Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरोघरी सजली मांगल्याची गुढी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

मराठी नववर्षाचा पहिला दिवस, गुढी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने आणि मांगल्यपूर्ण वातावरणात मंगळवारी साजरा झाला. दारात काढलेल्या रांगोळ्या, सकाळच्या मंगलमय, आनंदी वातावरणात घरासमोर उभारल्या गेलेल्या गुढ्या अशा वातावरणात चैत्र महिन्याचे स्वागत झाले.

गुढीपाडव्याच्या तयारीची लगबग पहाटेपासून सुरू झाली असली तरी, सकाळी साडेआठपर्यंत अमावस्या असल्यामुळे महिलांना तयारीसाठी थोडा अवधी मिळाला. सकाळी साडेआठ वाजल्यानंतर काठीची स्वच्छ करून, त्याला जरतारी वस्त्र, चाफ्याची माळ, साखरमाळा, कडूनिंबाची पाने लावून सजविण्यासाठी आख्खे कुटुंब तयारीत गुंतले होते. सकाळी नऊ वाजल्यानंतर अंगणात रांगोळी काढून गुढीचे पूजन करण्यात आले. तर दुपारी बारा वाजता गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. शुभमुहूर्त असल्याने विविध वस्तूंच्या खरेदीबरोबरच अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. दिवसभर सोशल मीडियावर नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता. तर ऑनलाइन शॉपिंग साइटवरही गेल्या काही दिवसांपासून ऑफर्सचा धमाका सुरू आहे. गुढीपाडव्या दिवशी अनेक शाळांमध्ये मुलांचे प्रवेश निश्चित झाले. मराठी आणि काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांत आज मुहूर्चतावरील प्रवेश प्रक्रिया झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांगलादेशसह नेपाळमधून मुलींची तस्करी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकाक येथील स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जुना राजवाडा पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटने देशव्यापी सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण ठरत असल्याने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छुपा व्यवसाय कोल्हापुरात फोफावल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २८) केलेल्या कारवाईतील चार संशयितांना कोर्टात हजर केले असता, त्यांना ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावली होती, तर त्याच्याहीपूर्वी सादळे-मादळे येथील एका हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या सर्व प्रकारांमध्ये मुंबई, कोलकाता, नेपाळ आणि थेट बांगलादेशातील पीडित मुलींचा वापर केला जात होता. गेल्या काही वर्षात शहरात छुप्या पद्धतीने हा प्रकार सुरू आहे, मात्र पोलिसांपर्यंत याच्या तक्रारी पोहोचत नसल्याने कारवाई झाली नाही. गोकाक येथील स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह दोन पीडित मुली पोलिसांच्या हाती लागल्या.

सेक्स रॅकेट चालवण्यामध्ये दाम्पत्य सक्रीय असल्याचे पाहून पोलिसही चक्रावले होते. विशेष म्हणजे दिनेश स्वामी या संशियिताच्या साळोखे पार्कातील टुमदार घरातच हा छुपा कुंटणखाना सुरू होता. ग्राहकांकडून लाखो रुपये उकळून त्यांना थेट नेपाळ, बांगलादेशी पीडित मुली पुरवल्या होत्या. याशिवाय ग्राहकांकडून पुरेशी रक्कम न मिळाल्यास त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटले जात होते. जुना राजवाडा पोलिसांनी या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईतून मुलींना घेऊन आलेला संशयित नवकुमार मोहती याची अधिक चौकशी सुरू केली आहे. त्याने मुंबईतून कुठून पीडित मुलींना आणले याचा शोध पोलिस घेत आहेत, त्याचबरोबर स्वामी दाम्पत्याकडून किती वर्षांपासून हा प्रकार सुरू होता याचा तपास सध्या सुरू आहे.

३१ पर्यंत पोलिस कोठडी

सेक्स रॅकेटमधील संशयित नवकुमार मलाई मोहती (वय ३०, रा. उल्हासनगर), अनिल उर्फ जनविजय पाटील (३६, रा. हनुमाननगर, कोल्हापूर), दिनेश दानय्या स्वामी (३४) आणि त्याची पत्नी पूजा दिनेश स्वामी (२९, दोघेही रा. आयटीआय कॉलेजच्या मागे, गणेश कॉलनी) या चौघांना मंगळवारी कोर्टात हजर केले असता, यांना ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर रस्ते मार्ग बदलणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रादेशिक आराखड्यात सूचवण्यात आलेल्या प्रस्तावित रस्त्यांच्या मार्गात १०० पेक्षा जास्त संख्येने घरे बाधित झाल्यास रस्त्याचे मार्ग बदलण्यात येतील, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ट्रक टमिनससाठी खासगी जागेवर आरक्षण न टाकता सरकारी अथवा महामंडळाच्या जागेवर आरक्षण टाकण्याची सूचना आजच्या बैठकीत मान्य करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

चोक्कलिंगम म्हणाले, ‘आराखड्याला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी तो हरकती व सूचनांसाठी जनतेसमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भात ५३९० हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यामधील सर्वात जास्त हरकती या रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबतच्या होत्या. यामध्ये तालुक्याची ठिकाणे, नगरपालिकांसह १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये बायपास रस्ते सुचविण्यात आले आहेत. बायपास रस्ते व रस्ते रुंदीकरणात ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने घरे बाधित होत आहेत त्या ठिकाणी रस्त्यांचे मार्ग बदलावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. रस्त्यांमध्ये चार ते पाच घरे आली तर रस्त्याचा मार्ग बदलण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच रस्ता मार्गामध्ये विहिरींची संख्या जास्त असतील तर मार्ग बदलण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले. सरकारी नियमाप्रमाणे राज्य महामार्ग असेल तर ४५ मीटर आणि राष्ट्रीय महामार्ग असेल तर ६० मीटर रुंदी ठेवण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. इचलकंरजीमध्ये नवीन निवासी भागांमध्ये सुद्धा यंत्रमाग उद्योगासाठी वापरास परवानगीची मागणीही मान्य करण्यात आली.

काही ठिकाणी जमिनीचे क्षेत्र शेती विभागातून वगळून औद्योगिक विभागात वर्ग करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यामध्ये पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये कृषीपूरक उद्योगांव्यतिरिक्त अन्य उद्योगांना परवानगी देता येणार नाही. तसेच इतर क्षेत्रात शेती वापर विभागामध्ये औद्योगिक वापरास परवानगी असल्याचे सरकारचे धोरण आहे. त्याठिकाणी विशेष निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीला आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, डॉ. एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, प्रादेशिक योजना नगररचनाचे उपसंचालक एम. आर. खान यांच्यासह विविध नगरपरिषदांचे नगराध्यक्ष उपस्थित होते.

सरकारी जागेवर ट्रक टर्मिनसचे आरक्षण

कोल्हापूर परिसर आणि इचलकरंजीत सुचविण्यात आलेल्या ट्रक आणि बस टर्मिनससाठी काही ठिकाणी खाजगी जागांवर आरक्षण टाकण्यात आले होते. याबाबत आमदारांनी पर्याय सुचवून वाहन तळासाठीचे आरक्षण हे खाजगी जमिनीवर न करता रस्त्यांच्या बाजूला ज्या ठिकाणी सरकारी किंवा महामंडळांची जमीन उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी ट्रक आणि बस टर्मिनससाठी आरक्षण टाकावे, अशी मागणी केली. भूसंपादनासाठी लागणाऱ्या खर्चातही बचत होणार असल्याने आमदारांचे म्हणणे मान्य करुन ही शिफारस आराखड्यात समाविष्ठ करण्यात येणार आहे.


