Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विठ्ठल मंदिराला मिळणार मूळरूपपुरातत्त्व विभागाच्या विज्ञान विभागाकडून कामाला सुरुवात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरीच्या विठुरायाच्या मंदिराला मूळ रूपात आणण्यासाठी पुरातत्त्व विभागाने कामाला सुरुवात केली आहे. पुरातत्त्व विभागाचा विज्ञान विभागाने या कामाला सुरुवात केली असून, हेमाडपंथी असलेल्या मंदिरातील दगडांना त्याच्या मूळ रूपात आणण्यात येणार आहे. विठुरायाचे मंदिर अकराव्या शतकात किंवा त्यापूर्वी बांधण्यात आल्याचे इतिहासात दाखले सापडतात. काही पुराणातील दाखल्यानुसार आणि शिलालेखाच्या अभ्यासामध्ये मंदिर अकराव्या शतकाच्या आसपास बांधण्यात आले. पुढील काळात या मंदिराचा विस्तार होत गेला. मात्र, मूळ मंदिर गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी इतकेच असल्याचे सांगण्यात येते. या हजार वर्षांत अनेक राज्यकर्त्यांच्या काळात मंदिरात विविध प्रकारच्या सुधारणा घडविण्यात आल्या. अलीकडच्या काळात मात्र मंदिर सजावट आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली मूळ दगडी असलेल्या मंदिराला विविध प्रकारचे रंग आणि इतर रसायनयुक्त रंग देण्यात आले. कालांतराने त्यावरच दुसरे रंग लावण्यात येत होते. यावरच अनेक वर्षे घाण आणि धुळीचे थर चढत गेले. अनेक ठिकाणी दिवे लावल्याने काजळी चढली होती, तर काही ठिकाणी तेलकट थर चढल्याने मंदिराचे मूळरूप फार पूर्वीच लुप्त होऊन गेले होते.

मंदिर समितीवर थोड्या काळासाठी आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी हा विषय तडीस लावत पुरातत्व विभागाशी संपर्क साधून मंदिराला मूळरूपात आणण्याचे काम पुरातत्व विभागाकडे सोपविले होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

असे सुरू आहे काम

मंदिर समितीच्या मागणीनुसार पुरातत्त्व विभागाने त्यांच्या विज्ञान विभागातील रसायन तज्ज्ञ अनिल पाटील यांच्याकडे काम सोपविले आहे. पाटील यांनी त्यांच्या सोबत दहा-बारा तज्ज्ञ कारागीर घेऊन मंदिरातील विठ्ठल सभामंडपापासून कामाला सुरुवात केली आहे. सभामंडपातील दगडी भिंती, दीपमाळेवरील घाण, रंग आणि इतर थर त्यांच्या जवळील विविध रसायनाचा वापर करून स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला दगडांवरील घाणीच्या थरानुसार संबंधित रसायनाचा ब्रशच्या साहाय्याने लेप देऊन नंतर साफ करायच्या हार्ड ब्रशच्या साहाय्याने त्याला घासण्यात येते. प्रत्येक दगड काळजीपूर्वक घासून त्याला त्याच्या मूळ रूपात आणण्यात येत आहे. मंदिराच्या बाहेरील भिंती, नामदेव पायरी, सभामंडप, सोळखांबी, चौखांबी यासह मंदिरातील सर्व दगडी बांधकामे या पद्धतीने साफ केली जाणार आहेत.

चार महिन्यात होणार काम

मंदिराच्या गाभाऱ्याचे काम करण्याबाबचा निर्णय अद्याप निर्णय मंदिर समितीने घेतला नाही. वास्तविक पुरातत्व विभागानेच विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी गाभाऱ्यात भिंतीला बसविलेले मार्बल फारशा आणि गाभाऱ्यातील प्रखर दिवे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या तरी मंदिरातील संपूर्ण दगडी भिंती, पुरातन दगडी नक्षीदार खांब, दगडी नक्षीकाम याला मूळ रूप देण्याचे काम केले जाणार आहे. या कामाला अंदाजे चार महिन्याचा अवधी लागणार असून, यासाठी जवळपास ३३ लाखांचा खर्च होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योग बँकेची गणेशोत्सवव्याख्यानमाला सुरू राहणार

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमाला यंदापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी, या संस्थेने पुढाकार घेतल्यामुळे बंद होणारी व्याख्यानमाला यंदाच्या ५१व्या वर्षीही अखंडपणे सुरू राहणार आहे. यंदा दाजीशास्त्री पणशीकर आणि विवेक मेहेत्रे हे मुंबईचे दोन वक्त्यांसह अन्य स्थानिक वक्ते व्याख्यानमालेत बोलणार आहेत. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयामध्ये ही व्याख्यानमाला सुरू झाली आहे.

पूर्व भागात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जायचे उद्योग-व्यवसायाची भरभराट होती. या उद्योग आणि व्यवसायिकांच्या जीवावर उद्योग बँकेची उभारणी झाली होती. त्यामुळे पूर्व भागातील श्रोत्यांना बौद्धिक मेजवानी मिळावी म्हणून गणेशोत्सवाच्या कालावधीत उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बौद्धिक व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. या व्याख्यानमालेत बोलणारे वक्ते मातब्बर असायचे. व्याख्यान ऐकायला दोन तास अगोदरच सभागृह रसिक श्रोत्यांच्या गर्दीने भरून जायचे. सुरुवातीला आलेल्या काही वक्त्यांनी दर वर्षी येण्याचा आग्रह धरला होता. इतका उत्तम प्रतिसाद रसिक होता.

कालांतराने पूर्व भागाच्या भरभराटीला ओसरती कळा आली. येथील बँका बंद पडल्या. वस्त्रोद्योगाला घरघर लागली. उद्योग बँकेलाही उतरती कळा लागली. कामगार बेकार झाले. उद्योगासाठी घेतलेल्या कर्जांची परतफेड न झाल्याने उद्योग बँके समोरच्या अडचणी वाढल्या. अनेक कामगारांनी इचलकरंजी आणि भिवंडीला स्थलांतर केले. उद्योगाच्या जोरावर भरभराटीला आलेली उद्योग बँक २००४साली बंद पडली. बँक बंद पडली असली तरी व्याख्यानमाला बंद पडू द्यायची नाही म्हणून सांस्कृतिक मंडळाने आठ लाख रुपये जमवले होते. त्यानंतर बँक दिवाळखोरीत निघाली अन् ठेवलेले आठ लाखही बुडाले होते. मात्र, तत्कालीन जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांनी ते आठ लाख रुपये मिळवून दिले. त्याच्या व्याजातून येणाऱ्या रकमेतून जयप्रकाश पल्ली यांनी ही व्याख्यानमालापुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. काही वर्षे व्याख्यानमाला सुरु राहिली. मात्र, आर्थिक अडचणी सुटू शकल्या नाहीत. मागील वर्षी फडकुले सभागृहात सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करून या वर्षापासून व्याख्यानमाला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यंदा म्हणजेच तीन सप्टेंबर रोजी उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळाने व्याख्यानमाला बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सोलापूरचे कारखानदार श्रीनिवास सामलेटी यांनी पुढाकार घेतला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीचे अध्यक्ष श्रीनिवास बिंगी यांनी मदतीचा हात दिल्यानंतर व्याख्यानमाला सुरू ठेवण्याचे ठरले. सोमवार, पाच सप्टेंबरपासून ५१व्या वर्षांतील व्याख्यानमाला अविरतपणे सुरू झाली. पूर्वी जसा श्रोता होता तशाच उस्फूर्त श्रोत्यांच्या गर्दीने पूर्व विभाग वाचनालयाचे सभागृह खचाखच भरून गेल्यामुळे रोटरी व सांस्कृतिक मंडळाचा विश्वास दुणावला आहे. सोलापूरकरांच्या दानशूरपणामुळे ५१ वर्षांचा हा सांस्कृतिक ठेवा अधिक समृद्ध होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिराला मिळणार मूळ रूप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

