Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गोवा बनावटीची ६२ हजारांची दारू जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानाच्या पिछाडीस बेकायदेशीर विदेशी मद्याचा साठा असलेली कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. कारमधून ६२ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा व कार असा सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी (ता. २६) दुपारी ही कारवाई करण्यात आली. संशयित कारचा चालक गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी ही माहिती दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्राय डे असूनही काही ठिकाणी छुपी मद्यविक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानाच्या पिछाडीस सापळा लावला होता. या परिसरात संशयित कार (एम. एच. ०३ एस. ८४८१) रस्त्याकडेला पार्क केली होती. कारमधील तरुण अवैध मद्यविक्री करीत असल्याचे लक्षात येताच पथकाने कारकडे धाव घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक आल्याचे समजताच संशयिताने तिथून पळ काढला. पथकाने गोवा बनावटीचे मद्य आणि कार आसा सुमारे एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याच पथकाने खंडोबा तालमीनजीक संशयित दुचाकी ताब्यात घेतली. या दुचाकीला लावलेल्या नायलॉनच्या पिशव्यांमध्ये सुमारे ३० हजार रुपयांचा मद्यसाठा होता. पोलिसांनी मद्यासह दुचाकी जप्त केली. दोन्ही कारवायांमध्ये संशयित विक्रेते पसार झाले आहेत. पथकाने एक कार, एक दुचाकी आणि गोवा बनावटीचे मद्य असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निरीक्षक संजय जाधव, विक्रम मोरे, जगन्नाथ पाटील, एम. आर. लाडके, जवान आय. आय. गडकरी, अमर पाटील, संदीप हालुंडे, राहुल सकपाळ, आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कणेरकर नगरात घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यू कणेरकर नगरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी (ता. २८) सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वंदना विलास वाघरे (वय ३५) यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

न्यू कणेरकरनगर येथील प्लॉट नंबर १७१ मध्ये वंदना वाघरे कुटुंबीयांसह राहतात. वंदना वाघरे या गृहिणी आहेत, तर त्यांचे पती खासगी नोकरी करतात. शनिवारी वंदना वाघरे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्या होत्या. रविवारी सकाळी त्या परत आल्या असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचाचा कडी कोयंडा उचकटला असल्याचे दिसले. आत जाऊन पाहिल्यानंतर त्यांना कपाटातील साहित्य विस्कटल्याचे दिसले. बेडरूममधील कपाटही उचकटले होते. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, पैंजण यासह हॉलमधील एलसीडी टीव्ही, आदी साहित्य लंपास केले होते. त्यांनी तातडीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दाखल केली. चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपयांची मुद्देमाल लंपास केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एंजल कंपनीकडून डॉक्टरांची २९ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डी मॅट अकाऊंटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील चार डॉक्टरांची ३० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत कुणाल भरत कामत (ओम बिल्डिंग, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या सबब्रोकरसह एंजल ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर (आकृती ट्रेड सेंटर, अंधेरी एमआयडीसी मुंबई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. अभिजित आप्पासाहेब पाटील (वय ४२, रा. पूर्वरंग, राजारामपुरी, १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने दोन महिन्यांपुर्वीच या फसवणुकीचे वृत्त दिले होते.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पेठेतील कुणाल कामत हा मुंबईतील एंजल ब्रोकिंग कंपनीसाठी सबब्रोकर म्हणून कोल्हापुरात काम करतो. त्याने कोल्हापुरातील काही डॉक्टरांना डी मॅट अकाऊंटची माहिती दिली. याद्वारे कमी कालावधीत जास्त आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने चार डॉक्टरांचे डी मॅट अकाऊंट सुरू केले. यात डॉ. अभिजित पाटील यांनी नऊ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. याशिवाय डॉ. विठ्ठल अण्णासाहेब भोसले यांनी दोन लाख २० हजार रुपये, डॉ. विद्या भरत ठाकर यांनी ११ लाख ३५ हजार रुपये, तर डॉ. प्रसाद सुनील देसाई यांनी पाच लाख २२ हजार रुपये असे चौघांनी २८ लाख ८७ हजार रुपये गुंतवले होते. २०१४ पासून पैशांची गुंतवणूक केली होती. गेल्या काही दिवसांत सबब्रोकर कामत याने गुंतवणूकदारांची पूर्वपरवानगी न घेताच डी मॅट अकाऊंटवरून शेअर्सची खरेदी-विक्री केली आहे. यामुळे चारही डॉक्टरांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले.

याबाबत सबब्रोकर कामत आणि एंजल कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. दोन महिन्यांपूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून फसवणुकीचा प्रकार समोर आणला होता. सबब्रोकरने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात डॉ. अभिजित पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी कुणाल कामत याच्यासह एंजल ब्रोकिंग कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित अधिक तपास करीत आहेत. अशा पद्धतीने अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात सात एकर ऊस जळाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

येथील शिंदे- खामकर मळ्यात शॉर्ट सर्किटने सात एकर क्षेत्रातील उसाला आग लागली. या आगीत उसासह ठिबक सिंचनाचे साहित्य जळाले. शेतकरी व परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोती ईश्वरा शिंदे यांच्या शेतात ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या पडल्याने उसाला आग लागली. काही क्षणातच ही आग परिसरात पसरली. शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकास पाचारण करण्यात आले. मात्र रस्त्याअभावी ही गाडी तेथे पोचू शकली नाही. या आगीत सदाशिव रामचंद्र शिंदे, शिवाजी बाळासाहेब शिंदे, उमेश आण्णासो शिंदे, जोती ईश्वरा शिंदे, वत्सला आप्पासाहेब पाटोळे, लक्ष्मण बाळू साखळे, चंद्रकांत बाळू साखळे यांच्या शेतातील ऊस, तसेच काही शेतकर्यांचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवजड वाहतुकीचा शिवाजी पुलाला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवारी (ता. २६) रात्री पंचगंगा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातामुळे महामार्ग प्राधिकरणे रविवारी पुलाची पाहणी केली. ध्रुव कन्सलटन्सी आणि महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पुलाचे फोटो आणि चित्रीकरण केल्यानंतर अवजड वाहतुकीचा पुलाला धोका होऊ शकतो. त्यामुळे १५ दिवसांत पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून याचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली. हलक्या वाहनांच्या वाहतुकीला पूल सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरधाव वाहनाची धडक बसून १४० वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवाजी पुलाचा दगडी कठडा तुटून पहिल्यांदाच भीषण अपघात झाला. या अपघातामुळे पूल कमकुवत झाल्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनानेही तातडीने पुलावरील अवजड वाहतूक बंद केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पुलाची पाहणी आणि स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले. यानुसार रविवारी पुलाची पाहणी झाली. महामार्ग प्राधिकरण आणि राज्यातील पुलांची पाहणी करण्याचा ठेका दिलेल्या ध्रुव कन्सलटन्सीच्या अधिकाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने पुलाचे फोटो काढले, त्याचबरोबर चित्रीकरणही केले. पुलावर तीन ठिकाणी पाहणी करण्यात आली. अपघातग्रस्त परिसरातील बांधकाम, पुलाचे खांब, दगडी कठडा, बांधकामाची मजबुतीची पाहणी केली.