‘टोप, अंबपवाडी’ चा निर्णय नाकारला

टोप, संभापूर, कासारवाडी, अंबप व अंबपवाडी परिसरातील सुमारे १८३ हेक्टर जमिनीमध्ये एकात्मिक नगरवसाहत प्रकल्प वसाहतीसाठी जमीन वापर विभागात बदल करुन जमिनीचा रहिवास विभागात समाविष्ठ करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. हा निर्णय प्रादेशिक आराखड्यांतर्गत निर्णय होवू शकत नसल्याने टाऊनशिप पॉलिसीखाली अर्ज करावेत, असे समितीने सूचना केली आहे.


आजऱ्याची चूक सुधारली

आजरा नागरी संकुलामध्ये औद्योगिक वसाहत सुचविण्यात आली होती. आरक्षणाची तां​त्रिक चूक लक्षात आल्यावर तत्काळ सुधारणा करुन ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत अस्तित्वात आहे त्याच ठिकाणी दर्शविण्यात यावी व नवीन दर्शविण्यात आलेले ठिकाण तत्काळ वगळावे, असे आदेशही विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिला.

लोहमार्गाचा निर्णय रेल्वेकडे

प्रस्तावित कराड-बेळगाव लोहमार्गाची आखणी कोल्हापूर शहरालगत क्षेत्रातून करावी, अशा सूचना आल्या होत्या. पण लोहमार्गाचा निर्णय घेण्याचे अधिकार रेल्वे विभागाला असल्याने सूचना करणाऱ्यांनी याबाबत रेल्वे विभागाकडे मागणी करावी. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘योगी’ कैदी माफीच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारागृहातील कैद्यांच्या वागणुकीत सुधारणा व्हावी आणि शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांपासून दूर राहावे यासाठी कैद्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. कैद्यांनी प्रामाणिकपणे योगासने करावित यासाठी त्यांना शिक्षेत माफी देण्याचेही जाहीर केले होते. या निर्णयानुसार कळंबा कारागृहातील ७४ कैदी योगा परीक्षेत उत्तीर्ण झाले, मात्र यातील एकाही कैद्याला अद्याप शिक्षेत माफी मिळाली नाही. कारागृह प्रशासनाने पाठवलेले माफीचे प्रस्ताव कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात पडून आहेत, त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कैद्यांना माफीचा काहीच लाभ मिळाला नाही.

भारतातील प्राचीन योगविद्या जगभरात पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने विशेष प्रयत्न केले. जागतिक योगदिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिले होते. यानुसार देशभरातील कारागृहांमध्येही कैद्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. कैद्यांनी प्रामाणिकपणे योग शिक्षण आत्मसाद करावे आणि याचा त्यांना पुढील आयुष्यात फायदा व्हावा यासाठी कारागृह प्रशानाकडून कैद्यांना शिक्षेत माफी देण्याचे जाहीर केले होते. अपर पोलिस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांनी तसे परिपत्रक प्रसिद्ध करून कैद्यांना योगाचे शिक्षण देण्याचे आदेश दिले होते.

यानुसार कळंबा कारागृहात फेब्रुवारी २०१६ मध्ये योगा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. कारागृहातील १०० हून अधिक कैद्यांनी योगा प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. यातील ७४ कैदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने ते शिक्षेत माफी मिळवण्यास पात्र ठरले आहेत. एक वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी तीन महिन्यांची सवलत मिळणार आहे. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी माफीसाठी पात्र ठरलेल्या कैद्यांचे प्रस्ताव महासंचालक कार्यालयाकडे पाठवले आहेत, मात्र अद्याप यावर कारवाई न झाल्याने परीक्षा पास होऊनही कैद्यांना माफीची सवलत मिळू शकली नाही. ७४ कैद्यांमधील काही कैदी मिळालेली शिक्षा भोगून बाहेर आले. काही कैदी येत्या दीड-दोन महिन्यात बाहेर येतील, मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून माफीची फाईल पुढे सरकली नसल्याने कैद्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

योगाच्या प्रशिक्षणानंतर घेतलेल्या परीक्षेत ७४ कैदी उत्तीर्ण झाले आहेत. या कैद्यांना शिक्षेत माफी मिळणार असल्याने त्यांचे प्रस्ताव अपर पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवले आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी येताच पात्र कैद्यांना याचा लाभ मिळेल.

शरद शेळके, कारागृह अधीक्षक, कळंबा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील दारुबंदी बारगळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य मार्गांसह महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मार्गांवरील ५०० मीटरच्या आतील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश सुप्रिम कोर्टाने दिला होता. आता या आदेशातून परमिट रुम आणि बिअर बारना वगळले असून, केवळ रिटेल विक्रीची दुकाने बंद होणार असल्याचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. निर्णयातील नवीन सुधारणांमुळे जिल्ह्यातील केवळ १४ दुकाने बाधित होणार आहेत, परिणामी सुप्रिम कोर्टाच्या आदेशातील मूळ हेतू मात्र मागे पडणार असल्याने महामार्गांवरील दारुबंदी बारगळल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह राज्यमार्गांलगत दारूविक्री करणारे वाईन शॉप, बिअरबार आणि कंट्रीलिकरच्या दुकानांची संख्या १३६५ इतकी आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याने सुप्रिम कोर्टाने महत्त्वाच्या मार्गांलगत ५०० मीटर अंतरातील दारूविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील एकूण १३६५ दुकानांपैकी ६८३ दुकानांना कुलूप लागणार होते. बाधित दुकानांचे परवाने नुतणीकरणाचे कामही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बंद केले होते. या निर्णयाने अस्वस्थ झालेल्या मद्यविक्रेत्यांनी निर्णयाच्या विरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती, त्याचबरोबर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. परवाने नूतणीकरण रखडल्याने राज्याच्या महसूल वसुलीवरही मोठा परिणाम जाणवत होता, त्यामुळे राज्य सरकारनेही या निर्णयातून सूट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दारू विक्रेत्यांशी चर्चा करून त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले होते. अखेर अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रिम कोर्टाचा निर्णय केवळ रिटेल विक्रेत्यांना लागू असल्याचे स्पष्ट करून परमिट रुम आणि बिअरबारना दिलासा दिला आहे.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयातील सुधारणांमुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवरील ६८२ दारू विक्रेत्यांना दिलासा मिळाला असला तरी मूळ निर्णयातील हेतूबाबत शंका उपस्थित झाली आहे. महामार्गांवरील दारू विक्रीची सर्व दुकाने अपघातांना निमंत्रण देणारी ठरताता, मग यातून परमिट रुम आणि बिअर बारना वगळण्याचे तर्कशास्त्र स्पष्ट होत नाही. परमिट रुम आणि बिअरबारमुळे अपघात होणारच नसल्याचा सरकारचा दृष्ट‌िकोण आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या निर्णयानंतर आता रिटेल विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. कदाचित या १४ रिटेल विक्रेत्यांनाही एखादी पळवाट मिळू शकते.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर महामार्गांवरील दारुविक्रीच्या ६८३ दुकानांचे परवाने नुतणीकरणाचे काम बंद होते. नव्याने आलेल्या आदेशानुसार परवाने नुतणीकरण करणे सुरू झाले आहे. रिटेल विक्रीच्या १४ दुकानांचा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे.

