Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आजपासून महाकृषी प्रदर्शन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या क्रीडांगणावर शुक्रवार (ता.२२) पासून महाकृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, प्रदर्शनस्थळी लहान मुलांसाठी अॅम्युजमेंट पार्कही उभारला आहे. शाहूवाडी तालुक्यातील खासकरून शेतकरी व उद्योजकांसाठी महादेव फाउंडेशनने या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे.

गतवर्षी मलकापूर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या तालुक्यातील पहिल्या वाहिल्या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी फाउंडेशनच्या पुढाकाराने बांबवडेत २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत हे महाकृषी प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनामध्ये प्रगत शेती तंत्रज्ञान, औजारे, शेतीसाठी बँकिंग अर्थसाह्य, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे दालन, यांत्रिक शेती, कुक्कुटपालन, मत्स्य उद्योग, रेशीम उद्योग याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. सुधीर दूध, खुटाळे ज्वेलर्स, बालाजी उद्योग समूह मुख्य प्रायोजक असलेल्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत खणीत लाखो जलचर मृत्युमुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कृष्णानगर येथील खणीत परिसरातील सायझिंग व प्रोसेसचे रसायनयुक्त सांडपाणी थेट खणीत सोडले जात असल्याने मोठ्या प्रमाणात जलचर मृत्युमुखी पडले आहेत. खणीच्या काठावर खच पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने दोन दिवसांत

खणीची स्वच्छता न झाल्यास मृत्युमुखी पडलेले जलचर नगरपरिषदेसह सीईटीपी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे यांनी दिला आहे.

शहापूर परिसरात अनेक खणी असून, दोन वर्षांपूर्वी एका खण परिसराचे सुशोभिकरण करुन गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरली जात आहे. पण या खणीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होऊ लागल्याने येथे जलपर्णी निर्माण झाली होती. हे प्रकरण ताजे असताना कृष्णानगर येथील खणीत भागातील प्रोसेसमधील रसायनयुक्त सांडपाणी थेट खणी सोडले जात असल्याचे अनेकदा निष्पन्न होऊन प्रशासन अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काहीच कार्यवाही केली गेली नाही. या दुर्लक्षामुळेच कृष्णानगर परिसरातील खणीतील मासे, कासव यासह अनेक जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत.

यासंदर्भात भागातील नागरिकांनी नगरपरिषदेत जाऊन तक्रारी केली; पण प्रशासनाकडून त्याची काहीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे, नितीन कोकणे, बंडा मुसळे यांची भेट घेऊन या प्रकाराची माहिती दिली. मोठ्या प्रमाणात जलचर मेल्याने भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांत नगरपरिषदेने खणीची साफसफाई न केल्यास मृत्युमुखी पडलेले जलचर नगरपरिषद, सीईटीपी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात आणून टाकू, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनच्या आश्रमांवर छापे का नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी संशयाची सुई सनातन संस्थेवर जात असताना सनातन संस्थेच्या ठाणे व गोवा आश्रमावर छापे का टाकले जात नाहीत? असा सवाल प्रा. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी केला. पानसरे समता संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देताना त्यांनी तपासाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.

प्रा. पाटील, ‘या गुन्हाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सातत्याने बदली होत आहे. गेले महिनाभर तपास अधिकारीपद रिक्त आहे. तपासात सातत्य ठेवण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे. या गुन्ह्यातील संशयित सारंग अकोलकर, विनय पवार यांची छायाचित्रे राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात का लावली जात नाही? पोलिस अनेक अवघड, गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करत असताना पानसरे, दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास होत नाही, हे आश्चर्य आहे.’

‘सनातन संस्थेत काही साधकांना गुंगीचे औषधे दिले जाते, याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पण पोलिसांनी सनातनवर पुढे कोणतीही कारवाई केली नाही. पानसरे हत्येतील संशयितांचे वकील कोल्हापुरात येऊन ‘आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचे’ अशी घटनाविरोधी भूमिका घेत आहेत. पानसरे, दाभोलकर, कुलबुर्गी यांच्या हत्या सकाळी झाल्याने तुम्हीही सकाळी बाहेर फिरायला बाहेर पडा, असे आव्हान अॅड संजीव पुनाळेकर देत आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही,’ याबद्दल प्रा. टी. एस. पाटील, सतीश कांबळे यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही दर महिन्याच्या २० तारखेला निर्भय वॉक आयोजित करून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे घटनाविरोधी वक्तव्ये करत असताना त्यांना नोटीस काढण्याचे धाडसही पोलिस दाखवत नाहीत, असा आरोपही यावेळी केला.

उमा पानसरे यांना धमकीचे पत्र?

उमा पानसरे यांना आलेल्या पत्राची झेरॉक्स नामदेव गावडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिली. या पत्राची प्रत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना यापूर्वी दिली असल्याचे सांगितले. तपासात या पत्राची मदत होईल, असे गावडे यांनी सांगितले. पण पत्राचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.

मी भित्रा नाही

‘मला धमक्याची अनेक पत्रे येतात. पण आम्ही या पत्रांना केराची टोपली दाखवतो. ते धमकी देत असले तरी मी भित्रा नाही,’ असे प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले. पानसरे हत्येनंतर मला पोलिस संरक्षण दिले होते. पण आपण सरंक्षण नाकारले होते. विवेकांची लढाई लढण्यासाठी सरंक्षण नाकारले असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदणी मठाच्या महास्वामींचे निर्वाण

$
0
0



म. टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

‘नांदणी मठाचे स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी (वय ८४) यांचे गुरुवारी निर्वाण झाले. सायंकाळी मठातील निशीधिकेवर ते चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात त्यांना उपचारासाठी आणण्यात आले होते, येथे त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्यावर आज (शुक्रवारी) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत,’ अशी माहिती डॉ. सागर पाटील व दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन सागर चौगुले यांनी पत्रकारांना दिली.

त्यांनी सांगितले की, स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे शिरोळ तालुक्यातील निमशिरगावचे असून सदलगा (ता.चिक्कोडी) येथे ते दत्तक गेले होते. त्यांनी आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून क्षुल्लक दीक्षा घेतली होती. यानंतर प.पू. १०५ चंद्रभूषण महाराज या नावाने ते ओळखले जात होते. देशभर त्यांनी विहार केला. १९९१ साली तत्कालीन नांदणी मठाधिपतींचे निर्वाण झाल्यानंतर ते मठाधिपती बनले. कोल्हापूर, नांदणी, तेरदाळ, बेळगाव या चार धर्मपीठांतर्गत येणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील ७४० गावामध्ये स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या अधिपत्याखाली विधी, विधान, मंदिर जिर्णोद्धार, नव्या मंदिरांची उभारणी तसेच मूर्ती प्रतिष्ठापना, पंचकल्याण पूजा यांसह धार्मिक कार्यक्रम होत होते.

गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते मठातील निशीधिकेवर आले. येथे चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तत्काळ जयसिंगपूर येथील पायोस रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे निर्वाण झाले. रात्री त्यांचे पार्थिव नांदणी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० वाजता निशीधिकेवर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, दादासो पाटील-चिंचवाडकर, उद्योजक अण्णासाहेब चकोते, नगराध्यक्षा नीता माने, नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, सागर संभूशेटे, नगरसेवक शीतल गतारे उपस्थित होते.

०००००००००००००००

आजचे कार्यक्रम रद्द

दरम्यान, महास्वामींच्या निर्वाणामुळे आज (शुक्रवार) दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने कोल्हापुरात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दक्षिण भारत जैन सभा, दिगंबर जैन बोर्डिंग आणि दिगंबर जैन समाजातर्फे भट्टारकरत्न स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी सुवर्ण पट्टाभिषेक व अमृत महोत्सव समारंभ आयोजित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिता-पुत्रास जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द येथे राजकीय वर्चस्ववादातून बंदूक आणि पिस्तुलामधून गोळ्या झाडून दोघांचा खून केल्याप्रकरणी निवृत्त मुख्याध्यापक आनंदा माणकू पाटील (वय ६३) त्याचा मारुती आनंदा पाटील (वय ३२ रा. बेलवळे खुर्द) या पिता -पुत्रास गुरुवारी जन्मठेप आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी शिक्षा सुनावली.

बेलवळे खुर्द गावात भावेश्वरी देवालय चौकात एक जुलै २०१२ मध्ये राजकीय वादातून सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा पाटील आणि मुलगा मारुती पाटील यांनी बंदूक आणि पिस्तुलातून गोळीबार केला होता. यात आमदार हसन मुश्रीफ गटाचे बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर यांच्या गटाचे कार्यकर्ते रवींद्र आनंदा डोंगळे (वय २७) आणि प्रकाश विलास पाटील (वय २४ रा. बेलवळे खुर्द) हे दोन तरुण मृत्यूमुखी पडले होते. तर अनेक लोक जखमी झाले. खुनाची घटना घडण्याच्या एक दिवस आधी ३० जून रोजी प्रमोद पाटील व केरबा पाटील यांना रणजित पाटील, विजय पाटील आणि नातेवाईकांनी शिवीगाळ करून दमदाटी केली होती. यावेळी दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र बैठक घेऊन भांडण करू नका, अशी समज दिली होती. तरीही दुसऱ्या दिवशी एक जुलैला सकाळी साडेनऊ वाजता मारामारी झाली. यावेळी काहीजण लोखंडी पाइप, काठ्या, लोखंडी रॉड घेऊन गावातील भावेश्वरी देवालयाच्या चौकात आले असता तुंबळ हाणामारी झाली. यावेळी आनंदा आणि मारुतीने गोळीबार गेला. यात रवींद्र डोंगळे, प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य काहीजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कोतेकर यांनी कागल पोलिस तक्रार दाखल केली होती.

पोलिस निरीक्षक रमेश बनकर यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड पिरजादे यांनी २६ साक्षीदार तपासले. जखमी कृष्णा महादेव पाटील, अभिज‌ित कोतेकर, राजेंद्र पाटील, प्रकाश डोंगळे, संदीप पाटील, काडतूस विक्री करणारे दुकानदार जैनुद्दीन शिकलगार, अशोक तुकाराम पाटील, डॉ. वीरेंद्रसिंह पोवार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिलांचा युक्त‌िवाद ग्राह्य मानून न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी आरोपी आनंदा व मारुती पाटील याला जन्मठेप व प्रत्येकी ५० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली. तिसरा आरोपी प्रकाश पाटील याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. मात्र तो शिक्षण घेत असल्याने व तीन वर्षाच्या चांगल्या वर्तुणुकीच्या प्रतिज्ञापत्रावर सोडण्यात आले.

