Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पर्यायी पुलाला उजाडणार नववर्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या परवानगीअभावी रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाच्या अडथळ्याची शर्यत कायम राहणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व कायद्याच्या सुधारणा विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतरच बांधकाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. ही प्रक्रिया झाली तर बांधकाम पूर्ण होण्यासाठी नववर्षाची वाट पहावी लागणार आहे.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामास परवानगी न मिळाल्याने १० डिसेंबर, २०१५ पासून पुलाचे बांधकाम रखडले आहे. पुलाच्या दोन गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून एका गाळ्याचे काम अपूर्ण असल्याने गेली दोन वर्षे काम रखडले आहे. कोल्हापूर जिल्हा नाग​री कृती समितीने काम त्वरित सुरू करावे, यासाठी आंदोलन करून पाठपुरावा सुरु आहे. पुरातत्व विभागाच्या ब्रह्मपुरी टेकडीपासून २०० मीटर अंतरावर तिसरा पिलर येत असल्याने केंद्रीय पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. केंद्रीय पुरातत्व कायद्यामुळे सार्वजनिक हिताची अनेक कामे रखडली असल्याने केंद्र सरकारने नवीन कायद्याचा प्रस्ताव तयार केला आहे. १७ मे, २०१७ रोजी केंद्र‌ीय मंत्र‌िमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी आपणच पाठपुरावा केला म्हणून जिल्ह्यातील नेत्यांनी फलकबाजी केली. तसेच ऑक्टोबरनंतर कामास सुरुवात होण्याची घोषणाही केली. पण प्रत्यक्षात कायद्याच्या प्रस्तावाला हिवाळी अधिवेशनात लोकसभा, राज्यसभेत मंजुरी मिळणार आहे. नेत्यांनी ऑक्टोबरनंतर पुलाचे काम सुरु होणार म्हणून जनतेची फसवणूक केली असल्याने कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर दोन वेळा धडक मारून अधिकाऱ्यांना जाब विचारला. पण पुरातत्त्व खात्याच्या कायद्याच्या मंजुरीनंतरच पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे केंद्रीय पुरातत्त्व विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. शिवाजी पूल धोकादायक स्थितीत असून नवीन पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कायदा मंजुरीसाठी राज्य व केंद्राकडे पाठपुरावा करून पुलाचे गांभीर्य पटवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात समितीच्यावतीने विविध मार्गानी आंदोलन करून केंद्र सरकार व नेत्यांवर दबाव आणण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.

पुरातत्व कायदा बदलाला केंद्रीय मंत्र‌िमंडळाने मंजुरी दिली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर पूल बांधणीचा मार्ग मोकळा होणार आहे.त्यासाठी दिल्लीत सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छठपूजा उत्सवाने उजळला घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मावळतीकडे झुकणाऱ्या सूर्याच्या साक्षीने पंचगंगा नदीच्या घाटावर छठपूजा उत्सव उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिवाळीनंतर येणाऱ्या सूर्यषष्ठीदिवशी नदीची पूजा करून व्रत करण्यात आले.

कोल्हापुरात व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या उत्तर भारतीय समाजातील महिलांनी सहकुटुंब हा पूजाविधी केला. राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्यावतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छठपूजा हा उत्तर भारतीय समाजातील सांस्कृतिक उत्सव आहे. कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव पंचगंगा नदीवर साजरा केला जातो. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासूनच उत्तर भारतीय समाजातील महिला सहकुटुंब नदीघाटावर येण्यास सुरुवात झाली. फळे, फुले, उसाची पूजा घाटावर मांडण्यात आली. त्यानंतर जलपूजा करण्यात आली. दिवे प्रज्वलित करण्यात आले. सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर या पूजाविधी व दिव्यांनी पंचगंगा घाट परिसर उजळून गेला. समाजातील पुरूषांनी अर्ध्य देऊन पूजा केली. त्यानंतर प्रसादवाटप करण्यात आले. संघातर्फे ओम मिश्रा, निरंजन झा, ललनकुमार, कामेश्वर मिश्रा, अजितकुमार सिंह, सुचित कुमार झा, नरेंद्र झा, राजीव पाठक, उमेश सिंह, शंभूनाथ मिश्रा, ​जितेन्दा झा यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांच्या संघर्षामुळे नेतृत्व खुंटले

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

tweet@:gurubalmaliMT

कोल्हापूर : राजकीय स्वार्थासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी संघर्षाला सतत धार लावण्याचेच काम केले. यामुळे कोल्हापूरच्या विकासात तो अडथळा तर ठरलाच, शिवाय कार्यकर्त्यांच्या जीवावर उठणाऱ्या या संघर्षाने एकमेकांच्या एकमेकांची जिरवण्यातच ताकद खर्ची पडली. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील संघर्षाने सध्या टोक गाठले आहे. या पार्श्वभूमीवर पाहिले असता गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत जिल्ह्यातील नेत्यांनी एकमेकांशी लढण्यात ताकद खर्च केल्याने क्षमता असूनही राज्यपातळीवर त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही.

बिद्री साखर कारखान्याच्या विजयी मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील संघर्षाचा संदर्भ दिला. पाटील आणि महाडिक यांच्या संघर्षाचा दाखला देत हा वाद धोकादायक असल्याने या दोघांनी तो मिटवावा, अशी सूचना केली. पाटील यांच्यापुर्वी शरद पवारापासून ते विलासराव देशमुखापर्यंत अनेक नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कधीच यश आले नाही. यामुळेच वादाची ठिणगी अधून मधून पडत असल्याने जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटत असतात. निवडणुकीच्या पलिकडे जावून वैयक्त‌िक पातळीवर पोहचलेल्या वादाने सतत टोक गाठल्यानेच कधी पक्षाचे, कधी गटाचे तर कधी जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले. तरीही नेत्यांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने तोटा मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

कोल्हापुरात राजकीय संघर्ष नवा नाही, एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणे एवढ्यापुरता हा संघर्ष मर्यादित न राहता तो एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंत गेला. यामुळेच जिल्ह्यातील या संघर्षाची चर्चा राज्यभर पोहचली, शिवाय त्याचा फटका कार्यकर्त्यांना अधिक बसला. राजकीय स्वार्थासाठी, गट जिवंत ठेवण्यासाठी हा संघर्ष वाढवण्यात अनेकांनी रस दाखवला. यामुळे काही नेत्यांचा तात्पुरता राजकीय फायदा झाला, पण त्याची झळ कार्यकर्त्यांना बसली. एकमेकांचा काटा काढण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाणाऱ्या या नेत्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा तर बिघडलीच शिवाय जिल्ह्याच्या विकासाला अडथळा झाला. या संघर्षामुळे एकमेकांचे पाय ओढले गेल्याने साठ वर्षांत राज्याची धुरा सांभाळणारा एकही नेता तयार झाला नाही. काही नेत्यांमध्ये ही धमक असूनही त्यांची ताकद विरोधकांना जिरवण्यात गेल्याने ते जिल्ह्याच्या राजकारणातच अडकून बसले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत रत्नाप्पाण्णा कुंभार आणि शामराव पाटील-यड्रावकर यांच्यातील संघर्ष २५ वर्षांपूर्वी चांगलाच गाजला. माजी खासदार बाळासाहेब माने आणि कुंभार यांच्यात अनेक वर्षे छुपा संघर्ष होता. त्यामध्ये नंतर कलाप्पाण्णा आणि प्रकाश आवाडे सहभागी झाले. आवाडे आणि जयवंतराव आवळे यांच्यातील गटबाजी २५ वर्षानंतरही सुरूच आहे. एका पक्षात राहूनही एकमेकांच्या पायात पाय घालण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत. यामुळे पाडापाडीच्या राजकारणात पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. वारणा खोऱ्यातील कोरे-पाटील गटातील मारामारी अनेकांनी अनुभवली. चंदगड तालुक्यात भरमू पाटील आणि नरसिंग पाटील यांच्या वादात दौलत सहकारी साखर कारखाना डबघाईला आला.