पंढरीच्या विठुरायाच्या मंदिराला मूळ रूपात आणण्यासाठी पुरातत्त्व विभागाने कामाला सुरुवात केली आहे. पुरातत्त्व विभागाचा विज्ञान विभागाने या कामाला सुरुवात केली असून, हेमाडपंथी असलेल्या मंदिरातील दगडांना त्याच्या मूळ रूपात आणण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत अनेक राज्यकर्त्यांच्या काळात मंदिरात विविध प्रकारच्या सुधारणा घडविण्यात आल्या. अलीकडच्या काळात मात्र मंदिर सजावट आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली मूळ दगडी असलेल्या मंदिराला विविध प्रकारचे रंग आणि इतर रसायनयुक्त रंग देण्यात आले. कालांतराने त्यावरच दुसरे रंग लावण्यात येत होते. यावरच अनेक वर्षे घाण आणि धुळीचे थर चढत गेले. अनेक ठिकाणी दिवे लावल्याने काजळी चढली होती, तर काही ठिकाणी तेलकट थर चढल्याने मंदिराचे मूळरूप फार पूर्वीच लुप्त होऊन गेले होते.

मंदिर समितीवर थोड्या काळासाठी आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी हा विषय तडीस लावत पुरातत्व विभागाशी संपर्क साधून मंदिराला मूळरूपात आणण्याचे काम पुरातत्व विभागाकडे सोपविले होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

असे सुरू आहे काम

मंदिर समितीच्या मागणीनुसार पुरातत्त्व विभागाने त्यांच्या विज्ञान विभागातील रसायन तज्ज्ञ अनिल पाटील यांच्याकडे काम सोपविले आहे. पाटील यांनी त्यांच्या सोबत दहा-बारा तज्ज्ञ कारागीर घेऊन मंदिरातील विठ्ठल सभामंडपापासून कामाला सुरुवात केली आहे. सभामंडपातील दगडी भिंती, दीपमाळेवरील घाण, रंग आणि इतर थर त्यांच्या जवळील विविध रसायनाचा वापर करून स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला दगडांवरील घाणीच्या थरानुसार संबंधित रसायनाचा ब्रशच्या साहाय्याने लेप देऊन नंतर साफ करायच्या हार्ड ब्रशच्या साहाय्याने त्याला घासण्यात येते. प्रत्येक दगड काळजीपूर्वक घासून त्याला त्याच्या मूळ रूपात आणण्यात येत आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे काम करण्याबाबचा निर्णय अद्याप निर्णय मंदिर समितीने घेतला नाही. या कामाला अंदाजे चार महिन्याचा अवधी लागणार असून, यासाठी जवळपास ३३ लाखांचा खर्च होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रत्नाप्पा कुंभार विचार मंचचे पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

येथील दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचतर्फे यंदा राज्यस्तरीय 'जीवन गौरव' पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना तर गायक रविंद्र साठे यांना 'गौरव', अभिनेते राहुल सोलापूरकर यांना 'समाजभूषण', साहित्यिक डॉ.तारा भवाळकर यांना 'साहित्यरत्न', डॉ.अनिल अवचट यांना 'भूषण' तसेच शिरोळ तालुका पातळीवरील 'क्रांती' पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते डॉ.महावीर अक्कोळे यांना देण्यात येणार आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत मिणीयार यांनी पत्रकारपरिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.

बुधवारी (ता.१४) जयसिंगपूर नगरपालिकेच्या राजर्षी शाहू खुल्या नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील सोहळ्यात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

मिणीयार म्हणाले, 'मंचच्यावतीने यापूर्वी डॉ.प्रकाश आमटे, मेघा पाटकर, डॉ.अभय बंग, बाबा आढाव, अभिनेत्री सुलोचना, डॉ.श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, सिंधुताई सपकाळ, मधुमंगेश कर्णिक, जगदीश खेबूडकर, विक्रम गोखले, हृदयनाथ मंगेशकर, नसिमा हुरजूक, विश्वास नांगरे पाटील, दिलीप प्रभावळकर, यासह कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदक बनवा स्पर्धेत मंजुषा तामणकर प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र टाइम्स' कल्चर क्लब आणि हॉटेल के ट्री यांच्यावतीने घेण्यात आलेल्या 'मोदक बनवा' स्पर्धेत मंजुषा तामणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माधवी कट्टी यांनी दि्वीतीय तर श्रद्धा पेंढुरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. संगीता सावर्डेकर, पूनम उंब्रजकर, वंदना कारेकर, ऋग्वेदिता कारेकर यांनी स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. विविध चवी आणि हऱ्हेक प्रकारच्या मोदकांनी या स्पर्धेला चांगलीच रंगत आली. आकर्षक सजावट आणि उत्तम चव असा मिलाफ घडवत स्पर्धक सुगरणींनी मोदकाची वैविध्यपूर्ण मालिकाच सादर केली. शिवाजी पार्कातील हॉटेल के ट्री येथे बुधवारी दुपारी ही स्पर्धा महिलांच्या उदंड उत्साहात झाली.

गणेशोत्सवानिमित्त घरोघरी मोदक तयार होतात. या​निमित्त गृहिणींच्या मोदक बनवण्याच्या पाककौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' कल्चर क्लबच्यावतीने मोदक बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उकडीचे किंवा तळलेले मोदक यापलीकडे विविध चवी आणि सारण वापरून मोदक बनविणाऱ्या सुगरणींना या स्पर्धेमुळे व्यासपीठ मिळाले. मोदकाची चव, पोषणमूल्ये, नावीन्यता, मांडणी आणि वापरलेले घटकपदार्थ यावर परीक्षण करण्यात आले. स्पर्धेसाठी मोदक घरातून बनवून आणून स्पर्धेच्या ठिकाणी लिखित साहित्यकृतीसह मांडणी केली.

उकडीच्या पारंपरिक मोदकामध्ये कुणी ड्रायफ्रूटचे सारण भरले होते तर कुणी बटाट्याचे सारण भरून मोदकाला खास चव दिली होती. शाही मोदकामध्ये खवा, चेरी, फ्रूटस यांच्या सारणाचा वापर करून नाविन्यपूर्ण चवीची पर्वणी दिली. क​णिकेचाही कुशलतेने वापर केलेल्या मोदकांनी पाककौशल्याचा कस लागला. मोदक आणि गणपती हे समीकरण लक्षात घेऊन सहभागी स्पर्धक महिलांनी केलेली सजावटही मांगल्यपूर्ण होती. ​दिवे, समई, जास्वदीची फुले, आरतीचे तबक यांचा कलात्मकपणे सजावटीसाठी केलेला वापर लक्ष वेधून घेत होता. गोडासोबत नमकीन आणि तिखट मोदकही स्पर्धेत मांडण्यात आले. ओल्या नारळाच्या सारणापेक्षा कोरड्या सारणाचा वापर करून काही महिलांनी नाविन्य आणले. विविध डाळींच्या पिठांपासून तयार केलेले मोदकही स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. हॉटेल के ट्रीच्या संचालिका कविता कडेकर यांनी परीक्षण केले. तर यावेळी हॉटेल के ट्रीच्या शेफ्सनी महिलांना महत्त्वपूर्ण ​टिप्सही दिल्या.