मुश्रीफ, घाटगे गटात वाद

कागल तालुक्यात गटातटाचे राजकारण प्रत्येक गावात आहे. बेलवळे खुर्द गावात दिनकर कोतेकर हे मुश्रीफ गटाचे तर आरोपी पाटील हे संजय घाटगे गटाचे समर्थक होते. दोन्ही गटातील राजकीय ईर्ष्येमुळे गावात वाद धुमसत होता. राजकीय वादातून गोळीबार झाला आणि दोघांचा खून झाला. कागलमध्ये विविध गटातटातील राजकारणात अनेक बळी गेले, पण हे प्रकरण दोन खुनामुळे गाजले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत २३ लाख टन उसाचे गाळप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
यंदाच्या ऊस गाळप हंगामाचा पंचेचाळीस दिवसांचा एक टप्पा पूर्ण झाला असून, आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांनी २३ लाख ५८ हजार ५७५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.९७ उतारा मिळाला असून, २५ लाख ८७ हजार ७३३ क्विंटल साखरेचे उत्पन्न झाले आहे. ऊसाच्या हंगामापूर्वी निर्माण झालेला दराचा प्रश्न सोडविल्यानंतर साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला वेग आला आहे.
सरकारने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवागनी दिली होती. एफआरपीचा कोल्हापूर पॅटर्न सांगली जिल्ह्यासाठी लागू करण्यात आल्यानंतर कारखान्यांच्या हंगामाने गती घेतली. जिल्ह्यात अठरा कारखाने असून, त्यामध्ये चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे. तासगाव कारखाना, जतचा डफळे आणि खानापूरखा यशवंत या कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही. मागील पंचचाळीस दिवसांत जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांनी २३ लाख ५८ हजार ४७५ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २५ लाख ८७ हजार ७३३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. सरासरी १०.९७ टक्के साखर उतारा मिळत आहे. साखराळेतील राजारामबापू कारखान्याने गाळप आणि साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. कारखान्याने २ लाख ९९ हजार ५३० मे टनाचे ऊसाचे गाळप करुन ३ लाख ४७ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले, त्यांना ११.५९ टक्के उतारा मिळाला. वसंतदादा कारखान्याने १ लाख ८९ हजार ५७० टन उसाचे गाळप करुन १ लाख ९० हजार ५३० क्विंटल साखर उत्पादन घेतले. शिराळ्याच्या विश्वास कारखान्याने १ लाख ९२ हजार ४२० टन ऊस गाळप करीत २ लाख दहा हजार क्विंटल साखरेचे उत्पादन मिळविले. वाळव्याच्या हुतात्मा कारखान्याने २ लाख २० हजार ९४० टन ऊस गाळप करुन २ लाख ४८ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन घेतले.
दुष्काळी भागातील आटपाडीच्या माणगंगा कारखान्याने १९ हजार ९२० टन ऊसाचे गाळप करुन १३ हजार ५२५ क्विंटल साखर उत्पन्न घेतले आहे. महांकाली कारखान्याने ५४ हजार ९४० टन ऊस गाळप करून ५१ हजार ५७० क्विंटल साखर, राजारामबापूच्या वाटेगाव युनिटने १ लाख ९३ हजार ४१५ टन गाळप व २ लाख २१ हजार पाचशे क्विंटल साखर, वांगीतील सोनहिरा कारखान्याने २ लाख ७१ हजार ९१५ टन उसाचे गाळप करीत ३ लाख साडेपाच हजार क्विंटल साखर, कुंडलच्या क्रांती कारखान्याने २ लाख ३६ हजार ६७० टन ऊसाचे गाळप करून २ लाख ६३ हजार शंभर क्विंटल साखर, कारंदवाडीच्या सर्वोदय कारखान्याने १ लाख ४३ हजार चारशे टन गाळप व १ लाख ६४ हजार ५८० क्विंटल साखर, मोहनराव शिंदे १ लाख १५ हजार ६४० टन गाळप करुन १ लाख २३ हजार सहाशे क्विंटल साखर, कोकरुडच्या निनाई कारखान्याने ४८ हजार १७० टन ऊस गाळप करुन ५० हजार २५० क्विंटल साखर, केन अ‍ॅग्रो कारखान्याने ७० हजार ४३० टन ऊस गाळप करुन ७२ हजार नऊशे क्विंटल साखर, पारे येथील उदगिरी कारखान्याने १ लाख ३८ हजार ९३० टन ऊस गाळप करुन १ लाख ४० हजार २५०, तर श्री श्री साखर कारखान्याने १ लाख ६२ हजार ७६५ टन ऊसाचे गाळप करून १ लाख ४९ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे साखराळे युनिट गाळप आणि साखर उताऱ्यात आघाडीवर आहे. या युनिटने २ लाख ९९ हजार ५३० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून, ११.५९ टक्के उतारा मिळविला आहे. साखरेच्या दरात घसरण झाल्याने साखरेचे मूल्यांकनही कमी झाले आहे. बँकाकडून मिळणारी उचल आणि उसासाठी द्यावा लागणारा पहिला हप्ता यामध्ये एक हजार रुपयांपर्यंतची तफावत आहे. त्यामुळे कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले आहेत. त्यामुळे आंदोलनातून तोडगा निघालेली एफआरपी अधिक २०० रुपये उत्पादकांना कसे द्यायची, असा प्रश्न कारखानदारांपुढे निर्माण झाला आहे.
आकडे सांगतात
हंगामाचा पंचेचाळीस दिवसांचा एक टप्पा पूर्ण
सांगली जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांचे गाळप
२३ लाख ५८ हजार ५७५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप
सरासरी १०.९७ उतारा, २५ लाख ८७ हजार ७३३ क्विंटल साखर उत्पादन
जिल्ह्यात एकूण अठरा कारखाने, चार खासगी कारखान्यांने तासगाव कारखाना, जतचा डफळे, खानापूरचा यशवंत बंद.
राजारामबापू कारखान्याची गाळप, साखर उताऱ्यात आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली-कोल्हापुरात ट्रक चोरीचे रॅकेटचौघांना अटक; २८ लाखांचे स्पेअर पार्ट जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
दहा चाकी ट्रक, डंपरची चोरी करून त्यांची मोडतोड करून त्याचे साहित्य कोल्हापुरातील भंगार दुकानात घालणारी टोळी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २८ लाख ८१ हजार रुपये किमतीचे ट्रकचे सुटे करून विकलेले पार्ट जप्त केले आहेत. या शिवाय टोळीकडे ट्रकपासून कापून वेगळे केलेले तब्बल २१ चॉसी क्रमांक सापडले असून, या टोळीने आणखी काही ट्रक भंगारात घातले असण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक राजन माने यांनी सांगितले.
सांगलीतून एका पाठोपाठ दोन मोठे ट्रक चोरीला गेल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. १२ डिसेंबर रोजी अनिस रशिद चौधरी (वय २७, खंडोबानगर, मलकापूर, कराड) आणि मंगू तुकाराम घुणके (वय ३०, कसबे डिग्रज, आपटेमळा) हे हाताला लागले. त्यांनी सांगलीतील इदगाह मैदानानजीकच्या गॅरेजसमोरील दहा चाकी ट्रक चोरल्याची कबुली दिली. त्या दोघांकडे कसून, चौकशी केल्यानंतर असिफ राजू शेख (वय ३३, रा. सुतार प्लॉट, कोल्हापूर) याचे नावे पुढे आले. त्याला १३ डिसेंबर रोजी अटक केली. या तिघांच्या चौकशीत सांगली, बेळगाव, कोल्हापूरसह इतर ठिकाणी ट्रकच्या चोऱ्या केल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी कोल्हापुरातील भंगार बाजारवर छापा घातला. त्यावेळी परवेझ सादतखान पटेल (वय ४१, रा. साळे गल्ली, सोमवार पेठ, कोल्हापूर) या भंगार दुकानदाराला अटक केली. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. या टोळीकडून एक डंपर, एक ट्रक, दोन ट्रकच्या बॉडी, तीन इंजिन्स, तीन डिझेल टाक्या, अनेक रेडीएटर, बॅटऱ्या, स्टेअरिंग आणि ट्रकची मोडतोड करण्यासाठीचे गॅसकटरसह इतर साहित्य, असा एकूण २८ लाख ८१ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आणि चोरलेले ट्रक भंगारात घेणारे दुकानदार कोल्हापुरातले असल्याने कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेलाही कारवाईबाबत कल्पना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे एकरांवरील ऊस खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
काळोली (ता. पाटण) येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे दीडशे एकरांवरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कांबळे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत संपूर्ण ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाल्याने आक्रमक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
दरम्यान, शेतकरी आक्रमक झाल्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या वेळी तालुक्यातील नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मदत मिळवून देण्याची सक्त सूचना केल्याने घेराव मागे घेण्यात आला.
पाटणपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील काळोली गावच्या हद्दीतील कोयना नदीकाठावरील असणाऱ्या काळवट, इंगळ्याचा माळ, देऊळमाती या शिवारातातील तोडणीला आलेल्या ऊसाला शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीमध्ये सुमारे १०० ते १५० एकर क्षेत्रावरील उसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. यात शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच पाटण तालुका खरेदी विक्री संघाचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आग विझविण्यात अनेक अडचणी येत होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांबरोबरच पुरुष, महिलांनी सहभाग घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात येत असल्याने आगीजवळ जाणे अशक्य होत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्व.जयवंतराव भोसले कार्य प्रेरणादायी:राज्यपाल राम नाईक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘समाजासाठी ध्येयवेडी होणारी माणसे हाताच्या बोटांवर मोजावी एवढीच असतात. त्यातीलच एक नाव कृष्णाकाठचे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले. त्यांचे व्यक्तीमहत्त्व आणि कृती सार्वजनिक जीवनातील भूषण ठरली आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे,’ असे गौरोद्गार उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी काढले.
कृष्णा अभिमत विद्यापीठ संकुलच्या प्रांगणात सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले (अप्पा) यांच्या ९३व्या जयंती समारोहनिमित्त आयोजित केलेल्या स्व. जयवंतराव भोसले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, संग्रहालयाचे लोकार्पण व भगीरथ ग्रंथाचे प्रकाशन, अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल नाईक बोलत होते.
या वेळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार दिलीपराव देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते, शिवाजीराव मोहिते, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले,‘कराडच्या मातीशी माझी नाळ जोडलेली असल्यामुळेच मला स्व. जयवंतरावांच्या जयंती कार्यक्रमात येता आले. सहकारामध्ये काम करीत असताना सर्वसामान्य घटक हा केंद्रबिंदू मानून काम करणारी एकमेव व्यक्ती म्हणून जयवंतरावांचा नामोल्लेख केला तर तो चुकीचा ठरणार नाही. त्यांचे विचार सर्वाना प्रेरणा देत राहोत, त्यांच्या स्मृती चिरकाल टिकाव्यात, यासाठी त्यांचे चिरंजीव डॉ. सुरेश भोसले व नातू डॉ. अतुल भोसले यांनी उभारलेले म्युझियम व पुर्णाकृती पुतळा चिरकाल प्रेरणा देत राहील. जयवंतराव अभ्यासू व बोलक व्यक्तीमत्व होतं, त्यामुळे त्यांनी सहकारक्षेत्रात भरीव कार्य केले. कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार उपलब्ध करून दिला. या शिवाय स्व. जयवंतरावांनी त्या काळी साखर कारखाना, सुतगिरणी, वीज, कारखानदारीतील समस्या या महत्त्वपूर्ण विषयांवर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचेही काम केले.
वैधानिक पातळीवर लढण्याचे जयवंतरावांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे असे आहे. कृष्णा संकुल परिसरात उभारण्यात आलेले जयवंतरावांचा जीवनपट दर्शविणारे अत्यंत विलोभणीय असून, म्युझियम भावी पिढीस मार्गदर्शकाची भूमिका पार पाडेल. जयवंतरावांचा पुर्णाकृती पुतळा सर्वानाच त्यांच्या कार्यकतृत्वाची प्रेरणा देईल. यापुढील काळातही कृष्णा उद्योग समूहाचे माध्यमातून भोसले कुटुंबीयांनी कराड परिसर आदर्श परिसर करण्यासाठी आपले योगदान द्यावे.’
माजी मंत्री पतंगराव कदम, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नापिकीला कंटाळूनशेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