कोल्हापुरात सर्वाधिक संघर्ष गाजला तो माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांच्या गटातच. कागल तालुक्याची विभागणीच दोन गटांत करणाऱ्या या नेत्यांच्या वादात काहींचा जीव गेला. यामुळे उशिरा का होईना या नेत्यांनी संघर्षाला पूर्णविराम देत नवा आदर्श घालून दिला. पण हा संघर्ष संपताच मंडलिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय वैर सुरू झाले. आरोप प्रत्यारोपाच्या पलिकडे जावून हा संघर्ष कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहचला. एकमेकांच्या संस्था संपवण्याचा आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न या संघर्षात झाला. मंडलिकांच्या निधनानंतरच त्याला पूर्णविराम मिळाला. काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आवाडे यांच्यातही १५ वर्षांपासून वाद सुरू आहे. या वादातूनच काँग्रेस कमिटीत मारामारी झाली.

राजकारण म्हटल्यावर गटबाजी असणारच. पण ही गटबाजी किती दिवस कायम ठेवायची, संघर्ष किती ताणायचा याला मर्यादाच नाहीत. एकेमकांना संपवण्याचा प्रयत्न जर या संघर्षातूनच होत असेल तर राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे हे लक्षात येते. यामुळेच पालकमंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा नेत्यांतील संघर्ष मिटवण्याची सूचना केली आहे. राजकारण केवळ निवडणुकीपुरते ठेवले तर हा वाद वाढण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे सूचना करण्याच्या पलिकडे जाऊन पालकमंत्र्यांनी वाद मिटवण्यात पुढकार घेण्याची गरज कार्यकर्त्यामधून व्यक्त केली जात आहे.

गाजलेले संघर्ष …

रत्नाप्पाणा कुंभार व शामराव पाटील-यड्रावकर

बाळासाहेब माने व रत्नाप्पाणा कुंभार

तात्यासाहेब कोरे, विनय कोरे व यशवंत एकनाथ पाटील

सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे

सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ

महादेवराव महाडिक व सतेज पाटील

पी. एन. पाटील व आवाडे पिता व पूत्र

जयवंतराव आवळे व आवाडे पिता व पुत्र

नरसिंग पाटील व भरमू पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८ गावांचे आरोग्य धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी उभा केलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच बंद ठेवण्याची परिस्थिती ओढवल्याने कोल्हापूरपासून पुढे जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. जलसंपदा विभागाने बंधाऱ्यांना बरगे घातले नसल्याने व अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे प्रदूषणाची तीव्रता कमी वाटत आहे. पण उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कोल्हापूरपासून पुढील ३८ गावांमध्ये प्रदूषणाचे परिणाम तीव्र होऊन आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळेच हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नेमण्यात आलेल्या तपासणी समितीच्यावतीने शुक्रवारी प्रदूषणाची पाहणी करण्यात येणार आहे.

पंचगंगेतील प्रदूषण रोखण्यासाठी ७६ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. प्रकल्प उभा केल्यानंतर तो पूर्ण क्षमतेने चालवण्यात आला नव्हता. अशा परिस्थितीत गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन तुटून गेली. त्यामुळे एसटीपीसाठी सांडपाणी उपसा करणे बंद होऊन जयंती नाल्यातून सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. जयंती नाल्यातून जवळपास ५० एमएलडीच्या आसपास सांडपाणी वाहून जात आहे. दिवाळीपर्यंत पाऊस सुरू असल्याने नदीचे पाणी अजून वाहते आहे. यामुळेच जलसंपदा विभागाने बंधाऱ्यांना बरगेही घातलेले नाहीत. हीच बाब कोल्हापूरपासून पुढील ३८ गावांसाठी सुदैवाची ठरली आहे.

नदी वाहती असली तरी सध्या जयंती नाल्यातून नदी​मध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे शिरोळ तालुक्यापर्यंतच्या नदीच्या प्रवाहाला दुर्गंधी येत आहे. पाऊस आला नाही तर पाणी अडवले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी उपसा करणाऱ्या या गावांना दूषित पाणीच वाट्याला येणार आहे. सध्या किमान दीड महिना तरी काम करता येणार नाही, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत वाहत राहणाऱ्या सांडपाण्यामुळे पुढील गावांमध्ये साथीच्या रोगाचा धोका आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने महापालिकेला नोटीस दिली आहे. त्यानुसार नदीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. पर्यावरणप्रेमींनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून गंभीर प्रकाराची कल्पना दिली आहे. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना समितीचे अध्यक्ष बनवले आहे. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली करवीर प्रांताधिकाऱ्यांची तपासणी समिती नियुक्त केली आहे. या समितीच्यावतीने शुक्रवारी नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली जाणार असून जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. जयंती नाल्यावरील सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन बसवण्यासाठी महापालिकेने वालचंद कॉलेजकडून आराखडा तयार करुन घेतला आहे. ही पाइपलाइन बसवण्यासाठी पूल तयार करण्यात येणार आहे. याबाबतच्या टेंडरला मुदतवाढ दिली असून कंत्राटदार नेमण्यास वेळ लागत आहे.


जुन्या एसटीपीची पाइप तोडली

नवीन एसटीपी कार्यरत होत असताना जुना एसटीपी कार्यरत ठेवण्याबाबत चर्चा झाली होती. जुन्या एसटीपीतून प्राथमिक प्रक्रिया होत असली तरी सध्याच्या परिस्थितीत तीही महत्त्वाची ठरली असती. पण कचऱ्यातून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाच्या बांधकामासाठी या एसटीपीची जुनी पाइपलाइन तोडण्यात आल्याचे समजते. ही पाइपलाइन व्यवस्थित असती तर जयंती नाल्यात सांडपाणी अडवून जुन्या एसटीपीत प्राथमिक प्रक्रिया करता आली असती. मात्र पाइपलाइनच तोडल्यामुळे हा तातडीचा उपाय करणेही महापालिकेच्या हातात राहिलेले नाही.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजीसीए-एएआयकडून कोल्हापूर विमानतळाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागरी हवाई वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) संयुक्त पथकाने गुरुवारी विमानतळ परिसराची पाहणी केली. लँडिंगसाठी अडथळा होत असलेल्या कंपनीने तातडीने टॉवर हलविण्याचे मान्य केले. त्यासह विमानतळाचा रन-वे, टर्मिनल बिल्डींग, सुरक्षितता, एअर ट्रॅफीक कंट्रोलर, एटीआर-७२ यांसारखी विमाने उतरण्यासाठीच्या भौतिक सुविधांची पाहणी केली. ही संयुक्त समिती येत्या आठ दिवसांत नागरी उड्डयन मंत्रालयाला अहवाल देईल. त्यानंतर पंधरा दिवसांत विमान उड्डाणाचा कच्चा परवाना (प्री ऑपरेटिंग लायसन्स) मिळणार आहे.