परंपरा आणि नाविन्य

गणेशोत्सवात घरोघरी हमखास केला जाणारा मोदक या स्पर्धेच्या निमित्ताने नाविन्यासोबत मांडण्यात आला. मुलांच्या आवडीचा चॉकलेट, मँगो फ्लेवर वापरून मोदक बनवण्यात आले. तर फ्रूट मोदक आणि मोदक डिलाइट या डेझर्ट डिशही स्पर्धेत मांडण्यात आल्या. तांदुळ, कणिक याऐवजी उकडलेल्या बटाट्याचा स्मॅश केलेल्या पारीपासून बनवलेल्या मोदकांनीही मजा आणली. त्यामुळे पारं​परिक मोदकाची नाविन्यपूर्ण रुपं या स्पर्धेच्यानिमित्ताने पहायला मिळाली.​

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राची संस्कृती शाहीरांनी जोपासली

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,गारगोटी

'शाहीरी ही महाराष्ट्रातील जिवंत कला असून या कलेवर लाखो लोक प्रेम करतात. राज्याच्या संस्कृतीचे दर्शन शाहीरीच्या माध्यमातून लोककलाकार करून देत असून शाहीरांनी महाराष्ट्राची संस्कृती जोपासली आहे,' असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे चेअरमन प्रा.संजय मंडलिक यांनी केले. येथे जोतिबा भक्त मंडळ व गारगोटी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शाहीरी महोत्सवाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई होते.

यावेळी आयोजित शाहीरी महोत्सवातील यशस्वी शाहीरांची अनुक्रमे नावे अशीः उत्कृष्ट शाहीर - भिकाजी दूर्गुळे, उत्कृष्ट संच शाहीर - पांडुरंग पाटील पार्टी, चक्रेश्वरवाडी (ता.राधानगरी), खास शाहीर - बंडोपंत भोसले, भोसलेवाडी (ता.शाहूवाडी).

पंच म्हणून दगडू पाटील (पेरीड), वसंत पाटील (कळे) यांनी काम पाहिले. या स्पर्धेत अशोक फडतारे (माजगांव), बळवंत चौगले (पन्हाळा), बाळासो चव्हाण (करवीर), भुजंगा संकपाळ (कसबा वाळवे), चंद्रकांत सुतार (म्हासुर्ली), शहाजी भोसले (मिरज), युवराज मयेकर (पालकरवाडी), प्रकाश सुतार (धामोड), रंगराव मालप (कानेकरवाडी), रंगराव वीर (करवीर), हिंदूराव पाटील (राधानगरी) आदींनी शाहीरी सादर केली. स्वागतगीत शाहीर विष्णू पाटील, शंकर आबिटकर, धोंडीराम कांबळे यांनी गायिले. संयोजन सर्जेराव मोरे यांनी केले.

यावेळी प्रा.शिवाजी चोरगे, धनाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी जालेंद्र बुवा, सुनील देसाई, सखाराम खोत, कवि बाळासो नरके, भगवान पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर, सरपंच रुपाली राऊत, पंचायत समिती सदस्या विजयमाला चव्हाण, कॉ.दत्ता मोरे, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, सदाशिव खेगडे, उपसरपंच अरुण शिंदे, विजय सारंग आदी उपस्थित होते. स्वागत सर्जेराव मोरे यांनी केले.आभार श्रीकांत कांबळे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहार संघटनेची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कापशी, विद्या मंदिर बामणी, मानव हायस्कूल शेंडूर या शाळेतील शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी कागल पंचायत समिती कार्यालयासमोर कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना देण्यात आले.

जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेने दुपारी बारा वाजता महामार्गापासून पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणापर्यंत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली. यावेळी गटविकास अधिकारी यांच्या अनुपस्थितीत गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना संघटनेच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित शाळेतील शालेय पोषण आहाराच्या ठेकेदार, स्वयंपाकी, मदतनिस यांना बेकायदेशीपणे आणि कोणतीही तक्रार नसताना त्यांना कामावरून कमी केले आहे. याबाबत संघटनेने शिक्षण विभागास अनेक वेळा निवेदने दिली आहेत. यापुर्वी या प्रश्नाबाबत शिक्षण विभागाकडून न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आम्ही आमचे आंदोनल स्थगित केले होते. तरीही याबाबत शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आता संघटनेने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या निदर्शनानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत.

यावेळी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ए. बी. पाटील, सिटूचे जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम, कॉ. भगवान पाटील, अमोल नाईक, महादेव वाईंगडे आदींसह ठेकेदार, स्वयंपाकी, मदतनीस आदी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक गाव एक गणपती’करणाऱ्या गावांचा सत्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज,

'सुंदर व रेखीव मूर्ती घडविणारे कलाकार उत्सवापासून वंचित राहतात. अशा कलाकारांचा यथोचित सत्कार होणे आवश्यक आहे ,'असे प्रतिपादन आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केले. नेसरी (ता.गडहिंग्लज) पोलिस ठाण्यांतर्गत आयोजित गणराया अवार्ड्स वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रांतधिकारी संगीता चौगुले व तहसीलदार राजेश चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आमदार कुपेकर यांनी पर्यावरण संवर्धन, मूर्तीदान व पारंपारिक वाद्यांचा उपयोग करून सामाजिक बांधलकी जपून समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असताना समाजातील अनिष्ट प्रथेला विरोध करणारे देखावे सकारावेत, असे आवाहन केले. प्रांतधिकारी चौगुले म्हणाल्या, 'गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक बांधलकी जपून संस्कृती जोपासणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. उत्सवाच्या माध्यमातून तरूण पिढीने समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करावेत.' तहसीलदार चव्हाण, सरपंच वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य अॅड.हेमंत कोलेकर व शिवाजी मगर यांनीही मनोगत व्यक्त केले.

शहरी विभागात अनुक्रमे वीरशैव गणेश तरूण मंडळ, नवयुग तरूण मंडळ, जयशिवराय तरूण मंडळ व जबरदस्त तरुण मंडळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस देवून गौरविण्यात आले. ग्रामीण विभागात अनुक्रमे अष्टविनायक तरुण मंडळ (अर्जुनवाडी), उत्कर्ष युवक मंडळ (बटकणगले), जयहिंद सांस्कृतिक मंडळ (मुंगुरवाडी) तर गणेश कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळ (तावरेवाडी), सार्वजनिक गणेश मंडळ (मांगनूर तर्फ सावतवाडी) व आदर्श कला, क्रीडा मंडळ (बिद्रेवाडी) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 'एक गाव एक गणपती' साजरा करणाऱ्या हडलगे, सरोळी, शिप्पूर, सांबरे, तारेवाडी, मासेवाडी, दुगूनवाडी, डोणेवाडी येथील मंडळांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कृष्णराव रेडेकर व अर्जुनवाडीचे महादेव पाटील यांनी देहदानाचा संकल्प केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सरिता पाटील, उत्तम नाईक, बाबुराव गुरबे, उपसरपंच दयानंद नाईक, अशोक पांडव, अनिता मटकर, पद्मजा देसाई आदी उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी स्वागत केले. विनायक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विकास कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळची सभा गुंडाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रात्र झाली तरी प्रश्नांची उत्तरे देऊ असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांची विरोधक आमदार सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे कोंडी झाल्याने उत्तरे न देताच सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली. जोरदार शक्तिप्रदर्शन, आरोप, घोषणाबाजी आणि वादावादीमुळे सभेत काही वेळ गोंधळ उडाला. अचानक चप्पल फेकल्याने सभेत तणाव वाढला. प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने आमदार पाटील यांनी रस्त्यावरच समांतर सभा घेतली. गोकुळमधील भ्रष्टाचाराची सहकारमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आमदार पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून गोंधळ घालणे हे पूर्वनियोजित होते, असा आरोप चेअरमन विश्वास पाटील यांनी केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५४ वी वार्षिक सभा बुधवारी ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात झाली. विरोधक आमदार सतेज पाटील यांच्या गटाने गेल्या काही महिन्यांपासून त्याची जय्यत तयारी केल्याने सत्ताधाऱ्यांनीही जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर गोकुळचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व विरोधक आमदार पाटील यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले होते. या सर्वांमुळे सभेत राडा होण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवल्याने सभास्थानाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.