संजय पाटील,उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट’ चे शतक पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रमणमळा येथील पोस्ट ऑफ‌िसच्या प्रधान कार्यालयात नव्याने सुरु झालेल्या पासपोर्ट कार्यालयात दोन दिवसांत १०० अर्जदारांनी पासपोर्टसाठी आवश्यक कागपदत्रे व अन्य प्रक्रिया पूर्ण केल्या. पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पासपोर्टसंदर्भात माहिती घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

शनिवारी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पासपोर्ट कार्यालयास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या पासपोर्ट नुतनीकरणाने कार्यालयास सुरुवात झाली. शनिवारी ५० जणांना अपाईंटमेंट दिली होती.

सोमवारीही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० जणांना ऑनलाइन अपॉईंटमेंट दिली होती. अपॉईमेंट मिळालेल्या व्यक्तीला प्रथम टोकन दिले जाते. त्यानंतर टाटा कन्सल्टंटी कार्यालयाच्या कर्मचाऱ्याकडून हाताचे ठसे, डोळ्याचे स्कॅनिंग झाले. तसेच मूळ कागपत्रांची तपासणी पासपोर्ट व्हेरिफिकेशन अधिकाऱ्यांनी केली.

पुण्यामध्येच कोल्हापुरचा ऑपशन

पासपोर्ट नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. सर्व प्रथम www.passportindia.gov.in ही वेबसाईट ओपन केल्यानंतर फ्रेश, रिन्यू, मायनर हे ऑपशन येतात. नवीन अर्ज भरण्याऱ्यांनी फ्रेशमध्ये ऑनलाईन फॉर्म भरावयाचा असतो. पासपोर्टसाठी प्रत्येक व्यक्तीचा ई मेल असणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन पेमेंट करावयाचे असते. त्यानंतर अपॉईमेंटसाठी तारीख मिळते. कोल्हापुरात नवीन कार्यालय मिळाले असले तरी अर्ज भरणाऱ्या शहरामध्ये कोल्हापूर हा ऑप्शन नसतो. पण कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील व्यक्तींनी पुणे ऑपशन निवडायचा. फॉर्म भरताना कोल्हापूरच्या पिनकोडची नोंद केल्यानंतर अर्ज भरणाऱ्या व्यक्तींना कोल्हापूर कार्यालयाची अपॉईमेंट मिळते. कोल्हापूरचे कार्यालय पुणे कार्यालयाच्या अखत्यारित असल्याने फॉर्म भरताना पुणे ऑपशन सिलेक्ट करावा, असे व्हेरिफिकेशन ऑफ‌िसर शशिकांत नरके यांनी सांगितले.

शेड्यूल चेंज करुन घ्या

कोल्हापूर कार्यालय सुरू होण्यापूर्वी अनेक जणांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यांना मुलाखतीसाठी पुण्यात बोलावले आहे. पण कोल्हापूर कार्यालय सुरू झाल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेड्यूल चेंज करुन घेण्याची गरज आहे. शेड्यूल्ड चेंज करण्यासाठी अर्जदारांनी ०२० २५६७५४२१, २५६७५४२२ या क्रमांकाशी संपर्क साधवा अथवा rpo.pune@mea.gov.in या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

अपॉईमेंटला ओरिजनल कागदपत्रेच हवी

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जदाराला अपॉईमेंट दिली जाते. अर्जदाराला जन्मदाखला, अॅड्रेस प्रुफ व दहावी व त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा दाखला आवश्यक आहे. अर्जदाराने ओरिजन कागदपत्रे व ओरिजनन झेरॉक्स कागदपत्राचा एक संच घेऊन यावा. झेरॉक्स कागदपत्रावर सेल्फ असेस्टड म्हणून अर्जदाराने स्वतःची सही करावयाची असते. झेरॉक्स कागदपत्रावर अन्य कोणत्याही गॅझेडेड अधिकाऱ्याची सहीची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या व्यक्ती निरक्षर आहेत. त्यांना फक्त जन्मदाखला व पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. आधारकार्ड व पॅनकार्ड हे प्रमुख पुरावे म्हणून मान्य केले जातात.

सरकारी कर्मचारी वगळता अन्य व्यक्तींना पोलिस व्हेरिफिकेशन

सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस व्हेरिफिकेशनची गरज नसते. कारण नोकरीत जाँईन होताना त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन झालेले असते. पण सरकारी कर्मचारी वगळता अन्य व्यक्तींच्या पासपोर्ट कागदपत्रांचे पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांसाठीही ‘सहल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

भाजप आघाडीने विविध मित्रांची मोट बांधत जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत केली असली तरी विषय समितींच्या सभापती निवडीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी सदस्य फोडाफोडीच्या हालचाली चालल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभापती निवडीपर्यंत आणखी काही सदस्य भाजप आघाडीत दाखल होण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आघाडी सतर्क झाली आहे. विरोधकांना संधी मिळू नये यासाठी दोन दिवसांत दोन्हीकडील सर्व सदस्य सहलीवर पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, भाजप आघाडीने महापालिकेतील महादेवराव महाडिक पॅटर्न अवलंबला असून बंद लखोट्यातून सभापतींची नावे दिली जाणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने मोठे यश मिळवल्यानंतर अध्यक्ष बनवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. त्यासाठी विविध मंडळे, गोकुळ, साखर कारखान्यांपासून विधान​परिषदेपर्यंतची अमिषे दाखवली गेली आहेत. त्यानुसार अध्यक्ष भाजपचा झाला असला तरी विषय समितींच्या सभापती निवडीसाठी आघाडीतील अनेक घटक इच्छुक झाल्यामुळे प्रचंड गुंता निर्माण झाला आहे. अनेकांची नाराजी बाहेर येऊ लागली आहे. त्या नाराजीचा फायदा घेत विरोधी काँग्रेस आघाडीच्यावतीने जाळे टाकण्यास सुरुवात केली होती. भाजप आघाडीतील सदस्य गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने सभापती निवडीबाबत आघाडीतील सदस्यांची बैठक घेऊन सदस्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जादा समिती निर्माण करुन सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचेही आश्वासन ​आघाडीच्यावतीने देण्यात येत आहे.

एकंदरीत सभापती निवडीच्यानिमित्ताने पुन्हा जिल्हा परिषदेतील राजकारण तापू लागले असून विरोधकांच्या हाताला सदस्य लागू नयेत याची दक्षता घेण्यात येत आहे. पालकमंत्री पाटील यांनी आणखी काही सदस्य लवकरच आघाडीत येतील असे सांगून फोडाफोडीचे संकेत दिले आहेत. पण काँग्रेस आघाडीकडून अद्यापपर्यंत काहीच दावा करण्यात आलेला नाही. मात्र आघाडीचे सदस्य विरोधकांच्या हाताला लागू नयेत यासाठी दोन दिवसात सदस्यांना सहलीवर पाठवण्यात येणार आहे. भाजप आघाडीकडूनही सदस्यांना सहलीवर पाठवण्यात येणार आहे.

