी राबवण्यात येणार आहे. याद्वारे खातेदारांना त्वरीत सेवा देण्यावर भर असेल. बँकिंग व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाताना त्यातून संधीचा शोध घेवून ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करण्यात भर दिला असल्याचे मोहपात्रा यांनी सांगितले.' यावेळी पश्चिम विभागाचे महाप्रबंधक अमित रॉय, कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक नितीन देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

१८० कर्जप्रमाणपत्रांचे वाटप

बँकेच्यावतीन विविध स्वरुपाचे कर्जपुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर विभागात येणाऱ्या सर्व शाखांच्या माध्यमातून व्यवस्थापकी संचालक मोहपात्रा यांच्या हस्ते सुमारे शंभर कोटी रुपयांची १८० कर्जप्रमाणपत्रांचे वाटप कर्जदारांना करण्यात आले. त्यानंतर नॅशनल ग्राम बँकिंग (एनजीबी) मधील कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बँकिंग कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सांगली येथे रिटेल बँकिंग सेंटरचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.

..............

शाहूपुरी शाखेत गोल्ड लोन सुविधा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून शेतकऱ्यांना गोल्ड लोनची सुविधा दिली जाते. त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडियाने खास शेतकऱ्यांसाठी गोल्ड लोनची सुरुवात केली. शाहूपुरी शाखेत शेतकऱ्यांना अल्पदरात गोल्ड लोन देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या भावाची एक्झिट चटका लावणारी...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आजारपणाची माहिती मिळताच, धक्का बसला होता. त्यांना स्वास्थ लाभावं यासाठी माझ्याबरोबरच त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेहमीच प्रार्थना केली. पण नियतीला ते मान्य नव्हतं. माझ्या करिअरमध्ये नेहमी मार्गदर्शन करणारा माझा मोठा भाऊ गेला,' अशी भावना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केली.

'जमिनीवर पाय असणाऱ्या धडाडीच्या अधिकाऱ्याची अनपेक्षित एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.' अशा भावना व्यक्त करत रॉय यांच्या आत्महत्येनंतर बोलताना नांगरे-पाटील यांना अश्रू आवरता आले नाहीत.

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये हिमांशू राय यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक हायप्रोफाइल गुन्ह्यांचा तपास राय यांच्या देखरेखीखाली झाल्याने ते नेहमीच चर्चेत होते. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख, आयपीएल स्पॉट फिक्सिंग, अभिनेत्री मीनाक्षी थापा, पत्रकार जेडे हत्या प्रकरणाचाही राय यांनी शिताफीने तपास केला. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी विश्वास नांगरे-पाटील हे मुंबईत डीसीपी झोनचे अधिकारी होते, तेव्हा हिमांशू रॉय त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते. चार वर्ष नांगरे-पाटील यांनी राय यांच्यासोबत काम केले. नांगरे-पाटील यांच्यासाठी रॉय यांच्या आत्महत्येची बातमी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरली.

याबाबत महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना ते म्हणाले, 'हिमांशू रॉय यांच्यासोबत चार वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. प्रचंड उर्जा देणारा तो अनुभव होता. सोबतचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामात मोकळीक देण्याची त्यांची खासीयत. कठीण प्रसंगात ते स्वत: सर्वात पुढे राहायचे. परिणामांची जबाबदारी स्वत:कडे घेऊन ते धडाडीने काम करीत होते. पोलिस बळाचा वापर कधी करावा याचे अचून ज्ञान त्यांना होते. एकदा मुंबईत अंधांचा मोर्चा होता. मोर्चासाठी बंदोबस्ताची जबाबदारी माझ्याकडे होती. मोर्चेकऱ्यांनी महामार्ग अडवला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने मी रॉय सरांना फोन केला. अंध मोर्चेकऱ्यांवर बळाचा वापर करायचा नाही, असे त्यांनी बजावले. शारीरिकदृष्या कमजोर आणि पीडितांवर कधीच बळाचा वापर करायचा नाही, हा महत्त्वाचा धडाच त्यांनी आम्हाला दिला.'

'व्यायामाची आवड हा आमच्या दोघांचाही समान धागा होता. ते स्वत: शरीर सौष्ठवपटू होते. मॅरेथॉनमध्येही त्यांचा उत्साही सहभाग असे. इतरांना ते प्रकृती जपण्याचा सल्ला द्यायचे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे आजारपण बळावले होते. मोबाइलवरून आमचा नेहमीच संपर्क होता, मात्र अनेकदा मी त्यांना प्रत्यक्ष भेटूनही आलो. दुर्धर आजाराशी सामना करतानाही त्यांचा उत्साह कायम होता. अनेक गुन्ह्यांच्या तपासाबाबत त्यांनी मोकळेपणाने चर्चा केली. मला मार्गदर्शन केले. या धडाडीच्या अधिकाऱ्याला उदंड आयुष्य मिळावे यासाठी नेहमी प्रार्थना करत होतो. पण शेवटी नियतीने आमचा खंबीर अधिकारी हिरावला.'