सभा एक वाजता सुरू होणार असली तरी सत्ताधारी समर्थकांनी बारापूर्वीच सभेच्या ठिकाणी गर्दी केली होती. सत्ताधाऱ्यांकडून माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजीत कदम, अनिल ढवण, धीरज डोंगळे यांच्यासह महाडिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सव्वा बाराच्या सुमारास आमदार सतेज पाटील, किरण पाटील, बाबासो देवकर, भूषण पाटील, भैय्यासाहेब कुपेकर यांच्यासह सर्वजण सभास्थळी आले. 'गोकुळ बचाओ'च्या टोप्या घालून आलेल्या विरोधकांनी आमदार पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही महादेवराव महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. जोरदार घोषणाबाजीने सभेचा नूरच स्पष्ट झाला. चेअरमन पाटील यांच्या प्रास्ताविकानंतर गेल्या सभेच्या प्रोसेडिंगच्या मुद्द्यावरुन बाबासो देवकर यांनी प्रश्न वगळल्याचा आक्षेप घेतला. तर किरण पाटील यांनी बल्क कुलरचा मुद्दा उपस्थित करुन सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचे उत्तर मागितले. चेअरमन पाटील यांच्याकडून उत्तरे द्यायला टाळाटाळ होत असल्याचे पाहून आमदार पाटील यांनी तुमचा कारभार स्वच्छ असेल तर ताकदीने उत्तरे द्या. आम्ही ती ऐकायलाच आलो असल्याचे सांगितले. या दरम्यान दोन्ही बाजूचे समर्थक उभे राहून बाजू मांडण्याचा प्रयत्न करु लागल्याने गोंधळ उडाला. यावेळी चेअरमन पाटील यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. पण, आमदार पाटील यांनीही आम्हाला गोंधळ घालून सभा उधळायची नाही तर उत्तरे हवी आहेत. त्यामुळे गडबड करु नका, असेही सांगितले.

त्यानंतर देवकर व किरण पाटील बोलत असताना पुन्हा मंजूर, मंजूरचा गोंधळ सुरू झाल्याने शेवटी आमदार पाटील यांनी त्याला आक्षेप घेतला. एकमेकांवर आरोप करुन गोंधळ वाढत असल्याचे पाहून ज्येष्ठ संचालक अरुण नरके म्हणाले की, संघ टिकला पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध केला जात असेल तर तुमच्या पाया पडतो. राजकारण येथे आणू नका, असे भावनिक आवाहन करत विरोधकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरण निवळले. पण नंतर आमदार पाटील यांनी चेअरमन यांच्याकडे मुख्य प्रश्नांची विचारणा करुन उत्तराची मागणी केली. मात्र त्यावर प्रश्नांची नोंद घेतली असून संचालक मंडळात चर्चा करु, असे मोघम उत्तर दिले. यामुळे समाधान न झालेल्या विरोधकांनी उत्तरांचा आग्रह धरला. त्यामुळे झालेल्या घोषणाबाजीत संचालक उमेश आपटे यांनी आभार मानले व राष्ट्रगीत सुरू करुन सभा संपवली. त्यानंतर आमदार पाटील गटाने रस्त्यावरच समांतर सभा घेतली.

या प्रश्नांनी केली सत्ताधाऱ्यांची कोंडी

परराज्यातील दूध खरेदीमुळे सोसाव्या लागणाऱ्या २४ कोटींच्या नुकसानीचा भुर्दंड सभासदावर का?

टेंडर न काढता दिल्या जाणाऱ्या टँकरमुळे इतर संघांपेक्षा महाग पडणारे टँकर

संचालकांच्या स्कॉर्पिओवर खर्च होणारा चार कोटींचा खर्च

तोटा होत असतानाही बल्क कुलर कशाला?

कडबाकुट्टीतून उत्पादकांची लुबाडणूक

२० टक्के कर्मचारी नेमके करतात काय?

आधुनिकीकरण का नाही?

०००००००

सभेत गोंधळ घालण्याचे नियोजन विरोधकांनी केले होते. ठरलेल्या मुदतीत त्यांनी लेखी प्रश्न विचारायला हवे होते. त्या प्रश्नांची माहिती घेऊन उत्तर देता आले असते. ते पोस्टाच्या माध्यमातून प्रश्न पाठवले, असे सांगत होते. ते सांगत होते ती पोस्टाची यंत्रणा तीन वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्यामुळे ते खोटे बोलत आहेत. आयत्यावेळी त्यांनी जे प्रश्न विचारले ते चुकीचे आहेत. सभा दरवर्षीप्रमाणे सुरळीत झाली.

विश्वास पाटील, चेअरमन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२९ हजार थकीत कर्जदारांवर कारवाई

$
0
0

सुमारे १४८ कोटींचे कर्ज थकीत; सोसायट्यांवरही कारवाई

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९ हजार २५८ सभासदांचे सुमारे १४८ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. थकबाकीदारांवर सहकार कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मध्यम, दीर्घसह विविध योजनांची थकबाकीदारांवर सहकार कायद्यानुसार १०१ची कारवाई करण्यात आली नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. सोसायट्यांनी कारणांचा पाढा न वाचता थकबाकीदारांवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा सोसायट्यांवर कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी नुकताच दिला आहे.

सांगलीच्या जिल्हा बँकेकडून ऊस, द्राक्ष, डाळींबासह, उद्योग, शैक्षणिक आणि वाहनांसाठी कर्ज दिले जाते. बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाची वसुली नियमित होणे आवश्यक आहे. चालू वर्षी २९ हजार २५८ सभासद थकबाकीदार असून, १४८ कोटी ६७ लाख ८७ हजार रुपये थकित आहेत. शिराळा तालुक्यात अडीच कोटी, वाळव्यात सात कोटी, मिरज तालुक्यात साडेपंधरा कोटींहून अधिक, कवठेमहांकाळमध्ये नऊ कोटी सदतीस लाख, जत तालुक्यात बहात्तर कोटी पंचावन्न लाख, तासगावात एकोणीस कोटी बावीस लाख, खानापूरमधील चार कोटी चौदा लाख , आटपाडीत सहा कोटी अठरा लाख, पलूसमध्ये सात कोटी एक्क्यान्नव लाख आणि कडेगाव तालुक्यात तीन कोटी बहात्तर लाख रुपये थकित आहेत.

सरकारकडून यापूर्वी विकास सोसायट्यांना १०१ची कारवाई करण्याचे अधिकार दिले होते. सरकारने केलेल्या सहकार कायद्यातील ९७व्या घटना दुरुस्तीमध्ये एक लाख रुपयांच्या दाव्यासाठी अडीच हजार रुपये शुल्क आकारण्यात यावे, असा अध्यादेश काढला आहे. यापूर्वी राष्ट्रीयकृत आणि नागरी बँकांना शुल्क आकरणीचा अधिकार होता. आता सोसायट्यांनी थकबाकीदारांवर शुल्क आकारायचे आहेत. थकबाकीदारांच्या खात्यावर कारवाईची रक्कम लागू करण्यास सोसायट्या तयार नाहीत. त्यामुळे थकबाकीदारांची रक्कम वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. थकबाकीदारांवर एकशे एकची कारवाई झालीच पाहिजे, त्यांच्या नावे कारवाईची रक्कम टाकण्यात यावी, सोसायट्यांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आक्षेप घेतला जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी दिला आहे.


शेतकऱ्यांनी पैसे भरावेत अध्यक्ष दिलीप पाटील

शेतकऱ्यांनी थकित पैसे भरुन सोसायटी आणि बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले आहे. बँक शेतकऱ्यांची असून, त्यांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. थकबाकी शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही, त्यामुळे थकबाकीदारांनी थकित कर्ज भरले पाहिजेत.