पाहणीनंतर 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना ध्रुव कन्सलटन्सी कंपनीचे मुख्य प्रबंधक अलोक कुमार म्हणाले, 'दोन महिन्यांपूर्वी पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी पुलाची स्थिती भक्कम असल्याने अवजड वाहतुकीला धोका नसल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. शुक्रवारच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तातडीने पुलाची पाहणी करण्याचे आदेश आम्हाला मिळाले. यानुसार महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. अपघातामुळे पुलाच्या कठड्याला धोका निर्माण झाला आहे. उर्वरित पूल, कठडा, पुलाचे खांबाला कोणताही धोका नाही. तांत्रिक दोषही नाहीत. पुलाची नैसर्गिक झिज झाली आहे, मात्र पूल सुस्थितीत आहे. हलक्या वाहनांचा पुलाला कोणताच धोका नाही. मात्र अवजड वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे आहे. सध्यातरी अवजड वाहतुकीला परवानगी देता येणार नाही. पंधरा दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सरकारकडे सादर केला जाईल.'

यावेळी ध्रुव कन्सलटन्सीच्या अधिकाऱ्यांचे पथक, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता एस. पी. आबदार उपस्थित होते. अद्ययावत मोबाइल ब्रिज इन्स्पेक्शन क्रेनच्या मदतीने पाहणी करण्यात आली.

वाहतूक बंद

अपघातानंतर शिवाजी पुलावरून केवळ दुचाकींची वाहतूक सुरू आहे. पुलाची पाहणी करताना दोन्ही बाजुने वाहतूक बंद करण्यात आली. पाहणीसाठी मोठ्या आकाराची क्रेन असल्याने वाहनांना पुढे जायला जागाच नव्हती. दोन्ही बाजुने पोलिसांनी बॅरिकेट लावून वाहतूक अडवली. अर्ध्या तासाच्या पाहणीनंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली. रिक्षा, कार, जिप, बस आणि अवजड वाहनांना प्रवेश नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अवजड वाहतुकीचा धोका

शिवाजी पुलाला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलावरून कोकणाकडे जाणारी आणि येणारी वाहतूक वाढली आहे. शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीतही पुलावरील अवजड वाहतुकीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर अवजड वाहतुकीबाबत निर्णय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकार उभारणार सोलापुरात गारमेंट पार्क

$
0
0

सुभाष देशमुखांची घोषणा; पन्नास एकर जमीन देणार

म. टा. प्रतिनिधी, सोलापूर

'सोलापूरला लवकरच राज्य सरकारतर्फे गारमेंट पार्क उभारण्यात येणार आहे. ५० एकर जागेवर हे पार्क उभारस्यात येणार असून, त्यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार विशेष तरतूद करणार आहे,' अशी घोषणा पणन आणि वस्त्रोद्योमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या गणवेश आणि वस्त्र उत्पादकांच्या तीन दिवसांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. सोलापूर येथे वस्त्रोद्योगाचे दालनही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मफतलाल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ऋषीकेश मफतलाल, बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्री अजयकुमार साहू, सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, उपाध्यक्ष नीलेश शाह आदी उपस्थित होते. २९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

'सोलापूरमध्ये सध्या ६० ते ७० हजार विडी कामगार काम कार्यरत असून, शहरामध्ये मुबलक जमीन आणि भरपूर मनुष्यबळ उपलब्ध आहे. सोलापूरला गारमेंट पार्क आणि वस्त्रोद्योगाचे दालन उभारले तर त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आम्हाला ६० ते ७० हजार विडी कामगारांमधून इकडे वळवता येईल अणि व त्यांना पण रोजगार उपलब्ध होईल. सोलापूर शहर हे भारताशी उत्तम प्रकारे जोडले गेले असून रेल्वे आणि रस्त्यांचे उत्तम जाळे येथे उपलब्ध आहे. मुंबई, पुणे आणि हैदराबाद हे विमानतळ येथून जवळच असून, राज्यातील वस्त्रोद्योग येथे स्थापित होण्यासाठी हे शहर उत्तम गुंतवणूक ठिकाण म्हणून समोर येत आहे. अगदी सहजपणे उपलब्ध असलेली दळणवळण साधने, कामगार आणि कच्चा माल यांमुळे हे एक आदर्शवत असे ठिकाण आहे. पुढील वर्षी हे आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शन केनियात भरविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल,' असेही देशमुख यांनी नमूद केले,

'देशभरातील १० हजार रिटेलर्सनी या प्रदशर्नाला भेट दिली. कापड, गणवेश वस्तू, घरातील वापराचे कापड आणि यंत्रसामुग्रींचे राज्यभरातील उत्पादक या प्रदर्शनात सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे १५०हून अधिक ब्रँड प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. शिवाय विविध ब्रँडच्या प्रसारासाठी एका फॅशन शोचेसुद्धा आयोजन आले होते. या माध्यमातून वस्त्रोद्योग क्षेत्रात सध्या सुरू असलेले आणि येऊ घातलेले ट्रेंड आणि पॅटर्न यांचा अंदाज ग्राहक आणि सहभागी झालेल्या मान्यवरांना यावेळी घेता आला, 'असे उद्गार सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम साहित्यासह तीन वाहने जळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवारपेठ परिसरातील बेलबाग येथे शनिवारी (ता. २७) मध्यरात्री तीन वाहनांसह सेंट्रिंगच्या साहित्याला आग लागली. यात सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जुना राजवाडा पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रवींद्र वसंतराव खिरुगडे (वय ५२, रा. बेलबाग, मंगळवार पेठ) यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी सेट्रिंगसाठी लागणाऱ्या लाकडी फळ्या, बांबू, प्लायवूड असे सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे साहित्य स्वयंवर मंगल कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या रिकाम्या जागेत ठेवले होते. या साहित्याला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. साहित्याशेजारी गणेश सावंत, अभिजित पाटील यांच्या दोन कार, तर संजय खारुगडे यांची अॅपे रिक्षा पार्किंग केली होती.