गेली सहा वर्षे कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे डीजीसीए आणि एएआयच्या संयुक्त पथकाने विमानतळाची पाहणी केली. विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान उड्डाणाचा परवाना अत्यावश्यक आहे. त्यामुळे विमानतळ पाहणीसाठी बुधवारी समिती कोल्हापुरात दाखल झाली. तेव्हा कागदपत्रांची पाहणी आणि अग्निशमन दलाची प्रात्याक्षिके सादर झाली. गुरुवारी समितीने विमानतळाच्या परिसराची पाहणी केली. १८ सीटर विमानासह एटीआर ७२ या प्रकारातील विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ होण्यासाठीच्या भौतिक सुविधा, आवश्यक रन-वे, कंपाऊंड वॉल, सर्व ऋतुंमध्ये विमानसेवा सुरू राहण्यासाठीच्या वातावरणाचा अहवाल, प्रशिक्षित एटीसी आणि आपत्तकालीन स्थितीसाठीच्या पाहणी केली. दोन दिवसांच्या पाहणीचा अहवाल समिती आठवडाभरात तयार करेल. यापूर्वी विमानतळासंदर्भात सादर झालेली कागदपत्रे आणि अहवालाची छाननी समिती करेल. त्यानंतर विमानतळाला प्री ऑपरेटिंग लायसन्स मिळेल. पहिल्या विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर विमान उड्डाणाचा पक्का परवाना मिळू शकेल असे सूत्रांनी सांगितले.


समितीच्या निकषांनुसार आवश्यक सर्व सुविधा कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी समितीने काढलेल्या नाहीत. टॉवरचा अडथळाही तातडीने दूर केला जाणार आहे. मुंबईत बुधवार आणि शुक्रवारी स्लॉट मिळाला आहे. एअर इंडिया, स्पाइस जेट या कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. या परवान्यामुळे येत्या काही दिवसांत विमानसेवा सुरू होणे शक्य आहे.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला मिळेनात ६० हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या निसर्गसौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळ्याला प्रदूषणाचे गालबोट लागले आहे. पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेल्या रंकाळ्यात प्रदूषित पाणी मिसळत आहे. त्यामुळे पाणी हिरवे झाले आहे तर जलपर्णीसदृश वनस्पतींचा विळखा वाढत आहे. यावर उपाय म्हणून बोटी फिरविण्याचा उपाय शोधला मात्र, या बोटी फिरविण्यासाठी महानगरपालिकेकडे अवघे साठ हजार रुपये नाहीत. महापालिकेच्या एका बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी बोटींच्या इंधनासाठी महानगरपालिकेकडे ६० हजार रुपये नाहीत, असे सांगून हात वर केले. शिवाय ‘तुमच्याकडे काही निधी असेल तर सांगा’ असे प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाच विचारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गटार चांगली असताना पुन्हा नुतनीकरण, जिथे गटारींची आवश्यकता आहे तिथे सोय न केल्याने वाहून जाणारे रस्ते, छोटे खड्डे असताना त्याकडे दुर्लक्ष करून खड्ड्यांची संख्या वाढण्याची प्रतीक्षा करण्याचे प्रकार डोळ्यासमोर आहेत. या सर्वांवर लाखो रुपयांचा खर्च होत असताना केवळ साठ हजार नसल्याने रंकाळा तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या बोटी बंद ठेवण्याचा प्रकार महापालिकेच्या गलथान कारभाराची लक्षणे आहेत. रंकाळा तलावातील प्रदूषण थांबवण्यासाठी हरित लवादाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असताना महापालिकेने चालवलेले दुर्लक्ष गंभीरच असल्याचे मते पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहेत.

शहरातील प्रदूषणविषयक तसेच अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शहरस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ तसेच पर्यावरणप्रेमींचा समावेश आहे. या समितीमध्ये सर्वांची मते ऐकून प्रशासनाने काम करावे, असे अपेक्षित आहे. पण दोन महिन्यांपुर्वी झालेल्या ​समितीच्या बैठकीतील चर्चेचा महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचारच केलेला नाही, असे बुधवारी झालेल्या बैठकीत दिसून आले. रंकाळ्यामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णीसदृश हिरवी वनस्पती वाढत असल्याने त्याची वाढ रोखण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून रंकाळ्यातील पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे हाच पर्याय होता. त्यासाठी महापालिकेला तलाव संवर्धन योजनेतून मिळालेल्या बोटींचा वापर करण्याबाबत सदस्यांनी सूचना केली. या बोटी पाण्यामध्ये फिरवल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन वनस्पतींची वाढ कमी करता आली असती. मात्र या दोन महिन्यात त्याबाबत काहीच हालचाल केली नाही. तसेच बुधवारी झालेल्या बैठकीस उपस्थित असणाऱ्या अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी हात वर केले. मुळात बैठक ते घेणार असल्याने संपूर्ण माहिती घेणे अपेक्षित होते. बोटी फिरवण्याचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर त्यांनी थेट महापालिकेकडे पैसे नसल्याने बोटी फिरवता आल्या नाहीत, असे सांगून टाकले. दोन बोटी दररोज फिरवण्यासाठी महिन्याला फार तर साठ हजार रुपये खर्च येणार होता. महापालिकेकडे इतकेही पैसे नसल्याने त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच अशा ‘उपाययोजनांसाठी काही निधी तुमच्याकडे असतो का’ अशी विचारणा केल्याचे समजते. यामुळे महापालिकेची इतकी वाईट अवस्था झाली आहे का? असाच प्रश्न सदस्यांसमोर उभा राहिला.


रंकाळा तलाव संवर्धनासाठी विविध पातळींवर प्रयत्न केले जात असताना केवळ बोटी फिरवण्यासाठी लागणाऱ्या इंधनासाठी पैसे नाहीत ही बाब गंभीरच आहे. महापालिकेने ठरवले तर कोणतेही काम तातडीने करता येऊ शकते. पण, रंकाळा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती प्रशासनाकडे नाही.

उदय गायकवाड, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’वर दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुबईहून कोल्हापूरला येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये राजेवाडी (ता. शिरूर) स्टेशन परिसरात दरोडा पडला. गुरुवारी (ता. २६) पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवली. रेल्वेतील वीसहून अधिक महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने हिसकावून लंपास केले. याबाबत प्रवाशांनी कोल्हापूरसह मिरज आणि सातारा येथे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने त्यांच्याकडे दरोड्याचा तपास सोपविण्यात आला आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बुधवारी रात्री आठच्या सुमारास महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटली. रात्री दीडच्या सुमारास रेल्वे जेजुरीजवळील राजेवाडी स्टेशनच्या परिसरात पोहोचली. सिग्नल मिळाला नसल्याने चालकाने रेल्वे थांबवली. काही वेळातच उघड्या खिडक्यांमधून झोपलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार सुरू झाले. प्रवाशांनी जागे झाल्यानंतर आरडाओरडा सुरू केला. मात्र तोपर्यंत एस-२ ते एस-१२ या अकरा बोगींमधील प्रवाशांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. काही प्रवाशांनी चोरट्यांना पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र शरिराला तेलकट पदार्थ लावून आलेल्या चोरट्यांनी स्वतःची सुटका करून घेऊन पळ काढला. काही बोगींमध्ये घुसून चोरट्यांनी प्रवाशांवर दहशत मागविण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकाराने प्रवाशी घाबरले होते.