गणपती संघाला नोटीस

तासगाव साखर कारखाना चालवण्यासाठी गणपती जिल्हा संघास देण्यात आलेल्या दहा कोटी रुपयांच्या थकित कर्जाच्या वसुलीसाठी गणपती कृषी औद्योगिक सहकारी संघाला जिल्हा बँकेच्या वतीने जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तीन वर्षांपासून थकबाकी असून, ती भरण्यात आलेली नसल्याने कारवाईची पाऊले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उचलली आहेत. थकीत सर्व रक्कम तत्काळ भरा अन्यथा जप्तीसह पुढील कारवार्ई केली जाईल, असा इशारा जिल्हा बँकेने दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रशासक कालावधीत गणपती संघाला तासगाव कारखाना चालवण्यासाठी कर्ज दिले होते. या पैकी काही रक्कम संबधितांनी भरली. मात्र, आठ कोटींचे कर्ज बाकी आहे. तारण देण्यात आलेली सर्व साखर विक्री करूनही कर्ज भागले नाही. आठ कोटींच्या कर्जावर दोन कोटी रुपयांचे व्याज मिळून सुमारे दहा कोटी थकीत असल्याचे समोर आले आहे. तासगावचा साखर कारखाना गणपती संघाने २००९पासून भाडेतत्वावर चालविण्यास घेतला होता. प्रारंभी भाडेतत्वावर आणि २०१२मध्ये राज्य सहकारी बँकेकडून तो कारखाना गणपती जिल्हा संघाने विकतच घेतला. खासदार संजय पाटील यांच्या गणपती संघाला १४ कोटी ५१ लाखाला कारखाना देण्यात आला होता. कारखाना ताब्यात घेतला त्याच पद्धतीने राजकारण करून नेत्यांची मध्यस्थी घालून जिल्हा बँकेवर प्रशासक असतानाही संघाने कर्ज मिळविले होते. तासगाव कारखान्यांसाठी गणपती संघाची मालमत्ता तारण घेण्यात आली होती. कर्ज गेल्या तीन वर्षांपासून थकित आहे. त्यावरील सुमारे दोन कोटी रुपयांचे व्याजही येणे बाकीतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेने कर्ज देताना तासगाव कारखाना संघाकडे असून, कारखान्याच्या माध्यमातून आपले कर्ज वसूल होऊ शकेल, असे गृहीत धरले होते. जिल्हा बँकेने या थकित १० कोटी कर्जाची नफ्यातून तरतूद करण्यात आली होती. बँकेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. परंतु, थकित दहा कोटींचा प्रश्न शिल्लक राहतो.

कर्ज वसुली न झाल्यास सिक्युरिटीटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत वसुलीचा पर्याय आहे. त्यासाठी कालावधी लागण्याची शक्यता आहे. थकित कर्जासदंर्भात गणपती संघाला वेळावेळी नोटीस देण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडून कर्ज भरण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाने पुन्हा गणपती संघाला जप्तीपूर्व नोटीस बजावली असल्याचे कार्यकारी संचालक एम. बी. रामदुर्ग यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाच्या कामाला १५ दिवसांत परवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामाला १५ दिवसांत सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. येत्या आठ दिवसांत केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिली. या प्रकरणी दोन दिवसांत पुरातत्व खात्याने प्रस्ताव सादर करावा. जनहितासाठी कुणी आडवे येत असेल तर त्याची गय केली जाणार नसल्याचा दमही गडकरी यांनी पुरातत्व खात्याला दिला.

नवीन पुलाच्या अपूर्ण कामासंदर्भात बुधवारी दिल्लीत बैठक झाली. खासदार महाडिक यांनी ४ ऑगस्टला पर्यायी पुलाचे बांधकाम रखडल्याचे निदर्शनास आणले होते. पुरात्त्व खात्याच्या जाचक नियमामुळे काम रेंगाळले आहे. सध्याचा पूल ब्रिटीशकालीन असून १३५ वर्षापेक्षा जुना आहे. त्याला पर्याय म्हणून समांतर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी हेरिटेज परिसर घोषित झाला आहे त्या ठिकाणी कोणतीही प्राचीन वास्तू नसून सध्या अतिक्रमणे आणि अस्वच्छता असल्याचे महाडिक यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यावर गडकरी यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुलाचे काम रखडण्यामागे पुरातत्व खात्याचे कोणते नियम आडवे येतात, अशी विचारणा मंत्री महेश शर्मा यांच्याकडे केली. त्याबाबत समाधानकारक खुलासा झाला नसल्याने लोकहिताचे प्रकल्प पूर्णत्वासाठी विनाकारण हयगय केली तर त्याची गय केली जाणार नाही, असा दम गडकरी यांनी पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना दिला. जुन्या पुलावरुन दुर्देवी घटना घडल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय पुरातत्व मंत्री महेश शर्मा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री सचिन परब, पुरात्व खात्याचे महासंचालक नवनीत सोहनी, सचिव ए. के. तिवारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बामणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जनादिवशी ४५ इमारती खाली करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरजकर तिकटी ते पंचगंगा नदीदरम्यानच्या मिरवणूक मार्गावर ४५ इमारती धोकादायक आहेत. यामुळे या इमारतींचा मिरवणुकीलाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विसर्जन मिरवणुकीदिवशी इमारतीत थांबू नये, अशा नोटिसा महापालिका प्रशासनाने या मालकांना पाठवल्या आहेत. ऐन सणात काढलेल्या या नोटिसामुळे मालकांत अस्वस्थता आहे.

कोल्हापूर शहरात अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत. या इमारती उतरून घेण्याच्या नोटिसा महापालिकेने अनेकदा पाठवल्या. पण, मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातही काही धोकादायक इमारती आहेत. चार वर्षांपूर्वी डॉल्बीच्या दणक्याने मिरवणूक मार्गावरील एका इमारतीची गॅलरी कोसळून संदीप टिळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरवणूक मार्गाचे सर्वेक्षण केले. त्यात ४५ इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारती कोणत्याही क्षणी पडू शकतात. डॉल्बीमुळे तर त्या पडण्याचा धोका जास्त आहे. यामुळे मिरवणुकीदरम्यान या इमारतीत कुणीही वास्तव्य करू नये, अशा नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

ज्या धोकादायक इमारती आहेत, त्यामध्ये रहिवासीबरोबरच दुकानगाळेही आहेत. या इमारतीत अजूनही मालक किंवा कूळ राहत आहेत. कूळ आणि मालकांच्या वादात काही इमारती धोकादायक असूनही त्या उतरून घेतल्या नाहीत. मिरवणुकीदिवशी हा धोका वाढू शकतो. यामुळे या इमारती तातडीने उतरून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

इमारतींभोवती कंपाउंडसारखी यंत्रणा

मिरवणुकीच्या काळात या इमारतीच्या आसपास कुणीही उभे राहू नये यासाठी इमारतीभोवती कंपाउंडसारखी व्यवस्था करण्याची सूचना ‌देण्यात आली आहे. मिरवणूक काळात कोणत्याही परिस्थितीत या सर्व इमारतीत कुणीही वास्तव्य करू नये, यासाठी महापालिका पुन्हा पाहणी करणार आहे. गणेश आगमनावेळी डॉल्बीचा आवाज घुमला नसला तरी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजण्याची शक्यता गृहित धरून महापालिकेने ही व्यवस्था केली आहे.

मिरवणूक मार्गावरील सर्व इमारतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. त्यामध्ये ज्या इमारती धोकादायक आहेत. त्या तातडीने न उतरवल्यास मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

एस. के. माने, उपशहरअभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी संस्कृतीशी जुळली नाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या सहा ते सात पिढ्यांपासून कोल्हापुरात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय समाजातही दरवर्षी गणेशोत्सवात मोरयाचा गजर अगदी उत्साहात होतो. कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात उत्तर भारतीय समाजाची जवळपास २५ हजार कुटुंबे आहेत. गणेशोत्सवाची चाहूल लागली की बाप्पांची मूर्ती ठरवण्यापासून ते अगदी खीर-मोदकाचा नैवेद्य करण्यापर्यंतची सगळी धमाल आणि लगबग त्यांच्याही घरात सुरू असते. ज्या प्रांताने, शहराने आम्हाला सामावून घेतले, त्या मराठी संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी गणेशोत्सवासारखे दुसरे माध्यम नाही, अशा शब्दांत उत्तर भारतीय समाजबांधव आवर्जून भावना व्यक्त करतात.