या वाहनांनीही पेट घेतला. परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलास कळवले. काही वेळात जवान रघुनाथ साठे, दिगंबर केदारी, पवन कांबळे, संदीप पाटील, विशाल परीट, प्रमोद मोरे, चंद्रकांत वासुदेव, कृष्णात साठे, गिरीष गवळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीन बंबाद्वारे पाण्याचा फवारा मारुन आग विझवली. सेट्रिंगचे पूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, तर दोन्ही कार व रिक्षाचा काही भाग जळाला आहे. यात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्फोटित पत्नीकडून पतीस मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'घटस्फोट झाल्याने मुलाच्या नावासमोर माझे नाव लावू नकोस,' असे सांगण्यासाठी गेलेल्या घटस्फोटीत डॉक्टर पतीस पत्नीने दोन मित्रांसह बेदम मारहाण केली. या घटनेत डॉ. प्रफुल्ल परमानंद हळदणकर (वय ४३, रा. महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ) हे जखमी झाले आहेत. रविवारी (ता. २८) दुपारी रामानंदनगर येथे हा प्रकार घडला. डॉ. हळदणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी अपर्णा हळदणकर, विशाल भोसले यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रफुल्ल हळदणकर यांचे सहा वर्षांपूर्वी अपर्णा कांदीकर या तरुणीशी लग्न झाले.सहा वर्षानंतर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही अपर्णा मोठ्या मुलाच्या नावासमोर डॉ. प्रफुल्ल यांचे नाव लावत असल्याने प्रफुल्ल यांनी आक्षेप घेतला होता. रविवारी डॉ. हळदणकर हे दुसरी पत्नी, मुलगा आणि घरातील मोलकरणीला घेऊन अपर्णा राहत असलेल्या रामानंदनगर येथील घरी गेले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. अपर्णाने मित्र विशाल भोसले याला फोन करून बोलवून घेतले. अपर्णासह चौघांनी प्रफुल्ल यांना लाकडी बॅट व काठीने बेदम मारहाण केली.

मारहाणीत डॉ. हळदणकर यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी ताराबाई पार्क येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हळदणकर यांनी याप्रकरणी सोमवारी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित अपर्णा हळदणकर यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवले होते. अपर्णा एका खासगी रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नोकरी करते. मारहाण करणाऱ्या भोसलेसह त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदाराची खासदाराला मंत्रिपदाची ऑफर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आमच्या भागातील एक खासदार सातत्याने एकाच प्रश्नाची मांडणी करत असतात, आपण मात्र विमानतळ, कोकण रेल्वे, शिवाजी पूल अशा असंख्य प्रश्नांची मांडणी करून विकासाला चालना दिली. आपल्यासारख्या अष्टपैलू खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरज असून आपण भाजपमध्ये या आपल्याला मंत्रिपद देऊ, अशी ऑफर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. भीमा कृषी व पशू प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

'आमच्या भागातील एक खासदार केवळ एकाच प्रश्नाची मांडणी करत आहेत, असे खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता टोला लगावताना आमदार हाळवणकर म्हणाले, 'खासदार महाडिक यांनी संसदेमध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी पोषक प्रश्नांची मांडणी केली. त्यांच्या अभ्यासू मांडणीमुळे त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या माध्यमातून कोल्हापूरचा सन्मान झाला. असाच सन्मान मंत्रिपद देऊन भाजप करू शकते. यासाठी खासदार महाडिक यांनी आगामी निवडणूक भाजपकडून लढवावी. खासदार महाडिक यांच्यासारख्या खासदारांची पंतप्रधान मोदी यांना आवश्यकता आहे. महाडिक पक्षात आल्यास त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यास माझ्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील सक्षम असून वरिष्ठस्तरावर आमच्या शब्दाला वजन आहे.'

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'जिल्ह्याच्या विकासात शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि जातिवंत जनावरांची पैदास आणि संगोपन कसे करावे, याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी अकरा वर्षांपासून कृषी व पशू प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. मात्र काहीजण मैदानाचा प्रश्न पुढे करून आडकाठी करत आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या मदतीने प्रदर्शनाच्या जागेच्या प्रश्न निकालात काढत 'भगवान के घर में देर है, लेकिन अंधारा नही' असा टोला आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता लगावला. विमानतळ, कोकण रेल्वे, पासपोर्ट कार्यालय असे प्रश्न मार्गी लावत मतदारसंघात ४१० कोटी रुपयांच्या रस्त्यांची बांधणी केली आहे. आठवड्यात बास्केट ब्रीजची निविदा प्रसिद्ध करुन दीड वर्षात ब्रीजचा प्रश्न मार्गी लावला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारणात लिंगायतांचा आवाज घुमावा: मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाराव्या शतकात बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे तत्त्वज्ञान सांगत या धर्माची स्थापना केली. आज २१ व्या शतकात लिंगायत समाजबांधवांना स्वतंत्र धर्मासाठी रस्त्यावर उतरावे लागते. कारण त्यांच्या मागण्या ठोसपणे मांडणारा समाजाचा नेता राजकारणात नाही. देशाच्या सीमेवर लिंगायत आहेत. समाजातील विविध क्षेत्रांत लिंगायत समाजाचा सहभाग आहे. मात्र, देशाची धोरणे ठरवणाऱ्या सरकारमध्ये राजकीय फळीत लिंगायतांचा आवाज घुमला पाहिजे. त्यासाठी आता संघटित होण्याबरोबरच राजकीय नेतृत्व तयार करा,' असे आवाहन पंजाब येथील अकाली दलाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजिनसिंह मान यांनी केले.