सोलापूर
दिवाकर भारत दराडे (वय ४४) या शेतकऱ्यांने नापिकीला कंटाळून घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत हनुमंत परसू दराडे यांनी वैराग पोलिसात खबर दिली आहे. दिवाकर यांना भालगाव येथे एकर जमीन आहे. त्या जमिनीतील उत्पादनावर त्यांचा प्रपंच चालत होता. मात्र, सतत होणाऱ्या नापिकीला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. भालगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीचे दिवाकर यांचे वडील भारत खंडू दराडे यांचे नावे १ लाख ७० हजार कर्ज आहे, तर चुलते श्रीहरी यांच्या नावे तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांना पाच मुली व एक मुलगा आहे. दोन मुलींचे लग्न झाले आहे तर तीन मुली अविवाहित आहेत. वैराग्य येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून भालगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाती सागर यवलुजे महापौरपदी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्ताधारी काँग्रेसच्या स्वाती सागर यवलुजे यांची अपेक्षेप्रमाणे महापौरपदी तर राष्ट्रवादीच्या सुनील सावजी पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. दोन्ही पदांसाठी शुक्रवारी महापालिकेच्या विशेष सभेत मतदान होऊन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी भाजप, ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा ४८ विरुद्ध ३३ मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी यावेळी काँग्रेस आघाडीला मतदान केले असले तरी मतदानाच्या क्षणापर्यंत तटस्थ रहायचे की मतदान करायचे, याबाबत फोनवरुन वरिष्ठांशी संपर्क साधून अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापौर, उपमहापौर निवडणूक थोडी उत्कंठावर्धक झाली.

निवडीनंतर महापौर यवलुजे व उपमहापौर पाटील यांच्या समर्थकांनी महापालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. तसेच प्रभागांमध्ये सायंकाळपर्यंत जल्लोषी मिरवणुकाही काढण्यात आल्या. नूतन महापौरांना १५ मेपर्यंतचा कालावधी मिळणार असून त्यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला गटातून महापौर निवडला जाणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार हे महापालिकेच्या निवडीच्या विशेष सभेसाठी पीठासन अ​धिकारी होते.

सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात झाली. भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक साडेदहाच्या सुमारास सभागृहात आले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ कार्यालयातून आरामबसमधून पावणेअकराच्या सुमारास महापालिकेत आले. यावेळी दोन्ही आघाडीकडील कुणीही नेते उपस्थित नव्हते. काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी जरीचे भगवे फेटे तर गळ्यात पक्षाच्या चिन्हांचे मफलर घातले होते. यवलुजे व पाटील यांनी तिरंगी फेटा बांधला होता. महापौरपदासाठी प्रथम मतदान घेण्यात आले. त्यात भाजपच्या मनीषा कुंभार यांच्यासाठी प्रथम तर काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांच्यासाठी नंतर हात उंचावून मतदान नोंद करण्यात आले. हात उंचावलेल्या मतदारांची स्वाक्षरी घेण्यात बराच कालावधी गेल्याने जवळपास तासभराचा वेळ लागला. त्यानंतर अशाच पद्धतीने उपमहापौरपदासाठीही मतदान घेण्यात आले.

महापौरपदासाठी काँग्रेसच्या स्वाती यवलुजे यांना ४८ तर भाजपच्या उमेदवार मनीषा कुंभार यांना ३३ मते पडली. उपमहापौरपदासाठी अशाच पद्धतीने मतदान होऊन राष्ट्रवादीचे सुनील पाटील विजयी झाले. पीठासन अधिकारी खेमनार यांनी निकाल जाहीर केल्यानंतर महापालिकेसमोर करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने व वाद्यांच्या दणदणाटाने महापालिकेचा परिसर दणाणून गेला.

......

स्वाती यवलुजे ४५ व्या महापौर

प्रभाग क्र. ६, मतदार संघ लाइन बाजार

सुनील पाटील ४२ वे उपमहापौर

प्रभाग क्र. ६७, मतदार संघ रामानंदनगर-जरगनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शूटिंग रेंजचे ‘लक्ष्य’ दूरच!