काही प्रवाशांनी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र १३२२ या क्रमांकावर संपर्क झाला नाही. १८२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तेथील पोलिसांनी दिलेल्या माहितीने प्रवाशांची चिंता आणखी वाढली. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पुण्यानंतर एकही सुरक्षा पोलिस नसल्याने सातारा येथे तक्रार द्या, असे आवाहन हेल्पलाइनवरून करण्यात आले.

दरम्यान, रेल्वे चालकाने पुढील स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सिग्नलमध्ये बिघाड असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनीच सिग्नल यंत्रणेत बिघाड करून लूट केल्याचे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सांगितले. अर्ध्या तासानंतर रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. कोल्हापूरला पोहोचेपर्यंत प्रवासी भीतीच्या छायेत होते. यातील सात प्रवाशांनी सातारा येथे उतरल्यानंतर लुटीची तक्रार दिली. तर कृष्णा श्रीकांत माने (वय १२, रा. भोईवाडा, मुंबई), सुचित्रा प्रल्हाद इटेकरी (रा. निपाणी) आणि विजया केतन राजगुरू (रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांनी कोल्हापुरात लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. या तिघींच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि गंठण असा सव्वा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. नूरजहॉँ सैफुद्दीन शेख (रा. इंदिरा गांधी हाउसिंग सोसायटी, बांद्रा इस्ट) यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसडा मारून लांबवले. शेख यांनी गुरुवारी सकाळी मिरज रेल्वेस्थानकात पोलिसांकडे तक्रार दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत दरोड्याचा प्रकार घडल्याने या सर्व तक्रारी पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्या.

सुरक्षेविना धावते रेल्वे

महालक्ष्मी एक्स्प्रेसला २१ बोगी आहेत. यातून हजार प्रवाशी रोज प्रवास करतात. मात्र त्यांच्या सुरक्षेकडे रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. २१ बोगींसाठी एकआड एक दिवस केवळ पाच सुरक्षा कर्मचारी असतात. बुधवारी मुंबईतून सुटलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये पुण्यापर्यंत एकच सुरक्षा कर्मचारी होता. यानंतर कोल्हापूरपर्यंत एकही कर्मचारी नव्हता. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीच याची कबुली प्रवाशांकडे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवस्थान’ने बसवलेले कॅमेरे पुजाऱ्यांनी केले बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थआपन समितीने कार्यान्वित केलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे पुजाऱ्यांनी परस्पर बंद केल्याने गुरूवारी रात्री गोंधळ उडाला. कॅमेरे कार्यान्वित करण्याचा अधिकार देवस्थान समितीला आहे. पुजाऱ्यांना या कॅमेऱ्यांबाबत आक्षेप घेता येणार नाही अशी भूमिका घेत देवस्थान समितीने घेतल्याने हा वाद जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. दरम्यान, याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. २७ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बैठक होणार आहे.

जून महिन्यात मंदिरातील पुजारी अजित ठाणेकर यांनी अंबाबाईच्या मूर्तीला एका पर्यटक भाविकाकडून देणगीदाखल आलेला घागरा-चोली पेहराव परिधान केला होता. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या. साडी हा अंबाबाईचा पारंपरिक पोषाख असताना राजस्थानी पोषाख परिधान केल्याबद्दल पुजारी ठाणेकर यांच्याविरोधात पुजारी हटाओ समितीने आंदोलन केले. त्यांना मारहाणही करण्यात आली. त्यानुसार येत्या हिवाळी अधिवेशनात पुजारी हटवून पंढरपूरच्या धर्तीवर सरकारी पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्याचे आश्वासनही राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दिले आहे. पुजारी-समितीतील वादात तोडग्यासह सरकारी पुजारी नियुक्तीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पुढाकार घेतला होता.

दरम्यान, गाभाऱ्यामध्ये पुजाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याबद्दलही पुजारी हटाओ समितीने आक्षेप घेतला आहे. भाविकांकडून गाभाऱ्यात देण्यात येणारी देणगी देवस्थान समितीकडे न देता पुजारी स्वतःकडे ठेवतात. तसेच गाभाऱ्यात गर्दी करतात. भाविकांकडून देणगीदाखल येणारे दागिने, रक्कमेचा कोणताही हिशेब मिळत नाही. त्यामुळे पुजाऱ्यांवर अंकुश रहावा आणि सुर​क्षिततेच्या दृष्टिने गाभाऱ्यात लक्ष रहावे यासाठी देवस्थान समितीने गाभाऱ्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला होता. पुजारी हटाओ समितीने आंदोलनावेळी गाभाऱ्यात कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी देवस्थान समितीने कॅमेरे बसवण्याची कार्यवाही केली होती. त्याला पुजाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामार्गांवर हेल्मेट सक्ती थंडावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महामार्गांवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे केल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाईला सुरुवात केली. पोलिसांच्या कारवाईमुळे दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर वाढला. परिणामी अपघाती जखमींचे प्रमाणही घटले. मात्र, ऑक्टोबर महिन्यात महामार्गावरील हेल्मेट सक्ती थंडावली आहे. त्यामुळे पुन्हा विनाहेल्मेट दुचाकीस्वार सुसाट दुचाकी चालवताना दिसत आहेत. कारवाई थंडावल्याने हेल्मेट सक्तीचा हेतू बारगळत आहे.

रस्ते अपघातांमध्ये बहुतांश मृत्यू दुचाकीस्वारांचे होतात. त्यांच्याकडूनच हेल्मेटचा वापर करण्यास टाळाटाळ होते. यातच ट्रीपल सिट आणि भरधाव दुचाकी चालवताना अपघात होतात. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र याकडे काणाडोळा करून जिवाशी खेळ केला जातो. दुचाकीस्वारांचे वाढते अपघाती मृत्यू आणि जखमींची संख्या रोखण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे केले होते. महामार्गांवर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी करून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाया केल्या. यात दुचाकीस्वारांकडून सुमारे अडीच कोटी रुपयांची दंड वसुली झाली. त्यातूननच सुरक्षित प्रवासाबाबत जागृतीही निर्माण झाली.

पोलिसांच्या कारवाईचा धसका घेऊन दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली. पाचशे रुपयांचा दंड भरण्यापेक्षा हेल्मेटच्या वापरास प्राधान्य दिले गेले. स्वतःकडे हेल्मेट नसेल तर मित्राकडील, नातेवाईकांकडील हेल्मेट वापरले जात होते. समोर पोलिसांची नाकाबंदी पाहून कारवाईच्या धास्तीने अनेक दुचाकीस्वारांनी रस्ते बदलले. काहींनी तातडीने हेल्मेट खरेदी करून वापरास सुरुवात केली. पुणे-बेंगळुरू महामार्गासह कोल्हापूर - रत्नागिरी, कोल्हापूर - गारगोटी, कोल्हापूर - सांगली, गगनबावडा, राधानगरी, आजरा या सर्वच मार्गांवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. यातून लाखो रुपये दंडाची वसुली झाली. शिवाय हेल्मेटचा वापरही वाढला. कालांतराने कारवाई कमी झाली. गणपती, नवरात्रोत्सव आणि आता दिवळी संपली तरीही महामार्गांवर हेल्मेटबाबत कारवाई होत नाही. महामार्गांवर पोलिसच दिसत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वारांचा पुन्हा विनाहेल्मेट प्रवास जोरात सुरू आहे. कारवाई थंडावल्यामुळे दुचाकीस्वार निवांत झाले आहेत. कारवाईत सातत्य नसल्याने मूळ हेतूबाबत शंका उपस्थित होत आहे. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेऊन हेल्मेट वापराबाबत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे.