मित्रपक्षांचा दबाव वाढला

सदस्यांची संख्या कमी होऊ नये यासाठी आघाडींच्यावतीने खबरदारी म्हणून सहलीवर पाठवण्यात येणार असले तरी सभापतिपदी आपल्या सदस्याची वर्णी लावावी म्हणून मित्र पक्षांनी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी चार समितींऐवजी त्यातील खात्यांची विभागणी करुन समितींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण, बांधकाम, जलसंपदा, कृषीबरोबर अर्थ, आरोग्य, पाणीपुरवठा, पशूसंवर्धन अशा आठ समिती करण्याचा विचार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु आहेत. यानुसार जर समिती वाढवल्या गेल्या तर जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळून नाराजी कमी करता येईल, असा विचार आहे. मात्र अशा ​समिती निर्माण केल्यानंतर त्यांच्या कामकाजात अर्थ राहणार नाही, असाही सूर व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास आराखडा अखेर रेटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास आराखड्यावर विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी आक्षेप आणि हरकती नोंदवल्या आहेत. शिवाय गंभीर त्रुटीही निदर्शनास आणून दिलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून तो मंगळवारी मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आराखड्यावर ५३९० हरकती व सूचना केल्या आहेत. मात्र आराखडा ३१ मार्चपर्यंत सरकारकडे पाठवायचा असल्याने तो घाईने मंजूर करण्यात आला. दरम्यान, ज्या त्रुटीं आहेत त्याबाबत नियमानुसार मार्ग काढून १५ ऑगस्टपर्यंत आराखड्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.

प्रादेशिक आराखड्याचे सुरवातीला सार्वत्रिक स्वागत झाले. पण, आराखड्याचे स्वरुप समजू लागले तसे हरकती व सूचनांचा पाऊस पडला. तब्बल ५३९० हरकती व सूचना आल्या. त्यात सर्वाधिक हरकती रस्ता रुंदीकरणाबाबतच्या आहेत. राजारामपुरीतील प्रादेशिक विभागाच्या कार्यालयात अनेक गावांतील शिष्टमंडळाकडून हरकती नोंदवण्यात आल्या. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्सने आराखड्याची चिरफाड केल्यानंतर राजकर्त्यांना जाग आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर त्रुटी असतील तर आराखडा रद्द केला जाईल, अशी घोषणा केली आहे. त्रुटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आराखडा मंजूर करण्यात आला.

गुढीपाडव्याची सुटी असूनही चोक्कलिंगम कोल्हापुरात आले. जिल्हधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत हरकती व त्रुटींवर चर्चा करण्यात आली. रस्ते रुंदीकरणात ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने घरे बाधित होत आहेत ते मार्ग बदलावेत, अशा सूचना यावेळी बहुतांश सदस्यांनी केल्या. पण राज्य महामार्गाची रुंदी ४५ मीटर तर राष्ट्रीय महामार्गाची रुंदी ६० मीटरच असेल, असे समितीने मान्य केले आहे.

लहान गावात ७५० मीटर आणि मोठ्या गावात १५०० मीटरपर्यंत वाढ करण्याची सूचना कायम ठेवली आहे. ट्रक टर्मिनससाठी खासगी जागेवर आरक्षण न टाकता सरकारी किंवा महामंडळाची जागा असेल त्या जागेचा विचार करावा, अशी सूचना करण्यात आली. इचलकरंजीत निवासी भागात यंत्रमाग उद्योगाला परवानगी असावी ही आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या सूचनेची शिफारस आराखड्यात करणार आहेत. आजरा नागरी संकुलात सूचवलेली औद्योगिक वसाहत तांत्रिक चुकीमुळे दर्शवण्यात आली होती हे बैठकीत मान्य करण्यात आली. कराड-बेळगाव लोहमार्गाची आखणी कोल्हापूर शहरालगतच्या क्षेत्रातून करावी, अशी सूचना करण्यात आली. पण, हा निर्णय रेल्वे विभाग घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

००००

आराखड्यात अनेक त्रुटी आहेत. त्या आम्ही दाखवून दिल्या आहेत. पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आराखडा मंजुरीला सहा महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी करणार आहोत. त्रुटींचे निराकरण करुनच आराखडा मंजूर केला पाहिजे.

आमदार चंद्रदीप नरके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा प्रोजेक्ट विभाग नावापुरताच; प्रकल्पांच्या तपासणीवर वाढता खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत प्रोजेक्ट विभाग आहे, इंजिनीअर आहेत. विभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंते आहेत. तरीही प्रकल्पांचे काम रखडले, कामात त्रुटी आढळल्या की तपासणी करायला मात्र थर्ड पार्टीची नियुक्ती अशी पद्धतच पडली आहे. काही वेळेला सोयीनुसार खासगी संस्थेकडे चौकशीचे काम तर काही वेळेला सरकारी यंत्रणेकडून थर्ड पार्टी ऑडिटचे काम होते. वास्तविक शहरातील प्रकल्पावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रोजेक्ट विभाग आणि सल्लागार कंपनीची असताना याच कामासाठी महापालिकेला थर्ड पार्टीसाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागत आहेत. रुपये खर्च होऊनही बहुतांश वेळेला थर्ड पार्टीचा अहवाल सभागृहासमोर सादर होत नसल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. ‌थर्ड पार्टीच्या बोजा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या दोन वर्षांत लहान मोठ्या ११ प्रकल्पांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय झाला. पाइपलाइन योजनेपासून रस्त्यापर्यंतच्य कामाच्या चौकशीचा त्यात समावेश आहे. पाइपलाइन योजना ही शहराच्या दृष्टीने महत्त्वाची योजना. युनिटी सल्लागार कंपनीवर या योजनेवर देखभालीची जबाबदारी आहे. योजना पूर्ण होण्याचा कालावधी संपला पण तीस महिन्याच्या कालावधीत केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले. गुणवत्ता, पाइपचा दर्जा, पाइपलाइनची चाचणी यावरुन नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पाइपलाइन कामाचे ऑडिट करण्याचा निर्णय झाला. पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगकडून तपासणी करुन घेण्याचे ठरले. अद्याप त्या कामाचा अहवाल सभागृहापुढे आलेला नाही.

रस्त्यांचा अहवाल कधी?

गेल्यावर्षी पावसाळ्यात रस्ते खराब झाले. मुदतीआधी रस्ते खराब झाल्याने आठ ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित केली. कोट्यवधींची कामे पावसात वाहून गेली. रस्त्याच्या कामाची त्रयस्थ तपासणी करण्याची सूचना केल्यानंतर सांगली आणि कराड येथील इंजिनीअरिंग कॉलेजकडे तपासणीचे काम दिले. मात्र त्याचा अहवाल अद्याप सभागृहासमोर आलेला नाही. दरम्यान, सेफ सिटी प्रोजेक्टची त्रयस्थ पाहणी झाली. कळंबा तलाव सुशोभिकरणाच्या कामातील त्रुटी संदर्भात नव्याने चौकशीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

याबाबत स्थायीचे माजी सभापती, नगरसेवक मुरलीधर जाधव म्हणाले, ‘महापालिकेच्या प्रोजेक्ट विभागाने गेल्या पाच वर्षात एक तरी मोठा प्रोजेक्ट राबविल्याचे उदाहरण समोर येत नाही. प्रोजेक्ट विभाग नावापुरताच आहे, प्रोजेक्ट विभागाकडून भरीव काम दिसत नाही. रस्ते विकास प्रकल्प, थेट पाइपलाइन योजना, अमृत योजना, नगरोत्थान योजना अशा कुठल्याच प्रकल्पाशी प्रोजेक्टचा संबंध दिसला नाही. मंदिर विकास आराखडा आणि सेफ सिटी ही दोन उदाहरणे सोडली तर प्रो​जेक्ट विभागाचे ठसठशीत काम दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे, थर्ड पार्टी ऑडीटचा अहवाल नगरसेवकांना माहीत झाला पाहिजे. ’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांचे उद्या कामबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अॅडव्होकेट अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला असून, यातील काही तरतुदींना इंडियन बार कौन्सिलने विरोध दर्शवला आहे. बार कौन्सिलच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. ३१ मार्च) देशभरातील वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत. याला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने पाठिंबा दिल्याने कोल्हापुरातील न्यायालयीन कामकाज ठप्प राहणार आहे.