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या नेमबाजपटूंची कामगिरी लक्षात घेऊन कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुल आणि महापालिकेच्या दुधाळी शूटिंग रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजसाठी इमारती उभारल्या आहेत. दोन्ही ठिकाणी भव्यदिव्य एअर कडिंशन रेंज उभारली असली तरी साहित्यअभावी ही शूटिंग रेंज धूळ खात आहेत. टेंडर नोटीस आणि निधीअभावी शूटिंग रेंजचे ‘लक्ष्य’ दूरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

१९७२ मध्ये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. कोल्हापूर शहराच्या जडणघडणीत मैलाचे दगड ठरलेले तत्कालीन प्रशासक व्दारकानाथ कपूर यांनी दुधाळी येथे धर्मवीर संभाजीराजे शूटिंग रेंजची उभारणी केली. जयसिंगराव कुसाळे, रमेश कुसाळे आणि सखारामबापू खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शूटिंग रेंजच्या नेमबाजांना तब्बल वीस वर्षांनंतर यश मिळू लागले. गोल्डन गर्ल तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, संदीप तरटे, नवनाथ फरताडे, गिरीजा देसाई, फुलचंद बांगर यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत भारताला पदके मिळवून दिली.

कोल्हापूरच्या शूटिंगचा दबदबा वाढू लागल्याने अनेक उदयोन्मुख खेळाडू शूटिंगकडे वळू लागले आहेत. रेसकोर्स येथील विभागीय क्रीडा संकुलात पाच कोटी रुपयाहून अधिक निधी खर्च करुन १० मीटर इनडोअर, २५ मीटर आउटडोअर, ५० मीटर इनडोअर आउटडोअर शूटिंग रेंज इमारती उभारल्या आहेत. मात्र या रेंजमध्ये अद्याप साहित्य नसल्याने इमारती धूळ खात आहेत. साहित्य खरेदीसाठी दीड कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी टेंडर प्रक्रियेतील तांत्रिक प्रक्रियेमुळे साहित्य खरेदीला अंदाजे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

२०१४ मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुधाळी येथे शूटिंग रेंज उभारणीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. दुधाळी येथे एअरकंडिशन्ड शूटिंग रेंजची इमारत उभी आहे, पण साहित्य नसल्याने ही इमारतही धूळ खात आहे. साहित्यासाठी महापालिकेने नाविन्यपूर्ण योजनेतून ६० लाखाच्या निधीची मागणी जिल्हा नियोजन मंडळाकडे केली आहे. पण महापालिकेने शूटिंग रेंज उभारणीसाठी उभारलेला निधी कसा खर्च केला याचे उपयोजिता सर्टिफिकेट दिले नसल्याने हा निधी थांबला आहे. निधी मंजुरी आणि साहित्य खरेदी झाल्यानंतर प्रत्यक्ष रेंज सुरु होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. शूटिंग रेंज उभारणीसाठी कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारामुळे दोन्ही इमारती आणखी काही वर्षे धूळ खात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


००००

शूटिंग रेंज साहित्यासाठी राज्य सरकारचा एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून टेंडर प्रक्रिया सुरु आहे. दोन ते तीन महिन्यात शूटिंग रेंज सुरू होईल.

माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडाधिकारी


००००

दुधाळी शूटिंग रेंजसाठी यापूर्वी महापालिकेला दोन कोटींचा निधी दिला आहे. पण महापालिकेने उपयोजिता सर्टिफिकेट दिलेले नाही. त्यांनी आणखी ६० लाखाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवला आहे. पण हा निधी नाविन्यपूर्ण योजनेतून देता येत नाही. तो क्रीडा साहित्य खरेदीतून देता येणे शक्य आहे.

एस. एच. यादव, जिल्हा नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर निवडणुकीच्यानिमित्ताने शुक्रवारी महापालिकेतील शिवसेनेच्या चार नगरसेवकांची तळ्यात मळ्यातील भूमिका पुन्हा एकदा उघड झाली. वरिष्ठांकडून फोनवरुन तटस्थ राहण्याचे आदेश दिले असताना अखेरच्या क्षणी साऱ्यांनीच काँग्रेस आघाडीच्या बाजूने मतदान केले. पण मतदानापूर्वी जागेचे कारण सांगून भाजप, ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या बाजूला बसून शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधात जाण्याचे संकेत दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांची धावाधाव झाली.

या सभागृहातील पहिल्या महापौर निवडीवेळी शिवसेनेची मते मिळवण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आणण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेने कधी तटस्थतेची तर कधी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची भूमिका घेतली. या निवडणुकीसाठीही नेत्यांचा निरोप नव्हता. त्यामुळे सकाळी अकरा वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी नेत्यांशी फोन संपर्क सुरू झाले. प्रथमता शिवसेनेचे नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण हे तिघे सदस्य भाजप, ताराराणी आघाडीच्या सदस्यांजवळ बसले होते. मुळात त्या तिघांशी काँग्रेस आघाडीच्यावतीने गुरुवारपासून संपर्क केला होता. तरीही शेवटच्या क्षणी जागेचे कारण सांगून विरुद्ध बाजूला बसलेले पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या कारभाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ४४ असले तरी शिवसेनेच्या चार सदस्यांनी शेवटच्या क्षणी उलटा निर्णय घेतला व त्यांना काँग्रेस आघाडीतील आणखी चार नाराजांची साथ मिळाली तर धक्कादायक परिस्थिती झाली असती. त्यामुळे शिवसेनेच्या या चार सदस्यांना सोबत ठेवण्याची आवश्यकता काँग्रेस आघाडीला होती. ही परिस्थिती विचारात घेऊन प्रथम त्या सदस्यांना काँग्रेस आघाडीच्या बाजूने बसण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जागा दिल्या.

सततचे फोन आणि सदस्यांची धावपळ

त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी वरिष्ठांशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना तटस्थ राहण्याची व गरज लागल्यास काँग्रेस आघाडीला मदत करण्याचा संदेश देण्यात आला होता. या प्रकारामुळे ते सदस्यही गोंधळून गेले. त्यातून त्यांचे सतत सभागृहातून बाहेर जाणे व आत येणे सुरू राहिले. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सभागृहातून कुणाला बाहेर जाता येणार नाही व आतही येणार नाही, असा आदेश पीठासन अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे त्या सदस्यांमध्ये आणखी अस्वस्थता पसरली. ही अस्वस्थता सभागृह पहात होते. प्रथम भाजपच्या उमेदवारांसाठी मतदान घेतल्याने आणखी काही वेळ या सदस्यांना मिळाला. तोपर्यंत नियाज खान, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले यांचाही फोन सुरू होता. अखेर मतदानावेळी या तिघांनी हात वर केल्यानंतर निल्ले यांनीही हात वर केला.