गेले काही दिवस पोलिस हे बंदोबस्त आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गुंतले होते, त्यामुळे महामार्गांवरील नाकाबंदीला मर्यादा आल्या होत्या. कारवायांचे प्रमाण कमी झाले असले तरीही काम थांबलेले नाही. यापुढे कारवाया वाढवून हेल्मेटच्या वापराबाबत प्रबोधन सुरुच राहील.

- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकतर्फी प्रेमातून दोन तरुणांनी कॉलेज तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर कटर ब्लेडने वार केले. गुरुवारी (ता. २६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाहूपुरीतील साईक्स एक्स्टेंशन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. जखमी अल्पवयीन तरुणीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, पोलिस हल्लेखोर तरुणांचा शोध घेत आहेत. या घटनेने शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

पीडित तरुणी राजारामपुरी परिसरातील एका कॉलेजमध्ये ११ वीच्या वर्गात शिकते. गेल्या महिन्याभरापासून एका तरुणाकडून या अल्पवयीन तरुणीचा पाठलाग सुरू होता. तरुणी कॉलेजला गेल्यानंतर तो तरुण कॉलेजच्या बाहेर गेटवर थांबत होता. अनेकदा त्याने घरापर्यंत तिचा पाठलाग केला. पुन्हापुन्हा हा प्रकार होत असल्याने तरुणी घाबरली होती. तिने तरुणाला टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र रोजच तरुणाकडून पीडित तरुणीचा पाठलाग सुरू होता. कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी एकदा तरुणाने पीडित तरुणीला अडवले. ‘तू मला खूप आवडतेस. माझ्या प्रेमाला प्रतिसाद दे, नाहीतर तुझी बदनामी करणार,’ असे धमकावले. यावर तरुणीने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही. यापुढे तू माझा पाठलाग करू नकोस. पुन्हा असे केलेस तर माझ्या वडिलांना सांगेन,’ असे स्पष्ट केले होते. यानंतर आठवडाभर तरुण फिरकला नाही.

गुरुवारी सकाळी तरुणी क्लासला जाण्यासाठी घरातून दुचाकीवरून बाहेर पडली. संशयित तरुणाने मित्रासह तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. शाहूपुरी परिसरातील साईक्स एक्स्टेंशनजवळ आल्यानंतर तरुणांनी तिला अडवले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझी झाली नाहीस तर इतर कोणाचीही होऊ देणार नाही,’ असे म्हणत त्यातील एकाने तरुणीच्या दंडावर कटर ब्लेडने वार केला. जखमी तरुणीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर तरुण पसार झाले. जखमी तरुणीने मोबाइलवरून या घटनेची माहिती कुटुंबीयांना कळवली. यानंतर तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन तरुणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या तरुणांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही, त्यामुळे नावे स्पष्ट झालेली नाहीत. वर्दळीच्या रस्त्यावर सकाळी घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ निर्माण झाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

निर्भया पथकांचे अपयश

शहरात निर्भया पथकांकडून जोरदार कारवाया सुरू आहेत. सुमारे २३०० टवाळखोरांवर कारवाई केली असून, सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या आसपास टवाळखोरांवर निर्भया पथकांची करडी नजर असल्याचा दावा निर्भया पथकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले, मात्र एकतर्फी प्रेमातून झालेल्या गंभीर हल्ल्याने निर्भया पथके आहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएस चौक हायजॅक

$
0
0

कोल्हापूर : खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्ससह अन्य वाहनधारकांकडून मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर चौक परिसर रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत हायजॅक केला जात आहे. वाट्टेल तेथे गाड्या पार्किंग करून वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांनी कोंडीत भर पडत आहे. दिवाळीनंतर परतीचे प्रवासी मिळवण्यासाठी परिसरात पार्क होणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या वाढली आहे. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
दाभोळकर कॉर्नर हा शहराचा मध्यवर्ती भाग. मुख्य चौकात सिग्नल आहे. पादचाऱ्यांसाठी फूटपाथ आहे. जवळच बसस्थानक आहे. तेथे सतत बसची ये-जा सुरू असते. त्यामुळे नेहमी परिसर बस, दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांच्या वर्दळीने गजबजून गेलेला असतो. येथे परवानगी नसताना खासगी ट्रॅव्हल्स पार्क करून प्रवाशी घेतले जातात. अलिकडे दिवसेंदिवस तेथे पार्क केल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या वाढते आहे. दिवाळीसाठी आलेले प्रवासी परतीच्या वाटेवर असल्याने गेल्या तीन दिवसांपासून परिसर ट्रॅव्हल्सनी भरलेला दिसत आहे. फूटपाथ आणि निम्या रस्त्यावरच ट्रॅव्हल्स थांबवल्या जातात. त्यांनी फूटपाथ बळकावल्याने पादचाऱ्यांना अडथळा होत आहे.

बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्स लावून प्रवासी घेणे बेकायदेशीर असतानाही वाहतूक पोलिस, आरटीओचे प्रशासन मूग गिळून गप्प आहे. प्रत्येक ट्रॅव्हल्स आणि सरकारी यंत्रणेचे लागेबांधे असल्याने खुलेआम वाहतुकीला अडथळा होईल असे पार्किंग केले जाते. रात्री नऊ वाजल्यानंतर वाहने पार्क करण्यासाठी एक तास आधीच जागा आरक्षीत ठेवण्यासाठी ट्रॅव्हल्सवाल्यांने कर्मचारी दादागिरीने दुचाकी, चारचाकी काढण्यासाठी धमकावतात. त्यांना ज्या ठिकाणी ट्रॅव्हल्स लावायची आहे, त्या ठिकाणी कोणतेही वाहन लागणार नाही, त्याची दक्षता अरेरावीच्या जोरावर घेतली जाते.

महालक्ष्मी चेंबर्स, दाभोळकर कॉर्नर चौकात टॅव्हल्सवाल्यांच्या टोळक्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. एखाद्या वाहनधारकाने वाहतुकीला अडथळा होईल असे का पार्किंग केले असे ‌विचारल्यानंतर सर्व टोळक्यांतील तरुण एकत्र येऊन दहशत निर्माण करतात. संबंधीत तक्रारदारास गप्प बसवले जाते. नुकताच सोमवारी साडेदहाच्या सुमारास असाच प्रकार दाभोळकर चौकात घडला. ट्रॅव्हल्स पार्किंगमुळे अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली. त्यावेळी वाहतूक पोलिसही तेथे नव्हते. वादावादीचे प्रसंगही उदभवले. हे एक प्रातिनिधीक उदाहरण. मात्र असे प्रकार नित्याचेच घडत असतात. ट्रॅव्हल्सच्या गाड्या वाटेत लावल्याचा त्रास होत असल्याबद्दल वाहनधारकांनी विचारणा केल्यास ट्रॅव्हल्सधारकांनी पोसलेल्या टोळक्यांकडून अरेरावी केली जात आहे. ‘पोलिसांचे आम्ही बघतो. मग कोण काय करतो ते बघू’, अशी धमकावणी केली जाते. येथे ड्युटीवर असलेले वाहतूक पोलिस बघ्याच्या भूमिकेत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर: पुजारी-समिती वाद चिघळला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले कॅमेरे बंद केल्याने पुन्हा एकदा पुजारी आणि देवस्थान समिती आमने-सामने आले आहेत. समितीने पुजाऱ्यांच्या कृतीवर जोरदार आक्षेप घेतला असून, कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे ठणकावले आहे. समिती आणि पुजाऱ्यांच्या बैठकीत जोरदार वाद निर्माण झाल्याचे समजताच पुजारी हटाव संघर्ष समितीने धाव घेऊन गाभाऱ्यावर मालकी हक्क गाजवू पाहणाऱ्या पुजाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी पुजाऱ्यांना बंदोबस्तात बैठकीतून बाहेर काढले.