उत्तर भारतातून कोल्हापुरात व्यवसायाच्या निमित्ताने जवळपास साठहून अधिक वर्षांपासून समाजातील अनेक कुटुंबे स्थायिक आहेत. समाजाच्या उत्सवासोबत महाराष्ट्रीय संस्कृतीतील सणही उत्तर भारतीय समाजातील बांधव अगदी उत्साहाने साजरे करतात. विशेषत: गणेशोत्सवामध्ये अगदी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापनाही अनेकांच्या घरात केली जाते. गणपतीचे आगमन म्हणजे खपली गव्हाची खीर आणि उकडीचे मोदक यांचा नैवेद्य महत्त्वाचा. उत्तर भारतीय समाजातील महिलांनी हे पदार्थ कोल्हापुरातील मैत्रिणींकडून शिकून घेतल्याचे संजना सिंह यांनी सांगितले. उत्तर भारतीय समाजाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्या घरी गेल्या १५ वर्षांपासून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यासाठी घरातील सर्वजण सजावट करतात. कुंभारगल्लीत जाऊन मूर्तीची ऑर्डर दिली जाते. रोज पाच दिवस सकाळी व सायंकाळी बाप्पांच्या आरतीची वेळ ठरवली जाते आणि घरातील प्रत्येकाने आरतीला उपस्थित राहण्याचा नियमही पाळला जातो.

उत्तर भारतीय समाजातील हितेश सिंह हा जन्मापासून कोल्हापुरातच राहतो. शाळा, कॉलेजच्या दिवसातच गणेशोत्सवातील वातावरण त्याला आवडायला लागले. सध्या त्याच्या घरीही गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपती घरी असेपर्यंत जे चैतन्यपूर्ण वातावरण असते ते आवडत असल्याचे हितेश सांगतो.

कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात स्थायिक असलेला उत्तर भारतीय समाज बहुतांश व्यापार, व्यवसाय करतो. यामध्येही फर्निचर बनवणे, लाकूड कारागिरी, पेंटिंग, इंटिरियर डेकोरेशन, ट्रॅव्हल मॅनजमेंट या व्यवसायात मोठ्या संख्येने या समाजातील लोक कार्यरत आहेत. तर महिला मंडळ, भिशी ग्रुप या माध्यमातून संघटित आहेत. गणेशोत्सवाच्या नि​मित्ताने उत्तर भारतीय महिलांमार्फत विविध स्पर्धा घेण्यात येतात. अगदी नऊवारी साडी नेसण्यापासून ते नैवेद्य बनविण्यापर्यंत. त्यामुळे कोल्हापुरातील गणेशोत्सवासोबत उत्तर भारतीय समाज अगदी समरस झाला आहे.

मिरवणूककाळातही मदतीचा हात

गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत उत्तर भारतीय समाजाच्यावतीने महाप्रसादवाटप केले जाते. तसेच विधायक उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना समाजाच्यावतीने मदत केली जाते. उत्तर भारतीय समाजातील लोकांचा व्यवसाय हा बहुतांश कलेशी संबंधित आहे. त्यामुळे उत्सवकाळात देखावे उभारण्यासाठी या समाजातील कुशल कारा​गीर आपला हातभार लावत असतात. त्यामुळे शहरातील अनेक देखाव्यांच्या पडद्यामागे उत्तर भारतीय कलाकारांचा स्पर्श झालेला असतो. यानिमित्तानेही कोल्हापूरचा गणेशोत्सव आणि उत्तर भारतीय समाजाचा सहभाग हे समीकरण जुळून येते.

'गेल्या ५० वर्षांपासून उत्तर भारतीय समाज कोल्हापुरात वास्तव्यास असल्यामुळे आता आम्ही कोल्हापूरकर असल्यासारखेच वाटते. मी १५ वर्षांपूर्वी कोल्हापुरात स्वत:चे घर बांधले तेव्हाच गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. आता ज्याप्रमाणे मऱ्हाठमोळ्या घरात गणेशोत्सव साजरा होतो, तसाच आमच्याही घरी साग्रसं​गीत उत्सव होतो. हा आमचाच सण आहे असे वाटते.'

संजय सिंह, अध्यक्ष, उत्तर भारतीय समाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका अधिकारी धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कचरा उठाव करणारी आरसी वाहने बंद असल्यामुळे रस्त्याकडेच्या कंटेनरमध्ये कचरा साचून दुर्गंधी प​सरत आहे. आगामी दोन दिवसांत कचरा उठाव करण्यासाठी आरसी वाहने उपलब्ध झाली नाहीत, तर नगरसेवक आपापल्या प्रभागातील कचरा आणून महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टाकतील असा इशारा महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दिला. गुरुवारी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी वर्कशॉपची झाडाझडती घेतली. किरकोळ दुरुस्तीअभावी वाहने बंद आहेत, स्पेअरपार्ट दुरूस्तीसाठी हजार-पाचशे रुपये मंजूर होणार नसतील तर अधिकारी कार्यालयात बसून काय करतात, अशी विचारणाही नगरसेवकांनी केली. यावेळी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी आरसी वाहने दुरूस्तीसाठी उपाय करू असे सांगितले.

कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे नगरसेवकांनी गुरूवारी दुपारी वर्कशॉप गाठले. महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, अरूण निल्ले, सुयोग मगदूम, आशपाक आजरेकर यांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्यासह वर्कशॉपमधील वाहनांची पाहणी केली. शहरात दररोज २०० टन कचरा निर्माण होतो. कचरा उचलणाऱ्या दहापैकी चार आरसी वाहने सुरू आहेत. सहा गाड्या नादुरूस्त असल्याने कचरा उठावावर मर्यादा येत असल्याचे वर्कशॉप विभागप्रमुख रावसाहेब चव्हाण यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी आरसी वाहनाच्या दुरूस्तीसाठी ८०० रुपये दिले. नगरसेवक स्वत:च्या खिशातून वाहन दुरूस्तीसाठी पैसे देत असतील, तर प्रशासन काय करते? असा सवाल नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांना विचारला.

नगरसेवकांनी खराब आरसीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वर्कशॉप विभागप्रमुख चव्हाण यांच्या कामाला आक्षेप घेतला. चव्हाण यांनी, ' वर्कशॉपचा कारभार घेऊन दोन दिवस झाले आहेत. विभागाची माहिती घेत आहे' असे दिले. अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांनी 'आयुक्तांसोबत चर्चा करून अधिकाधिक वाहने कचरा उठावसाठी उपलब्ध केली जातील, अशी ग्वाही दिली.


शहरातील कचरा उठाव गतीने व्हायला हवा. दोन दिवसांत आरसी वाहने दुरूस्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवसांत कचरा उठाव झाला नाही तर नगरसेवक महापालिका चौकात आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा आणून टाकतील. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे डोळेझाक करू नये.

अश्विनी रामाणे, महापौर


वर्कशॉप विभागाचा कार्यभार उपायुक्तांकडे सोपवा. विभागप्रमुख रावसाहेब चव्हाण यांच्या कामाविषयीचा अनुभव चांगला नाही. त्यांच्यावर वर्कशॉपमधील कामाची जबाबदारी निश्चित करा.