लिंगायत समाजातर्फे स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी कोल्हापुरात काढलेल्या भव्य मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. दसरा चौक येथील व्यासपीठावरून मान यांनी मोर्चात सहभागी सुमारे दोन लाख लिंगायत समाजबांधवांना पाठिंबा जाहीर केला.

मान म्हणाले, 'एखाद्या समाजासाठी संघटन हे किती महत्त्वाचे असते याची जाणीव आहे. जोपर्यंत समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत त्यांना सरकारकडून हव्या असलेल्या सुविधा मिळवण्याचे बळ येत नाही. शीख धर्माचे प्रतिनिधी या नात्याने मला लिंगायत समाजाने स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी सुरू केलेल्या या लढ्याला पाठिंबा देताना आनंद होत आहे. कोणताही धर्म जातीपलीकडे धर्मातील तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करत असतो. धर्माच्या शिकवणीत जातीपातीला स्थान नाही असे सांगितले आहे. लिंगायत धर्म जातीपाती न मानणारा आहे. माणसाशी माणुसकीने वागा, हा या धर्माचा मंत्र आहे. शीख धर्मातही जातीपेक्षा माणसाच्या चांगुलपणाला महत्त्व दिले आहे. लिंगायत समाजाची मोठी संख्या देशभरात आहे. याआधारे या समाजाला वेगळा धर्म मिळावा ही मागणी रास्त आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवण्यासाठी सध्याचे सरकार किंवा इतर मोठे पक्ष लक्ष देतील अशी परिस्थिती नाही. त्यासाठी लिंगायत समाजाचे नेतृत्त्व सरकारमध्ये सक्रिय असले पाहिजे. शाहू महाराजांच्या भूमीत लिंगायत समाजाने पुकारलेला एल्गार नक्कीच क्रांती घडवणारा ठरेल. सहाशे वर्षांची परंपरा असलेल्या लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अकाली दल कायम सोबत राहील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्याची कोल्हापुरी नशा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर :

आरोग्य विभागच्या मौखिक तपासणी मोहिमेत चार जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात दारू पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. एक महिन्याच्या तपासणी मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार, ९६३ जणांना दारूचे व्यसन असल्याचे पुढे आले आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या चार जिल्ह्यात तब्बल १ लाख, ५६ हजार ९१२ जणांनी स्वतः मद्य प्राशन करीत असल्याचे सांगितले आहे.

दारू पिण्यात दुसऱ्या क्रमांकावर सांगली जिल्हा आहे. त्यावरून सधन जिल्ह्याला दारूच्या नशेचा विळखाही घट्ट होत आहे. परिमाणी तोंड आणि पोटाच्या विकार होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचा आरोग्य प्रशासनाचा दावा आहे. राज्यात कोल्हापूर, सांगली जिल्हे सधन म्हणून ओळखली जातात. उसाची शेती अधिक असल्याने ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली आहे. शेतीपूरक उद्योगधंद्यातूनही अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. याशिवाय छोटे, मोठे उद्योग धंदे आहेत. सहावा वेतन आयोगाने कुटुंबांतील दोघेजण सरकारी नोकरीत असल्यांकडे पैसे शिल्लक राहत आहेत. अशा विविध कारणांमुळे ऐषोराम जीवन जगण्यांकडे कल वाढतो आहे. त्यातूनच व्यसनाधीनकडे अनेकजणांची वाटचाल होत आहे.

मजा, आनंदासाठी घेतलेला दारूचा एकच प्याला कायमची सोबत करते. पुढे संबंधित दारुच्या आहारी जातो. पिणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने बिअरबार, दारुची दुकाने वाढत आहेत. सायंकाळी सर्वच बार फुल्ल असल्याचे दिसतात. शहरापासून खेड्यापर्यंत या संस्कृतीमुळे मद्यपींचे आरोग्य धोक्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातर्फे तोंडाच्या आजारांसंबंधी तपासणी मोहीम राबवण्यात आली. एक महिन्याच्या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील ३० वर्षांवरील ८ लाख, ६५ हजार, ६८१ जणांच्या मौखिक आरोग्याची तपासणी केली. त्यापैकी ६० हजार, ४१३ जण दारू पित असल्याचे पुढे आले. सांगली जिल्ह्यातील ६ लाख, ८ हजार, ९८९ जणांची तपासणी केली. त्यापैकी ३४ हजार, ५० जणांना दारूचे व्यसन आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक दारू पिणाऱ्यांची संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंदगड तालुका आहे. सर्वात कमी दारू पिणाऱ्यांची संख्या गगनबावडा तालुक्यातील आहेत. दरम्यान, सर्व्हेक्षणातील एक महिन्यात मिळालेले इतके मद्यपी आहेत. व्यापक प्रमाणात सर्व्हे झाल्यास यापेक्षाही अधिक संख्या असण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत कमी

आरोग्य प्रशासनाकडून झालेल्या सर्व्हेत दारूचे व्यसन असल्याचे सांगितलेल्यांची संख्या जिल्हानिहाय अशी

कोल्हापूर : ६८,९६३

सांगली : ३९८००

सिंधूदुर्ग : १६९८५

रत्नागिरी :३११६४

हातकणंगले आघाडीवर

आजरा : १७२६, भुदरगड : ५९२७, चंदगड : ७२७६, गडहिंग्लज : ६८५७, गगनबावडा : २७२, हातकणंगले: ८०९५, कागल : १८७६, करवीर : १८४८, पन्हाळा : ४६३९, राधानगरी : ३८८६, शाहूवाडी : ४४०९, शिरोळ : २२१३

००

आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत दारू, तंबाखूचे व्यसन असणारे सापडले आहेत. त्यांची नावनिहाय यादी तयार केली आहे. त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे. तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे आढळलेल्यांची बायप्सी केली जाईल.

डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा सरकारच्या विरोधात हल्लाबोल

$
0
0

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात बैलगाडी मोर्चा; पालकमंत्र्यांवरही टीकास्त्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीवरुन शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 'मोदी सरकार हाय हाय', 'पेट्रोल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देत शिवसेनेने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. अच्छे दिन आणि सर्वसामान्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याच्या थापा मारणाऱ्या केंद्र सरकारची खिल्ली उडवताना आमदार क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते हातात गाजर घेऊन मोर्चात सहभागी झाले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. आमदार क्षीरसागर, माजी उपमहापौर उदय पोवार, दिगंबर फराकटे, रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, शिवसेनेचे गटनेते नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्त तीन वेगवेगळ्या बैलगाड्यातून मोर्चाद्वारे बिंदू चौक ते व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महागाईच्या राक्षसाचा प्रतिकात्मक सजीव देखावा, कार्यकर्त्यांच्या हातातील गाजर आणि मोदी सरकारच्या विरोधातील घोषणा यामुळे मोर्चा लक्षवेधी ठरला.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अन्यायकारक कराचा बोजा नागरिकांवर पडत असून नागरिक भरडले जात आहेत. सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅससह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी आला. मोर्चात रघुनाथ टिपुगडे, दीपक गौड, प्रकाश सरनाईक, सुनील जाधव, प्रकाश देवकुळे, आझम जमादार, मंगला साळोखे, पूजा भोर, गीता भंडारी, गौरी माळदकर, मंगल कुलकर्णी, रुपाली कवाळे आदींचा समावेश होता.

मोदींचे गाजर, दादांचे लॉलीपॉप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासनांचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक केली. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात विकास कामे करण्याऐवजी इतर पक्षातील लोकांना लॉलीपॉप दाखवत फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. मात्र शिवसेनेतील एकही कार्यकर्ता त्यांच्या आमिषांना बळी पडलेला नाही. केंद्र सरकारकडून लोकांची आर्थिक लूट सुरू आहे. लोकांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरुन खेचल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठात आज स्पार्क चित्रपट महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग तसेच एमए मास कम्युनिकेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तृतीय 'स्पार्क फिल्म फेस्टिव्हल'चे आयोजन विद्यापीठाच्या निलांबरी हॉलमध्ये मंगळवार (दि. ३०) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. माहितीपट तज्ज्ञ शोएब शेख हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. शैलेश कोरे दिग्दर्शित 'फांझर' या लघुपटाचा प्रिमियर शो यावेळी होणार आहे.

शिवाजी विद्यापीठात गेल्या तीन वर्षांपासून 'स्पार्क फिल्म फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात येते. या फेस्टिव्हलमध्ये पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या माहितीपट तसेच लघुपटांचे सादरीकरण करण्यात येते. मंगळवारी होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये दहा माहितीपट आणि पाच लघुपटांचे सादरीकरण होईल. विद्यार्थ्यांनी या माहितीपटांतून जलसंधारणासह विविध सामाजिक विषय हाताळले आहेत. फेस्टिव्हलमध्ये सादर होणारे लघुपट आणि माहितीपट सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी केले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिंदाल टोळीवर मोकाअंतर्गत दोषारोपपत्र दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मारामारी, लूटमार, धमकावणे, खंडणी वसूल करणे या गंभीर गुन्ह्याखाली मोक्काखाली अटकेत असलेल्या हातकणंगले येथील जिंदाल टोळीवर मोक्का कोर्टात सोमवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास-नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी जिंदाल टोळीवर विशेष मोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. अपर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पुण्यातील विशेष मोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. जिंदाल टोळीचा म्होरक्या किशोर सुरेश जैद (वय ४०), शाहरुख आरीफ सुतार (३८), सुरज अब्दुल शेख (३५) आणि केशव संजय कदम (३२, रा. सर्व हातकणंगले) या गुंडांवर आरोपपत्र दाखल झाले आहे.

हातकणंगले परिसरातील खोतवाडी येथे विनायक राजेंद्र माने या तरुणाचा खून झाला होता. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जिंदाल टोळीनेच हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आल्याने पोलिसांनी जिंदाल टोळीचा म्होरक्या किशोर जैद याच्यासह चौघांना अटक केली होती. या टोळीचे गुन्हेगारी कारनामे वाढल्याने परिसरात दहशत वाढली आहे. नागरिकांनी याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रारीही दिल्या आहेत. जिंदाल टोळीची संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सादर केला होता. पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी तपास करून हा प्रस्ताव सादर केला होता. आयजी नांगरे-पाटील यांनी प्रस्तावाला मान्यता देऊन जिंदाल टोळीवर पुण्यातील विशेष मोका कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात पाठवला होता.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांनी नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानुसार पोलिसांनी जिंदाल टोळीचा म्होरक्या किशोर जैद, शाहरुख सुतार, सुरज शेख आणि केशव कदम या चौघांवर पुण्यातील विशेष मोका कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 'पोलिसांच्या या कारवाईमुळे हातकणंगले परिसरातील जिंदाल टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसला आहे, त्याचबरोबर इतर गुन्हेगारांवरही वचक निर्माण झाला आहे. मोकाच्या कारवाईमुळे हातकणंगले परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल,' अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

सहा महिन्यांत दुसऱ्या टोळीवर कारवाई

संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सहा महिन्यात दोन टोळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करून पुण्यातील मोका कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. पाच महिन्यांपूर्वीच इचलकरंजीतील अमोल माळी या गुंडाच्या टोळीवर ही कारवाई केली आहे. यानंतर हातकणंगलेतील जिंदाल टोळीवर मोका कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. याशिवाय कोल्हापूर शहरातील काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. यांच्यावरही मोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीचे काम अर्धवट, लाईटही नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

'राहायला घर नाही, पिण्याला पाणी नाही, चालायला रस्ते नाहीत, हे सगळं सहन करत असताना मरण पावलेल्या व्यक्तिच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीसूद्धा नाही. सांगा तुम्हीच कसं जगायचं आणी कसं मरायचं. महापौर नंदकुमार घोडेले यांना निवेदन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याचे आदेश देऊनही ते काम पूर्ण झालेले नाही. महापालिकेत सातारा परिसर हस्तांतरित झाला असला तरी नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. एक महिन्यापूर्वी ते अर्धवट काम झालेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी झाला, पण तो अंधारात. तिथे एकसुद्धा लाईट नाही. साताऱ्यातील एसआरपीएफ ग्राऊंडकडे जाण्याऱ्या रस्त्याच्या कडेलाच आ. शिरसाट यांनी दिलेल्या निधीतून या स्मशानभूमीचे काम करण्यात आले होते. त्याचे काम अर्धवट आहे. ते अपूर्ण काम पूर्ण झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी लाईट बसण्यात यावेत', अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.