अंबाबाई देवीच्या लाईव्ह दर्शनसाठी देवस्थान समितीने गुरुवारी दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. यानंतर संध्याकाळी काही पुजाऱ्यांनी कॅमेरे बंद केले. शुक्रवारी सकाळी कॅमेरे कापडात बांधून ठेवले होते. याबाबत समितीने तातडीने पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवून समितीच्या कार्यालयात बैठक बोलवली होती. आज (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास बैठक सुरू झाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गाभाऱ्यातील कॅमेरे बंद केल्याबद्दल पुजाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पुजाऱ्यांनी समितीला निवेदन दिले. ‘गाभाऱ्याची किल्ली पुजाऱ्यांकडे असते. मंदिरातील गाभाऱ्याचा कायदेशीर ताबा पुजाऱ्यांकडे आहे. समितीने बळजबरीने कॅमेरे बसवून पुजाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली आहे. कॅमेरे त्वरीत काढून घ्यावेत, अन्यथा समितीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशारा पुजाऱ्यांनी निवेदनाद्वारे समितीलाच दिला. यामुळे समितीचे पदाधिकारी खवळले.

अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पुजाऱ्यांना केवळ पुजेचा अधिकार आहे. गाभाऱ्याला कुलूप लावण्याची भाषा करणाऱ्या पुजाऱ्यांसाठी आमच्याकडे मंदिराच्या सर्वच दरवाजांच्या चाव्या आहेत. कॅमेऱ्यांना विरोध करण्याचा अधिकार पुजाऱ्यांना नाही. गाभाऱ्यातील कॅमेरे सुरू राहणारच. कॅमेऱ्यांशी छेडछाड केल्याबद्दल संबंधित पुजाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार. कुणाचा आक्षेप असेल तर त्याने कोर्टात जावे. पुजाऱ्यांनी मुद्दाम कुरापत काढून वाद वाढवला असल्याने यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पुजारीच जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

रस्ता झाल्यानंतरच्या तीन वर्षांच्या काळात त्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबधित ठेकेदार कानाडोळा करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. त्या रस्त्यावरील खड्डयात एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर आपण स्वतः संबधित ठेकेदारावर खुनाचा गुन्हा दाखल करणार आहोत, असा इशारा जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी शुक्रवारी दिला.
महापालिकेतील रस्त्यांसाठी दिलेल्या पैशाचा मालक मी असल्याने तुम्ही दिलेल्या थर्डपार्टी ऑडीटवर विश्वास न ठेवता स्वतः संबधित रस्त्यांचा दर्जा तपासून घेतल्यानंतरच उर्वरित निधी देण्यात येईल, असेही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
सांगली महापालिकेबरोबरच जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नागरिक आणि संघटना आक्रमक होत आहेत. आता अधिकृतरित्या पावसाळा संपलेला आहे. त्यामुळे कोणतीही कारणे सांगत बसू नका. काही रस्त्यांची डागडुजी नोव्हेंबर तर उर्वरित रस्त्याची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे आदेश देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यांची दुरुस्ती वेळेत झाली नाहीतर जनक्षोभ उसळून येईल, इतकी स्फोटक स्थिती आहे. ठेकेदारांवर मेहरबानी दाखविण्याचे कारण नाही. डिफेक्टीव लायबलिटी पिरियड (देखभाल दुरुस्तीचा कालावधी) तीन वर्षांचा आहे. नव्याने केलेल्या रस्त्याची सलग तीन वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. याची जरी दखल घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम केले तर अनेक रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे भरण्याची प्रक्रिया विना पैशाची होणार आहे. नवीन केलेल्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी आणि संबधित ठेकेदाराचे नाव जनतेकरीता जाहीर केले पाहिजे. महापालिकेतील रस्त्यांचे रोड रजिस्टरच नसेल तर अवघड आहे. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. रस्ता खोदाईचे पैसे भरून घेतल्यानंतर त्याच पैशातून तत्काळ दुरुस्ती झाली पाहिजे. पण आपल्याकडे खोदाईची लांबी रुंदी कमी दाखवून कमी पैसे भरून घेऊन संबधितांवर मेहरबान होण्याचे प्रमाणही बरेच आहे. असा प्रकार समोर आल्यास संबधितांनी त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवावी. सरकारचा पैसा म्हणजे सर्वसामान्यांकडून झालेला कर भरणा आहे. त्यांचेच पैसे त्यांच्यासाठी खर्च करायचे आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. जनतेमधील असंतोष उफाळून येण्याच्या अगोदर महापालिकेतील आणि जिल्ह्यातील रस्त्यांची डागडुजी झालीच पाहिजे. रस्त्यांच्या गुणात्मक दर्जाबाबत चालढकल कराल तर मला पोलिसांना एक नवे आणि चांगले काम द्यावे लागेल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
सांगली-पेठ रस्त्याची दुरुस्ती
दहा नोव्हेंबरपूर्वी
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम, पश्चिम विभाग, मिरज विभाग, जिल्हा परिषदेकडील सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा चार विभागात विभागलेल्या रस्त्यांच्या बाबतील आढावा घेतला. या वेळी सांगली-पेठ या रस्त्यावरील मृत्यूसाठी जबडा उघडून बसलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. हा रस्ता म्हैसाळपर्यंत तीन वेगवेगळ्या विभागात विभागल्याचे समोर आले. पेठ-तुंग पश्चिम भाग सार्वजनिक भाग, तुंग-टिळक चौक मिरज सार्वजनिक बांधकाम विभाग, टिळक चौक-म्हैसाळ नाका महापालिका आणि पुढे पुन्हा मिरज बांधकाम विभाग, अशी विभागणी झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती दहा नोव्हेंबरपूर्वी केली जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महापालिकेडून प्रस्ताव आलाच नाही
खड्डेमुक्त महापालिका क्षेत्राच्या नियोजनाचा प्रस्ताव शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार होता. परंतु, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव सादर होऊ शकला नसल्याचे या वेळी समोर आले. सध्या जिल्ह्यात रस्ता दुरुस्तींच्या कामाची संख्या एकूण २४० इतकी असून, सार्वजनिक बांधकाम, पश्चिम भाग ६२, मिरज भाग ६४, जिल्हा परिषद १२ आणि महापालिकेतील १०२ कामे नोव्हेंबर, डिसेंबरअखेर पूर्ण झालीच पाहिजे. उर्वरित ५० कामांच्या निविदाही वेळत काढून कामांना सुरुवात करण्याचे आदेश या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माकपचे सांगलीतराज्यव्यापी अधिवेशन