जमिनीवर पाय ठेवणारे रॉय

रॉय यांच्याकडे अनेक संवेदनशील गुन्ह्यांचे तपास होते. दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख म्हणून काम करताना संपूर्ण देशाची नजर त्यांच्या कामावर होती. नेहमी चर्चेत असलेले हे अधिकारी आयुष्यभरात एकदाही वादात अडकले नाहीत. यशाच्या शिखरावर असतानाही जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची त्यांची अनोखी शैली होती. यामुळे ते पोलिस खात्यासह नागरिकांमध्येही लोकप्रिय होते.

माझा मोठा भाऊ गेला!

हिमांशू राय आणि विश्वास नांगरे-पाटील यांचा सहा वर्षांचा संपर्क होता. नांगरे-पाटील यांनी अनेकदा रॉय यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. रॉय हेदेखील लहान भावाप्रमाणे नांगरे-पाटील यांची काळजी घेत होते. त्यांच्या अनपेक्षित जाण्याने 'माझा मोठा भाऊ गेला,' अशी भावना नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारदर्शकता ठेवा, दडवू नका

$
0
0

जि. प. सभागृहात सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बांधकाम विभागाने रस्ते, पुलांच्या कामांची यादी विषय समितीचे सभापती, सदस्यांच्या निदर्शनास न आणता थेट सभागृहातच सदस्यांना वाचायला दिली. अशाप्रकारे माहिती दडवू नका, पारदर्शकता आणा, ही शेवटची सूचना असेल. सुधारणा न झाल्यास दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल', असा इशारा देत सत्ताधारी सदस्य अरूण इंगवले यांनी घरचा आहेर दिला. त्यांनी आक्रमकपणे नाकर्त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यांनी विकास आराखड्यातील जिल्ह्यातील रस्ते, पुलांच्या कामांची माहिती दिली. त्यावर इंगवले यांनी सदस्यांना विश्वासात न घेता कामांची यादी केल्याचा आरोप केला. बुरूड यांनी सरकारने केलेल्या सर्व्हेनुसार कामांची निवड केली. त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार मलाही नाही, असे सांगितले. आयएसओ मानांकनप्राप्त करवीर तालुक्यातील इस्पुर्ली आरोग्य केंद्राला गेल्या रविवारी कुलूप होते. तेथील रूग्णांची गैरसोय झाली. याउलट आरोग्य केंद्राजवळील माहेर हॉस्पिटलमध्ये रूग्णांची गर्दी होती. हे खासगी रूग्णालय कोणाचे त्याची माहिती द्यावी, अशी मागणी सभापती प्रदीप झांबरे यांनी केली.

'माझ्या पतीच्या नावे माहेर रूग्णालय आहे. त्यांच्या निधनानंतर मुलगा केदार कुंभार हे रूग्णालय चालवतात', असे उत्तर आरोग्य अधिकारी उषादेवी कुंभार यांनी दिले. इस्पुर्ली आरोग्य केंद्र बंद ठेवणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यास नोटीस दिल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील आजारी कष्टकरी, शेतकरी, मजुरांना सायंकाळी वेळ असतो. त्यामुळे सर्वच आरोग्य केंद्रात रात्री दहापर्यंत डॉक्टर असावेत, अशी मागणी विजय भोजे यांनी केली. तर दुसऱ्या जिल्ह्यातून शिक्षक आल्याशिवाय शाहूवाडी तालुक्यातील एकही शिक्षक सोडले जाणार नाही, असे सभापती अंबरीश घाटगे यांनी सांगितले.

-----------

चौकट

घट्ट नेता अन आण्णा कर्नाटकात

मी गटनेता असूनही बुरूड हे मी मागितलेली माहिती देत नाहीत', असा आरोप इंगवले यांनी केला. त्यामुळे मी गटनेता आहे की 'घट्ट नेता' हे कळत नाही ', असा टोला लगावताच सभागृहात हशा पिकला. साजणी पाणी योजनेवरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनाही इंगवले यांनी चांगलेच धारेवर धरले. उत्तर देताना देसाई यांनी 'आण्णा' असे म्हणताच आण्णा कर्नाटकात येथे कोठे, अशी मिश्किली टिप्पणी केली.