महिन्याभरापूर्वी महापौरांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले असले तरी, अद्यापपर्यंत अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. पुन्हा एकदा अंत्यविधी अंधारात करावा लागल्याने नागरिक आता प्रचंड संतापलेले आहेत. लवकरात लवकर लक्ष घालून हे काम पूर्ण केले नाही, तर आम्ही आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. सातारा परिसरात दोन स्मशानभूमी आहेत. दोन्ही ठिकाणी लाईट नसल्याने या ठिकाणी लाईट लावण्याच्या महापौरांच्या आदेशाची अधिकाऱ्यांनी अद्याप अंमलबजावणी केलेली नाही.

सतत महापौरांकडे आणि आयुक्तांकडे या कामाची मागणी करुणही हे पूर्ण होत नाही. त्यामुळे अंत्यविधीची मोठी अडचण निर्माण होत आहे. आता हे काम लवकर पूर्ण न झाल्यास सर्व नागरिकांच्या वतीने आंदोलन करावे लागेल.

- सोमीनाथ शिराने, संघर्ष समिती

स्मशानभूमीचे कामही अर्धवट आहे. तिथे लाईटही नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. याकडे महापौरांनी लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

- गणेश साबळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत्यूला आमंत्रण देणारा रत्नागिरी मार्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

विहंगम कोकण दर्शनाची मनाला भुरळ पडतेय, दमून थकून गेला आहात तर विरंगुळा म्हणून आल्हाददायक निसर्गाच्या सान्नध्यिात जावंसं वाटतेय... मात्र कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर धावणार असाल तर सावधान! कारण गेल्या वर्षभरात वळणांची भरमार असणाऱ्या या 'राष्ट्रीय' मार्गावर निष्पाप असे ५० हून अधिक जीव गेले आहेत. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील भाडळे खिंड ते आंबा घाट या साधारण पस्तीस किलोमीटर अंतरात गेल्या तेरा महिन्यात झालेल्या पंधरा अपघातात वीसहून अधिकजणांना मृत्यूने आपलेसे केले आहे. तर तीसहून अधिकजणांना जखमी होऊन जायबंदी व्हावे लागले आहे. यातील एकदोन वगळता सर्व अपघात हे बेदरकार वेगामुळे घडले आहेत.

आंबा नजीक तळवडे (ता.शाहूवाडी) येथे शुक्रवारी सकाळी पावणे आकराच्या सुमारास भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटून झाडावर आदळलेल्या कारमधील सहाजणांना एकाचवेळी जीवास मुकावे लागले. याअगोदर येथून जवळच केर्ली गावाजवळ गेल्या रविवारी सायंकाळी वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीवरील दोन युवकांना थेट मृत्यूने कवटाळल्याची घटना ताजीच असल्याने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील विशेष करून शाहूवाडीच्या हद्दीतील प्रवास जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधेरेखित झाले आहे. गेल्या तेरा महिन्यात महामार्गावरील खुटाळवाडी, गोगवे, तळवडे येथे प्रत्येकी दोन, बांबवडे येथे तीन तसेच येळाणे, निळे, भैरेवाडी, मलकापूर, केर्ली, वारूळ पूल या ठिकाणी भीषणता स्पष्ट करतील असे पंधरावर अपघात घडले आहेत. यामध्ये तीन अपघात घटना वगळता उर्वरित अपघाताने किमान एक याप्रमाणे वीसहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. अपघात नोंदीनुसार तीसहून अधिक जखमींचा आकडाही उरात धडकी भरवण्यिास पुरेसा आहे. या मार्गावरील अपघातात जखमी झालेले किंवा बळी गेलेले बहुतेक जण दूर अंतरावरील प्रवासी आहेत. याचाच अर्थ या टप्प्यातील वळणाच्या रस्त्याचा बाहेरून आलेल्या प्रवाशांना अंदाजच येत नाही हे पुन्हा पुन्हा स्पष्ट झाले आहे. भाडळे खिंड उतार, डोणोली, चढउतार व वेड्या वाकड्या वळणाची जुळेवाडी खिंड, करंजोशीतील 'एस' वळण, कडवी नदी पात्रालगत निळे व वारूळ येथील धोकादायक वळण, धोपेश्वर फाटा, वालूर ही या मार्गावरील आणखीन काही ठिकाणे अपघातप्रवणच नव्हे तर अपघातातील कपाळमोक्ष ठरणारी ठिकाणे म्हणून यापूर्वीच परिसराला परिचित झाली आहेत. यामध्ये झाडावर वाहन आदळून गंभीर जखमी किंवा ठार होण्याचे प्रमाण वाढले आहे. सहाजिकच सततच्या अपघातात काही ठिकाणच्या झाडांची साल नाहीशी झाली आहे.

बाहेरच्या प्रवाशांना ही बाब अनभज्ञि ठरण्यास रस्ते सुरक्षाविभाग जबाबदार म्हणता येईल. अनेक कारणांनी या मार्गावरील वाहतूक वर्दळीत दिवसेंदिवस वाढ होत असताना रस्त्यालगत अपवादानेही सूचनाफलक दिसत नाहीत. रस्त्यावर पुरातन काळात बांधकाम झालेल्या छोट्या-मोठ्या पुलांचे संरक्षण कठडे अनेक ठिकाणी निखळलेले आहेत. यावर काही ठिकाणी उपाययोजना म्हणून बांबू किंवा वेळूच्या चिवाट्यांचे संरक्षण कवच उभे केले गेले आहे. तसेच अरुंद रस्ता, पूल, वळण आदी ठिकाणी वाहतुकीच्या नियमांना अनुसरून 'पुढे धोका आहे'..किंवा 'सावकाश जा' यासारख्या प्रवाशांना लक्षवेधी सूचना असायला हव्यात, तुटलेले वाकलेले संरक्षक लोखंडी ग्रील पुन्हा व्यवस्थित करण्याची तसदी घ्यायला हवी. किंबहुना हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला तरीही या गोष्टी संबंधितांच्या नजरेआड राहल्यिा आहेत हे विशेष.