$
0
0

सांगली :
मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे २२ वे राज्यव्यापी अधिवेशन १५, १६ आणि १७ फेब्रुवारी दरम्यान सांगलीत होणार आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार आणि शेतमजूर विरोधी धोरणाच्या विरोधात विचारमंथन होणार आहे. राज्यातून निमंत्रित ४०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक ढवळे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांना दिली.
सांगलीत माकपच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डावे पक्ष, पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्वागताध्यक्षपदी व्ही. वाय. उर्फ आबा पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, सरचिटणीसपदी उमेश देशमुख, उपाध्यक्षपदी हमाल पंचायतचे विकास मगदुम, भारीप-बुहजन महासंघाचे अध्यक्ष गौतम लोटे, सीपीआयचे नेते रमेश सहस्त्रबुद्धे यांच्यासह १२५ जणांची स्वागत समिती करण्यात आली.
ढवळे म्हणाले, या अधिवेशनाचे उद्घाटन समारंभ, जाहीर सभा, १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सांगलीतील मराठा सेवा संघाच्या सभागृहात अधिवेशन होणार आहे. सकाळी औपचारिक उद्घाटन होऊन कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून फेरी निघणार आहे. फेरीनंतर स्टेशन चौकात होणाऱ्या जाहिर सभेत माकपचे जनरल सेक्रेटरी माजी खासदार सिताराम येच्युरी, पश्चिम बंगालचे माजी खासदार निलोत्पल बसू यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या अधिवेशनात प्रामुख्याने मोदी सरकारची शेतकरी विरोधी धोरण, फसवी कर्जमाफी, धर्माधंतेचा धोका, नोटाबंदी, जीएसटीमुळे निर्माण झालेी बेरोजगारी या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, या अधिवेशनात ठराव संमत होणार आहेत. देशात मोदी सरकार आल्यापासून धर्माधतेचा धोका निर्माण झाला आहे. कामगार नेते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह अनेक साहित्यिक, पत्रकार यांच्या हत्या होत आहेत. या हत्या चिंताजनक आहेत. गोरक्षेच्या नावाखाली हत्या होत असून, देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हे प्रकार वाढत आहेत. या सर्व फॅसिष्ट शक्तींच्या विरोधात सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करून मुकाबला करण्याची रणनिती ठरवली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीतीसंगमावरील कृष्णेच्या पाण्याला दुर्गंधी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील कृष्णेच्या पाण्यात दररोज शेकडो आबालवृद्ध पोहण्यासाठी येतात. मात्र, टेंभू योजनेसाठी कराडजवळ पाणी अडवल्याने पोहणाऱ्याची गैरसोय होत आहे. पाण्याचा प्रवाह रोडावल्यामुळे दुर्गंधी येऊ लागली आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नही गंभीर झाला आहे.
टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचे पात्र कराडजवळ अडवून त्यामध्ये पाणी अडवण्यात आल्यामुळे पाण्याचे वाहणे थांबले आहे. तीच स्थिती कृष्णा नदीला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या कोयना नदीचीही झाली आहे. परिणामी पाणी अनेक दिवस साचून त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. पिण्यासाठी येणाऱ्या पाण्याचीही दोन दिवसांपासून चव बदलली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी कडेगाव, आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी मिळावे, या हेतूने सरकारने येथील कृष्णा नदीचे पाणी टेंभू गावाजवळच्या नदी पात्रामध्ये अडविले आहे. तिथून पाणी उचलण्यासाठी पाण्याची आवश्यक पातळी ठेवावी लागते. ती ठेवण्यासाठी नदीचे वाहते पाणी अडवण्यात येते. अनेक दिवस पाणी अडवण्यात येत असल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्याचे प्रवाह थांबविले जात आहेत. परिणामी पाण्यामध्ये जलचर वाढून शेवाळची मोठ्या प्रमामात वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येऊन ते वापरास अयोग्य होत आहे. त्याचबरोबर नदीच्या पाण्यात अनेक गावचे सांडपाणी मिसळते. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यामध्ये वाढ होत आहे. पालिकेकडून नदीचेच पाणी शुद्धिकरण करुन पिण्यास दिले जाते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्याही पाण्याची चव बदलली आहे. शेवाळासारखा वास पाण्याला येऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टेंभू प्रशासन आणि पालिकेने याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कासवरील अवैध बांधकाम धारकांवर गुन्हेतहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांची माहिती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
कास परिसरातील तेरा अवैध बांधकाम धारकांवर महसूल विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली. दरम्यान, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, आता अवैध बांधकाम धारकांवर कायदेशीर फास आवळण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट झाला होता. या बाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मंत्री शिवतारेंनी चार महिन्यांपूर्वी या भागाची पाहणी करून या धनदांडग्यांच्या मुजोरीला लगाम घालण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तदनंतर प्रशासनाने कारवाईचे कागदीघोडे नाचवले. प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी सुमारे ३० बांधकामधारक न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने फटकरल्यावरही प्रशासन गप्प होते. दरम्यान, कास रस्ता खचल्यानंतर दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला पळवून लावल्याने ग्रामीण-डोंगरी भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने पत्रकारांनी आक्रमक होत पालकमंत्र्यांना धारेवर धरल्यावर शिवतारेंनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडेबोल सुनवत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री शिवतारे शनिवारी नियोजन समितीची बैठक असल्याने साताऱ्यात आहेत. त्यापूर्वीच तेरा अवैध बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाई फार्स
कासवरील सरसकट ९६ अवैध बांधकामांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक असताना केवळ तेरा जणांवर कारवाईचा फार्स करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहे. यातून प्रशासन काय सिद्ध करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असले तरी पालकमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी तेरा जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करून जुजबी कारवाई न करता ठोस धडक कारवाई करून बेकायदा इमले उभारणाऱ्यांवर कायद्याचा दंडुका उगारावा, अशी मागणी सातारकर करीत आहेत.
दरम्यान, पालकमंत्र्यांचा दौरा लागला की, तहसिलदार कासच्या धूळखात पडलेल्या फायली मागवून यंत्रणा सक्रिय करतात. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अकरा बांधकामांमुळे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकामे थांबत नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांची गाडीबळीराजा संघटनेने अडवली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
कर्जमाफीतील गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. शिवाय ऊसदर जाहीर करण्यापूर्वीच साखर कारखान्याच्या गाळप उद्घाटनाला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना रोषाला सामोरे जावे लागले. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरच बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी सहकार मंत्र्यांची गाडी अडवत जाब विचारला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात देखील बळीराजाचे कार्यकर्ते गाडी अडवण्यासाठी गाडीच्या समोर झोपल्याने देशमुख यांना गाडी थांबवावी लागली. मात्र, तरीही आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सहकारमंत्री गाडीच्या खाली उतरले नाहीत. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून देशमुख यांचा निषेध केला.
सहकारमंत्री सुभाष देशमुख पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत प्रारंभासाठी आले होते. उसाचा दर जाहीर केल्याशिवाय गाळप प्रारंभ करू न देण्याचा इशारा बळीराजा संघटनेने देऊनही सहकार मंत्र्यांनी पहिल्यांदा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचा गाळप प्रारंभ केला. या वेळी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि धनंजय महाडिक आणि आमदार भारत भालके उपस्थित होते.
पहिल्या कारखान्यावरील कार्यक्रम शांततेने झाल्यावर मंत्री दुसऱ्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागले.
उजनीवर सौर उर्जा प्रकल्प
सोलापूर-पुणे-अहमदनगर जिल्ह्यातील जनतेला वरदान असलेल्या उजनी धरणावर आता लवकरच ५०० मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चेन्नईमधील टेकफेडरल या कंपनीने हे काम करण्याची तयारी दर्शवल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
उजनी धरणाचे पाणी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर पसरले असून, यातील ५ हजार हेक्टर क्षेत्रावर हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करायची योजना आहे. धरणाच्या पाण्यावर हा सौर ऊर्जा प्रकल्प होणार असल्याने जमीन आणि मोबदला यासाठी पैसा खर्च होणार नाही. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीने तीन रुपये पंचवीस पैसे युनिट दराने वीज खरेदीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. मासेमारी आणि पर्यटनास अडथळे न आणण्याच्या अटीवर सरकार उजनी धरणावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी देण्याच्या विचारात असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सोलापूर-पुणे इंटरसिटी इंद्रायणीगाडी चार महिने बंद