समझोत्यांतर मतदान

उपमहापौरपदाच्या ​मतदानावेळी काही क्षण अगोदर तीनही सदस्य सभागृहाबाहेर होते. त्यावेळी मतदानात तटस्थ राहण्याची चर्चा होती. पण काँग्रेसच्यावतीने असा प्रकार झाल्यास चुकीचा संदेश जाईल, असे सांगण्यात आल्याने अखेर मतदानावेळी सर्व सदस्य आत येऊन काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे कारभाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण या सदस्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत फोनवरुन चालवलेल्या संपर्कामुळे नेमका काय समझोता झाला याची चर्चा सुरू होती.

.......

फरास यांची प्रकृती बिघडली

दोन दिवसांपासून माजी महापौर हसीना फरास यांची प्रकृती ठीक नाही. चक्कर येत असल्याने त्यांना नीट चालताही येत नव्हते. तरीही त्या मतदानासाठी सभागृहात आल्या होत्या. मतदानासाठीही त्यांना हात नीट वर करता येत नव्हता. त्यामुळे शेजारी बसलेल्या काँग्रेसच्या प्रतिक्षा पाटील यांनी त्यांच्या हाताला आधार दिला. महापौरपदाचे मतदान झाल्यानंतर त्यांना आणखी अस्वस्थ वाटू लागल्याने महापालिकेचे डॉक्टर अमोल माने यांना तपासणीसाठी बोलवण्यात आले. त्यावेळी त्यांचे ब्लडप्रेशर तपासण्यात आले. पण फरास यांनी मतदान करून जायचे असे सांगितल्याने मतदान प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत त्या सभागृहात थांबून होत्या. पीठासीन अधिकारी खेमनार यांनीही फरास यांची प्रकृती ठीक असल्याची खात्री करुन घेतली.



थेट पाइपलाइनमधील त्रुटी दूर करणार

महापौरपदासाठीचा कालावधी मे महिन्यापर्यंत आहे. त्यामुळे शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या थेट पाइपलाइन योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. आठ दिवसांत कामाची पाहणी केली जाणार आहे. त्यातील ज्या त्रुटी आहेत, त्यातील जास्तीत जास्त दूर करण्याचा प्रयत्न करुन योजनेच्या कामाला गती देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापाठोपाठ माझ्या प्रभागातील कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न असेल. कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यातून वीज निर्मिती करण्याचा रोकेमचा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे. त्यातून कचऱ्याचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न असेल. झूम कचरा प्रकल्प हलवण्यात येणार आहे. एसटीपी प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणींचीही सोडवणूक करुन शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस आहे. स्ट्रॉम वॉटर योजनाही मार्गी लावण्यासाठी प्रशासनाबरोबर चर्चा करण्यात येणार आहे.

स्वाती यवलुजे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदणीचे महास्वामी अनंतात विलीन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो श्रावक-श्राविकांनी णमोकार मंत्राचा जयघोष केला. पुष्पाभिषेक, जलाभिषेकासह विविध धार्मिक विधी केल्यानंतर गावकामगार पाटील महावीर पाटील यांनी पार्थिवास अग्नी दिला. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे गुरुवारी सायंकाळी निर्वाण झाले. त्यानंतर रात्री नांदणी येथील मठात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. सकाळी श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत णमोकार मंत्र व जाप्य करण्यात आले. चारूकीर्ती महास्वामी व स्वस्तिश्री सौरभसेन महास्वामी (मुडबिद्री) यांनी श्लोकरूपात भक्ती सादर केली. महास्वामींवर अग्निसंस्कारासाठी सवाल झाले. सकाळी १० वाजता विमानरूपी रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत हजारो श्रावक-श्राविका तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.

मठापासून गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा आडकेवाडी रस्त्यावरील मठाच्या शेतात आली. येथे लक्ष्मीसेन महास्वामी, चारूकीर्ती महास्वामी, स्वस्तिश्री वृषभसेन महास्वामी, स्वस्तिश्री सौरभसेन महास्वामी, देवेंद्रकीर्ती महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधीनंतर अंत्यविधी केले. महावीर पाटील यांनी अग्नी दिला. यावेळी शोकाकुल वातावरणात हजारो श्रावक-श्राविकांनी णमोकार मंत्राचा जयघोष केला.

यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, रावसाहेब पाटील बोरगावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, जयसिंगपूरचे उपनराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, निवेदिता माने, पी. के. मग्गेन्नावर, भारत ओसवाल, अभिनंदन खोत, सावकर मादनाईक, अण्णासाहेब चकोते, डी. ए. पाटील, सागर चौगुले, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, पी. एम. पाटील, राहुल खंजिरे, नानासाहेब गाठ, अजित कुचनुरे, राजवर्धन नाईक-निंबाळकर आदींसह श्रावक-श्राविका उपस्थित होते. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२५) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. मध्ये तोंडाच्या कॅन्सरचे चार संशयित

$
0
0

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाचे मोफत मौखिक आजार तपासणी श‌िबिर घेण्यात आले. त्यामध्ये तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यातील तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान भीतीपोटी तंबाखू, गुटखा, पान मसाला खाणारे, सिगारेट ओढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तपासणीला दांडी मारली. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांच्या निदर्शनास आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी शि‌बिर आयोजित केले जाईल. तरीही दांडी अनुपस्थित राहिल्यास नोटीस काढण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतंत्र समितीद्वारे खंडपीठाचा पाठपुरावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेल्या खंडपीठ आंदोलनात निर्णायक क्षणी शिथिलता येत आहे. खंडपीठाचा पाठपुरावा करण्यासाठी सहा जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकिलांची स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला. समितीच्या माध्यमातून सरकारवरील दबाव वाढवला जाणार आहे, त्याचबरोबर सरकारने एक महिन्याच्या आत केवळ कोल्हापूरसाठी नव्याने ठराव करावा, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा बैठकीतून देण्यात आला. शुक्रवारी शाहू मार्केट यार्ड परिसरातील सभागृहात बैठक पार पडली.

कोल्हापूरसह आसपासच्या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे यासाठी गेली ३० वर्षे आंदोलन सुरू आहे. सातत्याने आंदोलन करूनही केवळ आश्वासने देऊन सरकार आंदोलकांची दिशाभूल करते. निर्णायक क्षणी आंदोलनात शिथिलता येते. आंदोलनाची दिशा ठरवण्यातही गोंधळ होतो. त्यामुळे आंदोलनाचा पाठपुरावा करण्यासाठी सहा जिल्ह्यांतील ज्येष्ठ वकील आणि बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला.

यावेळी साताऱ्याचे ज्येष्ठ विधीज्ञ धैर्यशील पाटील म्हणाले, ‘उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांनी दिलेला ठराव कोल्हापूरच्या बाजूने होता. सरकारने त्या अहवालाचा सकारात्मक विचार करावा. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करून अडचणी वाढवण्यात काहीच अर्थ नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नवीन ठरावाबाबत दबाव वाढवावा. एक महिन्यात काही झाले नाही, तर मग पुन्हा आंदोलन तीव्र करू.’

माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, ‘सरकार सहजासहजी कोल्हापूरला खंडपीठ देईल असे वाटत नाही. गेली ३० वर्षे आपण अर्ज आणि विनंत्या करीत आहोत. आता चर्चा आणि बैठका घेऊन हा प्रश्न निकाली निघेल असे वाटत नाही. सरकारला जाग येईल, असे आंदोलन करण्याची गरज आहे.’

माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे म्हणाले, ‘आपल्या हातात आता केवळ दीड वर्षांचा कालावधी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा पाच वर्षे सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करेल, त्यामुळे आत्ताच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी आहेत. आंदोलनाची ताकद वाढवण्याशिवाय पर्याय नाही.’

सांगलीचे माजी अध्यक्ष ॲड. श्रीकांत जाधव यांनीही निर्णायक आंदोलनाची गरज व्यक्त करीत आंदोलनाच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे सांगितले. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. प्रशांत शिंदे म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर आम्ही फोनवरून चर्चा केली. त्यावेळी महिनाभरात नवा ठराव उच्च न्यायालयात पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच काम झाले नाही. पालकामंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भेटीनंतर महिनाभरात कोल्हापुरातील खंडपीठाचा प्रस्ताव हायकोर्टात पाठवला नाही तर, मग आमचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ फेब्रुवारीपासून सहा जिल्ह्यांत आंदोलन तीव्र केले जाईल.

यावेळी ॲड. संभाजी मोहिते, ॲड. अजित मोहिते, ॲड. शिवाजीराव चव्हाण, इचलकरंजी बार असोसिएशनचे विश्वास चुडमुंगे, जयंत बलुगडे, पंढरपूरचे ॲड. बी. बी. भादोले यांची मनोगत व्यक्त केले. सांगली अध्यक्ष शैलेद्र हिंगमिरे, साताऱ्याचे अध्यक्ष वैभव काटकर, उपाध्यक्ष भगवंतराव सानप, सांगोला बारच्या अध्यक्षा संजिवनी खांडेकर, विवेक घाटगे, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.

कंन्झ्युमर बेंचचे कामकाज १५ दिवस चालावे

सध्या कोल्हापुरात सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी कन्झुमर सर्किट बेंचचे कामकाज महिन्यातील ७ दिवस चालते. यातील तीन दिवस कमी करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. असे झाल्यास प्रलंबित खटल्याची संख्या वाढणार आहे. त्यामुळे १५ दिवस कामकाज चालावे यासाठी प्रयत्न करण्याचा ठरावही या बैठकीत मांडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांवर फौजदारी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्यातील ड्रेनेज लाइन दुरुस्तीस होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ शिवसेनेने महानगरपालिकेवर मोर्चा काढून धडक मारली. जयंती नाल्यात मिसळणारा मैला थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या जिविताशी खेळ करणाऱ्या महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जल अभियंत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

अवकाळी पावसामुळे जयंती नाल्याला आलेल्या फुगवट्यामुळे मैला वाहून नेणारी तुटल्यामुळे मैला थेट नाल्यात मिसळत आहे. घटना घडल्यापासून १०० दिवस उलटूनही दुरुस्ती न झाल्याने जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्या महानगरपालिका आयुक्त आणि जलअभियंत्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जयंती नाल्यातील सांडपाण्याने भरलेल्या घागरी आणि ढोल ताशाच्या निनादात मोर्चा काढला. महापौर निवडीमुळे शिवसैनिकांनी उत्तर दरवाजावर निदर्शने न करता पूर्व दरवाजाजवळ अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर केली. पोलिसांनी दरवाजाजवळ मोर्चा अडवला पण पोलिसांचे कडे तोडून शिवसैनिक चौकात घुसले. यावेळी पोलिसांशी त्यांची झटापट झाली. शिवसैनिक आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत असताना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी त्यांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शन केली.

मोर्चाला महानगरपालिका अतिकिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर सामोरे गेले. त्यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. शहरातील सांडपाण्यामुळे पंचगंगेचे पाणी दुषित होत आहे. २०१२ मध्ये काविळीमुळे ३८ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. पाणी प्रदूषणप्रश्नी गेल्या २० वर्षांत महानगरपालिकेचा वीज पुरवठा खंडीत करणे, आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, महानगरपालिका बयाणा रक्कम जप्त करणे अशा कारवाया होऊनही पंचगंगेचे प्रदूषण थांबलेले नाही. ड्रेनेज लाइन दुरुस्त न केल्याने गेले १०० दिवस मैला जयंती नाल्यात मिसळत आहे. प्रदूषणाला आयुक्त चौधरी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनात शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, शशी बिडकर, कमलाकर जगदाळे, विनायक जाधव, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे,जयश्री खोत, मेघना पेडणेकर, अवधूत साळोखे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या एमआयडीसीचा प्रस्ताव बेदखल

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी नव्या एमआयडीसीची गरज आहे. उद्योजकांनी विकासवाडी आणि अर्जुनी या नवीन एमआयडीसींसाठी केलेला मागणीचा प्रस्ताव एमआयडीच्या कार्यालयातच पडून आहे. भविष्यात एमआयडीसीची गरज असूनही विस्तारीकरणाचे घोडे राजकीय इच्छाशक्तीत अडकले आहे. गोकुळ शिरगाव, कागल फाइव्ह स्टार एमआयडीसी आणि शिरोली एमआयडीसीही चौथ्या एमआयडीची मागणी उद्योजकांच्यातून होत आहे. नव्या मागणीसह कागल एमआयडीसीतही काहींनी जागा अडविल्याने उद्योगाच्या विस्ताराला खीळ बसली आहे.