पोलिसांचे अपुरे संख्याबळ

ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह हा वाढता प्रकारही येथील वाढत्या अपघातांना निमंत्रण देत आहे. अपघातानंतर चर्चा होत असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने येथील पोलिसांचे अपुरे संख्याबळ या प्रकारांना आळा घालण्यासाठी असमर्थ ठरत आहे. यामुळे या रस्त्यावरील बेदरकार आणि सुसाट प्रवासात कधी कोण जाणे पुढून मागून ठोकर देईल याचा नेम उरलेला नाही हेच वास्तव आहे. महामार्ग म्हणता येईल असे या रस्त्याचे प्रलंबित विस्तारीकरण केंव्हा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल दुर्घटना : अपघाताचे कारण अस्पष्टच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी

शिवाजी पुलावर शुक्रवारी (ता. २६) रात्री झालेल्या अपघातातील मिनी बसची नव्याने तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी आरटीओ विभागाला दिल्या आहेत. आरटीओ विभागाकडून रविवारी मिळालेल्या अहवालाबाबत पोलिसांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त बसची नव्याने तपासणी होणार आहे. अपघातास कारणीभूत अन्य बाबींचाही शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शिवाजी पुलावरील संरक्षक कठडा बांधून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

शिवाजी पुलावर झालेल्या अपघातातील बस नवीनच होती. नव्या कोऱ्या बसचा अपघात होऊन १३ जणांना जीव गमवावा लागला. चालकाने अचानक ८० अंशाच्या कोनात बस का वळवली? याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी चालक महेश कुचेकर याचा व्हिसेरा राखीव ठेवला होता. चालकाचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी किमान दहा दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच चालकाने मद्यप्राशन केले होते की नाही, याबाबत माहिती मिळणार आहे. बसमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊन अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपघातग्रस्त बसची तपासणी केली जात आहे. अपघातानंतर तातडीने पोलिसांनी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून बसची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राथमिक तपासणीचा अहवाल रविवारी पोलिसांना मिळाला. मात्र याबाबत पोलिसांना शंका उपस्थित झाल्याने त्यांनी अपघातग्रस्त बसची नव्याने पाहणी करण्याच्या सूचना आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बसचे ब्रेक, क्लच, स्टेअरिंग, टायर, अॅक्सल याची माहिती द्यावी, असे पोलिसांनी सुचवले आहे.

संरक्षक कठड्याचे काम तातडीने करा

शिवाजी पुलावरील अपघातानंतर हा पूल दुचाकी वगळता अन्य वाहनांसाठी बंद केला आहे. यामुळे राजाराम बंधाऱ्यावरून वाहतुकीचा ताण वाढला आहे. राजाराम बंधाऱ्यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास या पुलाला धोका होऊ शकतो. तांत्रिक दृष्ट्या शिवाजी पूल भक्कम आहे, त्यामुळे तातडीने कोसळलेल्या संरक्षक कठड्याचे काम करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, असे निवेदन आर्किटेक्ट्स अँड इंजिनीअर्स असोसिएशनने सोमवारी (ता. २९) जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शिवाजी पुलावर झालेल्या अपघातानंतर यावरील वाहतुकीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने तातडीने पुलावरील अवजड वाहतूक थांबवून ती अन्य पर्यायी मार्गांनी वळवली आहे. पन्हाळ्याकडून येणारे बहुतांश वाहनधारक वडणगेमार्गे राजाराम बंधाऱ्यावरून कोल्हापुरात येत आहेत. 'राजाराम बंधाऱ्यावरील पूल का केवळ हलक्या आणि मध्यम वाहनांसाठी तयार केला आहे. यावरून मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास अपघात होऊ शकतो, शिवाजी पुलावरील अपघातानंतर राजाराम बंधाऱ्यावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात अवजड वाहनांचाही समावेश आहे. ही वाहतूक अशीच सुरू राहिल्यास राजाराम बंधाऱ्याला धोका होऊन दुर्घटना होऊ शकते. दोन महिन्यांपूर्वीच शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून, हा पूल सुस्थितीत असल्यचा निर्वाळा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने संरक्षक कठडा बांधून वाहतूक पूर्ववत सुरू ठेवावी. पूल जुना असण्याचा आणि अपघाताचा काही संबंध नाही. राजाराम बंधाऱ्यावर दुर्घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने संरक्षक कठड्याचे काम करावे.'

असोसिएशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट सुधीर राऊत, माजी अध्यक्ष रविकिशोर माने, सुनील मांजरेकर, बाजीराव भोसले, मिलिंद नाईक, सुधीर हंजे, महेश ढवळे, परशराम रेमानिचे, सुधीर पाटील, आदींनी हे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपअभियंता आबदारवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोशल मीडियावर सर्वपक्षीय कृती समितीवर आरोप करून बदनामी करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन कायदे व नियमांची परवानगी घेऊन शिवाजी पुलाच्या डागडुजीच्या कामात समिती कोणतीही आडकाठी येऊ देणार नाही, अशी ग्वाही समितीने दिली.

उपअभियंता आबदार यांनी सोशल मीडियावर शिवाजी पुलाचे काम कृती समितीने बंद पाडले असून या समितीचे सदस्य कार्यालयात येऊन खंडणी मागतात व त्यांना अधिकारी खंडणी देतात, अशी पोस्ट टाकली आहे. कृती समितीच्या सदस्यांनी आबदार यांच्या पोस्टबद्दल जिल्हाधिकारी सुभेदार यांचे लक्ष वेधले. कृती समितीवर आरोप करणाऱ्या आबदार यांच्याकडून खुलासा मागावा, अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी. कांडगावे उपस्थित होते.