अॅडव्होकेट अॅक्टमधील नवीन तरदुतींनुसार वकिलांच्या काही अधिकारांना कात्री लागणार आहे. ही दुरुस्ती वकिलांवर अन्यायकारक आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी ३१ मार्चला न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने बार कौन्सिलला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे शुक्रवारी कोल्हापुरातील सर्व वकील न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नाहीत, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात बुधवारी (ता. २९) आजी-माजी शिक्षकांनी सहभाग घेतला. सुरेश राजाराम देसाई, एम. डी. देसाई, बी. पी. पाटील, कैलास पाटील, संभाजी देसाई, कार्तिक काळे, बाळासाहेब पाटील, मारुती देसाई, एकनाथ पाटील आदींनी सहभाग घेतला होता. दिवसभराच्या उपोषणाची सांगता बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीष नाईक यांच्या हस्ते झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये ‘सेफ्टी फर्स्ट’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईत डॉक्टरांना झालेली मारहाणीचा प्रकार, डॉक्टरांचे आंदोलन आणि त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अभ्यागत समितीच्या बैठकीत झालेले निर्णय याचे परिणाम छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या परिसरात दिसू लागले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सीपीआरमध्ये नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. सीपीआरचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या प्रवेशद्वारातून सुरू झालेली वाहतूक, रुग्णांच्या नातेवाईकांना चौकशीनंतरच दिला जाणार प्रवेश, सीसीटीव्ही कार्यान्वित असल्याचे ठिकठिकाणी लागलेले फलक, पार्किगचे नियोजन, अतिक्रमणे हटविण्याबाबतची सूचना, सीपीआरमध्ये प्रवेशाचे अन्य मार्ग बंद करुन प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. रुग्णांसह डॉक्टरांच्या सुविधांत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांना सुरक्षा पुरविल्या जात आहेत. सीपीआरमध्ये गेल्या आठवडाभरापासून चर्चा, बैठका घेऊन नियोजन केले गेले. सुरक्षिततेसाठी दोन क्रमांकाच्या गेटमधून डॉक्टर, प्रशासकीय कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात आहे. गेटवर दोन सुरक्षारक्षक तैनात केले असून एक क्रमाकाचे गेट फक्त रुग्णवाहिकांसाठी खुले ठेवले जाईल.

हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत दोनच नातेवाईकांना थांबण्याची परवानगी दिली जात आहे. आवारातील बेशिस्त पार्किंग सुधारण्यासाठी बुधवारी पट्टे मारून चारचाकी, दुचाकी, स्टाफ पार्किंग, पे पार्किंग यासाठीचे काम सुरू झाले. सीपीआरच्या आवारात २९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्या ठिकाणांवर फलक लावण्याचे कामही सुरू आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना २० वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. रुग्णाला सोडण्यासाठी सीपीआरमध्ये आलेली एखादी रिक्षा ५ मिनिटांत बाहेर न गेल्यास वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधून ती शोधून बाहेर काढली जाणार आहे. शिवाय, सुरक्षिततेच्या दृष्टीने एप्रिल महिन्यात ५० शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी अतिक्रमणांवर हातोडा?

सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात १४ अतिक्रमणे आहेत. या अतिक्रमणधारकांना २ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अतिक्रमणे काढताना राजकीय दबाव घेऊ नये असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. रविवारपर्यंत सीपीआरचा परिसरातील अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून न घेतल्यास प्रशासन सोमवारपासून कारवाई करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू झाल्या आहेत. बुधवारी पार्किंग आणि सीसीटीव्ही अद्ययावतीकरणाचे काम सुरू झाले. २ एप्रिलपर्यंत अतिक्रमणधारकांनी स्वतः खोकी न हटविल्यास प्रशासनाकडून ही कारवाई केली जाईल.

शिरिष निरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

सुरक्षेसाठीची उपाययोजना

- १९ नवीन, १० जुने असे २९ सीसीटीव्ही कार्यान्वित
- २० वॉकीटॉकीद्वारे अंतर्गत संवाद व्यवस्थापन
- एप्रिलमध्ये ५० शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्ती होणार
- सीपीआरचे पाठीमागील बाजूचे गेट बंद
- एका गेटमधून रुग्ण, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रवेश
- वाहन पार्किंगसाठीचे नियोजन सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडणार सिद्धी जोहरचा वेढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक पर्यटन ‌विकास योजनेतून ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर ‘लाइट अँड साऊंड शो’च्या माध्यमातून ‌छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा मिळणार आहे. सिद्धी जोहारच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांची सुटका हा ऐतिहासिक प्रसंग उलगडणार आहे. प्रकल्पासाठी सरकारकडून ४ कोटी ५० लाख मंजूर झाले आहेत. याबाबतची प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रिया सध्या सुरू आहे.

सिद्धी जोहारच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका हा इतिहासातील रोमांचक प्रसंग आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून, खडतर मार्गावरून पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास शिवरायांनी केला. त्याची माहिती नव्या पिढीला आणि पर्यटकांना व्हावी यासाठी पन्हाळगडावर लाइट अँड साऊंड शो उभाण्यात येणार आहे. त्यासाठी किल्यावरील तटबंदीचा वापर पडद्यासारखा करण्यात येईल.

दररोज रात्री अंधारात रंगीबेरंगी लाइट, साउंड इफेक्ट्सच्या साथीने चित्रफितीतून शिवरायांच्या सुटकेचा प्रसंग उलगडला जाईल. पाहणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर काही वेळासाठी का असेना, इतिहासातील तो प्रसंग उभा राहावा अशी ध्वनीचित्रफित तयार केली जात आहे. एकाचवेळी ध्वनीचित्रफित आणि लक्षवेधी लाइट्सच्या परिणामातून ‌इतिहास समोर मांडला जाईल. पन्हाळगडाचा इतिहास, महत्व पर्यटकांना कळावे हा उद्देश आहे. याचा अंतिम आराखडा जिल्हा पर्यटन विकासच्या बैठकीत मंजूर करून सरकारकडे पाठवला. निविदा काढून काम सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पन्हाळा किल्ल्यावर लाइट अँड साऊंड शोसाठी सरकारकडून निधी मंजूर झाला आहे. त्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल.