जिल्ह्यात अर्जुनी आणि विकासवाडी येथे औद्योगिक वसाहतीसाठी जागा मंजूर आहेत. त्यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे भूसंपादनात अडथळे येत असल्याचे चित्र आहे. विरोधाला विरोध म्हणून हस्तांतरण लांबणीवर पडले आहे. नवी एमआयडीसी झाल्यास रोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकेल. मेक इन कोल्हापूरच्या माध्यमातून कोल्हापूर ब्रॅण्डला चालना मिळण्याची शक्यता होती. रोजगाराच्या उपलब्धतेबरोबरच आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा होती. क्षमता, मनुष्यबळ उपलब्ध असून, जिल्ह्यातील तरुण उद्योजकांना नव्या उद्योगांसाठी किंवा उद्योग विस्तारासाठी जागा मिळत नसताना, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल दहा वर्षे काही प्लॉट्स पडून आहेत. प्रत्यक्षात ताबा दिल्यानंतर पाच वर्षांत तेथे उद्योजकांनी उद्योग सुरू करणे अपेक्षित असते. मात्र, तरीही या उद्योजकांना दहा वर्षे मुदतवाढ देणारे कोण? असा प्रश्न जागांच्या प्रतीक्षेत असलेल्या उद्योजकांकडून केला जात आहे.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असताना उद्योजकांचे कागल एमआयडीसीकडे डोळे लागले होते. यामध्ये काही उद्योजकांना तेथे जागा मिळाल्या मात्र, काही उद्योजक आजही जागांसाठी धडपडत आहेत. पण काहींनी कोणताही उद्योग सुरू न करता अकारण जागा अडवून ठेवल्या आहेत. जागा घेऊन गुंतवणूक करायची आणि काही वर्षांनी मार्केट भावाने विकायची हा काहीचा प्रमुख उद्योग बनला आहे. या प्रकारामुळे एक तर, गरजू आणि प्रामाणिक उद्योजकांना जागा मिळत नाहीत. जागा घेण्याचा प्रयत्न केला तर दलालातर्फे मार्केटच्या भावाने विनाकारण जादा रक्कम भरून जमीन घ्यावी लागते. यात सगळ्यांत मोठे नुकसान एमआयडीसीचे होते आणि जागा अडविलेल्या माफियांना करोडो रुपयांचा फायदा होताना दिसत आहे. उद्योग विस्तारासाठी जमीन मिळत नाही. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होण्यासाठी अशा जागा होतकरू उद्योजकांना देऊन तेथे रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे.



अर्जुनी आणि विकासवाडी एमआयडीसीला काहींनी विरोध केला. नव्या एमआयडीसीला जागा देण्यासाठी विरोध केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटत चालला आहे. एमआयडीसीकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी नसल्याने जमीन संपादनाचा मोठा अडथळा आहे. भविष्यातील नवीन एमआयडीसीची गरज भासणार आहे.

राजू पाटील, अध्यक्ष, स्मॅक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाताळ’ची बाजारपेठ फुलली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केवळ दोन दिवसांवर नाताळ सण आल्याने शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ फुलून गेली आहेत. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यांसह नविन कपडे, विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. लक्षवेधी विद्यूत रोषणाईने शहराच्या सौदर्यांत भर पडली आहे.

सोमवारी (ता. २५) नाताळ आहे. त्यामुळे ख्रिस्ती समाजाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. शहरातील राजारामपुरी, शाहुपूरी, लक्ष्मीपुरी, महानगरपालिका चौक, गांधीनगर या भागातील दुकानात नाताळासाठी आवश्यक वस्तूंची आकर्षक पध्दतीने मांडणी केली आहे. होली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, बालकांसह अबालवृध्दांचे रेडीमेड कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉज, ख्रिसमस बॉल्स, टोप्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. शुभेच्छावेळी भेट देण्यासाठी मिठाई खरेदी केली जात आहे. होलीक्रॉस, सेंट ‌झेवियर्स हायस्कूलमध्ये आज (शनिवारी) सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ख्रिस्ती युवाशक्तीतर्फे बुधवारी शहरातून सुवार्ता रॅली काढण्यात आली.

सेंट फ्रान्सिस, ख्राइस्ट, वायल्डर मेमोरियल, ऑल सेंट, झेवियर्स चर्चना आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे. सोमवारी सर्व चर्चमध्ये दिवसभर धर्मगुरूंचे प्रवचन, प्रार्थना होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारपासून सरकारी कार्यालयांना तीन दिवसांची सलग सुटी मिळत आहे. त्यामुळे पुन्हा खरेदीला गर्दी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी नियोजन केले. आतापासून सोशल मीडियावरून नाताळच्या शुभेच्छांचे वर्षाव सुरू झाले आहेत. एसएमएस, व्हॉट्सअॅप, ‌ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ख्रिसमस फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलमध्ये फुड स्टॉल्स, विविध खेळ, कॅरल सॉग्स, फनी गेम्स, फॅन्सी ड्रेस, ड्राईंग स्पर्धा घेतल्या जात आहेत. पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे चर्च परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.

महोत्सवाची मेजवानी

पोलिस उद्यानात २४ ते २८ डिसेंबर दरम्यान फुलांचा महोत्सव आयोजित केला आहे. नाताळमध्ये महोत्सव होत असल्याने बाहेर गावांहून आलेल्या पर्यटकांना फुल महोत्सव पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. चर्चसह विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना हजेरी लाऊन महोत्सव पाहता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, आकोलकर फरार घोषित करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांना फरार घोषित करावे, अशी मागणी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी शुक्रवारी (ता. २२) कोर्टात केली. दरम्यान, साक्षीदार संजय साडविलकर याच्याविरोधात अर्ज देऊनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याने त्याच्याविरोधात कोर्टात तक्रार अर्ज देण्यास समीर गायकवाड याला परवानगी मिळावी, अशी मागणी संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी केली आहे. पुढील सुनावणी गुरुवारी (ता. ४) होणार आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड, (रा. सांगली) डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. पुणे), विनय बाबुराव पवार (रा. उंब्रज, ता. कराड) आणि सारंग दिलीप आकोलकर (रा. शनिवारपेठ, पुणे) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यातील समीर गायकवाड याला जिल्हा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, तर दुसरा संशयित डॉ. तावडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपपत्रातील पवार आणि आकोलकर हे दोघे पोलिसांना सापडले नाहीत, त्यामुळे या दोघांचीही छायाचित्रे आणि माहिती प्रसिद्ध करून यांना उद्घोषित आरोपी जाहीर करावे, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली होती. यानुसार कोर्टाने ८ ऑगस्ट, २०१७ मध्ये पवार आणि आकोलकर यांना नोटीस काढून ३० दिवसांच्या आत कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले होते. दोन्ही संशयित कोर्टात हजर झाले नाहीत. सातारा आणि पुणे पोलिसांनी संशयितांच्या पत्त्यांवर शोध घेऊनही ते मिळाले नाहीत, त्यामुळे यांना फरार घोषित करावे, अशी मागणी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. सातारा आणि पुणे पोलिसांचा तपास अहवालही वकिलांनी कोर्टात सादर केला. दरम्यान, संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे.

साडविलकरांच्या चौकशीसाठी अर्ज

पानसरे यांच्या हत्येबाबत पोलिसांकडे साक्ष देणारे संजय साडविलकर यांनी केलेल्या शस्त्रविक्रीची चौकशी करावी, अशी मागणी संशयित समीर गायकवाड याने अर्जाद्वारे पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी हा अर्ज गांभीर्याने घेतला नाही, असा आरोप संशयिताचे वकील समीर पटवर्धन यांनी कोर्टात केला. याबाबत समीर गायकवाड याला कोर्टात तक्रार अर्ज करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही त्यांनी कोर्टात केली होती. यानुसार शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पवार यांच्याकडे साडविलकर यांच्या चौकशीचा अर्ज सादर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images