शारंगधर देशमुख, गटनेते, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चोरीप्रकरणी एकास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , जयसिंगपूर

फिनोलेक्स पाईपसह चोरीस गेलेला ट्रक जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी अनिल गुणवंत मस्के (वय २८, रा.आरणी, जि.उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, म्हैसूर येथील मंगाराम रत्नाराम यांच्या मालकीचे दोन ट्रक आहेत. एका ट्रकवर राजाभाऊ पांडूरंग नरफळ तर दुसऱ्या ट्रकवर अनिल मस्के हे चालक म्हणून काम करतात. २३ ऑगस्ट रोजी नरफळ हे फिनोलक्स पाईप घेऊन जात होते. जयसिंगपूरजवळ चिपरी हद्दीत सुमंगल हॉटेलजवळ आरसीबुक देण्याच्या कारणावरून अनिल मस्केसह अन्य तिघा साथीदारांनी चालक नरफळ याला बेदम मारहाण केली. यानंतर पाईपसह ट्रक लंपास केला होता. यानंतर मालक मंगाराम रत्नाराम यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली होती.

दरम्यान, पोलिसांनी मस्के याला ताब्यात घेवून त्याच्याकडून ५ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या फिनोलेक्स पाईप तसेच ट्रक जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, सहायक फौजदार बजरंग माने, हवालदार सुनील पाटील, संदीप हेगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर ‘शाहू’ ची निवडणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

सहकारातील आदर्श समजल्या जाणाऱ्या येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर माघारीच्या शेवटच्या दिवशी लागल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी निवडणुकीसाठी बिनशर्त पाठींबा दिला असताना पिंपळगाव खुर्द येथील सदाशिव तेलवेकर या एकट्या उमेदवारामुळे निवडणूक लागली. ऊसउत्पादक गटातून सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात तेलवेकर यांचा एकमेव अर्ज राहिल्याने चार बिनविरोध सोडले तर एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. त्यांना १७ हजार सभासद मतदान करतील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयसिंह देशमुख काम पाहत आहेत.

शाहू कारखान्याची निवडणूक बिनविरोधच होणार अशी सर्वांनाच खात्री होती. दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर २७८ अर्ज येवूनही एक अर्ज वगळता ऊर्वरित सर्वांनी बिनर्शत माघार घेतली. त्यामुळे सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे, रूक्मिणी पाटील (दिंडर्नेली), युवराज पाटील (मौजे सांगाव), तुकाराम कांबळे (व्हन्नूर) हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. शेवटच्या क्षणापर्यंत तेलवेकर यांच्याशी अर्ज माघार घेण्यासाठी चर्चा व बैठका झाल्या. परंतु जिल्ह्यातील कुठलाही नेता आथवा संघटनेशी संबध नसलेल्या तेलवेकर यांनी आपल्या हट्टापायी अर्ज कायम ठेवला.

निवडणुकीतील उमेदवार असेः समरजितसिंह घाटगे(कागल), वीरकुमार पाटील (कोगनोळी),अमरसिंह घोरपडे(माद्याळ), यशवंत माने (कागल), धनंजय पाटील (केनवडे), मारूती पाटील (पिंपळगाव बुद्रुक), पांडूरंग चौगले (म्हकवे), बाबूराव पाटील (गोकुळ शिरगाव), भूपाल पाटील (कोगील बुद्रुक), मारूती निगवे (नंदगाव), सचिन मगदूम (पिंपळगाव बुद्रुक).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फौजदार धक्काबुक्कीप्रकरणी चौघांना शिक्षा

$
0
0

इचलकरंजी

पट्टणकोडोली येथील बिरदेव यात्रेवेळी पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश मस्के यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याप्रकरणी तळंदगे (ता. हातकणंगले) येथील युवराज तानाजी वाघमोडे, संतोष रामचंद्र शिंगाडे, महावीर महादेव पालखे आणि मलगोंडा पुंडलिक मगदूम या चौघांना येथील न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिन्याची सक्तमजुरी आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सन २०१२ मध्ये पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील विठ्ठल बिरदेव यात्रेवेळी पोलिस उपनिरीक्षक मस्के हे बंदोबस्तासाठी होते. त्याचदरम्यान आरोपी युवराज वाघमोडे, संतोष शिंगाडे, महावीर पालखे, मलगोंडा मगदूम हे चौघे भरधाव वेगाने मोटार चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मस्के यांनी या चौघांना रस्त्यावर गर्दी असल्याने मोटारसायकल सावकाश चालवण्याचा सल्ला दिला. मात्र त्या चौघांनी मस्के यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक आराखडा २१ला प्रसिद्ध होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्याचा वीस वर्षांचा विकास नजरेसमोर ठेऊन तयार केलेला प्रादेशिक आराखड्याचे प्रारूप २१ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल', अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात राज्य सरकारने प्राधिकरणाचा प्रस्ताव दिला असला तरी प्रादेशिक आराखड्याचा प्राधिकरण अथवा हद्दवाढीला कसलाही अडथळा होणार नाही' असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

'प्रादेशिक आराखड्याचा प्रस्ताव बोर्ड मिटींगमध्ये सादर केला जाणार आहे' असे सांगून विभागीय आयुक्त चोक्कलिंगम म्हणाले, '२१ सप्टेंबरला प्रारुप आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आराखड्यावरील हरकती अथवा सूचना स्वीकारण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात येईल. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आराखडा सरकारला सादर होईल. मार्च २०१७ मध्ये कोल्हापूर शहरातील ९० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. पंचगंगा प्रदूषणाबाबत महानगरपालिकेकडून सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत. ७० एमएलडीचा एसटीपी प्लँट सुरू झाला असून शहरासाठी १२० कोटी रुपयांची अमृत योजना मंजूर झाली आहे. १२ नाल्यांचे पाणी अडविण्यासंदर्भात नगरोत्थान योजनेसाठी निधी मागितला आहे. प्रथम भूसंपादन करा, मग निधी देतो असे सरकारने स्पष्ट केले आहे. बापट कॅम्पमधील एसटीपी प्लँटसाठीची जमीन संपादित झाली आहे. लाइन बाजार येथील काम ३० टक्के झाले आहे. पंपिंग स्टेशनसाठी जमीन संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. पाच नाल्यांतील पाणी बावड्यातील एसटीपी प्लँटमध्ये नेण्यात येईल. एसटीपी प्लँटमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर कसा करावयाचा याबद्दल चर्चा सुरू आहे. १० टक्के बीओपीचे प्रमाण असलेले पाणी थेट नदीत सोडता येते. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी गरज आहे. त्यासाठी १८ कोटी रुपयांची गरज असून त्याबाबत चर्चा सुरू आहे.'

विभागीय आयुक्त चोक्कलिंगम म्हणाले, 'मार्च २०१७ अखेर शहरातील ९० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. उद्योगांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी सोडले पाहिजे. प्रक्रिया न करता थेट नदीत पाणी सोडणाऱ्या पाच उद्योग बंद करावेत, असा प्रस्ताव प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाने मंडळाच्या सचिवांकडे पाठवला आहे. पंचगंगा नदीकाठच्या १२८ गावांच्या प्रदूषणाबाबत 'निरी' काम करीत आहे. कमी खर्चाचे एसटीपी प्लँट तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे.'

मेंटनन्ससाठी मैदाने, कोर्ट संघटनांना देणार

पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर विभागीय क्रीडा संकुलातील मैदाने, कोर्ट जिल्ह्यातील क्रीडा संघटनांना मेंटनन्ससाठी देण्याचा विचार सुरू आहे. या संघटनांनी रोज मैदाने वापरावीत. मैदान वापरणाऱ्यांकडून शुल्क आकारावे असा प्रस्ताव आहे. मैदानाचे भाडे किती असावे याबाबत चर्चा सुरू आहे. जलतरण तलावात नागरी वस्तीतून मिसळणारे सांडपाणी अन्य ठिकाणी वळविण्यात येणार आहे.'