कृती समितीने यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अधिकार वापरून पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. तसेच शिवाजी पुलावर उगवलेल्या झाडांमुळे पुलाला धोका उत्पन्न होऊ शकतो याकडे राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुलाला खिळा ठोकण्यासाठीही पुरातत्व विभागाची परवानगी लागते, असे सांगून कृती समितीची बोळवण केली होती. पण पुलाचा कठडा तुटल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्ग समितीने सरंक्षक भिंत कशी उभी केली? असा सवाल केला.

कृती समितीने विरोध केल्यामुळे वाहतूकीसाठी रस्ता बंद केला आहे,असा प्रचार प्रशासनातील काही अधिकारी करत आहेत ही चुकीची गोष्ट आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी अवजड वाहनांसाठी प्रशासनाने रस्ता बंद केल्याचा खुलासा केला. नागरिकांची कोणतीही अडचण होऊ नये व सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम व कायद्याची सांगड घालून शिवाजी पुलावर सरंक्षक कठडा घालावा. नियमानुसार केलेल्या कामात समिती आडकाठी येऊ देणार नाही, अशी ग्वाही समितीच्या सदस्यांनी दिली. समितीच्या शिष्टमंडळात आर. के. पोवार,बाबा पार्टे, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अॅड विवेक घाटगे, प्रकाश मोरे, अजित सासने, अॅड पंडीतराव सडोलीकर, सुभाष देसाई, अशोक रामचंदाणी यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी उपमहापौरांकडून सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका चौकात कार पार्किंगच्या कारणावरुन नगरसेविका अनुराधा खेडकर यांचे पती माजी उपमहापौर सचिन खेडकर यांनी सुरक्षा रक्षकांना सोमवारी दुपारी अर्वाच्य शिवीगाळ केली. माजी सैनिक असलेल्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करण्याबरोबरच चौकातील झाडाला लटकून फाशी देण्याचीही भाषा खेडकर यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर कामासाठी केलेला मोबाइल उचलला नाही व खोटे कारण देऊन फोन घेण्याचे टाळल्याबद्दल माजी विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांनी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली.

गेल्या आठवड्यात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वाहनांच्या पार्किंगबाबत कडक सूचना केल्या होत्या. पदाधिकारी, नगरसेवक तसेच माध्यम प्रतिनिधींव्यतिरिक्त अन्य वाहने चौकामध्ये येऊ देऊ नयेत, असे सांगितले होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी चौकामध्ये कडक अंमलबजावणी सुरू केली होती. सोमवारी दुपारी खेडकर कार घेऊन चौकात आले. कार गेटमधून आत सोडण्यात आली पण ती आयुक्तांच्या वाहनासमोर उभी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील दोन सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवले. कार पार्किंगमध्ये जागा रिकामी असल्याने तिथे कार लावावी, असे सांगितले. त्यानंतर खेडकर यांनी आम्ही चारवेळा निवडून आलो आहे, महापालिकेत आत्ता आला असून आम्हाला शिकवायला लागतात, असे सांगत चौकातील साऱ्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. अर्वाच्य शिवीगाळ ऐकून अनेकांना माना खाली घालायला लागल्या. शिवीगाळ करत असताना चौकातील झाडाला लटकून फाशी देऊ, अशी धमकीही दिली.

दुपारी भरचौकात हा प्रकार सुरू असल्याने सारे कर्मचारी जमले. नगरसेवक ईश्वर परमार यांनी सुरक्षा रक्षक हे माजी सैनिक असून त्यांच्याबाबत आदर राखावा, असे खेडकर यांना समजावत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खेडकर यांनी कारच्या किल्ल्या दिल्या व कार कुठे लावायची तिथे लावा, असे सांगून निघून गेले. दरम्यान, खेडकर यांनी ते सुरक्षा रक्षक माजी सैनिक असल्याचे समजल्यानंतर दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले.

सरनोबतांना जाधव यांची शिवीगाळ

दरम्यान, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक संभाजी जाधव यांनी सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना कार्यालयात जाऊन जोरदार शिवीगाळ केली. महापालिकेतील एका कर्मचाऱ्याची पत्नी शहर अभियंता सरनोबत यांना भेटण्यास आली होती. सकाळपासून महापालिकेत थांबून भेट मिळाली नव्हती. त्यामुळे ती महिला चारनंतर पुन्हा महापालिकेत आली होती. ज्यावेळी सरनोबत कार्यालयात आले, त्यावेळी महिलेने भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्या महिलेने जाधव यांना फोन करून सांगितले. त्यावेळी जाधव यांनी सरनोबत यांना सात वेळा मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सरनोबत यांनी फोन घेतला नाही. तसेच लँडलाइनवरुन केल्यानंतर कर्मचाऱ्यांना साहेब आयुक्त कार्यालयात गेले आहेत, असे सांगण्यास सांगितले. प्रत्यक्षात आयुक्त त्यावेळी कार्यालयात नव्हते. त्यामुळे जाधव महापालिकेत आले व सरनोबत यांना शिवीगाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या: संशयित आरोपी तावडेला जामीन

$
0
0

कोल्हापूर:

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. न्यायालयाने तावडेला कोल्हापूरमध्ये येण्यास मज्जाव केला असून पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, तसेच दर शनिवारी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावावी, या अटींवर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी तावडेच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती. पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित आरोपी तावडे यानेच रचला असून त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. तोच या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला होता. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने तावडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळं त्याला पानसरे हत्या प्रकरणातही जामीन देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली होती. तर एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि त्याच्याविरोधात खोटे पुरावे गोळा करायचे. तसं तपास यंत्रणेनं तावडेच्या बाबतीत केलं आहे. त्याला जाणूनबुजून अडकवले आहे, अशी बाजू तावडेच्या वकिलांनी मांडली होती. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तावडेच्या जामीन अर्जावर ३० जानेवारीला निकाल देण्यात येईल, असं सांगितलं होतं. न्यायालयानं आज तावडेच्या जामीन अर्जावर निकाल दिला. त्याला सशर्त जामीन मंजूर केला. कोल्हापूरमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये आणि दर शनिवारी विशेष पथकासमोर हजेरी लावावी, असे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images