-------------

दिलगिरीची नामुष्की

'ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांचे काम कासवगती पेक्षाही मंद आहे', असा गंभीर आरोप सभापती रेश्मा सनदी यांनी केला. सनदी यांनी सांगितलेले कामही भालेराव विसरल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या अधिकच संतापत आम्ही कोण आहे हे तरी माहित आहे का, असा प्रश्न केला. जनसुविधांच्या कामावरून सतीश पाटील यांनीही भालेराव यांची खरडपट्टी केली. शेवटी भालेराव यांच्यावर दिलगिरी व्यक्ती करण्याची नामुष्की ओढवली.

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवदासी परिषद

$
0
0

...तर ठिय्या आंदोलन करू

देवदासी विकास परिषदेत इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवदासींच्या न्याय मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवदासी विकास परिषदेत देण्यात आला. परिषदेचे संयोजक व माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली अक्षता मंगल कार्यालय येथे बैठक झाली. नेहरू युवा देवदासी विकास मंडळतर्फे परिषदेचे आयोजन केले होते.

परिषदेत देवदासींच्या घरकुलाच्या प्रस्तावास त्वरित मान्यता द्यावी, देवदासींना निवृत्ती वेतन मिळावे, या प्रमुख मागण्या केल्या. यापूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारप्रमाणे सध्याच्या भाजप, सेनेच्या सरकारनेही देवदासींच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्षित केले आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्ती अनुदानात कोणतीही वाढ केली नाही. त्यामध्ये वाढ करून दरमहा २५०० रुपये निवृत्ती वेतन मिळावे असा ठराव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना माजी नगरसेवक भंडारे यांनी देवदासींच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला. माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती शेवंता माने यांनी आभार माने. याप्रसंगी श्रीमती देवाताई साळोखे, शांता पाटील, द्रौपदी सातपुते, रेखा वडर, मालन आवळे, जमन्नवा वज्रमुठ्ठी,यल्लव्वा कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका स्थायी समिती सभा

$
0
0

महापालिका लोगो

..........

रस्त्यांचे पॅचवर्क पावसाळ्यापूर्वी

स्थायी समिती बैठकीत निर्णय

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ड्रेनेज लाइनचे काम झालेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क करण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी मंगळवारी अधिकारी, लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.

शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यावरून चालणेदेखील कठीण झाले आहे, यामुळे हे रस्ते तातडीने करण्याची मागणी दीपा मगदूम यांनी केली. यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी संबंधित ठेकेदाराकडून रस्ते तयार करण्याचे ठरले. 'महापालिकेच्या दोन इमारती आपल्या प्रभागात आहेत. तेथे पेव्हींग ब्लॉक बसविणे काम सुरु आहे. याठिकाणी माजी नगरसेवकांनी शेडमध्ये मटेरिअल ठेवले आहे ते काढण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांना ते शिवीगाळ करतात,' अशी तक्रार नगरसेविका कविता माने यांनी केली. त्यावर दोन दिवसात हे अतिक्रमण काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

गुरूवारी जोरदार पावसाने शहरात अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली. उद्यान विभागाला झाडांची अवस्था माहित होती, झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी वारंवार सांगूनही वेळेवर कामे केली जात नसल्याचा आरोप प्रतिज्ञा निल्ले यांनी केल्यानंतर पावसाळयापूर्वी सर्व्हे करुन धोकादायक फांद्या छाटा, असे आदेश सभापती ढवळे यांनी दिले. तर केएमटीकडील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याची मागणी संजय मोहिते यांनी केली.

.................

कळंबा तलावातील गाळ

नेण्याचे महापालिकेचे आवाहन

कोल्हापूर

कळंबा तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व पाण्याच्या पातळीत वाढ होणेच्या दृष्टीने कळंबा तलावाच्या दक्षिण पात्रातील गाळाची माती नि:शुल्क व स्वखर्चाने उपसा करुन न्यावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक शेतकरी, नागरिक यांनी महापालिकेच्या जल अभियंता, पाणी पुरवठा विभागाकडे रितसर मागणी अर्ज करावा. गाळाची माती मुरुमापर्यंत खोलवर न खोदता मुरमावरती दोन फूट मातीचा थर राखीव ठेवून उपसा करावा. जागोजागी खड्डे न खोदता समांतर पध्दतीने ठरवून दिलेल्या जागेमध्येच गाळमाती उपसा करावा, असेही कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images