तीर्थक्षेत्र आराखडा महिनाअखेर सरकारकडे

'करवीरनिवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा अंतिम टप्प्यात आला असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे' असे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले. ते म्हणाले, '७० कोटींचा अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. खर्चाची अंदाजपत्रकीय पडताळणी करण्यात येत आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आराखडा राज्य सरकारला सादर होईल. आक्षेप असले तरी दर्शन मंडप होणारच. दर्शन मंडपाचे स्थळ कदाचित बदलले जाईल. काही तज्ज्ञांनी वाऱ्यांची दिशा आणि वास्तूच्या सौंदर्याला अडथळा येण्याची शक्यता वर्तवली आहे. याबाबत निर्णय घेऊ. याशिवाय व्हीनस टॉकीज आणि बिंदू चौक येथे वाहनतळ उभारले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू’ ची सिस्टीमकुणापुढेही झुकणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'एका व्यक्तीच्या हट्टापायी बिनशर्त माघार घेतलेल्या कोणत्याही इच्छुकावर मी अन्याय करणार नाही. दिवंगत विक्रमसिंह घाटगेंनी घालून दिलेली सिस्टिम कुणापुढेही गुडघे टेकणार नाही. लोकांच्या बदलेल्या प्रवृत्ती आणि आलेल्या अनुभवांचा विचार करता आता निवडणुकांची तयारी ठेवा. स्वर्गीय विक्रमसिंह राजेंनी दिलेली ही संधीच आहे. यानिमित्ताने आपल्या गटाची ताकद आणि सिध्दांत जिल्ह्याला दाखवून देवू,' असा इशारा 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

शाहू कारखान्याची निवडणूक एका जागेसाठी लागली असल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. त्या पार्श्वभूमीवर येथील सात मोटेच्या विहीरीनजिक आयोजित स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळ पाटील होते.

घाटगे म्हणाले, 'वास्तविक 'शाहू' मध्ये विक्रमसिंह राजेंच्यानंतर अशा प्रकारचे राजकारण शिरायला नको होते. त्यादृटीने जिल्ह्यातील सर्वांचा बिनविरोधसाठी न विचारता पाठींबा मिळाला. एका जागेसाठी निवडणूक लागली म्हणून वाईट वाटून घेवू नका. राजेंचा गटही कोणत्याही निवडणुकीला ताकदीने ,एकजुटीने सामोरा जावू शकतो असा संदेश जिल्ह्याला देवू. भविष्यातील साखर व्यवसायापुढील आव्हाने गृहीत धरून आपला पुढील दहा वर्षाचा प्लॅन तयार आहे. बायोप्रोडक्टचेही नियोजन आहे.'

यावेळी नवोदिता घाटगे, विरेंद्र घाटगे, उपाध्यक्ष एस.के.मगदूम, वीरकुमार पाटील, डी.एस.पाटील, अमरसिंह घोरपडे,बॉबी माने,युवराज पाटील,मारुती पाटील,पांडूरंग चौगले,बाबूराव पाटील,भूपाल पाटील,मारूती निगवे,सचिन मगदूम,सचिन मगदूम,रुक्मिणी पाटील,तुकाराम कांबळे ,बेबीताई करडे यांमयासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत युवराज पाटील यांनी केले. आभार संजय धामन्ना यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइनमध्ये कोल्हापूर पिछाडीवर

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

कोल्हापूर: ऑनलाइन जन्म दाखल्यासाठी माहिती अपलोड करण्यामध्ये कोल्हापूर महापालिका केवळ तीन टक्क्यावर आहे. याउलट कागल, मुरगूड, मलकापूर, पन्हाळा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी १ जानेवारी, २०१६ नंतर जन्मलेल्या सर्व बाळांची नोंदणीची माहिती अपलोड केली आहे. मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेतून दाखले देण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीवर आहे. परिणामी महापालिकेने या अशा नोंदी करण्याबाबत फारसे गांभीर्य दाखविलेले नाही.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपा‌लिका, नगरपरिषदांनी जन्माची माहिती अपलोड करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र, कोल्हापूर महा‌पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेचे नागरी सुविधा केंद्रकाडून जन्म, मृत्यू दाखले व इतर अर्ज दिले जातात. यासाठी पैसे आकारले जातात. हेच कारण महापालिका जन्म दाखल्यांच्या नोंदी न करण्याचे आहे. जन्म मृत्यू दाखले देण्यासाठी महापालिका प्रशासनाने खासगी कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे यात झालेल्या करारामुळे या नोंदीबाबत महापालिका प्रशासन फारसे आग्रही नाही. मात्र, या अनास्थेचा फटका नागरिकांना बसत आहे. एका ‌‌क्लिकवर कोठूनही, कधीही दाखले मिळणे, दाखल्यासाठी महापालिकेत येण्याची गरज न भासणे, इंटरनेटची सुविधा असल्यास घरबसल्याही दाखला पाहता येणे, प्रिंन्टर, इंटरनेटची स‌ुविधा असलेल्या ठिकाणी दाखला मिळणे या सुविधांपासून माहिती अपलोड न झालेल्या बालकांच्या पालकांना वंचित राहावे लागणार आहे.

या प्रक्रियेत पहिल्या टप्यात हॉस्पिटलकडून आलेली माहिती या वेबसाइटवर अपलोड करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनावर आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका येथे 'जन्म, मृत्यू निंबधक' अधिकारी कार्यरत आहे. ‌केंद्रीय जन्म, मृत्यू नोंदणी अधिनियमनुसार जन्म, मृत्यू घटना ज्या ठिकाणी घडतात त्या कार्यक्षेत्रातील निंबधकाकडे नोंदणी बंधनकारक आहे. नोंदणीची माहिती त्याच दिवशी या वेबसाइटवर करणे आवश्यक आहे.

दुसऱ्या टप्यात जन्म दाखल्यासाठी माहिती अपलोड करण्याची सुविधा हॉस्पिटलला देण्यात येणार आहे. हॉस्पिटलमधून माहिती वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर पडताळणी निंबधक करतील. त्यानंतर इंटरनेटवरून दाखला मिळेल. एक जानेवारीनंतर जन्मलेल्या बाळाचे हस्तलिखितातील दाखले ग्राह्य मानण्यात येणार नाही. त्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेना जन्म नोंद माहिती या वेबसाइटवर अपलोड करणे अपरिहार्य आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेनी ऑलनाइन माहिती अपलोड होण्यासाठी सरकारच्या आरोग्य प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे.


सर्वात कमी गडहिंग्लजला

सरकारच्या नव्या आदेशानुसार १ जानेवारीनंतर जन्मलेल्या बाळांची ऑनलाईन माहिती अपलोडची टक्केवारी अशी कोल्हापूर महापालिका- ३.४१

मलकापूर नगरपालिका- १००

पन्हाळा तालुका व नगरपालिका - १००

शाहूवाडी ता‌लुका-१५. २७

हातकणंगले तालुका-४५.१७,

वडगाव व इचलकरंजी-९६.८२

शिरोळ-१४.५

कुरूंदवाड आणि जयसिंगपूर नगरपालिका- ४.९४

करवीर-४५.५४

गगनबावडा-१.५०

राधानगरी-६७.५५

कागल-७६.३१

कागल व मुरगूड नगरपालिका-गगनबावडा-१.५०

राधानगरी-६७.५५, कागल-७६.३१

कागल व मुरगूड नगरपालिका-१००

भुदरगड -६.७०

आजरा-६०.१४

गडहिंग्लज-०‍.१४

गडहिंग्लज नगरपालिका-१६.०५

चंदगड-६७.३२.

कोणत्या वेबसाईटवर

अचूक आणि एका क्लिकवर जन्म दाखला मिळावा, यासाठी राज्यात जन्म, मृत्यू च्या घटनेची नोंद

www.crsorgi.gov.in या वेबसाईटवर नोंद करणे बंधनकारक केले आहे. जन्म, मृत्यू दाखला ऑनलाइन पाहण्यासाठी, प्रिंट घेण्यासाठी ही वेबसाइट सर्वासाठी खुली आहे.

‌भविष्यात हस्तलिखित जन्म दाखले कोठेही चालणार नाहीत. यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक बाळाची जन्म नोंदणी वेबसाइटवर करावी, यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images