- सरिता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमन घडवणारी भूमिका आनंददायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मनोरंजनाचे माध्यम जेव्हा प्रेक्षकांच्या विचारांना दिशा देतं, तेव्हा ते केवळ मनोरंजनाचं साधन उरत नाही, तर सूज्ञ प्रेक्षकांना जाणिवेच्या पातळीवर आणणं हा कलाकृतीचा एक भाग बनतो. सध्या गर्भलिंग निदान करून स्रीभ्रूण हत्या करण्याची किड समाजाला पोखरत असताना या प्रश्नाकडे सजगपणे पाहण्याची दृष्टी देणारी भूमिका करण्याची संधी मिळाली. बदलासाठी समाजमन घडवणारी भूमिका करायला मिळणं हा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नकुशी’ या मालिकेच्या निमित्ताने हा अनुभव आमचं जगणं बनला आहे’ अशा शब्दांत अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री प्रसिद्धी ऐलवार यांनी ‘मटा कल्चर क्लब’च्या सदस्यांची मनमोकळा संवाद साधला.

‘नकुशी’ या मालिकेत रणजित ही व्यक्तिरेखा साकारणारा उपेंद्र आणि नकुशी हे पात्र वठवणारी प्रसिद्धी यांच्यासोबत ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लबतर्फे ‘मटा संवाद’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी सायंकाळी शिवाजी पार्कातील हॉटेल के ट्री येथे हा संवाद रंगला. तिसऱ्या मुलीचे नाव नकुशी ठेवण्याची कुप्रथा, मुलगी नको म्हणणारी प्रवृत्ती, एखादा संदेश देण्यामध्ये मनोरंजनाच्या माध्यमांचा वाटा आणि एकूण कलाकार आणि माणूस यामधील प्रगल्भता वाढवण्यासाठी भूमिकेचे योगदान अशा विविध विषयांवर गप्पा रंगल्या.

उपेंद्र यांच्या आजवरच्या कलाकृती, त्यातील भूमिका आणि व्यावसायिक चौकटीला छेद देणाऱ्या त्याच्या भूमिका या अनुषंगाने या गप्पा सुरू झाल्या. उपेंद्र म्हणाला, ‘जोगवापासून यलोपर्यंतचा माझा प्रवास जेव्हा मीच एक प्रेक्षक म्हणून पाहतो, तेव्हा मला कळते की मी व्यावसायिक सिनेमांमध्ये फारसा रमणारा कलाकार नाही. अर्थात मी व्यावसायिक सिनेमे केलेच नाहीत असे नाही. पण माझा पिंड तो नाही. मी अभिनेता कमी आ​णि चळवळीतील कार्यकर्ता वाटावा असा पडद्यावर दिसतो अशी प्रतिक्रीयाही येते. काही अंशी ते खरंही आहे. मला माझ्या भूमिकेतील गाभा महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी झोकून देताना माझ्यातील सगळं त्या भूमिकेत कधी झिरपतं ते कळत नाही.’

उपेंद्रचं जवळपास ९ वर्षांनी छोट्या पडद्यावर येणं हा नक्कीच उत्सुकतेचा विषय होता. तो म्हणाला, ‘टीव्हीवरील मालिकांमध्ये आलेल्या बटबटीतपणामुळे मी टीव्हीपासून लांब गेलो होतो. मालिकाही करायची आ​णि त्यात वेगळेपणाही हवा हे ‘नकुशी’तून साधलं गेलं. कलाकार म्हणून असे विषय मांडण्याची, त्याबाबत समाजामध्ये असलेल्या चुकीच्या विचारांवर ताशेरे ओढण्याची संधी मी नाकारू शकलो नाही.’

प्रसिद्धी ऐलवार तिचा अनुभव सांगताना म्हणाली, ‘मुलगी झाल्यावर संकट समजणाऱ्या काही कुटुंबांमध्ये नकुशी हे नाव ठेवलं जातं. चित्रीकरणावेळी वास्तवात नकुशी हे नाव घेऊन जगणाऱ्या काही मुली मला जेव्हा भेटल्या, तेव्हा या नावासोबत जगणं किती अवघड असतं याचा अनुभव आला. पण या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेतून दाखवण्यात आलेला आत्मविश्वास, सकारात्मकता पाहून त्यांना हवीहवीशी वाटण्याचा बदल नक्कीच सुखावून गेला.’

पडद्यावर साकारणाऱ्या भूमिकेमुळे माणूस म्हणून बदल जाणवतो का या प्रश्नावर उपेंद्र म्हणाला, ‘माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी व्य​क्तिरेखा मला खूप योगदान देतात. समाजातील प्रश्न अस्वस्थ करत असतील तर आपण संवेदनशील आहोत हे कळतं. अस्वस्थ होणं थांबेल त्यावेळी माझ्यातील कलाकार संपेल.’

प्रसिद्धी म्हणाली, मालिकेच्या निमित्ताने जेव्हा सामाजिक प्रश्नांशी जोडले जातो तेव्हा कलाकार म्हणून आपण खूप वेगळा विचार करतो याचा अनुभव घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेक्स रॅकेटमध्ये दहा पीडित मुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अल्पवयीन मुलींना वाममार्गाला लावून हायप्रोफाई सेक्स रॅकेटमध्ये ओढणाऱ्या संशयितांनी गेल्या दोन वर्षात १० अल्पवयीन मुलींना या रॅकेटमध्ये ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी संशयितांचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. रॅकेटमधील अन्य पीडित मुलींचा शोध घेण्याचे काम जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू झाले आहे.

मुंबईसह बांगलादेश, नेपाळ येथून लाख ते दीड लाख रुपयांना अल्पवयीन मुलींची खरेदी करून त्यांना मुंबईत आणून वाममार्गाला लावले जात होते. त्यानंतर कोल्हापुरात आणून मालदार ग्राहकांचा शोध घेतला जात होता. या पीडित मुलींच्या माध्यमातून दररोज २५ ते ३० हजार रुपयांची कमाई केली जात होती. संशयितांच्या कॉल डिटेल्सवरून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात दहा मुलींना यांनी वाममार्गाला लावले आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी पीडित मुलीची बुधवारी सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याचबरोबर तिचे एक्सरेही काढण्यात आले आहेत. पीडित मुलीला तिच्या आईनेच तीन वर्षांपूर्वी एक लाख रुपयांना विकल्याचे तपासात पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सामाजिक सहाय्यासाठी २ कोटींची तरतूद

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने यंदा २०१७ -१८ मध्ये अंदाजपत्रकात सामाजिक सहाय्यता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते.

देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे गेल्यावर्षी सामाजिक सहाय्यतेसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. यंदा आरोग्य, धार्मिक आणि शिक्षणविषयक खर्चासाठी भरीव वाढ करण्यात आली आहे. देवस्थान समितीतर्फे वर्षभर करण्यात येणाऱ्या खर्चांसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यंदा वैयक्तिक लाभार्थ्यांना निधी न देण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत पुढील बैठकीत नियमावली तयार करण्यात येणार आहे. बैठकीस सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, बी. एन. पाटील मुगळीकर, सुभाष वोरा, शिवाजी जाधव उपस्थित होते.

जोतिबा, अंबाबाई मंदिरासाठी १० कोटींची तरतूद

जोतिबा मंदिरराच्या विकास आराखड्याला सरकारने मंजूरी दिली आहे. २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याबरोबरच देवस्थान समितीच्यावतीने ३ कोटी खर्च करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्यात मंदिराच्या अंतर्गत विकास कामांसाठी ७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही बाबींसाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बुधवारी अंदाजपत्रक मांडण्यात आले. यंदा यामध्ये सामाजिक सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांबाबतची नियमावली पुढील बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे.