$
0
0

सोलापूर
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड-सोलापूर या रेल्वे मार्गावर वाशिंबे-जेऊर दरम्यान ट्रॅकच्या कामासाठी एक नोव्हेंबरपासून १२५ दिवस म्हणजे ४ महिने दररोज १ तास ४५ मिनिटे वाहतूक बंद राहणार आहे. या काळात प्रवासी गाड्यांच्या मार्गात व वेळेत बदल करण्यात येत आहे. या कालावधीत दुपारी धावणारी सोलापूर-पुणे इंटरसिटी गाडी चार महिने बंद राहणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा यांनी सांगितले.
सोलापूरकरांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (गाडी क्र १२१६९ व १२१७०) ही गाडी पूर्णपणे बंद राहणार आहे. आठवड्यातून तीन दिवस धावणारी साईनगर-पंढरपूर एक्स्प्रेस (गाडी क्र ११००१ व ११००२) ही गाडीही चार महिन्यांसाठी रद्द करण्यात येत आहे.
तसेच काही पॅसेंजर गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. पुणे सोलापूर पॅसेंजर (क्र ५१४४९) ही गाडी भिगवनपर्यंत धावणार आहे. सोलापूर पुणे पॅसेंजर (क्र ५१४५६) ही गाडी भिगवनवरुन पुण्यापर्यंत धावणार आहे, भिगवणपासून सोलापूरपर्यंतही धावणार नाही. हैदराबाद-पुणे एक्सप्रेस (क्र १७०१४) गाडी हैदराबाद-कुर्डुवाडी रेल्वेस्थानकपर्यंतच धावणार आहे. ही गाडी पुन्हा पुण्याहून न सुटता कुर्डुवाडीहूनच हैद्राबादकडे रवाना होणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोन दिवस धावणारी गाडी एक नोव्हेंबरपासून दररोज निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने धावणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवड्यात मुख्यमंत्री बदलण्याची सेनेची ताकद: महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मुंबई महापालिकेचा महापौर बदलून भाजपचा करणे अवघड नाही हे विधान मुख्यमंत्रिपदाला शोभणारे नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाबाबत, अच्छे दिन कसे येतील या नियोजनाबाबत आणि सीमाभागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत बोलावे. त्यांच्या विकासाधारीत भाष्यावर नागरिक त्यांचे नक्कीच अभिनंदन करतील. राहिला प्रश्न महापौर बदलण्याचा, तर राज्याचा मुख्यमंत्री सात दिवसांत बदलण्याची ताकद शिवसेनेत आहे आणि प्रसंगी ती ताकद दाखवू,’ असा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला.

येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघ अधिवेशनातील परिसंवादानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हाती आहे म्हणूनच राज्य सरकारसाठी काही गोष्टी सोप्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी महापौर बदलाच्या वल्गना करण्यापूर्वी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, असा इशारा देऊन महाडेश्वर म्हणाले, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाच नगरसेवक शिवसेनेत आणल्यानंतरही काहींनी पक्षांतरबंदीच्या निर्णयावरून टीका केली. मात्र सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश प्रमाणानुसार गट स्थापन करण्याचा अधिकार पक्षांतरबंदी विरोधी कायद्यानुसार आहे. त्यामुळे मनसे नगरसेवक शिवसेनेत आणण्यात मी पुढाकार घेतला असेल तर कायद्याचा भंग केलेला नाही. आणि जे मनसेचे नगरसेवक शिवसेनेत आले ते मूळचे सेनेचेच होते. भाजपने त्याचा विचार करू नये. शिवाय किरीट सोमय्या यांनी मराठी नगरसेवकांच्या निष्ठेविषयी न बोललेलेच बरे.

शिवसेनेच्या मराठी माणसाविषयीच्या आत्मीयतेबद्दल कुणीही शंका घेण्याची गरज नाही.’

मनसेचे नगरसेवक शिवसेनेत आणण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला या प्रश्नावर बोलताना महाडेश्वर यांनी, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील आमदार भाजपमध्ये आणण्यासाठी भाजपने जो फॉर्म्युला वापरला तो काय होता ते आधी भाजपने जाहीरपणे सांगावे, अशी पुष्टी जोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ पदे घेऊन मिरवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कार्यकर्त्यांनी गावागावात केवळ पदे घेऊन मिरविण्यासाठी पक्षाचे सभासद होण्याची गरज नाही. पक्ष संघटना बळकटीसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी झपाट्याने कामाला लागा. पदे घेऊनही काम करणार नसणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिला. पक्षाच्या ताराबाई पार्कातील शर्वरी संकुल येथील कार्यालयात सभासद नोंदणी संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. शुक्रवारपासून कार्यकर्त्यांना अर्ज वाटपास सुरुवात झाली.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ‘पक्षाचे काही सभासद पक्षाकडून पदे घेतात. मात्र त्या पदांना अनुसरुन काहीही काम केले जात नाही. ही पदे केवळ दारे, वाहने आणि लेटरपॅडवर छापण्यापुरती नसावीत. पदाला साजेसे काम करुन पक्ष वाढीसाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. सर्वसामान्य माणसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक आपुलकीचा आणि हक्काचा वाटला पाहिजे. त्यासाठी पद हाती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी झपाट्याने कामाला लागले पाहिजे. जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर दिल्या जाणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणी मोठ्या संख्येने करण्याची गरज आहे. पदांचा वाटप झाल्यानंतर तीन ते सहा महिन्यांचा कामाचा आढावा घेतला जाईल. या आढाव्यात कामचुकारपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे.’

जयकुमार शिंदे यांनी ब्रिदी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. हातकणंगले तालुका युवक अध्यक्षपदी अमोलदत्त कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. दरम्यान यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. पक्षाच्या कामानिमित्त पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर परगावी असल्याने गैरहजर राहिल्याचे मेळावा संयोजकांनी मेळाव्यात जाहीर केले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, बाबासाहेब पाटील, संगीता खाडे, मधुकर जांभळे, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, रामसिंग रजपूत, अमरसिंह पाटील, पंडितराव केणे, विश्वनाथ कुंभार, बाजीराव पाटील, कल्पेश चौगुले, संजीवनी कदम, स्वाती मोरे, स्वाती कांबळे, निर्मला बोडके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images