विजय पोवार, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनर खरेदीत लाखोंचा घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेकडून ३०० कंटेनर खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. कचरा साठवणुकीसाठीच्या या कंटेनरसाठी वापरलेला पत्रा हलक्या दर्जाचा आहे. बाजारभावाप्रमाणे कंटेनरची किंमत १८ हजार रुपये असताना त्याची खरेदी ३९ हजार रुपयांना केली गेली. प्रत्येक कंटेनरला २१ हजार रुपये जादा घेतल्याचा आल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

नगरसेवक शेटे म्हणाले, ‘नागपूर येथील तिरुपती एंटरप्रायझेकडून महापालिकेने ३०० कंटेनर खरेदी केले आहेत. कंटेनर कमी वजनाचे असल्याची शंका आल्यानंतर उद्यम को. ऑपरेटिव्ह सोसायटीच्या काट्यावर त्यांचे वजन केले असता प्रत्यक्षात त्याचे वजन ३४० किलो भरले. वास्तविक कंटेनर ४३० किलो वजनाचे पाहिजे होते. इतर महापालिकेत कंटेनरची गॅरंटी तीन ते पाच वर्षांची आहे. मात्र महापालिकेने एक वर्षाची गॅरंटी घेतली आहे. कार्यशाळा प्रमुख रावसाहेब चव्हाण, सहायक अभियंता सुनील पुजारी, विजयकुमार दाभाडे, वाहन निरीक्षक अमरकुमार बिसुरे यांनी कंटेनर तपासणीसाठी कारखान्याला भेट दिली. पण प्रत्यक्ष मटेरियलची तपासणी केली नाही. तिरुपती एंटरप्रायझेसच्या मालकांनी या अधिकाऱ्यांची एका बड्या हॉटेलमध्ये शाही व्यवस्था केली होती. कंपनीला महापालिकेने एक कोटी १८ लाख रुपयांचे बिलही ताबडतोब दिले. कंटेनर वर्कशॉपमध्ये जमा झाल्यानंतर व्हेरीफिकेशन आवश्यक होते. मात्र तपासणी न करता २४० कंटेनर वितरीत केले. माझ्या तक्रारीनंतर ४० कंटेनरचे वितरण झालेले नाही. कंपनी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून गैरव्यवहार घडला आहे. आयुक्तांनी याची चौकशी करावी. कंपनीकडून दिलेले बिल वसूल करावे आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी करावी.’

प्रशासनाच्या मान्यतेनंतरच अधिकाऱ्यांनी नागपूर येथे जाऊन कंटेनरची तपासणी केली. एका दिवसात कंटेनरची तपासणी पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून नागपूर येथे मुक्काम केला. निविदा प्रक्रियेतील तरतुदीनुसार कंटेनरची खरेदी, मटेरियलचा वापर झाला आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेनुसार डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्रतिनिधींकडून थर्डपार्टी ऑडिट करून घेतले आहे.

रावसाहेब चव्हाण, प्रमुख, कार्यशाळा विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारही करणार आराखड्याची छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया जरी जिल्हा प्रशासनाने चालवली असली तरी सरकारच्या पातळीवरही आराखड्याची सखोल छाननी करण्यात येणार आहे. त्यामध्ये आणखी काही त्रुटी आढळल्यास त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश सरकारकडून दिले जाऊ शकतात. त्यामुळे दुरुस्तीची ही प्रक्रिया बराच काळ चालण्याची शक्यता आहे. मात्र, गावठाणामध्ये बांधकाम करताना रेडीरेकनरच्या ३० टक्के प्रिमीअम घेण्याच्या धोरणात्मक निर्णयाबाबत सरकारच्या पातळीवर प्रयत्न करावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने प्रादेशिक आराखडा तयार होणे महत्वाची बाब आहे. आगामी जवळपास ३० वर्षाची जिल्ह्याची वाटचाल या आराखड्यातून निश्चित होणार असते. त्यामध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरुन दळणवळणाच्या साधनामध्ये आवश्यक असलेल्या नवीन रस्त्यांचे महत्व अधिक आहे. मात्र या आराखड्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या या अनेक नवीन रस्त्यांबाबतच बहुतांश तक्रारी आहेत. त्यासाठी प्रशासनाने काही अभ्यास केलेला नाही असा स्पष्ट आरोप आर्किटेक्ट असोसिएशनने केला आहे. एखादा रस्ता का आवश्यक आहे याचा अभ्यास केलेला नसल्याने, अनेक गावांमध्ये दोन राज्य मार्ग असताना आणखी बायपास काढण्यात आल्याची उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी प्रचंड खोल दऱ्या व उंच डोंगर असलेल्या भागाचा विचार न करता रस्ते सुचवले आहेत. सध्या जलस्त्रोत वाचवण्याची पराकाष्टा केली जात आहे. मात्र या आराखड्यातील रस्त्यामुळे अनेक विहीरी नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी पाणलोटमध्ये करण्यात आलेला नो डेव्हलपमेंट झोन उठवण्यात आला आहे. त्याचा जलस्त्रोतांना फटका बसणार आहे. जिल्हा पातळीवर ज्या तक्रारींचे निराकरण करता येते, त्यांची प्रक्रिया सुरु आहे. पण ज्या तक्रारी, त्रुटींबाबत सरकारच्या पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे, त्यासाठी ​जिल्हा प्रशासनाकडून शिफारस करण्यात येणार आहे.

वाढीव गावठाणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

अनेक गावठाणांजवळ वाड्यावस्त्या आहेत. आराखड्यातील नवीन नियमानुसार त्या वस्ती बेकायदेशीर ठरणार आहेत. त्या वस्ती वाढीव गावठाण म्हणून जाहीर करता येऊ शकतात. त्यासाठी आराखड्यात तरतूद करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय घेता येऊ शकतो. त्यासाठी या वाढीव गावठाणाबाबत ग्रामसभेने ठराव करुन त्याबाबतचा अर्ज ​दिल्यास जिल्हाधिकारी त्या वस्तीला वाढीव गावठाण म्हणून जाहीर करु शकतात.


काही धोरणात्मक बाबींवर प्रादेशिक नियोजन मंडळ निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे सरकारकडे केवळ शिफारस करता येऊ शकते. त्याप्रमाणे काही विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारकडे शिफारस केली आहे. सरकार त्यावर निर्णय घेऊ शकते.

​एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर माणसी २७२५ रुपये, खर्च ६८२१ रुपये

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet :@Appasaheb_MT

कोल्हापूर : महापालिका शहरवासियांना पथदिव्यांपासून आरोग्यापर्यंत आणि रस्त्यांपासून ते कचरा उठाव करण्यापर्यंतच्या सुविधा पुरविते. त्या मोबदल्यात नागरिकांकडून विविध करांची आकारणी होते. महापालिकेच्या २०१६-१७ मधील अंदाजपत्रकातून निव्वळ करांतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अडीच पट जादा रक्कम नागरिकांसाठीच्या सोयी-सुविधांवर खर्च होत असल्याचे सामोरे आले आहे. महापालिका माणसी २७२५ रुपये कर रुपात महसूल जमा करते. त्याबदल्यात प्रती माणसी खर्च ६८२१ रुपये आहे असा निष्कर्ष यातुन पुढे आला आहे.

महापालिकेच्या आस्थापना विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील रकमेचा यात समावेश आहे. कोल्हापूर शहराची २०११ मधील लोकसंख्या (५ लाख ४९ हजार २३६) गृहित धरून प्रतीमाणसी उत्पन्न आ​णि खर्चाचा ताळेबंद मांडला आहे. २०१६-१७ मधील अंदाजपत्रकाच्या आधारे महापालिकेला निव्वळ करांतून १४९ कोटी ६९ लाख ४५ हजार रुपये उत्पन्न मिळाले. या आर्थिक वर्षात महसुली आणि भांडवली खर्च ३७४ कोटी ६४ लाख ९४ हजार रुपये आहे. घरफाळा, पाणीपट्टी, नगररचना, व्यवसाय परवाना, इस्टेट विभाग, मार्केट वसुली अशी विविध प्रकारच्या करांची आकारणी केली जाते. आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाकडील एनओसीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांकडून शुल्क घेतले जाते. त्यातही उत्पन्न मिळवून देणारे विभाग म्हणून घरफाळा, पाणीपट्टी आणि नगररचना विभागावर भिस्त आहे.

तीन विभागांत खर्च जादा, उत्पन्न कमी

पाणी पुरवठा विभाग, पथदिवे आणि कचरा ​वाहतूक - विल्हेवाट या सुविधांचा संबंध प्रत्येक नागरिकाशी येतो. कोल्हापूर शहरात सुमारे २१ हजार पथदिवे आहेत. महापालिकेच्या म्हणण्यानुसार २०१५-१६ या आर्थिक वर्षात या विभागांकडून एक रुपयाही जमा झाला नाही. मात्र, विभागांवर एकूण ९ कोटी ४२ लाख ५२ हजार रुपये खर्च झाले. यात पथदिव्यांची दुरुस्ती, देखभाल, वीज बिलाचा समावेश आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाट ही जटील समस्या बनली आहे. आरोग्य विभागाला गेल्या आर्थिक वर्षात ६ कोटी ३८ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, या विभागावर ३४ कोटी ३० लाख ३९ हजार रुपये खर्च झाला. जादा खर्च हा महापालिकेच्या महसुली उत्पन्नातून करण्यात आला. पाणीपुरवठा विभागातील दुरुस्ती, देखभाल व अन्य खर्च मिळून वार्षिक ५० कोटी रुपये खर्च पडतात. मात्र या विभागांकडून मिळणारे उत्पन्न सुमारे ३९ कोटी रुपये आहे. जवळपास दहा कोटींची तूट महापालिकेला महसुली उत्पन्नातून भरून काढावी लागते.

महापालिकेचा आस्थापन खर्च सातत्याने वाढणारा असतो. लोकांच्या अपेक्षाही वाढत असतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी खर्चात वाढ अपरिहार्य ठरते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वतःचे उत्पन्नाचे मार्ग विस्तारणे आवश्यक ठरते. यामध्ये स्वतःच्या मालमत्ता, विशेषतः जमिनी, त्यावरील व्यापारी संकुले विकसित करणे हा महत्वाचा मार्ग ठरेल. लोकांनीही वाढत्या सोयीसाठी नवे सूत्र स्वीकारणे आवश्यक आहे. आपण वापर करणाऱ्यांनी सेवेची किंमत दिली पाहिजे. लोकांनी प्रत्येकवेळी होणारी करवाढ ही नकारात्मक घेऊ नये. त्याचबरोबर नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डाची, वॉर्डसभा घेऊन लोकांच्या अपेक्षा, त्याचबरोबर आवश्यक खर्च याबाबतचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. लोकांचा सहभाग अंदाजपत्रकात वाढला पाहिजे.

डॉ. विजय ककडे, अर्थतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक’च्या तिजोरीत दहा कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​जिल्हा प्रशासनातर्फे आकारण्यात येणाऱ्या करमणूक कराची‌ ८९ टक्के वसुली झाली असून १० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. या विभागाला ११ कोटी, ७५ लाख रुपयांचे उदिष्ट निश्चित करण्यात आले होते. मार्चअखेर उदिष्टपूर्तीसाठी विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.

​जिल्ह्यातील करमणुकीच्या माध्यमांद्वारे वर्षभरात करवसुली केली जाते. यामध्ये वि​विध करमणूक केंद्रांचा समावेश आहे. एकपडदा व बहुपडदा चित्रपटगृहे, फिरते चित्रपटगृह, व्हिडिओ सिनेमा, केबल, डीटीएच सेवा, ​व्हिडिओ गेम या करमणूक केंद्रांना करआकारणी केली जाते. सन २०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षासाठी या केंद्रांकडून करवसुलीसाठी एकूण ११ कोटी, ७५ लाख रूपयांचे उदिष्ट देण्यात आले होते. ​

जिल्ह्यात ३६ एकपडदा तर दोन बहुपडदा चित्रपटगृहे आहेत. या चित्रपटगृहांसाठी साडेतीन लाख रुपये करवसुलीचे उदिष्ट होते, त्यापैकी फेब्रुवारीअखेर ११ लाख रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्यातील दोन व्हिडिओ सिनेमा केंद्रांमार्फत गेल्या वर्षभरात साठ हजार रुपयांच्या उदिष्टापैकी ५० हजार रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक करमणूक कर जमा होणाऱ्या माध्यमांमध्ये केबल सेवेचा समावेश होतो. केबल केंद्रांची संख्या एक लाख ८६ हजार, ५६७ इतकी आहे. गेल्या आर्थिक वर्षात केबलकेंद्रामार्फत फेब्रुवारीअखेर ५७ लाखांपैकी ३९ लाख रुपयांची करवसुली करण्यात आली असून ही टक्केवारी ६८ टक्के आहे. जिल्ह्यातील ८२ व्हिडिओगेम्स केंद्रांकडून वसुलीपोटी ८२ लाख रुपये कर जमा झाला आहे.

केबलची वसुली कमी‌

जिल्ह्यात सर्वाधिक करमणूक केंद्र म्हणून केबल सेवाकेंद्रे आहेत. पावणेदोन लाख केबल केंद्रे असूनही या विभागाकडून जमा होणाऱ्या करवसुलीची टक्केवारी सर्वात कमी आहे. तर डीटीएच सेवेतून करमणूक कर विभागाकडे जमा होणारा कर सर्वाधिक म्हणजे ९१ टक्के इतका आहे. फिरत्या चित्रपटगृहांची संख्या जरी एक असून हा प्रकार कालबाह्य झाल्याने या केंद्राकडून वसुलीच झालेली नाही.

गेल्या आर्थिक वर्षात करमणूक कर विभागाला देण्यात आलेल्या ११ कोटी उदिष्टापैकी फेब्रुवारीअखेर ८९ टक्के वसुली करण्यात विभागाला यश आले आहे. मार्च महिन्यातही करवसुलीची मोहीम चांगल्या प्रकारे राबवण्यात आली असून मार्चअखेर उदिष्टपूर्तीचा अहवाल तयार करण्यात येईल. दरम्यान ज्या करमणूक केंद्रांमार्फत थकबाकी दिसून येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

गणेश शिंदे, जिल्हा करमणूक कर अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images